श्री गुरुचरित्र अध्याय १ ते ७

ग्रंथ - पोथी  > श्री गुरुचरित्र मराठी कथासार Posted at 2019-02-17 14:47:09
श्री गुरुचरित्र पारायण - दिवस पहिला अध्याय १ ते ७ अध्याय १ ला मंगलाचरण ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंहसरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नम: ।। हे ॐ कारस्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वतीसुता, गजानना तुला माझा नमस्कार असो. तू लम्बोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध् आहेस. तुझ्याा हालणाऱ्या कांनापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या सर्व भक्तांची सर्व संकटे दूर होतात, म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते. उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते . संकटरुपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशू धारण केला आहेस. तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज, विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात, त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही. त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते. हे लंबोदर गणेशा, तूच चौदा विद्यांचा, म्हणजे चार वेद, सहा वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेद शास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस, म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात. हे गणेशा, अजिंक्य, अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकरांने तुझेच स्तवन केले होते. हरी-ब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी, गणनायका, हे मूषकवाहना, ॐकारस्वरूप, दु:खहर्त्या, विनायका मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात, त्यांची कार्ये सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत, म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करतो. तू मला ज्ञान दे, बुद्धी दे. हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुला शरण आलो आहे. श्रीगुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादुष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे. आता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदन करतो. तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे. तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते. हे सरस्वतीमाते, मी तुला वंदन करतो. वेद शास्त्रेपुराणे तुझ्यााच वाणीने प्रकट झाली आहेत. माते, मला चांगली बुद्धी दे.श्रीनृसिंहसरस्वती हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय, वंदनीय आहेस. हे जग कळसुत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते, म्हणून तू मला या ग्रंथलेखानासाठी प्रेरणा दे. मला स्फूर्ती दे. मला विद्यादान दे. आता मी ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो. भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे. तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो. शंख-चक्र-गदा-पद्मधारी त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजयन्तीमाला धारण केली आहे. पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो.तो मोठा कृपाळू, दयाळू आहे. आता मी पंचमुख, गंगाधर अशा शंकराला वंदन करतो. साक्षात जगन्माता पार्वती त्यांची पत्नी आहे. तोच या जगाचा संहार करतो, म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात. व्याघ्रचर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो. ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले, त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करतो. सर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध-साध्य, सर्व ऋषीमुनी, पराशर, व्यास, वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो. माझ्या जवळ कवित्व नाही. ग्रंथरचना कशी करतात ते माहित नाहीं. मला मराठी भाषा नीट येत नाही. मला शास्त्रज्ञान नाही, म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी . माझ्या या ग्रंथलेखनास सर्वतोपरी मदत करावी. अशाप्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई-वडिलांना-पूर्वजांना नमस्कार करतो. आपस्तंभ शाखेचे, कौंडीण्य गोत्रात जन्मास आलेले सायंदेव हे आमचे मूळपुरुष. साखरे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ. त्यांचा पुत्र देवव्रत. देवव्रतांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील. अश्वलायन शाखेचे, कश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या 'चंपा ' हि माझी आई. माझा पिता गंगाधर. ते सदैव श्रीगुरुंचे ध्यान करीत असत, म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गोवून 'सरस्वती-गंगाधर' असे स्वतःचे नाव धारण केले. श्रीगुरुंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधूसंतांना संन्यासी, यती, तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार, मी या सर्वांना प्रार्थना करतो की, मी अल्पमती आहे. माझे बोबडे बोल गोड मानून घ्या. पूर्वीपासून आमच्या कुलावर श्रीगुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली. ते म्हणाले, "तू आमचे चरित्र कथन कर. त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील" . गुरुंची आज्ञा मला प्रमाण आहे. ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली कामधेनूच. श्रीगुरुंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्रीनृसिंहसरस्वती हे त्रयमूर्ती श्रीदत्तात्रेयांचा अवतार आहेत. त्यांचे चरित्र अगाध आहे अपार आहे. त्यांचे वर्णन कोण करू शकेल? परंतु प्रत्यक्ष श्री गुरुंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे. ज्याला पुत्रापौत्राची इच्छा असेल, त्याने या चरित्राचे नित्य श्रवण-पठण करावे. जो या चरित्राचे श्रवण-पठण करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करेल. त्याला सर्वप्रकारची ऐश्वर्ये प्राप्त होतील. श्रीगुरुकृपेने त्याला रोगराईची बाधा होणार नाही. पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्वप्रकारची बंधने नष्ट होतील. अशी ही परमपुण्यदायक कथा मी सांगत आहे.श्रोते हो ! मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेव. आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. आपणही एकाग्रचित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या. मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नक. भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो. त्याप्रमाणे हे मी स्वानुभवातून बोलत आहे. उस दिसावयास काळा व वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो. कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो, हे लक्षात घ्या. श्रीगुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते, म्हणून श्रोते हो ! आपण लक्षपूर्वक ऐका. श्रीगुरू नृसिंहसरस्वती गाणगापुरक्षेत्री असतना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या क्षेत्री श्रीगुरुंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गाणगापुरक्षेत्री तीर्थयात्रेला सतत जात असतात,तेथे जाऊन श्रीगुरुंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात . चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. नामधारक नावाचा एक भक्त सदैव श्री गुरूंचे चिंतन करीत असे. एकदा त्याला श्रीगुरुदर्शनाची तीव्र ओढ लागली, म्हणून तो तहान-भूक विसरून गाणगापुराकडे निघाला.'आता एकतर श्रीगुरुंचे दर्शन तरी घेईन नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करिन' असा निर्धार करून तो श्रीगुरुंचे स्मरण करीत जात होता. तो मनात श्रीगुरुंना आळवीत होता, "अहो गुरुदेव, लोखंडाला परीसस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात, आपले नाम परीस आहे. ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता, मला इतके दु:ख का बरे भोगावे लागते? परिसस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा? हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात. परमदयाळू आहात.सर्वांच्यावर आपण कृपा करता, मग माझ्या-बद्दल आपणास दया का बरे येत नाही? आपण मला दर्शन दिले नाहीत, तर मी कोठे कुणाकडे जाऊ?" अशाप्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुनः पुन्हा श्रीगुरूंची आळवणी करीत होता. "अहो गुरुदेव, कलियुगात श्रीगुरू हेच श्रेष्ठ आहेत. ते कृपासिंधू आहेत. भक्तांचे कृपासिंधू, भक्तांचे रक्षणकर्ते आहेत. ते नृसिंहसरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील." असे वेदवचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा. हे दयासागरा, मला भावभक्ती माहित नाही. माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृपासागर आहात. माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का? तुम्ही तर माझे माता, पिता, सखा,बंधू आहात. परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात. माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे, म्हणून मी सुध्दा तुमचेच भजन-पूजन करीत आहे. हे नरहरी, माझे दैन्य, दारिद्र्य दूर करा. तुम्हीच अखिल विश्वाचे पालनपोषण कर्ते आहांत. सर्व देवांचे तुम्हीच दाते आहात. मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार? तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनातील दु:ख तुम्हाला समजत नाही का? बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते. मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल का? घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा, दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळलोकात पाठविले. तुम्ही श्री रामावतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले, त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही अढळपद दिलेत, त्याने तुम्हाला काय दिले? (श्री परशुराम अवतारी ) सर्व पृथ्वी नि:क्षत्रिय करून ब्राह्मणांना दिलीत,त्यांनी तुम्हाला काय दिले? केवळ तुम्हीच या जगाचे पालनपोषण करणारे आहात. मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार? अहो, साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरीत आहे. असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता? आणि मी तरी काय देणार? लहान बाळाला दुध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते? काहीच नाही. आधी देऊन मग देणाऱ्याला 'दाता' असे कसे म्हणता येईल? सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो. याला दातृत्व म्हणत नाहीत. मेघ जलवृष्टी करून तळी, विहीर पाण्याने भरतो, पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही कुणाचीही सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचे, तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्षे तुमची मनोभावे सेवा केली आहे. म्हणजे आमचे वडीलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे. त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्ही असे केले नाही, तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेईन. खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही, मग माझ्याविषयी असे कठोर का वागत? मी तुमचा दासानुदास आहे. प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात, मग तुम्हाला माझी दया का येत नाही? मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही? आई रागावली तर बालक पित्याकडे जातो, पण पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो. अहो गुरुदेव,तुम्हीच माझे आई-वडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथरक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाषाणालाही पाझर फुटेल, मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा का येत नाही? त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले. श्रीगुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याचे मन शांत झाले. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणांवरील धूळ झाडली. डोळ्यातील आनंदाश्रुंनी त्यांच्या चरणांना स्नान घतले. त्यांची आपल्या हृदयमंदीरात स्थापना करून यथाविधी पूजा केली. त्याच्या हृदयात श्रीगुरू स्थिर झाले. अशाप्रकारे श्रीगुरू आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात, त्यामुळे सरस्वती गंगाधरला अतीव संतोष होतो. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'मंगलाचरण'नावाचा अध्याय पहिला समाप्त. ========================================= अध्याय २ रा कलियुग वर्णन - गुरुमाहात्म्य संदीपक आख्यान ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। "हे त्रैमुर्ती दत्तात्रेया, तूच माझा गुरु आहेस. तू कृष्णानदीच्या तीरावर वास्तव्य करतोस. तेथे तुझे भक्त नांदत असतात. ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते. " असे श्रीगुरुंचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असता थकवा आल्याने तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला. तेथेच त्याला झोप लागली. झोपेत असताना त्याला स्वप्न पडले. त्या स्वप्नात जटाधारी, सर्वांगाला भस्म लावलेले, व्याघ्रचर्म परिधान केलेले, पितांबर नेसलेले श्रीगुरू दिसले. त्यांने नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले. हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला व इकडेतिकडे पाहू लागला, पण त्याला कोणीच दिसले नाही. स्वप्नात त्याने जी मूर्ती पहिली तिचे ध्यान करीत तो पुढे चालत निघाला. काही अंतर जातो तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे दर्शन झाले. त्याने धावत जाऊन त्या योग्याला दंडवत घातला. तो त्या योग्याला म्हणाला, " हे कृपासागर, तुझा जयजयकार असो ! आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली. तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्यच आहेस. माझा उद्धार करण्यासाठीच तू आला आहेस. या दीन भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे. आपण कोठून आला आहात ? आपले नाव काय ? आपण कोठे राहता ? " नामधारकाने असे विचारले असता, ते सिद्धयोगी म्हणाले, "मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करीत फिरतो आहे. माझे गुरु श्रीनृसिंहसरस्वती भीमा-अमरजा नद्यांच्या संगमावरील श्रीक्षेत्र गाणगापुर येथे असतात. ते त्रिमुर्ती श्रीदत्तात्रेयांचे अवतार आहेत. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत .त्यांच्या भक्तांना दुःख, दारिद्र्य कधीही येत नाही. त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो, त्यांचे घर धन,धान्यांनी, गोधनादी अष्टैश्वर्याने भरलेले असते ." सिद्धमुनींनी असे सांगितले असता नामधारक म्हणाला, "मी सुद्धा त्या श्रीगुरुंचे सदैव ध्यान करीत असतो. आमच्या वंशात त्यांचीच भक्ती-उपासना परंपरेने चालत आली आहे. असे असताना माझ्याच नशिबी ही कष्टदशा का बरे ? माझे नशीब थोर म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात. तुम्हीच माझे तारक आहत. आता कृपा करून माझ्या संशयाचे निराकरण करा. " नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "अरे, श्रीगुरू भक्तवत्सल आहेत. त्यांची कृपा लहान-मोठ्यांवर सारखीच असते. ज्यावर गुरुकृपा आहे त्याला कसलेही दु:ख असू शकत नाही. गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो. सर्व देवदेवता त्याला वश होतात. अशा श्रीगुरुची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दीन-दु:खी आहोत असे सांगतोस. याचा अर्थ हाच की, तुझी त्यांच्यावर दृढभक्ती नाही, श्रद्धा नाही, म्हणूनच तुला नानाप्रकारची दु:खे भोगावी लागत आहेत. श्रीगुरुदत्तात्रेय ब्रह्म-विष्णू-महेश स्वरूप आहेत. त्यांची एकभावे उपासना केली असता ते सर्व काही देतात, म्हणून तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव. आणखी एक लक्षात ठेव, जर हरी-हरांचा कोप झाला तर श्रीगुरू आपल्या भक्तांचे रक्षण करतात, पण श्रीगुरूच जर कोपले तर हरी-हरसुद्धा रक्षण करू शकत नाही." सिद्धांनी असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले. मग तो हात जोडून म्हणाला," स्वामी, आपण सांगता त्या विषयी माझ्या मनात एक शंका आहे. श्री गुरुदत्तात्रेय हे ब्रह्मा-विष्णू-महेश स्वरूप आहेत. ते त्रिमूर्ती आहेत. ते त्रिमूर्ती अवतार आहेत हे कसे काय ? आपण असेही सांगितले की , हरि-हर कोपले तर गुरु रक्षण करतात पण गुरूच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही. हे कसे काय ? हे वाचन कोणत्या शास्त्रपुराणातले आहे ? कृपा करून माझी ही शंका दूर करा." सिद्ध म्हणाले, "नामधारका, तुझी शंका रास्त आहे. तुझ्या शंकेचे उत्तर मी वेद-रचनेच्या साक्षीने देतो, ते लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवाच्या मुखातून चार वेद व अठरा पुराणे निर्माण शलॆ. त्या अठरा पुराणांत 'ब्रह्मवैवर्त' नावाचे पुराण अतिशय प्रसिद्ध आहे. द्वापारयुगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यासरूपाने अवतीर्ण झाले. त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली. त्या व्यासांनी ऋषीमुनींना जी कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो. ती तू एकाग्रचित्ताने श्रवण कर.ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमाहात्म्य सविस्तर सांगितले. सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला ,"गुरुदेव, तुम्ही मला भेटलात . ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमाहात्म्य कोणत्या कारणास्तव सांगितले ? ते केव्हा सांगितले ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून ते मला सविस्तर सांगा. " नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनींनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले," ऐक तर. जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदीमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरुपात वात्पात्रावर पहुडले होते. त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली.जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले. त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झालें. त्यांनी चारी दिशांना पहिले ते चतुर्मुख झालें . ते स्वत:शीच म्हणले," मीच सर्वश्रेष्ठ आहे. माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही. " त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले. ते गंभीर स्वरात म्हणाले. "मी महाविष्णू आहे. तू माझी भक्ती कर." हे ऐकताच ब्रम्हदेवांनी भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परोपरीने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णुंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, " हे महाप्रभू, मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही. मग मी काय करू ?" विष्णुंनी त्यांना चार वेद दिले व त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितले. भगवान विष्णुंनी अशी आज्ञा केली असता, ब्रह्मदेवांनी विविधतेने नटलेले स्थावर जंगम विश्व निर्माण केले. त्यांत स्वेदज (घामातून उत्पन्न होणारे ),अंडज (अंड्यातून उत्पन्न होणारे ), जारज (वीर्यातून उत्पन्न होणारे ) व उद्भिज (उगवणारे वृक्ष ) अशी चार प्रकारची सृष्टी निर्माण केली. भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ब्रह्मदेवाने त्रैलोक्याची रचना केली. मग त्यांने सनकादिक मानसपुत्र, मरीची इत्यदी सप्तर्षी, देव आणि दैत्य उत्पन्न केले. मग ब्रह्मदेवांनी कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग व कलियुग अशी चार युगे निर्माण केली. ही चार युगे ब्रम्हदेवांच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतत. ब्रह्मदेवांनी सर्वप्रथम कृतायुगाला पृथ्वीवर पाठविले. कृतयुग म्हणजे सत्ययुग. त्याची वैशिष्ट्ये सांगतो ती ऐक. ते सत्ययुग सत्यवचनी, वैराग्यसंपन्न, ज्ञानी व सत्वगुणांची वृद्धी करणारे होते. त्याने शुभ्रवस्त्र परिधान केले होते. त्याच्या खांद्यावर यज्ञोपवीत, गळ्यात रुद्राक्षमाळा व हातात कंकणे होती त्याने पृथ्वीवर येउन लोकांना सत्वगुणी, सत्प्रवृत्त केले. त्याने लोकांना तपश्चर्येचा मार्ग दाखविला व लोकांचा उद्धार केला. सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवांनी त्याला परत बोलविले. मग त्यांने त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठविले. त्याची लक्षणे सांगतो ती ऐक, त्या त्रेतायुगाचा देह स्थूल होत. त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती. त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञयाग करीत असत. त्याने कर्ममार्गाची स्थापना केलॆ. वृषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते. त्यानें पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले. मग ब्रह्मदेवांनी द्वापारयुगाला पृथ्वीवर पाठविले. त्याच्या हातात खट्वांग व धनुष्यबाण हि शस्त्रे होती. ते उग्र, शांत, निष्ठुर व दयावान होते. त्या युगात पाप-पुण्य समान होते, असे ते द्वापारयुग पृथ्वीवरील आपला कार्यकाल पूर्ण होताच ब्रह्मदेवांकडे परत गेले. द्वापारयुग परत आल्यावर ब्रह्मदेवांनी कलियुगाला बोलावून घेतले व त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. ते कलियुग अविचारी होते. पिशाच्चाप्रमाणे मुख असलेले ते नग्न स्वरुपात ब्रह्मदेवांसमोर प्रकट झालें. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ व डाव्या हातात शिश्न म्हणजे लिंग धरले होते. ते रडत, हसत, शिव्या देत, नाचत-नाचता ब्रह्मदेवापुढे तोंड खाली घालून उभे रहिले. त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले,"तू लिंग आणि जीभ का धरली आहेस ?" असे विचारले असता कलियुग म्हणाले, " मी सर्वांना जिंकू शकतो पण वाणी, रसना व कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही." ब्रह्मदेवांनी त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले, मला पृथ्वीवर पाठवत आहात, पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणांस माहित आहे का ? मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन. मी स्वच्छंदी आहे. मी लोकांच्यात निद्रा आणि कलह माजवीन. परद्रव्याचा अपहार करणारे व परस्त्रीशी रममाण होणारे हे दोघेही माझे प्राणसखे आहेत. ढोंगी संन्यासी कपटकारस्थान करून आपले पोट भरणारे, माझे प्राणसखे आहेत. परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू, वैरी होत." कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले असता ब्रह्मदेव म्हणाले, "पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घायुष्य होते, त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत. त्यांना मृत्यू नव्हता, त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घकाळ कष्ट सोसावे लागत असत. पण आता तसे नाही. तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्पायुष्य, फार तर शंभर वर्षे आयुष्य असेल. त्यांच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल. त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीत परमार्थप्राप्ती करून घेतील. जे लोक ब्रह्मज्ञानी व पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस." ब्रह्मदेवांनी असे सांगितले असता कलियुग म्हणाले, "आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी होत . असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ? मला त्यांची भीती वाटते. त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही. भरतखंडात पुण्य खूप आहे. अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील. मग मी तिकडे कसा जाऊ? " ब्रह्मदेव म्हणाले," तू कसलीही चिंता करू नकोस. तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील. एखादाच मनुष्य पुण्यशील असेल, त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही, त्याला तू सहाय्य कर. बाकी सगळेच तुला वश होतील. " कलियुग म्हणाले, "मी दुष्ट स्वभावाचा आहे. मग मी धर्मशील, पुण्यशील मनुष्यांना सहाय्य कसे करणार ?" ब्रह्मदेव म्हणाले," जे लोक देहाने व मनाने पवित्र असतील, जे निर्लोभी असतील, जे हरिहरांची सेवा करणारे असतील, जे सदैव आपल्या गुरुंची सेवा करतील त्यांना तू पीडा देऊ नकोस. आई-वडिलांची सेवा करणाऱ्या, ब्राह्मण, गायत्री व कपिलाधेनु यांची सेवा करणाऱ्या, सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस. आपल्या गुरुंची सेवा करणारे, अभेद भक्ती करणारे, नित्य पुराण श्रवण करणारे जे लोक असतील, त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस. ही माझी आज्ञा आहे." कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले "गुरु, या शब्दाचा अर्थ काय ? त्याचे स्वरूप कसे असते ? गुरुचे माहात्म्य कोणते ?" ब्रह्मदेव म्हणाले " 'ग +उ' व 'र + ऊ' मिळून 'गुरु' शब्द होतो. यातील गकार म्हणजे 'ग् ' हे अक्षर गणेशवाचक आहे, 'उ' हा विष्णूवाचक व 'र' हे अग्निवाचक आहे. दोन वर्णांचा गुरु शब्द धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चारी पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारा आहे. शिव शंकर कोपले तर गुरु रक्षण करील, पण गुरु कोपले तर शिवसुद्धा रक्षण करू शकणार नाही. गुरु हाच ब्रह्मा-विष्णू-महेश आहे. गुरु हाच साक्षात परब्रम्ह आहे. म्हणून सदैव गुरूची-सद्गुरूची सेवा करावी. वैष्णवजन 'गुरुभक्ती अखंड राहो !' अशी प्रार्थना करतात. गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो. गुरुची भक्ती केल्याने तीर्थे, तपे, योग, ताप इत्यादी धर्म कळतात. त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचारधर्म, वर्णाश्रमधर्म, ज्ञान, भक्ती व वैराग्य यांची प्राप्ती होते म्हणून गुरूचीच सेवा करावी. त्याचेच भजन-पूजन करवे. गुरूच सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे." अशाप्रकारे ब्रह्मदेवांनी गुरुमाहात्म्य सांगितले असता, कलीने विचारले, "गुरु हा सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणता हे कसे काय ? याचे काही उदाहरण असेल तर मला सांगावे." ब्रम्हदेव कलीला म्हणाले, "तुला सगळे काही सविस्तर सांगतो. तू एकाग्र चित्ताने श्रवण कर.गुरुशिवाय तरणोपाय नाही . शास्त्रश्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रवण केले तरच ज्ञानप्राप्ती होते. गुरु हाच प्रकाश देणारा ज्योतिस्वरुप आहे. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ती ऐक. " असे बोलून ब्रह्मदेवांनी संदीपक आख्यान सांगण्यास प्रारंभ केला. खूप वर्षापुर्वीची कथा. गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होत. त्या आश्रमात पैलऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते. त्यांचे अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्रादींचा अभ्यास करीत असत. त्यांत संदीपक नावाचा एक शिष्य होता. तो मोठा विद्वान होता. त्याची आपल्या गुरूंवर फार भक्ती होती. तो आपल्या गुरुंची अगदी मनापासून सेवा करीत असे. एकदा वेदधर्मानी आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरविले. त्यांनी सर्व शिष्यांना बोलाविले ते शिष्यांना म्हणाले, "तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका." शिष्य म्हणाले, "गुरुदेव तुमचे वचन आम्हाला वेदप्रमाण. आपण काय ते सांगा." वेदधर्म म्हणाले, "पातकाचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केले. त्यातील पुष्कळसे पाप संपले आहे. अद्याप थोडे शिल्लक आहे. ते भोगल्याशिवाय संपणार नहि. त्यासाठी काशीक्षेत्री जाऊन राहावयाचे असे मी ठरविले आहे. ते पापभोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील ते सांगा. तुमच्यापैकी एकजण जरी माझ्याबरोबर येउन माझी सेवा करील तर मी नक्कीच पापमुक्त होइन." वेदधर्माचे हे शब्द ऐकताच सर्व एकमेकांकडे पाहू लगले. त्यावेळी संदीपक नावाचा शिष्य म्हणाला, "गुरुदेव,जो दुःखभोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपवावं लागणार. आपला देह सुदृढ आहे तोवर तो भोग संपवावा म्हणजे देहाचा नाश होणार नाही. भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे. " मी आपली सेवा करण्यास तयार आहे. मी आपणास काशीला घेऊन जातो." संदीपकाचे हे बोलणे ऐकून वेदधर्म ऋषींना खूप बरे वाटले. ते म्हणाले, " अरे बाळ संदीपका, जरा नीट विचार कर. अरे, भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईन. अंगहीन होईन. मी पांगळा होईन. अंध होईन. तुला माझा एकवीस वर्षे सांभाळ करावा लागेल. तुझी तयारी आहे का ? " संदीपक म्हणाला,"गुरुदेव, मी तयार आहे. तुम्ही माझे काशीविश्वनाथच आहात." मग संदीपक आपल्या गुरूंना घेऊन काशीला गेला. तेथे मनकर्णिकेच्या उत्तरेस कामबालेश्वराजवळ ते रहिले.तेथे मनकर्णिकेत स्नान व विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनेम होता. असेच काही दिवस गेले आणि वेदधर्माच्या शरीरात बदल होऊ लागला होता. त्यांचे शरीर कुष्ठरोगाने भरले. त्यांची दृष्टी गेली. सगळे अवयव विद्रूप दिसू लागले. त्यांना धड चालताही येईना. पण संदीपक त्यांच्या सेवेत काहीही कमी करीत नसे. तो त्यांचे कपडे धूत असे. त्यांना स्नान घालीत असे. त्यांचा बिछाना घालीत असे. पण महाव्याधीने त्रस्त झालेले गुरु संदीपकाला उलटसुलट आज्ञा करून अत्यंत त्रास देत होते. संदीपकाने कितीही सेवा केली तरी गुरु वेदधर्म त्याच्यावर सारखे रागवत, चिडत, सारखी कसली तरी तक्रार करीत असत; पण संदीपकाने गुरुसेवेत कधीही खंड पडू दिला नाही. गुरुसेवा हेच त्याचे जीव झाले होते. संदीपक भिक्षा मागून आणीत असे; पण कधी कमीच आणलीस म्हणून गुरु रागवत; पण कधी कधी गोड पदार्थ आणले नाहीस म्हणून सगळे अन्न फेकून देत असत; पण संदीपक कधीही कष्टी होत नसे. गुरुंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्याला आनंद होत असे. संदीपकच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली. हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पाहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रकट झाले. संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झालें. ते संदीपकाला म्हणाले,"मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग." परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होते. तो आपल्या गुरूंकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, "गुरुदेव, भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत, तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का ? " वेदधर्म रागावून म्हणाले "मुळीच नको. माझ्यासाठी देवाकडे कसलीही भीक मागू नकोस." संदीपक परत गेला व शंकराला म्हणाला ,"मला माझ्यासाठी कोणतेही वरदान नको. माझ्या गुरुंनाही नको." आश्चर्यचकित झालेले शंकर कैलासावर परत गेले. त्यांनी सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला. काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरुशिष्यांचे दर्शन घेण्यासाठी आले. संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून ते संतुष्ट झाले. संदीपकापुढे प्रकट होऊन त्याला म्हणाले, "बाळा, या पृथ्वीवर तुझ्याइतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पहिला नाही. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तेव्हा तू काहीतरी वर मागच." तेव्हा संदीपक म्हणाला, "परमेश्वरा, मला काहीही नको. तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहेत. माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान, ऐश्वर्ये आहेत. प्रसन्न झालेले गुरु देत नाहीत असे काहीही नाही. म्हणून मला काहीही नको. आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या. कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो. " प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले, "खरे आहे. जो कोणी माता-पिता व गुरु यांची सेवा करतो तो एकार्थाने आमचीच भक्ती करतो. आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरुभक्तीच श्रेष्ठ आहे. तुझ्या ठायीं गुरुभक्ती दृढ होईल असा मी तुला वर देतो." असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले. मग वेदधर्मांनी संदीपकाला विचारले, "काय रे, विष्णुंनी तुला काय वर दिला ?" तेव्हा संदीपक म्हणाला, "मी भगवान विष्णुंकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला !" संदीपकाच्या या बोलण्याने वेदधर्मांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले, "संदीपका, धन्य आहे तुझी ! तू काशीत चिरकाल निवास करशील. जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन ते सर्वप्रकारच्या वैभवाने संपन्न होतील. तुला माझे आशीर्वाद आहेत." असे ते म्हणाले, तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या. त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले. त्यांना दृष्टी आली. त्यांनी संदीपकाला प्रेमाने पोटाशी धरले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, "बाळा , मी तुझी परीक्षा पहिली. अरे, जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही. एकवीस वर्षे तू माझी सेवा केलीस, तुला सर्व विद्या प्राप्त होतील. " सूत म्हणाले , "ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमाहात्म्य सांगताना ही कथा सांगितली. संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, " गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची पूर्ण श्रद्धेने, भक्तीभावाने सेवा केली तर भगवान श्रीशंकर त्या गुरुभक्तावर प्रसन्न असतात." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'कलियुग वर्णन - गुरुमाहात्म्य संदीपक आख्यान' नावाचा अध्याय दुसरा समाप्त. ================================================= अध्याय ३ रा अंबरीष आख्यान ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। सिद्धमुनींनी सांगितलेले गुरुमाहात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. तो सिद्धमुनींचा जयजयकार करीत म्हणाला,"अहो सिद्ध मुनीवर्य, आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात. आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले. तुम्ही जे गुरुमाहात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे. आता मला कृपा करून सांगा, आपण कोठे राहता ? भोजन कोठे करता ? मी आपला दासानुदास होऊ इच्छितो." नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले. ते म्हणाले,"ज्या ज्या ठिकाणी श्रीगुरू राहत होते तेथे तेथे मी राहतो. गुरुस्मरण हेच माझे भोजन. श्रीगुरुचरित्रामृताचेच मी सदैव सेवन करतो." असे सांगून त्यांनी नामधारकाला श्रीगुरुचरित्र ग्रंथ दाखविला. ते म्हणाले, या श्रीगुरुचरित्राचे नित्य श्रवण-पठण केले असता भक्ती आणि मुक्ती, सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. ही कथा श्रवण केली असता धन, धन्य, संपत्ती, पुत्रपौत्र इत्यादींची प्राप्ती होते. ज्ञानप्राप्ती होते. या ग्रंथाचे सप्ताह पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्रसंतान प्राप्त होते. ग्रहरोगादी पीडा नाहीशा होतत. बंधनातून सुटका होते. या ग्रंथांचे श्रवण-पठण करणारा ज्ञानसंपन्न, शतायुषी होतो." सिद्धमुनींनी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला,"आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरूच भेटले आहेत. श्रीगुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे. तहानेने व्याकूळ झालेल्याला अमृत आणून द्यावे त्याप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहत. मला श्रीगुरुचरित्र सविस्तर सांगा." सिद्धमुनीं त्याला आश्वासन देऊन म्हणाले,"आता तू कसलीही चिंता करू नकोस. मी तुझे संकट दूर करीन. ज्यांच्या ठिकाणी गुरुभक्ती नाही, ते श्रीगुरुला बोल लावतात. श्रीगुरू काय देणार? असा विचार करतात, त्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागतात, म्हणून तूसुद्धा संशयवृत्ती सोडून दे. श्रीगुरूंवर दृढ श्रद्धा ठेव. श्रीगुरू कृपेचा सागर आहेत. त्यांच्या देण्याला मर्यादाच नाही. ते तुझी उपेक्षा कधीही करणार नाहीत. श्रीगुरु मेघदूतासारखे उदार आहेत.मेघ जलवृष्टी करतो पण ते पाणी उथळ जागी साचत नाही. ते सखोल जागीच साचते. दृढभक्ती ही सखोल जागेप्रमाणे असते. प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी मस्तकी वरदहस्त ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो. कल्पवृक्ष किंवा कामधेनू कल्पिले तेवढेच देते; पण श्रीगुरू कल्पनेच्या पलीकडचेही देतात. म्हणून तू निःसंदेह होऊन एकाग्रचित्ताने, परमश्रद्धेने गुरुभक्ती कर." नामधारक म्हणाला,"हे योगेश्वरा, आपण कामधेनू आहात. कृपासागर आहत. माझे मन आता स्वछ झाले आहे. आता श्रीगुरुचरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे. त्रैमूर्ती श्रीगुरू मनुष्ययोनीत अवतीर्ण झाले असे मी ऐकले आहे. ते कशासाठी अवतीर्ण झाले व ते मला सविस्तर सांगावे." नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले,"वत्सा, आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती आज फळास आली. मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला, परंतु श्रीगुरुचरित्राविषयी कोणीही म्हणाले नाही."आम्हाला गुरुचरित्र सांगा" असे कोणीही म्हटले नाही. तूच पहिला मला भेटलास. तूच खरा भाग्यवान आहेस. ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्रकथा गोड लागेल.तू श्रीगुरूंचा भक्त आहेस म्हणून तुला हि सदबुद्धी झाली. आता तू काय-वाचा-मन एकाग्र करून श्रीगुरुचरित्र श्रवण कर. यामुळे तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. या चरित्र श्रवणाने धनधान्यादी, संपत्ती, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते. कलियुगात ब्रह्मा-विष्णू-महेश मनुष्यरूपानें पृथ्वीवर अवतीर्ण झाले. तेच श्रीगुरुदत्तात्रेय होय. भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठीच ते सर्वत्र संचार करीत असतात. आता पुढे ऐक,प्रथम आदीवस्तु एकच ब्रह्म असून प्रपंचात तीन गुणांना (सत्व-रज-तम) अनुसरून तीन मूर्ती झाल्या. त्यात ब्रह्मा हा रजोगुणी. विष्णू सत्वगुणी व महेश तमोगुणी. त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रेय. पहिला सृष्टी निर्माण करतो, दुसरा त्याचे पालन-पोषण करतो आणि तिसरा तिचा संहार करतो. हे तीन गुण अभिन्न आहेत. हि सृष्टी चालविणे हे त्या तिघांचे कार्य. या अवतारांचे कार्य व अवतार घेण्याचे कार्य याविषयी पुराणकथा आहे तीच मी तुला सांगतो. अंब ऋषींनी (त्यांना अंबरीष असेही म्हणतात.)" द्वादशीच्या निमित्ताने विष्णूला अवतार घ्यावयास लावला. ती कथा ऐक, अंबरीष ऋषींनी द्वादशी व्रत सुरु केले होते. ते नित्य अतिथी-अभ्यंगताची पूजा करून सर्वकाळ हरीचिंतन करीत असत. त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्राज्ञा आहे. अंबरीषांच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहित होती. त्यांचा व्रतभंग करावयाचा असा हेतू मनात धरून शीघ्रकोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबरीषाकडे गेले. त्या दिवशी द्वादशी अगदी घटकाभरच होती. पारणे करायचे तर तेवढ्या वेळेतच अन्नग्रहण करावयास हवे; पण त्याच वेळी दुर्वास अतिथी म्हणून आले. दुर्वासांना पाहताच अंबरीषांना मोठी भीती वाटली. वेळ तर थोडाच होत. आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले. तशाही परीस्थितीत अंबरीषांनी दुर्वासाचे स्वागत करून त्यांची पूजा केली. भोजनापूर्वी दुर्वास स्नानसंध्यादि करण्यासाठी नदीवर गेले." सत्वर परत या" असे अंबरीषांनी त्यांना सांगितले. इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ झाली तरीही दुर्वासांचा पत्ताच नव्हता. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीषांनी केवळ एक आचमन करून पारणे केले. अतिथीच्या जागेवर भोजनाचे पान वाढून ठेवले. थोड्याच वेळाने दुर्वास आले. त्यांना सगळा प्रकार समजला. अंबरीषांकडे रागाने पाहून म्हणाले,"अरे दुरात्म्या, अतिथीने भोजन करण्याआधीच तू भोजन केलेस ? थांब मी तुला शाप देतो." हे शब्द ऐकताच अंबरीष घाबरले. त्यांनी अत्यंत कळवळून भगवान विष्णूंचा धावा केला. शीघ्रकोपी दुर्वासांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली,"अरे दुरात्म्या, माझ्या आधी तू भोजन केलेस. माझा तू अक्षम्य अपराध केला आहेस. या अपराधाबद्दल तुला सर्व योनींत जन्म घ्यावा लागेल." ही शापवाणी ऐकताच अंबरीष दुःखाने रडू लागले. त्याचक्षणी भक्तवत्सल भगवान विष्णू प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले,"मुनिवर्य, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, पण मी त्याचे रक्षण करणार आहे. तो शाप मी स्वतः भोगीन." दुर्वास हे परमज्ञानी होते, ते ईश्वराचा अवतार होते, क्रोधी होते तरी ते उपकारी होते. त्यांनी विचार केला. या भूलोकी युगानुयुगे तपश्चर्या केली तरीसुद्धा श्रीहरीचरणांचे दर्शन होत नाही. आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीसह अवतार घेइल. दुष्ट-दुर्जनांचा नाश करून संतसज्जनांचे रक्षण करील. मग ते भगवान विष्णूंना म्हणाले,"हे श्रीहरी, तू पूर्णब्रह्म, विश्वात्मा आहेस.तू परोपकारासाठी शाप भोगताना विविध स्थानीं, विविध वेळी, विविध योनींत असे दहा अवतार घे." भगवान विष्णुंनी ते मान्य केले. त्यानुसार भगवान विष्णूने मत्स्य, कूर्म, वरहादि दहा अवतार घेतले. हे अवतार कार्यकारणपरत्वे होत असतात. ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात.फक्त ज्ञानी लोकांना हे समजते. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले,"आता मी तुला एक गंमतीची कथा म्हणजे श्रीदत्तजन्माची कथा सांगतो. अनसूया ही अत्रीऋषींची पत्नी. ती पतिव्रता शिरोमणी होती.तिच्या घरी ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव कपटवेष धारण करून आले, परंतु अनसूयेच्या तप सामर्थ्यामुळे तिच्या घरी तिची बाळे म्हणून जन्मास आले." हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला,"ते त्रिदेव कपटवेष धारण करून अनुसुयेच्या घरी कशासाठी आले होते ? त्यांची बाळे कशी झाली? आणि अत्रीऋषी पूर्वी कोण होते ? त्यांचा मूळ पुरुष कोण ? हे सगळे मला सविस्तर सांगा." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'अंबरीष आख्यान' नावाचा अध्याय तिसरा समाप्त. ================================================= अध्याय ४ था त्रैमुर्ति (श्रीदत्तात्रेय) अवतार कथा ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। "त्रैमुर्ति श्रीदत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा." असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम, मी तुला अत्रिऋषी कोण होते ते सांगतो." सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते.त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेलें ब्रह्म. त्यालाच ब्रम्हांड म्हणतात. मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश, खाली भूमी असे दोन भाग झाले. ब्रह्माने तेथे चौदा भुवने निर्माण केली. दहा दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, क्रतू आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले. त्या सप्तर्षीपैकी अत्रींची पत्नी अनसूया. ही श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्यरूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल कि काय अशी सर्व देवांना भिती वाटू लागली. मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री-अनसूया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, "महातपस्वी अत्रींची पत्नी अनसूया असामान्य पतिव्रता आहे.ती काया-वाचा-मनाने अतिथींची पूजा करते. ती कुणालाही विन्मुख करीत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंदमंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड, शीतल होतो. वारासुद्धा भीतीने मंदमंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते.ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवाचाकरी करत राहावे लागेल." देवांचे गाऱ्हाणे ऐकताच ब्रह्मा-विष्णू-महेश भयंकर रागावले आणि म्हणाले,"चला, आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पातिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू. नाहीतर यमलोकाला पाठवू." असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मग सती अनसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा-विष्णू-महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला. मग ते तिघेजण अत्रिऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्रिऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनसूया आश्रमात एकटीच होती. ते अनसुयेला हाक मारून म्हणाले, "माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सदा संतर्पण चालू असते. अतिथी-अभ्यागतांना येथे इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे, म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लौकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो." तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनसुयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले. बसावयास दिले. त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षतपुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली,"आपण स्नान करून या. तोपर्यंत पाने वाढते." तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, "आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लौकर भोजन दे." "ठीक आहे." असे म्हणून अनसूयेने त्यांना बसावयास पाट दिले, पाने मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, "माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छाभोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे . तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे, म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ. नाहीतर आम्ही परत जातो." त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनसूया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिनें ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील ? आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होइल.विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटातून तारुन नेईल." असा विचार करून अनसूया त्या भिक्षुंना 'तथास्तु' असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले.पतीची मनात पूजा केली.मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य ! त्याचक्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली.मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली, अंगाई गीते गाऊ लागली. ती बाळें भुकेने व्याकूळ होउन रडत होती. त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याचवेळी अनसुयेला वात्सल्याने पान्हा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव अनसूयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्रिऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनसूयेने त्यानं सगळी हकीकत सांगितली. ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिमुर्ती आहेत हे अत्रिऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा-विष्णू-महेश अत्रि ऋषींपुढे प्रकट झाले 'वर माग' असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनसुयेला म्हणाले, "त्रिमुर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे." तेव्हा अनसूया हात जोडून म्हणाली, "नाथ, हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या." अत्री म्हणाले, "हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात, तर पुत्ररूपाने येथेच राहा." तेव्हा 'तथास्तु' म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव 'चंद्र' झाला. श्रीविष्णू 'दत्त' झाला आणि महेश 'दुर्वास' झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, "आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा 'दत्त' येथेच राहील.तोच त्रिमुर्ती आहे असे समज." अनसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमुर्ती दत्त मात्र आई-वडिलांची देव करीत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि-अनसूयेचा पुत्र, श्रीविष्णूचा अवतार असूनही त्रिमुर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय व अत्रिअनसुयेला देवांनी तो दिला म्हणून 'दत्त'. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहे. अशाप्रकारे सिद्धमुनींनी नामधारकाला दत्तजन्म अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो सिद्धमुनींना म्हणाला, "श्रीगुरुदत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा" सिद्ध योगींनी तथास्तु म्हटले. (दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीष पौर्णिमेला झाला. या दिवशी दत्तजयंती असते.) अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'त्रैमुर्ति (श्रीदत्तात्रेय) अवतार कथा' नावाचा अध्याय चौथा समाप्त. ===================================== अध्याय ५ वा श्रीदत्तात्रेयांचा श्रीपादश्रीवल्लभ अवतार कथा ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। सिद्धयोगी नामधारकाला श्रीदत्तात्रेयांची अवतार कथा सांगू लागले. आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्यलोकात अनेक अवतार धारण केले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "अरे नामधारका, लक्षपूर्वक ऐक. भगवान विष्णूंनी अंबरीषासाठी अवतार घेतले. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध, कल्की असे श्रीविष्णूचे दहा अवतार आहेत. त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्रीदत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले. संतसज्जनांचे रक्षण व दुष्ट -दुर्जनांचे निर्दोलन याच हेतूंनी परमेश्वर नानारूपांनी अवतार घेतो. द्वापारयुग संपल्यावर कलियुग सुरु झाले. जगात अधर्म आणि अनाचार वाढला. ब्राह्मण आचारभ्रष्ट, विचारभ्रष्ट झाले. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली. त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्यरुपात अवतार घेतो. पीठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती. अतिथी-अभ्यागतांची ती मनोभावे सेवा करीत असे.दोघेही सत्वगुणी होते.ती श्रीविष्णूची आराधना-उपासना करीत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी श्रीदत्तात्रेय अतिथीवेषात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धासाठी बोलाविलेले ब्राह्मण अद्याप यावयाचे होते. दारी अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करुन त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता, त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथीवेषातील श्रीदत्तात्रेयांनी तीन शिरे, सहा हात अशा स्वरुपात तिला दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिने भक्तीपूर्वक श्रीदत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला.प्रसन्न झालेले श्रीदत्तात्रेय तिला म्हणाले, "माग माते जे इच्छिसी । जे जे वासना तुझे मन पावसी । पावसी त्वरित म्हणतसे ।। "माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते माग." श्रीदत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली, "भगवंता, आपण मला 'जननी' म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा.मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून दोन पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे. ते असून नसल्यासारखे आहेत, म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य, परमज्ञानी, देवस्वरूप असा पुत्र व्हवा." सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्रीदत्तप्रभू, पुढील धर्मकार्याचे स्मरण करून तिला म्हणाले, "माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा तो उद्धार करील. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु तुम्ही जो सांगेल तसे करा. नाहीतर, तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे सगळे दैन्य-दुःख दूर नाहीसे करेल." असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरुपी श्रीदत्तात्रेय अदृष्य झाले. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला. काही कामासाठी बाहेर गेलेला आपळराजा घरी परतल्यावर सुमतीने त्यास सगळी हकीगत सांगितली. माध्यानकाळी कोणी अतिथी आल्यास त्यला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही श्रीदत्तात्रेयांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्रीदत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल, त्याला श्रीदत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते. सुमतीने सांगितलेली हकीगत ऐकून आपळराजा अतिशय आनंदित झाला. तो सुमतीला म्हणाला, "तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले. माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले. कारण आज आपल्याकडे श्रीदत्तरुपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल." पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली. नवमास पूर्ण झाल्यावर एके शुभदिनी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) सुमती प्रसूत झाली.तिला एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. आपळराजाने खुप दानधर्म केला. विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले. 'हा मुलगा दीक्षाकर्ता जगद्गुरु होईल.' असे त्याचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानांत घेऊन त्या नवजात बालकाचे नाव 'श्रीपाद' असे ठेवले. हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपळराजा व सुमती यांने समजले. अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करीत होते. यथावकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला. मग आपाळराजाने त्याचे यथाशास्त्र मौंजीबंधन केले. मुंज होताच श्रीपाद चारही वेद म्हणू लागला. तो न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रांत पारंगत झाला. त्यावर भाष्य करू लागला. आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला. श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले. त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पीठापुरास येऊ लागले. श्रीपाद सोळा वर्षांचे झाले. माता-पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरु केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले, त्यावेळी ते म्हणाले, "मी विवाह करणार नाही.मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे.मी तापसी ब्रह्मचारी, योगश्री हीच आमची पत्नी होय.माझे नावच श्रीवल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे." हे ऐकून आई-वडिलांना खूप वाईट वाटले. परंतु 'तुला ज्ञानी पुत्र होईल.तो सांगेल तसे वागा.' हे श्रीदत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही. असा विचार करून आई-वडील त्यांना म्हणाले, "बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. पण आम्ही तुला अडवीत नाही." आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले, "तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल." मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतदृष्टीने पहिले . आणि त्याचक्षणी परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्ती झाली. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले. 'आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो.' असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला. "तुम्हाला पुत्रपौत्रांसह सर्वप्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल . तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आई-वडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल." मग ते आई-वडिलांना म्हणाले, "या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तरदिशेला जात आहे. अनेक साधुजनांना मी दीक्षा देणार आहे." सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले अन एकाएकी गुप्त झाले. ते मग गुप्तपणे काशीक्षेत्री गेले. तेथून बदरिकाश्रमात गेले. तेथे श्रीनारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासठी भूलोकी अवतार घेतला आहे. " असे सांगून गोकर्णक्षेत्रात आले. श्रोते हो ! सिद्धमुनींनी सांगितलेली कथा ऐकून आनंदीत झालेल्या नामधारकाने सिद्धमुनींना पुढें काय विचारले व सिद्धमुनींनी काय उत्तर दिले ती कथा पुढील अध्यायात ऐका. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'श्रीदत्तात्रेयांचा श्रीपादश्रीवल्लभ अवतार कथा' नावाचा अध्याय पाचवा समाप्त. ======================================= अध्याय ६ वा गोकर्ण महिमा - महाबळेश्वरलिंग स्थापना ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, "स्वामी, अज्ञानरुपी अंधारात अडकलेल्या मला तुम्ही ज्ञानदीप दाखविलात. तुम्ही मला गुरुपीठही साद्यंत सांगितलेत. आता मला सांगा, श्रीदत्तप्रभूंनी श्रीपादश्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला.ते तीर्थयात्रेला का गेले ? इतर अनेक तीर्थक्षेत्रे असतांना ते गोकर्णालाच का गेले ?" नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "तुझ्या प्रश्नाने मला खूप आनंद झाला आहे. मी तुला श्रीगुरुचरित्र सविस्तर सांगतो. श्रीदत्तप्रभूंनी श्रीपादश्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला. त्यांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी व त्यांना परमार्थाची - आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठीच वेळोवेळी तीर्थयात्रा केली. या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, पण या सर्व तीर्थक्षेत्रांत गोकर्ण क्षेत्राचे माहात्म्य फारच मोठे आहे. तेथे 'महाबळेश्वर' नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे. त्या लिंगाची स्थापना गणेशाने केली. ती कथा मोठी अद्भुत आहे. "सिद्धमुनींनी असे सांगितले असता, "ती महाबळेश्वर लिंगाची कथा मला सविस्तर सांगा." अशी नामधारकाने विनंती केली. प्रसन्न झालेल्या सिद्धांनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली. पुलस्त्य नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते.त्यांच्या पत्नीचे नाव, कैससी. ती भगवान शंकराची एकनिष्ठ उपासक होती. ती नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न घेत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही. व्रतभंग होऊ नये म्हणून मृत्तिकाशिवलिंग करून तिने त्याची भक्तीभावाने पूजा सुरु केली. याचवेळी तिचा पुत्र दशानन रावण तिला वंदन करण्यासाठी तेथे आला होता. तो अत्यंत क्रूर होता, तरी मोठा शिवभक्त होता. आपली आई मृत्तिकाशिवलिंगाची पूजा करीत आहे हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "माते, मी तुझा पुत्र असताना तू मृत्तिका-शिवलिंगाची पूजा करीत आहेस हे माझे मोठे दुर्भाग्यच म्हणावे लागेल आणि या असल्या शिवलिंगाची पूजा करून काय फळ मिळणार आहे ?" कैससी म्हणाली, "या पूजनाने कैलासपदाची प्राप्ती होते." हे ऐकताच रावण म्हणाला, "मी तुला प्रत्यक्ष कैलासच आणून देतो. मग तुला हे कष्टच करावे लागणार नाहीत. तुला प्रत्यक्ष शिवपार्वतीची पूजा करता येईल." असे वचन देऊन तो शिवपार्वतीसह कैलास आणण्यासाठी मनोवेगाने निघाला. काहीही करून शिवपार्वतीसह कैलास लंकेत आणून आईला द्यायचाच असा निश्चय त्याने केला. तिथे पोहोचताच, शुभ्र आणि रमणीय अशा त्या कैलास पर्वताला रावण आपल्या वीस हातांनी गदागदा हलवू लागला. कैलास भुवन डळमळू लागले . रावण आपली दहा मस्तके पर्वताला लावून व वीस हात मांड्यांवर ठेवून अत्यंत जोराने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. सप्तपाताळे डळमळू लागली. सप्तस्वर्गात हल्लाकल्लोळ मजला.शेषनाग फडा चुकवू लागला. कूर्म भीतीने थरथरू लागला. स्वर्गातील सर्व देव भयभीत झाले. सत्यलोक, वैकुंठलोक डळमळू लागले. आता प्रलय होणार असे सर्वांना वाटू लागले. घाबरलेली पार्वती शंकराचे पाय धरून म्हणाली." स्वामी, आपल्या कैलासाचे काय होणार? काहीतरी उपाय करा. शिवलोकात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सगळे शिवगण घाबरले आहेत.आता स्वस्थ बसू नका.काहीतरी इलाज करा." पार्वतीने अशी विनंती केली असता शंकर म्हणाले, "तू कसलीही चिंता करू नकोस. माझा भक्त रावण भक्तीने खेळतो आहे." शंकरांनी असे सांगितले तरी पार्वतीचे समाधान झाले नाही. मग शंकरांनी आपल्या डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण कैलास पर्वताच्या व जमिनीच्या सांध्यात दडपला गेला.त्यामुळे त्याचे प्राण कासावीस झाले. आता जगतो की मरतो असे त्याला झाले. त्याने शिवनामाचा घोष सुरु केला. रावणाने अत्यंत भक्तीनें शिवस्तवन करीत, "हे पिनाकपाणि महादेवा, मला वाचवा ! वाचवा ! मी आपणास शरण आलो आहे ! " अशी प्रार्थना केली असता शंकरांना त्याची दया आली. त्यांनी डाव्या हाताचा भर काढून घेतला.रावणाची सुटका झाली.आतां त्याने शंकरांचे स्तवन सुरु केले. त्यासाठी त्याने आपले एक मस्तक छाटले. आपली आतडी तोडून तारेप्रमाणे मस्तकाला जोडून तंतुवाद्य तयार केले व त्याच्या साथीने विविध रागात शिवस्तुतीपर गायन केले.त्याने सर्व-प्रथम सामवेदगायन केले. आपल्या गायनातून नवरसांचे भाव प्रकट केले. इतकी कथा सांगून झाल्यावर सिद्धमुनींनी नामधारकाला संपूर्ण संगीतशास्त्र समजावून सांगितले. संगीतातील सप्तस्वर, त्यांची स्थाने, कुल, वंश, त्यांचे स्वरूप आणि स्वभाव इत्यादींची माहिती दिली. त्याचप्रमाणे संगीतातील आठ गण कोणते तेही सांगितले. त्याचप्रमाणे रावणाने रागदारीत जे गायन केले त्या छत्तीस रागरागिण्यांची नावेही सांगितली. रावणाने छत्तीस रागांत गायन करून भगवान शंकराची अत्यंत भक्तीने आराधना केली असता भोलेनाथ शंकर त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले. ते पंचवदन व दशभुज अशा स्वरुपात त्याच्यापुढे प्रकट झाले.व म्हणाले ."मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर मागून घे." रावण म्हणाला, "महादेव, मला काहीही कमी माही. प्रत्यक्ष लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरते आहे.ब्रह्मदेव माझा ज्योतिषी आहे. तेहतीस कोटी देव सूर्य, चंद्र, वरूण, वायू माझी अहोरात्र सेवा करीत असतात. अग्नी माझे कपडे धुतो. यम माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही मारीत नाही. इंद्रजीत माझा पुत्र आहे.अत्यंत बलाढ्य असा कुंभकर्ण माझा भाऊ आहे. माझी लंका नगरी समुद्रात सुरक्षित आहे. माझ्या घरी कामधेनू आहे. मला सहा कोटी वर्षे आयुष्य आहे. त्यामुळे मला माझ्यासाठी काहीही नको आहे.पण माझी आई तुझी भक्त आहे. ती नित्यनेमाने लिंगपूजा करते. तिला तुझी नित्यपूजा करता यावी म्हणून तुझ्यासकट कैलासपर्वतच लंकेला न्यावा या हेतूने मी आलो आहे. परमेश्वरा, माझी एवढी इच्छा पूर्ण कर." शंकर म्हणाले," तुला कैलास नेण्याची काय गरज? मी माझे प्राणलिंग तुला देतो.हे लिंग माझा प्राण आहे. सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे." असे सांगून शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले आणि ते म्हणाले, " या लिंगाची तू तीन वर्षे पूजा केलीस तर तू माझ्यासामान होशील. हे लिंग ज्याच्याजवळ असेल त्याला मृत्यू येणार नाही. याच्या केवळ दर्शनानेच सर्व दोष नाहीसे होतील. मात्र तुझ्या लंका नगरीत जाईपर्यंत हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस. या लिंगाची तीन वर्षे पूजा कर म्हणजे तू स्वतः ईश्वर होशील." अशाप्रकारे रावणाला आत्मलिंगाचे माहात्म्य सांगून ते रावणाच्या हाती दिले. भगवान शंकरांचे आत्मलिंग मिळाल्याने रावणाला अतिशय आनंद झाला.तो ते लिंग घेऊन लंकेकडे निघाला. त्रिकालज्ञानी त्रैलोक्य-संचारी नारदमुनींना हे समजताच ते धावतच अमरावतीत इंद्राकडे गेले व म्हणाले, "देवराज, घात झाला. सगळे संपले आता ! असे अस्वस्थ काय बसले आहात ? अहो, भोलेनाथ शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले आहे. "या आत्मलिंगाची तीन वर्षे पूजा केलीस तर तूच ईश्वर होशील. तुझी लंका कैलास होईल. तुला कधीही मृत्यू येणार नाही." असा वरही त्या रावणास दिला आहे. आता तो रावण अमर होईल. आता त्याच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही. आता तुमचे वैभव गेले म्हणून समजा. रंभा, उर्वशी, मेनका इत्यांदी अप्सरांसह तुम्हालापण लंकेला जावे लागेल. त्या रावणाची सेवा-चाकरी करावी लागेल. तेव्हा त्वरा करा. काहीतरी उपाय करा.तुम्ही आता ब्रह्मदेवाकडे जा. तोच काहीतरी उपाय करील." नारदमुनींनी असे सांगताच भयभीत झालेला इंद्र नारदांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला. सगळी हकीगत समजताच ब्रह्मदेव म्हणाले, "या संकटसमयी श्रीविष्णूच काहीतरी उपाय करतील." मग ते वैकुंठलोकात विष्णूकडे गेले. त्यांना सगळी हकीगत सांगून ब्रह्मदेव म्हणाले, " श्रीहरी, रावणाने सर्व देवांना कारागृहात डांबले आहे. आता शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने तर तो अत्यंत उन्मत्त होईल. त्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे तुम्हाला रामावतार घ्यावा लागेलच. परंतु तोपर्यंत, आत्मलिंग मिळाल्याने तो रावण सर्व राक्षसांसह अमर होईल.मग सगळेच कठीण होऊन बसेल.तेव्हा आत्ताच काहीतरी करावयास हवे." ब्रह्मदेवांनी असे सांगताच भगवान विष्णू त्वरित कैलास पर्वतावर निघाले. तिथे श्री शंकरांची भेट घेऊन त्यांस विचारले, "महादेवा, तुम्ही हे काय करून बसलात? तुम्ही त्या रावणाला आत्मलिंग कशासाठी दिले ? अहो तो क्रूर, दुष्ट रावण आता अमर होईल. त्याने सर्व देवांना तुरुंगात डांबले आहे. त्यांची आता सुटका कशी होणार? आता देवत्व त्याच्याकडे जाईल. तो अवघ्या त्रैलोक्याला नकोसे करून टाकेल. शंकर म्हणाले, "श्रीहरी, मी तरी काय करू ? मी आहे साधा-भोळा.त्या रावणाची भक्ती पाहून त्याच्या दोषांचा मला विसरच पडला.त्यानें स्वतःचे मस्तक तोडून तयार केलेल्या वीणेवर सुस्वर गायन करून माझे अपार स्तवन केले.त्याची ती दृढ भक्ती पाहून मी संतुष्ट झालो व त्याला माझे आत्मलिंग दिले. त्याने पार्वती मागितली असती तरीही मी त्याला दिली असती." विष्णू म्हणाले, "महादेवा, तुम्ही असले वर देता, त्यामुळे दैत्य उन्मत्त होतात. ते सर्वांचा छळ करतात.मग त्यांचा नाश करण्यासाठी, संतसज्जनांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागतात.आता झाले ते झाले, आता सांगा, तो रावण आत्मलिंग घेऊन गेला त्याला किती वेळ झाला?" शंकर म्हणाले, "फार तर पाच घटका झाल्या असतील. अद्याप तो लंकेत गेला नसेल.तो मार्गातच कोठेतरी असेल. त्याला मी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे बजाविले आहे." शंकरांनी असे सांगताच विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याला झाकण्यासाठी पाठविले.मग ते नारदमुनींना म्हणाले, "मुनीवर्य, रावण लंकेकडे निघाला आहे. तुम्ही त्वरा करा, त्याच्याकडे जा व काहीही करून त्याला रोखून धरा.माझे सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्त झाल्याचा आभास निर्माण होईल. रावण नित्यनेमाने संध्यावंदन करतो, हे तुम्हाला माहित आहे. त्याला गाठून त्याला विलंब होईल असा काहीतरी प्रयत्न करा." विष्णूंनी असे सांगितले असता नारदमुनी मनोवेगे निघाले. नारदमुनी गेल्यावर विष्णू गणेशाला म्हणाले,"गणेशा, तू विघ्नहर्ता, दुःखहर्ता आहेस, म्हणून तर सर्व देवसुद्धा तुला वंदन करतात. तुला जे वंदन करतात त्यांचे मनोरथ सिद्धीला जातात; परंतु जे लोक तुला वंदन करीत नाही, तुझी उपेक्षा करतात, त्यांच्यावर अनेक संकटे येतात; पण रावण तुला मुळीच जुमानत नाही.तो तुझ्या नकळत शंकराचे आत्मलिंग घेऊन गेला आहे. आता त्या आत्मलिंग पूजनामुळे तो अमर होईल व सर्व जगाचा छळ करील. तो लंकेत जाण्यापूर्वीच त्याला रोखून धरले पाहिजे. ते आत्मलिंग कधीही जमिनीवर ठेवू नकोस असे श्रीशंकरांनी त्यांस बजाविले आहे.त्याचाच फायदा करून घ्यावयास हवा. जेणेकरून रावण लवकर लंकेस जाणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी नारदांना पुढे पाठविले आहे. आता तू बाल-ब्रह्मचाऱ्याचे रूप धारण करून रावणाकडे जा व त्याचा विश्वास संपादन करून ते आत्मलिंग मिळव व ते जमिनीवर ठेव. असे केल्यास ते लिंग तिथेच कायम राहील." अशाप्रकारे विष्णूंनी गणेशाला साहाय्य करण्यास सांगितले. श्रीगणेशाने ते मान्य केले. त्याने बालब्रह्मचाऱ्याचे रूप धारण केले.भगवान विष्णूंनी त्याला शिदोरी म्हणून गूळ, खोबरे, साखर, लाडू, डाळींबे इत्यादी पदार्थ दिले. मग गणराज ते पदार्थ खात खात रावणाकडे निघाला.नारदमुनी अगोदरच रावणाकडे गेले होते. त्यांनी रावणाला गाठून विचारले."रावणा, कोठून आलास ?" रावण म्हणाला, "मी कैलासावर गेलो होतो.तेथे मी कठोर तप केले.त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकरांनी मला आत्मलिंग दिले. या आत्मलिंगाचे माहात्म्य फार मोठे आहे असे त्यांनी सांगितले." नारदमुनी म्हणाले,"रावणा, तू खरोखरच मोठा भाग्यवान आहेस म्हणूनच तुला आत्मलिंग दिले.मला त्या लिंगाची बरीच माहिती आहे.मला ते दाखव.म्हणजे ते शंकराचेच आत्मलिंग आहे अशी माझी खात्री पटेल." नारदांच्या बोलण्यावर रावणाचा विश्वास नव्हता. त्याने ते आत्मलिंग दुरूनच दाखविले. ते लिंग पाहून नारदमुनी म्हणाले, "लंकेशा, हेच ते आत्मलिंग ! मला त्याचे माहात्म्य चांगले माहित आहे. मी तुला ते सविस्तर सांगतो. तू अगदी शांत बसून मी सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक. मी तुला या लिंगाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो. कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता. त्या पशुला तीन शिंगे होती. एकदा ब्रह्मा-विष्णू-महेश शिकारीसाठी गेले होते.त्यांनी त्या पशूची शिकार केली. त्यांनी त्या पशूची तिन्ही शिंगे काढली. त्या प्रत्येक शिंगाखाली एकेक प्राणलिंग होते. ती तिन्ही लिंगे त्या तिघांनी घेतली. तू जे आत्मलिंग दाखविलेस तेच शंकरांना मिळाले होते. जो या लिंगाची तीन वर्षे पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल. तो वरदाता होईल.हे लिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल. या लिंगाचे आणखीही मोठे माहात्म्य आहे. "नारदांनी वेळ काढण्यासाठी आणखी काही सांगावयास सुरुवात केली, तेव्हा रावण म्हणाला, "पुरे पुरे. मला लवकर लंकेत गेले पाहिजे." असे बोलून तो जाऊ लागला. तेव्हा नारद म्हणाले, " सूर्यास्त होण्याची वेळ झाली आहे.तू चार वेदांचे अध्ययन केले आहेस.ब्राह्मणाने सायं-संध्यावंदन केलेच पाहिजे. तू जर असाच गेलास तर संध्याकाळ होईल. संध्येची वेळ चुकवत कामा नये. कितीही असले तरी संध्यावंदनाचा नियम मोडता कामा नये.आता माझीही संध्येची वेळ झाली आहे. मी जातो" असे बोलून नारदमुनी निघून गेले. इकडे सुदर्शन चक्र सूर्याआड आल्यामुळे संध्याकाळ झाल्याचा आभास निर्माण झाला. रावण मोठ्या काळजीत पडला. आता काय करायचे ? संध्याकाळ तर झाली. आता संध्या न करताच पुढे गेलो तर व्रतभंग होणार. संध्या करावयास बसलो तर या आत्मलिंगाचे काय करायचे ? काही झाले तरी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे शंकरांनी बजावून सांगितले आहे. आता काय करावे? अशा काळजीत तो पडला होता. त्यावेळी त्याला एक बालब्रह्मचारी दिसला. तो फुले, समिधा गोळा करीत होता.रावणाने विचार केला, "बालब्रह्मचारी अगदी साधा-भोळा दिसतो आहे. हा काही झाले तरी आपला विश्वासघात करणार नाही. आपले संध्यावंदन होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्या हाती द्यावे." असा विचार करून रावणाने त्याबाळ ब्रह्मचारीरूपी गणेशाला हाक मारली. पण रावणाला पाहताच तो पळू लागला. रावणाने त्याला थांबवून प्रेमाने अरे विचारले," अरे बटू, घाबरू नकोस.तू कोण रे बाळा ? तुझे आई वडील कोण? तू कोठे राहतोस ? तू कोणत्या कुळातला ? मला सगळे काही सांग." रावणाने अशी विचारपूस सुरु केली असता ब्रह्मचारीरूपी गणेश म्हणाला, "अहो, माझी एवढी चौकशी कशासाठी करीत आहात? माझ्या पित्याने तुमच्याकडून काही कर्ज वगैरे घेतले आहे काय ? माझा पिता जटाधारी आहे. तो सर्वांगाला भस्म लावतो. त्याच्या गळ्यात रुद्राक्षमाळा असतात.तो वृषभावर बसून भिक्षा मागत फिरतो. त्यांचे नाव शंकर. माझी माता प्रत्यक्ष जगन्माता आहे. आता मला जाऊ दे, मला तुझी फार भीती वाटते." रावण म्हणाला, "अरे बाळा, तुझे वडील तर अगदी गरीब दिसतात,घरोघरी भिक्षा मागतात, मग ते तुला कुठले सुख देणार ? माझे लंका नगर रत्नखचित आहे. तू माझ्याबरोबर चल. माझ्या घरी देवपूजा कर. तुला हवे असेल ते मी देईन, " त्यावर बालब्रह्मचारी म्हणाला, "नको, नको. तुझ्या लंकेत राक्षस आहेत. मला ते मारून टाकतील. मला सोड मी आपला माझ्या घरी जातो. मला खूप भूक लागली आहे." रावण म्हणाला, "ठीक आहे. तू खुशाल आपल्या घरी जा, पण थोडा वेळ थांब. मी समुद्रतीरावर संध्या करून येतो, तोपर्यंत हे लिंग हातात धरून ठेव; पण काही झाले तरी जमिनीवर ठेवू नकोस." त्यावर बालब्रह्मचारी म्हणाला," अहो, मला हा त्रास का देत आहात ? मी लहान आहे, तुमचे लिंग जड असेल. मला कसे धरत येईल ?" रावणाने त्याला परोपरीने समजाविले व लिंग हातात धरून ठेवण्यास तयार केले. रावण त्या ब्रह्मचारीरूपी गणेशाच्या हाती लिंग देऊन समुद्राच्या काठावर संध्येला बसला. तेव्हा तो बाळ ब्रह्मचारी म्हणाला, "ठीक आहे. मी तुम्हाला तीन हाका मारीन. तेवढ्यात तुम्ही आला नाहीत तर मी हे लिंग जमिनीवर ठेवीन." रावणाने ते मान्य केले. तो बालब्रह्मचारी म्हणजे गणेश हातात आत्मलिंग घेऊन उभा राहीला. रावण संध्येला बसला. सर्व देव विमानांत बसून गणेशाकडे कौतुकाने पाहत होते. रावण अर्ध्य देऊ लागला, तेव्हा गणेश रावणाला हाका मारीत म्हणाला, "लवकर या. माझ्या हाताला हे लिंग पेलवत नव्हती. माझा हात दुखावला आहे."रावणाने हाताने खूण करून त्यास थोडा वेळ थांबण्यास सांगितले. काही वेळानंतर गणेशाने पुन्हा दोन हाक मारल्या; पण रावण संध्या अर्धवट सोडून उठला नाही. आता अट पूर्ण झाली होती.मग गणेशाने भगवान विष्णूंचे स्मरण करून व सर्व देवांना साक्षी ठेवून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले. सर्व देवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी आकाशातून गणेशावर पृष्पवृष्टी केली. अर्ध्य देऊन रावण वेगाने परत आला. गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो अतिशय क्रुद्ध झाला. त्याने रागाच्या भारत ठोसे मारले. गणेश रडत रडत पण मनातल्या मनात हसत हसत म्हणाला," मला विनाकारण का मारता ? मी आता माझ्या वडिलांना तुमचे नाव सांगतो." असे बोलून तो रडत रडत निघून गेला. मग रावणाने सारी शक्ती एकटवून ते लिंग वर काढण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पीळ बसला. ते गो-कर्ण म्हणजे गाईच्या कानाच्या आकारासारखे झाले; पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. हताश, निराश झालेला रावण स्वतःचे कपाळ बडवीत लंकेला निघून गेला. भगवानसदाशिवांनी वास्तव्य केले म्हणून सर्व देवही तेथे येऊन राहू लागले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "या गोकर्ण महाबळेश्वराचे माहात्म्य स्कंद पुराणांत अधिक विस्ताराने सांगितले आहे. ही कथा ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. त्याने सिद्धांचे पाय धरले. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'गोकर्ण महिमा - महाबळेश्वरलिंग स्थापना' नावाचा अध्याय सहावा समाप्त. ===================================== अध्याय ७ वा गोकर्ण महिमा ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक सिद्धांना म्हणाला, "मला गोकर्णमाहात्म्य सविस्तर सांगा. पूर्वी तेथे कुणाला वर मिळाला ? अनेक तीर्थे असताना श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्णक्षेत्री का गेले ? या गोकर्णमहाबळेश्वराची पूर्वी कोणी आराधना केली ? त्याविषयी एखादी पुराणकथा असेल तर ते मला सांगा." नामधारकाच्या या प्रश्नांवर प्रसन्न होऊन सिद्धयोगी उत्तरले ," ज्यावर गुरुचे प्रेम असते त्यालाच तीर्थमाहात्म्य ऐकण्याची इच्छा होते. या विषयी मी तुला एक प्राचीन कथाच सांगतो. एकाग्रचित्ताने ऐक." पूर्वी इक्ष्वाकुवंशात मित्रसह नावाचा एक राजा होता. तो राजा सकलशास्त्रपारंगत, अत्यंत बलाढ्य, महाज्ञानी होता. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला होता. त्या अरण्यात वाघ-सिंहादी अनेक प्राणी होते. राजा तेथे शिकार करीत असता त्याला एक भयानक दैत्य दिसला. त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणाचा वर्षाव केला. त्या बाणांच्या आघातांनी तो दैत्य जमिनीवर कोसळला. त्याचा भाऊ जवळच होता. आपल्या भावाची अवस्था बघून तो रडू लागला. त्यावेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला, "तू जर माझा सख्खा भाऊ असशील तर मला मारणाऱ्या या राजाचा सूड घे." असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले. त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोकाकुल झाला. त्याने राजाचा सूड घेण्याचा निश्चय केला. त्याने मनुष्यरूप धारण करून मित्रसह राज्याच्या राजवाड्यात प्रवेश केला. तेथील अधिकाऱ्यांशी गोड गोड बोलून व त्यांना आपले पाककौशल्य दाखवून राजवाड्यात आचाऱ्याचे काम मिळवले व सूड घेण्यासाठी योग्य संधीची वाट पाहू लागला.त्याला लवकरच तशी संधी मिळाली. एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी वसिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनासाठी निमंत्रण होते. श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नवीनच आलेल्या त्या आचाऱ्याचे रूप घातलेल्या दैत्याकडे होते. त्याला ही मोठीच सुवर्णसंधी होती. त्याने श्राद्धाच्या अन्नात गुप्तपणे नरमांस मिसळले. वसिष्ठादी सर्व ऋषीमुनी भोजनाला बसले. पत्री वाढण्यात आली.त्या मायावी दैत्याने वसिष्ठांच्या पानात नरमांस मिसळलेले अन्न वाढले. वसिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते. वाढलेल्या अन्नात नरमांस आहे हे त्यांनी ओळखले; ते ताडकन पानावरून उठले व राजाला म्हणाले, "राजा, तुझा धिक्कार असो ! तू श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना कपटाने नरमांस खाऊ घालतोस ? या तुझ्या पापकर्माबद्दल 'तू बारा वर्षे ब्रह्मराक्षस होशील' असा मी तुला शाप देतो." ही शापवाणी ऐकताच मित्रसह राजा भयंकर संतापला. कारण त्याला यातले काहीच माहित नव्हते. आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या विचाराने त्यालाही राग आला. मग तोही प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेऊन वसिष्ठांना म्हणाला, "ऋषीवर्य, तुमच्या पानात नरमांस वाढले गेले याची मला माहिती नव्हती. हे कपटकारस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार. नीट चौकशी न करता मला शाप दिलात, या अन्यायाबद्दल मी आपणास प्रतिशाप देतो." असे म्हणून त्याने तळहातावर पाणी घेतले, तेव्हा त्याच्या पत्नीने-मदयंतीने त्याला रोखले. ती म्हणाली, "नाथ, तुम्ही हे काय करीत आहात ? स्वतःला आवरा. गुरूंना शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे पाप करून नका. आता जे घडेल ते घडेल.आता त्यांचे पाय धरून उ:शाप मागा. यातच तुमचे भले आहे." मदयंतीने असे सांगितले असता राजा भानावर आला. पण हातातील शापोदक कुठे टाकायचे ? ते जमिनीवर टाकले तर नापीक झाली असती, म्हणून त्याने ते शापोदक आपल्या पायांवर टाकले. त्यामुळे राजाचे नाव 'कल्माषपाद' असे झाले. मदयंती वसिष्ठांच्या पाया पडून म्हणाली, "ऋषीवर्य, माझ्या पतीवर दया करा.त्यांना उ:शाप द्या." यामुळे शांत झालेले वसिष्ठ राजाला म्हणाले, "राजा, हा शाप तू बारा वर्षे भोगशील. त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील." असा उ:शाप देऊन वसिष्ठ निघून गेले. वसिष्ठांच्या शापाने मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात फिरू लागला. तो पशुपक्ष्यांची, मनुष्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ लागला.त्याची भूक कधीच संपत नसे.एके दिवशी भुकेने कासावीस झालेला तो वनात भटकत असता त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्याने त्या दोघांपैकी ब्राह्मणाला पकडले. त्याला आता राक्षस ठार मारून खाणार हे पाहून त्याची पत्नी शोक करीत त्या ब्रह्मराक्षसाला विनवणी करीत म्हणाली, "कृपा करून माझ्या पतीला सोड. त्याला मारून मला विधवा करू नकोस. अरे, तू राक्षस नाहीस. शापित आहेस. अरे, तू अयोध्येचा राजा आहेस. माझ्या पतीला जीवनदान दे." असे तिने अनेकवेळा विनविले.पण त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला मारून खाऊन टाकले. राक्षसाचे ते कृत्य बघून ती ब्राह्मण स्त्री भयंकर संतापली. ती सती गेली. जाताना तिने ब्रह्मराक्षसाला शाप दिला, "दुरात्म्या, तू माझ्या पतीला ठार मारून मला अनाथ केलेस. या अपराधाबद्दल मी तुला शाप देते. तू शापमुक्त होऊन जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल." होता होता बारा वर्षे संपली. वसिष्ठांच्या शापातून मुक्त झालेल्या राजाला आपले मूळ स्वरूप प्राप्त झाले. तो आपल्या घरी गेला. सर्वांना आनंद झाला. परंतु त्या ब्राह्मणपत्नीने दिलेला शाप आठवून राजा अगदी बैचेन झाला. तो मोठ्या काळजीत पडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. मदयंतीने त्याला अस्वस्थ होण्याचे कारण विचारले, तेव्हा राजाने सगळी हकीगत तिला सांगितली. ती ऐकून राणीला मोठाच धक्का बसला. आता आपल्याला पतिसुख मिळणार नाही, आपला वंश वाढणार नाही, अशा विचारांनी ती अतिशय दुःखी झाली. राजाने व राणीने आपल्या अनुभवी पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा, दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या, यज्ञयाग केले, दानधर्म केला, अन्नदान केले, पण पापक्षालन होईना, ब्रह्महत्या राजाची पाठ सोडीना. त्यामुळे राजा अधिकाधिक बैचेन व अस्वस्थ होऊ लागला. अखेर राजा तीर्थयात्रा करीत करीत मिथिला नगरीत गेला. तेथे त्याला गौतमऋषी भेटले. राजाने त्यांच्या पाया पडून स्वतःचा परिचय सांगितला व ब्रह्महत्येच्या पातकाची सगळी माहिती सांगितली. मग तो गौतमांना म्हणाला, "मुनीवर्य, हे सगळे असे आहे. आता मला मनःशांती मिळवून द्या. आज माझ्या भाग्याने आपले दर्शन घडले. तुमच्या कृपेने मी शापमुक्त होऊन सुखी होईन असा मला विश्वास वाटतो. माझ्यावर कृपा करा. या ब्रह्महत्येच्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग मला दाखवा. राजाने अशी विनंती केली असती गौतमऋषी त्याला समजावीत म्हणाले, "राजा, घाबरू नकोस. कसलीही चिंता करू नकोस. भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात. मृत्युंजय शंकर तुलाही तारतील. गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. ते महापातकांचा नाश करते. तेथे कसलेही पाप शिल्लक राहत नाही. गोकर्णक्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश करतात. तेथे भगवान महादेव महाबळ नावाने राहतात. सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत त्याप्रमाणे गोकर्णक्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापक्षय होत नाही. हजारो ब्रह्महत्या केलेला मनुष्यही गोकर्णक्षेत्री जाताच पापमुक्त होतो. या क्षेत्रात जपतपादी केल्याने लक्षपटीत फळ मिळते. या क्षेत्राचे माहात्म्य इतके थोर आहे की, कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूने येथे तप केले आहे. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळविले त्याची श्रीगणेशाने या क्षेत्री स्थापना केली आहे. सनकादी महात्मे व साध्यादी मुनीगण तेथे बसून भगवान शिवाची आराधना करतात. समस्त पातकांचा नाश करणारे महात्मेसुद्धा येथे सदाशिवाची उपासना करतात. या ब्रह्माण्डात गोकर्णासम दुसरे क्षेत्र नाही. राजा, या तीर्थात सर्व देवदेवतांचे स्थान आहे. भगवान विष्णू, ब्रह्मदेव, कार्तिकेय व गणेश यांचे वास्तव्य आहे. या गोकर्णक्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत. आता तेथील पाषाणलिंगाची खूण सांगतो. सत्ययुगात हे शिवलिंग श्वेत पाषाणाचे असते. त्रेतायुगात तांबूस, द्वापारयुगात ते पीतवर्ण आणि कलियुगात कृष्णवर्णाचे असते, गोकर्ण महाबळेश्वराचा अधोभाग खूप गोल आहे. तो सप्तपाताळापर्यंत गेलेला आहे. परमपवित्र असे हे गोकर्णक्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. ते ब्रह्महत्यादी सर्व पापांचे भस्म करते. तेथे शुभ दिवशी अर्चना करणारे वरती रुद्ररूप होतात. जो कोणी गोकर्णक्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो तो ब्रह्मपदाला जातो. रविवारी, सोमवारी व बुधवारी जेव्हा अमवास्या येते तेव्हा तेथे केलेले समुद्रस्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान, होमहवन अनंत फळ देणारे होते. शिवरात्रीला शिवलिंग व बिल्वपत्र यांचा सुयोग दुर्लभ आहे. अशा रीतीने गोकर्णक्षेत्र हे श्रेष्ठ माहात्म्य असलेले अत्यंत दुर्लभ असे शिवतीर्थ आहे.अशा या क्षेत्री शिवरात्री उपवास, जागरण, भगवान सदशिवाजवळ निवास या सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा सोपानच होय. अशाप्रकारे गौतऋषींनी मित्रसह राजाला गोकर्णतीर्थक्षेत्राचे माहात्म्य सांगितले असता त्याने विचारले, "ऋषीवर्य, आपण हे जे गोकर्णमाहात्म्य मला सांगितले, त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता का? किंवा आपण प्रत्यक्ष काही पहिले असेल तर, त्याविषयी एखादी कथा असेल तर कृपा करून मला सांगा." राजाने असे विचारले असता गौतमऋषी म्हणाले, "राजा, ऐक. या गोकर्णक्षेत्री शिवरात्रीला महोत्सव असतो.चारी वर्णातील अनेक लोक येथे येतात व भगवान महाबळेश्वर शिवदर्शनाने कृतकृत्य होतात. एकदा शिवरात्रीच्या दिवशी मीसुद्धा गोकर्णक्षेत्री गेलो होतो. दुपारची वेळ होती. आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो. त्यावेळी पूर्वजन्मी अनेक पापे केलेली आणि म्हणून अनेक व्याधींनी जर्जर झालेली एक मरणासन्न अशी चांडाळ स्त्री आम्ही पहिली. ती वृद्ध, अंध व महारोगाने ग्रासलेली होती.तिच्या सर्वांगाला क्षते पडली होती. त्यांत कृमी पडलेले होते. जखमांतून रक्त व पू वाहत होता. सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते. त्यातच तिला क्षय झाला होता. शरीरावर धड वस्त्र नव्हते.ती विधवा होती. तिने केशवपन केले होते. तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. तहानभुकेने ती कासावीस झालेली होती. तिला धड चालताही येत नव्हते.क्षणाक्षणाला जमिनीवर पडत होती. अशा अवस्थेत ती एका वृक्षाच्या सावलीत येउन पडली. थोड्याच वेळाने तिने प्राणत्याग केला. त्याचवेळी आम्हाला एक प्रसंग दिसला. अचानक शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून चार शिवदूत उतरले. ते अत्यंत तेजस्वी, बलवान होते. त्यांच्या हातात शस्त्रे होती. सर्वांगाला भस्म लावलेले होते. त्यांची शरीरकांती चंद्रासारखी होती. अशा त्या शिवदूतांना आम्ही विचारले," आपण येथे कशासाठी आला आहात?" ते म्हणाले, "आम्ही या चांडाळणीस नेण्यासाठी आलो आहोत." ते ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले.आम्ही त्यांना विचारले, "अहो, या महापापी चांडाळणीला शिवलोकाला कसे काय नेता ? कुत्र्याला कोणी सिंहासनावर बसवतात का ?" या चांडाळणीने पूर्वजन्मी अनेक पापकर्मे केली आहेत. हिने कधी कोणाला दया-माया दाखविली नाही. हिने आयुष्यात कधीही जपतप केलेले नाही. कधीही शिवस्मरण-पूजन केले नाही. अशा हिला शिवलोकाला कसे काय नेता ?" आम्ही असे विचारले असता शिवदूत म्हणाले, " गौतमा, या चांडाळणीची पूर्वकथा सांगतो, ती ऐक ! ही चांडाळीण पूर्वजन्मी ब्राह्मणकन्या होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती दिसावयास अत्यंत सुंदर होती, तिचे लग्नाचे वय झाले पण तिला योग्य असा पतीच मिळेना.त्यामुळे तिच्या आई-वडिलांना मोठी काळजी वाटू लागली.शेवटी ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. काही दिवस ठीक चालले; पण तिचा पती एकाएकी आजारी पडला आणि त्यातच त्याला मरण आले. अकाली विधवा झालेल्या सौदामिनीला तिच्या आई-वडिलांनी घरी परत आणले.ती दिसावयास सुंदर होती. तिने आता तारुण्यात प्रवेश केला होता.तिला वैधव्य आले होते, त्यामुळे तिची कामवासना कशी पूर्ण होणार ? ती तिला स्वस्थ बसू देईना. परपुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागले.ती लपून छापून जारकर्म करू लागली.मग व्हायचे तेच झाले.तिचा व्यभिचार लोकांना समजला. लोक तिच्याबद्दल उघड बोलू लागले. गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले. मग आई-वडिलांनीही तिचा त्याग केला.तिला घराबाहेर काढले. आता तिला सगळे रान मोकळे झाले. ती सगळी लाजलज्जा सोडून उघडपणे गावात व्यभिचार करू लागली.त्याच गावात एक तरुण श्रीमंत शुद्र होता. त्याच्याशी तिने विवाह केला. ती त्यच्या घरी राहू लागली. अशा रीतीने तिने आपल्या कुळाला काळिमा फासला. कामवासनेने स्त्रीचा अधःपात होतो. हीन माणसाची सेवा केल्याने ब्राह्मणाचा नाश होतो. ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो व विषयवासनेने संन्यासी अधोगतीला जातो असे म्हणतात ते अगदी खरे आहे. सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला. आता ती बेधडक मद्यमांस सेवन करू लागली. एकदा मद्यपान करून बेधुंद झालेल्या तिने बकरा समजून वासरूच कापले. त्या वासराचे मुंडके दुसऱ्या दिवसासाठी म्हणून शिंक्यात ठेवले. मग त्या वासराचे मांस काढून ते शिजवून खाऊ घातले. स्वतः ही खाल्ले. संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेली तिथे वासरू नव्हते. त्या ऐवजी बकरा होता. तिने घरात जाऊन पहिले तो शिंकाळ्यात वासराचे मुंडके दिसले. सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. ती कपाळ बडवून रडू लागली. मग तिने एक खड्डा खणून त्यात वासराचे मुंडके व हाडे, कातडी पुरून टाकली व 'वाघाने वासरू पळवून नेले' असे सगळ्यांना सांगत रडण्याचे नाटक करू लागली. तिने आपल्या पतीलाही हीच थाप मारली. काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात टाकले व तिचे अतोनात हाल केले. नंतर ती चांडाळ जातीत जन्मास आली. ती जन्मापासून अंध होती. दुःखी झालेल्या तिच्या आई-वडिलांनी तिचा काही दिवस कसा-बसा सांभाळ केला. तिला शिळे-ऊष्टे अन्न खाऊ घालीत.काही दिवसांनी तिला महारोग झाला. आई-वडिलांचा आधार तुटला. नातेवाईकांनी तिला पार झिडकारले. आता ती भिक मागत फिरू लागली. अन्न नाही, वस्त्र नाही अशा स्थितीत तिचे आयुष्य गेले. ती म्हातारी झाली. तिला अनेक रोग जडले. अनेक दुःखे भोगत असलेल्या तिला आता मरण हवे होते, पण ते येत नव्हते. पुढे माघ महिना आला. माघ महिन्यात शिवरात्रीला गोकर्णक्षेत्री मोठी यात्रा असते. त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्री-पुरुष शिवनामाचा घोष करीत जात होते. लोक नाचत होते. गात होते. शिवनामाची गर्जना करीत जात होते. ती चांडाळीणही इतर भिकाऱ्यांसोबत रडत, ओरडत जात होती. दिसेल त्याला भीक मागत होती. तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता.अंगावर वस्त्र नव्हते. सर्वांगाला महारोग झाला होता. सगळे शरीर दुर्गंधीने भरलेले होते. सर्वांच्या पुढे हात करून 'धर्म करा, धर्म करा' असे दीनपणे म्हणत होती; पण कुणालाही तिची दया येत नव्हती. जन्मजन्मांतरी तिने एकही पुण्यकृत्य केले नव्हते. त्यामुळे जिवंतपणी अनंत यमयातना भोगाव्या लागत होत्या. ती चांडाळीण गोकर्णक्षेत्री गेली. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या चांडाळीणला कोणीही काहीही देत नव्हते, त्यामुळे तिला कडकडीत उपवास झाला. एका भाविकाने थट्टेने तिच्या हातात भिक्षा म्हणून एक बिल्वपत्र टाकले. ती खाण्याची वस्तू नव्हे हे लक्षात येताच तिने ते बिल्वपत्र रागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडाले व नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले. कडकडीत उपवास, रात्रभर जागरण, शिवनाम-घोषाचे श्रवण व अजाणतेपणे एका बिल्वपत्राने झालेले शिवपूजन एवढ्याने त्या चांडाळीणीची शतजन्मांची पातके जाळून भस्म झाली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठविले आहे." इतके कथन करून शिवदूतांनी त्या चांडाळणीच्या मृत शरीरावर अमृतसिंचन केले. त्यामुळे तिला दिव्यदेह प्राप्त झाला. मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकांस घेऊन गेले. त्या चांडाळीणीची कथा सांगून गौतमऋषी मित्रसह राजाला म्हणाले, "राजा, तूसुद्धा गोकर्णक्षेत्री जाऊन व भगवान महाबळेश्वर शिवाचे दर्शन घेऊन कृतकृत्य हो. तेथे पर्वकाळी स्नान करून शिवाची पूजा कर. शिवरात्रीला उपवास करून बिल्वपत्रांनी भगवान शिवाची पूजा कर. असे केले असता तू सर्व पापांतून मुक्त होशील व शिवलोकी जाशील." गौतमांनी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला. तो गोकर्णक्षेत्री गेला. तेथे भक्तिभावाने शिवपूजन करून ब्रह्महत्या व सतीचा शाप यातून मुक्त झाला. इतके सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, असे हे गोकर्णक्षेत्र पुण्यवान स्थान आहे, म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ तेथे राहिले. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'गोकर्ण महिमा'नावाचा अध्याय सातवा समाप्त. ।।श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ।।

Search

Search here.