श्री गुरुचरित्र अध्याय ३८ ते ४३

ग्रंथ - पोथी  > श्री गुरुचरित्र मराठी कथासार Posted at 2019-02-17 15:09:41
श्री गुरुचरित्र पारायण - दिवस सहावा अध्याय ३८ ते ४३ ।। श्री गणेशाय नमः ।। अध्याय ३८ वा भक्ताची लाज राखली ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारकाने सिद्धमुनींना विनंती केली, "हे योगिराज, श्रीगुरुचरित्र ऐकण्यासाठी मी अतिशय आतुर झालो आहे. पुढे काय झाले ते मला सांगा." सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, तुझी जिज्ञासा पाहून मला अतिशय आनंद होत आहे. तुझ्यामुळेच मला परमलाभ झाला आहे. मला एक कथा आठवली आहे, ती मी तुला सांगतो. नामधारका, श्रीगुरू नृसिंहसरस्वतींना त्यांचे अनेक भक्त द्रव्य आणून देत असत; परंतु श्रीगुरू ते स्वतःसाठी स्वीकारीत नसत. ते त्या भक्तांना त्या द्रव्यातून अन्नदान करण्यास सांगत असत. त्यामुळे गाणगापुरात रोजच्या रोज समाराधना होत असे. त्यात कधीही खंड पडत नसे. एके दिवशी काश्यप गोत्रातील भास्कर नावाचा एक गरीब ब्राह्मण श्रीगुरुंच्या दर्शनासाठी मठात आला. आपल्या हस्ते स्वयंपाक करून श्रीगुरुंना भोजन देण्याचा त्याचा संकल्प होता. तीन लोकांना पुरेल एवढा शिधा त्याने आणला होता; परतू नित्य चालू असलेल्या समाराधनेमुळे त्याला श्रीगुरुंना भोजन देण्याची संधीच मिळत नव्हती. तीन महिनेपर्यंत तो ब्राह्मण इतर भक्तांनी केलेल्या समाराधनेत भोजन करीत असे. तीन लोकांना पुरेल एवढ्या शिध्याने हा समाराधना घालणारा आहे हे इतर भक्तांना समजले, तेव्हा ते त्या भास्कर ब्राह्मणाची थट्टा करू लागले. प्रत्येकाच्या वाट्याला एक एक शीत तरी येईल का ? असे त्या ब्राह्मणाला विचारत. त्यामुळे तो ब्राम्हण दुःखी होत असे; पण तो कोणाला काय बोलणार ? लोकांनी केलेली थट्टा मुकाट्याने सहन करीत असे. श्रीगुरुंना हे समजताच ते त्या भास्कर ब्राह्मणाला म्हणाले, "तू आज समाराधना कर. आज मी तुझ्याकडेच भोजन करणार आहे." श्रीगुरुंनी असे सांगताच त्या भास्कर ब्राह्मणास अतिशय आनंद झाला. त्याने डाळ, तांदूळ, कणीक इत्यादी जो काही शिधा आणला होता त्यातून सोवळ्याने स्वयंपाक केला. ही गोष्ट इतरांना समजली तेव्हा ते आपापसात म्हणाले, "आज श्रीगुरुंनी भास्कराला समाराधना करण्यास सांगितले आहे म्हणजे आज आपणास मठात भोजन मिळणार नाही. गोडधोड काही मिळणार नाही. तेव्हा आज आपल्या घरीच भोजन करावे लागणार." श्रीगुरुंना हे अंतर्ज्ञानाने समजले. त्यांनी सर्वांना बोलावून सांगितले, "आज भास्कर समाराधना घालणार आहे, तेव्हा सर्वांनी येथेच भोजनाला यावे. घरी कोणीही भोजन करू नये. सर्वांनी स्नान करून यावे." श्रीगुरुंनी असे सांगताच त्या ब्राह्मणांनी विचार केला, 'मठात असलेल्या सामग्रीनेच श्रीगुरू भास्करांकडून स्वयंपाक करवून घेणार असतील' असा विचार करून सर्वजण स्नानासाठी नदीवर गेले. इकडे भास्कराने तीन लोकांना पुरेल इतका स्वयंपाक केला. मग श्रीगुरू भास्कराला म्हणाले, "तू सर्व ब्राह्मणांना बोलावणे पाठव. चार हजार पत्रावळ्या मांडा." भास्करने विचार केला, मी तर स्वयंपाक केला आहे, तीन माणसांना पुरेल एवढा ! आणि श्रीगुरुंनी सर्वांना भोजनास सांगितले आहे ! चार हजार पत्रावळी मांडल्या आहेत ! या सर्वांना अन्न कसे काय पुरणार ? पण मग श्रीगुरू महात्मा आहेत. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. श्रीगुरू समर्थ आहेत. त्यांची लीला आपल्याला कशी कळणार ? " श्रीगुरुंच्या आज्ञेनुसार भास्कर त्या ब्राह्मणांना बोलाविण्यासाठी नदीवर गेला; पण ते सगळे टंगळमंगळ करू लागले. श्रीगुरुंना हे समजताच त्यांनी दुसऱ्या शिष्यांना नदीवर पाठविले व सर्वांना भोजनास येण्यास सांगितले. मग सर्वजण भोजनासाठी आले. स्वयंपाक तयार होता. सर्वांनी श्रीगुरूंची पूजा केली. चार हजार पत्रावळी मांडून झाल्या होत्या. मग श्रीगुरुंनी आपले वस्त्र त्या अन्नावर झाकले. त्यावर कमंडलूतील तीर्थ शिंपडले. मग श्रीगुरू त्या भास्कर ब्राह्मणाला म्हणाले, "अन्नावरील वस्त्र न काढता अन्न दुसऱ्या पात्रांत काढून घ्यावे व वाढावे." श्रीगुरुंच्यासह सर्वजण भोजनास बसले. वाढणे सुरु झाले; पण आश्चर्य असे की, अन्न कितीही वाढले तरी ते पहिले होते तेवढे शिल्लक ! हजारो ब्राह्मण पोटभर जेवले, पण अन्न काही संपेना. मग गाणगापुरातील सर्व स्त्री-पुरुष, मुले यांना भोजनासाठी बोलाविले. सगळे पोटभर जेवले. मग गाणगापुराच्या शेजारच्या गावातील लोकांना भोजनासाठी बोलाविले. तेही पोटभर जेवले. त्या दिवशी गाणगापुरातील व परिसरातील एकही मनुष्य उपाशी राहिला नाही. मग श्रीगुरुंनी भास्कराला भोजन करण्यास सांगितले. भास्कर जेवला तरी सुरुवातीला तयार केले होते तेवढे अन्न शिल्लक ! शेवटी ते अन्न जलचरांना अर्पण केले. त्या दिवशी भास्कराने केवळ तीन लोकांना पुरेल एवढा शिधा आणला होता. तेवढ्या शिध्याच्या तयार अन्नात चार हजार लोक जेवले. केवढा हा चमत्कार ! ही सगळी श्रीगुरूंची कृपा ! या प्रसंगाने श्रीगुरूंची कीर्ती सर्वत्र झाली. गाणगापुरातील हे संन्यासी साधे संन्यासी नाहीत, ते साक्षात त्रैमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार आहेत याची लोकांना खात्री पटली. सर्वांनी श्रीगुरूंचा जयजयकार केला. नंतरच्या काळात देशोदेशीच्या अनेक लोकांनी श्रीगुरुंचे शिष्यत्व पत्करले. आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी श्रीगुरुंनी असे कितीही चमत्कार केले. एका प्रेताला सजीव केले. शुष्ककाष्ठास पालवी फुटली. त्रिविक्रम-भारतीला विश्वरूप दाखविले. वांझ म्हैस दुभती केली. कुष्ठरोग झालेल्या ब्राम्हणाचा रोग नाहीसा केला. पतितामुखी वेद वदविले, एका विणकरी भक्ताला श्रीशैलपर्वत दाखवून त्याला काशीयात्रा घडविली. श्रीगुरुंच्या लीला अपार आहेत. अनेक देवदेवतांची आराधना केली असता उशिराने कामना पूर्ण होतात, परंतु श्रीगुरू नृसिंहसरस्वतींच्या केवळ दर्शनाने सर्व इच्छा तात्काळ पूर्ण होतात. म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात, "लोक हो ! तुम्ही श्रीगुरूंची सेवा करा." अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'भक्ताची लाज राखली' नावाचा अध्याय अडतिसावा समाप्त. ============================= अध्याय ३९ वा अश्वत्थ माहात्म्य - साठ वर्षाच्या वंध्येस संतानप्राप्ती ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, " श्रीगुरुंच्या कृपेने एका साठ वर्षांच्या वांझ स्त्रीला पुत्र झाला, ती अद्भुत कथा ऐक. ती कथा अशी, सोमनाथ नावाचा एक शौनकगोत्री ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव गंगा. पतिपरायण असलेली ती स्त्री वेद्शास्त्रानुसार आचरण करीत असे. ती साठ वर्षांची झाली तरी तिला मुलबाळ नव्हते. गाणगापुरात तिला सर्वजण 'वांझोटी' म्हणून हिणवत. ती नित्यनेमाने श्रीगुरुंच्या दर्शनाला येत असे व नीरांजनाने त्यांची आरती करीत असे. तिचा हा नेम कितीही दिवस चालू होता. तिच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी तिला विचारले, "तू नित्यनेमाने माझी नीरांजनाने आरती करतेस. तुझी काय इच्छा आहे ? तुझी जी काही कामना असेल ती सांग. नारायणाच्या, शंकराच्या मनात आले तर ते तुझी इच्छा नक्की करतील." श्रीगुरू असे म्हणाले असता गंगा त्यांच्या पाया पडून म्हणाली, "स्वामी, 'अपुत्रस्य गतिर्नास्ति'. निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्त नाही. निपुत्रिक स्त्रीचे तोंड पाहू नये असे लोक म्हणतात. जिच्या पोटी मूल नाही त्या स्त्रीचे आयुष्य व्यर्थ आहे. पुत्रजन्माचे मागच्या बेचाळीस पिढ्या उद्धरून जातात. पुत्राविना घर अरण्यासमान. मी जेव्हा गंगेवर स्नानासाठी जाते त्यावेळी लेकुरवाळ्या स्त्रिया आपल्या मुलांना कडेवर घेऊन येतात; पण माझ्या नशिबात ते नाही. ज्यांना पुत्रपौत्र असतात, त्यांना परलोक प्राप्ती होते; पण निपुत्रिकाला पिंडदान कोणी करत नसल्याने त्याला मुक्ती मिळत नाही. आता हा जन्म पुरे झाला. तो फुकट गेला. आता माझा पुढचा जन्म तरी सफल होईल, पुत्रप्राप्तीची माझी कामना पूर्ण होईल असा वर मला द्या." त्यावर श्रीगुरू हसून म्हणाले, "पुढचा जन्म कोणी पाहिला आहे ? पुढच्या जन्मी तुला या जन्मातले काही आठवेल का ? तेव्हा पुढच्या जन्माचे सोडून दे. तुला याच जन्मी सुलक्षणी कन्या-पुत्र होतील यावर पूर्ण विश्वास ठेव." त्यावर ती स्त्री म्हणाली, "स्वामी, हे काय सांगता ? मला आता साठ वर्षे झाली. आजपर्यंत पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक व्रतवैकल्ये केली, नवससायास केले, पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या, सगळे काही मी विश्वासाने केले; पण कशाचा काही उपयोग झाला नाही. आजही मी अश्वत्थाला (पिंपळाला) मूर्खपणाने प्रदक्षिणा घालीत आहे. या नाही तर पुढच्या जन्मी तरी अश्वत्थसेवा फळाला यावी. आता मी साठ वर्षाची झाले, माझा विटाळही गेला, असे असतानाही याच जन्मी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिलात. तुमच्या शब्दांवर मी अविश्वास कसा दाखवू ?" श्रीगुरू म्हणाले, "अश्वत्थसेवा महापुण्यकारक आहे. ती कधीही व्यर्थ जात नाही. तू अश्वत्थाची निंदा करू नकोस. आमच्यासह अश्वत्थाचीही तू सेवा कर. तुला नक्की पुत्रप्राप्ती होईल. आता आम्ही सांगतो तसे कर. तू नित्यनेमाने भीमा-अमरजा संगमावर जा. तेथे अश्वत्थवृक्ष आहे. आम्ही दररोज अनुष्ठानासाठी तेथे जात असतो. तेथे तू आमच्यासह अश्वत्थाची सेवा कर. तेथे अश्वत्थरूपाने प्रत्यक्ष नारायणाचे वास्तव्य आहे." 'मला अश्वत्थाचे माहात्म्य सांगा' अशी त्या स्त्रीने विनंती केली असता श्रीगुरू म्हणाले, अश्वत्थाची निंदा कधीही करू नये. त्याचे माहात्म्य फार मोठे आहे. अश्वत्थाच्या ठिकाणी सर्व देवांचे वास्तव्य असते. एका अश्वत्थाच्या सेवेने सर्व देवांची सेवा केल्याचे फळ मिळते. ब्रम्हांड पुराणात प्रत्यक्ष ब्रम्ह्देवांनी नारदमुनींना अश्वत्थाचे माहात्म्य सांगितले आहे. एकदा त्रैलोक्यसंचारी नारदमुनी फिरत फिरत पृथ्वीवरील ऋषींच्या आश्रमात आले. नारदमुनींना पाहून सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्यांना अर्घ्यपाद्य देऊन त्याचे उत्तम स्वागत केले. "मुनिवर्य, आम्हाला अश्वत्थाचे माहात्म्य सांगा' अशी सर्व ऋषींना विनंती केली असता नारदमुनी म्हणाले 'प्रत्यक्ष ब्रम्हदेवांनी मला अश्वत्थ माहात्म्य सांगितले आहे, तेच मी तुम्हाला सांगतो. अश्वत्थ म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय. तो विष्णुस्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रम्हदेव, बुंध्यामध्ये विष्णू व शेंड्यावर रुद्राचे वास्तव्य असते. तय्च्या फांद्यांमध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू, उत्तरेला ब्रम्हदेव व पूर्वेला इंद्रादी सर्व देवदेवता वास्तव्य करतात. त्याच्या सर्व शाखा-फांद्यांवर आदित्य नित्य निवास करतो. त्याच्या मुळ्यांत गो, ब्राम्हण, सर्व ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य आहे. पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य आहे. ॐकारस्वरूप अश्वत्थाचे 'अ' हे मूळ, 'उ' म्हणजे बुंधा आणि 'म' म्हणजे फळे-फुले होत. त्रेमुर्तींचे वास्तव्य असलेल्या या पवित्र वृक्षावर एकादशरुद्र व अष्टवसू असे सर्व देव आहेत, म्हणूनच अश्वत्थाला 'कल्पवृक्ष' म्हणतात. एका अश्वत्थाची सेवा केली असता या सर्व देवदेवांची सेवा घडते व त्यांच्या कृपेने श्रद्धाळू लोकांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अश्वत्थाचे माहात्म्य अगाध शब्दातीत आहे." मग नारदमुनींनी अश्वत्थाची सेवा कशी करायची ते समजावून सांगितले.नारदमुनी म्हणाले, "अश्वत्थसेवा व्रताला गुरु, शुक्र व चंद्रबळ असणाऱ्या चैत्र, आषाढ व पौष महिन्यात या व्रताला प्रारंभ करावा. गुरु-शुक्राचा अस्त असताना व चंद्रबळ नसताना या व्रताला प्रारंभ करू नये. याशिवाय इतर महिन्यात दिनशुद्धी पाहून उपासपूर्वक, शुचिर्भूतपणे या व्रताला सुरुवात करावी.रविवारी, सोमवारी, शुक्रवारी, संक्रातीच्या दिवशी, संध्याकाळी, रिक्त तिथीस, तिसऱ्या प्रहरी, पर्वणीकाळी, व्यतिपात योग असताना वैधुति इत्यादी अशुभ दिवशी अश्वत्थाला स्पर्श करू नये. करणाऱ्याने सदैव शुचिर्भूत असावे. द्यूतकर्म असत्यभाषण करू नये. परनिंदा, वितंडवाद टाळावा, प्रातःकाळी सचैल सचैल स्नान करावे. श्वेतवस्त्र परिधान करावे. अश्वत्थाखालची जमीन गोमयाने सारवावी. त्यावर सुंदर रांगोळ्या काढाव्यात. त्या रांगोळ्यात कमळादी शुभाकृती काढाव्यात. शुद्ध जाळणे जलाने भरलेले दोन कलश त्या रांगोळ्यावर स्थापन करावेत. त्या दोन्ही कलशांत गंगा व यमुना या नद्या आहेत असा संकल्प करावा. त्या कलशांची गंधाक्षतपुष्पांनी करावी. पुन्याहवाचन करून आपल्या इष्ट कामनेचा उच्चार करावा. मगकलशाने कलशाने पाणी आणून अश्वत्थाला सात वेळा स्नान घालावे. मग पुन्हा स्नान करून अश्वत्थाची पुरुषसूक्त मंत्रांनी षोडशोपचारे यथासांग पूजा करावी. त्यावेळी लक्ष्मीसहित अष्टभुजा नारायणाचे ध्यान करावे. सर्व देवदेवांना आवाहन करावे. मग अश्वत्थ नारायणाला वस्त्राने किंवा सुटणे वेढे घालावेत. मग पुरुषसूक्त म्हणत मंदगतीने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे सर्व संकटे नाहीशी होऊन इष्टकामना पूर्ण होतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर साष्टांग नमस्कार घालावा. या प्रदक्षिणांचे फळ काय सांगावे ? प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते. ब्रम्हहत्यदि महापातकांचा नाश होतो. सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा होतात.जन्म, मृत्यू, जरा, व्याधी नाहीशा होतात. संसारभव राहत नाही. ग्रहपीडा होत नाही. ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याला उत्तम पुत्रसंतान प्राप्त होते. शनिवारी अश्वत्थवृक्षाखाली मृत्युंजय जप केला असता अपमृत्यू टळतो. पूर्ण आयुष्य प्राप्त होते. अश्वत्थवृक्षाखाली बसून शनिअष्टकस्तोत्र म्हटल्यास शनीची पीडा होत नाही. साडेसातीचा त्रास होत नाही. अश्वत्थवृक्षाखाली मंत्रपाठ केल्यास वेदपठणाचे पुण्य मिळते. जो अश्वत्थाची स्थापना करतो त्याची बेचाळीस कुळे उद्धारून स्वर्गाला जातात. अश्वत्थवृक्ष तोडणे महापाप आहे. असे कृत्य करणारा मनुष्य आपल्या पितारांसह नरकात जातो. अश्वत्थवृक्षाखाली होमहवन केले असता महायज्ञाचे पुण्य प्राप्त होते. अश्वत्थाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असतील त्याच्या दशांश हवन करावे. हवनाच्या दशांश ब्राम्हणभोजन घालावे. हे सर्व केल्यानंतर व्रताचे उद्यापन करावे. सोन्याचा अश्वत्थवृक्ष विधीपूर्वक ब्राम्हणाला द्यावा. सवत्सश्वेतधेनूचे ब्राम्हणाला दान द्यावे. अश्वत्थाखाली तिळाची रास करून वस्त्राने ती झाकावी व ती ब्राम्हणाला दान द्यावी." असे हे अश्वत्थाचे माहात्म्य नारदांनी ऋषींना सांगितले. तेच श्रीगुरुंनी गंगाबाईला सांगितले, मग श्रीगुरू तिला म्हणाले, "अश्वत्थाचे माहात्म्य असे आहे. ज्याच्याजवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फलप्राप्ती होईल." अशाप्रकारे श्रीगुरुंनी गंगाबाईला अश्वत्थम्म्हात्म्य सांगितले. मग तिला ते म्हणाले, "आता तू संगमावर जा व अश्वत्थसेवा कर. तुला कन्या-पुत्र प्राप्त होतील." त्यावर गंगाबाई म्हणाली, "स्वामी, मी साठ वर्षांची वंध्या आहे. मला मूल होणार नाही; परंतु तुमच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. तुमच्या सांगण्यानुसार मी अश्वत्थसेवा करीन, ती केवळ तुमच्यावर माझी श्रद्धा आहे म्हणून !" मग गंगाबाई श्रीगुरुंना वंदन करून भीमा-अमरजा संगमावर गेली. तेथे षट्कुल तीर्थात स्नान करून ती यथाविधी अश्वत्थसेवा करू लागली. तिने अश्वत्थसेवा सुरु केली. त्याच्या तिसऱ्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राम्हण आला. तो तिला म्हणाला, "तुझी इच्छा पूर्ण झाली आहे असे समज. आता तू एक कर. तू गाणगापुरास जा. तेथे श्रीगुरू आहेत, त्यांना तू सात प्रदक्षिणा घालून नमस्कार कर. मग ते तुला जे देतील ते भक्षण कर. आता उशीर करू नकोस. लवकर जा." गंगाबाई स्वप्नातून जागी झाली. तिला सगळे स्वप्न आठवले. चौथ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती गाणगापुरात श्रीगुरुंच्याकडे आली. तिने श्रीगुरुंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला, श्रीगुरुंनी प्रसन्न हास्य करून तिच्या ओटी दोन फळे घातली व तिला ते म्हणाले, "ही फळे तू आनंदाने खा. तुझे काम झाले असे समज. आता तू भोजन करून जा. तुला मी कन्या आणि पुत्र दिले आहेत. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल.प्रथम व्रताचे यथासांग उद्यापन कर व मग ती फळे खा." श्रीगुरुंनी सांगितल्याप्रमाणे गंगाबाईने व्रताचे उद्यापन केले, दानधर्म केला आणि काय आश्चर्य ! त्याच साठ वर्षांची ती वंध्या गंगाबाई ऋतूमती झाली. पुढे तीन दिवस श्वेतवस्त्र परिधान करून, मौनव्रत स्वीकारून एकांतात राहिली. चौथ्या दिवशी सुस्नान करून ती आपल्या पतीसह श्रीगुरुंच्या दर्शनाला गेली. तिने श्रीगुरूंची यथासांग पूजा केली, तेव्हा श्रीगुरुंनी तिला 'पुत्रवती भव' असा आशीर्वाद दिला. पाचव्या दिवशी पतीसंग करून गर्भवती झाली. हि बातमी गावात सर्वांना समजताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. केस पिकलेली, साठ वर्षांची वंध्या गर्भवती झाली ही केवळ भक्तवरद त्रैमूर्ती नृसिंहसरस्वतींची कृपा ! त्यांची मनोभावे सेवा केली असता अशक्य काय ? याची सर्वांना खात्री पटली. सोमनाथालाही खूप आनंद झाला. त्याने तिच्या गर्भारपणातील सर्व विधी यथासांग पूर्ण केले. यथाकाली ती प्रसूत झाली. तिला कन्यारत्न झाले. सोमनाथाने खूप दानधर्म केला. दहा दिवसांनी गंगा आणि सोमनाथ आपल्या कन्येला घेऊन श्रीगुरुंच्या दर्शनाला आली. त्यांनी आपल्या कन्येला श्रीगुरुंच्या पायावर घातले, तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी आशीर्वाद दिला. "ही तुमची कन्या शतायुषी होईल. हिला परमज्ञानी पती मिळेल. हिला सर्वप्रकारची ऐश्वर्ये प्राप्त होतील. दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनाला येईल. हिला पुत्रपौत्र प्राप्त होतील" श्रीगुरुंनी असा आशीर्वाद दिला असता गंगाबाई हात जोडून म्हणाली, "स्वामी, तुमच्या कृपाशीर्वादाने मला कन्या झाली. आता मला पुत्र व्हावा अशी इच्छा आहे." श्रीगुरू म्हणाले, "तुला कसला पुत्र हवा आहे ? परमज्ञानी असा हवा असेल तर तो अल्पायुषी -तीस वर्षे जगेल. तुला दीर्घायुषी पुत्र हवा असले तर तो मूर्ख असेल." गंगाबाई म्हणाली, "स्वामी, मला मोठ्या योग्यतेचा,ज्ञानी पुत्र हवा आहे. त्याला पाच पुत्र व्हावेत." श्रीगुरुंनी 'तथास्तु' म्हणून तिला तसा वर दिला. गंगा आणि सोमनाथ यांना अतिशय आनंद झाला. ती मोठ्या समाधानाने गहरी परत गेली. पुढे यथावकाश सर्वकाही तसेच घडले. गंगाबाईला ज्ञानी पुत्र झाला. कन्येचेही भविष्य खरे ठरले, तिच्या पतीने मोठमोठे यज्ञ केले म्हणून त्याचे 'दीक्षित' असे नाव सर्वत्र झाले. श्रीगुरू कृपा अशी आहे. जेथे श्रद्धा आहे तेथे फळ आहे, म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात, "लोक हो ! श्रीगुरूंची मनोभावे सेवा करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील." अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'अश्वत्थ माहात्म्य - साठ वर्षाच्या वंध्येस संतानप्राप्ती ' नावाचा अध्याय एकोणचाळीसावा समाप्त. ============================== अध्याय ४० वा नरहरीचा कुष्ठरोग गेला - शिवभक्त शबरकथा ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, श्रीगुरू गाणगापुरात असताना एक मोठी अद्भुत घटना घडली. वाळलेल्या लाकडाचा वृक्ष झाला. ती कथा मी तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक." एकदा नरहरी नावाचा एक ब्राह्मण गाणगापुरास श्रीगुरुंकडे आला. त्याच्या सगळ्या शरीराला कुष्ठरोग झाला होता. तो श्रीगुरुंच्या पाया पडून म्हणाला, "स्वामी, तुम्ही भक्तवत्सल परमपुरुष आहात. तुमची कीर्ती ऐकून मी तुम्हाला शरण आलो आहे. माझा उद्धार करा. स्वामी, मी मनुष्य म्हणून जन्मास आलो पण दगडासारखे जीवन जगतो आहे. मला भयंकर असा कुष्ठरोग झाला आहे. सगळ्या लोकांनी मला वाळीत टाकले आहे. मी यजुर्वेदाचे अध्य्ययन केले आहे; परंतु भोजनासाठी मला ब्राह्मण म्हणून कोणीही बोलावीत नाहीत. सगळ्या नातलगांनी मला हाकलून लावले आहे. सकाळच्या वेळी कोणीही माझे तोंडसुद्धा पाहत नाही. त्यामुळे मला आता जगण्याचा कंटाळा आला आहे. गतजन्मी मी अनेक पातके केली असणार त्यामुळेच मला हा कर्मभोग भोगावा लागतो आहे. मी आजपर्यंत अनेक व्रते, तीर्थे केली, सर्व देवदेवतांची पूजा केली; पण माझा रोग काही बरा झाला नाही.आता आपल्या चरणांशी आलो आहे. तुम्ही जर माझ्यावर कृपा केली नाहीत तर मी प्राणत्याग करीन." असे बोलून त्याने श्रीगुरुंचे स्तवन केले. त्याचे ते दुःखपूर्ण बोलणे ऐकून श्रीगुरुंना त्याची दया आली. श्रीगुरू त्याला म्हणाले, "तुझ्या पूर्वजन्मातील पापांमुळे तुला हा रोग झाला आहे. मी तुला आता एक उपाय सांगतो. विश्वासाने त्याचे आचरण कर म्हणजे तुझे पाप नाहीसे होईल व तू रोगमुक्त होशील." मग श्रीगुरुंनी त्याला औदुंबराचे एक वाळलेले लाकूड दिले व सांगितले, "हे लाकूड घेऊन तू भीमा-अमरजा संगमावर रोज जा. भीमा नदीच्या पूर्वतीरावर हे लाव. संगमात रोज स्नान कर व या लाकडाला रोज तीन वेळा पाणी घाल. अश्वत्थाची पूजा करीत जा. ज्या दिवशी या लाकडाला पालवी फुटेल. तय दिवशी तुझा कुष्ठरोग नाहीसा होईल. तुझे शरीर शुद्ध होईल." असे सांगून श्रीगुरुंनी नरहरीला निरोप दिला. श्रीगुरुंच्या या बोलण्याने नरहरीला आनंद झाला. त्यांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून तो ते औदुंबराचे लाकुस घेऊन संगमावर गेला. त्याने ते लाकूड संगमेश्वराच्या समोर रोवले. मग त्याने श्रीगुरुंनी सांगितल्याप्रमाणे संगमात स्नान केले, अश्वत्थाची पूजा केली ब कलशांनी पाणी आणून त्या लाकडाला स्नान घातले. हे सगळे तो पूर्णश्रद्धेने त्रिकाल करीत होता. तो काहीही खात-पीत नव्हता. रोजच्या रोज तो त्या लाकडाला पाणी घालत असे. तेथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना हे समजले तेव्हा ते नरहरीची थट्टा करू लागले, "अरे, तू वेडा आहेस की काय ? अरे वेड्या, वाळक्या लाकडाला कधीतरी पालवी फुटेल का ? असे कधी झाले नाही, कोणी पहिले नाही. तुझे पाप नाहीसे होत नाही म्हणून श्रीगुरुंनी तुला हा व्यर्थ उद्योग सांगितला आहे. श्रीगुरुंनी तुझी गंमत केली हे तुला कसे समजले नाही ?" त्यावर नरहरी म्हणाला, "श्रीगुरुंच्या वचनावर माझी दृढश्रद्धा आहे. ते बोलतात तसेच घडते. त्यामुळे या लाकडाला पालवी फुटेपर्यंत मी ही सेवा करीत राहणार आहे." असे सात दिवस लोटले. श्रीगुरुंच्या शिष्यांनी त्यांना नरहरीची सगळी हकीगत सांगितली. लोक नरहरीला काय म्हणाले, नरहरीने त्यांना काय उत्तर दिले हे सर्व त्यांनी श्रीगुरुंना सांगितले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, "अरे, जसा भाव तसे फळ. भक्तीने, श्रद्धेने निर्धारपूर्वक केलेले कार्य कधीच फुकट जात नाही. श्रद्धेत प्रचंड सामर्थ्य असते. श्रद्धेच्या बळावर अलौकिक कार्य घडू शकते. या विषयी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो, ही कथा स्कंदमहापुराणात आली आहे. नैमिषारण्यात यज्ञसत्र सुरु होते. त्यावेळी सूत सर्व ऋषींना अनेक कथा सांगून ज्ञानदानाचे कार्य करीत असत. एके दिवशी 'गुरुभक्ती' या विषयावर सूत बोलत होते, सूत म्हणाले, "दुर्धर असा संसारसागर तरुण जाण्यास गुरुभक्ती हाच एक सुलभ उपाय आहे. आपली गुरुवचनावर दृढ श्रद्धा हवी. दृढ श्रद्धेने गुरुभक्ती केली असता अप्राप्य, असाध्य असे काहीच नसते. गुरूला सामान्य मनुष्य समजू नये. गुरु साक्षात परब्रम्ह परमेश्वर असतात, म्हणून त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागावे. जे आपल्या गुरूची सेवा करतात त्यांच्यावर शंकर प्रसन्न होतात. कारण गुरु हे शिवस्वरूप असतात. मंत्र, तीर्थ, द्विज, देव, ज्योतिषी, औषध व गुरु यांच्यावर ज्याची जशी श्रद्धा असते तसे फळ त्याला मिळते. याची साक्ष पटविण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो. ती श्रवण करा म्हणजे अश्रद्धा दूर होईल. पूर्वी पांचाल देशात सिंहकेतू नावाचा एक राजा होता. त्याच्या पुत्राचे नाव धनंजय आपल्या एका शबर (भिल्ल) सेवकाला बरोबर घेऊन वनात शिकारीला गेला. श्वापदांच्या मागे धावताना तो खूप दमला, म्हणून तो विश्रांतीसाठी थांबला. त्याला खूप तहान लागली होती. त्याने त्या शबर सेवकाला पाणी आणण्यासाठी पाठविले. तो शबर पाणी शोधण्यासाठी वनात फिरत असता त्याला एक जीर्ण मोडके-तोडके मंदिर दिसले. तो त्या मंदिराजवळ गेला. त्या मंदिराच्या चबुतऱ्यावर त्याला एक शिवलिंग दिसले. ते शिवलिंग अत्यंत साधे व सूक्ष्म होते. ते शिवलिंग म्हणजे परमभाग्य असे त्या शबराला वाटले. पूर्वकर्माने प्रेरित झालेल्या त्या शबराने तो शिवलिंग उचलले व राजपुत्राला दाखविले 'युवराज' हे पाहा शिवलिंग. किती सुंदर आहे ! मला येथेच मिळाले." असे तो शबर म्हणाला असता राजपुत्र हसून म्हणाला, "अरे, हे भग्न झालेले शिवलिंग घेऊन तू काय करणार आहेस ? " त्यावर शबर म्हणाला, "मी याची आदरपूर्वक पूजा करीन. आपण मला पूजाविधी सांगा. मला मंत्र- तंत्र काही येत नाही, तरीसुद्धा मी याची भक्तिभावाने पूजा केली तर भगवान शंकर प्रसन्न होतील." शबराचा तो भोळा भाव पाहून राजपुत्राला हसू आले. मग तो म्हणाला, "ठीक आहे. शुद्ध आसनावर या शिवलिंगाची स्थापना कर व संकल्पपूर्वक शुद्ध जलाने अभिषेक कर. गंध, अक्षता, वनपत्रे, फुले, धूप-दीप इत्यादींनी पूजा कर. रोज स्मशानातून चिताभस्म आणून या शिवलिंगाला लेपन कर. घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून पत्नीसह भक्षण कर. त्या शबराने घरी परत आल्यावर ते शिवलिंग आपल्या पत्नीला दाखविले. तो तिला म्हणाला, "भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न आहेत म्हणूनच हे शिवलिंग मला सापडले. आता गुरुउपदेशानुसार याची आपण पूजा करूया." त्याच्या पत्नीने मोठ्या आनंदाने ते मान्य केले. मग एका शुभमुहूर्तावर त्या शबराने शिवलिंगाची स्थापना केली व राजपुत्राने सांगितल्याप्रमाणे दररोज त्या शिवलिंगाची पूजा सुरु केली. तो दररोज स्मशानात जाऊन चिताभस्म आणीत असे. पण एके दिवशी त्याला स्मशानात चिताभस्म मिळाले नाही. त्याने आजूबाजूच्या गावात शोधाशोध केलील पण चिताभस्म मिळाले नाही. शेवटी तो निराशेने पत्नीला म्हणाला, "प्रिये, चिताभस्म मिळत नाही. आता काय करू ? आज माझ्या शिवपूजनात विघ्न निर्माण झाले. पूजेशिवाय मी क्षणभरसुद्धा जिवंत राहू शकणार नाही." चिताभस्म नाही तर पूजा कशी करणार ? गुरूंनी सांगितल्याप्रमाणेच पूजन झाले पाहिजे. नाहीतर ते व्यर्थच ठरणार." आपल्या पतीची ही व्याकुळता पाहून शबरपत्नी म्हणाली, "घाबरू नका, चिंता करू नका. मी उपाय सांगते. आपले हे घर जुनाट झाले आहे.मी स्वतःला या घरात कोंडून घेते. मग तुम्ही घराला आग लावा. मग आपल्याला चिताभस्म मिळेल." शबर म्हणाला, "तू हे काय बोलतेस ? मानवी शरीर धर्मार्थकाममोक्षसाठी श्रेष्ठ साधन आहे. मग तुझ्या या सुखोचित शरीराचा त्याग का बरे करतेस ? मी तुझा घात कसा करू ? मला स्त्रीहत्येचे पाप लागेल. शंकरही प्रसन्न होणार नाहीत." शबरपत्नी म्हणाली, "दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या प्राणांचा त्याग करणे यातच जीवनाची सफलता आहे. मग भगवान सदशिवासाठी प्राणत्याग करावा लागला तर त्यात वाईट ते काय ? शिवाय या देहाचा कधीतरी नाश होणारच. तो सत्कार्यासाठी उपयोगी पडला तर त्यात मला आनंदच आहे, माझे प्राण गेले तरी चालतील, पण शिवपूजनात खंड पडू देऊ नका." आपल्या पत्नीचे हे विचार ऐकून शबराने शेवटी तिला संमती दिली. मग शबरपत्नी स्नानादी करून शिवस्मरण करीत बसली. शबराने घराला आग लावली. त्याला चिताभस्म मिळाले. त्याने चिताभस्माने शिवपूजा पूर्ण केली. पूजा संपल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी त्याने नित्याप्रमाणे आपल्या पत्नीला हाक मारली. हाक मारताच त्याची पत्नी पुढे आली व जळलेले घर होते तसे झाले. हे पाहून शबर आश्चर्यचकित झाला. आपली जळून गेलेली पत्नी परत कशी आली ? आपण स्वप्न तर पाहत नाही ना ? असे त्याला वाटले. त्याने आपल्या पत्नीला विचारले,"तू तर जळून भस्म झाली होतीस, मग येथे कशी आलीस ? आणि घर होते तसे कसे झाले ?" शबरपत्नी म्हणाली, "घराला आग लागल्यानंतर मला काहीच आठवत नाही, मी झोपेत होते. तुम्ही हाक मारलीत तेव्हा प्रसादासाठी येथे आले. आपले घर तर मुळीच जळालेले नाही ." अशाप्रकारे दोघांचा संवाद चालू असताना भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले, शबराने पत्नीसह त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला, तेव्हा भगवान शंकर म्हणाले, "धन्य आहे तुमची भक्ती ! तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला राजपद मिळेल इहलोकातील सर्व सुखे, ऐश्वर्ये तुम्हाला प्राप्त होतील. शेवटी तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल." ही कथा सांगून श्रीगुरू म्हणाले, "सर्व पुण्यकर्मात श्रद्धा पाहिजे. शबराला केवळ श्रद्धेमुळेच उत्तम गती प्राप्त झाली म्हणून श्रद्धा महत्वाची. श्रद्धा नसेल तर बक्की सर्व खटाटोप व्यर्थ आहे, जसा भाव तसे फळ. भक्तीने, श्रद्धेने केलेले कार्य कधीच फुकट जात नाही." मग एके दिवशी श्रीगुरू नरहरीला पाहण्यासाठी संगमावर गेले. नरहरीचे औदुंबराच्या लाकडाला पाणी घालणे चालूच होते. नरहरीची भक्ती पाहून श्रीगुरु प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या कमंडलूतील तीर्थ त्या लाकडावर शिंपडले. त्याचक्षणी त्या लाकडाला पालवी फुटली आणि नरहरीचा रोग नाहीसा झाला. त्याचे शरीर तेजस्वी झाले. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार घातला. तो त्यांची 'इंदुकोटीतेज०' इत्यादी श्लोकांनी स्तुती करू लागला. श्रीगुरुंनी नरहरीला आपल्या मठात नेले. त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला म्हणून मोठे अन्नदान केले. नरहरीला श्रीगुरुंनी आशीर्वाद दिला, "तुला कन्या, पुत्र, धन-गोधन सर्व काही लाभेल. तुझी वंशवृद्धी होईल. आजपासून तू 'योगेश्वर' म्हणून ओळखला जाशील. आमच्या सर्व शिष्यांत तू थोर ठरशील. आता तू कसलीही चिंता करू नकोस. आता तू तुझ्या बायकामुलांना घेऊन ये. सर्वजन आमच्या येथेच राहा. तुला तीन पुत्र होतील. त्यातील एक योगी नावाने प्रसिद्ध होईल. तोही आमची सेवा करील." असा आशीर्वाद देऊन श्रीगुरुंनी नरहरीला (योगेश्वराला) 'विद्या सरस्वती' मंत्र दिला. श्रीगुरुंच्या आदेशानुसार नरहरी आपल्या बायकामुलांसह गाणगापुरात श्रीगुरुंच्या सेवेत आनंदाने राहू लागला. अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'नरहरीचा कुष्ठरोग गेला - शिवभक्त शबरकथा' नावाचा अध्याय चाळीसावा समाप्त. ============================ अध्याय ४१ वा सायंदेवाची गुरुसेवा - काशीयात्रा - त्वष्टाख्यान ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारक सिद्धमुनींना साष्टांग नमस्कार करून हात जोडून म्हणाला, "महाराज, तुम्ही खरोखर संसारसागरतारक आहात. आतापर्यंत श्रीगुरुचरित्र सविस्तर सांगितले आहे . त्यामुळे मी धन्य झालो. माझ्या ठिकाणी सत्यज्ञानाचा उदय झाला. मला तुम्ही गुरुस्मरणी अमृत पाजलेत. माझी तुमच्या चरणी एक विनंती आहे. तुम्ही श्रीगुरुंच्या सान्निध्यात होता, त्यावेळी तेथे आणखी कोण कोण शिष्य होते ? आमच्या पूर्वजांपैकी कोणी तेथे श्रीगुरुंच्या सेवेत होते का ?" नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, "सांगतो. सविस्तर सांगतो, ऐक. तुमचे पूर्वज सायंदेव म्हणून जे होते ते वासरगावात राहत होते. ते श्रीगुरुंचे माहात्म्य ऐकून गाणगापुरास आले. गाणगापूर पाहताच त्यांना अतिशय आनंद झाला.ते लोटांगण घालीत मठात आले. त्यांनी श्रीगुरुंच्या चरणांना वंदन करून त्यांचे उत्तमोत्तम शब्दांत स्तवन केले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ते श्रीगुरुंना म्हणाले, "स्वामी, तुम्ही साक्षात ब्रम्हा-विष्णू-महेशस्वरूप त्रैमूर्ती अवतार आहात. तुम्ही परमात्मा आहात. भक्तवत्सल आहात. तुम्ही शरणागताचे रक्षक आहात. सर्व तीर्थे तुमच्या चरणांशी आहेत. तुमचे माहात्म्य मी काय वर्णन करणार ? तुम्ही वंध्या स्त्रीला कन्या पुत्र दिलेत. वाळलेले लाकूड पल्लवित केलेत. वांझ म्हैस दुभती केलीत. तुम्ही विष्णूस्वरूप आहात. त्रिविक्रमभारतीला तुम्ही विश्वरूप दाखविले. पतिताकरवी वेद म्हणाविलेत असा तुमचा महिमा आहे. तुम्ही भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्रैमूर्ती अवतार घेतला आहे. तुमचा महिमा अगाध आहे." सायंदेवानी असे स्तवन केले असता प्रसन्न झालेले श्रीगुरू त्यांच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले," आता तू संगमावर जा. तेथे स्नान कर व अश्वथाची पूजा करून मठात परत ये. आज तू आमच्याबरोबर भोजन करावयाचे आहे." श्रीगुरुंनी अशी आज्ञा करताच सायंदेव संगमावर जाऊन, स्नान करून व अश्वत्थाची पूजा करून मठात परत आला. त्याने श्रीगुरूंची यथासांग पूजा केली. श्रीगुरुंच्यासमवेत बसले असता त्यांनी सायंदेवाला विचारले, "तुझे नाव, गाव कोणते ? तुझी बायकामुले कोठे असतात ? तुझ्या घरी सर्व ठीक आहे न ?" त्यावर तो म्हणाला, "माझे नाव सायंदेव. उत्तरकांची नावाच्या गावात मी माझ्या बायकामुलांसह राहतो. माझे सगळे लोक संसारी आहेत. मला मात्र आपल्या येथे राहून आपली सेवा करण्याची इच्छा आहे." श्रीगुरू म्हणाले, "अरे, तू येथे कशाला राहतोस ? आमची सेवा करणे वाटते इतके सोपे नाही. आम्ही कधी गावात तर कधी अरण्यात राहतो. तुला कष्ट सोसणार नाहीत." त्यावर सायंदेव म्हणाला, "स्वामी, कितीही कष्ट पडोत, मला त्याची पर्वा नाही. गुरूची सेवा करण्यात कष्ट कसले ? मी सर्व काही सहन करीन." सायंदेवाचा निर्धार पाहून श्रीगुरु म्हणाले, "ठीक आहे. तुला जमेल तशी सेवा कर." सायंदेवाचा आनंद झाला. तो श्रीगुरूंची सेवा करीत मठात राहू लागला. असेच तीन महिने लोटले. एके दिवशी श्रीगुरुंनी त्याच्या धैर्याची परीक्षा पाहण्याचे ठरविले. एके दिवशी श्रीगुरू संगमाकडे निघाले. जाताना त्यांनी फक्त सायंदेवाला बरोबर घेतले. संध्याकाळ झाली. श्रीगुरू अश्वत्थ वृक्षाजवळ सायंदेवाला बोलत बसले. रात्र झाली. श्रीगुरुंनी अघटीत लीला केली. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळू लागला. झाडे उन्मळून पडली. सगळीकडे पाण्याचे पाट वाहू लागले. हवेत एकदम गारवा आला. सायंदेवाने श्रीगुरुंच्या अंगावर पांघरूण घातले, तरी थंडी कमी होईना, म्हणून श्रीगुरू सायंदेवाला म्हणाले, "तू लवकर मठात जा व शेकण्यासाठी विस्तव घेऊन ये, मात्र येताना उजवीकडे किंवा डावीकडे जराही पाहू नकोस." श्रीगुरुंनी सांगितल्याप्रमाणे सायंदेव विस्तव आणण्यासाठी गावाकडे निघाला. मुसळधार पाऊस कोसळत होता. सगळीकडे अंधार होता. रस्ता नित दिसत नव्हता. मधूनमधून विजा चमकत होत्या. त्या प्रकाशात सायंदेव गावाकडे जात होता. तो गाणगापुराच्या वेशीपाशी गेला व द्वापाराला हाक मारून म्हणाला, "श्रीगुरुंसाठी विस्तव हवा आहे, तो दे." द्वारपालाने पेटते निखारे एका पात्रात घालून दिले. ते निखारे घेऊन सायंदेव परत निघाला. त्याने मनात विचार केला. श्रीगुरुंनी मला सांगितले होते, डावी-उजवीकडे पाहू नको." पण असे का सांगितले. त्याला समजेना. तो विजांच्या प्रकाशात परत निघाला. त्याने केवळ जिज्ञासा म्हणून डावी-उजवीकडे पाहतो तर काय ? त्याच्याबरोबर दोन प्रचंड नाग अर्धे उभे राहून, फणा वर करून चालले होते. नागांना पाहताच तो अतिशय घाबरला व संगमाकडे धावत सुटला. त्याच्याबरोबर ते नागही येत होते. श्रीगुरुंचे स्मरण करीत तो संगमाजवळ आला. सहस्त्र दिव्यांच्या प्रकाशात श्रीगुरू अश्वत्थवृक्षाखाली बसले असून, त्यांच्या भोवती अनेक ब्राम्हण वेदपठण करीत बसले आहेत असे त्याला लांबून दिसले. तो जवळ गेला तो श्रीगुरू एकटेच बसले आहेत असे त्याला दिसले. हा काय चमत्कार आहे ? त्याला काहीच समजेना. ते दोन नाग श्रीगुरुंना वंदन करून एकाएकी नाहीसे झाले. अत्यंत घाबरलेल्या सायंदेवाला पाहून श्रीगुरुंनी त्याला विचारले, "अरे सायंदेवा, तू इतका घाबरलेला का दिसतोस ? तुझ्या रक्षणासाठी तर मी ते दोन नाग पाठविले होते. आमची सेवा करणे किती कठीण आहे हे आता तुला समजले ना ? अरे, सेवाधर्म मोठा गहन आहे. दृढभक्तीने सेवा करशील तर कळिकाळाचेही भय तुला वाटणार नाही." सायंदेव श्रीगुरुंच्या पाया पडून म्हणाला, "मला दृढभक्ती कशी करावी, ती कशी असते ते सांगा, म्हणजे माझेही मन तुमच्या चरणी स्थिर राहील." श्रीगुरू म्हणाले, "दृढभक्ती कशी असते याविषयी मी तुला उद्या प्रातःकाली एक कथा सांगेन. आता रात्र झाली आहे. आपण मठात परत जाऊया." मग श्रीगुरू सायंदेवासह मठात परत आले. सायंदेवाची परीक्षा झाली होतीच. दुसऱ्या दिवशी प्रातःकाली श्रीगुरुंनी गुरुभक्तीविषयी कथा सांगण्यास सुरुवात केली. मठातील इतर शिष्यही ती कथा ऐकण्यासाठी श्रीगुरुंच्या समोर आले. श्रीगुरू म्हणाले," एकदा काय झाले, कैलास पर्वतावर शिवपार्वती एकांतात बोलत बसले होते. त्यावेळी पार्वतीने शंकरांना विचारले, "नाथ, गुरुभक्ती कशी असते ते मला सविस्तर सांगा." पार्वतीने असे विचारले असता, शिवशंकर म्हणाले, "एका गुरुभक्तीने सर्वकाही साध्य होते ,शिव तोच गुरु समजावा. अनेक व्रते, अनुष्ठाने करून सुद्धा जी गोष्ट साध्य होत नाही ती गुरुभक्तीने त्वरित साध्य होते. तपानुष्ठान, यज्ञयाग, दानधर्म यात अनेक संकटे येतात. गुरुभक्तीचे तसे नाही. गुरुभक्तीने सर्वकाही लवकर साध्य होते. मात्र गुरुभक्ती निष्ठापूर्वक, दृढतेने करावयास हवी. हे पार्वती, याविषयी मी तुला एक कथा सांगतो. त्वष्टा हा ब्रम्हदेवाचाच अवतार. त्याला एक अत्यंत सुंदर, बुद्धिमान, कार्यकुशल असा पुत्र झाला. त्वष्ट्याने यथासमय त्याचे मौजिबंधन करून त्याला विद्याध्ययनासाठी गुरूगृही पाठविले. ती गुरूगृही राहून आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करीत असे. एके दिबाशी मोठा पाऊस सुरु झाला. गुरूंची पर्णशाला गळू लागली. त्यावेळी गुरु त्या शिष्याला म्हणाले, "ही आमची जीर्ण झालेली पर्णशाला दरवर्षी पावसाळ्यात गळते, म्हणून तू आमच्यासाठी एक भक्कम कधीही न गळणारे घर तयार कर." त्याचवेळी गुरुपत्नी त्या शिष्याला म्हणाली, "माझ्यासाठी एक चांगली कंचुकी आण. ती विणलेली नसावी किंवा शिवलेली नसावी." गुरुपुत्र म्हणाला, "माझ्यासाठी पादुका आण. त्या घालून पाण्यावरून चालता यावे. त्या पादुका मला वाटेल तिथे घेऊन जातील. त्या पादुकांना चिखल लागू नये. अशा पादुका माझ्यासाठी लवकर आण." गुरुकन्या म्हणाली, "माझ्यासाठीसुद्धा काहीतर आण ना ! मला दोन कर्णभूषणे आण. त्याचप्रमाणे मला खेळण्यासाठी हस्तिदंती घरकूल आण. ते कधीही तुटणार नाही, जीर्ण होणार नाही असे असावे. ते एका खांबावर उभे असावे. मी जेथे असेन तेथे ते आपोआप यावे. त्या घरात पाट वगैरे सर्व काही असावे. त्यात ठेवण्यासाठी भांडीकुंडी असावीत. ते सदैव नवे दिसावे. याशिवाय मला स्वयंपाक करण्यास शिकव. स्वयंपाकाची भांडी कधी काळी होऊ नयेत." त्या शिष्याने त्या सर्व वस्तू आणण्याचे कबूल केले. मग सर्वांचा निरोप घेऊन तो निघाला व एका मोठ्या अरण्यात शिरला, आता तो मोठ्या काळजीत पडला. तो विचार करू लागला, "मी एक साधा ब्रम्हचारी ! मला साधी पत्रावळ लावता येत नाही. मग मी या सर्व गोष्टी कशा काय करणार ? आता मला कोण मदत करेल ? ही सांगितलेली सर्व कामे मी लवकर केली नाहीत तर गुरु माझ्यावर रागावतील. मला शाप देतील. मी हे न जमणारे काम का बरे स्वीकारले ? आता प्राणत्याग करणे हाच एक उपाय." असा विचार करीत असताना तो वनातून जात असताना एक अचानक अवधूत त्याला भेटला. तो बालब्रम्हचाऱ्याला म्हणाला, "अरे, तू कोठे चालला आहेस ? तू कसल्यातरी काळजीत दिसतो आहेस. तुझी काय चिंता आहे, मला सांग. दुःख करू नकोस." तो अवधून असे बोलला असता तो बालब्रम्हचारी त्यांच्या पाया पडून म्हणाला, "स्वामी, मला वाचवा ! वाचवा ! मी चिंतासागरात बुडालो आहे. माझे पूर्वपुण्य थोर म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात. तुम्ही साक्षात परमेश्वरच आहात. माझ्यावर गुरुकृपा आहे म्हणूनच या निर्मनुष्य अरण्यात तुम्ही भेटलात. तुमच्या दर्शनाने माझे मन शांत झाले आहे. तुम्ही भक्तवत्सल आहात." असे बोलून त्या बालब्रम्हचाऱ्याने अवधूताच्या चरणांना मिठी मारली. अवधूताने त्याला आलिंगन देऊन त्याची सगळी विचारपूस केली व "तुला कसली चिंता आहे ?" असे विचारले. त्या बालब्रम्हचाऱ्याने आपली सगळी हकीगत सांगितली. आपल्या गुरूंनी, गुरूपत्नीने व त्यांच्या मुलांनी कोणकोणती कामे सांगितली आहेत ते सांगितले. आपण सध्या बालब्रम्हचारी असून न जमणारे कठीण काम स्वीकारले. ते मी कसे करणार ? केले नाही तर गुरु रागावतील, मला शापसुद्धा देतील. यामुळे मला मोठी चिंता लागून राहिली आहे. आता मी काय करू ? मला मार्ग सुचवा." अशी त्याने विनंती केली असता अवधूत म्हणाले, "तू आता काशीक्षेत्री जा. त्यामुळे तुझे काम होईल. काशी महाक्षेत्र असून तेथे सर्व कार्ये सिद्धीला जातात. तेथे जाऊन तू काशीविश्वनाथाची आराधना कर. तेथेच ब्रम्हदेवाला सृष्टीचे व विष्णूला विश्वपालनाचे ज्ञान प्राप्त झाले. तेथेच सर्व साधकांची साधना सफल होते. तू तेथे जा म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. त्या क्षेत्राला 'आनंदकानन' असे म्हणतात. तेथील पुण्याची गणनाच करता येत नाही. त्या काशीक्षेत्रात फिरताना प्रत्येक पावलागणिक अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य होते, यावर विश्वास ठेव. कसलीही चिंता करू नकोस. अवधूताने असे विचारले असता तो ब्रम्हचारी म्हणाला, "मी येथे अरण्यात आहे. मला काशी कोठे आहे वगैरे काहीच माहित नाही. ते आनंदकानन पृथ्वीवर आहे की स्वर्गात आहे ? ते पाताळलोकात आहे की आणखी कोठे मला माहीत नाही. मला तेथे कोण नेणार ? तुम्ही मला न्याल का ? पण तुम्हाला खूप कामे असणार, त्यामुळे मला तेथे न्या मी कसे म्हणू ? " अवधूत म्हणाला, "चिंता करू नकोस. मी तुला घेऊन जातो. तुझ्या निमित्ताने मलाही काशीविश्वनाथाचे दर्शन घडेल. काशीयात्रा नाही तर जीवन व्यर्थ ठरते." असे बोलून त्या अवधूताने योगबलाने एका क्षणात त्या ब्रम्हचाऱ्यास काशीक्षेत्री नेले. तेथे गेल्यावर अवधूताने ब्रम्हचाऱ्यास काशीक्षेत्री नेले. तेथे गेल्यावर अवधूताने ब्रम्हचाऱ्याला तेथे असलेल्या शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते सगळे नीट समजावून सांगितले. सर्वप्रथम मणिकर्णिकेत स्नान करून, विनायकाचे दर्शन घेऊन कंबळेश्वराची पूजा करावी. मग विश्वनाथाचे दर्शन घेऊन जाऊन मणिकर्णिकेत स्नान करावे. मणिकर्णिकेश्वराची पूजा करावी. त्यानंतर कंबळेश्वर, वासुकीश्वर, पर्वतेश्वर, गंगाकेशव, ललितादेवी, जरासंधेश्वर, सोमनाथ, शूळटंकेश्वर, वाराहेश्वर, ब्रम्हेश्वर, अगस्त्येश्वर, कश्यपेश्वर, हरिकेशवनेश्वर, वैद्यनाथ, ध्रुवेश्वर, गोकर्णेश्वर, हाटकेश्वर, अस्थिक्षेप, तटाकतीर, कीकसेश्वर, भारतभूतेश्वर, चित्रगुप्तेश्वर, पाशुपतेश्वर, पितामहेश्वर, कल्लेश्वर, चंद्रेश्वर, विश्वेश्वर, अग्नीश्वर, नागेश्वर, हरिश्चचंद्रेश्वर, चिंतामणीविनायक, सोमनाथ-विनायक, वसिष्ठ, वामदेव, त्रिसंध्येश्वर, विशालाक्ष, धर्मेश्वर, विश्वबाहू, आशाविनायक, वृद्धादित्य, चतुवक्त्रेश्वर, ब्रम्हेश्वर, मनःप्रकामेश्वर, ईशानेश्वर, चंडीश्वर, भवानीशंकर, धुंडिराज, राजराजेश्वर, लागूलेश्वर, नकुलेश्वर, परान्नेश्वर, परद्रव्येश्वर, पाणिग्रहणेश्वर, गंगेश्वर, मोरेश्वर, ज्ञानेश्वर, नंदिकेश्वर, निष्कलंकेश्वर, मार्कंडेयेश्वर, असुरेश्वर, तारकेश्वर, महाकालेश्वर, महेश्वर, मोक्षेश्वर, वीरभद्रेश्वर, अविमुक्तेश्वर, पंचविनायक, आनंदभैरव अशी अंतर्गृहाची यात्रा करून मुक्तीमंडपात यावे व तेथे पुढील मंत्र म्हणावा - अंतर्गृहस्य यात्रेयं यथावद्या मया कृता ! न्युतातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः !! असा मंत्र जपून विश्वनाथाला नमस्कार करावा. मग तेथून दक्षिणमानस यात्रेला सुरुवात करावी. मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाची पूजा करावी व यात्रेचा संकल्प सोडावा. मग मोदादी पंचविनायकाची भक्तिंभावाने पूजा करावी व मग पुढील लिंगाचे दर्शन घ्यावे -धुंडिराज, भवानीशंकर, दंडपाणि, विशालाक्ष यांची पूजा करावी. त्यानंतर धर्मकूपात स्नान करून श्राद्धादी कार्ये करावीत. त्यानंतर धर्मेश्वर, गंगाकेशव, ललितादेवी, जरासंधेश्वर, सोमनाथ, वाराहेश्वर, दशाश्वमेतीर्थ, प्रयागतीर्थ येथे स्नान करून श्राद्धविधी करावा. त्यानंतर दशाश्वमेधेश्वर, प्रयागेश्वर, शीतलेश्वर, बंदीदेवी, सर्वेश्वर, धुंडिराज, तिळभांडेश्वर, रेवाकुंड, मानसकुंड, मानसेश्वर, केदारकुंड, केदारेश्वर, गौरीकुंड, वृद्धकेदारेश्वर, हनुमंतेश्वर, रामेश्वर, सिद्धेश्वर, स्वप्नेश्वर, संगमेश्वर, लोलार्ककूप, गतिप्रदिपेश्वर, अर्कविनायक, पाराशरेश्वर, सन्निहत्यकुंड, कुरुक्षेत्रकुंड, विशाखेश्वरकुंड, अमृतकुंड, दुर्गाविनायक, दुर्गादेवी पूजन, चौसष्टयोगिनी, कुक्कुटद्विज, गोबाई, रेणुका, शंखोद्वार, कामाक्षीकुंड, कामाक्षीदेवी, अयोध्याकुंड, सीतारामदर्शन, लवांकुश, लक्ष्मी, सूर्य, सांबादित्य, वैद्यनाथ, गोदावरी, अगस्त्य, शुक्र, ज्ञानवापी अशा कुंडात स्नान करून देवांची पूजा करावी. ज्ञानेश्वर, दंडपाणि, आनंदभैरव, विश्वनाथ यांची पूजा करावी. अवधूताने त्या बालब्रम्हचाऱ्याला काशीमाहात्म्य सांगून, उत्तरमानस यात्रा कशी करावी हे सांगून काशीतील अनेक तीर्थांचा क्रमही सांगितला. संपूर्ण यात्रा त्याच्याकडून करवून घेतली. काशीतील अनेक कुंडांची, लिंगांची, देवदेवतांची नवे व त्यांचे माहात्म्य सांगितले. ही सर्व यात्रा तू यथाविधी कर म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील." असा आशीर्वाद देऊन तो अवधूत गुप्त झाला. अतिशय आनंदित झालेल्या ब्रम्हचाऱ्याने यथाविधी संपूर्ण यात्रा पूर्ण केली. त्यावेळी प्रसन्न झालेले भगवान शंकर प्रकट झाले व 'तुला हवा असेल तो वर माग' असे म्हणाले. आपल्या गुरूंनी, गुरूपत्नीने व गुरुकन्या-पुत्राने जे जे मागितले होते ते सर्व ब्रम्हचाऱ्याने शंकरांना सांगितले. संतुष्ट झालेले शंकर त्याला म्हणाले, "तुझे गुरुभक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. तू विश्वकर्मा होशील. तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. तुला सृष्टीरचनेचे सामर्थ्य प्राप्त होईल." असा वर देऊन भगवान शंकर गुप्त झाले. या वरप्राप्तीने आनंदित झालेल्या त्या ब्रम्हचाऱ्याने आपल्या नावाचे विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले. मग त्याने भगवान शंकरांनी दिलेल्या सामर्थ्याने आपले गुरु, गुरुपत्नी, गुरुकन्यापुत्र यांनी जे जे मागितले होते ते ते सर्व निर्माण करून सर्व वस्तूंसह तो गुरूगृही परत आला. त्याने आपल्या गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. गुरु, गुरुपत्नी व गुरुकन्यापुत्र यांनी ज्या ज्या वस्तू मागितल्या होत्या त्या त्या वस्तू त्यांना दिल्या. त्याची गुरुभक्ती पाहून गुरूंनी त्याला अनेक आशीर्वाद दिले. गुरु त्याला म्हणाले, "तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. तुझ्या घरी अष्टेश्वर्स अष्टैश्वर्ये नांदतील. त्रैमूर्ती तुला वश होतील. आचंद्रसूर्य तुझे नाव चिरंजीव राहील. तू चौदा विद्या, चौसष्ट कला यांचा ज्ञात होशील. अष्टसिद्धी, नवनिधी तुझ्या अधीन होतील. तुला सृष्टीची रचना करताना कोणतीही अडचण येणार नाही." असा गुरूंनी त्याला वर दिला. ही कथा सांगून भगवान शंकर पार्वतीला म्हणाले, "पार्वती, गुरुभक्ती ही अशी असते. एका गुरुभक्तीनेच मनुष्य भवसागर तरुण जाऊ शकतो. ज्याच्या ठिकाणी दृढभक्ती असते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, म्हणूनच गुरूच त्रैमूर्ती आहे असे मानावे. श्रीगुरू नृसिंहसरस्वती सायंदेवाला व इतर शिष्यांना विश्वकर्माख्यान व गुरुभक्तीमहिमा सांगत होते तोपर्यंत सकाळ झाली. सायंदेव श्रीगुरुंच्या चरणांना वंदन करून म्हणाला, "स्वामी, तुम्ही मला काशीयात्रेविषयी सांगत होतात त्याचवेळी मी तुमच्याबरोबर काशीक्षेत्रातच फिरत होतो, असे मला जाणवत होते. त्यावेळी मी ते स्वप्न पाहत होतो की सत्य ? मला माहित नाही." असे बोलून त्याने तिथल्या तिथे 'आदौ ब्रम्ह त्वमेव जगतां०.. ' हे तयंत प्रासादिक संस्कृत स्तोत्र रचून श्रीगुरुंना ऐकविले आणि म्हणाला, "स्वामी, आपणच त्रैमूर्तीचा अवतार आहात. केवळ भक्तजनांच्या उद्धारासाठी आपण पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. मला तुम्ही चारी पुरुषार्थ प्राप्त करून दिलेत. आपणच विश्वनाथ असून आपल्या चरणांशी काशी आहे. त्यावर प्रसन्न झालेले श्रीगुरू म्हणाले, "तूच आमचा श्रेष्ठ भक्त आहेस, म्हणूनच तुला मी काशी दाखविली. तुझ्या एकवीस पिढ्यांना या यात्रेचे फळ मिळेल. आता तू तुझ्या बायकामुलांसह येथे राहून आमची सेवा कर, पण काही झाले तरी यवनाची सेवा करू नकोस. जर केलीस तर तुझा नाश होईल." सायंदेवाला अतिशय समाधान वाटले. इतर शिष्यांनीसुद्धा 'कंडेनिंदु भक्तजन०.. ' इत्यादी कन्नड स्तोत्रे तयार करून म्हटली. ती ऐकून श्रीगुरू अतिशय प्रसन्न झाले. मग सायंदेव आपल्या गावी गेला व आपल्या बायकामुलांना घेऊन मठात आला. सर्वांनी श्रीगुरुंच्या चरणांना वंदन केले, मग सर्व शिष्यांना आपल्याभोवती बसवून श्रीगुरुंनी त्यांना उपदेश केला. श्रीगुरू सायंदेवाला म्हणाले, "तुझ्या या ज्येष्ठपुत्र नागनाथाला पूर्णायुष्य प्राप्त होईल. त्याची वंशवृद्धी होईल. तो माझा परमभक्त होईल. तुला आणखी एक पत्नी असेल. तिला चार पुत्र होतील. त्यांना सर्वप्रकारची सुखे प्राप्त होतील. तुझ्या ज्येष्ठ पुत्राची सर्वत्र मोठी कीर्ती होईल. आता तुंम्ही सर्वांनी संगमावर जाऊन स्नान करून यावे." मग सार्वजन संगमावर जाऊन विधिवत स्नान करून व अश्वत्थाची पूजा करून मठात आले. मग श्रीगुरू म्हणाले, "आज अनंत चतुर्दशी आहे. सर्वजण आज श्रीदेवअनंताची पूजा करतात." त्यावर सायंदेव म्हणाला, "स्वामी, तुमची चरणसेवा हेच आमच्यासाठी अनंतव्रत आहे. तथापि, या व्रताचे माहात्म्य काय आहे ? या व्रताचा विधी कसा असतो ? या व्रताचे फळ काय ? आणि पूर्वी हे व्रत कोणी केले ? हे सगळे आम्हाला सविस्तर सांगा." सायंदेवाने असे विचारले असता श्रीगुरुंनी 'अनंतव्रत' सांगण्याचे मान्य केले. अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'सायंदेवाची गुरुसेवा - काशीयात्रा - त्वष्टाख्यान' नावाचा अध्याय एकेचाळीसावा समाप्त. ================================ अध्याय ४२ वा अनंतव्रत कथा - कौडिण्य आख्यान ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। श्रीगुरू सायंदेवाला म्हणाले, "तू मला अनंतव्रताविषयी विचारले होतेस. या अनंतपूजेचे माहात्म्य काय आहे व ही अनंतव्रतपूजा पूर्वी कोणी केली होती ? या व्रतपूजेचे फळ काय याविषयी मी तुला सांगतो, ते ऐक. हे अनंतव्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते. त्या व्रतप्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. त्याचे असे झाले, कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते. त्या द्यूतक्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. युधिष्ठीर अर्ध्या राज्याचा स्वामी, पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होता. पांडव वनसात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठविले; परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण केले. पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला. श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले. त्याची यथासांग पूजा केली. मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली - "हे भक्तवत्सला, कृष्णनाथा, तुझा जयजयकार असो. हे कृष्णा, तूच या विश्वाचे उत्पत्ती-स्थिती-लय यास कारण आहेस. तूच ब्रम्हा-विष्णू-महेश आहेस. दृष्ट-दुर्जनांचा नाश व संतसज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस. पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस, मग आमची उपेक्षा का करतोस ? तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग. तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहेत ? आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल ?" सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, "तुमचे गेलेले वैभव परत मिळविण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो. ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल. सर्व व्रतांमध्ये अनंतव्रत अतयंत श्रेष्ठ व प्रभावी आहे. ते व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तो अनंत म्हणजे शेषशायी विष्णू तेच माझे मूळ रुप आहे .मीच तो नारायण. दृष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेवकुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला. मीच जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे. मीच सर्वकाही आहे. मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे. त्या अनंताची, म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा. या व्रताने तुमचे सर्वतोपरी लाक्यान होईल." "हे व्रत कोणत्या दिवशी करावे ? कसे करावे ? हे आम्हाला सविस्तर सांग" अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला, "भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षातील चतुर्दशीला ही व्रतपूजा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा कृतयुगातील आहे. वसिष्ठगोत्री सुमंतु नावाचा एक ब्राम्हण होता. भृगकन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती. त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव सुशीला. दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली. सुशीला अगदी नावासारखीच होती. ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करीत असे. घरातील केरवारा, सडासारवण करणे, अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे, देवपूजेची तयारी करणे, घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनःपूर्वक करीत असे. सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी श्रौतकर्मे थांबली होती, म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली. तिचे नाव कर्कशा. ती अगदी नावासारखी होती. ती अत्यंत दृष्ट बुद्धीची होती. ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे. सुशीला तिची सावत्र मुलगी. ती सुशीलेचा छळ करीत असे. सुशीला आता उपवर झाली. सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. सावत्रआई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते. यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे. आपल्या कन्येचा विवाह लौकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते. आणि तसा योग जुळून आला. एके दिवशी कौंडीण्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला. त्याने सुशीलेला पहिले व तिला मागणी घातली. सुमंतूला कौंडीण्य जावई म्हणून पसंत पडला.एका शुभमुहूर्तावर सुशीला आणि कौंडीण्य जावई यांचा विवाह झाला. सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशीला व कौंडीण्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले. आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले. कौंडीण्याला सासुरवाडीस राहणे पसंत नव्हते. आपण आता दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरविले. मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली. जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला, "कन्या आणि जावई जात आहेत. त्याच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर." हे ऐकताच ती कर्कशा संतापली. काही एक न बोलता ती. घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले. तिघांना मोठे आश्चर्य वाटले. सुमंतूला तर फार वाईट वाटले. त्याने स्वयंपाक घरात शोधाशोध केली. एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले. तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या-जावयाला निरोप दिला. सुशीला आणि कौंडीण्य एका रथात बसून निघाले. दुपारच्या वेळी कौंडीण्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबविला. कौंडीण्य अनुष्ठानासाठी गेला. सुशीला रथातच बसून राहिली. तिने सहज नदीच्या तीराकडे पहिले. तेथे काही स्त्रिया एकत्र जमून कसलीही पूजा करीत होत्या. त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या. निरनिराळ्या कलशांची पूजा करीत होत्या. सुशिलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले, "तुम्ही ही कसली पूजा करीत आहात ? या पूजेचा विधी कसा असतो ? ही पूजा केली असता काय फळ मिळते, हे सर्व मला सांगाल का ?" त्या स्त्रिया म्हणाल्या, "बस. आम्ही तुला सर्व काही सांगतो. आम्ही ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करावयाची असते. याला अनंतचतुर्दशी व्रत असे म्हणतात. ही अनंतपूजा दरवर्षी केली असता सर्वप्रकारच्या सुखसमृद्धीची प्राप्ती होते. अनंतस्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते. ही पूजा कशी करावयाची याचा थोडक्यात विधी असा : भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंतरुपी श्रीविष्णूची पूजा करावयाची असते. हे एक कौटुंबिक व्रत आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवावयाचे असते. या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असेलेला एक रेशमाचा दोरा असतो. पूर्वी ज्याने हे व्रत चालविलेले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवावयाचा असतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करावयाची असते. चौरंगावर दर्भाच्या बनविलेल्या सात फण्यांच्या शेषरुपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यापुढे अनंत दोरक ठेवावयाचा. त्याची पूजा करावी. चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे दोन जलपूर्ण कलश ठेवावेत. त्यांची पूजा करावी. चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ' ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची 'अनंत' म्हणून मनात धारणा करावी. नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशांवर ठेवून पुरुषसूक्त मंत्रांनी त्यांची पूजा करावी. या अनंतपूजेत १४ या संख्येला फार महत्व आहे. अनंत दोरकाला चौदा गाठी असतात. नैवेद्याला १४ लाडू, करंज्या, अपूप इत्यादी पदार्थ असावेत. हे व्रत किमान चौदा वर्षे करावयाचे असते. चौदा वर्षे झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे. या व्रतामुळे सर्वप्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व सुखसमृद्धींची प्राप्ती होते. अनंतस्वरुपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते. अनंतव्रताची अशी माहिती सांगून त्या सुशीलेला म्हणाल्या, "आजच अनंत चतुर्दशी आहे. तू आजच आमच्या बरोबर ही व्रतपूजा कर, त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझे मनोकामना पूर्ण होईल." सुशिलेने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांच्यासमवेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली. सुशीला आणि कौंडीण्य रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावतीसमान नगर लागले. हे कोणते नगर ? हे कोणाचे नगर आहे ? त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. "स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात ! या नगराचे राज्य तुमचेच आहे." असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभवसंपन्न राजप्रसादात नेले. अनंतपूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते. एके दिवशी कौंडीण्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले, "हे हातावर तू काय बांधले आहेस ? " सुशीला म्हणाली, "हा अनंत आहे. मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्यामुळे आपल्याला ही सुखसमृद्धी प्राप्त झाली आहे." हे ऐकताच कौंडीण्याला राग आला. तो म्हणाला, "आपल्याला सुखसमृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानामुळे. मी केलेल्या खडतर तश्चर्येने. त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही." असे म्हणून त्याने तो अनंतदोरक हिसकावून घेतला व अग्नीत टाकला. अनंताचा कोप झाला. अनंतव्रताचा अपमान झाला. कौंडीण्याची सगळी संपत्त्ती नष्ट झाली. चोरांनी सगळी संपत्ती चोरून गेली. त्याच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले. सुशिलेला अतिशय दुःख झाले. ती शोक करू लागली. प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला. सुशीला आणि कौंडीण्य एकवस्त्रानिशी वनात भटकू लागली. कौंडीण्याचे डोळे उघडले. त्याचा गर्व नाहीसा झाला. पश्चातापदग्ध झालेला तो शोक करीत, अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला. जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला,"तुम्हाला अनंत कोठे दिसला का ?" प्रत्येकजण 'नाही' असे उत्तर देत असे. त्या वनात कौंडीण्याला एक आम्रवृक्ष दिसला. त्या वृक्षावर खूप फळे होती, पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता. कौंडीण्याने त्या वृक्षाला विचारले, "तू भगवान अनंताला पाहिलेस का ?" वृक्ष म्हणाला, "नाही. मी पाहिला नाही. तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा." पुढे त्याला एक बैल दिसला. त्याच्यापुढे भरपूर चारा होता, पण त्याला तो खाताच येत नव्हता. "तू अनंताला पाहिलेस का ?" असे कौंडीण्याने त्याला विचारले. त्याने 'नाही' असे सांगितले. कौंडीण्य पुढे गेला. त्याला दोन सरोवरे दिसली, पण त्यातले पाणी कुणीच पीत नव्हते. त्यांनीही "आम्ही अनंत पाहिला नाही. तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत ही परिस्थिती देवाला सांगा." असेच सांगितले. पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला. ते दोघे नुसतेच उभे होते. कोणी काही बोलत नव्हते. काही सांगत नव्हते. तेव्हा कौंडीण्य दुःखी, कष्टी झाला. जमिनीवर पडून शोक करू लागला. 'अनंत, अनंत' अशा हाका मारू लागला. त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. तो वृद्ध ब्राम्हणरूपाने तेथे प्रकट झाला. कौंडीण्याने त्याच्या पायांवर डोके ठेवून विचारले, "तुम्ही तरी अनंत कोठे पाहिलात का ?" त्यावेळी 'मीच तो अनंत' असे तो ब्राम्हण म्हणाला आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले. त्यांनी कौंडीण्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले. भगवान अनंत विष्णूने कौंडीण्याला वर दिला. तू धर्मशील होशील. तुला कधीही दारिद्र्य येणार नाही. तू शाश्वत वैकुंठलोकात राहशील." श्रीकृष्ण म्हणाला, "भगवान अनंत विष्णूने कौंडीण्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष, बैल, दोन सरोवरे, गाढव, हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का ?" असे विचारले असता तेव्हा विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, "तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राम्हण होता; परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता. त्याने कुणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली. त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईनासे झाले. तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता. त्याने बरेच दान केले होते; पण त्याला त्या दानाचा गर्व होता, त्यामुळे आता त्याच्यापुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते. तुला ती दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या. दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकीनांच दान देत असत. त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग नाही झाला, म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पीत नाही. तुला जो गदर्भ दिसला तो तुझा क्रोध होय. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गदर्भाचा जन्म मिळाला. तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्येचा झालेला गर्व. तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला. तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास. सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस, गर्व, अहंकार, देवाधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले. आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा व अनंतव्रत कर, म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल. मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसु नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील." कौंडीण्याला सगळे पटले. त्याचा गर्व नाहीसा झाला. त्याने घरी जाऊन पुन्हा सुशीलेसह अनंतचतुर्दशीचे व्रत केले. त्याला अनंत वैभव प्राप्त झाले. ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, "अनंत व्रताचा महिमा हा असा आहे. या व्रतामुळे कौंडीण्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले. त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे व्रत केलेत तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल." श्रीगुरू नृसिंहसरस्वती शिष्यांना म्हणाले, "श्रीकृष्णाच्या सांगण्या-नुसार पांडवांनी वनवासात असताना अनंतचतुर्दशीचे व्रत केले त्यामुळे त्यांना गेलेले राज्य पुन्हा प्राप्त झाले. हे व्रत सर्व स्त्री-पुरुषांनी करावे. त्यामुळे चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते." श्रीगुरू सायंदेवाला म्हणाले, "तुझे गोत्र कौंडीण्य आहे. तू जर हे व्रत करशील तर तुला मोठे पुण्य प्राप्त होईल." श्रीगुरुंच्या आज्ञेनुसार सायंदेवाने ते व्रत केले. त्याने श्रीगुरूंची मोठ्या थाटात यथासंग पूजा केली. ब्राम्हणांना भोजन देऊन त्यानं संतुष्ट केले. मग तो आपल्या परिवारासह गाणगापुरात राहून श्रीगुरूंची सेवा करू लागला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, तुझा पूर्वज सायंदेव याने श्रीगुरूंची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतले." अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'अनंतव्रत कथा - कौडिण्य आख्यान' नावाचा अध्याय बेचाळीसावा समाप्त. ================================ अध्याय ४३ वा विमर्षण राजाची कथा - विणकरास मल्लिकार्जुन दर्शन ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। "मला आता पुढे काय झाले ते कृपा करून सांगा. पुढचे श्रीगुरुचरित्र ऐकण्यास मी आतुर झालो आहे." असे नामधारक म्हणाला असता सिद्धयोगी पुढची कथा सांगू लागले. श्रीगुरुंचे अनेक शिष्यभक्त होते. त्यांना एक विणकर (कोष्टी) श्रीगुरूंचा परमभक्त होता. तो आपले नेहमीचे काम संपले की संध्याकाळी श्रीगुरुंच्या मठात येत असे व श्रीगुरूंची सेवा म्हणून मठाच्या आवारातील केर काढून श्रीगुरुंना लांबूनच नमस्कार करीत असे. हा त्याचा क्रम कित्येक दिवस चालू होता. एकदा शिवरात्री पर्व जवळ आले असता त्या विणकराचे आई-वडील व इतर लोकांनी श्रीशैल्य यात्रेला जाण्याचे ठरविले. "तू पण आमच्याबरोबर यात्रेला चल. शिवरात्रीला श्रीमल्लिकार्जुनाचे दर्शन घेतले असता मोठे पुण्य मिळते." असे सांगून सर्वांनी त्या विणकराला खूप आग्रह केला. त्यावर तो म्हणाला, "मी येणार नाही. तुम्ही सर्व मूर्ख, अज्ञानी आहात. माझा श्रीशैल्यपर्वत येथेच आहे. श्रीगुरूंचा मठ हाच श्रीशैल्य पर्वत व श्रीगुरू हेच मल्लिकार्जुन. श्रीगुरुंचे चरण सोडून मी कोठेही येणार नाही." सगळे लोक त्याला हसले व यात्रेला निघून गेले. तो एकटाच श्रीगुरूंची सेवा करण्यासाठी मागे राहिला नेहमीप्रमाणे तो मठाची झाडलोट करण्यासाठी आला. श्रीगुरुंनी त्याला विचारले, "अरे, तुझे सगळे लोक श्रीशैल्य यात्रेला निघाले. मग तू का नाही गेलास ?" तो विणकर म्हणाला, "स्वामी, तुमच्या चरणांशी माझी तीर्थयात्रा आहे. सर्व तीर्थे तुमच्या चरणाशी असताना लोक मुर्खासारखे तीर्थयात्रेला जातात व पाषाणाचे दर्शन घेतात, याला काय म्हणावे ?" पुढे माघ वद्य चतुर्दशीला शिवरात्र आली. दोन प्रहरी श्रीगुरू संगमावर होते. त्या विणकराने शिवरात्रीचा उपवास केला होता. त्याने संगमात स्नान करून श्रीगुरुंच्या चरणांचे दर्शन घेतले. श्रीगुरू त्याला म्हणाले, "अरे, तू एकटाच कसा मागे राहिलास ? तू श्रीशैल्य पाहिला आहेस का ? ती यात्रा कधी पाहिली आहेस का ?" त्यावर तो विणकर म्हणाला, "स्वामी, तुमचे चरणदर्शन हीच माझी यात्रा ! तुमच्या चरणदर्शनाने सर्व यात्रा केल्याचे पुण्य मला मिळते." त्याचा भक्तिभाव पाहून श्रीगुरू म्हणाले, "चल, मी तुला यात्रा दाखवितो. आंत माझ्या पादुकांना घट्ट धरून ठेव व डोळे झाकून घे." त्या विणकराने तसे केले असता श्रीगुरुंनी एका क्षणात श्रीशैल्य पर्वतावर नेले व डोळे उघडण्यास सांगितले. त्या विणकराने डोळे उघडून सभोवती पाहिले, तो खरोखरच आपण श्रीशैल्यपर्वतावर आलो आहोत असे त्याला दिसले. श्रीगुरू म्हणाले, "अरे, असे काय बघत बसला आहेस ? लवकर जा व दर्शन घे . क्षौरही कर." मग तो विणकर देवदर्शन करून स्नान करण्यासाठी गेला. तो तेथे त्याला आई-वडील व त्याच्या गावातले लोक यात्रेला आलेले दिसले. त्यांनी त्याला विचारले, "आमच्याबरोबर चाल म्हटले तर आला नाहीस, मग असा लपत-छुपत का आलास ? " त्यावर तो विणकर म्हणाला, "छे, मी तुमच्या मागोमाग नाही आलो. श्रीगुरू आणि मी आजच दुपारी निघालो. श्रीगुरुंनी मला एका क्षणात येथे आणले. मी आत्ताच आलो आहे." पण त्याच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. हा खोटे बोलतो आहे असेच सर्वांना वाटले. मग तो विणकर स्नान करून व पूजासाहित्य घेऊन मंदिरात गेला. त्यावेळी त्याला शिवलिंगावर साक्षात श्रीगुरू बसलेले दिसले. लोक शिवलिंगाची म्हणून पूजा करीत होते, ती पूजा श्रीगुरुंचीच होत होती. तो विणकर त्यांना म्हणाला, "स्वामी, तुम्ही साक्षात शंकर आहात. मल्लिकार्जुन आहात. तुम्ही जवळ असताना हे लोक इतक्या दूर कशासाठी येतात ? मी तुम्हाला शिवलिंगाच्या स्थानी पाहिले. मग येण्याची गरज काय ?" त्यावर श्रीगुरू म्हणाले, "परमेश्वर सर्वत्र आहे ही गोष्ट खरीच. तथापि स्थानमाहात्म्यही असतेच. यासंबंधी एक कथा तुला सांगतो. ही कथा स्कंद पुराणात आलेली आहे. माघ वद्य चतुर्दशीला म्हणजे शिवरात्रीला श्रीपर्वताचे माहात्म्य फार मोठे आहे. ती कथा ऐक. श्रीगुरुंनी सांगितलेली कथा सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले, विमर्षण राजाची कथा-खूप वर्षापूर्वी किरात देशात विमर्षण नावाचा एक राजा होता. तों अत्यंत पराक्रमी, शूर होता. तो सदैव शिकार, हिंसा, मद्यमांस सेवन करीत असे. तो अत्यंत निर्दयी होता. अधर्माचरण करण्यात त्याला काहीही वावगे वाटत नसे. चारही वर्णातील स्त्रियांचा उपभोग घेत असे. असे असले तरी तो मोठा शिवभक्त होता. तो भगवान सदाशिवाची नित्यनेमाने पूजाअर्चा करीत असे. त्याच्या पत्नीचे नाव होते कुमुव्द्ती. ती मोठी चतुर व गुणवती होती. एकदा तिने आपल्या पतीला एकांतात विचारले, "नाथ, तुम्ही भगवान सदाशिवाची नित्य पूजा-अर्चा करता, सदाशिवापुढे भक्तिभावाने नृत्य-गायन करता, शिवकथा ऐकता, मग असे असतानाही तुमच्या हातातून रोज पापकर्मे होतात, अनेकांची हत्या होते हे कसे काय ? असे का बरे होते ?" राजा विमर्षण म्हणाला, "तू विचारलेस म्हणून सांगतो. मला पूर्वजन्मातील बरेच काही आठवते, ते ऐक. मागील जन्मी मी पंपानगरीत कुत्रा म्हणून जन्मास आलो. एकदा माघ महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी एका शिवमंदिरासमोर येउन उभा राहिलो. मंदिरात शिवशंकराची पूजा-अर्चा चालू होती. मी ती लक्षपूर्वक पाहत होतो. त्यावेळी एका सेवकाने मला काठीने मारले. तेव्हा मी उजव्या बाजूने पळून शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली व पुन्हा होतो तेथे येउन उभा राहिलो. त्यावेळी त्या सेवकाने अत्यंत रागाने मला काठी मारली. वर्मी घाव लागल्याने मी तेथेच प्राण सोडले.तेवढ्या पुण्यकर्माने मला या जन्मी राजदेह प्राप्त झाला. आता मी दुराचारी का आहे ? कारण कुत्र्याचे काही गुणदोष माझ्यात शिल्लक आहेत. मी सध्या जे वागतो ते चांगले नाही हे मला कळते, तरीही पूर्वसंस्कारामुळे माझ्या हातून वाईट कर्म घडते." राणी कुमुद्वतीने विचारले, "तुम्हाला पूर्वजन्माचे ज्ञान आहे, तर आता मला सांगा, गतजन्मी मी कोण होते ?" राजा म्हणाला, "तू गतजन्मी कबुतरी होतीस. तू मांसाचा तुकडा तोंडात धरून जात असता एका ससाण्याने तुझा पाठलाग केला. तू शिवमंदिराला तीन प्रदक्षिणा घालून शिखरावर बसलीस.तू खूप दमलीस. तेवढ्यात ससाण्याने तुझ्यावर हल्ला केला. तू शिवमंदिरासमोर मारून पडलीस. त्या पुण्याने तू या जन्मी राहिलीस." राणी म्हणाली, "तुम्ही त्रिकालज्ञानी आहात. मोठे पुण्यपुरुष आहात. आता यानंतर आपल्या दोघांना कोणकोणते जन्म मिळतील ते सांगा." राजा म्हणाला, "हे चंद्रमुखी, मी पुढील जन्मी सिंधुदेशाचा राजा होईन. तू जया नावाची राजकन्या होशील. त्या जन्मीही तुझा माझ्याशी विवाह होईल. तिसऱ्या जन्मी मी सौराष्ट्र देशाचा राजा होईन. तू कलिंग देशात जन्म घेशील व माझ्याशी विवाह करशील.चौथ्या जन्मी मी गांधार देशाचा राजा होईन व तू मगध देशात जन्म घेशील त्याही वेळी तुझा माझ्याशीच विवाह होईल. पाचव्या जन्मी मी अवंतीचा राजा होईन. तू दाशार्ह राजाची कन्या होशील व मला वरशील. सहाव्या जन्मी मी आनार्त देशाचा राजा होईन व तू ययातीराजाची कन्या होशील व तुझा माझ्याशी विवाह होईल. सातव्या जन्मी मी पांड्यराजा होईन व तू पद्मराज कन्या वसुमती म्हणून जन्म घेशील व माझीच पत्नी होशील. त्या जन्मात मी मोठी कीर्ती मिळवीन. शिवप्रसादाने मी शत्रूंना शिक्षा करीन. धर्माची वाढ करीन. सतत शिवभजनात गढून जाईन. मग त्या जन्मी मी पुत्राला राज्य देऊन तपश्चर्येला वनात जाईन. अगस्तीऋषींना शरण जाईन व शिवदीक्षा घेईन. मग तुझ्या समवेत कैलासपदाला जाईन." ही कथा सांगून श्रीगुरू विणकराला म्हणाले, "आता तुला स्थान-माहात्म्य कसे असते हे लक्षात आले असेल. त्या कुत्र्याला शिवरात्रीच्या दिवशी अजाणतेपणे उपवास घडला. त्याने शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली व त्याला शिवदर्शन घडले. त्यामुळेच त्याची पशु इत्यादी योनींतून मुक्तता झाली, सात जन्म राजवैभव प्राप्त झाले व शेवटी मोक्षप्राप्ती झाली. त्या कबुतरीने कळसाला प्रदक्षिणा घातली व तेवढ्या पुण्याने तिलाही सात जन्म राजवैभव प्राप्त झाले व शेवटी मुक्तीही मिळाली. यावरून विशिष्ट तिथी, दिनविशेष, तीर्थक्षेत्र, देवस्थान यांचे माहात्म्य किती अलौकिक असते हे तुझ्या लक्षात आले असेल. म्हणूनच केवळ सामान्य लोकच नव्हे, तर मोठे ऋषीमुनी, तपस्वी तीर्थयात्रा करतात. देवदर्शन घेतात. गाणगापुरातील लोक इतक्या दूर अंतरावर तीर्थयात्रेसाठी आले हे अगदी योग्यच. गाणगापुरात संगमात कल्लेश्वराचे मंदिर आहे. तो कल्लेश्वर म्हणजे श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुनच आहे. या भावनेने त्याची नित्य पूजा-अर्चा कर." श्रीगुरू विणकराला घेऊन क्षणार्धात गाणगापुरात संगमावर आले. ते संगमावर थांबले व विणकरास मठात पाठविले. गावातले लोक श्रीगुरुंना शोधत होते. त्यावेळी विणकर मठात आला. लोकांनी त्याला विचारले, "तू होतास कुठे ? आणि हे क्षौर का केलेस ?" तेव्हा विणकराने सर्व काही प्रांजळपणे सांगितले व श्रीगुरू संगमावर आहेत असे सांगितले. काही लोकांचा विणकराच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता, पण काही लोकांना श्रीगुरुंच्या अलौकिक सामर्थ्याची कल्पना असल्याने त्यांनी विणकराचे बोलणे खरे मानून त्यांच्या श्रीगुरुंवरील श्रद्धेबद्दल कौतुक केले. मग सर्वांनी संगमावर जाऊन, श्रीगुरुंचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केली. काही दिवसांनी श्रीशैल्याबद्दल गेलेले लोक परत आले. त्यांनी श्रीगुरू व विणकर श्रीशैल्ययात्रेला आले होते असे सांगताच सर्वांना पुन्हा एकदा श्रीगुरुंच्या अलौकिक सामर्थ्याची खात्री पटली. अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'विमर्षण राजाची कथा - विणकरास मल्लिकार्जुन दर्शन ' नावाचा अध्याय त्रेचाळीसावा समाप्त. ।।श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ।।

Search

Search here.