श्रीगुरुचरित्र अध्याय २४ ते २८

ग्रंथ - पोथी  > गुरुचरित्र Posted at 2019-02-09 13:53:23
श्रीगुरुचरित्र अध्याय २४ श्रीगणेशाय नमः । सिद्ध म्हणे नामधारका । पुढे अपूर्व वर्तले देखा । विस्तारे कथाकौतुका । निरोपीन तुज आता ॥१॥ नामधारक म्हणे सिद्धासी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारोनि आम्हांसी । निरोपावी दातारा ॥२॥ शिष्यवचन परिसोनि । सांगता झाला सिद्ध मुनि । ऐक तू वत्सा नामकरणी । गुरुचरित्र अभिनव ॥३॥ ऐसा त्रिविक्रम महामुनि । जो का होता कुमसीस्थानी । निंदा करी सर्व जनी । दांभिक संन्यासी म्हणोनि ॥४॥ ज्ञानवंत श्रीगुरुमूर्ति । विश्वाच्या मनीचे ओळखती । नसधिपासी सांगती । निंदा करितो म्हणोनि ॥५॥ श्रीगुरु म्हणती तये वेळी । आजची निघावे तात्काळी । त्रिविक्रमभारतीजवळी । जाणे असे कुमसीस ॥६॥ ऐकोनि राजा संतोषला । नानालंकार करिता जाहला । हत्ती अश्वपायदळा । श्रृंगार केला तये वेळी ॥७॥ समारंभ केला थोरु । आंदोळी बैसले श्रीगुरु । नानापरी वाद्यगजरु । करूनिया निघाले ॥८॥ ऐसेपरी श्रीगुरुमूर्ति । तया कुमसी ग्रामा येती । त्रिविक्रमभारती । करीत होता मानसपूजा ॥९॥ मानसपूजा नरहरीसी । नित्य करी भावेसी । स्थिर न होय तया दिवसी । मानसमूर्ति नरकेसरी ॥१०॥ मनी चिंता करी यति । का पा न ये मूर्ति चित्ती । वृथा झाली तपोवृत्ति । काय कारण म्हणतसे ॥११॥ बहुत काळ आराधिले । का पा नरसिंहे उपेक्षिले । तपफळ वृथा गेले । म्हणोनि चिंता करीतसे ॥१२॥ इतुके होता त्या अवसरी । श्रीगुरुते देखिले दूरी । येत होते नदीतीरी । मानसपूजेच्या मूर्तिरूपे ॥१३॥ सर्व दळ दंडधारी । तयांत एकरूप हरी । भारती देखोनि विस्मय करी । नमन करीत निघाला ॥१४॥ साष्टांग नमन करोनि । जावोनि लागे श्रीगुरुचरणी । सर्वचि रूपे झाला प्राणी । दंडधारी यतिरूप ॥१५॥ समस्तरूप एकसरी । दिसताती दंडधारी । कवण लघु कवण थोरी । न कळे तया त्रिविक्रमा ॥१६॥ भ्रांत झाला तये वेळी । पुनरपि लागे चरण कमळी । ब्रह्मा विष्णु चंद्रमौळी । त्रिमूर्ति तू जगद्गुरु ॥१७॥ तुझे न कळे स्वरूपज्ञान । अविद्यामाया वेष्टोन । निजरूप होऊन । कृपा करणे दातारा ॥१८॥ तुझे स्वरूप अवलोकिता । आम्हा अशक्य गुरुनाथा । चर्मचक्षूकरूनि आता । पाहू न शके म्हणतसे ॥१९॥ तू व्यापक सर्वा भूती । नरसिंहमूर्ति झालासी यति । प्रगट नरसिंहसरस्वती । समस्त दिसती यतिरूप ॥२०॥ नमू आता सांग कवणा । कवणापुढे दाखवू करुणा । त्रिमूर्ति तू ओळखसी खुणा । निजरूपे रहावे स्वामिया ॥२१॥ तप केले बहुत दिवस । पूजा केली तुझी मानस । आजि आलि गा फळास । मूर्ति साक्षात भेटली ॥२२॥ तू तारक विश्वासी । उद्धराया आम्हांसी । म्हणोनि भूमी अवतरलासी । दावी स्वरूप चिन्मय ॥२३॥ ऐसेपरी श्रीगुरूसी । स्तुति केली भक्तीसी । श्रीगुरुमूर्ति संतोषी । झाली निजमूर्ति एक ॥२४॥ व्यक्त पाहे तये वेळी । दिसो लागले सैन्य सकळी । तयामध्ये चंद्रमौळी । दिसे श्रीगुरु भक्तवरद ॥२५॥ श्रीगुरु म्हणती तयासी । नित्य आमुची निंदा करिसी । दांभिक नावे आमहंसी । पाचारिसी मंदमती ॥२६॥ या कारणे तुजपासी । आलो तुझ्या परीक्षेसी । पूजा करिसी तू मानसी । श्रीनृसिंहमूर्तीची ॥२७॥ दांभिक म्हणजे कवण परी । सांग आता विस्तारी । तुझे मनी वसे हरी । तोचि तुज निरोपी ॥२८॥ ऐकोनि श्रीगुरुचे वचन । यतीश्वर करी नमन । सद्गुरु स्वामी कृपा करून । अविद्यारूप नासावे ॥२९॥ तू तारक विश्वासी । त्रयमूर्ति-अवतार तूचि होसी । मी वेष्टोन । मायापाशी । अज्ञानपणे वर्ततो ॥३०॥ मायामोह-अंधकरी । बुडालो अज्ञानसागरी । न ओळखे परमार्थ विचारी । दिवांध झालो स्वामिया ॥३१॥ ज्योतिःस्वरूप तू प्रकाशी । स्वामी माते भेटलासी । क्षमा करावी बाळकासी । उद्धारावे दातारा ॥३२॥ अविद्यारूप-समुद्रात । होतो आपण वहात । न दिसे पैल अंत । बुडतसो स्वामिया ॥३३॥ ज्ञानतारवी बैसवोनि करुणावायु प्रेरूनि । पैलथडी निजस्थानी । पाववी स्वामी कृपासिंधु ॥३४॥ तुझी कृपा होय ज्यासी । दुःखदैन्ये कैचे त्यासी । तोचि जिंकील कळीकाळासी । परमार्थी ऐक्य होय ॥३५॥ पूर्वी कथा ऐकिली श्रवणी । महाभारत पुराणी । दाविले रूप अर्जुना नयनी । प्रसन्न होवोनि तयासी ॥३६॥ तैसे तुम्ही मजला आज । दाविले स्वरूप निज । अनंत महिमा तुझी चोज । भक्तवत्सला गुरुनाथा ॥३७॥ जय जयाजी जगद्गुरु । तू तारक भवसागरु । त्रयमूर्तीचा अवतारु । नरसिंहसरस्वती ॥३८॥ कृतार्थ झालो जी आपण । देखिले आजि तुमचे चरण । न करिता प्रयत्‍न । भेटला रत्‍नचिंतामणी ॥३९॥ जैसी गंगा सगरांवरी । कडे केले भवसागरी । जैसा विष्णु विदुराघरी । आला आपण कृपावंत ॥४०॥ भक्तवत्सला तुझी कीर्ति । आम्हा दाविली प्रचीति । वर्णावया नाही मति । अनंतमहिमा जगद्गुरु ॥४१॥ येणेपरी श्रीगुरूसी । करी स्तोत्र बहुवसी । श्रीगुरुमूर्ती संतोषी । दिधला वर तये वेळी ॥४२॥ वर दे तो त्रिविक्रमासी । तुष्टलो तुझ्या भक्तीसी । सद्‌गति होय भरवसी । पुनरावृत्ति नाही तुज ॥४३॥ तुज साधला परमार्थ । होईल ईश्वरी ऐक्यार्थ । ऐसे म्हणोनि गुरुनाथ । निघाले आपुल्या निजस्थाना ॥४४॥ वर देवोनि भारतीसी । राहविले तेथे कुमसीसी । क्षण न लागता परियेसी । आले गाणगापुरासी ॥४५॥ सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरुमहिमा ऐसा निका । त्रिमूर्ति तोचि ऐका । नररूपे वर्ततसे ॥४६॥ ऐसा परमपुरुष गुरु । त्याते जे कोणी म्हणती नरु । तेचि पावती यमपुरु । सप्तजन्मपर्यंत ॥४७॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु । गुरुचि होय गिरिजारमणु । वेदशास्त्रपुराणू । बोलती हे प्रसिद्ध ॥४८॥ या कारणे श्रीगुरूसी । शरण जावे निश्चयेसी । विश्वासावे माझ्या बोलासी । लीन व्हावे श्रीगुरुचरणी ॥४९॥ अमृताची आरवटी । घातली असे गोमटी । ज्ञानी जन प्राशिती घोटी । गुरुचरित्रकामधेनु ॥५०॥ गंगाधराचा नंदन । सांगे गुरुचरित्र विस्तारोन । भक्तिपूर्वक ऐकती जन । लाधती पुरुषार्थ चतुर्विध ॥५१॥ इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे त्रिविक्रमभारती विश्वरूपदर्शनं नाम चतुर्विशोऽध्यायः ॥२४॥ ------------------------------------------------------------------ अध्याय २५ श्रीगणेशाय नमः । जय जयाजी सिद्धमुनी । तूचि गुरुशिरोमणी । साक्षी येतसे अंतःकरणी । बोलिला माते परमार्थ ॥१॥ ऐसा कृपाळु परमेश्वर । आपण झाला अवतार । येरा दिसतसे नर । तेचि अज्ञानी प्रत्यक्ष ॥२॥ तया त्रिविक्रमभारतीसी । दाविले रूप प्रत्यक्षेसी । पुढे कथा वर्तली कैसी । निरोपावी दातारा ॥३॥ सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरूची अगम्य लीला । सांगता न सरे बहु काळा । साधारण मी सांगतसे ॥४॥ समस्त लीला सांगता । विस्तार होईल बहु कथा । या कारणे क्वचिता । निरोपीतसे बाळका ॥५॥ पुढे अपूर्व वर्तले एक । ऐक शिष्या नामधारक । विदुरा नामे नगर एक । होता राजा यवन तेथे ॥६॥ महाक्रूर ब्रह्मद्वेषी । सदा करी जीवहिंसी । चर्चा करवी ब्राह्मणांसी । वेद म्हणवी आपणापुढे ॥७॥ विप्रासी म्हणे यवन । जे का असती विद्वज्जन । आपुल्या सभेत येऊन । वेद सर्व म्हणावे ॥८॥ त्याते द्रव्य देईन बहुत । सर्वामध्ये मान्यवंत । जो का सांगेल वेदार्थ । विशेष त्याची पूजा करू ॥९॥ ऐसे ऐकूनि ज्ञानी जन । नेणो म्हणती वेद आपण । जे का असती मतिहीन । कांक्षा करिती द्रव्याची ॥१०॥ जावोनिया म्लेच्छापुढे । वेदशास्त्र वाचिती गाढे । म्लेच्छ मनी असे कुडे । ऐके अर्थ यज्ञकांडाचा ॥११॥ म्हणे विप्र यज्ञ करिती । पशुहत्या करणे रीती । आम्हा म्लेच्छाते निंदिती । पशु वधिती म्हणोनिया ॥१२॥ येणेपरी ब्राह्मणासी । निंदा करी बहुवसी । योग्यता पाहून द्विजवरांशी । अपार द्रव्य देतसे ॥१३॥ येणेपरी तो यवन । देतो द्रव्य म्हणोन । ऐकते झाले सकळ जन । देशोदेशी विप्रवर्ग ॥१४॥ वेदशास्त्री निपुण । द्रव्यावरी ठेवुनी मन । भेटीसी जाती ब्राह्मण । वेद म्हणती यवनापुढे ॥१५॥ ऐसे मंदमति विप्र । त्यांची जोडी यमपुर । मदोन्मत्त दुराचार । तेच इष्ट कलीचे ॥१६॥ येणेपरी वर्तमानी । वर्तत असता एके दिनी । मंदभाग्य विप्र दोनी । येवोनि भेटले राया ॥१७॥ वेदशास्त्र अभिज्ञाती । तीन वेद जाणो म्हणती । तया यवनापुढे किर्ति । आपली आपण सांगती ॥१८॥ विप्र म्हणती रायासी । कोणी नाही आम्हासरसी । वाद करावया वेदांसी । नसती चारी राष्ट्रांत ॥१९॥ असती जरी तुझ्या नगरी । त्वरित येथे पाचारी । आम्हासवे वेद चारी । चर्चा करावी द्विजांनी ॥२०॥ विप्रवचन ऐकोनि । राजा पडला अभिमानी । आपुल्या नगरचे विप्र आणोनि । समस्ताते पुसे तो ॥२१॥ राजा म्हणे समस्तांसी । चर्चा करावी तुम्ही यांसी । जे जिंकिती तर्केसी । त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे ॥२२॥ ऐकोनिया ज्ञानी जन । म्हणती म्लेच्छालागून । आम्हा योग्यता नाही जाण । या ब्राह्मणांते केवी जिंकू ॥२३॥ आम्हामध्ये हेचि श्रेष्ठ । विप्र दोघे महासुभट । याते करोनि प्रगट । मान द्यावा महाराज ॥२४॥ ऐसे म्हणती द्विज समस्त । ऐकोनि राजा मान देत । वस्त्रे भूषणे देई विचित्र । गजावरी आरूढविले ॥२५॥ आरूढवोनि हस्तीवरी । मिरवा म्हणे आपुल्या नगरी । नाही विप्र यांचे सरी । हेचि राजे विप्रांचे ॥२६॥ आपण राजा यवनांसी । हे दुजे राजे द्विजांसी । ऐसे भूसुर तामसी । म्लेच्छापुढे वेद म्हणती ॥२७॥ महातामसी ते ब्राह्मण । द्विजांते करूनिया दूषण । राजे म्हणविती आपण । तया यवनराज्यांत ॥२८॥ ऐसे असता वर्तमानी । विप्र मदांधे व्यापूनि । राजापुढे जावोनि । विनविताती परियेसा ॥२९॥ विप्र म्हणती रायासी । आम्हा योग्यता बहुवसी । न मिळे एखादा वादासी । वृथा झाले शिकोनिया ॥३०॥ आमुचे मनी बहु आर्ता । करणे वाद वेदशास्त्री । निरोप देई जाऊ आता । विचारू तुझ्या राष्ट्रात ॥३१॥ जरी मिळेल एखादा नरू । तयासवे चर्चा करू । न मिळे तैसा द्विजवरू । जयपत्र घेऊ ब्राह्मणाचे ॥३२॥ राजा म्हणे तयासी । जावे राष्ट्री त्वरितेसी । पराभवावे ब्राह्मणासी । म्हणोनि निरोप देता झाला ॥३३॥ यवनाचे आज्ञेसी । निघाले द्विजवर तामसी । पर्यटन करिता राज्यासी । गावोगावी विचारिती ॥३४॥ गावोगावी हिंडती । जयपत्रे लिहून घेती । ऐसी कवणा असे शक्ति । तयासन्मुख उभे रहावे ॥३५॥ समस्त नगरे हिंडत । पुढे गेले दक्षिणपंथ । भीमातीरी असे विख्यात । कुमसी ग्राम उत्तम ॥३६॥ तेथे होता महामुनि । त्रिविक्रमभारती म्हणुनी । त्यासी येती वेद तिन्ही । अनेकशास्त्री अभिज्ञ तो ॥३७॥ महामुनि कीर्तिमंत । म्हणोनि सांगती जन समस्त । ऐकती द्विज मदोन्मत्त । गेले तया मुनीपासी ॥३८॥ जावोनि म्हणती तयासी । त्रिवेदी ऐसे म्हणविसी । चर्चा करावी आम्हंसी । अथवा द्यावे हारिपत्र ॥३९॥ विप्रवचन ऐकोनि । म्हणतसे त्रिविक्रममुनि । आम्ही नेणो वेद तिन्ही । अथवा न ये वेद एक ॥४०॥ जरी जाणो वेदशास्त्र । तरी का होतो अरण्यपात्र । वंदन करिते राजे सर्वत्र । तुम्हांसारखे भोग करितो ॥४१॥ नेणो म्हणोनि अरण्यवासी । वेष घेतला मी संन्यासी । आम्ही भिक्षुक तापसी । तुम्हांसमान नव्हे जाणा ॥४२॥ हारी अथवा जिंकून । नाही तयाचा अभिमान । तुम्ही उत्कृष्ट विद्वज्जन । आम्हासवे काय वाद ॥४३॥ ऐकोनि मुनींचे वचन । तवका अले ते ब्राह्मण । आम्हासवे वाद कवण । घाली ऐसा त्रिभुवनी ॥४४॥ हिंडत आलो अवघे राष्ट्र । आम्हासमान नाही नर । म्हणोनि दाखविती जयपत्र । असंख्यात परियेसा ॥४५॥ येणेपरी आपणासी । जयपत्र द्यावे विशेषी । अभिमान असल्या मानसी । करी वाद म्हणताती ॥४६॥ अनेकपरी ब्राह्मणांसी । सांगे मुनि विनयेसी । ऐकती ना द्विज महाद्वेषी । मागती जयपत्र आपुले ॥४७॥ त्रिविक्रम महामुनि । आपुले विचार अंतःकरणी । याते न्यावे गाणगाभुवनी । शिक्षा करणे द्विजाते ॥४८॥ विप्र मदांधे व्यापिले । अनेक ब्राह्मण धिक्कारिले । त्याते करणे उपाय भले । म्हणोनि योजिले मनात ॥४९॥ त्रिविक्रम म्हणे विप्रासी । चला गाणगाभुवनासी तेथे देईन तुम्हांसी । जयपत्र विस्तारे ॥५०॥ तेथे असती आपुले गुरु । तयापुढे पत्र देईन निर्धारू । अथवा तुमच्या मनींचा भारू । शमन करू म्हणे देखा ॥५१॥ ऐशी निगुती करूनि । निघाला त्रिविक्रम महामुनि । सवे येती विप्र दोनी । आंद्लिके बैसोनिया ॥५२॥ मूढ ब्राह्मण अज्ञानी । यतीश्वरा चालवोनि । आपण बैसले सुखासनी । म्हणोनि अल्पायुषी झाले ॥५३॥ पावले तया गाणगापुरा । जे का स्थान गुरुवरा । रम्य स्थान भीमातीरा । वास नरसिंहसरस्वती ॥५४॥ नमन करूनि श्रीगुरूसी । विनवी मुनि भक्तीसी । कृपामूर्ति व्योमकेशी । भक्तवत्सला परमपुरुषा ॥५५॥ जय जयाजी जगद्गुरु । निर्गुण तूचि निर्विकारु । त्रयमूर्तीचा अवतारु । अनाथांचा रक्षक ॥५६॥ दर्शन होता तुझे चरण । उद्धरे संसारा भवार्ण । नेणती मूढ अज्ञानजन । अधोगतीचे ते इष्ट ॥५७॥ सद‌गदित कंठ झाला । रोमांच अंगी उठला । नेत्री बाष्प आनंद झाला । माथा ठेवी चरणावरी ॥५८॥ नमन करितांचि मनीश्वराते । उठविले श्रीगुरुनाथे । आलिंगोनि करुणावक्त्रे । पुसताती वृत्तान्त ॥५९॥ श्रीगुरु पुसती त्रिविक्रमासी । आलेत कवणे कार्यासी । विस्तारोनि आम्हांसी । निरोपावे मुनिवरा ॥६०॥ श्रीगुरुचे वचन ऐकोनि । सांगतसे त्रिविक्रममुनि । मदोन्मत्त विप्र दोनी । आले असती चर्चेसी ॥६१॥ वेदशास्त्रादि मीमांसे । म्हणती चर्चा करू हर्षे । वेद चारी जिव्हाग्री वसे । म्हणती मूढ विप्र दोनी ॥६२॥ जरी न करा चर्चेसी । पत्र मागती हारीसी । अनेकापरी तयांसी । सांगता न ऐकती उन्मत्त ॥६३॥ म्हणोनि आलो तुम्हांजवळी । तुम्ही श्रीगुरु चंद्रमौळी । तुमचे वाक्य असे बळी । तेणेपरी निरोपावे ॥६४॥ मुनिवचन ऐकोनि । श्रीगुरु म्हणती हास्यवदनी । आले होते विप्र दोनी । त्याते पुसती वृत्तान्त ॥६५॥ श्रीगुरु म्हणती विप्रांसी । कवण आलेती कार्यासी । वाद कायसा आम्हांसी । लाभ काय वादे तुम्हा ॥६६॥ आम्ही तापसी संन्यासी । आम्हा हारी कायसी । काय थोरी तुम्हांसी । जय होता यतीसवे ॥६७॥ श्रीगुरुवचन ऐकोनि । बोलताती विप्र दोनी । आलो पृथ्वी हिंडोनि । समस्त विप्र जिंकीत ॥६८॥ नव्हे कोणी सन्मुख । वेदचर्चापराङ्‍मुख । म्हणोनि पत्रे अनेक । काढोनिया दाखविली ॥६९॥ येणेपरी आम्हांसी । पत्र देता का सायासी । कोप आला त्रिविक्रमासी । घेवोनि आला तुम्हांजवळी ॥७०॥ जरी असाल साभिमान । तुम्हांसहित दोघेजण । वेदशास्त्रादि व्याकरण । चर्चा करू म्हणती विप्र ॥७१॥ आम्ही जाणो वेद चारी । न होती कोणी आम्हांसरी । तुम्ही दोघे यतीश्वरी । काय जाणाल वेदान्त ॥७२॥ श्रीगुरु म्हणती विप्रांसी । गर्वे नाश समस्तांसी । देवदानवादिकांसी । गर्वे मृत्यु लाधला जाणा ॥७३॥ गर्वे बळीसी काय झाले । बाणासुरासी फळ आले । लंकानाथ कौरव गेले । वैवस्वतक्षेत्रासी ॥७४॥ कवण जाणे वेदान्त । ब्रह्मादिका न कळे अंत । वेद असती अनंत । गर्व वृथा तुम्ही करिता ॥७५॥ विचाराल आपुले हित । तरी सांडा सर्व भ्रांत । काय जाणता वेदान्त । चतुर्वेदी म्हणविता ॥७६॥ श्रीगुरूचे वचन ऐकोनि । गर्वे दाटले बहु मनी । जाणो आम्ही वेद तीन्ही । सांग संहिता परियेसा ॥७७॥ येणेपरी श्रीगुरूसी । बोलती ब्राह्मण परियेसी । सिद्ध म्हणे नामधारकासी । अपूर्व पुढे वर्तले ॥७८॥ वेद चारी आदि अंती । श्रीगुरु ब्राह्मणां निरोपिती । सांगेन ऐका एकचित्ती । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥७९॥ इति श्रीगुरुचरित्रामृत । त्रिविक्रममुनि विख्यात । विप्र जयपत्र मागत । ते चरित्र वर्णिले ॥८०॥ इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विजप्रशंसा नाम पंचविशोऽध्यायः ॥२५॥ ----------------------------------------------------------------------- अध्याय २६ श्रीगणेशाय नमः । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । नका भ्रमू युक्तीसी । वेदान्त न कळे ब्रह्मयासी । अनंत वेद असती ॥१॥ वेदव्यासासारिखे मुनि । नारायण अवतरोनि । वेद व्यक्त करोनि । व्यास नाम पावला ॥२॥ तेणेही नाही पूर्ण केले । साधारण सांगितले । शिष्य होते चौघे भले । प्रख्यात नामे अवधारा ॥३॥ शिष्यांची नामे देखा । सांगेन विस्तारे ऐका । प्रथम पैल दुजा वैशंपायन निका । तिसरा नामे जैमिनी ॥४॥ चौथा सुमंतु शिष्य । करीन म्हणे विद्याभ्यास । त्यांसी म्हणे वेदव्यास । अशक्य तुम्हा शिकता ॥५॥ एक वेद व्यक्त शिकता । पाहिजे दिनकल्पांता । चारी वेद केवी वाचिता । अनंत वेद असे महिमा ॥६॥ ब्रह्मकल्प तिन्ही फिरले । वर्षोवर्षी वाचले । ब्रह्मचर्य आचरले । वेद पूर्ण शिको म्हणोनि ॥७॥ या वेदांचे आद्यंत । सांगेन ऐका एकचित्त । पूर्वी भारद्वाज विख्यात । ऋषि अभ्यास करीत होता ॥८॥ लवलेश आले त्यासी । पुनरपि करी तपासी । ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी । काय मागशील म्हणोनि ॥९॥ भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी । स्वामी मज प्रसन्न होसी । वेद शिकेन आद्यंतेसी । ब्रह्मचर्य आश्रमी ॥१०॥ वेदान्त मज दावावे । सर्व माते शिकवावे । ऐसे वरदान द्यावे । म्हणोनि चरणी लागला ॥११॥ ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी । मिती नाही वेदांसी । सर्व कैसा शिको म्हणसी । आम्हांसी वेद अगोचर ॥१२॥ तुज दावितो पहा सकळ । करोनि मन निर्मळ । शक्ति झालिया सर्व काळ । अभ्यास करी भारद्वाजा ॥१३॥ ऐसे म्हणोनि ऋषीसी । ब्रह्मा दावी वेदांसी । दिसताती तीन राशी । गिरिरूप होवोनि ॥१४॥ ज्योतिर्मय कोटिसूर्य । पाहता ऋषीस वाटे भय । वेदराशी गिरिमय । केवी शिकू म्हणतसे ॥१५॥ तिन्ही ब्रह्मकल्पांवरी । आचरले आश्रम चारी । वेद शिकले तावन्मात्री । एवढे गिरी केवी शिको ॥१६॥ म्हणोनि भयभीत झाला । ब्रह्मयाचे चरणी लागला । म्हणे स्वामी अशक्य केवळा । क्षमा करणे म्हणतसे ॥१७॥ या वेदाचा आद्यंत । आपण पहावया अशक्त । तूचि जाणसी जगन्नाथ । जे देशी ते घीन ॥१८॥ तू शरणागता आधार । माझे मनी वासना थोर । वेद शिकावे अपार । म्हणोनि आलो तुजपासी ॥१९॥ वेद देखोनि अमित । भय पावले चित्त । जे द्याल उचित । तेचि घेऊ परियेसा ॥२०॥ ऐसे वचन ऐकोन । ब्रह्मदेव संतोषोन । देता झाला मुष्टी तीन । अभ्यासावया ॥२१॥ तीन वेदांचे मंत्रजाळ । वेगळे केले तत्काळ । ऐसे चारी वेद प्रबळ । अभ्यासी भारद्वाजी ॥२२॥ अजून पुरते नाही त्यासी । केवी शिको पाहती वेदासी । सांगा तुम्ही परियेसी । चौघे वाचा चारी वेद ॥२३॥ पूर्ण एक एक वेदासी । शिकता प्रयत्‍न मोठा त्यासी । सांगेन थोडे तुम्हासी । व्यक्त करावया अभ्यास ॥२४॥ शिष्य म्हणती व्यासासी । एक एक वेद आम्हांसी । विस्तारावे आद्यंतेसी । शक्त्यनुसार अभ्यास करू ॥२५॥ ऐसे विनविती चौघेजण । नमुनी व्यासचरण । कृपा करावी जाण । आम्हांलागी व्यासमुनि ॥२६॥ करुणावचन ऐकोनि । व्यास सांगे संतोषोनि । पैल शिष्य बोलावोनि । ऋग्वेद निरोपित ॥२७॥ ऐक पैल शिष्योत्तमा । सांगेन ऋग्वेदमहिमा । पठण करी गा धर्मकर्मी । ध्यानपूर्वक करोनि ॥२८॥ पैल शिष्य म्हणे व्यासासी । बरवे विस्तारावे आम्हांसी । ध्यानपूर्वक लक्षणेसी । भेदाभेद निरोपावे ॥२९॥ त्यात जे अवश्य आम्हांसी । तेचि शिको भक्तीसी । तू कामधेनु आम्हांसी कृपा करी गा गुरुमूर्ती ॥३०॥ व्यास सांगे पैल शिष्यासी । ऋग्वेदध्यान परियेसी । वर्णरूप व्यक्ति कैसी । भेदाभेद सांगेन ॥३१॥ ऋग्वेदाचा उपवेद । असे प्रख्यात आयुर्वेद । अत्रि गोत्र असे शुद्ध । ब्रह्मा देवता जाणावी ॥३२॥ गायत्री छंदासी । रक्तवर्ण परियेसी । नेत्र पद्मपत्रसदृशी । विस्तीर्ण ग्रीवा कंबुकंठ ॥३३॥ कुंचकेशी श्मश्रु प्रमाण । द्वयरत्‍नी दीर्घ जाण । ऋग्वेद असे रूपधारण । मूर्ति ध्यावी येणेपरी ॥३४॥ आता भेद सांगेन ऐका । प्रथम चर्चा श्रावका । द्वितीय चर्चा श्रवणिया ऐका । जटा शफट दोनी शाखा ॥३५॥ पाठक्रमशाखा दोनी । सातवा दण्ड म्हणोनि । भेद सप्त निर्गुणी । पाच भेद आणिक असती ॥३६॥ अश्वलायनी शांखायनी । शाकला बाष्कला दोनी । पांचवी माण्डूका म्हणोनि । असे भेद द्वादश ॥३७॥ श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । व्यासे सांगितले शिष्यासी । ऐशिया ऋग्वेदासी । द्वादश भेद विस्तारे ॥३८॥ या कलियुगाभीतरी । म्हणविसी वेद चारी । कीर्ति मिरवा लोकांतरी । अध्यापक म्हणोनि ॥३९॥ तया द्वादश भेदांत । एक शाखा असे विख्यात । सुलक्षण रूप व्यक्त । कोण जाणे सांग मज ॥४०॥ नारायण व्यासमुनि । शाखा द्वादश विस्तारोनि । सांगितल्या संतोषोनि । पैल शिष्यासी ॥४१॥ ऋग्वेदाचे भेद असे । सांगितले वेदव्यासे । श्रीगुरु म्हणती हर्षे । मदोन्मत्त द्विजांसी ॥४२॥ यजुर्वेदविस्तार । सांगेन ऐका अपार । वैशंपायन शिष्य थोर । अभ्यास करी परियेसा ॥४३॥ व्यास म्हणे शिष्यासी । ऐक एकचित्तेसी । सांगतो यजुर्वेदासी । उपवेद धनुर्वेद ॥४४॥ भारद्वाज गोत्र जाणा । अधिदैवत विष्णु जाणा । त्रिष्टुप्‍ छंदासी तुम्ही म्हणा । आता ध्यान सांगेन ॥४५॥ कृशमध्य निर्धारी । स्थूल ग्रीवा कपाल जरी । कांचनवर्ण मनोहरी । नेत्र असती पिंगट ॥४६॥ शरीर ताम्र आदित्यवर्ण । पाच अरत्‍नी दीर्घ जाण । यजुर्वेदा ऐसे ध्यान । वैशंपायना निर्धारी ॥४७॥ ऐशिया यजुर्वेदासी । असती भेद शायसी । म्हणे व्यास शिष्यासी । सांगेन एकाचिपरी ॥४८॥ प्रथम चरका आहूरका । तिसरा नामकठा ऐका । प्राच्यकठा चतुर्थिका । कपिलकठा पाचवी पै ॥४९॥ सहावी असे अरायणीया । सातवी खुणी वार्तातवीया । श्वेत म्हणिजे जाण आठवीया । श्वेततर नवमी ॥५०॥ मैत्रायणी असे नाम । शाखा असे हो दशम । तिसी भेद उत्तम । असती सात परियेसा ॥५१॥ मानवा दुंदुभा दोनी । तिसरा ऐकेया म्हणोनि । वाराहा नाम चतुर्थपणी । भेद असे परियेसा ॥५२॥ हरिद्रवेया जाण पाचवा । श्याम म्हणिजे सहावा । सातवा श्यामायणीया जाणावा । दशम शाखा परियेसा ॥५३॥ वाजसनेया शाखेसी । भेद असती अष्टादशी । नामे सांगेन परियेसी । श्रीगुरु म्हणती तयांसी ॥५४॥ वाजसनेया नाम एका । द्वितीया जाबला निका । बहुधेया नामे तृतीयका । चतुर्थ कण्व परियेसा ॥५५॥ माध्यंदिना पाचवेसी । शापिया नाम षष्ठेसी । स्थापायनी सप्तमेसी । कापाला अष्टम विख्यात ॥५६॥ पौड्रवत्सा विख्यात । आवटिका नावे उन्नत । परमावटिका परम ख्यात । एकादश भेद जाणा ॥५७॥ पाराशर्या द्वादशी । वैद्येया नामे त्रयोदशी । चतुर्दश भेद पुससी । वैनेया म्हणती तयाते ॥५८॥ औंधेया नामे विशेषी । जाण शाखा पंचदशी । गालवा म्हणिजे षोडशी । बैजवा नाम सप्तदशी ॥५९॥ कात्यायनी विशेषी । जाण शाखा अष्टादशी । वाजसनीय शाखेसी । भेद असती अष्टादश ॥६०॥ तैत्तिरीय शाखा भेद दोनी । व्यास सांगे विस्तारोनि । औख्या काण्डिकेया म्हणोनि । यासी भेद पाच असती ॥६१॥ आपस्तंबी असे थोर । शाखा असे मनोहर । यज्ञादि कर्मे आचार । विज्ञान असे तयात ॥६२॥ दुसरा जाण बौधायनी । सत्याषाढी अघनाशिनी । हिरण्यकेशी म्हणोनि । चौथा भेद परियेसा ॥६३॥ औंधेयी म्हणोनि नाव । भेद असे पाचवा । अनुक्रमे पढावा । म्हणे व्यास शिष्यासी ॥६४॥ षडंगे असती विशेषे । नामे तयांची सांगेन ऐके । शिक्षा व्याकरण कल्पे । निरुक्त छंद ज्योतिष ॥६५॥ याते उपांगे असती माणिक । आणि त्यांची नामे तू ऐक । प्रतिपद अनुपद देख । छंद तिसरा परियेसा ॥६६॥ भाषाधर्म पंचम । मीमांसा न्याय सप्तम । कर्मसंहिता अष्टम । उपांगे ही जाणावी ॥६७॥ परिशिष्टे अष्टाविंश । असती ऐका विशेष । विस्तार करुनी परियेस । व्यास सांगे शिष्यासी ॥६८॥ पूर्वी होत्या वेदराशी । शिकता अशक्य मानवांसी । म्हणोनि लोकोपकारासी । ऐसा केला विस्तार ॥६९॥ शाखाभेदी येणेपरी । विस्तार केला प्रकारी । जितके मति उच्चारी । तितुके शिको म्हणोनि ॥७०॥ येणेपरी विस्तारी । सांगे व्यास परिकरी । वैशंपायन अवधारी । विनवीतसे त्याजवळी ॥७१॥ यजुर्वेद विस्तारेसी । निरोपिला आम्हांसी । शाखाभेद क्रमेसी । वेगळाले करोनि ॥७२॥ संदेह होतो आम्हासी । मूळ शाखा कोण कैसी । विस्तारोनि प्रीतीसी । निरोपावे स्वामिया ॥७३॥ व्यास म्हणे शिष्यासी । बरवे पुसिले आम्हांसी । या यजुर्वेदासी । मूळ तुम्हां सांगेन ॥७४॥ मंत्र ब्राह्मण संहिता । मिळोनि पढता मिश्रिता । तोचि मूळ प्रख्याता । यजुर्वेद जाणिजे ॥७५॥ आणिक असे एक खूण । संहिता मिळोनि ब्राह्मण । तोचि यजुर्वेद मूळ जाण । वरकड शाखा पल्लव ॥७६॥ यज्ञादि कर्मक्रियेसी । हे मूळ गा परियेसी । अभ्यास करी गा निश्चयेसी । म्हणे व्यास शिष्याते ॥७७॥ ऐकोनिया व्यासवचन । वैशंपायन म्हणे कर जोडून । यजुर्वेदमूळ विस्तारोन । निरोपावे स्वामिया ॥७८॥ व्यास म्हणे शिष्यासी । सांगेन ऐक विस्तारेसी । ग्रंथत्रय असती ज्यासी । अभ्यास करी म्हणतसे ॥७९॥ सप्त अष्टक संहितेसी । एकाएकाचे विस्तारेसी । सांगेन तुज भरवसी । म्हणे व्यास शिष्याते ॥८०॥ प्रथम इषेत्वा प्रश्नासी । अनुवाक असती चतुर्दशी । आठ अधिक विसांसी । पन्नासा असती ॥८१॥ अपऊर्ध्व प्रश्नासी । अनुवाक असती चतुर्दशी । चारी अधिक तिसांसी । प्रन्नासा तुम्ही जाणाव्या ॥८२॥ देवस्यत्वा प्रश्नासी । अनुवाक असती एकादशी । एक अधिक तिसांसी । पन्नासा असती ॥८३॥ आददेनामा प्रश्न चतुर्थ । षट्‍चत्वारिंशत्‍ अनुवाक विख्यात । पन्नासा जाण तयात । वेदाधिक पन्नास ॥८४॥ देवासुर नामक प्रश्नासी । अनुवाक असती एकादशी । असती एकावन्न पन्नासी । पंचम प्रश्नांत अवधारा ॥८५॥ ’संत्वासिंचा’ इति प्रश्न । द्वादश अनुवाक असती पूर्ण । पन्नासा असती एकावन्न । असती सहावे प्रश्नासी ॥८६॥ पाकयज्ञ नामक प्रश्न । त्रयोदशी अनुवाकी संपन्न । पन्नासा असती एकावन्न । सप्तम प्रश्न विस्तार ॥८७॥ अनुमत्य इति प्रश्नासी । अनुवाक जाणा द्वाविशंती । द्विचत्वारिशत पन्नासा असती । प्रथम अष्टक येणेपरी ॥८८॥ प्रथम अष्टक परियेसी । संख्या सांगेन संहितेसी । अनुवाक असती ख्यातीसी । एकचित्ते परियेसा ॥८९॥ एकशत आणि चत्वारिंशत वरी । अधिक त्यावरी तीन निर्धारी । अनुवाक असती परिकरी । अंतःकरणी धरावे ॥९०॥ पन्नासा असती त्यासी । त्रिशताधिक बेचाळिसी । प्रथम अष्टकी परियेसी । म्हणोनि सांगे व्यासमुनि ॥९१॥ द्वितीय अष्टकाचा विचार । सांगेन तो परिकर । प्रथम प्रश्नाचे नाम थोर । वायव्य असे म्हणावे ॥९२॥ प्रथम प्रश्नांत विशेश । अनुवाक जाण एकादश । पंचषष्टि असती पन्नास । एकचित्ते परियेसा ॥९३॥ पुढे असे द्वितीय प्रश्न । नाम असे प्रजापतिगुहान्‍ । द्वादश अनुवाक असती जाण । एकसप्तति पन्नासा ॥९४॥ आदित्य नामक प्रश्नास । अनुवाक जाणा चतुर्दश । षट्‍ अधिक पंचाशत । पन्नासा तुम्ही पढाव्या ॥९५॥ पुढील प्रश्न देवामनुष्या । अनुवाक जाणा चतुर्दशा । अष्ट अधिक चत्वारिंशा । पन्नासा तुवा जाणिजे ॥९६॥ म्हणता जाय महापाप । प्रश्न असे विश्वरूप । द्वादश अनुवाक स्वरूप । चारी अधिक सप्तति पन्नासा ॥९७॥ समिधा नाम प्रश्नास । निरुते अनुवाक द्वादश । सप्तति पन्नासा असती त्यास । एकचित्ते परियेसा ॥९८॥ ऐसे द्वितीय अष्टकासी । षष्ठ प्रश्न परियेसी । पाच अधिक सप्ततीसी । अनुवाक तुम्ही जाणावे ॥९९॥ पन्नासांची गणना । सांगेन तुज विस्तारोन । तीन शतांवरी अशीति जाण । अष्ट अधिक परियेसा ॥१००॥ तिसरा अष्टक सविस्तर । सांगेन तुम्हा परिकर । वैशंपायन शिष्य थोर । गुरुमुखे ऐकतसे ॥१॥ तिसर्‍या अष्टकाचा प्रश्न प्रथम । नाम ’प्रजापतिरकाम’ ॥ अनुवाक त्या एकादशोत्तम । द्विचत्वारिंशत पन्नासा त्यासी ॥२॥ द्वितीय प्रश्नास असे जाण । नाम ’यो वै पवमान’ । एकादश अनुवाक जाण । षट्‍चत्वारिशंत्‍ पन्नासा त्यासी ॥३॥ तृतीय प्रश्ना बरवीयासी । नाम असे ’अग्ने तेजस्वी’ । अनुवाकांची एकाद्शी । षट्‍चत्वारिंशत पन्नासा त्यासी ॥४॥ चौथा प्रश्न ’विवाएत’ । एकादश अनुवाक ख्यात । षट्‍चत्वारिशत पन्नासा त्यांत । एकचित्ते परियेसा ॥५॥ पुढे असे प्रश्न पंचम । म्हणावे नाम पूर्णा प्रथम । अनुवाक अकरा उत्तम । षड्‌विंशति पन्नासा त्यासी ॥६॥ ऐसे तृतीयाष्टकासी । अनुवाक पंचपंचाशत्‍ त्यासी । द्विशत अधिक सहा त्यासी । पन्नासा असती अवधारा ॥७॥ चौथ्या अष्टकाचा प्रथम प्रश्न । नामे असे युंजान । एकादश अनुवाक खूण । षट्‍चत्वारिंशत पन्नासा ॥८॥ प्रश्नास संज्ञा विष्णोः क्रम ऐसी । एकादश अनुवाक परियेसी । अष्ट अधिक चत्वारिंशतीसी । पन्नासा त्यात विस्तार ॥९॥ तिसरे प्रश्ना उत्तम । जाणा तुम्ही आपांत्वा नाम । त्रयोदश अनुवाक उत्तम । षट्‌त्रिंशत पन्नासा त्यासी ॥११०॥ चौथा प्रश्न रश्मिरसी । अनुवाक असती द्वादशी । सप्ताधिक त्रिंशत्‍ त्यासी । पन्नासा असती तुम्ही जाणा ॥११॥ नमस्ते रुद्र उत्तम । प्रश्न होय जाण पंचम । एकादश अनुवाक जाण । सप्ताधिक वीस पन्नासा ॥१२॥ ’अश्मन्नूर्ज’ प्रश्नास । नव अनुवाक परियेस । षट्‍चत्वारिंशत पन्नासा त्यास । एकचित्ते परियेसा ॥१३॥ प्रश्न ’अग्नाविष्णू’सी । अनुवाकांची जाण पंचदशी । एक न्यून चाळिसांसी । पन्नासा त्यासी विस्तारे ॥१४॥ ऐसे चतुर्थ अष्टकासी । सप्त प्रश्न परियेसी । अनुवाक असती ब्यायशी । द्विशतांवर एक उण्या अशीति पन्नासा ॥१५॥ पंचमाष्टका प्रथम प्रश्न । नामे ’सावित्राणि’ जाण । पन्नासा षष्टि एका ऊण । एकादश अनुवाक ख्याति ॥१६॥ विष्णुमुखा प्रश्नासी । अनुवाक असती द्वादशी । चतुषष्टि पन्नासा त्यासी । श्रीगुरु म्हणती द्विजाते ॥१७॥ तिसरा प्रश्न उत्सन्नयज्ञ । अनुवाक द्वादश धरा खूण । पन्नासांसी द्वय न्यून । पन्नासा असती परियेसी ॥१८॥ चौथा प्रश्न देवासुरा । अनुवाक असती त्यासी बारा । षष्टीत दोन उण्या करा । पन्नासा असती परियेसा ॥१९॥ यदेके नामे प्रश्न । चतुर्विशति अनुवाक खूण । दोन अधिक षष्टि जाण । पन्नासा असती परियेसा ॥१२०॥ हिरण्यवर्मा षष्ठ प्रश्न । त्रयोविंशति अनुवाक जाण । षष्टीमध्ये सहा न्यून । पन्नासा असती परियेसा ॥२१॥ यो वा आ यथा नामे प्रश्न । षड्‌विंशति अनुवाक जाण । षष्टीमध्ये सहा न्यून । पन्नासा असती परियेसा ॥२२॥ पंचमाष्टक संहितेसी । सप्त प्रश्न परियेसी । अनुवाक एकशत त्यासी । वीस अधिक विस्तारे ॥२३॥ त्रीणि अधिक चतुःशत । पन्नासा असती जाणा विख्यात । मन करूनि सावचित्त । ऐका म्हणे तये वेळी ॥२४॥ षष्ठाष्टक संहितेसी । प्रथम प्रश्न परियेसी । प्राचीनवंश नाम त्यासी । एकादश अनुवाक जाणा ॥२५॥ अधिक सहा सप्ततीसी । पन्नासा त्यासी परियेसी । विस्तार करूनि शिष्यासी । सांगतसे व्यासदेव ॥२६॥ ’यदुभौ’ नाम प्रश्नासी । अनुवाक जाणा एकादशी । एक उणा षष्ठीसी । पन्नासा असती परियेसी ॥२७॥ तिसरा प्रश्न चात्वाल । एकादशी अनुवाकी माळ । पन्नासा षष्ठीवरी द्वय स्थूळ । तिसरा प्रश्न परियेसी ॥२८॥ चवथा प्रश्न यज्ञेन । एकादश अनुवाक जाण । पन्नासा एक अधिक पंचाशत पूर्ण । एकचित्ते परियेसा ॥२९॥ ’इंद्रोवृत्र’ नाम प्रश्न । एकादश अनुवाक जाण । द्विचत्वारिंशत्‍ पन्नासा खूण । पंचम प्रश्नी परियेसा ॥१३०॥ ’सुवर्गाय’ नाम प्रश्नासी । अनुवाक असती एकादशी । त्रीणि अधिक चत्वारिंशती । पन्नासा असती परियेसा ॥३१॥ सहावे अष्टकी परिपूर्ण । त्यासी सहा अधिक असती पूर्ण । षष्टि अनुवाक असती जाण । त्रयस्त्रिंशदधिकत्रिशत पन्नासा ॥३२॥ सप्तमाष्टकाचा प्रश्न । नामे असे प्रजनन । अनुवाक वीस असती खूण । द्विपंचाशत पन्नासा त्यास ॥३३॥ साध्या म्हणती जो द्वितीय प्रश्न । विंशती अनुवाक जाण । पन्नास पन्नासा परिपूर्ण । एकचित्ते परियेसा ॥३४॥ ’प्रजवं वा’ नाम प्रश्नासी । अनुवाक वीस परियेसी । द्विचत्वारिंशत्‍ पन्नासा त्यासी । श्रीगुरु म्हणती तयांसी ॥३५॥ ’बृहस्पती’ नामक प्रश्न । द्वाविंशति अनुवाक जाण । त्रीण्यधिक पन्नासा खूण । पन्नासा असती अवधारा ॥३६॥ प्रश्न असे पाचवा जाण । ’गावो’ वा नामे उत्तम । पंचविंशति अनुवाक पूर्ण । चतुःपंचाशत्‍ पन्नासा त्यासी ॥३७॥ सप्तमाष्टक संहितेसी । अनुवाक असती परियेसी । एकशत सप्त त्यासी । अनुवाक असती विस्तार ॥३८॥ द्विशतावरी अधिकेसी । एकावन्न असती पन्नासी । सप्तमाष्टक असे सुरसी । एकचित्ते परियेसी ॥३९॥ अष्टमाष्टक संहितेसी । षट्‍ शताधिक अष्टचत्वारिंशतीसी । मुख्य प्रश्न चत्वारिंशत्‍ भरवसी । अनुवाक असती विस्तारे ॥१४०॥ द्विउणे शतद्वय सहस्त्र दोनी । पन्नासा तू जाण मनी । पठण करा म्हणोनी । व्यास सांगे शिष्यासी ॥४१॥ तीन अष्टक ब्राह्मणांत । असती जे जाण विख्यात । सांगेन ऐक एकचित्त । म्हणे व्यास शिष्यासी ॥४२॥ प्रथमाष्टक ब्राह्मणासी । प्रश्न आठ परियेसी । नामे त्याची ऐका ऐशी । एकचित्ते परियेसा ॥४३॥ प्रथम प्रश्न संधत्त । नाम असे विख्यात । अनुवाक दहा विस्तृत । अशीति दशक मनोहर ॥४४॥ उद्धन्य नाम दुसरा प्रश्न । सहा अनुवाक दशक पन्नास जाण । वाजपेय अनुसंधान । देवासुरा प्रश्न तिसरा ॥४५॥ त्यासी दशक अनुवाक जाण । पंच अधिक षष्टि दशक जाण । चौथा उभय नाम प्रश्न । दश अनुवाक मनोहर ॥४६॥ सवत्सरगणित सहा अधिका । त्यासी जाणा तुम्ही दशका । पाचवा नामे अग्नेकृत्तिका । प्रश्न असे अवधारा ॥४७॥ त्यासी अनुवाक द्वादश । सांगेन ऐका दशक । दोन अधिक षष्टि विशेष । एकचित्ते परियेसा ॥४८॥ सहावा प्रश्न अनुमत्य । अनुवाक दहा प्रख्यात । पाच अधिक सप्ततिक । दशक त्यासी अवधारा ॥४९॥ सप्तम प्रश्ना धरी खूण । नाम त्या एकद्वाब्राह्मण । दश अनुवाक आहेत जाण । चतुःषष्टि दशक त्यासी ॥१५०॥ आठवा वरुणस्य नाम प्रश्न । अनुवाक त्यासी दहा जाण । सप्त अधिक तीस खूण । दशक त्यासी मनोहर ॥५१॥ प्रथम अष्टक ब्राह्मणासी । प्रश्न आठ परियेसी । अष्टसंप्तति अनुवाक त्यासी । एकचित्ते परियेसा ॥५२॥ एक उणे पाचशत । दशक आहेत विख्यात । वैशंपायन ऐकत । गुरुमुखेकरोनि ॥५३॥ दुसरा अष्टक ब्राह्मणास । प्रथम प्रश्न आंगिरस । अनुवाक जाणा एकादश । साठी दशक मनोहर ॥५४॥ प्रजापतिरकांड । प्रश्न दुसरा हा गोड । एकादश अनुवाक दृढ । त्रिसप्तति दशक त्यासी ॥५५॥ कांड ब्रह्मवादिन । एकादश अनुवाक जाण । दशक आहे तो पन्नास पूर्ण । एकचित्ते परियेसा ॥५६॥ ’जुष्टो’ नाम प्रश्न ऐक । त्यासी अनुवाक अष्टाद्शक । वैशंपायन शिष्यक । गुरुमुखे ऐकतसे ॥५७॥ प्रश्न ’प्राणो रक्षति’ । अष्ट अनुवाक त्यासी ख्याति । पंच अधिक चत्वारिंशति । दशक तुम्ही ओळखिजे ॥५८॥ ’स्वाद्वीत्वा’ नामे षष्ठम । प्रश्न असे उत्तम । अनुवाक असती वीस खूण । षट्‍ अधिक अशीति दशक त्यासी ॥५९॥ सप्तम प्रश्न त्रिवृत्तास । अनुवाक असती अष्टादश । सहा अधिक षष्ठीस । दशक त्यासी मनोहर ॥१६०॥ अष्टम प्रश्न ’पीवोअन्न’ । अनुवाक असती नऊ जाणा । अशीतीसि एक उणा । दशक त्यासी मनोहर ॥६१॥ द्वितीय अष्टक ब्राह्मणासी । आठ प्रश्न परियेसी । वेद उणे शतक त्यासी । अनुवाक असती मनोहर ॥६२॥ चार शतां उपरी । तीन उणे सप्तति निर्धारी । दशक आहेती विस्तारी । एकचित्ते परियेसा ॥६३॥ तृतीयाष्टक ब्राह्मणासी । प्रश्न असती द्वादशी । नामे त्यांची परियेसी । एकचित्ते अवधारा ॥६४॥ प्रथम प्रश्न विख्यातु । नाम ’अग्निर्नः पातु’ । सहा अनुवाक विख्यातु । एक अधिक षष्ठी दशक ॥६५॥ ’तृतीयस्य’ द्वितीय प्रश्न । अनुवाक असती दहा जाण । पंचाशीतिक दशक खूण । एकचित्ते परियेसा ॥६६॥ तिसरा प्रश्न प्रत्युष्ट । अनुवाक असती एकादश । एका उणे ऐशी दशक । एकचित्ते अवधारा ॥६७॥ चौथा प्रश्न ’ब्राह्मणेसि’ । अनुवाक एका परियेसी । एका उणे विसांसी । दशक त्यांसी मनोहर ॥६८॥ पंचम प्रश्न नाम सत्य । चतुर्दश अनुवाक विख्यात । एक उणे तीस दशक । एकचित्ते परियेसा ॥६९॥ सहावा प्रश्न ’अंजंति’ । पंचदश अनुवाक ख्याति । सात अधिक त्रिंशती । दशक त्यासी जाणावे ॥१७०॥ अच्छिद्रसर्वान्वा नाम प्रश्न । चतुर्दश अनुवाक जाण । तीस अधिक शत खूण । दशक त्यासी मनोहर ॥७१॥ प्रश्न अश्वमेधासी । सांग्रहण्य ख्यातीसी । अनुवाक असती त्रयोदशी । एक्याण्णव दशक ॥७२॥ प्रजापतिरकाम । अश्वमेध असे उत्तम । त्रयोविंशति अनुवाक नेम । चारी अधिक अशीति दशक त्यासी ॥७३॥ संज्ञान म्हणती काठक । अनुवाक दहांशी एक अधिक । एका उणे पन्नास दशक । एकचित्ते परियेसा ॥७४॥ दुसरा ’लोकोसि’ काठक । दश अनुवाक असती ऐक । तयांमध्ये दोनी अधिक षष्ठी दशक । व्यास म्हणे शिष्यासी ॥७५॥ द्वादश प्रश्न तुभ्यासी । अनुवाक नव परियेसी । सहा अधिक पन्नासासी । दशक त्यासी मनोहर ॥७६॥ तिसरे अष्टक ब्राह्मणासी । सप्त चत्वारिंशत एक शत अनुवाकासी । सात शत द्‌व्यशीति दशकासी । विस्तार असे परियेसा ॥७७॥ तिनी अष्टक ब्राह्मणासी । प्रश्न सांगेन परियेसी । अष्ट अधिक विसांसी । एकचित्ते अवधारा ॥७८॥ त्रीणि शत विसांसी । एक अधिक परियेसी । अनुवाक आहेती विस्तारेसी । परत ब्राह्मणासी परियेसा ॥७९॥ दशक संख्या विस्तार । सप्तशत अधिक सहस्त्र । अष्टचत्वारिंशति उत्तर । अधिक असती परियेसा ॥१८०॥ आता सांगेन अरण । त्यासी असती दहा प्रश्न । विस्तारोनिया सांगेन । एकचिते अवधारा ॥८१॥ अरणाचा भद्रनाम प्रथम प्रश्न । द्वात्रिशत् अनुवाक असे खूण । एक शतक तीस जाण । दशक त्यासी मनोहर ॥८२॥ स्वाधाय ब्राह्मणासी । अनुवाक वीस परियेसी । चतुर्विंशति दशक त्यासी । एकचित्ते परियेसा ॥८३॥ चित्ती म्हणिजे प्रश्नासी । अनुवाक जाण एकविंशतीसी । दोन अधिक पन्नासासी । दशक त्यासी विस्तार ॥८४॥ ऐसा थोर चवथा प्रश्न । नाम तया मंत्रब्राह्मण । द्विचत्वारिम्शत अनुवाक जाण । द्विषष्ठी दशक त्यासी ॥८५॥ श्रेष्ठ ब्राह्मण प्रश्नासी । अनुवाक जाण द्वादशी । आठ अधिक शतासी । दशक तुम्ही जाणावे ॥८६॥ पितृभेद असे प्रश्न । द्वादश अनुवाक परिपूर्ण । सप्तविंशती दशक जाण । एकचित्ते परियेसा ॥८७॥ ’शिक्षा’ नाम प्रश्नासी । अनुवाक असती द्वादशी । तीन अधिक विसांसी । दशक त्यासी मनोहर ॥८८॥ ब्रह्मविदा असे प्रश्न । अनुवाक त्यासी नऊ जाण । दशक चतुर्दश असे खूण । व्यास म्हणे शिष्यांसी ॥८९॥ भुगुर्वै असे प्रश्न । अनुवाक त्यासी दहा जाण । पंचदश दशक जाण । एकचित्ते परियेसा ॥१९०॥ दशम प्रश्न नारायण । अनुवाक तीस असती खूण । एकशत वेद जाण । दशक त्यासी परियेसा ॥९१॥ दहा प्रश्न अरणासी । अनुवाक जाण परियेसी । दोनी पूर्ण द्विशतासी । संख्या असे परियेसा ॥९२॥ पंचशता उपरी । नवपंचाशत विस्तारी । दशक जाणा मनोहरी । म्हणे व्यास शिष्याते ॥९३॥ ऐसे ग्रंथ तयांसी । प्रश्न असती ब्यायशी । नव षष्ठी अधिक एकशत सहस्त्रासी । अनुवाक जाण मनोहर ॥९४॥ पन्नासी दशक विस्तार । सांगेन तुम्हा प्रकार । द्वयशत दोनो सहस्त्र । द्वय उणे पन्नास जाण ॥९५॥ द्वयसहस्त्र त्रय शत । सप्त अधिक उन्नत । दशकी जाण विख्यात । ग्रंथत्रय परिपूर्ण ॥९६॥ ऐशीया यजुर्वेदासी । भेद असती शायशी । त्यात एक भेदासी । एवढा असे विस्तार ॥९७॥ येणेपरी व्यासमुनि । वैशंपायना विस्तारोनि । सांगता झाला म्हणोनि । श्रीगुरु म्हणती द्विजांसी ॥९८॥ तिसरा शिष्य जैमिनी । त्यास सांगे व्यासमुनि । सामवेद विस्तारोनि । निरोपित अवधारा ॥९९॥ उपवेद गांधर्व अत्र । काश्यपाचे असे गोत्र । रुद्र देवता परम पवित्र । जगती छंद म्हणावा ॥२००॥ नित्यस्त्रग्वी असे जाणा । शुचि वस्त्र प्रावरणा । मन शांत इंद्रियदमना । शमीदण्ड धरिला असे ॥१॥ कांचननयन श्वेतवर्ण । सूर्यासारखे किरण । षड्‌रत्‍नी दीर्घ जाण । सामवेद रूप असे ॥२॥ याच्या भेदा नाही मिती । अखिल सहस्त्र बोलती । ऐसी कोणा असे शक्ति । सकळासी शिकू म्हणावया ॥३॥ एका नारायणावांचोनि । समस्त भेद नेणे कोणी । ऐक शिष्या जैमिनी । सांगे तुज किंचित ॥४॥ प्रथम आसुरायणीया । दुसरे वासुरायणीय़ा । वातान्तरेया म्हणोनिया । तिसरा भेद परियेसा ॥५॥ प्रांजली असे भेद एक । ऋज्ञग्वैनविधा एक । आणि प्राचीन योग्यशाखा । असे सहावा परियेसा ॥६॥ ज्ञानयोग सप्तम । राणायणीया असे ज्या नाम । यासी भेद दश जाण । आहेत ऐका एकचित्ते ॥७॥ राणायणीया सांख्यायनी । तिसरा शाठ्या म्हणोन । मुग्दल नाम जाणोनि । चौथा भेद परियेसा ॥८॥ खल्वला महाखल्वला । सप्तम नामे लाङ्‌गला । अष्ट भेद कैथुमा । गौतमा म्हणे परियेसा ॥९॥ दशम शाखा जैमिनी । ऐसे भेद विस्तारोनि । सांगितले व्यासमुनी । श्रीगुरु म्हणति द्विजांसी ॥२१०॥ पूर्ण सामवेदासी । कोण जाणे क्षितीसी । तीनवेदी म्हणविसी । मदोन्मत्त होवोनिया ॥११॥ सूत म्हणे शिष्यांसी । सांगे व्यास अतिहर्षी । अथर्वण वेदांसी । निरोपिले परियेसा ॥१२॥ अथर्वण वेदासी । उपवेद असे परियेसी । मंत्रशास्त्र निश्चयेसी । वैतान असे गोत्र ॥१३॥ आधिदैवत इंद त्यासी । अनुष्टुप्‍ छंदेसी । तीक्ष्ण चंड क्रूरेसी । कृष्ण वर्ण असे जाण ॥१४॥ कामरूपी क्षुद्र कर्म । स्वदार असे त्यासी नाम । विश्वसृजक साध्यकर्म । जलमूर्ध्नीगालव ॥१५॥ ऐसे रूप तयासी । भेद नव परियेसी । सुमंतु नाम शिष्यासी । सांगतसे श्रीव्यास ॥१६॥ पैप्पला भेद प्रथम । दुसरा भेद दान्ता नाम । प्रदांत भेद सूक्ष्म । चौथा भेद स्तोता जाण ॥१७॥ औता नाम असे ऐका । ब्रह्मदा यशदा शाखा । सातवा भेद शाखा ऐका । शौनकी म्हणती ॥१८॥ अष्टम वेददर्शा भेदासी । चरणविद्या नवमेसी । पाच कल्प परियेसी । सांगेन ऐका एकचित्ते ॥१९॥ ऐसे चौघा शिष्यास । सांगत असे वेदव्यास । प्रकाश केला क्षितीस । भरतखंडी परियेसा ॥२२०॥ या भरतखंडत । पूर्वी होते पुण्य बहुत । वर्णाश्रमधर्म आचर । होते लोक परियेसा ॥२१॥ या कलियुगाभीतरी । कर्म सांडिले द्विजवरी । लोपले वेद निर्धारी । गुप्त जाहले क्षितीसी ॥२२॥ कर्मभ्रष्ट झाले द्विज । म्लेच्छा सांगती वेदबीज । सत्त्व गेले सहज । मंदमती झाले जाण ॥२३॥ पूर्वी होते महत्त्व । ब्राह्मणासी देवत्व । वेदबळे नित्यत्व । भूसुर म्हणती त्या काजा ॥२४॥ पूर्वी राजे याच कारणी । पूजा करती विप्रचरणी । सर्व देता दक्षिणादानी । ते अंगिकार न करिती ॥२५॥ वेदबळे विप्रांसी । त्रिमूर्ति वश होते त्यांसी । इंद्रादि सुरवरांसी । भय होते विप्रांचे ॥२६॥ कामधेनु कल्पतरू । विप्रवाक्ये होत थोरू । पर्वत करिती तृणाकारू । तृणा पर्वत परत्वे ॥२७॥ विष्णु आपण परियेसी । पूजा करी विप्रांसी । आपुले दैवत म्हणे त्यांसी । वेदसत्त्वे करोनिया ॥२८॥ श्लोक ॥ देवाधीनं जगत्सर्वं मंत्राधीनं च दैवतं । ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम्‍ ॥२९॥ ऐसे महत्त्व द्विजांसी । पूर्वी होते परियेसी । वेदमार्ग त्यजोनि सुरसी । अज्ञानमार्गे रहाटती ॥२३०॥ हीन यातीपुढे ऐका । वेद म्हणती मूर्ख देखा । त्यांच्या पाहू नये मुखा । ब्रह्मराक्षस होताती ॥३१॥ तेणे सत्त्व भंगले । हीन यातीते सेविले । अद्यापि क्रय करिती मोले । वेद भ्रष्ट करिताती ॥३२॥ ऐशा चारी वेदांसी । शाखा असती परियेसी । कोणे जाणावे क्षितीसी । सकळ गौप्य होऊनि गेले ॥३३॥ चतुर्वेदी म्हणविसी । लोकांसवे चर्चा करिसी । काय जाणसी वेदांसी । अखिल भेद आहेत जाण ॥३३४॥ ऐशामध्ये काय लाभ । घेऊ नये द्विजक्षोभ । कोणी केला तूते बोध । जाई म्हणती येथून ॥३५॥ आपुली आपण स्तुति करिसी । जयपत्रे दाखविसी । त्रिविक्रम यतीपासी । पत्र मागसी लिहुनी ॥३६॥ आमुचे बोल ऐकोनि । जावे तुम्ही परतोनि । वाया गर्वे भ्रमोनि । प्राण आपुला देऊ नका ॥३७॥ ऐसे श्रीगुरु विप्रांसी । सांगती बुद्धि हितासी । न ऐकती विप्र तामसी । म्हणती चर्चा करू ॥३८॥ चर्चा जरी न करू येथे । हारी दिसेल आम्हांते । सांगती लोक राजयाते । महत्त्व आमुचे उरे केवी ॥३९॥ सिद्ध म्हणे नामांकिता । ऐसे विप्र मदोमन्ता । नेणती आपुले हिता । त्यासी मृत्यु जवळी आला ॥२४०॥ गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । वेदविवरण ऐकता साधनु । होय समाधान श्रोते जना ॥४१॥ इति श्रीगुरुचरित्रामृत । चारी वेदांचा मथितार्थ । उकलोनि दाविला यथार्थ । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥२४२॥ इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वेदविस्तारकथनं नाम षड्‍विंशोऽध्यायः ॥२६॥ ---------------------------------------------------------------------- अध्याय २७ श्रीगणेशाय नमः । नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा विनवीतसे वचना । ऐका श्रोते एकचित्ते ॥१॥ जयजयाजी सिद्ध योगी । तू तारक आम्हा जगी । ज्ञानप्रकाश करणेलागी । दिले दर्शन चरणांचे ॥२॥ चतुर्वेद विस्तारेसी । श्रीगुरु निरोपिती विप्रांसी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥३॥ शिष्यवचन ऐकोनि । सांगता झाला विस्तारोनि । ऐक शिष्या नामकरणी । अनुपम महिमा श्रीगुरूची ॥४॥ किती प्रकारे विप्रांसी । श्रीगुरु सांगती हितासी । न ऐकती द्विज तामसी । म्हणती वाद का पत्र देणे ॥५॥ ऐसे उत्तर ऐकोनि कानी । कोप करिती श्रीगुरु मनि । जैसे तुमचे अंतःकरणी । तैसे सिद्धी पाववू म्हणती ॥६॥ सर्पाचे पेटारियासी । कोरू जाता मूषक कैसी । जैसा पतंग दीपासी । करी आपुला आत्मघात ॥७॥ तैसे विप्र मदोन्मत्त । श्रीगुरु न ओळखत । बळे आपुले प्राण देत । दिवांधवत्‍ द्विज देखा ॥८॥ इतुके वर्तता ते अवसरी । श्रीगुरु देखती नरासी दूरी । शिष्यासी म्हणती पाचारी । कवण जातो मार्गस्थ ॥९॥ श्रीगुरुवचन ऐकोनि । गेले सेवक धावोनि । त्या नराते पाचारोनि । आणिला गुरुसन्मुख ॥१०॥ गुरु पुसती त्यासी । जन्म कवण जातीसी । तो वृत्तान्त सांग मजसी । म्हणोनि पुसती तये वेळी ॥११॥ श्रीगुरुवचन ऐकोन । सांगे आपण जातिहीन । मातंग नाम म्हणोन । स्थान आपुले बहिर्ग्रामी ॥१२॥ तू कृपाळू सर्वा भूती । म्हणोनि पाचारिले प्रीती । आपण झालो उद्धारगति । म्हणोनि दंडवत नमन करी ॥१३॥ ऐसे कृपाळू परमपुरुष । दृष्टि केली सुधारस । लोहासी लागता परिस । सुवर्ण होता काय वेळ ॥१४॥ तैसे तया पतितावरी । कृपा केली नरहरी । दंड देवोनि शिष्या करी । रेखा सप्त काढविल्या ॥१५॥ श्रीगुरु म्हणती पतितासी । एक रेखा लंघी रे ऐसी । आला नर वाक्यासरसी । आले ज्ञान आणिक तया ॥१६॥ श्रीगुरु म्हणती तयासी । कवणे कुळी जन्मलासी । पतित म्हणे किरातवंशी । नाम आपुले वनराखा ॥१७॥ दुसरी रेका लंघिता । ज्ञान झाले मागुता । बोलू लागला अनेक वार्ता । विस्मय करिती तये वेळी ॥१८॥ तिसरी रेखा लंघी म्हणती । त्यासी झाली ज्ञातिस्मृति । म्हणे गंगापुत्र निश्चिती । वास तटी गंगेच्या ॥१९॥ लंघिता रेखा चवथी । म्हणे आपण शूद्रजाती । जात होतो आपुले वृत्ती । स्वामी माते पाचारिले ॥२०॥ लंघिता रेखा पांचवेसी । झाले ज्ञान आणिक तयासी । जन्म झाला वैश्यवंशी । नाम आपुले सोमदत्त ॥२१॥ सहावी रेखा लंघितां । म्हणे आपण क्षत्रिय ख्याता । नाम आपुले विख्याता । गोदावरी म्हणोनि ॥२२॥ सातवी रेखा लंघिताक्षण । अग्रजाती विप्र आपण । वेदशास्त्रादि व्याकरण । अध्यापक नाम आपुले ॥२३॥ श्रीगुरु म्हणती तयासी । वेदशास्त्री अभ्यास म्हणसी । आले विप्र चर्चेसी । वाद करी त्यांसवे ॥२४॥ अभिमंत्रोनी विभूति । त्याचे सर्वांगी । प्रोक्षिती । प्रकाशली ज्ञानज्योती । त्या नरा परियेसा ॥२५॥ जैसे मानससरोवरास । वायस जाता होती हंस । तैसा गुरुहस्तस्पर्श । पतित झाला ज्ञानराशी ॥२६॥ नरसिंहसरस्वती जगद्गुरु । त्रयमूर्तींचा अवतारु । अज्ञानी लोक म्हणती नरु । तेचि जाती अधःपाता ॥२७॥ येणेपरी पतितासी । ज्ञान झाले आसमासी । वेदशास्त्र सांगेसी । म्हणो लागला तये वेळी ॥२८॥ जे आले चर्चेस विप्र । भयचकित झाले फार । जिव्हा तुटोनि झाले बधिर । ह्रदयशूळ तात्काळी ॥२९॥ विप्र थरथरा कापती । श्रीगुरुचरणी लोळती । आमुची आता काय गति । जगज्ज्योती स्वामिया ॥३०॥ श्रीगुरुद्रोही झालो जाण । धिक्कारिले ब्राह्मण । तू अवतार गौरीरमण । क्षमा करणे स्वामिया ॥३१॥ वेष्टोनिया मायापाशी । झालो आपण महातामसी । नोळखो तुझ्या स्वरूपासी । क्षमा करणे स्वामिया ॥३२॥ तू कृपाळु सर्वा भूती । आमुचे दोष नाणी चित्ती । आम्हा द्यावी उद्धारगति । म्हणोनि चरणी लागती ॥३३॥ एखादे समयी लीलेसी । पर्वत करसी तृणासरसी । पर्वत पाहसी कोपेसी । भस्म होय निर्धारी ॥३४॥ तूचि सृष्टि स्थापिसी । तूचि सर्वांचे पोषण करिसी । तूचि कर्ता प्रळयासी । त्रिमूर्ति जगद्गुरु ॥३५॥ तुझा महिमा वर्णावयासी । मति नाही आम्हांसी । उद्धरावे दीनासी । शरणागता वरप्रदा ॥३६॥ ऐसे विप्र विनविती । श्रीगुरु त्यासी निरोप देती । तुम्ही क्षोभविला भारती । त्रिविक्रम महामुनि ॥३७॥ आणिक केले बहुत दोषी । निंदिले सर्व विप्रांसी । पावाल जन्म ब्रह्मराक्षसी । आपुली जोडी भोगावी ॥३८॥ आपुले आर्जव आपणापासी । भोगिजे पुण्यपापासी । निष्कृति न होता क्रियमाणासी । गति नाही परियेसा ॥३९॥ श्रीगुरुवचन ऐकोनि । लागती विप्र दोघे चरणी । कधी उद्धरो भवार्णवी । म्हणोनिया विनविती ॥४०॥ श्रीगुरुनाथ कृपामूर्ति । त्या विप्रांते निरोप देती । ब्रह्मराक्षस व्हाल प्रख्याति । संवत्सर बारापर्यंत ॥४१॥ अनुतप्त झालिया कारण । शांतिरूप असाल जाण । जो का शुकनारायण । प्रथम वाक्य म्हणतसा ॥४२॥ तुमचे पाप शुद्ध होता । द्विज येईल पर्यटता । पुढील वाक्य तुम्हा सांगता । उद्धारगति होईल ॥४३॥ आता जावे गंगेसी । स्थान बरवे बैसावयासी । म्हणोनि निरोपिती त्यासी । गेले विप्र ते वेळी ॥४४॥ निघता ग्रामाबाहेरी । ह्रदयशूल अपरंपारी । जाता क्षण नदीतीरी । विप्र पंचत्व पावले ॥४५॥ आपण केल्या कर्मासी । प्रयत्‍न नाही आणिकासी । ऐसे विप्र तामसी । आत्मघातकी तेचि जाणा ॥४६॥ श्रीगुरुवचन येणेपरी । अन्यथा नव्हे निर्धारी । झाले राक्षस द्विजवरी । बारा वर्षी गति पावले ॥४७॥ विप्र पाठविले गंगेसी । मागे कथा वर्तली कैसी । नामधारक शिष्यासी । सिद्ध सांगे अवधारा ॥४८॥ पतित झाला महाज्ञानी । जातिस्मरण सप्तजन्मी । पूर्वापार विप्र म्हणोनि । निर्धार केला मनात ॥४९॥ नमन करूनि श्रीगुरूसी । विनवी पतित भक्तीसी । अज्ञानमाया तिमिरासी । ज्योतिरूप जगद्गुरु ॥५०॥ विप्र होतो पूर्वी आपण । केवी झालो जातिहीन । सांगावे जी विस्तारोन । त्रिकाळज्ञान अंतरसाक्षी ॥५१॥ जन्मांतरी आपण देख । पाप केले महादोष । की विरोधिले विनायक । नृसिंहसरस्वती सांग पा ॥५२॥ ऐसे वचन ऐकोनि । सांगती गुरु प्रकाशूनि । म्हणोनि सांगती सिद्धमुनि । नामधारक शिष्यासी ॥५३॥ म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । पुढील कथा ऐकता नर । पतित होय ब्रह्मज्ञानी ॥५४॥ ऐसी पुण्यपावन कथा । ऐकता उद्धार अनाथा । पावे चतुर्विध पुरुषार्था । निश्चयेसी जाण पा ॥५५॥ इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मदोन्मत्तविप्रशापकथनं नाम सप्तविंशोऽध्यायः ॥२७॥ ------------------------------------------------------------------- अध्याय २८ श्रीगणेशाय नमः । नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांग आम्हांसी । उल्हास माझे मानसी । गुरुचरित्र अतिगोड ॥१॥ सिद्ध म्हणे नामधारका । कथा असे अतिविशेष । ऐकता जाती सर्व दोष । ज्ञानज्योतिप्रकाशे ॥२॥ श्रीगुरु म्हणती पतितासी । आपुले पूर्वजन्म पुससी । सांगेन ऐक परियेसी । चांडालजन्म होणार गति ॥३॥ पुण्यपापांची गति । आपुले आर्जव भोगिती । कर्मविपाकी असे ख्याति । नीचश्रेष्ठकर्मानुसारी ॥४॥ विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण । यांचेपासाव चांडाल वर्ण । उपजला असता ज्ञातिहीन । जातिविभाग कर्मापरी ॥५॥ विप्रस्त्रियेपासी देखा । शूद्र जाय व्यभिचारिका । पिंड उपजे तो चांडालिका । सोळावी जाती चांडाल ॥६॥ हे मूळ उत्पत्तीचे लक्षण । नाना दोषांचे आचरण । तेणे हीन जन्म घेणे । विप्रादि चारी वर्णांसी ॥७॥ या दोषाचा विस्तार । सांगतो की सविस्तर । विप्रे करिता अनाचा । जन्म हीनजाती पावे ॥८॥ गुरु अथवा मातापिता । सांडोनि जाय तत्त्वतां । चांडालजन्म होय निरुता । सोडिता कुलस्त्रियेसी ॥९॥ कुलदेवता सोडोनि एका । पूजा करी आणिका । तो होय चांडाल देखा । सदा अनृत बोले नर ॥१०॥ सदा जीवहिंसा करी । कन्याविक्रय मनोहरी । लटिकेचि आपण प्रमाण करी । तोही जन्मे चांडालयोनी ॥११॥ शूद्रहस्ते करी भोजन । अश्वविक्रय करी ब्राह्मण । तोही चांडाल होय जाण । सदा शूद्रसंपर्कै ॥१२॥ शूद्रस्त्रीसी सदा संग । नित्य असे दासीयोग । गृहभांड अतळती त्याग । तेणे देवपितृकर्मे करी ॥१३॥ तोही पावे हीनयोनी । जो का अग्नि-घाली रानी । गायवासरांसी विघडोनि । वेगळी करी तोही । होय चांडाल ॥१४॥ सोडी आपुल्या जननीते । आणि मारी लेकराते । वेगळी करी आपुल्या सत्ते । तोही जन्मे चांडाल ॥१५॥ बैलावरी विप्र बैसे । शूद्रान्न जेवी हर्षे । चांडाल होय भरवसे । ऐसे म्हणती श्रीगुरु ॥१६॥ विप्र तीर्थास जावोन । श्राद्धादि न करी जाण । परान्न प्रतिग्रह घेणे । तो होय चांडाल ॥१७॥ षट्‍कर्मेरहित विप्र देखा । कपिला गाईचे दुग्ध ऐका । न करिता अभिषेका । क्षीरपान जो करी ॥१८॥ तोही पावे चांडालयोनी । तुळसीपत्रे ओरपोनि । पूजा करी देवांलागोनि । शालिग्राम शूद्रे भजलिया ॥१९॥ न सेवीच मातापिता । त्यजी त्यासी न प्रतिपाळिता । चांडाल होय जन्मता । सप्तजन्मी कृमि होय ॥२०॥ पहिली एक स्त्री असता । दुजी करोनि तिसी त्यजिता । होय जन्म त्यासी पतिता । आणिक सांगेन एक नवल ॥२१॥ श्रमोनि अतिथी आला असता । वेद म्हणवोनि अन्न घालिता । जन्म पावे हा तत्त्वता । चांडालयोनी परियेसा ॥२२॥ योग्य विप्रांते निंदिती । आणिक जाती पूजिती । चांडालयोनी जाती । वृत्तिलोप केलिया ॥२३॥ तळी विहिरी फोडी मोडी । शिवालयी पूजा तोडी । ब्राह्मणांची घरे मोडी । तोही जन्मे पतितकुळी ॥२४॥ स्वामिस्त्रियेसी । शत्रुमित्रविश्वासस्त्रीसी । जो करी व्याभिचारासी । तोही जन्मे पतितागृही ॥२५॥ दोघी स्त्रिया जयासी । त्यात ठेवी प्रपंचेसी । अतिथि आलिया अस्तमानासी । ग्रास न दे तोही पतित होय ॥२६॥ त्रिसंध्यासमयी देखा । जो विप्र जेवी अविवेका । भाक देउनी फिरे निका । तो जन्मे चांडालयोनी ॥२७॥ राजे देती भूमिदान । आपण घेती हिरोन । संध्याकाली करी शयन । तोही होय चांडाल ॥२८॥ वैश्वदेवकालि अतिथीसी । जो करी दुष्टोत्तरेसी । अन्न न देई तयासी । कुक्कुटजन्म होवोनि उपजे ॥२९॥ गंगातीर्थांची निंदा करी । एकादशी भोजन करी । स्वामीस सोडी समरी । चांडालयोनी तया जन्म ॥३०॥ स्त्री संभोगी पर्वणीसी । अथवा हरिहरादिवशी । वेद शिकवी शूद्रासी । चांडालयोनी जन्म पावे ॥३१॥ मृत्युदिवसी न करी श्राद्ध । केले पुण्य सांगे प्रसिद्ध । वाटेकरांसी करी भेद । चांडालयोनी जन्म पावे ॥३२॥ ग्रीष्मकाली अरण्यात । पोई घालिती ज्ञानवंत । तेथे विघ्न जो करी । तोही जन्मे चांडालयोनी ॥३३॥ नाडीभेद न कळता वैद्यकी । जाणोनि औषधे दे आणिकी । तो होय महापातकी । चांडालयोनीत संभवे ॥३४॥ जारण मारण मोहनादि । मंत्र जपती कुबुद्धि । जन्म चांडाल होय त्रिशुद्धी । वेदमार्ग त्यजिता विप्रे ॥३५॥ श्रीगुरुसी नर म्हणे कोण । हरिहराते निंदे जाण । अन्य देवतांचे करी पूजन । तो नर पतित होय ॥३६॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । आपुले कर्म त्यजूनि मंद । आणिक कर्म आचरे सदा । तोही होय चांडाल ॥३७॥ शूद्रापासूनी मंत्र शिके । त्यासी घडती सर्व पातके । गंगोदक क्षीरोदके । श्वानचर्मी घातले परी ॥३८॥ विधवा स्त्रीशी संग करी । शिव्या देऊन अतिथि जेववी घरी । श्राद्धदिनी पिंड न करी । चांडालयोनी तो जन्मे ॥३९॥ माता पिता गुरु द्वेषी । तो जन्मे चांडालयोनीसी । आणिक जन्म पापवंशी । उपजोनि येती परियेसा ॥४०॥ गुरूची निंदा करी हर्षी । सदा असे विप्रद्वेषी । वेदचर्चा करी बहुवशी । तो होय ब्रह्मराक्षस ॥४१॥ भजे आपण एक दैवत । दुजे देव निंदा करीत । तो होय अपस्मारित । दरिद्ररूपे पीडतसे ॥४२॥ माता पिता गुरु वर्जोन । वेगळा होय स्त्री आपण । बेरडाचे पोटी उपजोन । रोगी होऊन राहतसे ॥४३॥ सदा वेद दूषी आपण । अवमानीत ब्राह्मण । कर्मभ्रष्ट होय आपण । मूत्रकृच्छ्ररोगी होय ॥४४॥ लोकांचे वर्मकर्म आपण । सदा करी उच्चारण । ह्रदयरोगी होय जाण । महाकष्ट भोगीतसे ॥४५॥ गर्भपात करी स्त्रियेसी । वांझ होवोनि उपजे परियेसी । पुत्र झालिया मरती त्वरेसी । गर्भपात करू नये ॥४६॥ धर्मशास्त्रादि पुराण । सांगता नायके जाण । आणिक जेविता दृष्टि आपण । बहिरट होवोनि उपजे ॥४७॥ पतितासवे करी इष्टती । गर्दभजन्म पावती । त्यासी रस औषध घेती । मृगयोनी जन्मे तो ॥४८॥ ब्रह्महत्या केली जरी । क्षयरोगी होय निर्धारी । सुरापानी ओळखा परी । श्यामदंत उपजेल ॥४९॥ अश्ववध गोवध करिता । वांझ ज्वरी होय निश्चिता । सवेचि होय अनुतप्तता । दोष काही नाही त्यासी ॥५०॥ विश्वासघातकी नरासी । जन्म होय ऐसा त्यासी । अन्न जेविता वांति उर्वशी । अन्नवैरी तो होय ॥५१॥ सेवक एकाचा चाळवोन । घेवोनि जाती जे जन । त्यासी होय जाण बंधन । कारागृह भोगीतसे ॥५२॥ सर्पजाती मारी नर । सर्पयोनी पुढे निर्धार । ऐसे दोष अपार । आता तस्कर प्रकरण सांगेन ॥५३॥ स्त्रियांते चोरूनि घेऊनि जाय । मतिहीन जन्म होय । सदा क्लेशी आपण होय । अंती जाय नरकासी ॥५४॥ सुवर्णचोरी करी नर । प्रमेहव्याधि होय निर्धार । पुस्तक चोरिता नर । अंध होउनि उपजे देखा ॥५५॥ वेस्त्रचोरी करी जरी । श्वित्री रोगी होय निर्धारी । गणद्रव्यचोरी घरी । ब्रह्मांडपुराणी बोलिले असे ॥५७॥ परद्रव्य-अपहार देखा । परदत्तापहार विशेषा । परद्वेषी नर ऐका । धान्य अपुत्री होउनि उपजे ॥५८॥ अन्नचोरी केलिया देखा । गुल्मव्याधि होय ऐका । धान्य करील तस्करिका । रक्तांग होय दुर्गंध शरीर ॥५९॥ का एखादा तैल चोरी । तोही दुर्गंधी पावे शरीरी । परस्त्रीब्रह्मस्व अपहारी । ब्रह्मराक्षसजन्म पावे ॥६०॥ मोती माणिक रत्‍ने देखा । चोरी करी नर ऐका । हीनजातीसी जन्म निका । पावे नर अवधारा ॥६१॥ पत्रशाखादि फळे चोरी । खरूजी होय अपरंपारी । रक्तांगी होय निर्धारी । गोचिड होय तो नर ॥६२॥ कांस्य लोह कर्पास लवण । तस्करिता नरा जाण । श्वेतकुष्ठ होय निर्गुण । विचारोनि रहाटावे ॥६३॥ देवद्रव्यापहारी देखा । देवकार्यनाश अपहार देखा । पंडुरोगी तो निका । फळचोरी विद्रूपी ॥६४॥ परनिक्षेपचोरी करी देखा । करिता होय सदा शोका । धनतस्कर उंष्ट्र ऐका । जन्म पावे अवधारा ॥६५॥ फलचोरी होय वनचर । जलचोरही होय कावळा थोर । गृहोपकरणे तस्कर । काकजन्म तो पावे ॥६६॥ मधुतस्कर अवधारी । जन्म पावे होय घारी । गोरस करी चोरी । कुष्ठी होय परियेसा ॥६७॥ श्रीगुरु म्हणती पतितासी । जन्म पावे ऐसिया दोषी । आता सांगेन व्यभिचारप्रकरणेसी । शांतिपर्वी बोलिले असे ॥६८॥ परस्त्री आलिंगिया देखा । शतजन्म श्वान निका । पुढे मागुती सप्तजन्मिका । भोगी दुःखा अवधारा ॥६९॥ परस्त्रीयोनी पाहे दृष्टीने । जन्मे तो अंधत्वपणे । बंधुभार्यासंपर्क करणे । गर्दभजन्म तो पावे ॥७०॥ तोही जन्म सोडोनि । निघोनि जाय सर्पयोनी । पुन्हा नरकी जावोनि । नाना कष्ट भोगीतसे ॥७१॥ सखीभार्यासवे ऐका । मातुलस्त्री असे विशेखा । येखादा करी संपर्का । श्वानयोनी जन्म पावे ॥७२॥ परस्त्रियांचे वदन । न करावे कदा अवलोकन । कुबुद्धी करिता निरीक्षण । चक्षुरोगी होऊनि उपजे ॥७३॥ आपण असे शूद्रजाति । विप्रस्त्रीशी करी रति । ती दोघेही कृमि होती । हे निश्चित अवधारा ॥७४॥ सदा शूद्रसंपर्क करी । याची स्त्री व्यभिचारी । जन्म पावे हो कुतरी । महादोष बोलिलासे ॥७५॥ ऐसे तया पतिताप्रती । श्रीगुरु आपण निरोपिती । ऐकत होता त्रिविक्रमभारती । प्रश्न केला श्रीगुरूसी ॥७६॥ स्वामी निरोपिले धर्म सकळ । ऐकता होय मन निर्मळ । जरी घडले एक वेळ । पाप जाय कवणेपरी ॥७७॥ श्रीगुरु म्हणती त्रिविक्रमासी । प्रायश्चित्त असे पापासी । पश्चात्ताप होय ज्यासी । पाप नाही सर्वथा ॥७८॥ पाप असे थोर केले । अंतःकरणी असे खोचले । त्यासी प्रायश्चित्त भले । कर्मविपाकी बोलिले ॥७९॥ प्रायश्चित्तांची विधाने । सांगेन ऐका स्थिर मने । अनेक ऋषींची वचने । ती सांगेन ऐका तुम्ही ॥८०॥ प्रथम व्हावा ब्रह्मदंड । तेणे होय पापखंड । गोदाने सालंकृत अखंड । अशक्त तरी द्रव्य द्यावे ॥८१॥ निष्क अथवा अर्धनिष्क । सूक्ष्म पाप पाव निष्क । स्थूलसूक्ष्म असेल पातक । तेणे विधीं द्रव्य द्यावे ॥८२॥ अज्ञानकृत पापासी । पश्चात्तापे शुद्धि परियेसी । गुरुसेवा तत्परेसी । केलिया गुरु निवारी ॥८३॥ नेणता पाप केलियासी । प्रायश्चित्त असे परियेसी । प्राणायाम द्विशतेसी । पुण्यतीर्थी दहा स्नाने ॥८४॥ तीन गुंजा सुवर्ण द्यावे । नदी आचरावे दोन गावे । सौम्य पातक याचि भावे । जाती पापे परियेसी ॥८५॥ स्त्रीपुरुष दोघांत एक । करिती पुण्यपाप दोष । दोघेही पडती दोषात । दोघे आचरावे प्रायश्चित्त ॥८६॥ आणिक एक असे प्रकार । जेणे पाप होय दूर । गायत्रीजप दहा सहस्त्र । करावा तेणे वेदमंत्र ॥८७॥ याचे नाव गायत्रीकृच्छ । महादोषी करी पवित्र । ऐसे करावे विचित्र । श्रीगुरु सांगती त्रिविक्रमासी ॥८८॥ प्राजापत्यकृच्छ्र देखा । असे विधि अतिविशेषा । भोजन करावे मुक्त एका । अथवा अयाचित भिक्षा ॥८९॥ उपवास करावे तीन दिवस । स्मरावे गुरुचरणास । येणे जाती सौम्य दोष । जे आपणासी सामान्य ॥९०॥ ’अतिकच्छ्र’ असे एक । एकचित्ते मुनि ऐक । दोष असतील सामान्यक । अज्ञानेचि केलिया ॥९१॥ अन्न घ्यावे सप्तविंशति ग्रास । सकाळी बारा रात्री पंचदश । अथवा दोनी अष्ट ग्रास । अयाचित अन्न द्यावे ॥९२॥ ऐसे सौम्य पातकासी । विधि असती परियेसी । मास एक नेमेसी । अंजुली एक जेवावे ॥९३॥ उपवास तीन करावे देखा । प्रकार सांगेन आणिका । तीन दिन उपोषका । घृतपारणे करावे ॥९४॥ तीन दिवस घृत घेवोनि । क्षीर घ्यावे दिवस तीनी । तीन दिवस वायु भक्षोनि । पुनः क्षीर एक दिवस ॥९५॥ एखादा असेल अशक्त । तयासी असे एक व्रत । तीळ गुळ लाह्या पीठ । उपवास एक करावा ॥९६॥ पूर्णकृच्छ्र करा ऐसी । पर्णोदक घ्यावे प्रतिदिवशी । करावे तितके उपवासी । पश्चात्तापे प्राशन कीजे ॥९७॥ कमल बिल्व अश्वत्थ । कुशोदक बिंदु नित्य । पान करावे सत्य । पर्णकृच्छ्र परियेसा ॥९८॥ आणिक एक प्रकार । करी चांद्रायण-आचार । कुक्कुटांडप्रमाण आहार । ग्रास घ्यावे वर्धमानी ॥९९॥ अमावास्येसी एक ग्रास । पौर्णिमेसी पंचदश । कृष्णपक्षी उतरत । दुसरे मासी हविष्यान्न ॥१००॥ आपले पाप प्रगटूनि । उच्चारावे सभास्थानी । पश्चात्तापे जळूनि । पाप जाय अवधारा ॥१॥ आता सांगेन तीर्थकृच्छ्र । यात्रा करावी पवित्र । वाराणसी श्वेतपर्वत । स्नानमात्रे पापे जाती ॥२॥ वरकड तीर्थी गेलियासी । गायत्रीजप सहस्त्रेसी । पाप जाय त्वरेसी । अगस्तीवचन बोलिले असे ॥३॥ समुद्रसेतुबंधेसी । स्नान केलिया परियेसी । भ्रूणहत्यापाप नाशी । कृतघ्नादि पातके ॥४॥ विधिपूर्वक शुचीसी । जप कोटी गायत्रीसी । ब्रह्महत्यापाप नाशी । ऐके त्रिविक्रम एकचित्ते ॥५॥ लक्ष गायत्री जप केलिया । सुरापानपाप जाय लया । सुवर्णचोरी केलिया । सात लक्ष जपावे ॥६॥ अष्ट लक्ष गुरुतल्पगासी । गायत्री जपता पाप नाशी । आता सांगेन परियेसी । वेदाक्षरे पाप दूर ॥७॥ पवमानसूक्त चत्वारी । पठण करिता ब्रह्महत्या दूरी । इंद्रमित्र अवधारी । एक मास जपावे ॥८॥ सुरापानादि पातके । जातील येणे सूक्तके । शुनःशेपा नाम सूक्ते । सुवर्णहरा पाप जाय ॥९॥ पवमानशन्नसूक्त । पठण करिता हविष्योक्त । मास एक पठत । गुरुतल्पगादिक हरती ॥११०॥ पंच मास सहा मास । मिताहर करुनी पुरुष । पुरुषसूक्ते कर्मनाश । पंचमहापापे नासती ॥११॥ त्रिमधु म्हणेजे मंत्रसूक्त । सुवर्णात्रीनास मंत्र । जपावे नाचिकेत । समस्त पातके प्रायश्चित्त ॥१२॥ नारायणपन्न देखा । जपावे भक्तिपूर्वका । नाशी पंच महापातका । प्रीतिपूर्वक जपावे ॥१३॥ त्रिपदा नाम गायत्रीसी । जपती जे भक्तीसी । अघमर्षण त्रिरावृत्तेसी । सप्त जन्म पाप जाय ॥१४॥ अपांमध्य पन्नासी । तद्विष्णो नाम सूक्तेसी । जपती जे जन भक्तीसी । सप्त जन्म पाप जाय ॥१५॥ आणिक असे विधान देखा । अज्ञानकृत दोषादिका । अनुतप्त होवोनि विशेषा । पंचगव्य प्राशन कीजे ॥१६॥ गोमूत्र गोमय क्षीर । दधि घृत कुशसार । विधिमंत्रे घ्यावे निर्धार । पहिले दिनी उपवास ॥१७॥ नीलवर्ण गोमूत्र । कृष्णगोमय पवित्र । ताम्र गायत्रीचे क्षीर । श्वेतधेनूचे दधि घ्यावे ॥१८॥ कपिला गाईचे तूप बरवे । ऐसे पंचगव्य बरवे घ्यावे । एकेकाचे क्लप्त भावे । सांगेन सर्व अवधारा ॥१९॥ गोमूत्र घ्यावे पावशेर। अंगुष्ठपर्व गोमय पवित्र । क्षीर पावणे दोन शेर । दधि तीन पाव घ्यावे ॥१२०॥ घृत घ्यावे पाव शेर । तितुकेचि मिळवावे कुशनीर । घेता मंत्र उच्चार । विस्तारोनि सांगेन ॥२१॥ कुशांसहित सहा रसे । एकेकासी मंत्र पृथक्‍ असे । प्रथम मंत्र इरावती असे । इदं विष्णु दुजा देख ॥२२॥ मानस्तोक मंत्र तिसरा । प्रजापति चतुर्थ अवधारा । पंचम गायत्री उच्चारा । सहावी व्याह्रति प्रणवपूर्वका ॥२३॥ ऐसे मंत्रोनि पंचगव्य । प्यावे अनुतप्त एकभाव । अस्थिगत चर्मगत पूर्व । पापे जाती अवधारा ॥२४॥ गाई न मिळता इतुके जिन्नसी । कपिला गाय मुख्य परियेसी । दर्शनमात्रे दोष नाशी । कपिला गाई उत्तम ॥२५॥ पंचमहापातक नावे । ब्रह्महत्या सुरापान जाणावे । स्वर्णस्तेय गुरुतल्पग जाणावे । पाचवा त्यासवे मिळालेला ॥२६॥ चौघे पातकी देखा । पाचवा तया मिळता देखा । त्यासहित पंचमहापातका । आहेती पापे परियेसा ॥२७॥ सुरापानी ब्रह्मघातकी । सुवर्णस्तेय गुरुतल्पकी । पाचवा महाघातकी । जो सानुकूळ मिळे तो ॥२८॥ ऐसे पातक घडे त्यासी । प्रायश्चित्त परियेसी । श्रीगुरुसंतोषी । अनुग्रहे पुनीत ॥२९॥ एखादा मिळेल शास्त्रज्ञ । स्वधर्माचारे अभिज्ञ । त्याच्या अनुग्रहे पापघ्न । पुनीत होय अवधारा ॥१३०॥ ऐसे श्रीगुरु त्रिक्रमासी । प्रायश्चित्त सांगती परियेसी । सकल विप्र संतोषी । ज्ञानप्रकाशे होती ॥३१॥ श्रीगुरु म्हणती पतितासी । पूर्वी तू विप्र होतासी । माता पिता गुरु दूषी । तेणे होय चांडालजन्म ॥३२॥ आता सांगतो ऐक । स्नानसंगमी मास एक । केलिया दोष जाती निःशंक । पुनः विप्रजन्म होसी ॥३३॥ पतित म्हणे स्वामीसी । तव दर्शन जाहले आम्हांसी । कावळा जाता मानसासी । राजहंस तो होतसे ॥३४॥ तैस तव दर्शनमात्रे । पवित्र झाली सकळ गात्रे । तारावे आता त्वा कृपापात्रे । शरणागतासी ॥३५॥ परिस लागता लोखंडासी । सुवर्ण होय तत्क्षणेसी । सुवर्ण मागुती लोहासी । केवी मिळे स्वामिया ॥३६॥ तव दर्शनसुधारसी । आपण झालो ज्ञानराशी । अभिमंत्रोनि आम्हांसी । विप्रांमध्ये मिळवावे ॥३७॥ ऐकोनि तयाचे वचन । गुरु बोलती हासोन । तव देह जातिहीन । विप्र केवी म्हणतील ॥३८॥ पतिताच्या गृहासी । उपजोनि तू वाढलासी । ब्रह्मत्व केवी पावसी । विप्र निंदा करितील ॥३९॥ पूर्वी ऐसा विश्वामित्र । क्षत्रियवंशी गाधिपुत्र । तपोबळे म्हणवी पवित्र । म्हणे तो विप्र आपणा ॥१४०॥ ब्रह्मयाची शत वर्षे । तप केले महाक्लेशे । त्याचे बळे म्हणवीतसे । ब्रह्मऋषी आपणा ॥४१॥ इंद्रादि सुरवरांसी । विनविता झाला परियेसी । आपणाते ब्रह्मर्षि । म्हणा ऐसे बोलतसे ॥४२॥ देव म्हणती तयासी । आम्हा गुरु वसिष्ठ ऋषि । जरी तो बोले ब्रह्मऋषि । तरी आम्ही अंगिकारू ॥४३॥ मग त्या वसिष्ठासी । विनवी विश्वामित्र ऋषि । विप्र म्हणा आपणासी । केले तप बहुकाळ ॥४४॥ वसिष्ठ म्हणे विश्वामित्र । क्षत्रिय तपास अपात्र । देह टाकोनि मग पवित्र । विप्रकुळी जन्मावे ॥४५॥ मग तुझा होईल व्रतबंध । होईल गायत्रीप्रबोध । तधी तुवा होसी शुद्ध । ब्रह्मऋषि नाम तुझे ॥४६॥ काही केल्या न म्हणे विप्र । मग कोपला विश्वामित्र । वसिष्ठाचे शत पुत्र । मारिता झाला तये वेळी ॥४७॥ ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषि । नव्हे कदा तामसी । अथवा न म्हणे ब्रह्मऋषि । तया विश्वामित्रासी ॥४८॥ वर्तता ऐसे एके दिवसी । विश्वामित्र कोपेसी । हाती घेउनी पर्वतासी । घालू आला वसिष्ठावरी ॥४९॥ विचार करीत मागुती मनी । जरी वधीन वसिष्ठमुनि । आपणाते न म्हणे कोणी । ब्रह्मऋषि म्हणोनिया ॥१५०॥ इंद्रादि देव समस्त ऋषि । म्हणती वसिष्ठवाक्यासरसी । आपण म्हणो ब्रह्मऋषि । अन्यथा नाही म्हणोनिया ॥५१॥ ऐशा वसिष्ठमुनीस । मारिता यासी फार दोष । म्हणोनि टाकी गिरिवरास । भूमीवरी परियेसा ॥५२॥ अनुतप्त झाला अंतःकरणी । वसिष्ठे ते ओळखूनि । ब्रह्मऋषि म्हणोनि । पाचारिले तये वेळी ॥५३॥ संतोषोनि विश्वामित्र । म्हणे बोल बोलिला पवित्र । म्हणे घरी अन्नमात्र । तुम्ही घ्यावे स्वामिया ॥५४॥ संतोषोनि वसिष्ठ । तयालागी बोलत । म्हणे शरीर हे निभ्रांत । सूर्यकिरणी पचवावे ॥५५॥ विश्वामित्रे अंगिकारिले । सूर्यकिरणे देहा जाळिले । सहस्त्रकिरणी तापले । देह सर्व भस्म झाला ॥५६॥ विश्वामित्र महामुनि । अतिसामर्थ्य अनुष्ठानी । पहिला देह जाळोनि । नूतन देह धरियेला ॥५७॥ ब्रह्मर्षि तेथोन । विश्वामित्र झाला जाण । सकळांसी मान्य । महाराज ॥५८॥ मग म्हणती सकळ मुनि । विश्वामित्र ब्रह्मज्ञानी । ब्रह्मऋषी म्हणोनि । झाला त्रिभुवनी प्रख्यात ॥५९॥ या कारणे तव देह । विसर्जावा जन्म इह । अनुतप्त तव भाव । ब्रह्मकुल भाविसी ॥१६०॥ ऐसे त्या पतितासी । बोधिता गुरु परियेसी । लाधले सुख त्यासी । त्याच्या मानसी न ये काही ॥६१॥ निधान सापडे दरिद्र्यासी । तो का सांडील संतोषी । अमृत सापडता रोग्यासी । का सांडील जीवित्व ॥६२॥ एखादे ढोर उपवासी । पावे तृणबिढारासी । तेथोनि जावया त्यासी । मन नव्हे सर्वथा ॥६३॥ तैसे त्या पतितासी । लागले ध्यान गुरूसी । न जाय आपुल्या मंदिरासी । विप्र आपणा म्हणतसे ॥६४॥ इतुके होता ते अवसरी । आली त्यांची पुत्रनारी । म्हणो लागले अपस्मारी । म्हणोनि आलो धावत ॥६५॥ जवळ येता स्त्रियेसी । स्पर्शो नको म्हणे तिसी । कोपेकरोनि मारावयासी । जात असे तो पतित ॥६६॥ दुःख करी ती भार्या । दुरुनी नमे गुरुपाया । पति माते सोडोनिया । जातो आता काय करू ॥६७॥ कन्या पुत्र मज बहुत । तया कोण पाळित । आम्हा सांडोनि जातो किमर्थ । सांगा तयासी स्वामिया ॥६८॥ जरी न सांगाल स्वामी त्यासी । त्यजीन प्राण पुत्रासरसी । येरवी आपणाते कोण पोषी । अनाथ मी स्वामिया ॥६९॥ ऐकोनि तियेचे वचन । गुरु बोलती हासोन । त्या नराते बोलावून । सांगताती परियेसा ॥१७०॥ गुरु म्हणती पतितासी । जावे आपुल्या घरासी । पुत्रकलश क्षोभता दोषी । तूते केवी गति होय ॥७१॥ या संसारी जन्मोनिया । संतोषवावे इंद्रिया । मग पावे धर्मकाया । तरीच तरे भवार्णव ॥७२॥ या कारणे पूर्वीच जाणा । न करावी आपण अंगना । करोनि तिसी त्यजिता जाणा । महादोष बोलिजे ॥७३॥ सूर्य-भूमी-साक्षीसी । तुवा वरिले स्त्रियेसी । तीस त्यागिता महादोषी । तूते नव्हे गति जाण ॥७४॥ श्रीगुरुवचन ऐकोन । विनवीतसे कर जोडून । केवी होऊ जातिहीन । ज्ञान होवोनि मागुती ॥७५॥ श्रीगुरु मनी विचारिती । याचे अंगी असे विभूति । प्रक्षाळावे लुब्धका-हाती । अज्ञानत्व पावेल ॥७६॥ ऐसे मनी विचारूनि । सांगती शिष्यासी बोलावोनि । एका लुब्धका पाचारोनि । आणा अतित्वरेसी ॥७७॥ तया ग्रामी द्विज एक । करी उदीम वाणिक । तयाते पाचारिती ऐक । तया पतितासन्निध ॥७८॥ श्रीगुरु म्हणती त्यासी । उदक घेवोनि हस्तेसी । स्नपन करी गा पतितासी । होय आसक्त संसारी ॥७९॥ आज्ञा होता ब्राह्मण । आला उदक घेऊन । त्यावरी घालिता तत्‌क्षण । गेली विभूति धुवोनि ॥८०॥ विभूति धूता पतिताचे । झाले अज्ञान मन त्याचे । मुख पाहता स्त्री-पुत्रांचे । धावत गेला त्याजवळी ॥८१॥ आलिंगोनिया पुत्रासी । भ्रांति म्हणे त्यासी । का आलो या स्थळासी । तुम्ही आला कवण कार्या ॥८२॥ ऐसा मनी विस्मय करीत । निघोनि घरा गेला पतित । सांगितला वृत्तान्त । विस्मय सर्व करिताती ॥८३॥ इतुके झाले कौतुक । पहाती नगरलोक । विस्मय करिती सकळिक । म्हणती अभिनव काय झाले ॥८४॥ त्रिविक्रमभारती मुनि । जो का होता गुरुसन्निधानी । पुसतसे विनवोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥८५॥ त्रिविक्रम म्हणे श्रीगुरूसी । होतो संदेह मानसी । निरोप द्यावा कृपेसी । विनंती एक अवधारा ॥८६॥ महापतित जातिहीन जाण । तयाते दिधले दिव्यज्ञान । अंग धुता तत्‌क्षण । गेले ज्ञान केवी त्याचे ॥८७॥ विस्तारोनि आम्हांसी । निरोपावे कृपेसी । म्हणोनि लागला चरणांसी । भावभक्ति करोनिया ॥८८॥ ऐसे पुत्र त्रिविक्रम यति । श्रीगुरु तया निरोपिती । त्याचे अंगाची विभूति । धुता गेले ज्ञान त्याचे ॥८९॥ ऐसे विभूतीचे महिमान । माहात्म्य असे पावन । सांच होय ब्रह्म पूर्ण । भस्ममहिमा अपार ॥१९०॥ गुरुवचन ऐकोनि । विनवीतसे त्रिविक्रम मुनि । देव गुरुशिरोमणि । भस्ममहिमा निरोपावा ॥९१॥ सिद्ध म्हणे शिष्यासी । भस्ममहिमा परियेसी । गुरु सांगता विस्तारेसी । एकचित्ते अवधारा ॥९२॥ म्हणोनि सरस्वतिगंगाधर । गुरुचरित्रविस्तार । ऐकता होय मनोहर । सकळाभीष्टे साधती ॥९३॥ पुढील कथा पावन । सांगे सिद्ध विस्तारोन । महाराष्ट्रभाषेकरून । सांगे सरस्वती गुरुदास ॥९४॥ इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे कर्मविपाककथनं नाम अष्टाविंशोऽध्यायः ॥२८॥

Search

Search here.