श्रीगुरुचरित्र अध्याय ५ ते ७
ग्रंथ - पोथी > गुरुचरित्र Posted at 2019-02-09 09:30:56
श्रीगुरुचरित्र
अध्याय ५
श्रीगणेशाय नमः ।
नामधारक भक्तासी । सांगे सिद्ध विस्तारेसी । अवतार झाला मानुषी । भक्तजन तारावया ॥१॥
ऐक भक्ता नामधारका । अंबरीषाकारणे विष्णु देखा । अंगकारिले अवतार ऐका । मानुषी नाना रूप घेतसे ॥२॥
मत्स्य कूर्म वराह देख । नराचा देह सिंहाचे मुख । वामनरूप झाला भिक्षुक । झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी ॥३॥
दशरथाचे कुळी जन्म । प्रख्यात अवतार श्रीराम । राजा होऊनि मागुती जन्म । गौळियाघरी गुरे राखी ॥४॥
वस्त्रे फेडूनि झाला नग्न । बौद्धरूपी झाला आपण । होऊनि कलंकी अवतार जाण । तुरुंगारूढ काय आवडी ॥५॥
नाना प्रकार नाना वेष । अवतार धरी ह्रषीकेश । तारावया भक्तजनास । दुष्टहनन करावया ॥६॥
द्वापारांती झाला कली । अज्ञान लोक ब्राह्मणकुळी । आचारहीन होऊनि प्रबळी । वर्तती महिमा कलियुगी ॥७॥
भक्तजनतारणार्थ । अवतार धरी श्रीगुरुनाथ । सगराकारणे भगीरथ । आणी गंगा भूमंडळी ॥८॥
तैसे एक विप्रवनिता । आराधी श्रीविष्णु दत्ता । तिचे उदरी अवतार धरिता । आश्चर्य झाले परियेसा ॥९॥
पिठापूर पूर्वदेशी । होता ब्राह्मण उत्तमवंशी । आपस्तंभ शाखेसी । नाम आपळराजा जाण ॥१०॥
तयाची भार्या सुमता । असे आचार पतिव्रता । अतिथि आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावे ॥११॥
ऐसे असतां वर्तमानी । पतिसेवा एकमनी । अतिथिपूजा सगुणी । निरंतर करीतसे ॥१२॥
वर्तता ऐसे एके दिवशी । आला दत्त अतिथिवेषी । श्राद्ध होते अमावस्येसी । विप्राघरी तै देका ॥१३॥
न जेवितां ब्राह्मण घरी । दत्ता भिक्षा घाली ते नारी । दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळी ॥१४॥
त्रैमूर्तीचे रूप घेऊनि । स्वरूप दावियले अतिगहनी । पतिव्रता धावोनि चरणी । नमस्कारी मनोभावे ॥१५॥
दत्तात्रेय म्हणे तियेसी । माग माते इच्छिसी । जे जे वासना तुझे मानसी । पावसी त्वरित म्हणतसे ॥१६॥
ऐकोनि स्वामींचे वचन । विप्रवनिता करी चिंतन । विनवीतसे करद्वय जोडून । नानापरी स्तवोनिया ॥१७॥
म्हणे जय जय जगन्नाथा । तू तारक भवासी तत्त्वता । माझे मनी असे जे आर्ता । पुरवावी ते देवराया ॥१८॥
तू कृपाळु सर्वा भूती । वेदपुराणे वाखाणिती । केवी वर्णावी तुझी कीर्ती । भक्तवत्सला कृपानिधि ॥१९॥
मिथ्या नोहे तुझा बोल । जे का ध्रुवासी दिधले पद अढळ । बिभीषणासी लंकास्थळ । देऊनि राज्य समर्पिले ॥२०॥
भक्तजना तू आधार । तयालागी धरिसी अवतार । ब्रीद असे चराचर । चौदा भुवनामाझारी ॥२१॥
आता माते वर देसी । वासना असे माझे मानसी । न व्हावे अन्यथा बोलासी । कृपानिधि देवराया ॥२२॥
माझे मनीची वासना । पुरवावी जगज्जीवना । अनाथरक्षका नारायणा । म्हणोनि चरणा लागतसे ॥२३॥
ऐकोनि तियेचे करुणावचन । संतोषला त्रयमूर्ति आपण । कर धरिला आश्वासोन । सांग जननी म्हणतसे ॥२४॥
तव बोलिली पतिव्रता । स्वामी जे निरोपिले आता । जननी नाम मज ठेविता । करा निर्धार याच बोला ॥२५॥
मज पुत्र झाले बहुत । नव्हेत स्थिर उपजतमृत । जे वाचले आता असत । अक्षहीन पादहीन ॥२६॥
योग्य झाले नाही कोणी । काय करावे मूर्ख प्राणी । असोनि नसती येणे गुणी । पुत्रावीण काय जन्म ॥२७॥
व्हावा पुत्र मज ऐसा । ज्ञानवंत पुराणपुरुषा । जगद्वंद्य वेदसदृशा । तुम्हांसारिका दातारा ॥२८॥
ऐकोनि तियेचे वचन । प्रसन्न झाला दत्त आपण । पुढे असे कार्यकारण । दीक्षार्थ भक्तजनांसी ॥२९॥
तापसी म्हणे तियेसी । पुत्र होईल परियेसी । उद्धरिल तुझे वंशासी । ख्यातिवंत कलियुगी ॥३०॥
असावे तुम्ही त्याचे बोली । येर्हवी न राहे तुम्हांजवळी । ज्ञानमार्गी अतुर्बळी । तुमचे दैन्य हरील ॥३१॥
इतुके सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसी । विस्मय करितसे मानसी । विप्रवनिता तयेवेळी ॥३२॥
विस्मय करोनि मनात । पतीसी सांगे वृत्तान्त । दोघे हर्षे निर्भर होत । म्हणती दत्तात्रेय होईल ॥३३॥
माध्यान्हसमयी अतिथिकाळी । दत्त येताती तये वेळी । विमुख न होता तये काळी । भिक्षा मात्र घालिजे ॥३४॥
दत्तात्रेयाचे स्थान । माहूर करवीर क्षेत्र खूण । तयाचा वास सदा जाण । पांचाळेश्वर नगरात ॥३५॥
नाना वेष भिक्षुकरूप । दत्तात्रेय येती साक्षेप । न पुसतां मज निरोप । भिक्षा घाली म्हणतसे ॥३६॥
विप्रस्त्री म्हणे पतीसी । आजि अवज्ञा केली तुम्हांसी । ब्राह्मण न जेवता आपण त्यासी । भिक्षा घातली म्हणतसे ॥३७॥
ऐकोनी सतीच्या बोला । विप्र मनी संतोषला । म्हणे पतिव्रते लाभ झाला । पितर माझे तृप्त झाले ॥३८॥
करावे कर्म पितरांच्या नामी । सर्मपावे विष्णुसी आम्ही । साक्षात्कारे येऊनि स्वामी । भिक्षा केली आम्हा घरी ॥३९॥
कृतार्थ झाले पितृगण समस्त । निर्धारे झाले स्वर्गस्थ । साक्षात् विष्णु भेटले दत्त । त्रैमूर्तिअवतार ॥४०॥
धन्य तुझी मातापिता । जे वर लाधलीस मुख्य आता । पुत्र होईल निभ्रांता । न धरी चिंता मानसी ॥४१॥
हर्षे निर्भर होवोनि । राहिली दोघे निश्चित मनी । होती जाहली गर्भिणी । विप्रस्त्री परियेसा ॥४२॥
ऐसे नव मास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनी । विप्रे स्नान करूनि । केले जातककर्म तये वेळी ॥४३॥
मिळोनि समस्त विप्रकुळी । जातक वर्तविती तये वेळी । म्हणती तपस्वी होईल बळी । दीक्षाकर्ता जगद्गुरू ॥४४॥
ऐकोनि म्हणती मातापिता । हो कां आमुचा कुळउद्धरिता । आम्हा वर दिधला दत्ता । म्हणोनि ठेविती तया नाव ॥४५॥
श्रीपाद म्हणोनि या कारण । नाम ठेवी तो ब्राह्मण । अवतार केला त्रैमूर्ति आपण । भक्तजन तारावया ॥४६॥
वर्तत असता त्याचे घरी । झाली सात वर्षे पुरी । मौजीबधन ते अवसरी । करिता झाला द्विजोत्तम ॥४७॥
बांधिता मौजी ब्रह्मचारी । म्हणता झाला वेद चारी । मीमांसा तर्क अतिविस्तारी । म्हणो लागला तये वेळी ॥४८॥
ऐकोनि समस्त नगरलोक। विस्मय करिती सकळिक । होईल अवतार कारणिक । म्हणोन बोलती आपणात ॥४९॥
आचार व्यवहार प्रायश्चित्त । समस्तांसी आपण बोलत । वेदान्तभाष्य वेदार्थ । सांगतसे द्विजवरांसी ॥५०॥
वर्तता ऐसे तयासी । झाली वर्षे षोडशी । विवाह करू म्हणती पुत्रासी । मातापिता अवधारा ॥५१॥
विचार करिती पुत्रासवे । बा रे लग्न तुवा करावे । श्रीपाद म्हणे ऐका भावे । माझी वांछा सांगेन ॥५२॥
कराल विवाह माझा तुम्ही । सांगो ऐका विचार आम्ही । वैराग्यस्त्रीसंगे असेन मी । काम्य आमुचे तियेजवळी ॥५३॥
ते स्त्रियेवाचूनि आणीक नारी । समस्त जाणा मातेसरी । जरी आणाल ते सुंदरी । वरीन म्हणे तये वेळी ॥५४॥
आपण तापसी ब्रह्मचारी । योगस्त्रियेवांचोनि नारी । बोल धरा निर्धारी । श्रीवल्लभ नाम माझे ॥५५॥
श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे । झाले त्रिमूर्ति कैसे । पितयाते म्हणतसे । जाउ उत्तरपंथासी ॥५६॥
ऐकोनि पुत्राचे वचन । आठविले पूर्वसूचन । भिक्षुके सांगितली जे खूण । सत्य झाली म्हणतसे ॥५७॥
आताच या बोलासी । मोडा घालिता परियेसी । विघ्न होईल त्वरितेसी । म्हणोनि विचारिती तये वेळी ॥५८॥
न म्हणावे पुत्र यासी । अवतारपुरुष तापसी । जैसे याचे वसे मानसी । तैसे करावे म्हणती दोघे ॥५९॥
निश्चय करूनि आपुले मनी । पुत्राभिमुख जनकजननी । होती आशा आम्हांलागुनी । प्रतिपाळिसी म्हणोनिया ॥६०॥
ऐशी मनी व्याकुळित । डोळा निघती अश्रुपात । माता पडली मूर्च्छागत । पुत्रस्नेहे करोनिया ॥६१॥
देखोनि मातेचे दुःख । संबोखित परमपुरुष । उठवूनि स्वहस्ते देख । अश्रुपात पुशितसे ॥६२॥
न करी चिंता अहो माते । जे मागसी ते देईन तूते । दृढ करूनि चित्ताते । रहा सुके म्हणतसे ॥६३॥
बा रे तुजकरिता आपण । दुःख विसरले संपूर्ण । रक्षिसी आम्हा वृद्धांलागून । दैन्यावेगळे करोनि ॥६४॥
पुत्र असती आपणा दोन । पाय पांगुळ अक्षहीन । त्याते पोशील आता कोण । आम्हा कवण रक्षील ॥६५॥
ऐकोनि जननीचे वचन । अवलोकी अमृतदृष्टीकरून । पुत्र दोघेही झाले सगुण । आली दृष्टिचरणादिक ॥६६॥
वेदशास्त्रादि व्याकरण । सर्व म्हणती तत्क्षण । दोघे येऊनि धरिती चरण । कृतार्थ झालो म्हणोनिया ॥६७॥
आश्वासून तया वेळी । दिधला वर तत्काळी । पुत्रपौत्री नांदा प्रबळी । श्रियायुक्त सनातन ॥६९॥
सेवा करा जनकजननी । पावा सुख महाज्ञानी । इह सौख्य पावोनि । व्हाल मुक्त हे निश्चये ॥७०॥
ऐसे बोलोनि तयांसी । संबोधितसे मातेसी । पाहोनिया दोघा पुत्रांसी । राहता सुख पावाल ॥७१॥
पुत्र दोघे शतायुषी । निश्चय धरी वो मानसी । कन्या पुत्र होतील यांसी । तुम्ही नेत्री देखाल ॥७२॥
अखंड लक्ष्मी यांचे घरी । यांचे वंशपरंपरी । कीर्तिवंत सचराचरी । संपन्न होती वेदशास्त्रे ॥७३॥
आमची अवज्ञा न करिता । निरोप द्यावा आम्हा त्वरिता । जाणे असे उत्तरपंथा । दीक्षा द्यावया साधुजना ॥७४॥
सांगोनि मातापित्यासी । अदृश्य झाला परियेसी । पावला त्वरित पूरी काशी । गुप्तरूपे होता तेथे ॥७५॥
निघाला तेथूनि बदरीविना । भेटी घेऊनि नारायणा । अवतार असे आपणा । कार्याकारण मनुष्यदेही ॥७६॥
दीक्षा करावया भक्तजना । तीर्थे हिंडणे आपणा । मनोवेगे मार्गक्रमणा । आले तीर्थ गोकर्णासी ॥७७॥
ऐकोनि सिद्ध मुनींचे वचन । विनवी नामधारक आपण । ते परिसा श्रोतेजन । म्हणे सरस्वतीगंगाधरू ॥७८॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे दत्तात्रेयावतारकथनं नाम पंचमेऽध्यायः ॥५॥
श्रीपादश्रीवल्लभनृसिंहसरस्वतीदत्तात्रेयार्पणमस्तु ।
-----------------------------------------------------
अध्याय ६
श्रीगणेशाय नमः ।
नामधारक म्हणे सिद्धासी । स्वामी तू ज्योति अंधकारासी । प्रकाश केला जी आम्हांसी । गुरुपीठ आद्यंत ॥१॥
त्रैमूर्ति होऊनि आपण । तीर्थे करावी किंकारण । विशेष असे काय गोकर्ण । म्हणोनि गेले तया स्थान ॥२॥
तीर्थे असती अपरंपारी । समस्त सांडूनि प्रीति करी । कैसा पावला दत्तात्री । अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ ॥३॥
ऐक शिष्या शिखामणी । तुवा पुशिले जे का प्रश्नी । संतोष जाला अंतःकरणी । सांगेन चरित्र श्रीगुरूंचे ॥४॥
विस्तारोनि आम्हांसी । सांगा स्वामी कृपेसी । म्हणोनि लागला चरणांसी । नामधारक प्रीतिकारे ॥५॥
ऐकोनि नामधारकाचे वचन । संतोषले सिद्धाचे मन । सांगतसे विस्तारोन । गुरुचरित्र परियेसा ॥६॥
तुजकरिता आम्हासी । लाभ झाला असे मानसी । गुरुचरित्र सांगावयासी । उत्कंठा मानसी होय ते ॥७॥
म्हणे त्रैमूर्ति अवतरोन । तीर्थे हिंडे केवी आपण । विशेष पावला गोकर्ण । म्हणोनि पुससी आम्हाते ॥८॥
दत्तात्रेय आप्ण । तीर्थे हिंडे तयाचे कारण । भक्तजनाहितार्थ दीक्षेस्तव जाण । उपदेश करावया ॥९॥
विशेष तीर्थ आपुले स्थान । गोकर्णी शंकर असे जाण । याच कारणे निर्गुण । त्रैंमूर्ति वसती तया ठाया ॥१०॥
गोकर्णीचे माहात्म्य । सांगतसे अनुपम्य । एकचित्त करूनि नेम । ऐक शिष्या नामधारका ॥११॥
त्या तीर्थाचे आदि अंती । सांगेन तुम्हां विस्तृती । जे पूर्वी वर लाधले असती । अपूर्व असे ऐकता ॥१२॥
महाबळेश्वरलिंग देखा । स्वयंभू शिव असे ऐका । आख्यान त्याचे ऐका । लंबोदरे प्रतिष्ठले ते ॥१३॥
शिष्य म्हणे सिद्धासी । तीर्थमहिमा वानिसी । विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी । विस्तारोनि सांग मज ॥१४॥
ऐसे शिष्य विनवीत । ऐकोनि बहु संतोषत । निरोपित आद्यंत । महाबळेश्वरचरित्र ॥१५॥
पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या । नाम तियेचे कैकया । ईश्वरभक्ति अतिप्रिया । शिवपूजा सर्वकाळ ॥१६॥
नित्य करी शिवपूजन । पूजेवीण न घे अन्न । ऐसे करिता एक दिन । न मिळे लिंग पूजेसी ॥१७॥
व्रतभंग होईल म्हणोनि । मृत्तिकालिंग करूनि । पूजी अति संतोषोनि । भक्तिपुर्वक अवधारा ॥१८॥
तिचा पुत्र अतिक्रूर । नाम तया दशशिर । आला तेथे वेगवत्तर । मातृदर्शन करावया ॥१९॥
नमिता झाला मातेसी । पुसे पूजा काय करिसी । माता सांगे विस्तारेसी । लिंग पूजिले मृत्तिकेचे ॥२०॥
रावण म्हणे जननीसी । माझी माता तू म्हणविसी । मृतिकेचे लिंग पूजेसी । अभाग्य आपुले म्हणतसे ॥२१॥
मागुती म्हणे तियेसी । पूजिता फळ काय यासी । कैकया सांगे पुत्रासी । कैलासपद पाविजे ॥२२॥
रावण म्हणे मातेसी । कैलास आणुनी तुजपासी । देईन हे निश्चयेसी । सायास का वो करित्येसी ॥२३॥
ऐसे बोले तो रावण । मातेसवे करी पण । आणीन त्वरित उमारमण । कैलासासहित लंकेसी ॥२४॥
पूजा करी वो स्वस्थ चित्तेसी । मृत्तिकालिंग का करिसी । म्हणोनि निघाला त्वरितेसी । मनोवेगे निशाचर ॥२५॥
पावला त्वरे शिवपुरासी । शुभ्र रम्य पर्वतासी । धरोनि हालवीक्रोधेसी । वीस बाहु भुजाबळे ॥२६॥
आंदोळले कैलासभुवन । उपटीतसे तो रावण । दाही शिरे टेकून । उचलीन म्हणे उल्हासे ॥२७॥
शिर लावून पर्वतासी । कर टेकून मांडीसी । उचलिता झाला प्राणेसी । सप्तपाताळ आंदोळले ॥२८॥
फणा चुकवी शेष आपण । कूर्म भ्याला कांपोन । भयचकित देवगण । अमरपुर कांपतसे ॥२९॥
कंप झाला स्वर्गभुवन । सत्यलोक विष्णुभुवन । येरू पडतसे गडबडोन । म्हणती प्रळय मांडला ॥३०॥
कैलासपुरीचे देवगण । भयाभीत झाले कंपायमान । भयाभीत गिरिजा आप । होऊनि गेली शिवापासी ॥३१॥
पार्वती विनवी शिवासी । काय झाले कैलासासी । आंदोळतसे सभेसी । पडो पहात निर्धारे ॥३२॥
नगरात झाला आकान्त । बैसलेती तुम्ही स्वस्थ । करा प्रतिकार त्वरित । म्हणोनि चरणां लागली ॥३३॥
ईश्वर म्हणे गिरिजेसी । न करी चिंता मानसी । रावण माझा भक्त परियेसी । खेळतसे भक्तीने ॥३४॥
ऐसे वचन ऐकोनि । विनवी गिरिजा नमोनि । रक्ष रक्ष शूलपाणी । समस्त देवगणाते ॥३५॥
ऐकोनि उमेची विनंती । शंकरे चेपिला वामहस्ती । दाही शिरे भुजांसहिती । दडपलासे गिरीच्या तळी ॥३६॥
चिंता करी मनी बहुत । शिव शिव ऐसे उच्चारित । ध्यातसे स्तोत्र करीत । शरणागता रक्ष म्हणोनि ॥३७॥
त्राहि त्राहि पिनाकपाणी । जगद्रक्षकशिरोमणी । शरण आलो तुझे चरणी । मरण कैचे भक्तासी ॥३८॥
शंकर भोळा चक्रवर्ती । ऐकोनि त्याची विनंती । चेपिले होते वामहस्ती । काढिले त्वरित कृपेने ॥३९॥
सुटला तेथूनि लंकेश्वर । स्तोत्र करीतसे अपार । स्वशिरे छेदोनि परिकरे । तंतु लाविले निज अंत्रे ॥४०॥
वेद सहस्त्र एकवचनी । वर्णक्रमादि विस्तारोनि । सामवेद अतिगायनी । समस्त रागे गातसे ॥४१॥
गण रसस्वरयुक्त । गायन करि लंकानाथ । तयांची नामे विख्यात । सांगेन ऐका एकचित्ते ॥४२॥
आठही गण प्रख्यात । उच्चारीतसे लंकानाथ । मगण ब्राह्मण प्रख्यात । नगण क्षत्री विशेष ॥४३॥
भगण वैश्य ध्यानेसी । तगण शूद्रवर्णेसी । जगण दैत्य परियेसी । रगण प्रत्यक्ष च्यूतगुणे ॥४४॥
सगण तुरंगरूपेसी । यगण शुद्ध परियेसी । विस्तारित गायनेसी । लंकापति रावण ॥४५॥
गायन करीत नवरसेसी । नांवे सांगेन परियेसी । शांत भयानक अद्भुतेसी । शृंगार हास्य करुणरसे ॥४६॥
रौद्र वीर बीभत्सेसी । गायन करी अति उल्हासी । वेणू वाजवी सप्तस्वरेसी । ध्यानपूर्वक विधीने ॥४७॥
जंबुद्वीप वास ज्यासी । षड्जस्वर नाम परियेसी । कंठीहूनि उपज ज्यासी । मयूरस्वर आलापित ॥४८॥
उत्तमवंशी उपज ज्यासी । गीर्वाणकुळी ब्रह्मवंशी । पद्मपत्र वर्ण परियेसी । वन्हि देवता शृंगार रसे ॥४९॥
द्वितीय स्वर ऋषभासी । जन्म प्लक्ष द्वीपासी । उपज ह्रदयस्थानेसी । चाषस्वर आलापित ॥५०॥
प्रख्यात जन्म क्षत्रवंशी । विराजवर्ण यमदेवतेसी । क्रीडा अद्भुत रस ऐसी । वीणा वाजवी रावण ॥५१॥
तृतीय स्वर गांधारेसी । गायन करी रावण परियेसी । कुशद्वीप वास ज्यासी । नासिकस्थान अवधारा ॥५२॥
अजस्वर आलापत्यासी । गीर्वाण कुल वैश्यवंशी । सुवर्णवर्ण कांतीसी । चंद्रदेवता अद्भुत रसे ॥५३॥
मध्यम स्वर चातुर्थक । क्रौचद्वीप वास ऐक । उरस्थान उक्त उच्चारी मुखे । क्रौचस्वरे आलापित ॥५४॥
गीर्वाणकुळ ब्रह्मवंश । कुंदवर्ण रूप सुरस । ध्यान करी लंकाधीश । लक्ष्मी देवता करुणा रस ॥५५॥
शाल्मली द्वीप भूमीसी । जन्म पंचमस्वरासी । कंठी उपजोनि नादासी । कोकिळास्वरे गातसे ॥५६॥
ध्यान करी तया स्वरासी । उपज झाला पितृवंशी । कृष्णवर्ण रूप त्यासी । गणनाथ देव हास्यरसे ॥५७॥
श्वेतद्वीप जन्म ख्यात । स्वर असे नाम धैवत । ललाट स्थान नाद व्यक्त । दर्दुरस्वरे आलापी देखा ॥५८॥
ऐसा धैवत स्वरासी । बीभत्स रस अतिउल्हासी । गाय रावण परियेसी । ईश्वराप्रती भक्तीने ॥५९॥
पुष्कर द्वीप उपजे त्यासी । निषाद स्वर नाम परियेसी । उत्पत्ति तालव्य संधीसी । हस्तिस्वरे गातसे ॥६०॥
असुरवंश वैश्यकुळी । कल्प शुद्ध वर्ण पाटली । तुंबर मुनि देवता जवळी । सूर्य देवता अवधारी ॥६१॥
भयानक रस देखा । चर्ची व्याकुळ असे निका । येणेपरी सप्त स्वरिका । गायन करी लंकानाथ ॥६२॥
रागसहितरागिणीसी । गायन करी सामवेदासी । श्रीरागादि वसंतासी । आलाप करी दशशिर ॥६३॥
भैरवादि पंचमरागी । नटनारायण मेघरागी । गायन करी अभ्यासयोगी । लंकानाथ शिवाप्रति ॥६४॥
गौडी कोल्हाळ आंधळी । द्राविडरागी कौशिकमाळी । देवगांधार आनंदलिळी । गायन करी लंकानाथ ॥६५॥
धनाश्रिया वराडीसी । रामकलि मंजिरेंसी । गौडकी दशाक्षी हारिसी । गायन करी लंकेश्वर ॥६६॥
भैरवी गुर्जरीसहित । वेळावली राग ललित । कर्नाटकी हंसयुक्त । गायन करी दशशिर ॥६७॥
त्राटकी मोटकि देखा । टंकाक्षी सुधा नाटका । सैधवा माळाकी ऐका । गायन करी लंकानाथ ॥६८॥
बंगाली राग सोरटीसी । कामबोध मधुमाधवीसी । देवाक्रिया भूपाळीसी । गायन करी दशानन ॥६९॥
रागवल्लभ माधुरीसी । राव्हेरी राग हर्षी । विहंगदात्री चंडीसी । वसवीजादि रागाने ॥७०॥
शिर कापून आपुले देखा । यंत्र केले करकमळिका । शिरा काढून तंतुका । रावणेश्वर गातसे ॥७१॥
समयासमयी आलापन । करी दशशिर आपण । प्रातःकाळी करी गायन । अष्टराग परियेसा ॥७२॥
मध्यमराग वेळोवेळी । दशांकभैरव करी भूपाळी । मल्हार धनाश्री बंगाली । प्रातःकाळी गातसे ॥७३॥
बराडी ललिता गुर्जरासी । गौडक्री आहिरी कौशिकेसी । माध्याह्नसमयी गायनासी । रावण करी परियेसा ॥७४॥
कुरंजी तोडी मालश्रियेसी । दशांक पंचम परियेसी । अपराह्न वेळ अतिहर्षी । ईश्वराप्रती गातसे ॥७५॥
चारी प्रकार गौडियेसी । रामकली श्रीरागासी । देवकीपट मंजिरेसी । वसंतुरागे ऋतुकाळी ॥७६॥
ऐसे छत्तीस रागेसी । गायन करी सामवेदासी । निर्वाणरूप भक्तीसी । चंद्रमौळी सांबाचिये ॥७७॥
रावणाचे भक्तीसी । प्रसन्न ईश्वर त्वरितेसी । निजरूप अतिहर्षी । उभा राहिला सन्मुख ॥७८॥
पंचवक्त्र त्रिनेत्रेसी । उभा राहोनि संतोषी । काय इच्छा तुझे मानसी । माग वर म्हणतसे ॥७९॥
म्हणे रावण शिवासी । काय मागावे तुजपासी । लक्ष्मी माझे घरची दासी । आठ निधि माझे घरी ॥८०॥
चतुरानन माझा जाशी । तेहेतीस कोटी देव हर्षी । सेवा करिती अहर्निशी । सूर्य चंद्र वरुण वायु ॥८१॥
अग्नि सारिखा सेवा करी । वस्त्रे धूत अतिकुसरी । यम माझा आज्ञाधारी । निरोपावेगळा न मारी कवणा ॥८२॥
इंद्रजितासारिखा पुत्र । कुंभकर्णाऐसा भ्रात्र । स्थान समुद्रामाजी पवित्र । कामधेनु माझे घरी ॥८३॥
सहस्त्र कोटी आयुष्य मज । हे सांगणे नलगे तुज । आलो असे जे काज । कैलास नेईन लंकेसी ॥८४॥
व्रत असे जननीसी । नित्य पुजन तुम्हांसी । मनोरथ पुरवावे भक्तीसी । कृपासिंधु दातारा ॥८५॥
ईश्वर म्हणे रावणासी । जरी चाड असे पूजेसी । काय करिसी कैलासासी । आत्मलिंग तुज देतो आता ॥८६॥
जे जे मनीची वासना । पुरेल त्वरित ऐक जाणा । लिंग असे प्राण आपणा । म्हणोनि दिधले रावणासी ॥८७॥
पूजा करी वेळ तिन्ही । अष्टोत्तर शत जप करोनि । रुद्राभिषेके अभिषेकोनि । पूजा करावी एकचित्ते ॥८८॥
वर्षे तीन जे पूजिती । तेचि माझे स्वरूप ओती । जे जे मनी इच्छिती । ते ते पावती अवधारा ॥८९॥
हे लिंग असे जयापासी । मृत्यु नाही गा परियेसी । दर्शनमात्रे महादोषी । उद्धरतील अवधारा ॥९०॥
ठेवू नको भूमीवरी । जोवरी पावे तुझी नगरी । वर्षे तीन पूजा करी । तूचि ईश्वर होशील ॥९१॥
वर लाधोनि लंकेश्वर । निरोप देत कर्पूरगौर । करूनि साष्टांग नमस्कार । निघाला त्वरित लंकेसी ॥९२॥
इतुका होता अवसर । नारद होता ऋषीश्वर । निघोनि गेला वेगे सत्वर । अमरपुरा इंद्रभुवना ॥९३॥
नारद म्हणे इंद्रासी । काय स्वस्थ चित्ते बैसलासी । अमरत्व दिधले रावणासी । लक्ष्मी गेली आजि तुमची ॥९४॥
चिरायु झाला लंकेश्वर । प्राणलिंग देत कर्पूरगौर । आणिक दिधला असे वर । तूचि ईश्वर होशील ॥९५॥
वर्षे तीन पूजिलियासी । तूचि माझे स्वरूप होसी । तुझे नगर कैलासी । मृत्यु नाही कदा तुज ॥९६॥
ऐसा वर लाधोनि । गेला रावण संतोषोनि । तेहेतीस कोटी देव कोठूनि । सुटती आता तुम्हासी ॥९७॥
जावे त्वरित तुम्ही आता । सेवा करावी लंकानाथ । उर्वशी रंभा मेनका । त्वरिता भेटीस न्याव्या रावणाचे ॥९८॥
ऐसे वचन ऐकोनि । इंद्र भयभीत मनी । नारदा विनवी कर जोडूनि । काय करावे म्हणतसे ॥९९॥
नारद म्हणे इंद्रासी । उपाय काय त्वरितेसी । जावे तुम्ही ब्रह्मयासी । तयासी उपाय करील ॥१००॥
इंद्र नारदासमवेत । गेले ब्रह्मलोका त्वरित । विस्तारोनिया वृत्तान्त । सांगे इंद्र ब्रह्मयासी ॥१०१॥
ब्रह्मा म्हणे इंद्रासी । जावे त्वरित वैकुंठासी । दैत्येवरी ह्रषीकेशी । उपाय करील निर्धारे ॥२॥
म्हणोनि निघाले तिघेजण । पावले त्वरित वैकुंठभुवन । भेटला तत्काळ नारायण । सांगती वृत्तान्त रावणाचा ॥३॥
विरिंचि म्हणे विष्णूसी । प्रतिकार करावा वेगेसी । कारण असे तुम्हांसी । राम-अवतारी परियेसा ॥४॥
तेहतीस कोटी देवांसी । घातले असे बंदीसी । याचि कारणे तुम्हांसी । करणे असे अवधारा ॥५॥
ईश्वराचे प्राणलिंग । घेऊनि गेला राक्षस चांग । आता रावणा नाही भंग । तोचि होईल ईश्वर ॥६॥
त्वरित उपाय करावा यासी । पुढे जड होईल तुम्हांसी । निर्दाळावया राक्षसांसी । अवतरोनि तुम्हीच यावे ॥७॥
ऐसे विनवी चतुरानन । मग कोपोन नारायण । कार्य नासेल म्हणोन । निघाला झडकर कैलासा ॥८॥
विष्णु आला ईश्वरापाशी । म्हणे शंकरा परियेसी । प्राणलिंग रावणासी । द्यावया कारण तुम्हां काय ॥९॥
रावण क्रूर महादैत्य । सुरवर सकळ त्याचे भृत्य । कारागृही असती समस्त । केवी सुटती सांग आम्हा ॥११०॥
ऐसे दुराचारियासी । वर देता उल्हासी । देवत्व गेले त्याचे घरासी । घेईल स्वर्ग निर्धारे तो ॥११॥
ईश्वर म्हणे विष्णुसी । तुष्टलो तयाचे भक्तीसी । विसर पडला आम्हांसी । संतोषे दिधले प्राणलिंग ॥१२॥
आपले शिर छेदोनि देखा । वीणा केला स्वहस्तका । सप्तस्वर वेदादिका । गायन केले संतोषे ॥१३॥
जरी मागता पार्वतीसी । देतो सत्य परियेसी । भुली पडली भक्तीसी । लिंग नेले प्राण माझा ॥१४॥
विष्णु म्हणे उमाकांता । तुम्ही ऐसा वर देतां । आम्हां सायास होय तत्त्वतां । दैत्य उन्मत्त होताती ॥१५॥
देवद्विज लोकांसी । पीडा करिती बहुवशी । कारणे आम्हांसी । अवतार धरणे घडते देखा ॥१६॥
कधी दिले लिंग त्यासी । नेले असेल लंकेसी । शंकर म्हणे विष्णुसी । पांच घटी झाल्या आता ॥१७॥
ऐकताच शिववचन । उपाय करी नारायण । धाडिले चक्र सुदर्शन । सूर्याआड व्हावया ॥१८॥
बोलावूनि नारदासी । सांगतसे ह्रषीकेशी । तुम्ही जावे त्वरितेसी । रावण जातो लंकेसी देखा ॥१९॥
मार्गी जाऊनि तयासी । विलंब करावा परियेसी । जाऊ न द्यावे लंकेसी । त्वरित जावे म्हणतसे ॥१२०॥
चक्र झाले सूर्याआड । स्नानसंध्या रावणा चाड । तुम्ही जाऊनिया दृढ । विलंब करावा तयासी ॥२१॥
ऐकोनिया श्रीविष्णूच्या बोला । नारद त्वरित निघोन गेला । मनोवेगे पावला । जेथे होता लंकानाथ ॥२२॥
नारदाते पाठवूनि । विष्णू विचारी आपुल्या मनी । गणेशासी बोलावूनि । पाठवू म्हणे विघ्नासी ॥२३॥
बोलावूनि गणेशासी । सांगे विष्णु परियेसी । कैसा रावण तुजसी । सदा उपेक्षितो ॥२४॥
सकळ देव तुज वंदिती । त्याचे मनोरथ पुरती । तुज जे का उपेक्षिती । विघ्ने बाधती तयांसी ॥२५॥
तुज नेणतां रावण देखा । घेऊनि गेला निधान ऐका । प्राण लिंगा अतिविशेखा । नेले शिवाजवळूनि ॥२६॥
आता त्वा करावे एक । रावणापाशी जाऊनि देख । कपटरुपे कुब्जक । बाळवेष धरोनिया ॥२७॥
वाटेसि होईल अस्तमान । रावण करील संध्यावंदन । नारद गेला याचि कारण । विलंब करावया दैत्यासी ॥२८॥
आज्ञा शिवाची रावणासी । न ठेवी लिंग भूमीसी । शौचाचमनसमयासी । आपणाजवळी न ठेविजे ॥२९॥
बाळवेषे तुवा जावे । शिष्यरूप करुणाभावे । सूक्ष्मरूप दाखवावे । लिंग घ्यावे विश्वासुनी ॥३०॥
संध्यासमयी तुझे हाती । लिंग देईल विश्वासरीती । तुवा ठेवावे तत्काळ क्षिती । लिंग राहील तेथेची ॥३१॥
येणेपरी गणेशासी । शिकवी विष्णु परियेसी । संतोषोनि हर्षी । भातुके मागे तये वेळी ॥३२॥
लाडू तिळव पंचखाद्य । इक्षु खोबरे दालिम आद्य । शर्करा घृत क्षीर सद्य । द्यावे त्वरित आपणासी ॥३३॥
चणे भिजवून आपणासी । तांदूळ लाह्या साखएसी । त्वरित भक्षण करावयासी । द्यावे स्वामी म्हणतसे ॥३४॥
जे जे मागितले विघ्नेश्वरे । त्वरित दिधले शार्ङ्गधरे । भक्षित निघाला वेगवक्त्रे । ब्रह्मचारीवेष धरूनि ॥३५॥
गेला होता नारद पुढे । ब्रह्मऋषि महात्म्य गाढे । उभा ठाकला रावणापुढे । कवण कोठूनि आलासी ॥३६॥
रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी । केले उत्कृष्ट तपासी । तोषविले तया शिवा ॥३७॥
तेणे प्रसन्न होऊनि आम्हांसी । लिंग दिधले परियेसी । आणिक सांगितले संतोषी । लिंग महिमा अपार ॥३८॥
नारद म्हणे लंकानाथा । दैव थोर तुझे आता । लिंग लाधलासी अद्भुता । जाणो आम्ही आद्यंत ॥३९॥
दाखवी लिंग आम्हांसी । खुणे ओळखू परियेसी । लिंगलक्षण विस्तारेसी । सांगू आम्ही तुजलागी ॥१४०॥
नारदाचिया वचनासी । न करी विश्वास परियेसी । दाखवीतसे दुरोनि लिंगासी । व्यक्त करोनि त्या समयी ॥४१॥
नारद म्हणे लंकेशा । लिंग महिमेचा प्रकार ऐसा । सांगेन तुज बहु सुरसा । बैसोनि ऐके स्वस्थ चित्ते ॥४२॥
लिंग उपजले कवणे दिवशी । पूर्वी जाणिले तयासी । एकचित्ते परियेसी । कथा असे अतिपूर्व ॥४३॥
गिळूनि सकळ सौरभासी । मृग एक काळाग्निसमेसी । ब्रह्मांडखंड परियेसी । पडिला होता तो मृग ॥४४॥
ब्रह्माविष्णु महेश्वरांसी । गेले होते पारधियेसी । मृग मारिले परियेसी । भक्षिले मेद तये वेळी ॥४५॥
तयासी होती तीन शृंगे । खाली असती तीन लिंगे । तिघी घेतली तीन भागे । प्राणलिंगे परियेसा ॥४६॥
लिंगमहिमा ऐक कानी । जे पूजिती वर्षे तिनी । तेचि ईश्वर होती निर्गुणी । वेदमूर्ति तेचि होय ॥४७॥
लिंग असे जये स्थानी । तोचि कैलास जाण मनी । महत्त्व असे याच गुणी । ब्रह्माविष्णुमहेश्वरांसी ॥४८॥
असे आणिक एक बरवे । सांगेन ऐक एकभावे । रावण म्हणे आम्हा जाणे । असे त्वरित लंकेसी ॥४९॥
म्हणोनि निघाला महाबळी । नारद म्हणे तये वेळी । सूर्यास्त आहे जवळी । संध्याकाळ ब्राह्मणासी ॥१५०॥
सहस्त्रवेद आचरसी । संध्याकाळी मार्ग क्रमिसी । वाटेस होईल तुज निशी । संध्यालोप होईल ॥५१॥
आम्ही जाऊ संध्यावंदनासी । म्हणोनि नारद विनयेसी । पुसोनिया रावणासी । गेला नदीतीरा ॥५२॥
इतुकिया अवसरी । पातला गणेश ब्रह्मचारी । रावणापुढे चाचरी । समिधा तोडी कौतुके ॥५३॥
रावण चिंती मानसी । व्रतभंग होईल आपणासी । संध्या करावी त्रिकाळेसी । संदेह घडला म्हणतसे ॥५४॥
ईश्वरे सांगितले आम्हांसी । लिंग न ठेवावे भुमीसी । संध्यासमयो झाली निशी । काय करू म्हणतसे ॥५५॥
तव देखिला ब्रह्मचारी । अति सुंदर बाळकापरी । हिंडतसे नदीतीरी । देखिला रावणे तये वेळी ॥५६॥
मनी विचारी लंकानाथ । ब्रह्मचारी कुमार दिसत । न करी आमुचा विश्वासघात । लिंग देऊ तया हाती ॥५७॥
संध्या करू स्वस्थचित्तेसी । लिंग असेल तयापाशी । बाळक असे हे निश्चयेसी । म्हणोनि गेला तया जवळी ॥५८॥
देखोनिया दशशिर । पळतसे लंबोदर । रावण झाला द्विजवर । अभय देऊनि गेला जवळी ॥५९॥
रावण म्हणे तयासी । तू कवण बा सांग आम्हांसी । मातापिता कवण तुजसी । कवण कुळी जन्म तुझा ॥१६०॥
ब्रह्मचारी म्हणे रावणा । इतुके पुससी कवण्या कारणा । आमुच्या बापे तुझ्या ऋणा । काय द्यावे सांग मज ॥६१॥
हासोनिया लंकेश्वर । लोभे धरिला त्याचा कर । सांग बाळका कवणाचा कुमर । प्रीतीभावे पुसतो मी ॥६२॥
ब्रह्मचारी म्हणे रावणासी । आमुचा पिता काय पुससी । जटाधारी भस्मांगासी । रुद्राक्ष माळा असती देखा ॥६३॥
शंकर म्हणती तयाशी । भिक्षा मागणे अहर्निशी । वृषारूढ उमा सरसी । जननी ते जगन्माता ॥६४॥
इतुके आम्हांसी पुसतोसी । तुज देखता भय मानसी । बहुत वाटे परियेसी । सोड हात जाऊ दे ॥६५॥
रावण म्हणे ब्रह्मचारी । तव पिता असे दरिद्री । भिक्षा मागे घरोघरी । सौख्य तुज काही नसे ॥६६॥
आमुचे नगर लंकापूर । रत्नखचित असे सुंदर । आम्हांसवे चाल सत्वर । देवपूजा करीत जाई ॥६७॥
जे जे मागसी आम्हांसी । सकळ देईन परियेसी । सुखे रहावे मजपाशी । म्हणे रावण तये वेळी ॥६८॥
ब्रह्मचारी म्हणे त्यासी । लंकेसी बहुत राक्षसी । आम्ही बाळक अरण्यवासी । खातील तेथे जातांची ॥६९॥
न येऊ तुझिया नगरासी । सोड जाऊं दे घरासी । क्षुधे पीडतो बहुवसी । म्हणोनि भक्षितो भातुके ॥१७०॥
इतुके ऐकोनि लंकानाथ । त्या बाळका संबोधित । लिंग धरी ऐसे म्हणत । मी संध्या करीन तोवरी ॥७१॥
बाळक विनवी तयासी । न धरी लिंग परियेसी । मी ब्रह्मचारी अरण्यवासी । उपद्रवू नको म्हणतसे ॥७२॥
तव लिंग असे जड । मी पण बाळ असे वेड । न घे लिंग जाऊ दे सोड । धर्म घडेल तुजलागी ॥७३॥
नानापरी संबोधित । लिंग देत लंकानाथ । संध्या करावया आपण त्वरित । समुद्रतीरी बैसला ॥७४॥
ब्रह्मचारी तयासी । उभा विनवीतसे रावणासी । जड झालिया आपणासी । ठेवीन त्वरित भूमीवरी ॥७५॥
वेळ तीन परियेसी । बोलवीन तुम्हांसी । वेळ लागलिया परियेसी । आपण ठेवीन भूमीवरी ॥७६॥
ऐसा निर्धार करोनि । उभा गणेश लिंग घेऊनि । समस्त देव विमानी । बैसोनि पाहती कौतुके ॥७७॥
अर्घ्यसमयी रावणासी । बोलवी गणेश परियेसी । जड झाले लिंग आम्हांसी । सत्वर घे गा म्हणतसे ॥७८॥
न्यासपूर्वक अर्घ्य देखा । रावण करी अति विवेका । हाता दाखवी बाळका । येतो राहे म्हणोनि ॥७९॥
आणिक क्षणभर राहोनि । गणेश बोले वेळ दोनी । जड झाले म्हणोनि । शीघ्र यावे म्हणतसे ॥८०॥
न ये रावण ध्यानस्थ । गणेश असे विचारीत । समस्त देवांते साक्षी करीत । लिंग ठेवीत भूमीवरी ॥८१॥
श्रीविष्णूते स्मरोनि । लिंग ठेविले स्थापोनि । संतोष जाहला गगनी । पुष्पे वर्षती सुरवर ॥८२॥
अर्घ्य देवोनी लंकेश्वर । निघोनि आला सत्वर । लिंग देखिले भूमीवर । मनी विकळ जाहला ॥८३॥
आवेशोनि रावण देखा । ठोसे मारी गणनायका । हास्यवदन रडे तो ऐका । भूमीवरी लोळतसे ॥८४॥
म्हणे माझिया पित्यासी । सांगेन आता त्वरितेसी । का मारिले मज बाळकासी । म्हणोनि रडत निघाला देखा ॥८५॥
मग रावण काय करी । लिंग धरोनिया दृढ करी । उचलू गेला नानापरी । भूमीसहित हालतसे ॥८६॥
कापे धरणि तये वेळी । रावण उचली महाबळी । न ये लिंग शिर आफळी । महाबळी राहिला ॥८७॥
नाम पाविला याचि कारणे । महाबळेश्वर लिंग जाणे । मुरडोनि ओढिता रावणे । गोकर्णाकार जाहले ॥८८॥
ऐसे करिता लंकानाथ । मागुती गेला तपार्थ । ख्याती झाली गोकर्णांत । समस्त देव तेथे आले ॥८९॥
आणिक असे अपार महिमा । सांगतसे अनुपमा । स्कंदपुराण वर्णिली सीमा । प्रख्याद असे परियेसा ॥१९०॥
ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक संतोषोन । पुनरपि चरणा लागे जाण । म्हणे सरस्वती गंगाधरू ॥१९१॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ ।
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमा वर्णनं नाम षष्ठोऽध्यायः॥६॥
श्रीदत्तात्रेयार्पितमस्तु ।
--------------------------------------------------------
अध्याय ७
श्रीगणेशाय नमः ।
नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णमहिमा आम्हांसी । निरोपिजे स्वामी कृपेसी । पूर्वी कवणा साक्ष झाली ॥१॥
समस्त तीर्थ सांडुनी । श्रीपाद गेले किंकारणी । पूर्वी आधार केला कवणी । पुराण कथा सांगा मज ॥२॥
ज्यावरी असेल गुरूची प्रीति । तीर्थमहिमा ऐकणे चित्ती । वांछा होतसे ज्ञानज्योती । कृपासिंधु गुरुराया ॥३॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । गोकर्णमहिमा मज पुससी । सांगेन तुज विस्तारेसी । एकचित्ते परियेसा ॥४॥
पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी । मित्रसह राजा परियेसी । प्रतापवंत क्षत्रियराशी । सर्वधर्मरत देखा ॥५॥
राजा सकळशास्त्रज्ञ । विवेकी असे श्रुतिनिपुण । बलाढ्य शूर महाभीम । विद्योद्योगी दयानिधि ॥६॥
असता राजा एके दिवशी । विनोदे निघाला पारधीसी । प्रवेशला महावनासी । वसती शार्दूल सिंह जेथे ॥७॥
निर्मनुष्य अरण्यात । राजा पारधि खेळत । भेटला तेथे अद्भुत । दैत्य ज्वाळाकार भयानक ॥८॥
राजा देखोनि तयासी । वर्षता शर झाला कोपेसी । मूर्छना येऊनि धरणीसी । पडला दैत्य तया वेळी ॥९॥
होता तयाचा बंधु जवळी । आक्रंदतसे प्रबळी । पाषाण हाणी कपाळी । बंधुशोके करोनिया ॥१०॥
प्राण त्यजिता निशाचर । बंधूसी म्हणतसे येर । जरी तू होसी माझा सहोदर । सूड घेई माझा तू ॥११॥
ऐसे बोलोनि बंधूसी । दैत्य पावला पंचत्वासी । अनेक मायापाशी । नररूप धरिले तया वेळी ॥१२॥
रूप धरोनि मानवाचे । सौम्य वाणी बोले वाचे । सेवकत्व करी राजयाचे । अतिनम्रत्वे बोलोनिया ॥१३॥
सेवा करी नानापरी । सेवकाचे सारखे मन धरी । कितीक दिवसांवरी । वनांतरी राजा होता देखा ॥१४॥
समस्त मृग जिंकूनि । दुष्ट जीवाते वधोनि । राजा आला परतोनि । आपुल्या नगरा परियेसा ॥१५॥
ऐसे असता एके दिवशी । पितृश्राद्ध आले परियेसी । आमंत्रण सांगे ऋषींसी । वसिष्ठादिका परियेसा ॥१६॥
ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक । करवीतसे सविवेक । कापट्ये होता तो सेवक । तया स्थानी ठेविला ॥१७॥
राजा म्हणे तयासी । पाकस्थानी तू वससी । जे जे मागेल भाणवसी । सर्व आणूनि त्वा द्यावे ॥१८॥
अंगिकारोनि तो सेवक । नरमांस आणोनि देख । कापट्यभावे करवी पाक । केली शाक तया वेळी ॥१९॥
ठाय घालिता ऋषेश्वरांसी । पहिलेच वाढिले नरमांसासी । पाहता कोप आला वसिष्ठासी । दिधला शाप तये वेळी ॥२०॥
वसिष्ठ म्हणे रायासी । नरमांस वाढिले आम्हांसी । त्वरित ब्रह्मराक्षस होसी । म्हणोनि शाप दिधला ॥२१॥
शाप देता तये काळी । राजा कोपला तात्काळी । अपराध नसता प्रबळी । वाया मज का शापिले ॥२२॥
नेणे मांसपाक कोणी केला । माझा निरोप नाही झाला । वृथा आमुते शाप दिधला । आपण शापीन म्हणतसे ॥२३॥
उदक घेऊनि अंजुळी । शापावया सिद्ध झाला तये काळी । तव राजपत्नी येऊनि जवळी । वर्जी आपुले पतीते ॥२४॥
पतीसी म्हणे ते नारी । गुरूसी शापिता दोष भारी । वंदुनी तयाचे चरण धरी । तेणे भवसागर तरशील ॥२५॥
मदयंती सतीचे वचन । मानिता झाला राजा आपण । अंजुळीचे उदक जाण । टाकी आपुले चरणावरी ॥२६॥
शाप देता कल्मषपाणी । पडले राजाचे चरणी । कल्मषपाद नाम म्हणोनि । ब्रह्मराक्षस झाला तो राव ॥२७॥
राजपत्नी येऊनि परियेसी । लागली वसिष्ठचरणांसी । उद्धरी स्वामी बाळकासी । एवढा कोप काय काज ॥२८॥
करुणावचन ऐकोनि । शांत झाला वसिष्ठ मुनि । वर्षे बारा क्रमोनि । पुनरपि राजा होशील ॥२९॥
उःशाप देऊनि वसिष्ठ ऋषि । गेला आपुले स्थानासी । ब्रह्मराक्षस राजा परियेसी । होऊनी गेला वनांतरा ॥३०॥
निर्मनुष्य अरण्यात । राजा राहिला प्रख्यात । भक्षीतसे अनेक जंत । पशुमनुष्य आदिकरूनि ॥३१॥
ऐसे क्रमिता तये वनी । मार्गस्थ दंपत्ये दोनी । ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी । देखिला राक्षस भयासुर ॥३२॥
येऊनि धरी ब्राह्मणासी । व्याघ्र जैसा पशूसी । घेऊनि गेला भक्षावयासी । विप्रस्त्री समागमे ॥३३॥
अतिशोक करी ब्राह्मणी । जाऊनि लागे राक्षसचरणी । राखे मजला अहेवपणी । प्राणेश्वराते सोडी पितया ॥३४॥
न भक्षी गा माझा पति ।माझी तयावरी अतिप्रीति । मज भक्षी गा म्हणे सुमति । वल्लभाते सोडोनिया ॥३५॥
पतीविण राहता नारी । जन्म वृथाचि दगडापरी । पहिले माते स्वीकारी । प्राण राखे पतीचे ॥३६॥
पति लावण्य पूर्ववयेसी । वेदशास्त्रपारंगेसी । याचा प्राण जरी तू रक्षिसी । जगी होईल तुज पुण्य ॥३७॥
कृपा करी गा आम्हावरी । होईन तुझी कन्या कुमारी । मज पुत्र होतील जरी । नाम वाढवीन तुझे मी ॥३८॥
ऐसे नानापरी देखा । विप्रस्त्री करी महादुःखा । बोल न मानोनि राक्षसे ऐका । त्या ब्राह्मणाते भक्षिले ॥३९॥
पतीते भक्षिले देखोनि । शाप वदली ते ब्राह्मणी । म्हणे राक्षसा ऐक कानी । शाप माझा निर्धारे ॥४०॥
तू राजा सूर्यवंशी । शापास्तव राक्षस झालासी । पुढे मागुती राजा होसी द्वादश वर्षे क्रमोनि ॥४१॥
परि रमता स्त्रियेसवे । प्राण जाईल स्वभावे । अनाथा भक्षिले दुष्ट भावे । दुरात्म्या तू राक्षसा ॥४२॥
शाप देऊनि तया वेळी । पतीच्या अस्थि मिलवूनि जवळी । काष्ठे घालोनिया प्रबळी । अग्निप्रवेश केला तिने ॥४३॥
ऐसे असता राव देखा । क्रमी बारा वर्षे निका । पुनरपि राजा होऊन ऐका । आला आपुले नगरासी ॥४४॥
विप्रस्त्रियेचे शापवचन । स्त्रियेसी सांगितली खूण । म्हणे संग करिता तत्क्ष्ण । मृत्यु असे आपणासी ॥४५॥
ऐकोनि पतीचे वचन । मदयंती दुःख करी आपण । मन करूनि निर्वाण । त्यजावया प्राण पहातसे ॥४६॥
मदयंती म्हणे रायासी । संतान नाही तुमचे वंशासी । वनी कष्टला बारा वर्षी । आपुले कर्म न चुकेची ॥४७॥
ऐकोनि सतीचे वचन । शोके दाटला अतिगहन । अश्रु आले नेत्रांतून । काय करू म्हणतसे ॥४८॥
मंत्रीवृद्धपुरोहितांसी । बोलाविले परियेसी । ब्रह्महत्या घडली आम्हांसी । विमोचन होय कवणेपरी ॥४९॥
मंत्रीवृद्धपुरोहित । तयासी म्हणती ऐका मात । तीथे आचरावी समस्त । तेणे पुनीत व्हाल तुम्ही ॥५०॥
करोनि ऐसा विचार । राजा निघे तीर्था साचार । सर्व तीर्थपरिकर । विधिपूर्वक करीतसे ॥५१॥
ज्या ज्या तीर्था जाय आपण । अनेक पुण्य करी जाण । यज्ञादिक कर्म अन्नदान । ब्राह्मणादिका देतसे ॥५२॥
ऐसी नाना तीर्थे करीत । परी ब्रह्महत्या सवेचि येत । अघोररूपी असे दिसत । कवणेपरी न जायची ॥५३॥
कष्टोनि राजा बहुतांपरी । निर्वाण होऊनि मनाभीतरी । हिंडत पातला मिथिलापुरी । चिंताग्रस्त होवोनिया ॥५४॥
नगरा-बाह्यप्रदेशी । श्रमोनि राजा परियेसी । चिंता करी मानसी । वृक्षच्छाये बैसलासे ॥५५॥
ऋषेश्वरासमवेत । जैसा रुद्र प्रकाशित । गौतम ऋषि अवचित । तया स्थानासि पातला ॥५६॥
राजा देखोनि गौतमासी । चरणी लोळे संतोषी । नमन करी साष्टांगेसी । भक्तिभावे करोनिया ॥५७॥
आश्वासूनि तये वेळी । गौतम पुसे करुणाबहाळी । क्षेमसमाधान सकळी । पुसता झाला वृत्तान्त ॥५८॥
काय झाले तुझे राज्य । अरण्यवासाचे काय काज । चिंताकुलित मुखांबुज । कवण कार्य घडले असे ॥५९॥
ऐकोनि ऋषीचे वचन । राजा सांगे विस्तारोन । शाप जाहला ब्रह्मवचन । ब्रह्महत्या घडली मज ॥६०॥
प्रायश्चित्ते सकळिक । यज्ञादि कर्मे धर्मादिक । सुक्षेत्रे अपार तीर्थे देख । आपण सकळ आचरली ॥६१॥
शमन न होय महादोष । सवेचि येत अघोर वेष । व्रते आचरलो कोटीश । न जाय दोष सर्वथा ॥६२॥
आजिचेनि माझे सफळ जनन । दर्शन झाले जी तुमचे चरण । होतील माझे कष्ट निवारण । म्हणोनि चरणा लागलो ॥६३॥
ऐकोनि रायाचे वचन । करुणासागर गौतम आपण । म्हणे भय सांडी गा निर्वाण वचन । तारील शंकर मृत्युंजय ॥६४॥
तुझे पापनिवारणासी । सांगेन तीर्थविशेषी । महापातक संहारावयासी । गोकर्ण क्षेत्र असे भले ॥६५॥
स्मरण करितां गोकर्णासी । ब्रह्महत्यादि पाप नाशी । तेथे ईश्वर सदा निवासी । मृत्युंजय सदाशिव ॥६६॥
जैसे कैलासाचे शिखर । अथवा स्वर्धुनीमंदिर । निश्चय वास कर्पूरगौर । गोकर्णक्षेत्री परियेसा ॥६७॥
जैसी अंधकाररजनी । प्रकाशावया जेवी अग्नि । चंद्रोदय जरि होय निर्वाणी । तरी सूर्यप्रकाशावीण गति नव्हे ॥६८॥
तैसे समस्त तीर्थाने । पाप नच जाय याचि कारणे । सूर्योदयी तमहरणे । तैसे गोकर्णदर्शने होय ॥६९॥
सहस्त्र ब्रह्महत्या जरी । घडल्या असती या शरीरी । प्रवेश होता गोकर्णक्षेत्री । शुद्धात्मा होय परियेसा ॥७०॥
रुद्रोपेंद्रविरिंचि देखा । जाऊनि तया स्थानी ऐका । तप केले हो सकळिका । कार्यसिद्धि होय त्यांप्रती ॥७१॥
भक्तिपूर्वक तया स्थानी । जप व्रत करिती जाणोनि । फळ होय त्या लक्षगुणी । असे पुण्यक्षेत्र असे ॥७२॥
जैसे ब्रह्मा विष्णु देखा । इंद्रादि देवा सकळिका । साध्य झाले तप ऐका । यावेगळे काय सांगू ॥७३॥
जाणा तो साक्षात् ईश्वर । गोकर्णक्षेत्र कैलासपुर । प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर । विष्णुनिरोपे विनयार्थ ॥७४॥
समस्त देव तेथे येती । पुण्यक्षेत्री वास करिती । ब्रह्मा विष्णु इंद्रासहिती । विश्वेदेवे मरुद्गण ॥७५॥
चंद्र सूर्य वस्वादिक । पूर्वद्वारी राहिले ऐक । प्रीति करी भक्तिपूर्वक । बैसले असती तये स्थाना ॥७६॥
अग्नि यम चित्रगुप्त । एकादश रुद्र पितृदैवत । दक्षिणद्वारी वास करीत । संतोषे राहिले असती ॥७७॥
वरुणासहित गंगा सकळी । राहती पश्चिमद्वारस्थळी । प्रीति करी चंद्रमौळी । तया सकळां परियेसा ॥७८॥
कुबेर वायु भद्रकाळी । मातृदेवता चंडी सकळी । उत्तरवास त्रिकाळी । पूजा करिती महाबळेश्वराची ॥७९॥
चित्ररथादि विश्वावसु परियेसी । चित्रसेन गंधर्व सुरसी । पूजा करिती सदाशिवासी । सदा वसोनि तया ठायी ॥८०॥
घृताची रंभा मेनका । तिलोत्तमा उर्वशी ऐका । नित्य नृत्य करिती देखा । महाबळेश्वराचे सन्मुख ॥८१॥
वसिष्ठ कश्यप कण्व ऋषि । विश्वामित्र महातापसी । भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषि । पूजा करिती सदा तेथे ॥८२॥
कृतयुगी ब्रह्म-ऋषि । आचार करिती महातापसी । महाबळेश्वराचे भक्तीसी । राहिले गोकर्णक्षेत्रांत ॥८३॥
मरीचि नारद अत्रि ऋषि । दक्षादि ब्रह्म-ऋषि परियेसी । सनकादिक महातापसी । उपनिषदार्थ उपासिती ॥८४॥
अनेक सिद्ध साध्य जाण । मुनीश्वर अजिनधारण । दंडधारी संन्यासी निर्गुण । ब्रह्मचारी तेथे वसती ॥८५॥
त्वगस्थिमात्रशरीरेसी । अनुष्ठिती महातापसी । पूजा करिती भक्तीसी । चंद्रमौळीची परियेसा ॥८६॥
गंधर्वादि समस्त देव । पितर सिद्ध अष्टवसव । विद्याधर किंपुरुष सर्व । सेवेसी जाती निरंतर ॥८७॥
गुह्यक किन्नर स्वर्गलोक । शेषादि नाग तक्षक । पिशाच वेताळ सकळिक । जाती पूजेसी तया स्थाना ॥८८॥
नाना श्रृंगार करूनि । अनेक भूषणे विराजमानी । सूर्यशशी विमानी । वहनी येती वळंघोनिया ॥८९॥
स्तोत्रे गायन करिती देखा । नमिती नृत्य करिती अनेका । पूजेकारणे येती सकळिका । महाबळेश्वरलिंगासी ॥९०॥
जे जे इच्छिती मनकामना । पावती त्वरित निर्धारे जाणा । समान नाही क्षेत्र गोकर्ण । या ब्रह्मांडगोलकांत ॥९१॥
अगस्त्यादि सनत्कुमार । प्रियव्रतादि राजकुमार । अग्निदेवदानवादि येर । वर लाधले सर्व तया ठायी ॥९२॥
शिशुमारी भद्रकाळी । पूजा करिती त्रिकाळी । नागाते गरुड न गिळी । महाबळेश्वरदर्शने ॥९३॥
रावणादि राक्षसकुळी । कुंभकर्ण येर सकळी । वर लाधले ये स्थळी । बिभीषण पूजीतसे ॥९४॥
ऐसे समस्त देवकुळ । सिद्धदानवादि सकळ । गोकर्णक्षेत्रा जाऊनि प्रबळ । आराधिती नानापरी ॥९५॥
लिंग स्थापिती आपुले नामी । असे ख्याति तया नामी । वर लाधले अनेक कामी । चतुर्विध पुरुषार्थ ॥९६॥
ब्रह्मा विष्णु आपण देखा । कार्तवीर्य विनायका । आपुले नामी लिंग देखा । प्रतिष्ठा केली तये ठायी ॥९७॥
धर्मक्षेत्रपाळादी । दुर्गादेवीशक्तिवृंदी । लिंग स्थापिले आपुले नामी । ज्या गोकर्णक्षेत्रात ॥९८॥
गोकर्णक्षेत्र असे गहन । लिंग तीर्थे असंख्य जाण । पदोपदी असे निर्गुण । ऐसे क्षेत्र अनुपम असे ॥९९॥
सांगो किती विस्तारोन । असंख्यात तीर्थे जाण । पाषाण समस्त लिंग खूण । समस्त उदके जाणावी तीर्थे ॥१००॥
कृतयुगी महाबलेश्वर श्वेत । त्रेतायुगी लोहित । द्वापारी सुवर्णपित । कलियुगी कृष्णवर्ण जाहला ॥१॥
सप्त पाताळ खोलावोन । उभे असे लिंग आपण । कलियुगी मृदु होऊन । दिसे सूक्ष्ममरूपाने ॥२॥
पश्चिम समुद्रतीरासी । गोकर्णक्षेत्रविशेषी । ब्रह्महत्यादि पातके नाशी । काय आश्चर्य परियेसा ॥३॥
ब्रह्महत्यादि महापापे । परदारादि षट् पापे । दुःशील दुराचारी पापे । जाती गोकर्णदर्शने ॥५॥
दर्शनमात्रे पुनीत होती । समस्त काम्यार्थ साधती । अंती होय तयांसी गति । गोकर्णलिंगदर्शने ॥५॥
तये स्थानी पुण्यदिवशी । जे जे अर्चिती भक्तीसी । तेचि जाणा रुद्रवंशी । रायासी म्हणे गौतम ॥६॥
एखादे समयी गोकर्णासी । जाय भक्तीने मानुषी । पूजा करिता सदाशिवासी । शिवपद निश्चये पावे जाणा ॥७॥
आदित्य सोम बुधवारी । अमावास्यादि पर्वाभितरी । स्नान करूनि समुद्रतीरी । दानधर्म करावा ॥८॥
शिवपूजा व्रत हवन । जप ब्राह्मणसंतर्पण । किंचित् करिता अनंत पुण्य । गौतम म्हणे रायासी ॥९॥
व्यतिपातादि पर्वणीसी । सूर्य-संक्रांतीचे दिवशी । महाप्रदोष त्रयोदशी । पूजितां पुण्य अगण्य ॥११०॥
काय सांगो त्याचा महिमा । निवाडा होय अखिल कर्मा । ईश्वर भोळा अनंतमहिमा । पूजनमात्रे तुष्टतसे ॥११॥
असित पक्ष माघमासी । शिवरात्री चतुर्दशीसी । बिल्वपत्र वाहिले यासी । दुर्लभ असे त्रिभुवनांत ॥१२॥
ऐसे अनुपम स्थान असता । न जाती मूर्ख लोक ऐकता । शिवतीर्थ असे दुर्लभता । नेणती मूढ बधिर जाणा ॥१३॥
उपोषणादि जागरण । लिंग सन्निध गोकर्ण । स्वर्गासि जावया सोपान । पद्धति असे परियेसा ॥१४॥
ऐसे या गोकर्णस्थानासी । जे जाती जन यात्रेसी । चतुर्विध पुरुषार्थांसी । लाधती लोक अवधारा ॥१५॥
स्नान करूनि समस्त तीर्थी । महाबळेश्वरलिंगार्थी । पूजा करावी भक्त्यर्थी । पातकाव्यतिरिक्त होय जाणा ॥१६॥
ऐशापरी गोकर्णमहिमा । प्रकाश केला ऋषी गौतमा । राजा ऐकोनि अतिप्रेमा । पुसता झाला ते वेळी ॥१७॥
राजा म्हणे गौतमासी । गोकर्णस्थान निरोपिलेसी । पूर्वी पावला कोण यापासी । साक्ष झाली असेल ॥१८॥
विस्तारोनि ते आम्हांसी । सांगावे स्वामी करुणेसी । म्हणोनि लागला चरणांसी । अतिभक्ति करोनिया ॥१९॥
म्हणे गौतम तये वेळी । गोकर्णक्षेत्र महाबळी । जाणो आम्ही बहुकाळी । अपार साक्षी देखिली असे ॥१२०॥
गेलो होतो आम्ही यात्रे । देखिला दृष्टान्त विचित्र । आले होते तेथे जनमात्र । यात्रारूपे करोनिया ॥२१॥
माध्याह्नकाळी आम्ही तेथे । बैसलो होतो वृक्षच्छायेते । दुरोनि देखिले चांडाळीते । वृद्ध अंध महारोगी ॥२२॥
शुष्कमुखी निराहारी । कुष्ठ सर्वांगशरीरी । कृमि पडले अघोरी । पूय शोणित दुर्गंधी ॥२३॥
कुक्षिरोगी गंडमाळा । कफे दाटला असे गळा । दंतहीन अति विव्हळा । वस्त्र नाही परिधाना ॥२४॥
चंद्रसूर्यकिरण पडता । प्राण जाय कंठगता । शौचव्याधी असे बहुता । सर्वांगशूळ महादुःखी ॥२५॥
विधवा आपण केशवपनी । दिसे जैसी मुखरमणी । क्षणक्षणा पडे धरणी । प्राणत्याग करू पाहे ॥२६॥
ऐशी अवस्था चांडाळीसी । आली वृक्षच्छायेसी । देह टाकिला धरणीसी । त्यजू पाहे प्राण आपुला ॥२७॥
प्राण त्यजिता तये वेळी । विमान उतरे तत्काळी । शिवदूत अतिबळी । त्रिशूळ खट्वांग धरूनिया ॥२८॥
टंकायुधे चंद्र भाळी । दिव्यकांति चंद्रासारखी केवळी । किरीटकुंडले मिरवली । चतुर्वर्ग येणेपरी ॥२९॥
विमानी सूर्यासारिखे तेज । अतिविचित्र दिसे विराज । आले चांडाळियेकाज । अपूर्व वर्तले तये वेळी ॥३०॥
आम्ही पुशिले शिवदूतांसी । आलेति कवण्या कार्यासी । दूत म्हणती आम्हांसी । न्यावया आलो चांडाळिते ॥३१॥
ऐकोनि दूताचे वचन । विस्मित झाले आमुचे मन । पुनरपि केला त्यासी प्रश्न । ऐक राया तू एकचित्ते ॥३२॥
ऐशिया चांडाळी पापिणीसी । कैसी योग्य विमानेसी । नेऊनिया श्वानासी । सिंहासनी कैसे योग्य ॥३३॥
या जन्मादारभ्य इसी । पापे पापसंग्रहासी । ऐशी पापीण दुर्वृत्त इसी । केवी न्याल कैलासा ॥३४॥
नाही इसी शिवज्ञान । न करीच हे तपसाधन । दया सत्य कदा नेणे । इसी कैसे न्याल तुम्ही ॥३५॥
पशुमांस आहार इसी । सदा करी जीवहिंसी । ऐशिया दुष्ट कुष्ठी पापिणीसी । केवी नेता स्वर्गभुवना ॥३६॥
अथवा कधी शिवपूजन । न करी पंचाक्षरीजपन । नाही केले शिवस्मरण । इसी कैसे न्याल तुम्ही ॥३७॥
शिवरात्री उपोषण । नाही केले पुण्यदान । यज्ञयागादि साधन । नाही केले इणे कधी ॥३८॥
न करी स्नान पर्वकाळी । नेणे तीर्थ कवणे वेळी । अथवा व्रतादि सकळी । केले नाही इणे कधी ॥३९॥
या सर्वांगी पूय शोणित । दुर्गंधी असे बहुत । ऐशी चांडाळी दुर्वृत्त । कैसी विमानी बैसवाल ॥१४०॥
अर्चन जन्मांतरीचे म्हणा । कुष्ठ सर्वांग तेचि खुणा । कृमि निघती मुखांतून । पूर्वाजित काय केले ॥४१॥
ऐशी पापिणी दुराचारी । केवी नेता कैलासपुरी । योग्य नव्हे चराचरी । तुम्ही केवी न्याल इसी ॥४२॥
गौतम म्हणे रायासी । ऐसे पुशिले दूतांसी । त्यांनी सांगितला आम्हांसी । आद्यंत तये चांडाळीचा ॥४३॥
म्हणे गौतम ऋषेश्वर । चांडाळीचे पूर्वापार । सांगेन तुम्हांस सविस्तर । असे आश्चर्य परियेसा ॥४४॥
पूर्वी इचे जन्मस्थान । ब्राह्मणकन्या असे जाण । सौदामिनी नाम असे पूर्ण । सोमबिंबासारखे मुख ॥४५॥
अतिसुंदर रूप इसी । उपवर जाहली पितृगृहासी । न मिळे वर तियेसी । चिंता करिती मातापिता ॥४६॥
न मिळे वर सुंदर तिसी । उन्मत्त जाहली दहा वरुषी । मिळवूनि एका द्विजासी । गृह्योक्तेंसी लग्न केले ॥४७॥
विवाह झालियावरी । होती तया पतीचे घरी । क्वचित्काळ येणेपरी । होती नारी परियेसा ॥४८॥
वर्तता असे पुढे देख । तिचे पतीस झाले दुःख । पंचत्व पावला तात्काळिक । विधिलेख करूनिया ॥४९॥
ऐकोनि तिचे मातापिता । कन्या आपुले घरा आणिती तत्त्वता । पतीचे दुःखे दुःखिता । खेद करी ते नारी ॥१५०॥
अतिसुंदर पूर्ववयासी । मदे व्याप्त प्रतिदिवसी । चंचळ होय मानसी । परपुरुषाते देखोनिया ॥५१॥
गुप्तरुपे क्वचित्काळी । जारकर्म करी ते बाळी । प्रगट जाहले तत्काळी । गौप्य नोहे पातक ॥५२॥
आपण विधवा असे नारी । पूर्ववयासी अतिसुंदरी । विषयी प्रीति असे भारी । स्थिर नोहे तिचे मन ॥५३॥
ऐसे तिचिया पातकासी । विदित जाहले सर्वांसी । वाळीत केले तियेसी । मातापिताबंधुवर्गी ॥५४॥
शंका होती पहिली तिसी । निःशंक झाली व्यभिचारासी । प्रकटरूप अहर्निशी । रमो लागली नगरांत ॥५६॥
तिये नगरी एक वाणी । रूपे होता अतिलावण्यगुणी । त्यासी तिणे पूर्ववयस देखोनि । झाली त्याची कुलस्त्री ॥५७॥
तया शूद्राचिया घरी । वर्ततसे ते नारी । ऐसी पापिणी दुराचारी । कुळवैरीण बेचाळीस ॥५८॥
श्लोक ॥ स्त्रियः कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीनसेवया । राजानो ब्रह्मदंदेन यतयो भोगसंग्रहात ॥५९॥
टीका ॥ स्त्रिया नासती कामवेगे । ब्राह्मण नासती हीनसेवे । राज्य जाय द्विजक्षोभे । यति नासे विषयसेवने ॥१६०॥
शूद्रासवे अहर्निशी । रमत होती अतिहर्षी । पुत्र जाहला तियेसी । शूद्रगृही असता ॥६१॥
नित्य मांस आहार तिसी । मद्यपान उन्मत्तेसी । होऊनि तया शूद्रमहिषी । होती पापिणी दुराचारी ॥६२॥
वर्तता एके दिवसी । उन्मत्त होवोनि परियेसी । छेदिले वासरू आहारासी । मेष म्हणोनि पापिणीने ॥६३॥
छेदोनि वत्स परियेसी । पाक केला विनयेसी । शिर ठेविले शिंकियासी । दुसरे दिवशी भक्षावया ॥६४॥
आपण भ्रमित मद्यपानी । जागृत जाहली अस्तमानी । वासरू पाहे जावोनि । धेनु दोहावयालागी ॥६५॥
वत्सस्थानी असे मेष । भ्रमित जाहली अतिक्लेश । घरी पाहातसे शिरास । स्पष्ट दिसे वासरू ॥६६॥
अनुतप्त होवोनि तये वेळी । शिव शिव म्हणे चंद्रमौळी । अज्ञानाने ऐशी पापे घडली । म्हणोनि चिंती दुरात्मिणी ॥६७॥
तया वत्सशिरासी । निक्षेप केला भूमीसी । पति कोपेल म्हणोनि परियेसी । अस्थिचर्म निक्षेपिले ॥६८॥
जाऊनि सांगे शेजार लोका । व्याघ्रे वत्स नेले ऐका । भक्षिले म्हणोनि रडे देखा । पतीपुढे येणेपरी ॥६९॥
ऐसी कितीक दिवसांवरी । नांदत होती शूद्राघरी । पंचत्व पावली ते नारी । नेली दूती यमपुरा ॥१७०॥
घातली तियेसी नरकात । भोग भोगी अतिदुःखित । पुनरपि जन्मा चांडाळी जात । उपजली नारी परियेसा ॥७१॥
उपजतांचि जाहलि अंधळी । विद्रूपवर्ण जैशी काजळी । माता पिता क्वचित्काळी । प्रतिपाळिती मायामोहे ॥७२॥
उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा । स्वजन तियेचे अखंडा । बाळपणी तयेसि विघडा । पोसिताती येणेपरी ॥७३॥
ऐसे असता वर्तमानी । सर्वांग झाले कुष्ठवर्णी । पंचत्व पावली पिताजननी । दरिद्री झाली निराश्रय ॥७४॥
सर्वांग कुष्ठवर्णपीडित । त्यजिती तियेसि स्वजन भ्रात । भिक्षा मागोनि उदर भरित । रक्षण करी शरीर आपुले ॥७५॥
येणेपरी चांडाळी । वर्तत असे बहुतकाळी । क्षुधेने पीडित सर्वकाळी । आपण अंध कुष्ठ देही ॥७६॥
न मिळे तिसी वस्त्र अन्न । दुःख करीत अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म । झाली वृद्ध अतिकष्टे ॥७७॥
भिक्षा मागे जनांसी । मार्गी पडोनि अहर्निशी । कधी न भरे उदर तिसी । दुःखे विलापे अपार ॥७८॥
व्याधि असे शरीरासी । शोणित पूय परियेसी । दुर्गंधि येत असे महादोषी । सर्वांग कुष्ठे गळतसे ॥७९॥
ऐसे वर्ततांम माघमासी । लोक निघाले यात्रेसी । महास्थान गोकर्णासी । कलत्रपुत्रसहित देख ॥१८०॥
शिवरात्रीचे यात्रेसी । येती लोक देशोदेशी । चतुर्वर्ण आसपासी । हरुषे येती परियेसा ॥८१॥
देशोदेशीचे राजे देखा । हस्तीरथादिसहित ऐका । येती समस्त भूमांडलिका । महाबळेश्वरदर्शनासी ॥८२॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । येती यात्रेसी विनोद । समारंभ वाद्यनाद । अमित लोक परियेसा व८३॥
किती हासती गायन करिती । धावती नृत्य करीत येती । शिवस्मरणे गर्जना करिती । यात्राप्रसंगी जन देखा ॥८४॥
ऐसी महाजनांसमवेत । चांडाळी गेली तेथे त्वरित । सवे भिक्षुक असती बहुत । तयांसवे जात असे ॥८५॥
येणेपरी गोकर्णासी । चांडाळी पातली सायासी । करावलंबे महाजनांसी । भिक्षा मागे करुणावचने ॥८६॥
लोक जाती मार्गात । शयन करी आक्रंदत । कर वोढूनि मागत । महाजन लोकांसी ॥८७॥
पूर्वीची पापी आपण । पीडत असे याची कारण । भिक्षा घाला क्षुधानिवारण । म्हणोनि मागे सकळिका ॥८८॥
नेणे कधीच वस्त्र प्रावरण । धुळीत लोळे आपण । क्षुधाक्रांत होतसे मरण । धर्म करा सकळांसी म्हणे ॥८९॥
सर्वांगी रोगग्रस्त । वस्त्रावीण बाघे शीत । अक्ष नाही क्षुधाक्रांत । धर्म करा सकळिक हो ॥१९०॥
पूर्वी जन्मशतांतरी । नाही केले पुण्य येरी । याचि कारणे पीडित भारी । धर्म करा सकळिक ॥९१॥
येणेपरी मार्गांत । चांडाळी असे याचित । ते दिवशी असे शिवरात्रीव्रत । कोणी न घाली भिक्षा तिसी ॥९२॥
येरी विव्हळे क्षुधाक्रांत । जठराग्नि प्रदीप्त असे बहुत । धर्म करा ऐसे म्हणत । पडली मार्गात तेधवा ॥९३॥
पूजेसि जाती सकळजन । त्याते मागे आक्रंदोन । एक म्हणती हांसोन । उपवास आजि अन्न कैचे ॥९४॥
हाती होती बिल्वमंजरी । घाली ती तियेच्या करी । आघ्राणोनि पाहे येरी । भक्षणवस्तु नव्हे म्हणे ॥९५॥
कोपोनि टाकी ते अवसरी । जाऊनि पडली लिंगावरी । रात्री असती अंधारी । अलभ्य पूजा घडली देखा ॥९६॥
कोणी न घालिती भिक्षा तिसी । उपास घडला ते दिवशी । पूजा पावली त्या शिवासी । बिल्वमंजरी शिवमस्तकी ॥९७॥
इतुके पुण्य घडले तिसी । प्रयत६न न करिता परियेसी । तुष्टला ईश्वर हर्षी । भवार्णवाकडे केले ॥९८॥
येणेपरी चांडाळीसी । उपवास घडला अनायासी । तेथूनि उठली दुसरे दिवसी । भिक्षा मागावयाकारणे ॥९९॥
पहिलीच कुष्ठरोगी असे । अशक्त झाली उपवासे । चक्षुहीन मार्ग न दिसे । जात असे मंदमंद ॥२००॥
सूर्यरश्मीकरूनि तिसी । दुःख होय असमसहसी । पूर्वार्जित कर्मे ऐसी । म्हणती दूत गौतमाते ॥१॥
ऐसी चांडाळी कष्टत । आली वृक्षच्छायेसमीप । त्यजूं पाहे प्राण त्वरित । म्हणोनिया आलो धावोनि ॥२॥
पुण्य घडले इसी आजी । उपवास शिवतिथीकाजी । बिल्वपत्रे ईश्वर पूजी । घडले रात्री जागरण ॥३॥
तया पुण्येकरूनि इचे । पाप गेले शतजन्मीचे । हे प्रीतिपात्र ईश्वराचे । म्हणोनि पाठविले आम्हांसी ॥४॥
ऐसे म्हणती शिवदूत । तियेवरी शिंपूनिया अमृत । दिव्यदेह पावूनि त्वरित । गेली ऐका शिवलोका ॥५॥
ऐसे गोकर्ण असे स्थान । गौतम सांगे विस्तारोन । रायासि म्हणे तू निघोन । त्वरित जाई गोकर्णासी ॥६॥
जातांचि तुझी पापे जाती । इह सौख्य परत्र उत्तम गति । संशय न धरी गा चित्ती । म्हणोनि निरोपी रायासी ॥७॥
परिसोनि गौतमाचे वचन । राजा मनी दृढ संतोषोन । त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण । पापावेगळा जाहला तो ॥८॥
ऐसे पुण्यपावन स्थान । म्हणोनि राहिले श्रीपाद आपण । सिद्ध म्हणे ऐक कथन । नामधारका एकचित्ते ॥९॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधरू । सांगे गुरुचरित्र विस्तारू । श्रोते करूनि निर्धारू । एकचित्ते परियेसा ॥२१०॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमावर्णन नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥
Search
Search here.