दुर्वागणपती व्रत

व्रत - पूजा - कथा Posted at 2016-08-04 03:39:45

-- दुर्वागणपती व्रत --

।। ऊँ गँ गणपतये नमः ।। श्रावण शुक्ल चतुर्थीला दुर्वागणपती हे व्रत करतात. या व्रताचे तीन वेगवेगळे प्रकार किंवा आरंभ आहेत. १- कार्तिक शुद्ध चतुर्थी पासून २ - श्रावण शुद्ध चतुर्थी पासून ३ - कोणत्याही महिन्यातील शुक्लपक्षातील रविवारी येणाऱ्या चतुर्थीपासून सहा महिन्यापर्यंत वरील तीन प्रकारे हे व्रत करता येते . श्रावण शुद्ध चतुर्थी पासून माघ शुद्ध चतुर्थी पर्यंत दर शुक्ल चतुर्थी ला हे व्रत करावे असा सुद्धा एक भेद आहे . ज्याला ज्या प्रमाणे शक्य असेल त्या प्रमाणे व्रत करावे . हे व्रत तीन किंवा पाच वर्षे करावे व नंतर विधिवत् उद्यापन हवन करावे असा सौर पुराण , स्कंद पूराण शास्त्रात उल्लेख आहे . या व्रताला सुवर्ण गणेश व सुवर्ण दुर्वा घ्याव्यात असा उल्लेख आहे . पण जर एखाद्याची खरेच परिस्थिती नसेल तर त्याने रजत - ताम्र - पितळ - पंचधातु यापैकी गणेश मूर्ती असली तरी चालेल . मूर्ती पोकळ नसावी . पण जमल्यास दुर्वा मात्र सुवर्णाच्या असाव्यात . अगदीच शक्य नसेल तर मग रजत दुर्वा चालतील . निदान 6 दुर्वा तरी रजत असाव्यात . गणेश मूर्ती ही सिंहासनस्थ असावी . तसेच एकदंत - चतुर्भुज सुबक अशी मूर्ती असावी . इतर रूपाची मूर्ती चालणार नाही . प्रातःकाळी गुरुजींना बोलावून विधिवत् कलश स्थापन पूजन करून गणेश मूर्ती विधियुक्त अभिषेक पूजन षोडशोपचार करून स्थापना करावी . लाल वस्त्र , लाल फुले , लाल फळ आदी असावेत . गणपतीला सहा खवा / मावा मोदक , सहा दुर्वा अर्पण कराव्यात , सहा प्रदक्षिणा कराव्यात , सहा नमस्कार घालावे . बेलपत्र , आघाडा , शमीपत्र , दुर्वा , तुळशीपत्र अर्पण करावे . आरती करावी . व नंतर अर्घ्य अर्पण करावे . खालील मंत्राने प्रार्थना करावी . गणेश्वर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन । व्रतं संपूर्णतां यातू त्वत् प्रसादादिभानन ।। सहा मोदक गणपतीला अर्पण करावे , सहा मोदक ब्राह्मणाला द्यावेत , सहा आपण खावेत . दुर्वागणपती व्रत कथा वाचावी , ती कथा नसेल तर गणेश लिलेच्या - पराक्रमाच्या कोणत्याही इतर कथा वाचाव्यात . किंवा अखंड नामस्मरण करत राहावे ( कथा नसतील तर निदान गणेश मंत्र 6 माळा जप करावा ) या दिवशी एकभुक्त असावे . सतत श्री गणरायाचे स्मरण करत रहावे . सात्विक भोजन असावे . व्रत चालू असे पर्यंत पूर्ण शाकाहार असावा . दर श्रावण शुक्ल चतुर्थीला हे व्रत करावे . कोणी कोणी श्रावण चतुर्थी पासून तीन किंवा पाच वर्षे दर शुद्ध चतुर्थीला सुद्धा हे व्रत करतात. तीन किंवा पाच वर्षे पूर्ण झाल्यावर उद्यापनाला गुरुजींना बोलावून गणेशपूजन ( जमल्यास हवन यज्ञ ) करून यवाच्या ( जव ) पिठाचे अठरा मोदक करावेत , त्या सर्व मोदकांचा नेवैद्य दाखवून 6 गणपती समोरच राहू द्यावेत , 6 ब्राह्मणाला द्यावे व सहा स्वतः घ्यावे . ब्राह्मणाला विविध वस्त्र धान्य दान , ब्राह्मण भोजन असे उद्यापनाला असावे . 21 मोदक घेतले तर 7 गणपती समोर , 7 ब्राह्मणाला व सात स्वतः असे करावे . हे व्रत केल्याने श्री गणेशाची अखंड कृपा होऊन सर्व विघ्न संकटांचा नाश होऊन , सर्व सुख समृद्धी प्राप्त होते . स्वतःला - मुलांना विद्ये मध्ये अपूर्व असे यश प्राप्त होते . सर्व शुभ मनोकामना पूर्ण होतात . गंडांतर टळते . सर्वाना श्री गणरायाचा आशीर्वाद प्राप्त होवो व सर्वत्र सुख शांतता समाधान नांदो हि श्रीगणेशा चरणी प्रार्थना . लेखन - संग्राहक -- श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा स्रोत - व्रत समुच्चय , सौर पूराण , स्कंद पुराण , व्रत उपासना कोष

Search

Search here.