श्री गुरुचरित्र अध्याय ८ ते १८

ग्रंथ - पोथी  > श्री गुरुचरित्र मराठी कथासार Posted at 2019-02-17 14:50:41
श्री गुरुचरित्र पारायण - दिवस दुसरा अध्याय ८ ते १८ ।। श्री गणेशाय नम:।। अध्याय ८ वा ब्राह्मण स्त्रीला वरदान - शनिप्रदोषव्रतमाहात्म्य ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, "आपण मला गोकर्णमाहात्म्य सांगितले. श्रीगुरू श्रीपाद तेथे किती दिवस राहिले ? त्यानंतर काय झाले ते ऐकण्याची मला फार इच्छा आहे. त्याविषयी मला सविस्तर सांगा. श्रीगुरुचरित्र ऐकताना मला अतिशय आनंद होत आहे." नामधारकाने अशी विनंती केली असता आनंदित झालेले सिद्धमुनीं म्हणाले, आता तू लक्षपूर्वक ऐक. श्रीगुरू श्रीपादयती गोकर्णक्षेत्री तीन वर्षे गुप्तपणे राहिले. त्यांनंतर ते श्रीशैल पर्वतावर गेले. लोकांच्यावर अनुग्रह करण्यासाठी तेथे ते चार महिने राहिले. त्यानंतर ते कृष्णा-गोदा नद्यांच्या संगमावर असलेल्या कुरवपुरास गेले. कुरवपुर हे महाक्षेत्र आहे. त्याचे माहात्म्य फारच मोठे आहे.जे लोक तेथे राहून उपासना करतात त्यांना सर्वप्रकारची सुखे प्राप्त होतात. त्यांचे मनोरथ सिद्धीला जातात. श्रीपादयती तेथे राहत असताना असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले.तेथे श्रीपादांनी अनेक लीला करून असंख्य लोकांची संकटे दूर केली. त्या सर्वच लीला सांगू लागलो तर कथाविस्तार फार होईल. पण त्यांतील काही महत्वाच्या लीला मी तुला सांगतो.त्या तू एकाग्रचित्ताने ऐक. त्या कुरवपूर क्षेत्रात वेदशास्त्रसंपन्न असा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव 'अंबिका'. ही स्त्री अत्यंत सात्विक, धर्मपरायण होती; परंतु तिच्या संसारात एक मोठे दुःख होते. तिला पुत्र होत असत पण ते जगत नसत. तिने अनेक तीर्थयात्रा केल्या, व्रतवैकल्ये केली; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे अनेक वर्षाच्या उपासनेने तिला एक पुत्र झाला, परंतु दुर्दैवाने तो मंदबुद्धीचा झाला. त्यला कशातही गती नव्हती. त्याची मुंज करण्यात आली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्या ब्राह्मणाने त्या मुलाला अनेकप्रकारे शिकविण्याचा प्रयत्न केला, त्याला शिक्षा केली पण त्याला काहीच विद्या जमत नव्हती.वडिलांना मोठी चिंता वाटू लागली. त्याने अनेक नवसायास केले पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. वडील त्याला शिक्षा करू लागले की आईला फार वाईट वाटत असे. ती त्यांना म्हणे, "तुम्ही त्याला विनाकारण मारू नका, तो मंदबुद्धीचा आहे, त्याला तो काय करणार ? आपले हे पूर्वकर्म आहे, दुसरे काय ? निदान आपला पुत्र जिवंत आहे, यातच समाधान माना." काही दिवसांनी तो ब्राह्मण मरण पावला.त्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाडच कोसळली. पोट भरण्याची भ्रांती निर्माण झाली. भीक मागून जगण्याची वेळ झाली. मुलगा मोठा झाला, लग्नाचे वय झाले; पण त्याला मुलगी कोण देणार ? लोक त्याची . निंदा करीत म्हणू लागले,"तुझा पिता मोठा विद्वान,वेदज्ञानी आणि त्याच्या पोटी जन्मास आलेला तू मंदबुद्धी पुत्र. तुझा जन्म फुकट गेला. भीक मागताना लाज कशी वाटत नाही ? त्यापेक्षा गंगेत जीव का देत नाहीस ? ही जननिंदा ऐकून त्या मातापुत्रांना अत्यंत दुःख होत असते. तो मुलगा आईला म्हणाला, "मला ही जननिंदा सहन होत नाही. त्यापेक्षा जीव दिलेला बरा." त्याच्या आईलाही जीवन नकोसे झाले. मग ती आपल्या मुलाला बरोबर घेऊन खरोखरच जीव देण्यासाठी गंगेच्या काठावर गेली. त्या दोघांनी गंगेच्या पाण्यात प्रवेश केला. त्यावेळी श्रीपादयती तेथे स्नान करीत होते.त्यांना पाहून त्या दोघांनी पाण्यातच त्यांना वंदन केले. त्या मुलाची आई म्हणाली, "या गंगेत प्राणत्याग करावा, अशी आमची इच्छा आहे. आत्महत्या करणे महापाप असल्याने आम्हाला सद्गती मिळावी असा आपण आशीर्वाद द्यावा." "तुम्ही आत्महत्या का करीत आहात ? " असे श्रीपादांनी विचारले असता तिने सर्व हकीगत सांगितली. शेवटी म्हणाली, "यतिवरा, आता पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा त्रैलोक्यपूजनीय पुत्र मला प्राप्त व्हावा." तेव्हा श्रीपाद यतींनी तिला शिवाची आराधना करण्याचा उपदेश केला. ते म्हणाले, "पूर्वी एकदा एका गौळणीने शिवव्रताचे आचरण केले, त्यामुळे त्यांच्या कुळात श्रीकृष्णाचा अवतार झाला." असे सांगून त्यांनी तिला शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले. मग त्यांनी उज्जयिनी नगरातील एक प्राचीन कथा सांगितली. श्रीपाद यती म्हणाले, "ही कथा आहे उज्जयिनी नगरातील, एकदा त्या नगरात एक मोठी अद्भुत कथा घडली. त्या नगरात चंद्रसेन नावाचा एक धर्मशील राजा होता. मणिभद्र नावाचा त्याचा मित्र होता. तो भगवान शंकराची उपासना करीत असे.त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्याला एक अद्भुत, तेजस्वी मणी दिला. त्या मण्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होत असे. इतकेच नव्हे, तर पाषाणाचेही सोने होत असे. तो मणी म्हणजे चिंतामणीच होता. जे चिंतावे ते त्या मण्याच्या प्रभावाने प्राप्त होत असे. असा तो मणी मणिभद्र गळ्यात धारण करीत असे. इंद्रसेन आणि मणिभद्र मित्र असल्यामुळे इंद्रसेनही तो मणी गळ्यात धारण करीत असे. तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा असे अनेकांना वाटत असे. अनेक राजांनी तो मणी विकत मागितला; पण इंद्रसेनाने त्याला साफ नकार दिला. त्याने तो मणी अगदी गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवला होता. इंद्रसेन तो मणी बऱ्याबोलाने देत नाही हे पाहून इतर राजेलोकांनी युद्ध करून तो मणी हिरावून घेण्याची धमकी दिली; पण इंद्रसेनाने त्या धमकीला जुमानले नाही. मग इतर राजांनी सैन्यासह उज्जायिनीवर स्वारी केली व नगरला वेढा घातला. त्या दिवशी शनिवार त्रयोदशी होती.संध्याकाळी तो निश्चिंत मानाने भगवान शंकराची पूजा करण्यास बसला. मोठ्या थाटात त्याची पूजा चालू होती. राजा इंद्रसेन महाबळेश्वर शिवलिंगाची अगदी शांत चित्ताने पूजा करीत होता. त्याचवेळी काही गवळणी आपल्या मुलांना घेऊन मंदिरात चाललेली ती पूजा पाहून आपणही अशीच पूजा करू या. असे म्हणून गवळ्यांच्या मुलांनी बाहेर मोकळ्या जागेत दगड मांडून शिवलिंग, मंदिर, खांब, पाने, फुले, बिल्वपत्रे इत्यादी सगळे काही दगडांचेच कल्पून लुटूपुटुची शिवपूजा सुरु केली.काही वेळाने गवळणी परत गेल्या.थोड्यावेळाने त्या परत आल्या व आपापल्या मुलांना भोजनासाठी म्हणून घरी घेऊन गेल्या.परंतु एक मुलगा मात्र पूजा टाकून गेला नाही. तो पूजा करण्यात गढून गेला होता.डोळे मिटून शिवध्यान करीत होता. त्याची आई परत आली. ती आपल्या मुलाला रागारागाने घराकडे ओढत नेऊ लागली; पण तो मुलगा पूजा टाकून जाण्यास तयार होईना. तेव्हा त्या मुलाच्या आईने रागाने ती पूजा मोडून टाकली.त्यामुळे तो मुलगा रडू लागला.गडाबडा लोळू लागला. तेथील दगडावर डोके आपटून प्राण देण्याचा त्याने निश्चय केला. अत्यंत शोकाकुल होऊन बेशुद्ध पडला.त्या मुलाची भोळीभाबडी भक्ती पाहून प्रसन्न झालेले शंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी रत्नखचित शिवलिंग निर्माण केले. मग त्या मुलाला प्रेमाने जागे करून वर मागण्यास सांगितले. मुलाने डोळे उघडून समोर पहिले तो प्रत्यक्ष भगवान शंकर स्मितहास्य करीत उभे होते. भोवती भव्य रत्नखचित शिवमंदिर सूर्यतेजाप्रमाणे चमकत होते. ते पाहून आश्चर्यचकित झालेला तो मुलगा शिवचरणांवर मस्तक ठेवून हात जोडून म्हणाला, "भगवंत, माझ्या आईवर रागावू नका. तिने आपली प्रदोषपूजा मोडून टाकली.तिला क्षमा करा." त्या मुलाने अशी प्रार्थना केली असता भगवान शंकर अधिकच प्रसन्न झाले आणि म्हणाले, "बाळा, तू चिंता करू नकोस. मी तुझ्या आईवर मुळीच रागावणार नाही. तिच्या पोटी भगवान विष्णू अवतार घेईल व तुझ्या आईला लालनपालन करण्याचे भाग्य लाभेल. तुमच्या वंशाची भरभराट होईल. तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल." असे सांगून भगवान शंकर त्या लिंगात गुप्त झाले. मात्र ते रत्नखचित मंदिर जसेच्या तसे राहिले. त्या मंदिराचा कोटीसूर्यासम दिव्य प्रकाश नगराबाहेर पसरला होता. ज्या राजांनी नगरला वेढा घातला होता ते दिव्यप्रकाश पाहून चकित झाले. त्यांच्या मनातील राग, द्वेषभावना नाहीशा झाल्या. ते शिवदर्शनासाठी नगरात आले. इंद्रसेन राजा मोठा पुण्यवंत आहे. त्याला विरोध करणे योग्य नाही असा विचार करून ते इंद्रसेनाला भेटावयास गेले. इंद्रसेनाने त्या सर्वांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले.मग राजा इंद्रसेनाने सर्वांना बरोबर घेऊन मोठ्या प्रेमाने स्वागत केले.त्यानंतर राजा इंद्रसेन सर्वांना बरोबर घेऊन ते रत्नखचित शिवमंदिर पाहण्यासाठी गेला. त्याचेवेळी त्या गवळ्याचे घरही रत्नखचित झाले होते. ते पाहून सर्वांना आश्चर्य झाले. राजाने त्या गवळ्याच्या मुलाची चौकशी केली असता त्याने सगळी हकीगत सांगितली.ती ऐकून आनंदित झालेल्या सर्वांनी त्या मुलाला अनेक भेटवस्तू दिल्या. मग सर्व राजे स्वस्थळी निघून गेले. प्रदोषकाळी केलेल्या शिवपूजनाचे हे फळ आहे हे राजाला समजले. त्याला अतिशय आनंद झाला. तो मुलगा आपल्या घरी गेला. तो आईला म्हणाला, " आई, तुझ्या पोटी नारायणाचा अवतार होणार आहे असे भगवान शंकरांनी वरदान दिले आहे. प्रदोषकाळी तू शिवपूजा पाहिलीस त्यामुळे शंकरांनी तुला क्षमा करून हा वर दिला आहे." ही कथा सांगून श्रीपाद त्या ब्राम्हण स्त्रीला म्हणाले,"तूसुद्धा प्रदोषपूजा कर. तुला माझ्यासारखा पुत्र होईल. तू कसलीही चिंता करू नकोस. मनात शंकाही बाळगू नकोस." असे बोलून श्रीपादांनी त्या स्त्रीला अनेक आशीर्वाद दिले. मग त्यांनी त्या स्त्रीच्या मतीमंद मुलाला जवळ बोलावून त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला.त्याचक्षणी त्याच्या ठिकाणी सर्व ज्ञान प्रकट झाले. तो मुलगा आता अत्यंत तेजस्वी दिसू लागला. त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला. ती श्रीपादांना म्हणाली,"आज मला रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच भेटला. पुढील जन्मी मला तुमच्यासारखा पुत्र होईल असा वर मला दिला आहे, त्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही." त्या स्त्रीने श्रीपादांना प्रत्यक्ष शंकर मानून नित्य प्रदोषकाळी त्यांची पूजा करण्याचे व्रत घेतले.तिच्या पुत्राचाही पुढे विवाह झाला.त्यालाही पुत्रपौत्रादी सर्व काही प्राप्त झाले. नामधारकाला ही कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले,"श्रीगुरू असे कृपावंत, दयावंत आहेत.ते आपल्या भक्तांचे सर्वतोपरी रक्षण करतात." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'ब्राह्मण स्त्रीला वरदान - शनिप्रदोषव्रतमाहात्म्य' नावाचा अध्याय आठवा समाप्त. ======================================= अध्याय ९ वा रजक वरप्रदान ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। सिद्धयोगी श्रीगुरुचरित्रमाहात्म्य सांगत होते.ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन विचारले, "महाराज, श्रीपादयती कुरवपुरात असताना पुढे झाले ? ती कथा मला सविस्तर सांगा.". नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्धमुनींनी श्रीगुरुचरित्र सांगावयास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रीपादयती कुरवपुरात असताना एक धोबी त्यांची मनोभावे सेवा करीत असे.श्रीपादयती नित्यनेमाने गंगेवर येऊन, स्नान करून संध्यावंदन करीत असत, त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी येत असे. कपडे धुवून झाले की तो श्रीपादयतींना नमस्कार करीत असे. श्रीपादयतींच्या त्रिकाळ स्नान संध्येच्या वेळी त्या धोब्याचे नित्य नमन घडत असे. एक दिवस श्रीपाद श्रीवल्लभ नित्याप्रमाणे स्नानसंध्येसाठी नदीवर आले असता, त्यांनी विचारले, "अरे रजका, तू एवढे कष्ट का घेतोस? मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. आता तू सुखाने राज्य कर." श्रीगुरू श्रीपादवल्लभ असे म्हणाले असता त्या धोब्याने आपल्या धोतराच्या पदराला शकुनगाठ मारली.तो म्हणाला, "श्रीगुरू हेच साक्षात संकल्पाची मूर्ती आहेत." त्यानंतर त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली. त्याने श्रीपादयतींची अनन्यभावाने सेवा सुरु केली. तो नित्यनेमाने श्रीपादांच्या मठात येत असे. त्यांना लांबूनच वंदन करीत असे. मठातील सगळी कामे तो अगदी मनापासून श्रीगुरूंची सेवा म्हणून भक्तीभावाने करीत असे.त्याचा हा नित्यक्रम कित्येक दिवस चालला होता. एकदा वसंतऋतू-वैशाख महिन्यात त्याने अभिनव दृश्य पहिले. एक म्लेंच्छ राजा आपल्या स्त्रियांसमवेत नावेत बसून जलविहार करीत होता.त्या राजस्त्रिया नटूनथटून राजैश्वर्यात जलविहार करीत होत्या.त्यांच्या नौका शृंगारलेल्या होत्या. नदीच्या तीरावर राजाचे सैनिक होते.शृंगारलेले हत्ती, घोडे होते. दासदासी होत्या. ते सगळे ऐश्वर्य पाहून तो धोबी अगदी भारावून गेला.त्याच्या मनात आले, आपण जन्मात एकदाही असे ऐश्वर्य भोगले नाही. माझे जिणे पशुसमान आहे.या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे. केवढे याचे हे ऐश्वर्य ! हा किती सुखात आहे ! याची पुण्याई केवढी असेल कोणास ठाऊक? याने कोणत्या देवाची आराधना केली असेल ? त्या देवाच्या कृपेनेच हे सगळे वैभव याला मिळाले असणार."मला मात्र जन्मभर काडीमात्र सुख नाही. हे माझें जीवन एखाद्या पशुप्रमाणेच आहे." त्या धोब्याच्या मनात असे अनेक प्रश्न होते. श्रीगुरुंनी त्याच्या मनातील वासना ओळखली. त्यांनी त्याला विचारले, "अरे, तू कशाचे चिंतन करीत आहेस?" तो म्हणाला,"हा राजा हे ऐश्वर्य भोगतो आहे ते त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना? मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही. पण आता मला या सुखभोगाची इच्छा नाही. तुमची चरणसेवा मला बरी वाटते.पण आपण एकदा तरी असले ऐश्वर्य भोगावे असा विचार मनात येऊन गेला." त्यावर श्रीपाद यती म्हणाले, "तुझ्या ठिकाणी असलेल्या तमोवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावेसे वाटत आहे. आता प्रथम इंद्रिये शमन करावीत. नाहीतर मन निर्मळ राहू शकत नाही. या वासना जन्मोजन्मी बाधक ठरत असतात. तेव्हा इंद्रियादि वासना शमविण्यासाठी तू म्लेंच्छ कुळात जन्म घे व राज्याचा उपभोग घे." श्रीगुरू श्रीपादांनी असे सांगितले असता तो रजक म्हणाला, "कृपासागरा, माझी उपेक्षा करू नका.तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुनर्दर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्वज्ञान प्राप्त व्हावे." श्रीगुरू श्रीपाद म्हणाले,"तू वैदुरनगरात जन्म घेशील. त्यावेळी मी तेथे येईन.तुझा अंतःकाळ येईल तेव्हा तुझी-माझी भेट होईल. तू चिंता करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. काही कार्यासाठी मी त्यावेळी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईन." श्रीगुरुंनी असे आश्वासन दिले असता त्या राजकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. श्रीगुरुंनी त्याला विचारले,"तुला या जन्मी राज्यभोग घ्यावयाचा आहे कि पुढील जन्मात ? " श्रीगुरू श्रीपादांनी असे विचारले असता तो रजक म्हणाला,"आता माझे उतार वय झाले आहे. लहानपणी किंवा तरुणपणी राज्यभोग घेणे ठरते." "ठीक आहे" असे म्हणून श्रीपादांनी त्या रजकाला निरोप दिला. नंतर लवकरच रजकाला मृत्यू झाला." रजकाची इतकी कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाला, " त्या कथा मी नंतर सांगेन." सिद्धमुनीं म्हणाले, "नामधारका, श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात राहिल्यापासून त्या स्थानाचे माहात्म्य अधिकच वाढले. ते कुरवपुर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे.श्रीपाद श्रीवल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले व पुढील कार्यासाठी अवतार घ्यावयाचा असल्याने अश्विन वद्य द्वादशी, मघा नक्षत्र, सिंह राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत गुप्त झाले. ते लौकिक दृष्टीने अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्म देहाने त्याच ठिकाणी आहेत. ते स्थान सोडून गेले नाहीत. ते निर्गुणरुपात असल्याने कुणाला दिसत नाहीत; परंतु जें निर्मळ मनाचे भक्त असतात त्यांना ते दर्शन देतात, हे सत्य आहे. याभूमंडळात कुरवपुर हे अत्यंत अद्भुत प्रभावशाली तीर्थक्षेत्र आहे. तेथे त्रैमूर्ती श्रीदत्तात्रेयांचे वास्तव्य आहे असे सरस्वती गंगाधर भक्तजनांना सांगतात. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'रजक वरप्रदान' नावाचा अध्याय नववा समाप्त. ================================= अध्याय १० वा कुरवपुरक्षेत्र महिमा ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। सिद्धमुनींचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले,"कुरवपुराचे माहात्म्य कशाप्रकारे झाले ? आपण म्हणता, श्रीपाद श्रीवल्लभ कोठेही गेले नाहीत. ते कुरवपुरात सूक्ष्मरूपाने कायमचे राहिलेले आहेत. परंतु पुढे असेही सांगता की, श्रीदत्तात्रेयांचे अनेक अवतार झाले हे कसे काय ? "नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनीं म्हणाले, "अरे, श्रीगुरुंचे माहात्म्य काय विचारतोस ? ते सांगण्याच्या पलीकडे आहे. अरे, श्रीगुरुदत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत. ते कुरवपुरक्षेत्रात राहत असले तरी ते जगदोद्धारासाठी अनंत अवतार घेतात. भार्गव राम म्हणजे परशुराम आजही गुप्तरूपाने आहेतच.त्यांचेच पुढे श्रीरामादी अवतार झाले.भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत. तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुला माहित आहे ना ? सृष्टीक्रम अव्याहत परब्रह्मस्वरूप श्रीदत्तात्रेय एका स्थानी कायम राहूनही कोठेही अवतार घेतात. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात गुप्तपणे राहत असे तरी त्यांनी आपल्या योगबळाने विविधकाळी अवतार घेतले आहेत, हे लक्षात घे. गुरुभक्ती व्यर्थ जात नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात. जे खरे भक्त असतात,त्यांची ते कधीही उपेक्षा करत नाही. भक्ताने हाक मारताच त्याच्यासाठी धावून जातात. श्रीगुरू कसे भक्तवत्सल असतात, ते भक्तासाठी कसे प्रकट होतात याविषयी मी तुला एक कथा सांगतो. पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सदाचारसंपन्न, सुशील असा होता. तो दरवर्षी नित्यनेमाने कुरवपुरास श्रीगुरुंच्या दर्शनासाठी येत असे. त्यांची श्रीगुरुंवर नितांत श्रद्धा, भक्ती होती. एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला, "जात व्यापारात चांगला फायदा झाला तर मी कुरवपुर यात्रेस जाईन व एक सहस्त्र ब्राह्मणांना इच्छाभोजन देईन ." असा निश्चय करून मनोमन श्रीगुरुंचे स्मरण करीत व्यापारास गेला. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला.तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्रीगुरुंचे नामस्मरण करीत कुरवपुरास निघाला. काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरविले. अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले ते चोर 'आम्हीही श्रीपादयतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत.' अशी थाप मारून त्याच्या बरोबर जाऊ लागले. कुरवपुराजवळ येण्यापुर्वीच रात्रीच्यावेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राह्मणाचा शिरच्छेद करून त्याच्याजवळचे द्रव्य लुबाडले. त्याचक्षणी भक्तांचे कैवारी, कुरवपुरवासी श्रीगुरू श्रीपाद धिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात खड्ग घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले. परंतु श्रीगुरू श्रीपादांना पाहताचक्षणी त्यातील एक चोर पळाला होता.तो नंतर त्यांच्यापुढे आला आणि हात जोडून म्हणाला, "हे कृपावंत, जगन्नाथा, मी निरपराधी आहे. हे माझ्याबरोबर असेलेल या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पना नव्हती, मी केवळ यांच्याबरोबर प्रवास करीत होतो इतकेच. आपण सर्वज्ञ आहात. माझे अंत:करण आपणास समजते." हे ऐकून श्रीपादयतींनी त्याला जवळ बोलाविले. त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले," ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक." मग श्रीपाद गुरूंच्या आज्ञेनुसार त्या चोराने त्या वल्लभेश ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या मृत देहावर चिकटवले व मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली. त्याच क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे-तिकडे पाहू लागला.इतक्यात सूर्योदय झाला. श्रीपादयती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तेथे होता. इतरांचे देह तेथे पडले होते. ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणाने विचारले, "या माणसांना कोणी मारले ?" त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, "हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्याजवळचे धन लुबाडले होते. पण त्याचवेळी येथे एक धिप्पाड तपस्वी झाले. ते जटाधारी होते. त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते. त्यांच्या हातात त्रिशूळ व खड्ग होते. त्यांनी या चोरांचा वध केला. मी त्यांना शरण गेलो. त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून, मंत्र म्हणून तुला जिवंत केले. ते लगेच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते भगवान शंकर असावेत असे माल वाटते." वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले. त्याच्याबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते. हे पाहून त्याची खात्रीच पटली. मग तो ते सगळे धन घेऊन कुरवपुरास गेला. त्याने श्रीगुरूंची मनोभावे पूजा केली. मग त्याने एक हजार ब्राह्मणांना भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला. असे अनेक भक्त कुरवपुरास येतात व श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणपादुकांची मनोभावे पूजा करतात. श्रीगुरू कुरवपुरात अव्यक्तरुपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करीत असतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले. कुरवपुराचे व तेथे अदृश्य रुपात असलेल्या श्रीपाद श्रीवल्ल्भांचे माहात्म्य असे आहे. यानंतर ते श्रीनृसिंहसरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील." सरस्वती गंगाधर सांगतात. "श्रोते हो ! आता श्रीगुरूंची पुढील चरित्रकथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातील." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'कुरवपुरक्षेत्र महिमा' नावाचा अध्याय दहावा समाप्त. ================================== अध्याय ११ वा श्रीगुरू नरहरीच - बालचरित्र लीलावर्णन ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। "श्रीगुरूंचा पुढचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा." असे नामधारक म्हणाला असता सिद्धमुनी म्हणाले,"श्रीपाद अवतारात मतीमंद ब्राह्मण गुरुकृपेने विद्वान झाला ही कथा मी तुला पूर्वी (आठव्या अध्यायात) सांगितली. श्रीपादांनी त्या मुलाच्या आईला शानिप्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करण्यास सांगितले. त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले. काही दिवसांनी तिला मृत्यू आला. त्यानंतर ती कारंजा गावात (लाड कारंजा) वाजसनीय शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्मास आली. तिच्या आई-वडिलांनी तिचे चांगल्याप्रकारे पालनपोषण केले. तिचे नाव अंबाभवानी असे ठेवण्यात आले. ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त 'माधव' नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. आंबा आणि माधव दोघेही भगवान शंकराची मोठी भक्ती करीत असत. ते दोघेही नित्यनेमाने प्रदोषसमयी शिवपूजन करीत असत. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेषप्रकारे यथासांग शिवपूजा करीत असत. आपल्याला श्रीदत्तात्रेयांसारखा पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती. काही दिवसांनी अंबाभवानीला पुत्र झाला. सर्वांना अतिशय आनंद झाला. अत्यंत तेजस्वी होता.तो जन्माला येताच ॐ काराचा उच्चार करू लागला. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले. विद्वान ज्योतिषांनी त्याचे नाव जातक वर्तविले. ज्योतिषी म्हणाले," हा अवतारी पुरुष आहे.सर्वांचा गुरु होईल. याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल. हा लोकांच्या इच्छा पुरविणारा चिंतामणी होईल.अष्टसिद्धी नवनिधींचा हा स्वामी त्रैलोक्यात वंदनीय, पूजनीय होईल. याच्या केवळ दर्शनाने महापातकी लोक पावन होतील.याचे केवळ स्मरण केले असता दुःख दारिद्र्य नाहीसे होईल.हा इच्छा पूर्ण करील.मात्र हा विवाह करणार नाही. हा संन्यासी होईल. तुम्ही दोघे मोठे भाग्यवान, पुण्यवान आहात, म्हणूनच तुम्हाला हा पुत्र लाभला. याचा नीट सांभाळ करा. याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका." ब्राह्मण ज्योतिषाने त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला.ज्योतिषाने वर्तविलेले ऐकून आंबा आणि माधव यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्रालंकार दिले. माधव ब्राम्हणाचा नवजात पुत्र ॐ कार जपतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली.गावातील असंख्य स्त्री-पुरुष हे माधवाच्या घरी गर्दी करू लागले.आपल्या या पुत्राला आल्यागेलेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून अंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती.दृष्ट काढीत असे. त्याच्या गळ्यात गंडादोरा बांधत असे. अहो, केवळ लोकोद्धारासाठी ज्या परमात्म्यानें अवतार धारण केला, त्याला दृष्ट कशी लागणार बरें ? पण शेवटी आईच ती, तिला काळजी वाटणारच. मुलगा दहा दिवसांचा झाल्यावर त्याचे मोठ्या थाटात बारसे करण्यात आले. "शालग्रामदेव' असे त्याचे जन्मनाव व 'नरहरी' असे पाळण्यातले नाव ठेवण्यात आले. नरहरी दिसामाजी वाढू लागला. पण तो ॐ काराशिवाय काहीच बोलत नसे.आई-वडिलांनी त्याला बोलावयास शिकविण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे कि काय अशी त्यांना भीती वाटू लागली. नरहरी सात वर्षांचा झाला. आठव्या वर्षी यांची मुंज करावयास हवी. पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची ? याला गायत्रीमंत्र कसा शिकवावयाचा ? भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला पण तो मुका दिला. या विचाराने दुःखी झालेली अंबाभवानी रडू लागली. नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले. मग त्याने एक लीला केली. त्याने घरातली एक लोखंडी पहार हाती घेतली.त्याचक्षणी ती पहार सोन्याची झाली. मग नरहरीने लोखंडी वस्तूंना हात लावला. त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या. तो चमत्कार पाहून नरहरीच्या आई-वडिलांना मोठे आश्चर्य वाटले. ते त्याला जवळ घेऊन म्हणाले, "बाळा, महात्मा आहेस. तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस; पण तू बोलत का नाहीस ? तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे. तू आमची इच्छा पूर्ण कर." नरहरी हसला. त्याने शेंडी, जानवे, मेखला यांच्या खुणा करून 'तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेन' असे खुणेने सुचविले. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांना अतिशय आनंद झाला.त्यांनी नरहरीची मुंज करायचे ठरविले. मग एका शुभमुहूर्ताला नरहरीची मुंज केली. माधवाने त्या निमित्ताने खूप दानधर्म केला. भोजन, दक्षिणा, मानपान यासाठी भरपूर खर्च केला. ते पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले,"माधवाने इतका खर्च कशासाठी केला ? मुलाची मोठ्या थाटात मुंज केली; पण तो गायत्रीमंत्र कसा शिकणार ? या मुक्याला संध्या कोण शिकविणार ? आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार ? दुसरे टवाळखोर म्हणाले, " काही का असेना , या निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले. दक्षिणा मिळाली हा मुलगा शिको नाहीतर न शिको ." नरहरीची मुंज यथासांग पार पडली. माधवाने नरहरीला गायत्री-मंत्राचा उपदेश केला आणि काय आश्चर्य ! नरहरीने गायत्री-मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. गायत्री म्हणताच दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली. मातेने पहिली भिक्षा घालताच नरहरी खणखणीत स्वरात ऋग्वेद म्हणून लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणून लागला.सात वर्षांचा मुलगा सगळे वेद अस्खलित म्हणतो आहे हे ऐकून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले. ते म्हणून लागले."अहो, हा मुलगा प्रत्यक्ष श्रीगुरू दत्तात्रेयांचाच अवतार दिसतो ! " सगळे लोक नरहरीचा जयजयकार करू लागले. त्याच्या चरणांना वंदन करू लागले. हा मुलगा मनुष्यरूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली. आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदास पारावार राहिला नाही. मग नरहरी आपल्या आई-वडिलांच्या पाया पडून म्हणाला, "मी आता तीर्थयात्रेला जातो. मी संन्यास घेणार आहे. मला परवानगी द्या." मग तो आईला म्हणाला, " माते, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस. मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन." नरहरीचे शब्द ऐकून अंबा रडू लागली. ती म्हणाली, "माझी शिवपूजा फळास आली म्हणून तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मिळाला. तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. आता तू गेलास तर आम्हाला कोण आधार देणार ? " असे दुःखाने बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली. नरहरीने तिला सावध केले. तो तिला समजावीत म्हणाला, " माते, मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला गृहत्याग करावाच लागेल. पण तुम्ही शोक करू नका.तुम्हाला चार पुत्र होतील. ते तुमची उत्तम सेवा करतील.माझे बोलणे खोटे ठरणार नाही." असे बोलून त्याने वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्याचक्षणी तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले. तिला हेही कळले कि, आपला नरहरी म्हणजेच श्रीपादश्रीवल्लभ. नरहरी तिला म्हणाला, " माते, मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे. हे गुप्त ठेव. मी संन्यासी आहे. संसारापासून अलिप्त आहे.आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे. मला निरोप दे." नरहरीने इतके सांगितले तरीसुद्धा अंबा त्याला म्हणाली."नरहरी, आता तू गेलास की मला कधीही दिसणार नाहीस. तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू ? इतक्या लहानपणी संन्यास घेण्याची काय आवश्यकता ? धर्म- शास्त्रानुसार मनुष्याने चारी आश्रम क्रमाक्रमाने आचरावे. ब्रह्मचर्याश्रमात वेदपठण करावे, मग गृहस्थाश्रम स्वीकारावा.सर्व इंदिये तृप्त करावीत. यज्ञादी कर्मे करावीत. मग तपाचरणास जाऊन शेवटी संन्यास घ्यावा." सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नरहरीने मातेला जे तत्त्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे. ते ऐक." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'श्रीगुरू नरहरीच-बालचरित्र लीलावर्णन' नावाचा अध्याय अकरावा समाप्त. =============================== अध्याय १२ वा काशीक्षेत्री संन्यास-गुरुशिष्यपरंपरा ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नरहरीला त्याच्या अंबामातेने संन्यास न घेण्याविषयी वारंवार विनविले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.नरहरी तिला समजावीत म्हणाला, "माते, तू मला थांबण्याचा आग्रह करीत आहेस. पण शरीर हे क्षणभंगुर आहे.संपत्ती अशाश्वत आहे. मनुष्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येणार नाही. म्हणून हा देह आहे तोपर्यंत धर्मसंग्रह करावा. माणसाचे केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही.मनुष्याचे आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत असते.वृक्षाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे आयुष्य आहे. कधी गळून पडेल सांगता येणार नाही. समुद्राकडे धावणारी नदी मागे फिरत नाही, त्याप्रमाणे आयुष्य परत मिळत नाही, म्हणून मनुष्याने प्रत्येक क्षण पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा. मूर्ख लोकांना हे समजत नाही. ते आयुष्यभर बायकामुले,घरदार, संपत्ती यातच गुंतून पडतात.ज्याला यम प्रिय आहे त्याने खुशाल संसारात, नाहीतर आळसात आयुष्य घालवावे; पण ज्याला आत्मज्ञान हवे असेल. मोक्ष, मुक्ती मिळवायची असेल त्याने विलंब न लावता धर्मसाधना करावी.मी तेच करणार आहे, म्हणून तू मला अडवू नकोस." नरहरीने केलेला हा उपदेश ऐकून त्याच्या आई-वडिलांना व तेथे असलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले. आपला मुलगा इतक्या लहान वयात जीवनाचे केवढे तत्वज्ञान सांगतो आहे हे पाहून आई-वडिलांना धन्यता वाटली. अंबा नरहरीला म्हणाली, "बाळा, तू आमचे कुलदैवत आहेस. मला चार पुत्र होतील असे तू वचन दिले होतेस. पण माझा यावर विश्वास बसत नाही, त्याला मी काय करू ? माझी तुला एक विनंती आहे, मला एक पुत्र होईपर्यंत तू आमच्याजवळ राहावेस. मग मी तुला जाण्यास परवानगी देईन.माझा शब्द मोडशील तर मी प्राणत्याग करीन." त्यावर नरहरी हसून म्हणाला," माते, माझे बोलणे सत्यच होय. तुला एकच काय दोन पुत्र होईपर्यंत मी तुमच्याजवळ राहीन. तुला दोन पुत्र झाले की मी तीर्थयात्रेस निघेन. मी एक वर्षभर तुमच्याजवळ राहीन." मग नरहरी एक वर्ष आई-वडिलांच्या जवळ राहिला. सात वर्षांचा नरहरी सर्वांना वेद शिकवू लागला.सात वर्षांचा हा मुलगा चार वेद शिकवितो हे पाहून लोक थक्क झाले. मोठमोठे विद्वान लोक नरहरीचे शिष्य बनून वेद शिकू लागले.स्वतःला षटशास्त्री म्हणविणारे लोकही नरहरीकडे येऊ लागले.त्यामुळे नरहरीची कीर्ती सर्वदूर पसरली.ते पाहून आई-वडिलांना मोठी धन्यता वाटू लागली. काही दिवसांनी अंबा गरोदर राहिली.नवमास पूर्ण होताच तिला जुळे पुत्र झाले. नरहरीचा आशीर्वाद खरा ठरला. सद्गुरूचे वचन खोटे कसे ठरेल ? पुत्रप्राप्तीने आई-वडिलांना अतिशय आनंद झाला. एक वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला,"माते, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे.तुझे हे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. तुला आणखी दोन पुत्र व एक कन्या होईल. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही.तुम्ही सर्वजण सुखात राहाल.तुमचे पुत्र तुमची आयुष्यभर उत्तम सेवा करतील.तुम्ही माझे स्मरण करताच मी तुम्हाला भेटेन. तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे. त्याची भावभक्तीने प्रदोषपूजा केली आहे. सुखसमृद्धी, यश, कीर्ती, इहलोकी सौख्य,परलोकी मोक्षमुक्ती याबरोबरच तुमच्या कुळात सत्पुरुषाचा जन्म हे शिवभक्तीचेच फळ आहे. हे सर्वकाही तुम्हाला प्राप्त होईल. आता मी तीस वर्षांनी तुम्हां सर्वांस पुन्हा भेटेन. आता मला जाण्याची परवानगी द्या." सर्वजण नरहरीच्या पाया पडले. सर्वांच्या मनात त्याचाबद्दल अपार श्रद्धा होती. प्रेम होते. कौतुक होते. आदर होता. सर्वजण त्याला वंदन करून आपापल्या घरी गेले.नरहरी काशीला निघाला.माधव व अंबा त्याला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत गेले.तेथे नरहरीने त्या दोघांना श्रीपादश्रीवल्लभ व श्रीदत्तात्रेयरुपात दर्शन दिले. त्या दोघांना धन्य धन्य वाटले.त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केला. नरहरी बदरीकाश्रमाकडे निघाला, पण त्या अगोदर तो काशीला गेला.तेथे त्याने कशीविश्वेश्वराचे दर्शन घेतले. तेथे त्याने अत्यंत खडतर तपश्चर्या केली.नरहरीची तपश्चर्या, योगसाधना, त्यांची संन्यासवृत्ती इत्यादी पाहून त्या काशीक्षेत्रातील मोठमोठ्या तपस्व्यांना मोठे नवल वाटले. अनेक लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. तेथे श्रीकृष्णसरस्वती नावाचे एक वयोवृद्ध-ज्ञानवृद्ध तपस्वी होते. ते नरहरीची लक्षणे पाहून इतर तपस्व्यांना म्हणाले, "हा नरहरी बालक असला तरी हा महातपस्वी आहे. हा परमज्ञानी असून जगद्वंद्य, सत्पुरुष आहे. हा गुरुपदाचा अधिकारी आहे. याने संन्यास घेतला तर या कलियुगात लोप पावलेल्या संन्यासधर्माचे पुनरुज्जीवन होईल. हा लोककल्याण करणारा आहे. याच्या दर्शनाने पतित लोक पावन होतील. याने इतरांना संन्यासदीक्षा दिली तर परमार्थ साधनेत आवश्यक असे बुद्धीचे स्थैर्य प्राप्त होईल. यासाठी याने अगोदर स्वतः संन्यास घ्यावयास हवा." असे कृष्णसरस्वतींनी सांगितले असता सर्व संन्यासी, तपस्वी नरहरीला भेटून म्हणाले, "या कलियुगात संन्यास घेणे निषिद्ध मानले जाते. हे अत्यंत अयोग्य आहे. पूर्वी शंकराचार्यांनी संन्यासधर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. तेच कार्य आता तुम्हाला करावे लागणार आहे. यासाठी तुम्ही ही संन्यासदीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा." नरहरीने ही विनंती मान्य करून कृष्णसरस्वतींना गुरु मानून विधिवत संन्यासदीक्षा घेतली. ते नृसिंहसरस्वती झाले." सिद्धमुनींनी असे सांगितले असता नामधारकाने त्यांना विचारले, "नरहरी म्हणजे साक्षात त्रैमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार.ते गुरुंचेही गुरु जगद्गुरु असताना त्यांनी दुसरा गुरु का केला ?" त्यावर सिद्धयोगी म्हणाले,"पूर्वी, भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामांनी वसिष्ठांना गुरु केले. त्याचप्रमाणे भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी सांदीपनींना गुरु केले. यामुळे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढली.गुरु-शिष्य परंपरा अबाधित ठेवली.हेच कार्य नरहरीने केले." नामधारकाने विचारले, "हे कृष्णसरस्वती कोण ? त्यांची गुरुपरंपरा मला सांगा." नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "मूळ गुरु भगवान श्रीशंकर. त्यांनी विष्णूला उपदेश केला. श्रीविष्णूंचा शिष्य ब्रह्मदेव होय. ब्रह्मदेवाचे शिष्य वासिष्ठ या क्रमाने शक्ती-पराशर-व्यास-शुक्राचार्य-गौडपादाचार्य-आचार्य गोविंद-शंकराचार्य-विश्वरुपाचार्य-ज्ञानबोधगिरी-सिंहगिरी-ईश्वरतीर्थ-नृसिंहतीर्थ-विद्यातीर्थ-शिवतीर्थ-भारतीतीर्थ-विद्यारण्य-विद्यातीर्थ-मलियानंद-देवतीर्थ सरस्वती-सरस्वती यादवेंद्र अशी ही श्रेष्ठ गुरुपरंपरा आहे.कृष्णसरस्वती हे यादवेंद्राचे शिष्य होतें. नरहरीने कृष्णसरस्वतींपासून संन्यासदीक्षा घेतली. त्यांना नृसिंहसरस्वती असे नाव देण्यात आले. नृसिंहसरस्वतींनी काशीक्षेत्री काही दिवस राहून अनेकांना संन्यासदीक्षा दिली व ज्ञानदानाचे मोठे कार्य केले. मग ते बदरीकाश्रमाकडे गेले. त्यांना अनेक शिष्य मिळाले. मार्गात त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. संगमाचे दर्शन घेऊन ते प्रयागक्षेत्री गेले. प्रयागक्षेत्री असताना त्यांना 'माधव' नावाचा ब्राह्मण भेटला.त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून संन्यासदीक्षा दिली व त्याला 'माधव सरस्वती' असे नाव दिले. सरस्वती गंगाधर श्रीगुरुचरित्र सांगत आहेत. याचे श्रवण केले असता चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'काशीक्षेत्री संन्यास-गुरुशिष्यपरंपरा' नावाचा अध्याय बारावा समाप्त. ================================= अध्याय १३ वा श्रीगुरूंचे कारंजानगराभिगमन व विप्रोदरव्यथा निवारण ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन म्हणाला, "गुरुदेव, तुम्ही तर माझ्यासाठी संसारसागर तारक आहात. तुम्ही दाखविलेल्या ज्ञानप्रकाशाने माझें चित्त शांत, स्थिर झाले आहे. तुम्ही आत्तापर्यंत सांगितलेले श्रीगुरुचरित्रामृत सेवन करूनही माझी श्रवणतृष्णा अधिकच वाढली आहे. ती शमविण्यासाठी तुम्हीच समर्थ आहात. ज्याने कधी स्वप्नातही ताकसुद्धा पहिले नाही पहिले नाही, त्याला जर दुधाने भरलेले भांडे मिळाले तर त्याची जशी अवस्था होईल तशी माझी अवस्था झाली आहे.महाराज, आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत. त्यांची परतफेड मी जन्मोजन्मी करू शकणार नाही. श्रीगुरुचरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे. श्रीनृसिंहसरस्वतींंविषयी मला आणखी विस्ताराने सांगा. गुरुदेव नृसिंहसरस्वती प्रयागक्षेत्री असताना त्यांनी माधवसरस्वतीस दीक्षा दिली असे आपण सांगितले.पण पुढे ते सांगण्याची कृपा करा." नामधारकाची ही जिज्ञासा पाहून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला.त्यांनी नृसिंहसरस्वतींचे सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले,"श्रीनृसिंहसरस्वतींनी प्रयागक्षेत्री माधव-सरस्वतीस दीक्षा दिली. त्यानंतर ते काही काळ ते तेथेच राहिले. त्यांची ख्याती सगळीकडे पसरली. अनेकजण त्यांचे शिष्य झाले. त्यांनी माधव-सरस्वतींसह सात जणांना संन्यासदीक्षा देऊन त्यांच्यावर अनुग्रह केला.हे सर्व शिष्य मोठे प्रज्ञावान व स्वामीनिष्ठ होते. बाळसरस्वती, कृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती आणि मी, सिद्ध असे तें सात शिष्य होते. त्या शिष्यांना बरोबर घेऊन श्रीनृसिंहसरस्वती दक्षिणयात्रेस निघाले. अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत घेत ते आपल्या जन्मगावी म्हणजे कारंजास आले. ते आपल्या आई-वडिलांना व भावंडांना भेटले. त्यांच्या आगमनाने सगळ्या गावाला अतिशय आनंद झाला. श्रीनृसिंहसरस्वती म्हणजे साक्षात श्रीदत्तात्रेयच अशीच सर्वांची दृढ श्रद्धा होती.लोकांनी आपापल्या घरी त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली.त्यांच्या आई-वडिलांनाही मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. आईला गतजन्माची आठवण झाली. आपण केलेली प्रदोषपूजा फळास आली असे तिला वाटले. ती आपल्या पतीला म्हणाली, "मी गतजन्मी 'परमज्ञानी व विश्ववंद्य असा पुत्र मला व्हावा' अशी मी श्रीपाद्श्रीवल्लभांना प्रार्थना केली होती. त्यांनी मला भगवान शंकराची आराधना व प्रदोषव्रत करण्यास सांगितले व 'तुझी इच्छा पूर्ण होईल' असा आशीर्वाद दिला होता. तो त्यांचा आशीर्वाद या जन्मी सफल ठरला. श्रीपादश्रीवल्लभांचा माझ्याच पोटी अवतार झाला आहे." माधव व अंबा यांनी श्रीनृसिंहसरस्वतींच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली."तू आमचा उद्धार कर." त्यांनी अशी प्रार्थना केली असता श्रीनृसिंहसरस्वती म्हणाले, "पुत्राने संन्यास घेतला की त्याच्या बेचाळीस पिढयांचा उद्धार होतो. त्यांना शाश्वत अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते.त्यांच्या कुळात आणखी जे जन्म घेतात त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. पूर्वी कोणी नरकात गेले असतील त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते.मी संन्यास घेतला असल्यामुळे तुम्हालासुद्धा ब्रह्मपद प्राप्त होईल. तुमचे पुत्र शतायुषी होतील.तुम्हाला पुत्रपौत्र पहावयास मिळतील. शेवटी तुम्ही काशीक्षेत्री देह ठेवाल.काशीक्षेत्र मुक्तिस्थान आहे. तुम्ही कसलीही चिंता करू नका." माधव आणि अंबा यांना 'रत्नाई' नावाची कन्या होती. ती श्रीस्वामी नृसिंहसरस्वतींच्या पाया पडून म्हणाली, "स्वामी, माझा उद्धार करा. मी या संसारसागरात बुडाले आहे. संसारातील त्रिविध तापांची मला भीती वाटते. संन्यास घेऊन तपश्चर्या करावी असे मला वाटू लागले आहे. तिने अशी विनंती केली असता श्रीगुरूनृसिंह-सरस्वती म्हणाले,"स्त्रियांनी आपल्या पतीला शिवस्वरूप मानून त्याची सेवा करावी. त्यासाठी संसारत्याग करून संन्यास घेण्याची काही गरज नाही. वेदशास्त्रपुराणांनी हेच सांगितले आहे. म्हणून तू संसारच कर." श्रीगुरुंनी असे सांगितले असता रत्नाई म्हणाली, "गुरुदेव, आपण त्रिकालज्ञानी आहात. भविष्यभूत सर्व काही जाणता,म्हणून माझे प्रारब्ध काय आहे ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी." रत्नाईने अशी विनवणी केली असता श्रीगुरू म्हणाले, "तुला तपश्चर्या करायची असली तरी तुझे संचित पाप खूप मोठे आहे व ते तुला भोगावेच लागणार आहे. तू पूर्वजन्मी एका गाईला लाथ मारली होतीस. तू शेजारच्या पतीपत्नींमध्ये भांडण लावून दिलेस. या पापकर्मामुळे तुझ्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल. भविष्यात तुझा पती त्याग करून तपश्चर्येला जाईल. तुझे सर्वांग कुष्ठरोगाने नासेल.मग तुला माझे दर्शन पुन्हा घडेल. तू दक्षिणेकडे भीमा-अमरजा संगमावरील गाणगापूर क्षेत्री जा, त्या संगमाला पापविनाशी तीर्थ असे म्हणतात. त्या तीर्थात स्नान केलेस की तुझे सर्व पाप नष्ट होईल. तू पापमुक्त होशील." रत्नाईला असा उपदेश करून श्रीगुरू आपल्या शिष्यांसह दक्षिणेकडील त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. येथेच गोदावरी नदीचा उगम आहे. त्या तीर्थक्षेत्राचे माहात्म्य फार मोठे आहे. पुराणांत ते विस्ताराने सांगितले आहे. ते मी तुला थोडक्यात सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक." असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदामाहात्म्य सांगू लागले. "भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटामुकुटात धारण केली होती. त्याकाळी गौतमऋषीसह अनेक ऋषीमुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात तपश्चर्या करीत होते. ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भातशेती करीत असत.एकदा त्या सर्वांनी विचार केला.भगवान शंकराच्या मस्तकावरील गंगा जर क्षेत्री आणली तर शेतीला भरपूर पाणी मिळेल.त्यामुळें सर्व लोकांचे कल्याण होईल; पण ती गंगा कोण आणू शकेल ? हे कार्य मोठे कठीण आहे. गौतमऋषी भगवान शंकरांचे परमभक्त आहेत. महातपस्वी आहेत.त्यांनाच हे कार्य करणे शक्य आहे. पण त्यांच्यावर काही संकट आल्याशिवाय ते हे काम करणार नाहीत." असा विचार करून त्या ऋषींनी आपल्या योगबळाने दुर्वेपासून एक मायावी सवत्स गाय मिर्माण केली व ती गौतम ऋषींच्या भातशेतीत सोडली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फेकली. अन्य ऋषींच्या योगबलाने त्या काडीचे शस्त्र झाले. त्या शस्त्राच्या आघाताने ती गाय तडफडून मेली. गोहत्या म्हणजे महापाप, ते गौतमांच्या हातून घडले. त्यांनी अन्य ऋषींना त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, "तुम्ही गंगानदीला पृथ्वीवर आणा.तिच्या पाण्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही पापमुक्त होणार नाही." गौतमऋषींनी ते मान्य केले. मग त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न केले. प्रसन्न झालेले शंकर 'हवा असेल तो वर माग' असे म्हणाले.तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, "भगवंता, तुझ्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या पाप क्षालनासाठी या त्र्यंबकक्षेत्री प्रकट कर." शंकरांनी 'तथास्तु' असे म्हणून आपल्या मस्तकावरील गंगा अंशरूपाने त्र्यंबकक्षेत्री अवतीर्ण केली.गौतमांच्या तपश्चर्येने ती अवतीर्ण झाली म्हणून तिला गौतमी असे म्हणतात.गौतमी म्हणजेच गोदा. तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात. या नदीत स्नान केले असता मनुष्य पापमुक्त होतो असे या नदीचे थोर माहात्म्य आहे. माधवारण्य स्तवन करीत म्हणाले. "अहो जगद्गुरु, आपण साक्षात त्रैमूर्तींचा अवतार आहात. आपण लोकांना सामान्य मनुष्य वाटता.पण आपण खरोखर परमपुरुष जगत्ज्योती आहात.आपण लोकोद्धारासाठी या भूमीवर अवतरला आहात. आज मला आपले चरणदर्शन झाले.मी खरोखरच कृतार्थ, धन्य झालो.माधवारण्यांनी केलेल्या स्तवनाने श्रीगुरू प्रसन्न झाले आहेत. ते म्हणाले, "तुझी तपश्चर्या सफल झाली आहे. तुला ब्रह्मलोक प्राप्त होईल.तू जी मानसपूजा सेवा करीत आहेस, तशीच करीत राहा. तुला प्रत्यक्ष श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घडेल याबद्दल जराही शंका धरू नकोस." माधवारण्यांना असे आश्वासन देऊन श्रीगुरू गंगातीरावरील वासरब्रह्मेश्वर क्षेत्री आले. त्यांनी सर्व शिष्यांसह गंगास्नान केले. त्यावेळी पोटदुखीने अगदी त्रस्त झालेला एक ब्राह्मण नदीवर येउन गडबडा लोळू लागला.पोटदुखीने तो अगदी कासावीस झाला होता.त्याला अन्न पचत नसे. अन्न त्याचा शत्रू झाला होता.त्यामुळे तो नेहमीच उपाशी असे. भोजन केले रे केले की त्याच्या पोटात प्राणांतिक वेदना होत असत.आत्महत्या करावी असे त्याला वाटत असे.तो कधीतरी महिना-पंधरा दिवसांनी भोजन करीत असे.आदल्या दिवशी महानवमीला त्याने मिष्टान्न भोजन केले होते.वेदना असह्य होत होत्या.त्यावेळी तो स्वतःशीच म्हणाला, "आता जगण्यात काही अर्थ नाही. या वेदना सोसण्यापेक्षा गंगेत जीव द्यावा. अन्न हा प्राण, अन्न हेच जीवन, असे म्हणतात.पण अन्नच माझा वैरी झाले आहे. आता जगणे नकोच, आता मेलेले बरे." असा विचार करून त्याने पोटाशी दगड बांधून जीव देण्यासाठी गंगेत प्रवेश केला. भगवान शंकराचे स्मरण करून तो म्हणाला, "मी भूमीला भार झालो आहे.मी आयुष्यात कसलाही परोपकार केला नाही. कुणालाही अन्नदान केले नाही. या पूर्वीच्या जन्मात मी जे कर्म केले त्याचेच हे मी फळ भोगतो आहे. मी ब्राह्मणाच्या तोंडचा घास हिरावून घेतला. गोहत्या केली. कुणाचा तरी विश्वासघात केला. गुरुंची निंदा केली. आई-वडिलांची अवज्ञा केली, म्हणून मला हे दुःख भोगावे लागत आहे. किंवा मी ब्राह्मणांचा अपमान केला असेल. दारी आलेल्या अतिथीला अन्न दिले नसेल.कुणाच्या तरी शेताला आग लावली असेल. आई-वडिलांचा त्याग केला असेल. या पापांमुळेच मला या जन्मी हे दुःख भोगावे लागत आहे." अशी त्याने खूप आत्मनिंदा केली. आता आत्महत्येशिवाय तरणोपाय नाही असा विचार करून तो नदीच्या पाण्यात शिरला. श्रीगुरुंनी त्या ब्राह्मणाला पाहिले. त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणास बोलावून घेतले. मग श्रीगुरू त्याला म्हणाले, "अरे, आत्महत्या हे महापाप आहे. तू कशासाठी आत्महत्या करीत आहेस ? मला सगळे काही सांग ." त्या ब्राह्मणाने आपल्या पोटदुखीबद्दल सर्व काही सांगितले. ते ऐकताच श्रीगुरू म्हणाले, "तू कसलीही चिंता करून नकोस. तुझे दुखणे गेलेच समज. माझ्याजवळ ह्या व्याधीवर औषध आहे. आता तू पोटभर जेवू शकशील. तुझे पोट दुखणार नाही.कसलीही शंका धरू नकोस.घाबरू नकोस." हे ऐकताच त्या ब्राह्मणाला अगदी हायसे वाटले. याचवेळी तेथे अजून एक ब्राह्मण आला. तो ग्रामाधिकारी होता. ती श्रीगुरुला वंदन करून म्हणाला,"आज आपले दर्शन झाल्याने मी पावन झालो." श्रीगुरुंनी त्याची विचारपूस केली, तेव्हा तो म्हणाला, "मी कौंडिण्यगोत्री, आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण असून माझे नाव 'सायंदेव' आहे.मी कडगंची गावाचा रहिवासी असून पोटासाठी सेवाचाकरी करतो. मी एका यवनाकडे चाकरी करीत असून एक वर्षापासून गावाचा अधिकारी म्हणून काम करतो. आज आपले दर्शन झाले. मी धन्य झालो. आपणच या विश्वाचे तारक आहात. आज आपल्या दर्शनाने माझे जन्मोजन्मीचे पाप नाहीसे झाले. ज्याच्यावर आपला अनुग्रह होतो तो हा संसारसागर तरुन जातो.गंगा मनुष्याचे पाप नाहीसे करते, चंद्र ताप नाहीसा करतो व कल्पवृक्ष दारिद्र्य नाहीसे करतो; परंतु एका सद्गुरूंच्या दर्शनाने या तिन्ही गोष्टी नाहीशा होतात." सायंदेवाचे असे स्तवन केले असता श्रीगुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, "सायंदेवा, 'हा ब्राह्मण पोटदुखीने अगदी बेजार झाला आहे.तो आत्महत्या करण्यास निघाला होता,पण मी त्याला थांबविले आहे.त्यल खूप भूक लागली आहे. त्याला तुझ्या घरी ने व त्याला उत्तम भोजन दे' त्यावर सायंदेव म्हणाला, "महाराज, मी याला भोजन दिले आणि त्याचे प्राण गेले तर ब्रह्महत्येचे पाप मला लागेल." श्रीगुरू म्हणाले, "तसे काही होणार नाही. तू चिंता करू नकोस.मी सांगितले तसे कर.ते अन्न खाल्ल्यानेच हा व्याधीमुक्त होईल." सायंदेव म्हणाले, "स्वामी महाराज, आज तुम्ही माझ्या घरी भोजन करावे अशी माझी फार इच्छा आहे." श्रीगुरुंनी ते आनंदाने मान्य केले. मग सायंदेव आपल्या घरी गेला. पोटदुखी असलेला तो ब्राह्मणही त्याच्याबरोबर गेला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, त्याचवेळी आम्हीही तेथेच होतो.श्रीगुरू भिक्षेसाठी म्हणून निघाले.ते कबूल केल्याप्रमाणे आपल्या शिष्यांसह सायंदेवाच्या घरी गेले.सायंदेवाला व त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला.त्यांनी श्रीगुरुंचे स्वागत करून त्यांची यथासांग षोडशोपचारे पूजा केली.त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व शिष्यांनाही वंदन केले. त्यांच्या भक्तिभावाने प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी सायंदेवांना आशीर्वाद दिला. "तुम्हाला उत्तम दीर्घायुषी संतती प्राप्त होईल.तुमच्या वंशाची वृद्धी होईल. तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा कायम राहील." या वरदानाने सायंदेवास व त्याची पत्नी जाखाई यांना अतिशय आनंद झाला.त्यांनी श्रीगुरुंस, त्यांच्या सर्व शिष्यांस व त्या पोटदुखी असलेल्या ब्राह्मणासही सुग्रास भोजन दिले. श्रीगुरुंच्या आज्ञेने तो व्याधीग्रस्त ब्राह्मणही पोटभर जेवला आणि श्रीगुरुंच्या कृपाशीर्वादाने त्याचक्षणी व्याधीमुक्त झाला. ते पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, सूर्योदय झाला असता अंधार शिल्लक राहील का ? श्रीगुरुदत्तात्रेयांची कृपा झाली असता मनुष्याचे पाप, ताप, दैन्य, दुःख राहणारच कसे ? श्रीगुरूकृपा झाली असता मनुष्याचे जन्मजन्मांतरीचे सर्व दोष नाहीसे होतात." ग्रंथकार सरस्वतीगंगाधर श्रीगुरुचरित्र विस्ताराने सांगत आहे. ज्याला आपले कल्याण असे वाटते त्याने ते श्रद्धापूर्वक एकाग्रचित्ताने श्रवण करावे. जे कोणी हे श्रीगुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही दुःख भोगावे लागणार नाही. त्यांना सर्व सुखांची प्राप्ती होईल हे त्रिवार सत्य आहें. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'श्रीगुरूंचे कारंजानगराभिगमन व विप्रोदरव्यथा निवारण' नावाचा अध्याय तेरावा समाप्त. ================================= अध्याय १४ वा क्रूरयवन शासन - सायंदेव वरप्रदान ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक सिद्धमुनींना नमस्कार करून जयजयकार करून म्हणाला, "अहो योगीश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथाभाग सांगा. त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्रीगुरू प्रसन्न झाले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे. "नामधारकाने अशी विनंती केली असता, सिद्धयोगी म्हणाले, "बा शिष्य ऐक. श्रीगुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे.श्रीगुरुंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायंदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले. ते सायंदेवाला म्हणाले, "तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील." श्रीगुरुंनी असा आशीर्वाद दिला असता सायंदेवाला अतिशय आनंद झाला. श्रीगुरुंच्या चरणांना पुनःपुन्हा वंदन केले. श्रीगुरूंचा जयजयकार करीत तो म्हणाला,"गुरुदेव, आपण त्रिमूर्तींचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता. तुमचे माहात्म्य वेदांनाही समजत नाही.तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा-विष्णू-महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेष धारण केला आहे. मी तुमचे माहात्म्य वर्णन करू शकत नाही. तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे. माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो. माझ्या कुळातील सर्वांना पुत्रपौत्रादी सर्व सुखे प्राप्त होवोत. शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो." अशी प्रार्थना करून सायंदेव म्हणाला,"गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवाचाकरी करतो. तो अत्यंत क्रूर, दृष्ट बुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राम्हणांना ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याचे ठरविले आहे.त्यासाठीच त्याने मला बोलाविले आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमचे चरणदर्शन झाले आहें, मला त्या यवनाकडून मरण कसे येणार ? सायंदेव असे म्हणाला असता श्रीगुरू त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, "तू कसलीही काळजी करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवील.तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू परत आलास की मी येथून जाईन. तू माझा भक्त आहेस. तुला वंशपरंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल. तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील.तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होतील." श्रीगुरुंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायंदेव त्या यवनाकडे गेला. सायंदेवाने त्या यवनाकडे पहिले तो काय ? तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायंदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लालेलाल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला. इकडे सायंदेव मनात श्रीगुरुंचे चिंतन करीत होता. वाळवीला क्रोध आला तरी ती अग्नीस स्पर्श करू शकत नाही,त्याप्रमाणेंच ज्यांवर गुरुकृपा असते त्यांस क्रूर दुष्ट काय करील बरें ? किंवा एखाद्या गरुडाच्या पिल्लासदेखील सर्प कधीही ग्रासू शकत नाहीं, तशीच त्या ब्राह्मणावर गुरुकृपा होती.किंवा ज्याप्रमाणे एखाद्या सिंहावर ऐरावत कधीही हल्ला करीत नाही, त्याचप्रमाणे गुरुकृपा झालेल्यास कली-काळाचे भय नसते.ज्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही. त्याला मृत्यूचीही भीती नसते.ज्याच्यावर श्रीगुरूंची कृपा असते त्याला मुळातच यमाची भीती असत नाही. त्या यवनांस चक्कर येऊ लागली. तशा स्थितीत तो आडवा झाला. त्यला झोप आली. त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहे." अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला. हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना.तेथे भयभीत होऊन म्हणाला,"आपल्याला इकडे कोणी बोलाविले ? आपण कृपा करून परत जा." अशी विनंती करून त्या यवनाने सायंदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. सायंदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते. त्या यवनाने सायंदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदीत झालेला सायंदेव धावतच श्रीगुरुंना - म्हणजे श्रीनृसिंह-सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदीतीरावर सद्गुरु श्रीनृसिंह-सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते.सायंदेवाने श्रीगुरुंच्या चरणांवर मस्तक ठेवले.त्याने श्रीगुरुंचे स्तवन करून त्यानं सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी "आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत." असे श्रीगुरुंनी सांगितले. हे ऐकताच सायंदेव हात जोडून म्हणाला, "गुरुदेव, मलाही तुमच्याबरोबर न्या. तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. आपणच रक्षणकर्ते आहात. आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले आहे. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली, त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात. आपण भक्तवत्सल आहात. मग माझा त्याग का करता ? आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच." असे म्हणून सायंदेवाने श्रीगुरुंच्या चरणांना मिठी मारली.सायंदेवाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेले श्रीगुरू नृसिंहसरस्वती त्याला समजावीत म्हणाले, "सायंदेवा, आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी पंधरा वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ.आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. मग तू आपल्या पुत्र-कलत्रासह मला भेटावयास ये. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत." असे आश्वासन देऊन श्रीगुरुंनी सायंदेवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला.मग ते आपली शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथक्षेत्री आले. तेथे ते गुप्तपणे राहिले. ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धमुनींना विचारले, "श्रीगुरू-नृसिंहसरस्वती वैजनाथक्षेत्री गुप्तपणे का राहिले ? त्यांचे जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले ? सर्व इच्छा पूर्ण करणारे श्रीगुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत. श्रीगुरुनृसिंहसरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले. ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे. ती ऐकण्यासाठी मन एकाग्र करा. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'क्रूरयवन शासन - सायंदेव वरप्रदान' नावाचा अध्याय चौदावा समाप्त. ============================= अध्याय १५ वा श्रीगुरुंचे वैजनाथक्षेत्री निरुपण ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "बा रे शिष्या, नामधारका, तुझी गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला अतिशय आनंद होत आहे. खरोखर, तू धन्य आहेस. तू मला विचारलेस - श्रीगुरूनृसिंहसरस्वती वैजनाथक्षेत्री गुप्तपणे का राहिले ? त्याचे कारण ऐक." श्रीगुरू वैजनाथक्षेत्री आले असता त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. अनेक लबाड, स्वार्थी लोक आपल्या इच्छा, वासना पूर्ण करण्यासाठी येऊ लागले. या कलियुगात अनेक लोक केवळ आपल्या वासनापूर्तीसाठी शिष्यत्व स्वीकारतात. त्यांना आपल्या गुरुपासून ज्ञान नको असते. त्यांना आपल्या वासना पूर्ण करावयाच्या असतात. पूर्वी परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय करून ब्राम्हणांना दिली. पण त्या ब्राम्हणांच्या कामना काही कमी झाल्या नाहीत. अनेक गोष्टी मागण्यासाठी ते येत. त्याच्या मागण्याला काही अंतच नव्हता, म्हणून तर ते गुप्त झाले. विश्वव्यापक परमेश्वर काहीही देऊ शकतो; पण वरदानांतही पात्र-अपात्रतेचा विचार करावाच लागतो. स्वार्थी, लबाड लोकांचा उपसर्ग होऊ नये म्हणून श्रीगुरु गुप्तपणे राहू लागले. नामधारका, त्यावेळी श्रीगुरू आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हणाले, "तुम्ही आता भारतभर तीर्थयात्रा करीत फिरा. सर्व तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर "श्री शैल' पर्वतावर या." श्रीगुरुंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्यांना अतिशय दुःख झाले. ते श्रीगुरुंच्या चरणांना वंदन करून म्हणाले, "स्वामी, आम्हाला आपल्या पवित्र चरणीं सर्व तीर्थांची प्राप्ती होते. तुमचे चरण सोडून आम्ही कुठे जाणार ? 'श्रीगुरूचरणांपाशीच सर्व तीर्थे असतात' असे सर्व वेदशास्त्रे सांगतात. जवळ असलेल्या कल्पवृक्षाचा त्याग करून रानावनात कशासाठी जावे ? " त्यावर श्रीगुरू म्हणाले, " तुम्ही सर्व संन्यासी आहात. जो संन्यासी आहे त्याने एकाच जागी पाच दिवसांपेक्षा अधिककाळ राहू नये. म्हणून तुम्ही सर्वत्र भ्रमण करा. तुमचे मन स्थिर होईल. मग एकाच जागी राहावे. या तीर्थाटनात तुम्हाला अधिक ज्ञान मिळावे अशी आमची इच्छा आहे. बहुधान्य संवत्सरात आम्ही श्रीशैल्यक्षेत्री असू. तेथेच आपली भेट होईल." श्रीगुरुंनी असे सांगितले असता सर्व शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, "तुमचे वाक्य आम्हाला परीसासमान आहे.जो आपल्या गुरुची आज्ञा मानीत नाही तो भयंकर अशा रौरव नरकात जातो. गुरुंची आज्ञा पाळणे हे शिष्याचे कर्तव्यच आहे. म्हणून आम्ही आता तीर्थयात्रा करू. आम्ही कोणकोणत्या तीर्थक्षेत्री जावे ते कृपा करून सांगा. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही जाऊ." शिष्यांनी असे विचारले असता श्रीगुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, "तुम्ही सर्वप्रथम काशीक्षेत्री जा. काशी हे या भूमंडलातील तीर्थराज आहे." असे सांगून त्यांनी गंगा, यमुना, सरस्वती, वरुणा, कुशावर्ती, कृष्णा, वेणी, वितस्ता, शरावती, मरुद्व्रुद्धा असिवनी, मधुमती, सुरनदी, चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका, कौशिका, मंदाकिनी, सहस्त्रवक्त्रा, पूर्णा, बहुधा, वरुणा, वैरोचनी, सन्निहिता, नर्मदा, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, अमरजा, पाताळगंगा, कावेरी, ताम्रपर्णी, कृतमाला, पंचगंगा, मलप्रभा, श्वेतशृंगी या नद्यांच्या तटाकयात्रा कराव्यात म्हणजे सर्व तीर्थाचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होईल. या नद्यांमध्ये स्नान करून जवळपासची सर्व गांवे व परिसर पाहावेत. प्रत्येक ठिकाणी क्रुच्छव्रत करावे. श्रीगुरुंनी आपल्या शिष्यांना गयातीर्थ, रामेश्वर, श्रीरंग, पुष्कर, बदरी, कुरुक्षेत्र, महालय, सेतुबंध, गोकर्ण, कोटीतीर्थ, जगन्नाथपुरी, भीमेश्वर, अयोध्या, मथुरा, द्वारका, कुशातर्पण, कुंभकोण, हरेश्वर, गाणगापुंर, नृसिंहतीर्थ, कोल्हापूर, भिल्लवडी, अमरापूर, युगालय, शूर्पालय, पीठापूर, शेषाद्री, वृषभाद्री, श्रीशैल इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य सांगून त्यांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. श्रीगुरुंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्य ती आज्ञा मान्य करून तीर्थयात्रेला गेले. श्रीगुरू वैजनाथक्षेत्री गुप्तपणे राहिले. सरस्वती गंगाधर सांगतात. आता पुढील कथा श्रवण करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील. श्रीगुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे. त्याचे श्रवण-पठण केले असता चारी पुरुषार्थ प्राप्त होतात. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'श्रीगुरुंचे वैजनाथक्षेत्री निरुपण ' नावाचा अध्याय पंधरावा समाप्त. ============================= अध्याय १६ वा गुरुभक्तीचे माहात्म्य - धौम्य शिष्याची कथा ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, "स्वामी, तुला श्रीगुरुचरित्र आणखी सविस्तर सांगा. सगळे शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्रीगुरुंच्याजवळ कोण राहिले ? पुढे काय घडले ते मला सविस्तर सांगा." नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, "नामधारका, तू खरोखरच धन्य आहेस. तू खरोखरच श्रेष्ठ गुरुभक्त आहेस. आज तूच माझ्यावर उपकार केले आहेस. माझे मन अविद्यारूप गाढ निद्रेत झोपले होते. तुझ्यामुळे ते जागृत झाले आहे.तू माझा प्राणसखा आहेस. तुझ्यामुळे मला सुखलाभ झाला आहे. मला श्रीगुरुचरित्र आठवले. आज तूच मला सुधामृतसागरात लोटले आहेस. तू माझ्यावर अनंत उपकार केले आहेस. त्यामुळे मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. तुला पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल. तुझ्या घरी कधीही दुःख-दारिद्र्य येणार नाही. तुला सर्वत्र मानसन्मान प्राप्त होतील.तुझ्या घरी अष्टैश्वर्ये नांदतील. श्रीगुरुचरित्र साक्षात कामधेनू आहे. ते चरित्र मी तुला विस्ताराने सांगतो. श्रीगुरुच्या आज्ञेने सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्रीगुरू वैजनाथक्षेत्री गुप्तपणे राहिले. त्यावेळी त्यांच्याबरोबर मी होतो. एक वर्षभर श्रीगुरुंचे तेथे वास्तव्य होते. एके दिवशी एक तपस्वी ब्राह्मण श्रीगुरूंच्याकडे आला व त्यांच्या चरणांवर डोके ठेवून म्हणाला, "स्वामी, मी अज्ञानासागरात बुडलो आहे. माझा उद्धार करा. माझे रक्षण करा. मी खूप दिवस तप केले; पण मला अद्याप आत्मज्ञान झालेले नाही. माझे मन एकाग्र होत नाही. ज्ञान झाले नाही तर तपश्चर्या व्यर्थ आहे. आज तुमचे दर्शन झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. तुम्हीच या विश्वाचे तारक आहात. तुम्ही सद्गुरु आहात. म्हणून मला उपदेश करा म्हणजे मला त्वरित ज्ञानप्राप्ती होईल." तो ब्राह्मण असे म्हणाला असता, श्रीगुरु हसून म्हणाले."तू स्वतःला तपस्वी म्हणवितोस, तेव्हा तुला कोणीतरी गुरु असलाच पाहिजे." श्रीगुरू असे म्हणाले असता तो तपस्वी ब्राह्मण रडत रडत म्हणाला, "मला गुरु आहेत, पण ते अत्यंत निष्ठुर आहेत. मला फार त्रास देतात. मला वाटेल ते टाकून बोलतात. जी कामे करू नयेत अशी कामे मला सांगतात. मला वेदशास्त्र, तर्क, भाष्य, व्याकरण यातील काहीच शिकवीत नाहीत. 'तुझे अंतःकरण अद्याप स्थिर, शांत नाही.' असे म्हणून मला दुसरीच कामे सांगतात; पण मी त्यांची कोणतीही आज्ञा मानीत नसे.त्यामुळे ते माझ्यावर खूप रागावत असत. या सर्व त्रासांतून सुटका घेण्यासाठी मी त्यांचा त्याग केला." त्या ब्राम्हणाचे हे बोलणे ऐकून श्रीगुरुंना हसू आले. ते त्याला म्हणाले, "तू मोठा आत्मघातकी आहेस. हे तुझे वर्तन म्हणजे स्वतःचे नाक कापून,दुसऱ्याला अपशकून करण्यासारखे आहे. तू स्वतःचे गुणदोष पाहत नाहीस आणि आपल्या गुरुचे दोष ओरडून सांगतोस. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तू गुरुद्रोही आहेस. मग तुला ज्ञानप्राप्ती कशी होणार ? घरात द्रव्याचा ठेवा असताना तो मिळविण्यासाठी रानोरान कशासाठी भटकायचे ? घरी कामधेनू असताना ताकासाठी दारोदार फिरण्यात कोणता शहाणपणा? जो गुरुद्रोही असतो त्याचे इह-पर कल्याण कधीच होत नाही. त्या दिवांधकाला ज्ञान प्राप्त कसे होणार ? जो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करतो त्याला सर्वप्रकारचे ज्ञान होते.अष्टसिद्धी वश होतात. यासाठी गुरूला शरण जावे." श्रीगुरुंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण त्यांच्या चरणांना वंदन करून हात जोडून म्हणाला, "स्वामी, आपण जगद्गुरु आहात. मी केवळ अज्ञानी आहे. माझा उद्धार करा. मला गुरुची ओळख नाही. त्यामुळेच माझ्या हातातून प्रमाद घडला. मला आता त्याविषयी सविस्तर सांगा." त्या ब्राह्मणानें अशी विनंती केली असता श्रीगुरुंना त्याची दया आली. ते त्याला म्हणाले, "गुरु हे मात्यापित्यासमान असतात. गुरु हा ब्रह्मा-विष्णू-महेशस्वरूप असतो. त्याचे आपल्या शिष्यावर निरपेक्ष प्रेम असते, म्हणून आपल्या गुरुची अगदी मनोभावे सेवा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा महाभारताच्या आदिपर्वात आलेली आहे. द्वापारयुगाच्या अखेरच्या काळातील ही कथा आहे. त्या काळी धौम्य नावाचे एक थोर ऋषी होते. त्यांचा एक आश्रम होता.त्या आश्रमात अनेक शिष्य होते. ते आपल्या गुरुंची मनोभावे सेवा करून वेदविद्या शिकत होते. त्याच आश्रमात अरुणी, बैद (वेद) व उपमन्यू असे तीन शिष्य आपल्या गुरुंची सेवा करीत वेदाध्ययन करीत होते. पूर्वी आपल्या शिष्यांना अनेक प्रकारची कामे करावयास लावत. ती कामे शिष्य किती चिकाटीने, कष्टाने व आपल्या गुरुवरील परमश्रद्धेने करतात याची ते परीक्षा घेत असत. मग सर्व कसोट्यांवर उतरलेल्या शिष्यावर तत्काळ कृपा करून त्याच्या मनोकामना पूर्ण करीत. धौम्यऋषी याच परंपरेतील होते. एकदा काय झाले, पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात काळे काळे मेघ जमले होते. धौम्यऋषी आपल्या आश्रमात विद्यार्थ्यांना शिकवीत होते.त्याचवेळी मोठा वारा सुरु झाला, विजा चमकू लागल्या आणि एकदम मुसळधार पाऊस सुरु झाला. पाण्याचे लोट वाहू लागले. धौम्यऋषी मोठ्या काळजीत पडले. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, "इतका मोठा पाऊस पूर्वी कधी पडला नव्हता. आपल्या भाताच्या शेताचा बांध घट्ट केला नाही तर शेतातील पाणी वाहून जाईल व सगळ पीक वाया जाईल." हे शब्द ऐकताच सगळे शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. आता आपल्यापैकी कुणाला तरी गुरुदेव आज्ञा करणार म्हणजे आता पावसात भिजावे लागणार ! काय ही कटकट ! " असा विचार करून, काहीतरी कारण काढून एकेक शिष्य उठला व आपल्या झोपडीकडे निघाला. त्या शिष्यांत आरुणी नावाचा जो शिष्य होता, तो अत्यंत नम्र, कष्टाळू होता. गुरुंनी सांगितलेले कोणतेही काम करण्यास तो एका पायावर उभा असे. आपल्या गुरूंवर त्याची नितांत भक्ती होती. कोणत्याही कामाची त्याला लाज वाटत नसे. आरुणी हात जोडून आपल्या गुरूंना म्हणाला, "गुरुदेव, मला आज्ञा करा. मी जातो व बांध पक्का करून येतो." धौम्य म्हणाले, "जा बाळ, बांध घट्ट करून ये, कितीही त्रास पडला तरी आळस करू नकोस." आरुणी धावत शेतात गेला. पाऊस पडताच होता. शेताचा बांध फुटला होता व त्यातून पाणी जोरात वाहून जात होते. आरुणीने मोठेमोठे दगड आणून टाकले, माती घातली पण पाण्याला इतका ओघ होता, की आडवे सगळे दगड वाहून जात होते. त्याच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडले. त्याला अतिशय वाईट वाटले. आता काय करायचे ? आरुणीपुढे मोठा प्रश्नच उभा राहिला. बांध घट्ट कसा करायचा ? पाणी कस अडवायचं ? आपणास काही जमत नाही म्हणून तसंच परत नाही जायचं. छे छे ! हे होणे नाही, प्राण गेला तरी चालेल. पण तसेंच परत नाही जायचं. आरुणीने निश्चयपूर्वक ठरविले. विचार करता करता त्याला एक चांगली युक्ती सुचली.शेताचा बांध जेथे फुटला होता तेथे तो आडवा पडला. त्यामुळे वाहून जाणारी माती, दगड त्याच्या शरीराला चिकटून बसली.त्यामुळे चांगला बांध तयार झाला. जिवंत बांधापुढे पाण्याला हार खावी लागली. आता शेतातून पाण्याचा एक थेंबसुद्धा वाहून जात नव्हता. आरुणी मोठ्या आनंदाने आपल्या गुरूंचे स्मरण करीत होता. संध्याकाळ झाली तरी आरुणी तसाच पडून होता. रात्र झाली तरी आरुणी परत आश्रमात आला नाही. धौम्यऋषी मोठ्या काळजीत पडले.ते उठले, मशाल पेटविली व तिच्या प्रकाशात ते शेतात गेले; पण आरुणी कुठे दिसत नव्हता, "अरे आरुणी बाळा , कुठे आहेस रे ?" अशा हाक मारू लागले; पण स्थिर उत्तर मिळेना. धौम्यऋषी व्याकूळ झाले. शेतात शोधू लागले. आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जेथे बांध फुटला होता तेथे सारे पाणी अडविण्यासाठी आरुणी आडवा पडला होता. त्याचे सगळे शरीर चिखलाने माखले होते. त्याची शुद्ध गेली होती. शरीर पार गारठले होते. सारा प्रकार धौम्यऋषींच्या लक्षात आला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी आरुणीला उचलून आश्रमात आणले. त्याचे शरीर पुसले.गरम पाण्याने शेकले. थोड्या वेळाने आरुणी सावध झाला. त्याने झालेला सगळा प्रकार सांगितला. त्याची कर्तव्यनिष्ठा व गुरुभक्ती पाहून त्यांचे अंतःकरण भरून आले. त्यांनी मोठ्या वात्सल्याने त्याला जवळ घेतले. तय्च्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, "बाळ आरुणी ! तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला सर्व विद्या प्राप्त होतील.तुझे जीवन सुखी होईल." त्यांच्या आशीर्वादाने आरुणी तत्काळ महाज्ञानी झाला. दुसऱ्या दिवशी धौम्यऋषी त्याला म्हणाले, "आरुणी, तुझे अध्ययन पूर्ण झाले आहे. सेवेच्या रूपानें तू मला गुरुदक्षिणाही दिली आहेस. आता तू आपल्या घरी परत जा.विवाह करून सुखाने संसार कर." आपल्या गुरूंचा निरोप घेऊन आरुणी आपल्या घरी परत गेला. पुढे हा आरुणी एक थोर ऋषी म्हणून प्रसिद्ध पावला. गुरूंचा आशीर्वाद खरा झाला. आरुणी निघून गेल्यावर धौम्यऋषींनी आपला दुसरा शिष्य बैद (वेद) याची परीक्षा पाहण्याचे ठरविले. बैद हा आरुणीप्रमाणेच आपल्या गुरुंची अगदी मनोभावे सेवा करीत होता. एके दिवशी धौम्यऋषी त्याला म्हणाले, "तुला मी आता एक सांगतो ते ऐक. तू आता आपल्या शेताकडे जा व तेथेच राहून आपल्या भातशेतीची निट देखभाल कर. पीक तयार झाले की धान्य घरी आण." धौम्यऋषींनी अशी आज्ञा करताच बैद मोठ्या आनंदाने शेताकडे गेला व शेतीची अगदी चांगल्याप्रकारे देखभाल करू लागला. तो दिवस-रात्र शेतात काम करीत होता. भातेशेती तयार झाल्यवर त्याने कापणी केली, झोडपणी केली व खळ्यात धान्याची रास केली, मग त्याने आश्रमात जाऊन सांगितले, "धान्य तयार झाले आहे. आता काय करू ?" धौम्य ऋषी म्हणाले ,"तू खूप कष्ट केले आहेस. आता तयार झालेले धान्य घेऊन ये." असे सांगून त्यांनी त्याला एक रेडा जुंपलेला गाडा दिला. बैद गाडा घेऊन शेतात गेला. त्याने दोन खंडी भात गाड्यात भरले व तो धान्याचा गाडा घेऊन आश्रमाकडे निघाला ; पण तो दोन खंडी भात रेड्याला ओढवेना. आता काय करायचे असा बैदापुढे प्रश्न निर्माण झाला. शेवटी त्याने जोखडात स्वतःची मान अडकविली व तो रेड्यासह गाडा ओढू लागला. वाटेत चिखलात रेडा रुतला. खूप प्रयत्न केले तरी काही केल्या रेडा चिखलातून बाहेर येईना. आता काय करायचे ? असा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. मग त्याने रेड्याला मोकळे केले व रेड्याच्या गळ्यामधील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला व खांद्याच्या आधाराने तो गाडा ओढू लागला. गाडा खूप जड होता त्यामुळे तो ओढताना त्याच्या गळ्याला फास लागला. त्याचा जीव कासावीस झाला; पण तो डगमगला नाही. थांबला नाही. त्याने मोठा नेट लावून गाडा ओढत ओढत आश्रमात आणला. बैदाची ती अवस्था पाहून धौम्यांच्या मनात त्याच्याविषयी अपार करुणा निर्माण झाली. त्यांनी बैदाला सोडवून मोठ्या प्रेमाने त्याला गाढ आलिंगन दिले. बैदाची भक्ती, श्रद्धा, कर्तव्यनिष्ठा पाहून धौम्यऋषी प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिला. "तू सर्वशास्त्रसंपन्न होशील." त्याचक्षणी त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्या. मग तो आपल्या गुरूंना वंदन करून स्वगृही परत गेला. धौम्य ऋषींचा तिसरा शिष्य उपमन्यू. तोही आपल्या गुरुंची मनोभावे सेवा करीत असे. धौम्य ऋषी आपल्या शिष्यांची अगदी कसून परीक्षा घेत असत व मगच त्यांच्यावर कृपा करीत असत. उपमन्यूची भूक मोठी होती. त्यामुळे तो खूप खात असे. अशा आहारामुळे त्याची बुद्धी जड झाली होती. त्यामुळे विद्याभ्यासात त्याची प्रगती होत नसे. यावर गुरुंनी एक उपाय शोधून काढला. त्यांनी त्याला गाई-गुरे चारण्याचे काम दिले. गुरूंच्या आज्ञेने तो दररोज गुरे- वासरे रानात घेऊन जात असे. उपमन्यू दिवसभर गाई-गुरे रानात चरत असे व त्या संध्याकाळी परत आणीत असे. आता याची परीक्षा घ्यायची असे गुरुंनी ठरविले. नेहमीप्रमाणे उपमन्यू संध्याकाळी गाई घेऊन परत आला तेव्हा गुरुंनी त्याला विचारले, "बाळ उपमन्यू, मी तर तुला खायला काहीही देत नाही तरीसुद्धा तुझे शरीर इतके पुष्ट कसे ?" उपमन्यू म्हणाला, "गुरुदेव, गुरे-वासरे रानात चरत असताना मी दुपारच्यावेळी जवळपासच्या चार घरी अन्नाची भिक्षा मागतो व जेवतो." गुरु धौम्य म्हणाले, "अरे, मिळालेली भिक्षा मला अर्पण केल्याशिवाय खाणे योग्य नाही. ते पाप आहे. तेव्हा जी भिक्षा मिळेल ती प्रथम मला देत जा." गुरूंच्या आज्ञेप्रमाणे उपमन्यू वागू लागला, पण गुरु त्या भिक्षेतील एक घासही उपमन्यूला देत नसत.काही दिवसांनी गुरुंनी पुन्हा विचारले, "बाळ, आता तू काय खातोस ?" उपमन्यू म्हणाला, "गुरुदेव, पहिली भिक्षा तुम्हाला देतो व दुसरी भिक्षा मी खातो." तेव्हा गुरु म्हणाले, "अरे ! दोन वेळा भिक्षा मागणे पाप आहे." उपमन्यूने गुरूंच्या आज्ञेचे पूर्ण पालन केले. तरीसुद्धा त्याचे शरीर पूर्वीसारखेच पुष्ट ! काही दिवसांनी पुन्हा उपमन्यू पूर्वीसारखा पुष्ट पाहून गुरुंनी, "बाळ, आता काय खातोस ?" उपमन्यू म्हणाला, "गुरुदेव, रानात गाईंना वासरे पिऊ लागली कि त्यांच्या तोंडातून दुध बाहेर गळते. गळणारे ते दुध मी द्रोणात धरून पितो." तेव्हा गुरु म्हणाले, "अरेरे, ही तर सर्वात वाईट गोष्ट. उष्टे काही खाल्ले असता माणसाची बुद्धी मंद होते." उपमन्यूने तेही सोडून दिले. आता त्याला उपवास घडू लागला. काय खावे त्याला समजेना. तो भुकेने अगदी कासावीस होत असे. संध्याकाळी परत येताना त्याच्या अंगात अगदी त्राण नसे. एके दिवशी रानात रुईच्या पानातून पांढरा शुभ्र चीक गळत असल्याचे उपमन्यूने पाहिले.त्याला वाटले, ते दुध आहे 'हे उष्टे दुध नाही' असा विचार करून त्याने पानांच्या द्रोणात तो चीक धरला.दूध समजून तो प्याला, पण पितापिता त्याच्या डोळ्यात चीक गेला. त्यामुळे त्याची दृष्टीच गेली. तो आंधळा झाला.त्याला समोरचे काहीही दिसेनासे झाले. आता गुरांना घरी कसे न्यायचे ? त्याच्यापुढे मोठाच प्रश्न पडला. आता आपणास गुरुदेव रागावणार ? त्यांना काय सांगायचे ? तरीही तो तसाच चालत गाई हाकू लागला, परंतु एका विहिरीत पडला. दृष्टी गेल्यामुळें त्याला विहिरीतून बाहेर पडता येईना. संध्याकाळ झाली. गुरे आश्रमात परत गेली. अजून उपमन्यू कसा आला नाही ? याबद्दल ऋषींना काळजी वाटू लागली. ते त्याला शोधण्यासाठी रानात गेले. ते त्याला मोठ्याने हाका मारू लागले.गुरूंचे शब्द कानी पडताच विहिरीत पडलेला उपमन्यू मोठ्यांदा म्हणाला , "गुरुदेव, मी येथे विहिरीत पडलो आहे." तू विहिरीत कसा पडलास ? " असे त्यांनी विचारले असता उपमन्यूने जे घडले ते सर्व सांगितले. ते ऐकताच धौम्य ऋषींना अतिशय वाईट वाटले. त्यांच्या मनात अपार कृपा आली. त्यांनी उपमन्यूला अश्विनीकुमारांचे स्मरण करण्यास सांगितले. त्याने अश्विनीकुमारांचा धावा करताच प्रसन्न झालेल्या अश्विनीकुमारांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली. तो विहिरीतून बाहेर आला. त्याने आपल्या कृपासागर गुरुदेवांच्या चरणांना भक्तिभावाने वंदन केले. उपमन्यूचा भक्तिभाव, त्याची गुरुवरील अनन्यनिष्ठा पाहून धौम्यऋषींनी त्याला पोटाशी धरले, प्रसन्न झालेल्या धौम्यऋषींनी आशीर्वादपूर्वक आपला वरदहस्त उपमन्यूच्या मस्तकावर ठेवला. त्याचक्षणी उपमन्यूला सर्व विद्या प्राप्त झाल्या. त्याने त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. धौम्यऋषी त्याला म्हणाले, "तुला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत. आता तू घरी जाऊन सुखाने संसार कर. तुला खूप मोठी कीर्ती प्राप्त होईल. तुला अनेक शिष्य मिळतील. तुझा शिष्य उत्तंक मोठा ज्ञानी व पराक्रमी होईल. गुरुदक्षिणा म्हणून तो शेषाला जिंकून कुंडले आणून देईल. जनमेजय राजाला सर्पसत्रात मदत करील. इंद्राला तक्षकासह शरण आणील." धौम्यऋषींनी असा आशीर्वाद दिला असता उपमन्यू आनंदाने स्वगृही गेला. सिद्ध म्हणाले, "नामधारका, गुरुसेवेची आदर्श उदाहरणे व गुरुसेवेचे माहात्म्य या विषयी श्रीगुरू नृसिंहसरस्वतींनी त्या तापसी ब्राह्मणाला धौम्यऋषींच्या कथा सांगितल्या. त्या कथा सांगून श्रीनृसिंहसरस्वती ब्राह्मणाला म्हणाले, "तू गुरु कडक बोलतात, वाटेल ती कामे सांगतात म्हणून त्यांचा त्याग करून येथे आलास. तू मोठा गुरुद्रोही आहेस. तू आपल्या गुरुंची निंदा केलीस हे महापाप आहे." श्रीगुरूनृसिंहसरस्वती असे बोलले असता तो तापसी ब्राह्मण पश्चात्तापाने पोळून निघाला. मोठ्यांदा रडू लागला. स्वतःची निंदा करू लागला. गुरुद्रोहाचे प्रायश्चित्त म्हणून मी आता प्राणत्याग करतो असे बोलू लागला, 'पश्चात्तापेन शुध्यति' या वचनानुसार त्या ब्राह्मणाचे गुरुद्रोहाचे पाप नाहीसे झाले. श्रीगुरुंनृसिंहसरस्वतींच्या कृपेने त्या ब्राह्मणाला सर्व विद्या प्राप्त झाल्या. मग श्रीगुरु त्याला म्हणाले, "आता तू तुझ्या गुरुच्याकडे परत जा. ते तुझा स्वीकार करतील. तू त्यांची सेवा कर यातच तुझे कल्याण आहे." त्या तपस्वी ब्राह्मणाने ते मान्य केले व तो आपल्या गुरूंकडे गेला." सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "तो ब्राह्मण निघून गेल्यावर श्रीनृसिंहसरस्वती कृष्णानदीच्या तीरावर भिल्लवडी येथे गेले. तेथील वास्तव्यात त्यांचा महिमा सर्वत्र पसरला.त्या विषयीची कथा नंतर सांगतो." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'गुरुभक्तीचे माहात्म्य - धौम्य शिष्याची कथा' नावाचा अध्याय सोळावा समाप्त. ============================= अध्याय १७ वा मंदबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, तू खरोखर श्रेष्ठ गुरुभक्त आहेस हे पाहून माझ्या मनाला विशेष आनंद होत आहे. पाऊस सुरु होण्या-अगोदर त्याची पूर्वसूचना देणारा वारा वाहू लागतो. त्याप्रमाणे श्रीगुरुचरित्र श्रवण करण्याची तुझी तीव्र इच्छा ही तुझ्या दैन्यनाशाचे पूर्वचिन्ह आहे. हे श्रीगुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. ते मी तुला सविस्तर सांगतो. ते तू एकाग्रचित्ताने श्रवण कर. कृष्णावेणी नद्यांच्या तीरावरील भिल्लवडी क्षेत्राच्या पश्चिमतीरावर औदुंबर हे तीर्थक्षेत्र आहे. तेथील औदुंबर वृक्षाखाली श्रीगुरू नृसिंहसरस्वती एक चातुर्मास (चार महिने) गुप्तपणे राहत होते. भुवनेश्वरीच्या जवळ श्रीगुरुंची तपोभूमी होती, त्यामुळे ते स्थान (औदुंबर) सिद्धस्थान म्हणून प्रसिद्ध पावले. त्या औदुंबरक्षेत्री श्रीगुरू गुप्तपणे का राहिले ? ते तर साक्षात परमात्मा परमेश्वर, मग त्यांना भिक्षा मागण्याची व जप-तप करण्याची आवश्यकता का होती ?" नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, साक्षात सदाशिव शंकर व श्रीदत्तात्रेयसुद्धा भिक्षा मागत असत. भिक्षा मागणे हे केवळ निमित्त. भिक्षेच्या निमित्ताने ते अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत असत. जे रंजले गांजलेले भक्त असत त्यांच्यावर ते अनुग्रह करीत असत. श्रीगुरुंच्या वास्तव्याने अनेक गुप्ततीर्थक्षेत्रे प्रकट झाली. भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठीच श्रीगुरू भिक्षेच्या निमित्ताने फिरत असत. पण अनेक लोक नानाप्रकारच्या लौकिक गोष्टी मागण्यासाठी त्यांच्याकडे वारंवार येऊ लागले, म्हणूनच ते गुप्तपणे राहू लागले. पण कस्तुरी कितीही झाकून ठेवली तरी तिचा सुगंध लपून राहत नाही. तो दरवळतोच. त्याप्रमाणे श्रीगुरू भिल्लवडीक्षेत्री गुप्तपणे राहत असले तरी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. सूर्य लपविला तरी त्याचे तेज लपून राहत नाही हे खरे. श्रीगुरुंचे माहात्म्य कसे प्रकट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो. ती ऐक. करवीरक्षेत्रात वेदशास्त्रपारंगत असा एक ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. विद्वान लोकांच्यात त्याला मोठा मन होता. त्याला एक मुलगा झाला पण दुर्दैवाने तो उपजत:च अगदी मतीमंद होता. कितीही शिकविले तरी त्याला काहीच येत नसे. काही समजत नसे.तो लहान असतानाच त्याचे आई-वडील देवाघरी गेले. त्याच्या नात्यातील लोकांनी त्याचे पालन पोषण केले. बघता बघता तो सात वर्षांचा झाला. कुळाचारानुसार सातव्या वर्षी त्याची मुंज झाली. मौंजीबंधानंतर त्याला अध्ययनासाठी गुरूकडे पाठविले, पण तो मतिमंद असल्यामुळे गुरुंनी शिकविलेले त्याला काहीच समजत नव्हते. त्याला संध्या येत नव्हती. गायत्री मंत्र येत नव्हता.मग वेदाध्ययन कुठले ? ब्राह्मणाला विद्या नाही तर पोट कसे भरणार ? विद्वान ब्राह्मणाचा मठ्ठ मुलगा अशी त्याची सर्व लोक थट्टा करीत असत. लोक त्याला म्हणत, "अरे मूर्खा ! तुझे वडील केवढे विद्वान होते ! तू मात्र अगदी दगडधोंडा आहेस. तू तुझ्या वडिलांच्या कीर्तीला बट्टा लावलास.अरे, ज्याला विद्या नाही तो मनुष्य अगदी पशू होय. विद्वानांची सर्वत्र पूजा होते. तुझ्यासारख्या दगडाची नाही. तुझा जन्म अगदी फुकट आहे. तू आणि सूकर यात काही फरकच नाही. आचारहीन अशा तुला या जन्मात कदापि सुख मिळणार नाही. मृत्यूनंतर तुला नरकातच जावे लागेल. असले लाजिरवाणे जिणे जगण्यापेक्षा तू मारत का नाहीस ?" लोकांनी केलेली निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला. तो लोकांना म्हणाला, "मी गतजन्मी विद्यादान केले नाही म्हणून मला या जन्मात विद्याभ्यास जमत नाही. त्याला मी तरी काय करणार ? आता तुम्हीच काहीतरी उपाय करा." त्यावर लोक हसून म्हणाले, "आता तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल.या जन्मी तू भीक मागून जग." लोकांनी केलेली हि निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला, त्याने गाव सोडले. तो रानावनातून फिरत चालला. 'मूर्ख म्हणून जिवंत राहण्यापेक्षा आपण प्राण द्यावा. मरून जावे.' असे त्याने ठरविले. आत्महत्येचा विचार करीत फिरत फिरत कृष्णानदीच्या काठावरील भिलवडी गावी आला. तेथे नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर होते. तेथे त्याने देवीचे दर्शन घेतले. त्याने अन्नपाण्याचा त्याग केला व देवीच्या समोर धरणे धरून बसला. देवीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी तो आक्रोश करीत देवीला आपले दुःख सांगू लागला, "हे जगन्माते, सर्व जगाने माझी हेटाळणी केली, माझी उपेक्षा केली; पण तू तरी माझ्यावर कृपा कर. मला दूर लोटू नकोस." तीन दिवस लोटले तरी पण देवीची आपल्यावर कृपा होत नाही, ती प्रसन्न होत नाही, हे पाहून त्याला अतिशय दुःख झाले. तो देवीला म्हणाला, "माते, आता मी काय करू ? कोठे जाऊ ? माझी हाक तुला का ऐकू येत नाही ? माझ्यावर तुझी कृपा होत नाही, म्हणून मी माझी जीभ कापून तुझ्या पायांवर वाहतो." असे म्हणून त्याने खरोखरच आपली जीभ कापली व देवीला अर्पण केली. तरीसुद्धा देवी प्रसन्न झाली नाही. तेव्हा तो देवीला कळवळून म्हणाला, "आतां माझ्यावर कृपा नाही केलीस तर उद्या मी सकाळी माझें मस्तक कापून माझे मस्तक तुला अर्पण करीन." त्यावर भुवनेश्वरी देवी प्रसन्न झाली. त्याच रात्री ती त्याच्या स्वप्नात आली. ती त्याला म्हणाली, "बाळा, तू इतके दुःख कशाला करतोस ? माझ्यावर रागावू नकोस. नदीच्या पलीकडे औदुंबर वृक्षाखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष आहेत. ते साक्षात श्रीदत्तात्रेयांचे अवतार श्रीनृसिंहसरस्वती आहेत . तू त्यांच्याकडे जा . तुझे काम होईल ." सकाळी मुलगा जागा झाला. त्याला रात्री पडलेले स्वप्न आठवले. तो नदीच्या पलीकडे गेला. तेथे औदुंबर वृक्षाखाली श्रीनृसिंहसरस्वती तपस्वी रुपात बसले होते. त्यानं पाहताच त्या मुलाला आनंद झाला. त्याने धावतच जाऊन त्यांचे पाय धरले. त्याला जीभ नसल्याने बोलता येत नव्हते, पण तो मनातल्या मनात श्रीगुरुंचे स्तवन करीत होता. श्रीगुरुंनी त्याचा मनोभाव ओळखला. ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेऊन आशीर्वाद दिला आणि काय आश्चर्य ! श्रीगुरूंचा स्पर्श होताच त्या मुलाला जीभ परत मिळाली. त्याचक्षणी त्याला वेदशास्त्रपुराणादी सर्व विद्या प्राप्त झाल्या. श्रीगुरु म्हणाले, माझी अगदी मनापासून जो भक्ती करील त्याला सर्व विद्या, सर्व सुखे प्राप्त होतील." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'मंदबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती' नावाचा अध्याय सतरावा समाप्त. =========================== अध्याय १८ वा अमरापूर माहात्म्य - ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक सिद्धमुनींचा जयजयकार करीत म्हणाला, "अहो गुरु, तुम्ही खरोखर संसारसागर तारक आहात. श्रीगुरुचरित्रामृताने तुम्ही माझे कान तृप्त केले आहेत. परंतु तुमच्या मुखातून श्रीगुरुचरित्र कथामृत कितीही श्रवण केले तरी ते अधिकाधिक ऐकण्याची मला इच्छा आहे, म्हणून मला आणखी सांगा." नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धमुनींना आनंद झाला. ते म्हणाले, "नामधारका, तुझी श्रीगुरूचरणी असलेली भक्ती पाहून मला आनंद होत आहे. आज तुझ्यामुळे मला संपूर्ण श्रीगुरुचरित्र आठवते आहे. मी तुला भिलवडी स्थान माहात्म्य सांगितले आहे. आता पुढचे चरित्र एकाग्रचित्ताने ऐक. भिल्लवडीक्षेत्री काहीकाळ वास्तव्य केल्यानंतर श्रीगुरू नृसिंहसरस्वती कृष्णानदीच्या काठाकाठाने परिभ्रमण करीत कृष्णा-वरूणा संगमावर आले. त्या स्थानाला दक्षिण-काशी असे म्हणतात. तेथून पुढे ते कृष्णापंचगंगा संगमावर आले. तेथे भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठी बारा वर्षे वास्तव्य केले. ते स्थान अत्यंत पवित्र असून त्याचे माहात्म्य काशी-प्रयागसमान आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती या प्रख्यात पाच नद्या व कृष्णा या नद्यांचा संगम तेथे आहे. या संगमात स्नान केले असता महापातकांचा नाश होतो. या क्षेत्राचे माहात्म्य कुरूक्षेत्रापेक्षा अधिक आहे. तेथे स्नान केल्याने सहा प्रकाराच्या महापातकांचा नाश होतो. प्रयागात माघस्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याच्या शतपट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते. येथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून त्याच्या दर्शनाने अमरत्व प्राप्त होते. येथे पवित्र औदुंबर वृक्ष असून तेथे चौसष्ठ योगिनी नित्य स्नान करतात. येथील संगमात अगणित तीर्थे आहेत. त्यात शुक्लतीर्थ, काम्यतीर्थ, वरदतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोटीतीर्थ ही विशेष प्रसिद्ध आहेत. या तीर्थात स्नान केले असता ब्रह्महत्यादी सर्व पातकांचा नाश होतो. अगणित पुण्याची प्राप्ती होते. याच कृष्ण-पंचगंगा संगमावर श्रीगुरूनृसिंहसरस्वती काही काळ गुप्त रूपाने राहिले. त्यानंतर त्यांचे माहात्म्य सगळीकडे प्रकट झाले. त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक. याच कृष्णा-पंचगंगा संगमावर अमरापूर नावाचे एक गाव आहे. श्रीगुरूनृसिंहसरस्वती दररोज दुपारी जात असत.अमरापुरात एक विद्याभ्यासी दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अत्यंत सुशील, धर्मपरायण, श्रेष्ठ पतिव्रता होती. हा ब्राह्मण गावात कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असे. जे काही मिळेल त्यांत तो आनंदाने राहत असे. कधी भिक्षा न मिळाल्यास तो त्याच्या अंगणात असलेल्या घेवड्याच्या वेलाच्या शेंगा रांधून भोजन करीत असे. आहे त्या परिस्थितीत तो दारी आलेल्या अतिथीची पूजा नेहेमीच करीत असे. त्याची पत्नीसुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत कधीही पाठवीत नसे. कोरडे भिक्षान्न, अतिथीसेवा व ईश्वराचे भजन-पूजन यांत तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह सुखात होता. एकदा काय झाले, श्रीगुरुनृसिंहसरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्या ब्राह्मणाने श्रीगुरुंना घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली व त्यांना घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचे भोजन दिले. परमेश्वर भावभक्तीचा भुकेलेला असतो. त्याला भावभक्तीने पत्रं, पुष्पं, फलं, तोयं यातले काहीही अर्पण केले असत ते तो आनंदाने स्वीकारतो. त्या ब्राह्मणाने दिलेल्या घेवड्याच्या शेंगाच्या भाजीने श्रीगुरू प्रसन्न झाले व 'तुझे दारिद्र्य गेले' असा त्यांनी त्या ब्राह्मणास आशीर्वाद दिला. संगमाकडे परत जाताना त्यांनी त्या ब्राह्मणाच्या दारातील घेवड्याचा तोडून टाकला. श्रीगुरुंनी घेवड्याचा वेल उपटून टाकलेला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले. ती शोक करीत आपल्या नशिबाला दोष देऊ लागली. ती म्हणाली, "अहो काय, आमचे दुर्दैव ! त्या यतीला आम्ही असा काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्न तोडले ?" असे म्हणून ती श्रीगुरुंना दोष देऊ लागली. त्या ज्ञानी ब्राह्मणाला आपल्या पत्नीचे बोलणे मुळीच आवडले नाही. तो तिला रागावून म्हणाला, "तू श्रीगुरुंना वाईट बोलू नकोस. सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे. सर्व काही आपल्या प्रारब्धानुसारच घडत असते. त्या परमेश्वराने अगोदर अन्नपाण्याची व्यवस्था केली व मग चौऱ्याऐंशीलक्ष सृष्टी निर्माण केली. आपण पूर्वजन्मी काही पाप-पुण्य केले असेल त्याचे फळ या जन्मी भोगावेच लागते. जे पेरावे तेच उगवते. त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही. त्या यतीश्वरांनी जाताना आशीर्वाद दिला आहे, त्यावर विश्वास ठेव." श्रीगुरुंनी घेवड्याचा वेल उपटून टाकला होता. आता सगळाच उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुऱ्हाड घेतली व घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य ! त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला जमिनीत धनाचा हंडा सापडला. ही तर त्या श्रीगुरूंची कृपा ! श्रीगुरू आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला. ते सामान्य मनुष्य नाहीत. यतिवेष धारण केलेले ईश्वरी अवतार आहेत. त्यांनी आमचे दैन्य-दारिद्र्य नाहीसे केले." असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंचा जयजयकर केला. मग तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह संगमावर गेला. दोघांनी श्रीगुरुंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्रीगुरुंना सांगितला. श्रीगुरू त्यांना म्हणाले, "जे घडले ते कुणालाही सांगू नका. जर कुठे बोलला तर आलेली लक्ष्मी निघून जाईल.तुम्हाला सर्व सुखे लाभतील. तुमच्या वंशात लक्ष्मी कायम राहील. तुमचे इहपर कल्याण होईल." श्रीगुरूंचा हा आशीर्वाद ऐकून त्या ब्राह्मण पती- पत्नीला अतिशय आनंद झाला. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरू नृसिंह-सरस्वतींचे माहात्म्य असे आहे म्हणून त्यांना शरण जावे. त्यांची भक्तिभावाने पूजा करावी. त्यामुळे आपले इहपरलोकी कल्याण होईल." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'अमरापूर माहात्म्य - ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले' नावाचा अध्याय अठरावा समाप्त. ।। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ।।

Search

Search here.