श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय ३७ ते ४०

ग्रंथ - पोथी  > श्री नवनाथ भक्तिसार कथा Posted at 2019-02-17 05:48:04
श्री नवनाथ भक्तिसार कथा --- अध्याय ३७ ते ४० अध्याय ३७ नागनाथास दत्तात्रेयाचे दर्शन, नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांची भेट... वटसिद्ध नागनाथ कोल्हापुरास आल्यानंतर ग्रामभोजनाच्या मिषानें दत्तात्रेयाचें दर्शन होईल; असा विचार करुण त्यानें सामानाच्या व द्रव्याच्या राशी तयार केल्या, पुजाऱ्यास दाखविल्या आणि राजापासुन रंकापर्यंत व ब्राह्मणापासुन अत्यंजापर्यंत सर्वास दोन्ही वेळचें सहकुंटूंब, सहपरिवार, पाहूण्यासुद्धां भोजनाचें आमंत्रण दिले. गांवांत स्वयंपाकासाठीं कोणी चूल पेटवू नये, सकाळीं व मध्यल्या वेळींही भूक लागली तर तिकडेच फराळाचा बेत ठेविला असल्याचें आमंत्रणांत सुचविलें होते. निरनिराळ्या जातींत भ्रष्टाकार होऊं नये म्हणुन बंदोबस्त ठेवुन कार्याची सुरुवात झाली. यामुळें गांवांत कोणीच स्वयंपाकाकरितां चूल पेटविली नाहीं. अन्न घरीं घेऊन जाण्यादेखील मनाई नव्हती. कोरडं किंवा शिजलेलें अन्न, जसें हवें असेल तसें व लागेल तितकें घेऊन जाण्याची मुभा होती. यामुळें गांवांत ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध अन्न भरलें होतें. दिव्या लावण्यासाठीं मात्र लोकांनी विस्तवाची गरज पडे. हा समाराधनेचा समारंभ एकसारखा महिनाभर चालला होता. त्यामुळें पहिल्याच दिवशीं दत्तात्रेयास भिक्षेची मारामार पडली. त्या दिवशीं तो कुत्सित रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होता. तो तेथें जाई तेथें लोक त्यास म्हणत कीं, अरे भीक कां मागतोस ? आज गांवात मोठें प्रयोजन आहे तिकडे जा, चांगलें चांगले जेवयास मिळेल. तूं तरी एक वेडा दिसतोस. उतम उत्तम पक्वान्नांचें भोजन सोडून कदान्नाकरितां गांवांत कां भटकतोस ? आम्हां सर्वांना जेवावयास जावयाचें आहे, तुझ्यासाठीं स्वयंपाक करावयास कोण बसतो ? मग प्रयोजनाचा कसा काय बेतबात आहे तो स्वतः जाऊन पाहण्याचा दत्तात्रेयाचा विचार ठरला. त्यानें तिकडे जाऊन संपूर्ण पाकनिष्पत्ति कशी काय होते हें नीट लक्षांत आणिलें सिद्धिच्या योगानें अन्नाच्या राशी झाल्या, हें तो पक्केपणीं समजला. मग ही मोठी समाराधना येथें कोण घालीत आहे ह्याची दत्तात्रेयानं विचारपूस केली. तेव्हां वटसिद्ध नागनाथाचें नांव त्यास लोकांनीं सांगितले. आपण वीस वर्षापूर्वी ज्यास सिद्धि दिली तो हा असुन आपल्या दर्शनाच्याच इच्छेनें त्यानें या गांवीं येऊन हें संतर्पण करण्याचें सुरु केले, असें दत्तात्रेयाच्या लक्षांत आलें. त्यानें त्या दिवशीं उपवास केला. तो तेथून तसाच परत जाऊं लागला असतां लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला. पण तें सिद्धीचें अन्न असल्यामुळें न जेवतां तसाच तेथून निघून गेला. तो दररोज गांवांत येऊन सुकी भिक्षा मागे. कोणी जास्त चौकशी करून विचारिलें तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय अन्नसेवन करीत नाहीं, असें सांगे व काशीस जाऊन भोजन करी. याप्रमाणें एक महिना लोटला. नागनाथानें विचार केला कीं, अजुन स्वामींचें दर्शन होत नाहीं हें काय ? मग त्यानें ग्रामस्थ मंडळींस विचारिलें कीं, गांवांत भिक्षा मागणारा कोणी अथीत येत असतो काय ? त्यावर लोकांनी सांगितलं कीं, एकजण नियमितपणें येतो; परंतु त्याच्या भिक्षान्न सेवन करण्याचा नियम असल्यामुळें तो तुमचें अन्न घेत नाही. गांवांत इतर शिजलेलें अन्न त्यास मिळत नाहीं म्हणून कोरान्न मागतो. मग भिक्षेकरी पुनः आल्यास मला सांगावें म्हणजें मीं स्वतः जाऊन त्याची विनवणी करीन व त्यास आणुन भोजन घालीन, असें नाथानें त्या लोकांना सांगुन ठेविलें त्या वेळीं त्यांना अशीहि सूचना केली होती कीं, त्या भिक्षा मागणाऱ्याला कोरडी भिक्षा घालूं नये. येथल्याच अन्नाची त्यास सांगुन सवरून भिक्षा घालावी व ती जर त्यानें न घेतली तर मला लागलेंच कळवावें. असें सांगून त्यांस सिद्धिचें पुष्कळ अन्न दिलें. पुढें दत्तात्रेय भिक्षेस आला असतां हें नाथाकडचं अन्न असें बोलून लोक भिक्षा घालूं लागले. ती तो घेईना. मग आपापल्या घरची कोरडी भिक्षा घालूं लागले. पण संशयावरून तीहि तो घेईना. इतक्यांत कोणी जाऊन ही गोष्ट नाथास कळविली. त्या सरसा तो लगबगीनें तेथें आला. त्यास लोकांनी लांबूनच तो भिक्षेकरी दाखविला. त्याबरोबर नाथानें त्याच्याजवळ जाऊन हात जोडून पायांवर मस्तक ठेविलें. नंतर बहुत दिवसांत माझा समाचार न घेतल्यामुळें मी अनाथ होऊन उघड्यावर पडलो आहें. आतां मजवर कृपा करावी, अशी स्तुति केली. त्याची तिव्र भक्ति पाहून दत्तात्रेयानें त्यास उठवून हृदयीं धरिलें व तोंडावरुन हात फिरविला. तसेंच त्याच्या डोळ्यांतले अश्रु पुसलें व त्यास एकीकडे नेऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कानांत मंत्र सांगितला. ती आत्मखून समजतांच तो ब्रह्मपरायण झाला व त्याच्या अज्ञानाचा समुळ नाश झाला. दत्ताचें स्वरूप पाहातांच त्यास अनुपम आनंद झाला. त्या समयीं तो दत्तात्रेयाच्या पायां पडला. त्यास स्वामीनें मांडीवर बसविलें व त्याची पूर्वजन्मकथा सांगितली व तुं ऐरहोत्र नारायणाचा अवतार आहेस, ह्यामुळें मी तुला सिद्धि दिली होती, असेंहि बोलून दाखविलें. तुझी भेट घेण्याचें फार दिवस मनांत होतें, पण प्रारब्धानुसार तो योग घडुन आला, असें दत्तात्रेयानें सांगितलें. मग ते उभयंता तेथून काशीस निघाले. जातांना दत्तानें यानमंत्रानें भस्म मंत्रुन नाथाच्या कपाळीं लाविलें व ते एका निमिषांत काशीस गेले. तेथें नित्यनेम उरकून क्षणांमध्यें ते बदरीकाश्रमास गेले व शिवालयांत जाऊन दत्तानें उमाकांताची भेट घेतली. उभयतांच्या भेटी झाल्यानंतर समागमें दुसरा कोण आणिला आहे, असें शंकरानें दत्तास विचारलें. तेव्हा दत्तानें हा नागनाथ ऐरहोत्र नारायणाचा अवतार आहे, असें कळविल्यानंतर शंकरानें त्यास नागपंथाची दीक्षा देण्याची सुचना केली, ती लागलीच दत्तानें कबूल केली. मग नागनाथासह दत्तात्रेय तेथें सहा महिनें राहिले. तितक्या अवकाशांत नाथांस सर्व विद्यांत व चौसष्ट कलांत निपुण केलें. मग नागाश्वार्त्थी जाऊन सर्व साधने सिद्धि करून घेतल्यावर दत्तानें त्यास पुनः बदरिकाश्रमास नेऊन तपश्चर्येस बसविलें व नाथदीक्षा दीली. तेथें त्यानें बारा वर्षें तपश्चर्या केली. त्यास संपूर्ण देवांनीं अनेक वर दिलें नंतर त्यानें मावंदे करून देव, ऋषि आदिकरून सर्वांस संतुष्ट केलें. नंतर सर्व आपपल्या स्थानीं गेले. पुढें दत्तात्रेयानें नाथास तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार दत्ताच्या पायां पडून नागनाथ तीर्थयात्रा करावयास निघाला व दत्तात्रेय निरिनारपर्वतावर गेला. नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास गेला. तेथें अरण्यांत राहिला असतां गांवोगांवचे लोक त्याच्या दर्शनास येऊं लागले. त्यांनीं त्यास तेथें राहण्याचा आग्रह केला. व त्याच्याजवळ पुष्कळ लोक येऊन राहूं लागले. त्या गांवाचें नांव वडगाव असें ठेविलें. पुढें एकें दिवशीं मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असतां त्या गांवात आले. तेथे नागनाथाची कीर्ति त्याच्या ऐकण्यांत आली. मग मच्छिंद्रनाथ नागनाथाच्या दर्शनास गेला असतां दरवाजांतुन आंत जातांना दाराशीं असलेल्या शिष्यांनी त्यास हरकत करून आंत जांताना मनाई केली. ते म्हणाले, नाथबाबा ! पुढें जाऊं नका. आम्ही नागनाथास कळवून मग तुम्हांस दर्शनास नेऊं . त्याच्या परवानगीवांचून आंत जाण्याचि मनाई आहे. शिष्याचें हें भाषण मच्छिंद्रनाथानें ऐकताच त्यास मोठा क्रोध आला. देवाच्या किंवा साधुच्या दर्शानास जाण्याची कोणाचीही आडकाठी नसावी, अशी पद्धत असतां येथें हा सर्व दांभिक प्रकार दिसतो, असें मनांत आणुन मच्छिंद्रनाथानें त्या शिष्यांस तांडण केलें. तें पाहून नागनाथाचे दुसरे सातशें शिष्य धांवले. परंतु त्या सर्वांना त्यांनीं स्पर्शास्त्राच्या योगानें जमिनीस खिळवुन टाकिले. व तो एकेकाच्या थोबाड्यांत मारूं लागला. तेव्हां त्यांनीं रडुन ओरडुन आकांत केला. मठामध्यें नागनाथ ध्यानस्थ बसला होता.तो ही ओरड ऐकून देहावर आला. ध्यानात घोटाळा झाल्यानें नागनाथास राग आला; त्यानें शिष्यांची ही अवस्था समक्ष पाहिली व मच्छिंद्रनाथासहिं त्यांच्या थोबाडांत मारतांना पाहिलें. तेव्हां त्यानें प्रथम गरुडबंधनविद्या जपून स्थर्गी गरुडाचें बंधन केलें व नंतर विभक्तास्त्र जपून आपले शिष्य मुक्त केले. ते मुक्त होतांच नागनाथाच्या पाठीशीं जाऊन उभे राहिले. त्या सर्वांना चूर्ण करण्याचा मच्छिंद्रनाथाच्या विचार करून पर्वतास्त्राची योजना केली तेव्हां आपल्या अंगावर विशाल पर्वत येत आहे, असें पाहून नागनाथानें वज्रास्त्राचा जप करितांच इंद्रांनें वज्र सोडून दिलें. तेव्हां तो पर्वत चूर्ण झाला अशा रीतींने ते उभयतां एकमेकांचा पाडाव करण्याकरितां मोठ्या शौर्यानें लढत होते. शेवटीं नागनाथानें सर्पास्त्र पेरून मोठमोठाले सर्प उप्तन्न केले. ते येऊन मच्छिंद्रनाथास दंश करुं लागले. तेव्हां मच्छिंद्रनाथानें गरुडास्त्राची योजना केली, परंतु नागनाथानें पूर्वीच गरुडास्त्रानें गरुडास बांधून टाकिल्यामुळें मच्छिंद्रनाथास गरुडास्त्राचा प्रयोग चालेनास झाला. सर्पानीं मच्छिंद्रनाथास फारच इजा केली, तेणेंकरून तो मरणोन्मुख झाला. त्यानें त्या वेळी गुरुचें स्मरण केलें की, देवा दत्तात्रेया ! या वेळेस विलंब न करता धाव. मच्छिंद्रनाथानें दत्तात्रेयाचें नांव घेतल्याचें पाहून नागनाथं संशयांत पडला. आपल्या गुरुचें स्मरण करित असल्यामुळें हां कोण व कोणाचा शिष्य ह्याचा शोध करण्याकरितां नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेला आणि त्यास विचारूं लागला. तेव्हां ' आदेश ' करून मच्छिंद्रनाथानें आपलें नांव सांगुन म्हटलें, माझा गुरु दत्तात्रेय, त्याच्या मी शिष्य आहे. माझ्याजवळ जालंदर, नंतर भर्तृहरी, त्याच्यामागुन रेवण. या नाथपथांत प्रथमच मीच आहे. म्हणुन मी दत्तात्रेयाचा वडील मुलगा आहे. अशी मच्छिंद्रनथानें आपली हकिकत सांगितली. ती ऐकून नागनाथास कळवळा आला. त्यानें लागलेंच गरुडांचे बंधन सोडुन गरुडाचा जप केला तेव्हां गरुड खालीं उतरला व सर्प भयभीत होऊन व विष शोधून अदृश्य झाले. गरुडाचें काम होतांच तो दोघां नाथांस नमस्कार करून स्वर्गास गेला. नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पायां पडला व म्हणाला, वडील बधु पित्यासमान होय, म्हणुन तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहांत. मग त्यास तो आपल्या मठांत घेऊन गेला व एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतलें. एके दिवशीं मच्छिंद्रनाथानें नागनाथास विचारलें कीं, तूं दाराशीं सेवक ठेवुन लोकांना आंत जाण्यास प्रतिबंध करतोस ह्यातील हेतु काय, तो मला सांग. भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात. तुझ्या शिष्यांनी त्यांना जाऊं दिलें नाहीं म्हणजे त्यांना परत जावें लागतें. आपला दोघांचा तंटा होण्याचें मुळ कारण हेंच. हें ऐकून नागनाथानें आपला हेतु असा सांगितला कीं, मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्यानें धानभंग होतो. म्हणुन दाराशीं रक्षक ठेविले. त्यावर मच्छिंद्रनाथानें त्यास सांगितलें कीं असें करणें आपणास योग्य नाहीं. लोक पावन व्हावयास आपल्या कडे येतात. व ते दारापासुन मागें जातात. तरी आतांपासुन मुक्तद्वार ठेव. असें सांगुन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस गेले. इकडे दाराशीं मनाई नसल्यामुळें नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊं लागली. त्या नाथाच्या शिष्यांतच गुलसंत म्हणुन एक शिष्य होता. त्यांची स्त्री मठांत मृत्यु पावली; तिला नाथानें उठविलें. हा बोभाटा झाला. मग कोणी मेलें म्हणजे प्रेत मठांत नेत व नागनाथ त्यास जिवंत करुण घरीं पाठवुन देई; यामुळें यमधर्म संकटांत पडला. त्यानें हें वर्तमान ब्रह्मदेवास कळविलें, मग ब्रह्मदेव स्वतः वडवाळेस येऊन त्यानें नाथाचा स्तव करून तें अद्‌भुत कर्म करण्याचें बंद करविलें. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************************ अध्याय ३८ चरपटीची जन्मकथा; सत्यश्रव्याकडे बालपण, नारदाचा सहवास..... चरपटीच्या उत्पत्तीची अशी कथा आहे कीं , पूर्वी पार्वतीच्या लग्नासमयीं सर्व देव, दानव, हरिहर, ब्रह्मदेव आदिकरुन देवगण जमलेला होता, ज्या वेळीं पार्वतीचें अप्रतिमा लावण्य व रूप पाहून ब्रह्मदेवास काम उत्पन्न झाला. तो त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन वीर्य पतन पावलें. तेव्हां ब्रह्मादेवास संकोच वाटला. व त्यानें तें वीर्य टांचेनें रगडिलें; तें पुष्कळ ठिकाणीं पसरलें. त्यापैकीं एक बाजुस गेलें त्याचें साठ हजार भाग झालें व त्यापासुन साठ हजार वालखिल्य ऋषि निर्माण झाले. दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता. तो सेवकानें केर झाडुन काढिला त्यांत गेला. पुढें लग्नाविधींनंतर लज्जाहोमाचें भस्म व तो केर सेवकांनीं नदींत टाकुन दिला. त्यांत तें रेतहि वहात गेलें. पुढें तें एका कुशास ( गवतास ) अडकून तेथेंच त्यांत भरुन राहिलें तें तेथें बरेच दिवस राहिलं होतें त्यांत पिप्पलायन नारायणानें सचार केला. तोच हा चरपटीनाथ. हा मुलगा नऊ महिन्यांनीं बाहेर पडुन स्पष्ट दिसूं लागला. सत्यश्रवा या नांवाचा ब्राह्मण पुनीत गांवांत राहात असे. तो सुशील व वेदशास्त्रांत निपुण होता. तो एकंदां भागीरथीतीरीं दर्भ आणावयास गेला असतां कुशाच्या बेटांत गेला. तेथें त्यानें त्या मुलास पाहिलें. तो मुलगा सूर्याप्रमाणें तेजस्वीं दिसत होता. त्यावेळीं सत्यश्रव्याच्या मनांत त्या मुलाविषयीं अनेक शंका येऊं लागल्या. असें हें तेज:पुंज बाळ कोणाचें असावें बरें ? उर्वशीं तर हें आपलें मुल टाकून गेली नसेल ना ? किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याला त्याच्या आईच्या बाजेवरून जलदेवता तर येथें घेऊन आल्या नसतील ? अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनांत येऊं लागल्या. तो मुलाकडे पाही, पण त्याला हात लावीना. आपण ह्यास घरीं घेऊन जावें. हा विचार त्याच्या मनांत येई; पण मुलगा कोणाचा हा निर्णय न ठरल्यामुळें त्या मुलास तो उचलून घेईना. अशा त-हेनें विचार करीत तो कांहीं वेळ तेथेच उभा राहिला होता व मुलगा हातपाय हालवुन रडत होता. थोड्याच वेळांत पिप्पलायन नारायणाचा अवतार झालेला पाहून देवांनीं त्या मुलावर पुष्पवृष्टी केली व जयजयकार करून आजचा दिवस सुदिन मानून कृतकृत्य झालों, असें मनांत आणिलें मुलाच्या अंगावर देव फुलें टाकीत तीं सत्यश्रवा काढी. देव एकसारखी फुलें टाकीत, पण सत्यश्रव्यास ती दिसत नसत; यामुळें त्याच्या मनांत संशय येऊन तो दचकला व हा पिशाच्च्याचा सर्व खेळ असावा असें त्यास वाटलें, मग तो जिवाची आशा धरुन दर्भ घ्यावयाचें सोडून चपळाईनें पळत सुटला. तें पाहून देव हसूं लागलें व सत्यश्रव्या पळूं नको, उभा रहा, असें म्हणूं लागलें. हें शब्द ऐकून तर सत्यश्रवा फारच घाबरला व धूम पळत सूटला. मग सत्यश्रवाची भीति घालवून तो मुलगा त्याच्या हवाली करावा म्हणुन देवांनीं नारदास पाठविले. नारद ब्राह्मणाचा वेष घेऊन सत्यश्रव्यापुढें येऊन उभा राहिला. सत्यश्रवा भयानें पळत असल्यामुळें धापा टाकीत होता व त्याचे प्राण कासावीस झाले होते. इतक्यांत ब्राह्मणरुपीं नारदानें त्यास उभें करून घाबरण्याचें कारण विचारलें तेव्हां त्यानें आपल्या मनांत आलेले सर्व विकल्प सांगितलें. मग नारदानें त्यास एका झाडाखाली नेलें व सावलींत बसुन स्वस्थ झाल्यावर पिप्पलायन नारायणाच्या जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला. तसेंच ही भूतचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणी मुलास घरीं नेऊन त्याचा सांभाळ करावयास सांगितलें. शेवटीं नारद त्यास असेंहि म्हणाला. कीं मीं जें तुला हें वर्तमान सांगितलें ते देवांचें भाषण असुन त्यावर भरंवसा ठेवुन मुलास घेऊन जा व त्याचें उत्तम प्रकारें संगोपन कर. तरी पण माझें स्वर्गांत कसें कळलें हे सत्यश्रव्यास संशय उप्तन्न झाला व क्षणभर उभा राहूण तो पाहूं लागला. नारदाच्या कृपेनें देव त्याच्या दृष्टीस पडलें मग सत्यश्रव्यानें नारदास म्हटलें कीं, तूं सांगतोस ही गोष्ट खरी, मला येथुन देव दिसत आहेत; पण तुं आतां मजबरोबर चल व तो मुलगा तेथून काढूण माझ्या हातांत दे. हें त्याचें म्हणणें ब्राह्मणरूपीं नारदानें कबुल केलें मग तें दोघें भागीरथीच्या तटीं गेले. तेथें नारदानें परमानंदानें मुलगा सत्यश्रव्याच्या स्वाधीन केला व त्याचें नांव चरपटीनाथ असें ठेवावयास सांगितलें हेंच नांव ठेवावें असें देव सुचवीत आहेत असेंहि त्यास सांगितले. नंतर नारद स्वर्गास गेला व सत्यश्रवा आपल्या घरीं आला. सत्यश्रव्याची स्त्री चंद्रा परम पतिव्रता असून मोठी धार्मिक होती. तो तिला म्हणाला, मी दर्भ आणावयास भागीरथीतीरीं गेलों होतो; देवानें आज आपणांस हा मुलगा दिला. याचें नांव चरपटी असें ठेवावें. त्याच्या योगानें देवांचे चरण माझ्या दृष्टीस पडले. असें सांगुन सर्व वृत्त थोडक्यांत त्यानें तिला सांगितला. तें ऐकून तिला परम हर्ष झाला. ती म्हणाली आज दर्भाच्या निमित्तानें वंशवेल आपल्या हातीं आली, असें बोलून तिनें मुलास हृदयीं धरिले. मग तिनें त्यास न्हाऊं घालून स्तनपान करविलं व पाळण्यांत घालूंन त्याचें चरपटी असें नांव ठेवून ती गाणी गाऊं लागली. पुढें तो मुलगा उत्तरोत्तर वाढ्त चालला. सातव्या वर्षी त्याची सत्यश्रव्यानें मुंज केली व त्यास वेदशास्त्रांत निपुण केलें. पुढें एके दिवशीं नारदाची स्वारी भ्रमण करीत करीत त्याच गांवांत आली. आंगंतुक ब्राह्मणाच्या वेषानें नारद सत्यश्रव्याच्या घरीं गेला. त्यानें चरपटीनाथास पाहिलें, त्या वेळेस त्याचें वय बारा वर्षाचं होतें. ब्रह्मदेवाच्या वीर्यापासुन चरपटीची उत्पत्ती असल्यामुळें तो आपला भाऊ असें समजून त्याचा विशेष कळवळा येई. चरपटीनाथास पाहिल्यानंतर नारद तेथुन निघुन बदरिकाश्रमास गेला व तेथें त्यानें शंकर, दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ ह्यांची भेट घेतली. मग चौघेजण आनंदानें एकें ठिकाणीं बसलें असतां गोष्टी बोलतां बोलतां चरपटीचा मूळारंभापासुन वृत्तांत त्यांस नारदानें सांगितला. तो ऐकून शंकरानें दत्तात्रेयास सांगितलें कीं, तुमची मर्जी नवनारायणांस नाथ करण्याची आहे; त्याअर्थीं चरपटीस आपण दीक्षा देऊन नाथपंथात आणावं त्यावर दत्तात्रेयानें म्हटलें कीं पश्चात्तपावांचुन हित करुण घेतां येत नाहीं; यास्तव चरपटीस अनुताप झाल्यानंतर पाहतां येईल त्यावर नारदानें म्हटलें कीं, ही खरी गोष्ट आहे; आतां चरपटीस पश्चात्ताप होईल अशी व्यवस्था मी करितों. पण आपण अनुग्रह देण्याची सिद्धतां करावी, इतकें दत्तात्रेयास सांगुन नारद पुनः त्या गांवीं सत्यश्रव्याकडे आला व त्यानें आपण विद्यार्थीं होऊन राहतो; मला विद्या पढवावी अशी त्यास विनंती केली सत्यश्रव्यानें त्याच्या म्हणण्याचा रुकार दिला . नारदास तो कुलंब या नांवाने हांक मारी. मग कुलंब व चरपटी एके ठिकाणी विद्याभ्यास करूं लागले. सत्यश्रवा ग्रामजोशी होता. एके दिवशीं एका यजमानाकडे ओटीभरण होतें. म्हणुन त्यानें सत्यश्रव्यास बोलाविलें; परंतु सत्यश्रवा स्नानसंध्येंत गुंतल्यामुळें त्यानें चरपटीस पाटविलें व समागमें कुलंबास मदतीस दिलें होते. तो संस्कार चरपटीनें यथाविधि चालविल्यावर यजमानानें त्यास दक्षिणा देण्यासाठीं आणिली. त्यावेळीं कांहीतरीं कुरापत काढून व तंटा करून चरपटीचें संसारावरचें मन उडवावें असा नारदानें बेत योजून तो चरपटीस म्हणाला, तूं या वेळेस दक्षिणा घेऊं नकोस. कारण, दोघे विद्यार्थीं अजून अज्ञान आहोत , दक्षिणा किती घ्यावयाची हें आपणेंस समजत नाहीं व यजमान जास्त न देतां कमीच देईल. यास्तव घेतल्या वांचून तूं घरीं चल. मागाहून सत्यश्रवा येऊन दक्षिणा घेईल. त्यावर चरपटी म्हणाला, मी रिकाम्या हातीं घरीं कसा जाऊं ? तेव्हां नारद म्हणाला तूं घेतलेली दक्षिणा जर कमी असली तर ती तुझा पिता कबूल करणार नाहीं. हें ऐकून चरपटी म्हणाला, मी यजमानापासुन युक्तीनें पुष्कळ दक्षिणा काढून घेतों. वाजवीपेक्षां जास्त दक्षिणा दाखविल्यावर बाप कशासाठीं रागे भरेल ? उलट शाबासकी देईल अशीं त्यांची भाषणे होत आहेत इतक्यांत यजमानानें थोडीशीं दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेविली. नारदानें आधींच कळ लावून दिली होती. तशात दक्षिणाहि मनाप्रमाणें मिळाली नाहीं, म्हणुन चरपटीस राग आला. तो यजमानास म्हणाला, तुम्हीं मला ओळखिलें नाहीं. हें कार्य कोणतें, ब्राह्मण किती योग्यतेचा, त्याच्यायोग्य दक्षिणा किती द्यावयाची याचें तुम्हांस बिलकुल ज्ञान नाहीं. तें चरपटीचें भाषण ऐकून यजमान म्हणाला, मुला ऐकून घे. तुजा पुष्कळ दक्षिणा द्यावी खरी, पण यजमानास सामर्थ नसेल तर तो काय करील ? तेव्हां चरपटी म्हणाला, अनुकुलता असेल त्यानेंच असलीं कार्यें करण्यास हात घालावा ! अशा त-हेनें दक्षिणेबद्दल उभयतांची बरीच बोलाचाली सुरु झाली. तें पाहून, चरपटीनें दक्षिणेसाठीं यजमानाशीं मोठा तंटा करून त्यानें मन दुखविल्याचें वर्तमान नारदानें घरीं जाऊन सत्यश्रव्यास सांगितलें आणि त्यास म्हटलें, चरपटीनें निष्कारण तंटा केला. यामुळें आतां हा यजमान मात्र तुमच्या हातांतुन जाईल. यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार. आज चरपटीनें भांडून तुमचें बरेंच नुकसान केलें. आपण पडलों याचक; आर्जव करून व यजमानास खूष करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजेत. नारदानें याप्रमाणें सांगितल्यावर सत्यश्रवा रागावला व पूजा आटोपून लागलाच यजमानाकडे गेला. तेथें दोघांची बोलाचाली चालली होती, ती त्यानें समक्ष ऐकीली. ती पाहून त्यास मुलाचा अधिक राग आला व यजमानाबरोबर भांडल्याबद्दल त्यानें खाडकन त्याच्या तोंडांत मारली. चरपटी अगोदर रागांत होताच, तशांच बापानें शिक्षा केली. या कारणानें त्यास अत्यंत राग येऊन तो तेथून पश्चात्तापानें निघून गांवाबाहेर भगवतीच्या देवालयांत जाऊन बसला. नारद अंतसाक्षीच, त्याच्या लक्षांत हा प्रकार येऊन त्यानें दुसऱ्या ब्राह्मणाचें रूप घेतलें व तो भगवतीच्या देवालयांत दर्शनास गेला दर्शन घेतल्यावर त्यानें चरपटीजवळ बसून तुम्हीं कोण, कोठें राहतां म्हणुन विचारलें. तेव्हां चरपटीनें सर्व वृत्तांत त्यास सांगितला. तो ऐकून ब्राह्मणरूपी नारदानें बोलून दाखविलें कीं त्या सत्यश्रवा ब्राह्मणाला वेड लागलेलें दिसतें. अविचारानें मुलगा मात्र हातांतला घालविला. त्या मुर्ख म्हाताऱ्याची बुद्धि चळली खचित आतां तूं त्याला पुनः तोंड दाखवूच नको, खुशाल त्याचा त्याग करून अरण्यांत जा. ह्याप्रमाणें नारदानं सांगतांच, चरपटीस पूर्ण पश्चात्ताप होऊन त्यानें पुनः घरीं न जाण्याचें ठरविलें आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला, तुम्हीं माझ्या घरीं जाऊन गुप्तपणानें त्या कुलंबास घेऊन या, म्हणजे आम्ही दोघे कोठें तरी अन्य देशांत जाऊन विद्याभ्यास करून राहूं. मग तो ब्राह्मणरुपी नारद कुलंबास आणावयासाठीं उठून बाहेर गेला. थोड्या वेळानें कुलंबाचा वेष घेऊन आला. नंतर सत्यश्रव्यापाशीं न राहतां अन्यत्र कोठं तरी जाऊन अभ्यास करून राहूं असा कुलंबाचाहि अभिप्राय पडला. मग ते दोघे एके ठिकाणी एकमतानें राहण्याचें ठरवून तेथून निघाले. ते बरेच लांब गेल्यावर कुलंबानें म्हटलें कीं, आतां आपण प्रथम बदरिकाश्रमास जाऊं व बदरी केदाराचें दर्शन घेऊन मग काशीस जाऊन तेथें विद्याभ्यास करुं हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला. मग ते दोघे बदरिकाश्रमास गेले. तेथें देवालयांत जाऊन त्यांनीं बदरीकेदारास नमस्कार केला. इतक्यांत दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथा प्रकट झाले. कुलंबानें ( नारदानें ) दत्तात्रेयाच्या पायां पडून मच्छिंद्रनाथास नमस्कार केला. चरपटीहि दोघांच्या पायां पडला व हें उभयतां कोण आहेत म्हणुन त्यानें कुलंबास विचारलें. मग कुलंबानें त्याची नावें सांगितली व स्वतःकडे हात करून म्हटलें कीं, या देहाला नारद म्हणतात; तुझें कार्य करण्यासाठीं मीं कुलंबाचा वेष घेतला होता. हें ऐकून चरपटी नारदाच्या पायां पडून दर्शन देण्यासाठीं विनंति करुं लागला. तेव्हां नारदानें त्यास सांगितलें कीं, आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊं. परंतु गुरुप्रसादावांचुन आम्ही तुला दिसणार नाहीं. एकदां गुरुनें कानांत मंत्र सांगितला कीं, सर्व जग ब्रह्मरूप दिसेल. तें ऐकून चरपटी म्हणाला, तुमच्याहुन श्रेष्ठ असा कोणता गुरु मी शोधून काढूं ? तरी आतां तुम्हीं मला येथें अनुग्रह देऊन सनाथ करावें. तेव्हां नारदानें दत्तात्रेयास सुचना केली. मग दत्तानें चरपटीच्या मस्तकावर हात ठेविला व कानांत मंत्र सांगितला. तेव्हां त्याचें अज्ञान लागलेंच जाऊन त्यास दिव्यज्ञान प्राप्त झालें. मग चरपटीनाथास त्यांचें दर्शन झालें. त्यानें तिघांच्या पायांवर मस्तक ठेविलें. ह्याच संधीस शंकरानेंहि प्रकट होऊन चरपटीनाथास दर्शन दिले. त्याच्या तोंडावरून हात फिरविला आणि विद्याभ्यास करवून नाथपंथ देण्याबद्दल दत्तात्रेयास सांगितलें. मग दत्तात्रेयानें त्यास सर्व विद्या पढविल्या; संपूर्ण अस्त्रविद्येंत वाकबगार केलें व तपश्चर्येंस बसविलें. पुढें नागअश्वर्त्थी जाऊन बारा वर्षें राहून वीरसाधन केलें व नवकोटी सातलक्ष साबरी कवित्व केलें. मग त्यास सर्व देवांनीं येऊन आशीर्वाद दिले. नंतर श्रीदत्तात्रेय गिरिनारपर्वतीं गेले व चरपटी तीर्थयात्रेस निघाला. त्यानें रामेश्वर, गोकर्णमहाबळेश्वर, जगन्नाथ, हरिहरेश्वर, काशीं आदिकरून बहुतेक तीर्थें केली, त्यानें पुष्कळ शिष्य केले, त्यातुंन सिद्धकला जाणणारें नऊ शिष्य उदयास आले. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************************ अध्याय ३९ सत्यलोकी चरपटीनाथ व नारद यांचें वास्तव्य... पुढें चरपटीनाथानें पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग, पाताळ या ठिकाणच्याहि तीर्थयात्रा कराव्या असें त्याच्या मनांत आले. मग त्यानें बदरिकाश्रमास जाऊन उमाकांताचें दर्शन घेतलें. तेथें त्यानें यानास्त्राचा प्रयोग सिद्ध करून भस्म कपाळास लावून स्वर्गी गमन केलें. तो प्रथम सत्यलोकास गेला व ब्रह्मदेवाच्या पायां पडून व हात जोडून जवळ उभा राहिला. तेव्हां हा योगी कोण कोठून आला, याची ब्रह्मदेव चौकशी करुं लागला असतां नारद तेथें होताच; त्यानें चरपटीनाथाचा जन्मापासुन सर्व वृत्तांत त्यास निवेदन केला. तो ऐकून घेऊन ब्रह्मदेवानें त्यास मांडिवर बसविलें नंतर येण्याचे कारण विचारल्यावर, तुमच्या दर्शनासाठी आलों असें चरपटीनाथानें सांगितले, मग ब्रह्मादेवाच्या आग्रहास्तव तो तेथें एक वर्ष राहिला. चरपटीनाथ व नारद एकमेकास न विसंबितां एक विचारानें राहात असत. एके दिवशीं नारद अमरपुरीस गेला असतां ' यावें कळींचे नारद' असें इंद्राने सहज विनोदानें त्यास म्हटलें. तें शब्द ऐकतांच नारदास अतिशय राग आला. मग तो ( कळीचा ) प्रसंग तुजवर आणीन, असं मनांत योजून नारद तेथून चालता झाला. कांहीं दिवस लोटल्यानतंर चरपटीनाथाकडून इंद्राची फटफजिती व दुर्दशा करण्याचा नारदानें घाट घातला. एके दिवशीं फिरावया करितां नारद चरपटीनाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेंत गेला. जातेवेळीं चरपटीनाथ हळू चालत होता. तेव्हा अशा चालण्यानें मजल कशी उरकेल, म्हणुन नारदानें त्यास म्हटल्यावर चरपटीनाथानें उत्तर दिलें की आमची मनुष्याची चालावयाची गति इतकीच. जलद जाण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास तो योजून मला घेऊन चला. तेव्हां नारदानें त्यास गमनकला अर्पण केली. ती कला विष्णुनें नारदाला दिली होती; ती चरपटीनाथास अनायास प्राप्त झाली. तिचा गुण असा आहे कीं ती कला साध्य असणाऱ्याचा जेथें जावयाचें असेल तेथें ती घेऊन जाते व त्रिभुवनांत काय चाललें आहे, हें डोळ्यापुढें दिसतें. कोणाचें आयुष्य किती आहे, कोण कोठें आहे, मागें काय झालें, सध्या काय होत आहे व पुढेहि काय होणार वगैरे सर्व कळतें. अशी ती गमनकला चरपटीनाथास प्राप्त होतांच त्यास अवर्णनीय आनंद झाला. मग ते उभयतां एक निमिषांत अमरपुरीस इंद्राच्या पुष्पवटिकेत गेले. तेथें मला येथील फळें खाण्याची इच्छा झाली आहे, असें चरपटीनथानें नारदास म्हटलें. मग तुला तसें करण्यास कोण हरकत करतो, असें नारदानें उत्तर दिल्यावर चरपटीनें यथेच्छा फळें तोडून खाल्ली. नंतर तेथील बरींच फुलें तोडून सत्यलोकास ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते तेथें त्यांच्याजवळ नेऊन ठेवली; याप्रमाणें ते नित्य इंद्राच्या बागेंत जाऊन फळें खात व फुलें घेऊन जात. त्यामुळें बागेचा नाश होऊं लागला. पण तो नाश कोण करतो, याचा इंद्राचे माळी तपास करीत असतांहि त्यांना शोध लागेना. ते एके दिवशीं टपून बसले. थोड्या वेळानें नारद व चरपटीनाथ हे दोघें बागेंत शिरले व चरपटीनाथानें फळें तोडण्यास हात लावला तोच रक्षकांनी हळुच मागून जाऊन नाथास धरिलें हें पाहून नारद पळून सत्यलोकास गेला. मग रक्षकांनीं चरपटीनाथास धरुन खूप मारले. तेव्हां त्यास राग आला. त्यानें वाताकर्षण अस्त्राचा जप करून भस्म फेकतांच रक्षकांच्या नाड्या आखडून ते विव्हळ होऊन पडले. त्याचें श्वासोच्छवास बंद झाले, डोळे पाढरे झाले व तोंडातुन रक्त निघाले. ही अवस्था दुसऱ्या रक्षकांनीं पाहिली व तें असे मरणोन्मुख कां झाले ह्याचा विचार करीत असतां चरपटीनाथ दृष्टीस पडला, मग ते मागच्या मागेंच पळुन गेले. त्यांनी इंद्रास जाऊन सांगितलें कीं, एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेंत बेधडक फिरत आहे व त्यानें आपल्या रक्षकांचा प्राण घेतला असून सर्व बागेची धूळदाणी करून टाकिली आहे. आमच्या त्याच्यापुढें इलाज चालत नाहीं म्हणुन आपणांस कळविण्यासाठीं आम्हीं येथें आलों. हें ऐकून त्याच्याशीं युद्ध करून त्यास जिंकण्याकरितां इंद्रानें सर्व देवांनां पाठविले. महासागराप्रमाणें देवांची ती अपार सेना पाहून चरपटीनाथानें वाताकर्षण अस्त्रानें सर्वांस मरणप्राय केलें. युद्धास गेलेल्या देवसैन्याची काय दशा झाली ह्याचा शोध आणावयास इंद्रानें कांहीं दूत पाठविले, त्यांनी सैन्य श्वासोच्छवास कोंडून मरावयास टेकल्याची बातमी इंद्रास सांगितली व ते म्हणाले कीं, तो येथें येऊन नगरी ओस पाडुन तुमचाहि प्राण घेईल. तो लहान बाळ दिसतो; परंतु केवळ काळासारखा भासत आहे. हें ऐकुन इंद्रास धसका बसला. त्यानें ऐरावत तयार करण्यास सांगितलें. तेव्हां हेर म्हणाले, त्या बालकाच्या हातांत धनुष्यबाण नाहीं, कीं अस्त्र नाहीं कोणती गुढविद्या त्यास साध्य झाली आहे, तिच्या साह्यानें प्राणी तडफडुन मरण्याच्या बेतास येतो, आपण तेथें जाउं नयें, काय इलाज करणें तो येथुन करावा. नाहीं तर शंकरास साह्यास आणावें म्हणजें तो देवास उठवील. हेरांचे तें भाषण ऐकुन इंद्र कैलासास गेला व शंकराच्या पायांपडून झालेला सर्व वृत्तांत सांगुन ह्या अरिष्टातुन सोडविण्याकरितां प्रार्थना करुं लागला. त्या समयीं तुझा शत्रु कोण आहे म्हणुन शंकरानें विचारल्यावर इंद्र म्हणाला, मीं अजुन त्यास पाहिलें नाहीं त्यानें माझ्या बागेचा नाश केल्यावरुन मी सैन्य पाठविलें. परंतु ते सर्व मरणप्राय झालें, म्हणुन मी पळून येथें आलों आहें. मग शत्रुवर जाण्यासाठीं शंकरानें आपल्या गणांस आज्ञा केली व विष्णुस येण्यासाठीसाहिं निरोप पाठविला. मग अष्टभैरव, अष्टपुत्र, गण असा शतकोटी समुदाय समागमें घेऊन शंकर अमरावतीस गेले. त्यांस पाहतांच चरपटीनाथानें वाताकर्षण मंत्रानें भस्म मंत्रुन फेंकलें; त्यामुळें शंकरासुद्धां सर्वांची मागच्यासारखिच अवस्था झाली. इंद्र शंकर व सर्व सेना मूर्च्छित पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहुन हंसु लागला. नारदास मात्र घटकाभर चांगलीच करमणुक झाली. शिवाच्या दूतांनी वैकुंठीस जाऊन हा अत्यद्भुत प्रकार विष्णुला सांगितला. मग छप्पन्न कोटी गण घेऊन विष्णु अमरावतीस आला व शंकरासुद्धां सर्वांस अचेतन पडलेले पाहून संतापला. त्यानें आपल्या गणांस युद्ध करण्याची आज्ञा दिली. तेव्हां चरपटीनाथानें विष्णुच्या सुदर्शनाचा, गांडीवाचा व इतर शस्त्रास्त्रांचा उपयोग होऊं नये म्हणुन मोहनास्त्राची योजना केली. मग वाताकर्षण मंत्रानें भस्म फेंकतांच संपूर्ण विष्णुगणांची अवस्था सदरहूप्रमाणें झाली. आपल्या गणांची अशी दुर्दशा झालेली पाहून विष्णुनें सुदर्शनाची योजना केली. विष्णुनें महाकोपास येऊन तें आवेशानें प्रेरिलें पण तें नाथाजवळ जातांच मोहनास्त्रांत सापडल्यामुळें दुर्बल झाले. पिप्पलायन हा प्रत्यक्ष नारायण; त्याचाच अवतार हा चरपटीनाथ अर्थात हा आपला स्वामी ठरतो; वगैरे विचार सुदर्शनानें करून नाथास नमन केलें व तें त्याच्या उजव्या हातांत जाऊन राहिलं हातांत सुदर्शन आल्यामुळें चरपटीनाथ प्रत्यक्ष विष्णु असाच, भासूं लागला. शत्रुच्या हातांत सुदर्शन पाहून विष्णुस आश्चर्य वाटलें. मग विष्णु नाथाजवळ येऊं लागला. तेव्हां त्यानें वाताकर्षणास्त्राची विष्णुवर प्रेरणा केली. त्यामुळें विष्णु धाडकन जमिनीवर पडला. त्याच्या हातातली गदा पडली व शंख वगैरे आयुधेंहि गळाली. मग चरपटीनाथ विष्णुजवळ येऊन त्यास न्याहाळून पाहूं लागला. त्यानें त्याच्या गळ्यांतील वैजयंती माळ काढून घेतली. मुगुट, शंख, गदा हीं देखील घेतली. नंतर तो शंकराजवळ गेला व त्याची आयुधें घेऊन सत्यलोकास जाऊन ब्रह्मदेवासमोर उभा राहिला. विष्णुचीं व शिवाची आयुधें चरपटीनथाजवळ पाहुन ब्रह्मदेव मनांत दचकला व कांहीं तरी घोटाळा झाला असें समजून चिंतेंत पडला. मग नाथास मांडीवर बसवुन ही आयुधें कोठून आणलींस असें त्यानें त्याला युक्तीनें विचारलें. तेव्हां चरपटीनें घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला. तो ऐकून ब्रह्मा घाबरला व त्यास म्हणाला बाळ ! विष्णु माझा बाप व तुझा आजा होता. महादेव तर सर्व जगाचें आराध्य दैवत होय. ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होऊन आपलें कांहीं चालणार नाहीं. यास्तव तूं लौकर जाऊन त्यांस उठीव किंवा मला तरी मारून टाक. तें भाषण ऐकून मी त्यांस सावध करतो. असें नाथानें ब्रह्मदेवास सांगितलें. मग ते अमरपुरीस गेले. तेथे विष्णु, शंकर आदि सर्व देव निचेष्टित पडलेले ब्रह्मदेवास दिसले. तेव्हां त्यानें त्यांस लौकर सावध करण्यासाठीं चरपटीनाथास सांगितलें. त्यानें वाताकर्षणास्त्र काढून घेतलें व जे गतप्राण झाले होते त्यास संजीवनीमंत्रानें उठविलें, मग ब्रह्मदेवानें चरपटीनाथास विष्णुच्या व शंकराच्या पायावर घातलें. त्यांनी हा कोण आहे म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवानें नाथाच्या जन्मपासुनची कथा विष्णुस सांगितली विष्णुची व शिवाची सर्व भूषण त्यांना परत देवविली. मग सर्व मडळीं आनंदानें आपापल्या स्थानीं गेली. नंतर नारद गायन करीत इंद्रापाशीं गेला व नमस्कार करून त्यास म्हणाला, तुम्हाला जें इतकें संकटांत पडावें लागलें त्याचें कारण काय बरें ? आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्हीं आम्हांस कळलाव्या नारद म्हणतां. आजचा हा प्रसंग तरी आमच्या कळीमुळें नाहीं ना गुदरला ? तुम्हांस कोणी तरी चांगलाच हात दाखविलेला दिसतो ! हें नारदाचें शब्द ऐकून इंद्र मनांत वरमला. त्यानें नारदाची पूजा करून त्यास बोळविलें व त्या दिवसापासुन त्यानें ' कळीचा नारद ' हे शब्द सोडून दिलें. नंतर पर्वणीस ब्रह्मदेव चरपटीनाथास घेऊन मणिकर्णीकेच्या स्नानास गेले. एकवीस स्वर्गीचें लोकहि स्नानास आले होते. नंतर चरपटीनाथ सत्यलोकास वर्षभर राहोला. तेथुन पृथ्वीवर येऊन तो अन्य तीर्थ करून पाताळांत गेला. त्यानें भोगावतीनें स्नान केलें. तसेंच सप्त पाताळें फिरुन बळीच्या घरीं जाऊन वामनास वंदन केले. त्याचा बळीनें चांगला आदरसत्कार केला. नंतर तो पृथ्वीवर आला. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************************ अध्याय ४० इंद्रानें केलेला सोमयाग; त्याकरिता सर्व नाथाचें आगमन, नवनाथांचा आशिर्वाद व समारोप... चरपटीनाथानें इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणुन इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याच्या मनास लागुन राहिला. त्यानें चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली कीं, तो अल्पवयीं असून तेजस्वी आहे हें खरें ! परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणुन बेतविली आणि आपली करामत दाखविली. इतकें सामर्थ्य दुसऱ्या कोणाचें नाहीं. एक वाताकर्षणविद्या ही देव विद्या कशी फैलावली कळत नाहीं; परंतु ती विद्या आपणांस साध्य होईल अशी कांहीं तरी युक्ती काढावी. नाहीं पेक्षा त्यांच्या घरीं जाऊन त्यांचें दास्यत्व स्वीकारुन त्यांस आनंदीत करावें. अशा भावार्थाचें इंद्राचें भाषण ऐकून बृहस्पतीनें सांगितलें कीं, नाथांस येथें आणावें हें फार चांगलें, सोमयाग करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथें आणावयास ठीक पडेल. ते तेथें आल्यानंतर तूं त्यांच्या खुशामतीमध्यें तत्पर रहा आणि त्यांच्या मर्जीनुरुप वागूंन त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधुन घे, हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो. ही बृहस्पतीची युक्ति इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदहि झाला. परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावें हा विचार पडला. बृहस्पति म्हणाला, अष्टवसुपैकीं उपरिक्षवसु हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय; तो जाऊन त्यास घेऊन येईल. पूर्वी मच्छिंद्रनाथ येथें आला होता तेव्हां त्याचा चांगला आदरसत्कार झालेला आहे. तो नऊ नाथांस घेऊन येऊन तुझा हेतु सफल करील, हें ऐकून इंद्रानें उपरिक्षवसुस बोलावून त्यास आपला हेतु सांगितला व विमान देऊन नाथांस आणावयास पाठविलें. मग तो बदरिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला. गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफा, गोपिचंद्र चालंदर अडबंगी आदि नाथमडळीहि तेथेंच होती. उपरिक्षवसु येतांच मच्छिंद्रनाथानें उठून त्याच्या पायांवर मस्तक ठेविलें त्यानें सर्वासमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथांस अमरपुरीस घेऊन येण्यासाठीं फारच आग्रह केला व त्याजकडून येण्याचें कबूल करून घेतलें. मग जालंदर , कानिफा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष , अंडबंगी, गोपीचंद्र आदिकरुन जोगी विमानांत बसले. गौडबंगाल्यास हेळापट्टणास येऊन गोपीचंदानें आपल्या आईस घेतलें. मग तेथून वडवाळ गांवीं जाऊन वटसिद्धनाथास बोध करून बरोबर घेतलें. तसेंच गोमतीच्या तीरीं. जाऊन भर्तृहरीस घेतलें. ताम्रपर्णीचें कांठीं जाऊन चरपटीनाथास घेतलें. पूणें प्रांतांत विटगांवाहून रेवणनाथास घेतलें असो; याप्रमाणें चौऱ्यांयशीं सिद्धासंह नवनाथ विमानांत बसुन सोमयागाकरितां अमरावतीस गेले. त्याचें विमान आलेलें पाहिल्यबरोबर, इंद्र नाथांस सामोरा गेला आणि नम्रपणानें बोलून त्यांच्या पायां पडला. मग त्यानें सर्वांस घरीं नेऊन आसनावर बसविलें व त्यांची षोडशोपचांरानीं पूजा केली. सर्व देव आनंदानें त्यांच्यापूढें उभे राहिलें. नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतु इंद्रानें सर्वास सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हें कळविण्यासाठी प्रार्थना केली. मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पति यांनीं आपसांत विचार करून सिंहलद्विपामध्यें जें अटव्य अरण्य आहे, तेथें शीतल छाया असुन उदकाचा सुकाळ असल्यानें तें ठिकाणी यज्ञाची तयारी केली व स्त्रीसह स्वतः यज्ञास बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडांत आहुती देण्याच्या कामाची त्यानें योजना केली. हें वन किलोतलेच्या सीमेंत होतें म्हणुन तेथें असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली. म्हणुन मच्छिंद्रनाथानें उपरिक्षवसुस त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितलें . त्याप्रामाणें किलोतलेसहि मी येथें घेऊन येतो असें सांगुन उपरिक्षवसु गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथानें त्यांना राहवुन घेतलें. मच्छिंद्रनाथानें मीननाथास विद्याभ्यास शिकविला. पुढें बृहस्पतीनें इंद्रास सांगितलें कीं, आपण यज्ञास न बसतां उपरिक्षवसुस बसवावें. मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उपरिक्षवसुच्या हातांत इंद्रानें यज्ञकंकण बांधिलें व आपण देखरेख ठेवूं लागला. जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता; त्यानें सेवा करण्यांत कसुर ठेवली नाहीं. ता वेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले. मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवीत असतां, इंद्रानें मयुराच्या रूपानें गुप्तपणें झाडावर राहुन वाताकर्षणमंत्रविद्या साधून घेतली. ती प्राप्त होतांच इंद्रास परमसंतोष झाला. एक वर्ष यज्ञ चालला होता. तोंपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवीत होता. यज्ञसांगतां होतांच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्रानें दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रेंभूषणें देऊन सर्वांस गौरविलें. मग सर्व नाथ कनकासनांवर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंति करुं लागला कीं, माझ्याकडुन एक अन्याय घडला आहे, त्यची मला क्षमा करावी. तो अन्याय हा कीं, मीननाथास विद्या पढवीत असतां ती सर्व मी चोरून शिकलों आहें. यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी. इंद्राचें हें चौर्यकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागानें शाप दिला कीं तुं कपटाने आम्हांस आणुन विद्या साधुन घेतली आहेस; पण ती निष्फळ होईल. तो शाप ऐकून उपरिक्षवसु व बृहस्पति यांनीं पुष्कळ प्रकारांनीं विनवून त्यास संतुष्ट केलें. नंतर इंद्रानें एवढ्या दीर्घ प्रयत्नानें व अति श्रमानें साधलेली विद्या फलद्रुप होण्यासाठीं काहीं तरी तोड काढावी अशी देवदिकांनी विनंति करून रदबदली केली मग नाथ म्हणाले, इंद्रानें बारा वर्षे तपश्चर्यें करावी व नाथपंथाचा छळ करूं नये, म्हणजे त्यास ती फलद्र्प होईल. असा उःशाप देऊन विमानारुढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करूं लागले. या वेळीं मच्छिंद्रनाथानें किलोतलेस विचारुन मीननाथासहि समागमें घेतलें होतें. मैनावतीस हेळापट्टाणास पोंचविलें मीननाथाचें सिद्ध शिष्य तीन झाले. त्या सर्व नाथांची फाटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरूं लागले. इंद्रानें सह्याद्री पर्वतावर बारा वर्षें तपश्चर्या केली. मंत्रयोगाच्या वेळेस तो जें पाणी सोडी त्या उदकांचा प्रवाह वाहं लागून तो भीमरथीस मिळाला. त्या ओघास इंद्रायणी असें नाव पडलें . या प्रमाणें तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला. नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करित होते. शके सत्राशें दहापर्यंत ते प्रकटरूपानें फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्यें कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजुनें मच्छिंद्रनाथ ज्याच्या बायबा असें म्हणतात तो राहिला. जालंदनाथास जानपीर म्हणतात, तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासच गैरीपीर म्हणतात. वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ वीटगांवीं राहिला चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अंडबंगी नाथ गुप्तरुपानें अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत. भर्तरी ( भर्तृहरि ) पाताळीं राहिला. मीननाथानें स्वर्गास जाऊन वास केला. गिरिनारपर्वतीं श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमांत गोरक्षनाथ राहिला. गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले. मग विष्णुनें विमान पाठवुन मैनावतीस वैकुंठास नेलें. चौऱ्यांयशीं सिद्धांपासुन नाथपंथ भरभराटीस आला. आतां नवनाथांचे चरित्र संपलें असें सांगुन मालुकवि म्हणतात. गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयीं असा अभिप्राय आहे कीं, यास जो कोणी असत्य मानील किंवा त्याची निंदा करील तो विघ्नसंतोषी इहपरलोकीं सुखी न राहतां त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकांत पडेल. हा श्रीनवनाथभक्ति कथासागर ग्रंथ शके सत्राशें एकेचाळीस, प्रमाथीनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालुकवीनें श्रोत्यांस सुखरुप ठेवण्यासाठीं व त्यांचे हेतु परिपूर्ण होण्यासाठीं श्रीदत्तात्रेयाची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला. ॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥ ************************************************************

Search

Search here.