श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय २५ ते ३०

ग्रंथ - पोथी  > श्री नवनाथ भक्तिसार कथा Posted at 2019-02-17 05:52:38
श्री नवनाथ भक्तिसार कथा --- अध्याय २५ ते ३० अध्याय २५ भर्तरीचे व्यापाऱ्याबरोबर गमन; सुरोचन गंधर्वाची कथा... मागल्या अध्यायांत सांगितल्याप्रमाणें भर्तरीनाथ व्यापाऱ्यांच्या समागमें अवंतीनगरास आल्यानंतर ते एका गांवाजवळ उतरले. तेथें माल नीट रचून ठेवून सारे एके ठिकाणीं अग्नि पेटवून शेकत बसले. इतक्यांत तेथें कांहीं कोल्हे आले आणि कोल्हाळ करून त्यांनीं असें सुचविलें कीं, व्यवसायी हो ! या अशा निर्धास्त स्थितींत बसून न राहतां सावध असा, तुह्मांवर चोरटे येऊन धाड घालण्याच्या विचारांत आहेत व ते तुम्हांस हाणमार करून सर्व द्रव्य घेऊन जातील. अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले. पूर्वी भर्तरी श्वापदांमध्यें राहिला असल्यामुळें त्यास जनावरांची भाषा चांगली येत होती. हा कोल्हांनीं सांगितलेला संदेश आपण व्यापाऱ्यांस सांगून सावध करावें, असा भर्तरीनें विचार करून चोर लुटावयास येणार आहेत, ही गोष्ट त्यांस सांगितली. कोल्हांची भाषा मला समजते व ते भोंकत असतां जें सांगत होते. तें सर्व मी लक्षपूर्वक ऐकून तुम्हांला सांगून अगोदरच सूचना केली आहे, असें तो व्यापाऱ्यास म्हणाला. ह्या भर्तरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, त्यांनीं आपल्या मालांची नीट लपवालपवी केली व हातांत शस्त्रें घेऊन व चांगला उजेड करून सर्वजण पाहारा करूं लागले. इतकेंच केवळ नव्हें, तर ते मोठ्या सावधगिरीनें व शौर्यानें आपलें संरक्षण करण्यास तयार झाले. इतक्यांत त्यांच्यावर चोरांची धाड येऊन पडली; परंतु व्यापाऱ्यांनी शस्त्रांचा मारा चालविल्यामुळें चोरांचें कांहीएक न चालतां ते जर्जर होऊन पळून गेले. तरीसुद्धां ते व्यापारी गाफील न राहतां मोठ्या सावधगिरीनें रात्रभर जागत राहिले होते. पुढें दीड प्रहर रात्र राहिली असतां, पुन्हां कोल्हांनीं येऊन कुही केली, तेव्हां कोल्हे आतां काय बोलले म्हणुन व्यापाऱ्यांनी भर्तरीस विचारलें. तेव्हां तो म्हणाला, शंकरानें ज्यास वर दिलेला आहे. असा एक राक्षस उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे जाण्याकरितां येत आहे. तो महाबलाढ्य आहे. त्याच्यापाशीं तेजस्वी अमोल अशीं चार रत्नें आहेत. त्यास जो मारील त्यास हा अलभ्य लाभ होईल आणि त्यास मारल्यानंतर त्याच्या रक्ताचा टिळा गांवच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावील तो अवंती ( उज्जेनी ) नगरीचा सार्वभौम राजा होईल. व्यापाऱ्यांस भर्तरी ही माहिती देत होता त्यांच वेळेस कर्मधर्मसंयोगानें विक्रम तेथून जात होता. त्यानें हें भर्तरीचें सर्व भाषण ऐकून घेतलें व लागलाच तो हातांत शस्त्र घेऊन राक्षसास मारवयास निघाला. त्या राक्षसाचा मूळ वृतांत असा कीं, पूर्वी हा चित्रमा या नांवाचा एक गंधर्व होता. एके दिवशीं तो शंकराच्या दर्शनाकरितां कैलासास गेला, त्या वेळेस शंकर व पार्वती सोंगट्यांनीं खेळत बसली होतीं. तो त्यांच्या पायां पडला व शंकराच्या आज्ञेनें त्यांच्याजवळ बसला. कांहीं वेळानें एक डाव शंकरावर आला व दानाविषयी शंकर व पार्वती ह्यांच्या म्हणण्यांत फरक पडला. तेव्हां दोघांत बराच वाद होऊन दान काय पडलें, हें त्यांनीं त्या गंधर्वास विचारलें, त्यानें शिवाचा पक्ष धरून अठरा पडले म्हणुन सांगितलें. परंतु त्या वेळेस खरोखर बारा पडले होते. पण शंकराची मर्जी मिळविण्याकरितां गंधर्वानें खोटें सांगितले, त्यामुळें भवानीस राग आला. ती त्यास म्हणाली, गंधर्वा ! तूं खोडसाळ आहेस. असत्याचा अंगीकार करून सांबाकडचें बोलतोस, तस्मात्‌ तूं मृत्युलोकीं राक्षस होऊन राहा. असा पार्वतीचा शाप मिळतांच तो थराथरां कापूं लागला. त्यानें शंकराच्या पायां पडून विनंति केली कीं, देवा ! आपला पक्ष स्वीकारल्यानें मी शापबद्ध झालों; आतां माझी वाट काय ? असें म्हणुन तो ढळढळां रडूं लागला. तेव्हां शंकरास दया येऊन तो म्हणाला, गंधर्वनाथ ! पार्वतीनें शाप दिला हें खरें; पण तूं कांहीं चिंत्ता करूं नको. सुरोचन गंधर्वास इन्द्रानें शाप दिलेला आहे, त्यास जो पुत्र होईल तो शस्त्रप्रहार करून तुझा प्राण घेऊन राक्षसदेहापासून तुला सोडवील. तेव्हां मला मारल्यानें त्यास लाभ कोणता व माझें वृत्त त्यास कसें व कोणत्या रीतीनें लागेल, हें कळल्यास बरें पडेल म्हणुन गंधर्वानें म्हटल्यानंतर शंकरानें सांगितलें कीं, तुला मारुन तुझ्या रक्ताचा टिळा कपाळीं लाविल्यानंतर त्यास सार्वभौमपद प्राप्त होऊन तो सदासर्वदा विजय मिळवीत जाईल. तुझी माहिती त्यास भर्तरीनाथाच्या मुखानें लागेल ! तो भर्तरी धृमीणनारायणाचा अवतार होय. हें ऐकून गंधर्वास समाधान वाटलें. मग तो राक्षसाचा देह धरून मृत्युलोकीं आलां. सुरोचन गंधर्वाला इन्द्रानें कोणत्या अन्यायास्तव शाप दिला, यांविषयी मूळ कथा अशी आहे कीं, एके दिवशीं अमरावतीस इन्द्र सभेंत असतां तेथें गंधर्व आदिकरून मंडळी आपापल्या स्थानीं बसली होती. अप्सरांचें नृत्यगायन चाललें होतें. त्या सभेंत बसलेल्या मेनका, तिलोत्तमा इत्यादि अत्यंत स्वरूपवान् अप्सर पाहून सुरोचन मोहित होऊन भरसभेमधून एकदम उठला व मेनकेचा हात धरून तिचे स्तन मर्दन करूं लागला. अशी अमर्यादा होतांच इंद्रास राग आला. त्यानें त्याची पुष्कळ निर्भर्त्सना केली व त्यास शाप दिला कीं, तूं यत्किचितही शरम न बाळगतां एकदम हें दुष्कर्म करावयास प्रवृत्त झालास; असा तूं दुष्ट असल्यानें स्वर्गापासून पतन पावून मृत्युलोकीं गाढव होऊन राहा. असा शाप मिळतांच तो पतन पावला. परंतु या वेळीं त्यानें इंद्राची प्रार्थना केली कीं महाराज अमरनाथ, मला आतां उःशांप द्यावा. मजकडून होऊं नये असा अपराध घडला खरा; पण मला माझ्या अपराधाची कृपा करून क्षमा करावी. अशी त्यानें स्तुति करून इंद्रास मोठेपणा दिला. तेणेंकरून त्याचें अंतःकरण द्रवून त्यानें त्यास उःशाप दिला कीं, तूं बारा वर्षांनीं पुनः परत आपल्या स्थानास येशील. परंतु तुला सांगतों तें ऐक, मिथिला नगरीच्या सत्यवर्मा नामक राजाच्या कन्येशीं युक्तिप्रयुक्तीनें तूं विवाह कर. पुढें विष्णूसारखा तेजःपुंज मुलगा विक्रम तुझ्या पोटीं येतांच तूं मुक्त होशील व पूर्ववत्‌ गंधर्व होऊन स्वर्गास येशील. याप्रमाणे इंद्रानें उःशाप देतांच तो स्वर्गाहून पतन पावून मिथिलेच्या रानांत गाढव होऊन राहिला. त्या गांवात कमट म्हणुन एक कुंभार होता. तो गाढवांच्या शोधासाठीं अरण्यांत गेला असतां तेथें मिळालेली सर्व गाढवें त्यानें हांकून आपल्या घरीं नेलीं. त्यांतच हें शाप मिळालेलें गाढव होतें. पुढें कांहीं दिवसानीं तो दरिद्री झाला; तेव्हां शाप मिळालेलें गाढव ठेवून बाकींची सर्व गाढवें त्यानें विकून टाकिली. तो गाढव तेथें एकटाच राहिला असतां दोन प्रहर रात्रीस कुंभारास उद्देशून म्हणूं लागला कीं, सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे. गोठ्यांतुन असा मनुष्यासारखा आवाज त्यास नित्य ऐकूं येई. पण कुंभारानें घराबाहेर येऊन पाहिल्यावर त्यास तेथें मनुष्य दिसत नसे. असा तो अनेक वेळां फसला. गाढव बोलत असल्याची कल्पना त्याच्या मनांतच येईना.. एकदां तो ह्याच संशयांत पडून कांहीं वेळ उभा राहिला. मग आपण याची आतां भ्रांति फेडावी, असा गाढवानें विचार करून कमटास आपल्याजवळ बोलाविलें आणी म्हणाला कीं, सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे. हेंच मी तुला नित्य सांगत असतो. ह्यांत संशयाचें कांहींच कारण नाहीं. कसेंहि करून माझें इतकें काम कर. हें ऐकून तो कुंभार खोल विचारांत पडला व त्याच्या मनांत भीति उप्तन्न झाली. कारण, ही अघटित गोष्ट कोणापाशीं बोलता येईना. जर ही गोष्ट बाहेर फुटली तर राजा मला शिक्षा करील. हा गाढव असतां राजाचा जांवई होऊं पाहतो ही गोष्ट घडेल तरी कशी ? ह्याचा परिणाम चांगला होणार नाहीं. यास्तव आतां येथून निघून दुसऱ्या राज्यांत राहावयास जावें हें चांगलें , असा विचार त्या कुंभारानें करून निघण्याची तयारी केली. दुसरे दिवशी सकाळीं हा सर्व प्रकार त्यानें आपल्या स्त्रीस कळविला व तिचाहि रुकार मिळविला. परंतु त्या उभयतांहि नवराबाकोच्या मनांत अशी कल्पना आली नाही कीं, गाढवास मुळीं वाचा नसते. असें असतां हा मनुष्यांप्रमाणें बोलतो आहे, यास्तव हा गंधर्व, यक्ष, किन्नर यांपैकींच कोणी तरी शापग्रस्त असावा. मग त्यांनीं त्याच गाढवावर सामानसरंजाम भरला व पळून जात असतां सीमेवर रक्षकांनीं त्यास प्रतिबंध केला आणि हें नगर सोडून कां जातां म्हणुन विचारूं लागले. पळून जाण्याचें कारण सांगावें म्हणुन राजसेवकांनीं पुष्कळ प्रयत्नं केला, परंतु तो व स्त्री कांहींच न बोलतां उभीं राहिली. कारण ही गोष्ट सांगावी तर राजा प्राण घेतल्यावांचून सोडणार नाहीं, ही त्यांस मोठी भीति होती. ह्यामुळें रक्षकांनीं जरी मनस्वी आग्रह केला तरी कांहीं न बोलतां स्वस्थ राहण्याखेरीज दुसरा मार्गच त्यांस दिसेना. इतक्यांत कमट कुंभार पळून जात असतां त्यांस आम्हीं पकडुन ठेविलें आहे, अशी बातमी रक्षकांनी सत्यवर्मा राजास सांगितली. ती ऐकून त्यास दरबारांत आणण्याचा हूकूम झाला. दूतांनी त्यास राजसभेंत नेऊन उभें केलें. त्यास सत्यवर्मा राजा म्हणाला, माझ्या राज्यांत मी कोणास दुःख होऊं देत नाहीं, असें असतां तूं कां पळून जात आहेस ? तुला कोणतें दुःख झालें आहे तें मला सांग मी बंदोबस्त करितों. तें राजाचें भाषण ऐकून कुंभार म्हणाला, महाराज ! प्रजेच्या सुखाकडे आपलें पूर्ण लक्ष आहे, हें मी जाणतों, परंतु मला जें दुःख आहें तें माझ्यानें सांगवत नाही. तें सांगितलें असतां माझ्या जिवास मला धोका दिसतो. मग राजानें त्यास आश्वासन दिलें कीं, एखाद्या अन्यायामुळें मजकडून शासन होइल अशी तुला धास्ती असेल तर मी तो अन्याय तुला माफ करून तुझ्या प्राणाचें रक्षण करीन. तूं कांहीं संशय आणूं नको. मी तुला वचनहि देतों. असें बोलून लागलेंच राजानें त्यास वचन दिलें मग त्यानें राजास एके बाजूस नेलें आणी तो त्यास म्हणाला, राजा ! तुझी कन्या सत्यवती आपल्यास स्त्री करून देण्याचा हट्ट माझ्या गाढवानें धरला आहे व हें तो नित्य मजपाशीं मनुष्यवाणीनें बोलत असतो. ही गोष्ट तुला समजल्यानंतर तूं रागावशील, ही कल्पना मनांत येऊन मी येथून पळून जात होतो. कमटाचें तें भाषण ऐकून राजास फार आश्चर्य वाटलें व त्यानें विचार केला कीं, ज्या अर्थी हा गाढव बोलतो आहे, त्याअर्थी हें जनावर नसुन कोणी तरी दैवत असलें पाहिजे व कारणपरत्वें त्यास पशूचा देह प्राप्त झाला असावा. असा विचार करून त्यानें कमट कुंभारास सांगितलें कीं, या कारणाकरितां तूं भय धरून गांव सोडून जाऊं नकोस; खुशाल आपल्या घरीं जाऊन आनंदानें राहा. मी या गोष्टीचा विचार करून व त्या गाढवाची परिक्षा घेऊन त्यास माझी कन्या अर्पण करीन. आतां तूं घरी जाऊन गाढवास सांग कीं, तूं म्हणतोस ही गोष्ट मी राजाजवळ काढिली होती, परंतु त्याचा अभिप्राय असा आहे कीं, हे सर्व मिथिलानगर तूं तांब्याचें करून दाखव म्हणजे तो आपली कन्या सत्यवती तुला देईल. इतके बोलून राजानें कमटास घरीं जावयास सांगितलें. नंतर तो कमट स्त्रीसह आपल्या घरीं गेला. त्या रात्री पुनः गाढवानें कमटास हाक मारून लग्नाची गोष्ट पूर्ववत्‌ निवेदन केली. तेव्हां कमटानें त्यास राजच्या संकेताप्रमाणें सर्व मजकूर सांगितला नंतर कमट म्हणाला कीं, राजाचा हेतू पूर्ण करावयाचें तुझ्या अंगी सामर्थ्य असेल तर सर्व नगर तांब्याचें कर. म्हणजे सत्यवती तुला प्राप्त होईल. तें कमटाचें भाषण ऐकून तो गाढवरूपी गंधर्व म्हणाला, राजा मोठा बुद्धिवान् असें दिसत नाहीं . कारण या कामी त्यानें अगदीं पोक्त विचार केला नाहीं. अरे रत्नतखचित सुवर्णाची नगरी त्यानें मला करावयास सांगितली असती तरी मी ती करून हुबेहुब दुसरी अमरावती त्यास बनवून दिली असती किंवा इंद्राची सर्व संपत्ति त्यास आणून दिली असती. त्यानें कल्पतरूचें आरामवन मागावयाचें होतें किंवा कामधेनू मागावयाची होती. असली अलभ्य मागणी मागावयाची सोडून त्यानें ताभ्रमय नगर करून मागितले ! असो ! मी तुझ्या म्हणण्याप्रमाणें आज रात्रीं तांब्याचें नगर करून देतों, असें त्या गंधर्वानें कबूल केलें, तो निरोप कुंभारानें राजास कळविला. तेव्हां राजानें गर्दभाचें म्हणणें आपणास कबूल असल्याबद्दल त्याच कुंभाराबारोबर उत्तर पाठविलें. तें ऐकून त्या गर्दभरूपी गंधर्वानें विश्वकर्म्याची प्रार्थना करतांच तो प्रत्यक्ष येऊन काय आज्ञा आहे म्हणुन विचारूं लागला. त्यास गंधर्वानें सांगितलें कीं, ही सर्व मिथिलानगरी एका रात्रींत तांब्याची करून दे, तें कबुल करून विश्वकर्मानें तें सर्व नगर रात्रींत तांब्याचें करून टाकिलें व राजापासून अंत्यजापर्यंत सर्वांचीं एकसारखीं तांब्याची घरें केलीं असें सांगून व गर्दभरूपी गंधर्वाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा निघून गेला. दुसरे दिवशीं प्रातःकाळीं सर्व लोक उठून पाहातात तो, सारें नगर तांब्याचें झालेलें ! तें पाहून सारे आश्वर्यचकित झाले. तो चमत्कार पाहून त्यांच्या मनांत अनेक प्रकारचे तर्क येऊं लागले. राजास मात्र खूण पटली; परंतु ह्यास आतां कन्या दिल्यावांचुन चालावयाचें नाहींच. जर दिली लोक हसतील, असे विचार मनांत येऊं लागले. मग कन्या कमटाचे स्वाधीन करून त्यास गांवातून दुसरीकडे पाठविण्याचा विचार करून त्यानें कुंभारास बोलावून आणिलें व लोकनिंदेचा सर्व प्रकार त्यांस ऐकविला. आणि कन्या घेऊन देशीं जाण्याकरितां प्रार्थना केली. त्यानें राजाचें म्हणणें कबूल केलें व सामानसुमान बांधून जाण्याची तयारी केली. रात्रीस जाऊन राजास तसें सांगितलें. मग राजानें कन्येस बोलावून तिला सांगितले कीं, मुली, तुला मी देवास अर्पण केलें आहे, तर त्याचा आनंदानें अंगीकार कर. त्यानें सर्व नगर तांब्याचें करून टाकिल हा प्रत्यक्ष अनुभव पहा. यावरून तो गाढव नसून प्रत्यक्ष देव असल्याविषयीं माझी खात्री आहे. आतां तो कोण आहे वगैरे सर्व विचारपुस तूं करून घे. माझ्या सांगण्याचा अपमान करूं नकोस. नाहीतर माझ्या कुळास डाग लागेल व तो रागावला तर शाप देईल. तूं युक्तिप्रयुक्त्तीनें या गाढवाच्या देहापासून त्याची मुक्तता करून घे. त्यानें पूर्वदेह धारण केल्यावर त्या योगानें उभय कुळांचा उद्धार होईल. आतां प्रफुल्लित अंतःकरणानें कमटाच्या घरीं जा. तें बापाचें म्हणणें सत्यवतीनें आनंदानें कबुल केलें. नंतर रात्रीं कन्येस घेऊन राजा कुंभाराच्या घरीं गेला. कमटानें बोटाच्या खुणानें जांवई ( गाढव ) दाखविल्यानंतर राजानें त्याचे पाय धरून विनंति केली कीं, महाराज ! ही माझी कन्या तुम्हांस अर्पण केली आहे, हिचें आतां आपण पालन करावें. हें राजाचें भाषण ऐकून गाढवानें सांगितलें, राजा, तूं महाभाग्यवान् आहेस म्हणून मी तुझा जांवई झालों. पण तूं माझ्या देहाकडे पाहा ! यामुळें लोक काय म्हणतील ? जो तो निंदाच करील. तरी तूं भाग्यवान् असें मी समजतो. नंतर त्यानें आपल्याला कोणत्या कारणानें इन्द्रानें शाप दिला वगैरे सर्व प्रकार सांगितला. तो ऐकून हा सुरोचन गंधर्व आहे असें समल्यावर राजास परमानंद झाला आणि आपली मुलगी त्याच्या स्वाधीन करून राजा घरीं गेला. कुंभारहि तो गांव सोडून रातोरात अवंतीनगराकडे जावयास निघाला. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************************ अध्याय २६ सुरोचन गंधर्वाची कथा, त्याचा पुत्र विक्रमाकडे भर्तरीचे आगमन.. तो कमट कुंभार मजल दरमजल करीत, सहकुटुंब सहपरिवार अवंतीनगरीस येऊन पोंचला. तेथें एका कुंभाराकडे जागा पाहून बिर्हारडास राहिला. तो सत्यवतीस आपल्या मुलीप्रमाणें पाळी. एके दिवशीं सत्यवतीनें आपल्या पतीस पहावयाचें आहे असें त्या कमट कुंभारास सांगितलें व तिच्या म्हणण्याप्रमाणे त्यानें भेट करून देण्याचें कबूल केलें. मग रात्रीं तो गाढवापाशी गेला व त्यास म्हणाला, गंधर्व महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणें राजानें आपली कन्या तुम्हांस अर्पण कीले ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे व माझ्याहि मनांत तुम्हीं उभयतांनी आतां आनंदानें वागावें असे आहे. हें कमटाचें भाषण ऐकून गंधर्व म्हणाला, लग्नाचा मंगल सोहाळा अद्यापपावेतों कोणत्याहि प्रकारानें झाला नाहीं, तरी पण असुरी गांधर्वविवाह करून सत्यवतीचा मी स्वीकार करीन, हें ऐकून कमट म्हणाला, महाराज ! आपण म्हणतां ही गोष्ट खरी आहें ; परंतु आपण पशूच्या देहानें वागत आहां. अशा अवस्थेंत मनुष्याचा संग होईल कसा ? हा माझा संशय फेडून आपल्या स्त्रीचा अंगीकार करावा. तें भाषण ऐकून गंधर्वानें उत्तर दिलें कीं तिला ऋतुकाळ प्राप्त झाला म्हणजे चौथ्या दिवशीं मी माझें मूळ स्वरूप प्रकट करून स्त्रीची मनकामना पूर्ण करीन; यास्तव तिचा चौथा दिवस मला कळवावा. हें भाषण ऐकून त्यास परमानंद झाला. त्यानें ही गोष्ट सत्यवतीस सांगितली, तेव्हां तिलाहि आनंद झाला. पुढें काहीं दिवस लोटल्यानंतर सत्यवती ऋतुस्नान होऊन चौथा दिवस प्राप्त झाला. त्या दिवशीं कमटानें जाऊन गंधर्वास सांगितलें. तें ऐकतांच त्यानें गाढवाचा वेष टाकून सुरोचन गंधर्वीचें स्वरूप प्रकट केलें. नंतर त्यानें जडावाचे दागिने घातले व भरजरी पोषाख केला. त्यामुळें सूर्याप्रमाणें लखलखीत तेज पडूं लागलें तें तेजस्वीं रूप पाहून कमटाचा आनंद पोटांत मावेनासा झाला. स्वर्गीच्या रत्नाणचें आज प्रत्यक्ष आपल्या घरीं दर्शन झाल्यानें आपण धन्य झालों असें त्यास वाटलें. सत्यवती दैववान म्हणून हें पुरुषरत्नल तिला प्राप्त झालें, असे अनेक दृष्टांत योजून तो आनंदानें सुरोचनाच्या पायां पडला व विनंति करूं लागला, महाराज ! मी अज्ञानी आहें. मी दुष्टानें तुमची योग्यता न जाणतां तुम्हांस बहुत कष्ट दिले; तुमच्या पाठीवर ओझीं घातलीं, वाहनासारखा उपयोग केला व निर्दयपणानें मारलेंहि, तरी मजकडून अज्ञानपणें झालेले अपराध पोटांत घालून त्यांची क्षमा करून मला पदरांत घ्यावें, असें म्हणून त्यानें पायांवर मस्तक ठेविलें. मग कमटानें सुरोचन गंधर्वास हातीं धरून घरांत नेलें व सत्यवती त्याच्या स्वाधीन करून तिचा प्रतिपाळ करण्यासाठी विनंती केली. मग ती उभयतां एकांतांत गेलीं. तिनें त्याची षोडशोपचारें पूजा केली. मग गांधर्वविवाह करून उभयतां अत्यंत प्रीतीनें रममाण झाली. त्याच रात्रीस सत्यवतीस गर्भसंभव झाला. गंधर्वानें तिला आपणास शाप दिल्याबद्दलचा सविस्तर मजकूर निवेदन केला. शेवटीं तो म्हणाला, हे सत्यवती ! तुला पुत्र झाला म्हणजे मी स्वर्गी गमन करीन. तुझा तो पुत्र मोठा योग्यतेस चढेल व विक्रम या नांवानें सार्वभौम राजा होईल. धैर्य, उदारपणा हेहि गुण त्याच्या अंगीं पूर्ण असतील व तो शककर्ता होईल असं पुत्ररत्ना तूं प्रसवलीस म्हणजे मी तुझ्या ऋणांतून मुक्त झालों असें समज. मी शापमुक्त होऊन तुला टाकून स्वर्गास गेल्यानंतर तूं मजविषयीं बिलकूल दुःख मनांत आणूं नकोस. त्या पुत्रापासून तुला अनेक सुखें प्राप्त होतील. असा तिला बोध करून पुनः वेष पालटून सुरोचन गंधर्व गाढव होऊन राहिला. सत्यवतीविषयीं लोकांच्या मनांत संशय येऊन ही मुलगी कोण आहे, असें जो तो कमटास विचारी. तेव्हां तो त्यास सांगे कीं, ही माझी मुलगी आहे. बाळंतपणासाठीं मी तिला माहेरीं आणिलें आहे. पुढें नऊ महिने भरल्यावर उत्तम वेळेवर ती प्रसुत होऊन पुत्ररत्न झालें. बारावे दिवशीं बारसें करून मुलास पाळण्यांत घालून त्याचें नांव विक्रम असें ठेविलें. अस्तमान झाल्यावर सुरोचन गंधर्वानें गाढवाचा वेष पालटून आपलें रूप प्रगट केलें व घरांत जाऊन स्त्रीपासून मुलास मागुन घेतलें आणी त्याचा मुखचंद्र पाहून तो शापमुक्त झाला. त्याच वेळीं त्यास आणावयासाठीं इंद्रानें मातलीस विमान देऊन पाठविलें. तो अवंतीस आल्यावर कमटाकडे गेला. त्या वेळेस सुरोचन परम स्नेहानें मुलाचे मुके घेत बसला होता. इतक्यांत मातली त्याच्याजवळ गेला त्यास म्हणाला 'गंधर्वनाथ ! तुम्हांस नेण्यासाठीं इंद्राच्या आज्ञेनें मी विमान घेऊन आलों आहें; तर आतां हा पुत्रमोह सोडून विलंब न लावतां विमानारुढ व्हावें. अमरनाथ वाट पाहात बसला आहे. मातलीचें तें भाषण ऐकून सुरोचन गंधर्वानें मुलास सत्यवतीच्या हवाली केलें व सांगितलें कीं, मी आतां जातों तूं येथें मुलासह समाधानाने वास कर. तेव्हां ती म्हणाली, प्राणनाथ, मुलाला टाकून तुम्ही कसे जातां ? तुमच्यासाठीं मी आईबापास व त्यांच्याकडे मिळण्याऱ्या सर्व सुखांस सोडून या परदेशांत आलें. तुमच्यावांचून मला कोण आहे, असें म्हणून ती मोठमोठ्यानें रडू लागली. तिनें त्याच्या गळ्यास मिठी मारली. तेव्हां त्यानें तिला सांगितलें कीं तूं मुलासमागमें खुशाल आनंदानें राहा. ज्या वेळेस माझें तुला स्मरण होईल त्या वेळेस मी येऊन तुला भेट देईन. असें त्यानें तिलाज वचन देऊन तिचें समाधान केलें. मग मुलाला व सत्यवतीला कमटाच्या पदरांत घालून त्याची आज्ञा घेऊन गंधर्व विमानारुढ होऊन आपल्या स्थानीं गेला. पुढें विक्रम दिवसेंदिवस वाढत चालला. त्यानें अल्पवयांत चांगली विद्या संपादन केली. पुढें सोळा वर्षाचा झाल्यावर त्यानें राजची भेट घेतली व दरबारी मंडळींत विक्रमात चांगला स्नेह झाला. राजानें त्यास गांवच्या रखवालीचें काम दिल्यामुळें पहारा करण्यासाठीं त्याला गांवात फिरावें लागे. त्याप्रमाणें तो कामगिरीवर असतां एकदां एके ठिकाणीं उतरलेले कांहीं व्यापारी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागत बसलेले त्यास दिसले. त्यांत भर्तरीनाथ होता. त्यास पशुंची भाषा समजत होती. त्यानें प्रथम कोल्हे ओरडले तेव्हां चोर येणार आहेत, असें व्यापाऱ्यांस सांगितलें. त्यावरून त्यांनीं सावध राहून चोरांचा मोड केला. दुसऱ्या वेळीं कोल्हे भुंकूं लागले तेव्हां भर्तरी व्यापाऱ्यांस म्हणाला, उत्तरेकडून दक्षिणेकडे जावयास एक राक्षस मनुष्यावेषानें येत आहे, त्यास मारून त्याच्या रक्तांचा टिळा गांवच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावील तो अवंतीमध्यें सार्वभौम राजा होईल. हें भर्तरी बोलावयास व विक्रम त्याच समयीं रस्त्यानें जावयास एकच गांठ पडली. पूर्वी सांगितल्याप्रमाणें चित्रमा गंधर्व पार्वतीच्या शापानें राक्षस होऊन फिरत होता. त्यास शंकराने उःशाप दिला होता कीं, सुरोचन गंधर्व शापबद्ध होऊन पृथ्वीवर फिरेल; त्याच्या वीर्यापासून जो विक्रम नावांचा पुत्र होईल त्याच्या हातून तूं मारला जाशील व राक्षसयोनींतून मुक्त होशील; तोच हा राक्षस . राक्षस मारल्यावर तो राजा होईल म्हणुन जें भर्तरीनें सांगितलें, तें त्याच विक्रमाविषयीं व त्यानें तें ऐकलेंहि होतें. तो चित्रमा गंधर्व राक्षस झाला होता तरी पण या वेळी मनुष्यवेष घेऊन तो उत्तरेकडून दक्षिणेस जात होता. इतक्यांत विक्रमानें त्यास शस्त्रप्रहार करून जमिनीवर पाडलें व त्याच्या रक्तानें वस्त्रें भिजविलीं आणि आपल्या कपाळीं एक टिळा रेखिला. त्याच वेळीं राक्षसरूपी गंधर्व शापमुक्त होऊन लागलेंच विमान आलें; त्यात बसुन तो जाऊं लागला, त्यास विक्रमानें विचारलें कीं, तूं राक्षस असतां स्वर्गास जातोस ही गोष्ट नीटशी माझ्या लक्षांत येत नाहीं. मग त्यानें त्यास शंकर-पार्वतीच्या खेळापासूनचा साद्यंत वृत्तांत निवेदन केला आणि मी चित्रमा गंधर्व आहें असें सांगून तो स्वर्गास गेला. विक्रमानें राक्षसाचें प्रेत चांचपून पाहिलें तों त्याच्या मुठींत चार रत्नेंत सांपडली. ही साक्ष पटतांच त्यानें मनांत भर्तरीची वाखाणणी करण्यास आरंभ केला व हा पुरुष आपल्याजवळ असावा असें त्याच्या मनांत आलें. नंतर राक्षसाच्या रक्ताचा टिळा गांवच्या दरवाजास त्यानें लावला. मग विक्रम त्या व्यापाऱ्याकडे पुनः गेला. त्या वेळेस ते सर्व भर्तरीस मध्यभागीं घेऊन जागत बसले होते. तुम्ही कोण वगैरे व्यापाऱ्यांनीं विक्रमाला विचारिलें.तेव्हां विक्रमानें आपलें नांव सांगून तुमच्या गोष्टींत मन रमलें म्हणुन आंत आलों असें त्यांस सांगितलें. त्यावर तुम्हीं आमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकल्या म्हणून व्यापाऱ्यांनीं विक्रमास विचारल्यावर तो म्हणाला, माझा पहारा जवळच आहे, त्यामुळें तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकूं आल्या. पण तुमच्यावर जी चोरांची धाड आली तिचा सुगावा तुम्हांस पूर्वीच कसा लागला याचा शोध करण्यासाठीं मी आलों आहें चोरांचा सुगावा काढण्याची युक्ति तुमच्याकडून समजल्यास आम्हांस बंदोबस्त ठेवण्यास ठीक पडेल. ते म्हणाले, चोरांच्या टोळींत एकंदर किती मंडळी असतील ती नकळे; पण सुमारें शंभर असामी तर आम्हीं पाहिलें, ते चोर येण्याच्या पूर्वीं कांहीं वेळ अगोदर कोल्हे भुंकत होते, ती त्यांची भाषा आमच्याबरोबर जो भर्तरी नांवाचा मुलगा बसला आहे त्यास समजते. त्यानें चोर लुटावयास येणार आहेत हें आम्हांस सांगितल्यावरून आम्ही सावध राहिलों होतों. तेव्हां विक्रमानें त्यास ( भर्तरीस ) पुरें लक्षांत ठेवलें. मग कांहीं वेळानें तो तेथून निघून गेला. सुमारे घटिका रात्र राहिल्यावर एक जकातदार शौचास जात होता. त्यास विक्रमानें एकांतीं सांगितलें कीं, गांवाबाहेर जे व्यापारी आले आहेत त्यांच्यापाशीं जकातीचा पैसा तुम्ही मागूं नका त्याच्याऐवजीं मी तुम्हांस तिप्पट रक्कम देईन. तुम्हीं त्यांना तो पैका माफ करून भर्तरी नांवाच्या मुलास माझ्याकडें घेऊन यावें. तो माझ भाऊ आहे. तो माझ्या हवाली कराल तर तुम्हांस अतोनात पुण्य लाभेल. अशा प्रकारें विक्रमानें जकातदाराची विनवणी केली व द्रव्यलोभस्तव जकातदारानें वचन देऊन विक्रमाचें म्हणणे कबुल केले. पुढें कचेरींत आल्यावर जकातदारांनें शिपाई पाठवून त्या व्यापाऱ्यांस बोलावून आणलें आणि मालाची टीप करून दस्तुरीच्या पैक्याचा आंकडा केला. मग तुम्हांमध्यें भर्तरी नांव कोणाचें आहे म्हणून त्यानें व्यापाऱ्यांस विचारलें. तें ऐकून व्यापाऱ्यांनीं भर्तरीस बोलावून जकातदारास दाखविलें. त्यास पाहतांच त्याच्या तेजावरून हा कोणी तरी अवतारी असावा, असें जकातदारास वाटलें. त्यानें व्यापाऱ्याच्या मुख्यास एकीकडे नेऊन सांगितलें कीं, तुमच्याकडे जकातीचा जो आंकडा येणें आहे; त्याची मी तुम्हांस माफी करून देतो; पण तुमच्याकडे जो भर्तरी आह, त्यास कांहीं दिवस आमच्याकडे राहूं द्या. असे बोलून त्यानें त्यास पुष्कळ प्रकारें समजावून वळवून घेतलें. मग व्यापाऱ्यानीं भर्तरीस दोन गोष्टी सांगुन त्यास खूष केलें व ऐवज वसूल करून त्यांतून जकातीची रक्कम घेण्याबद्दल जकातदरास सांगितल्यावर भर्तरीस जकातदाराच्या स्वाधीन केलें. तसेंच माल विकून कोणाकडे काय येणें राहिलें आहे. हें जकातदारास माहीत आहे, यास्तव ह्यांच्या मार्फतीनें सारा वसूल कर, तुला जी मदत लागेल ती हे करतील, असे भर्तरीस बजावून व त्यास जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेले. मग जकातदारानें विक्रमास बोलावून आणिलें व त्यास जकातीच्या रकमेच्या आंकडा दाखवून तो सर्व पैसा भरावयास सांगितलें तेव्हां विक्रमानें आपल्याजवळचें एक रत्ना जकातीचा ऐवज पटेपर्यंत त्याच्याजवळ गहाण ठेविलें आणि सांगितल्यें कीं, तूर्त भर्तरीस माझ्याकडे नुसता भोजनास पाठवीत जा. पुढें हळूहळू ओळख पटेल. असें विक्रमाचें मत पाहून जकातदारानें भर्तरेच्या देखत विक्रमास सांगितलें कीं, आमचा हा गडी आहे; ह्याची भोजनाची सोय तुजकडे कर. तुझी आई स्वयंपाक करील व शिधा मी येथून धाडीत जाईन. याप्रमाणें ठरल्यावर त्याचें बोलणें विक्रमानें मान्य केलें व भर्तरीस घेऊन तो आपल्या घरीं गेला. घरीं ओटीवर चार घटका उभयंतांचे बोलणें झालें. मग विक्रमानें रात्रीं झालेला हा सर्व प्रकार आईस सांगितला, तेव्हां तिला अति आनंद झाला. मग पुत्राप्रमाणेंच भर्तरीचें संगोपन करण्यासाठीं विक्रमानें आईस सांगितलें . भोजन झाल्यावर भर्तरी तेथेंच राहिला. तो जकातदाराकडे गेला. तेव्हां त्यास सांगितलें कीं, तूं विक्रमाच्याच घरी राहा मला कारण पडेल तेव्हां मी तुला बोलावीन. मग भर्तरी विक्रमाकडे राहूं लागला, ती दोघें मायलेक भर्तरीवर अतिशय ममता करीत व तीं तिघें अगदीं आनंदानें वागत. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************************ अध्याय २७ विक्रम राजाचा सुमेधावतीबरोबर विवाह, भर्तरीचा पिंगलेबरोबर विवाह व दत्तात्रेयाची भेट.. अवंतीनगरात शुभविक्रम या नांवाचा एक राजा राज्य करीत होता. त्यास सुमेधावती या नांवाची एकच कन्या होती. ती अति रूपवति होती. एके दिवशीं ती आपल्या बापाच्या मांडीवर बसली असतां तिचें लग्न करावें, असें त्याच्या मनांत आलें. नंतर त्यानें प्रधानापाशीं गोष्ट काढिली कीं, सुमेधावती उपवर झाली आहे,याकरितां तिच्या रूपास योग्य असा वर शोधून पाहावा. त्या बोलण्यावर सुमंतीक प्रधानानें सांगितलें कीं , माझ्या मनांत एक विनंति करावयाची आहे, ती अशी कीं, आपला आतां वृद्धापकाळ झाला आहे; पुत्र होण्याची आशा मुळींच नाहीं; कन्येच्या मुखाकडे पाहून, काय तें सुख मानावयाचें ! यास्तव कन्येस मी जो उत्तम वर पाहिन त्यास राज्यावर बसवून कन्या अर्पण करावी. जांवई तुम्हांस पुत्राच्या ठिकाणींच आहे. त्यास गादीवर बसविल्यानें राज्यव्यवस्था चालू पद्धतीस अनुसरून उत्तम रीतीनें चालेल व तुम्ही काळजींतून दूर व्हाल. सुमंतीक प्रधानानें ही काढलेली युक्ति राजाच्या मनास पटली व त्यानें त्याच्या म्हणण्यास रुकार दिला. तो म्हणाला, प्रधानजी तुम्हीं ह्या प्रसंगीं ही फार चांगली युक्ति मला सुचविली. यास्तव अतां असे करा कीं, हत्तीच्या सोंडेंत माळ देऊन ईश्वरी इच्छेनें तो ज्याच्या गळ्यांत ती माळ घालील त्यास राज्यावर बसवून नंतर कन्येचा त्याशीं विवाह करावा, हा विचार मला चांगला वाटतो. शुभविक्रम राजनें काढलेली ही तोड प्रधानास रुचली. मग त्यानें राजाज्ञेनें सुमुहूर्तावर एक मोठा मंडप घालून दरबार भरविला गुढ्यातोरणें उभारून आनंदानें नगरांत धामधूम चालली. नंतर हत्तीस श्रुंगारून त्याच्या सोंडेंत माळ देऊन त्यास सोडलें. राजा, प्रधान, सरदार, मानकरी व नागरिक लोक अशी पुष्कळ मंडळी त्याच्यामागून जात होती. हत्तीनें प्रथम सभामंडपातलें लोक अवलोकन केले; पण तेथें कोण्याच्याहि गळ्यांत माळ न घालिता तो शहरांत चालला. तो सर्व नगर फिरत फिरत किल्ल्याजवळ जाऊन उभा राहिला. त्यावेळीं किल्ल्यावर विक्रमासह आठजण पाहारेकरी होते. त्यांस राजानें खालीं बोलाविलें. ते आल्यानंतर त्यांपैकीं विक्रमाच्या गळ्यांत हत्तीनें मोठ्या हर्षानें माळ घातली. ती घालतांच वाद्यें वाजूं लागली व सर्वास मोठा आनंद झाला. मग विक्रामास मोठ्या सन्मानानें हत्तीवर बसवून वाजतगाजत मोठ्या वैभवानें सभामंडपांत आणलें. तेव्हां हा कुंभार आहे असें लोक आपापसांत बोलूं लागले. ही गोष्ट राज्याच्याहि कानीं आली. मग त्यानें प्रधानास एकीकडे नेऊन सांगितलें कीं, हा कुंभार आहे अशी लोकांत चर्चा होत आहे. ही गोष्ट खरी असेल तर आपली मुलगी त्यास देणें अनुचित होय. राजानें असें सांगितल्यावर प्रधानहि फिकिरींत पडला. परंतु दूरवर नजर पोंचवून त्यानें विक्रमाच्या साथीदारांस बोलावून आणिलें व एकीकडे नेऊन तो विक्रमाच्या जातीची त्यांच्यापाशीं विचारपूस करुं लागला. तेव्हां ते म्हणाले, विक्रम जातीचा कोण आहे ह्याविषयीं आम्हांला नक्की माहिती नाही; पण त्यास कुंभार म्हणतात. तर त्या जातीच्या लोकांत चौकशीं केली असतां, ह्याची जात कोणती आहे ह्याचा पक्का शोध लागेल. मग प्रधानानें कमट कुंभारास बोलावून आणलं व त्यास विचारिलें. तेव्हां तो म्हणाला कीं, मिथिलानगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता व स्वर्गीत राहाणारा गंधर्व सुरोचन हा याचा पिता होय. तें कमटाचें भाषण ऐकतांच प्रधानास परमानंद झाला. मग कमटास घेऊन प्रधान राजापाशीं गेला व खरें वर्तमान त्याच्याकडून राजास कळविलें. तेव्हां राजासहि परम संतोष वाटला. शेवटीं खुद्द सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानानें राजास सुचविलें व त्या गोष्टीस राजाची संमति घेतली. राजाज्ञा मिळाल्यावर प्रधान कमटास समागमें घेऊन सत्यवर्मा राजास आणावयाकरितां मिथिलानगरीस गेला. तेथे गेल्यावर त्यानें राजाची भेट घेतली. त्याचा सत्यवर्मा राजानें चांगला आदरसत्कार केला. मग कमटानें राजास अवंतीनगरांतील विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर, सुरोचनगंधर्व विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर, सुरोचनगंधर्व स्वर्गास गेला हेंहि सांगितलें शेवटीं, तो कमट कुंभार राजास म्हणाला, विक्रमाच्या जातीविषयीं तेथील लोकांस संशय आहे. यास्तव आपण आमच्याबरोबर तेथें येऊन त्यांच्या संशयाची निवृत्ति करावी. सत्यवर्मा राजाने तें सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यास परमानंद झाला. त्यानें स्वतः अवंतीस जाऊन आपली कन्या सत्यवती हिची भेट घेतली. तेव्हां सर्वांच्या संशयाची निवृत्ति झाली. मग विक्रमास राज्याभिषेक झाला. दानधर्म पुष्कळ करून याचक जनांस संतुष्ट केलें. नंतर शुभविक्रमराजानें आपली मुलगी सुमेधावती विक्रम राजास दिली. तो लग्नसमारंभहि मोठ्या थाटाचा झाला. शेवटीं सत्यवर्मा राजानेंहि आपलें राज्य विक्रमास अर्पण केलें. याप्रमाणें विक्रम दोन्ही राज्यांचा राजा झाल्यानंतर भर्तरी युवराज झाला. ते दोघे एकविचारानें राज्यकारभार करीत असतां सुमंतीक प्रधानानें आपली मुलगी पिंगला ही भर्तरीस द्यावी असें मनांत आणून ती गोष्ट त्यानें विक्रमराजाजवळ काढिली. त्याचें म्हणणें विक्रमानें कबूल करून लग्न नक्की केलें. तेव्हां त्याच्या जातीचा प्रथम शोध करण्यासाठी एक परिटानें प्रधानास सूचना केली. त्यावरून त्यानें कुंभारास विचारिलें असतां त्या कमटाने आपणास याची जात माहित नाही म्हणून सांगितलें. मग ही गोष्ट त्यानें सत्यवतीस विचारली. परंतु तिनें तो माझ्या पोटचा मुलगा नाहीं म्हणून कळविल्यावर प्रधानानें विक्रमास विचारलें. त्यानेंहि सांगितलें कीं, आपल्या जातीची मला माहिती नाहीं, मी त्याला आपला भाऊ मानिला आहे. याप्रमाणे तिघांनी सांगितल्यानंतर प्रधानानें ही गोष्ट खुद्द भर्तरीस विचारली. तेव्हां त्यानें आपला जन्मवृत्तांत त्यास निवेदन केला. मग प्रधानानें त्यास सांगितले कीं, जर सूर्यापासून तुम्ही झालां आहां, तर त्यास लग्नासाठी येथें बोलवा. तो तुमचा पिता असल्यानें अगत्यानें येईल. तें ऐकून भर्तरी म्हणाला, ही गोष्ट कांहीं अवघड नाहीं. नंतर भर्तरीनें अंगणांत उभें राहून वर तोंड केलें आणी सूर्याची प्रार्थना केली कीं, जर मी तुझा मुलगा असेन तर माझ्या लग्ना करितां येथवर येऊन सर्वाच्या संशयाची निवृत्ति करावी, ती पुत्राची प्रार्थना ऐकून सुर्य मृत्युलोकीं अवंतीनगरास आला. त्यानें सुमंतीक प्रधानाची भेट घेतली व त्यास सांगितलें कीं, मनांत कांहीएक संशय न आणतां माझ्या भर्तरीस तूं आपली मुलगी पिंगला दे. नंतर सूर्य त्यास म्हणाला, लग्नाच्या मंगल कार्यास नवऱ्यामुलाचा बाप जवळ असावा असें तुं म्हणशील, तर तूं त्याची काळजी बाळगूं नकोस. प्रत्यक्ष देव जयजयकार करून पुष्पवृष्टि करतील. विक्रमराजाचा बाप जो सुरोचर गंधर्व, त्याससुद्धां या लग्नाकरितां येथें धाडून देईन. मात्र मी जर या ठिकांनीं लग्नाकरितां राहिलों तर माझा ताप लोकांस सहन होणार नाहीं. इतकें सांगितल्यानंतर प्रधानाचा संशय गेला व त्यानें लग्नसमारंमास आरंभ केला. भर्तरीच्या लग्नाच्या दिवशी सीमंतपुजनाच्या वेळी राजाचा पिता सुरोचन गंधर्व स्वर्गाहून खाली आला. तो सत्यवतीस व विक्रमात भेटला. त्या वेळी विक्रमराजा पित्याच्या पायां पडला. मग राजानें सुमंतीक प्रधानास बोलावून आणलें व सुरोचनास भेटविलें त्यां गंधर्वानें प्रधानास म्हटलें, तुझें थोर भाग्य म्हणून धृमीननारायणाचा अवतार जो भर्तरी तो तुझा जांवई झाला. हा प्रत्यक्ष मित्रावरूणीचा ( सूर्याचा ) पुत्र होय. अशी त्याची समग्र मूळकथा सांगितल्यानंतर प्रधान पुन्हां सुरोचनाच्या पायां पडला व त्यास आग्रह करून सन्मानानें सीमंतपूजनासाठीं मंडपांत घेऊन गेला. तेव्हां त्या गंधर्वानें मनुष्याचा वेष घेतला होता. सीमंतपूजन झाल्यावर वधुवरांस आशीर्वाद देतेस मयीं स्वर्गीतून देवांनी पुष्पवृष्टि केली व लग्नमंडपांत असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून जयघोष केला.नंतर पांच दिवसपर्यंत लग्नसमांरभ मोठ्या थाटानें करून सर्वांस उत्तम वस्त्रें, भूषण दिलीं व वर्हा डी मंडळी मोठ्या गौरवानें रवाना केली. त्या लग्नासमयीं गोरगरिबांस राजानें पुष्कळ द्रव्य देऊन संतुष्ट केलें.सुरोचन गंधर्व आणि सत्यवती मुलाच्या लग्नसमारंभांत व्याही व विहीण म्हणून मिरवत होती. सुरोचन तेथें एक महिनाभर राहिला होता. नंतर सर्वांस भेटून व त्यांची परवानगी घेऊन तो आपल्या स्थानी गेला. भर्तरीचें पिंगलेशीं मोठ्या थाटाने विवाह लागल्यानंतर पुढें कांहीं दिवसांनीं त्यानें दुसऱ्याहि स्त्रिया केल्या. त्यास एकंदर बाराशें स्त्रिया होत्या. त्यांत मुख्य पट्टराणी पिंगलाच होती, ही उमयतां अत्यंत प्रीतीनें वागत. त्यांना एकमेकांचा वियोग घटकाभर सुद्धां सहन होत नसे. तो मोठा विषयी होता. यास्तव त्यास रात्रदिवस स्त्रियांचे ध्यान असे. अश रीतीनें भर्तरीराजा सर्व सुखांचा यथेच्छ उपभोग घेत असतां बरीच वर्षे लोटली. एके दिवशीं भर्तरी अरण्यांत शिकारीकरितां जात असतां, मित्रावरूणीनें ( सूर्यानें ) त्यास पाहिलें व मनांत विचार केला कीं, माझे पुत्र दोन; एक अगस्ती व दुसरा भर्तरीनाथ, त्यापैकीं पहिल्यानें तर ईश्वरप्राप्ति करून घेऊन आपलें हित साधून घेतलें, पण दुसरा भर्तरीनाथ मात्र विषयविलासांत निमग्र होऊन आपले कर्तव्यकर्म विसरला. यास्तव हा आपलें स्वहित साधून घेईल, असा कांही तरी उपाय योजिला पाहिजे. मग भर्तृहरी ( भर्तरी ) चा भ्रम उडावा आणि त्यानें आपल्या हिताचा मार्ग पाहावा म्हणून मित्रावरूणीनें पृथ्वीवर येऊन दत्तात्रयाची भेट घेतली व समग्र वर्तमान निवेदन करून आपला हेतु कळविला. तेव्हा दत्तात्रेयानें सूर्यास सांगितल्यें कीं, भर्तरीविषयी तूं कांहीं काळजी न करितां आपल्या स्थानास जा; मी त्यास नाथपंथी म्हणुन मिरवून त्रैलोक्यांत नांवाजण्याजोगा करीन, तुझा पुत्र भर्तरी हा माझ्या आशीर्वादानें चिरंजीव होईल. ह्यापूर्वीच जें भविष्य करून ठेविलिलें आहे तदनुसार घडून आल्यावांचून राहावयाचें नाहीं, परंतु तूं मला आठवण केलीस हें फार चांगलें झालें आतां तूं पुत्राविषयीं कांही एक काळजी न वाहतां खुशाल जा: मला जसें योग्य दिसेल तसें मी करीन. इतकें सांगुन सूर्यास रवाना केलें व दत्तात्रेय भर्तृहरीसमगमें गुप्तपणें जाऊं लागला. भर्तृहरी अरण्यांत शिकारीला गेला, त्या वेळी त्यानें अपार सेना समागमें घेतली होती. चौत्राचा महिना असल्यानें प्रखर उन्हाचे दिवस होते त्या दिवशी तिसरा प्रहर होऊन गेला. तरी त्यास कोठें पाणी मिळेना. तहानेनें ते लोक कासावीस होऊं लागले. त्यानीं बराच शोध केला, पण उदकाचा पत्ता लागेना, सर्वजण व्याकुल होऊन चौफेर पडून राहिले. राजाहि पाणी पाणी करीत होता व त्याच्या घशास कोरड पडली. बोलण्याचें अवसानहि राहिलें नाही. अशी सर्वांची अवस्था होऊन गेलीं. तें पाहूण दत्तात्रेयानें एक मायावी सरोवर निर्माण केलें. त्याच्या आजूबाजूस मोठेमोठे वृक्ष असून ते फलपुष्पांनी लादलेले व थंडगार वारा सुटलेला व तेथें पक्ष्यांचा किलकिलाट चालला होता. अशा सुंदर व रमणीय स्थानीं दत्तात्रेय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते. भर्तहरी स्वतः अरण्यामध्यें पाण्याचा शोध करीत फिरत होताच त्याच्या दृष्टीस हें सरोवर पडलें. तेव्हां तो एकटाच उदक पिण्यासाठी त्या सरोवराच्या कांठीं गेला व आतां पाणी पिणार इतक्यांत पलीकडे दत्तात्रेयानें ओरडून म्हटलें, थांब थांब ! उदकास स्पर्श करूं नकोस. तूं कोण आहेस ? तुझें नांव काय ? तें मला प्रथम सांग. दत्तात्रेयस्वामीस पाहतांच राजा चकित झाला आणि त्यास भीतीहि उत्पन्न झाली. तो तोंडांतून ब्रहि न काढितां, टकमक पाहूं लागला. तेव्हां दत्तात्रेयानें त्यास म्हटलें कीं तूं बोलत कां नाहींस ? तूं कोण आहेस ? तुझे आईबाप कोण ? गुरु कोण ? हें मला सांग व मग पाणी पी. तें भाषण ऐकून भर्तहूरी दत्तात्रेयाच्या पायां पडला. नंतर त्यानें आपली सविस्तर हकीगत त्यास सांगितलीं व अजूनपर्यंत गुरु केला नाहीं असें सांगितलें. तेव्हां दत्तात्रेयानें त्यास सांगितलें की, ज्याअर्थीं अद्यापपावेतों तूं गुरु केला नाहींस, त्या अर्थी तूं अपवित्र आहेस म्हणुनच तुला अजून कोणी गुरु मिळाला नाहीं, याकरितां तूं उदकास शिवूं नको. शिवशील तर तें सर्व पाणी आटून तळें कोरडें पडेल व मग मला राग येईल. तेणेंकरून तूं नाहक भस्म होऊन जाशील. अशा प्रकरें दत्तात्रेयानें भर्तृहरीचा धिक्कार केल्यानंतर तो स्वामीच्या पायां पडून प्रार्थना करूं लागला की, महाराज ! माझा प्राण तृषेनें जाऊं पाहात आहे; आपन अनुग्रह करून मला उदक पाजावें. त्यावर दत्तात्रेयानें सांगितलें कीं, माझ्या अनुग्रहास तूं योग्य नाहींस, शंकर, ब्रह्मदेव माझ्या अनुग्रहासाठीं खेपा घालितात; असें असतां, तूं मला अनुग्रह करावयास सांगतोस ही गोष्ट घडेल तरी कशी ? हें ऐकून भर्तृहरी म्हणाला, तें कसेंहि असो, तुम्हीं कृपाळू आहां; दया क्षमा तुमच्या अंगीं आहे, तर कृपा करून मला उदक पाजावें व माझे प्राण वांचवावें. तेव्हां दत्तात्रेयानें त्यांस सांगितलें कीं, तुं म्हणतोस तर मी तुला अनुग्रह देतों; पण तूं बारा वर्षेपर्यंत तपश्चर्या करून अनुग्रह घेण्यास योग्य हो. त्यावर राजा म्हणाला, सध्यांच माझा प्राण जात आहे; मग बारा वर्षे कोणीं पाहिलीं आहेत ? दत्तात्रेयानें त्यास समजावून सांगितलें कीं, तूं मनाचा निग्रह करून संकल्प सोड, म्हणजे मी तुला उदक पाजतों, पण पुनः संसाराची आशा धरतां कामा नये व अगदीं विरक्त होऊन राहिलें पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुला पत्करत असल्या तर पाहा. तें भाषण ऐकून राजा कुंठित होऊन विचार करीत बसला. त्यानें शेवटीं पोक्त विचार करून दत्तात्रेयास सांगितलें कीं मी अजून प्रपंचांतून मुक्त झालों नाहीं गयावर्जन करून पितुऋणांतून मुक्त होईन. तसेंच कांतेस पुत्र झाल्यावर तिच्या ऋणांतून मुक्त होईन. पुत्राचें लग्न झाल्यावर त्याच्या ऋणांतून मुक्त होईन. हीं सर्व ऋणें अद्यापर्यंत जशीच्या तशींच कायम आहेस: यास्तव आणखीं बारा वर्षें मला संसार करण्याची मोकळीक द्यावी. मग दत्तात्रेयानें भर्तृहरीचें म्हणणें कबूल केलें व त्यास पिण्यास पाणी देऊन अनुग्रह दिला. त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून कानांत मंत्र सांगितला आणि आपण दत्तात्रेय आहों असें सांगून त्यांस ओळख दिली. नंतर तें मायिक सरोवर अदृश्यन करून आपणहि गुप्त झाला. पाण्यावांचून सर्व तळमळत असल्यामुळें इतकी खटपट करून व्यर्थ असें भर्तृहरीस वाटून त्यानें श्रीदत्तात्रेयाची प्रार्थना केली. मग दत्तात्रेयानें भोगावतीचें उदक आणून सर्वांस पाजिलें. कामधेनूपासून अन्न निर्माण करविलें; शेवटीं राजा सैन्यासह भोजन करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरास गेला. इतक्यांत दत्तात्रेय भोगावतीस व कामधेनूस रवाना करून आपणहि निघून गेले. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************************ अध्याय २८ पिंगलेचे भर्तरीवरील प्रेम; त्याच्या कसोटीकरितां पाठविलेला निरोप; त्याचा दुष्परिणाम ... अरण्यामध्यें दत्तात्रेयानें अनुग्रह दिल्यानंतर भर्तृहरीनें संसार करण्यासाठीं त्याजपाशीं बारा वर्षांचीं मुदत मागितली. ती मिळाल्यानंतर तो उज्जैनीस गेला व रात्रीं भोजन झाल्यानंतर पिंगलेच्या महालांत गेला. महालांत जातांच पिंगलेनें त्यास सुवर्णाच्या मंचकावरील पुष्पशय्येवर बसवून त्याची पूजा केली व राजावरील आपलें प्रेम व्यक्त केलें. तीं उभयतां अगदीं जवळ बसून विनोदाचीं भाषणें करूं लागली. मग राजानें तिला आपल्या डाव्या मांडीवर बसवून तिचे मुके घेतले व सर्वांमध्यें तूं माझी आवडती आहेस; आपल्या दोघांच्या कुडी दोन, पण प्राण एकच आहे, अशा भावार्थाचीं व विनोदाचीं पुष्कळ भाषणें झालीं. नंतर पिंगलेनें राजास तांबूल दिला आणि म्हटलें, महाराज, ब्रह्मदेवानें आपला जोडा निर्माण केला, त्याप्रमाणें योगहि घडून आला. आपली एकमेकावरची प्रीति म्हटली म्हणजे जसें मीठ पाण्यांत मिळून एकत्र होतें, त्याचप्रमाणें आपलें दोघांचें मन एक होऊन गेलें आहे; परंतु निर्दय कृतांत केव्हा धाड घालील ही भीति आहे. तुमच्यापूर्वी मी मरावें हा मार्ग उचित होय व ईश्वरकृपेनें जर असा योग घडून आला, तर मी मोठी भाग्यवती ठरेन. असें पिंगला राणी बोलत असतां भर्तृहरे तिला म्हणाला, प्रिये ! ह्या गोष्टी ईश्वराधीन आहेत, आपल्या कोणाच्या हातांतील नाहींत. त्याचा संकेत काय आहे हें आपणांस कसें समजणार ? माझ्यपूर्वीं तूं मरण इच्छीत आहेस ही गोष्ट कांहीं वाउगी नाहीं. परंतु सूर्यपुत्र ( यम ) अगदी निर्दय आहे. त्याच्यामध्यें विचाराचा लेशसुद्धां नाहीं. तेव्हां न जाणों, जर तुझ्याअगोदर मी मरण पावलों तर पुढें तूं आपले दिवस कसे काढशील ? तेव्हां पिंगला म्हणाली, ब्रह्मदेवानें कपाळीं काय लिहिलें आहे हें कळत नाही. पण जर तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली, तर मी जीव ठेवणार नाही. अग्नीत देहाची आहुति तुमच्या समागमें देईन. पिंगला राणीचें हें भाषण ऐकून भर्तृहरि म्हणाला, मी जिवंत आहें तोंपर्यत तुझें हें बोलणें ठीक आहे. परंतु स्वतःच्या जिवासारखी प्रिय वस्तु दुसरी कोणतीच नाही. म्हणून जिवाचा घात कोणाच्यानं करवत नाहीं. मला खूष करण्यासाठी तुझें हें सारें बोलणें; पण प्रसंग पडल्यानंतर हें बोलणें असेंच राहून जाईल ! राजाच्या या भाषाणावर पिगंलेनें उत्तम दिलें कीं, मी मनःपूर्वक बोललें तरी तुम्ही तें खरें मानीत नाहीं. परंतु इतकी पक्की खात्री असूं द्या कीं, वैधव्याचा डाग मी माझ्या देहास कदापि लागूं देणार नाही. कशावरून म्हणाला तर काया, वाचा, मन हीं मी तुम्हांस अर्पण केलीं आहेत. ह्यास साक्ष ईश्वर आहे. तो ईश्वर सत्यवादी असल्याचें सर्व जग म्हणून सांगतें. म्हणून मी विधवा राहाणार नाहीं हें खचित, अशा रीतीनें त्याची समजुत करून ती उगीच राहिली व राजानहि ह्या भाषणाचा अनुभव पाहण्याचा निश्चय केला. पुढें एके दिवशीं राजा अरण्यांत शिकारीस गेला असतां त्यास राणीच्या ह्या भाषणाची आठवण झाली. तेव्हां त्यानें असा प्रकार केला कीं, एक मृग जिवंत धरिला आणि त्याचा वध करून आपला मुकुट व वस्त्रें त्याच्या रक्तानें भिजविलीं. नंतर तीं एक सेवकाजवळ देऊन त्यास सांगितलें कीं, हीं वस्त्रें घेऊन तूं पिंगलेकडे जा व तिला सांग कीं, राजा शिकार करीत असतां वाघानें त्याच्यावर झडप घालून त्याचा घात केला. हा निरोप तिला कळविल्यासाठी राजानें त्या सेवकास अंवतीस पाठविलें व आपण अरण्यांत स्वस्थ बसून राहिला. राजाच्या सेवकानें अवंतीस जाऊन पिंगलेची भेट घेतली व ती रक्तानें भरलेलीं वस्त्रें पुढें ठेवून हात जोडून उभा राहिला. राजानें शिकवून ठेविल्याप्रमाणें त्यानें पिंगलाराणीस निरोप सांगितला व राजाच्या कलेवराचें दहन करून त्याच्याबरोबर गेलेलें उष्कर लौकरच परत येईल, असें म्हटलें. सेवकाचे हे शब्द पिंगलेच्या कानीं पडले मात्र, तोंच तिची जी अवस्था झाली ती वर्णन करतां येत नाहीं. ती कपाळ बडवून घेऊं लागली. केस तोडूं लागली, हेल काढून मोठमोठ्यानें रडूं लागली. इतक्यांत राजवाड्यांत हे दुःखकारक बातमी पसरली. ती ऐकून राजाच्या बाराशें स्त्रिया रडत ओरडत धांवत आल्या व त्यांनीहि अतिशय शोक केला. पिंगलेस मात्र सर्वापैक्षां विशेष दुःख झालें शेवटी पिंगलेनें सती जाण्याचा निश्चय करून सर्व तयारी केली. राजाचें वस्त्र परिधान केलें, वाणें घेतलीं व समारंभानें स्मशनांत जाऊन अग्नि तयार केला. सर्वांनी तिला आशीर्वाद दिले. नंतर तिनें अग्निकुंडांत उडी टाकून आपलें स्वहित साधून घेतलें. त्या वेळीं संपूर्ण नगरवासी लोक शोक करीत आपपल्या घरीं गेलें. इकडे अस्तमान होऊन रात्र झाल्यावर राजा नगरांत जावयास निघाला. त्यावेळीं आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यांत जो सेवक पाठविला होता त्याची राजास आठवण होऊन त्याच्या मनांत नानाप्रकारच्या वाईट कल्पना येऊं लागल्या. असा मोठा प्रसंग गुदरला असतांहि भर्तृहरीचा बंधु विक्रमराजा स्वस्थ कसा राहिला, ही कल्पना साहजिकच मनांत येते. तसेंच ज्या नोकरानें राजवस्त्रें नेऊन पिंगलेस दिलीं होतीं, तो तरी या पल्ल्यास गोष्ट येऊन ठेपेपर्यंत स्वस्थ कसा बसला, अशीहि शंका येते. परंतु या गोष्टीविषयींचा विचार करून पाहतां असें दिसतें कीं, तो सेवक वस्त्रें नेऊन दिल्यानंतर फार वेळ तेथें न राहतां तसाच परत भर्तृहरीकडे अरण्यांत गेला; परंतु राजा दुसऱ्या रस्त्यानें परतल्यामुळें त्यांची चुकामुक झाली. तो सेवक मागाहून त्यांस जाऊन मिळाला. तसेंच त्या समयीं विक्रमराजा मिथुलनगरास आपल्या आजोळी गेला होता. सुमंतीक प्रधान, शुभविक्रम राजा वगैरे मंडळीही राजासमागमें गेलीं होती. राजवाड्यांत फक्त स्त्रियाच होत्या. गांवकरी लोकांनी पिंगलेस सती जाण्याविषयीं हरकत केली होती, पण तिच्यापुढें कोणाचें कांही चाललें नाहीं अज्ञानामुळें पिंगला मात्र प्राणास मुकली. भर्तृहरी राजा गांवाच्या शिवेशीं येतांच द्वाररक्षकांनीं पिंगला सती गेलाचा वृत्तांत कळविला. तेव्हां राजास अत्यंत दुःख झालें. तो तसाच रडत, ओरडत स्मशानांत गेला व आपणहि पिंगलेप्रमाणें जळून जावें, अशा उद्देशानें तो तिच्यासाठीं केलेल्या अग्नींत उडी टाकू लागला. पण बरोबरच्या लोकांनीं त्यास धरून ठेवल्यामुळें राजाचा कांहीं इलाज चालला नाहीं. पिंगलेची ही अवस्था झाल्यानें राजास अतिशय दुःख झालें. तो तिचे एक एक गुण आठवून रडत होता. पिंगला सती गेली म्हणून भर्तृहरी स्मशानांत शोक करीत आहे, ही बातमी ऐकून गांवचे लोकहि धांवत धांवत स्मशानांत आले. तेहि राजाबरोबर मोठमोठ्यानें रडूं लागले. परंतु त्यांचें तें रडणें वरवर दाखविल्यापुरतेंचि होतें. राजा शोकसागरांत पडला असतां लोक त्याची समजूत करूं लागलें कीं, राजन् ! अशाश्वताचा शोक करून काय उपयोग ! ईश्वरावर भरंवसा ठेवून स्वस्थ असावें. अशा रीतीचा लोकांनी राजास पुष्कळ बोध केला. परंतु राजाचें तिकडे लक्ष जाईना. शेवटीं लोक आपापल्या घरोघर गेले. राजा मात्र स्मशांनांत पिंगलेच्या चितेशींच बसून राहिला. राख भरून टाकण्यासाठीं दुसऱ्या दिवशीं लोक स्मशानांत गेले. परंतु भर्तृहरी चित्तेस हात लावूं देईना व आपणहि तेथून उठेना. या पल्ल्यास गोष्ट आल्यानंतर लोक निघून गेले. भर्तृहरी मात्र अन्नपाण्यावांचून तसाच तेथें रात्रंदिवस बसून राहिला. याप्रमाणें अवंतीमध्यें घडलेला प्रकार दूतांनीं मिथूलेस जाऊन विक्रमराजास सांगितला. तो ऐकून सत्यवर्मा, शुभविक्रम, सुमंतीक प्रधान आदिकरून सर्व मंडळींस अत्यंत दुःख झालें. ते सर्व ताबडतोब उज्जैनीस आले व स्मशानामध्यें जाऊन पाहतात तों त्यांना पिंगलेचें दुःख करीत भर्तृहरी रडत बसलेला दिसला. तेव्हां विक्रमराजा भर्तृहरीची समजूत करूं लागला. परंतु त्याला वेड लागल्यासारखें झालें तो पिंगला ! पिंगला ! असें म्हणून रडत होता. त्यास बोध करितां करितां दहा दिवस गेल्यावर विक्रमानें पिंगलेची उत्तरक्रिया केली. नंतर तो राज्यकारभार पाहूं लागला. विक्रमराजा त्यास नित्य जाऊन बोध करीत असे. याप्रमाणें बारा वर्षें झाली. पण बोध केल्यानें कांहीं फायदा झाला नाहीं. पिंगलेच्या दुःखाने भर्तृहरीनें अन्न सोडलें होतें व तो फक्त झाडांची पानें खाऊन व उदक प्राशन करून राहिला होता. त्यायोगानें त्याचें शरीर कृश झालें. भर्तृहरीची अशी अवस्था पाहून मित्रावरूणीस ( सूर्यास ) त्याची दया आली. नंतर तो दत्तात्रेयाकडे गेला. दत्तात्रेयानें त्यास येण्याचें कारण विचारलें असतां मित्रावरूणी म्हणाला, आपणांस सर्व ठाऊक आहे. मीच सांगितलें पाहिजे असें नाहीं. परंतु सुचवायचें इतकेंच कीं भर्तृहरीवर आपली कृपा असूं द्या म्हणजे झालें. मग मित्रावरुणीस दत्तात्रेयानें धीर देऊन भर्तृहरीबद्दल काळजी न वाहतां स्वस्थ मनानें जावयास सांगितिलें व मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भर्तृहरीकडे पाठवून त्यास बोध करून ताळ्यावर आणतो, अशा रीतीनें मित्रावरूणीची समजूत करून त्याची रवानगी केली. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************************ अध्याय २९ गोरक्षनाथाच्या भेटीनें भर्तरीचा मोहनाश; भर्तृहरीस वैराग्यदीक्षा... मागें एका अध्यायांत सांगितल्याप्रमाणें गर्भाद्रिपर्वतावर मच्छिंद्रनाथ राहिला व गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता. त्यानें गिरिनारास जाऊन दत्तात्रेयाची भेट घेतली. तो दत्तात्रेयाच्या पायां पडल्यावर दत्तात्रेयानें तोंडावरून हात फिरविला व मच्छिंद्रनाथ कोठें आहेत व तूं इकडे कोठें आलास, म्हणुन विचारलें. तेव्हां गर्भाद्रिपर्वतावर मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करावयास राहिले आहेत व त्यांनीच सांगितल्यावरून व मी तीर्थ करीत करीत आपल्या चरणांजवळ आलों, असें गोरक्षनाथानें सांगितलें. नंतर दत्तात्रेयानें गोरक्षनाथास सांगितलें, मला तुझ्यापासून एक कार्यभाग करून घ्यावयाचा आहे. तो असा कीं, भर्तुहरीवर मी अनुग्रह केला, पण तो आपल्या बायकोसाठीं स्मशांनांत शोक करीत राहिला आहे. या गोष्टिस आज बारा वर्षे झाली. तो गवत, पानें खाऊन जिवंत राहिला. तरी तूं तेथें जाऊन त्यास सावध कर. हें सर्व जग मिथ्या, अशाश्वत आहे, असें त्याच्या अनुभवास आणून दे व त्यास नाथ पंथांत आण. मी त्यास मागें उपदेश केला तेव्हां त्यानें 'मी नाथपंथास अनुसरीन' असें माझ्याजवळ कबूल केले होते. असें सांगून भर्तृहरीची जन्मापासूनची संपूर्ण हकीकत सांगितली. ती ऐकून घेतल्यानंतर गोरक्षनाथानें दत्तात्रेयास सांगितलें कीं, आपल्या कृपेनें मी हें कार्य करून येतों. नंतर दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन आणि त्यास वंदन करून तो निघाला. मग गोरक्षनाथानें व्यानअस्त्राचा जप करून कपाळी भस्म लावतांच तो एक निमिषांत पन्नास योजने लांब अवंतीस गेला. तेथें स्मशानामध्यें भर्तृहरी बसला होता. शरीर अगदीं क्षीण झालें होतें व त्यास पिंगलेचा एकसारखा ध्यास लागला होता. त्याची स्थिती पाहतांच गोरक्षास अत्यंत वाईट वाटलें. त्यानें असा विचार केला कीं, या समयीं हा पिंगलेच्या विरहानें अगदीं भ्रमिष्टासारखा होऊन गेला आहे. अशा वेळीं जर मी ह्यास उपदेश करीन, तर फायदा होण्याची आशा नाहींच, पण उलट माझें सर्व भाषण मात्र व्यर्थ जाईल. यास्तव तो आपल्या सांगण्यास अनुकूल होऊन आपल्या मनाप्रमाणें वागले अशी युक्ति योजून कार्यभाग साधून घ्यावा. त्याप्रमाणें विचार करून गोरक्षनाथानें कुंभाराकडे जाऊन एक मडकें विकत घेतलें व त्यास बाटली असें नाव दिलें. नंतर त्या मडक्यास चित्रविचित्र रंग देऊन सुशोभित केल्यावर तें तो स्मशानांत घेऊन गेला. तेथें ठेंच लागली असें ढोंग करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध झाल्यासारखें त्यानें केलें. त्या वेळेस बाटली ( मडकें ) फुटून गेली असें पाहून तो रडूं लागला. त्यानें तिच्यासाठीं फारच विलाप केला. त्यानें त्या खापराचें सर्व तुकडे जमा करून जवळ घेतले आणि रडत बसला, ती आपणास अत्यंत उपयोगाची होती व मी मरून ती बाटली राहिली असती तर फार नामी गोष्ट पडती, अशा भावार्थाच्या शब्दांनी फारच विलाप करून 'बाटली ! बाटली !' म्हणून मोठमोठ्यानें गोरक्षनाथ रडत बसला. हें पाहून जवळच बसलेला भर्तृहरीस नवल वाटले. त्यास राहून राहून हसूं येई. गोरक्षनाथ एकसारखा धायधाय रडत होता. तो म्हणे, माझें बाटलीधन कोण्या दुष्टानें हिरावून नेलें ! हे बाटले ! एकदां मला तुझें तोंड दाखीव पाहू. अशा प्रकारचा त्याचा विलाप ऐकून भर्तृहरी पिंगलेचा नाद विसरला. अर्ध्या पैशाची त्या बाटलीची किंमत आणि तेवढ्यासाठीं 'बाटली, बाटली' म्हणत रडत असलेला गोरक्षनाथास पाहून भर्तुहरीस उगीच बसून राहवेना. तो गोरक्षनाथास म्हणाला, मडक्याची किंमत ती काय व तेवढ्यासाठीं मूर्खाप्रमाणें तूं योगी म्हणवीत असतां रडत बसला आहेस, हें काय ? तेव्हा गोरक्षनाथ विचारूं लागला, राजा ! तूं कोणासाठीं दुःख करून शोक करीत बसला आहेस बरें ? आवडत्या वस्तुच्या दुःखाचा अनुभव तुला आहेच. त्याचप्रमाणें माझी बाटली फुटल्यामुळें मला किती दुःख झालें आहे हें माझें मीच जाणतो ! हें ऐकून भर्तृहरी म्हणाला मी मडक्यासारख्या क्षुल्लक वस्तुकरितां शोक करीत नाहीं. प्रत्यक्ष माझ्या पिंगलाराणीचा घात झाला आहे; म्हणून तिचें मला भारी दुःख होत आहे. ती मला आतां पुन्हां प्राप्त व्हावयाची नाहीं, परंतु अशीं मडकीं हवीं तितकीं मिळतील. तें ऐकून गोरक्षनाथानें सांगितलें कीं, तुझ्या पिंगलेसारख्या लक्षावधि पिंगला एका क्षणांत निर्माण करून देईन; पण माझ्या बाटलीसमान दुसरी बाटली कदापि मिळावयाची नाहीं. तेव्हां भर्तृहरीनें म्हटलें कीं, तुं लक्षावधि पिंगला उत्पन्न करून दाखीव म्हणजे मी तुला लाखों बाटल्या निर्माण करून देतो; उगीच थापा मारून वेळ साजरी करून नेऊं नकोस तें ऐकून, जर मी पिंगला उत्पन्न करून दाखविल्या तर तूं मला काय देशील म्हणून गोरक्षानें भर्तृहरीस विचारलें, तेव्हां आपलें संपूर्ण राज्य देण्याचें भर्तृहरीनें कबूल केलें व दैवतांना साक्षी ठेवून बोलल्याप्रमाणें न केल्यास माझे पूर्वज नरकवास भोगतील आणि मीहि शंभर जन्म रवरव नरक भोगीन, अशी भर्तृहरीनें प्रतिज्ञा केली. मग गोरक्षनाथ त्यास म्हणाला, तूं आपलें बोलणें खरें करून न दाखवशील, तर शंभर जन्मच नव्हे, पण सहस्त्र जन्मपर्यंत नरक वास भोगशील. नंतर गोरक्षानें कामिनीअस्त्राचा जप करून पिंगलेच्या नांवाने भस्म सोडतांच लक्षावधि पिंगला खाली उतरल्या. पिंगला राणीप्रमाणें त्या सर्वांची रूपें पाहून राजांस आश्चर्य वाटलें. त्या सर्व जणी भर्तृहरीजवळ बसून संसाराच्या खाणखुणा विचारूं लागल्या. त्यांनीं राजाच्या प्रश्नांचीं उत्तरे बरोबर दिली. शेवटीं पिंगलेनें राजास बोध केला कीं, माझ्या विरहानें तुम्हांस दुःख झालें ही गोष्ट खरी आहे; परंतु अशाश्वताचा भार वाहणें व्यर्थ होय. मी तुमच्यावर मनस्वी प्रीति करीत असतां आपणास जाळून घेतले; परंतु गोरक्षनाथानें मला पुन्हां दृष्टिगोचार केलें. तथापि शेवटीं आम्हांस व तुम्हांस मरावयाचें आहेच, तें कदापि चुकावयाचें नाहीं. यास्तव आतां माझा छंद सोडून देऊन तुम्हीं आपल्या देहाचें सार्थक करून घेऊन मोक्षाची प्राती करून घ्यावी. फक्त माझा ध्यास धरल्यानें तुम्ही मुक्तीला मात्र अंतराल. मी तुमची कांता असतांना पतिव्रताधर्म आचरून आपलें हित करून घेतलें. आतां तुम्हीं आपल्या हिताचा मार्ग पाहावा. हा सर्व चमत्कार पाहून राजास विस्मय वाटला. मग भर्तृहरी गोरक्षानाथाच्या पायां पडण्यासाठीं धांवला. तेव्हां गोरक्षानाथानें त्यास हातीं धरून सांगितलें, राजा, माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रेयाचा शिष्य आहे व तुलाहि त्या दत्ताचाच अनुग्रह झालेला आहे. तर तूं माझ्या गुरुचा बंधु आहेस म्हणून मला गुरुस्थानीं आहेस, सबब मी तुझ्या पायां पडणें योग्य होय व म्हणुन मीच तुला साष्टांग नमस्कार करितों. राजा, आतां मला सांग कीं, तुझ्या मनांत काय आहे ? पिंगलेसहवर्तमान राज्यसुखाचा उपभोग घेण्याचे इच्छा आहे का वैराग्यवृत्ति घेऊन जन्माचें सार्थक करून घेणार ? तें ऐकून राजानें सांगितलें कीं, मी पिंगलेसाठीं बारा वर्षें भ्रमिष्ट होऊन बसलों होतों, परंतु ती माझ्या दृष्टीस पडली नव्हती. तूं योगसामर्थ्यानें हां हां म्हणतां शेकडों पिंगला मला दाखविल्यास, हें सामर्थ्य राज्यवैभवांत दिसत नाहीं. मी भ्रांत पडून श्रीगुरुच्या हातून निसटलों आणि मोठ्या संकटांत पडलों आतां कृपा करून मला दत्तात्रेयाचें दर्शन करव. मी योगमार्गाचा स्वीकार करणार. दत्तात्रयाच्या दर्शनास जाण्यापूर्वी भर्तृहरी गोरक्षनाथास म्हणाला कीं, तूं ह्या सर्व पिंगला अदृश्य कर व राज्यकारभार आपल्या हातांत घेण्यासाठीं राजवाड्यांत चल. तें भर्तृहरीचें म्हणणें गोरक्षनाथानें कबूल करून पिंगला अदृश्य केल्या व त्यास घेऊन तो नगरांत गेला. त्या वेळेस सर्वांना आनंद झाला. विक्रमराजानें गोरक्षनाथास सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्याची षोडशोपचारांनीं पूजा केली. भर्तृहरीस कोणत्या युक्तीनें देहावर आणिलें हें मला कृपा करून सांगावें, अशीं गोरक्षनाथाची विक्रमराजानें प्रार्थना केली. तेव्हां त्यानें घडलेला सर्व प्रकार त्यास निवेदन केला व पूढचा संकेतहि त्याच्या कानांवर घातला. मग विक्रमानें त्या दोघांस आणखी सहा महिनेपावेतों तेथें राहण्याचा आग्रह केला. बारा वर्षेपर्यंत भर्तृहरी केवळ झाडांची पानें खाऊन राहिल्यानें अगदी क्षीण होऊन गेला आहे, व तितक्या अवकाशांत त्यास कांहीशीं शक्ती येईन असें विक्रम म्हणाला. तेव्हां गोरक्षनाथानें सांगितलें कीं, आज जी राजाची बुद्धि आहे तीच पुढें कायम राहील हा नेम नाहीं, म्हणुन आमच्यानें येथें राहवत नाहीं. परंतु विक्रमानें अति आग्रह केल्यावरून तो तीन रात्रीं तेथें राहून भर्तृहरीस बरोबर घेऊन निघाला. त्या वेळेस भर्तृहरीच्या स्त्रियांनीं गोरक्षनाथावर फार रागवून शिव्यांची वृष्टि केली. परंतु विक्रमराजानें आनंदानें उभयतांची रवानगी केली. त्या वेळीं गांवची दुसरी बरींच मंडळीहि त्यास पोचविण्यासाठी विक्रमराजाबरोबर गेलेली होती. गोरक्षनाथानें भर्तृहरीस स्पष्ट सांगितलें कीं, जर तुझें मन संसारांत गुंतत असेल तर तुं अजून माघारी जा आणि खुशाल संसारसुखाचा उपभोग घे. मी आडकाठी करीत नाहीं. पण भर्तृहरीस तें बोलणें रूचलें नाहीं. आपण संसारास विटलों, असें त्यानें निक्षून सांगितलें. मग गोरक्षनाथानें आपली शैली, शिंगी, कंथा त्यास देऊन भिक्षेकरितां झोळी दिली. प्रचीति पाहण्यासाठीं त्याच्याच स्त्रियांकडे भिक्षा मागावयास त्याला पाठविलें. तेव्हां स्त्रियांनीं रडून गोंधळ केला. त्याचे गूण आठवून त्या त्यास राहण्यासाठी आग्रह करूं लागल्या. पण भर्तृहरीचें मन डगमगलें नाहीं. तो त्यांचा तिरस्कार करून निघून गेला. मग विक्रम वगैरे सर्व मंडळी परत नगरांत गेली. विक्रमानें भावजयांची समजूत करून त्यांचें सांत्वन केलें. भर्तृहरी फार अशक्त झालेला असल्यानें वाट चालतांना त्याच्या नाकीं नउ आलें तें पाहून गोरक्षनाथानें यानास्त्राची योजना करून भस्म मंत्रून त्याच्या कपाळास लावतांच भर्तृहरीचा अशक्तपणा गेला व ते दोघे डोळे मिटून एका क्षणांत गिरिनार पर्वतावर आले आणि दत्तात्रेयाचें दर्शन घेऊन पायां पडले. दत्तानें त्यांच्या तोंडावरून हात फिरविला व त्यांचें समाधान केलें. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************************ अध्याय ३० भर्तरीस दत्तात्रेयाचें दर्शन, चौरंगीची व गोरक्ष-मच्छिंद्रनाथाची भेट, पूर्व इतिहास... गोरक्षनाथ भर्तृहरीस घेऊन गिरिनारपर्वतावर दत्तात्रेयाकडे गेल्यानंतर तेथें तो तीन दिवसपर्यंत राहिला. मग दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे जावयास निघाला. त्या वेळेस, मला बहुत दिवस झाले, मच्छिंद्रनाथ भेटला नाहीं, म्हणुन त्यास एकदां माझ्या भेटीस घेऊन ये, असें श्रीदत्तात्रेयानें गोरक्षनाथास सांगितलें. इकडे दत्तात्रेयानें भर्तृहरीस नाथपंथाची दीक्षा देऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला व त्यास चिरंजीव केलें. मग त्याच्याकडून अभ्यास करविला. ब्रह्मज्ञान, रसायन, कविता, वेद हीं सर्व व संपूर्ण अस्त्रविद्या शिकविल्या आणि साबरी विद्येंतहि त्यासि निपूण केलें. नंतर नाग अश्वत्थाच्या ठायीं असलेल्या संपूर्ण दैवतांचा आशिर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठविलें. तेथें जाऊन भर्तृहरीनें बावन्न वीर अनुकुल करून घेतले. मच्छिंद्रनाथाप्रमाणें त्यासहि सर्व देव अनुकूल होऊन वर देऊन गेले, मग भर्तृहरीस श्रीदत्तात्रेयानें आपल्याबरोबर बदरिकाश्रमास नेऊन तपश्वर्येस बसविलें व आपण गिरिनारपर्वतीं जाऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटांची वाट पाहात राहिले. दत्तात्रेयास विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर तो गर्भगिरीवर येऊन मच्छिंद्रनाथास भेटला व त्यानें त्यास दत्तात्रेयाचा निरोप सांगितला. मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरितां कांहीं दिवसांनीं दोघेजण निघाले. ते वैदर्भदेशाचा मार्ग लक्षून जात असतां कौंडण्यपूर नगरांत गेलें. तेथें ते भिक्षेकरितां हिंडत असतां त्याच्या असें दृष्टीस पडलें कीं, तेथील शशांगर राजानें क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्यास गांवच्या चव्हाट्यावर टाकून दिलें आहे. शशांगर राजा मोठा ज्ञानी, धीट, उदार, सामर्थशाली, सत्वस्थ व तसाच सदगुणी असतांना मुलची इतकी भयंकर दशा करून टाकण्याइतका राजा कां रागावला ? राजा रागावण्याचें कारण असें आहे कीं, ज्या मुलाचे हातपाय तोडले तो राजाचा औरस पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळें तो राजास कृष्णानदींत प्राप्त झाला होता. पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजास संतान नव्हतें. त्यामुळें तो निरंतर उदास असे. राजाची ती अवस्था पाहून त्याची स्त्री मंदाकिनी म्हणत असे कीं, मुलासाठीं असें खंतीं होऊन बसण्यास अर्थ नाहीं. नशिबीं असेल तर संतान होईल, विचार करून काळजी वाहण्याचें सोडून द्या, चिंतेनें शरीर मात्र झिजत चाललें आहे; अशानें संसाराची धूळधाण होऊन जाईल. अशा रीतीनें राणीनें त्यास उपदेश केला असंताहि त्याचें चित्त स्वस्थ होईना. मग राजाच्या मनांत शंकराची आराधना करण्याचें येऊन त्यानें प्रधानास बोलावून आणलें व राज्याचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला. भग रामेश्वरास जाऊन शंकरास प्रसन्न करून घेण्याचा विचार ठरवून राजा स्त्रीसह तेथें जावयास निघाला. तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमावर आला. तेथें शंकरानें त्यास स्वप्नांत दृष्टांत दिला कीं, तूं कांहीं काळजी करूं नको. तुला येथेंच पुत्र प्राप्त होईल. कृष्णा व तुंगभ्रद्रा यांच्यामध्यें माझें वास्तव्य आहे. समागमें पार्वतीहि आहे. तरी तूं आमची पूजा येथें नित्य करीत जा. ह्याप्रमाणें दृष्टांत झाल्यानंतर तो संगमावर मित्रिडोहांत पाहूं लागला असतां तेथें एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडलें. त्याची राजानें मोठ्या समारंभानें अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली. हाच रामेश्वर आहे अशी त्याची निष्ठा जडली. मग तेथें दर्शनासाठीं पुष्कळ लोक नित्य जाऊं लागले व 'जय जय शिव संगमेश्वर' असें बोलूं लागले. राजा संगमेश्वरीं नित्य पूजा करून त्यावर निष्ठा ठेवून काल क्रमीत राहिला. तेथून नजीकच्या भद्रसंगम गांवात मित्राचार्य या नांवाचा एक विप्र राहात होता. त्याच्या स्त्रियेचें नांव शरयू. ती मोठी पतिव्रता होती. त्यांसहि पोटीं कांहीं संतान नव्हतें, म्हणूण त्यांनींहि त्याच संगमेश्वराची ( शिवाची ) आराधना आरंभिली. इकडे कैलासास शंकर कित्येक गणांसह बसले असतां सुरोचना नांवाच्या अप्सरेस शंकरानें बोलावून आणिलें. ती कैलासास आल्यावर शंकराच्या पायां पडून नाचावयास व गावयास लागली. परंतु त्यावेळेस शंकराचे प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली. ह्यामुळें नाचतांना तिच्या तालासुरांत चूक पडली, तेव्हां तिचा हा सर्व प्रकार शंकराच्या लक्षांत आला व त्यानें तिला सांगितलें, सुरोचने ! तुझ्या मनांतील हेतू मी समजलों. तूं मनानें भ्रष्ट झाली आहेस, म्हणुन भद्रसंगमीं मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटीं तुला जन्म प्राप्त होईल. शंकरानें सुरोचनेस असा शाप देतांच ती भयभीत झाली. स्वर्गच्युत होणार म्हणून तिला फारच वाईट वाटलें. शंकराशीं रत होण्याचा विचार मनांत आणल्याचा हा परिणाम, अशी तिची खात्री होऊन तिला परम दुःख झालें. मग तिनें शंकराची स्तुती करून उःशाप देण्याकरितां विनंति केली. तेव्हां शंकरानें प्रसन्न होऊन सुरोचनेस उःशाप दिला कीं, तुं आतां मृत्युलोकीं जन्म घे, तुझी मनकामना पूर्ण होण्यासाठीं माझा तुला स्पर्श होतांच तूं स्वर्गीत येशील. याप्रमाणें उःशापवाणी निघतांच ती तेथून निघाली व मित्राचार्याची स्त्री शरयू हिच्या उदरीं तिचा जन्म झाला. शरयू गरोदर होऊन नऊ महिने पूर्ण होतांच ती प्रसूत होऊन कन्या झाली. ती कन्या मूळची अप्सरा असल्यामुळें तिचें स्वरूप अप्रतिम होतें. तिच नांव 'कदंबा' असें ठेवण्यांत आलें. कदंबा बारा वर्षाची झाली तेव्हां तिच्या बापानें तिच्याकरितां वर पाहण्याचा प्रयत्नि चालविला. परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती. ती रात्रंदिवस शंकराचें ध्यान करण्यांत निमग्न असे. शंकराची पूजा करण्यासाठीं आईबाप नित्य जात, त्यांच्यासमागमें ती नेमानें जात असे; परंतु ती मोठी होऊन तिला जसें समजूं लागलें, तशी ती एकटीहि शंकराच्या पूजेस देवालयांत जाऊं लागली. एके दिवशी ती एकटीच शिवालयांत गेली होती. त्या वेळीं देवळांत दुसरें कोणी नव्हतें. 'जय शंकर' म्हणून शिवाच्या पाया पडून मस्तक जमिनीस टेकातांच शंकरानें अपलें प्रत्यक्ष रूप प्रकट केलें. तिला पाहतांच शिव कामातुर झाला. मग तो तिला धरण्याचा विचार करून धांवूं लागला, तेव्हां ती तेथून निसटून पळूं लागली. शिवानेंहि तिच्या मागोमाग धांवत जाऊन तिला धरिलें; पण शंकराचा स्पर्श होतांच ती सुरोचना पूर्ववत्‌ अप्सरा होऊन स्वर्गास गेली. परंतु कृत्य फसल्यामुळें शंकराच्या भलतीकडे वीर्यपात होऊन रेत कृष्णानदींत गेलें. पुढें शशांगर राजानें स्नान करून अर्ध्य देण्यासाठी हातांत उदक घेतलें, तों तें वीर्य हातांत आलें व राजास ओंजळीत मनुष्यदेहाचा पुतळा दिसूं लागला, मग आपणांस शंकरानें प्रसन्न होऊन अयोनिसंभव पुत्र दिला असा मनाशीं विचार करून अति हर्षानें घरीं जाऊन राजानें तो मुलगा मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समग्र वृत्तांत निवेदन केला. ब्रह्मदेव, शंकर, विष्णु, इंद्र, बृहस्पति ह्यापैकीं कोणीतरी हा अवतार घेतला असावा असें त्यास वाटलें. मग राणीनें आनंदानें त्यास स्तनाशीं लावतांच पान्हा फुटून मुलगा दूध पिऊं लागला. त्याचें नांव कृष्णागर असें ठेविलें व रीतीप्रमाणें सर्व संस्कार केले. मग कांहीं दिवस तेथें राहून राजा कौडण्यपुरास गेला. पुढें कृष्णागराचें वय बारा वर्षीचें झालें, तेव्हां त्याचें लग्न करण्याचें मनांत आणून राजानें मुलाच्या रूपास व गूणांस योग्य अशी कन्या शोधावयास बरीच मंडळी देशोदेशीं पाठविली. त्या मंडळीनीं अनेक स्थळें पाहिली. पण मुलाच्या योग्य मुलगी त्यांच्या पाहण्यात येईना. मग ते सर्व परत कौडण्यपुरास गेले व त्यांनीं सर्व मजकूर राजाच्या कानांवर घातला. पुढें कांहीं दिवसांनी मंदाकिनी राणी मरण पावली. तिच्या वियोगानें राजास परम दुःख झालें. राजानें वर्षश्राद्धापर्यंतचें तिचें उत्तरकार्य केलें. पुढें राजास मदनाची पीडा होऊं लागली. पण पुनः लग्न करण्यास त्याचें मन धजेना. शेवटीं लग्न करण्याचा निश्चय करून त्यानें प्रधानास आपल्याजवळ बोलाविलें व त्यास आपला मनोदय सांगितला आणि माझ्यायोग्य एखादी मुलगी तुझ्या पाहण्यांत आहे काय, असें विचारलें, तेव्हां प्रधानानें सांगितलें कीं, पुरोहितानें बऱ्याच मुलींच्या टिपणांच्या नकला करून आणिलेल्या आहेत; त्यापैकीं घटित पाहून कोणत्या मुलीशीं जुळतें तें पहावें, मग त्याचा विचार करून लग्न जुळविण्यास ठिक पडेल. मग प्रधानानें पुरोहितास बोलावून आणलें व मुलींच्या सर्व पत्रिका पाहिल्या त्यांत चित्रकूटचा राजा भूजध्वज ह्याच्या कन्येशीं चांगलें जमल. ती मुलगीहि अत्यंत रूपवती असून उपवरहि झालेली होती. मग ही कामगिरी बजावण्याकरितां राजानें आपल्या प्रधानाला चित्रकुटास भूजध्वज राजाकडे पाठविलें. त्यानें तेथें जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्यास सर्व मजकूर कळविला. भूजध्वज राजासहि ही गोष्ट मान्य झाली. पत्रिका काढून पाहतां कांहीं नडण्याजोगें आलें नाहीं. मग त्यास मुलगी देण्याचें त्या राजानें कबूल करतांच प्रधानानें पत्र लिहून आपल्या राजाकडे दूत पाठविला. तो कौंडण्यपुरास गेल्यावर पत्र वाचून शशांगर राजास परमानंद झाला व तो लग्नासाठीं चित्रकूटास गेला. लग्नसोहळा उत्तम प्रकारें पार पडला. नंतर भुजावंती स्त्री घेऊन राजा आपल्या नगरांत परत आला. त्यावेळीं भुजवंती वय तेरा वर्षाचें व कृष्णागर पुत्राचें वय सतरा वर्षांचें होतें. एके दिवशीं अशी गोष्ट घडून आली कीं, सापत्ना पुत्राची व तिची नजरानजर झाली. त्यापूर्वीं तिनें त्यास निरखून पाहिलेलें नव्हतें. एकें दिवशीं राजा शिकारीस गेला असतांना राजपुत्र वावडी उडवावयास बाहेर पडला होता. त्यास पाहतांच भुजावंती कामानें व्याकूळ झाली. मग तिनें दासीस बोलावून सांगितलें कीं, तो पलीकडच्या घरीं वावडी उडवीत आहे; त्यास मजकडे घेऊन ये. आज्ञा होतांच दासीनें कृष्णानराजवळ जाऊन तुला तुझ्या सापत्नव मातेनें बोलाविलें आहे, असा निरोप कळविला. आईनें निरोप पाठविला म्हणून राजपुत्र आनंदानें दासीसमागमें भुजावंतीकडे गेला. त्यापूर्वीं तो एकदांच तिच्या भेटीस गेला होता. त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनीं होण्याचा योग येत असून आपली माता आपणास बोलावून नेत आहे, म्हणुन आपलें भाग्य उदयास आलें, असें त्यास वाटूं लागलें. त्या वेळीं भुजावंती रंगमहालाच्या दाराशीं त्याची वाट पाहात उभी राहिली होती; इतक्यांत दासी कृष्णागरास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजावंती दाखवून निघून गेली. कृष्णागर सापत्ना आईजवळ गेल्यावर त्यानें आईस नमस्कार केला. परंतु कामानें व्यथित झाल्यामुळें तिनें हा आपला मुलगा आहे हा विचार एका बाजूस ठेवून अन्य नजरेनें कृष्णागराकडे पाहिल्यानें तो मनांत दचकला. ती त्याच्याजवळ जाऊन व त्याचा हात धरून, मला या वेळेस भोग देऊन माझा काम शांत कर, असें तिनें त्यास उघड सांगितलें. तसेंच त्यानें वश व्हावें म्हणुन तिनें दोन शब्द बोलून बराच आग्रह केला. त्या वेळीं कृष्णागरानें संतापून तिची भीड न धरितां तिला अतिशय फजीत केलें. तो तिला म्हणाला, तुं माझी प्रत्यक्ष सापत्नग माता आहेस; असें असतां तूं आज मजशीं पापकर्म करावयास प्रवृत्त झालीस. तुं काय रानातलें जनावर आहेस ? स्त्रियांची जात अमंगळ व दुष्ट त्या कसा अनर्थ करून सोडतील, याचा नेम नाहीं. असें बोलून हात झिडकारून तो पुन्हा पतंग उडवावयास गेला. त्या वेळीं कामानें आपला अंमल भुजावंतीवर बसविल्यामुळें ती देहभान विसरली होती. जेव्हां हा आपला सापत्न पुत्र आहे, असें तिच्या पूर्ना लक्षांत आलें, तेव्हां ती भयभीत होऊन गेली, तिनें दासीस बोलावून सांगितलें कीं, मघाशीं मी तुजकडून जो पुरुष आणविला तो कोणी परका नसून माझाच सावत्र मुलगा होता; ह्यामुळें मोठ्याच अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे. आतां तो राजास ही हकिकत सांगेल व ती ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतल्यावांचून राहणार नाहीं. त्यास्तव आतां विष खाऊन आपणच जिवाचा घात करावा हें चांगलें म्हणजे ही घाणेरडी गोष्ट उघडकीस येणार नाहीं. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************************

Search

Search here.