श्रीगुरुचरित्र अध्याय ३५ ते ३७

ग्रंथ - पोथी  > गुरुचरित्र Posted at 2019-02-09 14:53:04
श्रीगुरुचरित्र अध्याय ३५ श्रीगणेशाय नमः । नामधारक सिद्धासी । विनवीतसे परियेसी । रुद्राध्याय विस्तारेसी । दंपतीसी सांगितला ॥१॥ पुढे काय वर्तले । विस्तारोनि सांगा वहिले । मन माझे वेधले । गुरुचरित्र ऐकावया ॥२॥ सिद्ध म्हणे ऐक ताता । अपूर्व असे पुढे कथा । तेचि जाण पतिव्रता । श्रीगुरूते विनवीत ॥३॥ कर जोडोनि गुरूसी । विनवीतसे भक्तीसी । आम्हा गति पुढे कैसी । कवणेपरी असावे ॥४॥ या कारणे आपणासी । एखादा मंत्र उपदेशी । जेणे होय स्थिर जीवासी । चरणस्मरण सनातन ॥५॥ श्रीगुरु म्हणती तियेसी । स्त्रियांसी मंत्र उपदेशी । पतिभक्तीविणे त्यांसी । उपदेशासी देऊ नये ॥६॥ देता उपदेश स्त्रियांसी । विघ्न असे मंत्रासी । पूवी शुक्राचार्यासी । झाले असे परियेसा ॥७॥ ऐसे ऐकता गुरुवचन । विनवीतसे कर जोडून । स्त्रिया केवी मंत्रहीन । शुक्राचार्या कैसे झाले ॥८॥ विस्तारोनि आम्हासी । सांगा स्वामी कृपेसी । म्हणोनि लागली चरणासी । करुणावचनेकरोनिया ॥९॥ श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा आहे ऐसी । युद्ध देवदैत्यांसी । सदैव होय अवधारा ॥१०॥ दैत्यसैन्य पडे रणी । शुक्र जपे संजीवनी । सकळ सैन्य उठवूनि । पुनरपि युद्धा पाठवीत ॥११॥ इंद्र वज्रे असुर मारी । शुक्र अमृत जप करी । सवेचि येती निशाचरी । देवसैन्य मारावया ॥१२॥ ऐसे होता एके दिवसी । इंद्र गेला कैलासासी । सांगे स्थिति शिवासी । शुक्राचार्याची मंत्रकरणी ॥१३॥ कोपोनिया ईश्वर । नंदीस सांगे उत्तर । तुवा जावोनि वेगवक्त्र । शुक्राचार्या धरोनि आणी ॥१४॥ स्वामीचे वचन ऐकोनि । नंदी गेला ठाकोनि । होता शुक्र तपध्यानी । मुखी धरिला नंदीने ॥१५॥ नंदी नेत शिवापासी । आकांत वर्तला दैत्यांसी । ईश्वरे प्राशिले शुक्रासी । अगस्ती सिंधूचियापरी ॥१६॥ ऐसा कित्येक दिवसांवरी । होता शुक्र शिवाचे उदरी । निघूनि गेला मूत्रद्वारी । विसर पडला शिवासी ॥१७॥ पूर्वी होते शुक्र नाव । ईश्वर-उदरी झाला उद्‍भव । नाव पावला भार्गव । पुनः संजीवनी जपे तो ॥१८॥ इंद्र मनी विचारी । पुरोहितासी पाचारी । कैसा शुक्र जिवंत करी । पुनः दैत्यजनांसी ॥१९॥ त्यासी विघ्न करावे एक । तू पुरोहित विवेकयुक्त । बुद्धि विचारी अनेक । बृहस्पति गुरुराया ॥२०॥ पाहे पा दैत्यांचे दैव कैसे । शुक्रासारिखा गुरु विशेषे । देतो जीवासी भरवसे । दैत्य येती युद्धासी ॥२१॥ तैसा तू नव्हेस आम्हांसी । आम्हाते का उपेक्षिसी । देवगुरु तू म्हणविसी । बुद्धि करी शीघ्र आता ॥२२॥ तू पूज्य सकळ देवांसी । जरी आम्हा कृपा करिसी । शुक्राचार्य काय विशेषी । तुजसमान नव्हे जाणा ॥२३॥ ऐसे नानापरी देख । इंद्र अमरनायक । पूजा करी उपचारिक । बृहस्पति संतोषला ॥२४॥ गुरु म्हणे इंद्रासी । यासी ऐक तू उपायासी । षट्‍कर्णी करावे मंत्रासी । सामर्थ्य राहील शुक्राचे ॥२५॥ एखादा पाठवावा शुक्रापासी । विद्यार्थी करून त्वरेसी । मंत्र शिकेल भरवसी । विद्यार्थिरूपेकरूनिया ॥२६॥ आपुला पुत्र कच असे । त्याते पाठवू विद्याभ्यासे । मंत्र शिकेल आहे कैसी । संजीवनी अवधारा ॥२७॥ कचाते आणूनि बुद्धियुक्ति । सांगतसे बृहस्पति । तुवा जावे शुक्राप्रती । विद्यार्थिरूप धरोनि ॥२८॥ आमुची निंदा तेथे करी । मनोभावे सेवा करी । संजीवनी कवणेपरी । मंत्र शिके पुत्रराया ॥२९॥ इंद्रादिक देवतांचा । निरोप घेऊनि पितयाचा । शुक्राप्रति गेला कचा । विद्यार्थिरूप धरोनि ॥३०॥ नमन केले साष्टांगी । उभा राहिला करुणांगी । शुक्र पुसतसे वेगी । कवण कोठूनि आलासी ॥३१॥ बोले आपण द्विजकुमार । तुझी कीर्ति ऐकिली थोर । विद्याभ्यासीन मनोहर । म्हणोन आलो सेवेसी ॥३२॥ सेवक होईन तुमचे चरणी । आलो इच्छेसी धरूनि । तू भक्तवत्सलशिरोमणि । अनाथांचा प्रतिपालक ॥३३॥ बोलोनि ऐसे कचवचन । विनवीतसे कर जोडून । शुक्रकन्या जवळी येऊन । पितयालागी विनवित ॥३४॥ पितयासी म्हणे देवयानी । विप्र भला दिसे नयनी । याते तुम्ही शिष्य करूनि । विद्याभ्यास सांगावा ॥३५॥ कच सुंदर सुलक्षण । जैसा दिसे की मदन । देवयानी करी चिंतन । ऐसा पति व्हावा म्हणे ॥३६॥ ऐसी वासना धरुनी । पितयाते विनवुनी । शिष्य केला कच सगुणी । शुक्राचार्य विद्या सांगे ॥३७॥ ऐसा विद्याभ्यास करीत । दैत्यकुळी म्हणती निश्चित । देवगणी आले सत्य । कपटवेषे करूनि ॥३८॥ शिकूनिया विद्येसी । जाऊनि शिकवील देवांसी । कुडे होईल आम्हांसी । तेणे मनी चिंतावले ॥३९॥ काळ क्रमिता एके दिवसी । कच पाठविला समिधांसी । दैत्य जाती साह्येसी । तया कचाचे अवधारा ॥४०॥ रानी जाउनी समागमेसी । दैत्य मारिले कचासी । समिधा घेवोनि घरासी । दैत्य आपण येते झाले ॥४१॥ शुक्राचार्यांची कन्या । पितयासी परम मान्या । पितयासी विनवी धन्या । कच कैसा नाही आला ॥४२॥ कच आलियावाचूनी । भोजन न करी देवयानी । ऐसे ऐकता निर्वाणी । शुक्राचार्य चिंतावला ॥४३॥ ज्ञानी पाहे मानसी । मृत्यु झाला असे तयासी । मंत्र जपूनि संजीवनीसी । त्वरित घरी आणिला ॥४४॥ आणिक होता बहुत दिवस । दैत्य करिती अतिद्वेष । गेला होता वनवास । पुनरपि तयासी वधियेले ॥४५॥ मागुती वाचेल म्हणोनि । चूर्ण करिती छेदोनि । दाही दिशा टाकुनी । आले घरा पुनरपि ॥४६॥ दिवस गेला अस्तमानी । पुसतसे देवयानी । कच न दिसे म्हणोनि । पितयाते विनवीत ॥४७॥ कच माझा प्राणसखा । ना आणिशी जरी खाईन विखा । दावी मज तयाचे मुखा । म्हणोनि प्रलाप करीतसे ॥४८॥ कन्येवरी ममत्व बहुत । तेणे शुक्र ज्ञाने पहात । छिन्नभिन्न केले म्हणत । मंत्र जपला संजीवनी ॥४९॥ धन्य मंत्राचे सामर्थ्य । कच आला घरा त्वरित । देवयानी संतोषत । पितयाने आलिंगिली ॥५०॥ दैत्य मनी विचार करिती । काय केल्या न मरे म्हणती । गुरुकन्येसी याची प्रीति । म्हणुनि गुरु वाचवितो ॥५१॥ आता उपाय करू यासी । उदईक येईल एकादशी । मारूनि मिळवू पानेसी । गुरुमुखी पाजावे ॥५२॥ ऐशी निगुती करोनि । आली एकादशी दिनी । कचाते बाहेर नेवोनि । मारते जहाले दैत्य शिष्य ॥५३॥ प्राशन करविती गुरूसी । मिळवूनिया मद्यरसी । स्निग्ध मिळवूनिया बहुवसी । शुक्रगुरूसी देत झाले ॥५४॥ मागुती पुसे देवयानी । पितयाते विनवुनी । कचासी आणी म्हणोनि । रुदन करी आक्रोशे ॥५५॥ शुक्र पहातसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी । खेद करीतसे मनी । कन्यालोभेकरोनिया ॥५६॥ विचार करिता सर्वा ठायी । दिसू लागला आपुले देही । संदेह पडला शक्रासी पाही । कैसे करावे म्हणोनि ॥५७॥ कन्येसी म्हणे शुक्र देखा । कच न ये आता ऐका । माझे उदरी असे निका । कैसा काढू तयासी ॥५८॥ यासी काढिता आपणासी । मृत्यु होईल परियेसी । काय अभिलाष असे त्यासी । म्हणोनि कन्येसी पुसतसे ॥५९॥ पितया विनवी देवयानी । अभिलाष होता माझे मनी । भार्या त्याची होउनी । दोघे राहू तुजपासी ॥६०॥ हाचि व्हावा माझा पति । ऐसे संकल्पिले चित्ती । न उठे जरी पुढती । तरी प्राण त्यागीन ॥६१॥ संदेह पडला शुक्रासी । बोधिता झाला कन्येसी । त्यास उठविता आपणासी । मृत्यू होईल अवधारी ॥६२॥ कन्या म्हणे पितयासी । सकळा तू वाचविसी । आपुला प्राण जाईल म्हणसी । हे आश्चर्य वाटतसे ॥६३॥ शुक्र म्हणे देवयानी । मंत्र असे संजीवनी । मजवाचोनि नेणे कोणी । माते कोण उठवील ॥६४॥ मंत्र सांगो नये कवणा । षट्‍कर्णी होता जाईल गुणा । कचाकरिता माझा प्राण । जाईल देखा अवधारी ॥६५॥ न ऐके कन्या देवयानी । पित्याचे चरण धरोनि । विनवीतसे कर जोडोनि । मंत्र आपणाते शिकवावा ॥६६॥ कचासी तू सजीव करी । तुज येईल मृत्यू जरी । मी मंत्र जपोनि निर्धारी । सजीव करीन तुजलागी ॥६७॥ शुक्र म्हणे कन्येसी । मंत्र सांगू नये स्त्रियांसी । दोष असता परियेसी । वेदशास्त्रसंमत असे ॥६८॥ स्त्रियांसी मंत्र पतिभक्ति । जपू नये मंत्रयुक्ति । सांगता दोष आम्हा घडती । मंत्रसामर्थ्य जाईल ॥६९॥ पितयासी म्हणे देवयानी । सुखे असा मंत्र जपोनि । प्राण जातो म्हणोन । मूर्च्छागत पडली ते ॥७०॥ शुक्राची कन्येवरी प्रीति । उठवूनि तिसी आलिंगिती । मंत्र तिसी सांगती । संजिवनी अवधारा ॥७१॥ आपुल्या पोटी कच होता । तोही होय ऐकता । मंत्र जहाला षट्‍कर्णता । मग जपला कचानिमित्त ॥७२॥ शुक्राचे पोटातुनी । कच निघाला फोडुनी । मंत्र जपे ती देवयानी । पितयाते उठविले ॥७३॥ तीन वेळा मंत्र जपता । कचे पाठ केला तत्त्वता । संतोष करी मनी बहुता । कार्य साधले म्हणोनि ॥७४॥ शुक्राचार्याते नमुनी । कच विनवी कर जोडुनी । माते दैत्य मारिती म्हणोनि । निरोप द्यावा मजलागी ॥७५॥ स्वामीचेनि विद्या शिकलो । तुझे कृपेने पूर्ण जहालो । देवकार्यार्थ संतोषलो । म्हणूनि चरणी लागला ॥७६॥ शुक्राचार्ये हर्षोनि । निरोप दिधला त्यालागोनी । पदर धरी देवयानी । पति व्हावे म्हणोनिया ॥७७॥ तूते मारिले तीन वेळी । मी वाचविले त्या काळी । विद्या शिकलासी पित्याजवळी । अवश्य वरावे मजलागी ॥७८॥ कच म्हणे ऐक बाळे । गुरुकन्या भगिनी बोले । तुवा आमुते वाचविले । माता होसी निर्धारी ॥७९॥ वरिता दोष आपणासी । दूषण ठेवितील सर्व ऋषि । भगिनी तू आमुची होसी । कैसी वरू म्हणे तो ॥८०॥ देवयानी कोपोनि । शाप दिधला ते क्षणी । वृथा विद्या होईल मानी । समस्त विसरे तात्काळी ॥८१॥ माझे अंतःकरणीची आशा । वृथा केली निराशा । विद्या न ये तुज लवलेशा । म्हणूनि शाप दिधला ॥८२॥ कच म्हणे तियेसी । वाया शापिले आम्हांसी । पुरुष वरील तुजसी । ब्रह्मकुळाव्यतिरिक्त ॥८३॥ तुझा पिता ब्रह्मज्ञानी । जाणे अमृतसंजीवनी । तुज शिकविले म्हणोनि । पुढे मंत्र न चाले ॥८४॥ ऐसा शाप देउनी । कच गेला निघुनी । संतोष झाला इंद्रभुवनी । दैत्यजीवन नव्हेची ॥८५॥ शुक्राचा संजीवनी मंत्र । कामा न ये झाला अपात्र । स्त्रियांसी न सांगावा मंत्र । म्हणोनि श्रीगुरु निरूपिती ॥८६॥ स्त्रियांलागी पतिसेवा । याची कारणे मंत्र न द्यावा । व्रतोपवास करावा । गुरु-पुरुष-निरोपाने ॥८७॥ सावित्री विनवी श्रीगुरूसी । व्रत आचरले बहुवसी । तुझे वाक्य आम्हांसी । व्रत एखादे निरोपावे ॥८८॥ तुजवरी माझा विश्वास । तुजवाचोनि नेणू आणिकास । व्रत तूचि आम्हांस । व्रत तुझी चरणसेवा ॥८९॥ भक्ति राहे तुझे चरणी । ऐसा निरोप द्यावा मुनि । म्हणुनी लागली चरणी । कृपा करी म्हणोनिया ॥९०॥ श्रीगुरु म्हणती तियेसी । सांगेन तुज व्रत ऐसी । स्थिर होय अहेवपणासी । राज्य पावे तुझा पति ॥९१॥ दंपत्य विनवी श्रीगुरूसी । तुझे वाक्य कारण आम्हासी । जैसा तू निरोप देसी । तेणे रीती रहाटू ॥९२॥ जो गुरुवाक्य न करी । तो पडे रौरवघोरी । तुझे वाक्य आम्हा शिरी । म्हणूनि चरणी लागली ॥९३॥ भक्तवत्सल श्रीगुरुनाथ । सांगता जहाला अतिप्रीत । विस्तारोनि समर्थ । व्रत तिसी सांगतसे ॥९४॥ सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरु म्हणती कौतुका । ऐकताती दंपती निका । अतिप्रीतिकरोनिया ॥९५॥ श्रीगुरु म्हणती तयांसी । सांगेन व्रत इतिहासी । ऋषि पुसती सूतासी । व्रत बरवे निरोपावे ॥९६॥ सूत म्हणे ऋषीश्वरा । व्रत सांगेन मनोहरा । स्त्रिया अथवा पुरुषा बरा । व्रत असे अवधारा ॥९७॥ नित्यानंद असे शांत । निर्विकल्प विख्यात । ऐसा ईश्वर अर्चिता त्वरित । सकळाभीष्टे पाविजे ॥९८॥ संसारसागरात । विषयातुर आचरत । तेही पूजिता पूर्ण भक्त । त्यासी ईश्वर प्रसन्न होय ॥९९॥ विरक्त अथवा संसाररत । विषयातुर आसक्त । जे पूजिती पूर्ण भक्त । त्यासी ईश्वर प्रसन्न होय ॥१००॥ तेणे पाविजे पैलपार । ऐसे बोलती वेदशास्त्र । स्वर्गापवर्गा अधिकार । त्यासी होय परियेसा ॥१॥ विशेष व्रत असे ऐक । सोमवार व्रतनायक । ईश्वरार्चन करा विवेक । सकळाभीष्टे पाविजे ॥२॥ नक्त भोजन उपवासी । जितेंद्रिय करा विशेषी । वैदिक तांत्रिक पूजेसी । विधिपूर्वक सकळिक ॥३॥ गृहस्थ अथवा ब्रह्मचारी । सुवासिनी कन्याकुमारी । भर्तृविण विधवा नारी । व्रत करावे अवधारा ॥४॥ याचे पूर्वील आख्यान । सांगेन ऐका अतिगहन । ऐकता करी पावन । सकळासही परियेसा ॥५॥ स्कंदपुराणींची कथा । सर्व साद्यंत ऐका । पूर्वयुगी आर्यावर्तका । राजा एक अवधारा ॥६॥ चित्रवर्मा नाम त्यासी । धर्मात्मा राजा परियेसी । धर्ममार्ग आचरे हर्षी । अधर्माते शिक्षा करी ॥७॥ अखिल पुण्ये त्याणे केली । सकल संपत्ति वाढविली । समस्त पृथ्वी जिंकिली । पराक्रमेकरूनिया ॥८॥ सहपत्‍नी धर्म करिती । पुत्रकाम्ये शिवाप्रती । ऐसा किती काळ क्रमिती । कन्या झाली तयाते ॥९॥ अतिसुंदर सुलक्षण । पार्वतीरूपासमान । तेज फाके सूर्यकिरण । अतिलावण्य न वर्णवे ॥११०॥ वर्तावया जातकासी । बोलाविले ज्योतिषी । द्विज मिळाले अपारेसी । वर्तविती जातक ॥११॥ म्हणती कन्या सुलक्षण । नामे सीमंतिनी जाण । उमेसारखे मांगल्यपण । किंवा दमयंतीस्वरूप होय ॥१२॥ भागीरथीऐसी रूपासी । लक्ष्मीसारिखी गुणराशी । ज्ञाने देवमतासरसी । जानकीसमान पतिव्रता ॥१३॥ सूर्यासारिखी होईल कांति । चंद्रासमान मनशांति । दहा सहस्त्र वरुषे ख्याति । पतीसह राज्य करील ॥१४॥ जातक वर्तवले तिसी । राव पावला अतिहर्षी । अखिल दाने विप्रांसी । देता जाहला अवधारा ॥१५॥ असता राव सभेसी । द्विज एक परियेसी । भय न धरिता वाक्यासी । बोलतसे अवधारा ॥१६॥ ऐक राया माझे वचन । कन्यालक्षण मी सांगेन । चवदावे वर्षी विधवापण । होईल इयेसी जाण पा ॥१७॥ ऐसे वाक्य परिसोनि । राव पडिला मूर्छा येवोनि । चिंता वर्तलि बहु मनी । विप्रवाक्य परिसता ॥१८॥ ऐसे सांगोनि ब्राह्मण । गेला निघोनि तत्क्षण । सर्व दुःखाते पावून । तळमळीत तेधवा ॥१९॥ ऐसे बालपण क्रमिता । सप्त वर्षे जाती तत्त्वता । चिंतीत होती मातापिता । वर्‍हाड केवी करावे ॥१२०॥ चवदावे वर्षी विधवापण । म्हणोनि बोलिला ब्राह्मण । तेणे व्याकुळ अंतःकरण । राजा-राजपत्‍नीचे ॥२१॥ कन्या खेळे राजांगणी । सवे सखयाते घेवोनि । बोलता ऐकिले विप्रवचनी । चौदावे वर्षी विधवत्व ॥२२॥ ऐसे ऐकोनि वचन । कन्या करीतसे चिंतन । वर्तता आली एक दिन । तया घरी ब्रह्मस्त्री देखा ॥२३॥ याज्ञवल्क्याचिया पत्‍नी । मैत्रेयी म्हणोनि । घरी आली देखोनि । चरण धरीत तेधवा ॥२४॥ भावे साष्टांग नमूनि । करसंपुट जोडोनि । विनवी करुणावचनी । माते प्रतिपाळी म्हणतसे ॥२५॥ सौभाग्य स्थिर होय जेणे । उपाय सांगे मजकारणे । चंचळ असे अंतःकरणे । म्हणूनि चरणी लागली ॥२६॥ कन्या विनवी तियेसी । ऐसे व्रत सांग आम्हांसी । आम्हा जननी तूचि होसी । व्रत सांग म्हणतसे ॥२७॥ ऐकोनि कन्येच्या वचना । बोले मैत्रेयी जाणा । शरण रिघावे उमारमणा । अहेवपण स्थिर होय ॥२८॥ सोमवार परियेसी । व्रत आचरी नेमेसी । पूजा करावी शिवासी । उपवास करुनी अवधारा ॥२९॥ बरवे सुस्नात होवोनि । पीतांबर नेसोनि । मन स्थिर करोनि । पूजा करावी गौरीहरा ॥१३०॥ अभिषेके पापक्षय । पीठ पूजिता साम्राज्य । गंधाक्षता पुष्पमाल्य । सौभाग्यसौख्य पाविजे ॥३१॥ सौगंध होय धूपाने । कांति पाविजे दीपदाने । भोग नैवेद्यार्पणे । तांबूलदाने लक्ष्मी स्थिर ॥३२॥ चतुर्विध पुरुषार्थ । नमस्कारिता त्वरित । अष्टैश्वर्यै नांदत । ईश्वरजप केलिया ॥३३॥ होमे सर्व कोश पूर्ण । समृद्धि होतसे जाण । करिता ब्राह्मणभोजन । सर्व देवता तृप्त होती ॥३४॥ ऐसे सोमवार व्रत । कन्ये करी वो निश्चित । भव आलिया दुरित । परिहरती महाक्लेश ॥३५॥ गौरीहरपूजा करिता । समस्त दुरिते जाती तत्त्वता । ऐकोनि सीमंतिनी तत्त्वता । अंगिकारिले व्रत देखा ॥३६॥ सोमवारचे व्रत । आचरे सीमंतिनी त्वरित । पिता देखोनि निश्चित । विवाहायोग्य म्हणोनि ॥३७॥ राजा विचारी मानसी । वर्‍हाड करावे कन्येसी । जैसे प्राक्तन असेल तिसी । तैसे घडो म्हणतसे ॥३८॥ विचारोनि मंत्रियांसी । पाठविता झाला राष्ट्रांसी । दमयंतीनळवंशी । इंद्रसेनाचा कुमारक ॥३९॥ चंद्रांगद वर बरवा । जैसा तेज चंद्रप्रभा । बोलाविले विवाहशोभा । कन्या दिधली संतोषे ॥१४०॥ राजे भूमांडलिक देखा । समस्त आले वर्‍हाडिका । वर्‍हाड झाले अतिकौतुका । महोत्साह नानापरी ॥४१॥ नाना द्रव्यालंकार । वर्‍हाडिका देई नृपवर । अखिल दाने देकार । विप्रालागी देता झाला ॥४२॥ पाठवणी केली सकळिका । जामात ठेविला कौतुका । कन्यास्नेह अनेका । म्हणोनि राहविले राजपुत्रा ॥४३॥ राजपुत्र श्वशुरगृही । स्त्रिया प्रीति अतिस्नेही । काळ क्रमिता एके समयी । जलक्रीडेसी निघाला ॥४४॥ कालिंदी म्हणिजे नदीसी । राजपुत्र परियेसी । सर्व दळ समागमेसी । गेला नदीसी विनोदे ॥४५॥ राजपुत्र निघे नदीत । सवे निघाले लोक बहुत । विनोदे असे पोहत । अतिहर्षे जलक्रीडा ॥४६॥ पोहता राजकुमार देखा । बुडाला मध्ये गंगोदका । आकांत झाला सकळिका । काढा काढा म्हणताती ॥४७॥ सवे सैन्य लोक सकळ । होते नावेकरी प्रबळ । उदकी पाहताती तये वेळ । न दिसे कोठे बुडाला ॥४८॥ उभय तटी सैन्यातून । धावत गेले राजसदना । व्यवस्था सांगती संपूर्ण । जामात तुमचा बुडाला ॥४९॥ कालिंदी नदीच्या डोहात । संगतीने होते पोहत । अदृश्य झाला त्वरित । न दिसे कुमार बुडाला ॥१५०॥ ऐकोनि राजा पडे धरणी । मूर्च्छना येऊनि तत्क्षणी । कन्या ऐकताच श्रवणी । त्यजू पाहे प्राणाते ॥५१॥ राजा कन्येसी संबोखित । आपण गेला धावत । राजस्त्रिया शोक करीत । कन्यादुःखे अतिबहु ॥५२॥ सीमंतिनी करी शोका । म्हणे देवा त्रिपुरांतका । शरण रिघालिया देखा । मरण कैसे न आले मज ॥५३॥ मृत्यु चवदा वर्षी जाण । म्हणोनि धरिले तुमचे चरण । वृथा गेले व्रताचरण । सोमवार शिवाचे ॥५४॥ तव देणे अढळ सकळा । मज उपेक्षिले जाश्वनीळा । अपकीर्ति तुज केवळा । शरणागता रक्षिसी ॥५५॥ स्मरण करी श्रीगुरूसी । याज्ञवल्क्यपत्‍नीसी । सांगितले व्रत आम्हांसी । सौभाग्य स्थिर म्हणोनिया ॥५६॥ तिचिया वाक्ये करूनि । पूजिली शिवभवानी । वृथा झाली माझे मनी । शीघ्र विनवी शिवासी ॥५७॥ ऐसे दुःखे प्रलापत । सीमंतिनी जाय रडत । गंगाप्रवेश करीन म्हणत । निघाली वेगे गंगेसी ॥५८॥ पिता देखोनि नयनी । धरावया गेला धावोनी । कन्येते आलिंगोनी । दुःख करी अत्यंत ॥५९॥ सकळ मंत्री पुरोहित । सर्व सैन्य दुःख करीत । बोलाविले नावेकरी त्वरित । पहा म्हणती गंगेत ॥१६०॥ गंगा सकळ शोधिती । न दिसे कुमार कवणे गती । शोक करीतसे सीमंती । राजा संबोखी तियेसी ॥६१॥ राजकुमाराचे सेवक । करू लागले बहु दुःख । सांगो गेले पुत्रशोक । इंद्रसेनाकारणे ॥६२॥ ऐकोनिया इंद्रसेन । दुःख करी अतिगहन । भार्येसहित धावून । आला तया मृत्युस्थळा ॥६३॥ दोघे राव मिळोन । शोक करिती दारुण । हा हा कुमारा म्हणोन । ऊर शिर पिटताती ॥६४॥ हा हा पुत्रा ताता म्हणत । राजा गडबडा असे लोळत । मंत्री राजकुळ समस्त । नगरलोक दुःख करिती ॥६५॥ कोठे गेला राजसुत । म्हणोनि सीमंतिनी रडत । खिन्न झाले समस्त । मातापितर श्वशुरादि ॥६६॥ कोणे स्थानी पति गेले । म्हणोनि सीमंतिनी लोळे । ललाट हस्ते पिटिले । पार नाही शोकासी ॥६७॥ सीमंतिनी म्हणे पितयासी । प्राण त्यजीन पतिसरसी । वाचूनिया संसारासी । वैधव्य कोण भोगील ॥६८॥ पुसे सकळ द्विजासी । करावे की सहगमनासि । विप्र सांगती रायासी । प्रेतावेगळे करू नये ॥६९॥ प्रेत शोधावे नदीत । दहन करावे कन्येसहित । न दिसे बुडाला गंगेत । केवी सहगमन होईल ॥१७०॥ आता इसी ऐसे करणे । प्रेत सापडे तववरी राखणे । ऐकोनिया द्विजवचने । राजा कन्ये विनवीतसे ॥७१॥ ऐसे व्याकुळ दुःखे करिती । मंत्री पुरोहित म्हणती । जे असेल होणार गती । ब्रह्मादिका चुकेना ॥७२॥ होणार जहाली देवकरणी । काय कराल दुःख करोनी । ऐसे मंत्री संबोखुनी । रायाते चला म्हणती ॥७३॥ निघाले राजे उभयता । मंदिरा पावले दुःख करिता । इंद्रसेन अति दुःखिता । न विसरे कधी पुत्रशोक ॥७४॥ राज्य-व्यापार सोडूनि । दुःख करी पुत्रचिंतनी । गोत्रजी राज्य हिरूनी । कपटे घेतले तयाचेच ॥७५॥ सहभार्या रायासी । ठेविते झाले कारागृहासी । पुत्रशोके बहु त्यासी । राज्यभोग चाड नाही ॥७६॥ चित्रवर्मा राव देखा । कन्या ठेविली ममत्विका । प्राण त्यजू पाहे निका । लोक निंदितील म्हणोनि ॥७७॥ राव म्हणे कन्येसी । पुत्र नाही आमुचे वंशी । कन्या एक तू आम्हांसी । पुत्रापरी रहाटावे ॥७८॥ लोक निंदितील आम्हांसी । वैधव्य आले परियेसी । वर्ष एक क्रमिलियासी । पुढे आचार करी वो बाळे ॥७९॥ पित्याचे वचन ऐकोनी । करीतसे बहु चिंतनी । म्हणे देवा शूळपाणि । केवी माते गांजिले ॥१८०॥ ऐसे विचारुनी मानसी । व्रत आचरे तत्परेसी । सोमवार उपवासासी । ईश्वरपूजा करीतसे ॥८१॥ इकडे तो राजकुमार । बुडाला होता गंगापूर । गेला जेथे पाताळनगर । वासुकी जेथे राज्य करी ॥८२॥ नागलोकीचिया नारी । आल्या होत्या नदीतीरी । राजकुमार आला पुरी । नदीतटाकी वहातसे ॥८३॥ देखोनिया नागकन्या । काढिती संतोषे करोनिया । अमृता शिंपिती आणुनिया । सावध केला तयाते ॥८४॥ कन्या मिळूनि त्यासी । घेवोनि जाती तक्षकापासी । विचित्र नगर परियेसी । राजपुत्र पहात असे ॥८५॥ पाहे पाताळनगर-रचना । जैसी शोभा इंद्रभुवना । गोपुरे दिसती महारत्‍ना । विद्युल्लतेपरी ॥८६॥ इंद्रनीळ वैडुर्यैसी । मानिके मुक्ताफळांसी । महारम्य पुरी जैसी । सूर्यकांति मिरवत ॥८७॥ चंद्रकांतिसरसी भूमि । महाद्वारे कपाट हेमी । अनेक रत्‍ने नाही उपमी । ऐशा मंदिरा प्रवेशला ॥८८॥ पुढे देखिली सभा थोर । समस्त बैसले सर्पाकार । आश्चर्य करी राजकुमार । असंख्य सर्प दिसताती ॥८९॥ सभेमध्ये अतिशोभित । मध्ये बैसला पन्नगनाथ । जैशी सूर्यकांति फाकत । अति उन्नत बैसला ॥१९०॥ अनेक शत फणा दिसती । जैशी वीज लखलखती । पीतांबरे सज्योती । रत्‍नकुंडलमंडित ॥९१॥ अनेकरत्‍नखचित देखा । मुकुट मिरवती सहस्त्र एका । सहस्त्रफणी मिरवे तक्षका । ऐसा सभे बैसला असे ॥९२॥ रूपयौवन नागकन्या । नानापरी भरणे लेवोनिया । अनेक सहस्त्र येवोनिया । सेवा करिती तक्षकाची ॥९३॥ ऐशा सभास्थानी देख । राव बैसला तक्षक । देखोनिया राजकुमारक । नमन करी साष्टांगी ॥९४॥ तक्षक पुसे नागकन्यांसी । कैचा कुमार आणिलासी । सुलक्षण दिसतो कैसी । कोठे होता म्हणे तया ॥९५॥ नागकन्या म्हणती त्यासी । नेणो नाम याचे वंशी । वहात आला यमुनेसी । घेऊन आलो तुम्हांजवळी ॥९६॥ तक्षक पुसे राजकुमारासी । नाम कवण कवणे वंशी । काय कारणे आलासी । कवण देशी वास तुझा ॥९७॥ सांगे राजकुमार देख । आम्ही भूमंडळनायका । नैषध राजपति ऐका । नळनामे पुण्यश्लोक ॥९८॥ त्याचा पुत्र इंद्रसेन । जन्म आमुचा त्यापासून । चंद्रांगद नामे आपण । गेलो होतो श्वशुरागृहा ॥९९॥ जलक्रीडा करावयासी । गेलो होतो यमुनेसी । विधिवशे आम्हांसी । बुडालो नदी अवधारा ॥२००॥ वहात आलो नदीत । नागकन्या मज देखत । घेवोनि आल्या तुम्हांप्रत । पूर्वभाग्ये करूनि ॥१॥ पूर्वार्जित पुण्यवंशी । भेटी झाली चरणांसी । धन्य माझे जीवित्वासी । कृतार्थ झालो म्हणतसे ॥२॥ करुणावचन ऐकोनि । तक्षक बोले संतोषोनि । नको भिऊ म्हणोनि । धैर्य तया दिधले ॥३॥ शेष म्हणे रे बाळा । तू आहेसी मन निर्मळा । तुमचे घरी सर्वकाळा । दैवत कोण पूजितसा ॥४॥ ऐसे ऐकोनि राजकुमार । हर्षे जहाला निर्भर । सांगतसे विस्तार । आपुला देव शंकर ॥५॥ सकळ देवांचा देव । नाम ज्याचे सदाशिव । वामांगी उमा अपूर्व । त्यालागी पूजू निरंतर ॥६॥ ज्यापासोनि जनित ब्रह्मा । सृष्टि सृजितो अनुपमा । तो सदाशिव आम्हा । निज दैवत निर्धारे ॥७॥ तयाच्या सत्त्वगुणेसी । विष्णु उपजला परियेसी । प्रतिपाळक लोकांसी । तो सदाशिव आराधितो ॥८॥ ज्याच्या तामसगुणे जाण । एकादश रुद्रगण । उपजले असती याकारण । प्रलयकर्ता या नाव ॥९॥ धाता विधाता आपण । उत्पत्तिस्थितिलयाकारण । तेजासी तेज असे जाण । तैसा ईश्वर पूजितसो ॥२१०॥ पृथ्वी आप तेजासी । जो पूर्ण वायु आकाशी । तैसा पूजितसो शिवासी । म्हणे राजकुमार देखा ॥११॥ सर्वां भूती असे संपूर्ण । चिन्मय आपण निरंजन । जो रूपे असे अचिंतन । तो ईश्वर पूजितसो ॥१२॥ ज्याची कथा वेद जहाले । तक्षक शेष ज्याची कुंडले । त्रिनेत्री असे चंद्र मोळे । तैसा शंकर पूजितसो ॥१३॥ ऐसे ऐकोनि वचन । तक्षक संतोषला अतिगहन । राजकुमारा आलिंगोन । तुष्टलो तुष्टलो म्हणतसे ॥१४॥ तक्षक बोले तये वेळी । तुज देईन राज्य सकळी । तुवा रहावे पाताळी । आनंदे भाग्य भोगीत ॥१५॥ माझ्या लोकी जे जे रत्‍न । ते ते देईन तुजकारण । पावोनिया समाधान । सुखे येथे रहावे ॥१६॥ पाताळ लोकीची रचना । पहावी तुवा अनुपमा । कल्पवृक्ष मनोरमा । आहेत माझ्या नगरात ॥१७॥ अमृत न देखती स्वप्नी कोणी । ते भरले असे जैसे पाणी । तळी बावी पोखरणी । अमृताच्या माझ्या घरात ॥१८॥ नाही मरण तव येथे । रोगपीडादि समस्ते । नेणती कोणी स्वप्नावस्थे । ऐसे नगर माझे असे ॥१९॥ सुखे रहावे येथे स्वस्थ । तक्षक कुमारक सांगत । राजपुत्र असे विनवीत । करुणावचने ॥२२०॥ राजपुत्र विनवी तक्षकासी । मी एकलाची पितयाचे कुशी । भार्या चतुर्दश वर्षी । शिवपूजनी रत सदा ॥२१॥ नूतन झाले माझे पाणिग्रहण । गुंतले तेथे अंतःकरण । पाहीन मातापिताचरण । तेणे सर्वस्व पावलो ॥२२॥ आपण बुडालो नदीत । पिता माता दुःख करीत । पत्‍नी जीव त्यागील सत्य । हत्या पडे मस्तकी ॥२३॥ देखिले तव चरण आपण । तेणे झालो धन्य धन्य । रक्षिला आपण माझा प्राण । दर्शन करा मातापिता ॥२४॥ तक्षक झाला संतोषित । नाना रत्‍ने त्यासी देत । अमृत पाजिले बहुत । आण्क दिधले स्त्रियेसी ॥२५॥ कल्पवृक्षफळे देती । अपूर्व वस्तु आभरणे त्यासी । जे अपूर्व असे क्षिती । अमोल्य वस्तु देता जहाला ॥२६॥ इतुके देवोनि कुमारकासी । तक्षक बोले परियेसी । जे जे काळी आम्हा स्मरसी । तव कार्य सिद्धि पावेल ॥२७॥ आणिक संतोषोनि चित्ती । वस्त्रे वाहने मागुती । तुरंग दिधले मनोगती । सवे दे कुमार आपुला ॥२८॥ चंद्रांगदकुमारासी । इतके दिधले आनंदेसी । निरोप दिधला परियेसी । वाहन तुरंग मनोहर ॥२९॥ तक्षका नमूनि त्वरित । वारूवरी आरूढ राजसुत । मनोवेगे मार्ग क्रमित । नागकुमार सवे जाणा ॥२३०॥ जिये स्थानी बुडाला होता । तेथे पावला क्षण न लागता । निघाला बाहेर वारूसहिता । नदीतटाकी उभा असे ॥३१॥ सोमवार त्या दिवशी । सीमंतिनी आली स्नानासी । सवे होत्या सखी सेवेसी । नदीतीरी उभी असे ॥३२॥ सीमंतिनी म्हणे सखियासी । आश्चर्य वाटे मानसी । उदकातुनी निघाला परियेसी । सवे असे नागपुत्र ॥३३॥ राक्षस होई की वेषधरू । रूप धरिले असे नरू । दिसतसे मनोहरू । तुरंगारूढ जाहला असे ॥३४॥ कैसे पहा हो रूप यासी । जेवी सूर्य प्रकाशी । दिव्यमालांबरे कैसी । सुगंध असे परिमळा ॥३५॥ दश योजनेपर्यंत । सुवास येतसे अमित । पूर्वी देखिला असे रूपवंत । भासे त्यासी पाहिला ॥३६॥ स्थिर स्थिर भयभीता । त्याचिया पहाती स्वरूपता । आपुला पतीसादृश्य म्हणता । रूप आठवी तये वेळी ॥३७॥ राजपुत्र पाहे तियेसी । म्हणे स्वरूपे माझी स्त्री ऐसी । गळसरी न दिसे कंठासी । हार नसे मुक्ताफळ ॥३८॥ अवलोकितसे अंगखूण । न दिसे हळदी करी कंकण । चित्ती व्याकुळ रूपहीन । सदृश दिसे प्राणेश्वरी ॥३९॥ मनी विचरी मागुता । रूप तिचे आठविता । तुरंगावरूनि उतरता । नदीतीरी बैसला असे ॥२४०॥ बोलावोनि तियेसी । पुसतसे अति प्रेमेसी । तुझा जन्म कवणे वंशी । पुरुष तुझा कोण सांगे ॥४१॥ का कोमाइलीस बाळपणी । दिससी शोके म्लान लक्षणी । सांगावे मज विस्तारोनि । अति स्नेहे पुसतसे ॥४२॥ ऐकोनि सीमंतिनी देखा । आपण न बोले लज्जे ऐका । सखियांसी म्हणे बालिका । वृत्तान्त सांगा समस्त ॥४३॥ सखिया सांगती तयासी । हे सीमंतिनी नाम परियेसी । चंद्रांगदाची महिषी । चित्रवर्म्याची हे कन्या ॥४४॥ इचा पति अतिसुंदर । चंद्रांगद नामे थोर । जळक्रीडा करिता फार । येथे बुडाला नदीत ॥४५॥ तेणे शोक करिता इसी । वैधव्य आले परियेसी । दुःख करीत तीन वर्षी । लावण्य इचे हरपले ॥४६॥ सोमवारव्रत करीत । उपवास पूजादि आचरत । आज स्नानानिमित्त । आली असे नदीसी ॥४७॥ इच्या श्वशुराची स्थिति देखा । पुत्रशोके विकळ ऐका । राज्य घेतले दायादिका । कारागृही घातले ॥४८॥ या कारणे सीमंतिनी । नित्य पूजी शूलपाणि । सोमवार उपोषणी । म्हणोनि करिती परियेसा ॥४९॥ इतके सख्या सांगती । मग बोले आपण सीमंती । किमर्थ पुसता आम्हांप्रती । आपण कोण कंदर्परूपी ॥२५०॥ गंधर्व किंवा तुम्ही देव । किन्नर अथवा सिद्ध गंधर्व । नररूप दिसता मानव । आमुते पुसता कवण कार्या ॥५१॥ स्नेह्भावे करोनी । पुसता तुम्ही अति गहनी । पूर्वी देखिले होते नयनी । न कळे खूण म्हणतसे ॥५२॥ आप्तभाव माझ्या मनी । स्वजन तसे दिसता नयनी । नाम सांगा म्हणोनि । आठवी रूप पतीचे ॥५३॥ आठवोनि पतीचे रूप । करू लागली अति प्रलाप । धरणी पडली रुदितबाष्प । महादुःख करीतसे ॥५४॥ तियेचे दुःख देखोनि नयनी । कुमार विलोकी तटस्थपणी । मुहूर्त एक सावरोनि । आपण दुःख करीतसे ॥५५॥ दुःख करोनिया देखा । प्रक्षाळिले आपुल्या मुखा । उगी राहे म्हणे ऐका । आमुचे नाम सिद्ध म्हणे ॥५६॥ सीमंतिनी करिता शोक अपार । जवळी आला राजकुमार । हाती धरली सत्वर । संबोखीतसे प्रेमभावे ॥५७॥ एकांती सांगे तियेसी । म्हणे तुझ्या भ्रतारासी । देखिले आम्ही दृष्टीसी । सुखी आता असावे ॥५८॥ तव व्रतपुण्ये करोनी । पति शीघ्र पहासी नयनी । चिंता करून नको म्हणोनी । तृतीय दिनी भेटेल ॥५९॥ तव पति माझा सखा । प्राण तोचि ऐका । संदेह न करी वो बालिका । आण शिवचरणाची ॥२६०॥ ऐसे एकांती सांगून । प्रगट न करी म्हणून । दुःख आठवले ऐकून । सीमंतिनी बाळिकेसी ॥६१॥ सुटल्या धारा लोचनी । प्रेमे रडे स्फुंदोनी । विचार करी सीमंतिनी । हाचि होय मम पति ॥६२॥ पतीसारिखे मुखकमळ । नयन सुंदर अति कोमळ । ध्वनि बोलता ज्याची मंजुळ । अति गंभीर बोलतसे ॥६३॥ मृदु वाणी पतीसरसी । तैसाची बोले तो हर्षी । धरिता माझिया करासी । अति मृदु लागले ॥६४॥ माझे पतीचे लक्षण । मी जाणे सर्व खूण । हाचि होय माझा प्राण । समस्त चिन्हे असती ॥६५॥ यास देखोनि नयनी । धारा सुटल्या प्रेमे जीवनी । नवलपरी विचारूनी । मागुती अनुमान करीत ॥६६॥ दैवहीन असे आपण । कैसा पति येईल म्हणोन । बुडाला नदीत जाऊन । मागुती कैसी भ्रांति म्हणे ॥६७॥ मेला पति मागुती येता । ऐशी न ऐकिली कानी कथा । स्वप्न देखिले की भ्रांता । काय कळते माझे मना ॥६८॥ धूर्त होय की वेषधारा । राक्षस यक्ष किंवा किन्नरी । कपटे प्रगटला नदीतीरी । म्हणोनि कल्पना करीतसे ॥६९॥ किंवा पावला शिवव्रते । की धाडिला गिरिजानाथे । संकट जाणोनि आमुच्या येथे । मैत्रेयीकारणे धाडिला ॥२७०॥ ज्यास प्रसन्न शंकर । त्यास कैचा दुःखविकार । चिंतिले पाहिजे निर्धारे । ऐसे चिंती सीमंतिनी ॥७१॥ ऐसे होता राजकुमार । आरूढला वारूवर । निरोप मागे प्रीतिकर । सीमंतिनी नारीसी ॥७२॥ निघाला अश्व मनोवेगे । पातला नगरा अतिशीघ्रे । वासुकीपुत्र होता संगे । तया पाठवी नगरांत ॥७३॥ त्वा जावोनि वैरियांसी । इष्टती सांगा वादीयासी । न ऐकता तव बोलासी । संहारीन बोलावे ॥७४॥ ऐसे वचन ऐकोनि । त्वरित पावला राजभुवनी । उभा राहोनि कठोर वचनी । बोलतसे नगराधिपतीसी ॥७५॥ चला शीघ्र कुटुंबेसी । चंद्रांगदाचे भेटीसी । तक्षकाचे दर्शनासी । गेला होता पाताळी ॥७६॥ कालिंदीये नदीत । बुडाला हे ऐकोनिया मात । तुम्ही केला स्वामीघात । राज्य घेतले इंद्रसेनाचे ॥७७॥ आता सांगेन तुम्हांसी । चाड असे जरी प्राणासी । शरण जावे तयासी । इंद्रसेना स्थापोनी ॥७८॥ तक्षकासारखा मैत्र जोडला । दिधले नवनागसहस्त्रबळा । शीघ्र लागा चरणकमळा । चंद्रांगदाचे जाऊनी ॥७९॥ न ऐकाल माझ्या वचना । तरी आताचि घेतो प्राणा । तक्षके पाठविले आपणा । पारिपत्याकारणे हो ॥२८०॥ ऐसे वचन ऐकोनी । शत्रु भयाभीत मनी । हीन बुद्धि केली जाणोनी । आता शरण रिघावे ॥८१॥ जरी करू बलात्कार । तक्षक करील संहार । लोकात होई निंदा फार । प्राण जाईल आपुला ॥८२॥ ऐसे विचारूनि मानसी । बाहेर आणिती इंद्रसेनासी । नाना वस्त्रे आभरणेसी । सिंहासनी बैसविला ॥८३॥ सकळ विनविती त्यासी । अपराध घडला आम्हांसी । प्राण राखा वेगेसी । म्हणोनि चरणी लागले ॥८४॥ राया इंद्रसेनासी । तक्षकपुत्र सांगे त्यासी । तुमचा पुत्र आला परियेसी । वासुकी भेटी गेला होता ॥८५॥ ऐकोनि राव संतोषी त्यासी । आठवोनि अधिक दुःखासी । मूर्छा येवोनि धरणीसी । पत्‍नीसहित पडियेला ॥८५॥ नागकुमरे उठविले त्यासी । दुःख कासया करावे हर्षी । येईल पुत्र भेटीसी । त्वरे करोनि आतांची ॥८६॥ मग राव अतिहर्षी । बोलावित मंत्रियांसी । नगर श्रृंगारावयासी । निरोप दिधला तये वेळी ॥८७॥ ऐसा निरोप देऊन । भेटी निघाला आपण । सकळ दायाद स्वजन । राणीवसा आदिकरूनि ॥८९॥ मंत्रीपुरोहितासहित । निघाले लोक समस्त । कौतुक पाहो म्हणत । मेला पुत्र कैसा आला ॥२९०॥ आनंद झाला सकळिका । राव मानि महाहरिखा । पाहीन म्हणे पुत्रमुखा । अति आवडीने अवधारा ॥९१॥ सवे वाजंत्र्यांचे गजर । नगरलोका संतोष थोर । करिताती जयजयकार अति उल्हास करिताती ॥९२॥ ऐसे जाऊनि पुत्रासी । भेटी झाली रायासी । चंद्रांगद पितयासी । नमस्कारी साष्टांगे ॥९३॥ अति प्रेमे पुत्रासी । आलिंगी राव त्वरेसी । सद्गदित कंठेसी । नेत्री सुटल्या अश्रुधारा ॥९४॥ पुत्रासी म्हणे इंद्रसेन । आलासी बाळा माझा प्राण । श्रमलो होतो तुजविण । म्हणोनि सांगे दुःख आपुले ॥९५॥ मातेते आलिंगोन । दुःख करी ती अतिगहन । विनवीत तिये संबोखोन । मजनिमित्त कष्टलिसी ॥९६॥ पुत्र नव्हे मी तुमचा शत्रु । जाऊनि आपुले सुखार्थु । तुम्हा दुखविले की बहुतु । नेदीच सुख तुम्हाते ॥९७॥ आपण जावोनि पाताळी । राहिलो सुखे शेषाजवळी । तुम्ही कष्टलीत बहुतकाळी । मजनिमित्त अहोरात्र ॥९८॥ काष्ठासरी अंतःकरण । माझे असे की सत्य जाण । माताजीव जैसे मेण । पुत्रानिमित्त कष्ट बहुत ॥९९॥ मातापितयांचे दुःख । जो नेणे तोचि शतमूर्ख । उत्तीर्ण व्हावया अशक्य । स्तनपान एक घडीचे ॥३००॥ मातेवीण देव देखा । पुत्रासि नाही विशेखा । कवण उत्तीर्ण नव्हे ऐका । माता केवळ मृडानी ॥१॥ दुःख देत जननीसी । तो जाय यमपुरासी । पुत्र नव्हे त्याचे वंशी । सप्तजन्मी दरिद्री ॥२॥ ऐसे मातेसि विनवूनी । भेटतसे तो भाऊबहिणी । इष्ट सोयरे अखिल जनी । प्रधानासमवेत नागरिका ॥३॥ इतुकिया अवसरी । प्रवेश केला नगराभीतरी । समारंभ केला अति थोरी । पावले निजमंदिरा ॥४॥ तक्षकाचे पुत्रासी । गौरविले सन्मानेसी । वस्त्रे भूषणे रत्‍नेसी । इंद्रसेने अतिप्रीती ॥५॥ चंद्रांगद सांगे पितयासी । तक्षक उपकार विस्तारेसी । प्राण वाचविला आम्हासी । द्रव्य दिधले अपार ॥६॥ सुंदर वस्त्रे आभरणे । दिधली होती तक्षकाने । पिता देखोनि संतोषाने । म्हणे धन्य तक्षक ॥७॥ निरोप दिधला नागपुत्रासी । बोळविले तयासी । भृत्य पाठविले वेगेसी । चित्रवर्म्याचे नगरात ॥८॥ राव म्हणे तये वेळी । सून माझी दैवे आगळी । तिचे धर्मै वाचला बळी । पुत्र माझा अवधारा ॥९॥ तिणे आराधिला शंकर । तेणे कंकण चुडे स्थिर । तेणे वाचला माझा कुमर । सौभाग्यवती सून माझी ॥३१०॥ म्हणोनि पाठविले वेगेसी । लिहोनिया वर्तमानासी । चित्रवर्मरायासी । इंद्रसेन रायाने ॥११॥ हेर निघाले सत्वरी । चित्रवर्म्याचिये नगरी । व्यवस्था सांगितली कुसरी । चंद्रांगदशुभवार्ता ॥१२॥ संतोषे राजा ऐकोनि देखा । करिता झाला महासुखा । दाने दिधली अपार ऐका । रत्‍ने भूषणे हेरांसी ॥१३॥ इंद्रसेन राजा सत्वर । पुनरपि करावया वर्‍हाड थोर । चंद्रांगद बडिवार । सेना घेवूनि निघाला ॥१४॥ महोत्साह झाला थोर । वर्‍हाड केले धुरंधर । चंद्रांगद प्रीतिकर । सीमंतिनीसी भेटला ॥१५॥ पाताळींची अमोल्य वस्तु । प्राणेश्वरीसी अर्पित । पाजिता झाला अमृत । महानंद प्रवर्तला ॥१६॥ कल्पवृक्षफळ देखा । देवोनि तोषविला नायका । अमोल्य वस्त्राभरणी देखा । दश योजने तेज फाके ॥१७॥ ऐसा उत्साह विवाह केला । आपुले पुरीसी निघाला । सीमंतिनीचे वैभवाला । जोडा नसे त्रिभुवनी ॥१८॥ मग जावोनि नगरासी । राज्यी स्थापिला पुत्रासी । दहा सहस्त्र पूर्ण वर्षी । राज्य केले चद्रांगदे ॥१९॥ सीमंतिनी करी व्रतासी । उपवास सोमवारासी । पूजिले गौरीहरासी । म्हणोनि पावली इष्टार्थ ॥३२०॥ ऐसे विचित्र असे व्रत । म्हणोनि सांगे श्रीगुरुनाथ । ऐक सुवासिनी म्हणत । अति प्रीती निरूपिले ॥२१॥ ऐसे करी वो आता व्रत । चुडे कंकणे अखंडित । कन्या पुत्र होती बहुत । आमुचे वाक्य अवधारी ॥२२॥ दंपत्य विनवी श्रीगुरूसी । तुमची चरणसेवा आम्हांसी । पुरविती मनोरथासी । आम्हा व्रत कायसे ॥२३॥ आमचा तू प्राणनायक । तुजवाचोनि नेणो आणिक । तव स्मरणमात्रे असे निक । म्हणोनि चरणी लागली ॥२४॥ श्रीगुरु म्हणती तयासी । आमुचे निरोपे करा ऐसी । व्रत आचरा सोमवारासी । तेचि सेवा आम्हा पावे ॥२५॥ निरोप घेऊनि श्रीगुरूचा । नेम धरिला सोमवाराचा । भेटीलागी तयाच्या । मातापिता पावली ॥२६॥ ऐकोनिया कन्यापुत्रवार्ता । संतोषली त्याची माता । द्रव्य वेचिले अपरिमिता । समाराधना ब्राह्मणांसी ॥२७॥ पूजा करिती श्रीगुरूसी । आनंद अति मानसी । समारंभ दिवानिशी । बहुत करिती भक्तीने ॥२८॥ ऐशापरी वंदोनी । श्रीगुरूचा निरोप घेउनी । गेली ग्रामा परतोनी । ख्याती झाली चहू राष्ट्री ॥२९॥ पुढे त्या दंपतीसी । पाच पुत्र शतायुषी । झाले आशीर्वादेसी । श्रीगुरूरायाच्या ॥३३०॥ प्रतिवर्षी दर्शनासी । दंपती येती भक्तीसी । ऐसे शिष्य परियेसी । श्रीगुरूचे माहात्म्य ॥३१॥ ऐसे श्रीगुरुचरित्र । सिद्ध सांगे पवित्र । नामधारक अतिप्रीती । ऐकतसे अवधारा ॥३२॥ गंगाधराचा कुमर । सरस्वती विनवी गुरुकिंकर । स्वामी माझा पारंपार । श्रीनृसिंहसरस्वती ॥३३॥ ऐसा वरदमूर्ति देखा । सकळ जन तुम्ही ऐका । प्रसन्न होईल तात्काळिका । न धरावा संदेह मानसी ॥३४॥ साखर स्वादु म्हणावयासी । उपमा द्यावी कायसी । मनगटीचे कंकणासी । आरसा कासया पाहिजे ॥३५॥ प्रत्यक्ष पाहता दृष्टान्तेसी । प्रमाण कासया परियेसी ।ख्याती असे भूमंडळासी । कीर्ति श्रीगुरुयतीची ॥३६॥ ऐका हो जन समस्त । सांगतो मी उत्तम होत । सेवा करिता श्रीगुरुनाथ । त्वरित होय मनकामना ॥३७॥ अमृताची आरवटी । घातली असे गोमटी । पान करा हो तुम्ही घोटी । धणीवरी सकळिक ॥३८॥ श्रीगुरुचरित्र कामधेनु । ऐकता होय पतित पावनु । नाम ज्याचे कामधेनु । तो चिंतिले पुरवित ॥३९॥ इति श्रीगुरुचरित्रामृत । सीमंतिनी आख्यान विख्यात । पंचत्रिशत्‍ अध्यायात । कथासार सांगितली ॥३४०॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे सीमंतिन्याख्यानं नाम पंचत्रिंशोऽध्यायः । श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ -------------------------------------------------------------------- अध्याय ३६ श्रीगणेशाय नमः । शिष्योत्तम नामकरणी । लागे सिद्धाचे चरणी । विनवीतसे कर जोडोनि । भक्तिभावे करूनिया ॥१॥ जय जयाजी सिद्ध मुनि । तूचि तारक भवार्णी । तूचि होसी ब्रह्मज्ञानी । अविद्यातिमिरभास्कर ॥२॥ मायामोहरजनीत । होतो आपण निद्रिस्त । कृपासागर श्रीगुरुनाथ । जागृत केले आम्हांसी ॥३॥ तिमिरहरण भास्करु । मज भेटलासी गुरु । कडे केले भवसागरु । चिन्मयात्मा सिद्ध मुनि ॥४॥ ऐसे म्हणोनि सिद्धासी । विनवी भावभक्तीसी । गुरुमूर्ति संतोषी । अभयकर देतसे ॥५॥ पुढे चरित्र केवी झाले । विस्तारावे स्वामी वहिले । आमुते स्वामी कृतार्थ केले । ज्ञानामृत प्राशवून ॥६॥ कथामृत ऐकता श्रवणी । तृप्ति न होय अंतःकरणी । निरोपावे विस्तारोनि म्हणोनि चरणी लागला ॥७॥ सिद्ध म्हणे नामधारका । पुढील कथा झाली निका । एकचित्ते तुम्ही ऐका । ज्ञान होय समस्तांसी ॥८॥ गाणगापुरी असता श्रीगुरु । महिमा वाढली अपरंपारु । बोलता असे विस्तारु । तावन्मात्र सांगतसो ॥९॥ महिमा एकेक सांगता । विस्तार होईल बहु कथा । अवतार श्रीहरी साक्षाता । कवण शके वर्णावया ॥१०॥ तया गाणगापुरात । होता विप्र वेदरत । विरक्त असे बहुश्रुत । कर्ममार्गे वर्ततसे ॥११॥ न घेतला प्रतिग्रह त्याणे । परान्नासी न वचे नेणे । मिथ्या वाचे नेणे । अनुवाद आपण न करीच ॥१२॥ नित्य शुष्क भिक्षा करी । तेणे आपुले उदर भरी । तयाची नारी असे घरी । क्रोधवंत परियेसा ॥१३॥ याचकवृत्ति तो ब्राह्मण । कंठी संसार सामान्यपणे । अतीत- अभ्यागताविणे । न घेई अन्न प्रत्यही ॥१४॥ तया ग्रामी प्रतिदिवसी । विप्र येती समाराधनेसी । सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी । मिष्टान्न घालिती परियेसा ॥१५॥ समस्त जावोनि भोजन करिती । तया विप्रवनितेप्रती । येऊनि गृही स्तुति करिती । अनेक परीची पक्वान्ने ॥१६॥ ऐकोनि तया विप्रनारी । नानापरी दुःख करी । परमेश्वरा श्रीहरी । म्हणोनि चिंती मनात ॥१७॥ कैसे दैव आपुले हीन । नेणे स्वप्नी ऐसे अन्न । दरिद्री पतीसी वरून । सदा कष्ट भोगितसे ॥१८॥ पूर्वजन्मीचे आराधन । तैसा आपणासी पति हीन । सदा पाहे दरिद्रपण । वर्ततसो देवराया ॥१९॥ समस्त विप्र स्त्रियांसहित । नित्य परान्नभोजन करीत । पूर्वजन्मीचे सुकृत । केले होते समस्ती ॥२०॥ आपुला पति दैवहीन । कदा नेणे परान्नभोजन । काय करावे नारायण । म्हणोनि चिंती मनात ॥२१॥ वर्तता ऐसे तया स्थानी । आला विप्र महाधनी । अपरपक्ष करणे मनी । म्हणोनि आला परियेसी ॥२२॥ तया स्थानी विप्रासी । क्षण दिले परियेसी । सवे त्यांच्या स्त्रियांसी । आवंतिले तिही परियेसा ॥२३॥ देखोनि ते विप्रवनिता । पतीजवळी आली त्वरिता । सांगती झाली विस्तारता । आमंत्रण ब्राह्मणाचे ॥२४॥ अनेक परीची पक्वान्ने । देताती वस्त्रे परिधाने । अपार दक्षिणाद्रव्यदाने । देताती ऐके प्राणेश्वरा ॥२५॥ याते स्वामी अंगीकारणे । अथवा आपण निरोप देणे । कांक्षा करिते माझे मन । अपूर्व अन्न जेवावे ॥२६॥ ऐकोनि तियेचे वचन । निरोप देत ब्राह्मण । सुखे जावे करी भोजन । आपणा न घडे म्हणतसे ॥२७॥ निरोप घेउनी तये वेळी । गेली तया गृहस्थाजवळी । आपण येऊ भोजनकाळी । म्हणोनि पुसे तयासी ॥२८॥ विप्र म्हणे तियेसी । आम्ही सांगू दंपतीसी । बोलावी आपुल्या पतीसी । तरीच आमुच्या गृहा यावे ॥२९॥ ऐकोनि तयाचे वचन । झाली नारी खेदे खिन्न । विचार करी आपुले मन । काय करावे म्हणोनिया ॥३०॥ म्हणे आता काय करणे । कैसे दैव आपुले उणे । बरवे अन्न स्वप्नी नेणे । पतीकरिता आपणासी ॥३१॥ विचारोनि मानसी । आली नृसिंहगुरूपासी । नमन करी साष्टांगेसी । अनेकापरी विनवीतसे ॥३२॥ म्हणे स्वामी काय करणे । बरवे अन्न कधी नेणे । आपुले पतीसी सांगणे । आवंतणे बरवे येतसे ॥३३॥ सांगू म्हणती दंपतीसी । माझा पति नायके वचनासी । न वचे कधी परान्नासी । काय करू म्हणतसे ॥३४॥ स्वामी आता कृपा करणे । माझ्या पतीते सांगणे । बरवी येताती आमंत्रणे । अन्नवस्त्र देताती ॥३५॥ ऐकोनि तियेचे वचन । श्रीगुरुमूर्ति हास्यवदन । बोलावूनिया तत्क्षण । सांगती तया द्विजासी ॥३६॥ श्रीगुरु म्हणती तयासी । जावे तुम्ही आवंतणेसी । तुझे स्त्रियेचे मानसी । असे मिष्टान्न जेवावे ॥३७॥ तिचे मनींची वासना जाण । तुवा पुरवावी कारण । सदा दुश्चित अंतःकरण । कुलस्त्रियेचे असो नये ॥३८॥ ऐकोनि श्रीगुरूचे वचन । नमन करी तो ब्राह्मण । विनवीतसे कर जोडून । परान्न आपणा नेम असे ॥३९॥ गुरुवचन जो न करी । तोचि पडे रौरवघोरी । निरोप तुमचा माझ्या शिरी । जाईन त्वरित म्हणतसे ॥४०॥ पुसोनिया श्रीगुरूसी । आले दंपत्य आवंतणेसी । आनंद झाला बहुवसी । तया विप्रस्त्रियेते ॥४१॥ पितृनाम उच्चारोन । संकल्प करी तो ब्राह्मण । अनेक परीचे मिष्टान्न । वाढिती तया दंपतीसी ॥४२॥ भोजन करिता समयासी । दिसे विपरीत तियेसी । श्वान सूकर येउनी हर्षी । समागमे जेविताती ॥४३॥ कंटाळले तिचे मन । उठली आपण त्यजुनी अन्न । जे जेवीत होते ब्राह्मण । तया समस्तांसी सांगतसे ॥४४॥ ऐसेपरी पतीसहित । आली नारी चिंताक्रांत । पतीस सांगे वृत्तान्त । श्वानउच्छिष्ट जेविलेती ॥४५॥ स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण । तुझे नि आपुले दैव हीन । घडले आपणासी परान्न । उच्छिष्ट श्वानसूकरांचे ॥४६॥ ऐसे म्हणोनि स्त्रियेसी । आली दोघे श्रीगुरुपासी । नमन केले परियेसी । ऐका श्रोते एकचित्ते ॥४७॥ श्रीगुरु म्हणती तियेसी । कैसे सुख परान्नासी । सदा दुखविसी पतीसी । पुरले तुझे मनोरथ ॥४८॥ ऐसे वचन ऐकोनि । लागे नारी श्रीगुरुचरणी । विनवीतसे कर जोडूनि । क्षमा करणे स्वामिया ॥४९॥ मंदमति आपणासी । दोष घडविले पतीसी । नेले आपण परान्नासी । क्षमा करणे स्वामिया ॥५०॥ चिंता करी द्विजवरू । म्हणे स्वामी काय करू । दोष घडला अपारू । व्रतभंग झाला म्हणोनि ॥५१॥ परान्न न घ्यावे म्हणोनि । संकल्प होता माझे मनी । मिळाली सती वैरिणी । दोष आपणा घडविला ॥५२॥ ऐकोनि तयाचे वचन । श्रीगुरु म्हणती हासोन । पुरविली स्त्रियेची वासना । आता तिचे मन धाले ॥५३॥ कधी न वचे परान्नासी । वर्तेल तुझ्या वाक्यासरसी । न करी चिंता मानसी । दोष तुज नाही जाण ॥५४॥ आणिक एक सांगे तुज । जेणे धर्म घडती सहज । अडला असेल एखादा द्विज । देवपितृकर्माविणे ॥५५॥ कोणी न मिळती विप्र त्यासी । जावे तेथे भोजनासी । जरी तेथे तू न जासी । अनंत दोष असे जाण ॥५६॥ श्रीगुरूचे वचन ऐकोन । साष्टांगी करी नमन । विनवीतसे कर जोडून । विनंति माझी परियेसा ॥५७॥ अन्न घ्यावे कवणा घरी । घडतील दोष कवणेपरी । जाऊ नये कवणा घरी । निरोपावे स्वामिया ॥५८॥ विप्रवचन ऐकोन । श्रीगुरु सांगती विस्तारोन । सावधान करून मन । ऐका श्रोते सकळिक ॥५९॥ श्रीगुरु म्हणती विप्रासी । अन्न घ्यावया घरे पुससी । गुरुभुवनादिकी हर्षी । जेवावे शिष्यवर्गा घरी ॥६०॥ वैदिकादि विद्वज्जन । मातुळ आपुला श्वशुर जाण । सहोदरादि साधुजन । तया घरि जेवावे ॥६१॥ अडला विप्र ब्राह्मणाविण । त्याचे घरी घ्यावे अन्न । करावे गायत्रीजपन । दोष जाती अवधारा ॥६२॥ विप्र म्हणे श्रीगुरूसी । विनंत माझी परियेसी । निषिद्ध अन्न आम्हासी । कवण्या घरी जेवू नये ॥६३॥ श्रीगुरु सांगती ब्राह्मणासी । अन्नवर्जित घरे ऐसी । अपार असे स्मृति चंद्रिकेसी । ऋषिसंमते सांगेन ॥६४॥ नित्य मातापितयांसी । सेवा घेती अतिदोषी । जाऊ नये तया घरांसी । धनलोभिष्ठ द्विजांघरी ॥६५॥ कलत्र पुत्र कष्टवोनि । धर्म करी विप्रालागोनि । अन्ननिषेध तया भुवनी । दोष घडती जेविल्या ॥६६॥ गर्विष्ठ चित्रक शस्त्रधारी । विप्र जाण मल्लयुद्ध करी । वीणा वाद्य ज्याचे घरी । न घ्यावे अन्न ब्राह्मणाने ॥६७॥ बहिष्कारी विप्राघरी । याचकवृत्तीने उदर भरी । अन्न वर्जावे तया घरी । आत्मस्तुति परनिंदक ॥६८॥ बहुजन एक अन्न करिती । पृथक्‌ वैश्वदेव न करिती । वर्जावी अन्ने विप्रजाती । महादोष बोलिजे ॥६९॥ गुरु म्हणोनि समस्तांसी । आपण मंत्र उपदेशी । शिष्य रहाटे दुर्वृत्तींसी । त्या गुरुघरी जेवू नये ॥७०॥ क्रोधवंत ब्राह्मण असे । अन्न न घ्यावे त्या गृही ऐसे । स्त्रियेसी वर्जिता पुरुष असे । जेवू नये तया घरी ॥७१॥ धनगर्वी तामसाघरी । कृपण निर्द्रव्य व्यभिचारी । दांभिक दुराचारी विप्राघरी । अन्न तुम्ही वर्जावे ॥७२॥ पुत्रा पतीते सोडोनि । वेगळी असे जे ब्राह्मणी । वर्जावे अन्न साधुजनी । महादोष बोलिजे ॥७३॥ स्त्रीजित असे एखादा जरी । विप्र सुवर्णाकार करी । सदा बहु याचक जरी । तया घरी न जेवावे ॥७४॥ खळ राजसेवकाघरी । लोह काष्ठ छेदन करी । वस्त्रधुत्या रजकाघरी । दान विप्रे घेऊ नये ॥७५॥ मद्यपान नराघरी । याचने उदरपूर्ति करी । वेश्मी सहजार असे नारी । दान विप्रे न घ्यावे ॥७६॥ तस्करविद्या असे ज्यासी । द्वारपाळकाघरी परियेसी । न घ्यावे अन्न कुटिलासी । महादोष बोलिजे ॥७७॥ द्रव्य घेउनी शूद्राकरी । अध्ययन सांगे द्विजवरी । अन्न वर्जावे तया घरी । घोडी विकी जो ब्राह्मण ॥७८॥ भागवतकीर्तन नाही घरी । द्यूतकर्मी अतिनिष्ठुरी । स्नानावीण भोजन करी । तया घरी जेवू नये ॥७९॥ न करी संध्या सायंकाळी । दान न करी कदा काळी । पितृकर्म वर्जिता कुळी । तया घरी न जेवावे ॥८०॥ दंभार्थाने जो जप करी । अथवा कापट्यरूपे जरी । द्रव्य घेवोनि जप करी । तया घरी जेवू नये ॥८१॥ ऋण देऊन एखाद्यासी । उपकार दावी परियेसी । द्रव्य सांची कलत्रेसी । तया घरी जेवू नये ॥८२॥ विश्वासघातकी नराघरी । अनीति पक्षपात करी । स्वधर्म सांडी दुराचारी । पूर्वजमार्ग सोडिल्या घरी ॥८३॥ विद्वज्जन ब्राह्मण साधूसी । एखादा करी अति द्वेषी । अन्न वर्जावे तुम्ही हर्षी । तया घरी जेवू नये ॥८४॥ कुळदैवत माता पिता । सोडोनि जाय जो परता । आपुलाले गुरूसी निंदिता । जेवू नये तया घरी ॥८५॥ गोब्राह्मणवध करी । स्त्रीवधु नर असे जरी । अन्न घेता दोष भारी । श्रीगुरु म्हणती विप्रासी ॥८६॥ आशाबद्ध सदा नरु । धरूनि राहे एका द्वारु । दान देता वर्जी जरु । जेवू नये तया घरी ॥८७॥ समस्त जातीस करी शरण । तोचि चांडाळ होय जाण । घेऊ नये त्याचे अन्न । नमन न करी विप्रासी ॥८८॥ आपुल्या कन्याजामातेसी । क्रोधे करून सदा दूषी । न घ्यावे अन्न त्या घरासी । निपुत्राचे घरी देखा ॥८९॥ पंचमहायज्ञ करी आपण । जेवी आणिकाचे घरी अन्न । परपाक करी तया नाम जाण । तया घरी जेवू नये ॥९०॥ विवाह झाला असता आपण । पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण । स्थालीपाकनिवृत्ति नव जाणे । न जेवावे तया घरी ॥९१॥ घरचे अन्न दूषण करी । परान्नाची स्तुति करी । अन्न वर्जावे तया घरी । श्वपच नाम तयाचे ॥९२॥ भाणसपणे उदर भरी । अन्न घेता तया घरी । डोळे जाती अवधारी । आंधळा होय अल्पायुषी ॥९३॥ बधिर होय शरीरहीन । स्मृतिमेघा जाय जाण । धृतिशक्ति जाय जाण । माणसाचे घरी जेवू नये ॥९४॥ गृहस्थधर्मे असे आपण । दानधर्म न करी जाण । अद्वैतशास्त्र बोलू जाणे । तया घरी जेवू नये ॥९५॥ परगृही वास आपण । परान्न जेवी जो ब्राह्मण । त्याचे जितुके असे पुण्य । यजमानासी जाय देखा ॥९६॥ तया यजमानाचे दोष । लागती त्वरित भोजनस्पर्श । त्याचिकारणे निषिद्ध असे । परान्न तुम्ही वर्जावे ॥९७॥ भूदान गोदान सुवर्णदान । गजवाजीरत्‍नदान । घेता नाही महादूषण । अन्नदाना अतिदोष असे ॥९८॥ समस्त दुष्कृत परान्नासी । घडती देखा ब्राह्मणासी । तैसेचि जाणा परस्त्रियेसी । संग केलिया नरक होय ॥९९॥ परगृही वास करिता । जाय आपुली लक्ष्मी त्वरिता । अमावास्येसी परान्न जेविता । मासपुण्य जाय देखा ॥१००॥ अगत्य जाणे परान्नासी । न बोलाविता जाय संतोषी । जाता होती महादोषी । शूद्रे बोलाविता जाऊ नये ॥१॥ आपुल्या कन्येच्या घरासी । जाऊ नये भोजनासी । पुत्र झालिया कन्येसी । सुखे जावे अवधारा ॥२॥ सूर्यचंद्रग्रहणेसी । दान घेऊ नये परियेसी । जात अथवा मृतसूतकेसी । जाऊ नये परियेसा ॥३॥ ब्राह्मणपणाचा आचार । कवण रहाटे द्विजवर । तैसे जरी करिती नर । त्यासी कैचे दैन्य असे ॥४॥ समस्त देव त्याचे होती । अष्ट महासिद्धि साधती । ब्राह्मणकर्मै आचरती । कामधेनु तया घरी ॥५॥ विप्र मदांधे व्यापिले । आचारकर्मे सांडिले । याचिकारणे दरिद्री झाले । स्वधर्म नष्ट होऊनिया ॥६॥ विप्र विनवी स्वामीसी । आमुची विनंति परियेसी । सकळ आचारधर्मासी । निरोपावे दातारा ॥७॥ श्रीगुरुमूर्ति कृपासागरु । त्रिमूर्तीच्या अवतारु । भक्तजनांच्या आधारु । निरोपावे आचार ब्राह्मणाचे ॥८॥ श्रीगुरु म्हणती तयासी । ब्राह्मणाचा आचार पुससी । सांगेन ऐक विस्तारेसी । पूर्वी ऋषि आचरले जे ॥९॥ नैमिषारण्यी समस्त ऋषि । तप करिती बहु दिवसी । आला पराशर ऋषि । म्हणोनि समस्त वंदिती ॥११०॥ समस्त ऋषि मिळोन । विनविताती कर जोडून । ब्राह्मणाचे आचरण । केवी करावे म्हणती ते ॥११॥ आता आम्ही आचार करितो । तेणे संशय मनी येतो । ब्रह्मऋषि तुम्ही म्हणूनि पुसतो । तुमचा उपदेश आम्हा व्हावा ॥१२॥ गुरुमुखेवीण मंत्र । ग्राह्य नव्हे हो पवित्र । तैसा श्रीगुरु तू सत्पात्र । आचार आम्हा सांगावे ॥१३॥ पराशर म्हणे ऋषींसी । सांगेन आचार तुम्हासी । जेणे होय अप्रयासी । सर्व सिद्धि पावती ॥१४॥ ब्राह्ममुहूर्ती उठोनि । श्रीगुरुस्मरण करोनि । मग ध्याव्या मूर्ति तिन्ही । ब्रह्माविष्णुमहेश्वर ॥१५॥ मग स्मरावे नवग्रह । सूर्यादि केतूसह । सनत्कुमार-सनक-सनंदन-सह । स्मरावे तये वेळी ॥१६॥ सह-नारद तुंबरु देखा । स्मरावे सिद्ध योगी देखा । सप्त समुद्र असती जे का । स्मरावे सप्त पितृदेवता ॥१७॥ सप्त ऋषीते स्मरोनि । सप्त द्वीपे सप्त भुवनी । समस्त नामे घेऊनि । ऐसे म्हणावे प्रातःस्मरण ॥१८॥ मग उठावे शयनस्थानी । आचमन करोनि दोनी । लघुशंकेसी जाऊनि । शौचाचमन करावे ॥१९॥ पराशर म्हणे ऋषींसी । ऐका आचमनविधीसी । सांगतसे विस्तारेसी । जे जे समयी करणे ऐका ॥१२०॥ स्नानापूर्वी अपर दोनी । उदक प्राशिता येणेचि गुणी । निजता उठता समयी दोनी । आचमने करावी ॥२१॥ अधोवायुशब्द झालिया । वोखटे दृष्टी देखिलिया । दोन्ही वेळा आचमूनिया । शुचि व्हावे परियेसा ॥२२॥ भोजनापूर्वी अपर दोनी । जांभई आलिया शिंकलिया दोनी । लघुशंकाशौची दोनी । आचमन करावे ॥२३॥ जवळी उदक नसेल जरी । श्रोत्राचमन करा निर्धारी । स्पर्श करावा अक्ष श्रोत्री । येणे पवित्र परियेसा ॥२४॥ ब्राह्मणाचे उजवे कानी । सप्त देवता असती निर्गुणी । त्यासी स्पर्शिता तत्क्षणी । आचमनफळ असे देखा ॥२५॥ श्लोक । अग्निरापश्च चंद्रश्च वरुणार्कैद्रवायवः । विप्रस्य दक्षिणे कर्णे नित्यं तिष्ठन्ति देवताः ॥२६॥ टीका । त्या देवतांची नावे ऐका । सांगेन ऋषि सकळिका । अग्नि आप वरुणार्का । वायु इंद्र चंद्र असती ॥२७॥ लघुशंकाचमन करोनि । तूष्णीम स्नान करा सुमनी । बैसावे शुचि आसनी । अरुणोदय होय तव ॥२८॥ गायत्रीमंत्रजपाव्यतिरिक्त । वरकड जपावे पवित्र । प्रगट होता अरुणोदित । बहिर्भूमीसी जाईजे ॥२९॥ यज्ञोपवीत कानी ठेवोनि । डोईल पालव घालूनि । नैऋत्य दिशे जाऊनि । अधोमुखी बैसावे ॥१३०॥ दिवसा बसावे उत्तरमुखी । रात्री बैसावे दक्षिणमुखी । मौन असावे विवेकी । चहूकडे पाहू नये ॥३१॥ सूर्यचंद्रनक्षत्रांसी । पाहू नये नदी-आकाशी । स्त्रीजन लोक परियेसी । पाहू नये कवणाते ॥३२॥ शौचाविणे कांस घाली । कांस न काढी लघुशंकाकाळी । त्यासी होय यमपुरी अढळी । नरक भोगी अवधारा ॥३३॥ अगत्य घडे उदकावीण । करूनिया गंगास्मरण । मृत्तिकेने शौच करणे । भक्षणादि वर्जावे ॥३४॥ बर्हिर्भूमि जावयासी । ठाऊ कैसा परियेसी । ऐका समस्त तत्परेसी । म्हणे पराशर सर्वाते ॥३५॥ न बैसावे भूमीवरी । बैसिजे पानगवतावरी । हिरवी पर्णे करावी दुरी । वाळल्या पानी बैसावे ॥३६॥ जे ब्राह्मण उभ्या मुतती । त्यांसी ऐका कवण गति । त्यांचे रोमे अंगी किती । तावत्काळ वर्षे नरकी पडती ॥३७॥ मळविसर्जन करूनि । उठावे हाती शिश्न धरूनि । जळपात्रापासी जाऊनि । शौच करावे परियेसा ॥३८॥ मृत्तिकाशौच करावयासी । मृत्तिका आणावी तुम्ही ऐसी । वारुळ मूषकगृह परियेसी । नदीमधील आणु नये ॥३९॥ ज्या मार्गी लोक चालती । अथवा वृक्षाखालील माती । देवालय क्षेत्रतीर्थी । मृत्तिका आपण वर्जावी ॥१४०॥ वापी कूप तडागात । मृत्तिका आणिता पुण्य बहुत । उदक करी घेऊनि प्रोक्षित । मृत्तिका घ्यावी शौचासी ॥४१॥ आवळ्याएवढे गोळे करावे । लिंगस्थानी एक लावावे । अपानद्वारी पाच स्वभावे । एकैका हस्तासी तीन सप्ते ॥४२॥ एकैक पायासी सात वेळ । मृत्तिका लावावी सकळ । आणिक सांगेन समय केवळ । ऋषि समस्त परियेसा ॥४३॥ या मृत्तिका शौचविधान । मूत्रशंकेसी एक गुण । बहुर्भूमीसी द्विगुण । मैथुनाअंती त्रिगुण देखा ॥४४॥ आणिक प्रकार असे देखा । करावे येणेप्रमाणे ऐका । जितुके करणे गृहस्थ लोका । द्विगुण करावे ब्रह्मचारी ॥४५॥ त्रिगुण करावे वानप्रस्थे । चतुर्गुण करावे यती समस्ते । न्यून पूर्ण करावे यापरते । धर्मसिद्धि होय देखा ॥४६॥ येणे प्रकारे करा दिवसी । रात्री याच्या अर्धैसी । संकटसमयी या अर्धैसी । मार्गस्थे अर्ध त्याहुनी ॥४७॥ व्रतबंध झालिया ब्राह्मणासी । हाच आचार परियेसी । हाचि उपदेश चहू वर्णासी । शौचविधि बोलिला ॥४८॥ शौच केलियानंतरी । चूळ भरावे परिकरी । ब्राह्मणे आठ भरी । क्षत्रिये सहा परियेसा ॥४९॥ वैश्ये चार शूद्रे दोनी वेळ । येणे विधि भरा चूळ । अधिक न करावे केवळ । म्हणे पराशर ऋषि ॥१५०॥ चूळ भरावे आठ वेळा । आचमावे तीन वेळा । शुचिस्थानी बैसून निर्मळा । कुळदेवता स्मरावी ॥५१॥ तूष्णीम्‍ आचमन करावे । नाम घेता चोवीस ठावे । आतळावे पुनः आचमावे । त्याचा विधी सांगेन ॥५२॥ विप्रदक्षिणतळहाती । पाच तीर्थे विख्यात असती । जे बोलिले असे श्रुती । सांगेन तीर्थ अवधारा ॥५३॥ अंगुष्ठमूळ तळहातेसी । अग्निब्रह्मतीर्थ परियेसी । तर्जनी अंगुष्ठ मध्यदेशी । पितृतीर्थ असे जाण ॥५४॥ चतुर्थ अंगुलीचे वरी । देवतीर्थ अवधारी । कनिष्ठिका भागोत्तरी । ऋषितीर्थ परियेसा ॥५५॥ तर्पण देवापितृऋषि । जे स्थानी तीर्थै करावी हर्षी । आचमन ब्रह्मतीर्थेसी । करा ब्राह्मण विद्वज्जन ॥५६॥ ब्रह्मतीर्थे आचमने तिन्ही । केशव नारायण माधव म्हणोनि । देवतीर्थ उदक सांडोनि । गोविंद नाम उच्चारावे ॥५७॥ विष्णु मधुसूदन हस्त धुवोनि दोन्ही । त्रिविक्रम वामन गाला स्पर्शोनि । बिंबोष्ठ तळहस्ते स्पर्शोनि । श्रीधर नाम उच्चारावे ॥५८॥ पुनरपि हस्त ह्रषीकेशी । पद्मनाभ पादद्वय स्पर्शी । सव्य हस्त पंचांगुलीसी । दामोदर शिखास्थानी ॥५९॥ चतुरंगुलि पृष्ठदेशी । संकर्षण घ्राणेसी । तर्जनी आणि अंगुष्ठेसी । म्हणावा वासुदेव प्रद्युम्न ॥१६०॥ अंगुष्ठ अनामिकेसी । नेत्रस्पर्श श्रोत्रेसी । कनिष्ठिका अंगुष्ठेसी । अच्युत नाभी म्हणावे ॥६१॥ पंचांगुली उपेंद्र देखा । हरी श्रीकृष्ण भुजा एका । पाच अंगुली विधिपूर्वका । येणे विधी स्पर्शावे ॥६२॥ विधी संध्याकाळी । आणिक करावे वेळोवेळी । अशौच अथवा संकटकाळी । असती विधाने ती ऐका ॥६३॥ देवतीर्थे तिन्ही घ्यावे । हस्त प्रक्षाळा गोविंद नावे । मुख प्रक्षाळोनि मंत्र म्हणावे । संध्याव्यतिरिक्त येणेपरी ॥६४॥ विधान आणिक सांगेन । देवतीर्थे तिनी घेऊन । गोविंदनामे हस्त धुवून । चक्षु श्रोत्र स्पर्शावे ॥६५॥ शूद्रादि ओवाळियासी । स्पर्श होता परियेसी । आचमनविधि ऐसी । गुरु म्हणती ब्राह्मणाते ॥६६॥ भिजोनि आलिया पाउसात । द्विराचमने होय पुनीत । स्नान भोजनी निश्चित । द्विराचमन करावे ॥६७॥ फलाहार भक्षण करिता । अथवा आपण उदक घेता । आला असेल स्मशानी हिंडता द्विराचमने शुद्ध होय ॥६८॥ उदक नसे जवळी जरी । श्रोत्राचमन करा निर्धारी । आणिक असे एक परी । तूष्णीम आचमन करावे ॥६९॥ श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आचमनविधि आहे ऐसी । जे करिती भक्तीसी । दैन्य कैचे तया घरी ॥१७०॥ आता सांगेन विधान । करावया दंतधावन । समस्त पर्वणी त्यजून । प्रतिपदा षष्ठी वर्जावी ॥७१॥ न करावे नवमीद्वादशीसी । शनयर्कमंगळवारेसी । श्राद्धकाळी विवाहदिवसी । करू नये दंतधावन ॥७२॥ कंटकवृक्षशाखेसी । ताडमाडकेतकीसी । खर्जूरनारिकेलशाखेसी । केलिया जन्म चांडाळयोनी ॥७३॥ खदिरकरंजाआघाडेसी । औदुंबरार्कवटशाखेसी । अथवा वृक्ष करवंदेसी । पुण्य वृक्ष ऐका तुम्ही ॥७४॥ विप्रे द्वादशांगुलेसी । नवांगुले क्षत्रियासी । षडांगुले वैश्यशूद्रांसी । दंतधावन काष्ठ आणावे ॥७५॥ दंतधावन काष्ठेसी । तोडिता म्हणावे मंत्रासी । आयुः प्रज्ञा नाम परियेसी । म्हणोनि काष्ठ तोडावे ॥७६॥ दंतधावन करोनि ऐसे । काष्ठ टाकावे नैऋत्य दिशे । चूळ भरोनि द्वादश । द्विराचमन करावे ॥७७॥ मग करावे प्रातःस्नान । तेणे होय सर्व साधन । तेजोबलाआयुष्यवर्धन । प्रातःस्नान केलिया ॥७८॥ प्रज्ञा वाढे दुःस्वप्ननाश । सकळ दैवते होती वश । सौभाग्य सुख होती हर्ष । प्रातःस्नान केलिया ॥७९॥ यती तापसी संन्यासी । त्रिकाळ करावे स्नानासी । ब्रह्मचारी विधींसी । एक वेळ करावे ॥१८०॥ नित्य केलिया पापनाश असे । करावे याचि कारणे हर्षे । गृहस्थे वानप्रस्थे विशेषे । प्रातर्मध्याह्नी करावे ॥८१॥ अशक्य संकट आले जरी । अथवा न मिळे निर्मल वारि । स्नान करावयाचि परी । सांगेन ऐका ब्राह्मणहो ॥८२॥ अग्निस्नान भस्मस्नान । अथवा करावे वायुस्नान । करा विधीने मंत्रस्नान । आपोहिष्ठा मंत्राने ॥८३॥ आणिक स्नानफळे असती । ज्यास असेल भावभक्ति । गुरुदेवता दर्शनमात्री । तीर्थस्नानफळ असे ॥८४॥ अथवा दर्शन मातापिता । चरणतीर्थ भक्तीने घेता । अंगावरी प्रोक्षिता । तीर्थस्नानफळ असे ॥८५॥ अथवा भिजेल पर्जन्यांत । उभा राहोनि वारा घेत । किंवा बैसावे गोधुळीत । स्नानफळ असे देखा ॥८६॥ स्पर्श चांडाळा होता । जलस्नाने होय शुचिता । शूद्राचा स्पर्श होता । उपस्नान करावे ॥८७॥ दृढ असे तनु आपुले । स्नान मुख्य करावे जले । संधि-विग्रह-साकडे पडले । उषःस्नान करावे ॥८८॥ प्रातःस्नान करावयासी । शीतोदक उत्तम परियेसी । अशक्तता असेल देहासी । उष्णोदके करावे ॥८९॥ स्वभावे पवित्र असे उदक । वरी झालिया अग्निसंपर्क । पवित्र झाले उदक अधिक । गृहस्थासी मुख्य असे ॥१९०॥ उष्णोदके स्नान करिता । शीतोदक करा मिश्रित । मध्ये करावे आचमन तत्त्वता । संकल्प तेथे म्हणावा ॥९१॥ घरी स्नान करिता देखा । अघमर्षण तर्पण नव्हे निका । वस्त्रे पिळू नये ऐका । आपुले हस्ते करूनिया ॥९२॥ पुत्रोत्साह संक्रांतीसी । श्राद्धकाळ मृतदिवसी । न करावे स्नान उष्णोदकेसी । अमावास्या पौर्णिमा ॥९३॥ स्नान करिता बांधा शिखा । दर्भहस्ती सूर्याभिमुखा । मौन असावे विवेका । कवणासवे न बोलावे ॥९४॥ आपोहिष्ठा मंत्रेसी । गायत्री तीन म्हणा सुरसी । येणेपरी स्नानोदकासी । अभिमंत्रावे ब्राह्मणे ॥९५॥ प्रथम शीतोदक घेऊनि । पश्चात उष्णोदक मिळवोनि । स्नान करावे प्रतिदिनी । गृहस्थांनी घरी देखा ॥९६॥ अवधूत मंत्र म्हणत । वस्त्र उकलावे त्वरित । उद्यंत मंत्र जपत । वस्त्र सूर्यासी दाखवावे ॥९७॥ आचमन करूनि आपण देवस्यत्व मंत्र जपोन । धूत वस्त्र नेसून । आणिक मंत्र जपावे ॥९८॥ आवहंती वितन्वती मंत्रे । वस्त्रे नेसावी पवित्र । द्विराचमन करावे तंत्रे । वस्त्र पिळोनि आचमन कीजे ॥९९॥ आता मंत्रस्नान करणे । सांगेन त्याची विधाने । आपोहिष्ठादि मंत्राने । प्रोक्षावे शरीरावरी ॥२००॥ पाद मुर्ध्नी ह्रदयस्थानी । मूर्ध्नीं ह्रदय पाद प्रोक्षोनि । करावे तुम्ही मार्जनी । आपोहिष्ठा मंत्रेसी ॥१॥ ऐसे स्नान करोनि । पुनः आचमन करोनि । मानसस्नान विधींनी । करावे ऐका भक्तीने ॥२॥ नारायण विष्णूमूर्तीसी । स्नान करावे भक्तीसी । चतुर्भुज अलंकारेसी । ध्यान केलिया मानसन्मान ॥३॥ अपवित्रः पवित्रो वा । येणे मंत्रे हरि ध्यावा । उदके देहे प्रोक्षावा । स्नानफळ अवधारा ॥४॥ मंगलस्नानविधा । सांगेन ऐका ब्राह्मण । रविवारी निषेध जाण । ज्वर होय अंगासी ॥५॥ नदीतीरी असे नरु । अशक्त असे शरीरु । गंगास्मरणे निर्धारु । आर्द्रवस्त्रे अंग पुसावे ॥६॥ कांतिहानि सोमवारासी । मंगळवारी मृत्यु परियेसी । लक्ष्मी पावे बुधवारेसी । धनहानि गुरुवारी ॥७॥ शुक्रवारी पुत्रघात । शनिवारी अखिल संपत । जाणा ऐसे निश्चित । मंगलस्नान करावे ॥८॥ नदीस्नान प्रवाहमुखी । घरी प्रातःसूर्याभिमुखी । संध्याकाळी पश्चिममुखी । स्नान करावे अवधारा ॥९॥ स्नान करिता नदीसी । अघमर्षण करावे परियेसी । नमोऽग्नयेऽप्सुमते मंत्रेसी । नदीस्नान करावे ॥२१०॥ यदपांक्रूर मत्रेंसी । उदक लोटावे द्विहस्तेसी । तीन वेळा लोटोनि हर्षी । इमं मे गंगे जपावे ॥११॥ ऋतं च सत्यं च मंत्र जपत । स्नान करावे गंगेत । नदीस्नानविधि ख्यात । करा तुम्ही विप्रवर्ग ॥१२॥ रोदनांती वमनांती । मैथुनदुःस्वप्नदर्शनांती । स्नानावेगळे शुद्ध न होती । स्नान करावे अवधारा ॥१३॥ आता वस्त्रावे विधान । सांगेन ऐका ऋषिजन । ओले वस्त्रे कासेवीण । नेसू नये गृहस्थाने ॥१४॥ रक्तादि वस्त्र जीर्ण धोत्र । नेसूनि जे जन जप करीत । ते पुण्य जाय राक्षसांप्रत । एक धोत्र असलिया ॥१५॥ श्वेतवस्त्र ब्राह्मणासी । मुख्य असे परियेसी । उपवस्त्र वहिर्वासी । उत्तरवस्त्र म्हणिजे तया ॥१६॥ धोत्र नेसलिया नंतरी । विभूति लावावी परिकरी । मंत्रविधान-पुरःसरी । भस्म धारण करावे ॥१७॥ भस्म शुद्ध न मिळे जरी । गोपीचंदन लावावे परी । द्वारावती मुख्य धरी । वरकड मृत्तिका अग्राह्य ॥१८॥ न मिळे द्वारावती देखा । करा धारण गंगामृत्तिका । ऊर्ध्वपुंड्र असे निका । विष्णुसायुज्य होय तया ॥१९॥ पुष्टिकाम असे ज्यासी । लावावे तेणे अंगुष्ठेसी । ज्यासी काम असे आयुधी । मध्यांगुली लावावे ॥२२०॥ अन्नकाम अनामिएसी । तर्जनी काम्य मुक्तीसी । जे लाविती नखेसी । महापातक घडे तया ॥२१॥ उत्तम रुंदी दशांगुली । मध्यम नव आष्ट अंगुली । सप्त सहा पंचागुली । शूर्पाकार लावावे ॥२२॥ चतुर्थ त्रीणि द्वयांगुली । अधम पक्ष असे बोली । द्वादश नामे करा भली । विष्णुनाम उच्चारित ॥२३॥ केशव म्हणावे ललाटस्थानी । नाभी नारायण म्हणोनि । माधवनामे ह्रदयस्थानी । कमळपुष्पाकार देखा ॥२४॥ गोविंदनामे कंठेसी । विष्णुनामे कटिप्रदेशी । दक्षिणभुजा मधुसूदनेसी । नाभी उत्तर त्रिविक्रम ॥२५॥ वामन नामे बाहु देखा । श्रीधर दक्षिणकर्णिका । ह्रषीकेश वामकर्णिका । पद्मनाभ दक्षिणकटी ॥२६॥ दामोदर शिरस्थान । ऐका ऊर्ध्वपुंड्रविधान । पापे जाती जळोन । गोपीचंदन लाविता ॥२७॥ द्वारावती लावोनि । लावा भस्म त्रिपुंड्रांनी । हरिहर संतोषोनि । साधे भुक्ति मुक्ति देखा ॥२८॥ विवाहादि शोभन दिवसी । देवताकृत्य श्राद्धदिवसी । अभ्यंगानंतर सूतकेसी । गोपीचंदन वर्जावे ॥२९॥ ब्रह्मयज्ञतर्पणासी । कुश सांगेन विस्तारेसी । आहेत दश प्रकारेसी । नामे सांगेन विख्यात ॥२३०॥ दूर्वा उशीर कुश काश । सकुद गोधूम व्रीहि मौजीष । नागरमोथा दर्भ परियेसा । दश दर्भ मुख्य असती ॥३१॥ नित्य आणावे दूर्वैसी । जरी न साधे आपणासी । श्रावण भाद्रपदमासी । संग्रह संवत्सरी करावा ॥३२॥ चारी दूर्वा विप्रासी । त्रीणि क्षत्रिय-वैश्यासी । एक नेमिली शूद्रासी । चतुर्वर्णी धरावे ॥३३॥ या दूर्वेची महिमा । सांगता असे अनुपमा । अग्रस्थानी असे ब्रह्मा । मूळी रुद्र मध्ये हरि ॥३४॥ अग्रभागी चतुरंगुल । ग्रंथी मूळी द्वयांगुल । धारण करावे ब्रह्मकुळे । याची महिमा थोर असे ॥३५॥ चक्र धरोनि विष्णु देखा । दैत्य पराभवी ऐका । ईश्वर त्रिशूल धरिता देखा । राक्षसांतक केवी होय ॥३६॥ इंद्र वज्रायुध धरिता । दैत्यगिरी विभांडी तत्त्वता । तैसे ब्राह्मण दूर्वा धरिता । पापदुरिते पराभवती ॥३७॥ जैसे तृणाचे बणवीसी । अग्निस्पर्श होता नाशी । तेवी आलिया पापराशि । दर्भस्पर्शै जळती देखा ॥३८॥ ब्रह्मयज्ञ जपसमयी । ग्रंथि बांधावी कुशाग्री । वर्तुळाकार भोजनसमयी । धरावी ब्राह्मणे भक्तीने ॥३९॥ कर्म आचरता दूर्वैसी । ग्रंथि बांधावी परियेसी । अग्निस्पर्श कर्पूराशी । पाप नाशी येणेपरी ॥२४०॥ एकादशांगुल प्रादेशमात्र । द्विदल असावे पवित्र । नित्य-कर्मासी हेच पवित्र । द्विदल जाणा मुख्य असे ॥४१॥ जपहोमादि दानासी । स्वाध्याय पितृकर्मासी । सुवर्णरजतमुद्रिकेसी । कुशावेगळे न करावे ॥४२॥ देवपितृकर्मासी देख । रजत करावे सुवर्णयुक्त । तर्जनीस्थानी रौप्यमुद्रिका । सुवर्ण धरावे अनामिकेसी ॥४३॥ मुद्रिका असावी खड्‍गपात्री । कनिष्ठिकांगुली पवित्री । ग्राह्य नव्हे जीवंतपित्री । तर्जनांगुली मुद्रिका ॥४४॥ योगपट उत्तरी देखा । तर्जनीस्थानी रौप्यमुद्रिका । पायी न घालाव्या पादुका । गयाश्राद्ध न करावे ॥४५॥ नवर‍त्‍न मुद्रिका ज्याचे हाती । पापे त्यासी न लागती । एखादे रत्‍न असता हाती । मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी ॥४६॥ प्रातःसंध्येच विधान । सांगेन ऐका ऋषिजन । नक्षत्र असतांचि प्रारंभून । अर्घ्य सूर्योदयी द्यावे ॥४७॥ सूर्योदय होय तव । जप करीत उभे असावे । उदयसमयी अर्घ्य द्यावे । तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ ॥४८॥ ऋषि पुसती पराशरासी । संध्या करावया विधि कैसी । विस्तारोनि आम्हांसी । सांगावे जी स्वामिया ॥४९॥ श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । सांगेन संध्याविधिसी । ऐका तुम्ही तत्परेसी । पराशरस्मृतीसी असे ॥२५०॥ गायत्रीमंत्र जप करिता । शिखा बांधावी तत्त्वता । आसन घालावे निरुता । दर्भपाणि होउनी ॥५१॥ देवतीर्थे द्विराचमन । विष्णुनाम स्मरोन । प्राणायाम विस्तारोन । न्यासपूर्वक करावे ॥५२॥ प्रणवाचा परब्रह्म ऋषि । गायत्री नाम छंदासी । परमात्मा देवता परियेसी । म्हणा प्राणायामे विनियोगः ॥५३॥ ॐ व्याह्रति सत्यज्ञानिया । नाभि ह्रदय मूर्ध्नी स्पर्शावया । व्याह्रति सप्त अतिशया । प्रत्येक देवता ऋषि सांगेन ॥५४॥ व्याह्रति सप्तस्थानासी । ऐका असे प्रजापति ऋषि । प्रत्येक देवता परियेसी । सप्त नामे देवांची ॥५५॥ अग्निर्वायु गुरुः सूर्य । वरुणेंद्र विश्वदेव । सप्त व्याह्रति सप्त देव । छंद सप्त सांगेन ॥५६॥ गायत्री आणि उष्णिका । अनुष्टुप्‍ बृहती पंक्ति पंचम ऐका । त्रिष्टुप्‍ जगती छंद विशेखा । प्राणायामे विनियोगः ॥५७॥ ॐ भूः पादन्यास । ॐ भुवः जानु स्वः गुह्य । ॐ महः नाभि स्थान स्पर्शा । जनो ह्रदय तपो कंठ ॥॥५८॥॥ ॐ भू र्ह्रदयाय नम इति । ॐ भुवः शिरसे स्वाहेति । ॐ स्वः शिखायै वषडिति । ॐ तत्सवितुर्वरेण्यं कवचाय हुं ॥२६०॥ ॐ भर्गोदेवस्य धीमहि नेत्रत्रयाय वोषट्‍ । धियोयोनः प्रचोदयात्‍ अस्त्राय फट्‍ । ॐ भूर्भु०इति दिग्बंधः । ऐसे षडंग करावे ॥६१॥ प्राणायामे विनियोगः म्हणुनि । आपोस्तन स्पर्शोनि । ज्योतिर्नेत्रस्पर्शस्थानी । रसो जिव्हामृतललाटे ॥६२॥ प्राणायाम करावयासी । प्रजापति म्हणती ऋषि । देवतानामे परियेसी । ब्रह्माग्निवायु सूर्य असे ॥६३॥ ब्रह्मभूर्भुवःस्वः म्हणुनि । प्राणायाम करा तिन्ही । त्रिपदा गायत्री जप कोणी । जपणारासी सर्व सिद्धि ॥६४॥ गायत्रीची अधिदेवता । ब्रह्माग्निवायु सविता । ऋषि ब्रह्मा असे ख्याता । सप्त लोकन्यास सांगेन ॥६५॥ पादन्यास भुर्लोक । भुवः जानु अतिविशेख । स्वः गुह्य असे लोक । नाभिन्यास महर्लोक ॥६६॥ जनो ह्रदय तपो ग्रीवे । भ्रुवोर्ललाटे सत्यलोक म्हणावे । ऐसे शिरस्थान बरवे । सत्यलोक म्हणती तयासी ॥६७॥ गायत्रीची प्रार्थना करूनि । प्राणायाम करा विधींनी । ब्रह्मचारी गृहस्थानी । पंचांगुली धरा परमेष्ठी ॥६८॥ वानप्रस्थ संन्यासी यती । अनामिकाकनिष्ठिकांगुष्ठेसी । ओंकारादि वायुपूरकेसी । दक्षिणनासापुटे चढवावे ॥६९॥ वामनासापुटी विसर्जोनि । करा प्राणायाम तिन्ही । येणेचि विधी करा मुनि । त्रिकालसंध्या कर्मै ॥२७०॥ आता करावे मार्जनेसी । सांगेन ऐका समस्त ऋषि । जैसे अति स्मृतिचंद्रिकेसी । तेणे विधी सांगतो ॥७१॥ आपोहिष्ठेति सूक्तेसी । सिंधुद्वीप ऋषि गायत्री छंदेसी । आपोदेवता मार्जनासी । हा म्हणावा विनियोग ॥७२॥ येणे मंत्रे म्हणोन । कुशपवित्रे करा मार्जन । यस्य क्षयाय मंत्रे जाण । आपुले पाद प्रोक्षावे ॥७३॥ आपोजनयथा मंत्रेसी । प्रोक्षावे आपुल्या शिरसी । सूर्यश्चेति मंत्रेसी । उदक प्राशन करावे ॥७४॥ हिरण्यवर्णसूक्तेसी । मार्जन करावे परियेसी । द्रुपदादिवेति मंत्रेसी । घ्राणोनि उदक सोडावे ॥७५॥ आचमने करोनि दोन । मार्जनविधान सांगेन । वामहस्ती पात्र धरून । मार्जन करा विशेषी ॥७६॥ औदुंबर सुवर्ण रजत । काष्ठाचेही असे पवित्र । ऐसे असे निर्मळ पात्र । वामहस्ती उदक बरवे ॥७७॥ मृण्मय अथवा द्विमुख पात्र । भिन्न पात्र ते जाण अपवित्र । ते अग्राह्य देवपितरा । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥७८॥ मार्जनसंख्या सांगेन ऐका । शिरसी अष्ट पादे नवका । यस्य क्षयाय स्नान भुमिका । येणेपरी मार्जन ॥७९॥ आपः पुनन्तु मंत्रेसी । प्राशनोदक माध्याह्नेसी । अग्निश्चेति मंत्रेसी । सायंसंध्या करावी ॥२८०॥ प्राशनांती तुम्ही ऐका । द्विराचमन करा निका । आघ्राण करुनी सांडिजे ऐका । एक आचमन करावे ॥८१॥ अर्घ्य द्यावयाचे विधान । सांगेन ऐका ऋषिजन । गोश्रृंगाइतुके आकारोन । अर्घ्य द्यावे मनोभावे ॥८२॥ गायत्रीमंत्र जपोनि । सायंप्रातर्द्यावी तिन्ही । हंसःशुचिषेति माध्याह्नी । अर्घ्य द्यावे अवधारा ॥८३॥ प्रातर्माध्याह्नी उभे बरवे । सायं अर्घ्य बैसोनि द्यावे । आचमन त्रिवारी करावे । करी प्रदक्षिणा असावादित्य ॥८४॥ अर्घ्य द्यावयाचे कारण । सांगेन कथा विस्तारोन । राक्षस मंदेह दारुण । तीस कोटि आहेती देखा ॥८५॥ सूर्यासवे युद्धासी। नित्य येतीपरियेसी । संदेह पडे देवांसी । सूर्या होईल अपजय ॥८६॥ अपजय येता सूर्यासी । उदयास्तमान न होय परियेसी । कर्मै न चालती ब्राह्मणांसी । स्वाहास्वधाकार न चाले ॥८७॥ स्वाहास्वधाकार रहाती । समस्त देवांस उपवास होती । सृष्टि राहिली न होय उत्पत्ति । म्हणोनि उपाय रचियेला ॥८८॥ याचि कारणे अर्घ्य देती । तीचि वज्रायुधे होती । जावोनि दैत्यांसी लागती । पराभविती प्रतिदिवसी ॥८९॥ दैत्य असती ब्रह्मवंश । त्यांसी वधिलिया घडती दोष । प्रदक्षिणा करिता होय नाश । असावादित्य म्हणोनिया ॥२९०॥ ब्रह्महत्येचिया पातकासी । भूमिप्रदक्षिणा दोष नाशी । चार पावले फिरता कैसी । भूमिप्रदक्षिणा पुण्य असे ॥९१॥ संध्या करावयाचे स्थान । सांगेन ऐका फलविधान । घरी करिता प्रतिदिन । एकचि फळ अवधारा ॥९२॥ दश फळ ग्रामाबाहेर देखा । नदीस केलिया शताधिका । पुष्करतीरी सहस्त्र ऐका । गंगासुरनदी कोटिफल ॥९३॥ सुरापान दिवा मैथुन । अनृतादि वाक्ये पापे जाण । संध्या बाहेर करिता क्षण । जळती दोष तात्काळी ॥९४॥ स्थाने असती जप करावयासी । विस्तारे सांगेन तुम्हासी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । एकचित्ते परियेसा ॥९५॥ जप केलिया घरी ऐका । एकचि फल असे देखा । बाहेर द्विगुणी फल अधिका । नदीतीरी त्रिगुण फल ॥९६॥ गोस्थळ वृंदावन देखा । दशगुण फल अधिका । अग्निहोत्रस्थानी निका । शतगुणफल अधिक असे ॥९७॥ तीर्थदेवता सन्निधानी । सहस्त्रफल असे निर्गुणी । शतकोटि फल हरिसन्निधानी । ईश्वरसंनिधानी अनंत फल ॥९८॥ जप करिता आसनासी । विधिनिषेध आहे परियेसी । सांगेन ऐका तत्परेसी । पुण्य पाप बोलिले असे ॥९९॥ काष्ठासनी बैसोनि जरी । जप करिता मनोहरी । दुःख भोगी निरंतरी । अभागी पुरुष तो होय ॥३००॥ पल्लवशाखांसी बसता । सदा होय दुश्चिता । वस्त्रासनी दरिद्रता । पाषाणासनी व्याधि होय ॥१॥ भस्मासनी व्याधिनाश । कंबलासनी सुखसंतोष । कृष्णाजिनी ज्ञानप्रकाश । व्याघ्रचर्मी मोक्षश्री ॥२॥ कुशासनी वशीकरण । सर्व रोगांचे उपहरण । पापे जाती पळोन । आयुःप्रज्ञा अधिक होय ॥३॥ ओ इत्येक्षारकमंत्री । जपावा तुम्ही पवित्री । ध्यान करावे गायत्री । समस्त पापे हरती देखा ॥४॥ गायत्रीचे स्वरूप आता । अभिवन असे वर्णिता । रक्तांगी वास रक्ता । हंस वाहन असे देखा ॥५॥ अकार ब्रह्मा अधिदेवता । चतुर्भुजा चतुर्वक्त्रा । कमंडलु अक्षसूत्रा । चाटु धरिला असे करी ॥६॥ ऋग्वेद असे समागमी । अग्निहोत्रफल आवाहयामि । मग आयातु वरदा देवी । म्हणावे ऐका ब्राह्मणाने ॥७॥ त्या मंत्रासी ऋषि देवता । गायत्रीसदृश असे ख्याता । प्रातःसंध्या तुम्ही करिता । विधि तुम्हा सांगेन ॥८॥ गायत्री देवता गायत्री अनुष्टुप छंदः । ॐ आदित्य देवता देवा । हे प्रातःसंध्या म्हणता भेद । गायत्री देवता गायत्री छंदः ॥९॥ गायत्री आवाहने विनियोगः । ही माध्याह्नसंध्या म्हणावी । सविता देवता गायत्री छंदः । सरस्वती आवाहने विनियोगः ॥३१०॥ प्रातःसंध्येचे ध्यान । सांगेन ऐका तुम्ही गहन । रक्तांगी रक्तवसन । हंसासनी आरूढ असे ॥११॥ चतुर्बाहु चतुर्मुखी । कमंडलु धरिला विशेखी । अक्षसूत्र चाटु हस्तकी । ऋग्वेदसहित अग्निहोत्र ॥१२॥ ऐसे ध्यान करोनि । मग म्हणावे अक्षरज्ञानी । एकचित्ते असा ध्यानी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥१३॥ ओंकार शिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामी । श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥१४॥ ऐसे म्हणोनि प्रातःकाळी । संध्या करावी सुवेळी । आता सांगेन माध्याह्नकाळी । ध्यान आवाहनपूर्वक ॥१५॥ अभिभुरो सावित्रीध्यान । यौवनस्था माध्याह्न । सांगेन ऐका ऋषिजन । एकचित्ते परियेसा ॥१६॥ श्वेतांगी श्वेतवस्त्र । वाहन असे वृषभ पवित्र । उकार रुद्रगण दैवत । पंचमुखा असे देखा ॥१७॥ वरद अभयहस्त देखा । रुद्राक्षमाळा त्रिशूलधारका । यजुर्वेद असे देखा । अग्निष्टोम फल जाणा ॥१८॥ ओंकारशिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि । श्रियमावाहयामि । ह्रियमावाहयामि ॥१९॥ आता सायंसंध्या ध्यान । सांगेन ऐका विधान । एकचित्ते ऐका वचन । ध्यानपूर्वक सांगेन ॥३२०॥ अभिभूरो सरस्वती वृद्धा । जाणावी तुम्ही सायंसंध्या । कृष्णांगी कृष्णवस्त्रपरिधाना । गरुडवाहन असे देखा ॥२१॥ मकार विष्णुदेवता । चतुर्भुज शंखचक्रधृता । गदापद्मधारणहस्ता । सामवेदसहित जाणा ॥२२॥ वाजपेयफल जाण । सायंसंध्या असे ध्यान । करावे ऐका तुम्ही ब्राह्मण । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥२३॥ ओंकारशिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि । श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥२४॥ पंचशीर्षोपनयने विनियोगः । प्रणवस्य परब्रह्म ऋषिः । परमात्मा देवता । गायत्री छंदः ॥२५॥ उदात्तस्वरित स्वरः अग्निर्वायुः सूर्यदेवता । गायत्री त्रिष्टुप्‍ जगती छंदः । ब्रह्माविष्णुमहेश्वरादेवताः । ऋग्यजुःसामानि स्वरूपाणि ॥२६॥ आहवनीयाग्निगार्हपत्य । दक्षिणाग्निउपस्थानानि । पृथिव्यंतरिक्षं द्यौस्तत्त्वानि । उदात्तानुदात्तस्वरितस्वराः ॥२७॥ पीतविद्युतश्वेतवर्णी । प्रातर्मध्याह्नतृतीयसवनानि । विश्वतजसप्राज्ञस्वरूपिणी । जागृतीस्वपन्सुषुप्त्यवस्था ॥२८॥ ऐसे त्रिपदा गायत्रीसी । सांगितले त्रिविध ध्यानासी । आता विधान जपासी । सांगेन ऐका एकचित्ते ॥२९॥ ममोपात्तदुरितक्षयद्वारा । श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं जपे विनियोगः । ॐ अं नाभौ । वं ह्रदये मं कंठे ॥३३०॥ भूः अक्षरमंत्रासी । गायत्री असे छंदेसी । अग्निर्देवता परिएय्सी । विश्वामित्र ऋषि देखा ॥३१॥ षड्‍ज स्वर श्वेत वर्ण । पादस्पर्श उच्चारोन । प्राणायामे विनियोगून । दुसरी व्याह्रति म्हणावी ॥३२॥ भुवः अक्षरमंत्रासी । उष्णिक्‍ नाम छंदासी । वायुर्देवता परियेसी । भृगु ऋषि असे जाण ॥३३॥ असे रूप श्यामवर्ण । पादस्पर्श रूप उच्चारोन । करा तुम्ही ऐसे ध्यान । जानूमध्ये न्यासावे ॥३४॥ प्राणायाम विनियोग म्हणोनि । न्यास करावे भक्तिभावनी । स्वः व्याह्रति म्हणोनि । ध्यान करा भक्तीने ॥३५॥ स्वः व्याह्रतिमंत्रासी । म्हणा अनुष्टुप्‍ छंदासी । सविता देवता परियेसी । भारद्वाज ऋषि जाण ॥३६॥ स्वर गांधार पीतवर्णा । कंठी स्पर्शोन मंत्र म्हणा । प्राणायामे विनियोग जाणा । तृतीय व्याह्रतिमंत्रासी ॥३७॥ ॐ महः मंत्रासी । बृहती छंदासी । बृहस्पति देवता परियेसी । वसिष्ठ ऋषि निर्धारे ॥३८॥ मध्यम स्वर पिशंग वर्ण । ऐसे करा तुम्ही ध्यान । वेगे म्हणा नाभी स्पर्शोन । प्राणायामे विनियोगः ॥३९॥ जन मंत्र उच्चारासी । म्हणा पंक्ति छंदासी । वरुण देवता गौतम ऋषि । पंचम स्वर असे जाण ॥३४०॥ रूप असे नीलवर्ण । करा न्यास ह्रदयस्थान । प्राणायामे विनियोगून । जनः पंच न्यास ऐसे ॥४१॥ तपः मंत्र न्यासासी । त्रिष्टुप्‍ छंद परियेसी । ईश्वर देवता कश्यप ऋषि । धैवत स्वर परियेसा ॥४२॥ असे आपण लोहवर्ण । स्पर्श करावे कंठस्थान । प्राणायामे विनियोगून । न्यास करावा ब्राह्मणहो ॥४३॥ सत्यं म्हणतसे मंत्रासी । करावे जगती छंदासी । विश्वेदेव अंगिरस ऋषि । निषाद स्वर जाणावा ॥४४॥ रूप असे कनकवर्ण । भ्रुवोर्ललाटा स्पर्शून । प्राणायामे विनियोगून । न्यास करावा भक्तीने ॥४५॥ इतुके न्यास करोनि । हस्त ठेवा शिरस्थानी । ध्यान करा विधानी । सांगेन ऐका ब्राह्मणहो ॥४६॥ शिरस्थान स्पर्शासी । म्हणा अनुष्टुप्‍ छंदासी । उच्चार प्रजापति ऋषि । परमात्मा देवता जाण ॥४७॥ प्राणायामे विनियोगून । मग करावे गायत्रीध्यान । ॐ आपोज्योति म्हणोन । मंत्र म्हणा भक्तीने ॥४८॥ ॐ आपोज्योतिरसोमृतं । ब्रह्मभूर्भुवःस्वरो । शिरसी येणे विधी । अंगन्यास करावे ॥४९॥ चोवीस अक्षरे मंत्रासी । न्यास सांगेन एकाएकासी । एकचित्ते परियेसी । म्हणे पराशर ऋषि तो ॥३५०॥ या त्रिपदा गायत्रीसी । असे विश्वामित्र ऋषि । देवी गायत्री छंदेसी । वर्ण देवता सांगेन ॥५१॥ ऐसे त्रिपदा गायत्रीमंत्रासी । चोवीस अक्षरे परियेसी । पृथक्‍ न्यास परियेसी । सांगेन ऐक द्विजोत्तमा ॥५२॥ तवर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । अग्नि देवता परियेसी गायत्री छंद म्हणावा ॥५३॥ अतसीपुष्पे वर्णै जैसी । तद्रूप वर्ण असे परियेसी । वायव्य कोण स्थान त्यासी । गुल्फन्यास करावा ॥५४॥ त्सवर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । वायुदेवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥५५॥ जंघस्थानी असे न्यास । सौम्यरूप पिवळे सुरस । सर्व पापे दहती परियेस । त्सवर्णाचे लक्षण ॥५६॥ विवर्णनाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । सोमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥५७॥ न्यास करावया जानुस्थान । इंद्रनील विद्युद्वर्ण । ऐसे अक्षरविधान । महारोग हरती देखा ॥५८॥ तुवर्ण नाम अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि । विद्युद्देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥५९॥ न्यास करा जानुस्थानी । दीप्ति असे जैसा वह्नि । रूप असे सौम्यपणी । भ्रूणहत्यापाप नाशी ॥३६०॥ र्ववर्ण अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि । सोम देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥६१॥ सुवर्णस्फटिककांति । गुह्यस्थानी न्यास बोलती । समस्त अघौघ नाशती । रूपार्ववर्णस्थाना उत्तम ॥६२॥ रेवर्ण नाम अक्षरमंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । वरुण देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥६३॥ णिकार वृषणस्थान जाणा । विद्युत्प्रकाशरूपधारणा । बार्हस्पत्यनाम खुणा । अभक्ष्यपापक्षालन ॥६४॥ णिवर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । बृहस्पति देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥६५॥ यं कटिस्थान शांताकारवर्ण । देहहत्यापापज्वलन । न्यास करावे सगुण । विद्वज्जन ब्राह्मणा ॥६६॥ यं अक्षर म्हणावयासी । असे विश्वामित्र ऋषि । तारका दैवत परियेसी । देवी गायत्री छंद असे ॥६७॥ भकारा नाभी करा न्यास । कृष्णमेघवर्ण सुरस । पर्जन्य देवता संकाश । गुरुहत्यापाप नाशी ॥६८॥ भवर्ण नाम अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि । पर्जन्य देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥६९॥ र्गो अक्षरा उदर न्यास । ध्यान रक्तवर्ण सुरस । इंद्र देवता परियेस । गोहत्येचे पाप जाय ॥३७०॥ गोवर्ण नाम अक्षरासी । जाणावा विश्वामित्र ऋषि । इंद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥७१॥ देकारन्यास स्तनासी । गंधर्व नाम देव परियेसी । स्त्रीहत्यापाप नाशी । एकचित्ते परियेसा ॥७२॥ देवर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । गंधर्व देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥७३॥ वकार ह्रदयस्थानन्यास । शुक्ल रूप वर्ण परियेस । पूषा देवता असे त्यास । वाणीजातपाप नाशी ॥७४॥ ववर्णाक्षर मंत्रासी । जाणावा विश्वामित्र ऋषि । रुद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥७५॥ स्य अक्षरा कंठन्यास । कांचनवर्ण रूप सुरस । मित्र देवता परियेस । मार्जारकुक्कुटपाप जाय ॥७६॥ स्यवर्ण अक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । मित्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥७७॥ धीकाराक्षरमंत्र दंती न्यास । शुक्लकुमुदसंकाश । त्वष्टा देवता परियेस । पितृहत्यापाप जाय ॥७८॥ धीवर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । विष्णु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाण ॥७९॥ मकारन्यास तालुस्थान । पद्म तेजोमय जाण । वासुदेव असे खूण । सर्वजन्मपाप जाय ॥३८०॥ मकार वर्णाक्षरमंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । वासुदेव देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८१॥ हिकार नासिकी करा न्यास । शंखवर्ण असे त्यास । वासुदेव देवता परियेस । सर्व पाप हरण होय ॥८२॥ हिवर्ण नाम मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । मेरु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८३॥ धिकारा नेत्रस्थानी न्यास । पांडुरभास संकाश । सोम देवता परियेस । पाणिग्रहणपाप नाशी ॥८४॥ धिवर्ण नाम मंत्रासी । तोचि विश्वामित्र ऋषि । सोमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८५॥ योकाराक्षर मंत्रासी । भुवोर्मध्ये न्यासिजे त्यासी । रक्तगौरवर्ण रूपेसी । प्राणिवधपाप जाय ॥८६॥ योकाराक्षर नामाक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । यमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८७॥ योकार ललाटस्थानी न्यास । रूप रुक्मांभसंकाश । सर्व पाप होय नाश । भक्तिपूर्वक न्यासावे ॥८८॥ योवर्णाक्षर मंत्रासी । तोचि विश्वामित्र ऋषि । विश्वे देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८९॥ नकारा उदित प्राङ्‌मुखा । सूर्यासमान तेज देखा । आश्विनौ देवता असे निका । विराजमान परियेसा ॥३९०॥ नकाराक्षर वर्णासी । जाणा विश्वामित्र ऋषि । अश्विनौ देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९१॥ प्रकाराक्षरन्यास करोनि दक्षिणे । रूप असे नीलवर्ण । प्रजापति देवता जाण । विष्णुसायुज्य पाविजे ॥९२॥ प्रवर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । प्रजापति देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९३॥ चोकार वर्ण मंत्रासी । न्यासिजे तया पश्चिम भागासी । कुंकुमरूपवर्ण त्यासी । सर्वदेवपदवी पाविजे ॥९४॥ चोकार वर्ण मंत्राक्षरासी । जाणावा विश्वामित्र ऋषि । सर्व देवता परियेसी । गायत्री देवी छंद जाणा ॥९५॥ दकाराक्षराचा उत्तरे न्यास । शुक्लवर्ण रूप सुरस । करावे तुम्ही ऐसे न्यास । कैलासपद पाविजे ॥९६॥ दकाराक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । रुद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९७॥ याकार मूर्धास्थानी न्यास । सुवर्णरूप सुरस । ब्रह्मस्थाना होय वास । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥९८॥ यावर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । ब्रह्म देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९९॥ तकार न्यास शिखास्थानी । निरुपम वैष्णवभुवनी । विष्णुरूप धरोनि । वैकुंठवास होय जाणा ॥४००॥ तकार वर्णाक्षरमंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । विष्णु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥१॥ ऐसे चोवीस अक्षरमंत्रासी । न्यास करावे विधींसी । हस्त ठेवोनिया शिरासी । आणिक न्यास करावे ॥२॥ शिरस्थानी न्यासासी । म्हणावे अनुष्टुप्‍ छंदासी । ख्याति प्रजापति ऋषि । परमात्मा देवता जाणा ॥३॥ प्राणायामे विनियोग म्हणोनि । ओं आपोस्तन स्पर्शोनि । ज्योतिर्नेत्र स्पर्शोनि । रसोजिह्वा न्यासावे ॥४॥ अमृतेति ललाटेसी । मूर्घ्नि स्पर्शोनि ऐसी । ब्रह्मभूर्भुवःस्वरोमासी । न्यास करा येणे विधी ॥५॥ इतुके न्यास करोनि । गायत्री त्रिवार म्हणोनि । व्यापक न्यास करोनि । करशुद्धि करा तीन वेळा ॥६॥ भुः० स्वः० विन्यसोनि । गायत्रीच्या दश पदांनी । दशांगुली न्यासोनि । पादप्रमाण करावे ॥७॥ अंगुष्ठमूल धरोनि । कनिष्ठिका स्पर्शोनि । उभय हस्त न्यासोनि । दशपादांगुली न्यासावे ॥८॥ चोवीस अक्षरमंत्रासी । अंगुलिन्यास करा हर्षी । तर्जनीमूलादारभ्येसी । कनिष्ठिकापर्यंत ॥९॥ द्वादशाक्षरी अकैक हस्त । करावे न्यास सुनिश्चित । षडंगन्यास समस्त । प्रणवासहित करावे ॥४१०॥ ॐ भूः हिरण्यात्मने । अंगुष्ठाभ्यां नमः । ॐ भुवः प्रजापत्यात्मने । तर्जनीभ्यां नमः ॥११॥ ॐ स्वः सूर्यात्मने मध्यमाभ्यां नमः । ॐ महः ब्रह्मात्मने अनामिकाभ्यां नमः । ॐ जनः, ॐ तपः ॐ सत्यं, कनिष्ठिकाभ्यां नमः । प्रचोदयात्‍ करतलकरपृष्ठाभ्यां नमः ॥१२॥ ॐ तत्सवितुः अंगुष्ठाभ्यां ह्रदयाय नमः । वरेण्यं तर्जनीभ्यां शिरसे स्वाहा । भर्गोदेवस्य मध्यमाभ्यां शिखायै वषट्‍ । धीमहि अनामिकाभ्यां कवचाय हुं ॥१३॥ धियोयोनः कनिष्ठिकाभ्यां नेत्रत्रयाय वौषट्‍ । प्रचोदयात्‍ करतलकरपृष्ठाभ्यां अस्त्राय फट्‍ । उभयहस्तांगुलिन्यासं कुर्यात्‍ । अथ षडंगन्यासः ॥१४॥ ॐ भूः हिरण्यात्मने ह्रदयाय नमः । ॐ भुवः प्रजापत्यात्मने शिरसे स्वाहा । ॐ स्वः सूर्यात्मने शिखायै वौषट्‍ । ॐ महः ब्रह्मात्मने कवचाय हुं ॥१५॥ ॐ जनः, ॐ तपः, ॐ सत्यं, सोमात्मने । नेत्रत्रयाय वौषट्‍ । प्रचोदयात सर्वात्मने अस्त्राय फट्‍ । ॐ तत्स० ह्रदयाय नमः ॥१६॥ ॐ वरेण्यं शिरसे स्वाहा ।भर्गोदेवस्य शिखायै वौषट्‍ । धीमहि कवचाय हुं । धियोयोनः नेत्रत्रयाय वौषट्‍ । प्रचोदयात अस्त्राय फट्‍ ॥१७॥ षडंगन्यास करोनि । अंगन्यास दशस्थानी । त्यांची नावे सांगेन कानी । एकचित्ते अवधारा ॥१८॥ पादजानुकटिस्थानी । नाभिह्रदयकंठभुवनी । तालुनेत्र स्पर्शोनि । ललाटशिरी दशस्थान ॥१९॥ गायत्रीमंत्राच्या दहा पदांसी । दशस्थान अंगन्यासासी । तत्सवितुर्वरेण्येसी । भर्गोदेवस्य पंचम स्थान ॥४२०॥ धीमहि म्हणजे षष्ठ स्थान । धियो सप्तम स्थान जाण । योकारो अष्टम अंगन्यास पूर्ण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥२१॥ नकार नवम मंत्रस्थान । प्रचोदयात्‍ दहावे जाण । अंगन्यास येणे गुण । करा तुम्ही द्विजोत्तमा ॥२२॥ चतुर्विशति अक्षरांसी । करावे अंगन्यासासी । पादांगुष्ठस्पर्श हर्षी । शिखादारभ्य न्यासावे ॥२३॥ अंगुष्ठाभ्यां नमः । त्सं गुल्फयोर्नमः । विं जंघर्योर्नमः । तुं जानुभ्यां नमः ॥२४॥ व ऊरुभ्यां नमः । रें गुह्याय नमः । णीं वृषणाय नमः । यं कटिभ्यां नमः ॥२५॥ भं नाभ्यै नमः । र्गौ उदराय नमः । दें स्तनाभ्यां नमः । वं ह्रदयाय नमः ॥२६॥ स्यं कंठाय नमः । धीं दंतेभ्यो नमः । मं तालवे नमः । हिं नासिकायै नमः ॥२७॥ धिं नेत्राभ्यां नमः । यों भ्रुवोर्मध्याय नमः । यों ललाटाय नमः । नः प्राङ्‍मुखाय नमः ॥२८॥ प्रं दक्षिणमुखाय नमः । चों पश्चिममुखाय नमः । दं उत्तरमुखाय नमः । यां मूर्ध्ने नमः । तं शिखायै वषट्‍ ॥२९॥ ऐसे न्यास करोनि । पुनः पादांगुष्ठ धरोनि । कटिपर्यंत न्यासोनि । ऊर्ध्वन्यास करावे ॥४३०॥ तकारा अंगुष्ठस्थान । त्सकार गुल्फ असे स्थान । विकार जंघास्थान । ऐका ब्राह्मणा म्हणती गुरु ॥३१॥ तुकार जानूर्वकार ऊरवे । वकार गुह्यपूर्वक स्पर्श । णिकारा वुषणस्थान बरवे । तुकार कटिस्थान न्यास ॥३२॥ शिखा धरोनि पादपर्यंत । करावे न्यास उतरत । त्याते सांगेन आदिअंत । एकचित्ते परियेसा ॥३३॥ तं नमः शिकायै विन्यस्य । यां नमः मुर्ध्नि विन्यस्य । दं नमः उत्तरशिखायां न्यस्य । चो नमः पश्चिमशिखायां ॥३४॥ प्रं नमः दक्षिणशिखायां । नं नमः प्राङ्‍मुखे । यो नमः ललाटे । यो नमः भ्रुवोर्मध्यी ॥३५॥ धिं नमः नेत्रत्रये । हिं नमः नासिकयोः । मं नमः तालौ । धी नमः दंतेषु ॥३६॥ स्यं नमः कंठे । वं नमः ह्र्दये । दें नमः स्तनयोः । र्गौ नमः उदरे । भं नमः नाभौ ॥३७॥ प्रणवादि नमोत न्यास करावे । आकार नाभी उकार ह्रदये । मकार मुखे नकार ललाटे । मकर शिरसि हस्तेन नमस्कृत्वा ॥३८॥ अथ मुद्रासंपुटप्रकारी । चतुर्विशति अवधारी । सांगेन त्यांचा विस्तार परी । ऐका ब्राह्मण एकचित्ते ॥३९॥ श्लोक । सुमुखं संपुटं चैव विततं विस्तृतं तथा । द्विमुखं त्रिमुखं चैव चतुःपंचमुखं तथा ॥४४०॥ षण्मुखाधोमुखं चैव व्यापकांजलिकं तथा । शकटं यमपाशं च ग्रंथितं चोल्मुकोल्मुकम ॥४१॥ प्रलंबं मुष्टिकं चैव मत्स्यकूर्मो वराहकम्‍ । सिंहाक्रांतं महाक्रांतं मुद्गरं पल्लवं तथा ॥४२॥ एता मुद्रा न जानाति गायत्री निष्फला भवेत्‍ । एता मुद्रास्तु कर्तव्या गायत्री सुप्रतिष्ठिता ॥४३॥ अस्यार्थः । सुमुखं ॥१॥ संपुटं ॥२॥ विततं ॥३॥ विस्तृतं ॥४॥ द्विमुखं ॥५॥ त्रिमुखं ॥६॥ चतुर्मुखं ॥७॥ पंचमुखं ॥८॥ षण्मुखं ॥९॥ अधोमुखं ॥१०॥ व्यापकांजलिकं ॥११॥ शकटं ॥१२॥ यमपाशं च ॥१३॥ ग्रंथितं ॥१४॥ चोल्मुकोल्मुकं ॥१५॥ प्रलंबं ॥१६॥ मुष्टिकं ॥१७॥ मत्स्यः ॥१८॥ कूर्मः ॥१९॥ वराहः ॥२०॥ सिंहाक्रांतं ॥२१॥ महाक्रांतं ॥२२॥ मुद्गरं ॥२३॥ पल्लवं ॥२४॥ मुद्राविण गायत्रीमंत्र । जप करितां सर्व व्यर्थ । या कारणे करावे पात्र । मुद्रापूर्वक जप करावा ॥४४॥ गौप्प्य करावा मुद्रायुक्त । प्राणायाम करा निश्चित । समस्त पापक्षयार्थ । म्हणोनि अष्टोत्तरीय संकल्पावे ॥४५॥ या गायत्रीप्रथमपादासी । म्हणा ऋग्वेद असे ऋषि । भूमितत्त्व परियेसी । ब्रह्मा देवता त्रिष्टुप्‍ छंद ॥४६॥ द्वितीयपाद गायत्रीसी । यजुर्वेद असे ऋषि । रुद्रदेवता प्राणापानव्यालतत्त्वेसी । जगती म्हणा अहर्निशी ॥४७॥ गायत्री तृतीयपादासी । ऋग्यजुः सामतत्त्व परियेसी । विष्णु देवता त्रिष्टुप छंदेसी । समस्तपापक्षयार्थ विनियोग ॥४८॥ भूमिस्तंभ परियेसी । गायत्री छंदासी । म्हणावे ब्रह्मपदासी । ब्रह्मा दैवत जाणावे ॥४९॥ गायत्रीचे ध्यान । सांगेन तुम्हा विधान । एकचित्ते करा पठण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥४५०॥ श्लोक । मुक्ताविदुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्रीक्षणैर्युक्तामिंदुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम्‍ । गायत्री वरदाभयांकुशकशां शुभ्रं कपालं गदां शंखं चक्रमथारविदयुगलं हस्तैर्वहन्ती भजे ॥५१॥ ऐसे ध्यान करोनि । जप करावा नासिकाग्रनयनी । अंती षडंग न्यासोनि । जप करा येणेपरी ॥५२॥ गायत्रीमंत्राची प्रशंसा । एकचित्ते परियेसा । मंत्रनाम असे विशेषा । अक्षरे दोनी पाप हरे ॥५३॥ मकार म्हणजे आपुले मन । त्रकार नाम आपुला प्राण । मन प्राण एकवटोन । जप करावा एकचित्ते ॥५४॥ जप म्हणजे अक्षरे दोनी । प्रख्यात असती त्रिभुवनी । जकार जन्म विच्छेदोनि । पकारे जन्मपाप दुरी ॥५५॥ चारी वेदांस मूळ एका । गायत्रीनाम नाशी पातका । याचि कारणे करावा निका । वेदपठणफळ असे ॥५६॥ ऐसा मंत्र न जरी जपे नर । वृथा जन्म जैसा सूकर । जप करा हो निर्धार । चिंतिले फल पाविजे ॥५७॥ न करावा उदकी बैसोन । त्वरित होय प्रज्ञाहीन । याचि कारणे सांगेन विस्तारोन । अग्नि तीनि विप्रमुखी ॥५८॥ आहवनीय गार्हपत्य । दक्षिणाग्नि तिसरा विख्यात । अग्निउदकसंपर्कै त्वरित । तेजत्व जाय अग्नीचे ॥५९॥ या कारणे उदक वर्जोनि । बैसिजे उत्तम आसनी । हस्तस्पर्शी नाभिस्थानी । जपावा माळ धरोनिया ॥४६०॥ उभेनी जपावा प्रातःकाळी । बैसोनि कीजे माध्याह्नकाळी । अथवा उभा ठाकोनि । उभय पक्षी करावा ॥६१॥ माध्याह्नी ह्रदयस्थानी । जपावा माळ धरोनि । हस्त मुखे स्पर्शोनि । सायंकाळी जपावा ॥६२॥ बैसोनि जपावा सायंकाळी । पहावा वृक्ष निर्मळी । जरी वृक्ष नसे जवळी । नासाग्रानयनी जपावा ॥६३॥ ब्रह्मचारी गृहस्थासी । जप नेमिला अष्टोत्तरेसी । वानप्रस्थ संन्यासी यासी । सहस्त्र मुख्य करावा ॥६४॥ संधिविग्रह होय जरी । अष्टाविंशति तरी करी । अशक्ति होय जरी । दहा वेळ जपावा ॥६५॥ उत्तम पक्ष मानसी । मध्यम गौप्य सुमुखेसी । अक्षरे प्रगट वाक्येसी । कनिष्ठ पुकार परियेसा ॥६६॥ त्रिपाद असती गायत्रीसी । मिळोनि न म्हणावी परियेसी । म्हणता होय महादोषी । महानरक अवधारा ॥६७॥ पृथक करोनि त्रिपदासी । जपा मंत्र अतिहर्षी । ब्रह्महत्यादि पापे नाशी । अनंत पुण्य लाधिजे ॥६८॥ अंगुष्ठजपे एक पुण्य । पर्वांगुलीने दशगुण । शंखमणीने होय शतगुण । प्रवालमाला सहस्त्रफळ ॥६९॥ स्फटिकमणि दहासहस्त्र । मौक्तिके पुण्य लक्षाधिक । पद्माक्षी निर्गुण जप । दशलक्ष पुण्य असे ॥४७०॥ कोटुगुणे सुवर्णमाला । कुश रुद्राक्ष अनंतफला । जप करा नित्य काळा । गौप्यमाला धरोनिया ॥७१॥ गौप्यमाला करकमळी । जप करा निश्चली । सौख्य पावे अनंत फळी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणाते ॥७२॥ जप करिता नुल्लंघिजे मेरु । उल्लंघिता पाप बोलिले अपारु । प्राणायाम केलिया त्रिवारु । मेरुलंघनपाप जाय ॥७३॥ गायत्रीजप तीन दिवस । प्रत्यही करावा एकादश । सर्व पातके होती नाश । त्रिरात्रीचे पाप जाय ॥७४॥ अष्टोत्तरशत जप करिता । अघोर पातक जाय त्वरिता । करोनि सहस्त्र जप एकाग्रता । उपपातके नासती ॥७५॥ महापातकादि दोषासी । कोटि जप करावा परियेसी । जे जे कर्म इच्छिसी । त्वरित होय अवधारा ॥७६॥ जप करावा मन दृढे । न पहावे मागे पुढे । शूद्रादिक यातीकडे । संभाषण न करावे ॥७७॥ द्रव्य घेवोनि एखाद्यासी । जपता होय अनंतदोषी । चांडाळयोनीत भरवसी । जन्म पावे परियेसा ॥७८॥ कंडू नये शरीर आपुले । नेणता जरी इतुके घडले । श्रोत्राचमन करा वहिले । दोष नाही अवधारा ॥७९॥ ब्राह्मणाचे दक्षिणकर्णी । सप्त देवता ऐका निर्गुणी । स्पर्श करिता तत्क्षणी । पापे जाती परियेसा ॥४८०॥ दृष्टी पडता चांडाळासी । द्विराचमने शुद्ध होसी । संभाषण झालिया पतितासी । आचमनस्नान करावे ॥८१॥ जपता निद्रा येई जरी । अधोवायु जांभई आलियावरी । क्रोधरूपे जपता जरी । पापरूपे अवधारा ॥८२॥ मौन्य करावे हे उत्तमी । अगत्ये बोलिजे संधिविषयी । तद्विष्णो मंत्र जपता कर्मीं । पापे जाती सकळिक ॥८३॥ नेणता घडे इतुके जरी । आचमन करावे श्रोत्री । अग्नि सूर्यधेनुदर्शन करी । विष्णुमंत्र जपावा ॥८४॥ ऐसा जप करावा विधीने । मनकामना होय पूर्ण । ऐकती समस्त ऋषिजन । म्हणोनि सांगे पराशर ॥८५॥ गायत्री जपावी ऐशी । प्रातःकाळी म्हणा मित्रस्य ऋषि । उदुत्यं मंत्र माध्याह्नेसी । इमं मे वरुण सायंकाळी ॥८६॥ शाखापरत्वे मंत्र असती । म्हणावे विधि जैसे असती । गोत्र प्रवर म्हणा भक्ती । वृद्धाचाराप्रमाणे ॥८७॥ चारी दिशा नमोनि । प्रदक्षिणा करावी सगुणी । गोत्र प्रवर उच्चारोनि । नमस्कार करा परियेसा ॥८८॥ ऐसी संध्या करून । मग करावे औपासन । सांगेन त्याचे विधान । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥८९॥ साय्म्प्रातवेला दोन्ही । औपासन करावे सगुणी । मिळोनि न करावे द्विजजनी । सर्वांनी पृथक्‍ पृथक्‍ हेचि जाणा ॥४९०॥ न करावे वेळणी आळंद्यात । भूमीवरी न करा नित्य । स्थंडिली करावे विहित । अथवा उदके सारवावे ॥९१॥ कुंडी स्थापोनि अग्नीसी । करावे नित्य उपासनेसी । वारा घालो नये त्यासी । हाते पर्णी आणि सुपे ॥९२॥ व्याधिष्ठ पर्णवाते होय । सुपे दरित्र धनक्षय । मुखे फुंकिलिया आयुष्य जाय । हस्तमूली होय मृत्यु ॥९३॥ फुंकणी अथवा विंझण्यासी । वायु घालावा अग्नीसी । काष्ठे समृद्धि परियेसी । ज्वलित असावा अग्नि देखा ॥९४॥ ज्वाला निघती जये स्थानी । आहुति घालावी तया वदनी । समिधा आणाव्या ब्राह्मणी । शूद्रहस्ते घेऊ नये ॥९५॥ समिधा पुष्पे दूर्वा देखा । आणो नये शूद्रे ऐका । होमद्रव्ये होती विशेखा । सांगेन नावे परियेसा ॥९६॥ साळी सावे नीवार । तंदुल असती मनोहर । गोधूम जव निर्धार । यावनाळ मुख्य असे ॥९७॥ साठी दाणे मिति प्रमाण । आहुति मुख्य कारण । अधिक न कीजे अथवा न्यून । घृतसंपर्क करावे ॥९८॥ घृत नसेल समयासी । तिल पवित्र होमासी । तिळांचे तैल परियेसी । तेही पवित्र असे देखा ॥९९॥ औपासन केलियावरी । ब्रह्मयज्ञ तर्पण करी । सांगेन विधि अवधारी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥५००॥ मुख्य सकळ प्रातःकर्म सारोनि । ब्रह्मयज्ञ करावा माध्याह्नी । उपासनादि कर्मै करोनि । मग करावा ब्रह्मयज्ञ ॥१॥ उदकसन्निध मुख्य स्थानी । करावे तर्पण ब्राह्मणी । प्राणायाम तीन करोनि । विद्युदसि मंत्र जपावा ॥२॥ दूर्वा घेऊनि दक्षिण करी । पूर्वमुख अथवा उत्तरी । बसावे वाम पादावरी । दक्षिण पाद ठेवोनि ॥३॥ उभयहास्तसंपुटेसी । ठेवावे दक्षिण जानुवासी । म्हणावे तीन प्रणवांसी । मग म्हणावे ऋचाक्षर ॥४॥ ॐ भू० ऐसे म्हणोनि । त्रिपदा गायत्री उच्चारोनि । तत्स० म्हणोनि । मग जपावी दश वेळा ॥५॥ स्वाध्याय दिवसासी । म्हणा वेद शक्तीसी । अनध्याय होय तया दिवसी । एक ऋचा म्हणा पन्नासा ॥६॥ तोही नये एखाद्यासी । मंत्र म्हणावा विशेषी । नमो ब्रह्मणे मंत्रासी । तीन वेळा जपावा ॥७॥ वृष्टिरासि मंत्रासी । जपोनि स्पर्शावे उदकासी । तर्पण करावे परियेसी । ऐक ब्राह्मणा एकचित्ते ॥८॥ ब्रह्मयज्ञ करावयासी । द्रव्य दर्भ परियेसी । वसुरुद्रआदित्यांसी । तृप्त समस्त देव पितर ॥९॥ एखादे दिवसी न घडे जरी । अथवा होय समय रात्री । जप करावा गायत्री । वेदपठण फल असे ॥५१०॥ देवतर्पण कुशाग्रेसी । मध्यस्थाने तृप्त ऋषि । मुळे पितृवर्गासी । तर्पण करावे परियेसा ॥११॥ न करावे तर्पण पात्रात । करावे आपण उदकात । भूमीवरी घरी नित्य । निषिद्ध असे करू नये ॥१२॥ दर्भ ठेवोनि भूमीवरी । तर्पण करावे अवधारी । विधियुक्त भक्तिपुरःसरी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥१३॥ तीळ धरोनि आपुल्या करी । तर्पण करावे अवधारी । ठेवो नये शिळेवरी । भूमी काष्ठपात्री देखा ॥१४॥ रोमकूपादि स्थानी देखा । तीळ ठेविता पावती दुःखा । तीळ होती कृमि ऐका । निषिद्ध बोलली स्थाने पाच ॥१५॥ घरी तर्पण करावयासी । तीळ अग्राह्य परियेसी । करावे आपण उदकासी । ऐका समस्त ऋषिजन ॥१६॥ श्वेत तीळ देवांसी । धूम्रवर्ण ऋषिजनांसी । कृष्णवर्ण पितरांसी । तीळतर्पण करावे ॥१७॥ यज्ञोपवीती सव्ये देवांसी । निवीती करावी ऋषींसी । अपसव्य पितरांसी । तर्पण करावे येणे रीती ॥१८॥ देवासी अंजुलि एक । ऋषींसी अंजुलिद्वय सम्यक । पितरांसी अंजुलि त्रिक । तर्पण ऐसे करावे ॥१९॥ स्त्रियांसी अंजुलि एक देखा । व्यतिरिक्त बंधूसी एक । सपत्‍नी आचार्य नामिका । द्वयांजुलि करावे ॥५२०॥ देवब्रह्मऋषीश्वरांसी । अक्षता मुख्य तर्पणासी । कृष्णतिलतर्पण पितरांसी । अनंत पुण्ये परियेसा ॥२१॥ आदित्य शुक्रवारेसी । प्रतिपदा मघा नक्षत्रासी । षष्ठी नवमी एकादशीसी । तिलतर्पण करू नये ॥२२॥ अथवा विवाह उपनयनासी । जन्मनक्षत्र जन्मदिवसी । आपुल्या घरी शुभदिवसी । तिलतर्पण करू नये ॥२३॥ जधी न करी तिलतर्पण । उदके मुख्य करा जाण । मुद्रिका हस्ती सुवर्ण । दर्भपवित्रे करावे ॥२४॥ पाय न धुता मंगलस्नान । तिलावीण करिता तर्पण । श्राद्ध करी दक्षिणेविण । निष्फल असे अवधारी ॥२५॥ निषिद्ध बोलिले ज्या दिवसी । तर्पण करावे उदकेसी । दिपवाळी चतुर्दशीसी । करावे तर्पण परियेसा ॥२६॥ अंगारक कृष्ण चतुर्दशीसी । करावे तर्पण परियेसी । यमाचे नावे विधींसी । यज्ञोपवीत सव्याने ॥२७॥ एकेक तीळ घेऊनि । त्रिवार अंजुलि देऊनि । यमाचे नाव उच्चारोनि । तर्पण करावे भक्तीने ॥२८॥ यमाची नावे त्रयोदशी । सांगेन ऐका विस्तारेसी । यम धर्मराजा परियेसी । मृत्यु अंतक चौथा जाणा ॥२९॥ वैवस्वत काल देखा । सर्वभूतक्षय ऐका । आठवा औदुंबरनामिका । नीलाय परमेष्ठी दहा जाणा ॥५३०॥ वृकोदर चित्ररेखा । चित्रगुप्त त्रयोदशिका । प्रत्येक नामे म्हणोनि एकेका । नदीत द्यावे परियेसा ॥३१॥ समस्त पातके नासती । रोगराई न पीडिती । अपमृत्यु कधी न येती । ग्रहपीडा न बाधे ॥३२॥ शुक्लपक्षी माघमासी । तर्पण करावे अष्टमीसी । भीष्मनामे परियेसी । वर्षपातके परिहरती ॥३३॥ ऐसे तर्पण करोनि । सूर्यनामे अर्घ्यै तिन्ही । द्यावी समस्त द्विजजनी । म्हणे नृसिंहसरस्वती ॥३४॥ सिद्ध म्हणे नामधारकासी । कृपामूर्ति स्वामी कर्मविधिसी । सांगता झाला ब्राह्मणासी । येणेपरी विहिताचार ॥३५॥ म्हणे सरस्वतीगंगाधर । ऐसा ब्राह्मणांचा आचार । वर्तता होय मनोहर । सर्वाभीष्टे साधतील ॥३६॥ इति श्रीगुरुचरित्रामृत । नामधारक शिष्य संवादत । वेदोपनिषदमतितार्थ । आचारनिरूपणाध्याय हा ॥५३७॥ इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निकनिरूपणं नाम षट्‍त्रिंशोऽध्यायः ॥३६॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ --------------------------------------------------------------------- अध्याय ३७ श्रीगणेशाय नमः । नामधारक विनवी सिद्धासी । पुढे कथा वर्तली कैसी । श्रीगुरु सांगती विस्तारेसी । काय निरूपिले यानंतर ॥१॥ ऐक नामधारका सगुणा । श्रीगुरु अवतार नारायणा । जाणे सर्व आचारखुणा । सांगतसे कृपेसी ॥२॥ त्रैमूर्तीच्या अवतारास । आचार सांगता काय प्रयास । ज्ञान देउनी पतितास । वेद म्हणविले कवणेपरी ॥३॥ ऐसे गुरुमूर्ति दातारु । भक्तजनकल्पतरु । सांगते झाले आचारु । कृपा करोनि विप्रासी ॥४॥ श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । गृहरक्षणार्थ कारणासी अग्निमंथनकाष्ठासी । संपादावे कृष्णामार्जार ॥५॥ श्रीखंडादि मणिघृते । तिळ कृष्णाजिन छागवस्त्रे । इतुकी असावी पवित्रे । दुरिते बाधा करू न शकती ॥६॥ शुक्लपक्ष सारसासी । पोसावे घरी परियेसी । समस्तपापविनाशी । धेनु असावी आपुले घरी ॥७॥ देवपूजेचे विधान । सांगेन ऐका एक मन । गृह बरवे संमार्जन । देवगुह असावे ॥८॥ हिरण्य रौप्य ताम्रेसी । अथवा मृत्तिका पात्रेसी । संमार्जन करावे विधींसी । निषिद्ध पात्रे सांगेन ॥९॥ कास्यपात्री कन्यकाहस्ती । नोवरी अथवा शूद्र जाती । न करावे वस्त्र धरोनि वामहस्ती । दक्षिण हस्ती सारवावे ॥१०॥ प्रारंभ करावा नैऋत्यकोनी । रात्री न करावे उदक घेउनी । अगत्य करणे घडे मनी । भस्मे करोनि सारवावे ॥११॥ रंगमाळिका घालोनि निर्मळ । असावे देवताभुवनी । मग बैसोनि शुभासनी । देवपूजा करावी ॥१२॥ जैसी संध्या ब्राह्मणासी । देवपूजा करावी तैसी । त्रिकाल करावे अर्चनासी । एकचित्ते मनोभावे ॥१३॥ त्रिकाळी न घडे ज्यासी । प्रातःकाळी करावी हर्षी । तेही न साधे परियेसी । माध्याह्नकाळी करावे ॥१४॥ सायंकाळी मंत्रेसी । पुष्पे वाहोनि भक्तीसी । ऐसे न साधे जयासी । भोजनकाळी करावे ॥१५॥ देवपूजा न करी नर । पावे त्वरित यमपुर । नरक भोगी निरंतर । ऐक ब्राह्मणा एकचित्ते ॥१६॥ विप्रकुळी जन्म जयासी । पूजा न करिता जेवी हर्षी । तोचि होय यमग्रासी । वैश्वदेव न करी नर ॥१७॥ देवपूजा करावयासी । सहा प्रकार परियेसी । उदकनारायण विशेषी । पूजिता तृप्ति जगन्नाथा ॥१८॥ दुसरा प्रकार सांगेन ऐका । अग्निदेवपूजा अधिका । मानसपूजा अतिविशेखा । एकचित्ते परियेसा ॥१९॥ सूर्यपूजा करिता जाण । संतुष्ट होय नारायण । सामान्यपक्षे स्थंडिली जाण । प्रतिमापूजा स्वल्पबुद्धि ॥२०॥ ज्ञाता असेल बुद्धिमंत । यज्ञपुरुषपूजा त्वरित । स्वर्गापवर्गा पूजा देत । यज्ञपुरुषपूजा मुख्य जाण ॥२१॥ अथवा पूजावे धेनूसी । ब्राह्मणपूजा विशेषी । गुरुपूजा मनोभावेसी । प्रत्यक्ष तुष्टे गुरुमूर्ति ॥२२॥ गुरु त्रैमूर्ति म्हणोनि । बोलती समस्त श्रुतिवचनी । सकळाभीष्टे तयापासूनी । पाविजे चारी पुरुषार्थ ॥२३॥ कलिप्रवेश होता नरू । न करिता अंतःकरण स्थिरू । उत्पत्ति केली शाङर्गधरू । समस्त कलि उद्धारावया ॥२४॥ शालिग्रामचक्रांकितेसी । प्रकाश केला ह्रषीकेशी । तीर्थ घेता परियेसी । समस्त पापे नासती ॥२५॥ आज्ञा घेऊनि श्रीगुरूची । पूजा करावी प्रतिमेची । वेदोक्त मंत्र करोनी वाची । विधिपूर्वक पूजावे ॥२६॥ स्त्रीजनादि शूद्रांसी । न म्हणावे वेदमंत्रेसी । आगमोक्तमार्गैसी गुरुनिरोपे करावे ॥२७॥ श्रीगुरूचे निरोपाने । पूजिजे काष्ठे पाषाणे । तेचि होती देव जाणे । होती प्रसन्न परियेसा ॥२८॥ शुचि आसनी बैसोनी । करावे प्राणायाम तिन्ही । येभ्योमाता म्हणोनि । चेतन करावा परमात्मा ॥२९॥ प्रणव मंत्रोनि द्वादशी । उदक प्रोक्षावे आपुल्या शिरसी । संकल्प करोनि अंगन्यासी । कलशपूजा करावी ॥३०॥ देवाच्या दक्षिण भागेसी । कलश ठेवावा परियेसी । पूजा करोनि भक्तीसी । शंखपूजा करावी ॥३१॥ निर्माल्य काढोनि विनयेसी । टाकावे ते नैऋत्यदिशी । धौत वस्त्र हांतरोनि हर्षी । दीप प्रज्वलित करावा ॥३२॥ स्मरावे मनी श्रीगुरूसी । मनोवाक्कायकर्मैसी । अर्चन करावे पीठासी । विधिपूर्वक अवधारा ॥३३॥ चारी द्वारे पूजोनि । दिशा पूजाव्या अर्चुनी । शांताकार करा ध्यानी । मग आवाहनावे मंत्रोक्त ॥३४॥ सहस्त्रशीर्षेति आवाहनोनि । पुरुषएवेदं आसनी । एतावानस्य म्हणोनि । पाद्य द्यावे अवधारा ॥३५॥ मंत्र म्हणोनि त्रिपादूर्ध्व ऐसा । अर्घ्य द्यावे परियेसा । तस्माद्विराड म्हणा ऐसा । देवासी आचमन समर्पावे ॥३६॥ यत्पुरुषेण मंत्रेसी । स्नपन करा देवासी । दुग्धादि पंचामृतासी । स्नपनपूजा करावी ॥३७॥ पुरुषसूक्तादि रुद्रेसी । श्रुतिमार्गै करोनि न्यासासी । स्नपन करावे परियेसी । एकचित्ते अवधारा ॥३८॥ स्नपन करूनि देवासी । बैसवावे शूभासनेसी । तयज्ञमिति मंत्रेसी । वस्त्रे द्यावी परियेसा ॥३९॥ तस्माद्यज्ञेति मंत्रेसी । यज्ञोपवीत द्यावे देवासी । येणेचि मंत्रे गंधाक्षतेसी । वहावे अनन्यभक्तीने ॥४०॥ तस्मादश्वा अजायन्त । ऐसा तुम्ही मंत्र म्हणत । पुष्पे वहावी एकचित्त । मनःपूर्वक देवासी ॥४१॥ पुष्पे वहावयाचे विधान । सांगेन ऐका ऋषिजन । आपण पेरिली कुसुमे सगुण । उत्तम पक्ष परियेसा ॥४२॥ पुष्पे असती अरण्यात । ती मध्यम प्रकार बोलिजेत । क्रय करूनि घेता विकत । अधम पुष्पे जाणिजे ॥४३॥ उत्तम न मिळता घ्यावी विकत । उत्तम पक्ष पुष्पे श्वेत । रक्त मध्यम अधम पीत । कृष्णचित्र अधमाधम ॥४४॥ वर्जावी शिळी पुष्पे देख । सच्छिद्र अथवा कृमिभक्षक । भूमीवरी पडे ऐक । पुष्प त्यजावे देवासी ॥४५॥ शिळी नव्हेती द्रव्ये जाणा । बिल्वपत्रे तुळसी आणा । सहस्त्रपत्रे कमळे नाना । सदा ग्राह्य देवांसी ॥४६॥ शतपत्रे बकुलचंपकासी । पाटले कमले पुन्नागेसी । मल्लिका जाती करवीरेसी । कल्हारपुष्पे अर्पावी ॥४७॥ विष्णुपूजा करावयासी । वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी । धत्तूर अर्क करवीरेसी । रक्त पुष्पे वर्जावी ॥४८॥ गिरिकर्णिका निर्गुडेसी । सेवगा कपित्थ करंजेसी । अमलपत्र कुष्मांडेसी । पुष्पे विष्णूसी वर्जावी ॥४९॥ ही वाहिल्या होय दोषी । सांगेन ऐका समस्त ऋषि । पुजा करिती विष्णुसी । त्यजावी याचि कारणे ॥५०॥ अर्कपुष्प वाहिल्यासी । विनाश होय आपणासी । धत्तूरपुष्पे प्रज्ञानासी । कोविदारे दरिद्रता ॥५१॥ श्रीकर्णिकापुष्पे वाहता । कुळक्षय होय त्वरिता । कंटुकारीपुष्पे वाहता । शोक होय परियेसा ॥५२॥ कंदपुष्पे होय दुःख । शाल्मलीपुष्पे रोग ऐक । त्याची कारणे करूनि विवेक । पुष्पे वहावी विष्णूसी ॥५३॥ वर्जा पुष्पे ईश्वरासी । सांगेन नावे परियेसी । कपित्थ केतकी शशांकेसी । श्यामपुष्पे वर्जावी ॥५४॥ काष्ठ पिंपळ करंज देखा । बकुल दाडिंब केतका । घातकी निंबादि पंचका । माधवीपुष्पे वर्जावी ॥५५॥ चूत कुंद यूथिका जाती । रक्त पुष्पे वर्जावी निरुती । ईश्वरार्चने दोष घडती । श्वेतपुष्पे मुख्य देखा ॥५६॥ पूजा करिता गणेशासी । वर्ज करा तुम्ही तुलसी । नित्यपूजा करा दूर्वैसी । दूर्वा वर्ज शक्तिदेवीते ॥५७॥ येणे विधी पुष्पे वाहता । काम्य होय तुम्हा त्वरिता । चतुर्विध पुरुषार्था । लाधाल तुम्ही अवधारा ॥५८॥ यत्पुरुषेति मंत्रेसी । सुगंध धूपादि परिमळेसी । ब्राह्मणोस्येति मंत्रेसी । एकार्तिक्य करावे ॥५९॥ चंद्रमामनसो इति मंत्रेसी । नैवेद्य अर्पावा देवासी । तांबूल अर्पिता म्हणा मंत्रासी । नाभ्याआसीदिति ऐसा ॥६०॥ सुवर्णपुष्पे नीरांजन । सप्तास्येति मंत्रे करून । पुष्पांजलि घेऊन । देवा यज्ञेति मंत्रे अर्पावी ॥६१॥ धातापुरस्तात्‍ मंत्रेसी । नमस्कारावे देवासी । अति संमुख पृष्ठदेशी । गर्भगृही करू नये ॥६२॥ नमस्काराचे विधान । सांगेन ऐका विद्वज्जन । सव्य देवप्रदक्षिणा । करूनि नमन करावे ॥६३॥ आपुला गुरु माता पिता । संमुख जावे बाहेरूनि येता । अथवा उत्तम द्विज देखता । संमुख जावोनि वंदावे ॥६४॥ सभा असेल द्विजांची । नमस्कार करा तुम्ही एकची । देवार्चनी तैसेची । नमस्कार पावे समस्ता ॥६५॥ माता पिता श्रीगुरूसी । नमस्काराची रीति ऐसी । उभय हस्ते कर्णस्पर्शी । एकभावे वंदावे ॥६६॥ सव्य पादावरी देखा । सव्य हस्त स्पर्शोनि निका । वामहस्ती वामपादुका । धरूनि नमन करावे ॥६७॥ गुरुस्थानांची नावे । सांगेन ऐका भावे । विचारोनिया बरवे । नमस्कारावे येणे विधी ॥६८॥ माता पिता गुरु धाता । भयहर्ता अन्नदाता । व्रतबंध केल्या पुरोहिता । सापत्‍नी ते गुरुस्थानी ॥६९॥ ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता । सापत्‍न असेल ज्याची माता । वय अधिक इष्टमित्रा । नमस्कारावे तयांसी ॥७०॥ निषिद्ध स्थाने नमावयासी । सांगेन ऐका तुम्हासी । उणे असेल वय ज्यासी । नमू नये विद्वज्जनी ॥७१॥ अग्नि समिधा पुष्पे कुशा । धरिला असेल अक्षतांकुशा । स्वहस्ती परहस्ती असता दोषा । अशस्त्रवध होईजे नमस्कारिता ॥७२॥ जप अथवा होम करिता । दूर देखिला द्विज येता । स्नान करिता जळी असता । नमन करिता दोष घडे ॥७३॥ एखादा विप्र असे धावत । नेणता अथवा धनगर्वित । क्रोधवंत किंवा मंगलस्नान करित । नमस्कार करू नये ॥७४॥ एकहस्ते ब्राह्मणासी । नमू नये परियेसी । सूतकिया मूर्ख जनांसी । करू नये नमस्कार ॥७५॥ गीतवाद्यादि नृत्येसी । संतुष्टावे देवासी । प्रार्थना करावी भक्तीसी । मग अर्चावे सनकादिका ॥७६॥ पूजा अपूर्व देवासी । हस्त ठेवूनि पीठेसी । उत्तरपूजा करावी हर्षी । मग करावे उद्वासन ॥७७॥ ऐसेपरी देवपूजा । करावी भक्तीने ऐका द्विजा । संस्कृत अन्न व्हावया काजा । वैश्वदेव करावा ॥७८॥ अग्नि अलंकार करूनि । अन्न अग्निकुंडी दाखवूनि । घृतसंमिश्रित करूनि । पंच भाग करावे ॥७९॥ एक भागाच्या दहा आहुति । दुसरा बळिहरणी योजिती । अग्रदान तिसरा करिती । चौथ्या मागे पितृयज्ञ ॥८०॥ मनुष्ययज्ञ पांचव्यासी । वैश्वदेव करावा मंत्रेसी । अन्न नाही ज्या दिवसी । तंदुलांनी करावा ॥८१॥ वैश्वदेव समयासी । अतिथि आलिया घरासी । चोर चांडाल होय हर्षी । पूजा करावी मनोभावे ॥८२॥ यम सांगे दूतासी । वैश्वदेव करिता नरासी । जाऊ नको तयापासी । विष्णुआज्ञा आम्हा असे ॥८३॥ मातापिताघातकियांसी । शुनि श्वपचचांडासांसी । अतिथि आलिया घरासी अन्न द्यावे परियेसा ॥८४॥ न विचारावे गोत्रकुळ । अन्न घालावे तात्काळ । विन्मुख झालिया पितृकुळ । वर्षै सोळा न येती घरासी ॥८५॥ प्रवासी असेल आपण जरी । औषधि घृत दधि क्षीरी । कंदमूळे फळे तरी । देवयज्ञ करावा ॥८६॥ अन्नाविणे अग्रदान । करू नये साधुजन । पंचमहायज्ञ करू ब्राह्मण । चांद्रायण आचरावे ॥८७॥ न होता वैश्वदेव आपुल्या घरी । भिक्षेसि आला नर जरी । भिक्षा घालिता पाप दूरी । वैश्वदेवफल असे ॥८८॥ बळिहरण घालोनि काडःई आपण । त्याणे आचरावे चांद्रायण । आपं काढिता दोष जाण । आणिकाकरवी काढवावे ॥८९॥ बळिहरण न काढिता जेवी जरी । सहा प्राणायाम त्वरित करी । तेणे होय पाप दूरी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥९०॥ गृहपूजा करूनि देखा । गोग्रास द्यावा विशेखा । नित्य श्राद्ध करणे ऐका । करूनि अन्न समर्पावे ॥९१॥ स्वधाकार पिंडदान । करू नये अग्नौकरण । ब्रह्मचारियासी तांबूलदान । दक्षिणा वर्ज परियेसा ॥९२॥ वैश्वदेव झालियावरी । उभा राहोनि आपुल्या द्वारी । अतिथिमार्ग पहावा निर्धारी । आलिया पूजन करावे ॥९३॥ श्रमोनि आलिया अतिथिसी । पूजा करावी भक्तीसी । अथवा अस्तमानसमयासी । आलिया पूजन करावे ॥९४॥ वर्णाना ब्राह्मणो गुरुः । ऐसे बोलती वेदशास्त्रु । अतिथि जाण सर्व गुरु । वैश्वदेवसमयासी ॥९५॥ वैश्वदेवसमयी अतिथिसी । पूजा करिता परियेसी । ती पावे देवांसी । तुष्टे ब्रह्मा इंद्र वह्नि ॥९६॥ वायुगण अर्यमादि देव । तृप्ति पावे सदाशिव । पूजा करावी एकभाव । सर्व देवता संतुष्टती ॥९७॥ अतिथीपाद प्रक्षाळिती । पितर सकळ तृप्त होती । अन्नदाने ब्रह्मा तृप्ति । विष्णुमहेश्वरा अवधारा ॥९८॥ यतीश्वरादि ब्रह्मचारी । जे समयी येती आपुल्या घरी । अन्न द्यावे निर्धारी । महापुण्य असे देखा ॥९९॥ ग्रासमात्र दिधला एक । मेरूसमान पुण्य अधिक । बरवे द्यावे त्यासी उदक । समुद्रासमान दान असे ॥१००॥ अतिथि आलिया घरासी । जेवी आपण त्यजूनी त्यासी । श्वानयोनी पावे हर्षी । गर्दभयोनी पुढे उपजे ॥१॥ ऐसे अतिथि पूजोन । मग करावे भोजन आपण । सर्वथा न करावे अन्न भिन्न । प्रपंच करिता दोष असे ॥२॥ सायंप्रातर्गृहस्थासी । भोजन करणे संतोषी । प्रक्षालन करोनि पादांसी । ओले पायी असावे ॥३॥ ओली असावी पाच स्थाने । हस्त पाद उभय जाणे । मुख ओले पंचम स्थाने । शतायुषी पुरुष होय ॥४॥ पूर्वाभिमुख बैसोन । भोजनसमयी धरा मौन । पाद उभय जोडोन । बैसावे ऐका एकचित्ते ॥५॥ मंडल करावे चतुष्कोनी । वरी भस्म प्रोक्षोनि । क्षत्रियास मंडल त्रिकोनी । वर्तुळ वैश्यासी परियेसा ॥६॥ शूद्रे अर्धचंद्राकार । मंडल करावे परिकर । आवाहनावे सुरवर । आदित्य वसु रुद ब्रह्मा ॥७॥ पितामहादि देवता । तया मंडली उपजविता । याचि कारणे तत्त्वता । मंडलाविणे जेवू नये ॥८॥ न करिता मंडल जेवी जरी । अन्न नेती निशाचरी । पिशाच असुर राक्षस परी । अन्नरस नेती अवधारा ॥९॥ उत्तम पूर्वाभिमुखी देख । पश्चिम मध्यम ऐक । पितृकार्या उत्तरमुख । सदा दक्षिण वर्जावी ॥११०॥ धरावे पात्र सुवर्ण रजत ताम्रपात्र । पद्मअपात्र पालाशपात्र । पुण्यपात्र परियेसा ॥११॥ जेविता वर्जावे गृहस्थांनी ताम्रपात्र । यतींनी सुवर्ण अथवा रजत । ताम्रशुक्तिशंखज पात्र । स्फटिक पाषाण यतीसी ॥१२॥ कर्दलीगर्भपत्रेसी । पद्मपत्रजळे स्पर्शी । वल्लीपालाशपत्रेसी । जेविता चांद्रायण आचरावे ॥१३॥ वट अश्वत्थ अर्क पटोल । कदंब कोविदारपर्णे कोमळ । भोजन करिता तात्काळ । चांद्रायण आचरावे ॥१४॥ लोहपात्र आपुले करी । ताम्र मृण्मय पृष्ठपर्णावरी । कार्पासपत्री वस्त्रावरी । जेविता नरकाप्रती जाय ॥१५॥ कास्यपात्री जेविल्यासी । यश बळ प्रज्ञा आयुष्यासी । वढे नित्य अधिकेसी । गृहस्थांनी नित्य कास्यपात्र ॥१६॥ असावे पात्र पाच शेर । नसावे उने अधिक थोर । उत्तमोत्तम षट्‍ शेर । सुवर्णपात्रासमान देखा ॥१७॥ कास्यपात्रीचे भोजन । तांबूलासहित अभ्यंगन । यती ब्रह्मचारी जाण । विधवा स्त्रियांनी वर्जावे ॥१८॥ श्वानाच्या चर्माहुनी । निषेध असे एरंडपानी । निषेध अधिक त्याहुनी । आणिक जेविल्या भिन्नताटी ॥१९॥ फुटके कास्यपात्रेसी । जेविता होय महादोषी । संध्याकाळी जेविता हर्षी । महापातकी होय जाणा ॥१२०॥ जवळी असता पतित जरी । जेवू नये अवधारी । शूद्र जेविल्या शेषावरी । जेवू नये ब्राह्मणाने ॥२१॥ सवे घेउनी बाळासी । जेवू नये श्राद्धदिवसी । आसन आपुले आपणासी । घालू नये ब्राह्मणाने ॥२२॥ आपोशन आपुले हाती । घेऊ नये मंदमती । तैल घालुनी स्वहस्ती । आपण अभ्यंग करू नये ॥२३॥ भोजनकाळी मंडळ देखा । करू नये स्वहस्तका । आयुष्यक्षय पुत्रघातका । म्हणिजे नाम तयासी ॥२४॥ नमस्कारावे वाढिता अन्न । अभिधारावे पहिलेचि जाण । प्राणाहुति घेता क्षण । घृत घालावे स्वहस्ताने ॥२५॥ उदक घेऊनि व्याह्रति मंत्री । प्रोक्षोनि अन्न करा पवित्री । परिषिंचावे तेचि रीती । मग नमावे चित्रगुप्ता ॥२६॥ बळी घालोनि चित्रगुप्तासी । काढवावे सवेचि परियेसी । वाम हस्तक धुवोनि सरसी । पात्र दृढ धरावे ॥२७॥ अंगुष्ठतर्जनीमध्यमांगुलीसी । धरावे पात्र वामहस्तेसी । आपोशन करावे सव्यकरेसी । आणिकाकरवी घालावे ॥२८॥ आपोशन उदक सोडोनि जरी । आणिक घेती उदक तरी । श्वानमूत्र घेतल्यापरी । एकचित्ते परियेसा ॥२९॥ धरिले आपोशन ब्राह्मणासी । नमस्कारिता महादोषी । आशीर्वाद घेऊ नये तयापासी । उभयतांसी दोष घडे ॥१३०॥ मौन असावे ब्राअह्मणे देख । बोलू नये शब्दादिक । आपोशन घ्यावे मंत्रपूर्वक । मग घ्याव्या प्राणाहुति ॥३१॥ आपोशनाविण भोजन करी । पापविमोचन करा तरी । अष्टोत्तरशत मंत्र गायत्री । जपता दोष परिहरे ॥३२॥ प्राणाहुतीचे विधान । सांगेन ऐकिजे ब्राह्मण । प्राणाग्निहोत्र करिता जाण । समस्त पापे जाती देखा ॥३३॥ जैसा कार्पासराशीची । अग्नि लागता परियेसी । जळोनि जाय त्वरितेसी । तैसी पापे नासती ॥३४॥ प्राणाहुतीचे लक्षण । चतुर्विध पुरुषार्थ जाण । अन्न स्पर्शोनि मंत्र म्हणे । गीताश्लोक प्रख्यात ॥३५॥ श्लोक ॥ अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः । प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‍ ॥३६॥ टीका ॥ अन्नं ब्रह्म रसो विष्णु । भोक्ता देव गिरिजारमणु । ऐसा तुम्ही मंत्र म्हणोनु । अग्निरस्मि मंत्र जपावा ॥३७॥ मग घ्याव्या प्राणाहुति । आहेति पंच मंत्र प्रख्याति । तर्जनी मध्यम अंगुष्ठधृती । प्राणाय स्वाहा म्हणावे ॥३८॥ मध्यम अनामिका अंगुष्ठेसी । अपानाय स्वाहा म्हणा हर्षी । व्यानाय स्वाहा म्हणा यांसी । कनिष्ठिकाअनामिकाअंगुष्ठेसी ॥३९॥ अंगुष्ठतर्जनीकनिष्ठिकेसी । उदानाय स्वाहा म्हणा हर्षी । पंचांगुलीने परियेसी । समानाय स्वाहा म्हणावे ॥१४०॥ प्राणाहुती घेतल्या अन्न । दंता स्पर्शो नये जाण । जिव्हे गिळावे तक्षण । मग धरावे मौन देखा ॥४१॥ मौन धरावयाची स्थाने । सांगेन ऐका अतिउत्तमे । स्नानासमयी धरा निर्गुणे । न धरिता फल असेना ॥४२॥ होम करिता न धरी मौन । लक्ष्मी जाय तत्क्षण । जेविता मौन न धरिता आपण । अपमृत्यु घडे त्यासी ॥४३॥ अशक्य असेल मौन जरी । प्राणाहुति घेई तववरी । मौन धरावे अवधारी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥४४॥ पिता जिवंत असे ज्यासी । अथवा ज्येष्ठ बंधु परियेसी । धरू नये मौनासी । श्राद्धान्न जेविता धरावे ॥४५॥ पंच प्राणाहुति देता । सर्वांसी मौन ग्राह्यता । असेल पिता वडील भ्राता । मौन धरिल्या अधःपात ॥४६॥ जेविता प्रथम मधुरान्न । भोजन करावे नरे जाण । भक्षून पूर्वी द्रवान्न । कठिणांश परियेसा ॥४७॥ भोजनांती समयासी । जेवू नये द्रवान्नांसी । बळ जाय परियेसी । शीघ्र भोजन करावे ॥४८॥ धेनूसी उदक प्यावयासी । जितुका वेळ होय त्यासी । भोजन करावे परियेसी । शीघ्र भोजन मुख्य जाणा ॥४९॥ भोजन करावयाची स्थिति । सांगेन ऐका ग्रासमिति । संन्यासी-मुनि-यती । अष्ट ग्रास ध्यावे जाण ॥१५०॥ षोडश ग्रास अरण्यवासी । द्वात्रिशत गृहस्थासी । मिति नाही ब्रह्मचार्‍यासी । एकचित्ते परियेसा ॥५१॥ जितुका मावेल आपुल्या मुखी । तितुका ग्रास घ्यावा विशेखी । अधिक घेता ग्रास मुखी । उच्छिष्ठ भक्षिले फळ देखा ॥५२॥ अर्धा ग्रास भक्षूनि । उरले ठेविती आपुल्या भाणी । चांद्रायण आचरावे त्यांनी । उच्छिष्ठ भोजन तया नाव ॥५३॥ न बैसावे सहभोजनासी । इष्टसोयरे इत्यादिकांसी । व्रतबंधाविणे पुत्रासी । कन्याकुमारांसी दोष नाही ॥५४॥ सांडू नये अन्न देखा । घृत पायस विशेष ऐका । सांडावे थोडे ग्रास एका । जेवू नये सर्व अन्न ॥५५॥ भोजन संपेपर्यंत । पात्री धरावा वामहस्त । जरी सोडील अजाणत । अन्न वर्जोनि उठावे ॥५६॥ या कारणे द्विजजना । सोडू नये पात्र जाणा । अथवा न धरावे पूर्वीच जाणा । दोष नाही परियेसा ॥५७॥ वस्त्र गुंडाळोनि डोयीसी । अथवा संमुख दक्षिणेसी । वामपादावरी हस्तेसी । जेविता अन्न राक्षस नेती ॥५८॥ वामहस्त भूमीवरी । ठेवूनि नर भोजन करी । रोग होय शरीरी । अंगुली सोडोनि जेवू नये ॥५९॥ अंगुली सोडूनि जेवी जरी । दोष गोमांस भक्षिल्यापरी । दोष असती नानापरी । स्थाने असती भोजनासी ॥१६०॥ अश्वगजारूढ होऊनि । अथवा बैसोनि स्मशानी । देवालयी शयनस्थानी । जेवू नये परियेसा ॥६१॥ निषिद्ध जेवण करपात्रेसी । ओले नेसोनि आर्द्रकेशी । बहिर्हस्त बहिःकेशी । जेविता दोष परियेसी ॥६२॥ यज्ञोपविताच्या उपवीतीसी । भोजन करावे परियेसी । जेविता आपुल्या संमुखेसी । पादरक्षा असू नये ॥६३॥ ग्रास उदक कंद मूळ । इक्षुदंडादि केवळ । भक्षोनि पात्री ठेविता सकळ । उच्छिष्ट होय अवधारा ॥६४॥ भोजन करी स्नानाविणे । न करिता होम जेवी कवणे । अन्न नव्हे कृमि जाणे । म्हणे पराशर ऋषि ॥६५॥ पर्णपृष्ठावरी रात्रीसी । दीपेविण जेविल्यासी । महादोष असे तयासी । कृमि भक्षिल्यासमान होय ॥६६॥ दीप जाय भोजन करिता । पात्र धरावे स्मरोनि सविता । पुनरपि आणोनि लाविता । मग भोजन करावे ॥६७॥ पात्री असेल जितुके अन्न । तितुकेचि जेवावे परिपूर्ण । आणिक घेता दोष जाण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥६८॥ स्पर्शो नये जेविता केश । कथा सांगता महादोष । दिसू नये व्योम आकाश । अंधकारी जेवू नये ॥६९॥ न ठेविता शेष स्त्रियेसी । जेविता होय अत्यंत दोषी । ठेविले न जेविता स्त्रिया दोषी । महापातके घडती जाणा ॥१७०॥ शून्यदेवदेवालयी । देवस्थान आपुले गृही । जलसमीप संध्यासमयी । जेवू नये परियेसा ॥७१॥ पात्रे ठेवूनि दगडावरी । जेवू नये अवधारी । अवलोकू नये मुखावरी । स्त्रीजनाचे परियेसी ॥७२॥ न करावे सहभोजन । जेविता होय उच्छिष्टभक्षण । कुलस्त्रियेसी करिता भोजन । निर्दोष असे परियेसा ॥७३॥ प्राशन शेष उदकासी । घेऊ नये उच्छिष्टासी । अगत्य घडे संधीसी । किंचित्‍ सांडूनि घेईजे ॥७४॥ वस्त्रोदक घेतल्यासी । अपार दोष घडती तयासी । जन्म पावे श्वानयोनीसी । पडे मागुती नरकात ॥७५॥ शब्द होय उदक घेता । अथवा क्षीर घृत सेविता । आपोशनोदक प्राशिता । सुरापानसमान असे ॥७६॥ महाजळी रिघोनि । उदक घेती मुखांतुनी । अथवा जे घेती उभ्यानी । सुरापानसमान जाणा ॥७७॥ द्वयहस्तांजुळि करूनि । घेऊ नये उदक ज्ञानी । घ्यावे एक हस्ते करूनि । वाम हस्त लावू नये ॥७८॥ सभे बैसोनि एकासनी । अथवा आपुले हातुरणी । प्राशन करू नये पाणी । महादोष परियेसा ॥७९॥ वाढावे भिन्न पात्रेसी । पाहू नये आणिक यातीसी । रजस्वला स्त्रियांसी । चांडाळ श्वान पाहू नये ॥१८०॥ दृष्टि पडे इतुकियासी । ध्वनि ऐकता कर्णासी । त्यजावे अन्न त्वरितेसी । जेविता दोष परियेसी ॥८१॥ कलहशब्द कांडण दळण । ऐकता जेवू नये अन्न । अपशब्द स्पृष्टास्पृष्ट जाण । त्यजावे अन्न परियेसा ॥८२॥ नेणते लोक पंक्तीसी । घेऊ नये परियेसी । अगत्य घडे संधीसी । उदके भस्मे करा पृथक ॥८३॥ अथवा स्तंभ असेल मध्य । द्वारमार्ग असेल शुद्ध । उदके वेष्टिता आपुले परिघ । दोष नाही परियेसा ॥८४॥ कृष्ण वस्त्र नेसोनि आपण । जेविता दोष अपार जाण । स्त्रीजन वाढिती कांसेविण । उच्छिष्टसमान परियेसा ॥८५॥ ऐसा विचार करूनि मनी । करावे भोजन द्विजजनी । विकिरिद विलोहित म्हणोनि । अभिमंत्रावे शेष अन्न ॥८६॥ विकिरीदे इति मंत्रासी । म्हणावा अघोर ऋषि । रुद्रदेवता परियेसी । अन्नाभिमंत्रणे विनियोग ॥८७॥ ऐसा मंत्र जपोन । हाती घ्यावे शेषान्न । यमाच्या नावे बळी घालोन । उत्तरापोशन मग घ्यावे ॥८८॥ उच्छिष्ट सर्व पात्रीचे । घेऊनि हाती म्हणा वाचे । रौरवमंत्र असे त्याचे । पात्राजवळी ठेवावे ॥८९॥ उठोनि जावे प्रक्षालनासी । गंडूष करोनि मग हस्त स्पर्शी । न करित गंडूष प्रक्षाली हस्तासी । आत्मघातकी तोचि जाणा ॥१९०॥ मुख प्रक्षाळिता परियेसी । मध्यमांगुली दात घासी । तर्जनी अंगुष्ठे महादोषी । रौरव नरकी परियेसा ॥९१॥ बरवे हस्तप्रक्षालन । करावे दंतशोधन । हातीचे पवित्र सोडून । टाकावे नैऋत्य दिशे ॥९२॥ अंगुष्ठमात्र पुरुषा । म्हणावा मंत्र परियेसा । हस्त घासोनि चक्षुषा । उदक लावावे अवधारा ॥९३॥ ऐसा जरी न म्हणा मंत्र । चक्षुरोग होय त्वरित । या कारणे करा निश्चित हस्तोदके आरोग्यता ॥९४॥ द्विराचमन करोनि । आयंगौ मंत्र म्हणोनि । दुपदादिवेन्मुमुचा म्हणोनि । पादप्रक्षालन करावे ॥९५॥ ऐसा तुम्ही मंत्र जपता । भोजनठायी जाऊनि बैसता । द्विराचमन करूनि निगुता । नासिकास्पर्श मग करावा ॥९६॥ स्मरावे मग अगस्त्यासी । कुंभकर्ण वडवाग्नीसी । वृकोदर शनैश्चरासी । इल्वल वातापि जीर्य म्हणावे ॥९७॥ हस्त दाखवावे अग्निसी । आणिक सांगेन परियेसी । बंधुवर्ग असती जयासी । पुसू नये वस्त्रे कर ॥९८॥ मग स्मरावे श्रीगुरूसी । आणिक स्मरावे कुळदेवतेसी । येणेपरी विधीसी । भोजन करावे द्विजोत्तमे ॥९९॥ विप्र विनवी श्रीगुरूसी । भोजनप्रकार सांगितला आम्हासी । विधिनिषिद्ध अन्नै कैसी । निरोपावी दातारा ॥२००॥ विप्रवचन ऐकोनि । निरोपिती श्रीगुरु संतोषोनि । ऐक ब्राह्मणा म्हणोनि । अतिप्रेमे निरोपिती ॥१॥ म्हणे सरस्वती गंगाधरु । ब्राह्मणपणाचा आचारु । निरोपिला गुरुनाथे समग्रु । म्हणोनि विनवी संतोषे ॥२॥ वैश्वदेवाविणे अन्न । अथवा गणान्न परिपुर्ण । घातले असेल बहु लवण । बहुमिश्रितान्न जेऊ नये ॥३॥ लशुन गाजर कंद मुळा । वृंताक श्वेत जो असे भोपळा । छत्राकार शाखा सकळा । वर्जाव्या तुम्ही परियेसा ॥४॥ धेनुअजामहिषीक्षीर । प्रसूतीचे । वर्जावे । दशरात्र । नूतनोदक पर्जन्य पूर । त्रिरात्रीचे वर्जावे ॥५॥ कूष्मांड डोरली पडवळेसी । मुळा बेल आवळेसी । न भक्षावे प्रतिपदेसी । भक्षिता पाप परियेसा ॥६॥ स्वर्गापवर्ग चाड ज्यासी । अष्टमी वर्जावी औदुंबरासी । अमलकफळ रात्रीसी । वर्जावे भानुवासर सप्तमी ॥७॥ बेलफळ वर्ज शुक्रवारी । शमीफळ मंदवारी । भक्षिता लक्ष्मी जाय दुरी । वर्जावे ते दिवसी परियेस ॥८॥ धात्रीफळ रात्रीसी । भक्षिता हानि प्रज्ञेसी । नाश करी वीर्यासी । धात्रीफळ वर्जावे ॥९॥ नख केश पडिलिया अन्ना । स्पर्श केलिया मार्जार जाणा । वायस घारी कुक्कुट जाणा । स्पर्श केलिया अन्न त्यजावे ॥२१०॥ धेनुमूषक मुखस्पर्शे । अथवा स्पर्शे अधःकेशे । त्यजावे अन्न भरवसे । असेल उच्छिष्ट अन्नाजवळी ॥११॥ एक हाती वाढले अन्न । शिळे असेल शीत जाण । वर्जावे तुम्ही ब्राह्मण । निषिद्ध बोलिले आचार्य ॥१२॥ घृततैलमिश्रित । शिळे अन्न अपवित्र । तळिले असेल सर्वत्र । शिळे नव्हे सर्वथा ॥१३॥ विप्र विकिती गोरस । घृत क्षीर परियेस । घेता घडती महादोष । साक्षात वह्निपक्व जेवू नये ॥१४॥ माषान्नाचे वटक देखा । शिळे न होती कधी ऐका । जैसे लाह्यापीठ देखा । शिळे नव्हे परियेसा ॥१५॥ कंदमूळादि सुरान्न । जवांचे असेल परमान्न । गुडयुक्त असेल अन्न । शिळे नव्हे परियेसा ॥१६॥ ऐशा शिळ्या अन्नासी । दोष नाही परियेसी । विटाळ होता महादोषी । शुचि स्थानी असावे ॥१७॥ भोजन केलिया नंतर । तांबूल घ्यावे परिकर । क्रमुकचूर्ण पर्ण सत्वर । घ्यावे द्यावे ब्राह्मणी ॥१८॥ तिळमिश्रित भक्ष्यासी । जेवु नये रात्रीसी । जेविता होय महादोषी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणाते ॥१९॥ क्रमुक एक सुखारोग्य । द्वय देता निश्चळ आरोग्य । त्रीणि द्यावी महा भाग्य । चतुर्थे दुःख होय जाणा ॥२२०॥ पाच क्रमुक देता जरी । आयुष्य प्रज्ञा वाढे भारी । देऊ नये सहा सुपारी । मरण सांगे परियेसा ॥२१॥ पर्ण अग्र मूल न काढी जरी । व्याधि संभवे अवधारी । अग्र भक्षिता पाप भारी । चूर्णपर्णे आयुष्य क्षीण ॥२२॥ पर्णपृष्ठी बुद्धिनाश । द्विपर्ण खाता महादोष । ऐश्वर्याचा होय विनाश । ऋषिसंमत असे जाणा ॥२३॥ पर्णैविण क्रमुक मुखी । घालिता आपण होय असुखी । सप्त जन्म दरिद्री दुःखी । अज्ञानी होय अंतकाळी ॥२४॥ यतीश्वरादिब्रह्मचारी । रजस्वला स्त्री विधवा जरी । तांबूल भक्षिता मांसपरी । रस त्याचा सुरापानसम ॥२५॥ तांबूल भक्षिल्यानंतर । सायंसंध्या करावी विप्रे । सूर्यअर्धमंडळ उतरे । अर्घ्यै द्यावी परियेसा ॥२६॥ बैसोनि द्यावी अर्घ्यै तिन्ही । चारी द्यावी काळ क्रमूनि । गायत्री मंत्र जपूनि । इमंमेवरुण म्हणावा ॥२७॥ गोत्रप्रवर उच्चारोन । मग करावे औपासन । करावे निशि भोजन । क्षीरमिश्रित मुख्य असे ॥२८॥ रात्री करिता परिसिंचना । ऋतंत्वा सत्यं मंत्र म्हणा । येणे विधी करा भोजना । पूर्वी जैसे बोलिले असे ॥२९॥ भोजन झालियानंतर । वेदाभ्यास एक प्रहर । मग जावे शयनावर । येणे विधी आचरावे ॥२३०॥ शयन करावयाचे विधान । सांगेन ऐका विद्वज्जन । पराशर सांगे वचन । तेचि विधान सांगतसे ॥३१॥ खट्‍वा असावी निर्मळ जाण । वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण । औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण । न करावी खट्‍वा परियेसा ॥३२॥ निषिद्ध जांबूळ काष्ठाची । वर्जावी प्रेतगजदंताची । भिन्नकाष्ठ त्यजावी साची । बरवी असावी खट्‍वा देखा ॥३३॥ सुमुहूर्तै विणावी खट्‍वा देखा । धनिष्ठा भरणी मृगशीर्षी दूषका । वार सांगेन विशेखा । शूभाशुभफळ असे ॥३४॥ आदित्यवारी लाभ देखा । चंद्रवारी महामुखा । भौमवारी पाविजे दुःखा । बुधवारी सांगे महापीडा ॥३५॥ गुरुवारी विणल्यासी । सहा पुत्र होती त्यासी । शुक्रवारी अतिविशेषी । मृत्यु पावे मंदवारी ॥३६॥ स्वगृही शयन पूर्वशिरेंसी । श्वशुरालयी दक्षिणेसी । प्रवासकाळी पश्चिमेसी । शयन करावे परियेसा ॥३७॥ सदा निषिद्ध उत्तर दिशा । वर्जले फळ सांगितली दिशा । विप्रे आचरावा ऐसा । ऋषिमार्ग शुभाचार ॥३८॥ पूर्ण कुंभ ठेऊनि उशी । मंगळ द्रव्य घालावे बहुवशी । रात्रिसूक्त म्हणावे हर्षी । विष्णुस्मरण करावे ॥३९॥ मग स्मरावा अगस्त्यऋषि । माधव मुचुकुंद परियेसी । आस्तिक कपिल महाऋषि । सर्पस्तुति करावी ॥२४०॥ निषिद्ध स्थाने निजावयासी । सांगेन सर्व परियेसी । जीर्ण देवालयी स्मशानासी । एक वृक्षातळी वर्जावे ॥४१॥ चारी बिदी चोहाटेसी । ईश्वरस्थान परियेसी । मातापिता निजले स्थळासी । निजू नये परियेसा ॥४२॥ वर्जावे वारुळाजवळी । आणि तळ्याचे पाळी । नदीतीरी नसता जवळी । घोर स्थळी निजू नये ॥४३॥ वर्जावे शयन धान्यावरी । निजू नये मोडके घरी । वडील खाली निजतील तरी । खट्‍वा वर्जावी त्यापुढे ॥४४॥ नेसून ओले अथवा नग्न । निजू नये शिर वेष्टून । आकाशाखाली वर्जावे शयन । दीप असता निजू नये ॥४५॥ पूर्वरात्री अपरात्रीसी । निजू नये परियेसी । असू नये स्त्रियेपासी । रजस्वला चतुर्थदिनी ॥४६॥ असावे जानवे उपवीतीसी । दृष्टी न पडावी योनीसी । आयुष्य क्षीण परियेसी । दीप वर्जावा या कारणे ॥४७॥ नीळ वस्त्र नेसले स्त्रियेसी । करिता संग परियेसी । पुत्र उपजे चांडाळेसी । शुभ्र वस्त्र विशेष ॥४८॥ रजस्वला न होता स्त्रियेसी । न करावा संग परियेसी । संग करिता महादोषी । आणिक प्रकार एक असे ॥४९॥ दश वर्षे होता कन्येसी । रजस्वला सर्वत्रांसी । ऐका तुम्ही सर्व ऋषि पराशर सांगतसे ॥२५०॥ ऋतुकाळ असता स्त्रियेसी । गावासी जाता परियेसी । भ्रूणहत्या होय दोषी । प्रख्यात असे परियेसा ॥५१॥ वृद्ध अथवा वांझेसी ।असती पुत्र जिसी । बहु कन्या होती जियेसी । चुकता ऋतुकाळ दोष नाही ॥५२॥ ऋतु देता चतुर्थ दिवसी । पुत्र उपजे अल्पायुषी । कन्या होय पाचवे दिवसी । सहावे दिनी पुत्र परियेसा ॥५३॥ विषम दिवसी कन्या जाण । सम दिवसी पुत्र सगुण । दहा दिवस ऋतुकाळ खूण । चंद्रबळ असावे ॥५४॥ मूळ मघा रेवती दिवसी । संग न करावा परियेसी । कोप नसावा उभयतांसी । संतोषरूपे असावे ॥५५॥ ऋतुकाळी स्त्रीपुरुषांसी । जे जे असेल मानसी । सत्त्वरजतमोगुणेसी । तैसा पिंड उपजे देखा ॥५६॥ ऐसा ब्राह्मणाचा आचार । सांगता झाला पराशर । ऐकोनि समस्त ऋषीश्वर । येणेपरी आचरती ॥५७॥ श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । ऐसा आचार परियेसी । जे आचरती विधींसी । दैन्य कैचे तया घरी ॥५८॥ ते वंद्य होत देवांसी । कामधेनु येईल घरासी । लक्ष्मी राहे अखंडेसी । पुत्रपौत्री नांदती ॥५९॥ होय आपण शतायुषी । न घडती दोष काही त्यासी । तो न भिई कळिकाळासी । ब्रह्मज्ञानी होय जाणा ॥२६०॥ काळमृत्यु चुके देखा । अपमृत्यु घडे कैचा ऐका । ऐसा आचार आहे निका । नित्य रहाटावे येणेपरी ॥६१॥ ऐसे ऐकोनिया वचना । विप्र लागे श्रीगुरुचरणा । झाला उपदेश उद्धारणा । कृपासागर गुरुमूर्ति ॥६२॥ भक्तजन तारावयासी । अवतरलासी ह्रषीकेशी । परिहरिले अंधकारासी । ज्ञानज्योती प्रकाशली ॥६३॥ ऐसे विनवोनि ब्राह्मण । पुनरपि धरिले श्रीगुरुचरण । श्रीगुरुमुर्ति संतोषोन । प्रसन्न झाले तये वेळी ॥६४॥ म्हणती श्रीगुरु तयासी । आचार सांगितला तुज हर्षी । नव जावे आता भिक्षेसी । आचार करूनि सुखी असे ॥६५॥ जे जे इच्छिसी कामना । होईल निरुती सत्य जाणा । कन्या पुत्र नांदती सगुणा । संदेह न धरावा मानसी ॥६६॥ ऐसा वर लाधोनि । विप्र गेला संतोषोनि । होता तैसा आचरोनि । सकळाभीष्टे लाधला ॥६७॥ सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसे परियेसी । ऐकता ज्ञान समस्तांसी । मूढ होय ब्रह्मज्ञानी ॥६८॥ अज्ञानतिमिरअंधकारासी । ज्योतिप्रकाश कथा सुरसी । जे जे इच्छिले मानसी । पाविजे त्वरित अवधारा ॥६९॥ म्हणे सरस्वतीगंगाधरु । श्रीगुरुचरित्र असे सुरतरु । ऐकता होय संतोष फारु । सकळाभीष्टे साधती ॥२७०॥ इति श्रीगुरुचरित्र । नामधारका शिष्य सांगत । आचार जो का समस्त । निरोपिला श्रीगुरुनाथे ॥२७१॥ इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निककर्मनिरूपणं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः ॥३७॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

Search

Search here.