देवर्षि नारद मुनी

श्याम जोशी ब्लॉग Posted at 2016-05-23 14:32:15
।। *अहो देवर्षी धन्योयं यत्कीर्तिं शारंगधन्वनः गायन्माद्यन्निदं तंत्र्या रमयत्यातुरं जगत्*  ।। सदैव महाविष्णू चे नामस्मरण - गुणगान करणारे , व आपल्या मधुर वाणीने , परम ज्ञानाने व आनंददायक संगीताने सर्व दुःखी ,  संभ्रमितां ना ज्ञानाचा प्रकाश देऊन मार्गी लावतात , आनंदित करतात असे ते नारद मुनी सदैव पूजनीय आहे .. आज वैशाख कृष्ण द्वितीया ( अमवस्यांत ) नारद मुनी यांची जयंती .. [ MP / UP आदी अनेक ठिकाणी ज्येष्ठ कृष्ण द्वितीया आहे कारण पोर्णिमांत मास ] .. *_अश्वत्थ: सर्व वृक्षाणां देवर्षीणांच नारदः_* असे स्वतः भगवंताने भगवद्गीता मध्ये सांगितले , यावरून च नारदांचे महत्व व पुज्यत्व दिसून येते .. तृतीयम् ऋषी सर्गंच देवार्षित्व मुपेत्य सः तंत्रंसात्वतमाचष्ट नैष्कर्म्यं कर्मणां यतः ।। भागवतातील अवतार कथना नुसार नारदांना भगवंताचा तिसरा अवतार मानतात .. या अवतारात त्यांनी उत्तम असे कर्म करूनच  भगवंत प्राप्ती , मोक्षप्राप्ती होते असे सात्वत ज्ञान सांगितले .. कठोर अशी तपश्चर्या करून ब्रह्मर्षी पद प्राप्त करून , स्वतः च्या उपजत गुणांनी देवर्षी पद प्राप्त केलेले व जवळ जवळ सर्वच स्मृती - पुराण आदी मध्ये उल्लेख असलेले , देव दानव यक्ष गंधर्व आदी सर्वांनाच पूजनीय असलेले असे महान थोर ऋषी ... त्रिकाल ज्ञानी , सत्यभाषणी , कठोर तपस्वी , नैष्ठिक ब्रह्मचारी , परब्रह्म तत्व जाणणारे परमज्ञानी , आत्मसाक्षात्कारी , व सदैव लोक हितैरतः असे असल्याने सर्वत्र मुक्त संचार व पुज्यत्व का बरे मिळणार नाही आणि म्हणूनच  नारदां ना देवर्षी पद प्राप्त होऊन भगवत्हृदय म्हणून ओळखले जाते .. ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक , पूर्वकल्पमध्ये उपबर्हण नामक गंधर्व असून स्वतः च्या रूपाचा कलेचा गर्व झाल्याने  ब्रह्मदेवाकडूनच शुद्र योनीत जन्माला जाशील हा शाप मिळाला .. पण त्यापुढील जन्म हा पूर्णतः भगवद्भक्तीमधील असून भगवंताचा पार्षद होणार असा उःशाप मिळाला .. त्यानुसार शूद्रा दासी कडे जन्म झाला . माता हि ईश्वर भक्ती व ऋषी सेवा या सत्धर्मात रत असल्याने बालपणापासूनच भगवद्भक्ती चे बाळकडू मिळाले . पण मातेच्या अकाली निधनाने एकटे झाल्यानंतर ईश्वराची ओढ लागली . अनेक वर्ष तपश्चर्या केली पण लक्ष्यप्राप्ती न झाल्याने आलेला निरुत्साह हा जन्म संपल्यावर भगवंत सानिध्य प्राप्त होईल असे समजल्यावर कृतकृत्य झाला व मृत्यू नंतर पार्षद रूप प्राप्त होऊन भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त झाली .. भगवंताच्या अनेक , नव्हे जवळ जवळ सर्वच लिलां मध्ये अवतारांमध्ये किंवा त्या अवतारा साठी नारद ऋषींचे महत्वाचे योगदान आहे .. तसेच अनेक महत्वाची कृत्ये , स्थित्यंतरे नारद मुनींमुळे झालेली आहेत .. मग ते महादेवाकडून जालंधराचा विनाश असो का कंसाला आकाशवाणी चे स्मरण करून मुद्दामून चूक करायला भाग पाडणे असो .. वाल्मिकी ऋषींना रामायण लिहिण्यास उद्युक्त करणारे , व्यासाला भागवत लिखाणासाठी प्रेरित करणारे , इंद्र - प्रल्हाद - ध्रुव - शुकमुनी - राम - कृष्ण - युधिष्टिर आदी अनेकांना काही ना काही कारणाने उपदेश - सूचना - देऊन त्यांचे अज्ञान दूर करून इष्ट व लोककल्याणस्तव सन्मार्गाला प्रेरित करणारे नारद मुनी यांचे अनेक उपकार देव , दानव तसेच मानवां वर आहेत .. धर्माचे , न्यायाचे पक्षकार असलेले नारदमुनी हे जणू काही देवपक्षाचे प्रवक्ताच होय किंवा त्याकाळचे निर्भीढ , सत्यवादी पत्रकारच समजा .. ऋग्वेदातील काही सुक्तांचे द्रष्टे आहेत . उत्तम असे यज्ञवेत्ता , संगीतज्ञ , धर्मज्ञ , राजनीतिज्ञ , सृष्टीतील अनेक बाबींचे पूर्ण ज्ञानी असे नारद मुनी जेव्हा सध्याच्या चित्रपट - मालिका - सोशल मीडिया मध्ये बेरकी - धूर्त - असहाय व कळ लावून भांडण लावून देणारे दाखवले जाते तेव्हा मन विदीर्ण होते . फक्त दोन ठिकाणी त्यांनी असे कलह किंवा संशय निर्माण केला आणि ते म्हणजे १) सत्यभामा व रुक्मिणी यांच्यात कलह लावून देणे आणि  २) कंसाला आकाशवाणी चे स्मरण करून तुरुंगात असणाऱ्या देवकीच्या संतती चे काय करायचे हि शंका कंसाच्या मनात निर्माण करणे वास्तविक त्रिकालज्ञानी नारद मुनींनी भविष्यातील अनेक घातक घटना जाणून त्या  टाळण्यासाठी किंवा त्याचे अशुभ परिणाम -  नुकसान कमी करण्यासाठी केलेली ती सत्कर्मे च होत .. आणि तशी नियती ची - भगवंतांचीच रचना होती .. देवर्षि असूनही यांना सुद्धा शाप भोगावा लागला आहे . पद्मपुराणात विष्णूच्या शापामुळे स्रीरूप प्राप्त होऊन गर्भवास घडल्याचा उल्लेख आहे .. तसेच नारदीय पंचरात्र व वैवर्तामध्ये नारद ऋषींच्या विवाहाचा सुद्धा उल्लेख आहे .. परंतु थोर देवर्षि असूनही नारदांनी शाप दिल्याची उदाहरणे मात्र अत्यंत कमी आहेत .. त्यांनी निर्मिलेले पंचरात्र , बृहद्कल्प धर्माख्या ( म्हणजेच नारद पुराण ) , नारद स्मृती , नारदोपनिशद् , नारदीय शिक्षा आदी अनेक ग्रंथांवरून त्यांचे परमज्ञान , भक्ती - कर्मा वरील असलेले अगाध प्रभुत्व दिसून येते . अशा वेदज्ञ , धर्मज्ञ , नितिज्ञ नारद मुनींना माझे कोटी कोटी वंदन ... © लेखक - श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा वरील माहिती हि लेखकाने खूप मेहनत घेऊन तयार केली आहे, एका मिनिटात त्या लेखकाचे नाव खोडून स्वतःचे नाव टाकून क्षणभरची खोटी प्रसिद्धी प्रशंसा मिळविणे योग्य नाही.. असे चुकीचे केल्याने नैतिक आणि तात्विक आनंद - समाधान मिळत नाही.. लेखकाचे नावासहच शेअर / फॉरवर्ड करा..

Search

Search here.