गुढीपाडवा पूजन

सण व उत्सव Posted at 2016-03-24 12:56:16

गुढीपाडवा पूजन

?।।अथ ब्रह्मध्वजारोपणम् ।। ?

? गुढीपाडवा ( गुढी उभारणे) ?

सूर्योदयापूर्वी घरातील सर्वांनी अभ्यंगस्नान करून नूतन वस्रे परीधान करावीत . तसेच सुवासिनीने घरातील सर्वांना कुंकुम तिलक करावा. घरासमोर रांगोळी काढावी व मुख्यद्वारास पानाफुलांचे तोरण बांधावे. त्यानंतर वेळूस ( बांबूस ) सुवासिक तेल लेवून व उष्णोदकाने धुऊन स्वच्छ पुसावा. त्यावर हळद कुंकवाच्या रेघा काढाव्यात. त्याच्या टोकाकडे एक मोठा रेशमी / भगवा ध्वज किंवा मोठा ध्वज नसेल तर मग खणं किंवा साडी बांधून , तेथे निंबपत्रे , फुलांची माळ , साखरगाठी इत्यादि वस्तु रेशमी दोर्‍याने घट्ट बांधाव्यात. ( ध्वजासारखे मोठे रेशमी वस्त्र घेतल्यास उत्तम) . त्यावर धातुपात्र - कलश उपडा ठेवावा. सूर्योदयास ही गुढी घराच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ किंवा दर्शनी भागी एका पाटावर उभी करुन व्यवस्थित बांधावी. आजूबाजूची जागा शेणाने सारवणे - स्वच्छ करणे , सर्वत्र गोमूत्र गंगाजल शिंपडने. पाटाभोवती रांगोळी काढावी.

।। अथ ब्रह्मध्वजपूजन ।।

प्रथम गणपतीबाप्पा , आपली कुलदेवता - ग्रामदेवता - पूर्वज या सर्वांचे स्मरण करावे . हातात जल किंवा फुल घेऊन खालील संकल्प करावा. संकल्पसाठी घेतलेले जल / फुल ताम्हणात - थाळी मध्ये सोडावे . 

संकल्प - मम आत्मनः सकल शास्र पुराणोक्त फल प्रात्प्यर्थं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य दीर्घायुरारोग्य ऐश्वर्य कुलाभिवृध्दि अभिष्ट फलसिध्द्यर्थं प्राप्त नूतनवत्सरे नित्य मंगलावाप्तये प्रतिसंवत्सर विहीतं आरोपणपूर्वकं ब्रह्मध्वज पूजनं करिष्ये ।

नंतर गणपतीला पंचोपचारे पूजन करावे. गुढी च्या येथे गणपती न ठेवता घरातील गणपती चे पूजन करावे आणि गुढी जवळ येऊन गणपती चे स्मरण करावे

( ओंजळीत अक्षता फुले घ्यावीत )

ब्रह्मध्वज नमस्तुभ्यं सर्वकल्याणकारक । मद् गृहे कुरु कल्याणं सर्वकामार्थसिध्दिदम् ।।

श्री ब्रह्मध्वजाय नमः

असे म्हणून पूजा करावी. गंध , अक्षता, धूप , दिप, नैवेद्य, विडासूपारी, दक्षिणा अर्पण करावी.

।।अथ निंबपत्रसेवनम् ।।

( निंबाची पाने व फुले, मिरे, हिंग, मीठ, ओवा, साखर, चिंच ह्या सर्वांचे योग्य प्रमाण घेऊन ते पाट्यावर वाटावे. )

पारिभद्रस्य पत्राणि कोमलानि विशेषतः । मरीच लवणं तिंतिण्या हिंगुशर्करया युतम् । अजमोदायुतं कृत्वा भक्षये रोगशांतये ।।

(असे म्हणून घरातील सर्वांनी ह्या आरोग्यदायी मिश्रणाचे सेवन करावे.)

महानैवेद्य तयार झाल्यावर माध्याह्नी पुढीलप्रमाणे पूजन करावे.

दुपारी माध्यान्ही किंवा सूर्यास्तसमयी ( जशी रीत परंपरा चालत आलेली असेल तशी ) गुढीला गंध फुल अक्षता वाहून व जेवण किंवा दुधसाखरेचा नैवेद्य अर्पण करून सावकाशपणे खाली ऊतरवावी, साखरगाठीचा प्रसाद घरातील सर्वांनी घ्यावा. जर संध्याकाळी गुढी उतरवणार असतील तर माध्यान्ही भोजन नेवैद्य अर्पण करावा.

? नूतन संवत्सराच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा ? ? श्री श्याम जोशी गुरूजी टिटवाला ?

जमल्यास प्रत्येकाने आपल्या घरावर , घरासमोर एक भगवा ध्वज ( झेंडा ) पुढील गुढीपाडवा पर्यंत म्हणजे पूर्ण एक संवत्सर ( वर्ष ) लावून ठेवावा . पुढील पाडव्याला हा जुना काढून पुन्हा नवीन लावावा . काही कारणाने भगवा ध्वज ( झेंडा ) खराब झाल्यास मध्ये सण उत्सवाच्या दिवशी नवीन लावणे . ( उदा. गणेश स्थापना , दसरा , दिवाळी इत्यादी ) 

महत्वाचे ---- 

तसेच आज घरी पंचांगाचे पूजन करावे किंवा आपल्या गुरुजींना / ज्योतिषाला बोलावून किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पूजन करून संवत्सर फल श्रवण करावे व त्यांना वस्त्र - धान्य - दक्षिणा - श्रीफळ देऊन पंचांग म्हणजेच नवग्रहांचे व त्या गुरुजींचे आशीर्वाद घ्यावे , कारण हेच गुरुजी किंवा ज्योतिषी आपल्याला नेहमी योग्य सल्ला देऊन आपल्या अनेक अडचणींना दूर करीत असतात. भले त्यांना काही देऊ नका पण त्यांचे स्मरण करून दोन शब्द गोड बोलून त्यांचे ऋण - उपकार स्मरण करा.. कारण ब्राह्मण - गुरुजी हे फक्त प्रेमाचे व गोड बोलण्याचे चाहते असतात .. आणि स्वमाता व पिता सोडून गुरुजी हि एकच व्यक्ती अशी आहे की ती यजमानाच्या समृद्धीची मनापासून प्रार्थना व प्रयत्न करत असतात .. 

 

Search

Search here.