दिवाळी दीपावली

सण व उत्सव Posted at 2018-11-03 05:05:46

दिवाळी दीपावली

दीपावली हा शब्द दीप+आवली (ओळ), असा बनला आहे. दीप या शब्दाचा खरा अर्थ तेल आणि वात यांची ज्योत. तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा, अशी वेदांची आज्ञा आहे. आश्‍विन कृष्ण पक्ष त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) आणि कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा (बलीप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशी दिवाळीत न धरता, दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे, असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः ते सण वेगवेगळे आहेत.
गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस -- अंधारावर मात करून सारा परिसर प्रकाशमान करणाऱ्या दिवाळीची आश्‍विन वद्य द्वादशीस सुरवात होते. त्याला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस असेही म्हटले जाते. सवत्सधेनूची पूजा करण्याचा हा दिवस. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साऱ्या देवांची वस्ती गोमातेच्या शरीरात असते, अशी श्रद्धा आहे. अशी कथा सांगितली जाते की समुद्रमंथनातून ज्या चिजा निघाल्या, त्यामध्ये पाच कामधेनू होत्या. कामधेनू म्हणजे व्यक्त केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी गोमाता. खरे तर गाय आणि तिच्यापासून जन्माला येणारे बैल यांच्या जिवावरच प्राचीन काळी शेतीची मदार होती. त्यामुळे गाईची पूजा होणे स्वाभाविकच आहे. क्षीरसागराच्या मंथनातून नंदिनी, शुभदा, सुरभी, सुशीला आणि बहुला या पाच कामधेनू जन्माला आल्या.

या पाच गायी जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ, अगस्ति आणि गौतम या ऋषींना देण्यात आल्या. या कामधेनूंच्या दूध, गोमूत्र, गोमयापासून बेलाचे झाड, गुग्गुळ या चिजांचा जन्म झाला. गायीच्या धृतापासून म्हणजेच तुपापासून अमृतच तयार होते. या साऱ्याचा संबंध आजच्या काळात शेणाचे होणारे जैविक खत, आरोग्य वाढविणारे गायीचे कमी फॅटचे दूध, आयुर्वेदाचार्यांना उपचारासाठी प्रिय असणारे धृत या साऱ्यांशी जोडता येईल. प्राचीन काळी पृथू राजा राज्य करीत असताना पृथ्वीवर नैसर्गिक संकट आले तेव्हा त्याने गोमातेचेच पूजन केले. मग संकटात सापडलेली सृष्टी पुन्हा नवजीवनाने तरारली. तोच हा द्वादशीचा दिवस. वसुबारसेला गायीला नैवेद्य तर दाखवितातच; पण काही ठिकाणी तिला सर्जनाचे, मातृत्वाचे प्रतीक म्हणून साडीचोळी नेसवतात. पूजेच्या वेळी जी रांगोळी काढण्याची प्रथा आहे त्यामध्ये "गोपद्म' म्हणजे गायीची पावले काढण्याची प्रथा आहे. म्हणजेच भारतीयांनी गायीला गोठ्यातून थेट देव्हाऱ्यापर्यंत आणून ठेवले आहे. या साऱ्याचे स्मरण देते ती वसुबारस.

वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

तिन्हीसांजेला गायीला ओवाळून, तिला चारा घालून करंजीचा नैवेद्य दाखवून गायीची वासरासह पूजा केली जाते. सध्या शहरातील गोठे महापालिका हद्दीबाहेर गेल्यामुळे सुवासिनींना जवळपास सवत्सधेनूचे पूजन करणे अशक्‍य झाले आहे. हे ध्यानात घेऊन विविध स्वयंसेवी संस्था-संघटना आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत ठिकठिकाणी सवत्सधेनू पूजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
धनत्रयोदशी ( देवांचा वैद्य धन्वंतरि जयंती )

आश्‍विन कृष्ण पक्ष त्रयोदशीच्या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात. शेवटी जमा झालेल्याचा आणि खर्च झालेल्याचा आढावा लक्ष्मीपुढे ठेवून लक्ष्मीची पूजा करतात.
ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची पूजा करतात. येथे धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायु, अग्नि आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो.

धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतकयांच्या दृष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ ह्यांचा नैवेद्य दाखवतात.ह्या सुमारास झेंडू व शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झेंडू व शेवंतीची फुले वापरतात. या दिवसापासून दारांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.

धनत्रयोदशीचा दिवस आयुर्वेदाच्या दृष्टीने धन्वंतरि जयंतीचा आहे. वैद्य या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे तुकडे आणि साखर असे प्रसाद म्हणून लोकांना देतात. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
धन्वंतरि जन्म : धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वंतरी एका हातात अमृत कलश, दुसर्‍या हातात जळू, तिसर्‍या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र घेऊन जन्माला आला. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतो. या दिवशी शरिरावर दूरगामी परिणाम करणारी पाश्‍चात्त्य अ‍ॅलोपॅथी औषधे त्यागून
आयुर्वेद अनुसरण्याची सुबुद्धी हिंदूंना व्हावी, अशी श्री धन्वंतरि देवतेच्या चरणी प्रार्थना !
नरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी)

आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात.स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. स्नानानंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी पहाटेच पणत्या लावतात. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरितां अशा पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.

आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.

यमतर्पण : अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस (रक्त) जिभेला लावतात.

दुपारी ब्राह्मणभोजन घालतात आणि वस्त्रदान करतात.

प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो.
नरकाची पीडा होऊ नये, यासाठी अभ्यंगस्नान करणे !
देव आणि मानव यांना त्रास देणार्‍या नरकासुराला श्रीकृष्णाने आश्‍विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी ठार मारून सर्वांना आनंदी केले. या तिथीला जो अभ्यंगस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होणार नाही, असा वर श्रीकृष्णाने दिला. यासाठी उटणे आणि सुगंधी द्रव्ये आदी लावून अभ्यंगस्नान केले जाते. महाराष्ट्र आणि गोवा आदी भागांत या प्रथेचे पालन करण्यात येते. या दिवशी आप्तेष्टांना बोलावून फराळ करण्याची प्रचिलत झाली आहे.
लक्ष्मीपूजन ---

या दिवशी प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध आणि ब्राह्मणभोजन अन् प्रदोषकाळी लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे. एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून सिद्ध केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.
या दिवशी दिव्यांचा झगमगाट शोभून दिसतो. त्यामुळेच अमावास्या ही पवित्र झाली आहे. शरदऋतूतील आश्‍विन मासातील पौर्णिमा तशीच ही अमावास्याही कल्याणकारी आहे. सर्व समृद्धीदर्शक आहे. या दिवसांत शेतकर्‍यांचे पीक घरात आलेले असते. केलेल्या श्रमाचे साफल्य प्रभूकृपेने मिळालेले असते; म्हणून शेतीतील धान्य ही खरी लक्ष्मी आहे. धान्य हे प्रत्यक्ष जीवनोपयोगी आहे. म्हणूनच अन्न हे ब्रह्म म्हटले आहे. आपण दीपावलीला मातीची पणती वापरतो, तिची पूजा करतो, गायीद्वारे दूध मिळत असल्यामुळे गायीची पूजा, भगवंताद्वारे येणारे शुद्ध स्वरूपांतील धन म्हणजेच धान्यलक्ष्मी तिची रास टाकून पूजा करतो.

या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.
बलीप्रतिपदा --

बलीप्रतिपदेच्या दिवशी भूमीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात. या दिवशी लोक पक्वान्नांचे भोजन करून नवी वस्त्रावरणे लेवून सर्व दिवस आनंदात घालवतात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे.
बळीराजाचे कोटकल्याण करण्याच्या उद्देशाने त्याला पाताळात लोटणे !
बलीप्रतिपदेला नित्य अर्चनेसह बलीपूजन होते. बळीने भृगुकृच्छ (भडोच) येथे नर्मदातीरावर अश्‍वमेध यज्ञ केला. त्या यज्ञात सर्व भुवन तृप्त झाले. देव आणि ऋषी यांनी त्या यज्ञाची विलक्षण प्रशंसा केली. हा बळीराजा भोगार्थी नसून मोक्षार्थी आहे, हे जाणून भगवान विष्णु वामनरूप धारण करून त्यांच्या यज्ञात ‘याचक म्हणून आला.
इंद्रपदाच्या अधिकार भोगाकरता दीन झालेल्या वडील भाऊ इंद्राला जगताचा एक तुकडा द्यावा; म्हणून बटु वामनाने फसवून; पण आंतरिकदृष्ट्या बळी चक्रवर्तीचे कोटकल्याण करून दोन पावलांनी पृथ्वी आणि स्वर्गलोक व्यापून तिसर्‍या पावलाने बळीला पाताळात लोटले. सध्या बली पाताळाचा चक्रवर्ती राजा असून जीवन्मुक्त स्थितीत स्वस्थ राहिला आहे. त्याचे प्रारब्ध त्याला इंद्रपद देणार आहे. त्याकरता तो जीवन्मुक्तावस्थेत शरीर धारण करून आहे. त्याने सर्व भोगांची अभिलाषा सोडल्यामुळे त्याचे मन तृप्त झाले आहे. जे कर्तव्यप्राप्त होईल, ते शांत मनाने करायचे, अशी त्याची सवय असल्यामुळे तो स्वंय आनंदपूर्ण झाला आहे.

बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर करतात.
भाऊबीज (कार्तिक शुद्ध द्वितीया / यमद्वितीया)

या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊ बहिणीकडून ऒवाळून घेतो. भाऊ तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ऒवाळते.

भावा - बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात.

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी , ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं …
!!! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!!

स्रोत -- आंतरजाल , व्हाट्सप , ग्रंथ पुस्तके

Search

Search here.