श्रीगुरुचरित्र अध्याय ८ ते १२
ग्रंथ - पोथी > गुरुचरित्र Posted at 2019-02-09 13:09:33
श्रीगुरुचरित्र
अध्याय ८
श्रीगणेशायनमः ।
नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णमहिमा निरोपिलासी । श्रीगुरु राहिले किती दिवसी । वर्तले पुढे काय सांग ॥१॥
श्रीगुरुमूर्ति कृपासिंधु । माझे मनी लागला वेधु । चरित्र ऐकतां महानंदु । अतिउल्हास होतसे ॥२॥
परिसोनि शिष्याचे वचन । संतोषे सिद्ध अतिगहन । सांगता झाला विस्तारोन । श्रोते तुम्ही अवधारा ॥३॥
गोकर्णक्षेत्री श्रीपाद यति । राहिले वर्षे तीन गुप्ती । तेथोनि श्रीगिरिपर्वता येती । लोकानुग्रहाकारणे ॥४॥
जयाचे करिता चरणदर्शन । समस्त तीर्थासमान जाण । 'चरणं पवित्रं विततं पुराणं । वेदश्रुति ऐसे बोलतसे ॥५॥
समस्त तीर्थे गुरुचरणी । तो कां हिंडे तीर्थभवनी । लोकानुग्रहालागुनी । जात असे परियेसा ॥६॥
मास चारी क्रमोनि तेथे । आले निवृत्तिसंगमाते । दर्शन देती साधुभक्तांते । पातले तया कुरवपुरा ॥७॥
कुरवपुर महाक्शेत्र । कृष्णा गंगा वाहे नीर । महिमा तेथील सांगता अपार । भूमंडाळात दुर्लभ ॥८॥
तेथील महिमा सांगता । विस्तार होईल बहुत कथा । पुढे असे चरित्र अमृता । सांगेन ऐका एकचित्ते ॥९॥
श्रीपाद राहिले कुरवपुरी । ख्याति राहिली भूमीवरी । प्रगटे महिमा अपरंपारी । सांगतां विस्तार असे देखा ॥१०॥
जे जन भजती भक्तीसी । सौख्य पावती अप्रयासी । कन्या पुत्र लक्ष्मीसी । चिंतिले फळ पावती ॥११॥
समस्त महिमा सांगावयासी । विस्तार होईल बहुवसी । नामधारका स्वस्थ परियेसी । सांगेन किंचित् तुज आतां ॥१२॥
पुढे अवतार व्हावया गति । सांगेन ऐका एकचित्ती । श्रीपाद कुरवपुरा असती । कार्यकारणमनुष्यदेही ॥१३॥
अवतार व्हावयाचे कारण । सांगेन त्याचे पूर्वकथन । वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण । होता तया ग्रामी ॥१४॥
त्याची भार्या होती देखा । नाम तियेचे अंबिका । सुशील आचार पतिसेवका । महापुण्य सती देखा ॥१५॥
तियेसी पुत्र होऊनि मरती । पूर्वकर्मफळ अर्जिती । अनेक तीर्थे आचरती । तिणे केलि परियेसा ॥१६॥
ऐसे असतां जे होणार गति । पुत्र जाहला मंदमति । माता स्नेह करी भक्ती । अपूर्व आपणासी म्हणोनि ॥१७॥
वर्धता मातापित्याघरी । विप्रात्मज वाढला प्रीतिकरी । व्रतबंध करिती कुळाचारी । वेदाभ्यास करावया ॥१८॥
विद्या नये तया कुमरा । मंदमति अज्ञान बहिरा । चिंता वर्ते त्या द्विजवरा । म्हणे पुत्र मंदमति ॥१९॥
अनेक देव आराधोनि । पुत्र लाधलो कष्टोनि । प्राचीन कर्म न सुटे म्हणोनि । चिंता करी अहोरात्र ॥२०॥
अनेक प्रकारे शिकवी त्यासी । ताडन करी बहुवसी । होतसे दुःख जननीसी । वर्जी आपुले पतीते ॥२१॥
पतीसी म्हणे ते नारी । पुत्र नाहीत आम्हा घरी । कष्ट करोनि नानापरी । पोसिले एका बाळकासी ॥२२॥
विद्यान येचि वेद त्यासी । वाया मारून का कष्टसी । प्राचीन कर्म न सुटे त्यासी । की मूढ होऊनि उपजावे ॥२३॥
आतां जरी तुम्ही यासी । ताडन कराल अहर्निशी । प्राण त्यजीन मी भरवसी । म्हणोनि विनवी पतीते ॥२४॥
स्त्रियेचे वचन ऐकोनि । विप्र राहिला निचिंत मनी । ऐसा काही काळ क्रमोनि । होती तया ग्रामांत ॥२५॥
वर्तता ऐसे तया स्थानी । विप्र पडला असमाधानी । दैववशेकरूनि । पंचत्व पावला परियेसा ॥२६॥
मग पुत्रासहित ते नारी । होती तेथे कुरवपुरी । याचूनि आपुले उदर भरी । येणेपरी जीवित्व रक्षी ॥२७॥
विप्रस्त्रियेचा पुत्र देखा । विवाहाहायोग्य झाला निका । निंदा करिती सकळीका । मतिहीन म्हणोनिया ॥२८॥
कन्या न देती तयासी कोणी। म्हणती काष्ठे वाहतो का पाणी । समस्त म्हणती असे दूषणी । उदर भरी येणे विद्ये ॥२९॥
समस्त लोक म्हणती त्यासी । तू दगडापरी व्यर्थ जन्मलासी । लांछन लाविले वंशासी । अरे मूर्खा कुळनाशका ॥३०॥
तुझ्या पितयाचा आचार । ख्याति असे चारी राष्ट्र । जाणे धर्म वेद शास्त्र । त्याचे पोटी अवतरलासी ॥३१॥
बोल आणिलासी तुवा पितरांसी । घातले तया अधोगतीसी । भिक्षा मागोनि उदर भरिसी । लाज कैसी तुज न वाटे ॥३२॥
जन्मोनिया संसारी । काय व्यर्थ पशूचिये परी । अथवा गंगेत प्रवेश करी । काय जन्मोनि सार्थक ॥३३॥
ऐसे ऐकोनि ब्रह्मचारी । दुःख करीत नाना प्रकारी । मातेसि म्हणे ते अवसरी । प्राण त्यागीन मी आता ॥३४॥
निंदा करिती सर्वही मज । असोनि देह कवण काज । पोसू न शके माते तुज । जाईन अरण्यवासासी ॥३५॥
ऐकोनि पुत्राचे वचन । माता करी चिंता गहन । शोकदुःखेकरून । विलाप करी ते नारी ॥३६॥
माता सुत दुःख करीत । गेली गंगाप्रवाहात । तेथे देखिले जगदुद्धरित । श्रीपाद योगी स्नान करिता ॥३७॥
जाऊनि दोघे लागती चरणी । विनविताती कर जोडुनी । वासना असे आमुचे मनी । प्राण त्यजावा गंगेत ॥३८॥
निरोप द्यावा जी आम्हांसी । सद्गति व्हावया कारणासी । आत्महत्या महादोषी । म्हणोनि विनवितो कृपासिंधु ॥३९॥
ऐकोनि विप्रसतीचे वचन । पुसती श्रीपाद कृपायमान । कां संकटी तुमचे मन । त्यजिता प्राण काय निमित्त ॥४०॥
विप्रस्त्री तया वेळा । सांगतसे दुःखा सकळा । म्हणे स्वामी भक्तवत्सला । तारावे आम्हा बाळकाते ॥४१॥
पुत्रावीण कष्ट भारी । अनेक तीर्थे पादचारी । केले व्रत पूजा जरी । सकळ देव आराधिले ॥४२॥
व्रते उपवास सांगू किती । करिते झाले अपरिमिती । झाला पुत्र हा दुर्मति । निंदा करिती सकळ जन ॥४३॥
वेदशास्त्रसंपन्न । पति माझा होता ब्राह्मण । त्याचिये पोटी झाला हीन । मंदमति दुरात्मा हा ॥४४॥
कृपा करी गा श्रीपाद यति । जन्मोजन्मी दैवगति । पुत्र न व्हावा मंदमति । ऐसा प्रकार सांगावा ॥४५॥
कृपासागर दैन्यहरण । म्हणोनि धरिले तुझे चरण । शरणागताचे करावया रक्षण । आलासि आजि कृपासिंधु ॥४६॥
जन्मोनिया संसारी । कष्ट केले नानापरी । न देखेचि सौख्यकुसरी । परी जाहले पुत्र न राहती ॥४७॥
वाचोनिया हा एक सुत । शेळीचे गळा स्तन लोंबत । वृथा जन्मला म्हणत । विनवीतसे श्रीगुरूसी ॥४८॥
देवा आता ऐसे करणे । पुढील जन्मी मनुष्यपणे । पूज्यमान पुत्र पावणे । जैसा पूज्य तू जगत्त्रयासी ॥४९॥
सकळ लोक ज्यासि वंदिती । ऐसा पुत्र व्हावा म्हणे ती । उपाय सांगा श्रीगुरु यती । म्हणोनि चरणां लागली ॥५०॥
त्याचेनि माते उद्धारगति । मागुती न होय पुनरावृत्ति । पितरां सकळा स्वर्गप्राप्ति । लाधे ऐसे निरोपावे ॥५१॥
वासना असे माझे मनी । पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी । बाळपणिच पाहो नयनी । पूज्यमान समस्तांसी ॥५२॥
ऐकोनि तियेचे वचन । सांगती कृपा भक्ति पाहोन । करी वो ईश्वरआराधन । पुत्र होईल श्रीहरीऐसा ॥५३॥
गौळियाचे घरी देखा । कृष्ण उपजला कारणिका । व्रत केले गौळी ऐका । ईश्वराची आराधना ॥५४॥
तैसा तू आराधी ईश्वर । पुत्र पावशील हा निर्धार । तुझा मनोरथ साचार । पावेल सिद्धि श्रीपाद म्हणती ॥५५॥
विप्रस्त्री म्हणे ते वेळी । कैसे व्रत आचरले गौळी । कैसा पूजिला चंद्रमौळी । विस्तारावे मजप्रती ॥५६॥
तैसेच व्रत करीन आपण । म्हणोनि धरी सद्गुरुचरण । कृपामूर्ति सद्गुरु जाण । सांगता झाला ते वेळी ॥५७॥
म्हणती श्रीपाद यति तियेसी । ईश्वर पूजी हो प्रदोषी । मंदवारी तू विशेषी । पूजा करी भक्तीने ॥५८॥
पूजा करी जे गौळणी । विस्तार असे स्कंदपुराणी । कथा सांगेन ऐक कानी । म्हणती श्रीगुरु तियेसी ॥५९॥
ऐकोन श्रीगुरूचे वचना । संतोषली विप्रांगना । पुढती घाली लोटांगणा । तया श्रीपाद श्रीगुरूप्रती ॥६०॥
विप्रस्त्री म्हणे स्वामीसी । अभिनव माते निरोपिलेसी । देखता पूजा प्रदोषी । पुत्र झाला कृष्णा ऐस ॥६१॥
आपण केलिया पूजा जरी । फळ पावेन निर्धारी । पुर्वी कवणे परी । विस्तारावे दातारा ॥६२॥
श्रीगुरु सांगती तियेसी । सांगेन ऐक एकचित्तेसी । उज्जनी नाम नगरीसी । जाहले विचित्र परियेसा ॥६३॥
तया नगरी चंद्रसेन । राजा होता धर्मपरायण । त्याचा सखा असे प्राण । मणिभद्र नामे परियेसा ॥६४॥
सदा ईश्वरभक्ति करी । नाना प्रकारे अपरंपारी । भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणि एक ॥६५॥
कोटिसूर्यांचा प्रकाश । माणिक शोभे महासरस । कंठी घालिता महाहर्ष । तया मणिभद्ररायासी ॥६६॥
तया मण्याचे लक्षण । सुवर्ण होय लोह पाषाण । तेज फाकले ज्यावरी जाण । ते कनक होय परियेसा ॥६७॥
जे जे चिंतीत मानसी । ते ते पावत त्वरितेसी । ऐशी ख्याति माणिकासी । समस्त राजे कांक्षा करिती ॥६८॥
इष्टत्वे मागती किती एक । मागो पाठविती ते माणिक । बलात्कारे इच्छिती एक । राजे वांछिती परियेसा ६९॥
म्हणती विक्रय करूनि देखा । आपणा द्यावे ते माणिका । जरी न देशी स्वाभाविका । तरी युद्धालागी येऊ म्हणती ॥७०॥
राजे समस्त मिळोनि । पातले नगराते उज्जनी । अपार सैन्य मिळवूनि । वेढिले तया नगरासी ॥७१॥
ते दिवशी शनिवार त्रयोदशी । राजा बैसला पूजनासी । शंका न धरितां मानसी । एकचित्ते पूजीतसे ॥७२॥
महाबळेश्वरलिंगासी । पूजा करी तो राजा हर्षी । गौळियाचा कुमर पहावयासी । आला तया शिवालया ॥७३॥
पूजा पाहोनि शिवाची । मुले म्हणती गौळियांची । खेळू चला आम्ही असेची । लिंग करुनि पुजू आता ॥७४॥
म्हणोनि विनोदेकरूनि । आपुले गृहासन्निधानी । एकवटोनि पाषाणी । कल्पिले तेथे शिवालय ॥७५॥
पाषाणाचे करूनि लिंग । पूजा करीत बाळके चांग । नानापरीची पत्री सांग । कल्पिली तेथे पूजेसी ॥७६॥
षोडशोपचारे पूजा करिती । उदक नैवेद्य समर्पिती । ऐसे कौतुके खेळती । गोपकुमर तये वेळी ॥७७॥
गोपिका स्त्रिया येउनी । पुत्रांते नेती बोलावुनी । भोजनाकारणे म्हणोनि । गेले सकळही बाळक ॥७८॥
त्यातील एक गोपीसुत । लिंगभुवन न सोडित । त्याची माता जवळी येत । मारी आपुले पुत्रासी ॥७९॥
म्हणे कुमारा भोजनासी । चाल गृहासी झाली निशी । काही केल्या न जाय परियेसी । तो गोपकुमारक ॥८०॥
कोपेकरूनि ते गौळिणी । मोडी पूजा खेळ अंगणी । पाषाण दूर टाकुनी । गेली आपुले सदनासी ॥८१॥
पूजा मोडिता तो बाळक । प्रलाप करी अनेक । मूर्च्छा येऊनि क्षणेक । पडिला भूमी अवधार ॥८२॥
लय लावूनी लिंगस्थानी । प्राण त्यजू पाहे निर्वाणी । प्रसन्न झाला शूलपाणी । तया गोपसुताकारणे ॥८३॥
शिवालय रत्नखचित । सूर्यासमान प्रभावंत । लिंग दिसे रत्नखचित । जागृत झाला तो बाळ ॥८४॥
निजरूप धरी गौरीरमण । उठवी बाळ करी धरून । वर माग म्हणे मी झालो प्रसन्न । देईन जे वांछिसी ते ॥८५॥
बाळके नमिले ईश्वरासी । कोप न करावा मातेसी । पूजा बिघडली तव प्रदोषी । क्षमा करणे म्हणतसे ॥८६॥
ईश्वर भोळा चक्रवर्ती । वर दिधला बहुप्रीती । प्रदोषसमयी पूजा देखती । गौळिणी होय देवजननी ॥८७॥
तिचे पोटी होईल सुत । तोचि विष्णु अवतार ख्यात । न करी पूजा पाहिली म्हणत । पोषील आपुले पुत्रासी ॥८८॥
जे जे मानसी तू इच्छिसी । पावेल ते ते धरी मानसी । अखिल सौख्य तुझिया वंशासी । पुत्रपौत्रेसी नांदसील ॥८९॥
प्रसन्न होवोनि गिरिजापती । गेले लिंगालयी गुप्ती । लिंग राहिले रत्नखचिती । गौळियाघरी याचिपरी ॥९०॥
कोटिसूर्यप्रकाश । शिवालय दिसे अति सुरस । लोक म्हणती काय प्रकाश । उदय झाला दिनकरा ॥९१॥
आले होते परराष्ट्रराजे । विस्मय करिती चोजे । सांडूनि द्वेष बोलती सहजे । भेटू म्हणती रायासी ॥९२॥
पाहे या पवित्र नगरांत । सूर्य झाला असे उदित । राजा असे बहु पुण्यवंत । ऐसियासी विरोध न करावा ॥९३॥
म्हणोनि पाठविती सेवकासी । भेटू म्हणती रायासी । राजा बोलवी तयांसी । आपुले गृहासी नगरांत ॥९४॥
इतुके होता ते अवसरी । राजा पुसतसे प्रीतिकरी । रात्री असतां अंधकारी । उदय पावला केवी सूर्य ॥९५॥
राजा चंद्रसेनसहित । पाहावया येती कौतुकार्थ । दिसे विचित्र रत्नखचित । शिवालय अनुपम ॥९६॥
येणेचि परी गौळ्याचे सदन । अतिरम्य विराजमान । पुसता झाला आपण । तया गौळिकुमारकाते ॥९७॥
सांगितला सकळ वृत्तान्त । संतोष करिती राजे समस्त । गौळियांत राजा तू म्हणत । देती नानादेशसंपदा ॥९८॥
निघोनि गेले राजे सकळ । राहिला चंद्रसेन निर्मळ । शनिप्रदोष पूजा सफळ । भय कैचे तया राजा ॥९९॥
गौळीकुमर येऊनि घरा । सांगे माते सविस्तरा । पुढे येईल तुझ्या उदारा । नारायण अवतरोनि ॥१००॥
ऐसा ईश्वरे दिधला वर । संशय न करी तू निर्धार । संतोषला कर्पूरगौर । देखिली पूजा प्रदोषाची ॥१॥
मोडिली पूजा म्हणोनि । म्यां विनविला शूलपाणी । क्षमा करूनि घेतले म्हणोनि । सांगे वृत्तान्त मातेसी ॥२॥
ऐसा ईश्वर प्रसन्न झाला । प्रदोषपूजने तया फळला । श्रीपाद सांगती तया वेळा । विप्रस्त्रियेकारणे ॥३॥
तुझे मनी असेल जरी । होईल पुत्र मजसरी । संशय सांडूनि निर्धारी । शनिप्रदोषी पूजी शंभू ॥४॥
ऐसे म्हणोनि श्रीपाददेव । चक्रवर्ती भोळा शिव । विप्रस्त्रियेचा पाहोनि भाव । प्रसन्न होत तया वेळी ॥५॥
बोलावूनि तिचे कुमारासी । हस्त ठेविती मस्तकेसी । ज्ञान जाहले तत्काळेसी । त्रिवेदी झाला तो ब्राह्मण ॥६॥
वेदशास्त्रादि तर्कभाषा । म्हणता झाला अतिप्रकाशा । विस्मय झाला असे सहसा । विप्र म्हणती आश्चर्य ॥७॥
विस्मय करोनि विप्रवनिता । म्हणे ईश्वर हाचि निश्चिता । कार्याकारणे अवतार होता । आला नरदेह धरोनि ॥८॥
पूर्वजन्मीचे पुण्यार्जित । जोडला आम्हा हा निश्चित । भेटला असे श्रीगुरुनाथ । म्हणोनि नमिती क्षणोक्षणा ॥९॥
म्हणे ईशर तूचि होसी । पूजा करीन तुझी मी प्रदोषी । मिथ्या नोहे तुझे वाक्यासी । पुत्र व्हावा तुज ऐसा ॥११०॥
ऐसा निश्चय करोनि । पूजा करिती नित्य येऊनि । प्रदोषपूजा अति गहनी । करी श्रीपादरायासी ॥११॥
पुत्र तिचा झाला ज्ञानी । वेदशास्त्रार्थसंपन्नी । पूज्या जाहला सर्वांहूनि । ब्रह्मवृंद मानित ॥१२॥
विवाह झाल मग यासी । पुत्रपौत्री नांदे हर्षी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । ऐसे होय अवधारा ॥१३॥
ऐसा श्रीगुरु कृपावंत । भक्तजना असे संरक्षित । ऐक शिष्या एकचित्त । नामधारका श्रीमता ॥१४॥
नामधारक भक्तासी । सांगे सिद्ध विस्तारेसी । परियेसा समस्त अहर्निशी । म्हणे सरस्वतीगंगाधरू ॥११५॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्यानेसिद्धनामधारकसंवादे प्रदोषव्रतमाहात्म्यकथनं नाम अष्टमोऽध्यायः ॥८॥
---------------------------------------------------------------
अध्याय ९
श्रीगणेशाय नमः ।
ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक करी नमन । विनवीत कर जोडून । भक्तिभावे करोनिया ॥१॥
श्रीपाद कुरवपुरी असता । पुढे वर्तली कैसी कथा । विस्तारूनि सांग आता । कृपामुर्ति दातारा ॥२॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढे कथा अपूर्व देखा । तया ग्रामी रजक एका । सेवक झाला श्रीगुरूचा ॥३॥
भक्तवत्सल श्रीगुरुराव । जाणोनि शिष्याचा भाव । विस्तार करोनि भक्तीस्तव । निरोपित गुरुचरित्र ॥४॥
नित्य श्रीपाद गंगेसी येती । विधिपूर्वक स्नान करिती । लोकवेव्हार संपादिती । त्रयमूर्ति आपण ॥५॥
ज्याचे दर्शन गंगास्नान । त्यासी कायसे आचरण । लोकानुग्रहाकारण । स्नान करीत परियेसा ॥६॥
वर्तता ऐसे एके दिवशी । श्रीपाद यति येती स्नानासी । गंगा वहात असे दशदिशी । मध्ये असती आपण ॥७॥
तया गंगातटाकांत । रजक असे वस्त्रे धूत । नित्य येऊनि असे नमित । श्रीपादगुरुमूर्तीसी ॥८॥
नित्य त्रिकाळ येवोनिया । दंडप्रमाण करोनिया । नमन करी अतिविनया । मनोवाक्कायकर्मे ॥९॥
वर्तता ऐसे एके दिवशी । आला रजक नमस्कारासी । श्रीपाद म्हणती तयासी । एकचित्ते परियेसा ॥१०॥
श्रीपाद म्हणती रजकासी । का नित्य कष्टतोसी । तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी । सुखे राज्य करी आता ॥११॥
ऐकता गुरूचे वचन । गाठी बांधी पल्लवी शकुन । विनवीतसे कर जोडून । सत्यसंकल्प गुरुमूर्ति ॥१२॥
रजक सांडी संसारचिंता । सेवक जाहला एकचित्ता । दुरोनि करी दंडवता । मठा गेलिया येणेचि परी ॥१३॥
ऐसे बहुत दिवसांवरी । रजक तो सेवा करी । आंगण झाडी प्रोक्षी वारी । नित्य नेमे येणे विधी ॥१४॥
असता एके दिवशी देखा । वसंतऋतु वैशाखा । क्रीडा करीत नदीतटाका । आला राजा म्लेछ एक ॥१५॥
स्त्रियांसहित राजा आपण । अलंकृत आभरण । क्रीडा करीत स्त्रिया आपण । गंगेमधून येतसे ॥१६॥
सर्व दळ येत दोनी थडी । अमित असती हस्ती घोडी । मिरविताती रत्नकोडी । अलंकृत सेवकजन ॥१७॥
ऐसा गंगेच्या प्रवाहात । राजा आला खेळत । अनेक वाद्यनाद गर्जत । कृष्णावेणि थडियेसी ॥१८॥
रजक होता नमस्कारित । शब्द झाला तो दुश्चित । असे गंगेत अवलोकित । समारंभ राजयाचा ॥१९॥
विस्मय करी बहु मानसी । जन्मोनिया संसारासी । जरी न देखिजे सौख्यासी । पशुसमान देह आपुला ॥२०॥
धन्य राजयाचे जिणे । ऐसे सौख्य भोगणे । स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे । कैसा भक्त ईश्वराच ॥२१॥
कैसे याचे आर्जव फळले । कवण्या देवा आराधिले । कैसे श्रीगुरु असती भेटले । मग पावला ऐसी दशा ॥२२॥
ऐसे मनी चिंतित । करीतसे दंडवत । श्रीपादराय कृपावंत । वळखिली वासना तयाची ॥२३॥
भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । जाणोनि अंतरी त्याची स्थिति । बोलावूनिया पुसती । काय चिंतिसी मनांत ॥२४॥
रजक म्हणे स्वामीसी । देखिले दृष्टी रायासी । संतोष झाला मानसी । केवळ दास श्रीगुरूचा ॥२५॥
पूर्वी आराधोनि देवासी । पावला आता या पदासी । म्हणोनि चिंतितो मानसि । कृपासिंधु दातारा ॥२६॥
ऐसे अविद्यासंबंधेसी । नाना वासना इंद्रियांसी । चाड नाही या भोगासी । चरणी तुझे मज सौख्य ॥२७॥
श्रीपाद म्हणती रजकासी । जन्मादारभ्य कष्टलासी । वांछा असे भोगावयासी । राज्यभोग तमोवृत्ति ॥२८॥
निववी इंद्रिये सकळ । नातरी मोक्ष नव्हे निर्मळ । बाधा करिती पुढे केवळ । जन्मांतरी परियेसी ॥२९॥
तुष्टवावया इंद्रियांसी । तुवा जावे म्लेछवंशासी । आवडी जाहली तुझे मानसी । राज्य भोगी जाय त्वरित ॥३०॥
ऐकोनि स्वांमीचे वचन । विनवी रजक कर जोडून । कृपासागरू तू गुरुराज पूर्ण । उपेक्षू नको म्हणतसे ॥३१॥
अंतरतील तुझे चरण । द्यावे माते पुनर्दर्शन । तुझा अनुग्रह असे कारण । ज्ञान द्यावे दातारा ॥३२॥
श्रीगुरु म्हणती तयासी । वैदुरानगरी जन्म घेसी । भेटी देऊ अंतकाळासी । कारण असे येणे आम्हा ॥३३॥
भेटी होतांचि आम्हांसी । ज्ञान होल तुझे मानसी । न करी चिंता भरवसी । आम्हा येणे घडेल ॥३४॥
आणिक कार्यकारणासी । अवतार घेऊ परियेसी । वेष धरोनि संन्यासी । नाम नृसिंहसरस्वती ॥३५॥
ऐसे तया संबोधूनि । निरोप देती जाय म्हणोनि । रजक लागला तये चरणी । नमस्कारीत तये वेळी ॥३६॥
देखोनि श्रीगुरु कृपामूर्ति । रजकासी जवळी पाचारिती । इह भोगिसी की पुढती । राज्यभोग सांग मज ॥३७॥
रजक विनवीत श्रीपादासी । झालो आपण वृद्धवयेसी । भोग भोगीन बाळाभ्यासी । यौवनगोड राज्यभोग ॥३८॥
ऐकोनि रजकाचे वचन । निरोप देती श्रीगुरु आपण । त्वरित जाई रे म्हणोन । जन्मांतरी भोगी म्हणती ॥३९॥
निरोप देता तया वेळी । त्यजिला प्राण तत्काळी । जन्माता झाला म्लेछकुळी । वैदुरानगरी विख्यात ॥४०॥
ऐसी रजकाची कथा । पुढे सांगून विस्तारता । सिद्ध म्हणे नामधारका आता । चरित्र पुढती अवधारी ॥४१॥
ऐसे झालीया अवसरी । श्रीपादराय कुरवपुरी । असता महिमा अपरंपारी । प्रख्यात असे परियेसा ॥४२॥
महिमा सकळ सांगता । विस्तार होईल बहु कथा । पुढील अवतार असे ख्याता । सांगेन ऐक नामधारका ॥४३॥
महत्त्व वर्णावया श्रीगुरूचे । शक्ति कैची या वाचे । नवल हे अमृतदृष्टीचे । स्थानमहिमा ऐसा ॥४४॥
श्रीगुरु राहती जे स्थानी । अपार महिमा त्या भुवनी । विचित्र जयाची करणी । दृष्टान्ते तुज सांगेन ॥४५॥
स्थानमहिमाप्रकार । सांगेन ऐक एकाग्र । प्रख्यात असे कुरवपूर । मनकामना पुरती तेथे ॥४६॥
ऐसे कित्येक दिवसांवरी । श्रीपाद होते कुरवपुरी । कारण असे पुढे अवतारी । म्हणोनि अदृश्य होते तेथे ॥४७॥
आश्विन वद्य द्वादशी । नक्षत्र मृगराज परियेसी । श्रीगुरु बैसले निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेत ॥४८॥
लौकिकी दिसती अदृश्य जाण । कुरवपुरी असती आपण । श्रीपादराव निर्धार जाण । त्रयमूर्तिचा अवतार ॥४९॥
अदृश्य होवोनि तया स्थानी । श्रीपाद राहिले निर्गुणी । दृष्टान्त सांगेन विस्तारोनि । म्हणे सरस्वतीगंगाधरू ॥५०॥
जे जन असती भक्त केवळ । त्यांसी दिसती श्रीगुरु निर्मळ । कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ । असे प्रख्यात भूमंडळी ॥५१॥
सिद्ध सांगे नामधारकासी । तेचि कथा विस्तारेसी । सांगतसे सकळिकांसी । गंगाधराचा आत्मज ॥५२॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रजकवरप्रदानं नाम नवमोऽध्यायः ॥९॥
----------------------------------------------------------------
अध्याय १०
श्रीगणेशाय नमः ।
ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक विनवी जाण । कुरवपुरीचे महिमान । केवी जाहले परियेसा ॥१॥
म्हणती श्रीपाद नाही गेले । आणि म्हणती अवतार झाले । विस्तार करोनिया सगळे । निरोपावे म्हणतसे ॥२॥
सिद्ध सांगे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी । अनंतरूपे होती परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥३॥
पुढे कार्यकारणासी । अवतार झाले परियेसी । राहिले आपण गुप्तवेषी । तया कुरवक्षेत्रांत ॥४॥
पाहे पा भार्गवराम देखा । अद्यापवरी भूमिका । अवतार जाहले अनेका । त्याचेच एकी अनेक ॥५॥
सर्वा ठायी वास आपण । मूर्ति एक नारायण । त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिति आणि प्रलय ॥६॥
भक्तजना तारावयासी । अवतरतो ह्रषीकेशी । शाप देत दुर्वासऋषि । कारण असे तयांचे ॥७॥
त्रयमूर्तीचा अवतार । याचा कवणा न कळे पार । निधान तीर्थ कुरवपूर । वसे तेथे गुरुमूर्ति ॥८॥
जे जे चिंतावे भक्तजने । ते ते पावे गुरुदर्शने । श्रीगुरु वसावयाची स्थाने । कामधेनु असे जाणा ॥९॥
श्रीपादवल्लभस्थानमहिमा । वर्णावया अनुपमा । अपार असे सांगतो तुम्हा । दृष्टान्तेसी अवधारा ॥१०॥
तुज सांगावया कारण । गुरुभक्ति वृथा नव्हे जाण । सर्वथा न करी निर्वाण । पाहे वाट भक्तांची ॥११॥
भक्ति करावी दृढतर । गंभीरपणे असावे धीर । तरीच उतरिजे पैलपार । इहपरत्री सौख्य पावे ॥१२॥
याचि कारणे दृष्टान्ते तुज । सांगेन ऐक वर्तले सहज । काश्यपगोत्री होता द्विज । नाम तया वल्लभेश ॥१३॥
सुशील द्विज आचारवंत । उदीम करूनि उदर भरीत । प्रतिसंवत्सरी यात्रेस येत । तया श्रीपादक्षेत्रासी ॥१४॥
असता पुढे वर्तमानी । उदीमा निघाला तो धनी । नवस केला अतिगहनी । संतर्पावे ब्राह्मणासी ॥१५॥
उदीम आलिया फळासी । यात्रेसी येईन विशेषी । सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी । इच्छाभोजन देईन म्हणे ॥१६॥
निश्चय करोनि मानसी । निघाला द्विजवर उदीमासी । चरण ध्यातसे मानसी । सदा श्रीपादवल्लभाचे ॥१७॥
जे जे ठायी जाय देखा । अनंत संतोष पावे निका । शतगुणे लाभ झाला ऐका । परमानंदा प्रवर्तला ॥१८॥ लय लावूनि श्रीपादचरणी । यात्रेसि निघाला ते क्षणी । वेचावया ब्राह्मणसंतर्पणी । द्रव्य घेतले समागमे ॥१९॥
द्रव्य घेऊनि द्विजवर । निघता देखती तस्कर । कापट्यवेषे सत्वर । तेही सांगते निघाले ॥२०॥
दोन-तीन दिवसांवरी । तस्कर असती संगिकारी । एके दिवशी मार्गी रात्री । जात असता मार्गस्थ ॥२१॥
तस्कर म्हणती द्विजवरासी । आम्ही जाऊ कुरवपुरासी । श्रीपादवल्लभदर्शनासी । प्रतिवर्षी नेम असे ॥२२॥
ऐसे बोलती मार्गासी । तस्करी मारिले द्विजासी । शिर छेदूनिया परियेसी । द्रव्य घेतले सकळिक ॥२३॥
भक्तजनांचा कैवारी । श्रीपादराव कुरवपुरी । पातला त्वरित वेषधारी । जटामंडित भस्मांकित ॥२४॥
त्रिशूळ खट्वांग घेऊनि हाती । उभा ठेला तस्करांपुढती । वधिता झाला तयांप्रती । त्रिशूळेकरूनि तात्काळ ॥२५॥
समस्त तस्करा मारिता । एक तस्कर येऊनि विनविता । कृपाळुवा जगन्नाथा । निरपराधी आपण असे ॥२६॥
नेणे याते वधितील म्हणोनि । आलो आपण संगी होऊनि । तू सर्वोत्तमा जाणसी मनी । विश्वाची मनवासना ॥२७॥
ऐकोनि तस्कराची विनंती । श्रीपाद त्याते बोलाविती । हाती देऊनिया विभूति । विप्रावरी प्रोक्षी म्हणे ॥२८॥
मन लावूनि तया वेळा । मंत्रोनि लाविती विभूती गळा । सजीव जाहला तात्काळा । ऐक वत्सा ऐकचित्ते ॥२९॥
इतुके वर्तता परियेसी । उदय जाहला दिनकरासी । श्रीपाद जाहले गुप्तेसी । राहिला तस्कर द्विजाजवळी ॥३०॥
विप्र पुसतसे तस्करासी । म्हणे तू माते का धरिलेसी । कवणे वधिले तस्करासी । म्हणोनि पुसे तया वेळी ॥३१॥
तस्कर सांगे द्विजासी । आला होता एक तापसी । जाहले अभिनव परियेसी । वधिले तस्कर त्रिशूळे ॥३२॥
मज रक्षिले तुजनिमित्ते । धरोनि बैसविले स्वहस्ते । विभूति लावूनि मग तूते । सजीव केला तव देह ॥३३॥
उभा होता आता जवळी । अदृश्य जाहला तत्काळी । न कळे कवण मुनि बळी । तुझा प्राण रक्षिला ॥३४॥
होईल ईश्वर त्रिपुरारि । भस्मांगी होय जटाधारी । तुझी भक्ति निर्धारी । म्हणोनि आला ठाकोनिया ॥३५॥
ऐकोनि तस्कराचे वचन । विश्वासला तो ब्राह्मण । तस्कराजवळिल द्रव्य घेऊन । गेला यात्रेसी कुरवपुरा ॥३६॥
नानापरी पूजा करी । ब्राह्मणभोजन सहस्त्र चारी । अनंतभक्ती प्रीतिकरी । पूजा करी श्रीपादुकांची ॥३७॥
ऐसे अनंत भक्तजन । मिळूनि सेविती श्रीपादचरण । कुरवपूर प्रख्यात जाण । अपार महिमा ॥३८॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । संशय न धरी तू मानसी । श्रीपाद आहेती कुरवपुरासी । अदृश्यरूप होऊनिया ॥३९॥
पुढे अवतार असे होणे । गुप्त असती याचि गुणे । म्हणती अनंतरूप नारायण । परिपूर्ण सर्वा ठायी ॥४०॥
ऐसी श्रीपादवल्लभमूर्ति । लौकिकी प्रगटली ख्याति । झाला अवतार पुढती । नृसिंहसरस्वती विख्यात ॥४१॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधरू । सांगत कथेचा विस्तारू । ऐकता होय मनोहरू । सकळाभीष्टे साधती ॥४२॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे भक्तसंकटहरणं नाम दशमऽध्यायः ॥१०॥
------------------------------------------------------------------
अध्याय ११
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें अवतार जाहले कैसी । विस्तारोनियां आम्हांसी । सांगा स्वामी कृपामूर्ति ॥१॥
सिद्ध म्हणे ऐक वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा । पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥२॥
शनिप्रदोषीं सर्वेश्वरासी । पूजित होती गुरु-उपदेशीं । देहवासना असतां तियेसी । पंचत्व पावली तयेवेळीं ॥३॥
झाला जन्म पुढें तिसी । कारंज-नगर उत्तरदेशीं । वाजसनीय शाखेसी । विप्रकुळीं जन्मली ॥४॥
जातक वर्तलें तियेसी । नाम 'अंबा-भवानी' ऐसी । आरोपिलें स्नेहेसीं । मातापितरीं परियेसा ॥५॥
वर्धतां मातापित्यागृहीं । वाढली कन्या अतिस्नेही । विवाह करिती महोत्साहीं । देती विप्रासी तेचि ग्रामीं ॥६॥
शिवव्रती असे तो ब्राह्मण । नाम तया 'माधव' जाण । त्यासी दिधली कन्या दान । अतिप्रीतींकरुनि ॥७॥
तया माधवविप्राघरीं । शुभाचारें होती नारी । वासना तिची पूर्वापरीं । ईश्वरपूजा करीतसे ॥८॥
पूजा करी ईश्वरासी । दंपती उभयवर्ग मनोमानसीं । प्रदोषपूजा अतिहर्षी । करिती भक्तिपुरस्कर ॥९॥
मंदवारीं त्रयोदशीसी । पूजा करिती अतिंविशेषीं । तंव वत्सरें झालीं षोडशीं । अंतर्वत्नी झाली ऐका ॥१०॥
मास तृतीय-पंचमेसी । उत्साह करिती अनेक हर्षी । उत्तम डोहाळे होती तियेसी । बह्मज्ञान बोलतसे ॥११॥
करिती उत्साह मास-सातीं । द्विज करी सीमंती । अक्षवाणें वोंवाळिती आरती । सुवासिनी मिळूनियां ॥१२॥
ऐसें क्रमितां नवमासीं । प्रसूत झाली शुभ दिवशीं । पुत्र जाहला म्हणून हर्षी । निर्भर होतीं मातापिता ॥१३॥
जन्म होतांचि तो बाळक । 'ॐ' कार शब्द म्हणतसे अलोलिक ।
पाहूनि झाले तटस्थ लोक । अभिनव म्हणोनि तयेवेळीं ॥१४॥
जातककर्म करी तो ब्राह्मण । विप्रांसी देत दक्षिणा दान । ज्योतिषी सांगती सुलक्षण । लग्न सत्वर पाहोनियां ॥१५॥
सांगती ज्योतिषी त्या द्विजासी । मुहूर्त बरवा असे विशेषीं । कुमर होईल कारणिक पुरुषी । गुरु होईल सकळिकां ॥१६॥
याचा अनुग्रह होईल ज्यासी । तो वंद्य होईल विश्वासी । याचें वाक्य होईल परिस । चिंतामणि याचे चरण ॥१७॥
अष्टही सिद्धि याचे द्वारीं । वोळगत राहतील निरंतरीं । नव निधि याच्या घरीं । राहती ऐक द्विजोत्तमा ॥१८॥
न होती यासी गृहिणी-सुत । पूज्य होईल त्रिभुवनांत । याचे दर्शनमात्रें पतित । पुनीत होतील परियेसीं ॥१९॥
होईल हा अवतार-पुरुषी । आम्हां दिसतसे भरवंसीं । संदेह न धरावा मानसीं । म्हणोनि करिती नमस्कार ॥२०॥
म्हणती समस्त द्विजवर । सांगती जनकासी उत्तर । याचेनि महादैन्य हरे । भेणें नलगे कळिकाळा ॥२१॥
तुमचे मनीं जे जे वासना । सर्व साधेल निर्गुणा । यातें करावें हो जतना । निधान आलें तुमचे घरा ॥२२॥
ऐसें जातक वर्तवोन । सांगता झाला विद्वज्जन । जनक जननी संतोषोन । देती दान वस्त्राभरणें ॥२३॥
सांगोनि गेले ब्राह्मणस्तोम । मातापिता अति प्रेम । दृष्टि लागेल म्हणून विषम । निंबलोण वोंवाळिती ॥२४॥
व्यवस्था फांकली नगरांत । अभिनव आजि देखिलें म्हणत ।
उपजतां बाळ 'ॐ' कार जपत । आश्चर्य म्हणती सकळ जन ॥२५॥
नगलोक इष्ट मित्र । पहावया येती विचित्र । दृष्टि लागेल म्हणोनि मात्र । माता न दाखवी कवणासी ॥२६॥
मायामोहें जनकजननी । बाळासी दृष्टि लागेल म्हणोनि । आंगारा लाविती मंत्रोनि । रक्षा बांधिती कृष्णसुतें ॥२७॥
परमात्मयाचा अवतार । दृष्टि त्यासी केवीं संचार । लौकिकधर्म ममत्कार । मातापिता संरक्षिती ॥२८॥
वर्ततां बाळ येणेंपरी । दिवस दहा झालियावरी । नामकरण पुरःसरीं । ठेविता झाला जनक द्विजोत्तम ॥२९॥
'शालग्रामदेव' म्हणत । जन्मनाम झालें ख्यात । नाम 'नरहरी' ऐसें म्हणत । उच्चार केला धर्मकर्मे ॥३०॥
ममत्व थोर बाळकावरी । प्रतिपाळ करिती प्रीतिकरीं । माता म्हणतसे येरी । न पुरे क्षीर बाळकासी ॥३१॥
पतीसी म्हणे तये वेळां । स्तनीं दूध थोडें बाळा । एखादी मिळवा कां अबळा । स्तनपान देववूं ॥३२॥
अथवा आणा मेषी एक । आपुले स्तनें न शमे भूक । ऐकोनि हांसे बाळक । स्पर्श करी स्तनासी सव्यकर ॥३३॥
स्तनीं स्पर्श होतांचि कर । बत्तीस धारा वाहे क्षीर । वस्त्र भिजोनि विचित्र । वाहों लागे भूमीवरी ॥३४॥
विस्मय करिती जनकजननी । प्रगट न करिती गौप्यगुणीं । नमन करिती बाळकाचरणीं । माता होय खेळविती ॥३५॥
पाळण्या घालूनि बाळकासी । पर्यंदें गाय अति हर्षी । न राहे बाळक पाळणेसीं । सदा खेळे महीवरी ॥३६॥
वर्धे बाळ येणेंपरी । मातापिता-ममत्कारीं । वर्धतां झाला संवत्सरीं । न बोले बाळ कवणासवें ॥३७॥
माता बोलवी कुमरासी । बोले शब्द ॐकारेसीं । चिंता करीतसे मानसीं । मुकें होईल म्हणोनि ॥३८॥
पुसती जाण ज्योतिष्यासी । म्हणे बोल नये काय यासी । उपाय असेल यास विशेषी । म्हणोनि पुसे वेळोवेळीं ॥३९॥
सांगती जाण ज्योतिषी । आराधावें कुलदेवतेसी । अर्कवारीं अश्वत्थपर्णेसीं । अन्न घालावें तीनी वेळां ॥४०॥
एक म्हणती होईल मुकें । यासि शिकवावें बरव्या विवेकें । बाळ बोल बोलूं शिके । म्हणोनि सांगती विनोदें ॥४१॥
हांसोनि ॐकार उच्चारी बाळ । आणिक नेणे बोल केवळ । विस्मय करिताति लोक सकळ । ॐकार शब्द ऐकोनि ॥४२॥
एक म्हणती नवल झालें । सर्व ज्ञान असे भलें । श्रवणीं ऐकतो बोल सकळ । जाणूनि न बोले कवण्या गुणें ॥४३॥
कांहीं केलिया न बोले सुत । चिंता करिताति मातापिता । पुत्रासी जाहलीं वर्षे सात । मुका झाला दैवयोगें ॥४४॥
सातवें वर्ष कुमरासी । योग्य झाला मुंजीसी । पुसताति समस्त ब्राह्मणांसी । केंवी करावें म्हणोनियां ॥४५॥
विप्र म्हणती तया वेळां । संस्कारावें ब्राह्मणकुळा । उपनयनावें केवळा । अष्ट वरुषें होऊं नये ॥४६॥
मातापिता चिंता करिती । उपदेशावें कवणे रीतीं । मुका असे हा निश्चितीं । कैसें दैव झालें आम्हां ॥४७॥
कैसें दैव जाहलें आपुलें । ईश्वरगौरी आराधिले । त्रयोदशीं शिवासी पूजिलें । वायां झालें म्हणतसे ॥४८॥
ईश्वरें तरी दिधला वरु । सुलक्षण झाला कुमरु । न बोले आतां काय करुं । म्हणोनि चिंता शिवासी ॥४९॥
एकचि बाळ आमुचे कुशीं । आणिक न देखों स्वप्नेसीं । वेष्टिलों होतों आम्ही आशीं । आमुतें रक्षील म्हणोनि ॥५०॥
नव्हेच आमुचे मनींचा वास । पुत्र झाला निर्वाणवेष । काय वर दिधला त्या महेशें । शनिप्रदोषीं पूजितां म्यां ॥५१॥
ऐसें नानापरी देखा । जननी करी महादुःखा । जवळी येवोनि बाळक । संबोखीत मातेसी ॥५२॥
घरांत जाऊनि तये वेळां । घेऊनि आला लोखंड सबळा । हातीं धरितांचि निर्मळा । झालें सुवर्ण बावन्नकशी ॥५३॥
आणोनि देतसे मातेसी । विस्मय करी बहुवसीं । बोलावूनियां पतीसी । दाविती झाली तयेवेळीं ॥५४॥
गौप्य करिती तये वेळां । मंदिरांत नेलें तया बाळा । पाहती त्याची बाळलीला । आणिक लोह हातीं देती ॥५५॥
अमृतदृष्टीं पाहतां स्वामी । समृद्धि झाली सर्व हेमीं । विश्वास धरिती मनोधर्मी । होईल पुरुष कारणिक ॥५६॥
मग पुत्रातें आलिंगोनि । विनविताति जनकजननी । तूं तारका शिरोमणि । कारणिक पुरुष कुळदीपका ॥५७॥
तुझेनिं सर्वस्व लाधलें । बोलतां आम्हीं नाहीं ऐकिलें । अज्ञान-मायेनें विष्टिलें । भुकें ऐसें म्हणों तुज ॥५८॥
आमुचे मनींची वासना । तुंवा पुरवावी नंदना । तुझे बोबडे बोल आपणा । ऐकवावे पुत्रराया ॥५९॥
हास्यवदन करी बाळ । यज्ञोपवीत दावी गळां । कटीं दांवी मौंजीस्थळा । म्हणोनि दाखवी मातेसी ॥६०॥
संज्ञा करोनि मातेसी । दावी बाळक संतोषीं । मुंजी बांधितांचि आपणासी । येईल म्हणे बोल सकळ ॥६१॥
मातापिता संतोषती । विद्वांस ज्योतिषी पाचारिती । व्रतबंधमुहूर्त-लग्न पाहती । सर्व आयती करिते झाले ॥६२॥
केली आयती बहुतांपरी । रत्नखचित अळंकारीं । मायामोहें प्रीतीकरीं । समारंभ करिताति ॥६३॥
चतुर्वेदी ब्राह्मण येती । शाखापरत्वें वेद पढती । इष्ट सोयरे दाईज गोत्री । समस्त आले तया भवना ॥६४॥
नानापरीचे श्रृंगार । उभारिले मंडपाकार । आनंद करीतसे द्विजवर । अपार द्रव्य वेंचीतसे ॥६५॥
नगरलोक विस्मय करिती । मूक पुत्रासी एवढी आयती । द्विजा लागली असे भ्रांति । वृथा करितो द्रव्य आपुलें ॥६६॥
इतुकें वेंचूनि पुत्रासी । व्रतबंध करील परियेसीं । गायत्री केवीं उपदेशी । करील आचार कवणेवरी ॥६७॥
एक म्हणती हो कां भलतें । मिष्टान्न आम्हांसि मिळतें । देकार देतील हिरण्य वस्त्रें । चाड नाहीं त्याचे मंत्रा ॥६८॥
ऐसे नानापरीचे लोक । विचार करिती अनेक । मातापित्या अत्यंत सुख । देवदेवक करिताति ॥६९॥
चौलकर्म येरे दिवसीं । भोजन चौलमणीसी । पुनरभ्यंग करुनि हर्षी । यज्ञोपवीत धारण केलें ॥७०॥
मंत्रपूर्वक यज्ञोपवीत । धारण करविती द्विज समस्त । सहभोजन करावया माता । घेऊनि गेली मंदिरांत ॥७१॥
भोजन करोनि मातेसवें । निरोप घे तो एकोभावें । मुंजीबंधन असे करावें । म्हणोनि आला पित्याजवळी ॥७२॥
गृह्योक्तमार्गे मौंजी देखा । बंधन केलें त्या बाळका । सुमुहूर्त आला तत्काळिका । मंत्रोपदेश करिता झाला ॥७३॥
गायत्रीमंत्र अनुक्रमेसीं । उपदेश देती परियेसीं । बाळ उच्चारी मनोमानसीं । व्यक्त न बोले कवणापुढें ॥७४॥
गायत्रीमंत्र कुमरासी होतां । भिक्षा घेऊन आली माता । वस्त्रभूषणें रत्नखचिता । देती झाली तया वेळीं ॥७५॥
पहिली भिक्षा घेऊनि करीं । आशीर्वचन दे ती नारी । बाळ ऋग्वेद म्हणोन उच्चारी आचारधर्मे वर्ततसे ॥७६॥
पहिली भिक्षा येणेंपरी । देती झाली प्रीतिकरीं । 'अग्निमीळे पुरोहितं' उच्चारी । ब्रह्मचारी तया वेळीं ॥७७॥
दुसरी भिक्षा देतां माता । उच्चार केला यजुर्वेद 'इषेत्वा०। लोक समस्त तटस्था । माथा तुकिती तये वेळीं ॥७८॥
तिसरी भिक्षा देतां माता । म्हणे सामवेद पढे आतां । 'अग्नआयाहि०' गायन करीत । तीन्ही वेद म्हणतसे ॥७९॥
सभा समस्त विस्मय करी । पहाती हर्षनिर्भरीं । मुकें बोले वेद चारी । म्हणती होईल कारणिक ॥८०॥
यातें म्हणों नये नर । होईल देवाचा अवतार । म्हणोनि करिती नमस्कार । जगद्गुरु म्हणोनिया ॥८१॥
इतुक्यावरी तो बाळक । मातेसी म्हणतसे ऐक । तुंवा उपदेश केला एक । भिक्षा माग म्हणोनि ॥८२॥
नव्हती बोल तुझे मिथ्या । निर्धार राहिला माझिया चित्ता । निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थे आचरावया ॥८३॥
आम्हां आचार ब्रह्मचारी । भिक्षा करावी घरोघरीं । वेदाभ्यास मनोहरी । करणें असे परियेसा ॥८४॥
ऐकोनि पुत्राचें वचन । दुःखें दाटली अतिगहन । बाष्प निघताति लोचनीं । आली मूर्च्छना तये वेळीं ॥८५॥
निर्जीव होऊनि क्षणेक । करिती झाली महाशोक । पुत्र माझा तूं रक्षक । म्हणोनि केली आशा बहु ॥८६॥
आमुतें रक्षिसी म्हणोनि । होती आशा बहु मनीं । न बोलसी आम्हांसवें याचि गुणीं । मुकें म्हणविसी आपणासी ॥८७॥
न ऐकों कधीं तुझे बोल । आतां ऐकतां संतोष होईल । ईश्वरपूजा आलें फळ । म्हणोनि विश्वास केला आम्हीं ॥८८॥
ऐसें नानापरी देखा । पुत्रासि म्हणे ते बाळिका । आलिंगोनि कुमारका । कृपा भाकी तयेवेळीं ॥८९॥
ऐकोनि मातेचें वचन । बाळक सांगे ब्रह्मज्ञान । नको खेदवूं अंतःकरण । आम्हां करणें तेंचि असे ॥९०॥
तुतें आणखी पुत्र चारी । होतील माते निर्धारीं । तुझी सेवा परोपरी । करितील मनोभावेसीं ॥९१॥
तुवां आराधिला शंकर । जन्मांतरीं पूर्वापार । म्हणोनि मस्तकीं ठेविती कर । मग तिसी जहालें जातिस्मरण ॥९२॥
पूर्वजन्मींचा वृत्तांत । स्मरतां जाहली विस्मित । श्रीपादश्रीवल्लभ स्वरुपता । दिसतसे तो बाळक ॥९३॥
देखोनि माता तये वेळां । नमन केलें चरणकमळां । श्रीपाद उठवूनि अवलीळा । सांगती गौप्य अवधारीं ॥९४॥
ऐक माते ज्ञानवंती । हा बोल करीं वो गुप्ती । आम्ही संन्यासी असों यति । अलिप्त असों संसारीं ॥९५॥
याचिकारणें आम्ही आतां । हिंडूं समस्त तीर्थां । कारण असे पुढें बहुता । म्हणोनि निरोप मागती ॥९६॥
येणेंपरी जननियेसी । गुरुमूर्ति सांगे विनयेसीं । पुनरपि विनवी पुत्रासी । ऐका श्रोते एकचित्तें ॥९७॥
पुत्रासी विनवी तये वेळ । मातें सांडूनि तुम्ही जरी जाल । आणिक कधीं न देखों बाळ । केवीं वांचूं पुत्रराया ॥९८॥
धाकुटपणीं तुम्हां तापस- । धर्मी कवण आहे हर्ष । धर्मशास्त्रीं ख्याति सुरस । आश्रम चारी आचरावे ॥९९॥
ब्रह्मचर्य वर्षे बारा । त्यावरी गृहस्थधर्म बरा । मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा । घडती पुण्यें अपरांपर ॥१००॥
मुख्य आश्रम असे गृहस्थ । आचरतां होय अतिसमर्थ । मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ । धर्मशास्त्र येणेंपरी ॥१॥
ब्रह्मचर्यमार्ग ऐका । पठण करावें वेदादिकां । विवाह होतां गृहस्थें निका । पुत्रादिक लाधावे ॥२॥
यज्ञादिक कर्म साधोनियां । तदनंतर संन्यास करणें न्याया । येणेंविधि संन्यास असे मुख्या । अग्राह्य संन्यास बाळपणीं ॥३॥
समस्त इंद्रियें संतुष्टवावीं । मनींची वासना पुरवावी । तदनंतर तपासी जावें । संन्यास घेतां मुख्य असे ॥४॥
ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरू सांगती तत्त्वज्ञान । ऐक नामधारका सुमन । म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥५॥
गंगाधराचा नंदन । विनवीतसे नमून । तें परिसा श्रोते जन । श्रीगुरुचरित्रविस्तार ॥६॥
पुढें वर्तलें अपूर्व ऐका । सिद्ध सांगे नामधारका । महाराष्ट्रभाषेंकरुनि टीका । सांगतसे सरस्वती-गंगाधर ॥१०७॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुनरहरिबाळचरित्रलीलावर्णनं नाम एकादशोऽध्यायः ॥११॥
---------------------------------------------------------
अध्याय १२
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
श्रीगुरू म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी । काय भरंवसा जीवित्वाचा ॥१॥
श्लोक ॥ अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः । नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः ॥२॥
टीका ॥ एखादा असेल स्थिरजीवी । त्यासी तुझी बुद्धि बरवी । अनित्य देह विभवोभावीं । पुढें कवणा भरंवसा ॥३॥
देह म्हणिजे क्षणभंगुर । नाहीं राहिले कवण स्थिर । जंववरी दृढ असेल शरीर । पुण्यमार्गे रहाटावें ॥४॥
जो असेल मृत्यूसी जिंकीत । त्याणें निश्चयावें शरीर नित्य । त्यासि तुझा उपदेश सत्य । म्हणे करीन धर्म पुढें ॥५॥
अहोरात्रीं आयुष्य उणें । होत असतें क्षणक्षणें । करावा धर्म याचिकारणें । पूर्ववयेसीं परियेसा ॥६॥
अल्पोदकीं जैसा मत्स्य । तैसें मनुष्य अल्पायुष्य । जंववरी असे प्राणी सुरस । धर्म करावा परियेसा ॥७॥
जैसा सूर्याचा रथ चाले । निमिष होतां शीघ्रकाळें । बावीस सहस्त्र गांव पळे । तैसें आयुष्य क्षीण होय ॥८॥
पर्जन्य पडतां वृक्षावरी । उदक राहे पर्णाग्रीं । स्थिर नव्हे अवधारीं । पडे भूमीवरी सवेंचि ॥९॥
तैसें शरीर नव्हे स्थिर । जीवित्वा मरण निर्धार । यौवन अथवा होतांचि जर । कलेवर हें नश्य जाणा ॥१०॥
याचि कारणें देहासी । विश्वासूं नये परियेसीं । मृत्यु असे हा सहवासी । धर्म करावा तात्काळीं ॥११॥
पिकलें पान वृक्षीं जैसें । लागलें असें सूक्ष्मवेशें । तैसेंचि शरीर हें भरंवसें । केधवां पडेल न कळे जाणा ॥१२॥
एखादा नर कळंतरासी । द्रव्य देतो परियेसी । दिवसगणना करी कैसी । तैसा यम काळ लक्षीतसे ॥१३॥
जैशा समस्त नदी देखा । समुद्रासी घेऊनि जाती उदका । परतोनि न येती जन्मभूमिका । तैसें आयुष्य न परते ॥१४॥
अहोरात्री जाती पळोन । ऐसें निश्चयें जाणोन । पुण्य न करिती जे जन । ते पशुसमान परियेसा ॥१५॥
जया दिवशीं पुण्य घडलें नाहीं । वृथा गेला दिवस पाहीं । तया यमासि करुणा नाहीं । करावें पुण्य तात्काळ ॥१६॥
पुत्र दारा धन गोधन । आयुष्य देह येणें-गुण । जे जन निश्चित म्हणती जाण । ते पशूसम परियेसीं ॥१७॥
जैसी सुसरी मनुष्यासी । भक्षिती होय परियेसीं । तैसें या शरीरासी । वृद्धाप्य भक्षी अवधारा ॥१८॥
याकारणें तारुण्यपणीं । करावें पुण्य विद्वज्जनीं । आम्हां कां हो वर्जिसी जननी । काय बुद्धि बरवी असे ॥१९॥
जो यमाचा असेल इष्ट । त्याणें करावा आळस हट्ट । अमरत्वें असेल जो सुभट । त्याणें पुढें धर्म करावा ॥२०॥
संसार म्हणजे स्वप्नापरी । जैसें पुष्प असे मोगरी । सवेंचि होय शुष्कापरी । तयासम देह जाणा ॥२१॥
जैसी विजू असे लवत । सवेंचि होय अव्यक्त । तैसें-प्राय देह होत । स्थिर नोहे परियेसा ॥२२॥
ऐसें नानापरी देखा । बोधिता झाला जननीजनकां । विस्मय करिती सभालोक । बाळक केवीं तत्त्व सांगतो ॥२३॥
ऐकोनि पुत्राचें वचन । माता करीतसे नमन । देवा निरोपिलें ज्ञान । विनंति माझी परिसावी ॥२४॥
तुवां निरोपिलें आम्हांसी । पुत्र चवघे होतील ऐसी । विश्वास नव्हे गा मानसीं । कुळदेवता पुत्रराया ॥२५॥
जंववरी होय एक सुत । तंववरी रहावें समीपत । निरोप नेदीं तंववरी सत्य । म्हणोनि विनवी तयेवेळीं ॥२६॥
माझें वचन अव्हेरुनि । जरी जाशील निघोनि । प्राण देईन तत्क्षणीं । हा निश्चय अवधारीं ॥२७॥
पुत्र नव्हसी तूं आम्हांसी । आमुचें कुळदैवत होसी । सत्य करीं गा वचनासी । बोल आपुले दातारा ॥२८॥
ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरू बोलती हांसोन । आमचे बोल सत्य जाण । तुझें वाक्य निर्धारीन पां ॥२९॥
तुतें होतांचि पुत्र दोनी । निरोप द्यावा संतोषोनि । मग न राहें ऐक जननी । बोल आपुले सत्य करीं ॥३०॥
संवत्सर एक तुझ्या घरीं । राहूं माते निर्धारीं । वासना पुरतील तुझ्या जरी । मग निरोप दे मज ॥३१॥
ऐसी करुनियां निगुती । राहिले श्रीगुरु अतिप्रीतीं । वेदाभ्यास शिकविती । शिष्यवर्गा बहुतांसी ॥३२॥
नगरलोक विस्मय करिती । अभिनव झालें ऐसें म्हणती । बाळ पहा हो वर्षे साती । वेद चारी सांगतसे ॥३३॥
विद्वानांहूनि विद्वान विद्यार्थी । तीनी वेद पढती । षट्शास्त्री जे म्हणविती । तेही येती शिकावया ॥३४॥
येणेंपरी तया घरीं । राहिले गुरु प्रीतिकरीं । माता झाली गरोदरी । महानंद करीतसे ॥३५॥
नित्य पूजिती पुत्रासी । ठेवूनि भाव कुळदैवत ऐसी । निधान लाधे एखाद्यासी । काय सांगों संतोष त्यांचा ॥३६॥
तंव नवमास जाहली अंतर्वत्नी । माता झाली प्रसूती । पुत्र झाले युग्म ख्याती । अतिसुंदर परियेसा ॥३७॥
पुत्र झाले उल्हास थोर । मातापित्या संतोष फार । आशीर्वचन असे गुरू । असत्य केवीं होईल ॥३८॥
याकारणें गुरुवचन । सत्य मानावें विद्वज्जनें । जैसें असेल अंतःकरण । तैसें होईल परियेसा ॥३९॥
ऐशापरी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक । खेळवीतसे माता ऐक । आले श्रीगुरू तयांजवळी ॥४०॥
जननी ऐक माझे वचना । झाली तुझी मनकामना । दोघे पुत्रनिधाना । पूर्णायुषी आहेति जाण ॥४१॥
आणखी होतील दोघे कुमारक । त्यानंतर कन्या एक । असाल नांदत अत्यंत सुख । वासना पुरतील तुझी जाणा ॥४२॥
आतां आमुतें निरोपावें । जाऊं आम्ही स्वभावें । संतोषरुपी तुम्हीं व्हावें । म्हणोनि निरोप घेती तयेवेळीं ॥४३॥
संतोषोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा । स्वामी आमुच्या कुळदेवता । अशक्य आम्ही बोलावया ॥४४॥
न कळे आम्हां स्वरुपज्ञान । तुझें स्वरुप नकळे कवणा । मायामोहें वेष्टोन कामना । नेणोंचि महिमान तुझें ॥४५॥
मायाप्रपंचें वेष्टोनि । तुतें जरी सुत म्हणोनि । एके समयीं निष्ठुर बोलों वचनीं । क्षमा करणें स्वामिया ॥४६॥
सहभोजन-शयनासनीं । तुतें गांजों भुकेजोनि । कडे न घेंचि उबगोनि । क्षमा करीं गा देवराया ॥४७॥
तारक आमुचे वंशासी । बापा तूं अवतरलासी । प्रदोषपूजा फळासी । आली मातें स्वामिया ॥४८॥
आतां आम्हां काय गति । सांगा स्वामी कृपामूर्ती । जननमरण यातनयाती । कडे करावें दातारा ॥४९॥
सगरांवरी जैसी गंगा । तैसा तुवां आलासि चांगा । पावन केलेंसि माझे अंगा । उभयकुळें बेचाळीस ॥५०॥
आम्हां ठेविसी कवणेपरी । या धुरंधर संसारीं । तुझें दर्शन नोहे तरी । केवीं वांचों प्राणात्मजा ॥५१॥
ऐकोनि मातापितयांचें वचन । बोलती श्रीगुरू आपण । जे जे समयीं तुमचें मन । स्मरण करील आम्हांसी ॥५२॥
स्मरण करितां तुम्हांजवळी । असेन जननी मी तात्काळीं । न करावी चिंता वेळोवेळीं । म्हणोन भाक देतसे ॥५३॥
आणिक कन्या पुत्र तीनी । होतील ऐक तूं भवानी । दैन्य नाहीं तुमच्या भुवनीं । सदा श्रीमंत नांदाल ॥५४॥
जन्मांतरीं परमेश्वरासी । पूजा केली तुवां प्रदोषीं । याची महिमा आहे ऐसी । जन्मोजन्मीं श्रियायुक्त ॥५५॥
इह सौख्य होय ऐक । देहांतीं जाणा परम लोक । पूजा करितां पिनाक । पुनर्जन्म तुम्हां नाहीं ॥५६॥
तुवां आराधिला शंकर । आम्हां करविला अवतार । वासना पुरेल तुझा भार । आम्हां निरोप दे आतां ॥५७॥
पुनर्दर्शन तुम्हांसी । होईल ऐका वर्षे-तीसीं । जावोनि बदरीवनासी । म्हणोनि निघती तये वेळीं ॥५८॥
निरोप घेवोनि तये वेळां । श्रीगुरू निघाले अवलीळा । नगरलोक येती सकळा । मातापिता बोळविती ॥५९॥
म्हणती समस्त नगरनारी । तपासी निघाला ब्रह्मचारी । होईल पुरुष अवतारी । मनुष्यदेही दिसतसे ॥६०॥
एक म्हणती पहा हो नवल । तपासी निघाला असे बाळ । मातापिता सुखें केवळ । निरोप देती कौतुकें ॥६१॥
कैसें यांचें अंतःकरण । जैसा हो कां पाषाण । मन करुनि निर्वाण । बोळविताति पुत्रासी ॥६२॥
एक म्हणती नव्हे बाळ । होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ । अनुमान नव्हे हा निश्चळ । वेद केवीं म्हणतसे ॥६३॥
सात वर्षांचें बाळक देखा । वेद म्हणतो अखिल शाखा । मनुष्यमात्र नव्हे ऐका । ऐसें म्हणती साधुजन ॥६४॥
ऐसें म्हणोनि साधुजन । करिताति साष्टांगीं नमन । नानापरी स्तोत्रवचन । करिते झाले अवधारा ॥६५॥
नमन करोनि सकळिक । आले आपुले गृहांतिक । पुढें जाती जननीजनक । पुत्रासवें बोळवीत ॥६६॥
निजस्वरुप जननियेसी । दाविता झाला परियेसीं । श्रीपादश्रीवल्लभ-द्त्तात्रेयासी । देखते झाले जनकजननी ॥६७॥
त्रयमूर्तीचा अवतार । झाला नरहरी नर । निजरुपें दिसे कर्पूरगौर । पाहतां नमिलें चरणासी ॥६८॥
जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु । आमुचें पुण्य होतें थोरू । म्हणोनि देखिले तुमचे चरण ॥६९॥
तू तारक विश्वासी । आम्हां उद्धरिलें विशेषीं । पुनर्दर्शन आम्हांसी । द्यावें म्हणोनि विनविती ॥७०॥
ऐसें म्हणोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा । अलिंगिती श्रीगुरुनाथा । स्नेहभावेंकरुनियां ॥७१॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । आश्वास केला अतिप्रीतीं । पुनर्दर्शन हो निश्चितीं । देईन म्हणती तये वेळीं ॥७२॥
ऐसें तयां संभाषोनि । निरोप घेतला तत्क्षणीं । परतोनि आली जनकजननी । येती संतोषोनि मंदिरांत ॥७३॥
वरदमूर्ति श्रीगुरुराणा । निघाला जावया बदरीवना । पातला आनंदकानना । वाराणसी क्षेत्रासी ॥७४॥
अविमुक्त वाराणसी पुरी । क्षेत्र थोर सचराचरीं । विश्वेश्वर अवधारीं । अनुपम्य असे त्रिभुवनीं ॥७५॥
राहूनियां तया स्थानीं । अनुष्ठिती गुरुशिरोमणी । विश्वेश्वराचे दर्शनीं । पूजा करिती आत्मारामासी ॥७६॥
येणेंपरी तया स्थानीं । क्वचित्काळ श्रीगुरुमुनि । अष्टांगयोगेंकरुनि । तप करिती परियेसा ॥७७॥
तया काशीनगरांत । तापसी असती आणिक बहुत । संन्यासी यती अवधूत । तप करिती दारुण ॥७८॥
तयांत श्रीगुरू ब्रह्मचारी । योगाभ्यासधुरंधरीं । करिताति ; तपस्वी येरी । अभिनव करिती मनांत ॥७९॥
म्हणती पहा हो ब्रह्मचारी । तप करितो नानापरी; कैसें वैराग्य याचे उदरीं । निर्लिप्त असे परियेसा ॥८०॥
शरीरस्वार्थ नाहीं यासी । योग्य होय हा संन्यासीं । स्नान करितो त्रिकाळेसीं । मणिकर्णिका तीर्थांत ॥८१॥
ऐसें स्तोत्र नित्य करिती । समस्त संन्यासी येती । वृध्द होता एक यति । 'कृष्णसरस्वती' नामें ॥८२॥
तो केवळ ब्रह्मज्ञानी । तपस्वी असे महामुनि । सदा देखोनियां नयनीं । स्नेहभावें भावीतसे ॥८३॥
म्हणे समस्त यतीश्वरांसी । न म्हणा नर ब्रह्मचारीसी । अवतारपुरुष अतितापसी । विश्ववंद्य दिसतसे ॥८४॥
वयसा धाकुटा म्हणोनि । नमन न कराल तुम्ही मुनी । प्रख्यात मूर्ति हा त्रिभुवनीं । आम्हां वंद्य असे देखा ॥८५॥
वार्धक्यपणें आम्ही यासी । वंदितां दुःख सकळांसी । विशेष आम्ही संन्यासी । मूर्ख लोक निंदिती ॥८६॥
याकारणें आम्ही यासी । विनवूं, परोपकारासी । संन्यास देता, समस्तांसी । भक्ति होईल स्थिर मनीं ॥८७॥
लोकानुग्रहानिमित्त । हा होय गुरु समर्थ । याचे दर्शनमात्रें पुनीत । आम्ही परियेसा ॥८८॥
याकारणें बाळकासी । विनवूं आम्ही विनयेसीं । आश्रम घ्यावा संन्यासी । पूजा करुं एकभावें ॥८९॥
म्हणोनि आले तया जवळीं । विनविताति मुनी सकळी । ऐक तापसी स्तोममौळी । विनंति असे परियेसा ॥९०॥
लोकानुग्रहाकारणें । तुम्हीं आतां संन्यास घेणें । आम्हां समस्तां उद्धरणें । पूजा घेणें आम्हां करवीं ॥९१॥
या कलियुगीं संन्यास म्हणोन । निंदा करिती सकळै जन । स्थापना करणार कवण । न दिसती भूमीवरी ॥९२॥
श्लोक ॥ यज्ञदानं गवालंभं संन्यासं पलपैतृकम् । देवराच्च सुतोत्पत्तिं कलौ पंच विवर्जयेत् ॥९३॥
टीका ॥ यज्ञ दान गवालंभन । संन्यास घेतां अतिदूषण । पलपैतृक भ्रातांगना । करुं नये म्हणताति ॥९४॥
करितां कलियुगांत । निषिद्ध बोलती जन समस्त । संन्यासमार्ग सिद्धांत । वेदसंमत विख्यात ॥९५॥
पूर्वी ऐसें वर्तमानीं । निषेध केला सकळही जनीं । श्रीशंकराचार्य अवतारोनि । स्थापना केली परियेसा ॥९६॥
तयावरी इतुके दिवस । चालत आला मार्ग संन्यास । कलि प्रबळ होतां नाश । पुनरपि निंदा करिताती ॥९७॥
आश्रमाचा उद्धार । सकळ जनां उपकार । करावा कृपासागर । म्हणती सकळ मुनिजन ॥९८॥
ऐकोनि त्यांची विनंति । श्रीगुरुमुनि आश्रय घेती । वृद्ध कृष्णसरस्वती । तयापासूनि परियेसा ॥९९॥
ऐसें म्हणतां सिद्धमुनि । विनवीतसे नामकरणी । संदेह होतो माझे मनीं । कृपानिधि मुनिराया ॥१००॥
म्हणती श्रीगुरू तोचि जगद्गुरू । त्यातें झाला आणिक गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु । कवणेपरी दिसतसे ॥१॥
सिद्ध म्हणे शिष्यासी । सांगेन याची स्थिति कैसी । पूर्वी श्रीरघुनाथासी । झाला वसिष्ठ केवीं गुरु ॥२॥
आठवा अवतार श्रीकृष्णदेवासी । सांदीपनी जाहला गुरु कैसी । अवतार होतांचि मानुषीं तयापरी रहाटावें ॥३॥
याकारणें श्रीगुरुमूर्ती । गुरु केला तो कृष्णसरस्वती । बहुकाळींचा होता यति । म्हणोनि त्यातें मानिलें ॥४॥
शिष्य म्हणे सिद्धासी । स्वामी कथा निरोपिलीसी । वृद्ध कृष्णसरस्वतीसी । गुरु केलें म्हणोनियां ॥५॥
समस्त यतीश्वरांहून । तयासि दिधला बहुमान । कृष्णसरस्वती तो पूर्वी कोण । कोण गुरुचें मूळपीठ ॥६॥
विस्तारुनि आम्हांसी । निरोपावें कृपेसीं । त्याणें माझे मानसीं । संतोष होईल स्वामिया ॥७॥
ऐसें शिष्य विनवितां । तंव सांगे विस्तारता । मूळपीठ आद्यंता । गुरुसंतति परियेसा ॥८॥
आदिपीठ 'शंकर' गुरु । तदनंतर 'विष्णु' गुरु । त्यानंतर 'चतुर्वक्त्र' गुरु । हें मूळपीठ अवधारीं ॥९॥
तदनंतर 'वसिष्ठ' गुरु । तेथोनि 'शक्ति', 'पराशरु' । त्याचा शिष्य 'व्यास' थोरु । जो कां अवतार विष्णूचा ॥११०॥
तयापासूनि 'शुक' गुरु जाण । 'गौडपादाचार्य' सगुण । आचार्य 'गोविंद' तयाहून । पुढें आचार्य तो 'शंकर' जाहला ॥११॥
तदनंतर 'विश्वरुपाचार्य' । पुढें 'ज्ञानबोधीगिरिय' । त्याचा शिष्य 'सिंहगिरिय' । 'ईश्वरतीर्थ' पुढें झाले ॥१२॥
तदनंतर 'नृसिंहतीर्थ' । पुढें शिष्य 'विद्यातीर्थ' । 'शिवतीर्थ', 'भारतीतीर्थ' । गुरुसंतति अवधारीं ॥१३॥
मग तयापासोनि । 'विद्यारण्य' श्रीपादमुनि । 'विद्यातीर्थ' म्हणोनि । पुढें झाला परियेसा ॥१४॥
त्याचा शिष्य 'मळियानंद' । 'देवतीर्थसरस्वती' वृंद । तेथोनि 'सरस्वतीयादवेंद्र' । गुरुपीठ येणेंपरी ॥१५॥
यादवेंद्र मुनीचा शिष्य । तोचि 'कृष्णसरस्वती' विशेष । बहुकाळींचा संन्यासी । म्हणोनि विशेष मानिती ॥१६॥
येणेंपरी श्रीगुरुनाथ । आश्रम घेती चतुर्थ । संन्यासमार्गस्थापनार्थ । श्रीनृसिंहसरस्वती ॥१७॥
समस्त वेदांचा अर्थ । सांगता झाला श्रीगुरुनाथ । म्हणोनि वंदिती समस्त । तया काशी नगरांत ॥१८॥
ख्याति केली अतिगहनी । तया वाराणसीभुवनीं । यति समस्त येऊनि । सेवा करिती श्रीगुरुची ॥१९॥
मग निघाले तेथोनि । बहुत शिष्य-समवेत मुनि । उत्तरतीर्थ बदरीवनीं । अनंत तीर्थे पहावया ॥१२०॥
सव्य घालूनि मेरुसी । तीर्थे नवखंड क्षितीसी । सांगतां विस्तार बहुवसी । ऐक शिष्या नामकरणी ॥२१॥
समस्त तीर्थे अवलोकीत । सवें शिष्य-यतींसहित । भूमिप्रदक्षिणा करीत । आले गंगासागरासी ॥२२॥
सिद्ध म्हणे नामांकिता । समस्त चरित्र सांगतां । विस्तार होईल बहु कथा । म्हणोनि तावन्मात्र सांगतों परियेसीं ॥२३॥
समस्त महिमा सांगावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । अनंत महिमा त्रैमूर्तीसी । गुरुचरित्र परियेसीं ॥२४॥
गंगासागरापासाव । तटाकयात्रा करीत देव । प्रयागस्थानीं गुरुराव । येते झाले परियेसा ॥२५॥
तया स्थानीं असतां गुरू । आला एक द्विजवरु । 'माधव' नामें असे विप्रु । श्रीगुरुसी भेटला ॥२६॥
ब्रह्मज्ञान तयासी । उपदेश केला प्रीतीसीं । चतुर्थाश्रम तयासी । देते झाले परियेसा ॥२७॥
नाम 'माधवसरस्वती' । तया शिष्यातें ठेविती । तयावरी अतिप्रीती । शिष्यांमध्यें परियेसा ॥२८॥
सिद्ध म्हणे नामकरणी । शिष्य झाले येणेगुणीं । अखिल यतीनामकरणी । सांगेन ऐका एकचित्तें ॥२९॥
गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । ऐकतां होय महाज्ञानु । लाधे चारी पुरुषार्थ ॥१३०॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुचातुर्थाश्रमग्रहणं-गुरुपरंपरा-कथनं नाम द्वादशोऽध्यायः ॥१२॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥
Search
Search here.