सार्थ गोदावरी अष्टक

स्तोत्र - मंत्र  > संकीर्ण इतर स्तोत्र Posted at 2018-11-30 12:44:56
श्रीगोदावरी अष्टकम् अर्थासहीत   ऊँ श्री गणेशाय नमः ।। ऊँ नमः शिवाय ।। वासुदेवमहेशात्म कृष्णावेणीधुनीस्वसा । स्वसाराद्या जनोद्धर्त्री पुत्री सह्यस्य गौतमी ॥१॥ १) श्रीगोदावरी महानदी ही वासुदेव अर्थात् महेशरुपाची आहे. ती कृष्णा व वेणी या नद्यांची भगिनी आहे. ती स्वबलानेच लोकांचा उद्धार करण्यास समर्थ आहे. (गौतम ऋषिंच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ही त्र्यंबकेश्वर येथे पृथ्वीवर म्हणजे सह्याद्री पर्वतावर उतरली असल्याने) ही सह्यपर्वताची कन्या आहे अर्थात् सह्याद्रीतून हिचा उगम झाला आहे.  सुरर्षिवंद्या भुवनेनवद्या याद्यात्र नद्याश्रितपापहंत्री । देवेयाकृत्रिम गोवधोत्थ दोषापनुत्यै मुनयेप्रदत्ता ॥२॥ २) श्रीगोदावरी महानदी ही देव आणि ऋषि यांना वंदनीय किंवा देवर्षी श्रीनारदमुनींना वंद्य आहे. या लोकी ही अत्यंत स्तुत्य आहे. सर्व नद्यांमध्ये हिचा क्रमांक पहिला आहे. आपल्या आश्रयाने दोन्ही तीरांवर राहणार्‍या सर्व लोकांची पातके ती नष्ट करणारी आहे. (दर्भाच्या खोट्या अर्थात्) कृत्रिम गाईच्या वधामुळे उत्पन्न झालेल्या दोषास घालविण्यासाठी देवाने ही श्रीगोदावरी नदी मुनिवर्य गौतमास दिली आहे. वार्युत्तमं ये प्रपिबन्ति मर्त्या-यस्याः सकृत्तेऽपि भवन्त्यमर्त्याः । नन्दन्त ऊर्ध्वंचयदाप्लवेन नरादृढेनेव सवप्लवेन ॥३॥ ३) श्रीगोदावरी महानदीचे उत्तम व पवित्र पाणी जे लोक एक प्राशन करतील (करतात) तेही देवरुप होतील. या महानदीत स्नान करण्याने लोक दृढ अशा यज्ञरुपी नौकेने ऊर्ध्वलोकात जाऊन आनदांत राहतात. दर्शनमात्रेण मुदा गतिदा गोदावरी वरीवर्ति । समवर्तिविहायद्रोधासी मुक्तिः सती नरीनर्ति ॥ ४ ॥ ४) श्रीगोदावरी महानदी ही केवळ दर्शनाने संतुष्ट होऊन भक्ताला उत्तम गती देते. हिच्या दोन्ही तीरांवर मुक्तिरुपी स्त्री नाचत असल्यामुळे ही आपल्या तीरावर राहणार्‍या लोकांनी (तेथील) पवित्र तीर्थस्थाने सोडून न जाता तेथेच राहून मुक्तिची प्राप्ती करावी म्हणून त्यांना सद्बुद्धी देऊन तेथून दूर जाण्यापासून परावृत्त करते. रम्ये वसतामसतामपि यत्तीरे हि सा गतिर्भवति । स्वच्छान्तरोर्ध्वरेतोयोगोमुनीनां हि सा गतिर्भवति ॥ ५ ॥ ५) श्रीगोदावरी महानदीच्या रम्य व मनोहर तीरावर राहणार्‍या स्वच्छ व शुद्ध अंतःकरणाच्या आणि ऊर्ध्वरेत झालेल्या ब्रह्मचारी व योगी अशा मुनिजनांना जी उत्तम गती मिळते तीच गती या नदीच्या तीरावर राहणार्‍या दुष्ट-दुर्जनांनाही मिळते. तीव्रतापप्रशमनी सा पुनातु महाधुनी । मुनीढ्या धर्मजननी पावनी नोद्यताशिनी ॥ ६ ॥ ६) श्रीगोदावरी महानदी तीव्रतापांचे शमन करणारी आहे. हिचे ऋषिमुनींनी स्तवन केलेले आहे. ही धर्माची अर्थात् धार्मिकांची माता आहे. ही मानवांना निष्पाप करणारी आहे. (आपल्यामध्यें) पडेल त्या (पापाला) पातकांना ही खाऊन नष्ट करणारी आहे. अशी कीर्ती असलेली ही गोदावरीगंगानदी आमचे रक्षण करो. सदा गोदार्तिहा गंगा जन्तुतापापहारिणी । मोदास्पदा महाभंगा पातु पापापहारिणी ॥ ७ ॥ ७) श्रीगोदावरी महानदी ही इंद्रियांना सुख देणारी आहे अर्थात् ही सर्व इंद्रियपीडा घालविणारी आहे. ही सर्व जंतूंच्या म्हणजे सर्व प्राण्यांच्या तापाचा अपहार करणारी आहे. त्याचप्रमाणे ही आनंदाला आश्रय देणारी , मोठमोठ्या तरंगांनी अर्थात् लाटांनीं शोभणारी व सर्व पातकांचा अपहार करणारी ही श्रीगोदावरी महानदी आमचे रक्षण करो. गोदा मोदास्पदा मे भवतु वरवता देवदेवर्षिवन्द्या । पारावाराग्र्यरामा जयति यतियमीट्सेविता विश्ववित्ता ॥ ८ ॥ ८) श्रीगोदावरी महानदी आमच्या आनंदाचे स्थान होवो. ही अत्यंत श्रेष्ठ आहे. ही देव-देवर्षींना वंदनीय आहे. ही महासागराची पट्टराणी आहे. हिचा जयजयकार असो. हिच्या तीरावर संन्यासी व संयमी राहतात. ही विश्वाला जाणणारी किंवा विश्वाचा खजीना आहे.     पापाद्या पात्यपापा धृतिमतिगतिदा कोपतापाभ्यपघ्नी । वंदे तां देवदेहां मलकुलदलनीं पावनीं वन्द्यवन्द्यां ॥ ९ ॥ ९)  ही स्वतः निष्पाप असून ती इतरांना पातकांपासून संरक्षण देते. ही धैर्य, बुद्धी आणि सद्गती देणारी आहे. ही क्रोधापासून होणार्‍या तापाचा अपहार करणारी आहे. या वन्दनीयांना वंद्य असणार्‍या, पातकसमूहाचा नाश करणार्‍या व जिच्या देहात सर्व देव राहतात अशा अत्यंत पवित्र व श्रेष्ठ महानदीला मी नमस्कार करतो.  ॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीगोदाष्टकम् संपूर्णम् ॥

Search

Search here.