गजेंद्रमोक्ष स्तोत्र सार्थ

स्तोत्र - मंत्र  > संकीर्ण इतर स्तोत्र Posted at 2018-11-28 07:00:30
गजेन्द्रमोक्ष स्तोत्र श्रीशुक उवाच " एवं व्यवसितो बुद्ध्या समाधाय मनो ह्रदि । जजाप परमं जाप्यं प्राक्जन्मन्यनुशिक्षितम् ॥ " १ ॥ गजेन्द्र उवाच  " ॐ नमो भगवते तस्मै यत एतच्चिदात्मकम् । पुरुषायादिबीजाय परेशायाभीधीमहि ॥ " २ ॥ यस्मिन्निदं यतश्चेदं येनेदं य इदं स्वयम् । योऽस्मात्परस्माच्च परस्तं प्रपद्दे स्वयंभुवम् ॥ ३ ॥ यः स्वात्मनीदं निजमाययार्पितम् । क्वचिद्विभांतं क्व च तत्तिरोहितम् ।। अविद्धदृक् साक्ष्युभयम तदीक्षते ।।।  सआत्ममूलोऽवतु मां परात्पतरः ।। ४ ।। कालेन पंचत्वमितेषु कृत्स्नशो । लोकेषु पालेषु च सर्वहेतुषु ।। तमस्तदा ऽ ऽ सीद् गहनं गभीरम् ।।। यस्तस्य पारे ऽ भिविराजते विभुः ॥ ५ ॥ न यस्य देवा ऋषयः पदं विदुः । जन्तुः पुनः कोऽर्हति गंतुमीरितुम् ।। यथा नटस्याकृतिभिर्विचेष्टतो ।।। दुरत्ययानुक्रमणः स माऽवतु ॥ ६ ॥ दिदृक्षवो यस्य पदं सुमंगलम् । विमुक्तसंगा मुनयः सुसाधवः ।। चरंत्यलोकव्रतमव्रणं वने ।।। भूतात्मभूतः सुह्रदः स मे गतिः ॥ ७ ॥ न विद्यते यस्य च जन्म कर्म वा । न नामरुपे गुणदोष एव वा ।। तथापि लोकाप्ययसंभवाय यः ।।। स्वमायया तान्यनुकालमृच्छति ॥ ८ ॥ तस्मै नमः परेशाय ब्रह्मणेऽनन्तशक्तये । अरुपायोरुरुपाय नम आश्र्चर्य कर्मणे ॥ ९ ॥ नम आत्मप्रदीपाय साक्षिणे परमात्मने । नमो गिरां विदूराय मनसश्चेतसामपि ॥ १० ॥ सत्त्वेन प्रतिलभ्याय नैष्कर्म्येण विपश्र्चिता । नमः कैवल्यनाथाय निर्वाणसुखसंविदे ॥ ११ ॥ नमः शांताय घोराय मूढाय गुणधर्मिणे । निर्विशेषाय साम्याय नमो ज्ञानघनाय च ॥ १२ ॥ क्षेत्रज्ञाय नमस्तुभ्यं सर्वाध्यक्षाय साक्षिणे । पुरुषायात्ममूलाय मूलप्रकृतये नमः ॥ १३ ॥ सर्वेन्द्रियगुणद्रष्ट्रे सर्वप्रत्ययहेतवे । असताच्छाययोक्ताय सदाभासाय ते नमः ॥ १४ ॥ नमो नमस्तेऽखिल कारणाय । निष्कारणायाद्भुत कारणाय ।। सर्वागमाम्नायमहार्णवाय ।।। नमोऽपवर्गाय परायणाय ॥ १५ ॥ गुणारणिच्छन्नचिदूष्मपाय ।  तत्क्षोभ-विस्फूर्जितमानसाय ।। नैष्कर्म्यभावेन विवर्जितागम ।।। स्वयंप्रकाशाय नमस्करोमि ॥ १६ ॥ मादृक्प्रपन्नपशुपाशविमोक्षणाय । मुक्ताय भुरिकरुणाय नमोऽलयाय ।। स्वांशेनसर्वतनुभृत्मनसि-प्रतीत- ।।। -प्रत्यग् दृशे भगवते बृहते नमस्ते ॥ १७ ॥ आत्मात्मजाप्तगृहवित्तजनेषु सक्तैः । दुष्प्रापणाय गुणसंगविवर्जिताय ।। मुक्तात्मभिः स्वह्रदये परिभाविताय ।।। ज्ञानात्मने भगवते नमः ईश्र्वराय ॥ १८ ॥ यं धर्मकामार्थ-विमुक्तिकामाः । भजन्त इष्टां गतिमाप्नुवन्ति ।। किंत्वाशिषो रात्यपि देहमव्ययम् ।।। करोतु मेऽदभ्रदयो विमोक्षणम् ॥ १९ ॥ एकांतिनो यस्य न कंचनार्थम् । वांछन्ति ये वै भगवत् प्रपन्नाः ।। अत्यद्भुतं तच्चरितं सुमंगलम् ।।। गायन्त आनन्द समुद्रमग्नाः ॥ २० ॥ तमक्षरं ब्रह्म परं परेशम् । अव्यक्तमाध्यात्मिकयोगगम्यम् ।। अतीन्द्रियं सूक्ष्ममिवातिदूरम् ।।। अनंतमाद्यं परिपूर्णमिडे ॥ २१ ॥ यस्य ब्रह्मादयो देवा वेदा लोकाश्र्चराचराः । नामरुपविभेदेन फल्ग्व्या च कलया कृताः ॥ २२ ॥ यथार्चिषोऽग्ने सवितुर्गभस्तयोः । निर्यान्ति संयान्त्यसकृत् स्वरोचिषः ।। तथा यतोऽयं गुणसंप्रवाहो ।।। बुद्धिर्मनः ख्रानि शरीरसर्गाः ॥ २३ ॥ स वै न देवासुरमर्त्यतिर्यङ ।  न स्त्री न षंढो न पुमान् न जन्तुः ।। नायं गुणः कर्म न सन्न चासन् ।।। निषेधशेषो जयतादशेषः ॥ २४ ॥ जिजी विषे नाहमियामुया किम् । अन्तर्बहिश्र्चावृतयेभयोन्या ।। इच्छामि कालेन न यस्य विप्लवः ।।। तस्यात्मलोकावरणस्य मोक्षम् ॥ २५ ॥ सोऽहं विश्र्वसृजं विश्र्वमविश्र्वं विश्र्ववेदसम् । विश्र्वात्मानमजंब्रह्म प्रणतोऽस्मि परं पदम् ॥ २६ ॥ योगरंधितकर्माणो ह्रदि योग-विभाविते । योगिनो यं प्रपश्यति योगेशं तं नतोऽस्म्यहम् ॥ २७ ॥ नमो नमस्तुभ्यमसह्यवेग- ।  -शक्तित्रयायाखिलधीगुणाय ।। प्रपन्नपालाय दुरन्तशक्तये ।।। कदिन्द्रियाणामनवाप्यवर्त्मने ॥ २८ ॥ नायं वेद स्वमात्मानं यच्छक्त्याहं धिया हतम् । तं दुरत्ययमाहात्म्यं भगवंतमितोऽस्म्यहम् ॥ २९ ॥ श्रीशुक उवाच  एवं गजेन्द्र मुपवर्णितनिर्विशेषम् । ब्रह्मादयो विविधलिंग भिदाभिमानाः ।। नैते यदोपससृपुनिंखिलात्मकत्वात् ।।। तत्राखिलामरमयो हरिराविरासीत् ॥ ३० ॥ तं तद्वदार्तमुपलभ्य जगन्निवासः । स्तोत्रं निशम्य दिविजै सह संस्तुवद्भिः ।। छंदोमयेन गरुडेन समुह्यमानः ।।। चक्रायुधोऽभ्यगमदाशु यतो गजेन्द्रः ॥ ३१ ॥ सोऽन्तः सरस्युरुबलेन गृहीत आर्तो । दृष्टवा गरुत्मति हरिं ख उपात्तचक्रम् ।। उत्क्षिप्य साम्बुजकरं गिरमाह कृच्छ्रात् ।।। नारायणाखिलगुरो भगवन् नमस्ते ॥ ३२ ॥ तं वीक्ष्य पीडितमजः सहसावतीर्य । सग्राहमाशु सरसः कृपायोज्जहार ।। ग्राहाद् विपाटितमुखादरिणा गजेन्द्रम् ।।। संपश्यतां हरिरमूमुचदुस्त्रियाणाम् ॥ ३३ ॥ योऽसौ ग्राहः स वै सद्यः परमाश्र्चर्य रुपधृक् । मुक्तो देवलशापेन हुहु-गंधर्व सत्तमः ।। सोऽनुकंपित ईशेन परिक्रम्य प्रणम्य तम् ।।। लोकस्य पश्यतो लोकं स्वमगान्मुक्त-किल्बिषः ॥ ३४ ॥ गजेन्द्रो भगवत्स्पर्शाद् विमुक्तोऽज्ञानबंधनात् । प्राप्तो भगवतो रुपं पीतवासाश्र्चतुर्भुजः ।। एवं विमोक्ष्य गजयुथपमब्जनाभः ।।। स्तेनापि पार्षदगति गमितेन युक्तः ॥ ३५ ॥ गंधर्वसिद्धविबुधैरुपगीयमान- कर्माभ्दुतं स्वभवनं गरुडासनोऽगात् ॥ ३६ ॥ ॥ इति श्रीमद् भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कन्धे गजेंन्द्रमोक्षणे तृतीयोऽध्यायः ॥   गजेन्द्रमोक्ष स्तोत्र मराठी अर्थः १) श्रीशुक म्हणाले, मागच्या अध्यायांत वर्णन केल्याप्रमाणे त्या संकटग्रस्त मरणोन्मुख गजेंन्द्राने विवेक बुद्धीने निर्णय घेऊन, मन दुःख चिंता रहित करुन, पूर्व जन्मांत ग्रहण केलेले अध्यात्मज्ञान व अनन्यभक्ति ह्रदयांत आणून, पुढील जपण्यास सर्वश्रेष्ठ स्तोत्र, स्पष्ट उच्चारात म्हणावयास आरंभ केला.  २) गजेन्द्र म्हणाला, विश्र्वाचे जे स्वयंचेतन, अविनाशी, अनादि, मूलतत्व आहे, ते तर सर्वकाल निराकार व अगोचर आहे; परंतु ज्याचे ॐ या गूढ एकाक्षरी मंत्रबीजाने ज्ञान होते व अपरोक्षानुभूति लाभते, त्या अप्रमेय आदितत्वास, आणि त्याचे प्रतीक असणार्‍या परमात्म्यास ओंकारोच्चाराने नमन करतो. जड अचेतन देहघटामध्ये ज्याचा प्रवेश होताच तो ( जड देह ) सचेतन असल्याप्रमाणे वागतो, आणि ज्याने जीवदेहाचा त्याग करताच तो देह निष्प्राण जड होतो, असा जो सर्व देहामध्ये गूढपणे "आत्मा" या संज्ञेने वास करतो, त्या सर्वांतर्यामी परमेश्र्वराला मी अंतःकरणपूर्वक नमन करतो.  ३) ज्याच्यापासून हे विशाल विश्र्व निर्माण झाले आहे, ज्याने ही विश्र्वनिर्मिती केली आहे; ज्याच्या आधारावर हे विश्र्व अधिष्ठित असते तो कोण व कसा आहे? तर हे सर्वकाही तो स्वतःच झाला आहे; आणि जो या विश्र्व प्रपंचापेक्षा व मूल प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे, त्या स्वयंभु आदि पुरुषोत्तमाला मी शरण जात आहे.         ४) परंतु जो आपल्याच माया संज्ञक गूढ शक्तीने हे अत्यद्भूत जगत् स्थूलरुपाने प्रकत करतो, आणि महाप्रलयकाळी सर्व व्यक्तभावांचा स्थूलसूक्ष्म अखिल सृष्टिप्रपंचाचा संहार करुन सर्वकाही आपल्यातच विलीन करतो; विशेष म्हणजे ही सृष्टि कार्यरुपाने प्रगट झालेली असो, अथवा अव्यक्तभावात असो, जो या उत्पत्ति-लय पावणार्‍या सृष्टिलीलेकडे उदासीन साक्षी दृष्टीने निर्विकारपणें पाहतो, तो स्वयंभु स्वचेतन सर्वसमर्थ सर्वश्रेष्ठ परमात्मा माझे या आपत्तिपासून रक्षण करो.   ५) महासंहार समयी सगळे लोक आणि विश्र्वचालक देव हे सुद्धा विघटित होऊन पंचभूते व त्याहून सूक्ष्मतर अशा पंचतन्मात्रांमध्ये विलीन होतात. नंतर त्यांचेही सूक्ष्म भावामध्ये विघटन होत शेवटी मूलप्रकृतिमध्ये सर्व काही लीन होते. दिशा-काल नष्ट झालेल्या त्या अंतिम अवस्थेंत केवळ गतिशून्यता व अथांग निष्क्रियता नांदते. तथापि या सर्वांच्याही अतीत असा सर्वव्यापी, सर्वसमर्थ पतमात्मा स्वतःच्या चित्प्रकाशाने अबाधितपणे असतो.   ६) ज्याप्रमाणे प्रत्येक नातकातील भिन्न रुप,-वेश-अभिनय यामुळे कुशल नटाचे मूळ स्वरुप पाहता जाणता येत नाही, तसेच आदि परमात्म्याचे मूळ स्वरुप जाणणे, देवगण, ऋषिमुनी यांना सुद्धा शक्य होत नाही. तर ते मायाबद्ध जीवांना कसे पाहता येईल? अपवादात्मक अनन्यभक्तास तुझ्या कृपेनेच ते पाहता येईल. तरी ते अतिकष्टानेच पाहता येणारे तुझे षडैश्र्वर्य संपन्न स्वरुप कृपया मला दाखव, आणि हे सर्वेश्र्वरा तुला सर्वस्वी शरण आलेल्या माझे रक्षण कर.  ७) हे परमात्मन् तुझे स्वरुप पहावयास मिळणे अति दुर्लभ असले तरी ते परम कल्याणकारी आहे. म्हणून त्या अंतिम प्राप्तव्याचा लाभ व्हावा, अशी इच्छा धरणारे साधुस्वभावी ऋषिमुनी त्यासाठी सर्व भोगासक्ति व कुसंग यांचा त्याग करुन सत्य-अहिंसादि महाव्रते व यमनियम यांचे एकांतात खंड न पडूं देता कायावाचामने अत्यंत कटाक्षाने परिपालन करतात, आणि जे सर्व जीवांमध्ये एकच ईशतत्त्व पाहतात, ते तुझे तेजोमय षडैश्र्वर्य-स्वरुप मला पाहण्यास मिळो, हीच माझी एकमात्र कामना उरली आहे.   ८-९) ज्याला जन्म नाही, आणि त्यामुळे जरा-मृत्यु सुद्धा नाही, ज्यास प्रारब्धकर्म-भोग व कर्तव्यकर्मे नाहीत, ज्यास आकार-विकार, नाम-रुप, गुण-दोष नाहीत, परंतु जो स्वेच्छेने आपल्या अचिन्त्य मायेचा आश्रय करुन अनंतप्राय नामें रुपें गुण विकार असणारी सृष्टीची लीला सतत करतो, जो मूलतः आकार रहित आहे. तथापि जो अगणित नामें रुपें एकाचवेळी धारण करु शकतो, त्या अति विलक्षण ब्रह्माला आणि त्याच्या अनंतशक्ति-सामर्थ्य ऐश्र्वर्य असणार्‍या परमात्म स्वरुपाला मी वंदन करतो.   १०) ज्याला वाणीने आणि चित्ताच्या भाववृत्तीने जाणता येत नाही, जो सर्व जीवांचा व विश्र्वामध्ये होणार्‍या सर्व घडामोडींचा साक्षी आहे, जो सर्व तर्काच्या व कल्पनांच्या अतीत आहे, त्या स्वयंप्रकाशी सर्वज्ञ सर्वसाक्षी परमात्म्याला मी वंदन करतो.   ११) ज्यांनी प्रथम रज-तमगुण प्रवृत्तीचा क्षय करुन सत्त्वप्रवृद्ध होऊन कर्मविपाकाच्या जाळ्यातून आपली सुटका केली आहे, अशा विवेक-वैराग्यशील बुद्धिमानास प्राप्त होण्यास योग्य असे जीवमुक्तीचे महासुख आणि केवलाद्वय अवस्था, हे कृपाकटाक्षानेच प्रदान करणार्‍या परमात्म्याला मी नमन करतो.  १२) सृष्टिलीलेसाठी त्रिगुणांचा स्वीकार केल्याने सत्वगुणाधिक्यामुळे शांत स्वरुपाचा, रजोगुण प्रकर्षामुळे साहसी व भयंकर वाटणारा, आणि तमोगुण प्रभावामुळे जड मूढ भसणारा, तथापि जो त्रिगुणातील , सर्व उपाधि-रहित, व कोणतेही विकार, भेद, लक्षण नसल्याने अवर्णनीय आहे, जो सर्वत्र समत्वाने भरलेला असून जणु काही ज्ञानविज्ञानाची घनमूर्ति आहे, अशा त्या परमात्म्याला माझे नमन असो.  १३) सर्व जीवदेहामध्ये आत्मतत्व रुपाने वास करणारा, सर्व जीवकृत कर्मांचा ज्ञाता व कर्मानुसार फलदाता न्यायाधीश, यच्चयावत जडसमुहाचा नियंत्रक; जीव-जडाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारा, पण स्वतः कारणरहित असणार्‍या स्वयंभु सर्वज्ञ परमात्म्याला मी नमन करतो.   १४) जो सर्व जीवसमूहाच्या इंद्रियांद्वारे होणार्‍या गुणानुरुप क्रियांचा, त्यामागील प्रेरक हेतूंचा ज्ञाता व साक्षी आहे, जो समग्र जड पदार्थांना अविद्यारुपी छायेने ग्रासतो, आणि सचराचर सृष्टीत सर्वकाल अव्यय-सत्ता भावाने सूचित होत असतो, त्या सर्वव्यापी सर्वसमर्थ परमात्म्यास माझे सादर प्रणाम असोत.   १५) जो सर्वांचे उद्भव कारण आहे. परंतु स्वतःच्या अस्तित्वासाठी कोणत्याही कारण परंपरेवर अवलंबून नाही. तो निष्कारण स्वयंभू आहे. तो या विराट सृष्टीच्या उत्पत्ति-स्थिती-लय अशा अद्भुत लीलेचे एकमेव निमित्तकारण आहे. तो चारी वेद व तंत्रशास्त्रे यातील अध्यात्म विद्येचा महासागर आहे. तो सत्पात्र उपासकास तत्काल मोक्षफल देतो त्या श्रेष्ठ परमात्म्यास माझे नमन असो.   १६) अरणिमध्ये, काष्ठामध्ये जसा अग्नि गुप्त असतो, व अरणी मंथन केल्यावर अग्निरुपाने प्रकटतो, तसेच ज्याच्या सत्व-रज-तम या त्रिगुणांमध्ये गुप्तपणे सर्वदा परमात्म चैतन्यरुपी अग्नि असतो, आणि अरणि-मंथन तथा त्रिगुणांमध्ये अ-समता क्षोभ उत्पन्न करुन ज्याच्या चित्तामध्ये जो सृष्टी-रचना-संकल्प उद्भवतो, त्याला माझे वंदन असो. जे तीव्र जिज्ञासु मुमुक्षु सर्व वैदिक काम्य कर्मकाण्डाच्या अतीत होऊन अनासक्त भावनेने निष्काम कर्मे, व अहैतुकी भक्ति करतात, त्यांच्या ह्रदयांत जो स्वयमेव महत्तेजाने प्रकट होतो, त्या चिदग्नि परमेश्र्वराला मी वंदन करतो.   १७) तो सर्व आधि, बंधने, मर्यादा, गुण, विकार आदी भेदांपासून सर्वस्वी मुक्त आहे. तो माझ्यासारख्या पशुचें शरणागतांचे सर्व पाश तोडणारा आहे. तो करुणेचा सागर आहे. तो दया करण्यास कधीच आळस करत नाही. त्या महान तारकेक्ष्वराला माझे नमस्कार असोत. जो अंशमात्र चैतन्याने सर्व ह्रदयांत अंतर्यामी, साक्षी, आत्मा या   १८) स्वतःचे शरीर व जीवन, स्त्री-सुत-कन्या, आप्त, मित्र, तसेच घर, शेती, धनसंपदा, सत्ता, कीर्ति यामध्ये जे आसक्त असतात, त्यांना जो प्राप्त होण्यास अशक्यप्राय असतो; तथापि विषयांकडील अनिवार्य ओढ आणि त्रिगुणांची कार्यपद्धति यांच्या कचाट्यातून जे सुटका करुन घेतात, त्यांना जो निज ह्रदयातच निरंतर ध्यानाने अनुभविता येतो, त्या ज्ञानमात्र, ऐश्र्वर्य-सामर्थ्यवान, सर्व-रक्षक परमेश्वराला मी नमन करतो.   १९) धर्म-अर्थ-काम आणि मोक्ष अथवा प्रेम व श्रेय, यापैकी कामना मनात धरुन जे परमेश्र्वराची दृढ भक्ति करतात, त्यांना वांछित फल देणारा आणि जे कोणताही हेतु न बाळगता निर्मल निष्काम भक्ति करतात, त्यांना तर न मागताही जो स्वतः स्वर्गीय वैभव, सिद्धि सामर्थ्य तसेच अविनाशी पार्षद देह देतो, तो सर्वसमर्थ प्रभु माझी आपत्तीतून कायमची सुटका करो.   २०) सर्वभावाने हरिशरणागत होऊन सायुज्यता प्राप्त केलेल्या महाभक्तांना धर्म, अर्थ, काम व मोक्ष यापैकी काहीही नको असते. असे श्रेष्ठ एकान्तभक्त परमात्म-प्रेमरुप आनंद-सागरांत सर्वकाल विहार करतात, आणि निरंतर भगवंताच्या मंगल भवतारक महिम्याचे व अनंत शक्ति-सामर्थ्याचे गायनाने गुणप्रकाशन करतात.   २१) जो अविनाशी, सर्वव्यापी, ब्रह्मदेवादिकांचाही स्वामी, सर्ववरिष्ठ, मूलतः निराकार व आपल्यापेक्षा अत्यंत दूर आहे असे वाटणारा, सूक्ष्मातिसूक्ष्म असल्याने इंद्रियांना अगोचर असणारा, सर्वांच्याही पूर्वींचा, अंत नसणारा, सर्वच द्रुष्टीने परिपूर्ण, तथापि अनन्य भक्तीने प्राप्त होण्यासारखा आहे, अशा परमात्म्याला मी स्तवितो.  २२) ज्याच्या नगण्य अंशांश चैतन्यापासून ब्रह्मदेवादी ज्येष्ठ-कनिष्ठ देवगण, चराचर लोक, त्यातील जीववर्ग, तसेच त्रिगुण, नामें, रुपे, विकार, दिशा, काल, आदि असंख्य भेदांनी युक्त अनंत-विस्तारित विश्र्वलीला तो सहजपणे करतो.  २३) ज्याप्रमाणे अग्नि चेतविला की त्यापासून असंख्य ज्वाला उसळतात, जसें सूर्य उगवला की प्रकाश किरण सर्वत्र पसरतात, तसेच या स्वयंप्रकाशी सर्वसमर्थ परमात्म्याच्या चैतन्य किरणांपासूनच भिन्न जीवयोनी व प्रत्येक योनींतील अगणित शरीरे, त्यातील प्रत्येक शरीराची इंद्रियें-मन-बुद्धि, या गोष्टी पुनः पुनः प्रगट होतात व त्याच्यातच कालांतराने लीन होतात.  २४) पण असे हे अत्यद्भुत कार्य करणारा परमात्मा आहे तरी कसा? तर तो ज्येष्ठ-कनिष्ठ देवगण, तसेच असुर, मर्त्य मानव, भूत-प्रेतादि तिर्यक् योनी, यापैकी कोणत्याही विभागाचा नाही, आदिपरमात्मा हा " स्त्री, पुरुष, नपुसंक, तसेच कोणत्याही जीवयोनी " यापैकी नाही, त्यास त्रिगुण बंधने नाहीत. तो कार्यरुप नाही. तो असत् आहे वा सत् आहे, असेहि म्हणता येत नाही. या सर्व विचारांचा, कल्पनांचा, वर्णनांचा व्यतिरेक करुन जे काय अविनाशी, वि-लक्षण, उपाधिरहित निरंजन अस्तित्व राहते, तेच भगवंताचे विशुद्ध स्व-रुप होय. आणि शाश्र्वत निर्विशेष चित्सत्तेपासूनच सर्वकाही उत्पन्न होते. त्या आदि चित्सत्तेस माझे नमन असो.    २५) हे करुणाकरा, ज्ञानप्रबोध झालेल्या मला, तुझ्या कृपेने नक्राच्या दाढेतून सुटून अन्तर्बाह्य अज्ञानग्रस्त अशा गज-योनीरुपांत पुनः यावे व अधिक ज्याचीकाल जगावे अशी इच्छा किंचित्सुद्धा राहिली नाही. तरी आता ह्रदयांतील स्वयंज्योति आत्मरुपास झाकणार्‍या माझ्या अज्ञानाची संपूर्ण निवृत्ति व्हावी. येवढीच इच्छा मृत्युक्षणी उभे असणारा मी धरीत आहे.   २६) ज्याने या विश्र्वाची उत्पत्ति कौशल्याने सौन्दर्यपूर्ण रीतीने केली आहे; जो या विश्र्वरुपी खेळण्याशी खेळतो, किंबहुना जो स्वतः विश्र्वरुप धारण करतो, व्यक्तभावांत येतो. असे असून जो या सतत परिवर्तन व नाशवंत विश्र्वापेक्षा सर्वस्वी भिन्न आहे, जो परमशुद्ध चैतन्यरुपाने प्रत्येक जीवशरीरात आत्मा या संज्ञेने निवास करतो; आणि जो अज परब्रह्म तत्त्वतः आहे, म्हणून ज्याची प्राप्ती अनुभूति मिळवणे हेच सर्वोच्य श्रेय आहे, त्या सर्वेश्र्वराला तीव्र मोक्षकांक्षी असा मी वंदन करतो.  २७) उत्कट अनन्य एकप्रवाही भक्तीने ज्यांनी आपला समग्र संचित कर्मसमूह दग्ध केला आहे, असे योगीजन ध्यान व समाधिद्वारे आपल्या ह्रदयांत ज्याला निःसंदेहाने पाहतात, अनुभवितात, त्या योगेश्र्वर परमात्म्याला मी आदराने नमन करतो.   २८) ज्याच्या त्रिगुणरुप शक्तीचा आवेग आणि प्रभाव असह्य, अनिवार आहे; जो इंद्रियांमध्ये विषयज्ञान होण्याची शक्ति या रुपाने राहतो, जे इंद्रियजन्य भोगसुखातच आसक्त होतात त्यांना जो कधीच प्राप्त होत नाही; परंतु जो सर्वभावाने शरणागत होणार्‍यांचे रक्षण करतो, जो अमर्याद शक्तिशाली व सर्वाधार आहे, व ज्याचा मी आता सर्वभावाने आश्रय घेत आहे, त्या परमात्म्याला माझे प्रणाम असोत.  २९) ज्याच्या शक्तिमुळे देहाभिमान धरण्याने माझी बुद्धि कलुषित झाली आहे, परिणामी आत्मतत्त्व रुपाने माझ्याच ठिकाणी असणार्‍या विशुद्ध परमात्म रुपास पाहण्यास मी असमर्थ झालो आहे, तरी मजवर कृपा कर आणि अविद्येचे आवरण काढून घे. तुझा महिमा, तारकशक्ति, आणि सामर्थ्य अमर्याद आहे. मी तुला सर्वस्वी शरण आलो आहे. माझा उद्धार कर.   ३०) श्रीशुक म्हणाले, याप्रमाणे त्या गजेन्द्राने अति आर्तभावाने भेद लक्षण गुण रहित अशा सर्वव्यापी सर्वांतर्यामी सर्वसमर्थ आदि परमात्म्याचे स्तवन आवाहन केले. त्याचसमयी विशिष्ट मूर्तरुप व भिन्नभिन्न नियतकार्य करणारे ब्रह्मदेवादि ज्येष्टदेव व लोकपालादि विश्र्वदेव यापैकी कोणीही सहायास आले नाहीत. तेव्हा सर्वदेवस्वरुप विश्र्वात्मा भगवान श्रीहरि हे स्वतःच त्याठिकाणी षडैश्र्वर्य तेजस्वी साकार स्वरुपात तत्काल प्रकट झाले.   ३१) त्या गजेन्द्राची मरणोन्मुख अवस्थेतील उत्कट भक्ति व समग्र अध्यात्मज्ञान आसणारी प्रार्थना ऐकून, आपल्या गरुड वाहनावर बसून आणि हातात शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधे धारण करुन, तसेच ज्येष्टकनिष्ट देवगणासह स्वतः जगदीश्र्वर श्रीहरि, जेथे गजेन्द्र होता तेथे तत्क्षणी प्रगटले.  ३२) सरोवराच्या आत असणार्‍या नक्राने दृढपणे धरलेल्या त्या वेदनार्त गजेन्द्राने आकाशांत अधांतरीच गरुडारुढ राहून उंचावलेल्या एका हातात सुदर्शनचक्र धरलेल्या  श्रीहरिस पाहिले. त्याने एक कमळ खुडले व सोंड उंचावून श्रीहरिच्या दिशेकडे ते फेकीत म्हटले, " हे जगद्गुरो भगवान नारायणा तुला नमस्कार असो."  ३३) गजेन्द्राची अत्यंत पीडित अवस्था पाहून, स्वयंभु भगवान नारायण लागलीच गरुडावरुन उतरुन परमकारुण्याने त्या गजेन्द्राला नक्रासह उचलून, सरोवराच्या बाहेर काठावर आणले, आणि क्षणांतच आपल्या सुदर्शन चक्राने नक्राचे मुख चिरले व गजेन्द्राची मृत्युभयातून सुटका केली. हे घटना सर्व ज्येष्ठ-कनिष्ठ देव अवाक् होऊन पाहात होते.   ३४-३६) देवऋषींच्या शापाने जो आतापर्यंत नक्र रुपाने सरोवरांत वावरत होता, तो पूर्वींचा हु हु नावाचा मान्यवर गंधर्व देव होता. आता परमात्मकृपेने शापमुक्त झाल्याने त्याला पुनः मूळचे स्वर्गीय तेजस्वी गंधर्व रुप प्राप्त झाले. त्याने परम कृतज्ञभावाने हात जोडून वाकून श्रीहरिला प्रणाम केला. आणि भगवंताभोवती प्रदक्षिणा घालून गंधर्वलोकाकडे प्रयाण केले. मकरदाढेतून मुक्त झालेला गजेन्द्र हा केवळ भगवत्सर्शानेच अज्ञानमुक्त झाला. यापुढे कोणत्याही योनीमध्ये जन्म घेण्याची इच्छा नसलेल्या या गजेन्द्रास चतुर्भुज-पीतांबरधारी श्रीहरी सदृश्य स्वरुप प्राप्त झाले. तो भगवंताचा "पार्षद" म्हणजे अखंड सहवासात राहणारा सेवक झाला. तो सुद्धा गरुडारुढ होऊन भगवान श्रीहरीच्या पाठीमागे बसला. सर्व देव, गंधर्व व सिद्ध समूह ही गजेन्द्र-उद्धाराची अद्भुत-मंगल लीला पहात होते. त्यांनी भगवंताचा जयजयकार केला. आणि गरुडारुढ भगवंताने निजधामाकडे प्रयाण केले.   अशा रीतीने महाभागवतांतील आठव्या स्कंदांतील हे गजेन्द्रमोक्ष स्तोत्र पुरे झाले.

Search

Search here.