श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय ३१ ते ३६

ग्रंथ - पोथी  > श्री नवनाथ भक्तिसार कथा Posted at 2019-02-17 05:50:30
श्री नवनाथ भक्तिसार कथा --- अध्याय ३१ ते ३६ अध्याय ३१ चौरंगीस मच्छिंद्र-गोरक्षाने शशांगर राजाकडून मागून घेतले, चौरंगीची तपश्चर्या... कामविकारवश होऊन कृष्णागरास सापत्नत मातेनें बोलावून नेलें पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चात्ताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली. परंतु तिच्या दासीनें तिला सांगितलें कीं, तुला जिवाचा घात करण्याचें कांहीं कारण नाहीं; ज्याप्रमाणें ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणें घडून येईल, तें कधीं चुकावयाचे नाहीं. आतां तूं झाल्या गोष्टीची खंत करूं नको. स्वस्थ जाऊन नीज. राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महालांत येईल, तेव्हां तू उठूंच नको. मग तो तुला जागी करून निजण्याचें कारण विचारील. तेव्हां तूं रडून आकांत कर व मी आतां आपला जीव ठेवूं इच्छीत नाहीं म्हणून सांग. जर अब्रू जाऊं लागली, तर जगून काय करायाचें आहे ? असें तुं राजास सांगून रडूं लागलीस म्हणजे तो तुला काय झालें आहे तें सांगण्यासाठीं आग्रह करील. तेव्हां तूं त्यास सांग कीं, तुमचा मुलगा कृष्णागर यानें माझ्या मंदिरांत येऊन मजवर बलात्कार करावयाचा घाट घाटला होता; पण मी त्यास बळी पडलें नाहीं. यास्तव आपणांस हेंच सांगावयाचें कीं, आपल्यामागें असें अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करावयाचें आहे ? असें भाषण ऐकून राजास क्रोध आला, म्हणजे तो सहजच मुलगा-बिलगा मनांत न आणितां ताबडतोब त्यास ठार मारून टाकील. मग तूं निर्भय होऊन आनंदानें खुशाल राहा. अशी युक्ती सांगून दासी निघून गेली. त्याप्रमाणें भुजांवती सुवर्णामंचकावर निजली. तिनें अन्न, उदक, स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला. अंगावरील दागदागिने सर्व टाकून दिले. थोड्या वेळानें शशांगर राजा शिकारीहून आला. नेहमीप्रमाणें भुजांवती पंचारती घेऊन कां आली नाहीं म्हणुन राजानें दासीस विचारलें . तेव्हां ती म्हणाली, राणीला काय दुःख झालें आहे तें तिनें सांगितलें नाहीं; पण ती मंचकावर स्वस्थ निजली आहे. याप्रमाणें दासीनें सांगताच राजा भुजावंतीच्या महालांत गेला. तेथें पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणें ती पलंगावर निजली होती. राजानें तिला निजण्याचें कारण विचारिलें असतां ती कांहींच उत्तर न देतां ढळढळां रडूं लागली. त्या वेळीं राजास तिचा कळवळा येऊन त्यानें तिला पोटाशी धरीलें व तोंडावरून हात फिरवून तो पुन्हां विचारूं लागला. राजा म्हणाला. तूं माझी प्रिय पत्नीण असतां, इतकें दुःख होण्याजोगा तुला कोणी त्रास दिला काय ? तसें असल्यास मला सांग मात्र, मग तो कोण कां असेना, पाहा त्याची मी काय अवस्था करून टाकितों ती ! अगे, तूं माझी पट्टराणी ! असें असतां तुजकडे वाकडी नजर करण्याला. कोणाची छाती झाली ? तुं मला नांव सांग कीं, याच वेळेस त्यास मारून टाकतो. राजानें असें क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजांवंतीस किंचित्‌ संतोष झाला. मग तिनें सांगितलें कीं, तुमच्या मुलाची बुद्धि भ्रष्ट झाली आहे. तो खचित माजला आहे. तुम्ही शिकारिस गेल्यानंतर कोणी नाहीं असें पाहून तो माझ्या महालांत आला व माझा हात धरुन मजवर बलात्कार करावयास पाहात होता. माझी कामशांति कर, असें तो मनांत कांहीं एक अंदेशा न आणतां मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊं लागला. त्या वेळीं तो कामातुर झाला आहे असें मी ओळखून त्याच्या हातांतून निसटलें व पळत पळत दुसऱ्या महालांत गेलें. तेव्हां माझी जी अवस्था झाली ती सांगतां पुरवत नाही ! चालतांना पडलें देखील, पण तशीच लगबगीनें पळालें. एकदांची जेमतेम महालांत आलें आणि घेतलें दार लावून ! तेव्हां त्याचा इलाज चालेनासा होऊन तो निघून गेला. आपण नसलेत म्हणजे मजवर असले प्रसंग गुदरणार, ह्यास्तव आतां मी आपला जीव देतें, म्हणजे सुटेन एकदांची या असल्या जाचांतून. आपला एकदां शेवटचा मुखचंद्र पहावा म्हणून हा वेळपर्यंत तशीच तें दुःख सहन करून राहिलें. मोठमोठाल्या हिंसक जनावरांच्या तावडींतून पार पडून आपण सुखरूप घरीं केव्हां याल ह्याच धास्तीत मी राहिलें होते; म्हणून अजूनपर्यंत वाचलें तरी; नाहीं तर केव्हांच आत्महत्या करून घेतली असती. भुजांवंतीचें तें भाषण ऐकून राजाची नखशिखांत आग झाली. जणूं काय वडवानळच पेटला कीं काय, असें भासूं लागलें. मग राजानें बाहेर येऊन राजपुत्र कृष्णागरास मारून, जळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयीं सेवकांस आज्ञा केली. ती आज्ञा होतांच सेवक मुलास स्मशांनांत घेऊन गेले व तेथें नेल्याची बातमी त्या सेवकांनीं परत येऊन राजास सांगितली. ते सेवक चतुर होते. राजानें आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्यें दिली आहे व त्यास मारिलें असतां राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल, कोण जाणे, असे तर्क त्यांच्या मनांत येऊं लागले. त्यांनीं पुनःपुनः राजास जाऊन विनविलें. पण राजानें जो एकदां हुकूम दिला तो कायम. मग दूतांनीं निष्ठूर होऊन त्यास चव्हाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसविलें व त्याचें हातपाय बांधून टाकिले. ही बातमी थोडक्याच वेळांत गांवांत सर्वत्र पसरली. त्यासमयीं शेकडों लोक त्यास पाहावयास आले. कित्येक रदबदली करून राजाचा हुकूम फिरविण्यासाठीं राजवाड्यांत गेले. पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहुन कोणासहि ही गोष्ट त्याच्यापाशीं काढवेना. इकडे आज्ञेप्रमाणें सेवकांनीं कृष्णागराचे हातपाय तोडले आणि त्यास तसेंच तेथें टाकलें. तेव्हां कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या घशास कोरड पडली. डोळे पांढरे झाले व प्राण कासावीस होऊन तोंडातून फेंस निघू लागला. असा तो अव्यवस्थित पडलेला पाहून लोक शोकसागरांत बुडून गेले. त्या समयीं कित्येकांनी शशांगर राजास दूषण दिलें. त्या वेळीं गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेकरितां गांवांत आले होतें, ते सहज त्या ठिकाणीं आले. येथें कसली गडबड आहे. हें पहावें म्हणून ते चव्हाट्यावर जमलेल्या लोकांत मिसळले. तेथें गोरक्षनाथानें कृष्णागरास विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतर्दृष्टीनें पाहतां सर्व बोलण्यावर भरंवसा ठेवून निर्दोषी मुलाचा घात केल्यामुळें त्यानें ते दोघेहि तेथून निघाले. तेव्हां गोरक्षनाथानेंहि अंतर्दृष्टीनें कृष्णागराचा समूळ वृत्तांत ध्यानांत आणिल्यानंतर त्यास नांवारूपास आणावें, म्हणून त्यानें मच्छिंद्रनाथास सांगितलें. त्यांनीं कृष्णागरास त्या परिस्थितींत चौरंगावर पाहिल्यामुळें त्याचें कृष्णागर हें नांव बदलून चौरंगीनाथ असें ठेविलें. राजवाड्यांत जाऊन राजापासून ह्यास मागून घेऊन नाथपंथांत सामील करण्याची गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथासं सूचना केली. परंतु राजाराणीस आपलें सामर्थ दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जाऊं, असें मच्छिंद्रनाथाचें मत पडलें. पण हें गोरक्षनाथाच्या मनांत येईना. तो म्हणाला, प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्यास नाथपंथाची दीक्षा द्यावी व सर्व विद्येंत तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजास प्रताप दाखवून त्या व्यभिचारी राणीची जी दशा करावयाची असेल ती करावी. तूर्त युक्तिप्रयुक्तीनें राजाचें मन वळवून त्याजपासून ह्याला मागून घेऊन जावें. ह्या गोरक्षनाथाच्या विचारास मच्छिंद्रनाथानें रुकार दिला. मग ते उभयता राजवाड्यात गेले.त्यांनी द्वारपाळास आपली नांवें सांगून आपण भेट घेण्यासाठी आलों आहों, असा राजाला निरोप सांगावयास पाठविला. राजास निरोप कळतांच परमानंद झाला व जे हरिहरास वंद्य ते योगी आज अनायासें भेटीस आले आहेत, असें पाहून तो लागलीच पुढें जाऊन त्यांच्या पायां पडला. त्यांची राजानें स्तुति केली व त्यांस राजवाड्यांत नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसविलें. नंतर त्यानें षोडशोपचारांनीं यथाविधि पूजा केली आणि हात जोडून त्यांच्यासमोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळविण्याची विनंती केली. तेव्हां मच्छिंद्रनाथानें सांगितलें कीं तुम्ही अवकृपेमुळें आज एका मुलाचें हातपाय तोडून टाकिले आहेत. तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा. इतकाच आमचा हेतू आहे. मच्छिंद्रनाथाचें हें मागणें ऐकून राजास मोठें नवल वाटलें, तो हंसून म्हणाला, महाराज ! त्यास हातपाय नाहींत, मग त्याचा तुम्हांला काय उपयोग होणार आहे ? उलट तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असें होऊन तुम्हांस त्याला खांद्यावरून घेऊन फिरावें लागेल. हें ऐकून मच्छिंद्रनाथानें त्यास सांगितलें कीं, तूं त्यास आमच्या स्वाधीन करितोस किंवा नाहीं, एवढें सांग म्हणजे झालें. तो आमच्या कामास उपयोगी पडेल कीं नाहीं ही चौकशी तुला कशाला पाहिजे ? मच्छिंद्रनाथानें असें स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजानें परवानगी दिली. मग ते त्यास चौरंगासुद्धां आपल्या शिबिरांत घेऊन गेले व तेथें त्याचे हातपाय तळविले. येथें अशी शंका येते कीं, हे जती निर्जीवास सजीव करतात, असें असतां याची अशी अवस्था कां झाली ? निर्जीव पुतळ्याचा गहिनीनाथ निर्माण केला, मग कृष्णागराचे हातपाय पुनः निर्माण करणें अशक्य होते काय ? परंतु त्यास त्याच स्थितींत ठेवून कार्यभाग करून घ्यावयाचा होता. गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथें एक रात्र राहून पुढें चालते झाले. मग ते फिरत फिरत बदरिकाश्रमात गेले व शिवालयांत जाऊंन त्यांनी शंकराचें दर्शन घेतलें, तेथें चौरंगीस ठेवून आपण अरण्यांत गेलें. तेथें त्यांनीं एक गुहा पाहिली व दोघेहि तींत शिरले. त्यांनीं चौरंगीस तेथें ठेवून त्याची परिक्षा पाहण्याचा बेत केला. मग गोरक्षनाथानें एक मोठी शिळा आणिली. अस्त्राच्या योगानें गुहेंत अंधार पाडिला आणि चौरंगीस देवळांतून तेथें घेऊन गेले. त्या गुहेच्या तोंडाशींच एक मोठें झाड होतें, त्याच्या सावलींत तें तिघेहि बसले. तेथें चौरंगीस नाथदीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथानें गोरक्षनाथास आज्ञा केली. त्या वेळी गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथास सांगितलें कीं, चौरंगीनाथचें तप पाहून मग मी त्यास अनुग्रह करीन. त्याच्या या म्हणण्यास मच्छिंद्रथानें रुकार दिला व चौरंगीस विचारलें कीं, तूं या ठिकाणीं तप करण्यास बसशील काय ? तेव्हां चौरंगीनें उत्तर दिलें कीं, तुम्हीं सांगाल तें करीन व ठेवील तेथें राहीन , नंतर त्यानें त्या दोघांस विनंती केली की, तुम्ही जेथें असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा. इतकें मला दान दिलें म्हणजे माझें कल्याण होईल. ती विनंती मच्छिंद्रनाथानें कबूल केली. मग त्यांनी त्यास आनंदानें गुहेंत नेऊन ठेविलें व त्यास सांगितलें कीं, तुझी दृष्टि निरंतर या वरच्या दगडाकडे असूं दे. जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर पडून नाहक मरून जाशील व आपणांस पुढें जीं कामें करावयाचीं आहेत तीं जशींच्या तशीं राहून जातील. यास्तव फार सावधागिरीनें राहून आपलें हित साधून घे. इतके सांगुन त्यास मंत्रोपदेश केला व त्याचाच जप करावयास सांगितला. त्या वेळीं गोरक्षनाथानें त्यास एक फळ आणुन खावयास दिलें आणि सांगितलें कीं, हीं फळें भक्षून क्षुधा हरण कर. मंत्राचा जप करून तप कर. नजर वर ठेवुन जिवांचें रक्षण कर. आम्ही तीर्थयात्रा करून तुजकडे लवकरच येऊं असें चौरंगीस सांगुन गोरक्ष गुहेबाहेर निघाला व तिच्या तोंडाशीं एक शिळा ठेविली. गोरक्षनाथानें चामुंडेंचें स्मरण करतांच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठीं स्मरण केलें म्हणुन तिनें विचारले. तेव्हां तो म्हणाला, येथें एक प्राण आहे त्याच्यासाठीं तुं नित्य फळें आणून देत जा म्हणजे तो ती खाऊन राहात जाईल. परंतु तेथें फळें नेऊन ठेवशील तीं गुप्तपणें ठेवीत जा; त्याच्या समजण्यांत मुळींच येऊं देऊं नको. अशी चामुंडेस आज्ञा करून ते गिरिनारपर्वतीं आले. त्या आज्ञेप्रमाणें चामुंडा गुप्तपणानें त्यास फळें नेऊन देत असे. शिळा अंगावर पडून प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीति होती व गोरक्षनाथानें शिळेविषयीं फार सावध राहावयास बजावून सांगितलें होतें. म्हणुन एकसारखी तिकडे नजर लाविल्यानें त्याचें फळें खाण्याचें राहून गेलें. तो फक्त वायू भक्षण करून राहूं लागला. नजर चुकूं नये म्हणुन अंगसुद्धां हालवीत नसे. त्याचें लक्ष योगसाधनेकडे लागल्यानें शरीर कृश होऊन त्याचा हाडाचा सांगाडा मात्र उरला. अशा रीतीनें चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होता. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ******************************************* अध्याय ३२ त्रिविक्रमराजाची कथा, राजाच्या मृत्युनंतर त्याच्या देहांत मच्छिंद्रनाथाचा संचार... चौरंगीनाथास तपश्चर्येस बसविल्यानंतर मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ तेथून निघून गिरिनारपर्वतीं गेले व त्यांनीं दत्तात्रेयाचें दर्शन घेतलें. मच्छिंद्रनाथास पाहतांच दत्तात्रेयास परमानंद झाला. मच्छिंद्रनाथास केव्हां भेटेन असें त्यास होऊन तो त्या भेटीची वाट पाहात होताच. मुलानें आईस भेटावें तसें मच्छिंद्रनाथाच्या भेटीनें दत्तास आले. मग उभयतांच्या प्रेमपूर्वक सुखः दुखाच्या गोष्टी झाल्या. त्यानें त्यास पोटाशीं धरून आतां येथेंच राहा, तीर्थयात्रेस जाऊं नका म्हणून सांगितलें. ते उभयतां तेथें सहा महिनेपर्यंत राहिले. पुढें ते तीर्थयात्रा करावयास आज्ञा मागूं लागले. जगाच्या उद्धारासाठीं आम्ही जन्म घेतला आहे; ह्यास्तव आम्हांस एके ठिकाणीं राहतां येत नाहीं, असें मच्छिंद्रनाथानें सांगितल्यावर दत्तात्रेयानें त्यांस तीर्थयात्रा करावयास जाण्याची आज्ञा दिली. दत्तात्रेयास सोडून जातेवेळेस त्यांस फार वाईट वाटलें. त्यांच्या डोळ्यांतुन एकसारखें प्रेमाश्रु वाहात होते. ते त्या ठिकाणाहून काशीस जाण्याच्या उद्देशानें निघाले व फिरत फिरत प्रयागास गेले. त्या समयीं तेथें त्रिविक्रम नांवाचा राजा राज्य करीत होता. तो काळासारखा शत्रूवर तुटून पडे. तो मोठा ज्ञानी असून उदास होता. त्यास सर्व सुखें अनुकूल होती, परंतु पुत्रसंतति नसल्यामुळें त्यास तीं सर्व सुखें गोड लागेनात. त्याची साधुसंतांच्या ठिकाणी अति निष्ठा असे. त्याच्या राज्यांत याचक फारसा दृष्टीस पडत नसे. त्याच्यी प्रजा कोणत्याहि प्रकारची काळजी न वाहतां आनंदामध्यें राहात होती. त्याची राणी महापतिव्रता असून त्याच्या मर्जींनुरूप वागत असे. परंतु पोटीं संतति नसल्यानें ती थोडी खिन्न असे. राजा दिवसेदिवस थकत चालल्यामुळें पुत्रप्राप्तीची निराशा वाटून तिला वारंवार दुःख होई. अशी ती काळजींत पडली असतां, एके दिवशीं राजा परलोकवासी झाला. तेव्हां राज्यांत मोठा हाहाःकार झाला. राणी रेवती तर दुःखसागरांत बुडून गेली. तिजवर दुःखाचे डोंगर कोसळले. त्रिविक्रमराजासारखा राजा पुन्हां होणार नाहीं, असें त्याचे अनेक गुण गाऊन लोक विलाप करूं लागले. साऱ्या प्रयागभर रडारड झाली. त्यास संधीस मंच्छिद्रनाथ व गोरक्षनाथ त्या शहरांत प्रविष्ट झाले. त्या वेळीं मच्छिंद्र्नाथास तेथील परिस्थिति ऐकून कळकळा आला. धन्य हा राजा कीं, ज्यासाठीं सर्व लोक हळहळत आहेत. अशा राजास पुन्हां जिंवत करून दुःखातून सर्वांस सोडवावें, असें मच्छिंद्रनाथाच्या मनांत आलें. त्यानें राजाची आयुष्यमर्यादा शोधून पाहिली तों तो ब्रह्मस्वरूपीं जाऊन मिळाला असें दिसलें. तेव्हां त्याचा उपाय हरला. कारण बीजावांचून वृक्ष कसा होईल ? मग मच्छिंद्रनाथ गांवांतुन परत जाऊं लागला. परंतु गोरक्षनाथाचें मन इतके कळवळलें होतें कीं, लोकांस त्या दुःखांत ठेवून त्यास परत जाववेना. तरी तो तसाच मच्छिंद्रनाथाबरोबर गेला. गांवाबाहेर एक शिवालय होतें त्यांत ते दोघे जाऊन बसले. तेथून जवळच राजाच्या प्रेतास संस्कार करण्यासाठीं नेऊन ठेवलें होतें. प्रेतासमागमें पुष्कळ मंडळीं होती. त्याचें तें दुःख गोरक्षनाथाच्यानें पाहवेना. व राजाचें प्रेत उठविण्यासाठीं त्यानें मच्छिंद्रनाथास सांगुन पाहिलें. पण मच्छिंद्रनाथानें त्यास खुणेनें उगाच बसावयास सांगितलें. परंतु गोरक्षनाथास निमूटपणें बसवेना. तो म्हणाला, जर तुम्ही ह्यास उठवीत नसाल, तर मी ह्यास उठवून सर्वांच्या दुःखाचा परिहार करतों तें ऐकून राजास उठविण्याचें तुझें सामर्थ्य नाहीं, असें मच्छिंद्रनाथ म्हणाले. तेव्हां गोरक्षनाथा म्हणाला, राजास उठवून सर्वास सुखी करण्याचा मी निश्चय केला आहे. जर ही गोष्ट मजपासुन घडली नाहीं, तर अग्निकाष्ठें भक्षण करून स्वतःचा घात करून घेईन आणि जर याप्रमाणें मी न करीन तर कोटि वर्षेपर्यंत रवरव नरक भोगीन. हें ऐकून मच्छिंद्रनाथानें त्यास सांगितलें कीं. तूं अविचारानें पण केलास; पण राजा ब्रह्मास्वरूपीं जाऊन मिळाला आहे. मग गोरक्षनाथानें अंतदृष्टीनें पाहिलें असतां ती गोष्ट खरी दिसली. तेव्हां त्याची फार निराशा झाली. नंतर गोरक्षनाथानें प्रतिज्ञा शेवटास नेण्यासाठीं काष्ठें गोळा केली. हा अग्नींत उडी टाकून प्राण दिल्याशिवाय राहणार नाही, अशी मच्छिंद्रनाथाची पूर्ण खात्री होती. करण पूर्वी एकदां त्यानें एका ब्रह्माणाचे स्त्रीस वड्याकरितां डोळा काढून दिला होता. हा अनुभव मच्छिंद्रनाथास आलेला असल्यानें त्यानें गोरक्षनाथास जवळ बोलावून म्हटले कीं, लोकांच्या कल्याणाकरितां तूं आपल्या जिवावर उदार झाला आहेस; म्हणून आतां मी तुला एक युक्ति सांगतों, तसा वाग. म्हणजे तुझ्या मनाप्रमाणें गोष्ट घडून येऊन राजा जिवंत होईल व लोकांचें दुःख निवारण होईल. मी स्वतः राजाच्या देहांत प्रवेश करितो; परंतु तूं माझें हें शरीर बारा वर्षेपर्यंत जतन करून ठेव. बारा वर्षानंतर मी पुनः माझ्या देहांत प्रवेश करीन. मग आपल्याकडून होईल तितकें आपण जगाचें कल्याण करूं या. त्याच्या युक्तीस गोरक्षनाथ अनुकूल झाला. मग मच्छिंद्रनाथानें आपलें शरीर सोडून राजाच्या मृत शरीरांत संचार केला. त्यामुळें राजा लागलाच स्मशानांत उठून बसला. तेव्हां सर्व लोकांस आनंद झाला. मग लोकांनीं राजाचा एक सुवर्णाचा पुतळा करून जाळला. स्मशानांतील क्रिया उरकून घेतली व सर्वजण आनंदानें घरोघर गेले. इकडे शिवालयमध्यें गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथाचें शरीर कोणत्या रीतीनें रक्षण करावें या विचारांत पडला होता. इतक्यांत एक गुरवीण तेथें आली. तिला पाहून, माझ्या मच्छिंद्रगुरुनें त्रिविक्रम राजाच्या देहांत प्रवेश केला आहे, इत्यादि सर्व वृत्तांत त्यानें तिला निवेदन केला आणि शेवटीं तो तिला म्हणाला कीं, बारा वर्षेपर्यंत माझ्या गुरुचें प्रेत मला सांभाळुन ठेविलें पाहिजे, तरी एखादें निवांत स्थळ मला दाखीव. ही गोष्ट गुप्त ठेवावयास पाहिजे, म्हणुन तू कोणापाशीं बोलूं नकोस. जरी ही गोष्ट उघडकीस येईल तर मोठाच अनर्थ घडून येईल. मग ती गुरवीण गोरक्षनाथाच्या म्हणण्याप्रमाणें वागण्यास कबूल झाली. त्या शिवालयांत एक भुयार होतें. तेथें तें प्रेत छपवून ठेवण्यास गुरविणीनें सांगुन ती जागा त्यास दाखविल्यावर गोरक्षनाथानें तें प्रेत तेथें नेऊन ठेविलें. तें स्थळ त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणास ठाऊक नव्हतें. त्या वेळीं गुरविणीनें गोरक्षनाथास विचारलें कीं बारा वर्षेंपवेतों हा देह जतन करून ठेवावयाचा असें तुम्हीं म्हणतां, परंतु इतके दिवस हें शरीर कसें टिकेल हें मला कळत नाहीं. हें ऐकून गोरक्षनाथानें तिला सांगितलें कीं, माझा गुरु मच्छिंद्रनाथ चिरंजीव आहे; त्याच्या शरीराचा नाश कदापि व्हावयाचा नाहीं. परंतु ही गोष्ट तुला आणि मलाच ठाऊक आहे. दुसऱ्या कोणाच्याहि कानीं जाऊं नये म्हणुन फार खबरदारी ठेव. इकडे जिवंत झालेला त्रिविक्रमराजा ( मच्छिंद्रनाथ ) राजावाड्यांत गेल्यानंतर मनांत कांहीं किंतु न आणतां सर्व कारभार पाहूं लागला. राणीबरोबर त्याची त्रिविक्रमाप्रमाणेंच भाषणें होऊं लागली. तो पूर्ण ज्ञानी असल्यानें राजाच्या शरीरांत प्रवेश केल्यानंतर माहितगाराप्रमाणें सर्व व्यवस्था चालवूं लागला व राज्यप्रकरणीं सर्व कारभार सुरळीत चालूं झाला. पुढें एके दिवशीं, त्रिविक्रमराजाच्या स्वरूपांत मच्छिंद्र्नाथ त्या देवालयांत गेला व गोरक्षनाथास तेथें पाहून विचारपूस करूं लागला. गोरक्षनाथानें त्यास उत्तरें देऊन आपण कोण, कोठले ह्याचा खुलासा केला. तसेंच, मच्छिंद्रनाथाचें शरीर सांभाळून ठेविलें होतें ती जागाहि नेऊन दाखविली व बर्बर भाषेंत सर्व हकीकत सांगितली. मग राजा क्षणभर तेथें बसून आपल्या राजवाड्यांत गेला. याप्रमाणें राजा नित्य शिवालयांत जात असे व आपलें शरीर ठेवलेली जागा पाहात असे. तो कांहीं वेळ शिवाजवळ व कांहीं वेळ गोरक्षाजवळ बसून प्रेमपूर्वक गोष्टी करीत असे. ह्याप्रमाणें तीन महिने एकसारखा क्रम चालला असतां एके दिवशीं, गोरक्षनाथानें राजास सांगितलें कीं, आतं आम्ही तीर्थयात्रेस जातों. आपण योगासाधन करून स्वस्थ असावें व स्वहित साधून स्वशरीराचें संरक्षण करावें. तें गोरक्षनाथाचें सर्व म्हणणें मच्छिंद्रनाथानें मान्य करून त्यास तीर्थयात्रा करावयास जाण्याची आज्ञा दिली व गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला. पुढें सहा महिन्यांनीं रेवती राणी गरोदर राहिली. नऊ महिने पूर्ण होतांच ती प्रसुत होऊन पुत्ररत्ना झालें. बारावे दिवशीं मुलास पाळण्यांत घालून 'धर्मनाथ' असें नांव ठेविलें. त्या मुलाचें वय पांच वर्षाचें झाल्यावर एके दिवशीं राजा व राणी शिवालयांत पूजा करावयास गेलीं. तेथें राणीनें शिवाजी पूजा केल्यावर प्रार्थना केली कीं, हें शंकरा ! हे उमापते ! राजा त्रिविक्रम याच्याआधीं मला मरण दे. मी सुवाशीन असतां मरणें, हें उत्तम होईल. रेवती राणीनें केलेली प्रार्थना ऐकतांच तेथील गुरविणीस खदखदां हसूं आलें. तें पाहून राणीनें तिला विचारलें कीं, कांहींतरी आश्चर्य वाटल्याशिवाय तुला हसूं येत नाहीं, तरी तुला कोणतें नवल वाटलें तें तूं मनांत संशय न धरतां मला सांग. तेव्हां गुरवीण म्हणाली कीं, तुम्ही ती हकीकत विचारूं नये व मलाहि खरी हकीकत तुम्हांपाशीं बोलतां येणार नाहीं; कां कीं, कदाचित्‌ अनर्थहि घडून यावयाचा, म्हणुन मला भय वाटतें. आम्ही दुर्बळ असून तुम्ही सत्ताधीश आहांत आणि मी सांगेन ती हकीकत ऐकून तुम्हांस क्रोध आल्यास आमच्या जिवावर येऊन बेतायचें ! तें ऐकून, माझ्यापासून तुला कोणत्याहि प्रकारचें दुःख व जिवास कांहीं एक भीति होणार नाहीं, असें राणीनें तिला वचन दिलें. मग गुरविणीनें तिला मुळापासुन शेवटपर्यंत संपूर्ण वृत्तांत निवेदन केला. शेवटीं ती म्हणाली, त्रिविक्रमराजा मरण पावला असून त्याच्या देहांत मच्छिंद्रनाथानें संचार केला आहे; ह्या कारणानें तूं विधवा असतां सुवाशीव म्हणवितेस म्हणुन मला हसूं आलें; परंतु तुं आतां इतकेंच कर कीं, ही गोष्ट कोणाजवळ बोलूं नको. नंतर, राणीच्या आग्रहावरून गुरविणीनें तिला मच्छिंद्रनाथाचें शरीर भुयारांत होतें तें नेऊन दाखविलें. तें पाहून रेवती उदास होऊन राजवाड्यांत गेली; तिला चैन पडेना. नाना प्रकारच्या कल्पना तिच्या मनांत येऊं लागल्या. ती म्हणाली, दुदैवानें पतिव्रतापणास मी अंतरलें हें खचित.योगायोग होता त्याप्रमाणें घडून आलें, पण पुढें येणाऱ्या परिस्थितीचा आतांपासून बंदोबस्त केला पाहिजे. स्वस्थ बसून राहतां कामा नये. वास्तविक पाहूं गेले असतां, मच्छिंद्रनाथाचाच हा हल्लींचा संसार आहे. परंतु बारा वर्षांनी पुन्हां येणारें संकट टाळलें पाहिजे. मच्छिंद्रनाथ परकायाप्रवेश पूर्णपणें जाणत असल्यामुळें तो भुयारांत ठेविलेल्या आपल्या शरीरांत प्रवेश करील. पण आपला मुलगा त्या वेळीं लहान राहून मीहि निराश्रित होऊन उघड्यावर पडेन. तरी मच्छिंद्रनाथाचा देह छिन्नभिन्न करून टाकला, हाच एक उत्कृष्ट उपाय दिसतो. देह नसल्यावर मच्छिंद्रनाथ कोठें जाणार ? अशी कल्पना मनांत आणुन त्याच्या देहाचा नाश करून टाकण्याचा तिनें पक्का निश्चय केला. नंतर कोणास न सांगतां एकां दासीस बरोबर घेऊन ती मध्यरात्रीस भुयारांत दरवाजा उघडून शस्त्रानें मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे करून बाहेर नेऊन टाकून दिले आणि पूर्वीप्रमाणें गुहेचें द्वार लावून ती राजवाड्यांत गेली. इतकें कृत्य झाल्यावर पार्वती जागृत झाली. तिनें शंकरास जागें केलें व रेवती राणीनें मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे करून टाकल्याचें त्यास सांगितलें. तेव्हां आज आपला प्राण गेला असे शंकरास वाटलें. मग त्यानें याक्षिणींस बोलावून मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासास पाठवून देण्याबद्दल पार्वतीस सांगितलें. तिनें बोलावितांच कोटि चामुंडा येऊन दाखल झाल्या. त्यांस शरीराचे तुकडे वेंचून नीट जतन करून ठेवण्याची व वीरभद्राच्या स्वाधीन करण्याची पार्वतीनें आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणें शरीराचे तुकडे वेंचून चामुंडा कैलासास गेल्या व ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करून त्यास सर्व वृत्तांत समजाविला. शेवटीं त्या वीरभद्रास म्हणाल्या कीं, आमचा व तुमचा शत्रु मच्छिंद्रनाथ हा मरण पावला आहे. त्यानें आम्हांस नग्न करून आमची फारच फजिती केली होती. तसेंच अष्टभैरवांची दुर्दशा केली, तुमचीहि तीच दशा केली, मारुतीचाहि तोच परिणाम; सर्व देवांना भारी असा प्रबळ शत्रु अनायासें तावडीनें सांपडला आहे. तरी ह्याचें शरीर नीट जतन करून ठेवावें. ह्या मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ महान् प्रतापी आहे, तो हें शरीर घेऊन जाण्याकरितां येईल; यास्तव फर सावध राहावें. तें ऐकून वीरभद्रानें चौऱ्यांयशीं कोटि बहात्तर लक्ष शिवगण रक्षणासाठी बसविले व कोटि यक्षिणी, चामुंडा, डंखिणी व शंखिणी यांचा खडा पहारा ठेविला. इकडे त्रिविक्रमराजा ( मच्छिंद्रनाथ ) नित्य शिवालयांत गेल्यावर भुयाराकडे जाऊन पाही, पण खूण जशीच्या तशीच असल्यामुळें हा घडलेला प्रकार त्याच्या समजण्यांत आला नाही. त्याची बारा वर्षांची मुदत भरली. गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला होता तोहि मुदत पुरी झाली म्हणून सावध झाला. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ******************************************* अध्याय ३३ माणिक शेतकऱ्याची भेट; त्याची परीक्षा, चौरंगीनाथास बरोबर घेऊन मच्छिंद्रनाथाकरितां वीरभद्राबरोबर युद्ध... गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला असतां मागें रेवती राणीनें मच्छिंद्रनाथाच्या कलेवराचा नाश केला व पार्वतीनें तें यक्षिणीकडून जतन करून ठेवण्यासाठी कैलासास वीरभद्राच्या ताब्यांत दिलें, वगैरे झालेला प्रकार गोरक्षनाथास ठाऊक नव्हता. गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या तीरीं भामानगर आहे, त्याच्या जवळच्या अरण्यांत आला. तेथें त्यास क्षुधेनें फारच व्याकुळ केलें. उदकसुद्धां कोठें मिळेना. परंतु तो तसाच फिरत असतां माणिक या नावांचा एक दहा वर्षें वयाचा शेतकऱ्याचा मुलगा, शेतांत काम करीत असतांना त्यानें पाहिला. ऐन दोनप्रहरीं तो भोजनास बसणार, इतक्यांत गोरक्षनाथानें तेथें जाऊन 'आदेश' केला. तो शब्द ऐकून माणिक तसाच उठला व गोरक्षनाथाच्या पायां पडला आणि तुम्ही कोण, कोठें जातां, येथें आडमार्गांत कां आलेत, वगैरे विचारपूस मोठ्या आदरानें केली. तेव्हां गोरक्षनाथानें सांगितलें कीं, मी जति आहे; मला आतां तहान व भूक फार लागली असून जर कांहीं अन्न पाण्याची सोय होईल तर पाहा. हें ऐकतांच माणिक म्हणाला, महाराज! तयारी आहे भोजनास बसावें. असें म्हणून त्यानें त्यास जेवावयास वाढलें, पाणी पाजिलें व त्याची चांगली व्यवस्था ठेंविली. गोरक्षनाथ जेवून तृप्त झाल्यावर त्यास समाधान वाटलें. मग गोरक्षनाथानें प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्यास, तुझे नाव काय म्हणुन विचारलें. तेव्हां तो म्हणाला, आतां आपलें तर कार्य झालें ना ? आतां माझें नांव वगैरे विचारण्यांत काय अर्थ आहे? कार्य साधून घेण्यासाठी प्रथम सर्व विचारण्यांत करावयाची जरूर असते; पण आतां ही चौकशी निरुपयोगी ! आतां आपण हळूहळू आपली मजल काढा ! यावर गोरक्षनाथानें उत्तर दिलें कीं, तें म्हणतोस ती गोष्ट खरी; पण आज ऐनवेळीं तुं मला जेवावयास घातलेंस तेणेंकरून मी प्रसन्न झालों आहे; यास्तव तुझ्या मनांत कांही इच्छा असेल ती तूं माग; मी देतों. तेव्हां माणिक म्हणाला, महाराज आपण घरोघर अन्नासाठीं भिक्षा मागत फिरतां, असें असतां तुम्हांस माझ कळवळा आला असला तरी तुमच्याजवळ मला देण्याजोगें काय आहे ? हें ऐकून गोरक्षनाथानें सांगितल की, तूं जें मागशील तें मी देतों. तें माणिकास खरें न वाटून तो म्हणाला, तुम्ही भिक्षुक, मला काय देणार ? तुम्हांलाच कांहीं मागावयाचें असेल तर मागा, मी देतों. तें घेऊन आपण आपला रस्ता सुधारावा. याप्रमाणें भाषण ऐकुन गोरक्षनाथानें विचार केला कीं, शेतकरी लोक अरण्यांत राहत असल्यानें त्यांना फारसें ज्ञान नसतें; यास्तव आपण याचें कांहीं तरी हित केलें पाहिजे. मग नाथ त्यास म्हणाला, अरे, मी सांगेन ती वस्तु देईन असें तुं म्हणतोस ! पण वेळ आली म्हणजे मागें सरशील. हें ऐकून माणिक वर्दळीवर येऊन म्हणाला, अरे, जो जीवावरहि उदार, तो पाहिजे तें देण्यास मागें पुढें पाहिल काय ? तुला वाटेल तें तूं माग. पाहा मी तुला देतों कीं नाहीं तें असें बरेंच भाषण झाल्यावर गोरक्षनाथानेंहि त्याची परीक्षा पहाण्याकरितां त्यास सांगितलें कीं, जी जी गोष्ट तुला करावीशी वाटेल किंवा ज्यावर तुझी इच्छा असेल, अशाचा तुं तिरस्कार करावास, हेंच माझें तुझ्यापाशीं मागणें आहे. तें गोरक्षनाथाचें मागणें त्यानें आनंदानें कबूल केलें व नाथ तेथून पुढें निघून गेला. नंतर माणिक आपलें आउतादि सामानाचें ओझे डोक्यावर घेऊन शेतांतून घरीं निघाला व प्रथम जेवणाकडे त्याचें लक्ष गुंतलें इतक्यांत गोरक्षनाथ वचन दिल्याची त्यास आठवण झाली. मनांत येईल तें न करणें हाच वचन देण्यांत मुद्दा होता. मग त्याच्या मनांत आलें कीं, मन घरीं जाऊं इच्छीत आहे, त्याअर्थी वचनास गुंतल्याअन्वयें आतां घरीं जातां येत नाहीं. म्हणून तो तेथेंच उभा राहून झोंप घेऊं लागला. डोक्यावर बोचकें तसेंच होतें. मग अंग हलवावयास मन इच्छीत होतें, पण त्यानें अंग हालूं दिलें नाहीं. त्या वचनाचा परिणाम असा झाला कीं, वायुभक्षणा वांचून त्यास दुसरा मार्गच राहिला नाहीं. यामुळें कांहीं दिवसांनीं त्याचें शरीर कृश झालें. रक्त आटून गेलें; तिळभरसुद्धां मांस राहिलें नाहीं त्वचा व अस्थि एक होऊन गेल्या; असें झालें तरी तो रामानामस्मरण करीत एंका जागीं लाकडाप्रमाणें उभा राहिला. इकडे गोरक्षनाथ फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला. तेथें बदरिकेदाराच्या पायां पडून चौरंगीनाथाची काय स्थिति झाली आहे. ती पाहावयास गेला. त्यानें गुहेच्या दाराची शिळा काढून आंत पाहिलें तों चौरंगीचें सर्वांग वारुळानें वेष्टून टाकिलेलें, मुखानें रामानामाचा ध्वनि चाललेला, अशी त्याची अवस्था दिसली. ती पाहून गोरक्षनाथ हळहळला. त्यानें त्याच्या अंगावरचें सर्व वारूळ काढून टाकले आणि त्याच्या शरीराकडे पाहिले. तपःसामर्थ्यानें त्यास हातपाय फुटलेले दिसले. मग गोरक्षनाथ आलों आहें, असें बोलून त्यानें चौरंगीस सावध केल व बाहेर घेऊन आल्यावर त्याच्याकडे कृपादृष्टीनें पाहतांच त्यास चांगली शक्ती आली. तेव्हां चौरंगीनाथ गोरक्षनाथाच्या पायां पडला व मी आज सनाथ झालों, असें त्यानें बोलून दाखविलें. मग गोरक्षनाथानें खाण्यापिण्याची कशी व्यवस्था झाली म्हणून विचारपूस केली. तेव्हां त्यानें उत्तर दिलें कीं , मला माहीत नाही. तें चामुंडा सांगेल. मग तिला विचारल्यावर ती म्हणाली, आम्ही रोज फळें आणून देत होतों, परंतु चौरंगीचें लक्ष वर शिळेकडे असल्यामुळें त्यानें तीं भक्षण केलीं नाहींत. इतकें बोलून चांमुडेनें फळांचे पर्वताप्रमाणें झालेले ढीग दाखविले. ते पाहून गोरक्षनाथास विस्मय वाटला. त्याने चोरंगीच्या तपाची फारच वाखाणणी केली व आपला वरदहस्त त्याच्या मस्तकीं ठेविला. मग तो त्यास घेऊन बदरिकेदाराच्या देवालयांत गेला. तेथें उमारमणास जागृत करून चौरंगीस भेटविलें. नंतर गोरक्षनाथानें सहा महिनें तेथें राहून चौरंगीनाथाकडून विद्याभ्यास करविला व शस्त्रास्त्रविद्येंत त्यास आशीर्वाद देवविले. नंतर बदरिकेदारेश्वरास वंदन करून गोरक्षनाथ चौरंगीनाथास घेऊन निघाला आणि वैदर्भदेशांत उतरून कौंडण्यपुरास गेला. तेथें चौरंगीनाथास आपल्या आईबापांस भेटून येण्यास सांगितलें , त्यांनीं तुझे हातपाय तोडिले. म्हणुन तूं आपला प्रताप त्या दोघांस दाखीव असेंहि गोरक्षनाथानें सुचविलें. त्या आज्ञेप्रमाणें चौरंगीनाथानें वातानें भस्म मंत्रुन तें राजाच्या बागेकडे फुंकिलें. तें वातास्त्र सुटतांच बागेंत जे सोळाशें माळी रखवालीस होते, ते सर्व वादळ सुटल्यामुळें आकाशांत उडून गेले. मग वातास्त्र काढून घेतांच ते सर्वजण खालीं उतरले. त्यांतुन कित्येक मूर्च्छना येऊन पडले; कित्येक पळून गेले. कित्येकांनीं जाऊन हा बागेंत झालेला प्रकार राजाच्या कानांवर घातला. तेव्हां सर्व विस्मयांत पडले. मग हें कृत्य कोणाचं आहे, ह्याचा शोध करण्याकरितीं राजानें दूतांस पाठविलें. ते दूत शोधाकरितां फिरत असतां त्यांनीं पाणवठ्यावर या उभय नाथांस बसलेले पाहून राजास जाऊन सांगितलें कीं, महाराज ! पाणवठ्यांशीं दोन कानफडे गोसावी दिसत आहेत ! ते महातेजस्वी असून त्यांच्याजवळ कांहीं तरी जादू असावी असें दिसतें. दूतांचें भाषण ऐकून राजनें विचार केला कीं, हे गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ असतील, त्यांस आपण शरण जावें; नाहीं तर हें नगर पालथें घालून ते सर्वाचे प्राण संकटांत पाडतील. मग तो आपल्या लव्याजम्यानिशीं त्यास सामोरा गेला. तेव्हां आपला प्रताप दाखविण्याची गोरक्षनाथानें चौरंगीनाथास आज्ञा केली. त्या अन्वयें त्यानें राजाबरोबर आलेल्या सैन्यावर वातास्त्राची योजना केली. त्याक्षणींच राजासहवर्तमान सर्व लोक हत्ती, घोडे, रथासुद्धां आकाशांत उडून गेले. त्यामुळें सर्व भयभीत होऊन त्यांची प्रार्थना करूं लागले मग गोरक्षनाथाच्या आज्ञेवरून चौरंगीनाथानें पर्वतास्त्र सोडून वातास्त्र परत घेतलें. तेव्हां सर्वजण पर्वतास्त्राच्या आश्रयानें हळूंहळूं खाली उतरले. मग गोरक्षच्या आज्ञेनें, चौरंगी आपला पिता जो शशांगार राजा, त्याच्या पायां पडला व आपण पुत्र असल्याची त्यानें ओळख दिली. ओळख पटतांच राजानें त्यास पोटाशी धरिलें. नंतर राजा गोरक्षनाथाच्या पायां पडला. मग त्या उभयतांचीं चौरंगीच्या प्रतापाविषयीं भाषणें झाली. इतक्यांत चौरंगीनें वज्रांस्त्र सोडून पर्वतास्त्राचा मोड केला. थोड्या वेळानें राजानें घरीं येण्याबद्दल गोरक्षनाथास अति आग्रह केला; पण चौरंगीनें राजास सांगितलें कीं, तुझ्या घरीं आम्हीं येणार नाहीं, कारण सावत्र आईच्या कपटी बोलण्यावर विश्वास ठेवुन तूं माझे हातपाय तोडिलेस. असें बोलून मुळारंभापासुन खरा घडलेला वृत्तांत त्यानें सांगितला. त्यासमयीं आपलीं भुजावंती स्त्री जारिणी आहे असें समजून राजास तिचा अत्यंत राग आला. त्यानें राणीस मारीत झोडीत तेथें घेऊन येण्याची सेवकांस आज्ञा केली, परंतु तसें करण्यास चौरंगीनें किरोध केला. घरींच तिला शिक्षा करावी असें त्याचें मत पडलें. मग त्या दोघांस पालखीत बसवुन राजा आपल्या वाड्यांत घेऊन गेला. तेथें राजानें राणीचा अपराध तिच्या पदरांत घालून तिला शिक्षा केली व घरांतुन घालवून दिलें. नंतर गोरक्षनाथानें राजाचे शांतवन करून दुसरी स्त्री करण्याची आज्ञा केली व आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून वंश वाढेल असा आशीर्वाद दिला. तेथें गोरक्षनाथ एक महिना राहून चौरंगीनाथास घेऊन तेथून पुढें गेला. कौंडण्यापूर सोडल्यावर ते फिरत फिरत प्रयागास गेले तेथें स्नान करून शिवालयात देवाचें दर्शन घेतल्यानंतर पूर्वीच्या गुरविणीस बोलावून गोरक्षनाथानें तिला गुरुच्या देहाबद्दल विचारलें तेव्हां ती भयभीत होऊन थरथरां कापूं लागली. अडखळत बोलूं लागली. ती त्याच्या पायां पडली व म्हणाली, महाराज,रेवती राणीनें मला धमकी देऊन विचारल्यावरून मी खरी गोष्ट तिच्यापाशीं सांगितली. गुरुच्या देहाची कय व्यवस्था झाली आहे ती प्रत्यक्ष जाऊन पाहावी. असा जेव्हां तिच्या बोलण्याचा आशय दिसला, तेव्हां गोरक्षाच्या मनांत संशय उत्पन्न झाला. तो लागलाच भुयाराकडे गेला व दार उघडून पाहातो तो आंत मच्छिंद्रनाथाचें प्रेत दिसेना. तेव्हा तो शोक करूं लागला. तें पाहून गुरविणीनें त्यास सांगितलें कीं, तुम्हीं अंमळ स्वस्थ बसा; मी राणीस भेटून तिनें प्रेताची काय व्यवस्था केली आहे, तें विचारून येतें. असे सांगून ती लागलीच तेथून निघाली. नंतर तिनें राजवाड्यांत जाऊन राणीची भेट घेतली आणि राणीस म्हटलें, मच्छिंद्रनाथाच्या शरीराबद्दल मी तुमच्यापाशीं गोष्ट काढून बारा वर्षाची मुदत सांगितली होती, ती पुरी झाली म्हणुन मला आज त्या गोष्टीचें स्मरण झाल्यावरून आपल्याकडे आलें आहें, तें तिचें भाषण ऐकून राणी तिला एकीकडे घेऊन गेली व म्हणाली राजा त्रिविक्रमाच्या देहांत मच्छिंद्रनाथानें प्रवेश केला व आपला राजा त्रिविक्रमाच्या देहांत मच्छिंद्रनाथानें प्रवेश केला व आपला देह शिष्याकडून शिवालयाच्या भुयारांत लपवून ठेविला वगैरे हकीकत तुं मला सांगितलीस. त्यानंतर थोड्याच दिवसांत तुझ्या नकळत मीं त्याच्या शरीराचे तुकडे करून ते रानांत टाकून दिले. या गोष्टीस आज पुष्कळ दिवस झाले. ते तुकडे किडीमुंग्यांनीं खाऊन सुद्धां टाकले असतील. अशा रीतीनें मी चिंतेचें बीज समूळ खणुन टाकिलें. आतां तूं निर्धास्त राहा. राणीचें हे भाषण ऐकून ती फारच घाबरली. परंतु नशिबावर हवाला ठेवुन व आतां पुढें काय भयंकर परिणाम होणार अशी भीति मनांत आणुन तिनें परत येऊन गोरक्षनाथास ती हकीकत सांगितली. तेव्हां त्यास अत्यंत राग आला आणि राणीस शिळा करण्याचें त्याच्या मनांत आलें. परंतु आतां ती मच्छिंद्रनाथाची स्त्री असल्यामुळें आपली माता झाली. असा विचार येऊन तिला शिक्षा करण्याचा विचार त्यानें सोडून देला. त्यानें मनांत विचार केला कीं, गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असले तरी ते नाश पावावयाचे नाहींत. कोठें तरी पडलेले असतील, ते शोधून काढावे. नंतर त्या उद्योगास लागल्याचें त्यानें ठरविलें आणि तो चौरंगीस म्हणाला, मच्छिंद्रनाथाच्या देहाचा शोध करण्याकरितां मी माझा देह येथें ठेवून सूक्ष्मरूपानें जातों, माझ्या शरिराचें तूं नीट संरक्षण कर. येथील राणी रेवती हिनें मच्छिंद्राच्या देहाचा जसा नाश केला तसा ती माझ्याहि शरीराचा नाश करील. यास्तव फार सावधगिरी ठेव. असें सांगून गोरक्षनाथ शरीरांतुन प्राण काढून जिकडे तिकडे पाहूं लागला. त्यानें सुक्ष्म रूपानें सर्व पृथ्वी, पाताळ, स्वर्ग आदिकरून सर्व ठिकाणी धूंडून पाहिलें; पण पत्ता लागेना. शेवटी तपास करीत करीत तो कैलासास गेला व शिवगणांस पाहू लागल. तेथें मच्छिंद्रनाथाच्या अस्थि, त्वचा, मांस वगैरे त्यास दिसुन आलें. त्या वेळेस त्या शिवगणांस वीरभद्र सांगत होता कीं, बारा वर्षांची मुदत पुरी झाली; आतां मच्छिंद्रनाथाच्या शरीराचें रक्षण करण्यास फारच सावध राहा. कारण, त्याचा शिष्य गोरक्षनाथ हा शोध करण्यासाठीं केव्हां कोणत्या रूपानें येईल याचा नेम नाहीं.हे वीरभद्राचे शब्द गोरक्षनाथाच्या कानीं पडतांच तो तेथून निघुन पुनः परत येऊन आपल्या देहांत शिरला. मग गोरक्षनाथ व चौरंगीनाथ एक विचार करून भस्म व झोळी घेऊन युद्धास सिद्ध झाले. गोरक्षनाथानें सूर्यावर प्रथम पर्वतास्त्राची योजना केली, तेणेंकरून त्याचा रथ चालेना. सूर्यानें वज्रास्त्रानें पर्वतास्त्राचा मोड केला व मला अडथळा करण्यासारखें पर्वतास्त्र सोडणारा कोण, ह्याचा सूर्यानें मनांत शोध केला, तो गोरक्षनाथाजवळ आला. त्याचा ताप लागूं नये म्हणुन गोरक्षनाथानें चंद्रास्त्राची योजना करून कोटी चंद्र निर्माण केले; तेणेंकरून थंडावा येऊन सूर्याचा ताप लागेनासा झाला. नंतर गोरक्ष व चौरंगी हे दोघेहि सूर्याच्या पायां पडले. ह्या वेळेस मला हैराण करण्याचें कारण कोणतें, म्हणुन सूर्यानें विचारल्यावर गोरक्षनाथानें सांगितलें कीं, मच्छिद्रनाथाचा देह शिवगणांनी कैलासास नेला आहे. यास्तव आपण मध्यस्थी करून तो आमच्या हातांत येईल असें करावें. म्हणजे आपले आम्हांवर मोठें उपकार होतील. गोरक्षनाथाचें तें भाषण ऐकून शिष्टाई करण्याचें कबूल करून सूर्य कैलासास गेला. त्यास पाहतांच शिवगणांनीं त्याच्या पायां पडून येण्याचें कारण विचारिल्यावर गोरक्षनाथकडून मध्यस्थीचें काम घेऊन आलों आहें. असें सांगून सूर्यानें त्यांस मच्छिंद्रनाथाचें शरीर परत द्यावें म्हणुन फारच सुरस बोध केला व गोरक्षनाथाचा प्रतापहि वाखाणिला. परंतु सूर्याच्या बोलण्याचें वीरभद्राजवळ वजन पडलें नाहीं. त्यानें उत्तर दिलें कीं, मच्छिंद्रनाथानें आम्हांस अत्यंत त्रास देऊन दुःसह दुःखे भोगावयास लावून आमचे प्राण सुद्धा धोक्यात घातले; असा शत्रु अनायासें आमच्या तावडीत आलेला असल्यानें प्राण गेले तरी आम्ही त्यास सोडून देणार नाहीं, जर गोरक्ष युद्ध करील तर त्याचीहि मच्छिंद्राप्रमाणें अवस्था करुं. असें वीरभद्राचें वीरश्रीचें भाषण ऐकून सूर्यानें त्यास सांगितलें कीं, एवढे पाणी जर तुमच्यामध्यें होतें तर मच्छिंद्रनाथानें मागें तुमच्यी दुर्दशा करून प्राणावर आणुन बेतविलें, तेव्हां तुमचा प्रताप कोणीकडे लपून राहिला होता ? आतां तो सहज तुमच्या हातात आला म्हणून तुम्हीं इतकी मिजाज करित आहां. पण मच्छिंद्र आणि गोरक्ष हे दोघे सारखे बलवान आहेत. शिवाय त्या वेळेस मच्छिंद्रनाथ एकटाच होता. आतां गोरक्षानाथाच्या साह्यास चौरंगीनाथ आला आहे, यास्तव तुझ्या या अविचारी व दांडगाईच्या उत्तरेनें चांगला परिणाम घडून येणार नाहीं. परंतु सूर्यानें सांगितलेलें हें सर्व भाषण फुकट गेलें व कांहीं झालें तरी मच्छिंद्राचा देह परत देणार नाहीं, असें वीरभद्रादिकांनीं स्पष्ट सांगितलें. मग सूर्याने त्यास सांगितलें कीं , तुम्हीं आतां इतकें करा कीं, हें युद्ध कैलासास न होतां पृथ्वीवर होऊं द्या. कैलासास झालें तर कैलासाचा चुराडा होऊन जाईल; असें सांगुन सूर्य तेथून निघाला. सूर्य निघून गेल्यावर युद्धाकरितां तुम्हीं पुढें चला मी मागाहून लवकर येतों असा वीरभद्राचा शिवगणांस हुकूम झाला. त्याप्रमणें अष्टभैरव, गुण आदिकरून सर्व युद्धास येऊन थडकले. बहात्तर कोटि चौऱ्याऐंशीं लक्ष गण शस्त्रास्त्रांसह युद्धांस आले असे पाहून गोरक्ष व चौरंगी सावध झाले. दोन्हीं बाजु जयाची इच्छा धरून लढू लागल्या. शेवटीं चौरंगीच्या मोहिनी व वातास्त्रांनी वीरभद्राच्या दळांतील लोकांचा मोड होऊन ते भ्रमिष्टासारखे होऊन देहभान विसरले. इतक्यांत वीरभद्र चामुंडांसह येऊन दाखल झाला. आपल्या दळाचा पराभव झाला असें पाहून वीरभद्र गोरक्षनाथावर चवताळला. त्यांनी एकमेकांच्या नाशास उद्युक्त होऊन शस्त्रास्त्रांचा एकसारखा मारा चालूं केला. परंतु गोरक्षाच्या शक्तीमुळें वीर भद्राचीं अनेक शस्त्रें व अस्त्रें दुर्बल झाली. शेवटीं गोरक्षनाथानें संजीवनीं अस्त्राची योजाना करून सकल दानव उठविले. त्यात त्रिपुर, मधु महिषासुर , जलंधर काळयवन, अद्यासुर , बकासुर, हिरण्यापक्ष, हिरण्याकशिपु , मुचकुंद, वक्रंदत, रावण, कुंभकर्ण इत्यादि अनेक महापराक्रमी राक्षस युद्धासाठीं येऊन पोचलें. त्यावेळीं तेहतीस कोटि देवांनीं रणक्षेत्र सोडून आपपली विमानें पळविली व त्यांना मोठी चिंत्ता उप्तन्न झाली. त्यांनीं वैकुंठास जाऊन हा सर्व प्रकार श्रीविष्णुच्या कानांवर घातला. तेव्हां अतां पुनः अवतार घ्यावा लागेल, असें वाटून त्यालाहि काळजी पडली, मग विष्णुनें शंकरास बोलावून आणुन सर्व वृत्तांत त्यास सांगितला व वीरभद्राच्या वेडेपणानें या पल्ल्यास गोष्ट आली, असें सांगितलें. मग तंटा मिटवून विघ्न टाळण्यासाठीं ते गोरक्षनाथाकडे गेले व त्यास त्यांनी पुष्कळ प्रकारांनी समजावून सांगितलें. परंतु गुरुचें शरीर माझ्या स्वाधीन करा म्हणजे तंटा मिटेल, असें गोरक्षनाथानें स्पष्ट उत्तर दिलें, मग शंकरानें चामुंडास पाठवुण मच्छिंद्रनाथाचा देह आणविला. व गोरक्षनाथाच्या स्वाधीन केला आणि राक्षसांस अदृश्य करावयास सांगितले. तेव्हा गोरक्ष म्हणाला, अस्त्राच्या योगानें राक्षस उप्तन्न न होतां संजीवनीं मंत्रप्रयोग केल्यामुळें राक्षस उत्पन्न झालें आहेत. यास्तव पुनः अवतार घेऊन त्यास मारुन टाका किंवा वीरभद्राची आशा सोडा. दोहोंतुन जसें मला सांगाल तसें मी करितो. हें ऐकून शकरानें सांगितलें कीं, मधुदैत्य माजला त्या वेळेस आम्ही रानोमाळ पळुन गेलों, शेवटीं एकादशीस अवतार घेऊन त्याचा नाश करावा लागला. अशीं संकटें अनेक वेळां सोसावीं लागली यास्तव आतां विलंब न लावितां लौकरच राक्षसांचा बंदोबस्त कर; आम्हीं वीरभद्राची आशा सोडून दिली असें शिव व विष्णु त्यास म्हणूं लागले. त्या वेळीं प्रतापवान वीरभद्र एकटाच त्या राक्षसमंडळींशीं लढत होता. तें पाहून गोरक्षनाथानें वाताकर्षण अस्त्राची योजना केली आणि मंत्र म्हणुन भस्म फेंकतांच वीरभद्रासह सर्व राक्षस गतप्राण होऊन निश्चेष्ट जमिनीवर पडले. तेव्हां शंकर व विष्णु यांनीं गोरक्षनाथाची स्तुति केली. मग गोरक्षनाथानें अग्न्यस्त्र योजून निश्चेष्ट पडलेल्यांस जाळून टाकलें हा वाताकर्षण प्रयोग नाथपंथावांचून देवदानवांस ठाऊक नव्हता. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ******************************************* अध्याय ३४ वीरभद्रास सजीव केलें; मच्छिंद्रनाथानें त्रिविक्रम राजाचा देह सोडला; अडभंग कथा; रेवणनाथ जन्मकथा... युद्धामध्यें वीरभद्र जळल्यानंतर शंकर शोक करीत बसले. ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षांत येतांच त्याचें अंतःकरण द्रवून गेल. त्यानें विचार केला कीं, ज्या वेळेस गुरुनें मला बदरिकाश्रमास तपश्चर्येंस बसविलें, त्या वेळीं शंकरानें मजविषयीं विशेष काळजी बाळगिली होती व पुष्कळ श्रम घेतले होते. मातेसमान त्यांनीं माझा प्रतिपाळ केला. असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणानें शोक करित असलेला मी पाहावा हें मला शोभत नाहीं आणि हें अयोग्य कर्म मजकडून झालें, असा मनांत विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पायां पडला आणि म्हणाला. वीरभद्राचें तुम्हांस अतिशय दुःख झाले आहे, परंतु जर मला त्याच्या अस्थि आणुन द्याल तर मी वीरभद्रास उठवीन. संजीवनीमंत्राच्या योगानें मी त्यास तेथेंच उठविलें असतें, पण सर्व राक्षसांच्या मेळ्यांत तो जळला असल्यामुळें त्याच्याबरोबर पुन्हां राक्षस उठतील. मग वीरभद्राची हाडें मी ओळखून घेऊन येतों, असें सांगून शंकर समरभूमीवर गेले. जी हाडें शिवनामस्मरण करतील ती वीरभद्राचीं हांडें असें ओळखून गोरक्षनाथाजवळ आणिली. मग गोरक्षनाथानें संजीवनीमंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकतांच वीरभद्र उठून धनुष्यबानाची चौकशी करुं लागला व म्हणूं लागला कीं, आतां राक्षसांचा संहार करून शेवटीं गोरक्षनाथासहि यमपुरिस पाठवून देतो. तेव्हां शंकरानें त्यास म्हटलें, आतां व्यर्थ बोलूं नका. नंतर त्यास संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्याची व गोरक्षनाथाची मैत्री करून दिली. इतक्यांत वायुचक्रीं भ्रमत असलेले बहात्तर कोटी चौऱ्यांयशी लक्ष शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत कैलासास गेले. मग गोरक्षनाथाहि मच्छिंद्राचें शरीर घेऊन शिवालयांत आला. इकडे त्रिविक्रमराजा ( मच्छिंद्रनाथ ) राजविलासांत निमग्न झाला होता. एके दिवशीं तो नित्यनेमाप्रमाणें दर्शनाकरितां शिवालयांत गेला असतां गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचें तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसला. तेव्हां त्यास राजा प्रीतीनें भेटला. मग राजानें सर्व वृत्तांत विचारल्यावरुन गोरक्षनाथानें त्यास झालेला वृत्तांत निवेदन केला. तो ऐकून त्यास तळमळ लागली. त्यानें गोरक्षनाथास सांगितलें कीं, कांहीं दिवस असाच धीर धरुन राहा. धर्मनाथास राज्यावर बसवुन मग मी येतों. असें सांगुन तो राजवाड्यांत गेला. त्यानें लागलेंच या गोष्टींविषयीं प्रधानाचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला. त्या उत्सवसमयीं याचकांस विपुल धन देऊन संतुष्ट केलें. पुढें एक महिन्यांनंतर एके दिवशीं त्रिविक्रमराजाच्या शरीरांतुन निघून मच्छिंद्रनाथ शिवालयांत ठेवलेल्या आपल्या देहांत गेले. इकडे राजवाड्यांत राजास उठण्यास वेळ लागल्यानें राणी महलांत गेली व हालवून पाहते तों राजाचें शरीर प्रेतवत्‌ पडलेलें. मग तिनें मोठा आकांत मांडिला. इतक्यांत धर्मनाथ धांवून गेला व प्रधान आदिकरुन मंडळी जमली. ह्या बातमीनें नगरांत एकच हाहाःकार होऊन गेला. त्रिविक्रमराजा मरण पावला, हा वृत्तांत शिवालयमध्यें गोरक्षनाथ होता. त्यास लोकांकडुन समजला. तो ऐकून त्यानें संजीवनीप्रयोगानें भस्म मंत्रून अस्थी, मांस वगैरे जमवाजमव केली तोंच मच्छिंद्रनाथानें देहांत प्रवेश केला व उठून बसला. इकडे राजाचें प्रेत स्मशानांत नेऊन तेथें सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघर गेले. रेवती राणीनें मात्र मच्छिंद्रनाथाचा देवालयांतुन शोध आणविला होता. तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणानें अतिशय दुःख झालें. त्यास अन्न‌उदक गोड लागेना. त्यास आपला प्राणहि नकोसा झाला. तें पाहून रेवतीमातेनें त्यास एकीकडे नेऊन सांगितले कीं, तूं व्यर्थ का शोक करितोस ? बाळ ! तुझा पिता मच्छिंद्रनाथच होय. तो चिरंजीव आहे. तूं आतांच शिवालयांत जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये. मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा, म्हणुन धर्मनाथानें रेवती राणीस विचारल्यानंतर तिनें मच्छिंद्रनाथाच्या परकायाप्रवेशाची समग्र वार्ता त्यास निवेदन केली. ती ऐकून धर्मनाथ लवाजम्यानिशीं शिवालयांत गेला व मच्छिंद्रनाथाच्या पायां पडून त्यास पालखींत बसवून राजवाड्यांत घेऊन आला. तो एक वर्षभर तेथं होता. नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ, चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेस जावयास निघाले. त्यासमयीं धर्मनाथास परम दुःख झालें. तोहि त्यांच्यासमागमें तीर्थयात्रेस जावयास सिद्ध झाला. तेव्हां मच्छिंद्रनथानें त्याची समजुत केली कीं, मी बारा वर्षांनीं परत येईन; त्या वेळीं गोरक्षनाथाकडून तुला दिक्षा देववीन व मजसमागमें घेऊन जाईन. आतां तूं रेवतीची सेवा करून आनंदानें राज्यवैभवाचा उपभोग घे. अशा रीतीनें मच्छिंद्रनाथानें त्याची समजुत केल्यावर ते तिघे तेथून निघाले. ते त्रिवर्ग तीर्थयात्रा करीत करीत गोदातटीं धामानगरांत येऊन पोचलें. त्या ठिकाणीं गोरक्षनाथास माणिक शेतकऱ्याचें स्मरण झालें. त्यानें त्या मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर मच्छिंद्रनाथास कळविला. मग शेताची जागा लक्षांत आणुन तिघेजण माणिकाजवळ गेले. तेथ तो काष्ठासमान उभा असलेला त्यांनीं पाहिला. त्याच्या अंगावर तिळभरसुद्धां मांस नसुन हाडांचा सांगाडा मात्र उरला होता व तोंडानें सारखा राममंत्राचा जप चालला होता. त्याचें तें कडक तप पाहून गोरक्षनाथानें तोंडात बोट घातलें व 'मी म्हणतों तो हाच माणिक' असें त्यानें मच्छिंद्रनाथास सांगितलें. मग तिघेजण त्याच्याजवळ गेले व त्यांनीं त्यास तप पूर्ण करावयास सांगितलें तेव्हा त्यानें त्यांस उत्तर दिलें कीं, तुम्हाला ही पंचाईत कशाला पाहिजे ? तुम्ही आपलें येथुन चालू लागा. विनाकारण कां खोटी करतां ? त्यांनी त्यास जें जें विचारावें त्या त्या प्रत्येक प्रश्नाचा माणिक उलट जबाब देई. तें पाहून मी आतां ह्यास युक्तीनें ताळ्यावर आणतों , असे गोरक्षनाथानें म्हटलें. मग गोरक्षनाथ एकटाच तेथें राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखालीं बसले व गोरक्ष काय करितो हें पाहूं लागले. गोरक्षनाथानें माणिकाजवळ उभें राहून मोठ्यानें म्ह्टलें कीं, अहाहा ! असा तपस्वी मी अजूनपावेतों पाहिला नव्हता; अशाचा उपदेश घेऊन ह्यास गुरु करावा हेंच चांगलें. माझें दैव उदयास आलें म्हणुन समजावं, नंतर गोरक्ष त्यास बोलला; स्वामीं ! मी आपणांस गुरु करीत आहे; तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा. हें ऐकून माणिक त्यास म्हणाला. बेट्या, एवढा मोठा झालास तरी अजुन तुला अक्कल नाहीं. तु मला गुरु करुं पहातोस त्यापेक्षां तुंच कां माझा गुरु होईनास ! त्याचा उलटा जबाब येणार हें ओळखून गोरक्षनाथानें त्यास हा प्रश्न केला होता. त्याप्रमाणें उत्तर ऐकतांच गोरक्षनाथानें त्यास मंत्रोपदेश केला. त्यामुळें तो त्रिकाळज्ञानी सोडून गोरक्षनाथाच्या पायां पडला. तेव्हां गोरक्षनाथानें शक्तिप्रयोग मंत्रुन , त्यास हातीं धरून मच्छिंद्रनाथाकडे नेलें. त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचें नाव 'अंडभंग' असें ठेवलें व त्यास नाथदीक्षा देऊन ते चौघे मार्गस्थ झाले, वाटेंत गोरक्षनाथानें अडभंगास सकल विद्यांत निपूण केलें. नंतर तीर्थयात्रा करीत बारा वर्षानीं प्रयागास आले. त्या वेळेस धर्मनाथराजास पुत्र झाला असुन त्यांचें नांव त्रिविक्रम असं ठेविलें होतें हे चौघे गांवांत आल्याची बातमी धर्मनाथास समजांच तो त्यास सामोरा जाऊन राजवाड्यात घेऊन गेला. धर्मनाथानें आपल्या मुलास राज्यावर बसवुन आपण योगदीक्षा घेण्याचा निश्चय केला. माघ महिन्यांतील पुण्यतीथ द्वितीया, जिला धर्मबीज असें म्हणतात, त्या दिवशीं गोरक्षनाथानें धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दीली. त्या वेळेस सर्व देव बोलाविले होते. नगरवासी लोकांचाहि मोठा मेळा जमला होता. सर्वजण प्रसाद घेऊन आनंदानें आपपल्या स्थानीं गेले. दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांसुद्धां सर्वांनीं आपली इच्छा दर्शविली. मग ' धर्मनाथबीजेचा' उत्सव प्रतिवर्षीं करण्याची गोरक्षानें त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला. गोरक्षनाथानें आपल्या 'किमयागिरी' नामक ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं. आपपल्या शक्त्यनुसार जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदिकरुन विघ्नें स्वप्नांत देखील यावयाची नाहींत. त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृहीं वास्तव्य करील. याप्रमाणें धर्मनाथ बीजेचा महिमा होय. धर्मनाथास नाथदीक्षा दिल्यानंतर ते तिघेजण त्यास घेऊन निघाले. त्यांनी तीर्थ फिरत फिरत बदरीकाश्रमास जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायांवर घातलें व त्यास त्याच्या स्वाधीन करून तपश्चर्येस बसविलें. नंतर, बारा वर्षांनीं परत येऊं असें सांगुन तो तिघेजण तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत भरतांच ते पुनः बदरिकाश्रमास गेले मग तेथें मोठ्या थाटानें मावंदे केलें. मावंद्याकरितां सर्व देवांना बोलावून आणलें होतें. मावदें झाल्यावर सर्व देव वर देऊन निघुन गेले. व मच्छिंद्रनाथ, गोरक्षनथ, चौरंगीनाथ, अडभंगनाथ व धर्मनाथ असे पांचीजण तीर्थयात्रेस गेले. ब्रह्मादेवाच्या वीर्यापासून पुर्वी अठ्यांयशीं सहस्त्र ऋषि उत्पन्न झाले; त्याच वेळीं जे थोडेंसे रेत पृथ्वीवर रेवानदीच्या तीरीं पडलें न्यांत चमसनारायणानें संचार केला; तेव्हां पुतळा निर्माण झाला. तें मूल सुर्यासारखें दैदीप्यमान दिसूं लागलें. जन्म होतांच त्यानें एकसारखा रडण्याचा सपाटा चालविला. त्याच संधीस सहन सारुख या नांवाचा एक कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता. त्यानें तें मूल रेतीत रडत पडलेलें पाहिलें; तेव्हां त्याचें हृदय कळवळलें. त्यानें त्या मुलांस उचलून घेतलें व घरीं नेलें आणि रेवातीरीं वाळवंटावर पुत्र मिळाल्याचें वर्तमान स्त्रीस सांगितलें व त्यास तिच्या हवली केलें. तिनें आनंदानें त्यास स्नान घालून पाळण्यांत आपल्या पोटच्या मुलाशेजारीं निजविलें. तो रेवतीरीं ' रेवेतं ' सांपडला म्हणुन त्याचें नांव ' रेवणनाथ ' असें ठेविलें. त्यास थोडथोडें समजूं लागतांच तो काम करावयास बापाबरोबर शेतांत जाऊं लागला. तो बारा वर्षांच्या वयांत शेतकीच्या कामांत चांगलाच हुशार झाला. एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटेंच उठून आपले बैल रानांत चरावयास नेत होता. त्या समयीं लखलखीत चांदणें पडलें होते; ह्यामुळें रस्ता साफ दिसत होता. इतक्यांत दत्तात्रेयाची स्वारी पुढें येऊन थडकली. दत्तात्रेयास गिरिनारपर्वतीं जावयांस होतें. त्यांच्या पायांत खडावा असून त्यांनीं कौपीन परिधान केली होती, जटा वाढविल्या असुन दाढी, मिशी पिंगट वर्णाची होती. असा तिन्ही देवांचा अवतार जे दत्तात्रेय ते जात असतां त्यांची व रेवणनाथाची भेट झाली. त्यास पाहतांच रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचें स्मरण झालें. मग आपण पूर्वीचें कोण, व हल्लीचें कोण व कसें वागत आहों याची त्यास रुखरुख लागली. तसेच मला आतां कोणी ओळखत नाहीं, मी अज्ञानांत पडलों असें त्यास ज्ञान होऊन तो स्तब्ध राहिला. तेव्हां तूं कोण आहेस, असें दत्तात्रेयानें त्यास विचारल्यवर त्यानें उत्तर दिलें, तुमच्या देहांत तिन्ही देवांचे अंश आहेत; त्यांत सत्त्वगुणी जो महापुरुष तो मी असुन मला येथें फारच कष्ट भोगावे लागत आहेत; तर आतां कृपा करून या देहास सनाथ करावें. इतकें बोलून त्यांनें दत्तात्रेयाच्या पायांवर मस्तक ठेविलें. त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रेयानें आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला. नऊ नारायणाच्या अवतांरांपैकीं हा चमसनारायणाचा अवतार होय, हें दत्तात्रेयास ठाऊक होतें. त्यास दत्तात्रेयानें त्यास वेळेस अनुग्रह कां दिला नाहीं अशी शंका येईल. पण त्याचें कारण असें कीं, भक्तिमार्गाकडे प्रवृत्ति झाल्यावांचून अनुग्रह देऊन उपयोग नाही; यास्तव भक्तीकडे मग लागलें म्हणजे ज्ञान व वैराग्य सहज साध्य होतें असा मनांत विचार आणुन दत्तात्रेयानें फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली. तेव्हां रेवणनाथास परमानंद झाला. तो त्याच्या पायां पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रेय निघून गेले. एक सिद्धि प्राप्त झाली तेवढ्यावरच त्यानें समाधान मानल्यानें तो पूर्ण मुक्त झाला नाहीं. .. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ******************************************* अध्याय ३५ रेवणनाथास सिद्धिची प्राप्ति; त्याची तपश्चर्या व वरप्राप्ति; सरस्वती ब्राह्मणाच्या मृत पुत्राकरिता यमलोकीं गमन... रेवणनाथानें एका सिद्धिकलेस भूलून दत्तात्रयेयास परत पाठविल्यानंतर रेवणनाथ शेतांत गेला. दत्तात्रेयानें त्याची त्या वेळेची योग्यता ओळखूनच एक सिद्धकलेवर त्यास समाजावून वाटेस लाविलें होतें. रेवणनाथ शेतांत गेला व काम झाल्यावर तो मंत्रप्रयोगाचें गाणें गाऊं लागला. तेव्हां सिद्धि प्रत्यक्ष येऊन उभी राहिली व कोणत्या कार्यास्तव मला बोलाविलें म्हणून विचारूं लागली. प्रथम त्यानें तिला नांव विचारलें तेव्हां मी सिद्धि आहे, असें तिनें सांगितलें. ज्या वेळेस दत्तात्रेयानें रेवणनाथास सिद्धि दिली होती, त्या समयीं त्यानें तिच्या प्रतापाचें वर्णन करून सांगितलें होतें की, सिद्धि काम करावयास प्रत्यक्ष येऊन हजर राहिल व तूं सांगशील तें कार्य करील. जेवढे उपभोग घेण्याचे पदार्थ पृथ्वीवर आहेत तेवढे सर्व ती एका अर्ध क्षणांत पुरवील. सारांश, जें जें तुझ्या मनांत येईल तें ती करील; यास्तव जें तुला कार्य करावयाचें असेल तें तूं तिला सांग. अशी तिच्या पराक्रमाची परस्फुटता करून दत्तात्रयानें त्यास बीजमंत्र सांगितला होता. ती सिद्धि प्राप्त झाल्याचें पाहून रेवणनाथस किंचित गर्व झाला. परंतु स्वभावानें तो निःस्पृह होता. एके दिवशीं तो आनंदानें मंत्रप्रयोग म्हणत शेतांत काम करीत असतां महिमा नांवाची सिद्धि जवळ येऊन उभी राहिल्यानें त्यास परमानंद झाला. त्यानें हातांतील औत व दोर टाकून तिला सांगितलें कीं, जर तुं सिद्धि आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखालीं धान्याची रास पडली आहे ती सुवर्णाची करून मला चमत्कार दाखीव; म्हणजे तूं सिद्धि आहेस अशी माझी खात्री होईल. मग मला जें वाटेल तें काम मी तुला सांगेन. त्याचें भाषण ऐकून महिमा सिद्धि म्हणाली, मी एका क्षणांत धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवीन. मग तिनें धान्याच्या राशीं सुर्वणाच्या डोंगराप्रमाणें निर्माण करून दाखविल्या. त्याची खात्री झाली. मग तो तिला म्हणाला, तुं आतां माझ्यापाशीं रहा. तुं सर्व काळ माझ्याजवळ असलीस , म्हणजे मला जें पाहिजे असेल तें मिळण्यास ठीक पडेल. त्यावर ती म्हणाली, मी आतां तुझ्या संनिध राहीन; परंतु जगाच्या नजरेस न पडतां गुप्तरूपानें वागेन. तूं माझ्या दर्शनासाठी वारंवार हेका धरुन बसुं नको. तुझें कार्य मी ताबडतोब करीत जाईन. रेवणनाथानें तिच्या म्हणण्यास रुकार दिल्यावर ती सुवर्णाची रास अदृश्य करून गुप्त झाली. मग रेवणनाथ सांयकाळपर्यंत शेतांत काम करून घरीं गेला. त्यानें गोठ्यांत बैल बांधिले व रात्रीस स्वस्थ निजला. दुसरे दिवशीं त्यानें मनांत आणिलें कीं, आतां व्यर्थ कष्ट कां म्हणुन करावे ? मग दुसरे दिवशी तो शेतांत गेलाच नाहीं. त्यामुळें सुमारें प्रहर दिवसपर्यंत वाट पाहून त्याचा बाप सहनसारुक हा त्यास म्हणाला, मुला ! तूं आज अजूनपर्यंत शेतांत कां गेला नाहींस ? हें ऐकून रेवणानाथानें उत्तर दिलें कीं, शेतांत जाऊन व रात्रंदिवस कष्ट करून काय मिळवयाचें आहे ? त्यावर बाप म्हणाला, पोटासाठी शेतांत काम केलें पाहिजे. शेत पिकलें की, पोटाची काळजी करावयास नको, नाहीं तर खावयाचे हाल होतील व उपाशी मरावयाची पाळी येईल. यावर रेवणनाथ म्हणाला, आपल्या घरांत काय कमी आहे म्हणुन शेतांत जाऊन दिवसभर खपून पोट भरण्यासाठी धान्य पिकवावें ? आतां मेहनत करण्याचें कांहीं कारण राहिलें नाहीं. तें ऐकून बापानें म्हटलें, आपल्या घरांत अशी काय श्रीमंती आहे ? मी एक एक दिवस कसा लोटीत आहें, हें माझें मलाच ठाऊक. तें ऐकून रेवणनाथ म्हणाला, उगीच तुम्हीं खोटें बोलतां सारें घर सोन्याचें व धान्यानें भरलेलें आहे. मी बोलतों हें खरें कीं खोटें, तें एकादां पाहून तरी या; उगीच काळजी कां करतां ? मग बाप पाहूं लागला असतां घरांत सोन्याच्या व धान्याच्या राशीच्या राशी पडलेल्या दिसल्या. त्यावेळेस त्यास मोठेंच आश्चर्य वाटले. मग हा कोणी तरी अवतारी पुरुष असावा, असें त्याच्या मनांत ठसलें व तो रेवणनाथाच्या तंत्रानें वागूं लागला. रेवणनाथाचा बुंधुलगांव मोठा असून रहदरीच्या रस्त्यावरच होता, ह्यामुळें गांवांत नेहमी पांथस्थ येत असत. रेवणनाथास सिद्धि प्राप्त झाल्यानंतर गांवांत येणाऱ्या पांथस्थास रेवणनाथ इच्छाभोजन घालूं लागला. ही बातमी साऱ्या गांवांत पसरली. मग लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या त्याच्या घरीं जाऊं लागल्या. वस्त्र, पात्रं, अन्न, धन आदिकरुन जें ज्यास पाहिजे तें देऊन रेवणनाथ त्याचे मनोरथ पुरवीत असे. रोगी मनुष्याचे रोगाहि जात असत. मग ते त्याची कीर्ति वर्णन करून जात. यामुळें रेवणनाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला. सर्व लोक त्यास ' रेवणसिद्ध ' असें म्हणू लागले. इकडे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असतां बुंधुलगांवांत येऊन धर्मशाळेंत उतरला. मच्छिंद्रनाथ श्रीगुरुंचें चिंतन करीत आनंदानें बसला असतां कित्येक लोक त्या धर्मशाळेंत गेले. त्यांनी त्यास भोजनासाठीं रेवणनाथाचें घर दाखवून दिलें व त्यानें विचारल्यावरुन लोकांनीं रेवणसिद्धिची समूळ माहिती सांगितली. ती ऐकून रेवणनाथ चमसनारायाणाचा अवतार आहे, असें मच्छिंद्रमनांत समजला. नंतर जास्त माहिती काढण्याकरितां रेवननाथास कोन प्रसन्न झाला म्हणुन मच्छिंद्रनाथानें लोकांस विचारलें. परंतु लोकांस त्याच्या गुरुची माहिती नसल्यामुळें त्याचा गुरु कोण हें कोणी सांगेना. मग मच्छिंद्रनाथानें कांहीं पशु, पक्षी, वाघ, सिंह निर्माण करून त्यांस तो आपल्या अंगाखांद्यावर खेळवून एके ठिकाणीं खावयास घालूं लागला. हा चमत्कार पाहून हा सुद्धां कोणी ईश्वरी अवतार असावा असें मच्छिंद्रनाथाविषयीं लोक बोलू लागले. हा प्रकार लोकांनीं रेवणसिद्धाच्या कानांवर घातला व हा अद्‌भुत चमत्कार प्रत्यक्ष पाहावयास सांगितला. हें वृत्त ऐकून रेवणसिद्ध तेथें स्वतः पाहावयास गेला. सिंह, वाघ, आदिकरून हिंस्त्र जनावरें, तसेंच पशुपक्षीसुद्धां मच्छिंद्रनाथाच्या अंगाखांद्यावर निवैर खेळत आहेत, असें पाहुन त्यास फार चमत्कार वाटला. रेवणनाथ घरीं गेला व दत्तमंत्रप्रयोग म्हणतांच प्रत्यक्ष सिद्धि येऊन प्रविष्ट झाली. तिनें कोणत्या कारणास्तव बोलावलें म्हणुन विचारतां तो म्हणाला, मच्छिंद्रनाथाप्रमाणें पशुपक्ष्यांनीं माझ्या अंगाख्याद्यांवर प्रेमानें खेळावें व माझ्या आज्ञेंत असावें, असें झालें पाहिजे. तें ऐकून तिनें सांगितलें कीं, ही गोष्ट ब्रह्मवेत्त्यावांचुन दुसऱ्याच्यानें होणार नाहीं, या सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रथन तूं ब्रह्मवेत्ता हो. मग रेवणासिद्धानें तिला सांगितलें कीं, असें जर आहे तर तुं मला ब्रह्मवेत्ता कर. तेव्हां तिनें सांगितलें कीं तुझा गुरु दत्तात्रेय सर्वसमर्थ आहे; ह्यास्तव तूं त्याची प्रार्थना कर; म्हणजे तो स्वतः येऊन तुझ्या मनासारखें करील. असें सिद्धीनें सांगितल्या वर तसें करण्याचा त्यानें निश्चय केला. मग ज्या ठिकाणी पूर्वी दत्तात्रेयाची भेट झाली होती, त्याच ठिकाणीं रेवणनाथ जाऊन तपश्चर्येंस बसला. दत्तात्रेयाची केव्हां भेट होते असें त्यास झालें होतें. त्यानें अन्नपाणीसुद्धां सोडलें व झाडांची उडून आलेली. पानें खाऊन तो निर्वाह करूं लागला. तेणेंकरून त्याच्या हांडांचा सांगडामात्र दिसूं लागला. रेवणनाथाचा गुरु कोण हें मच्छिंद्रनाथाच्या लक्षांत नव्हतें त्याच्या गुरुनें अर्धवट शिष्य कां तयार केला म्हणुन मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होतें. त्यानें रेवणनाथाबद्दल चौकशीं केली. पण त्याचा गुरु कोण ही माहिती लोकांस नव्हती; ते फक्त त्याची बरीच प्रशंसा करीत. उपकार करण्यात, अन्न्‌उदक व द्रव्य देण्यास रेवणनाथ मागेंपुढें पाहत नसे, यावरुन कोणत्या तरी गुरुच्या कृपेनें, ह्यास सिद्धि प्राप्त झाली असावी, असें मनांत येऊन मच्छिंद्रनाथानें तो शोध काढण्यासाठीं अणिमा, नरिमा, लघिमा, महिमा इत्यादि आठहि सिद्धिस बोलाविलें. त्या येतांच त्याच्या पायां पडल्या. त्या वेळेस नाथानं त्यास विचारलें कीं, रेवणसिद्धाच्या सेवेस कोणत्या सिद्धिची कोणी योजना केली आहे हें मला सांगा.त्यावर महिमासिद्धीनें उत्तर दिलें कीं, त्याच्या सेवेस राहण्यासाठीं श्रीदत्तात्रेयाची मला आज्ञा झाली आहे. मग हा रेवणनाथ आपला गुरुबंधु होतो असें जाणुन त्यास साह्य करावें, असें मच्छिंद्रनाथाच्या मनांत आलें त्यानें लगेच तेथून निघुण गिरीनापर्वती येऊन श्रीदत्तत्रेयाची भेट घेतली व रेवणसिद्धिचा सर्व मजकूर कळविला आणि त्याच्या हितासाठीं पुष्कळ रदबदली केली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, महाराज ! रेवणसिद्ध हा प्रत्यक्ष चमसनारायणाचा अवतार होय. तो तुमच्यासाठीं दुःसह क्लेश भोगीत आहे. तर आपण आतां त्यावर कृपा करावी. ज्या ठिकाणीं तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे. तें ऐकून मच्छिंद्रनाथास समागमें घेऊन दत्तात्रेय यानास्त्राच्या साह्यानें रेवणनाथापाशीं आले. तेथें तो काष्ठाप्रमाणें कृश झालेला पाहिल्यावर दत्तात्रेयास कळवळा आला व त्यांनी त्यास पोटाशीं धरिलें रेवणनाथानें दत्तात्रेयास पायांवर मस्तक ठेविलें. तेव्हां दत्तानें त्याच्या कानांत मंत्रोपदेश केला. तेणेकरून त्याच्या अज्ञान व द्वैत यांचा नाश झाला. मग वज्रशक्ति आराधून दत्तानें रेवणनाथाच्या कपाळीं भस्म लाविले; त्यामुळें तो शक्तिवान् झाला. नंतर त्यास बरोबर घेऊन दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ गिरीनारपर्वतीं गेले. तेथें त्यास पुष्कळ दिवस ठेवुन घेऊन शास्त्रास्त्रासुद्धां सर्व विद्यांत निपुण केलें. तेव्हां, आतां आपण एकरूप झालों, असें रेवणनथास भासूं लागलें. त्याचा द्वैतभाव नाहिंसा होतांच सर्व पशुपक्षी निवैर होऊन रेवणनाथाजवळ येत व त्याच्या पायां पडत. दत्तानें रेवणनाथास नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथाप्रमाणेंच शस्त्रास्त्रादिसर्व विद्यांत निपूण करून त्यास त्याच्या स्वाधीन केलें. मग ते उभयतां मार्तंडपर्वतीं गेलें. तेथें त्यांनी नागेंश्र्वर स्थान पाहून देवदर्शन घेतलें व वर मिळवून साबरींमंत्र सिद्ध केले. सर्व विद्येंत परिपूर्ण झाल्यानंतर गिरीनारपर्वती येऊन तेथें मावंदें घालण्याचा रेवणनाथानें बेत केला. त्या समारंभास विष्णु, शंकर आदिकरून सर्व देवगण येऊन पोंचले. चार दिवस समारंभ उत्तम झाला. मग सर्व देव रेवणनाथास वर देऊन आपापल्या स्थानीं गेले. रेवणनाथहि दत्तात्रेयाच्या आज्ञेनें तीर्थयात्रा करावयास निघाला. त्या कालीं माणदेशांत विटे तीर्थयात्रा गांवांत सरस्वती या नावांचा एक ब्राह्मण राहात असे. त्याच्या स्त्रीचें नांव जान्हविका. त्यांची एकमेकांवर अत्यंत प्रीति. त्यांस मुलें होत, पण तीं वांचत नसत; आठ दहा दिवसांतच तीं मुलें मरत. ह्याप्रमाणें त्याचें सहा पुत्र मरण पावले. सातवा पुत्र मात्र दहा वर्षेपर्यंत वांचला होता व आतां यास भय नाहीं असें जाणुन सरस्वती ब्राह्मणानें अतिहर्षानें ब्राह्मणभोजन घेतलें. त्यासमयीं पंचपक्कान्ने केलीं होतीं व प्रयोजनाचा बेत उत्तम ठेविला होता. त्याच दिवशीं त्या गांवात रेवणनाथ आला. तो भिक्षा मागवयास फिरत असतां त्या ब्राह्मणाकडे गेला. त्यास पाहतांच हा कोणी सत्पुरुष आहे, अशी ब्राह्मणाची समजुत झाली. तेव्हां ब्राह्मणानें त्यास जेवून जाण्याचा आग्रह केला व त्याच्या पायां पडून माझी इच्छा मोडूं नये असें सांगितलें. त्यास रेवणनाथानें सांगितलें कीं, आम्हीं कनिष्ठ वर्णाचें व तूं ब्राह्मण आहेस, म्हणुन आमच्या पायां पडणें तुला योग्य नाहीं, हें ऐकून तो म्हणाला, ह्या कामीं जातीचा विचार करणें योग्य नाहीं. मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवणनाथानें त्यांचें म्हणणें मान्य केलें. मग रेवणनाथ त्याच्याबरोबर घरांत गेल्यावर सरस्वती ब्राह्मणानें त्यास पात्रावर बसविलें व त्याचें भोजन होईपर्यंत आपण जवळच बसून राहिला. जेवतांना त्यानें करून त्यास भोजनास वाढिलें व नाथाची प्रार्थना केली कीं, महाराज ! आजचा दिवस येथें राहून उदईक जावें. त्याची श्रद्धा पाहून रेवणनाथानें त्याच्या म्हणण्यास रुकार दिला व तो दिवस त्यानें तेथें काढिला. रात्रीस पुनः भोजनासाठीं सरस्वती ब्राह्मणानें नाथास आग्रह केला, परंतु दोनप्रहरीं भोजन यथेच्छ झाल्यानें रात्रीं क्षुधा लागली नव्हती; यास्तव नित्यनेम उरल्यानंतर नाथानें तसेंच शयन केलें. त्या वेळीं तो ब्राह्मण नाथाचे चरण चुरीत बसला. मध्यरात्र झाली असतां अशी गोष्ट घडली कीं, आईजवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटवीनें झडप घालून कासावीस केले. त्या वेळेस मोठा आकांत झाला. बायको नवऱ्यास हाका मारूं लागली, तेव्हां तो तिला म्हणाला, आपण पूर्वजन्म केलेल्या पापाचें फळ भोगीत आहों, यास्तव आपणांस सुख लाभणार कोठून ? आतां जसें होईल तसें होवो. तूं स्वस्थ राहा. मी उठून आलों तर नाथाची झोंप मोडेल, यास्तव माझ्यानें येववत नाहीं. जर झेंप मोडली तर गोष्ट बरी नाहीं. इतकें ब्राह्मण बोलत आहे तो यमाच्या दूतांनीं पाश टाकून मुलाच्या प्राणाचें आकर्षण केलें व मुलाचें शरीर तसेंच तेथें पडून राहिलें. मुलगा मरण पावला असें पाहून जान्हवी मंद मंद रडूं लागली. तिनें ती रात्र रडून रडून काढिली. प्रातःकाळ झाला तेव्हा नाथास रडका शब्द ऐकूं येऊं लागला. तो ऐकून त्यानें कोण रडतें म्हणुन सरस्वती ब्राह्मणास विचारिलें. त्यानें उत्तर दिलें कीं, मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणुन घरांत माझी बायको अज्ञपणनें रडत आहे. तें ऐकुन मुलास घेऊन ये, असं नाथानें विप्रास सांगितलें. त्यावरुन तो स्त्रीजवळ जाऊन पाहतो तों पुत्राचें प्रेत दृष्टीस पडलें. मग त्यानें नाथास घडलेलें वर्तमान निवेदन केलें. ही दुःखदायक वार्ता ऐकून नाथास यमाचा राग आला. तो म्हणाला, मी या स्थळी असतां यमानें हा डाव साधून कसा घेतला ? आतां यमाचा समाचार घेऊन त्यास जमीनदोस्त करून टाकितों, असें बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितलें. मग सरस्वती ब्राह्मणानें तो मुलगा नाथापुढें ठेविला. त्या प्रेताकडे पाहून नाथास परम खेद झाला. मग तुला एवढास मुलगा कीं काय, असें नाथानें त्यास विचारल्यावर, हें सातवें बालक म्हणुन ब्राह्मणानें सांगितलें व म्हटलें, माझीं मागची सर्व मुलें जन्मल्यानंतर पांचसात दिवसांतच मेली; हाच फक्त दहा वर्ष वांचला होता. आम्ही प्रारब्धहीन ! आमचा संसार सुफळ कोठून होणार ! जें नशिबीं होतें तें घडलें. याप्रमाणें ऐकून रेवणनाथानें सरस्वतीस सांगितलें कीं, तूं तीन दिवस या प्रेताचें नीट जतन करून ठेव. हें असेंच्या असेंच राहील, नासणार नाहीं. आतां मी स्वतः यमपुरीस जाऊन तुझीं सातहि बाळें घेऊन येतो. असें सांगुन नाथानें अमरमंत्रानें भस्म मंत्रुन मुलाच्या अंगास लाविलें व यानास्त्राच्या योगानें तो ताबडतोब यमपुरीस गेला. रेवणनाथास पाहतांच यमधर्म सिंहासनावरून उतरला व त्यास आपल्या आसनावर बसवून त्यानें त्याची षोडशोपचारांनीं पूजा केली आणि अति नम्रपणानें येण्याचें कारण विचारलें. तेव्हा रेवणनाथानें म्हटलें, यमधर्मा ! मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरीं असतां तूं तेथें येऊन त्याच्या मुलास कसा घेऊन आलास ? आतां न घडावी ती गोष्ट घडली तरी चिंता नाहीं. परंतु तूं त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कोठें ठेविलें आहेस. तेहि आणुन दे. हें न करशील तर माझा राग मोठा कठीण आहे; तुझा फडशा उडून जाईल. तेव्हा यमधर्मानें विचार केला कीं, ही जोखीमदारी आपण आपल्या अंगावर घेऊं नये. शंकराकडे मुखत्यारी आहे, असें सांगून त्यास कैलासास धाडावें; मग तिकडे पाहिजे तें होवो. असें मनांत आणुन तो म्हणाला, महाराज ! माझें म्हणणें नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावें. विष्णु, शंकर व ब्रह्मदेव हे तिघे या गोष्टीचे अधिकारी आहेत आणी हा सर्व कारभार त्यांच्याच आज्ञेनें चालतों. या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही सारे त्याचे सेवक आहों. यास्तव मारण्याचें वा तारण्याचें काम आमच्याकडे नाहीं, सबब आपण कैलासास जावें व शंकरापासून ब्राह्मणाचे सात पुत्र मागुन न्यावे. ते तेथेंच त्यांच्याजवळ आहेत. त्याचें मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्यावा. ते ऐकून रेवणनाथ म्हणाल, तूं म्हणतोस, हें काम शंकराचें आहे, तर मी आतां कैलासास जातो. असें म्हणुन रेवणनाथ तेथून उठून कैलासास शंकराकडे जावयास निघाला. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ******************************************* अध्याय ३६ रेवणनाथानें सरस्वती ब्राह्मणाचे मृत पुत्र सजीव केले; नागनाथाची जन्मकथा... यमपुरीहून रेवणनाथ कैलासास गेला. त्यास शिवगणांनीं विचारपूस करण्यासाठीं उभें राहावयास सांगितलें व आपण कोण, कोठें जातां, काय काम आहे वगैरे विचारलें. त्या वेळेस त्यानें सांगितलें कीं, मला रेवणनाथ म्हणतात. मी शंकराची भेट घ्यावयास जात आहें, कारण त्यानें एका ब्रह्मणाचा मुलगा चोरून आणिला आहे; तर त्यास शिक्षा करुण मुलास घेऊन जाण्यासाठी मी आलों आहे. तें भाषण ऐकून शिवगणांस राग झाला. ते म्हणाले, तुझा गुरु गंधर्व आहे असें वाटतें, म्हणूनच तूं असें बोलत आहेस. तुं आपला परत जा कसा. हें ऐकून नाथास फारच राग आला. तो म्हणाला माझा गुरु गंधर्व म्हणून म्हणतां, पण तुम्ही गंधर्वसमान आतां रानामाळ फिराल. असें बोलून त्यानें स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेंकलें. त्यामुळें द्वारपाळ व तेरांशें शिवगण हे सर्व जमिनीस खिळून बसले. जमिनीपासून त्यांचे पाय सुटताना, जमिनीस चिकटले आणी सर्वजण ओणवे होऊन राहिले. याप्रमाणें गणांची झालेली अवस्था पाहुन तेथचे सर्व लोक भयभीत झाले. ते शिवापुढें जाउन हात जोडून उभे राहिले व म्हणाले कीं, गावच्या दाराशीं एक मनुष्य आला असून त्याने तेराशें द्वाररक्षकगणांस जमिनीस खिळून ओणवें करून टाकिलें असून तें त्या दूःखानें ओरडत आहेत. हें ऐकून शिवानें त्या शिक्षा करावयास आठहि काळभैरवांस आज्ञा केली. त्याप्रमाणें ते काळभैरव शतकोटि गण घेऊन बाहेर पडले. हें पाहून नाथानें स्पर्शास्त्रानें त्या गणांनाहि ओणवे केलें, पण भैरवांनीं त्या अस्त्रास जुमानिलें नाहीं. त्यानीं धनुष्यें हाती घेऊन बाणांवर वातास्त्र अग्नस्त्र, नागास्त्र यांची योजना करुण बाण सोडिले. तेव्हां नाथानें पर्वतास्त्र, पर्जनास्त्र याप्रमाणें योजना केली. ह्या अस्त्रांनीं भैरवांच्या अस्त्रांचा मोड झाला. नंतर तीं अस्त्रें भैरवांवर पडली, तेणेंकरुन ते जर्जर झाले. मग हें वर्तमान हेरांनीं शंकारास कळविलें. तेव्हां रागानें तो नंदीवर बसुन युद्धस्थानी आला. तेव्हा रेवणनाथानें विचार केला कीं शंकराशीं युद्ध करण्याचें कारण नाहीं, एकाच अस्त्रानें बंदोबस्त करावा म्हणजे झालें. मग वाताकर्षकास्त्र मंत्रानें भस्म मंत्रून तें शंकरावर फेंकलें. त्यामुळें शंकराचा श्वासोच्छवास बंद झाला व उमाकांत नंदीवरुन खाली पडला व अष्टभैरव बेशुद्ध पडले. याप्रमाणें शंकाराची व गणांची प्राणांत अवस्था केल्याचें वृत्त विष्णुस कळतांच तो लागलाच तेथें धावून आला. त्यानें नाथास आलिंगन देऊन पोटाशीं धरिलें आणि विचारिलें कीं, कोणत्या कारणामुळें रागावून तुं हा एवढा अनर्थ केलास ? तेव्हां रेवणनाथानें विष्णुस सांगितलें कीं, मी सरस्वती ब्राह्मणकडे असतां शंकरानें त्याचा पुत्र मारिला. या कारणास्तव मी शिवाचा प्राण घेऊन संजीवनी अस्त्राच्या योगानें मुलास जिवंत करून घेऊन जाईन. तुम्ही ब्राह्मणाचीं सातहि बाळें आणुन द्या म्हणजे शंकराच्या प्राणांचे रक्षण करितो; तें ऐकून विष्णुनें सांगितलें कीं, ती सर्व बाळें माझ्याजवळ आहेत, मी ते सातहि प्राण तुझ्या हवाली करितो, पण देह मात्र तूं निर्माण कर. हे विष्णुचें बोलणें रेवणनाथानें कबूल केलें. मग वातप्रेरक अस्त्र जपून नाथानें शंकरास सावध केलें व मग विभक्त अस्त्राचा जप करून सर्व गण मुक्त केले व स्थितिमंत्र म्हणुन अष्टभैरवांना भस्म लावून त्यांस अस्त्रापासुन मोकळें केलें. मग सर्वांनीं नाथास नमन केलें. तेव्हां विष्णुनें सातहि प्राण नाथाच्या स्वाधीन केले व त्यास जावयांस परवानगी दिली. मग यानास्त्र जपून रेवणनाथ महीवर उतरून ब्राह्मणाकडे आला. व त्यास मुलाचे कलेवर कुटून त्याचा गोळा करून आणावयास सांगितलें, त्याप्रमाणें प्रेत कुटुन आणिल्यानंतर त्याचे सात भाग करुन, सात पुतळे तयार केले. नंतर संजीवनी प्रयोग प्रेरून सातहि बालकें जिवंत करतांच तीं रडूं लागली. त्यांना सरस्वती ब्राह्मणाच्या व त्याच्या स्त्रीच्या स्वाधीन केलें. बाराव्या दिवशीं मुलें पाळण्यांत घालून सारंगीनाथ, निरंजननाथ, जागीनाथ, निजानंद, दीनानाथ, नयननाथ, यदुनाथ, गहिनीनाथ अशीं त्यांची नावें रेवणनाथानें ठेविलीं. हे सातहि पुरुष पुढें जगविख्यांत झाले. रेवणनाथानं त्यांना बारा वर्षानंतर दीक्षा दिली व सर्व विद्यांत तप्तर केले. रेवणनाथ हा त्यात प्रांतांत राहिला. पूर्वी सरस्वतीच्या उद्देशानें ब्रह्मदेवाचें वीर्यपतन झीलें असतां तें एका सर्पिणीच्या मस्तकांवर येऊन पडलें. तें तिनें भक्षण करुण आपल्या पोटांत सांठवून ठेविलें. मग दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला. ही गोष्ट आस्तिकऋषीच्या लक्षांत आली. नऊ नारायणांपैकीं एकजन पोटीं येईल व त्यास लोक नागनाथ म्हणतील हेंहि तो समजला. मग आस्तिकमुनीनें त्या सर्पणीला जवळ बोलावून सांगितलें कीं, तूं या गोष्टीबद्दल कांहीं चिंता करुं नको तुझ्या पोटीं ऐरहोत्रनारायण जन्मास येणार आहे, परंतु तुला सांगावयाचें कारण असें कीं, पुढें तुजवर मोठा कठिण प्रसंग गुजरणार आहे. सध्यां जनमेजयराजानें सर्पमात्र आरंभिलें असून मोठ मोठ्या ऋषीच्या साह्यानें समिधांच्या ऐवजीं सर्पांची योजना करून त्याची यज्ञकुंडांत आहुति देत आहे; म्हणुन ही गोष्ट मी तुला सांगुन ठेविली. यास्तव आतां तुं कोठें तरी लपून राहा. याप्रमाणें आस्तिक मुनीनें जेव्हा तिला भय घातलें, तेव्हा तिनें आपणास राहावयास निर्भय स्थळ कोणतें म्हणून त्यास विचारिलें, तेव्हा जवळच एक वडाचें झाड होतें. त्याच्या पोखरामध्यें लपून राहाव यास आस्तिक ऋषीनें तिला सांगितलें. मग ती सर्पीण त्या वडाच्या पोखरांत लपून राहिली व आस्तिकानें अचळ वज्रप्रयोगानें तें झाड सिंचन करून ठेविलें व आपण हस्तिनापुरास गेला. नंतर आस्तिकमुनीनें जनमेजयराजाच्या यज्ञमंडपांत जाऊन सर्व ऋषींची भेट घेऊन त्यांना हा गुप्त वृत्तांत कळविला आणी म्हटलें, ब्रह्मवीर्य सर्पणीच्या उदरांत असून पुढें तो पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावानें प्रकट होईल. नऊ नारायणापैकीं ऐरहोत्र नारायणच हा अवतार घेणार आहे, त्यास मारुं नये. तें सर्व ऋषींनीं कबूल केल्यानंतर पुढें सर्पसत्र समाप्त झालें; इकडे सर्पिणाचे नवमास पूर्ण झाले. मग ती पद्मिण नावांची सर्पीण प्रसुत होऊन तिनें एक अंडें घातलें. तें वडाच्या पोकळींत बहुत दिवसपावेतों राहिलें होतें त्यांत ऐरहोत्र नारायणानें संचार केला. पुढें त्याचा देह मोठा झाल्यवर अंड फूटून मूल दिसूं लागलें. पुढें तें मुल रडू लागलें पण त्याचें रक्षण करण्यात तेथें कोणी नव्हतें. त्या वेळीं कोशधर्म या नांवाचा एक अथर्वणवेदी गौडब्राह्मण वेदशास्त्रांत निपूण होता, परंतु तो फार गरीब असल्यानें त्याच्या संसाराचे हाल होत. दारिद्र्यामुळें तो उदास होऊन गेला होता. गरिबी पाठीस लागल्यामुळें पत्रावळींकरितां तो वडाची पानें आणावयास जात असे. एके दिवशीं तो त्या झाडाजवळ गेला असतां तेथें मुलाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानीं पडला. तो ऐकून कोण रडतें हा शोध करण्यासाठीं तो आसपास पाहूं लागला. परंतु त्यास कोणिही न दिसल्यामुळें तो संशयांत पडला. तरी पण हा मुलाचाच शब्द अशी त्याची खात्री झाली. मग त्यास देवांनीं सांगितलें कीं, कोशधर्म या वडाच्या झाडाच्या पोकळींत बालक रडत आहे, त्यांस स्पर्श झाला कीं त्याचा काळिमा जाऊन सुवर्ण होते; तद्वतु हा मुलगा तुझ्या घरीं आला कीं, तुझें दारिद्र नाश पावेल, हा देवांनीं एक बाण सोडला. त्यासरसें तें झाड मोडून पडलें. झाड पडतांच आंतील वर्षाव केला. मग देवांनीं हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला. आणी कोशधर्म ब्राह्मणास सांगितलें कीं, महाराज ! या भुमंडळावर आपण मोठे भाग्यवान आहांत म्हणुन हा वटसिद्ध नागनाथ तुम्हांस प्राप्त झाला आहे. हा पद्मिणी नांवाच्या नागिणीच्या पोटीं जन्मला असून वटवृक्षामध्यें ह्याचें संरक्षण झालें आहे. त्यास्तव आतां ह्याचें ' वटसिद्ध नागनाथ ' हेंच नांव प्रसिद्ध करावें. हा सिद्ध असुन योगी लोकांचा नाथ होईल. ती देववाणी ऐकतांच कोशधर्मानें त्या मुलास उचलून घरीं नेलें. त्या समयीं त्यास परमानंद झाला. तें ऐकून त्याची स्त्री सुरादेवी हीदेखील समग्र झाली. ती म्हणाली, मला वाटतें कीं, हा चंद्र किंवा सूर्य अवतरला असावा. तिनें मुलास उचलून स्तनाशीं लाविलें तो पान्हा फुटला. मग तिनें आनंदानें मुलास स्नान घालून पाळण्यांत घातलें व त्याचें ' वटसिध्द नागनाथ ' असें नांव ठिविलें. सुरादेवींचें त्या मुलावर अत्यंत प्रेम जडलें. तो मुलगा मोठा झाल्यावर कोशधर्मानें सातव्या वर्षा त्याचें यथाविधि मौंजीबंधन केले. एके दिवशीं दोन प्रहरीं वटसिध्द नागनाथ भागिरथीच्या तीरीं काशीविश्वेश्वराच्या समोर कांहीं मुलें जमवून खेळूं लागला त्या संधीस दत्तात्रेयाची स्वारी तेथें गेली व मुलांचा खेळ पाहूं लागली. तेथें मुलांच्या पंक्ति बसवुन त्यांस वटसिद्ध नागनाथ लटकेंच अन्न वाढीत होता, मुलें पुरें म्हणत होती. हा त्यांस घ्या, घ्या म्हणून आग्रह करून वाढीत होता. असा मुलांचा चाललेला लटका खेळ दत्तात्रेयानें पाहिला. तेव्हां त्यास आश्चर्य वाटलें. लटक्यांच अन्नानें पोट भरलें म्हणून मुलें म्हणत, हें ऐकून त्यास हसुं आलें. नंतर बालरूप धरुण दत्तात्रेयानें त्या मुलांत संचार केला व अंगणांत उभा राहून तो म्हणाला, मी अथीत आलों आहें, मला भूक फार लागली आहे. कांहीं खावयास अन्न वाढा. हें ऐकून तीं मुलें त्याच्या पाठीस लागली व म्हणाली, तु रे कोण आमच्या मडळींत खेळावयास आला आहेस ? जातोस कां मारूं तुला ? असें म्हणुन कांहीं मुले काठीं उगारूं लागली व कांहीं मुलें दगड मारावयास धावलीं. हें नागनाथानें पाहिलें तेव्हां तो सर्व मुलांस म्हणाला आपल्या मेळ्यांत जो नवीन मुलगा आला आहे त्यास घालवून देऊं नका, आपल्याप्रमाणे त्यासहि वाढूं आयत्या वेळीं आलेल्या ब्राह्मणास अथीत समजुन परत दवडू नये, असे बोलुन त्याने त्या मुलास बसविलें. मग कल्पननें स्नान, षोडशोप चारांनीं पूजा, भोजन वगैरे झाले. जेवतांना सावकाश जेवा, घाई करुं नका. जें लागेल तें मागून घ्या, असा त्यस तो आग्रह करीत होताच. तेव्हा हा उदार आहे असें दत्तात्रेयास वाटले. हा पूर्वीचा कोणी तरी योगी असावा असेंहि त्याच्या मनांत ठसलें. दुसऱ्यास संतोशवून त्यावर उपकार करण्याची बुद्धी होणें पूर्वपुण्याईवांचुन घडावयाचें नाहीं, असा मनांत विचार करून तो त्याचे पूर्वजन्मकर्म शोधूं लागला. तेव्हा त्याच्या जन्माचा सर्व प्रकार दत्तात्रेयाच्या लक्षांत आला. मग दत्तात्रयानें त्यास कृपा करून सिद्धि दिली. तिचा गुण असा झाला कीं नागनाथ ज्या पदार्थाचें नांव तोंडांतुन घेई, तो पदार्थ तेथें उत्पन्न होऊं लागला. नंतर मुलांना जेवावयास वाढ म्हणून दत्तात्रेयानें नागनाथास सांगितलें. पण त्या सिद्धिचें अन्न खाण्याची नागनाथानें फक्त मनाई केली होती. जातेसमयीं दत्तात्रेयानें आपलें नांव सांगुन त्याचें नांव विचारुन घेतलें. मग खेळतांना नागनाथ ज्या पदार्थाचे नांव घेई तो पदार्थ उत्पन्न होऊं लागला. त्यामुळें मुलें नित्य तृप्त होऊन घरीं बरोबर जेवीनातशीं झालीं न जेवण्याचें कारण आईबापांनीं मुलांना घरीं विचारलें असतां आम्हीं षड्रस अन्न जेवून येतो; म्हणुन मुलांनी सागांवे. प्रथम ही गोष्ट आईबापांना खरीं वाटली नाहीं; पण त्यांनी स्वतः भागीतथीतीरीं जाऊन नागनाथ षड्रस अन्नें वाढतो हें पाहतांच त्यांची खात्री झाली. मग ही बातमी सर्व क्षेत्रभर झाली व नागनाथाचा बाप कोशधर्म याच्या देखील ती कानांवर गेली. कित्येकांनी त्यास सांगितलें कीं, भागीरथीच्यां कांठी तुझा मुलगा मुलांच्या पंक्ति बसवुन उत्तम उत्तम पक्वाअन्नांच्या जेवणावळी घालीत असतो. हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलों आहों. तो अन्न कोठून आणितो व कसें तयार करितो त्याचें त्यासच ठाऊक. त्यानें जमिनीवर हात ठेविला कीं, इच्छिला पदार्थ उत्पन्न होतो. ही बातमी कोशधर्मानें जेव्हां ऐकिली, तेव्हां तो पूर्वी देवांनीं सांगितलेली खून समजला. पण त्यानें लोकांस ती हकिकत बोलून दाखविली नाहीं. पुढें एके दिवशीं कोशधर्मानें आपल्या वटसिद्ध नागनाथ मुलास मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरुन हात फिरवित व मुलाच्या जेवणांसंबधीं गोष्ट काढिली. तेव्हा तो म्हणाला, तुम्हांसहि मी असाच चमत्कार दाखवुन भोजनास घालितो. असें म्हणुन तो मांडीवरुन उतरला व जमिनीवर हात ठेवुन षड्रस अन्नाची इच्छा प्रकट करतांच उत्तम उत्तम पदार्थानीं भरलेलें पान तेथें उत्पन्न झालें तें पाहून कोशधर्मास फारच नवल वाटलें. मग हें साधन तुला कसें साध्य झालें. असें बापानें विचारल्यावर तो म्हणाला बाबा ! आम्हीं एकदां पुष्कळ मुलें नदीतीरीं खेळत होतो. इतक्यांत दत्तात्रेय नांवाचा मुलगा आला. त्याचा सर्व मुलांनी धिक्कार केला पण मी त्याची लटक्याचा पदर्थानें मनोभावें पूजा केली. तेव्हां त्यानें माझ्या मस्तकावर हात ठेवून कानांत कांहीं मंत्र सांगितला व अन्न वाढावयास लाविलें. त्या दिवसापासून माझ्या हातुन पाहिजे तो पदार्थ निर्माण होतो. हें ऐकुअन बापास परमानंद झाला. मग तो त्या दिवसापासुन मुलाकडून अथीताभ्यागतांची पुजा करवून त्यांस भोजन घालुन पाठवू लागला. त्यानें दत्तात्रयास आनंद झाला नागनाथाकडे हजारो मनुष्य जेवून द्रव्य, वस्त्र , धान्ये वगैरे घेऊन जाऊं लागली. या योगानें तो जगविख्यात झाला. जो तो त्याची कीर्ति वाखाणूं लागला. एके दिवशीं नागनाथानें बापास विचारलें कीं , माझ्या हातानें या गोष्टी घडतात यांतला मुख्य उद्देश कोणता ? तसाच तो दत्तात्रेय मुलगा कोण होता, हें मला खुलासा करून सांगावें तेव्हां बाप म्हणाला तो द्त्तात्रेय तिन्हीं देवांचा अवतार होय. तुझे दैव्य चांगले म्हणून तुला भेटुन तो सिद्धि देऊन गेला. तें ऐकून पुनः त्यावर बाप म्हणाला , तो एके ठीकाणी निसतो; यामुळें त्याची भेट होणें कठीण होय. त्याच्या भेटीची इच्छा धरुन प्रयत्ना चालविल्यानें भेट होते असें नाहीं. तो आपण होऊन कृपा करून दर्शन देईल तेव्हां खरें असें सांगुन बाप कांहीं कामाकरितां घराबाहेर गेला. मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरिता जायाचा नागनाथानें निश्चय केला. तो कोणास न विचारतां घरुन निघाला व मातापुरी, पांचाळेश्वर वगैरे ठिकाणीं शोध करुं लागला. परंतु तेथें पत्ता न लागल्यामुळें कोल्हापुरास गेला व तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयीं चौकशीं करुं लागला . तेव्हा लोक त्यास समजुन हंसले व दत्तात्रेय येथें येतो पण कोणास दिसत नाहीं कोणत्या तरी रुपानें येऊन भिक्षा मागूण जातो असें त्यांनी सांगितले. तें ऐकून दुसऱ्या क्षेत्रांत त्यास भिक्षा मिळत नाहीं कीं काय असें नागनाथानें विचारिलें या नाथाच्या प्रश्नावर लोकांनीं उत्तर दिलें कीं तो या कोल्हापुराशिवाय दुसऱ्या ठिकाणचें अन्न सेवन करीत नाहीं. येथें अन्न न मिळालें तर तो उपवास करील, पण अन्नासाठी दुसऱ्या गांवीं जाणार नाहीं. अन्य गांवच्या पक्वांन्नांस विटाळाप्रमाणें मानून या गांवांत अन्न परम पवित्र असं तो मानितो. मग वटसिद्ध नागनाथानें विचार केला कीं, गांवांत कोठेंहि स्वयंपाक होऊं न देतां सर्वांस येथेंच भोजनास बोलवावें म्हणजे त्यास तिकडे कोठें अन्न मिळणार नाहीं व सहजच तो आपल्याकडे येईल. परंतु आपल्याकडचें सिद्ध अन्न तो घेणार नाही, ही खून लक्षांत ठेवुन ओळख पटतांच त्याचें पाय धरावे. माझें नांव त्यास व त्याचें नांव मला ठाऊक आहे, असा मनांत विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयांत गेला व पुजाऱ्यापासुन एक खोली मागून घेऊन तेथें राहिला. कांहीं दिवस गेल्यावर गांवजेवणावळ घालावी असें नाथाच्या मनांत आलें त्यानें ही गोष्ट पुजाऱ्याच्यापाशीं काढून खटपटीस मदत करण्यासाठी विनंती केली. तेव्हां पुजारी म्हणाला, साऱ्या गावाच्या समाराधनेस पुरेल इतक्या अन्नाचा संग्रह तुझ्याजवला कोठें आहे? एरव्हीं वरकड सर्व खटपट आम्हीं करुं पण सामान कोठून आणणार ? त्यावर नाथानें सांगितलें कीं, सामग्री मी पुरवितो, तुम्ही खटपट मात्र करुं लागा. तें त्याचें म्हणणें पुजाऱ्यानें कबूल केलें. शेवटीं नाथानें द्रव्य, धान्यें, तेल, साखर वगैरे सर्व सामुग्री सिद्धीच्या योगानें चिकार भरुन ठेविली व पुजाऱ्यास बोलावून ती सर्व सामग्री दाखविली. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ *******************************************

Search

Search here.