श्रीगुरुचरित्र अध्याय २९ ते ३१

ग्रंथ - पोथी  > गुरुचरित्र Posted at 2019-02-09 14:40:54
श्रीगुरुचरित्र अध्याय २९ श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । नामधारक विनवी सिद्धासी । मागे कथा निरोपिलीसी । भस्ममाहात्म्य श्रीगुरूसी । पुसिले त्रिविक्रमभारतीने ॥१॥ पुढे कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्री । निरोप द्यावा सविस्तारी । सिद्धमुनि कृपासिंधु ॥२॥ ऐसे विनवी शिष्य राणा । ऐकोनि सिद्ध प्रसन्नवदना । सांगतसे विस्तारून । भस्ममाहात्म्य परियेसा ॥३॥ श्रीगुरु म्हणती त्रिविक्रमासी । भस्ममाहात्म्य मज पुससी । एकचित करूनि मानसी । सावधान ऐक पा ॥४॥ पूर्वापरी कृतयुगी । वामदेव म्हणिजे योगी । प्रसिद्ध गुरु तो जगी । वर्तत होता भूमीवरी ॥५॥ शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी । गृह-सारादि वर्जूनि । कामक्रोधादि त्यजूनि । हिंडत होता महीवरी ॥६॥ संतुष्ट निःस्पृह असे मौनी । भस्म सर्वांगी लावोनि । जटाधारी असे मुनि । वल्कल-वस्त्र व्याघ्राजिन ॥७॥ ऐसा मुनि भूमंडळात । नाना क्षेत्री असे हिंडत । पातला क्रौचारण्यात । जेथे नसे संचार मनुश्यमात्राचा ॥८॥ तया स्थानी असे एक । ब्रह्मराक्षस भयानक । मनुष्यादि जीव अनेक । भक्षीतसे परियेसा ॥९॥ ऐशा अघोर वनात । वामदेव गेला हिंडत । ब्रह्मराक्षस अवलोकित । आला घावोनि भक्षावया ॥१०॥ ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत । आला असे भक्षू म्हणत । करकरा दात खात । मुख पसरूनि जवळी आला ॥११॥ राक्षस येता देखोनि । वामदेव निःशंक धीर मनी । उभा असे महाज्ञानी । पातला राक्षस तयाजवळी ॥१२॥ राक्षस मनी संतोषत । ग्रास बरवा लाधला म्हणत । भक्षावया कांक्षा बहुत । येवोनि धरिला आलिंगोनि ॥१३॥ आलिंगिता मुनीश्वरासी । भस्म लागले राक्षसासी । जाहले ज्ञान तयासी । जातिस्मरण जन्मांतरीचे ॥१४॥ पातक गेले जळोनि । राक्षस झाला महाज्ञानी । जैसा लागता चिंतामणि । लोह सुवर्ण केवी होय ॥१५॥ जैसा मानससरोवरास । वायस जाता होय हंस । अमृत पाजिता मनुष्यास । देवत्व होय परियेसा ॥१६॥ जैसे का जंबूनदीत । घालिता मृत्तिका कांचन त्वरित । तैसा जाहला पापी पुनीत । मुनीश्वराचे अंगस्पर्श ॥१७॥ समस्त मिळती कामना । दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन । स्पर्श होता श्रीगुरुचरण । पापावेगळा होय नर ॥१८॥ ब्रह्मराक्षस भयानक । काय सांगो त्याची भूक । गजतुरग मनुष्यादिक । नित्य आहार करी सकळ ॥१९॥ इतुए भक्षिता तयासी । न वचे भूक परियेसी । तृषाक्रांत समुद्रासी । प्राशन करिता न वचे तृषा ॥२०॥ ऐसा पापिष्ट राक्षस । होता मुनीचा अंगस्पर्श । गेली क्षुधा-तृषा-आक्रोश । झाला ज्ञानी परियेसा ॥२१॥ राक्षस ज्ञानी होऊनि । लागला मुनीश्वराचे चरणी । त्राहि त्राहि गुरुशिरोमणि । तू साक्षात ईश्वर ॥२२॥ तारी तारी मुनिवरा । बुडालो अघोर सागरा । उद्धरावे दातारा । कृपासिंधु जगदीशा ॥२३॥ तुझ्या दर्शनमात्रेसी । जळत्या माझ्या पापराशी । तू कृपाळू भक्तांसी । तारी तारी जगद्गुरु ॥२४॥ येणेपरी मुनिवरास । विनवीतसे राक्षस । वामदेव कृपासुरस । पुसतसे तये वेळी ॥२५॥ वामदेव म्हणे तयासी । तुवा कवणाचा कवण वंशी । ऐसा अघोर ठायी वससी । मनुष्य मात्र नसे ते ठायी ॥२६॥ ऐकोनि मुनीचे वचन । ब्रह्मराक्षस करी नमन । विनवीतसे कर जोडोन । ऐक त्रिविक्रम मुनिराया ॥२७॥ म्हणे राक्षस तये वेळी । आपणासी ज्ञान जहाले सकळी । जातिस्मरण अनंतकाळी । पूर्वापरीचे स्वामिया ॥२८॥ तयामध्ये माझे दोष । उत्कृष्ट जन्म पंचवीस । दिसतसे प्रकाश । ऐक स्वामी वामदेवा ॥२९॥ पूर्वजन्मे पंचविसी । होया राजा यवन-देशी । ’दुर्जय’ नाम आपणासी । दुराचारी वर्तलो जाण ॥३०॥ म्या मारिले बहुत लोक । प्रजेसी दिधले दुःख । स्त्रिया वरिल्या अनेक । राज्यमदे करूनिया ॥३१॥ वरिल्या स्त्रियांव्यतिरिक्त । बलात्कारे धरिल्या अमित । एक दिवस देवोनि रति । पुनरपि न भोगी तयासी ॥३२॥ एके दिवशी एकीसी । रति देऊनि त्यजी तिसी । ठेविले अंतर्गृहासी । पुनरपि तीते न देखे नयनी ॥३३॥ ऐसे अनेक स्त्रियांसी । ठेविले म्या अंतर्गृहासी । माते शापिती अहर्निशी । दर्शन नेदी म्हणोनिया ॥३४॥ समस्त राजे जिंकोनिया । आणि स्त्रिया धरोनिया । एकेक दिवस भोगूनिया । त्याते ठेविले अंतर्गृहासी ॥३५॥ जेथे स्त्रिया सुरूपे असती । बळे आणोन देई मी रति । ज्या न येती संतोषवृत्ती । तया द्रव्य देऊनि आणवी ॥३६॥ विप्र होते माझे देशी । ते जाऊनि राहिले आणि देशी । जाऊनि आणी त्यांचे स्त्रियांसी । भोगी आपण उन्मत्तपणे ॥३७॥ पतिव्रता सुवासिनी । विधवा मुख्य करोनि । त्याते भोगी उन्मत्तपणी । रजस्वला स्त्रियांसी देखा ॥३८॥ विवाह न होता कन्यांसी । बलात्कारे भोगी त्यांसी । येणेपरी समस्त देशी । उपद्रविले मदांधपणे ॥३९॥ ब्राह्मणस्त्रिया तीन शते । शतचारी क्षत्रिया ते । वैश्यिणी वरिल्या षट्‍शत । शूद्रस्त्रिया सहस्त्र जाण ॥४०॥ एक शत चांडाळिणी । सहस्त्र वरिल्या पुलदिनी । पाच शत स्त्रिया डोंबिणी । रजकिणी वरिल्या शत चारी ॥४१॥ असंख्यात वारवनिता । भोगिल्या म्या उन्मत्तता । तथापि माझे मनी तृप्तता । नाही झाली स्वामिया ॥४२॥ इतुक्या स्त्रिया भोगून । संतुष्ट नव्हे माझे मन । विषयासक्त मद्यपान । करी नित्य उन्मत्ते ॥४३॥ वर्तता येणेपरी देखा । व्याधिष्ठ झालो यक्ष्मादिका । परराष्ट्रराजे चालोनि ऐका । राज्य हिरतले स्वामिया ॥४४॥ ऐसेपरी आपणासी । मरण जाहले परियेसी । नेले दूती यमपुरासी । मज नरकामध्ये घातले ॥४५॥ देवांसी सहस्त्र वर्षे देखा । दहा वेळ फिरविले ऐका । पितृसहित आपण देखा । नरक भोगिले येणेपरी ॥४६॥ पुढे जन्मलो प्रेतवंशी । विद्रूप देही परियेसी । सहस्त्र शिश्ने अंगासी । लागली असती परियेसी ॥४७॥ येणेपरी दिव्य शत वर्षे । कष्टलो बहु क्षुधार्थै । पुनरपि पावलो यमपंथ । अनंत कष्ट भोगिले ॥४८॥ दुसरा जन्म आपणासी । व्याघ्रजन्म जीवहिंसी । अजगर जन्म तृतीयेसी । चवथा जाहलो लांडगा ॥४९॥ पाचवा जन्म आपणासी । ग्रामसूकर परियेसी । सहावा जन्म जाहलो कैसी । सरडा होऊनि जन्मलो ॥५०॥ सातवा जन्म झालो श्वान । आठवा जंबुक मतिहीन । नवम जन्म रोही-हरण । दहावा झालो ससा देखा ॥५१॥ मर्कट जन्म एकादश । घारी झालो मी द्वादश । जन्म तेरावा मुंगूस । वायस जाहलो चतुर्दश ॥५२॥ जांबुवंत झालो पंचादश । रानकुक्कुट मी षोडश । जन्म जाहलो परियेस । पुढे येणेपरी अवधारी ॥५३॥ सप्तदश जन्मी आपण । गर्दभ झालो अक्षहीन । मार्जारयोनी । संभवून । आलो स्वामी अष्टादशेसी ॥५४॥ एकुणिसावे जन्मासी । मंडूक झालो परियेसी । कासवजन्म विशतीसी । एकविसावा मस्त्य झालो ॥५५॥ बाविसावा जन्म थोर । झालो तस्कर उंदीर । दिवांध झालो मी बधिर । उलूक जन्म तेविसावा ॥५६॥ जन्म चतुर्विशतीसी । झालो कुंजर तामसी । पंचविंशति जन्मासी । ब्रह्मराक्षस आपण देखा ॥५७॥ क्षुधाक्रांत अहर्निशी । कष्टतसे परियेसी । निराहारी अरण्यावासी । वर्ततसे स्वामिया ॥५८॥ तुम्हा देखता अंतःकरणी । वासना झालो भक्षीन म्हणोनि । यालागी आलो धावोनि । पापरूपी आपण देखा ॥५९॥ तुझा अंगस्पर्श होता । जातिस्मरण झाले आता । सहस्त्र जन्मीचे दुष्कृत । दिसतसे स्वामिया ॥६०॥ माते आता जन्म पुरे । तुझ्या अनुग्रहे मी तरे । घोरांधार संसार । आता यातना कडे करी ॥६१॥ तू तारक विश्वासी । म्हणोनि माते भेटलासी । तुझी दर्शनमहिमा कैसी । स्पर्श होता ज्ञान झाले ॥६२॥ भूमीवरी मनुष्य असती । तैसा रूप दिससी यति । परि तुझी महिमा ख्याति । निरुपम असे दातारा ॥६३॥ महापापी दुराचारी । आपण असे वनांतरी । तुझे अंगस्पर्शमात्री । ज्ञान जाहले अखिल जन्मांचे ॥६४॥ कैसा महिमा तुझ्या अंगी । ईश्वर होशील की जगी । आम्हा उद्धारावयालागी । आलासी स्वामी वामदेवा ॥६५॥ ऐसे म्हणता, राक्षसासी । वामदेव सांगे संतोषी । भस्ममहिमा आहे ऐशी । माझे अंगीची परियेसा ॥६६॥ सर्वांग माझे भस्मांकित । तुझे अंगा लागले क्वचित । त्याणे झाले तुज चेत । ज्ञानप्रकाश शत जन्मांतरीचे ॥६७॥ भस्ममहिमा अपरांपर । परि ब्रह्मादिका अगोचर । याचिकारणे कर्पूरगौर । भूषण करी सर्वांगी ॥६८॥ ईश्वरे वंदिल्या वस्तूसी । वर्णिता अशक्य आम्हांसी । तोचि शंकर व्योमकेशी । जाणे भस्ममहिमान ॥६९॥ जरी तू पुससी आम्हांसी । सांगेन दृष्टांत परियेसी । आम्ही देखिले दृष्टीसी । अपार महिमा भस्माचा ॥७०॥ विप्र एक द्रविडदेशी । आचारहीन परियेसी । सदा रत शूद्रिणीसी । कर्मभ्रष्ट वर्तत होता ॥७१॥ समस्त मिळोनि विप्रयाति । तया द्विजा बहिष्कारिती । मातापिता दाईज गोती । त्यजिती त्यासी बंधुवर्ग ॥७२॥ येणेपरी तो ब्राह्मण । प्रख्यात झाला आचारहीन । शूद्रिणीते वरून । होता काळ रमूनिया ॥७३॥ ऐसा पापी दुराचारी । तस्करविद्येने उदर भरी । आणिक स्त्रियांशी व्यभिचारी । उन्मत्तपणे परियेसा ॥७४॥ वर्तता ऐसे एके दिवसी । गेला होता व्यभिचारासी । तस्करविद्या करिता निशी । वधिले त्यासी एके शूद्र ॥७५॥ वधूनिया विप्रासी । ओढोनि नेले तेचि निशी । टाकिले बहिर्ग्रामेसी । अघोर स्थळी परियेसा ॥७६॥ श्वान एक तये नगरी । बैसला होता भस्मावरी । क्षुधाक्रांत अवसरी । गेला हिंडत प्रेतघ्राणी ॥७७॥ देखोनि तया प्रेतासी । गेला श्वान भक्षावयासी । प्रेतावरी बैसून हर्षी । क्षुधानिवारण करीत होता ॥७८॥ भस्म होते श्वानाचे पोटी । लागले प्रेताचे ललाटी । वक्षःस्थळी बाहुवटी । लागले भस्म परियेसा ॥७९॥ प्राण त्यजिता द्विजवर । नेत होते यमकिंकर । नानापरी करीत मार । यमपुरा नेताति ॥८०॥ कैलासपुरीचे शिवदूत । देखोनि आले ते प्रेत । भस्म सर्वांगी उद्धूलित । म्हणती याते कवणे नेले ॥८१॥ याते योग्य शिवपुर । केवी नेले ते यमकिंकर । म्हणोनि धावती वेगवक्त्रे । यमकिंकरा मारावया ॥८२॥ शिवदूत येता देखोनि । यमदूत जाती पळोनि । तया द्विजाते सोडूनि । गेले आपण यमपुरा ॥८३॥ जाऊनि सांगती यमासी । गेलो होतो भूमीसी । आणीत होतो पापियासी । अघोररूपेकरूनिया ॥८४॥ ते देखोनि शिवदूत । धावत आले मारू म्हणत । हिरोनि घेतले प्रेत । वधीत होते आम्हांसी ॥८५॥ आता आम्हा काय गति । कधी न वचो त्या क्षिती । आम्हांसी शिवदूत मारिती । म्हणोनि विनविती यमासी ॥८६॥ ऐकोनि दूतांचे वचन । यम निघाला कोपून । गेला त्वरित ठाकून । शिवदूताजवळी देखा ॥८७॥ यम म्हणे शिवदूतांसी । का मारिले माझ्या किंकरासी । हिरोनि घेतले पापियासी । केवी नेता शिवमंदिरा ॥८८॥ याचे पाप असे प्रबळ । जितकी गंगेत असे वाळू । तयाहूनि अधिक केवळ । अघोररूप असे देखा ॥८९॥ नव्हे योग हा शिवपुरासी । याते बैसवोनि विमानेसी । केवी नेता मूढपणेसी । म्हणोनि कोपे यम देखा ॥९०॥ ऐकोनि यमाचे वचन । शिवदूत सांगती विस्तारून । प्रेतकपाळी लांछन । भस्म होते परियेसा ॥९१॥ वक्षःस्थळी ललाटेसी । बाहुमूळी करकंकणेसी । भस्म लाविले प्रेतासी । केवी आतळती तुझे दूत ॥९२॥ आम्हा आज्ञा ईश्वराची । भस्मांकित तनु मानवाची । जीव आणावा त्या नराचा । कैलासपदी शाश्वत ॥९३॥ भस्म कपाळी असत । केवी आतळती तुझे दूत । तात्काळी होतो वधित । सोडिले आम्हा धर्मासी ॥९४॥ पुढे तरी आपुल्या दूता । बुद्धि सांगा तुम्ही आता । जे नर असती भस्मांकिता । त्याते तुम्ही न आणावे ॥९५॥ भस्मांकित नरासी । दोष न लागती परियेसी । तो योग्य होय स्वर्गासी । म्हणोनि सांगती शिवदूत ॥९६॥ शिवदूत वचन ऐकोन । यमधर्म गेला परतोन । आपुले दूता पाचारून । सांगतसे परियेसा ॥९७॥ यम सांगे आपुले दूता । भूमीवरी जाऊनि आता । जे कोण असतील भस्मांकित । त्याते तुम्ही न आणावे ॥९८॥ अनेकपरी दोष जरी । केले असतील धुरंधरी । त्याते न आणावे आमुचे पुरी । त्रिपुंड टिळक नरासी ॥९९॥ रुद्राक्षमाळा ज्याचे गळा । असेल त्रिपुंड्र टिळा । त्याते तुम्ही नातळा । आज्ञा असे ईश्वराची ॥१००॥ वामदेव म्हणे राक्षसासी । या विभूतीचा महिमा असे ऐशी । आम्ही लावितो भक्तीसी । देवादिका दुर्लभ ॥१॥ पाहे पा ईश्वर प्रीतीसी । सदा लावितो भस्मासी । ईश्वरे वंदिल्या वस्तूसी । कवण वर्णू शके सांग मज ॥२॥ ऐकोनि वामदेवाचे वचन । ब्रह्मराक्षस करी नमन । उद्धारावे जगज्जीवना । ईश्वर तूचि वामदेवा ॥३॥ तुझे चरण मज भेटले । सहस्त्र जन्मीचे ज्ञान जाहाले । काही पुण्य होते केले । त्याणे गुणे भेटलासी ॥४॥ आपण जधी राज्य करिता । केले पुण्य स्मरले आता । तळे बांधविले रानात । दिल्ही वृत्ति ब्राह्मणांसी ॥५॥ इतुके पुण्य आपणासी । घडले होते परियेसी । वरकड केले सर्व दोषी । राज्य करिता स्वामिया ॥६॥ जधी नेले यमपुरासी । यमे पुसिले चित्रगुप्तासी । माझे पुण्य त्या यमासी । चित्रगुप्ते सांगितले ॥७॥ तघी माते यमधर्मे आपण । सांगितले होते हे पुण्य । पंचविशति जन्मी जाण । फळासी येईल म्हणोनि ॥८॥ तया पुण्यापासोन । भेटी जाहली तुझे चरण । करणे स्वामी उद्धारण । जगद्गुरु वामदेवा ॥९॥ या भस्माचे महिमान । कैसे लावावे विघान । कवण मंत्र-उद्धारण । विस्तारूनि सांग मज ॥११०॥ वामदेव म्हणे राक्षसासी । विभूतीचे धारण मज पुससी । सांगेन आता विस्तारेसी । एकचित्ते ऐक पा ॥११॥ पूर्वी मंदरगिरिपर्वती । क्रीडेसी गेले गिरिजापति । कोटि रुद्रादिगणसहिती । बैसले होते वोळगेसी ॥१२॥ तेहतीस कोटी देवांसहित । देवेंद्र आला तेथे त्वरित । अग्नि वरुण यमसहित । कुबेर वायु आला तेथे ॥१३॥ गंध्र्व यक्ष चित्रसेन । खेचर पन्नग विद्याधरण । किंपुरुष सिद्ध साध्य जाण । आले गुह्यक सभेसी ॥१४॥ देवाचार्य बृहस्पति । वसिष्ठ नारद तेथे येती । अर्यमादि पितृसहिती । तया ईश्वर-वोळगेसी ॥१५॥ दक्षादि ब्रह्मा येर सकळ । आले समस्त ऋषिकुळ । उर्वश्यादि अप्सरामेळ । आले त्या ईश्वरसभेसी ॥१६॥ चंडिकासहित शक्तिगण देखा । आदित्यादि द्वादशार्का । अष्ट वसू मिळोन ऐका । आले ईश्वराचे सभेसी ॥१७॥ अश्विनी देवता परियेसी । विश्वेदेव मिळून निर्दोषी । आले ईश्वरसभेसी । ऐके ब्रह्मराक्षसा ॥१८॥ भूतपति महाकाळ । नंदिकेश्वर महानीळ । काठीकर दोघे प्रबळ । उभे पार्श्वी असती देखा ॥१९॥ वीरभद्र शंखकर्ण । मणिभद्र षट्‍कर्ण । वृकोदर देवमान्य । कुंभोदर आले तेथे ॥१२०॥ कुंडोदर मंडोदर । विकटकर्ण कर्णधार । घारकेतु महावीर । भुतनाथ तेथे आला ॥२१॥ भृंगी रिटी भूतनाथ । नानारूपी गण समस्त । नानावर्ण मुखे ख्यात । नानावर्ण-शरीर-अवयवी ॥२२॥ रुद्रगणाची रूपे कैसी । सांगेन ऐका विस्तारेसी । कित्ये कृष्णवर्णैसी । श्वेत-पीत-धूम्रवर्ण ॥२३॥ हिरवे ताम्र सुवर्ण । लोहित चित्रविचित्र वर्ण । म्डूकासारिखे असे वदन । रुद्रगण आले तेथ ॥२४॥ नानाआयुधे-शस्त्रेसी । नाना वाहन भूषणेसी । व्याघ्रमुख कित्येकांसी । किती सूकर-गजमुखी ॥२५॥ कित्येक नक्रमुखी । कित्येक श्वान-मृगमुखी । उष्ट्रवदन कित्येकी । किती शरभ-शार्दूलवदने ॥२६॥ कित्येक भैरुंडमुख । सिंहमुख कित्येक । दोनमुख गण देख । चतुर्मुख गण कितीएक ॥२७॥ चतुर्भुज गण अगणिक । कितीएका नाही मुख । ऐसे गण तेथे येती देख । ऐक राक्षसा एकचित्ते ॥२८॥ एकहस्त द्विहस्तेसी । पाच सहा हस्तकेसी । पाद नाही कितीएकांसी । बहुपादी किती जाणा ॥२९॥ कर्ण नाही कित्येकांसी । एककर्ण अभिनव कैसी । बहुकर्ण परियेसी । ऐसे गुण येती तेथे ॥१३०॥ कित्येकांसी नेत्र एक । कित्येका चारी नेत्र विचित्र । किती स्थूळ कुब्जक । ऐसे गण ईश्वराचे ॥३१॥ ऐशापरीच्या गणांसहित । बैसला शिव मूर्तिमंत । सिंहासन रत्‍नखचित । सप्त प्रभावळीचे ॥३२॥ आरक्त एक प्रभावळी । तयावरी रत्‍ने जडली । अनुपम्य दिसे निर्मळी । सिंहासन परियेसा ॥३३॥ दुसरी एक प्रभावळी । हेमवर्ण पिवळी । मिरवीतसे रत्‍ने बहळी । सिंहासन ईश्वराचे ॥३४॥ तिसरिये प्रभावळीसी । नीलवर्णे रत्‍ने कैसी । जडली असती कुसरीसी । सिंहासन ईश्वराचे ॥३५॥ शुभ्रचतुर्थ प्रभावळी । रत्‍नखचित असे कमळी । आरक्तवर्ण असे जडली । सिंहासन शंकराचे ॥३६॥ वैडूर्यरत्‍नखचित । मोती जडली असती बहुत । पाचवी प्रभावळी ख्यात । सिंहासन ईश्वराचे ॥३७॥ सहावी भूमि नीलवर्ण । भीतरी रेखा सुवर्णवर्ण । रत्‍ने जडली असती गहन । अपूर्व देखा त्रिभुवनांत ॥३८॥ सातवी ऐसी प्रभावळी । अनेक रत६ने असे जडली । जे का विश्वकर्म्याने रचिली । अपूर्व देखा त्रिभुवनांत ॥३९॥ ऐशा सिंहासनावरी । बैसलासे त्रिपुरारि । कोटिसूर्य तेजासरी । भासतसे परियेसा ॥१४०॥ महाप्रळयसमयासी । सप्तार्णव-मिळणी जैसी । तैसिया श्वासोच्छ्‌वासेसी । बैसलासे ईश्वर ॥४१॥ भाळनेत्र ज्वाळमाळा । संवर्ताग्नि जटामंडळा । कपाळी चंद्र षोडशकळा । शोभतसे सदाशिव ॥४२॥ तक्षक देखा वामकर्णी । वासुकी असे कानी दक्षिणी । तया दोघांचे नयन । नीलरत्‍नापरी शोभती ॥४३॥ नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण । सर्पाचेचि करी कंकण । मुद्रिकाही देखा सर्पाचिया ॥४४॥ मेखला तया सर्पाचे । चर्मपरिधान व्याघ्राचे । शोभा घंटी दर्पणाचे । ऐसेपरी दिसतसे ॥४५॥ कर्कोटक-महापद्म । केली नूपुरे पाईंजण । जैसा चंद्र-संपूर्ण । तैसा शुभ्र दिसतसे ॥४६॥ म्हणोनि कर्पूरगौर म्हणती । ध्यानी ध्याईजे पशुपति । ऐसा भोळाचक्रवर्ती । बैसलासे सभेत ॥४७॥ रत्‍नमुकुट असे शिरी । नागेंद्र असे केयूरी । कुंडलांची दीप्ति थोरी । दिसतसे ईश्वर ॥४८॥ कंठी सर्पाचे हार । नीलकंथ मनोहर । सर्वांगी सर्पाचे अलंकार । शोभतसे ईश्वर ॥४९॥ शुभ्र कमळे अर्चिला । की चंदने असे लेपिला । कर्पूरकेळीने पूजिला । ऐसा दिसे ईश्वर ॥१५०॥ दहाभुजा विस्तारेसी । एकेक हाती आयुधेसी । बैसलासे सभेसी । सर्वेश्वर शंकर ॥५१॥ एके हाती त्रिशूळ देखा । दुसरा डमरू सुरेखा । येरे हाती खड्ग तिखा । शोभतसे ईश्वर ॥५२॥ पानपात्र एका हाती । धनुष्य-बाणे कर शोभती । खट्वांग फरश येरे हाती । अंकुश करी मिरवीतसे ॥५३॥ मृग धरिला असे करी देखा । ऐसा तो हा पिनाका । दहाभुजा दिसती निका । बैसलासे सभेत ॥५४॥ पंचवक्त्र सर्वेश्वर । एकेक मुखाचा विस्तार । दिसतसे सालंकार । सांगेन ऐका श्रोतेजन ॥५५॥ कलंकाविणे चंद्र जैसा । किंवा क्षीरफेन ऐसा । भस्मभूषणे रूपे कैसा । दिसे मन्मथाते दाहोनिया ॥५६॥ सूर्य-चंद्र अग्निनेत्र । नागहार कटिसूत्र । दिसे मूर्ति पवित्र । सर्वेश्वर परियेसा ॥५७॥ शुभ्र टिळक कपाळी । बरवा शोभे चंद्रमौळी । हास्यवदन केवळी । अपूर्व देखा श्रीशंकर ॥५८॥ दुसरे मुख उत्तरेसी । शोभतसे विस्तारेसी । ताम्रवर्णाकार कमळेसी । अपूर्व दिसे परियेसा ॥५९॥ जैसे दाडिंबाचे फूल । किंवा प्रातःरविमंडळ । तैसे मिरवे मुखकमळ । ईश्वराचे परियेसा ॥१६०॥ तिसरे मुख पूर्वदिशी । गंगा अर्धचंद्र शिरसी । जटाबंदन केली कैसी । सर्पवेष्टित परियेसा ॥६१॥ चवथे मुख दक्षिणेसी । मिरवे नीलवर्णेसी । विक्राळ दाढा दारुणेसी । दिसतसे तो ईश्वर ॥६२॥ मुखांहूनि ज्वाला निघती । तैसा दिसे तीव्रमूर्ति । रुंडमाळा शोभती । सर्पवेष्टित परियेसा ॥६३॥ पाचवे असे ऐसे वदन । व्यक्ताव्यक्त असे जाण । साकार निराकार सगुण । सगुण निर्गुण ईश्वर ॥६४॥ सलक्षण निर्लक्षण । ऐसे शोभतसे वदन । परब्रह्म वस्तु तो जाण । सर्वेश्वर पंचमुखी ॥६५॥ काळ व्याळ सर्प बहुत । कंठी माळ मिरवे ख्यात । चरण मिरविती आरक्त । कमळापरी ईश्वराचे ॥६६॥ चंद्रासारिखी नखे देखा । मिरवे चरणी पादुका । अळंकार-सर्प ऐका । शोभतसे परमेश्वर ॥६७॥ व्याघ्रांबर पांघरुण । सर्प बांधले असे आपण । गाठी बांधिली असे जाण । नागबंधन करूनिया ॥६८॥ नाभी चंद्रावळी शोभे । ह्रदयी कटाक्ष रोम उभे । परमार्थमूर्ति लाभे । भक्तजना मनोहर ॥६९॥ ऐसा रुद्र महाभोळा । सिंहासनी आरूढला । पार्वतीसहित शोभला । बैसलासे परमेश्वर ॥१७०॥ पार्वतीचे श्रृंगार । नानापरीचे अलंकार । मिरवीतसे अगोचर । सर्वेश्वरी परियेसा ॥७१॥ कनकचाफे गोरटी । मोतियांचा हार कंठी । रत्‍नखचित मुकुटी । नागबंदी दिसतसे ॥७२॥ नानापरीच्या पुष्पजाति । मुकुटावरी शोभती । तेथे भ्रमर आलापिती । परिमळालागी परियेसा ॥७३॥ मोतियांची थोर जाळी । मिरवीतसे मुकुटाजवळी । रत्‍ने असती जडली । शोभायमान दिसतसे ॥७४॥ मुख दिसे पूर्णचंद्र । मिरवतसे हास्य मंद । जगन्माता विश्ववंद्य । दिसतसे परमेश्वरी ॥७५॥ नासिक बरवे सरळ । तेथे म्रिअवे मुक्ताफळ । त्यावरी रत्‍ने सोज्ज्वळ । जडली असती शोभायमान ॥७६॥ अधर पवळवेली दिसे । दंतपंक्ति रत्‍न जैस । ऐसी माता मिरवतसे । जगन्माता परियेसा ॥७७॥ कानी तानवडे भोवरिया । रत्‍नखचित मिरवलिया । अलंकार महामाया । लेइली असे जगन्माता ॥७८॥ पीतवर्ण चोळी देखा । कुच तटतटित शोभे निका । एकावेळी रत्‍ने अनेका । शोभतसे कंठी हार ॥७९॥ कालव्याल सर्प थोर । स्तनपान करिती मनोहर । कैसे भाग्य दैव थोर । त्या सर्पाचे परियेसा ॥१८०॥ आरक्त वस्त्र नेसली । जैसे दाडिंब पुष्पवेली । किंवा कुंकुमे डवरिली । गिरिजा माता परियेसा ॥८१॥ बाहुदंड सुरेखा । करी कंकण मिरवे देखा । रत्‍नखचित मेखळा देखा । लेईली असे अपूर्व जे ॥८२॥ चरण शोभती महा बरवे । असती नेपुरे स्वभावे । ऐसे पार्वती-ध्यान ध्यावे । म्हणती गण समस्त ॥८३॥ अष्टमीच्या चंद्रासारिखा । मिरवे टिळक काअळी कैसा त्रिपुंड्र टिळा शुभ्र जैसा । मोतियांचा परियेसा ॥८४॥ नानापरीचे अलंकार । अनेकपरीचे श्रृंगार । कवण वर्णू शके पार । जगन्माता अंबिकेचा ॥८५॥ ऐसा शंभु उमेसहित । बैसलासे सभेत । तेहतीस कोटि परिवारसहित । इंद्र उभा वोळगेसी ॥८६॥ उभे समस्त सुरवर । देवऋषि सनत्कुमार । आले तेथे वेगवक्त्रे । तया ईश्वरसभेसी ॥८७॥ सनत्कुमार तये वेळी । लागतसे चरणकमळी । साष्टांग नमन बहाळी । विनवीतसे शिवासी ॥८८॥ जय जया उमाकांता । जय जया शंभु विश्वकर्ता । त्रिभुवनी तूचि दाता । चतुर्विध पुरुषार्थ ॥८९॥ समस्त धर्म आपणासी । स्वामी निरोपिले कृपेसी । भवार्णवी तरावयासी । पापक्षयाकारणे ॥१९०॥ आणिक एक आम्हा देणे । मुक्ति होय अल्पपुण्ये । चारी पुरुषार्थ येणे गुणे । अनायासे साधिजे ॥९१॥ एर्‍हवी समस्त पुण्यासी । करावे कष्त असमसहासी । हितार्थ सर्व मानवांसी । निरोपावे स्वामिया ॥९२॥ ऐसे विनवी सनत्कुमा । मनी संतोषोनिया ईश्वर । सांगता झाला कर्पूरगौर । सनत्कुमार मुनीसी ॥९३॥ ईश्वर म्हणे तयेवेळी । ऐका देव ऋषि सकळी । घडे धर्म तात्काळी । ऐसे पुण्य सांगेन ॥९४॥ वेदशास्त्रसंमतेसी । असे धर्म परियेसी । अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी । भस्मांकित परियेसा ॥९५॥ ऐकोनि विनवी सनत्कुमार । कवणे विधी लाविजे नर । कवण ’स्थान’, ’द्रव्य’ परिकर । ’शक्ति’ ’देवता’ कवण असे ॥९६॥ कवण ’कर्तृ’ किं ’प्रमाण’ । कोण ’मंत्रे’ लाविजे आपण । स्वामी सांगा विस्तारून । म्हणोनि चरणी लागला ॥९७॥ ऐसी विनंती ऐकोनि । सांगे शंकर विस्तारोनि । गोमय द्रव्य, देवता-अग्नि । भस्म करणे परियेसा ॥९८॥ पुरातनीचे यज्ञस्थानी । जे का असे मेदिनी । पुण्य बहुत लाविताक्षणी । भस्मांकिता परियेसा ॥९९॥ सद्योजाता’दि मंत्रेसी । घ्यावे भस्म तळहस्तासी । अभिमंत्रावे भस्मासी । ’अग्निरित्या’दि मंत्रेकरोनि ॥२००॥ ’मानस्तोके’ ति मंत्रेसी । संमदावे अंगुष्ठेसी । त्र्यंबकादि मंत्रेसी । शिरसी लाविजे परियेसा ॥१॥ ’त्र्यायुषे’ ति मंत्रेसी । लाविजे ललाटभुजांसी । त्याणेची मंत्रे परियेसी । स्थानी स्थानी लाविजे ॥२॥ तीनी रेखा एके स्थानी । लावाव्या त्याच मंत्रांनी । अधिक न लाविजे भ्रुवांहुनी । भ्रूसमान लाविजे ॥३॥ मध्यमानामिकांगुळेसी । लाविजे पहिले ललाटेसी । प्रतिलोम-अंगुष्ठेसी । मध्यरेषा काढिजे ॥४॥ त्रिपुंड्र येणेपरी । लाविजे तुम्ही परिकरी । एक एक रेखेच्या विस्तारी । सांगेन ऐका एकचित्ते ॥५॥ नव देवता विख्यातेसी । असती एकेक रेखेसी । ’अ’ कार गार्हपत्यासी । भूरात्मा रजोगुण ॥६॥ ऋग्वेद आणि क्रियाशक्ति । प्रातःसवन असे ख्याति । महादेव-देव म्हणती । प्रथम रेखा येणेपरी ॥७॥ दुसरे रेखेची देवता । सांगेन ऐका विस्तारता । ’उ’ कार दक्षिणाग्नि देवता । नभ सत्त्व जाणावे ॥८॥ यजुर्वेद म्हणिजे त्यासी । मध्यंदिन-सवन परियेसी । इच्छाशक्ति अंतरात्मेसी । महेश्वर-देव जाण ॥९॥ तिसरी रेखा मधिलेसी । ’म’ कार आहवनीय परियेसी । परमात्मा दिव हर्षी । ज्ञानशक्ति तमोगुण ॥२१०॥ तृतीयसवन परियेसी । सामवेद असे त्यासी । शिवदैवत निर्धारेसी । तीनि रेखा येणेविधि ॥११॥ ऐसे नित्य नमस्कारूनि । त्रिपुंड्र लाविजे भस्मेनि । महेश्वराचे व्रत म्हणोनि । वेदशास्त्रे बोलताति ॥१२॥ मुक्तिकामे जे लाविती । त्यासी पुनरावृत्ति । जे जे मनी संकल्पिती । लाधे चारी पुरुषार्थ ॥१३॥ ब्रह्मचारी-गृहस्थासी । वानप्रस्थ-यतीसी । समस्ती लाविजे हर्षी । भस्मांकित त्रिपुंड्र ॥१४॥ महापापी असे आपण । उपपातकी जरी जाण । भस्म लाविता तत्क्षण । पुण्यात्मा तोचि होय ॥१५॥ क्षत्रिय-वैश्य-शूद्र-स्त्रीवध्यासी । गोहत्यादि-पातकासी । वीरहत्या-आत्महत्येसी । शुद्धात्मा करी भस्मांकित ॥१६॥ विधिपूर्वक मंत्रेसी । जे लाविती भक्तीसी । त्यांची महिमा अपारेसी । वंद्य होय देवलोकी ॥१७॥ जरी नेणे मंत्रासी । त्याणे लाविजे भावशुद्धीसी । त्याची महिमा अपारेसी । एकचित्ते परियेसा ॥१८॥ परद्रव्यहारक देखा । परस्त्रीगमन ऐका असेल पापी परनिंदका । तोही पुनीत होईल जाणा ॥१९॥ परक्षेत्रहरण देखा । परपीडक असेल जो का । सस्य आराम तोडी का । ऐसा पातकी पुनीत होई ॥२२०॥ गृहदाहादि केला दोष । असत्यवादी परियेस । पैशून्यपण पापास । वेदविक्रय पाप जाणा ॥२१॥ कूटसाक्षी व्रतत्यागी । कौटिल्य करी पोटालागी । ऐसी पाप सदा भोगी । तोही पुनीत होय जाणा ॥२२॥ गाई-भूमि-हिरण्यदान । म्हैषी-तीळ-कंबळदान । घेतले असेल वस्त्रान्न । तोही पुनीत होय जाणा ॥२३॥ धान्यदान जलादिदान । घेतले असेल नीचापासून । त्याणे करणे भस्मधारण । तोही पुनीत होय जाणा ॥२४॥ दासी-वेश्या-भुजंगीसी । वृषलस्त्री-रजस्वलेसी । केले असती जे का दोषी । तोही पुनीत जाणा ॥२५॥ कन्या विधवा अन्य स्त्रियांशी । घडला असेल संग जयासी । अनुतप्त होऊनि परियेसी । भस्म लाविता पुनीत होईल ॥२६॥ रस-मांस-लवणादिका । केला असेल विक्रय जो का । पुनीत होय भस्मसंपर्का । त्रिपुंड्र लाविता परियेसा ॥२७॥ जाणोनि अथवा अज्ञानता । पाप घडले असंख्याता । भस्म लाविता पुनीता । पुण्यात्मा होय जाणा ॥२८॥ नाशी समस्त पापांसी । भस्ममहिमा आहे ऐशी । शिवनिंदक पापियासी । न करी पुनीत परियेसा ॥२९॥ शिवद्रव्य अपहारकासी । निंदा करी शिवभक्तांसी । न होय निष्कृति त्यासी । पापावेगळा नव्हे जाणा ॥२३०॥ रुद्राक्षमाळा जयाचे गळा । लाविला असेल त्रिपुंड्र टिळा । अन्य पापी होय केवळा । तोही पूज्य तीही लोकी ॥३१॥ जितुकी तीर्थे भूमीवरी । असतील क्षेत्रे नानापरी । स्नान केले पुण्य-सरी । भस्म लाविता परियेसा ॥३२॥ मंत्र असती कोटी सात । पंचाक्षरादि विख्यात । अनंत आगम असे मंत्र । जपिले फळ भस्मांकिता ॥३३॥ पूर्वजन्म-सहस्त्रांती । सहस्त्र जन्म पुढे होती । भस्मधारणे पापे जाती । बेचाळीस वंशादिक ॥३४॥ इहलोकी अखिल सौख्य । होती पुरुष शतायुष्य । व्याधि न होती शरीरास । भस्म लाविता नरासी ॥३५॥ अष्टैश्वर्यै होती त्यासी । दिव्य शरीर परियेसी । अंती ज्ञान होईल निश्चयेसी । देहांती तया नरा ॥३६॥ बैसवोनि दिव्य विमानी । देवस्त्रिया शत येऊनि । सेवा करिती येणे गुणी । घेऊनि जाती स्वर्गभुवना ॥३७॥ विद्याधर सिद्धजन । गंधर्वादि देवगण । इंद्रादि लोकपाळ जाण । वंदिती समस्त तयासी ॥३८॥ अनंतकाळ तया स्थानी । सुखे असती संतोषोनि । मग जाती तेथोनि । ब्रह्मलोकी शाश्वत ॥३९॥ एकशत कल्पवरी । रहाती ब्रह्मलोकी स्थिरी । तेथोनि जाती वैकुंठपुरी । विष्णुलोकी परियेसा ॥२४०॥ ब्रह्मकल्प तीनवरी । रहाती नर वैकुंठपुरी । मग पावती कैलासपुरी । अक्षय काळ तेथे रहाती ॥४१॥ शिवसायुज्य होय त्यासी । संदेह सोडोनिया मानसी । लावा त्रिपुंड्र भक्तीसी । सनत्कुमारादि सकळिक हो ॥४२॥ वेदशास्त्रदि उपनिषदार्थ । सार पाहिले मी अवलोकित । चतुर्विध पुरुषार्थ । भस्मधारणे होय जाणा ॥४३॥ ऐसे त्रिपुंड्रमहिमान । सांगितले ईश्वरे विस्तारून । लावा तुम्ही सकळ जन । सनत्कुमारादि ऋषीश्वर हो ॥४४॥ सांगोनि सनत्कुमारासी । गेला ईश्वर कैलासासी । सनत्कुमार महाहर्षी । गेला ब्रह्मलोकाप्रती ॥४५॥ वामदेव महामुनि । सांगती ऐसे विस्तारोनि । ब्रह्मराक्षसे संतोषोनि । नमन केले चरणकमलासी ॥४६॥ वामदे म्हणे राक्षसासी । भस्ममाहात्म्य आहे ऐसी । माझे अंगस्पर्शेसी । ज्ञान तुज प्रकाशिले ॥४७॥ ऐसे म्हणोनि संतोषी अभिमंत्रोनि भस्मासी । देता झाला राक्षसासी । वामदेव तया वेळी ॥४८॥ ब्रह्मराक्षस तया वेळी । लाविता त्रिपुंड्र कपाळी । दिव्यदेह तात्काळी । तेजोमूर्ति जाहला परियेसा ॥४९॥ दिव्य अवयव झाले त्यासी । जैसा सूर्यसंकाशी । झाला आनंदरूप कैसी । ब्रह्मराक्षस तया वेळी ॥२५०॥ नमन करूनि योगीश्वरासी । केली प्रदक्षिणा भक्तीसी । विमान आले तत्‌क्षणेसी । सूर्यसंकाश परियेसा ॥५१॥ दिव्य विमानी बैसोनि । गेला स्वर्गासी तत्क्षणी । वामदेव महामुनी । दिधला तयासी परलोक ॥५२॥ वामदेव महादेव । मनुष्यरूप दिसतो स्वभाव । प्रत्यक्ष जाणा तो शांभव । हिंडे भक्त तारावया ॥५३॥ त्रयमूर्तीचा अवतारु । वामदेव तोचि गुरु । करावया जगदोद्धारु । हिंडत होता भूमीवरी ॥५४॥ भस्ममाहात्म्य असे थोरु । विशेष हस्तस्पर्श गुरु । ब्रह्मराक्षसासी दिधला वरु । उद्धार गति परियेसा ॥५५॥ समस्त मंत्र असती । गुरूविणे साध्य नव्हती । वेदशास्त्रे वाखाणिती । ’नास्ति तत्त्वं गुरोः परम’ ॥५६॥ सूत म्हणे ऋषेश्वरांसी । भस्ममाहात्म्य आहे ऐसी । गुरुहस्ते असे विशेषी । तस्माद्‍ गुरुचि कारण ॥५७॥ येणेपरी त्रिविक्रमासी । सांगती श्रीगुरु विस्तारेसी । त्रिविक्रमभारती हर्षी । चरणांवरी माथा ठेवित ॥५८॥ नमन करूनि श्रीगुरूसी । निघाला आपुले स्थानासी । झाले ज्ञान समस्तांसी । श्रीगुरूच्या उपदेशे ॥५९॥ येणेपरी सिद्धमुनि । सांगते झाले विस्तारूनि । ऐकतो शिष्य नामकरणी । भक्तिभावेकरूनिया ॥२६०॥ म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । भक्तिभावे ऐकती नर । लाघे चारी पुरुषार्थ ॥२६१॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे भस्ममहिमावर्णन नाम एकोनत्रिंशोऽध्यायः ॥२९॥ --------------------------------------------------------------- अध्याय ३० श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा । विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेकरूनिया ॥१॥ जय जया सिद्धमुनि । तूचि तारक भवार्णी । अज्ञानतिमिर नासोनि । ज्योतिःस्वरूप तूचि होसी ॥२॥ अविद्यामायासागरी । बुडालो होतो महापुरी । तुझी कृपा जाहली तरी । तारिले माते स्वामिया ॥३॥ तुवा दाविला निज-पंथ । जेणे जोडे परमार्थ । विश्वपालक गुरुनाथ । तूचि होसी स्वामिया ॥४॥ गुरुचरित्र सुधारस । तुवा पाजिला आम्हांस । तृप्त न होय गा मानस । तृषा आणिक होतसे ॥५॥ तुवा केलिया उपकारासी । उत्तीर्ण नव्हे मी वंशोवंशी । निजस्वरूप आम्हांसी । दाविले तुम्ही सिद्धमुनि ॥६॥ मागे कथा निरोपिलीसी । अभिनव जाहले सृष्टीसी । पतिताकरवी ख्यातीसी । वेद चारी म्हणविले ॥७॥ त्रिविक्रम महामुनेश्वरासी । बोधिले ज्ञान प्रकाशी । पुढे कथा वर्तली कैशी । विस्तारावे दातारा ॥८॥ ऐकोनि शिष्याचे वचन । संतोषला सिद्ध आपण । प्रेमभावे आलिंगोन । आश्वासीतसे तये वेळी ॥९॥ धन्य धन्य शिष्यमौळी । तुज लाधले अभीष्ट सकळी । गुरूची कृपा तात्काळी । जाहली आता परियेसा ॥१०॥ धन्य धन्य तुझी वाणी । वेध लागला श्रीगुरुचरणी । तूचि तरलासी भवार्णी । सकळाभीष्टे साधतील ॥११॥ तुवा पुसिला वृत्तांत । संतोष झाला आजि बहुत । श्रीगुरुमहिमा असे ख्यात । अगम्य असे सांगता ॥१२॥ एकेक महिमा सांगता । विस्तार होईल बहु कथा । संकेतमार्गे तुज आता । निरोपीतसे परियेसी ॥१३॥ पुढे असता वर्तमानी । तया गाणगग्रामभुवनी । महिमा होतसे नित्यनूतनी । प्रख्यातरूप होऊनिया ॥१४॥ त्रयमूर्तीचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर । महिमा त्याची अपरंपारु । सांगता अगम्य परियेसा ॥१५॥ महिमा तया त्रयमूर्तीची । सांगता शक्ति आम्हा कैची काया धरूनि मानवाची । चरित्र केले भूमीवरी ॥१६॥ तया स्थानी असता गुरु । ख्याति झाली अपरांपरु । प्रकाशत्व चारी राष्ट्र । समस्त येती दर्शना ॥१७॥ येती भक्त यात्रेसी । एकोभावे भक्तीसी । श्रीगुरुदर्शनमात्रेसी । सकळाभीष्ट पावती ॥१८॥ दैन्य पुरुष होती श्रियायुक्त । वांझेसी पुत्र होय त्वरित । कुष्ठे असेल जो पीडित । सुवर्ण होय देह त्याचा ॥१९॥ अक्षहीना अक्ष येती । बधिर कर्णी ऐकती । अपस्मारादि रोग जाती । श्रीगुरुचरणदर्शनमात्रे ॥२०॥ परीस लागता लोहासी । सुवर्ण होय नवल कायसी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । सकळाभीष्ट पाविजे ॥२१॥ ऐसे असता वर्तमानी । उत्तर दिशे माहुरस्थानी । होता विप्र महाघनी । नाम तया ’गोपीनाथ’ ॥२२॥ तया पुत्र होऊनि मरती । करी दुःख अनेक रीती । दत्तात्रेया आराधिती । स्त्रीपुरुष दोघेजण ॥२३॥ पुढे जाहला आणिक सुत । तया नाम ठेविती ’दत्त’ । असती आपण धनवंत । अति प्रीती वाढविले ॥२४॥ एकचि पुत्र तया घरी । अति प्रीति तयावरी । झाला पाच संवत्सरी । व्रतबंध केला तयासी ॥२५॥ वर्षे बारा होता तयासी । विवाह करिती प्रीतीसी । अतिसुंदर नोवरीसी । विचारूनि प्रीतिकरे ॥२६॥ मदनाचे रतीसरसी । रूप दिसे नोवरीसी । अति प्रीति सासूश्वशुरासी । महाप्रेमे प्रतिपाळिती ॥२७॥ दंपती एकचि वयेसी । अति प्रिय महा हर्षी । वर्धता झाली षोडशी । वर्षे तया पुत्रासी ॥२८॥ दोघे सुंदर सुलक्षण । एकापरीस एक प्राण । न विसंबिती क्षण क्षण । अतिप्रिय परियेसा ॥२९॥ ऐसी प्रेमे असता देखा । व्याधि आली त्या पुरुषा । अनेक औषधे देता ऐका । आरोग्य नोहे तयासी ॥३०॥ नवचे अन्न तयासी । सदा राहे उपवासी । त्याची भार्या प्रीतीसी । आपण न घे सदा अन्न ॥३१॥ पुरुषावरी आपुला प्राण । करी नित्य उपोषण । पतीस देता औषधे जाण । प्राशन करी परियेसा ॥३२॥ येणेपरी तीन वर्षी । झाली व्याधि-क्षयासी । पतिव्रता स्त्री कैसी । पुरुषासवे कष्टतसे ॥३३॥ पुरुषदेह क्षीण झाला । आपण तयासरसी अबला । तीर्थ घेऊनि चरणकमळा । काळ क्रमी तयाजवळी ॥३४॥ दुर्गंधि झाले देह त्याचे । जवळी न येती वैद्य साचे । पतिव्रता सुमन तिचे । न विसंबेचि क्षणभरी ॥३५॥ जितुके अन्न पतीसी । तितुकेचि ग्रास आपणासी । जैसे औषध देती त्यासी । आपण घेतसे परियेसा ॥३६॥ मातापिता दायाद गोती । समस्त तिसी वारिती । पतिव्रता ज्ञानवंती । न ऐके बोल कवणाचे ॥३७॥ दिव्यवस्त्रादि आभरणे । त्यजिली समस्त भूषणे । पुरुषावरी आपुला प्राण । काय सुख म्हणतसे ॥३८॥ उभयतांची मातापिता । महाधनिक श्रीमंता । पुत्रकन्येसी पाहता । दुःख करिती परियेसा ॥३९॥ अनेक जपानुष्ठान । मंत्रविद्या महाहवन । अपरिमित ब्राह्मणभोजन । करविताति अवधारा ॥४०॥ अनेक परीचे वैद्य येती । दिव्य रस-औषधे देती । शमन नव्हे कवणे रीती । महाव्याधीने व्यापिले ॥४१॥ पुसती जाणत्या ज्योतिष्यासि । पूजा करिती कुळदेवतांसी । काही केलिया पुत्रासी । आरोग्य नोहे सर्वथा ॥४२॥ वैद्य म्हणती तये वेळी । नव्हे बरवे त्यासी अढळी । राखील जरी चंद्रमौळी । मनुष्ययत्‍न नव्हे आता ॥४३॥ ऐसे ऐकोनि मातापिता । दुःखे दाटली करिती चिंता । जय जया जगन्नाथा । दत्तात्रेया गुरुमूर्ति ॥४४॥ आराधोनिया तुम्हांसी । पुत्र लाधलो संतोषी । पापरूप आपणासी । निधान केवी राहो पाहे ॥४५॥ एकचि पुत्र आमचे वंशी । त्याते जरी न राखिसी । प्राण देऊ तयासरसी । दत्तात्रेया स्वामिया ॥४६॥ ऐसे नानापरी देखा । दुःख करिती जननीजनका । वारीतसे पुत्र ऐका । मातापिता आलिंगोनि ॥४७॥ म्हणे आपुले भोग सरले । जितुके ऋण तुम्हा दिधले । अधिक कैचे घेऊ भले । ऋणानुबंध न चुकेचि ॥४८॥ ऐसे ऐकोनि मातापिता । दोघे जाहली मूर्च्छागता । पुत्रावरी लोळता । महादुःखे दाटोनिया ॥४९॥ म्हणती ताता पुत्रराया । आमुचीआशा झाली वाया । पोषिसी आम्हा म्हणोनिया । निश्चय केला होता आपण ॥५०॥ उबगोनिया आम्हांसी । सोडूनि केवी जाऊ पाहसी । वृद्धाप्यपणी आपणांसी । धर्म घडे केवी तुज ॥५१॥ ऐकोनि मातापितावचन । विनवीतसे आक्रंदोन । करणी ईश्वराधीन । मनुष्ययत्‍न काय चाले ॥५२॥ मातापित्यांचे ऋण । पुत्रे करावे उत्तीर्ण । तरीच पुत्रत्व पावणे । नाही तरी दगडापरी ॥५३॥ मातेने केले मज पोषण । एके घडीचे स्तनपान । उत्तीर्ण नव्हे भवार्ण । जन्मांतरी येऊनिया ॥५४॥ आपण जन्मलो तुमचे उदरी । कष्ट दाविले अतिभारी । सौख्य न देखा कवणेपरी । ऐसा आपण पापी देखा ॥५५॥ आता तुम्ही दुःख न करणे । परमार्थी दृष्टी देणे । जैसे काही असेल होणे । ब्रह्मादिका न सुटेचि ॥५६॥ येणेपरी जननीजनका । संभाषीतसे पुत्र निका । तेणेपरी स्त्रियेसी देखा । सांगतसे परियेसा ॥५७॥ म्हणे ऐक प्राणेश्वरी । झाले आमुचे दिवस सरी । मजनिमित्ते कष्टलीस भारी । वृथा गेले कष्ट तुझे ॥५८॥ पूर्वजन्मीचे वैरपण । तुजसी होता माझा शीण । म्हणोनि तूते दिधले जाण । जन्मांतरीचे कष्ट देखा ॥५९॥ तू जरी रहासी आमुचे घरी । तुज पोशितील परिकरी । तुज वाटेल कष्ट भारी । जाई आपुले माहेरा ॥६०॥ ऐसे तुझे सुंदरीपण । न लाधे आपण दैवहीन । न राहे तुझे अहेवपण । माझे अंग स्पर्शता ॥६१॥ ऐकोनि पतीचे वचन । मूर्च्छा आली तत्क्षण । माथा लावूनिया चरणा । दुःख करी तये वेळी ॥६२॥ म्हणे स्वामी प्राणेश्वरा । तुम्ही मज न अव्हेरा । तुहांसरी दातारा । आणिक नाही गति आपणा ॥६३॥ जेथे असे तुमचा देह । सवेचि असे आपण पाहे । मनी न करा संदेह । समागमी तुमची आपण ॥६४॥ ऐसे दोघांचिया वचनी । ऐकोनिया जनकजननी । देह टाकोनिया धरणी । दुःख करिती तयेवेळी ॥६५॥ उठवूनिया श्वशुरासी । संबोखीतसे सासूसी । न करा चिंता, हो भरवसी । पति आपुला वाचेल ॥६६॥ विनवीतसे तये वेळी । आम्हा राखेल चंद्रमौळी । पाठवा एखाद्या स्थळी । पति आपुला वाचेल ॥६७॥ सांगती लोक महिमा ख्याति । नरसिंहसरस्वती श्रीगुरुमूर्ति । गाणगापुरी वास करिती । तया स्वामी पहावे ॥६८॥ त्याचे दर्शनमात्रेसी । आरोग्य होईल पतीसी । आम्हा पाठवा त्वरितेसी । म्हणोनि चरणा लागली ॥६९॥ मानवली गोष्ट समस्तांसी । मातापिताश्वशुरांसी । निरोप घेऊनि सकळिकांसी । निघती झाली तये वेळी ॥७०॥ तया रोगिया करोनि डोली । घेवोनि निघाली ते बाळी । विनवीतसे तये वेळी । आपले सासूश्वशुरांसी ॥७१॥ स्थिर करूनि अंतःकरण । सुखे रहावे दोघेजण । पति असे माझा प्राण । राखील माझे कुळदैवत ॥७२॥ म्हणोनि सासूश्वशुरांसी । नमन करी प्रीतीसी । आशीर्वाद देती हर्षी । अहेवपण स्थिर होय ॥७३॥ तुझे दैवे तरी आता । आमुचा पुत्र वाचो वो माता । म्हणोनि निघाले बोळवीत । आशीर्वाद देताति ॥७४॥ येणेपरी पतीसहित । निघती झाली पतिव्रता । क्वचित्काळ मार्ग क्रमिता । आली गाणगापुरासी ॥७५॥ मार्ग क्रमिता रोगियासी । अधिक जाहला त्रिदोषी । उतरता ग्रामप्रदेशी । अतिसंकट जाहले पै ॥७६॥ विचारिता श्रीगुरूसी गेले होते संगमासी । जावे म्हणोनि दर्शनासी । निघती झाली तये वेळी ॥७७॥ पतिव्रता तये वेळ । आली आपुले पतीजवळ । पहाता जाहला अंतकाळ । प्राण गेला तत्क्षणी ॥७८॥ आकांत करी ते नारी । लोळतसे धरणीवरी । भोसकूनि घ्यावया घेता सुरी । वारिती तियेसी ग्राम लोक ॥७९॥ आफळी शिरे भूमीसी । हाणी उरी पाषाणेसी । केश मोकळे आक्रोशी । प्रलापीतसे परियेसा ॥८०॥ हा हा देवा काय केले । का मज गाईसी गांजिले । आशा करूनि आल्ये । राखिसी प्राण म्हणोनि ॥८१॥ पूजेसी जाता देउळात । पडे देऊळ करी घात । ऐशी कानी न ऐको मात । दृष्टांत झाला आपणासी ॥८२॥ उष्णकाळी तापोनि नरु । ठाकोनि जाय एखादा तरु । वृक्षचि पडे आघात थोरु । तयापरी झाले मज ॥८३॥ तृषेकरूनि पीडित । जाय मनुष्य गंगेत । संधी सुसरी करी घात । तयापरी मज झाले ॥८४॥ व्याघ्रभये पळे धेनु । जाय आधार म्हणोनु । तेथेचि वधिती यवनु । तयापरी झाले मज ॥८५॥ ऐसी पापी दैवहीन । आपुले पतीचा घेतला प्राण । मातापितरांसी त्यजून । घेवोनि आल्ये विदेशी ॥८६॥ येणेपरी दुःख करीत । पाहू आले जन समस्त । संभाषिताति दुःखशमता । अनेकपरीकरूनिया ॥८७॥ वारिताति नारी सुवासिनी । का वो दुःख करिसी कामिनी । विचार करी अंतःकरणी । होणार न चुके सकळिकांसी ॥८८॥ ऐसे म्हणता नगरनारी । तिसी दुःख झाले भारी । आठवीतसे परोपरी । आपुले जन्मकर्म सकळ ॥८९॥ ऐका तुम्ही मायबहिणी । आता कैची वाचू प्राणी । पतीसी आल्ये घेऊनि । याची आशा करोनिया ॥९०॥ आता कवणा शरण जावे । राखेल कोण मज जीवे । प्राणेश्वरा त्यजूनि जीवे । केवी वाचू म्हणतसे ॥९१॥ बाळपणी गौरीसी । पूजा केली शंकरासी । विवाह होता परियेसी । पूजा केली मंगळागौरी ॥९२॥ अहेवपणाचे आशेनी । पूजा केली म्या भवानी । सांगती माते सुवासिनी । अनेकपरी व्रतादिके ॥९३॥ जे जे सांगती माते व्रत । केली पूजा अखंडित । समस्त जाहले आता व्यर्थ । रुसली गौरी आपणावरी ॥९४॥ आता माझिये हळदीसी । चोर पडले गळेसरीसी । सर्वस्व दिधले वन्हीसी । कंकण-कंचुकी परियेसा ॥९५॥ कोठे गेले माझे पुण्य । वृथा पूजिला गौरीरमण । कैसे केले मज निर्वाण । ऐका मायबहिणी हो ॥९६॥ केवी राहू आता आपण । पति होता माझा प्राण । लोकांसरिसा नोहे जाण । प्राणेश्वर परियेसा ॥९७॥ ऐसे नानापरी देखा । करी पतिव्रता दुःखा । पतीच्या पाहूनिया मुखा । आणिक दुःख अधिक करी ॥९८॥ आलिंगोनि प्रेतासि । रोदन करी बहुवसी । आठवी आपुले पूर्व दिवसी । पूर्वस्नेह तये वेळी ॥९९॥ म्हणे पुरुषा प्राणेश्वरा । कैसे माझे त्यजिले करा । उबग आला तुम्हा थोरा । म्हणोनि माते उपेक्षिले ॥१००॥ कैसी आपण दैवहीन । तटाकी खापर लागता भिन्न । होतासि तू निधान । आयुष्य तुझे उणे जहाले ॥१॥ तुमचे मातापितयांसी । सांडूनि आणिले परदेशी । जेणेपरी श्रावणासी । वधिले राये दशरथे ॥२॥ तैसी तुमची जनकजननी । तुम्हा आणिले त्यजूनि । तुमची वार्ता ऐकोनि । प्राण त्यजितील दोघेजण ॥३॥ तीन हत्या भरवसी । घडल्या मज पापिणीसी । वैरिणी होय मी तुम्हांसी । पतिघातकी आपण सत्य ॥४॥ ऐशी पापिणी चांडाळी । निंदा करिती लोक सकळी । प्राणे घेतला मीचि बळी । प्राणेश्वरा दातारा ॥५॥ स्त्री नव्हे मी तुमची वैरी । जैसी तिखट शस्त्र सुरी । वेधिली तुमचे शरीरी । घेतला प्राण आपणचि ॥६॥ मातापिता बंधु सकळी । जरी असती तुम्हाजवळी । मुख पाहती अंतकाळी । त्यांसि विघ्न आपण केले ॥७॥ माझ्या वृद्ध सासूसासर्‍यात । होती तुमची आस । पुरला नाही त्यांचा सोस । त्याते सांडोनि केवी जाता ॥८॥ एकचि उदरी तुम्ही त्यासी । उबगलेति पोसावयासी । आम्हा कोठे ठेवूनि जासी । प्राणेश्वरा दातारा ॥९॥ आता आपण कोठे जावे । कवण माते पोसील जीवे । न सांगता आम्हांसी बरवे । निघोनि गेलासी प्राणेश्वरा ॥११०॥ तू माझा प्राणेश्वरु । तुझे ममत्व केवी विसरू । लोकासमान नव्हसी नरु । प्रतिपाळिले प्रीतिभावे ॥११॥ कधी नेणे पृथक्‌शयन । वामहस्त-उसेवीण । फुटतसे अंतःकरण । केवी वाचो प्राणेश्वरा ॥१२॥ किती आठवू तुझे गुण । पति नव्हसी माझा प्राण । सोडोनि जातोसि निर्वाण । कवणेपरी वाचू मी ॥१३॥ आता कवण थार्‍य जाणे । कवण घेतील मज पोसणे । ’बालविधवा’ म्हणोनि जन । निंदापवाद ठेविती ॥१४॥ एकही बुद्धि मज न सांगता । त्यजिला आत्मा प्राणनाथा । कोठे जावे आपण आता । केशवपन करूनि ॥१५॥ तुझे प्रेम होते भरल्ये । मातापितयाते विसरल्ये । त्यांचे घरा नाही गेल्ये । बोलावनी नित्य येती ॥१६॥ केवी जाऊ त्यांच्या घरा । उपेक्षितील प्राणेश्वरा । दैन्यवृत्ती दातारा । चित्तवृत्ति केवी धरू ॥१७॥ जववरी होतासी तू छत्र । सर्वा ठायी मी पवित्र । मानिती सकळ इष्टमित्र । आता निंदा करतील ॥१८॥ सासूश्वशुरापाशी जाणे । मज देखता त्याही मरणे । गृह जहाले अरण्य । तुम्हाविणे प्राणेश्वरा ॥१९॥ घेवोनि आल्ये आरोग्यासी । येथे ठेवूनि तुम्हांसी । केवी जाऊ घरासी । राक्षसी मी पापीण ॥१२०॥ ऐसे नानापरी ते नारी । दुःख करी अपरांपरी । इतुके होता अवसरी । आला तेथे सिद्ध एक ॥२१॥ भस्मांकित जटाधारी । रुद्राक्षमाळाभूषण-अळंकारी । त्रिशूळ धरिला असे करी । येऊनि जवळी उभा ठेला ॥२२॥ संभाषीतसे तया वेळी । का वो प्रलापिसी स्थूळी । जैसे लिहिले कपाळी । तयापरी होतसे ॥२३॥ पूर्वजन्मीचे तपफळ । भोगणे आपण हे अढळ । वाया रडसी निर्फळ । शोक आता करू नको ॥२४॥ दिवस आठ जरी तू रडसी । न ये प्राण प्रेतासी । जैसे लिहिले ललाटेसी । तयापरी घडेल जाण ॥२५॥ मूढपणे दुःख करिसी । समस्ता मरण तू जाणसी । कवण वाचला असे धरित्रीसी । सांग आम्हा म्हणतसे ॥२६॥ आपुला म्हणसी प्राणेश्वरु । कोठे उपजला तो नरु । तुझा जन्म झाला येरु । कवण तुझी मातापिता ॥२७॥ पूर येता गंगेत । नानापरीची काष्ठे वाहत । येऊनि एके ठायी मिळत । फाकती आणिक चहूकडे ॥२८॥ पाहे पा एका वृक्षावरी । येती पक्षी अपरांपरी । क्रमोनि प्रहर चारी । जाती मागुती चहूकडे ॥२९॥ तैसा हा संसार जाण नारी । कवण वाचला असे स्थिरी । मायामोहे कलत्रपुत्री । पति म्हणसी आपुला ॥१३०॥ गंगेमध्ये जैसा फेन । तेणेपरी देह जाण । स्थिर नोहे याचि कारण । शोक वृथा करू नको ॥३१॥ पंचभूतात्मक देह । तत्संबंधी गुण पाहे । आपुले कर्म कैसे आहे । तैसा गुण उद्भवे ॥३२॥ गुणानुबंधे कर्मे घडती । कर्मासारिखी दुःख-प्राप्ति । मायामोहाचिया रीती । मायामयसंबंधे ॥३३॥ मायासंबंधे मायागुण । उपजे सत्त्व-रज-तमोगुण । येणेचि तीन्हि देह जाण । त्रिगुणात्मक देह हा ॥३४॥ हा संसार वर्तमान । समस्त कर्माचे अधीन । सुखदुःख आपुले गुण । भोगिजे आपुले आर्जव ॥३५॥ कल्पकोटी दिवसवरी । देवास आयुष्य आहे जरी । त्यासी काळ न चुके सरी । मनुष्याचा कवण पाड ॥३६॥ काळ समस्तांसी कारण । कर्माधीन देह-गुण । स्थिर कल्पिता साधारण । पंचभूत देहासी ॥३७॥ काळ-कर्म-गुणाधीन । पंचभूतात्मक देह जाण । उपजता संतोष नको मना । मेलिया दुःख न करावे ॥३८॥ जधी गर्भ होता नरु । जाणिजे नश्य म्हणोनि प्रख्यात थोरु । त्याचे जैसे गुणकर्म-विवरु । तैसे मरण जन्म परियेसा ॥३९॥ कोणा मृत्यु पूर्ववयसी । कवणा मृत्यु वृद्धाप्येसी । जैसे आर्जव असे ज्यासी । तयापरी घडे जाणा ॥१४०॥ पूर्वजन्मार्जवासरसी । भोगणे होय सुखदुःखअंशी । कलत्र-पुत्र-पति हर्षी । पापपुण्यांशे जाणा ॥४१॥ आयुष्य सुखदुःख जाणा । समस्त पापवश्य-पुण्य । ललाटी लिहिले असे ब्रह्माने । अढळ जाण विद्वज्जना ॥४२॥ एखादे समयी कर्मासी । लंघिजेल पुण्यवशी । देवदानवमनुष्यांसी । काळ न चुके भरवसे ॥४३॥ संसार म्हणजे स्वप्नापरी । इंद्रजाल-गारुडीसरी । मिथ्या जाण तयापरी । दुःख आपण करू नये ॥४४॥ शतसहस्त्रकोटि जन्मी । तू कवणाची कोण होतीस गृहिणी । वाया दुःख करिसी झणी । मूर्खपणेकरूनिया ॥४५॥ पंचभूतात्मक शरीर । त्वचा मांस शिरा रुधिर । मेद मज्जा अस्थि नर । विष्ठा-मूत्र-श्र्लेष्मसंबंधी ॥४६॥ ऐशा शरीरअघोरात । पाहता काय असे स्वार्थ । मल मूत्र भरले रक्त । तयाकारणे शोक का करिसी ॥४७॥ विचार पाहे पुढे आपुला । कोणेपरी मार्ग असे भला । संसारसागर पाहिजे तरला । तैसा मार्ग पाहे बाळे ॥४८॥ येणेपरी तियेसी । बोधिता झाला तापसी । ज्ञान झाले तियेसी । सांडी शोक तयावेळी ॥४९॥ कर जोडोनि तये वेळी । माथा ठेविनि चरणकमळी । विनवीतसे करुनाबहाळी । उद्धरी स्वामी म्हणोनिया ॥१५०॥ कवण मार्ग आपणासी । जैसा स्वामी निरोप देसी । जनक जननी तू आम्हासी । तारी तारी म्हणतसे ॥५१॥ कवणेपरी तरेन आपण । हा संसार भवार्ण । तुझा निरोप करीन । म्हणोनि चरणा लागली ॥५२॥ ऐकोनि तियेचे वचन । सांगे योगी प्रसन्नवदन । बोलतसे विस्तारून । आचरण स्त्रियांचे ॥५३॥ म्हणोनि सरस्वती गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । ऐकता समस्त पाप दूर । सकळाभीष्टे साधती ॥१५४॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रेतांगनाशोको नाम त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३०॥ --------------------------------------------------------------- अध्याय ३१ श्रीगणेशाय नम: । सिध्द म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे धर्म सकळ ॥१॥ योगेश्वर म्हणती स्त्रियेसी । आचार स्त्रियांचे पुससी । सांगेन तुज विस्तारेंसी । भवसागर तरावया ॥२॥ पति असतां कवण धर्म । अथवा मेलिया काय कर्म । उभयपक्षी विस्तारोन । सांगेन ऐकचित्ते ॥३॥ कथा स्कंदपुराणांत । काशीखंडीं विस्तृत । स्त्रियांचे धर्म बहुत । एकचित्तें ऐकावे ॥४॥ अगस्ति ऋषि महामुनि । जो का काशीभुवनीं । लोपमुद्रा महाज्ञानी । त्याची भार्या परियेसा ॥५॥ पतिव्रताशिरोमणि। दुजी नव्हती आणिक कोणी । असतां तेथें वर्तमानी । झाले अपूर्व परियेसा ॥६॥ त्या अगस्तिच्या शिष्यांत । विंध्य नामें असे विख्यात । पर्वतरूपें असे वर्तत । होता भूमीवर देखा ॥७॥ विध्याचळ म्हणिजे गिरी । अपूर्व वनें त्यावरी । शोभायमान महाशिखरी । बहु रम्य परियेसा ॥८॥ ब्रह्मर्षि नारदमुनि । हिंडत गेला तये स्थानीं । संतोष पावला पाहोनि । स्तुति केली तये वेळी ॥९॥ नारद म्हणे विंध्यासी । सर्वात श्रेष्ठ तूं होसी । सकळ वृक्ष तुजपासीं । मनोरम्य स्थळ तुझें ॥१०॥ परी एक असे उणें । मेरुसमान नव्हेसी जाणें स्थळ स्वल्प या कारणें । महत्व नाहीं परियेसा ॥११॥ ऐसें म्हणतां नारदमुनि । विंध्याचळ कोपोनि । वाढता झाला ते क्षणी । मेरुपरी होईन म्हणे ॥१२॥ वाढे विंध्याचळ देखा । सूर्यमंडळासंमुखा । क्रमांतरें वाढतां ऐका । गेला स्वर्गभुवनासी ॥१३॥ विंध्याद्रीच्या दक्षिण भागासी । अंधकार अहर्निशीं । सूर्यरश्मी न दिसे कैशीं । यज्ञादि कर्मे राहिलीं ॥१४॥ ऋषि समस्त मिळोनि । विनवूं आले इंद्रभुवनी । विध्याद्रीची करणी । सांगते झाले विस्तारें ॥१५॥ इंद्र कोपे तये वेळी । गेला तया ब्रह्मयाजवळी । सांगितला वृत्तान्त सकळी । तया विंध्य पर्वताचा ॥१६॥ ब्रह्मा म्हणे इंद्रासी । आहे कारण आम्हांसी । अगस्ति असे पुरीं काशी । त्यासी दक्षिण दिशे पाठवावें ॥१७॥ दक्षिण दिशा भुमीसी । अंधार पडिला परियेसी । या कारणें अगस्तीसी । दक्षिण दिशे पाठवावें ॥१८॥ अगस्तीचा शिष्य देखा । विंध्याचल आहे जो कां । गुरु येतां संमुखा । नमितां होई दंडवत ॥१९॥ सांगेल अगस्ति शिष्यासी । वाढों नको म्हणेल त्यासी । गमन करितां शिखरेसी । भूमीसमान करील ॥२०॥ या कारणें तुम्ही आतां । काशीपुरा जावें तत्त्वतां । अगस्तीतें नमतां । दक्षिणेसी पाठवावें ॥२१॥ येणेंपरी इंद्रासी । सांगे ब्रह्मदेव हर्षी । निरोप घेऊन वेगेंसी । निघता झाला अमरनाथ ॥२२॥ देवासहित इंद्र देखा । सवें बृहस्पति ऐका । सकळ ऋषि मिळोनि देखा । आले काशी भुवनासी ॥२३॥ अगस्तीच्या आश्रमासी । पातले समस्त इंद्र ऋषि । देवगुरु महाऋषि । बृहस्पति सवें असे ॥२४॥ देखोनिया अगस्ति मुनि । सकळांतें अभिवंदोनि । अर्ध्यपाद्य देउनी । पूजा केली भक्तीनें ॥२५॥ देव आणि बृहस्पति । अगस्तीची करिती स्तुति । आणिक सवेंचि आणिती । लोपामुद्रा पतिव्रता ॥२६॥ देवगुरु बृहस्पति । सांगे पतिव्रताख्याति । पूर्वी पतिव्रता बहुती । लोपमुद्रासरी नव्हती ॥२७॥ अरुंधती सावित्री सती । अनुसया पतिव्रती । शांडिल्याची पत्नी होती । पतिव्रता विख्यात ॥२८॥ लक्ष्मी आणि पार्वती । शांतरूपा स्वयंभुपत्नी । मेनिका अतिविख्याती । हिमवंताची प्राणेश्वरी ॥२९॥ सुनीती ध्रुवाची माता । संज्ञादेवी सुर्यकांता । स्वाहादेवी विख्याता । यज्ञपुरुषप्राणेश्वरी ॥३०॥ यांहूनि आणिक ख्याता । लोपामुद्रा पतिव्रता । ऐका समस्त देवगण म्हणतां । बृहस्पति सांगतसे ॥३१॥ पतिव्रतेचें आचरण । सांगे गुरु विस्तारोन । पुरुष जेवितां प्रसाद जाण । मुख्य भोजन स्त्रियेसी ॥३२॥ आणिक सेवा ऐशी करणें । पुरुष देखोनि उभें राहणें । आज्ञेविण बैसों नेणे । अवज्ञा न करणें पतीची ॥३३॥ दिवस अखंड सेवा करणे अतिथि येतां पूजा करणें । पतिनिरोपावीण न जाणें । दानधर्म न करावा ॥३४॥ पतीची सेवा निरंतरीं । मनीं भाविजे हाचि हरि । शयनकाळी सर्व रात्रीं । सेवा करावी भक्तींसी ॥३५॥ पति निद्रिस्त झाल्यावरी । आपण शयन कीजे नारी । चोळी तानवडे ठेवावीं दुरी । तेणें पुरुषशरीर स्पर्शू नये ॥३६॥ स्पर्शे चोळी पुरुषासी । हानि होत आयुष्यासी । घेऊं नये नांव त्यासी । पति-आयुष्य उणें होय ॥३७॥ जागृत न होतां पति ऐका । पुढें उठीजे सती देखा । करणें सडासंमार्जन निका । करणें निर्मळ मंगलप्रद ॥३८॥ स्नान करूनि त्वरित । पूजूनि घ्यावें पतितीर्थ । चरणी मस्तक ठेवोनि यथार्थ । शिवासमान भावावें ॥३९॥ असतां ग्रामीं गृहीं पुरुष । सर्व शृंगार करणें हर्ष । ग्रामा गेलिया पुरुष । शृंगार आपण करुं नये ॥४०॥ पति निष्ठुर बोले जरी । आपण कोप कदा न करी । क्षमा म्हणोनी चरण धरी । राग न धरी मनांत ॥४१॥ पति येतां बाहेरुनी । सामोरी जाय तेक्षणी । सकळ कामें त्यजूनि । संमुख जाय पतिव्रता ॥४२॥ काय निरोप म्हणोनि । पुसावें ऐसें वंदोनि । जें वसे पतीच्या मनीं । त्याचपरी रहाटे ॥४३॥ पतिव्रतेचें ऐसें लक्षण । सांगेन ऐका देवगण । बहिर्द्वारी जातां जाण । अनेक दोष परियेसा ॥४४॥ बहिर्द्वारीं जाणें जरी । पाहूं नये नरनारीं । सवेंचि परतावें लवकरी । आपुले गुही असावें ॥४५॥ जरी पाहे बहिद्वारीं । उलूकयोनी जन्मे नारी । याच प्रकारे निर्धारी । पातिव्रत्य लोपामुद्रेचें ॥४६॥ लोपामुद्रा पतिव्रता । बाहेर न वचे सर्वथा । प्रात:काळ जो का होता । सडासंमार्जन करीतसे ॥४७॥ देवउपकरणी उजळोनि । गंधाक्षतांदि करूनि । पुष्पवाती पंचवर्णी । रंगमाळा देवांसी ॥४८॥ अनुष्ठानाहूनि पति येतां । सकळ आयती करी तत्त्वतां । धरोनि पतीच्या चित्ता । पतीसवें रहाटे ती ॥४९॥ पुरुषाचें उच्छिष्ट भोजन । मनोभावें करणें आपण । नसतां पुरुष ग्रामीं जाण । घ्यावा अतिथिधेनुप्रसाद ॥५०॥ अतिथीसी घालावे अन्न । अथवा धेनूतें पूजोन । भोजन करावें सगुण । पतिव्रता परियेसा ॥५१॥ गृह निर्मळ निरंतर करी । निरोपावेगळा धर्म न करी । व्रतोपवास येणेपरी । निरोपावेगळे न करी जाणा ॥५२॥ उत्साह होता नगरात । कधी पाहू न म्हणत । तीर्थयात्राविवाहार्थ । कधीही न वचे परियेसा ॥५३॥ पुरुष संतोषी असता जरी । दुश्चित नसावी त्याची नारी । पुरुष दुश्चित असता जरी । आपण संतोषी असो नये ॥५४॥ रजस्वला झालिया देखा । बोलो नये मौन्य निका । नायकावे वेद ऐका । मुख पुरुषा दाखवू नये ॥५५॥ ऐसे चारी दिवसांवरी । आचरावे तिये नारी । सुस्नात होता ते अवसरी । पुरुषमुख अवलोकिजे ॥५६॥ जरी नसे पुरुष भवनी । त्याचे रूप ध्यावे मनी । सूर्यमंडळ पाहोनि । घरात जावे पतिव्रते ॥५७॥ पुरुषआयुष्यवर्धनार्थ । हळदीकुंकुम लाविजे ख्यात । सेंदूर काजळ कंठसूत्र । फणी माथा असावी ॥५८॥ तांबूल घ्यावे सुवासिनी । असावी तिचे माथा वेणी । करी कंकणे तोडर चरणी । पुरुषासमीप येणेपरी ॥५९॥ न करी इष्टत्व शेजारणीशी । रजकस्त्रीकुंटिणीसी । जैनस्त्रीद्रव्यहीनेसी । इष्टत्व करिता हानि होय ॥६०॥ पुरुषनिंदक स्त्रियेसी । न बोलावे तियेसी । बोलता दोष घडे तिसी । पतिव्रतालक्षण ॥६१॥ सासू श्वशुर नणंद वहिनी । दीरभावाते त्यजुनी । राहता वेगळेपणी । श्वानजन्म पावती ॥६२॥ अंग धुवो नये नग्नपणे । उखळमुसळावरी न बैसणे । पाई विवरल्यावीण जाणे । फिरू नये पतिव्रते ॥६३॥ जाते उंबर्‍यावरी देखा । बैसो नये वडिलांसमुखा । पतिव्रतालक्षण ऐका । येणेपरी असावे ॥६४॥ पतीसवे विवाद । करिता पावे महाखेद । पतिअंतःकरणी उद्वेग । आपण कदा करू नये ॥६५॥ जरी असे अभाग्य पुरुष । नपुसक जरी असे देख । असे व्याधिष्ठ अविवेक । तरी देवासमान मानावा ॥६६॥ तैसा पुरुष असेल जरी । तोचि मानावा हरि । त्याचे बोलणे रहाटे तरी । परमेश्वरा प्रिय होय ॥६७॥ पतीचे मनी जी आवडी । तैसीच ल्यावी लेणी लुगडी । पति दुश्चित्त असता घडी । आपण श्रृंगार करू नये ॥६८॥ सोपस्कार पाहिजे जरी । न सांगावे आपण नारी । असता कन्या पुत्र जरी । तयामुखी सांगावे ॥६९॥ जरी नसेल जवळी कोण । वस्तूची दाखवावी खूण । अमुक पाहिजे म्हणोन । निर्धार करोनि न सांगिजे ॥७०॥ जितुके मिळाले पतीसी । संतुष्ट असावे मानसी । समर्थ पाहोनि कांक्षेसी । पतिनिंदा करू नये ॥७१॥ तीर्थयात्रे जाती लोक । म्हणूनि न गावे कौतुक । पुरुषाचे पादोदक । तेचि तीर्थ मानावे ॥७२॥ भागीरथीसमान देख । पतिचरणतीर्थ अधिक । पतिसेवा करणे मुख । त्रयमूर्ति संतुष्टती ॥७३॥ व्रत करणे असेल मनी । ते पुरुषा करावे पुसोनि । आत्मबुद्धी करिता कोणी । पति-आयुष्य उणे होय ॥७४॥ आणिक जाय नरकाप्रती । पति घेवोनि सांगाती । ऐसे बोलती वेदश्रुति । बृहस्पति सांगतसे ॥७५॥ पतीस क्रोधे उत्तर देती । श्वानयोनी जन्म पावती । जंबुक होवोनि भुंकती । ग्रामासन्निध येऊन ॥७६॥ नित्य नेम करणे नारी । पुरुष-उच्छिष्ट भोजन करी । पाद प्रक्षालोनि तीर्थधारी । घेवोनि तीर्थ जेवावे ॥७७॥ पति प्रत्यक्ष शंकर । काम्य होती मनोहर । पावे ती वैकुंठपुर । पतिसहित स्वर्गभुवना ॥७८॥ जावो नये वनभोजनासी । अथवा शेजारीगृहासी । इष्टसोयरे म्हणोनि हर्षी । प्रतिदिनी न जावे ॥७९॥ आपुला पुरुष दुर्बल किती । समर्थाची न करावी स्तुति । पति असता अनाचाररीती । आपण निंदा करू नये ॥८०॥ कैसा तरी आपुला पति । आपण करावी त्याची स्तुति । तोचि म्हणावा लक्ष्मीपति । एकभावे करोनिया ॥८१॥ सासूश्वशुर पुरुषांपुढे । नेटे बोलो नये गाढे । हासो नये त्यांपुढे । पति-आयुष्य उणे होय ॥८२॥ सासूश्वशुर त्यजून आपण । वेगळे असू म्हणे कवण । ऋक्षयोनी जन्मोन । अरण्यात हिंडेल ॥८३॥ पुरुष कोपे मारी जरी । मनी म्हणे हा मरो नारी । जन्म पावेल योनी व्याघ्री । महाघोर अरण्यात ॥८४॥ पर पुरुषाते नयनी पाहे । उपजता वरडोळी होय । पुरुषा वंचूनि विशेष खाय । ग्रामसूकर होय ती ॥८५॥ तोही जन्मी सोडोनि । उपजे वाघुळाचे योनी । आपुली विष्ठा आपण भक्षुनी । वृक्षावरी लोंबतसे ॥८६॥ पतिसंमुख निष्ठुर वचनी । उत्तर देती कोपोनि । उपजे मुकी होऊनि । सप्तजन्म दरिद्री ॥८७॥ पुरुष दुजी पत्‍नी करी । तिसी आपण वैर धरी । सप्त जन्मांवरी । दुर्भाग्यता होय अवधारा ॥८८॥ पुरुषावरी दुसरिया । दृष्टि ज्या करिती आवडिया । पतिता घरी जन्म पावोनिया । दुःखे सदा दारिद्र्य भोगिती ॥८९॥ पुरुष येता बाहेरुनी । संमुख जावे भामिनी । उदके पाद प्रक्षालुनी । विंझणा वारिजे श्रमहार ॥९०॥ पादसंवाहन भक्तीसी । मृदु वाक्य बोलिजे पतीसी । पुरुष होता संतोषी । त्रिमूर्ति संतोषती ॥९१॥ काय देती माता पिता । नेदी इष्टवर्ग बंधु भ्राता । इहपराची जोडी देता । पुरुष नारीचा देव जाण ॥९२॥ गुरु देव तीर्थे समस्ती । सर्व जाणावा आपुला पति । ऐसा निश्चय ज्यांच्या चित्ती । पतिव्रता त्याचि जाणा ॥९३॥ जीव असता शरीरासी । पवित्र होय समस्तांसी । जीव जाता क्षणे कैसी । कदा प्रेता नातळती ॥९४॥ तैसा पति प्राण आपला । पति नसता अशुचि तिला । या कारणे पतिच सकळा । प्राण आपुला जाणावा ॥९५॥ पति नसता स्त्रियेसी । सर्व अमंगळ परियेसी । विधवा म्हणजे प्रेतासरसी । अपत्य नसता अधिक जाण ॥९६॥ ग्रामास जाता परियेसी । विधवा भेटता संमुखेसी । मरण सांगे सत्य त्यासी । पुत्रासी अशुभ नव्हे जाणा ॥९७॥ माता विधवा असे जरी । पुत्रासी मंगळ शकुन करी । पुत्राविण विधवा नारी । नमन तिसी करू नये ॥९८॥ तिच्या आशीर्वादे आपण । मंगळ न होय सत्य जाण । तिचा हो का शाप मरण । तिसी कोणी बोलू नये ॥९९॥ या कारणे पतिव्रता । बरवे पुरुषासवे जाता । सर्व वैभव देहासहिता । केवी जाई परियेसा ॥१००॥ चंद्रासवे चांदणी जैसी । मेघासवे वीज कैसी । मावळता सवेचि जातसे । पतीसवे तैसे जावे ॥१॥ सहगमन करणे मुख्य जाण । थोर धर्मश्रुतीचे वचन । पूर्वज बेचाळीस उद्धरण । पतिव्रताधर्माने ॥२॥ पुरुष प्रेत झालियावरी । सहगमना जाता ते नारी । एकेक पाउली निर्धारी । अश्वमेघसहत्रपुण्य ॥३॥ पापी पुरुष असेल जाण । त्यासी आले जरी मरण । यमदूत नेती बांधून । नरकाप्रती परियेसा ॥४॥ पतिव्रता त्याची नारी । जरी सहगमन करी । जैसी सर्पासी नेती घारी । तैसी पतीते स्वर्गा नेई ॥५॥ सहगमन केलियावरी । पाहूनि यमदूत पळती दूरी । पतीसी सोडोनि सत्वरी । जाती यमदूत आपले पुरासी ॥६॥ पतिव्रताशिरोमणी । बैसविती विमानी । पावविती स्वर्गभुवनी । देवांगना ओवाळिती ॥७॥ यमदूत त्वरे पळती । काळाची न चाले ख्याती । पतिव्रता देखताचि चित्ती । भय वाटे म्हणताती ॥८॥ सूर्य भितो देखून तियेसी । तपतो तेजे मंदेसी । अग्नि भिउनी शांतीसी । उष्ण तिसी होऊ न शके ॥९॥ नक्षत्रे भिती पाहता तियेसी । आपुले स्थान घेईल ऐसी । जाय स्वर्गभुवनासी । पतीसहित परियेसा ॥११०॥ येणेपरी स्वर्गभुवनी । जाय नारी संतोषोनि । आपुले पतीस घेऊनि । राहे स्वर्गी निरंतर ॥११॥ तीन कोटि रोम तिसी । स्वदेह देता अग्नीसी । त्याची फळे असती कैशी । एकचित्ते ऐकावे ॥१२॥ एकेक रोम रोमासी । स्वर्गी राहे शतकोटि वर्षी । पुरुषासवे स्वानंदेसी । पतिव्रता राहे तेथे ॥१३॥ ऐसे पुण्य सहगमनासी । कन्या व्हावी ऐशी वंशी । बेचाळीस कुळे कैसी । घेऊन जाय स्वर्गाते ॥१४॥ धन्य तिची मातापिता । एकवीस कुळे उद्धरिता । धन्य पुरुषवंश ख्याता । बेचाळीस उद्धरिले ॥१५॥ ऐसे पुण्य सहगमनासी । पतिव्रतेच्या संगतीसी । आणिक सांगेन विस्तारेसी । देवगुरु म्हणतसे ॥१६॥ असेल नारी दुराचारी । अथवा व्याभिचारकर्म करी । त्याचे फळ अतिघोरी । एकचित्ते परियेसा ॥१७॥ उभय कुळे बेचाळिस । जरी असतील स्वर्गास । त्यासी घेउनि नरकास । प्रेमे जाय परियेसा ॥१८॥ अंगावरी रोम किती । तितुकी कोटि वर्षे ख्याती । नरकामध्ये पंचे निरुती । तिचे फळ ऐसे असे ॥१९॥ भूमिदेवी ऐसे म्हणे । पतिव्रतेच्या पवित्र चरणे । आपणावरी चालता क्षणे । पुनीत मी म्हणतसे ॥१२०॥ सूर्य चंद्र ऐसे म्हणती । आपली किरणे ज्योती । जरी पतिव्रतेवरी पडती । तरी आपण पावन होऊ ॥२१॥ वायु आणि वरुण । पतिव्रतेचिया स्पर्शाकारणे । पावन होऊ म्हणोन । स्पर्शे पुनीत होती ते ॥२२॥ घरोघरी स्त्रिया असती । काय करावी लावण्यसंपत्ति । जिचेनि वंश उद्धरती । तैसी स्त्री असावी की ॥२३॥ ज्याचे घरी पतिव्रता । दैवे आगळा तो तत्त्वता । करावे सुकृत जन्मशता । तरीच लाभे तैशी सती ॥२४॥ चतुर्विध पुरुषार्थ देखा । स्त्रियेच्या संगती लाघे लोका । पतिव्रता सती अधिका । पुण्यानुसार लाभे जना ॥२५॥ ज्याचे घरी नाही सती । पुण्ये त्यासी काही न घडती । यज्ञादि कर्मे ख्याति । सती असता होती जाण ॥२६॥ सती नसे ज्याचे घरी । त्यासी अरण्य नाही दूरी । वृथा जन्मोनि संसारी । कर्मबाह्य तोचि जाणा ॥२७॥ ऐसी सती मिळे ज्यासी । समस्त पुण्य होय त्यासी । पुत्रसंतान परलोकासी । साधन होय सतीचेनि ॥२८॥ स्त्रियेवीण असेल नर । तयासी न साधे कर्माचार । कर्महीन देव पितर । कर्मार्ह नव्हे कदा ॥२९॥ पुण्य जोदे गंगास्नानी । त्याहूनि पतिव्रतादर्शनी । महापापी होय पावन । सप्त जन्म पुनीत ॥१३०॥ पतिव्रतेचा आचार । सांगे पतिव्रतेसी योगेश्वर । म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे बृहस्पति देवगुरु ॥३१॥ सिद्ध म्हणे नामधारकासी । गुरुचरित्र पुण्यराशी । ऐकता पावती सद्गतीसी । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥३२॥ इति श्रीगुरुचरित्रामृत । पतिव्रतानिरूपण विख्यात । ऐकता होय पुनीत । जे जे चिंतिले पाविजे ॥३३॥ इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे पतिव्रताख्यानं नाम एकत्रिंशोऽध्यायः ॥३१॥

Search

Search here.