बारा राशी स्वभाव माहिती

श्याम जोशी ब्लॉग Posted at 2018-11-27 04:12:46
 बारा राशी आणि स्वभाव --- १ ) मेष मंगळाच्या आधिपत्याखाली येणारी राशी असून याचे प्रतीक ‘मेंढा’ आहे. या राशीत शौर्य, धाडस अगदी ओतप्रोत भरलेले असल्याने अन्यायाविरुद्ध आवाज उठविणेफार आवडते. घरात, अगदी रस्त्यावरही आपला मुद्दा पटवून देण्यासाठी हे लोक हिरिरीने भांडायला तयार असतात. प्रयत्न वादावर पूर्ण विश्वास असल्याने हातपाय गाळून बसणे यांना सहन होत नाही. कामाची सुरुवात धडाडीने करण्यास यांचा हातखंडा असतो. मेंढय़ाप्रमाणे धडक मारण्यास तयार, मग त्यात त्रास झाला तरी बेहत्तर असतात. भाजीत मीठ जास्त पडले, तर जेवत्या ताटावरच बडबड करणारी आणि क्षणात तो राग विसरून जाणारी अशी ही रास आहे. भावनांचे खोटे प्रदर्शन या राशीस सहन होत नाही. जे आहे ते रोखठोक बोलणे यांना अचूक जमते. स्पष्टवक्तेपणा हा स्थायिभाव आहे. पत्नीशी भांडभांड भांडणार, परंतु तिने आणून दिलेल्या चहाचे कौतुक करण्याचा प्रामाणिकपणा या राशीत आहे. गती हा मूलभूत गुण आहे. त्यामुळे एकाच वेळेस अनेक गोष्टींत लक्ष घालण्याची प्रवृत्ती असते; परंतु ही रास शक्यतो आरंभी शूर असते. एखाद्या गोष्टीची सुरुवात धडाडीने करणार, पण ती गोष्ट शेवटपर्यंत यशस्वी करणारच याची शक्यता कमी असते. या राशीत अति मनमानीपणा, अहंपणा, अविचारीपणा दिसून येतो, त्यामुळे एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण न झाल्यास संतापाचे टोक गाठले जाते. समोरील व्यक्ती काय सांगत आहे हे न ऐकताच, स्वत:चे मत प्रदर्शित करण्याची सवय असल्याने शत्रुत्व ओढवून घेतात. शिक्षक गणित शिकवत असताना मेषेचा विद्यार्थी तिकडे लक्ष देणार नाही आणि परीक्षेत चुकीचे उत्तर लिहून मोकळा होईल. स्पष्टवक्तेपणामुळे एखाद्या गोष्टीतली गुप्तता सांभाळणे यांना जमत नाही. चंचल स्वभावामुळे कामात चिकाटी नसते. धांदरटपणा जास्त असल्याने अकारण नुकसान होते. मेषेची स्त्री लग्नानंतर सासूला सुनवास करून घरावर ताबा मिळवू शकते. घरातील सर्वानी माझेच ऐकावे अशी प्रवृत्ती असते. कोणी ऐकले नाही, तर संतापाचे हत्यार आहेच. तिथे मात्र ती असहिष्णू. तुम्ही त्यांना सहिष्णू म्हणालात तर ते तुमच्याबरोबर आनंदाने असतील, नाही तर…अगदी दुसरे टोक…! तुम्हीच ठरवा मग काय म्हणायचे! २ ) वृषभ शुक्राच्या आधिपत्याखाली येणारी राशी असून याचे प्रतीक ‘बैल’ आहे. या राशीत शुक्राचे गुण आहेत, त्यामुळे ही रास प्रेम आणि सौंदर्याची चाहती आहे. या राशीचे लोक आनंदी व मुख्यत: रसिक असतात. मिळणाऱ्या पैशातील बराचसा पैसा हा सौंदर्य प्रसाधने, अत्तर, उंची वस्त्रे यावर खर्च होतो. कलात्मक दृष्टिकोन आणि सर्वाचा मनमुराद आनंद लुटण्याची इच्छा यामुळे हे लोक जिथे असतील तिथे सर्व वातावरण आल्हाददायक, प्रसन्न करतात. कलासक्त व कलाकार स्वभाव असल्याने नाटक/सिनेमा पाहणे, सहलीला जाणे आवडते. सर्व मित्र, नातेवाईक यांना एकत्र करून कोठे तरी सहलीला जाण्यात यांची सहिष्णुता ओसंडून वाहते. शांत अणि सहनशील स्वभाव असल्याने कामात गडबड, धांदरटपणा यांना सहन होत नाही. व्यवहारकुशलता, चिकाटी असल्याने सोळा हजारांचे कपाट साडेपंधरा हजारांत कसे मिळवायचे याचे विचार मनात अगोदरच पक्के ठरलेले असतात. कमीत कमी श्रमात पैसा मिळविण्याचे तंत्र यांना चांगलेच अवगत असते. यामुळे अर्थखाते, फोटोग्राफी, सौंदर्य प्रसाधने या व्यवसायातही लोक जास्त रमतात. स्थिर असल्याने कोणत्याही समस्येवर शांतपणे समतोल विचार करून, साधकबाधक चर्चा करून निर्णय घेतात. आवडणारी, चवदार गोष्ट निवांत मजा मारत खाणे या राशीच्या लोकांना खूप आवडते. या राशीत सत्तेची लालसा, आडमुठेपणा, हेकेखोरपणा, आळशीपणा दिसून येतो. त्यामुळे अकारण कोणत्याही कामात विलंबाचे तोटे पाहावे लागतात. जास्तीचा पैसा मिळविण्यापेक्षा, आहे त्या पैशाचा उपभोग घेण्याची प्रवृत्ती असते, त्यामुळे कष्टाची कामे करण्याची मानसिकता नसते. स्वभावात चोखंदळपणा असल्याने एक शर्ट खरेदी करण्यासाठी दहा दुकानांत चक्कर मारली जाते. या राशीचे पुरुष जबाबदार आणि प्रेमळ पिता असू शकतात. मुलीच्या बाबतीत जास्त हळवे असतात. जर एखादा नातेवाईक, मित्र आवडला नाही, तर काहीही न बोलता त्याच्याकडे जाणे टाकतील. कलात्मक आणि सौंदर्यदृष्टी असलेले या राशीचे लोक वैवाहिक जीवनात फारच रसिक असतात. वैवाहिक साथीदाराएवढा विचार इतरांचा या राशीचे लोक करीत नाहीत. स्वार्थ आणि मज्जा ज्या पारडय़ात असेल त्या गोटातले हे लोक. मग त्यांना तुम्ही सहिष्णू म्हणायचे की काय, हा तुमचा प्रश्न. ३ ) मिथुन बुधाच्या आधिपत्याखाली येणारी राशी असून याचे प्रतीक गदाधारी पुरुष व वीणाधारी स्त्री असलेले हसतमुख जोडपे आहे. या राशीवर बुधाचा अंमल असल्याने कुशाग्र बुद्धी, उत्कृष्ट स्मरणशक्ती, समयसूचकता हे गुण दिसून येतात. बोलण्यात चैतन्य असते, दुसऱ्याचे मतपरिवर्तन करणे सहज जमते. वाचनाची आवड आणि समजावून घेण्याची तत्परता यामुळे एखादा विषय इतरांपेक्षा अधिक प्रमाणात या लोकांना समजतो. वादविवादात आपली प्रतिक्रिया समोरच्याला न समजता, त्याचे मतपरिवर्तन करण्यात हे लोक यशस्वी होतात. सहलीचे वर्णन या राशीचे लोक अशा प्रकारे करतील, की जणू प्रत्यक्ष सहलीला गेल्याचा अनुभव मिळावा. ही स्वभाव रास असल्याने एका वेळी एकच गोष्ट जास्त प्रमाणात असाव्यात असे वाटते, त्यामुळे फोन, वाहने, नोकरीबरोबर जोडधंदा असू शकतो. एकाच विषयाचा सखोल अभ्यास करण्यापेक्षा अनेक विषयांतील माहिती मिळविण्यात या लोकांचा कल असतो. एकाच वेळी पोट भरून जेवण्यापेक्षा सतत काही ना काही खात राहणे या लोकांना अधिक आवडते. जेवणात नावडते किंवा टाकावेत असे पदार्थ फारसे नसतात. अस्थिरता, मानसिक संताप, जाहिरातबाजी, अनावश्यक बडबड यांसारखे दोष या राशीत दिसून येतात. प्रत्येक व्यक्ती, गोष्टींबद्दल आपणास सर्वच माहीत आहे असे दाखवून आपला बोलण्याचा हक्क संपूर्णपणे बजावण्याची प्रवृत्ती असते. त्याचा इतरांवर काय परिणाम होतो याची जाणीव या लोकांना नसते. त्यामुळे कालांतराने लोक यांना टाळू लागतात. गांभीर्याचा अभाव असल्याने नेमके बोलणे जमत नाही. संवादातून जवळीक साधण्याचा गुणधर्म असल्याने, विशेषत: मुलांशी पित्यापेक्षा मित्रचे नाते असते. पत्नीशी मनापासून सहचर म्हणून वागणे पसंत असते. बुद्धिमत्तेला साथ देणारा, हास्यरस निर्माण करून एकत्र आनंद घेणारा जोडीदार या लोकांना आवडतो. सहिष्णू की असहिष्णू या वादात न पडता त्यावरही एखादा झकास विनोद करणारे हे लोक. ४ ) कर्क चंद्राच्या आधिपत्याखाली येणारी राशी असून याचे प्रतीक खेकडा आहे. या राशीत संवेदनक्षमता, भावनाशीलता, कोमलता याप्रमाणे गुण दिसून येतात. परिस्थितीनुसार बदलण्याची वृत्ती, चिकाटी, निश्चयी स्वभाव, काटकसर या राशीत आहे. या राशीची गृहिणी संसारात काटकसर करून व्यावहारिक दृष्टिकोनाने वागून एक उत्कृष्ट गृहिणी सिद्ध होऊ शकते. भावनांचे कोणतेही तरंग हे लोक लपवू शकत नाहीत. म्हणून क्षणात हसणारी, क्षणात रडणारी अशी ही रास आहे. डोक्याने बोलण्यापेक्षा हृदयाने बोलणे यांना जास्त पसंत आहे. म्हणून कौटुंबिक जीवनाची आवड असलेली, सर्वाप्रति आदर व सहानुभूती असलेली असे हे लोक असतात. स्वत: काही तरी नवीन पदार्थ बनवून लोकांना खाऊ घालणे या लोकांना फार आवडते. सतत कामात राहण्याची आवड यांना असल्याने व्यक्तिगत स्वार्थापेक्षा अनेकांचा फायदा होईल अशी कामे हे लोक निवडतात. या राशीचा स्वामी चंद्र हा मनाचा कारक असल्याने या राशीत चंचलता हा गुणधर्म दिसून येतो. या राशीच्या व्यक्ती एखादे काम करीत असताना दुसरे काम समोर आल्यास पहिल्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या कामात रममाण होतात. गरम, ताजे जेवण आवडत असले तरी काहीशा व्यवहारी स्वभावामुळे पदार्थाच्या किमतीचा विचार करतात आणि आवड सोडून दुसराच पदार्थ घेतात. या राशीत मानसिक चंचलता, कल्पनासाम्राज्यात रमणे, अति हळवेपणा, भावनांच्या आहारी जाणे असे दुर्गुण दिसून येतात. त्यामुळे कधी कधी फसवणूक होण्याची शक्यता असते. हे लोक भावनेच्या भरात एखाद्यास आर्थिक मदत करतात. ही मदत करताना दिलेले पैसे परत मिळतील का, याचा विचारही करीत नाहीत. आपल्याबद्दल लोक काय म्हणतील, यास हे लोक खूप घाबरतात. यांना स्तुती ऐकणे आवडते; परंतु एखादा दोष दाखवल्यास लगेच नाराज होतात. सर्वाशी प्रेमाने, आपुलकीने वागण्याच्या स्वभावामुळे भरपूर नातेवाईक असावेत असे वाटते. भावनांची देवघेव हा यांच्या वैवाहिक जीवनाचा पाया असतो. या राशीच्या पतीस बायकोच्या सर्व हौशी पुरवणे, गजरा आणणे, स्वयंपाकघरात मदत करणे मनापासून आवडते. मुळात काहीशी सोशीक असल्याने यांचे सहिष्णुतेचे पारडे जरा जड असते. ५ ) सिंह रवीच्या आधिपत्याखाली येणारी रास असून याचे प्रतीक सिंह आहे. या राशीत आशावाद, धैर्यवाद, आकर्षकता हे गुण असल्याने यांचे वागणे, बोलणे, ऐटबाज व रुबाबदार असते. कुशल संघटक, उत्तम प्रशासक असतात. कोणत्याही गोष्टीचे योग्य नियोजन यांना फार चांगले जमते. या राशीची व्यक्ती एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करताना कोणाला कोठे काही कमी पडणार नाही तसेच सर्वाशी उत्कृष्ट बडदास्त ठेवण्यात माहीर असते. हे करताना सर्वाच्या मदतीचा योग्य उपयोग करून घेण्याचे प्रशासन यांच्यात उपजतच असते. दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्यावर इतरांनी अवलंबून राहावे असा यांचा दृष्टिकोन असतो. या राशीत पुढारीपणा असल्याने यांना राजकारणाची आवड असते. या राशीचा पती सतत आपल्या पत्नीवर अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रचंड आशावाद, इच्छाशक्ती हे या लोकांचे विशेष गुण आहेत. मान, प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी सतत आव्हाने स्वीकारणे, लोकांच्या पुढे पुढे करणे, स्थिर स्वभावाची राशी असल्याने कामात निश्चयीपणा असतो. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या स्वभावामुळे चमचमीत, सुग्रास भोजन करण्यास यांना आवडते. या राशीच्या स्त्रीला घरकाम करण्यात फारसा रस नसतो. मात्र डामडौल करीत मिरविणे यांना आवडते. अनेक वेळेस हा डामडौल, दिखाऊपणा जाणवण्या इतका दिसतो. या व्यक्ती स्तुतिप्रिय असतात. त्यामुळे खोटय़ा स्तुतीसही लगेच भुलतात. या राशीत अहंम्भाव, ढोंगीपणा भरलेला असतो. एखाद्यावर उपकार केलेच तर त्याने तशी कृतज्ञता ठेवलीच पाहिजे, अशी यांची अपेक्षा असते. असे झाले नाही तर यांना राग येतो. सिंह राशीचा पिता असणे हे मुलांच्या दृष्टीने भाग्याचे समजले जाते. त्यांच्या बुद्धीची वाढ करण्यासाठी, त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्यासाठी ते झटत असतात. ही रास अधिकारासाठी हपापलेली असते. प्रत्येकाने आपला मान राखावा, आपल्या पुढे पुढे करावे अशी यांची इच्छा असते. सहिष्णुतेच्या बाबतीत या राशीचा क्रमांक तसा शेवटी शेवटीच लागतो. ६ ) कन्या बुधाच्या आधिपत्याखाली येणारी राशी असून याचे प्रतीक एका हातात धान्यांची ओंबी व दुसऱ्या हातात अग्नी घेऊन नौकेत बसलेली स्त्री आहे. या राशीत उत्कृष्ट बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती, हजरजबाबीपणा, हास्यविनोद हे गुण असतात. अतिशय चिकित्सक स्वभाव असल्याने कोणतीही गोष्ट स्वत:च्या बुद्धीला पटल्याशिवाय मान्य करणार नाही. कन्या राशीचा विद्यार्थी शिक्षकांस अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडेल; परंतु शिक्षकांचा मुद्दा नीट समजावून घेईल. हास्य- विनोद व अभ्यासपूर्ण वक्तव्य यांमुळे ही व्यक्ती अनेकांना माहिती असते. तर्कशुद्ध विचारसरणी, नित्य बदलाची अपेक्षा, यामुळे हे लोक ‘लक्ष्मी’पेक्षा बुद्धी, कला आणि सौंदर्याची पूजा करतात. चोखंदळपणा इतका असतो की कोणतीही गोष्ट निवडताना त्याची किंमत, उपयुक्तता याचा खूप विचार केला जातो. एखाद्या सेल्समनने कन्या राशीच्या व्यक्तीस घरी येऊन वस्तू विकणे हे खरेच जिकिरीचे काम आहे. बोलणे-चालणे तोलून-मापून असल्याने आंतरिचा थांगपत्ता दुसऱ्यास लागू न देण्याची कला यांच्यात असते. मात्र त्याचबरोबर दुसऱ्याच्या मनात काय आहे, हे काढून घेण्यात हे लोक तरबेज असतात. खाण्याचे पदार्थ, जेवणाच्या वेळा या गोष्टींकडे यांचा जास्त कटाक्ष असतो. त्यामुळे मिटक्या मारत तोंडाचा आवाज करीत जेवणे, मोठय़ाने बोलणे यांना आवडत नाही. चहा पिताना चहा गरम असला तरीही बशीत ओतून भुरक्या मारत पिण्यापेक्षा कपाने पिणे यांना आवडते. या राशीत चिडचिडेपणा, संशयीपणा हे दुर्गुण आहेत. प्रत्येक गोष्टीत अति चिकित्सका करण्याची सवय असल्यामुळे निर्णय घेणे कठीण जाते. दुसऱ्याच्या चुका काढण्याच्या सवयी असल्यामुळे सतत खोचक विनोद करणे दिसून येते. जेवणात निघालेला केस बायकोला दाखवत ‘‘वा! आज अगदी डोके वापरून स्वयंपाक केला की’’ असे म्हटले जाते. पिता म्हणून भूमिका करताना सर्व काळजी घेतली जाते. मात्र कन्या राशीची एक स्त्री आई म्हणून जास्त चांगली भूमिका पार पाडते. वैवाहिक जीवनात कन्या राशीचा पती बायकोवर कमी विश्वास ठेवतो. सीसॉच्या खेळासारखी ही राशी सहिष्णू-असहिष्णुतेच्या हिंदोळ्यात सतत दोलायमान असते. ७ ) तूळ शुक्राच्या आधिपत्याखाली येणारी राशी असून याचे प्रतीक ‘तराजू’ आहे. वृषभ राशीपेक्षा शुक्राचे गुण या राशीत जास्त दिसून येतात. म्हणून ही रास शुद्ध प्रेमाची निदर्शक आहे. या राशीला ‘देवमाणसांची रास’ असे म्हणतात. या राशीचे वेगवेगळे आवडते छंद आहेत. ही रास कलोपासक, भावनाप्रधान, प्रेमिक आहे. त्यामुळे एकाच वेळी काव्य, नाटक, बुद्धिमत्ता, धार्मिकता यांचा मिलाफ यांमध्ये असतो. दुसऱ्याला समजून घेण्यात हे लोक निष्णात असतात. या राशीजवळ प्रत्येक अस्थिरतेत स्थिरत्व शोधून काढण्याची कला आहे. त्यामुळे जीवनातील दु:ख, संकटे ही रास सहन करू शकते. सौंदर्याची मुळातच आवड असल्याने प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य यांची नजर शोधत असते. या राशीच्या व्यक्तींना समुद्रातील लाटांत भिजताना जितका आनंद होतो तितकाच वाळवंटातील वाळूत चालताना होतो. वैवाहिक जोडीदाराशी शुद्ध प्रेमाचे आविष्कार प्रकट करतात. ही व्यक्ती प्रेमाची आशिक आहे, पण व्यक्तीची नाही. व्यवस्थितपणा आणि समतोल व्यक्तिमत्त्व यांच्यात असते. कोणत्याही प्रकारच्या मर्यादा न सोडता व्यवसाय चातुर्याने प्रत्येक कार्यातील समतोल साधत असतात. शुक्र हा राशिस्वामी प्रेमाची देवता व स्त्री ग्रह आहे. त्यामुळे पुरुषी बाणा कमी असतो. टापटीपपणा, व्यवस्थितपणा यांच्यात असतो. म्हणून अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधने, अत्तर, उंची कपडे वापरण्याकडे यांचा कल असतो. कोणताही आरसा दिसला की डोकावल्याशिवाय ही व्यक्ती राहू शकत नाही. या राशीत डामडौलपणा अधिक असल्याने राहणीमान उच्च दर्जाचे असते. त्यामुळे खर्चावर नियंत्रण राहत नाही. शौक पुरविताना व्यसनाधीनता येऊ शकते. कधी कधी यांना राहणीमानाचा गर्व, अहंकार होतो, त्यामुळे इतरांचा मान राखला जात नाही. या राशीचा पुरुष मुलांचा आवडता पिता असतो. मात्र या राशीची स्त्री आई म्हणून वावरताना देवभोळी, मायाळू अशा भूमिका निभावते. त्यामुळे मुलांच्या काळ्या वागण्यावर पांघरूण घातल्यामुळे मुले व्यसनाधीन होऊ शकतात. तराजू हेच प्रतीक असल्याने आवडेल त्या बाबतीत हे लोक सहिष्णू आहेत, पण नाही आवडले तर फार असहिष्णू होऊन पुरस्कारवापसीच्या गटात जाणार नाहीत. ८ ) वृश्चिक मंगळाच्या अमलाखाली येणारी ही राशी असून त्याचे प्रतीक विंचू आहे. ही रास कळावयास अतिशय अवघड आहे. त्यामुळे मनात आणि प्रत्यक्ष कृतीत विसंगती असते. वृश्चिक राशीचा विद्यार्थी वर्गात फळ्यावर लक्ष देईल, मात्र त्याच वेळेस त्याच्या मनात दुसरेच विचार चालू असतील. स्वभावात फारच गुंतागुंत असल्याने हे लोक कधी प्रेमळ तर कधी अति कठोर होऊ शकतात. गुप्तता हा यांचा एक चांगला गुणधर्म असतो. त्यामुळे भावनांना योग्य वेळी आवर घालता येतो. एखाद्याने विश्वासाने यांना एखादी खासगी गोष्ट सांगितल्यास त्याची वाच्यताही कुणाकडे करीत नाहीत. यांच्यात धडाडी, इच्छाशक्ती, दुर्दम्य आशावाद असतो. त्यामुळे हे लोक कोणतेही काम मन लावून तन्मयतेने करतात. तळलेले, तिखट पदार्थ, शक्यतो मांसाहार यांना आवडतो. फारसे गोड पदार्थ आवडत नाहीत. यांचे प्रेम, राग हे सर्वच टोकाचे असते. त्यामुळे रागात एखाद्याच्या श्रीमुखात भडकवतील तेवढीच आजारपणात काळजी घेतील. वैवाहिक जीवनात आपले मूड, आवडी- निवडी जपणारा, तीव्र कामवासनेचा आवेग सहन करणारा जोडीदार यांना हवा असतो. पतीपत्नीपैकी एक जण वृश्चिकेचा असेल तर दिवसेंदिवस अबोला हा संसारात नित्याचाच असतो. यांच्यात सत्ता, अधिकार यांची महत्त्वाकांक्षा असते. त्यामुळे सतत दुसऱ्यावर अधिकार गाजविण्याची प्रवृत्ती असते. सर्वात विषारी, दाहक, टाकून बोलणारी अशी ही रास आहे. वृश्चिक राशीचा नवरा हा आपल्या पत्नीस टोमणे मारणे, विचित्र प्रतिक्रिया करून अपमानित करणे, छद्मी हास्य करून आसुरी आनंद प्राप्त करीत असतो. संधीची वाट बघून एखाद्यास अचूक वेळी टोमणा मारण्यात यांचा हातखंडा असतो. खिलाडूवृत्तीचा अभाव असल्याने आदळआपट, मोडतोड सतत चालू असते. या राशीत मनाचा मोकळेपणा नसतो. त्यामुळे काही तरी लपविण्याकडे यांचा कल असतो. यातूनच खोटे बोलणे, विंचवासारखा दंश करणे असे दुर्गुण निर्माण होतात. स्थिरत्व असल्यामुळे आडमुठेपणा, पाताळयंत्रीपणा, हट्टीपणा जन्मत:च असतो. कुटुंबात वृश्चिक राशीचे कोणी असल्यास ‘सतत बारूद भरून तयार राहणारा सुरुंग’ अशीच उपमा योग्य ठरेल. सहिष्णू की असहिष्णू याबाबत आपला कोणताही थांगपत्ता लागू न देणारी ही राशी आहे. ९ ) धनु गुरूच्या आधिपत्याखाली येणारी राशी आहे. याचे प्रतीक अर्धा भाग धनुर्धारी पुरुष व अर्धा भाग घोडा आहे. ही रास अंतर्यामीची सज्जन आहे. महत्त्वाकांक्षा, प्रेमळपणा, परोपकारी वृत्ती, दिलदारपणा या राशीत दिसून येतो. आशावादी असल्याने कामात अडथळे आले तरी रडत बसणे यांच्या स्वभावात नसते. अडचणीतून मार्ग काढणे यांना चांगले जमते. समतोल विचार व दूरदृष्टी यामुळे इतरांना लवकर आपलेसे करून घेतात. या व्यक्तींना मर्दानी खेळाची आवड असते. त्यामुळे शारीरिक कष्ट होणाऱ्या खेळाकडे यांचा जास्त कल असतो. परिस्थितीचा विचार करण्याची क्षमता असल्याने हे लोक कायम आनंदी, उत्साही असतात. यांना नावीन्याची आवड असते. त्यामुळे सतत काही तरी नवीन शिकत राहणे यांना अतिशय आवडते. यांच्यात भरपूर शक्ती असली तरी डोके मात्र जागेवर असते. त्यामुळे अविचाराने निर्णय घेत नाहीत. अभ्यास, वाचन यांची आवड असते. साहित्यिक क्षेत्रातील व्यक्ती शक्यतो धनू राशीच्या असतात. कारण या राशीला पुस्तकाची अ‍‍ॅलर्जी नसते. खाण्या-पिण्यात विशेष आवड नसते, मात्र सात्त्विक, ताजे, रुचकर भोजन यांना आवडते. जेवताना नावडती भाजी असली तर उपाशी न राहता दुसरी एखादी भाजी अथवा वरणावरही यांचे जेवण होऊ शकते. धनू राशीचा पुरुष किंवा स्त्री एक चांगल्या प्रकारचा पिता किंवा माता होऊ शकतात. सर्वच राशीतले काही चांगले गुण आणि तडजोड वृत्ती यामुळे वैवाहिक आयुष्य सुखाचे असते. त्यातच आपले ऐकणारा व आदर ठेवणारा जोडीदार मिळाला तर ‘सोन्याहून पिवळे’. या राशीतील महत्त्वाचा दोष म्हणजे ‘अहंकार’. धनू राशीची स्त्री जर दिसण्यास सुंदर असेल तर तिला आपल्या रूपाचा, सौंदर्याचा अहंकार असतो. यांना काही वेळेस आपल्या बुद्धिमत्तेचा, शक्तीचा अहंकार असू शकतो. त्यामुळे अनेक वेळेस चांगले मित्र गमावण्याची वेळ येऊ शकते. यांची धरसोड वृत्ती अनेक वेळेस यांना दगा देऊ शकते. महत्त्वाच्या वेळी योग्य निर्णय घेताना यांची द्विधा मन:स्थिती होते. ही राशी प्रचंड सकारात्मक असल्याने आवडले तर मोकळेपणाने सहिष्णुता प्रगट करतील अन्यथा अगदी विरोध न करता पुरस्कारवापसीवाल्यांचेही मतपरिवर्तन करतील. १० ) मकर शनीच्या अधिपत्याखाली येणारी ही राशी असून तिचे प्रतीक मगर आहे. या राशीस उंचीसाठी निसर्गाचा वरदहस्त असतो. त्यामुळे यांची उंची बऱ्यापैकी असते. या राशीस शनीमुळे चिकाटी, सोशिकपणा, गंभीरपणा असतो. त्यामुळे कामाची अत्यंत आवड व दीघरेद्योग आणि कष्ट करण्याची लहानपणापासूनच सवय असते. एखादी महत्त्वाकांक्षा चिकाटीने पूर्ण करू शकतात. मकर राशीची व्यक्ती एखादे काम हलके किंवा उच्च दर्जाचे असे न मानता कितीही संकटे आली तरी चिकाटीने ते काम पूर्ण करतात. छोटय़ा छोटय़ा गोष्टीत कोणावर अवलंबून राहणे यांना आवडत नाही. कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार करण्याची सवय यांना असते. मकर राशीची व्यक्ती पैसे मिळाले की, लगेच उधळणार नाही. काटकसर, तसेच पै- पैंचे महत्त्व या लोकांना माहीत असते. त्यामुळे व्यवहारी व हिशोबी असे व्यक्तिमत्त्व असते. सर्व कामे पूर्वनियोजित शिस्तबद्धपणे करणे यांना जमते. कारण यांच्या अंगात कडक शिस्त असते. काटकसरी स्वभाव असल्यामुळे शिळे अन्न प्रथम संपविण्याकडे यांचा कल असतो. खाण्यापिण्याच्या बाबतीत फार चोखंदळ नसतात. माणसांची फार गर्दी यांना आवडत नाही. त्यामुळे यांचे कुटुंबही मर्यादित असते. मकर राशीचा पिता मुलांवर व्यावसायिक शिक्षण देण्यास प्राधान्य देतो. आई प्रेम स्वरूप असली तरी दाखवून देत नाही. ऐहिक जीवनातील सुखाचे यांना कमी आकर्षण असते. त्यामुळे विवाहास उशीर होतो. मात्र जोडीदाराबद्दलचा आदर, निष्ठा, कर्तव्य यात कुठेही कसूर करत नाहीत. नैराश्य, बारीकसारीक गोष्टी मनाला लावून घेणे, संशयीपणा, संकुचित वृत्ती यांसारखे दोष दिसून येतात. निराशावाद हा यांचा खूप मोठा दोष असतो. पाण्याने अर्धा भरलेला पेला बघितल्यानंतर पेला अर्धा भरला आहे असे म्हणण्याऐवजी तो अर्धा रिकामा आहे असे म्हणण्याकडे यांचा दृष्टिकोन असतो. जरा काही मनाविरुद्ध घडले की निराश होणारी ही राशी असल्याने असहिष्णुतेकडे जरा जास्त झुकलेली आहे. ११ ) कुंभ शनीच्या आधिपत्याखाली येणारी राशी असून याचे प्रतीक ‘हातात घट घेतलेला पुरुष’ आहे. या राशीत कुशाग्र बुद्धिमत्ता, अचाट स्मरणशक्ती असल्याने वाचन चिंतन यांची आवड असते. सिद्धीचा वरदहस्त, उत्कृष्ट चिकाटी असल्याने ही रास मानवी जीवनाचा खराखुरा आविष्कार आहे. स्वत:हून कोणाला त्रास देणार नाहीत, मात्र कोणी त्रास दिल्यास बौद्धिक चतुराईने त्याला गप्प करणे यांना सहज जमते. माणसातली माणुसकी जपणारी, नि:स्वार्थपणे काम करणारी अशी ही राशी आहे. रस्त्याने एखादा अपघात दिसल्यास हातातील काम सोडून मदतीस धावणारी हे लोक असतात. या राशीस गूढशास्त्र, मानसशास्त्र, काव्य यांची आवड असल्याने अनेक कवी, योगी या राशीचे असतात. आधुनिक विज्ञानाशी यांचे चांगलेच नाते जोडलेले असते. कुंभ राशीचे लोक विज्ञानात जेवढे रस घेतात तेवढाच रस त्यांना आध्यात्मातही असतो. निरपेक्ष व नि:स्वार्थपणे काम करण्याची सवय असल्याने एक समतोल व्यक्तिमत्त्व यात पाहायला मिळते. खाण्यासाठी जगायचे हे तत्त्वज्ञान यांच्या विचारात बसत नाही, वाट्टेल ते खाणे यांना जमत नाही. साधा व नेमका आहार यांना प्रिय असतो. फिरायला गेल्यावर सहज भेळेची गाडी दिसली म्हणून भेळ खाणे या राशीला शक्यतो जमत नाही. कुंभ राशीची व्यक्ती पोटाची भूक भागवण्यापेक्षा बौद्धिक भूक भागवणे सहन करतो. पिता आणि आई म्हणून या राशीच्या व्यक्ती दोन्ही जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे निभावते. या राशीच्या लोकांना ऐहिक जीवनात अनासक्ती असते, कदाचित त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात कलह होऊ शकतो. या राशीचा अधिपती शनी असल्याने निराशावाद हा यांचा स्थायीभाव असतो. कुंभ राशीच्या व्यक्तीस एखाद्या कामात अपयश असल्यास त्या लगेच निराश होतात आणि आपला आत्मविश्वास गमावून बसतात. त्याचाच परिणाम म्हणून पुढील निर्णय घेताना बऱ्याचदा चुका होतात. काटकसरी स्वभाव असल्याने कधी कधी त्याची परिणती कंजूषपणात होते. विचारपूर्वक आणि शांतपणे मतप्रदर्शन असल्याने हे लोक जे मत मांडतील ते ग्रा धरणे योग्य ठरते. मग सहिष्णुता प्रकट केली तरी ती खरी असते आणि पुरस्कार वापस केला तरी त्यात काही तथ्य असते. १२ ) मीन गुरूच्या आधिपत्याखाली येणारी असून याचे प्रतीक एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड केलेले दोन मासे आहे. ही राशी भावनाप्रधान असल्याने कोणत्याही कृतीपेक्षा त्या कृतीमागील भावनेला जास्त प्राधान्य देतात. मीन राशीच्या व्यक्ती आयुष्यात अनेकदा, अनेकांबरोबर तडजोड करू शकतात. त्यामुळे सूड, मान-अपमान अशा गोष्टींच्या मागे लागत नाहीत. कारण या राशी अतिशय सोशिक, सहनशील असतात. या राशीस आध्यात्माची आवड असल्याने भक्ती, प्रेम व देवधर्म हे आपले कर्तव्य समजून करीत असतात. म्हणून घरात नेहमी प्रसन्न वातावरण ठेवण्यास उत्सुक असतात. माफक खर्च व आनंदी वृत्ती यामुळे झगमगाटापासून दूर असतात. परंतु एखाद्या धार्मिक किंवा शैक्षणिक कार्यक्रमात ‘विश्वस्त’ म्हणून नक्कीच शोभून दिसतात. वयाचा विचार न करता प्रत्येकाच्या मतांचा, भावनांचा आदर करण्याची सवय असल्याने या व्यक्ती स्वत:ही इतरांच्या आदरास प्राप्त होतात. या राशीला तेलकट, तिखट पदार्थ जास्त सहन होत नाहीत. साधा आहार यांना आवडतो. ‘‘खास तुमच्यासाठीच हा पदार्थ केला,’’ असे म्हटले की यांची स्वारी खूश होते, मग तो पदार्थ कसाही झाला असला तरी यांना तो स्वादिष्टच लागतो. मीन राशीचा पुरुष पिता म्हणून मातृवत वागत असतो. घरी कधी कोणावर ओरडणे नाही, जाब विचारणे नाही, मुलांना स्वच्छंदी जगू देणे. मीन राशीची स्त्रीसुद्धा एक आदर्श माता बनू शकते. वैवाहिक आयुष्यात महत्त्वाचे निर्णय जोडीदाराच्या विचारांशिवाय घेतले जात नाहीत. या व्यक्तीचे घरातील इतर खोल्यांपेक्षा स्वयंपाकघरात जास्त लक्ष असते. ही राशी ‘गुंतागुंतीची राशी’ असल्याने यांच्या मनात कायम वैचारिक गोंधळ चालू असतो. भावना आणि व्यवहार यांची सांगड घालताना पुरेवाट होते. ‘‘काय करू आणि काय नको’’ हे ठरविताना काम रेंगाळते, त्यातून कामाचा पसारा आणि जबाबदारी वाढत जाते. स्वार्थत्याग, सत्त्वगुण हे चांगले गुणधर्म आहेत. परंतु काही वेळेस त्याचा अतिरेक होतो आणि बरेच काही गमावून बसण्याची वेळ येते. तसेच हळव्या स्वभावामुळे भावनावेग थोपवता येत नाही आणि मग चिडचिड होते. बऱ्याच वेळेस या राशीच्या व्यक्ती देवधर्म आध्यात्मिक पातळीपेक्षा कर्तव्य म्हणून करतात. राशिचक्रातील ही सर्वात शेवटची राशी असली तरी सहिष्णुतेच्या बाबत मात्र यांचा क्रमांक एक लागतो.. 

Search

Search here.