मकरसंक्रांती 15 जानेवारी 2020

सण व उत्सव Posted at 2020-01-12 19:53:06

मकरसंक्रांति ॥ श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः ॥ स जयति सिंधुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम् । वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानाम् ॥ सुर्य ज्याप्रमाणें सर्व अंधः काराचा नाश करतो, त्या प्रमाणें ज्याच्या चरण कमलांचे स्मरण सर्व विघ्नांचा नाश करिते, तो सिन्धुरवदन गजानन उत्कर्ष पावत आहे . तिलस्नायी तिलोद्वर्ती तिलहोमी तिलोदकी ।तिलभुक् तिलदाताच च षट्तिलाः पापनाशकाः॥ ( तिलमिश्रीत पाण्याने स्नान , तिलाचे उद्वर्तन उटणे अंगाला लावणे , तिलांचा होम तिलमिश्रीत पाणी पिणें , तिल भक्षण करणे आणि तिलाचे दान करणें अशा सहा प्रकारें तिळाचा उपयोग केला असता सर्व पातक नाहीसें होतें ॥ ) ह्या पुण्यकालात शंकराचे देवळात तिळाच्या तेलाचे दिवे लावावेत.. तीळ, तांदुळ यांनी शंकराची पूजा करावी , शंकराला अभिषेक करावा , सुर्यनारायणाला दुधाचा अभिषेक करावा . संक्रांतीचा पुण्यकाल - मकर संक्रांति : १५ जानेवारी बुधवार रोजी दरवर्षी जानेवारी "१४" किंवा "१५" तारखेस सूर्याचा "निरयन मकर" राशीत प्रवेश असतो. मकरेत प्रवेश झाल्यावर, त्याच्या "पुण्य / पर्वकाला"चे दिवशी, "मकर संक्रांति" सण साजरा केला जातो. ह्या दिवशी तिळगूळ दान करण्याचे व खाण्याचे महत्व आहे. मकर संक्राति व इंग्रजी दिनांक : - मकर संक्रांति ही सूर्याने "निरयन मकर" राशीत प्रवेश करण्यावर अवलंबून आहे. ती "१४ जानेवारी"ला येते असे मात्र मुळीच नाही. सूर्याने एकदा "निरयन मकर" राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो "मकर" राशीत प्रवेश करेपर्यंत ३६५ दिवस, ०६ तास, ०९ मिनिटे, ०९.५४ सेकंद एवढा कालावधी लागतो. सांप्रत "सूक्ष्म वेधांनी प्रत्यक्ष अनुभवास" ("दृक् प्रत्यय तुल्य") येणारा हा कालावधी आहे. हीच "दृक् प्रत्यय तुल्य गणित (सूक्ष्म गणित) पध्दती" दाते पंचांगकर्ते, सोलापूर, ह्यांनी शके १८७२ (इ.स. १९५०-५१ पासून स्वीकारली आहे. म्हणूनच "दाते पंचांगा'तील ग्रह गणित अचूक असते." "प्लुत" ("लीप") वर्षातील फेब्रुवारीच्या २९ दिवसांमुळेच, ही मकर संक्रांति अनेक वर्षे एका तारखेला येते. इसवी सन १८९९ मध्ये निरयन मकर संक्रांति "१३" जानेवारीला आली होती. *इ. स. १९७२ पर्यंत संक्रांति "१४" जानेवारीला येत होती. इ. स. १९७२ पासून २०८५ पर्यंत संक्रांति कधी "१४" जानेवारीला तर कधी "१५" जानेवारीला असणार आहे. इ. स. २०८५ पासून २०९९ पर्यंत संक्रांति "१५" जानेवारीला असेल. त्यानंतर इ. स. २१०० पासून संक्राति "१६" जानेवारीला येईल. ह्या वेळेस (१) वार : "मंगळवार" (२) चंद्र नक्षत्र : "पूर्वाफाल्गुनी" (३) करण : "तैतिल". मकर संक्रमणाचा "पुण्य / पर्वकाल" बुधवार दि. १५ जानेवारी "सूर्योदया"पासून "सूर्यास्ता"पर्यंत आहे. म्हणून ह्याच पुण्य / पर्वकालाचे दिवशी "मकर संक्राति" सण साजरा करावा. "मुंबईचा पुण्य / पर्वकाल" : बुधवारी - ०७-१६ ते १८-२० प. "तैतिल" करणावर संक्रांत होत असल्याने युक्त असलेले "वाहनादि प्रकार" पुढील प्रमाणे : - (१) वाहन - गर्दभ (गाढव). (२) उपवाहन - मेंढा. (३) वस्त्र - पांडुर (पांढरे). (४) आयुध - दंड. (५) भक्षण - पक्वान्न. (६) तिलक - गोपीचंदन. (७) जाति - पक्षी. (८) पुष्प - केवडा. (९) वयसा - युवा (तरुणी). (१०) अवस्था - सुप्ता (निजलेली). (११) भूषण - हिरा. वार "मंगळवार" असल्याने (अ) वारनांव - महोदरी. (ब) चंद्रनक्षत्र "पूर्वाफाल्गुनी" असल्याने नाक्षत्रनांव - घोरा. (क) चंद्रनक्षत्र "पूर्वाफाल्गुनी" असल्याने - सामुदाय मुहूर्त ३० साम्यार्घ. म्हणजे त्याचे फल "सम" राहील असे समजावे. वार "मंगळवार" असल्याने (अ) गमन - पश्चिम. (ब) आगमन - पूर्व. (क) मुख - दक्षिण. (ड) दृष्टि - वायव्य. करिदिन : - मकर संक्रातींच्या "दुसरे" दिवसाला "करिदिन" अशी शास्त्रीय संज्ञा आहे. मकर संक्रातीचा "पुण्य / पर्वकाल" व त्याचे पुढील "करिदिन" हे सर्व शुभ कर्मांना वर्ज्य करावे. असे शास्त्र सांगते. यामध्ये देवकर्मे , संक्रात प्रित्यर्थ पूजन हवनकर्मे करू शकतात. पण शुभकर्म म्हणजे उद्घाटन , शुभारंभ , साखरपुडा , गृहप्रवेश इत्यादि इत्यादी .. संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला स्त्रियांनी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करतात तर संक्रांतीच्या दिवशी पुरुषांनी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करावे. जन्म नक्षत्रानुसार संक्रांतिफल : - १) पंथा: (प्रवास) : - मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी. २) भोग: (सुखभोग) : - हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा. ३) व्यथा (शरीरपीडा) : - मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा. ४) वस्त्रम् (वस्त्रलाभ) : - श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती. ५) हानि: (नुकसान) : - अश्विनी, भरणी, कृत्तिका. ६) विपुलं धनम् (विपुल धनलाभ) : - रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा. यानियानिच वस्तूनी संक्रांतिः स्वीकारोतिच । तत्तन्महर्घं वा नाशः क्रय विक्रय भीतिदा । आगमे च भवत्सौखं गमने दुःखदाय कम् । दर्शनेच भवद्धानिः संक्रांति फलमादिशेत् ॥ संक्रांत जी जी वस्तु धारण करते ती महाग होते व संक्रांत ज्या दिशे कडुन येते तिकडे सुख व ज्या दिशे कडे जाते व पहाते तिकडे अनिष्ट फल समजावें . संक्रातीचा जो रंग असेल तो आपण धारण करू नये , तसेच त्या गमन दिशेला प्रवास करू नये.. *अथ स्वरूपम् * षष्टियोजनविस्तिर्णा लंबोष्ठी दीर्घ नासिका । एकवक्त्रा नवभुजा संक्रांति पुरुषा कृतिः । पृष्टालोका भ्रमत्येव गृहीत्वा खर्परं करे ॥ ( संक्रांततीचें स्वरुप साठ योजनें २४० कोस, विस्तार आहे . तिचे ओठ लांब व नाकहि लांब आहे . तिला एक तोंड असून नऊ हात आहेत ती पुरुषाच्या आकृतीची आहे . ती पाठीमागे पाहणारी असून हातात खापर घेऊन फिरत असते . ) *संक्रांतिपर्वकालामध्ये वर्ज्यकर्माणि * दन्ता न शोध्याः पुरुषं न वाच्यं छेद्यं न किचिंतृणदारुपुष्पम् ।दोह्यो न गोऽजामहिषीसमा जो भोज्यं च वर्ज्यं मदनो न सेव्यः ॥ ( संक्रांतीच्या पर्वकाळांत दांत घासणें, कठोर बोलणें, वृक्ष व गवत तोडणें, फुल खुडूं नये,गायी, म्हशी, शेळ्या ह्यांचे दूध काढू नयें, भोजन करु नये व कामविषय सेवन हीं कामें करुं नयेत . ) *संक्रांतौ आवश्यकानि दानानि * सौम्यायनेनूतन भाण्डदानं गोग्रासमन्नं तिल पात्रदानम् । गुडं तिलोर्णाज्य सुवर्णंभूमिगोवस्त्रवाजिप्रभृतींश्र्च दद्यात् ॥ नवे भाडें, गाईला चारा, अन्न, तिळ भरुन भांडे, तिलपात्र, लोंकरिचें वस्त्र, गुळ, तीळ, सोनें, भूमि, गाय, वस्त्र, घोडा इत्यादि यथाशक्ति दाने करावी . वस्त्राचें दान द्यावे व तिळा सह वृषभदान करावे . तिळ व गुळ इष्टमित्रास द्यावा म्हणजे स्नेहसंवर्धन होते ... संक्रांतिच्या पर्वकाळात सौभाग्यवती स्त्रियांनी दाने द्यावयाची असतात . संक्राति "पुण्य / पर्वकालात" स्त्रियांनी करावयाची "दाने / सौभाग्यवायने" : - हळद, कुंकू, बांगड्या, आरसा, खण, नारळ, सौभाग्यवायने, नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळ, तिळपात्र, गूळ, कपडे, तूप, फळे, तिळाचे लाडू, उपयुक्त असणाऱ्या वस्तू इत्यादी. *दानफलम्* संक्रांतौ यानि दत्तानि हव्यकव्यानि दातृभिः। तानि नित्यं ददा त्यर्कःपुनर्जन्मनि जन्मनि ॥ रविसंक्रमणे प्राप्ते न स्नाया द्यस्तु मानवः । सप्त जन्मनि रोगी स्यान्निर्धनश्चैव जायते सूर्यसंक्रांति दिवसे ब्राह्मणं यो न भोजयेत् । स सप्त जन्मपर्यंतं क्षयरोगी भविष्यति । संक्रांतिसमये दानं स्वशक्त्या न करोति यः । स दरिद्रोमहापापी प्रति जन्मनि जायते ॥ इतीदं संक्रमफलंतस्मात्पाक्परतोऽपि वा । शृणुयात्पुत्रपौत्राद्यै र्मोदते सुचिरं भुवि ॥ ( संक्रांतीच्या पुण्यकालामध्यें किंवा संक्रांतीच्या निमित्ताने जी जी दानें दिली किंवा देवकार्य, पितृकार्य केले तें तें सूर्य आपणाला जन्मोजन्मी नित्य देतो . सूर्यसंक्रांति आली असतां जो मनुष्य यथाविधी स्नान करीत नाहीं, तो सात जन्म पर्यंत निर्धन व महापापी होते . संक्रांतीच्या पुण्य कालामध्ये यथाशक्ति दाने जो करीत नाही तो प्रत्येक जन्मात दरिद्री व महापापी होतो . हें संक्रांति फल संक्रांतीच्या पूर्वी किंवा नंतर जे श्रवण करितात तें पुत्रपौत्रादिकां सह निरंतर पृथ्वी वर आनंदाने राहतात . ) *श्रवणफलम्* ये वात्र्छन्तिसुखं सदैव परमं लक्ष्मींच रोगक्षयम् । लावण्यादिगुर्णैर्युतं वरवपुर्भा र्यां मनोहारिणीम् । स्वानन्दं पशुपुत्रपौत्र सहितं किर्तेश्र्च वृद्विं कुले । तैः श्रोतव्यंमिदं तु सक्रमफलं देयं सृपात्रे धनं॥ ( ज्यांना नेहमीं सुख, संपत्ती, आरोग्य, सौंदर्यादि गुण, सशक्त शरीर, मनोहर स्त्री, पशु , पुत्र, नातु , इत्यादिकांसह आनंद व कीर्ति ह्यांची आपल्या कुला मध्यें वृध्दि व्हावी अशी इच्छा असेल त्यांनीं हे संक्रांतिफल अवश्य ऐकावें व दान करणे तर सत्पात्रीं करावें . ) सर्वांना संक्रांतीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा..

Search

Search here.