श्रीगुरुचरित्र अध्याय ३२ ते ३४
ग्रंथ - पोथी > गुरुचरित्र Posted at 2019-02-09 14:43:42
श्रीगुरुचरित्र
अध्याय ३२
श्रीगणेशाय नमः ।
पतिव्रतेचिया रिति । सांगे देवा बृहस्पति । सहगमनी फलश्रुति । येणेपरी निरोपिली ॥१॥
विधवापणाचा आचारू । सांगता झाला देववरू । पुसताती ऋषेश्वरू । ऐका श्रोते एकचित्ते ॥२॥
जवळी नसता आपुला पति । त्याते मरण झालिया प्राप्ति । काय करावे त्याचे सती । सहगमन केवी करावे ॥३॥
अथवा असेल गरोदरी । असे तीते कन्याकुमरी । काय करावे तिये नारी । म्हणून विनविती गुरूसी ॥४॥
ऐकोनि देवांचे वचन । सांगता जाला विस्तारोन । एकचित्ते करून । ऐका श्रोते सकळ ॥५॥
पति जवळी असे जरी । सहगमनी जावे तिये नारी । असता आपण गरोदरी । करू नये सहगमन ॥६॥
स्तनपानी असता कुमारू । तिणे करिता पाप थोरू । पुरुष मेला असेल दुरू । सहगमन करू नये ॥७॥
तिणे असावे विधवापणे । विधिपूर्वक आचरणे । सहगमासमाने । असे पुण्य परियेसा ॥८॥
विधवापणाचा आचारू । करिता असे पुण्य थोरू । निवर्तता आपुला भ्रतारू । केशवपन करावे ॥९॥
ज्या का विधवा केश राखिती । त्यांची ऐका फलश्रुति । केश पुरुषासी बाधिती । नरकापरी परियेसा ॥१०॥
यास्तव करणे केशवपण । करावे तिणे नित्य स्नान । एक वेळा भोजन । करावे तिणे परियेसा ॥११॥
एक धान्याचे अन्न । करावे तिणे भोजन । तीन दिवस उपोषण । करावे तिणे भक्तीने ॥१२॥
पाच दिवस पक्षमासास । करावा तिणे उपवास । अथवा चांद्रायणग्रास । भोजन करणे परियेसा ॥१३॥
चंद्रोदय बीजेसी । एक ग्रास तया दिवसी । चढते घ्यावे पंधरा दिवसी । पौर्णिमेसी भोजन ॥१४॥
कृष्णपक्षी येणेपरी । ग्रास घ्यावे उतरत नारी । अमावास्या येता जरी । एक ग्रास जेवावा ॥१५॥
शक्ति नाही जियेसी । एकान्न जेवावे परियेसी । अथवा फल-आहारेसी । अथवा शाका-आहार देखा ॥१६॥
अथवा घ्यावे क्षीर मात्र । कधी न घ्यावे अपवित्र । जेणे राहे प्राण मात्र । श्वासोच्छ्वास चाले ऐसे ॥१७॥
शयन करिता मंचकावरी । पुरुष घाली रौरव घोरी । भोगी नरक निरंतरी । पतीसहित परियेसा ॥१८॥
करू नये मंगलस्नान । अथवा देहमर्दन । गंध परिमल तांबूल जाण । पुष्पादि तिणे वर्जावे ॥१९॥
पुत्रावीण असे नारी । करणे तर्पण पुत्रापरी । तीळ दर्भ कुशधारी । गोत्रनाम उच्चारावे ॥२०॥
विष्णुपूजा करावी नित्य । आपुला पुरुष हा निश्चित । पुरुष आठवोनि चित्त । विष्णुस्थानी मानिजे ॥२१॥
पुरुष असता जेणेपरी । पतिनिरोपे आचार करी । तेणेचि रीती विष्णु अवधारी । त्याचे निरोपे आचरावे ॥२२॥
तीर्थयात्रा उपासव्रत । विष्णुनिरोपे करावे निश्चित । अथवा गुरु द्विज विख्यात । त्यांचे निरोपे आचरावे ॥२३॥
आपण असता सुवासिनी । ज्या वस्तूची प्रीति अंतःकरणी । तैशी वस्तु द्यावी धणी । विद्वज्जनविप्रांसी ॥२४॥
वैशाख माघ कार्तिकमास । अनेक स्नानी आचारविशेष । माघस्नान तीर्थास । विष्णुस्मरणे करावे ॥२५॥
वैशाखी जळकुंभदान । कार्तिकी दीपआराधन । ब्राह्मणा द्यावे घृतदान । यथाशक्त्या दक्षिणेसी ॥२६॥
माघमासी तिळघृतेसी । द्यावे दान विप्रांसी । अरण्यात वैशाखमासी । पोई घालिजे निर्मळोदके ॥२७॥
शिवालयी ईश्वरावरी । गळती ठेविजे निर्मळ वारी । गंध परिमळ पूजा करी । तेणे पुण्य अगाध ॥२८॥
विप्राचिया घरोघरी । उदक घालिजे शक्त्यानुसारी । अन्न द्यावे निर्धारी । अतिथिकाळी परियेसा ॥२९॥
तीर्थयात्रे जात्या लोका । त्याते द्याव्या छत्रपादुका । येता आपल्या गृहांतिका । पादप्रक्षालन करावे ॥३०॥
वारा घालावा विझणेसी । वस्त्र द्यावे परिधानासी । गंध तांबूल परिमळासी । कर्पूरवेलादि परियेसा ॥३१॥
जलपात्र द्यावे शक्तीसी । गुडपान आम्रपानेसी । द्राक्षे कर्दळीफळेसी । ब्राह्मणा द्यावे मनोहर ॥३२॥
जे जे दान द्यावे द्विजा । पतीच्या नावे अर्पिजे वोजा । संकल्पून पुरुषकाजा । धर्म करणे येणेपरी ॥३३॥
कार्तिकमासी जवान्न । अथवा जेविजे एकान्न । वृताक माष मसूर लवण । तैलादि मधु वर्जावे ॥३४॥
वर्जावे कास्यपात्र । आणिक वर्जावे द्विदलमात्र । मनी असावे पवित्र । एकाग्रेसी परियेसा ॥३५॥
पलाशपात्री भोजन करावे । शुचि उद्यापन करावे । जे जे व्रत धराते । त्याते उजवावे तत्त्वता ॥३६॥
घृतभरित कास्यपात्र । विप्रा द्यावे पवित्र । भूमिशयन केले व्रत । मंचक द्यावा विप्रासी ॥३७॥
जे जे वस्तु त्यजिली आपण । ते ते द्यावी ब्राह्मणालागून । रसद्रव्ये एक मास जाण । त्याग करावी परियेसा ॥३८॥
त्यजूनिया दधि क्षीर । उद्यापन आचार मनोहर । असलिया शक्त्यनुसार । धेनु द्यावी सालंकृत ॥३९॥
विशेषे असे आणिक व्रत । दीपदान असे ख्यात । वर्णिता महिमा अनंत । देवांसी म्हणे बृहस्पति ॥४०॥
दीपदान भाग सोळा । वरकड नसती धर्म सकळा । या कारणे अनंतफळा । दीपदान करावे ॥४१॥
माघस्नान माघमासी । करणे सूर्योदयासी । येणेपरी एक मासी । आचरावे भक्तीने ॥४२॥
लाडू तिळ खर्जुरेसी । करूनि पक्वान्ने ब्राह्मणांसी । द्यावी तिणे भक्तीसी । दक्षिणेसहित जाणा ॥४३॥
शर्करा मिरे एळेसी । तळून अपूप घृतेसी । दान द्यावे यतीसी । भोजन द्यावे अतीता ॥४४॥
हेमंतऋतु होता जाण । व्हावया शीतनिवारण । काष्ठे द्यावी विप्राकारणे । वस्त्रे द्यावी द्विजांसी ॥४५॥
पर्यंक द्यावा सुषुप्तीसी । एखाद्या भल्या ब्राह्मणासी । चित्र रक्त वस्त्रेसी । कंबळ द्यावे विप्रवर्गा ॥४६॥
व्हावया शीतनिवारण । औषध द्यावे उष्ण उष्ण । तांबूलदान परिपूर्ण । द्यावे एळाकर्पूरेसी ॥४७॥
गृहदान द्यावे विप्रासी । सांवत्सरिक ग्रामेसी । जाता तीर्थयात्रेसी । पादरक्षा देईजे ॥४८॥
गंध परिमळ पुष्पेसी । पूजा करावी केशवासी । रुद्राभिषेक विधींसी । अभिषेकावा गौरीहर ॥४९॥
धूप दीप नैवेद्यसी । पूजा करावी षोडशी । प्रीति बहु शंकरासी । दीपमाळा उजळिता ॥५०॥
आणिक सुगंध गंधेसी । तांबूलदान विधींसी । कर्पूरलवंगादि विविधेसी । भक्तिभावे अर्पिजे ॥५१॥
आपला पुरुष ध्यावोनि मनी । नारायण तो म्हणोनि । पूजा करावी एके मनी । भक्तिभावे परियेसा ॥५२॥
नेमे असावे तिये नारी । न बैसावे बैलावरी । लेवू नये चोळी करी । श्वेतवस्त्र नेसावे ॥५३॥
रक्त कृष्ण चित्र वस्त्र । लेता जाण दोष बहुत । आणिक असे व्रत । पुत्राचे बोल वर्तावे ॥५४॥
’आत्मा वै पुत्र नाम’ । म्हणून बोलती वेदागम । पतीपासून पुत्रजन्म । पुत्रआज्ञेत असावे ॥५५॥
ऐसा आचार विधवेसी । असे शास्त्रपुराणेसी । जरी आचरती भक्तीसी । सहगमनाचे फळ असे ॥५६॥
पापी जरी पति असला । असेल पूर्वी निवर्तला । नरकामध्ये वास्ल केला । पापरूपे भुंजत ॥५७॥
विधवापणे येणेपरी । आचरण करी जे नारी । मरण होता अवसरी । घेवोनि पति स्वर्गी जाय ॥५८॥
जितुक्या परी बृहस्पति । सांगे समस्त देवांप्रती । लोपामुद्रेची केली स्तुति । पतिव्रताशिरोमणि ॥५९॥
जितुक्या पतिव्रता नारी । समस्त भागीरथी सरी । त्यांचे पुरुष शंकरापरी । पूजा करावी दोघांची ॥६०॥
ऐसे बृहस्पतीचे वचन । सांगितले मनी विस्तारोन । ऐक बाळे तव मन । ज्यावरी प्रीति तेचि करी ॥६१॥
दुःख सकळ त्यजोनि । मम बोल ठेवी मनी । सांगितले तुजलागोनि । परलोकसाधन ॥६२॥
धैर्य जरी असेल तुजसी । सहगमन करी पतीसरसी । विधवापणे आचार करिसी । तेही पुण्य तितुकेची ॥६३॥
जे आवड तुझे मनी । सांग माये विस्तारोनि । हस्त मस्तकी ठेवूनि । पुसतसे प्रेमभावे ॥६४॥
ऐकोनि तया अवसरी । केले नमन तिये नारी । विनवीतसे करुणोत्तरी । भक्तिभावे करूनिया ॥६५॥
जय जयाजी योगीश्वरा । तूचि पिता सहोदरा । माझा प्राण मनोहरा । जनक जननी तूचि होसी ॥६६॥
आल्ये आपण परदेशात । जवळी नाही बंधुभ्रात । भेटलेती तुम्ही परमार्थ । अंतकाळी सोयरा ॥६७॥
सांगितले तुम्ही आचार दोनी । कष्ट बहु विधवापणी । अशक्य आम्हा न-टाके स्वामी । असाधारण असे दातारा ॥६८॥
तारुण्यपण मजसी । लावण्य असे देहासी । निंदापवाद शरीरासी । घडेल केवी वर्तमान ॥६९॥
संतोष होतो माझे मनी । पुण्य अपार सहगमनी । पतीसवे संतोषोनि । जाईन स्वामी निर्धारे ॥७०॥
म्हणूनि मागुती नमस्कारी । माथा ठेवी चरणांवरी । स्वामी माते तारी तारी । भवसागरी बुडतसे ॥७१॥
करुणाकृपेचा सागर । उठवीतसे योगेश्वर । देता झाला अभयकर । म्हणे पतीसवे जावे ॥७२॥
तोचि ठाव पुरुषासी । जाय माते सांगतेसी । सांगेन तुज विशेषी । ऐक माते एकचित्ते ॥७३॥
आलात तुम्ही दर्शनी । श्रीगुरुभेटीलागोनि । आरोग्य होईल म्हणोनि । भक्तिभावेकरूनिया ॥७४॥
होणार झाली ब्रह्मकरणी । काळासी जिंकिले नाही कोणी । जैशी ईश्वरनिर्वाणी । तैसेपरी होतसे ॥७५॥
ब्रह्मलिखित न चुके जाण । जे जे भोगणे असेल आपण । घडे तैसे श्रुतिवचन । दुःख कोणी करू नये ॥७६॥
हरिश्चंद्र राजा देख । डोंबाघरी वाहे उदका । बळी अजिंक्य ऐका । तोही गेला पाताळा ॥७७॥
सहस्त्रकोटि वर्षे ज्यासी । आयुष्य असे रावणासी । काळ तयाप्रति ग्रासी । दुर्योदह्ना काय झाले ॥७८॥
भीष्मदेव इच्छारमनी । तेही पडले रणांगणी । परीक्षिती सर्पाभेणी । लपता काय झाले तया ॥७९॥
अनंत अवतार येणेपरी । होऊनि गेले संसारी । देव दानव येणेपरी । सकळ काळाआधीन ॥८०॥
या कारणे काळासी । कोणी जिंकिले नाही क्षितीसी । सकळ देवदानवांसी । काळ जिंकी निर्धारे ॥८१॥
काळा जिंकिता नाही कोणी । एका श्रीगुरुवाचोनि । भाव असे ज्याचे मनी । त्यासी प्रत्यक्ष असे जाणा ॥८२॥
आता तुम्ही ऐसे करणे । जावे त्वरित सहगमने । अंतकाळ होता क्षणे । श्रीगुरुदर्शना जाय म्हणे ॥८३॥
म्हणोनि भस्म तये वेळी । लाविता झाला कपाळी । रुद्राक्ष चारी तत्काळी । देता जहाला तये वेळी ॥८४॥
योगी बोले तियेसी । रुद्राक्ष बांधी कंठासी । दोनी प्रेतकर्णासी । बांधोनि दहन करावे ॥८५॥
आणिक एक सांगेन तुज । गुरुदर्शना जाई सहज । रुद्रसूक्त म्हणती द्विज । गुरुचरण प्रक्षाळिता ॥८६॥
तेचि तीर्थ घेवोनि । आपुला देह प्रोक्षोनि । प्रेतावरी आणोनि । प्रोक्षण करावे भक्तीने ॥८७॥
मग जावे सहगमनेसी । वाणे द्यावी सुवासिनींसी । अनेक द्रव्ये वेचूनि हर्षी । विप्रा तोषवावे बहुत ॥८८॥
ऐशा परी तियेसी । सांगोनि गेला तापसी । पतिव्रता भावेसी । करी आयती त्या वेळी ॥८९॥
भले ब्राह्मण बोलावूनि । षोडश कर्मे आचरोनि । प्रेतासी प्रायश्चित्त देवोनि । औपासन करविताती ॥९०॥
सुस्नात होवोनि आपण । पीतांबर नेसोन । सर्वाभरणे लेवोन । हळदी कुंकू लावितसे ॥९१॥
औपासन प्रेतासी । करविताती विधींसी । प्रेत बांधोनि काष्ठेसी । घेवोनि गेले गंगेत ॥९२॥
अग्नि घेऊनि तळहातेसी । निघाली पतिव्रता कैसी । आनंद बहु मानसी । प्रेतापुढे जातसे ॥९३॥
सोळा वरुषांचे तारुण्यपण । सुंदर रुप लावण्य । ल्याइलीसे आभरणे । लक्ष्मीसरसी दिसतसे ॥९४॥
मिळोनिया नगरनारी । पाहो आल्या सहस्त्र चारी । माथा तुकविती सकळी । पतिव्रता म्हणोनिया ॥९५॥
एक म्हणती काय नवल । पूर्ववयेसी असे बाळ । काय दैव पूर्वफळ । पतीसवे जातसे ॥९६॥
देखिले नाही पतीचे मुख । नाही जहाले की बाळक । कैसा जीव झाला एक । आनंदरूपे जातसे ॥९७॥
म्हणती शिकवा इसी । वाया का हो जीव देसी । परतूनि जाई माहेरासी । आपुल्या मातापित्याजवळी ॥९८॥
एक म्हणती ज्ञानवंता । सत्य नारी पतिव्रता । बुद्धि दे गा जगन्नाथा । सकळ स्त्रिया ऐसीच ॥९९॥
धन्य इची मातापिता । बेचाळीस उद्धरले आता । प्रेतापुढे चालता । एकैक पाउला अश्वमेधफळ ॥१००॥
येणेपरी नदीतीरासी । गेली नारी पतीसरसी । कुंड केले अग्नीसी । काष्ठे शेणी अपरिमित ॥१॥
अग्निकुंडसन्निधेसी । ठेविले तया प्रेतासी । बोलावोनि सुवासिनींसी । देई झाली वाण देखा ॥२॥
सुपे चोळी कुंकुमेसी । हळदी काजळ परियेसी । तोडर कंठसूत्रेसी । सुवासिनींसी देतसे ॥३॥
गंधपुष्पादि परिमळेसी । पूजा केली सुवासिनींसी । द्रव्य दिधले अपारेसी । समस्त ब्राह्मणा तये वेळी ॥४॥
नमन करोनि समस्तांसी । निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेरासी । लोभ असो द्यावा म्हणतसे ॥५॥
माझा पिता शूलपाणी । उमा गौरी अंतःकरणी । आम्हा बोलाविले सगुणी । प्रेमभावे करूनिया ॥६॥
आली श्रावणी दिपवाळी । आम्ही जातो मातेजवळी । पतीसहित मने निर्मळी । जाते लोभ असो द्यावा ॥७॥
समागमे लोक आपुले । होते जे का सवे आले । त्यांसी सांगतसे बाळे । परतोनि जावे ग्रामासी ॥८॥
पुसता श्वशुरमामेसी । त्याते न सांगावे परियेसी । प्राण देतील आम्हांसी । हत्या तुम्हा घडेल ॥९॥
त्यासी तुम्ही सांगावे ऐसे । क्षेम आहे तीर्थवासे । भीमातीरस्थान ऐसे । श्रीगुरूचे सन्निधानी ॥११०॥
आलो श्रीगुरुदर्शनासी । आरोग्य झाले पतीसी । राहिलो आपण संतोषी । म्हणोनि सांगा घरी आमुचे ॥११॥
ऐसे सांगा श्वशुरमामींसी । आमुचे मातापितयादिकांसी । इष्टजन सोयरियांसी । सांगा येणेपरी तुम्ही ॥१२॥
ऐसे वचन ऐकोन । दुःख पावले सकळ जन । आपण असे हास्यवदन । प्रेताजवळी उभी देखा ॥१३॥
अग्निकुंडी तये क्षणी । घालिताती काष्ठ शेणी । तो आठवण झाली झणी । योगेश्वराचा उपदेश ॥१४॥
मग रुद्राक्ष काढोनिया दोनी । बांधिले प्रेताचिया श्रवणी । कंठसूत्री दोन ठेवोनि । पुसतसे ब्राह्मणांसी ॥१५॥
विनवीतसे द्विजांसी । संकल्प केला म्या मानसी । श्रीगुरुमूर्ति आहे कैसी । आपल्या दृष्टी पाहीन ॥१६॥
दृष्टी देखोनिया स्वामीसी । त्वरित येईन अग्निकुंडापासी । आज्ञा झालिया वेगेसी । त्वरित येईन म्हणतसे ॥१७॥
ऐकोनि तियेचे वचन । बोलताती विद्वज्जन । दहन होता अस्तमान । त्वरित जाउनी तुम्ही यावे ॥१८॥
पुसोनिया विप्रांसी । निघाली नारी संगमासी । जेथे होता ह्रषीकेशी । श्रीनरसिंहसरस्वती ॥१९॥
सर्व येती नरनारी । विप्रमेळा नानापरी । कौतुक पाहती मनोहरी । पतिव्रता स्त्रियेची ॥१२०॥
जाता मार्गी स्तोत्र करी । म्हणे स्वामी नरकेसरी । अभाग्य आपुले पूर्वापरी । म्हणोनि आम्हा अव्हेरिले ॥२१॥
तूचि दाता सर्वेश्वर । शरणागतांचा आधार । ऐसे तुझे ब्रीद थोर । कामी आपण न लाधेची ॥२२॥
हेळामात्रे त्रिभुवनासी । रची स्वामी रजोगुणे सृष्टीसी । सत्त्वगुणे सृष्टीसी । प्रतिपाळिसी तूचि स्वामी ॥२३॥
तमोगुणे निश्चयेसी । प्रलय समस्त जीवांसी । त्रिगुण तूचि होसी । त्रिमूर्ति तूचि देवा ॥२४॥
तुजपाशी सर्व सिद्धि । ओळंघिती तव विधी । देखिली आमुची कुडी बुद्धि । जाणोनि माते अव्हेरिली ॥२५॥
एखादा नर बाधा करी । जाणोनि सांगती राजद्वारी । क्षण न लागता अवसरी । राजा साह्य करी तयांचे ॥२६॥
रोग होता मनुष्यासी । जाऊनिया वैद्यापासी । औषध करी तात्काळेसी । आरोग्य तया होतसे ॥२७॥
तू त्रिमूर्तीचा अवतार । ख्याति झाली अपरंपार । सर्व भक्तजना आधार । म्हणोनि सेविती सकळ जन ॥२८॥
अपराध आपण काय केले । भेटीसी वीस गावे आले । मातापिता विसरले । तुझ्या ध्याने स्वामिया ॥२९॥
होसी तूचि मातापिता । म्हणोनि आल्ये धावता । भेटी होता आरोग्यता । पतीस व्हावी म्हणोनिया ॥१३०॥
आपुले समान असती नारी । त्या नांदता पुत्रपौत्री । आपण झाल्ये दगडापरी । पुत्र नाही आपणासी ॥३१॥
पति आपुला सदा रोगी । कैचा पुत्र आपणालागी । तरी याचि काम्यालागी । निघोनि आल्ये स्वामिया ॥३२॥
आरोग्य होईल पतीसी । पुत्र होतील आपणासी । आशा धरून मानसी । आल्ये स्वामी कृपासिंधु ॥३३॥
पुरले माझे मनोरथ । आरोग्य झाला प्राणनाथ । पुत्र झाले बहुत । नवल झाले स्वामिया ॥३४॥
मनोरथ पावला सिद्धीसी । म्हणोनि आल्ये पुसावयासी । जाते आता परलोकासी । कीर्ति तुझी घेवोनि ॥३५॥
ऐशा परी ध्यान करीत । आली अमरजासंगमी त्वरित । वृक्ष असे अश्वत्थ । देखती झाली स्वामिया ॥३६॥
उभी ठाकोनिया दुरी । तया साष्टांग नमन करी । श्रीगुरु म्हणे त्या अवसरी । सुवासिनी होय ध्रुव ॥३७॥
ऐसे म्हणता मागुती । नमन करी एकभक्ती । पुनरपि स्वामी तेणेच रीती । अष्टपुत्रा होय म्हणतसे ॥३८॥
ऐसे ऐकोनिया वचन । हास्य करिती सकळ जन । सांगताती विस्तारोन । गुरूलागी सत्वर ॥३९॥
विप्र म्हणती स्वामीसी । इचा पति पंचत्वासी । पावला परंधामासी । सुवासिनी केवी होय ॥४०॥
प्रेत नेले स्मशानासी । ही आली सहगमनासी । निरोप घ्यावया तुम्हापासी । आली असे स्वामिया ॥४१॥
तुमचा निरोप घेवोनि । अग्निकुंडा जावोनि । समागमे पतिशयनी । दहन करणे तियेसी ॥४२॥
ऐकोनि त्याचे वचन । श्रीगुरु म्हणती हासोन । इचे स्थिर अहेवपण । मरण केवी घडे इसी ॥४३॥
गुरु म्हणती जा वेळी । आणा प्रेत आम्हाजवळी । प्राण गेला कवणे वेळी । पाहू म्हणती अवधारा ॥४४॥
श्रीगुरु म्हणती द्विजांसी । आमुचे बोल जहाले इसी । अहेवपण स्थिर इसी । संदेह न धरावा मनात ॥४५॥
या बोलाचा निर्धारू । करील आता कर्पूरगौरू । नका प्रेत संस्कारू । आणा प्रेत आम्हांजवळी ॥४६॥
श्रीगुरूचा निरोप होता । आणो गेले धावत प्रेता । पहाती लोक कौतुका । अभिनव म्हणताती ॥४७॥
इतुके होता ते अवसरी । आले विप्र तेथवरी । पूजा करिती मनोहरी । श्रीगुरुची भक्तीने ॥४८॥
रुद्रसूक्त म्हणोनि । अभिषेक करिती श्रीगुरुचरणी । षोडशोपचारी विस्तारोनि । पूजा करिती भक्तीने ॥४९॥
तीर्थपूजा नानापरी । पूजा करिती उपचारी । इतुकीया अवसरी । घेउनी आले प्रेतासी ॥१५०॥
प्रेत आणोनिया देखा । ठेविले श्रीगुरुसंमुखा । श्रीगुरु म्हणती विप्रलोका । सोडा वस्त्र दोर त्याचे ॥५१॥
चरणतीर्थ त्यावेळी । देती तया विप्रांजवळी । प्रोक्षा म्हणती तात्काळी । प्रेत सर्वांगी स्नपन करा ॥५२॥
श्रीगुरुनिरोपे ब्राह्मण । प्रेतासी करिती तीर्थस्नपन । अमृतदृष्टीसी आपण । पाहती प्रेत अवधारा ॥५३॥
पाहता सुधादृष्टीकरून । प्रेत झाले संजीवन । उठोनि बैसे तत्क्षण । अंग मुरडीत परियेसा ॥५४॥
नग्न म्हणुनी लाजत । प्रेत झाले सावचित्त । नवे वस्त्र नेसत । येवोनि बैसे एकीकडे ॥५५॥
बोलावोनि स्त्रियेसी । पुसतसे विस्तारेसी । कोठे आणिले मजसी । यतीश्वर कोण सांगे ॥५६॥
इतुके लोक असता का । का वो तू न करसी चेता । निद्रा आली मदोन्मत्ता । म्हणोनि सांगे स्त्रियेसी ॥५७॥
ऐकून पतीचे वचन । सांगती झाली विस्तारून । उभी राहून दोघेजण । नमन करिती श्रीगुरूसी ॥५८॥
चरणी माथा ठेवून । स्तोत्र करिती दोघेजण । पहाती लोक सर्व जन । महा आनंद प्रवर्तला ॥५९॥
म्हणती पापरूपी आपण । पाप केले दारुण । पापापासाव अनुसंधान । जन्म जहालो परियेसी ॥१६०॥
दुर्बुद्धीने वर्तलो । पापसागरी बुडालो । तुझे चरण विसरलो । त्रयमूर्ती जगद्गुरु ॥६१॥
सकळ जीवमात्रांसी । रक्षिता शंकर तू होसी । ख्याति तव त्रिभुवनासी । शरणागता रक्षिसी ॥६२॥
त्राहि त्राहि जगद्गुरु । विश्वमूर्ति परात्परु । ब्रह्मा विष्णु शंकरु । सच्चिदानंदस्वरूप तू ॥६३॥
त्राहि त्राहि विश्वकर्ता । त्राहि त्राहि जगद्भर्ता । कृपासागरा जगन्नाथा । भक्तजनविश्रामा ॥६४॥
जय जयाजी गुरुमूर्ति । जटाजूट पशुपति । अवतरलासी तू क्षिती । मनुष्यदेह धरूनिया ॥६५॥
त्राहि त्राहि पिनाकपाणि । त्राहि देवा तू शिरोमणि । भक्तजन पाळोनि । रक्षितोसी निरंतर ॥६६॥
सर्वा भूती तूचि वससी । नमन तुझे चरणांसी । मज ऐसे गमलासी । मातारूप वर्तत तू ॥६७॥
त्रिभुवनी तव करणी । माथा ठेविला तुझे चरणी । निश्चय केला माझे मनी । पुनर्जन्म नव्हे आता ॥६८॥
विश्वकारण करिसी । हेळामात्रे सृष्टि रचिसी । मज ऐसे गमलासी । अज्ञानरूपे वर्तत ॥६९॥
तुझे न ऐके एखादा जरी । कोपसी त्वरित त्यावरी । माझे मनी येणेपरी । निष्कलंक तू दिसतोसी ॥१७०॥
क्रोध नाही तुझे मनी । आनंदमूर्ति तूचि सहस्त्रगुणी । भक्तजना संरक्षणी । कृपासागर स्वामिया ॥७१॥
जीवमात्रा कृपा करिसी । शरणागताते रक्षिसी । इहपर सौख्याते देसी । चतुर्विध पुरुषार्थ ॥७२॥
तूचि करुणेचा सागरू । चिन्मात्रा अगोचरू । श्रीनरसिंहसरस्वती गुरु । क्षमा करणे स्वामिया ॥७३॥
ऐसी नानापरीसी । स्तोत्रे केली श्रीगुरूसी । श्रीगुरुमूर्ति संतोषी । आश्वासिती तये वेळी ॥७४॥
अष्ट पुत्र पूर्णायुषी । होतील सत्य तुजसी । हो का श्रीमंत अतिहर्षी । गेले तुमचे पूर्वदोष ॥७५॥
चतुर्विध पुरुषार्थ । लभ्य झाले तुम्हांसी यथार्थ । सांडोनि संदेह त्वरित । सुखे असा म्हणती गुरु ॥७६॥
इतुके होता ते अवसरी । मिळाल्या होत्या नरनारी । जयजयकार अपरंपारी । प्रवर्तला तये वेळी ॥७७॥
नमन करिती सकळ जन । स्तोत्र करिताती गायन । करिताती नीरांजन । जयजयकार प्रवर्तला ॥७८॥
तयामध्ये विप्र एक । होता धूर्त कुबुद्धिक । आपुले मनी आणोनि तर्क । श्रीगुरूसी पुसतसे ॥७९॥
विप्र म्हणे श्रीगुरूसी । विनंती स्वामी परियेसी । संशय आमुचे मानसी । होत आहे स्वामिया ॥१८०॥
वेदशास्त्रे पुराणे । बोलताती सनातने । ब्रह्मलिखित सत्य जाणे । म्हणोनि वाक्य निर्धारी पा ॥८१॥
घडला नाही अपमृत्यु यासी । दिवामरण परियेसी । आला कैसा जीव यासी । ब्रह्मलिखित सत्य मिथ्या ॥८२॥
न कळे याच्या अभिप्राया । निरोपावे गुरुराया । गुरु म्हणती हासोनिया । तया मूर्ख ब्राह्मणासी ॥८३॥
गुरु म्हणती तयासी । सांगेन तुज विस्तारेसी । पुढील जन्माच्या आयुष्यासी । उसने घेतले परियेसा ॥८४॥
आम्ही तया बह्मदेवासी । मागून घेतले करुणेसी । पुढले जन्मी परियेसी । वर्षे तीस संख्या पै ॥८५॥
भक्तजन रक्षावयासी । मागून घेतले ब्रह्मदेवासी । म्हणून सांगती विस्तारेसी । तया विप्रवर्गाते ॥८६॥
तटस्थ झाले सकळ जन । साष्टांग करिती नमन । गेले आपुलिया भुवना । ख्याति झाली चहू राष्ट्रा ॥८७॥
पतिव्रतेने पतीसहित । स्नान केले संगमात । अंतःकरणी संतोष बहुत । पूजा करिती भक्तीसी ॥८८॥
अपार द्रव्य वेचोनि । विप्र तोषवोनि आराधनी । सूर्य जाता अस्तमानी । येती गुरूच्या मठासी ॥८९॥
स्त्रीपुरुष नमस्कार । करिताती वारंवार । पूजासामग्री उपचार । आरती करिती श्रीगुरूसी ॥१९०॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढे अपूर्व वर्तले ते ऐका । कथा असे अपूर्व देखा । सांगेन ऐका एकचित्ते ॥९१॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्र विस्तार । ऐकता पावन मनोहर । सकळाभीष्टे पावती ॥९२॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । उठविले विप्राचे प्रेत । सौभाग्य देवोनि अद्भुत । परम तयासी तोषविले ॥१९३॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रेतसंजीवनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः ॥३२॥
---------------------------------------------------------
अध्याय ३३
श्रीगणेशाय नमः ।
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा । विनवीतसे भाकूनि करुणा । भक्तिभावेकरोनि ॥१॥
म्हणे स्वामी सिद्धमुनि । पूर्वकथानुसंधानी । पतीसह सुवासिनी । आली श्रीगुरुसमागमे ॥२॥
श्रीगुरु आले मठासी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारोनि कृपेसी । निरोपावी स्वामिया ॥३॥
सिद्ध म्हणे ऐक बाळा । दुजे दिनी प्रातःकाळी । दंपत्ये दोघे गुरूजवळी । येवोन बैसती वंदोन ॥४॥
विनविताती कर जोडोनि । आम्हा शोक घडल्या दिनी । एके यतीने येवोनि । बुद्धिवाद सांगितला ॥५॥
रुद्राक्ष चारी आम्हासी । देता बोलिला परियेसी । कानी बांधोनि प्रेतासी । दहन करा म्हणितले ॥६॥
आणिक एक बोलिले । रुद्रसूक्त असे भले । अभिषेकिती विप्रकुळे । ते तीर्थ आणावे ॥७॥
आणोनिया प्रेतावरी । प्रोक्षा तुम्ही भावे करी । दर्शना जावे सत्वरी । श्रीनृसिंहसरस्वती स्वामीचे ॥८॥
ऐसे सांगोनि आम्हांसी । आपण गेला परियेसी । रुद्राक्ष राहिले मजपासी । पतिश्रवणी स्वामिया ॥९॥
ऐकोनि तियेचे वचन । श्रीगुरु सांगती हासोन । रुद्राक्ष दिल्हे आम्ही जाण । तव भक्ति देखोनिया ॥१०॥
भक्ति अथवा अभक्तीसी । रुद्राक्ष धारण करणारासी । पापे न लागती परियेसी । उंच अथवा नीचाते ॥११॥
रुद्राक्षांचा महिमा । सांगितला अनुपमा । सांगेन विस्तारून तुम्हा । एकचित्ते परियेसा ॥१२॥
रुद्राक्षधारणे पुण्य । मिति नाही अगण्य । आणिक नाही देवास मान्य । श्रुतिसंमत परियेसा ॥१३॥
सहस्त्रसंख्या जो नर । रुद्राक्षमाळा करी हार । स्वरूपे होय तोचि रुद्र । समस्त देव वंदिती ॥१४॥
सहस्त्र जरी न साधती । दोही बाही षोडशती । शिखेसी एक ख्याति । चतुर्विशति दोही करी ॥१५॥
कंठी बांधा बत्तीस । मस्तकी बांधा चत्वारिंश । श्रवणद्वयी द्वादश । धारण करावे परियेसा ॥१६॥
कंठी अष्टोत्तरशत एक । माळा करा सुरेख । रुद्रपुत्रसमान ऐक । येणे विधी धारण केलिया ॥१७॥
मोती पोवळी स्फटिकेसी । रौप्य वैडूर्य सुवर्णेसी । मिळोनि रुद्राक्षमाळेसी । करावे धारण परियेसा ॥१८॥
याचे फळ असे अपार । रुद्राक्षमाला अति थोर । जे मिळती समयानुसार । रुद्राक्ष धारण करावे ॥१९॥
ज्याचे गळा रुद्राक्ष असती । त्यासी पापे नातळती । तया होय सद्गति । रुद्रलोकी अखंडित ॥२०॥
रुद्राक्षमाळा धरोनि । जप करिती अनुष्ठानी । अनंत फळ असे जाणी । एकचित्ते परियेसा ॥२१॥
रुद्राक्षाविणे जो नर । वृथा जन्म जाणा घोर । ज्याचे कपाळी नसे त्रिपुंड्र । जन्म वाया परियेसा ॥२२॥
रुद्राक्ष बांधोनि मस्तकेसी । अथवा दोन्ही श्रवणांसी । स्नान करिता नरासी । गंगास्नानफळ असे ॥२३॥
रुद्राक्ष ठेवोनि पूजेसी । अभिषेक करावा श्रीरुद्रेसी । लिंगपूजा समानेसी । फळ असे निर्धारा ॥२४॥
एकमुख पंचमुख । एकादश असती मुख । चतुर्दशादि कौतुक । मुखे असती परियेसा ॥२५॥
हे उत्तम मिळती जरी । अथवा असती नानापरी । धारण करावे प्रीतिकरी । पावे चतुर्विध पुरुषार्थ ॥२६॥
यांचे पूर्वील आख्यान । विशेष असे अति गहन । ऐकता पापे पळोन । जाती त्वरित परियेसा ॥२७॥
राजा काश्मीरदेशासी । भद्रसेन नामे परियेसी । त्याचा पुत्र सुधर्म नामेसी । प्रख्यात असे अवधारा ॥२८॥
त्या राजाचा मंत्रीसुत । नाम तारक विख्यात । दोघे कुमार ज्ञानवंत । परमसखे असति देखा ॥२९॥
उभयता एके वयासी । एके स्थानी विद्याभ्यासी । क्रीडा विनोद अति प्रीतींसी । वर्तती देखा संतोषे ॥३०॥
क्रीडास्थानी सहभोजनी । असती दोघे संतोषोनि । ऐसे कुमार महाज्ञानी । शिवभजक परियेसा ॥३१॥
सर्वदेहा अलंकार । रुद्राक्षमाळा सुंदर । भस्मधारण त्रिपुंड्र । टिळा असे परियेसा ॥३२॥
रत्नाभरणे सुवर्ण । लेखिती लोहासमान । रुद्रमाळावाचून । न घेती देखा अलंकार ॥३३॥
मातापिता बंधुजन । आणोनि देती रत्नाभरण । टाकोनि देती कोपोन । लोह पाषाण म्हणती त्यांसी ॥३४॥
वर्तता ऐसे एके दिवशी । तया राजमंदिरासी । आला पराशर ऋषि । जो का त्रिकाळज्ञ असे देखा ॥३५॥
ऋषि आला देखोन । राजा संमुख जाऊन । साष्टांगी नमन करून । अभिवंदिला तये वेळी ॥३६॥
बैसवोनि सिंहासनी । अर्घ्य पाद्य देवोनि । पूजा केली विधानी । महानंदे तये वेळी ॥३७॥
कर जोडोनि मुनिवरासी । विनवी राव भक्तीसी । पिसे लागले पुत्रांसी । काय करावे म्हणतसे ॥३८॥
रत्नाभरणे अलंकार । न घेती भुषण परिकर । रुद्राक्षमाळा कंठी हार । सर्वाभरणे तीच करिती ॥३९॥
शिकविल्या नायकती । कैचे यांचे मती । स्वामी त्याते बोधिती । तरीच ऐकती कुमार ॥४०॥
भूतभविष्यावर्तमानी । त्रिकाळज्ञ तुम्ही मुनि । यांचा अभिप्राय विस्तारोनि । निरोपावा दातार ॥४१॥
ऐकोनि रायाचे वचन । पराशरा हर्ष जाण । निरोपितसे हासोन । म्हणे विचित्र असे देखा ॥४२॥
तुझ्या आणि मंत्रिसुताचे । वृत्तान्त असती विस्मयाचे । सांगेन ऐक विचित्र साचे । म्हणोनि निरोपी तया वेळी ॥४३॥
पूर्वी नंदीनाम नगरी । अति लावण्य सुंदरी । होती एक वेश्या नारी । जैसे तेज चंद्रकांति ॥४४॥
जैसा चंद्र पौर्णिमेसी । तैसे छत्र असे तिसी । सुखासन सुवर्णैसी । शोभायमान असे देखा ॥४५॥
हिरण्यमय तिचे भुवन । पादुका सुवर्णाच्या जाण । नानापरी आभरणे । विचित्र असती परियेसा ॥४६॥
पर्यंक रत्नखचित देखा । वस्त्राभरणे अनेका । गोमहिषी दास्यादिका । बहुत असती परियेसा ॥४७॥
सर्वाभरणे तीस असती । जैसी दिसे मन्मथरति । नवयौवना सोमकांति । अतिसुंदर लावण्य ॥४८॥
गंध कुंकुम कस्तुरी । पुष्पे असती नानापरी । अखिल भोग तिच्या घरी । ख्याति असे तया ग्रामी ॥४९॥
धनधान्यादि संपत्ति । कोटिसंख्या नाही मिति । ऐशियापरी नांदती । वारवनिता तये नगरी ॥५०॥
असोनि वारवनिता । म्हणवी आपण पतिव्रता । धर्म करी असंख्याता । अन्नवस्त्रे ब्राह्मणांसी ॥५१॥
नाट्यमंडप तिचे द्वारी । रत्नखचित नानापरी । उभारिला अतिकुसरी । सदा नृत्य करी तेथे ॥५२॥
सखिवर्गासह नित्य । नृय करी मनोरथ । कुक्कुट मर्कट विनोदार्थ । बांधिले असती मंडप्पी ॥५३॥
तया मर्कटकुक्कुटांसी । नृत्य शिकवी विनोदेसी । रुद्राक्षमाळाभूषणेसी । गळा रुद्राक्ष बांधिले ॥५४॥
तया मर्कटकुक्कुटांसी । नामे ठेविली सदाशिव ऐसी । वर्तता एके दिवसी । अभिनव झाले परियेसा ॥५५॥
शिवव्रत म्हणजे एक । वैश्य झाला महाधनिक । रुद्राक्षमाळा-भस्मांकित । प्रवेशला तिचे घरी ॥५६॥
त्याचे सव्य करी देखा । रत्नखचित लिंग निका । तेजे फाके चंद्रार्का । विराजमान दिसतसे ॥५७॥
तया वैश्यासी देखोनि । नेले वेश्ये वंदूनि । नाट्यमंडपी बैसवोनि । उपचार केले नानापरी ॥५८॥
तया वैश्याचे करी । जे का होते लिंग भारी । रत्नखचित सूर्यापरी । दिसतसे तयाचे ॥५९॥
देखोनि लिंग रत्नखचित । वारवनिता विस्मय करीत । आपुल्या सखीस म्हणत । ऐसी वस्तु पाहिजे आम्हा ॥६०॥
पुसावे तया वैश्यासी । जरी देईल मौल्येसी । अथवा देईल रतीसी । होईन कुलस्त्री तीन दिवस ॥६१॥
ऐकोन तियेचे वचन । पुसती वैश्यासी सखी जाण । जरि का द्याल लिंगरत्न । देईल रति दिवस तीनी ॥६२॥
अथवा द्याल मौल्येसी । लक्षसंख्यादि द्रव्यासी । जे का वसे तुमचे मानसी । निरोपावे वेश्येप्रती ॥६३॥
ऐकोनि सखियांचे वचन । म्हणे वैश्य हासोन । देईन लिंग मोहन । रतिकांक्षा करुनी ॥६४॥
तुमची मुख्य वारवनिता । जरी होईल माझी कांता । दिवस तीन पतिव्रता । होवोनि असणे मनोभावे ॥६५॥
म्हणोनिया मुख्य वनितेसी । पुसतसे वैश्य तिसी । व्यभिचारिणी नाम तुजसी । काय सत्य तुझे बोल ॥६६॥
तुम्हा कैचे धर्म कर्म । बहु पुरुषांचा संगम । पतिव्रता कैचे नाम । तुज असे सांग मज ॥६७॥
प्रख्यात तुमचा कुळाचार । सदा करणे व्यभिचार । नव्हे तुमचे मन स्थिर । एका पुरुषासवे नित्य ॥६८॥
ऐकोनि वैश्याचे वचन । वारवनिता बोले आपण । दिनत्रय सत्य जाण । होईन तुमची कुलस्त्री ॥६९॥
द्यावे माते लिंगरत्न । रतिप्रसंगी तुमचे मन । संतोषवीन अतिगहन । तनमनधनेसी ॥७०॥
वैश्य म्हणे तियेसी । प्रमाण द्यावे आम्हांसी । दिनत्रय दिवानिशी । वागावे पत्नीधर्मकर्मे ॥७१॥
तये वेळी वारवनिता । लिंगावरी ठेवी हाता । चंद्र सूर्य साक्षी करिता । झाली पत्नी तयाची ॥७२॥
इतुकिया अवसरी । लिंग दिले तियेचे करी । संतोष जहाली ती नारी । करी कंकण बांधिले ॥७३॥
लिंग देवोनि वेश्येसी । बोले वैश्य परियेसी । माझ्या प्राणासमानेसी । लिंग असे जाण तुवा ॥७४॥
या कारणे लिंगासी । जतन करणे परियेसी । हानि होता यासी । प्राण आपुला देईन ॥७५॥
ऐसे वैश्याचे वचन ऐकोन । अंगिकारिले आपण । म्हणे लिंग करीन जतन । प्राणापरी परियेसा ॥७६॥
ऐसी दोघे संतोषित । बैसले होते मंडपात । दिवस जाता अस्तंगत । म्हणती जाऊ मंदिरा ॥७७॥
संभोगसमयी लिंगासी । न ठेवावे जवळिकेसी । म्हणे वैश्य तियेसी । तये वेळी परियेसा ॥७८॥
ऐकोनि वैश्याचे वचन । मंडपी ठेविले लिंगरत्न । मध्यस्तंभी बैसवोन । गेली अंतर्गृहात ॥७९॥
क्रीडा करिती दोघेजण । होते ऐका एक क्षण । उठिला अग्नि दारुण । तया नाट्यमंडपी ॥८०॥
अग्नि लागता मंडप । भस्म झाला जैसा धूप । वैश्य करितसे प्रलाप । देखोनि तये वेळी ॥८१॥
म्हणे हा हा काय झाले । माझे प्राणलिंग गेले । विझविताती अतिप्रबळे । नगरलोक मिळोनि ॥८२॥
विझवूनिया पहाती लिंगासी । दग्ध झाले परियेसी । अग्नी कुक्कुटमर्कटांसी । दहन जहाले परियेसा ॥८३॥
वैश्य देखोनि तये वेळी । दुःख करी अतिप्रबळी । प्राणलिंग गेले जळोनि । आता प्राण त्यजीन म्हणे ॥८४॥
म्हणोनिया निघाला बाहेरी । आयती केली ते अवसरी । काष्ठे मिळवोन अपारी । अग्नि केला परियेसा ॥८५॥
लिंग दग्ध झाले म्हणत । अग्निप्रवेश केला त्वरित । नगरलोक विस्मय करीत । वेश्या दुःख करीतसे ॥८६॥
म्हणे हा हा काय झाले । पुरुषहत्यापाप घडले । लिंग मंडपी ठेविले । दग्ध जहाले परियेसा ॥८७॥
वैश्य माझा प्राणेश्वर । तया हानि जहाली निर्धार । पतिव्रताधर्मे सत्वर । प्राण त्यजीन म्हणतसे ॥८८॥
बोलाविले विप्रांसी । संकल्पिले संपदेसी । सहगमन करावयासी । दानधर्म करीतसे ॥८९॥
वस्त्रे भूषणे भांडारा । देती झाली विप्रवरा । चंदनकाष्ठभारा । चेतविले अग्नीसी ॥९०॥
आपुल्या बंधुवर्गासी । नमोनि पुसे तयासी । निरोप द्यावा आपणासी । पतीसवे जातसे ॥९१॥
ऐकोनि तियेचे वचन । दुःख पावले बंधुजन । म्हणती तुझी बुद्धि हीन । काय धर्म करीतसे ॥९२॥
वेश्येच्या मंदिरासी । येती पुरुष रतीसी । मिती नाही तयांसी । केवी जहाला तुझा पुरुष ॥९३॥
कैचा वैश्य कैचे लिंग । वाया जाळिसी आपुले अंग । वारवनिता धर्म चांग । नूतन पुरुष नित्य घ्यावा ॥९४॥
ऐसे वैश्य किती येती । त्यांची कैशी होसी सती । हासती नगरलोक ख्याति । काय तुझी बुद्धि सांगे ॥९५॥
येणेपरी सकळ जन । वारिताती बंधुजन । काय केलिया नायके जाण । कवणाचेही ते काळी ॥९६॥
वेश्या म्हणे तये वेळी । आपुला पति वैश्य अढळी । प्रमाण केले तयाजवळी । चंद्र सूर्य साक्षी असे ॥९७॥
साक्षी केली म्या हो क्षिति । दिवस तीन अहोरात्री । धर्मकर्म त्याची पत्नी । जाहले आपण परियेसा ॥९८॥
माझा पति जाहला मृत । आपण विनवीतसे सत्य । पतिव्रता धर्म ख्यात । वेदशास्त्र परियेसा ॥९९॥
पतीसवे जे नारी । सहगमन हाय प्रीतिकरी । एकेक पाउली भूमीवरी । अश्वमेधफळ असे ॥१००॥
आपुले माता पिता उद्धरती । एकवीस कुळे पवित्र होती । पतीची जाण तेच रीती । एकवीस कुळे परियेसा ॥१॥
इतुके जरी न करिता । पातिव्रत्यपणा वृथा । केवी पाविजे पंथा । स्वर्गाचिया निश्चये ॥२॥
ऐसे पुण्य जोडिती । काय वाचूनि राहणे क्षिती । दुःख संसारसागर ख्याति । मरणे सत्य कधी तरी ॥३॥
म्हणोनि विनवी सकळांसी । निघाली बाहेर संतोषी । आली अग्निकुंडापासी । नमन करी तये वेळी ॥४॥
स्मरोनिया सर्वेश्वर । केला सूर्यासी नमस्कार । प्रदक्षिणे उल्हास थोर । करिती झाली तये वेळी ॥५॥
नमुनी समस्त द्विजांसी । उभी ठेली अग्निकुंडासी । उडी घातली वेगेसी । अभिनव जहाले तये वेळी ॥६॥
सदाशिव पंचवक्त्र । दशभुजा नागसूत्र । हाती आयुधे विचित्र । त्रिशूळ डमरू जाण पा ॥७॥
भस्मांकित जटाधारी । बैसला असे नंदीवरी । धरिता झाला वरचेवरी । वेश्येशी तये वेळी ॥८॥
तया अग्निकुंडात । न दिसे अग्नि असे शांत । भक्तवत्सल जगन्नाथ । प्रसन्न झाला तये वेळी ॥९॥
हाती धरुनी तियेसी । कडे काढी व्योमकेशी । प्रसन्न होउनी परियेसी । वर माग म्हणतसे ॥११०॥
ईश्वर म्हणे तियेसी । आलो तुझे परीक्षेसी । धर्मधैर्य पाहावयासी । येणे घडले परियेसा ॥११॥
झालो वैश्य आपणची । रत्नलिंग स्वयंभूची । मायाअग्नि केला म्यांची । नाट्यमंडप दग्ध केला ॥१२॥
तुझे मन पहावयासी । जहालो अग्निप्रवेशी । तूची पतिव्रता सत्य होशी । सत्य केले व्रत आपुले ॥१३॥
संतोषलो तुझे भक्तीसी । देईन वर जो मागसी । आयुरारोग्यश्रियेसी । जे इच्छिसी ते देईन ॥१४॥
म्हणे वेश्या तये वेळी । नलगे वर चंद्रमौळी । स्वर्ग भूमि पाताळी । न घे भोग ऐश्वर्य ॥१५॥
तुझे चरणकमळी भृंग । होवोनि राहीन महाभाग्य । माझे इष्ट बंधुवर्ग । सकळ तुझे सन्निधेसी ॥१६॥
दासदासी माझे असती । सकळा न्यावे स्वर्गाप्रति । तव सन्निध पशुपति । सर्वदा राहो सर्वेश्वरा ॥१७॥
न व्हावी पुनरावृत्ती । न लागे संसार यातायाती । विमोचावे स्वामी त्वरिती । म्हणोनि चरणी लागली ॥१८॥
ऐकोनि तियेचे वचन । प्रसन्न झाला गौरीरमण । सकळा विमानी बैसवोन । घेऊन गेला स्वर्गाप्रती ॥१९॥
तिचे नाट्यमंडपात । जो का झाला मर्कटघात । कुक्कुटसमवेत । दग्ध जहाले परियेसा ॥१२०॥
म्हणोनि पराशर ऋषि । सांगतसे रायासी । मर्कटजन्म त्यजूनि हर्षी । तुझे उदरी जन्मला ॥२१॥
तुझे मंत्रियाचे कुशी । कुक्कुट जन्मला परियेसी । रुद्राक्षधारणफळे ऐसी । राजकुमार होऊन आले ॥२२॥
पूर्वसंस्काराकरिता । रुद्राक्षधारण केले नित्या । इतके पुण्य घडले म्हणता । जहाले तुझे कुमार हे ॥२४॥
आता तरी ज्ञानवंती । रुद्राक्ष धारण करिताती । त्याच्या पुण्या नाही मिती । म्हणोनि सांगे पराशरऋषि ॥२५॥
श्रीगुरु म्हणती दंपतीसी । येणेपरी रायासी । सांगता झाला महाऋषि । पराशर विस्तारे ॥२६॥
ऐकोनि ऋषीचे वचन । राजा विनवी कर जोडून । प्रश्न केला अतिगहन । सांगेन ऐका एकचित्ते ॥२७॥
म्हणोनि सिद्ध विस्तारेसी । सांगे नामधारकासी । अपूर्व जहाले परियेसी । पुढील कथा असे ऐका ॥२८॥
गंगाधराचा नंदनु । सांगे श्रीगुरुचरित्रकामधेनु । ऐका श्रोते सावधानु । लाधे चारी पुरुषार्थ ॥२९॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । रुद्राक्षमहिमा येथ । सांगितले निभ्रांत । पुण्यात्मक पावन जे ॥१३०॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रुद्राक्षमाहात्म्य नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३३॥
------------------------------------------------------------------
अध्याय ३४
श्रीगणेशाय नमः ।
श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐसा पराशर ऋषि । तया काश्मीर राजासी । रुद्राक्षमहिमा निरोपी ॥१॥
तया राजकुमाराचे । विस्तारोनि सुधावाचे । सांगितले पूर्वजन्माचे । चरित्र सर्व ॥२॥
संतोषोनि तो राजा । लागला त्याचे पादांबुजा । कर जोडोनिया वोजा । विनवीतसे परियेसा ॥३॥
राजा म्हणे ऋषीश्वरासी । स्वामी निरोपिले आम्हांसी । पुण्य घडले आत्मजासी । रुद्राक्षधारणे करोनिया ॥४॥
पूर्वजन्मी अज्ञानेसी । रुद्राक्ष बांधिले तिणे वेश्यी । त्या पुण्ये दशा ऐशी । प्राप्त झाली स्वामिया ॥५॥
ज्ञानवंत आता जाण । करिती रुद्राक्षधारण । पुढे यांचे लक्षण । कवणेपरी वर्ततील ॥६॥
भूतभविष्य-वर्तमानी । त्रिकाळज्ञ तुम्ही मुनि । सांगा स्वामी विस्तारोनि । माझेनि मंत्रिकुमराचे ॥७॥
ऐकोनि रायाचे वचन । सांगे ऋषि विस्तारोन । दोघा कुमारकांचे लक्षण । अपूर्व असे परियेसा ॥८॥
ऋषि म्हणे रायासी । पुत्रभविष्य पुससी । ऐकोनि दुःख पावसी । कवणेपरी सांगावे ॥९॥
राव विनवी तये वेळी । निरोपावे सकळी । उपाय करिसी तात्काळी । दुःखावेगळा तूचि करिसी ॥१०॥
ऐकोनिया ऋषीश्वर । सांगता झाला विस्तार । ऐक राजा तुझा कुमार । बारा वर्षे आयुष्य असे ॥११॥
तया बारा वर्षात । राहिले असती दिवस सात । आठवे दिवसी येईल मृत्यु । तुझ्या पुत्रासी परियेसा ॥१२॥
ऐकोनि ऋषीचे वचन । राजा मूर्च्छित जाहला तत्क्षण । करिता झाला रुदन । अनेकपरी दुःख करित ॥१३॥
ऐकोनि राजा तये वेळी । लागला ऋषीच्या चरणकमळी । राखे राखे तपोबळी । शरणागत मी तुझा ॥१४॥
नानापरी गहिवरत । मुनिवराचे चरण धरित । विनवीतसे स्त्रियांसहित । काय करावे म्हणोनिया ॥१५॥
दयानिधि ऋषीश्वरु । सांगता झाला विचारु । शरण रिघावे जगद्गुरु । उमाकांत शिवासी ॥१६॥
मनीचे भय त्यजुनी । असावे आता शिवध्यानी । तो राखील शूलपाणी । आराधावे तयाते ॥१७॥
जिंकावया काळासी । उपाय असे परियेसी । सांगेन तुम्हा विस्तारेसी । एकचित्ते अवधारा ॥१८॥
स्वर्ग मृत्य पाताळासी । देव एक व्योमकेशी । निष्कलंक परियेसी । चिदानंदस्वरूप देखा ॥१९॥
ऐसा देव मूर्तिमंत । रजोरूपे ब्रह्मा सृजत । सृष्टि करणार समर्थ । वेद चारी निर्मिले ॥२०॥
तया चतुर्वेदांसी । दिधले तया विरंचीसी । आत्मतत्त्वसंग्रहासी । ठेविली होती उपनिषदे ॥२१॥
भक्तवत्सल सर्वेश्वर । तेणे दिधले वेदसार । रुद्राध्याय सुंदर । दिधला तया विरंचीसी ॥२२॥
रुद्राध्यायाची महिमा । सांगता असे अनुपमा । याते नाश नाही जाणा । अव्यय असे परियेसा ॥२३॥
पंचतत्त्व शिवात्मक । रुद्राध्याय असे विशेष । ब्रह्मयाने चतुर्मुख । विश्व सृजिले वेदमते ॥२४॥
तया चतुर्मुखी देखा । वेद चारी सांगे निका । वदन दक्षिण कर्ण एका । यजुर्वेद निरूपिला ॥२५॥
तया यजुर्वेदांत । उपनिषदसार ख्यात । रुद्राध्याय विस्तारत । सांगे ब्रह्मा मुनिवरांसी ॥२६॥
समस्त देवऋषींसी । मरीचि अत्रि परियेसी । आणिक सकळ देवांसी । सांगे ब्रह्मा तये वेळी ॥२७॥
तेचि ऋषि पुढे देखा । शिकविती आपुले शिष्यादिका । त्यांचे शिष्य पुढे ऐका । आपुल्या शिष्या शिकविले ॥२८॥
पुढे त्यांचे पुत्रपौत्री । विस्तार झाला जगत्री । शिकविले ऐका पवित्री । रुद्राध्याय भूमीवरी ॥२९॥
त्याहूनि नाही आणिक मंत्र । त्वरित तप साध्य होत । चतुर्विध पुरुषार्थ लाधे त्वरित परियेसा ॥३०॥
नानापरीची पातके । केली असती अनेके । रुद्रजाप्ये सम्यके । भस्म होती परियेसा ॥३१॥
आणिक एक नवल केले । ब्रह्मदेव सृष्टि रचिले । वेदतीर्थ असे भले । स्नानपान करावे ॥३२॥
त्याणे कर्मे परिहरती । संसार होय निष्कृति । जे जन श्रीगुरु भजती । ते तरती भवसागर ॥३३॥
सुकृत अथवा दुष्कृत । जे जे कीजे आपुले हीत । जैसे पेरिले असे शेत । तेचि उगवे परियेसा ॥३४॥
सृष्टिधर्मप्रवृत्तीसी । ब्रह्मे रचिले परियेसी । आपुले वक्षपृष्ठेसी । धर्माधर्म उपजवी ॥३५॥
जे जन धर्म करिती । इह पर सौख्य पावती । जे अधर्मे रहाटती । पापरूपी तेचि जाणा ॥३६॥
काम क्रोध लोभ जाण । मत्सर दंभ परिपूर्ण । अधर्माचे सुत जाण । इतुके नरकनायक ॥३७॥
गुरुतल्पगसुरापानी । कामुक जे परिपुर्णी । पुल्कस्वरूप अंतःकरणी । तेचि प्रधान नरकाचे ॥३८॥
क्रोधे पितृवधी देखा । मातृवधी असती जे का । ब्रह्महत्यादि पातका । कन्याविक्रयी जे जन ॥३९॥
इतुके क्रोधापासूनि । उद्भव झाले म्हणोनि । पुत्र जहाले या कारणी । क्रोधसुत तया म्हणती ॥४०॥
देवद्विजस्वहरण देखा । ब्रह्मस्व घेवोनि नेदी जो का । सुवर्णतस्कर ऐका । लोभपुत्र तया नाव ॥४१॥
ऐशा पातकांसी । यमे निरोपिले परियेसी । तुम्ही जावोनि मृत्युलोकासी । रहाटी करणे आपुले गुणे ॥४२॥
तुम्हासवे भृत्य देखा । देईन सर्व उपपातका । सकळ पाठवावे नरका । जे जन असती भूमीवरी ॥४३॥
यमाची आज्ञा घेवोनि । आली पातके मेदिनी । रुद्रजपत्याते देखोनि । पळोनि गेली परियेसा ॥४४॥
जावोनिया यमाप्रती । महापातके विनविती । गेलो होतो आम्ही क्षिती । भयचकित होउनी आलो ॥४५॥
जय जयाजी यमराया । आम्ही पावलो महाभया । किंकर तुमचे म्हणोनिया । प्रख्यात असे त्रिभुवनी ॥४६॥
आम्ही तुमचे आज्ञाधारी । निरोपे गेलो धरित्री । पोळलो होतो वह्निपुरी । रुद्रजप ऐकोनि ॥४७॥
क्षितीवरी रहावयासी । शक्ति नाही आम्हांसी । पाहता रुद्रजपासी । पोळलो आम्ही स्वामिया ॥४८॥
ग्रामी खेटी नदीतीरी । वसती द्विज महानगरी । देवालयी पुण्यक्षेत्री । रुद्रजप करिताती ॥४९॥
कवणेपरी आम्हा गति । जाऊ न शको आम्ही क्षिती । रुद्रजप जन करिताती । तया ग्रामा जाऊ न शको ॥५०॥
आम्ही जातो नरापासी । वर्तवितो पातकासी । होती नर महादोषी । मिति नाही परियेसा ॥५१॥
प्रायश्चित्तसहस्त्रेसी जो का नव्हे पुण्यपुरुषी । तैसा द्विज परियेसी । पुण्यवंत होतसे ॥५२॥
एखादे समयी भक्तीसी । म्हणती रुद्राध्यायासी । तो होतो पुण्यराशि । पाहता त्यासी भय वाटे ॥५३॥
तैसा पापी महाघोर । पुण्यवंत होतो नर । भूमीवरी कैसे आचार । आम्हा कष्ट होतसे ॥५४॥
काळकूट महाविष । रुद्रजाप्य आम्हा दिसे । शक्ति नाही आम्हांसी । भूमीवरी जावया ॥५५॥
रुद्रजाप्यविषासी । शमन करावया शक्त होसी । रक्ष गा रक्ष गा आम्हांसी । विनविताती पातके ॥५६॥
इतुके बोलती पातके । ऐकोनि यममाथा तुके । कोपे निघाला तवके । ब्रह्मलोका तये वेळी ॥५७॥
जाऊनिया ब्रह्मयापासी । विनवी यम तयासी । जय जयाजी कमळवासी । सृष्टिकारी चतुर्मुखा ॥५८॥
आम्ही तुझे शरणागत । तुझे आज्ञे कार्य करित । पापी नराते आणित । नरकालयाकारणे ॥५९॥
महापातकी नरांसी । आणू पाठवितो भृत्यांसी । पातकी होय पुण्यराशि । रुद्रजप करूनिया ॥६०॥
समस्त जाती स्वर्गासी । महापातकी अतिदोषी । नाश केला पातकांसी । शून्य जहाले नरकालय ॥६१॥
नरक शून्य झाले सकळ । माझे राज्य निष्फळ । समस्त जहाले कैवल्य । उत्पत्ति राहिली स्वामिया ॥६२॥
याते उपाय करावयासी । देवा तू समर्थ होसी । राखे राखे आम्हांसी । राज्य गेले स्वामिया ॥६३॥
तुम्ही होउनी मनुष्यासी । स्वामित्व दिधले भरवसी । रुद्राध्यायानिधानेसी । कासया साधन दिधलेत ॥६४॥
याकारणे मनुष्य लोकी । नाही पापलेश । रुद्रजपे विशेष । पातके जळती अनेक ॥६५॥
येणेपरी यम देखा । विनविता झाला चतुर्मुखा । प्रत्युत्तर देतसे ऐका । ब्रह्मदेव यमासी ॥६६॥
अभक्तीने दुर्मदेसी । रुद्रजप करिती यासी । अज्ञानी लोक तामसी । उभ्यानी निजूनी पढती नर ॥६७॥
त्याते अधिक पापे घडती । ते दंडावे तुवा त्वरिती । जे का भावार्थे पढती । ते त्वा सर्वदा वर्जावे ॥६८॥
बाधू नका तुम्ही ऐका । सांगावे ऐसे पातका । रुद्रजपे पुण्य विशेखा । जे जन पढती भक्तीसी ॥६९॥
पूर्वजन्मी पापे करिती । अल्पायुषी होऊनि उपजती । तया पापा होय निष्कृति । रुद्रजपेकरूनिया ॥७०॥
तैसे अल्पायुषी नरे । रुद्रजप करिता बरे । पापे जाती निर्धारे । दीर्घायु होय तो देखा ॥७१॥
तेजो वर्चस् बल धृति । आयुरारोग्य ज्ञान संपत्ति । रुद्रजपे वर्धती । ऐक यमा एकचित्ते ॥७२॥
रुद्रजपमंत्रेसी । स्नान करविती ईश्वरासी । तेचि उदक भक्तीसी । जे जन करिती स्नानपान ॥७३॥
त्याते मृत्युभय नाही । आणिक एक नवल पाही । रुद्रजपे पुण्य देही । स्थिर जीव पुण्य असे ॥७४॥
अतिरुद्र जपोनि उदकासी । स्नान केल्या वरांसी । भीतसे मृत्यु त्यासी । तेही तरती भवार्णवी ॥७५॥
शतरुद्र अभिषेकासी । पूजा करिती महेशासी । ते जन होती शतायुषी । पापनिर्मुक्त परियेसा ॥७६॥
ऐसे जाणोनि मानसी । सांगे आपुले दूतासी । रुद्र जपता विप्रांसी । बाधू नको म्हणे ब्रह्मा ॥७७॥
ऐकोनि ब्रह्मयाचे वचना । यम आला आपुले स्थाना । म्हणोनि पराशरे जाणा । निरोपिले रायासी ॥७८॥
आता तुझ्या कुमारासी । उपाय सांगेन परियेसी । दशसहस्त्र रुद्रेसी । स्नपन करी शिवाते ॥७९॥
दहा सहस्त्र वर्षांवरी । तव पुत्र राज्य करी । इंद्रासमान धुरंधरी । कीर्तिवंत अपार ॥८०॥
त्याचे राज्याश्रियेसी । अपाय नसे निश्चयेसी । अकंटक संतोषी । राज्य करी तुझा सुत ॥८१॥
बोलवावे शत विप्रांसी । जे का विद्वज्जन परियेसी । लावावे ज्ञानी अनुष्ठानासी । तात्काळ तुवा रुद्राच्या ॥८२॥
ऐशा विप्राकरवी देखा । शिवासीकरी अभिषेका । आयुष्य वर्धेल कुमारका । सद्यःश्रेय होईल ॥८३॥
येणेपरी रायासी । सांगे पराशर ऋषि । राये महा आनंदेसी । आयुष्य वर्धना आरंभ केला ॥८४॥
ऐसा ऋषि पराशर । उपदेशितांची द्विजवर । बोलावोनिया सर्व संभार । पुरवीतसे ब्राह्मणांसी ॥८५॥
शतसंख्याक कलशांसी । विधिपूर्वक शिवासी । पुण्यवृक्षतळेसी । अभिषेक करवितसे ॥८६॥
त्याचिया जळे पुत्रासी । स्नान करवी प्रतिदिवसी । सप्त दिन येणे विधींसी । आराधिला ईश्वर ॥८७॥
अवधी जहाली दिवस सात । बाळ पडिला निचेष्टित । पराशरे येवोनि त्वरित । उदकेसी सिंचिले ॥८८॥
तये वेळी अवचित । वाक्य जहाले अदृश्यत । सवेचि दिसे अद्भुत । दंडहस्त महापुरुष ॥८९॥
महादंष्ट्र भयचकित । आले होते यमदूत । समस्त द्विजवर रुद्र पढत । मंत्राक्षता देताती ॥९०॥
मंत्राक्षता ते अवसरी । घातलिया कुमारावरी । दूत पाहती राहूनि दूरी । जवळ येऊ न शकती ॥९१॥
होते महापाश हाती । कुमारावरी टाकू येती । शिवदूत दंडहस्ती । मारू आले यमदूता ॥९२॥
भये चकित यमदूत । पळोनि गेले धावत । पाठी लागले शिवदूत । वेदपुरुषरूप देखा ॥९३॥
येणेपरी द्विजवर । तेणे रक्षिला राजकुमार । आशीर्वाद देती थोर । वेदश्रुति करूनिया ॥९४॥
इतुकियावरी राजकुमार । सावध झाला मन स्थिर । राजयासी आनंद थोर । समारंभ करीतसे ॥९५॥
पूजा करोनि द्विजांसी । देता झाला भोजनासी । तांबूलादि दक्षिणेसी । संतोषविले द्विजवर ॥९६॥
संतोषोनि महाराजा । सभा रचित महावोजा । बैसवोनि समस्ता द्विजा । महाऋषीते सिंहासनी ॥९७॥
राजा आपुले स्त्रियेसहित । घालिता झाला दंडवत । येवोनिया बैसला सभेत । आनंदित मानसी ॥९८॥
त्या समयी ब्रह्मसुत । नारद आला अकस्मात । राजा धावोनि चरण धरीत । सिंहासनी बैसवी ॥९९॥
पूजा करोनि उपचारी । राजयाते नमस्कारी । म्हणे स्वामी या अवसरी । कोठोनि येणे झाले पै ॥१००॥
राजा म्हणे देवऋषी । हिंडता तुम्ही त्रिभुवनासी । काय वर्तले विशेषी । आम्हालागी निरोपिजे ॥१॥
नारद म्हणे रायासी । गेलो होतो कैलासासी । येता देखिले मार्गासी । अपूर्व झाले परियेसा ॥२॥
महामृत्यु दूतांसहित । न्यावया आला तुझे सुत । सवेचि येऊनि शिवदूत । तयालागी पराभविले ॥३॥
यमदूत पळोनि जाती । यमापुढे सर्व सांगती । आम्हा मारिले शिवदूती । कैसे करावे क्षितीत ॥४॥
यम कोपोनि निघाला । वीरभद्रापासी गेला । म्हणे दूता का मार दिला । निरपराधे स्वामिया ॥५॥
निजकर्मानुबंधेसी । राजपुत्र गतायुषी । त्याते आणिता दूतांसी । कासया शिवदूती मारिले ॥६॥
वीरभद्र अतिक्रोधी । म्हणे झाला रुद्रविधि । दहा सहस्त्र वर्षे अवधि । आयुष्य असे राजपुत्रा ॥७॥
न विचारिता चित्रगुप्ता । वाया पाठविले दूता । वोखटे केले शिवदूता । जिवे सोडिले म्हणोनि ॥८॥
बोलावोनि चित्रगुप्ता । आयुष्य विचारीन त्वरिता । म्हणोनि पाठवी दूता । चित्रगुप्त पाचारिला ॥९॥
पुसताति चित्रगुप्तासी । काढोनि पाहे पुत्रासी । बारा वर्षे आयुष्य परियेसी । राजकुमारा लिहिले असे ॥११०॥
तेथेचि लिहिले होते आणिक । दशसहस्त्र वर्षे लेख । पाहोनि यम साशंकित । म्हणे अपराध आमुचा ॥११॥
वीरभद्राते वंदून । यमधर्म गेला परतोन । आम्ही आलो तेथोन । म्हणोनि सांगे नारद ॥१२॥
रुद्रजपे पुण्य करिता । आयुष्य वर्धले तुझे सता । मृत्यु जिंकिला तत्त्वता । पराशरगुरुकृपे ॥१३॥
ऐसे नारद सांगोनि । निघोनि गेला तेथोनि । पराशर महामुनि । निरोप घेतला रायाचा ॥१४॥
समस्त गेले द्विजवर । राजा हर्षे निर्भर । राज्य भोगिले धुरंधर । पुत्रपौत्री महीवरी ॥१५॥
ऐसा रुद्राध्यायमहिमा । पूजा करावी गुरुब्रह्मा । भिणे नलगे काळमहिमा । श्रीगुरु म्हणती दंपतीसी ॥१६॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । ऐसी कथा विस्तारेसी । श्रीगुरु सांगे दंपतीसी । प्रेमभावेकरोनिया ॥१७॥
या कारणे श्रीगुरूसी । प्रीति थोर रुद्राध्यायासी । पूजा करावी भक्तीसी । रुद्राध्यायेकरोनिया ॥१८॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । ऐकता तरे भवसागर । लाधे चारी पुरुषार्थ ॥१९॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । रुद्राभिषेकमाहात्म्य तेथ । वर्णिले असे अद्भुत । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥१२०॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रुद्राध्यायमहिमावर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः ॥३४॥
Search
Search here.