श्री गुरुचरित्र अध्याय १९ ते २८

ग्रंथ - पोथी  > श्री गुरुचरित्र मराठी कथासार Posted at 2019-02-17 14:56:01
श्री गुरुचरित्र पारायण - दिवस तिसरा अध्याय १९ ते २८ ।।श्री गणेशाय नमः ।। अध्याय १९ वा औदुंबर माहात्म्य - नावाड्याची त्रिस्थळी यात्रा-योगिनी कथा ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला, "अहो गुरु, तुमचा जयजयकार असो. तुम्ही संसारसागरतारक आहात. मी आजपर्यंत अज्ञानरुपी अंधारात झोपलो होतो; परंतु तुम्ही श्रीगुरुचरित्रकथामृत पाजून जागे केलेत. आता मला पुढील कथा सांगा." नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनींना आनंद झाला. ते म्हणाले, "कृष्णा-पंचगंगा संगमावरील अमरेश्वराच्या जवळ असलेल्या औदुंबर वृक्षाखाली श्रीगुरूनृसिंहसरस्वती वास्तव्य करीत होते." त्यावर नामधारकाने विचारले, "स्वामी, अनेक पवित्र वृक्ष असताना श्रीगुरु नृसिंहसरस्वती औदुंबर वृक्षाखालीच वास्तव्य का करीत होते ? औदुंबर वृक्षावर त्यांचे इतके प्रेम का होते ?" नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "पूर्वी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला व प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्यकश्यपूचे पोट आपल्या नखाग्रांनी फाडून त्याला ठार मारले, त्यावेळी त्या दैत्याच्या पोटातील भयंकर असे कालकूट विष त्यांच्या नखांना, बोटांना लागले, त्यामुळे त्यांच्या नखांची आग होऊ लागली. त्यावेळी नृसिंहाच्या नखांची आग शांत करण्यासाठी लक्ष्मीदेवी औदुंबराची फळे घेऊन आली. नृसिंहानी त्या फळात आपली नखे रोवली असता त्यांच्या नखांची आग नाहीशी झाली. त्यावेळी प्रसन्न झालेल्या लक्ष्मी आणि नृसिंह यांनी औदुंबराला वर दिला, "हे औदुंबर, तुला सदैव खूप फळे येतील.तू कल्पवृक्ष या नावाने ओळखला जाशील. जे लोक तुझी सेवा करतील त्यांच्या सर्व कामना पूर्ण होतील. तुझ्या केवळ दर्शनाने विषबाधा नाहीशी होईल. मनुष्य पापमुक्त होईल. तुझी सेवा करणाऱ्या निपुत्रिक स्त्रीला त्वरीत पुत्रप्राप्ती होईल. जे दरिद्री असतील, ते श्रीमंत होतील. जे लोक तुझ्या छायेत बसून जप-तप-अनुष्ठान करतील त्यांना अनंत पुण्याची प्राप्ती होईल. ते ज्ञानी होतील. त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. तुझ्या छायेतील पाण्यात जे स्नान करतील त्यांना गंगास्नानाचे पुण्य प्राप्त होईल. तुझी सेवा करणाऱ्याला कोणताही शारीरिक, मानसिक व्याधी होणार नाही. ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील. कलियुगात तू 'कल्पवृक्ष' म्हणून ओळखला जाशील. आम्ही लक्ष्मीसह तुझ्याजवळ कायमचे वास्तव्य करू." असा हा औदुंबर वृक्ष कलियुगात कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो. अत्यंत क्रुद्ध झालेले भगवान नृसिंह औदुंबरापाशी शांत झाले. औदुंबराचे हे माहात्म्य श्रीदत्तात्रेयस्वरूप श्रीनृसिंहसरस्वती यांना माहित होते, म्हणून त्यांना औदुंबर वृक्ष प्रिय होता. अमरेश्वराच्या जवळ चौसष्ट योगिनी वास्तव्य करीत होत्या. त्या योगिनी दररोज मध्यान्हकाळी श्रीगुरुंच्याकडे येत असत. तेथे त्यांची पूजा-अर्चा करून त्यांना आपल्या स्थानी नेत असत. तेथे त्यांची पूजा करून त्यांना उत्तम भोजन देत असत. त्यानंतर श्रीगुरू पुन्हा औदुंबरापाशी परत येत असत. एकदा एका ब्राह्मणाला शंका आली. "हे यती येथे अरण्यात राहतात. यांना भूक लागत नसेल का ? हे भिक्षेसाठी गावात फिरताना दिसत नाहीत. मग हे खातात काय ? यांना भोजन कोण देत असेल ?"त्याने नृसिंहसरस्वतींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यावेळी त्याला श्रीनृसिंहसरस्वतींचे रूप इतके भयंकर दिसले की तो भयभीत होऊन पळून गेला. जे श्रीगुरुंचा अंत पाहतात ते नरकात जातात, म्हणून श्रीगुरूंची कधीही परीक्षा पाहू नये; परंतु नदीवर नौका चालविणाऱ्या एका साध्या-भोळ्या नावाड्याचे भाग्य थोर ! त्याला असे दिसले की, मध्यान्हकाळी नदीतून चौसष्ट योगिनी आल्या. त्यांनी श्रीगुरुंची पूजा केली. मग त्या श्रीगुरुंना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्याचक्षणी नदी दुभंगली. सर्वजणी श्रीगुरुंसह आत गेल्या व काही वेळाने श्रीगुरुंना घेऊन बाहेर आल्या. मग श्रीगुरू एकटेच स्वस्थानी गेले. ते दृश्य पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले. दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच योगिनी आल्या व श्रीगुरुंना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या.त्याचक्षणी नदीप्रवाह दुभंगला. वाट निर्माण झाली. योगिनी श्रीगुरुंच्यासह आत शिरल्या. त्याचक्षणी तो नावाडीही त्यांच्या मागोमाग आत शिरला. दुभंगलेला नदीप्रवाह पूर्ववत झाला. आत गेलेल्या त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटले. तेथे त्याला इंद्राच्या अमरावतीसमान वैभव संपन्न नगर दिसले. त्या नगरात रत्नखचित गोपुरे होती. श्रीगुरू तेथे जाताच त्या नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले. त्यांनी श्रीगुरुंना एका मंदिरात नेउन उच्चासनावर बसविले व त्यांची यथासांग पूजा केली. पूजा झाल्यानंतर त्यांना उत्तमोत्तम भोजन दिले. भोजन झाल्यावर श्रीगुरू बाहेर आले. त्याचवेळी श्रीगुरुंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्या नावाड्याला विचारले, "तू येथे कशासाठी आलास ? " तेव्हा तो नावाडी हात जोडून म्हणाला, "स्वामी, मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात. जे संसारमायेत अडकले आहेंत त्यांना तुमचे स्वरूप समजत नाही. या संसारसागरात बुडणाऱ्या लोकांचा उद्धार करणारे तुम्ही साक्षात त्रिमुर्ती श्रीदत्तात्रेय आहात. ज्यांना तुमचे दर्शन घडते त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. त्यांचे इह-पर कल्याण होते." त्या नावाड्याचे असे स्तवन केले असता श्रीगुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, "तुझे दैन्य-दारिद्र्य गेले. तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती ती पूर्ण होईल; परंतु येथे जे काही पाहिलेस ते कुणालाही सांगू नकोस. जर वाच्यता केलीस तर तुझे मोठे नुकसान होईल." असे सांगून ते नावाड्यासह औदुंबरापाशी आले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन तो नावाडी आपल्या शेतात गेला. तेथे त्याला गुप्तधन सापडले. त्या धनामुळे त्याचे दुःख-दारिद्र्य नाहीसे झाले. त्याची बायकामुले सुखी झाली. त्याला श्रीगुरुंच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्तीही झाली. त्या दिवसापासून तो आपल्या कुटुंबासह श्रीगुरूंची मनोभावे सेवा करू लागला. असेच काही दिवस गेले. माघ महिन्यातील पौर्णिमा आली. त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे श्रीगुरूंची सेवा करीत होता. तो श्रीगुरूंना सहज म्हणाला, "स्वामी, माघ महिन्यात प्रयागस्नान अत्यंत पुण्यकारक समजले जाते. काशीचेही माहात्म्य फार मोठे आहे. असे मी ऐकतो, पण मी हलक्या जातीचा. मी तिकडे कसा जाणार ? मला कोण नेणार ?" त्याचे हे बोलणे ऐकून श्रीगुरुंना त्याची दया आली. ते म्हणाले, "चिंता करू नकोस. अरे, कृष्णा-पंचगंगा संगमस्थान काशीप्रयागासमान आहे. अमरेश्वराचे वास्तव्य आलेले हे स्थानाच प्रत्यक्ष काशीक्षेत्रच आहे. कोल्हापूरला दक्षिण गया असे म्हणतात. ज्यांना उत्तरेतील काशी, प्रयाग, गया ही त्रिस्थळी यात्रा करता येत नाही, त्यांनी या त्रिस्थळेची यात्रा करावी म्हणजे तेच पुण्य प्राप्त होते, पण तुला उत्तरेतील ती क्षेत्रे पहावयाची असतील, तर चल माझ्याबरोबर, मी तुला ती दाखवितो." श्रीगुरुनृसिंहसरस्वती व्याघ्रचर्मावर बसले होते त्यांनी त्या नावाड्याला आपल्या मागे बसण्यास सांगितले व म्हणाले, 'मला नीट धरून ठेव' तो नावाडी व्यवस्थित बसला असता श्रीगुरुंनी आपल्या दिव्य योगशक्तीने त्याला एका क्षणात प्रयागक्षेत्री नेले. तेथे विश्वनाथाचे दर्शन घेऊन पुढच्याच क्षणी गयेला स्नान व दर्शन करून क्षणार्धात मुळ मुक्कामी परत आले. त्या नावाड्याचे केवढे भाग्य ! श्रीगुरुंच्या कृपेने एका दिवसात त्याला त्रिस्थळी यात्रेचे पुण्य प्राप्त झाले. या घटनेने श्रीगुरूंची कीर्ती सर्वत्र पसरली. मग त्यांनी औदुंबरक्षेत्र सोडून अन्यत्र जाण्याचे ठरविले. योगिनींना हे समजताच त्यांना अतिशय वाईट वाटले. त्यांनी श्रीगुरुंना इथेच राहण्याचा आग्रह केला, तेव्हा दयाघन श्रीगुरू त्यांना समजावीत म्हणाले, "मी या औदुंबरक्षेत्रात सूक्ष्म रूपाने राहीन. स्थूल रूपाने मी अन्यत्र जाणार आहे. मी औदुंबरात अन्नपूर्णेला ठेवून जातो. तुम्ही येथेच राहा. हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात होईल. जे लोक येथे येऊन औदुंबराची, आमच्या पादुकांची व तुमची पूजा करतील. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.येथे अन्नपूर्णा आहे, तिची नित्य पूजा केली असतां चारी पुरुषार्थ पूर्ण होतील. येथे पापविनाशी तीर्थ, काम्यतीर्थ व सिद्ध वरदतीर्थ आहे, त्या तीर्थात सात वेळा स्नान केले असता ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील. साठ वर्षाच्या वांझ स्त्रीलासुद्धा शतायुषी पुत्रप्राप्ती होईल. चंद्र-सूर्य ग्रहणाच्या दिवशी, मकर संक्रातीला, व्यतीपादादी पर्वणी असताना येथे स्नान केले असता गंगेच्या तीरावर ब्राह्मणाला एक हजार गाई दान केल्याचे पुण्य लाभेल. येथे भक्तिभावाने एक सत्पात्री ब्राह्मणाला भोजन दिल्यास कोटी ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्य प्राप्त होईल. येथील औदुंबर वृक्षाखाली पवित्र मनाने जप केल्यास त्याचे कोटीपट पुण्य लाभेल. येथे एकादश रुद्रजप केला असता अतिरुद्र केल्याचे फळ प्राप्त होईल. एक लक्ष प्रदक्षिणा घातल्यास कुष्ठरोग नाहीसा होऊन देवासमान शरीरकांती प्राप्त होईल." अशारीतीने चौसष्ट योगीनींना औदुंबरक्षेत्राचे माहात्म्य सांगून श्रीगुरू भीमातीरी वसलेल्या गाणगापुरांस गेले. सिद्धमुनी नामधारकास म्हणाले, "गुरुमाहात्म्य हे असे आहे." सरस्वती गंगाधर म्हणतात, कामधेनूसमान असलेले हे श्रीगुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करील त्याला चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल. त्याच्या घरी लक्ष्मीचे अखंड वास्तव्य राहील. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'औदुंबर माहात्म्य - नावाड्याची त्रिस्थळी यात्रा-योगिनी कथा 'नावाचा अध्याय एकोणिसावा समाप्त. =========================== अध्याय २० वा ब्राह्मण स्त्रीची पिशाच्चबाधा दूर केली ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारकाने सिद्धमुनींना विचारले, "महाराज, श्रीगुरू नृसिंह-सरस्वती योगिनींना आशीर्वाद देऊन गाणगापुरास गेले तरी ते गुप्तरूपाने औदुंबरक्षेत्री राहिले. असे तुम्ही सांगितले. त्याचा प्रत्यक्ष अनुभव कधी कोणाला आला का ? श्रीगुरू गाणगापुरास गेल्यानंतर पुढे काय झाले ? ते सविस्तर सांगा. मला ते ऐकण्याची फार इच्छा आहे." नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनींना फार आनंद झाला ते म्हणाले, "नामधारका, औदुंबराचे माहात्म्य किती सांगावे ! आजपर्यंत अनेक चमत्कार झाले आहेत. ते सगळे सांगणे शक्य नाही; पण त्यातील एक मोठा अद्भुत चमत्कार सांगतो, तो लक्षपूर्वक ऐक. शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी शांत, सरळ स्वभावाची होती. कशास काही त्यांना कमी नव्हते. परंतु त्यांना एक मोठे दुःख होते. त्यांना झालेला मुलगा जगत नसे. एक पिशाच्च त्यांना झालेल्या मुलाला मारून टाकत असे. त्यांना पाच पुत्र झाले पण त्यातील कोणीही जगला नाही. त्यामुळे ती ब्राह्मण स्त्री अतिशय दुःखी होती. मुले जगावीत म्हणून त्या दोघांनी अनेक नवसायास, व्रते, उपवास केले, अनेक देवदेवतांची आराधना उपासना केली; पण कशाचा काही म्हणून उपयोग झाला नाही. त्यामुळे ती पती-पत्नी अतिशय निराश, उदास, दुःखी असत. आता यावर काय उपाय करावा ? प्रत्येक वेळी मुलगा जन्मास आला असता मरतो याचे कारण काय ? आणि यावर उपाय काय ? असे गंगाधराच्या पत्नीने त्याच गावातील एका ब्राह्मणाला विचारले असता त्या ब्राह्मणाने त्यावर बराच विचार केला. त्याने ज्योतिषाभ्यासानें सर्व काही ओळखले. मग तो तिला म्हणाला, "तुझे पूर्वजन्मातील कर्मच या दुर्भाग्याला कारणीभूत आहे. पूर्वजन्मी तू शौनक गोत्रातील एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस, त्याचे कर्ज तू फेडले नाहीस. त्याने तुझ्याकडे अनेक वेळा मागणी केली पण तू त्याच्या धनाचा अपहार केलास. त्याला फसविलेस. तो द्रव्यलोभी होता. शेवटी त्याने पैशासाठी प्राण सोडले. त्याच्या मृत्यूला तूच कारणीभूत झालीस. त्यामुळे तुला दुहेरी पातक लागले. त्या ब्राह्मणाच्या मृत्युनंतर त्याची उत्तरक्रियाही केलेली नाही. त्यामुळे तो पिशाच्च झाला आहे. तो तुझा गर्भपात करतो आणि मुलाचा जन्म झाला तर तो त्याला मारून टाकतो." यातून सुटण्याचा एकाच मार्ग आहे. त्या ब्राह्मणाची तू उत्तरक्रिया कर म्हणजे त्याला सद्गती प्राप्त होईल. श्राद्धकर्माच्या निमित्ताने त्याच्या शौनक गोत्रातील ब्राह्मणास शंभर रुपये दान कर . म्हणजे त्या ब्राह्मणाच्या द्रव्याचा अपहार केल्याचा दोष जाईल. अगोदर तू कृष्णातीरी जाऊन एक महिना उपवास व्रत कर . तेथे कृष्णा-पंचगंगा संगमावर अनेक तीर्थे आहेत. तेथे औदुंबर वृक्ष आहे. तेथे तू औदुंबराची आराधना कर. तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला सात वेळा पाणी घाल. श्रीगुरुंच्या चरणांवर अभिषेक करून यथासांग पूजा कर. असे एक महिनाभर कर. तेथे श्रीगुरू-नृसिंहसरस्वतींचे वास्तव्य आहे. मी सांगितले तसे केलेस की श्रीनृसिंहसरस्वतींच्या कृपेने तू पापमुक्त होशील. तुला शतायुषी पुत्र होतील. नंतर ब्राह्मणाला शंभर रुपये द्यावयाचे. ही सर्व कर्मे त्या ब्राह्मणाच्या प्रीत्यर्थ करावयाची आहेत. यामुळेच तुझे सर्व दोष जातील. तुझ्याजवळ धन नसेल तर तू चिंता करू नकोस. तू मनोभावे श्रीगुरूंची सेवा कर. ते कनवाळू आहेत. ते तुला पापमुक्त करतील." हे ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीचे समाधान झाले. मग ती औदुंबरक्षेत्री आली. तेथे तिने संगमात स्नान करून श्रीगुरुचरणांची पूजा केली. औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या. याप्रमाणे तीन दिवस सर्वकाही यथासांग केले. तिसऱ्या दिवशी ती झोपेत असताना तो आत्महत्या केलेला ब्राह्मण आला व तिला दरडावून म्हणाला, "तू माझे शंभर रुपये दे नाहीतर तुला ठार मरीन. इतकेच काय मी तुमचा वंश वाढू देणार नाही. तुझे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत. तुला पुत्र होणार नाही. झालाच तर तो जगणार नाही." असे म्हणून तो पिशाच्च ब्राह्मण तिला मारण्यासाठी धावला. भयभीत झालेली ती स्त्री औदुंबराआड लपली. तिथे तिला श्रीगुरू दिसले. ती त्यांच्यामागे लपून बसली. श्रीगुरुंनी तिला अभय दिले. मग त्यांनी त्या पिशाच्च ब्राह्मणाला दरडावून विचारले, "काय रे, तू या स्त्रीला कशासाठी मारतो आहेस ?" त्यावर पिशाच्च ब्राह्मण म्हणाला, "स्वामी, या स्त्रीनें गतजन्मी माझ्या धनाचा अपहार केला. त्या दुःखाने मी प्राणत्याग केला. स्वामी, आपण कनवाळू आहात, कृपाळू आहात. तुमचे सर्वांवर प्रेम आहे. तुम्ही या स्त्रीची बाजू घेऊन पक्षपात करू नये." त्यावर श्रीगुरू संतापून म्हणाले, "तू माझ्या भक्ताला त्रास दिलास तर मी तुला शिक्षा करीन. मी सांगतो तसे वाग. यातच तुझे कल्याण आहे. ती जे काही देईल ते मुकाट्याने स्वीकार. तू ताबडतोब चालू लाग.माझ्या भक्ताचे रक्षण कसे करायचे ते मी पाहीन. मी माझ्या भक्ताची वंशवृद्धी करीन.आता जर पुन्हा परत आलास तर मी तुला कडक शिक्षा करेन." श्रीगुरुंनी असे ठणकावून सांगितले असता वरमलेला तो पिशाच्च ब्राह्मण श्रीगुरुंना वंदन करून म्हणाला, "स्वामी, माझे भाग्य थोर म्हणून तुमचे दर्शन घडले. आता माझा उद्धार करा. तुम्हीं आज्ञा कराल त्याप्रमाणें मी वागेन." त्यावर श्रीगुरु म्हणाले, "या ब्राह्मण स्त्रीने तुझे उत्तरकार्य केल्यावर दहाव्या दिवशी तुला सद्गती प्राप्त होईल." त्या ब्राह्मण पिशाच्चाने ते मान्य केले. मग श्रीगुरु त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, "तुझ्याजवळ जे काही थोडे फार धन असेल ते त्या ब्राह्मणाच्या नावाने खर्च कर. अष्टतीर्थांत स्नान करून औदुंबराला जलाभिषेक कर. असे केलेस की तुझे ब्रह्महत्या पाप नाहीसे होईल. तुला दीर्घायुषी कन्या-पुत्र होतील." हे सगळे त्या स्त्रीने स्वप्नात पहिले. तिला एकाएकी जाग आली. तिने डोळे उघडून इकडे तिकडे पहिले, पण कोणीच दिसत नव्हते. स्वप्नात पाहिलेली गुरुमूर्ती तिच्या मनात ठसली होती. स्वप्नात श्रीगुरुंनी सांगितलेले सर्वकाही तिने केले. ती ब्रह्महत्या-पातकातून मुक्त झाली व त्या पिशाच्चालाही मुक्ती मिळाली. एके दिवशी श्रीगुरुंनी तिला स्वप्नात दर्शन दिले. दोन नारळ तिच्या ओटीत घालून तिला म्हणाले, "आता तू व्रताचे उद्यापन कर. तुला शतायुषी आणि ज्ञानी पुत्र होतील. तुमची वंशवृद्धी होईल. आता कसलीही चिंता करू नको." श्रीगुरुंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मण दाम्पत्याला अतिशय आनंद झाला. त्यांनी श्रीगुरुंच्या आज्ञेनुसार व्रताचे उद्यापन केले. ती ब्राह्मण स्त्री शापमुक्त झाली. काही दिवसांनी त्या स्त्रीला श्रीगुरुंच्या आशीर्वादाने दोन पुत्र झाले. मोठ्या पुत्राचे मौंजीबंधन केले व धाकट्या पुत्राचे तिसऱ्या वर्षी चूडाकर्म विधी करण्याचे निश्चित केले; परंतु चूडाकर्मविधीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री तो मुलगा अचानक आजारी पडला आणि मरण पावला. आई-वडिलांना अतिशय दुःख झाले. मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन ब्राह्मण स्त्री मोठ्यामोठ्यांदा रडू लागली. नात्यागोत्यातील लोक जमले. सर्वांनी परोपरीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. लोक म्हणाले, "जे विधिलिखित असते ते टळत नाही. देवांनाही मरण टळत नाही तेथे आपल्यासारख्या माणसांची काय कथा ? काळ हा मोठा बलवान आहे ! " लोकांनी तिला खूप समजविण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला ते पटत नव्हते. ती म्हणाली, "असे कसे होईल ? औदुंबरक्षेत्री वास्तव्य करणारे श्रीनृसिंहसरस्वती श्रीदत्तात्रेयाचे अवतार आहेत. 'तुला दीर्घायुषी पुत्र होतील' असा त्यांनी आशीर्वाद दिला आहे. तरीही असे कसे घडले ? श्रीगुरुंच्या वचनाला कमीपणा येत असेल तर विश्वास तरी कोणावर ठेवायचा ? आता मी काय करू ? मला मरण आले तर बरे होईल 'आता मी प्राणत्याग करीन' असे म्हणून ती श्रीगुरुंना दोष देऊ लागली ती म्हणाली - "स्वामी महाराज, तुमचे वचन खोटे कसे ठरले ? तुमचे वचन म्हणजे ब्रम्हवाक्य ! त्याला आज तडा गेला. तुम्ही ध्रुवाला, बिभीषणाला वर दिलात हे तरी कसे मानायचे ? तुम्ही माझी उपेक्षा केलीत. वाघाला घाबरलेली गाय एखाद्याच्या आश्रयाला जावी आणि घात करावा तसेच हे घडले आहे. रंजले गांजलेले अनेक मोठ्या आशेने औदुंबरक्षेत्री येतात. तुमची सेवा करतात. आता त्यांनी विश्वास कसा ठेवायचा ? आता तुमची उपासना कोण आणि कशासाठी करील ?" असे बोलून ती अतिशय शोक करू लागली . प्रेताला कवटाळून ती रात्रभर रडत होती. अंत्यविधीसाठी पुत्राचे प्रेत देत नव्हती. 'आता मलाही जाळा' असे म्हणू लागली. लोक नाईलाजाने घरी परत गेले. याचवेळी तेथे एक बालब्रह्मचारी आला. त्याने त्या स्त्रीला शांत करण्याचा प्रयत्न केला. इतकी कथा सांगून सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, तो बालब्रह्मचारी म्हणजे मनुष्यवेष धरण केलेले श्रीगुरूनृसिंहसरस्वतीच होते. त्यांनी त्या स्त्रीला शांत करण्यासाठी जो उपदेश केला मी तो तुला आता सांगतो." ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, "हे श्रीगुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण-पठण करणारा मनुष्य शतायुषी होईल. या ग्रंथाचे परमश्रद्धेने श्रवण करणाऱ्याला कोणतीही शारीरिक व्याधी होणार नाही. झाली असल्यास ती तत्काळ नाहीशी होईल हे माझे शब्द माना." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'ब्राह्मण स्त्रीची पिशाच बाधा दूर केली' नावाचा अध्याय विसावा समाप्त. ======================== अध्याय २१ वा मृत बालक सजीव केला ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, त्या ब्रह्मचाऱ्याने त्या मेलेल्या मुलाच्या आईची विचारपूस केली व तिचे सांत्वन करीत म्हणाले, "हे बाई, तू विनाकारण शोक का करीत आहेस ? मला सांग, या जगात कोणी चिरंजीव झाला का ? जो जन्मास आला त्याला मृत्यू अटळ आहे. हा संसार म्हणजे पाण्यावरील बुडबुडा आहे. हा देह पृथ्वी-आप-तेज-वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. ही पंचमहाभूते विलग झाली की या देहाचा नाश होतो. त्या पंचमहाभूतांचे गुण मायापाशांनी माणसाच्या ठिकाणी भ्रम निर्माण करतात. त्यामुळे पुत्र-मित्र, पत्नी इत्यादीविषयी आसक्ती निर्माण करतात. ते गुण तीन आहेत. ते म्हणजे सत्व, रज व तमोगुण. सत्वगुणाने देव, रजोगुणामुळे मनुष्य व तमोगुणामुळे दैत्य निर्माण होतात. या गुणांनुसार कर्मे घडत असतात.कर्म चांगले, वाईट जसे असेल त्यानुसार त्याचे फळ मिळते. गुणांनुसार इंद्रियांच्या भोगाची वासना प्रबळ ठरते व सुख-दुःख भोग पुढें येतात. पूर्वकर्मानुसार प्राणी जन्मास येतात व देहप्रारब्ध भोगतात. कल्पवर्षे आयुष्य असणाऱ्या देवऋषींनाही अंत असतो. मग मनुष्याची काय कथा ? देहावस्था सतत बदलत असते. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य व शेवटी मृत्यू हें सर्व अटळ असते. मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो. हे जन्म-मरणाचे चक्र सतत चालू असते. जे ज्ञानी असतात ते जन्म-मृत्यूचे दुःख मानीत नाहीत. जन्मास येणाऱ्या प्रत्येकाची ललाटरेषा ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली असते. प्रत्येकाचे जे पूर्वार्जित असते त्यानुसार प्रत्येकाला तशी गत प्राप्त होते, म्हणून कोणी बालपणी मरतो तर कोणी म्हातारपणी. स्वप्नात दिसलेले धन जसे खरे मानता येत नाही, त्याप्रमाणे देहादिकांची खात्री करता येत नाही. आजपर्यंत तू कोणकोणत्या योनीत जन्म घेतला हे तुला सांगता येईल का ? तू मनुष्ययोनीत जन्म घेतला होतास असे मानले तर त्या प्रत्येक जन्मात तू कोणाची आई होतीस ? कोणाची पत्नी होतीस ? तुझे आई-वडील कोण होते ? हे तुला सांगता येईल का ? नाही ना ? मग आता या पुत्राचा वियोग झाला म्हणून विनाकारण शोक का करतेस ? हा देह पंचभौतिक आहे. हा देह चर्म-मांस-हाडे-मुत्र यांचा नश्वर गठ्ठा आहे. कसला पुत्र आणि कसला मृत्यू ? तू विनाकारण शोक करीत आहेस. आता हे मुलाचे प्रेत अग्निसंस्कारासाठी देऊन मोकळी हो." ब्रम्हचाऱ्याने असे परोपरीने समजाविले असता ती ब्राह्मण स्त्री म्हणाली, "स्वामी, तुम्ही जो मला उपदेश केलात तो मला पटतो; पण तरीही माझ्या मनाचे पूर्ण समाधान होत नाही. प्रारब्ध हेच जर अटळ असेल, तर परमेश्वराची भक्ती कशासाठी करावयाची ? परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने नाही झाले असे कधी घडते का ? मी भाग्यहीन, दुर्दैवी म्हणून श्रीगुरुंना शरण गेले. त्यांनी मला अभय दिले. मी त्यावर विश्वास ठेवला. ताप आला तर मनुष्य वैद्याकडे जाऊन औषध घेतो. श्रीनृसिंह-सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार आहेत. त्यांने मला वर दिला तो असत्य कसा ठरेल ? मी त्यांच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवला. असे असतानाही मला पुत्रवियोगाचे दुःख का भोगावे लागत आहे ? श्रीगुरुंचे वचन खोटे ठरले ! आता मी कोणावर विश्वास ठेवू ? त्यापेक्षा मारणे बरे ! आता मी प्राणत्याग करते ." त्या ब्राह्मण स्त्रीचा प्राणत्यागाचा अटळ निश्चय पाहून ब्रम्हचारी तिला म्हणाला, "आता तुझा निश्चय ठाम असेल तर मी तुला सांगतो तसे कर." तू श्रीगुरुंच्या वचनावर विश्वास ठेवलास, तुला पूर्णायुषी पुत्र झाला; पण त्याला मृत्यू आला. म्हणून तू श्रीगुरुंच्याकडे जा आणि जिथे तुला वर मिळाला त्या कृष्णा-पंचगंगा तीरावरील औदुंबराखाली मुलाचे प्रेत ठेव व तेथे प्राणत्याग कर." ब्रम्हचाऱ्याने असे सांगितले असता ते त्या ब्राह्मण स्त्रीला पटले. मग ती मुलाचे प्रेत पोटाशी बांधून औदुंबरा जवळ गेली. तिने पुत्राचे प्रेत गुरुपादुकांजवळ ठेवले.तिचा पतीही तिच्याबरोबर होता. ती स्त्री गुरुपादुकांवर डोके आपटून आक्रोश करू लागली. लोकांनी पुत्राचे प्रेत अंत्य संस्कारासाठी मागितले पण रात्र झाली तरी ती प्रेत देण्यास तयार होईना, "आता या निर्जन जागी रात्री थांबणे योग्य नाही. प्रेताला दुर्गंधी सुटली की ही बाई प्रेत आपल्याकडे देण्यास तयार होईल. आता आपण घरी जाऊ व उद्या सकाळी येऊ." असे म्हणून सर्व लोक आपापल्या घरी गेले. इकडे आक्रोश करणाऱ्या त्या स्त्रीला तिसऱ्या प्रहरी ग्लानी आली व त्याच स्थितीत तिला झोप लागली. झोपेत असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला एक जटाधारी योगी दिसले.त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते. व्याघ्रचर्म परिधान केले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षमाळा होत्या. हातात त्रिशूळ होते. असे ते योगी औदुंबराजवळ आले व त्या शोकाकुल स्त्रीला म्हणाले, "तू आम्हाला दोष देऊन विनाकारण शोक का बरे करीत आहेस ? तुझ्या मुलाला काय झाले आहे ? मी आताच त्याच्यावर उपाय करतो. " असे बोलून त्यांनी त्या मुलाच्या सर्वांगाला भस्म लावले. मुलाचे तोंड उघडून त्यात प्राणवायूचा संचार केला. 'आता तुझा पुत्र जिवंत होईल' असे आश्वासन दिले. हे स्वप्न पाहून तिला अचानक जाग आली. ध्यानी, मनी ते स्वप्नी असे मनाशी म्हणत ती आश्चर्यचकित झाली. मुलाच्या प्रेताकडे पाहून ती पुन्हा रडू लागली. आपले दैवच खोटे, तेथे देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे? श्रीगुरुंना तरी दोष का बरे द्यायचा ? असा विचार करीत तिने मुलाच्या प्रेताकडे पहिले. ते मूल हालचाल करीत आहे असे तिला दिसले. तिने प्रेताला हात लावला. तो ते गरम लागले. त्या प्रेतात जीव आला आणि तो मुलगा उठून आपल्या आईला बिलगला. त्या बाईला ही भुताटकी तर नाही ना? असे क्षणभर वाटले; पण तसें काही नव्हते. तो मुलगा खरोखरच जिवंत झाला होता. त्या बाईने अत्यानंदाने त्या मुलाला छातीशी घट्ट धरले. तिला एकाएकी प्रेमपान्हा फुटला. ती मुलाला स्तनपान देऊ लागली. तिने आपल्या पतीला जागे केले. आपला मुलगा जिवंत झालेला पाहून त्याला अतिशय आनंद झाला. ही सर्व श्रीनृसिंहसरस्वतींची अगाध लीला याची त्याला खात्री पटली. मग त्या पतीपत्नींनी स्नान करून औदुंबरास प्रदक्षिणा घातल्या. श्रीगुरुंचे अनेकपरींनी स्तवन करून क्षमायाचना केली. श्रीगुरुंच्या पादुकांची यथासांग पूजा करून भक्तिभावाने श्रीगुरुंचे स्तवन केले. त्याचवेळी गावातील ब्राह्मण मुलाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तेथे आलें. मुलगा जिवंत झालेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. सर्वांनी श्रीगुरूंचा जयजयकार केला. मग त्या ब्राह्मण पतीपत्नींनी तेथे ब्राह्मणभोजन घालून मोठा आनंदोत्सव केला. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकास म्हणाले, "नामधारका, औदुंबरक्षेत्र महिमा कसा आहे, याची एक कथा मी तुला सांगितली. अशा अनेक कथा आहेत. औदुंबरतळी श्रीगुरुंचे कायमचे वास्तव्य असते. तेथे जाऊन श्रीगुरूंची सेवा केली असता सर्व इच्छा पूर्ण होतात. याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. श्रीगुरूंची चरणपूजा केली असता वंध्य स्त्रीला पुत्रसंतान लाभते. दरिद्री माणसाला लक्ष्मीप्राप्ती होते. रोगी माणसाला आरोग्य लाभते. कधीही अपमृत्यू येत नाही. श्रीगुरूंची भावभक्तीने पूजा केली असता सर्व मनोकामना पूर्ण होतात. जो कुष्ठरोगी असेल त्याने श्रीगुरूचरणांची पूजा केली असता शरीर सुवर्ण होते याविषयी संदेह बाळगू नये. श्रीगुरूचरणपादुकांची पूजा केली असता हृदयविकार, गंडमाळा, अपस्मार इत्यादी दोष नाहीसे होतात. मंदमती, बहिरा, मुका, पंगू, रक्तपितीग्रस्त यांनी औदुंबराची सेवा केली असता सर्व दोष जातात. चतुर्विधपुरुषार्थाची प्राप्ती होते. श्रीगुरुंचे वास्तव्य असलेला औदुंबर म्हणजे या कलियुगातील कल्पवृक्षच होय. नामधारका, श्रीगुरुनृसिंह सरस्वतींचा महिमा किती सांगावा ? सरस्वती गंगाधर म्हणतात, श्रीगुरुचरित्र म्हणजे प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्याचे भक्तिपूर्वक श्रवण-पठण केले असता सव इच्छा पूर्ण होतात." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'मृत बालक सजीव केला' नावाचा अध्याय एकविसावा समाप्त. =========================== अध्याय २२ वा वांझ म्हैस दुभती झाली ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक शिष्य सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला, "अहो, योगेश्वर मुनिवर्या, तुमचा जयजयकार असो. तुम्ही खरोखर भवसागरतारक आहात. अज्ञानरुपी अंधार दूर करणारी तुम्ही दिव्य ज्योती आहात. तुमचे चरणस्पर्श होताच मला ज्ञानप्राप्ती झाली. माझे मन परमार्थाकडे वळले आहे. कामधेनूसमान श्रीगुरुचरित्र तुमच्या मुखातून मला ऐकावयास मिळत आहे. हे माझे केवढे भाग्य ! तुम्ही मला श्रीगुरुचरित्र सविस्तर सांगत आहात, पण माझे मन तृप्त होत नाही. आणखी ऐकण्याची मला तीव्र इच्छा आहे. श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरास आले असे तुम्ही सांगितले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करा." नामधारकाची ही इच्छा ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. ते नामधारकाचे कौतुक करीत म्हणाले, "नामधारका, तू खरोखर धन्य आहे. या जगात तू पूज्य होशील. तू मला जो प्रश्न विचारलास त्यामुळे माझ्या मनाला परमसंतोष झाला आहे. तुला श्रीगुरुचरित्र सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरास आल्यानंतर भीमा-अमरजा संगमावर गुप्तपणे राहू लागले. त्या संगमावर अश्वत्थवृक्ष आहे. ते स्थान वरदभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. तो संगम प्रयागसमान असून तेथे अष्टतीर्थे आहेत. त्या तीर्थाचे माहात्म्य अपार आहे. त्याविषयी मी तुला नंतर सांगेन. तीर्थमहिमा प्रकट व्हावा व भक्तजनांचा उद्धार व्हावा यासाठी श्रीगुरुंनी तेथे वास्तव्य केले. सूर्याची किरणे झाकून राहत नाहीत त्याप्रमाणे श्रीगुरू तेथे गुप्तपणे राहत होते, तरी यांची ख्याती सर्वत्र झालीच. श्रीगुरू माध्यान्हकाळी भिक्षेच्या निमित्ताने गाणगापुरात जात असत. ते गाव अग्रहार होते. त्या गावात वेदज्ञ ब्राह्मणांची शंभर घरे होती. राजाकडून त्यांना जमिनी मिळालेल्या होत्या. त्यामुळे सगळे ब्राह्मण तसे सुखासमाधानात होते. त्या गाणगापुरात एक दरिद्री ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव पतिव्रता असे होते. ती नावाप्रमाणेच मोठी पतिपारायण, साध्वी होती. तो ब्राह्मण चार घरी भिक्षा मागून आपले व आपल्या पत्नीचे पोट भरत असे. त्या ब्राह्मणाच्या घरी एक म्हैस होती, पण ती भाकड होती. ती दुध देत नसत. त्यामुळे तिला वेसण घातली होती. गावातील लोक दगडमाती आणण्यासाठी तिला भाड्याने नेत असत. त्यापासून त्या ब्राह्मणाला चार पैसे मिळत असत. श्रीगुरू भिक्षा मागण्यासाठी गाणगापुरात जात असत. एकेदिवशी माध्यान्हकाळी श्रीगुरू त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. तो ब्राह्मण भिक्षेसाठी गावात गेला होता. तो ब्राह्मण दरिद्री आहे, पोटासाठी भिक्षा मागतो हे श्रीगुरुंना माहित नसेल काय ? तो ब्राह्मण दरिद्री असला तरी सात्विकवृत्तीचा होता. सज्जन होता. आहे त्यात समाधान मानणारा होता. सज्जन होता. परमेश्वराला असलेच भक्त आवडतात. कृष्णशिष्टाईसाठी कौरवांकडे गेलेला श्रीकृष्ण दुर्योधनाकडे राहावयास गेला नाही, तो गेला होता विदुराकडे. परमेश्वर भक्तीचा भुकेलेला असतो. श्रीमंतीचा नाही. म्हणूनच श्रीगुरू त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी गेले. 'माते, भिक्षा वाढ' असे म्हणाले. श्रीगुरू दारात आलेले पाहून त्या ब्राह्मणाची स्त्री गडबडून गेली. अतिशय दुःखी झाली. कारण श्रीगुरुंना भिक्षा घालण्यासाठी तिच्या घरी काहीच नव्हते. ती श्रीगुरुंना वंदन करून म्हणाली, "माझे पती भिक्षा आणावयास गावात गेले आहेत. आपणास देण्यासाठी घरात काहीच नाही. आपण थोडावेळ थांबावे." त्या स्त्रीची अगतिकता पाहून श्रीगुरू तिला म्हणाले, "तुझ्या घरात काही नाही असे कसे म्हणतेस ? तुझ्या घरी म्हैस आहे. ती भरपूर दूध देणारी आहे, तेव्हा मला भिक्षा म्हणून दूध दिलेस तरी चालेल. 'काही नाही' असे म्हणू नकोस." तेव्हा ती म्हणाली, "महाराज, म्हैस असून नसल्यासारखीच. ती भाकड आहे. ती दूध देत नाही म्हणून आम्ही तिला रेडा म्हणून ठेवली आहे. ती कधी व्यालेलीच नाही, म्हणून तर तिला वेसण घालून माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो. मग आपल्याला दूध कुठले देऊ ?" तेव्हा श्रीगुरू जर रागानेच म्हणाले, "तू खोटे बोलतेस. तुझी म्हैस दूध देते. जा, जा, तिचे दूध काढून आण." श्रीगुरुंच्या शब्दावर विश्वास ठेवून ती भांडी घेऊन दूध काढण्यासाठी गोठ्यात गेली. तिचे आचळ पाण्याने स्वच्छ करून ती दूध काढू लागली, तो काय आश्चर्य ! त्या म्हशीने दोन भांडी भरून दूध दिले. श्रीगुरू सामान्य संन्यासी नाहीत, ते अवतारी महात्मा आहेत याची तिला खात्री पटली. तिने दूध गरम करून श्रीगुरुंना दिले. श्रीगुरु ते प्राशन करून संतुष्ट झाले. त्यांनी तिला आशीर्वाद दिला, "तुझ्या घरी अखंड लक्ष्मी राहील. तुझी मुले-नातवंडे सुखात सुखात, आनंदात राहतील. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही." असा आशीर्वाद देऊन श्रीगुरू संगमाकडे परत गेले. आज त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरात आनंद ओसंडून वाहत होता. काही वेळाने तो ब्राह्मण भिक्षा मागून घरी परत आला. त्याला सगळी हकीगत समजली. तो म्हणाला, "आपले दारिद्र्य गेले. श्रीदत्तगुरुंनीच आपल्यावर कृपा केली आहे. आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया." ती दोघे संगमावर गेली. त्यांनी श्रीगुरूनृसिंहसरस्वतींचे दर्शन घेऊन त्यांची यथासांग षोडशोपचारे पूजा केली. त्या दोघांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. श्रीगुरुंच्या कृपा-आशीर्वादाने ते कुटुंब ऐश्वर्यसंपन्न झाले. त्यांना धन, धान्य, पुत्रपौत्र सर्वकाही भरभरून मिळाले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरूदत्तात्रेयांची ज्याच्यावर कृपा होते त्याला दुःख, दैन्य, दारिद्र्य कधीही भोगावे लागत नाही. त्याला आठप्रकारची ऐश्वर्ये प्राप्त होतात." यासाठीच सरस्वती गंगाधर श्रीगुरुचरित्र विस्ताराने सांगतात. ते श्रवण करणाऱ्यास कधीही दैन्य, दारिद्र्य भोगावे लागणार नाही. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'वांझ म्हैस दुभती झाली' नावाचा अध्याय बाविसावा समाप्त. =============================== अध्याय २३ वा श्रीगुरूंचे गाणगापुरात आगमन -ब्रह्मराक्षसाचा उद्धार ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरुंच्या कृपाशीर्वादाने त्या ब्राह्मणाच्या घरातील वांझ म्हैस दुभती झाली आणि त्या दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कायमचे गेले, ही वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. दुसऱ्या दिवशी त्या गावातील काही लोक त्या ब्राह्मणाकडे आले व नेहमीप्रमाणे माती वाहून नेण्यासाठी त्याची वांझ म्हैस भाड्याने मागू लागले, तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, "माझी म्हैस दुभती आहे. दोन दोन घागरी दूध देते. त्यामुळे ती म्हैस मी माती वाहण्यासाठी आतां देणार नाही." ब्राह्मणाने असे सांगितले असता ते लोक आश्चर्याने अवाक झाले. ब्राह्मणाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसेना, ते म्हणाले, "कालपर्यंत वांझ असलेली म्हैस आज अचानक दुभती कशी झाली ? तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या लोकांना गोठ्यात नेऊन त्यांच्या देखत त्या म्हशीचे दोन घागरी दूध काढून सर्वांना दाखविले. त्यामुळे लोकांची खात्री पटली. ते आले तसे परत गेले. ही बातमी गावभर झाली, ही बातमी गावाच्या राजाला समजताच तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या ब्राह्मणाने सगळी हकीगत सांगताच त्या राजालाही श्रीगुरू नृसिंह-सरस्वतींच्या भेटीची ओढ लागली. मग तो आपल्या परिवारासह समारंभपूर्वक संगमावर श्रीगुरूंच्या दर्शनाला गेला. श्रीगुरुंच्या चरणांना मोठ्या भक्तिभावाने वंदन करून तो म्हणाला, "स्वामी, आज आपल्या दर्शनाने मी खरोखर धन्य झालो. आपण साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात. आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसांना आपले माहात्म्य कसे कळणार ? आपणच या जगाचे उद्धारकर्ते आहात. भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण या पृथ्वीवर अवतार घेतला आहे. आपण मनुष्यवेषधारी परमेश्वर आहात. मी अज्ञानी नरजीव आहे. आपण माझा उद्धार करा." त्या राजाने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरू प्रसन्न झाले. ते त्याला म्हणाले, "आम्ही अरण्यवासी संन्यासी. आमच्याकडे तुझे काय काम आहे ? तू आपल्या परिवारासह येथे कशासाठी आला आहेस ? तुला काय हवे आहे ? " त्यावर तो राजा हात जोडून म्हणाला, "आपण भक्तजनांचा उद्धार करणारे प्रत्यक्ष नारायण आहात. भक्तांच्या उद्धारासाठीच आपला अवतार आहे. आपण असे वनवासात का राहता ? आपण गावांत येऊन राहिलात तर सर्व लोकांवर मोठे उपकार होतील. गाणगापुर हे महास्थान आहे. आपण ते पावन करावे. आपल्यासाठी तेथे मठ बांधून देतो. तेथे राहून आम्हां सर्वांचा उद्धार करावा." राजाने अशी विनंती केली असता, भक्तजनांच्या उद्धारासाठी आंता प्रकट होण्याची वेळ आली आहे' असा विचार करून श्रीगुरुंनी गाणगापुरात येण्याचे मान्य केले. श्रीगुरुंनी मान्यता देताच राजाला आनंद झाला. त्याने श्रीगुरुंच्यासाठी पालखी सजविली. मग त्या वाद्यांच्या गजरात व जयघोषात श्रीगुरुंना गाणगापुरास नेले. गावाच्या वेशीवर लोकांनी त्यांचे मोठे स्वागत केले व त्यांना गावात नेले. त्या गावाच्या पश्चिमेला एक भला मोठा उंच पिंपळवृक्ष होता. त्या वृक्षाजवळ एक घर होते. पण ते पूर्ण ओसाड होते. त्या पिंपळावर एक अत्यंत क्रूर ब्रह्मराक्षस होता. तो माणसांना ठार मारून खात असे. सर्व लोकांना त्याची भीती वाटत असे, त्यामुळे त्या घरात कोणीही राहत नसे. श्रीगुरूंची पालखी त्या घराजवळ येताच तो ब्रह्मराक्षस पिंपळावरून खाली आला व श्रीगुरुंच्या पाया पडून हात जोडून म्हणाला, "स्वामी, माझा उद्धार करा ! मी घोर अंधारात बुडालो आहे. आज आपले दर्शन होताच माझी पूर्वजन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली आहेत. आपण प्राणिमात्रांवर दया करणारे आहात ,म्हणून माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे." श्रीगुरुंनी त्याची आर्तता ओळखली. त्यांनी मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्याचक्षणी त्याला मनुष्यरूप प्राप्त झाले. त्याने श्रीगुरुंच्या चरणांवर लोळण घेतली. श्रीगुरु त्याला म्हणाले, "तू ताबडतोब संगमावर जा व तेथे स्नान कर. तू मुक्त होशील. तुला पुनर्जन्म मिळणार नाही." श्रीगुरुंनी असे सांगताच तो ब्रह्मराक्षस भीमा-अमरजा संगमावर गेला. तेथे स्नान करताच तो मुक्त झाला. हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झालेले लोक म्हणाले, "अहो, आपल्या गाणगापुरात आलेले स्वामी साक्षात त्रैमूर्ती ब्रह्मा-विष्णू-महेश आहेत. आपले भाग्य थोर म्हणूनच त्यांचे चरणदर्शन लाभले." राजाने गाणगापुरात श्रीगुरुंसाठी सुंदर मठ बांधून दिला. श्रीगुरू त्या मठात राहू लागले. राजा दररोज मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजाअर्चा करीत असे. श्रीगुरु नित्यनेमाने रोज अनुष्ठानासाठी संगमावर जात असत व माध्यान्हकाळी मठात परत येत असत. कधी कधी तो राजा श्रीगुरुंना पालखीत बसवून राजेशाही थाटात संगमावर नेत असे व परत आणत असे. वास्तविक श्रीगुरुंना असल्या थाटामाटाची, ऐश्वर्याची काहीच आवश्यकता नव्हतील पण तो राजा मोठा श्रद्धाळू, भाविक होता. श्रीगुरूंचा भक्त होता. परमेश्वर भक्ताधीन असतो, म्हणूनच श्रीगुरू राजाला समाधान वाटावे त्याच्या इच्छेला मान देत असत. श्रीगुरू मठात आल्यापासून त्यांची कीर्ती सर्वत्र होऊ लागली. त्यावेळी 'कुमसी' नावाच्या गावात त्रिविक्रमभारती नावाचा एक वैदिक तपस्वी ब्राह्मण राहात होता. तो तीन वेद जाणणारा होता. तो श्रीगुरू नृसिंहाचा परमभक्त होता व तो नित्य नृसिंहाची मानसपूजा करीत असे. श्रीगुरू नृसिंहसरस्वतींची कीर्ती त्याच्या कानावर आली. तो स्वतःशीच म्हणाला, "हा गाणगापुरात आलेला संन्यासी मोठा दांभिक वाटतो. हा स्वतःला संन्यासी म्हणवितो आणि राजाच्या पालखीतून मिरवितो. याला काय म्हणावे ? खऱ्या संन्याशाला या डामडौलाची, पालखीची काय गरज ?" हा त्रिविक्रमभारती आपली निंदा करतो हे श्रीगुरुंनी अंतर्ज्ञानाने ओळखले. मग त्यांनी त्याला भेटण्याचे ठरविले. ही हकीगत सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, यानंतर एक अपूर्व कथा घडली ती मी तुला सविस्तर सांगतो. ती तू एकाग्रचित्ताने ऐक." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'श्रीगुरूंचे गाणगापुरात आगमन-ब्रह्मराक्षसाचा उद्धार' नावाचा अध्याय तेविसावा समाप्त. ============================== अध्याय २४ वा त्रिविक्रमभारतीचा उद्धार ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, "त्रिविक्रमभारती श्रीगुरू नृसिंहसरस्वतींची 'दांभिक संन्यासी' अशी निंदा करीत होता. हे अंतर्ज्ञानानी श्रीगुरुंना समजले .त्यानंतर काय झाले ते मला विस्तारपूर्वक सांगा." सिद्धमुनी म्हणाले, "नामधारका, ती मोठी अद्भुत कथा आहे. ती मी तुला सविस्तर सांगतो. कुमसी गावचा त्रिविक्रमभारती श्रीगुरुंची दांभिक, ढोंगी संन्यासी अशा शब्दांत सतत निंदा करीत असे. सर्व जगाचे मन ओळखणाऱ्या श्रीगुरुंना हे समजले. तेव्हा त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच्या मनातील गैरसमज दूर करावा असे श्रीगुरुंना ठरविले. ही गोष्ट त्यांनी राजाला सांगितली, तेव्हा राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजविली. हत्ती, घोडे, पायदळ शृंगारिले. श्रीगुरू पालखीत बसले. मग वाद्यांच्या गजरात श्रीगुरूंची स्वारी त्रिविक्रमभारतीला भेटण्यासाठी कुमसी गावाकडे निघाली. त्याचवेळी कुमसी गावात त्रिविक्रमभारती त्याचे उपास्य दैवत नृसिंहाची मानसपूजा करीत होता.परंतु त्या दिवशी नृसिंहाची मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे येईना. त्याने डोळे मिटून खूप प्रयत्न केला; पण नृसिंहाची मूर्ती काही प्रकट होईना. आज असे का होत आहे. हे त्याला समजेना. तो निराश झाला. 'माझी आजपर्यंतची सगळी साधना व्यर्थ गेली' अशा विचाराने तो अगदी निराश, उदास झाला. त्याने डोळे उघडून समोर पाहिले, तो नदीवरून श्रीगुरूंची पालखी येत असलेली दिसली. त्या पालखीत त्याला त्याचे उपास्य दैवत जे नृसिंह त्यांचीच मूर्ती दिसली. त्या पालखीबरोबर जे सैनिक होते ते सर्व श्रीगुरुंसारखेच दंडधारी संन्यासी दिसत होते. ते सगळे दृश्य पाहून त्रिविक्रमभारतीला मोठे आश्चर्य वाटले. त्याचा सगळा अहंकार गळून पडला. आपण पाहतो आहोत ते सत्य की भास ? त्याला काहीच समजेना. तो धावतच त्या पालखीजवळ गेला. पालखीत विराजमान असलेल्या नृसिंहाला, आपल्या उपास्य दैवतेला साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला "महाराज, आपण मला नृसिंहरुपात दर्शन दिलेत. मी खरोखर धन्य झालो.' आपण ब्रह्मा-विष्णू-महेशरूप आहात. अविद्यामायेने मी आपणास ओळखू शकलो नाही. आपले स्वरूप केवळ अचिंत्य आहे. चर्मचक्षुंनी ते ओळखता येणार नाही. आपणच खरोखर नृसिंह आहात. आता मला निजरुपात दर्शन देण्याची कृपा करा." त्रिविक्रमभारतीने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरू प्रसन्न झाले. त्यांनी आपली योगमाया आवरून निजरूप दाखविले. त्यावेळी श्रीगुरू त्याला म्हणाले, "तू आमची निंदा करतोस, म्हणूनच आम्ही तुला भेटावयाला आलो. तू मानसपूजेत नृसिंहमूर्तीची पूजा करतोस. त्या नृसिंहाचे तुला दर्शन झाले ना ? जे नृसिंह तेच आम्ही आहोत. आता आम्ही दांभिक आहोत का ? हे तूच ठरव." श्रीगुरू असे म्हणाले असता त्रिविक्रमभारतीच्या मनातील संशय नाहीसा झाला. श्रीनृसिंहसरस्वती व आपले उपास्यदैवत नृसिंह एकच आहेत. श्रीगुरू हे चराचर व्यापक परमात्मा-परमेश्वर आहेत याची त्याला खात्री पटली. मग तो श्रीगुरुंना शरण गेला व त्यांचे स्तवन करू लागला. तो म्हणाला, "स्वामी, मला क्षमा करा. अविद्येमुळे मी आपले स्वरूप ओळखले नाही. आपण परमात्मा-परमेश्वर आहात. आपण ज्याच्यावर कृपा कराल तो कळिकाळालाही जिंकेल. आपण भवसागरतारक त्रैमूर्ती अवतार आहात. आज आपले चरणदर्शन झाल्याने मी धन्य झालो. आपण भक्तवत्सल , कृपामूर्ती आहात. आता माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे. माझा स्वीकार करा. त्रिविक्रमभारतीने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरु त्यावर प्रसन्न झाले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, "मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सद्-गती प्राप्त होईल. तुला आता पुनर्जन्म मिळणार नाही." असा वर देऊन श्रीगुरू गाणगापुरास परत गेले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, श्रीगुरूमाहात्म्य हे असे आहे. त्रैमूर्ती अवतार असलेले श्रीगुरू आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठीच मनुष्यरूपाने राहिले होते. त्यांना जे मनुष्य म्हणतील ते सप्तजन्मपर्यंत नरकवास भोगतील. गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू, व गुरु हाच महेश्वर आहे. तो परब्रह्मस्वरूप आहे. असे वेद-पुराणेही सांगतात, म्हणून श्रीगुरू त्रैमूर्ती आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवावी व त्यांना शरण जावे. श्रीगुरुचरित्र कामधेनू आहे. या कलियुगातील ती अमृताची पाणपोई आहे. ज्ञानीजन ज्याचे सेवन करतात. सरस्वती गंगाधर निश्चयाने सांगतात, "हे श्रीगुरुचरित्र जे भक्तिभावाने श्रवण-पठण करतील त्यांना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील'त्रिविक्रमभारतीचा उद्धार' नावाचा अध्याय चोविसावा समाप्त. ================================= अध्याय २५ वा गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। सिद्धमुनींचा जयजयकार करीत नामधारक म्हणाला, "योगीराज, तुम्ही खरोखर संसारसागर तारक आहात. मला याची खात्री पटली आहे. तुम्ही मला परमार्थ सांगून माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. श्रीगुरू नृसिंहसरस्वती हे त्रैमूर्ती अवतार आहेत. जे लोक अज्ञानी असतात, त्यांना ते सामान्य मनुष्य वाटतात. पण ज्ञानी लोकांना 'प्रत्यक्ष' म्हणजे साक्षात परमेश्वर वाटतात. श्रीगुरूंनी त्रिविक्रमभारतीला आपले खरे परमेश्वरी रूप दाखविले व त्याचे अज्ञान दूर केले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करा." नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोगी म्हणाले, "वत्सा नामधारका, त्या श्रीगुरुंची लीला खरोखर अगम्य आहे. त्यांच्या सर्व लीला मी सांगू लागलो तर पुष्कळ वेळ लागेल. ही कथाही खूप मोठी होईल; पण थोडेफार तुला सांगतो, ऐक. 'विदुरा' नगरात एक यवन राजा होता. तो अत्यंत क्रूर व कमालीचा ब्राह्मणद्वेष्टा होता. तो नित्य पशुहत्या करीत असे व आपल्या सभेत ब्राह्मणांना बोलावून त्यांना वेद म्हणावयास सांगत असे. तो मोठ्यामोठ्या विद्वान, ज्ञानी ब्राह्मणांना आपल्याकडे बोलावून सांगत असे. 'तुम्ही माझ्या येथे सर्व वेद म्हणा, मी तुम्हाला भरपूर पैसे देईन. जो कोणी मला वेदार्थ सांगेल त्याची मी विशेष पूजा करीन." त्यांत जे मोठे ज्ञानी असत ते सांगत, "आम्ही मतिहीन म्हणजे अज्ञानी आहोत. आम्हाला वेदातले काहीही समजत नाही." असे सांगून ते तेथून काढता पाय घ्यायचे. परंतु जे मूर्ख, अज्ञानी असत ते पैशाच्या लोभाने त्या यवनाकडे जाऊन वेद्पठण करीत असत. त्यावेळी यज्ञकांडाचा अर्थ ऐकताना तो दुष्ट यवन राजा कुत्सितपणे हसून म्हणायचा, "तुम्ही ब्राह्मण यज्ञ करता तेव्हा पशुहत्या करता, ती तुम्हाला चालते, मग आम्ही पशुहत्या केल इतर काय बिघडते ?" असे बोलून तो ब्राह्मणांची यथेच्छ निंदा-नालस्ती करायचा व जो विद्वान असेल त्याला भरपूर धन देत असे. ही बातमी ऐकून ठिकठिकाणचे अनेक ब्राह्मण केवळ धनाच्या लोभाने त्या यवनाकडे येउन त्याला वेद म्हणून दाखवीत असत. या कलियुगात असे जे मतिहीन, मदोन्मत्त,द्रव्यलोभी असतील ते यमलोकाला जाण्याच्या योग्यतेचे असतील यात तीळमात्र शंका नाही. एकदा काय झाले, द्रव्यलोभी असे दोन ब्राह्मण त्या विदुरानगरात आले. ते त्या यवन राजाला भेटले व आपली कीर्ती आपणच सांगू लागले. ते म्हणाले, "आम्ही सर्व वेदांचे सांगोपांग अध्ययन केले आहे. सगळे वेद आम्हाला तोंडपाठ आहेत. वेदांविषयी आमच्याबरोबर वादविवाद करण्यांस चारी राष्ट्रांत कोणीही नाही. तुमच्या नगरात असे कोणी असतील तर त्यांना आमच्याशी वेदचर्चा करण्यासाठी बोलवावे." राजाने ते आव्हान स्वीकारले. त्याने आपल्या नगरातील विद्वान ब्राह्मणांना बोलावून घेतले. राजा त्यांना म्हणाला, "तुम्ही या दोन ब्राह्मणांशी वेदांविषयी चर्चा करा. तुमच्यापैकी जो जिंकेल त्याला मी भरपूर धन देईन." त्यावर ते विद्वान ब्राह्मण म्हणाले, "हे दोन्ही ब्राह्मण प्रकांडपंडित आहेत. या दोघांना जिंकू शकेल असा आमच्यात कोणीही नाही. हे आमच्यापेक्षा थोर आहेत." राजाने ते मान्य करून त्या दोन ब्राह्मणांना वस्त्रालंकार देऊन मोठा सन्मान केला. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. राजाने केलेल्या सन्मानाने त्या दोघांना अधिकच गर्व झाला. ते राजाला म्हणाले, "आमच्याशी वादविवाद करण्यास कोणीही मिळत नाही, मग आमचे मोठेपण सिद्ध कसे होणार ? आता आम्ही अन्यत्र जातो. आमच्याशी वादविवाद करण्यास कोणी भेटला तर तर त्याच्याशी चर्चा करू. कोणी मिळाला नाही तर जयपत्र घेऊन पुढे जाऊ." राजाने ते मान्य केले. मग राजाचे संमतिपत्र घेऊन ते दोघे ब्राह्मण गावोगाव फिरू लागले. त्यांच्याबरोबर वाद घालण्यास कोणीच तयार नसल्याने प्रत्येकाकडून जयपत्र घेऊन ते फिरत फिरत दक्षिणेकडे भीमातीरी असलेल्या कुमसी गावी आले. त्याच गावात महाज्ञानी त्रिविक्रमभारती पंडित राहत होता. त्याला तीन वेद येत होते व तो अनेक शास्त्रांत पारंगत होता. त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना गावातील लोकांकडून त्रिविक्रभारतीची माहिती समजली. मग ते त्रिविक्रमभारतीकडे गेले आणि त्याला म्हणाले, "तू स्वतःला मोठा 'त्रिवेदी' समजतोस, तर मग आमच्याशी चर्चा करण्यास तयार हो. नाहीतर जयपत्र लिहून दे." त्या ब्राह्मणांचे हे उन्मत्त बोलणे ऐकून त्रिविक्रमभारती म्हणाला, "अहो, तीन कसले, एकसुद्धा वेद मला येत नाही. मला वेदातले काहीही काळात नाही. जर मला वेदशास्त्र येत असते तर मी येथे अरण्यात कशाला राहिलो असतो ? मला जर वेद येत असते तर सर्व राजांनी मला वंदन केले असते. तुमच्याप्रमाणे सुखापभोग मला मिळाले असते.मला काहीच येत नाही म्हणून तर संन्यासवेष धारण करून मी वनात राहतो. मी एक सामान्य भिक्षुक आहे. तुमच्याशी बरोबरी मी कशी करणार ? "त्रिविक्रमभारतीचे हे बोलणे ऐकताच ते दोन ब्राह्मण भयंकर संतापले. ते म्हणाले, "आमच्याशी वादविवाद करण्यास या जगात कोणीही नाही. आम्ही सगळी राज्ये फिरत आलो पण आमच्याशी बरोबरी करू शकेल असा कोणीही नाही. आता आम्हाला जयपत्र लिहून दे, नाहीतर आमच्याशी वादविवाद कर." त्रिविक्रमभारतीने त्यांना अनेक प्रकारे समजाविले; पण ते काही ऐकण्यास तयारच होईनात. त्रिविक्रमभारतीने विचार केला, या ब्राह्मणांना भलताच गर्व झाला आहे. हे अनेकांचा अपमान करीत आहेत. आता यांना चांगलीच शिक्षा होईल." त्रिविक्रमभारती त्या ब्राह्मणांना म्हणाला, "आपण गाणगापुरास जाऊया. तेथे आमचे गुरु आहेत. त्यांच्या समक्ष तुम्हाला जयपत्र दिले जाईल." त्या दोघांनी मान्य केले. ते मेण्यात बसून गाणगापुराकडे निघाले. त्रिविक्रमभारतीसारख्या परमज्ञानी पुरुषाला पायी चालत येण्यास लावले. यामुळे ते अल्पायुषी झाले. गाणगापुरास आल्यावर त्रिविक्रमभारतीने श्रीगुरुंच्या पाया पडून त्यांना सर्व हकीगत सांगितली. श्रीगुरुंच्या सर्व काही लक्षात आले. मग ते मंदस्मित करीत त्या दोघा ब्राह्मणांना म्हणाले, "तुम्ही दोघे कशासाठी आला आहात ? आम्ही संन्यासी, आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मिळणार ? समजा, तुम्ही आमचा पराभव केला तर तुम्हाला कसलाही रस नाही. आम्ही बोलूनचालून संन्यासी. आम्हाला हार-जीत सारखीच. तुम्ही आम्हाला जिंकलेत तरी तुमचा काय फायदा ?" असे बोलून श्रीगुरुंनी त्यांना परावृत्त करण्याचा केला; पण पालथ्या घड्यावर पाणी ! विनाशकाले विपरीत बुद्धी हेच खरे !" ते ब्राह्मण म्हणाले, "जयपत्रे मिळविणे ही आमची प्रतिष्ठा आहे, तेव्हा आमच्याशी चर्चा करा नाहीतर दोघेही जयपत्रे लिहून द्या." मग श्रीगुरू त्यांना म्हणाले, "ब्राह्मणांनो ! इतका गर्व योग्य नाही.गर्व सर्व विनाशाचे मूळ आहे. या गर्वामुळेच बाणासुर, रावण, कौरव लयाला गेले. वेद अनंत आहेत. ब्रह्मादिकांनाही वेदांचा थांगपत्ता लागला नाही. वेद अनादि-अनंत आहेत. त्याविषयी आपण कसली चर्चा करणार ? तेव्हा गर्व सोडा. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता, मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहित आहे ?" श्रीगुरुंनी त्यांना परोपरीने समजविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ते ब्राह्मण अत्यंत अत्यंत गर्वाने म्हणाले, "आम्ही तीन वेदांचे सांगोपांग अध्ययन केले आहे." ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकास म्हणाले, "नामधारका, त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना श्रीगुरुंनी काय उत्तर दिले, ती मोठी अपूर्व कथा तुला सांगतो, ती एकाग्रचित्ताने ऐक." अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट' नावाचा अध्याय पंचविसावा समाप्त. =================================== अध्याय २६ वा गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। "वेद अनादी अनंत आहेत ब्रह्मदेवालाही त्यांचे पूर्ण ज्ञान नाही. म्हणून तुम्ही वृथा अभिमान बाळगू नका. गर्व करू नका." असे श्रीगुरुंनी त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 'आम्ही तीन वेद जाणतो' असे ते गर्वाने पुन्हा पुन्हा बोलत होते. तेव्हा त्यांचा गर्वपरिहार करण्यासाठी श्रीगुरू त्या ब्राह्मणांना म्हणाले, "नसत्या भ्रमात राहू नका. वेद अनंत आहेत. प्रत्यक्ष नारायणाचा अवतार असलेल्या व्यासांनी वेदांचे विभाजन केले; पण त्यांनाही वेदांचे पूर्ण ज्ञान नव्हते. त्या व्यासांचे पैल, वैशंपायन, जैमिनी व सुमंतु असे चार मुख्य शिष्य होते. "आम्ही सर्व वेदांचा अभ्यास करणार आहोत." असे ते म्हणाले असता 'हे केवळ अशक्य आहे ' कल्पपर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचेही अध्ययन पूर्ण होऊ शकणार नाही. एकदा भारद्वाज ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, "मला ब्रह्मचर्याश्रमात सर्व वेद शिकण्याची इच्छा आहे. मला तसा वर द्या." तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, "वेद अनंत आहेत. संपूर्ण वेद कसे शिकता येईल ? मलाही वेदांचा थांगपत्ता लागलेला नाही. वेद किती आहेत याची तुला कल्पना नाही, म्हणून तू असे बोलतो आहेस. आता मी तुला वेद किती आहेत तेच दाखवितो." असे सांगून त्यांनी भारद्वाजांना अतिउंच असे तीन पर्वत दाखविले व हे तीन पर्वत म्हणजेच तीन वेद आहेत." असे सांगितले. त्या पर्वतप्राय तीन वेदराशी पाहून घाबरलेले भारद्वाज म्हणाले, "मी इतके वेद कसे काय शिकणार ? केवळ अशक्य आहे ?" असे बोलून ते ब्रह्मदेवांना शरण गेले. मग ब्रह्मदेवांनी त्यांना अध्ययनासाठी तीन मुठी भरून वेद दिले. भारद्वाजांनी त्या तीन वेदातील काही मंत्र वेगळे काढून चौथा वेद तयार केला." असे सांगून व्यास आपल्या चौघा शिष्यांना म्हणाले, "मी आता तुम्हाला एकेक वेद देणार आहे. एकेका वेदाचाही अभ्यास करण्यास खूप प्रयास पडतात. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्यातील थोडेफार सांगेन." त्यावर ते शिष्य व्यासांना म्हणाले, "आम्हाला एकेक वेद त्याच्या आदि-अंतासह सांगा. त्यातील जे शक्य आहे ते आम्ही शिकू." असे बोलून त्या चार शिष्यांनी व्यासांच्या चरणांना वंदन केले. मग संतुष्ट झालेल्या व्यासांनी आपल्या चार शिष्यांना वेदसंहिता दिल्या. त्यांनी प्रथम 'पैल' नावाच्या शिष्याला जवळ बोलावून त्याला ऋग्वेद दिला. वैंशपायनाला 'यजुर्वेद' सांगितला. जैमिनीला 'सामवेद' दिला व सुमंतूला 'अथर्व' वेद संहिता दिली. अशाप्रकारे वेदव्यासांनी त्यांच्या पैलादी शिष्यांस चार वेदसंहिता दिल्या. त्याचप्रमाणे प्रत्येक वेदाचे ध्यान, स्वरूप, वर्ण, गोत्र, देवता, छंद, उपवेद व शाखा या सर्व गोष्टी सविस्तर समजावून सांगितल्या. व्यासांनी चार वेदांची केलेली ही सविस्तर चर्चा श्रीगुरुंच्या मुखातून ऐकून ते गर्विष्ठ ब्राह्मण अवाक झाले. मग श्रीगुरू म्हणाले, "पूर्वी या भरतखंडात अनेक पुण्यवान लोक होते. सर्वजण वर्णाश्रम-धर्माचे निष्ठापूर्वक पालन करीत असत; पण आता या कलियुगात ब्राह्मणांनी अगदी ताळतंत्र सोडला आहे. ते कर्मभ्रष्ट झाले आहेत. स्वधर्म, सदाचार यापासून दूर गेले आहेत. वेदबाह्य आचरण करू लागले आहेत. वेदाध्ययन मागे पडले आहे, त्यामुळे वेदांचे सामर्थ्य लोप पावले आहे. आजकाल ब्राह्मण म्लेच्छांपुढे वेदपठण करतात. यामुळे ब्राह्मणवर्गाचे सत्व नाहीसे झाले आहे. ते मंदबुद्धीचे झाले आहेत. पूर्वी ब्राह्मणवर्गाला फार महत्व होते. वेदसामर्थ्याने त्यांना देवत्व प्राप्त झाले होते, म्हणूनच त्यांना 'भूदेव' म्हटले जा असे. राजेमहाराजे ब्राह्मणांच्या चरणांची पूजा करीत असत. त्यानं कोणी सर्वस्वाची दक्षिणा देऊ केली तरी ते तिचा स्वीकार करीत नसत.वेदविद्येच्या सामर्थ्यामुळे ब्राह्मणांना ब्रह्मा-विष्णू-महेश वश होत असत. इंद्रादी देवांनाही ब्राह्मणांची भीती वाटत असे. विद्वान ब्राह्मणांचे वचन कामधेनुसमान होते. ते ब्राह्मण कल्पवृक्ष होते. त्यांच्या ठिकाणी एवढे सामर्थ्य होते की, मनात आले तर ते पर्वतांना तृणाकार करू शकत असत व तृणाला पर्वताकार करू शकत. स्वतः भगवान विष्णू ब्राह्मणांना आपले दैवत मानून त्यांची पूजा करीत असे. म्हणूनच भागवत पुराणात भगवान म्हणतात, "सर्व जग देवाच्या अधीन आहे, देव मंत्राच्या अधीन, मंत्र ब्राह्मणांच्या अधीन म्हणून ब्राह्मण हे माझे दैवत आहे." पूर्वी ब्राह्मणवर्गाला असे महत्व होते; पण आता ब्राह्मण वेदमार्ग सोडून भलत्याच मार्गाने जात आहेत. त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले. ते हीन जातीची सेवा करू लागले आहेत. पैसे घेऊन वेद शिकवितात.वेदविद्येची त्यांनी विक्री सुरु केली आहे. जे हीनजातीपुढे वेद म्हणतात त्या मूर्खाचे तोंडसुद्धा पाहू नये. ते मृत्युनंतर ब्रह्मराक्षसच होणार. हे ब्राह्मणांनो, अशा आहेत चार वेदांच्या शाखा. असे आहेत त्यांचे भेद. असा आहे वेदविस्तार ! वेद अनंत आहेत आणि तुम्ही म्हणता, आम्ही सर्व जाणतो ! हे सर्व तुम्हाला माहित होते का ? नाही ना ? मग स्वतःला चतुर्वेदी म्हणण्याचा मूर्खपणा कशासाठी करता ? ब्राह्मणांचा क्षोभ ओढवून का घेता ? तुम्ही स्वतःच स्वतःची स्तुती का करता ? जयपत्रे कशाला दाखविता ? त्रिविक्रमभारतीला जयपत्र कशाला मागत आहांत ? आले आहात तसे निघून जा. व्यर्थ गर्व करू नका नाहीतर प्राणाला मुकाल." श्रीगुरुंनी त्या अहंकारी ब्राह्मणांना इतके सांगितले तरी पालथ्या घड्यावर पाणी ! ते काही ऐकावयास तयार नव्हते. त्यांचे एकाच पालुपद, " आम्हाला वेदाविषयी वादविवाद करावयाचा आहे. चर्चा करायची आहे. आम्ही जर वादविवाद केला नाही, तर आम्ही हरलो असे लोक राजाला सांगतील. मग आमची प्रतिष्ठा काय राहणार ?" सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "त्या उन्मत्त ब्राह्मणांना आपले हिताहित समजत नव्हते, त्यामुळे त्यांनी आपल्या सर्वनाशाला निमंत्रण दिले असे मला वाटते. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट' नावाचा अध्याय सव्विसावा समाप्त. ============================== अध्याय २७ वा उन्मत्त ब्राह्मणांना शाप - मातंगास पूर्वजन्म स्मरण ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारकाने सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून त्यांचे स्तवन केले आणि विचारले, "श्रीगुरुंनी त्या ब्राह्मणांना चारही वेदांचा विस्तार समजावून सांगितला, तदनंतर काय झाले ते मला सविस्तर सांगा." नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले "नामधारका, श्रीगुरूंची महती किती सांगावी ? त्यांनी त्या मूर्ख ब्राह्मणांना समजावून सांगायचा खूप प्रयत्न केला, त्यांचे हिताहित कशात आहे हेही सांगितले, पण काहीही उपयोग झाला नाही. 'वादविवाद करा नाहीतर जयपत्र द्या' हाच ठेका त्यांनी धरला. त्या ब्राह्मणांचा हा दुराग्रह पाहून श्रीगुरू संतापले. ते म्हणाले, "ठीक आहे. जशी तुमची इच्छा! दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे त्यांनी स्वतःचे अहित करून घेण्याचे ठरविले, त्याला कोण काय करणार ? याचवेळी श्रीगुरुंना दूर अंतरावर एक मनुष्य दिसला. श्रीगुरू आपल्या शिष्याला म्हणाले, "त्या मनुष्यास बोलावून आमच्याकडे आण." त्या शिष्याने त्या मनुष्यास बोलावून आणले. श्रीगुरुंनी त्याची नीट चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, "महाराज, मी हीन जातीचा मातंग आहे, म्हणून गावाच्या बाहेर राहतो. माझे पूर्वपुण्य मोठे आहे, म्हणूनच मला आज तुमचे दर्शन घडले." असे म्हणून त्याने श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार घातला. श्रीगुरुंनी एक शिष्याला आपला दंड दिला व जमिनीवर सात समांतर रेषा काढण्यास सांगितले. त्या शिष्याने जमिनीवर सात रेषा काढल्यावर श्रीगुरू त्या मातंगाला म्हणाले, "आता तू एकेक रेषा ओलांडून पुढे ये. मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतरच पुढची रेषा ओलांडायची आहे." श्रीगुरुंनी सांगताक्षणीच तो मनुष्य पहिली रेषा ओलांडून पुढे आला. त्याचक्षणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली. श्रीगुरुंनी त्याला विचारले, "तू कोण आहेस ? तुझी जात कोणती ?" तो म्हणाला, "मी भिल्ल जातीचा आहे. माझे नाव 'वनराखा'. दुसरी रेषा ओलांडताच त्याला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. तो त्या जन्मातील अनेक गोष्टी सांगू लागला. ते पाहून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडताच त्या मनुष्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. तो म्हणाला, "माझे नाव 'गंगासुत'. मी गंगेच्या काठी राहत होतो." चौथी रेषा ओलांडताच तो म्हणाला, "माझे नाव 'सोमदत्त' मी वैश्य आहे." सहावी रेषा ओलांडताच तो म्हणाला, "मी क्षत्रिय असून माझे नाव 'गोवर्धन'." सातवी रेषा ओलांडताच तो म्हणाला, "माझे नाव अध्यापक. मी ब्राह्मण असून मी वेदशास्त्र व्याकरणात पारंगत आहे." त्या मातंगाने असे सांगताच श्रीगुरुंना अतिशय आनंद झाला. ते त्या मातंगाला म्हणाले, "तू स्वतःला वेदशात्रपारंगत ब्राह्मण म्हणवितोस, तर आता एक काम कर. येथे हे दोन ब्राह्मण आले आहेत, त्यांच्याशी वेदांवर वादविवाद कर." असे बोलून श्रीगुरुंनी अभिमंत्रित केलेली विभूती त्या मातंगाच्या सर्व शरीराला लावली. विभूतीचा स्पर्श होताच त्या मातंगाच्या ठिकाणी पूर्णज्ञानाचा उदय झाला. मानस सरोवरात बुडी मारताच कावळ्याचा राजहंस होतो, त्याप्रमाणे श्रीगुरुंच्या हृदयस्पर्शाने तो मातंग परमज्ञानी झाला. तो खड्या आवाजात सुस्वरात वेदमंत्र म्हणू लागला. हा सगळा चमत्कार त्रैमूर्ती श्रीनृसिंहसरस्वतींच्या दैवी सामर्थ्याचा ! अज्ञानी लोक त्यांना सामान्य मनुष्य समजताच त्यांचा अधःपात होतो. त्या मातंगाचे ते सुस्वर वेदपठण ऐकताच वादविवादासाठी आलेले ते दोन गर्विष्ठ ब्राह्मण भयचकित झाले. त्यांना एक शब्दही बोलता येईना. त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांच्या शरीराचा थरकाप उडाला. सर्वांगाला घाम फुटला. त्यांनी स्वतःची निंदा करीत श्रीगुरुंच्या चरणांवर लोळण घेतली. ते श्रीगुरुंना म्हणाले, "आम्ही अज्ञानी, मूर्ख आहोत. आम्हाला वाचवा. आम्ही गुरुद्रोही, ब्राह्मणद्रोही आहोत. तुमचे स्वरूप आम्ही ओळखले नाही. तुम्ही साक्षात शिवशंकर आहात. तुम्ही कृपाळू आहात. आमच्यावर दया करा. आमच्या अपराधांची क्षमा करा. आमचा उद्धार करा." त्या ब्राह्मणांनी अशी विनवणी केल असता श्रीगुरू म्हणाले, "तुमच्या अपराधांना क्षमा नाही. तुम्ही मदांध होऊन त्रिविक्रमभारतीला त्रास दिलात. त्यांचा अपमान केलात. अनेक ब्राह्मणांचा तुम्ही धिःकार केलात. विद्येच्या गर्वाने उन्मत्त होऊन तुम्ही करू नयेत अशा अनेक वाईट गोष्टी केल्यात. आता भोगा आपल्या पापांची फळे! तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल." ही शापवाणी ऐकताच ते ब्राह्मण शोकाकुल झाले. ते उःशाप मागू लागले. त्यावर कृपामुर्ती श्रीगुरू म्हणाले,"तुम्ही बारा वर्षे ब्रह्मराक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. पुढे तुम्हाला एक ब्राह्मण भेटेल. तेव्हा तुम्ही 'शुक्ल-नारायण' असा शब्द उच्चाराल. त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल, तेव्हाच तुमचा उद्धार होईल. आता तुम्ही नदीवर जा." श्रीगुरुंनी असे सांगताच ते ब्राह्मण गावाबाहेर गेले.नदीच्या तीरावर जाताच त्यांची हृदयक्रिया बंद पडली व त्यांना मृत्यू आला.कृतकर्माचे फळ ज्याचे त्यानेच भोगावे लागते. त्या आत्मघातकी ब्राह्मणांना गुरुशापाने मृत्यू आला व ते ब्रह्मराक्षस झाले. 'ते ब्राह्मण निघून गेल्यावर त्या मातंगाचे काय झाले ?' असे नामधारकाने विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, "श्रीगुरुंनी ज्या मातंगाला सात रेषा ओलांडावयास लावल्या होत्या व त्याला त्याच्या मागील अनेक जन्मांचा अनुभव दिला होता तो श्रीगुरुंच्या पाया पडून म्हणाला, "पूर्वजन्मी मी ब्राह्मण होतो. मग माझी अशी अधोगती का झाली ? मी कोणते पाप केले होते ते मला सांगा." त्या मातंगाने अशी विनंती केली असता श्रीगुरु त्याला त्याचा पूर्ववृत्तांत सांगू लागले." ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, श्रीगुरुचारित्रातील पुढील कथा जे श्रवण करतील जे महापातकी असले तरी ब्रह्मज्ञानी होतील. ही श्रीगुरुचरित्रकथा अत्यंत पुण्यदायक असून ती श्रवण केली असता चारी पुरुषार्थ प्राप्त होतात. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील ' उन्मत्त ब्राह्मणांना शाप-मातंगास पूर्वजन्म स्मरण ' नावाचा अध्याय सत्ताविसावा समाप्त. =========================== अध्याय २८ वा कर्मविपाक - मातंग कथा ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, "मला आता पुढची कथा ऐकण्याची तीव्र इच्छा झाली आहे. ती कथा मला सांगा." त्यावर सिद्धयोगी म्हणाले,"मला कोणत्या पूर्वकर्मामुळे हीन दशा प्राप्त झाली ?" असे मातंगाने विचारले असता श्रीगुरू त्याला म्हणाले. "पूर्वजन्मी केलेल्या पापकर्मामुळे इहजन्मी त्याचे भोग भोगावे लागतात. दोष किंवा पापकर्मे अनेक प्रकारची असतात व प्रत्येक पापकर्माचे फळ भोगावे लागते. त्याविषयी मी तुला सविस्तर सांगतो ऐक. ब्राह्मण किंवा अन्य कोणीही अनाचाराने वागला तर त्याला हीनजातीत किंवा कृमीकीटक, पशुपक्षी इत्यादी योनींत जन्म घ्यावा लागतो. आपल्या आईवडिलांचा किंवा कुलस्त्रीचा त्याग केल्यास त्या पापकर्माबद्दल मनुष्याला हीन कुळात जन्म घ्यावा लागतो. जो आपल्या कुलदेवतेऐवजी अन्य देवतेची पूजा करतो, सदैव असत्य बोलतो, जीवहिंसा करतो, आपल्या कन्येची विक्री करतो, खोटी साक्ष देतो, त्याला चांडाळ योनी प्राप्त होते. घोड्यांची विक्री करणारा, परस्त्रीशी संग करणारा, रानाला आग लावणारा, तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्धादी कर्मे न करणारा, आपल्या घरातील कपिला धेनूचे दूध देवब्राह्मणांना न देता स्वतःच सेवन करणारा नीच गतीला जातो. आपल्या आई-वडिलांची सेवा न करणारा, त्यांचा सांभाळ न करणारा, आपली एक पत्नी असताना तिचा त्याग करून दुसरी स्त्री करणारा सात जन्म कृमीकीटक होतो. सत्पात्री ब्राह्मणाची निंदा करणारा, त्याच्या उपजीविकेचा अपहार करणारा, तळी-विहिरी नष्ट करणारा, शिवमंदिरातील पूजा नष्ट करणारा, ब्राह्मणांची घरेदारे मोडणारा, हीन कुळात जन्मास येतो. आपला स्वामी, गुरु, शत्रू, मित्र यांच्या स्त्रीशी जो व्यभिचार करतो तो पतितगृही जन्म घेतो. दारी आलेल्या अतिथीला जो अन्न देत नाही, राजाने दुसऱ्याला दिलेले भूदान जो हिरावून घेतो, वैश्वदेवाच्या वेळी दारी आलेल्या अतिथीचे स्वागत न करता त्याला कठोर शब्दांनी बोलून अपमानित करतो, त्याला कोंबड्याचा जन्म मिळतो. जो गंगातीर्थाची निंदा करतो, रणांगणातून पळून जातो, पर्वकाळी किंवा एकादशीला जो स्त्रीसंग करतो, जो अपात्र व्यक्तीला वेदविद्या शिकवितो, तो चांडाळयोनीत जन्म घेतो. उन्हाळ्यात एखाद्या पुण्यवंत माणसाने पाणपोई घातली असता त्यात जो विघ्न निर्माण करतो त्याला हीनयोनी प्राप्त होते. रोग्याची नाडीपरीक्षा न करता जो औषधोपचार करतो, दुसऱ्याचे अहित करण्यासाठी जो जारणमारणादींचा मंत्रजप करतो, तो महापापी होय. जो आपल्या गुरुंची व हरीहरांची निंदा करतो व अन्यदेवतांची पूजा करतो तो महापातकी होय. त्याला हीन कुळात जन्म मिळतो. जो वर्णधर्माचे पालन करीत नाही, अपात्र माणसाला मंत्र शिकवितो तो पापवंशात जन्म घेतो. जो आपल्या गुरुंची निंदा करण्यात आनंद मानतो, जो विद्वान ब्राह्मणाचा द्वेष करतो, तो पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होतो. जो आपल्या गुरुंची पूजा करतो व त्याचवेळी दुसऱ्या देवाची व दुसऱ्या गुरुंची निंदा करतो त्याला अपस्मार रोग होतो व त्याला दारिद्र्य-दुःख भोगावे लागते. जो आपल्या आई-वडिलांचा त्याग करून वेगळा राहतो, तो महारोगी होतो. जो दुसऱ्याचे उणेदुणे चारचौघात बोलून दाखवितो, तो हृदयरोगी होतो. जो आपल्या स्त्रीचा गर्भपात करतो, तो निपुत्रिक होतो. त्याला पुत्र झालाच तर तो जगत नाही. जो वेदशास्त्र-पुराणांचे श्रवण-पठण करीत नाही, तो बहिरा, अंध होऊन जन्मास येतो. जो पापी माणसाशी मैत्री करतो, त्याला गाढवाचा जन्म मिळतो. पापी माणसाकडून औषध घेतो तो हरीण होतो. ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी होतो. मद्यपान करणाऱ्याचे दात काळे होतात. सुवर्णचोरी करणाऱ्याला नखे कुजण्याचा रोग होतो. गुरुस्त्रीकडे जो वाईट नजरेने पाहतो, तो कुष्ठरोगी होऊन जन्मास येतो. दुसऱ्याच्या सेवकाला फूस लावून पळवितो, त्याला सदैव तुरुंगवास भोगावा लागतो. जो परस्त्रीची चोरी करतो, तो जन्मतःच मंदबुद्धीचा होतो. शेवटी तो नरकात जातो. सापांना ठार मारणारा सर्प योनीत जन्मास येतो. अशी अनेक पापकर्मे आहेत व त्यांची फळे भोगावी लागतात. आता चौर्यकर्माबद्दल सांगतो. सुवर्णचोरी करणाऱ्यास परमा रोग होतो. पुस्तकाची चोरी करणारा अंध होतो. वस्त्रचोरी करणारा दमेकरी होतो. सार्वजनिक संपत्तीचा अपहार करणाऱ्याला गंडमाळ रोग होतो. दमेकऱ्याची चोरी करणाऱ्यास तुरुंगवास भोगावा लागतो असे ब्रह्माण्ड-पुराणात सांगितले आहे. परद्रव्याची किंवा दुसऱ्याला मिळालेल्या वस्तूची चोरी करणारा निपुत्रिक होतो. अन्नचोरी करणाऱ्यास पानथरी रोग होतो. धान्यादींची चोरी करणाऱ्याच्या शरीराला जन्मतःच दुर्गंध येतो. परस्त्री, परवस्तू किंवा ब्राह्मणांचे द्रव्य चोरणाऱ्याला ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळतो. पाने, फुले, फळे चोरणाऱ्यास खरुज रोग होतो. कास्य, ताम्र, लोह, कापूस, मीठ यांची चोरी करणाऱ्याला श्वेतकुष्ठ रोग होतो. देवद्रव्याचा अपहार करणारा, देवकार्याचा नाश करणारा, अभक्ष्यभक्षण करणारा पंडुरोगी होतो. दुसऱ्याचे भूमिगत धन चोरणाऱ्याला सदैव शोक करावा लागतो. धेनु-धनाची चोरी करणाऱ्याला उंटाचा जन्म मिळतो. दुसऱ्याच्या घरातील भांडी कुंडी चोरणारा मनुष्य कावळा होतो. मधाची चोरी करणारा बेघर होतो. श्रीगुरू त्या पतिताला म्हणाले, "या सर्व चौर्यकर्माबद्दल ते ते जन्म घ्यावे लागतात. आता व्यभिचारासंबंधी महाभारताच्या शांतीपर्वात श्रीव्यासांनी काय सांगितले आहे ते सांगतो, ऐक. परस्त्रीला आलिंगन दिल्यास शंभर जन्म श्वान योनीत जन्म घ्यावा लागतो. त्यानंतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो. परस्त्रीची योनी पाहणारा जन्मांध होतो. भावाच्या पत्नीशी संग करणाऱ्याला गाढवाचा जन्म मिळतो. त्यानंतर त्याला सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो व शेवटी तो नरकात जातो. मित्राची पत्नी मातेंसमान असते. तिच्याशी संग करणारा श्वानयोनीत जन्मास येतो. परस्त्रीचे मुखावलोकन करू नये. ते वाईट बुद्धीने करणारा नेत्ररोगी होतो. हीनजातीच्या स्त्रीशी व्यभिचार करणारा श्वानयोनीत जन्म घेतो." श्रीगुरुंचे हे निरुपण शांतचित्ताने ऐकत असलेल्या त्रिविक्रमभारतींनी विचारले, "स्वामी, आपण सांगितलेले पापकर्म एखाद्याच्या हातून एकदाच घडले तर ते पाप कशाने नष्ट होते ? " त्यावर श्रीगुरू म्हणाले, "केलेल्या पापकर्माचा पश्चाताप झाला तर त्या कर्माचे पाप लागत नाही. मोठ्या पापकर्माची मनाला बोचणी लागल्यास त्याला प्रायश्चित्त आहे. त्यासाठी ब्रह्मदंड द्यावा. सालंकृत गोदान करावे. ते शक्य नसेल तर यथाशक्ती द्रव्यदान करावे. केवळ अजाणतेपणे पाप घडल्यास प्रायश्चित्तानें शुद्धी होते. अशावेळी गुरुसेवा केल्यास गुरु निवारण करील. दोनशे प्राणायाम व पुण्यतीर्थात दहावेळा स्नान केल्यास पापाचा नाश होतो. त्याचप्रमाणे तीन गुंजा सुवर्णदान करावे. दोन योजनेपर्यंत नदीतीराने तीर्थयात्रा करावी. पती आणि पत्नी यांपैकी कोणी एकाने पाप केले असेल, तर दोघांनी प्रायश्चित्त घ्यावे. त्याचप्रमाणे गायत्रीचा दहा हजार जप करावा. बारा सत्पात्री ब्राह्मणांना भोजन द्यावे. एक हजार तिलाहुती द्याव्यात. याला गायत्रीकृच्छ असे म्हणतात. त्याचप्रमाणे प्राजापत्यकृच्छ्र, अतिकृच्छ्र, पर्णकृच्छ्र करावे, त्यामुळे केवळ अज्ञानाने झालेली पापे नष्ट होतात. समुद्रसेतुबंधी स्नान केल्यास भृणहत्या व कृताघ्नी पातकांचा नाश होतो. विधीपूर्वक एक कोटी गायत्रीमंत्राचा जप केल्याने ब्रह्महत्या पातकाचा नाश होतो. एक लक्ष गायत्री जप केल्याने गुरुपत्नीशी केलेल्या पातकाचा नाश होतो. अशाप्रकारे श्रीगुरुंनी त्रिविक्रमभारतीला पापमुक्तीसाठी करावयाची स्नान, दान, जप-तप, उपोषण, तीर्थयात्रा आदी गोष्टी सांगितल्या. पण त्या मातंगाला पुन्हा आपल्या जातीत जावे असे वाटेना. श्रीगुरुंनी त्याला स्वतःच्या घरी जाण्यास सांगितले. तो जाण्यास तयार नव्हता. इतक्यात त्या मातंगाची बायकामुलें तेथे आली. त्याची पत्नी म्हणाली, "माझ्या पतीला अपस्माराची व्याधी झाली आहे. बराच वेळ झाला तरी हे घरी परत आले नाहीत, म्हणून ह्यांना शोधीत आम्ही येथे आलो आहोत." ती त्याच्याजवळ जाऊ लागली तेव्हा तो मातंग म्हणाला, "मला स्पर्श करू नकोस. मी ब्राह्मण आहे." लोकांनी तिला घडलेली हकीगत सांगितली तेव्हा ती शोक करीत श्रीगुरुंना म्हणाली, "स्वामी, हे काय हो झाले ? आता मी काय करू ? मी आपणास शरण आले आहे. कृपा करा, माझ्या पतीची व माझी ताटातूट करू नका." मग श्रीगुरू त्या मातंगाला म्हणाले, "आता तू आपल्या घरी जा. तुझ्यामुळे तुझी पत्नी व मुलें दु:खी झाले तर तुला सद्गती प्राप्त होणार नाही. ज्याला संसारात रस नाही, त्याने बायकामुलांच्या भानगडीत पडू नये. पण एकदा संसारात पडल्यावर बायकामुलांचा त्याग केला तर मोठा दोष निर्माण होतो. तू सूर्य-चंद्राला साक्षी ठेवून स्त्रीचा स्वीकार केला आहेस. आता तिचा त्याग केलास तर तू महापापी ठरशील. तुला सद्गती मिळणार नाही," श्रीगुरुंनी असे सांगितले असता तो मातंग म्हणाला, "स्वामी, मला आता ज्ञानप्राप्ती झाली आहे. मग मी पुन्हा जातिहीन कशाला होऊ ?" तो असे म्हणाला असता श्रीगुरुंनी विचार केला, याच्या शरीरावर विभूती आहे. त्याचाच हा परिणाम आहे. ती धुतली गेली म्हणजे याच्या ठिकाणी अज्ञान निर्माण होईल." श्रीगुरुंनी एका लोभी, संसारासक्त ब्राह्मणाला बोलावून सांगितले. "तू या मातंगावर स्वहस्ते पाणी ओत म्हणजे याच्या ठिकाणी संसाराची आसक्ती निर्माण होईल." त्या ब्राह्मणाने नदीवरून घागर भरून आणली व त्या मातंगाच्या अंगावर ओतली. त्यामुळे श्रीगुरुंनी त्या मातंगावर प्रक्षेपण केलेले अभिमंत्रित भस्म धुऊन गेले. त्याचक्षणी त्या मातंगाचे जातिस्मरण नाहीसे झाले. तो धावतच आपल्या बायाकामुलांजवळ गेला आणि विचारू लागला, "मी येथे कसा आलो ? तुम्ही येथे कशासाठी आला आहात ? मला काही समजत नाही." मग तो आपल्या बायकामुलांसह घरी परत गेला. हा सगळा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले. श्रीगुरूंची लीला अगाध आहे त्यांना पुन्हा एकदा कळले. त्यावेळी तेथे असलेले त्रिविक्रमभारती श्रीगुरुंना म्हणाले, "स्वामी, भस्माच्या प्रभावाने त्या मातंगाला पूर्वजन्माचे स्मरण झाले व ते भस्म धुतले गेले असता त्याची स्मृती नाहीशी झाली. हा भस्माचा प्रभाव मोठा अद्भुत आहे. मला त्याविषयी सविस्तर सांगा." त्रिविक्रमभारतींनी अशी विनंती केली असता श्रीगुरुंनी भस्ममाहात्म्य सांगण्याचे मान्य केले. अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'कर्मविपाक - मातंग कथा' नावाचा अध्याय अठ्ठाविसावा समाप्त. ।।श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ।।

Search

Search here.