श्री गुरुचरित्र अध्याय ४४ ते ५२
ग्रंथ - पोथी > श्री गुरुचरित्र मराठी कथासार Posted at 2019-02-17 15:11:54
श्री गुरुचरित्र पारायण - दिवस सातवा अध्याय ४४ ते ५२
।। श्री गणेशाय नमः ।।
अध्याय ४४ वा
नंदी ब्राम्हणाचा कुष्ठरोग घालविला
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक सिद्धांच्या चरणांना वंदन करून म्हणाला, "तुमचे भाग्य अतिथोर. कारण तुम्ही श्रीगुरुचरित्र प्रत्यक्ष पाहिले आहे. तुम्हाला परब्रम्हाचे दर्शन घडले आहे. आज, तुमच्या कृपेने श्रीगुरुचरित्रामृत प्राशन करावयास मिळाले आहे. माझे दैन्य, दुःख नाहीसे झाले. सर्व काही लाधले. मागे तुम्ही सांगितले होते, की श्रीगुरूनृसिंहसरस्वती संगमावर राहिले. मग पुढे काय झाले ते मला सांगा," सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "ऐक. सर्वकाही सविस्तर सांगतो.एकदा एक मोठी विचित्र घटना घडली. नंदी नावाचा एक ब्राम्हण होता. त्याच्या सर्वांगाला श्वेतकुष्ठ झाले होते. ते नाहीसे व्हावे म्हणून तो तुळजापुरला गेला. तेथे त्याने तीन वर्षे तुळजाभवानीची आराधना केली. अनेक व्रतोपवास केले. तेथे त्याला असा आदेश मिळाला ,की त्याने चंदला परमेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन तिची आराधना करावी. तेही त्याने केले. सात महिने पुरश्चरणादी व्रते केली. एके दिवशी रात्री देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला, 'तू गाणगापुरात जा. तेथे मनुष्यवेषधारी त्रैमूर्तींचे अवतार श्रीगुरू नृसिंहसरस्वती आहेत. तेथे तुझा रोग नाहीसा होईल." त्यावर नंदी म्हणाला, "हे आधीच सांगितले असते तर इतका त्रास तरी सोसावा लागला नसता. प्रथम मी तुळजाभवानीची आराधना केली. नंतर तुझ्याकडे येण्याचा आदेश मिळाला. मग आता मला मनुष्याकडे का पाठ्वितेस? तू स्वतःला जगदंबा म्हणवितेस, मग तुला रोग का बरे करता येत नाही ?
तुझे देवत्व कळले मला ! आता मी कोठेही जाणार नाही. माझा रोग बरा होईपर्यंत मी येथेच पुरश्चरण करीत बसणार ! दुर्दैव माझे ! दुसरे काय ? 'तू मनुष्याकडे जा !' असे तू कसे म्हणू शकतेस ? मी सात महिने विनाकारण कष्ट सोसले. आता मी मरो किंवा जगो. मी कोठेही जाणार नाही." असे बोलून तो अगदी हट्टालाच पेटला. पुन्हा एके दिवशी देवीने त्याला तसाच दृष्टांत दिला. देवीच्या पुजाऱ्यांनाही देवीने दृष्टांत देऊन सांगितले. "तुम्ही त्या नंदी ब्राम्हणाला मंदिरात राहू देऊ नका. त्याला घालवून द्या." देवीच्या आदेशानुसार त्या पुजाऱ्यांनी नंदी ब्राम्हणाला देवीचा आदेश सांगितला व मंदिरात राहण्यास मनाई केली. मग तो नंदी ब्राम्हण नाईलाजाने मंदिरातून बाहेर पडत चालत-चालत गाणगापुरास आला.
तो मठात आला व श्रीगुरुंविषयी चौकशी करू लागला. मठातील शिष्य म्हणाले, "श्रीगुरू आता संगमावर आहेत. काल शिवरात्रीचा उपवास होता. आता पारण्यासाठी येथे येतील. तू येथे उभा राहू नकोस. जरा बाजूला उभा राहा." थोड्या वेळाने श्रीगुरू मठात आले, तेव्हा शिष्यांनी त्यांना सांगितले, "सर्वांगाला कुष्ट झालेला एक ब्राम्हण आला आहे. त्याला आपले दर्शन घ्यावयाचे आहे." श्रीगुरू म्हणाले, "आम्हाला माहित आहे. मनात संशय धरून तो आला आहे. त्याला मठात आणा." शिष्यांनी धावत जाऊन त्या नंदी ब्राम्हणाला मठात आणले. श्रीगुरुंना पाहताच त्याने जमिनीवर लोटांगण घातले व हात जोडून उभा राहिला. श्रीगुरू त्याला म्हणाले, "तू मनात संशय धरून आला आहेस ! जे कार्य देवी करू शकत नाही ते कार्य मनुष्य काय करणार ! असा संशय धरून तू आला आहेस." हे शब्द ऐकताच तो ब्राम्हण आश्चर्यचकित झाला. श्रीगुरू अंतर्ज्ञानी आहेत. त्यांनी आपल्या मनातले ओळखले हे लक्षात येताच त्या नंदीब्राम्हणाला पश्चाताप झाला. त्याने श्रीगुरुपुढे लोटांगण घातले व शोक करीत म्हणाला, "स्वामी, मला क्षमा करा. मी अज्ञानी आहे. मी आपले स्वरूप नाही. मी आपणास शरण आलो आहे. मला या पापकर्माच्या भोगातून सोडवा. मला आज भाग्याने आपले दर्शन घडले आहे. आपल्या दर्शनाने मी पावन झालो आहे. आपण भक्तांचे आधार आहात. आपण शरणागतवत्सल आहात. आज आपल्या रूपाने परब्रम्हाचे चरणदर्शन झाले आहे. आपण कृपासागर आहात. भक्तजनांची कामधेनू आहात. भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण मनुष्यवेषाने अवतीर्ण झाला आहात. प्रभू रामचंद्राच्या केवळ चरणस्पर्शाने अहिल्येला दिव्य देह प्राप्त झाला. त्याप्रमाणे आज मी आपल्या दर्शनाने पावन झालो आहे.
स्वामी, विवाहानंतर माझ्या सर्वांगाला कुष्ठरोग झाला. माझ्या पत्नीने माझा स्पर्शही टाळला. ती मला सोडून माहेरी गेली. माझ्या आई-वडिलांनी मला घराबाहेर काढले. मी तुळजाभवानीला शरण गेलो, अनेक उपवास केले, खूप कष्ट सोसले; पण काहीही उपयोग झाला नाही. देवीने मला चंदला परमेश्वरीकडे जाण्याची आज्ञा केली; पण तिच्याकडे जाऊनही माझे काम झाले नाही. देवीने मला आपल्याकडे जाण्याचा आदेश दिला, मला त्या मंदिरातून घालवून देण्यात आले. मी आपणास शरण आलो आहे. आता मला तारा किंवा मारा. असे रोगग्रस्त शरीर घेऊन जगण्याचा मला कंटाळा आला आहे.
त्या नंदी ब्राम्हणाच्या या बोलण्याने श्रीगुरुंना त्याची दया आली. त्यांनी सोमनाथ नावाच्या ब्राम्हणाला बोलावून सांगितले, "याला संगमावर ने.याच्याकडून संकल्प म्हणवून घे. याला षटकुल तीर्थात स्नान घाल. अश्वत्थवृक्षाला प्रदक्षिणा घालावयास लाव. याची पहिली वस्त्रे काढून टाक व दुसरी वस्त्रे दे. मग याला भोजनासाठी इकडे घेऊन ये."
श्रीगुरूंनी अशी आज्ञा करताच सोमनाथ त्या नंदीला घेऊन गेला. तो नंदी ब्राम्हण संगमात स्नान करून बाहेर येताच त्याच्या शरीराचा वर्ण पार बदलून गेला. त्याने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच त्याचे कोड नाहीसे झाले. त्याचे शरीर अत्यंत सुंदर. तेजस्वी दिसू लागले. त्याची जुने वस्त्रे दूर टाकली व त्याला नवीन वस्त्रे देण्यात आली. त्याची जुनी वस्त्रे जेथे टाकली गेली ती जमीन क्षारयुक्त झाली. मग सोमनाथ नंदीला घेऊन मठात आला. नंदीने श्रीगुरुंच्या चरणी लोटांगण घातले. त्यावेळी त्याचा सुवर्णदेह पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. त्यावेळी त्या नंदी ब्राम्हणाच्या असे लक्षात आले की, सर्वांगाचे कोड नाहीसे झाले असले तरी मांडीच्या आतील भागात एक लहानसा पांढरा डाग राहिला आहे. तो डाग पाहून घाबरला. त्याने तो डाग श्रीगुरुंना दाखविला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, "तू प्रथम मनात संशय बाळगला होतास त्यामुळे थोडे कोड शिल्लक राहिले आहे. आता तू आमच्यावर कवित्व कर म्हणजे तो डागही नाहीसा होईल." श्रीगुरुंनी असे सांगताच नंदी म्हणाला, "पण मला लिहिता-वाचता काहीच येत नाही. मग मी आपल्याविषयी कवित्व कसे करणार ?"
श्रीगुरू म्हणाले, "तोंड उघडून जीभ बाहेर काढ." त्याने तसे करताच श्रीगुरुंनी अभिमंत्रित केलेली विभूती त्याच्या जिभेवर ठेवली. त्याच ठिकाणी ज्ञान प्रकट झाले. तो श्रीगुरुंचे स्तवन करू लागला. तो म्हणाला, "स्वामी, मी केवळ अज्ञानी. आपली सेवा करण्यास कधी सवडच झाली नाही. मायापाशांनी वेढलेला मी संसारसागरात बुडालो. आपले स्मरण कधी झाले नाही. मी अनेक योनींत जन्म घेत घेत मनुष्ययोनीत जन्मास आलो; पण आयुष्यभर मी केवळ वाईट कर्मेच केली. नाना व्यसने केली. व्यभिचार केला.
पुढे वार्धक्य आले. नाना रोग जडले; पण माझ्या कडून सेवा घडली नाही. स्वामी, आपण साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात. आपणच या विश्वाचे तारक आहात, मनुष्य-वेषधारी आपण प्रत्यक्ष नारायण आहात. आता माझे रक्षण करा. माझा उद्धार करा." अशा शब्दांत त्या नंदीने ब्राम्हणाने श्रीगुरूंची स्तुती केली. त्याचे ते स्तवन ऐकून लोक आनंदाने माना डोलवू लागले. त्याने केलेल्या श्रीगुरुंच्या स्तवनाने त्याच्या शरीरावर राहिलेला कुष्ठरोगाचा डागही नाहीसा झाला. त्यामुळे त्याला अपार आनंद झाला. तो श्रीगुरुंच्या सेवेत रंगून गेला. त्याच्या स्तवनाने प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी त्याला कवीश्वर ही पदवी दिली. मग तो नंदी ब्राम्हण श्रीगुरूंची सेवा करत मठातच राहिला. ही कथा ऐकल्यानंतर नामधारकाने सिद्धांना विचारले, 'नरहरी' नावाचा दुसरा एक कवी होता. तो स्वामीचा शिष्य कसा झाला ती कथा मला सांगा."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'नंदी ब्राम्हणाचा कुष्ठरोग घालविला ' नावाचा अध्याय चव्वेचाळीसावा समाप्त.
=================================
अध्याय ४५ वा
कल्लेश्वर नरहरीची कथा
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाला, "स्वामी, नंदी नावाच्या एका कवीची कथा पूर्वी तुम्ही सांगितली होती. त्यानंतर दुसरा नंदी नावाचा कवी श्रीगुरुंकडे आला, तो गुरूंचा शिष्य कसा झाला ही संपूर्ण कथा मला सांगा."
सिद्धयोगी म्हणाले, "श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती सगळीकडे झाली.त्यामुळे अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्यात नंदी नावाचा एक कवी होता. त्याने पुष्कळ काव्य केले होते. एकदा एका भक्ताने, त्याच्या घरी काही मंगलकार्य होते म्हणून श्रीगुरुंना आपल्या हिप्परगी नावाच्या गावी नेले व त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्या हिप्परगी गावात 'कल्लेश्वर' नावाचे एक जागृत शिवमंदिर होते. त्याच गावात नरहरी नावाचा एक ब्राम्हण होता.तो कल्लेश्वर शिवाची सेवा करीत असे. तो स्वतः कवी होता. तो रोज शिवस्तुतीपर पाच श्लोक तयार करून ते काल्लेश्वराच्या पूजेच्यावेळी म्हणत असे. तो कल्लेश्वराशिवाय अन्य कोणालाही मानत नसे. लोक त्याला म्हणाले, "अरे नरहरी, कवी आहेस हे सर्वांना माहित आहे. साक्षात त्रैमूर्ती अवतार श्रीगुरूनृसिंहसरस्वती येथे आले आहेत. मग तू त्यांच्याविषयी कवित्व का बरे करीत नाहीस ?" त्यावर नरहरी म्हणाला, "माझी भक्ती, माझी श्रद्धा फक्त शिवशंकर कल्लेश्वरावरच आहे. अन्य देव पुष्कळ आहेत. त्यांची व मनुष्याची स्तुती मी करणार नाही." असे बोलून तो पूजेसाठी गेला. त्याने कवित्व करून पूजा करण्यास सुरुवात केली. पूजा करताना त्याला झोप लागली. झोपेत असताना त्याला स्वप्न पडले. त्याने स्वप्नात पाहिले, तो कल्लेश्वराची पूजा करीत आहे. कल्लेश्वराच्या पिंडीवर पूजाद्रव्ये अर्पण करीत आहे, पण त्या पिंडीवर श्रीगुरूनृसिंहसरस्वती आहेत व सर्व उपचार कल्लेश्वराऐवजी त्यांनाच मिळत आहे. त्याचवेळी तो जागा झाला. त्याला सगळे स्वप्न आठवले. त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो स्वतःशीच म्हणाला, "माझ्या हातून फार मोठी चूक झाली. श्रीगुरूनृसिंहसरस्वतींना सामान्य मनुष्य समजलो. आज माझी खात्री पटली. श्रीगुरूनृसिंहसरस्वती साक्षात शिवशंकरच आहेत. ते त्रैमूर्ती अवतार आहेत. जगाच्या उद्धारासाठीच ते अवतीर्ण झाले आहेत. मी मात्र त्यांची निंदा केली." असा विचार करून तो धावतच श्रीगुरुंच्याकडे आला व त्यांच्या पाया पडून म्हणाला, "स्वामी, मला क्षमा करा. मी केवळ अज्ञानी, आपले स्वरूप ओळखू शकलो नाही. आपण साक्षात शिवशंकर आहात. आपणच कल्लेश्वर आहात, याची मला खात्री पटली आहे. माझे मन आता स्थिर झाले आहे. आपणच या विश्वाचे आधार आहात. शरणागतांचे आधार आहात. घरी कामधेनू असताना ताकासाठी दुसऱ्याच्या दरी जावे तशी माझी अवस्था झाली होती. माझ्या अपराधाची क्षमा करा."
प्रसन्न झालेले श्रीगुरू नरहरीला म्हणाले, "काय रे, तू तर आमची नेहमी निंदा करीत होतास. मग, आजच तुझ्या ठिकाणी आमच्याविषयी भक्तिभाव कसा काय निर्माण झाला ?" त्यावर नरहरी म्हणाला, "स्वामी, मी आजपर्यंत अज्ञानरुपी अंधारात होतो. ज्ञान झाल्याशिवाय आपली भेट कशी होणार ? मी कल्लेश्वराची पूजा केली. त्या पुण्यामुळेच आज आपण मला भेटलात. आपण आणि कल्लेश्वर एकाच आहे हे ज्ञान मला झाले आहे. आता माझ्यावर कृपा करा. मला आपला शिष्य करून घ्या." नरहरीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्रीगुरू त्याला म्हणाले, "ही वस्त्रे घे. मी आणि कल्लेश्वर एकाच आहोत. आता तू गावातच राहून कल्लेश्वराची सेवा कर. आम्ही सदैव तेथेच असू." त्यावर नरहरी म्हणाला, "स्वामी, प्रत्यक्षात असलेल्या तुमच्या चरणांना सोडून मी कल्लेश्वराची पूजा कशाला करू ? मी तुम्हाला काल्लेश्वाराच्या ठिकाणी पाहिले होते. तुम्हीच त्रैमूर्तीचा अवतार आहात. तुम्हीच कल्लेश्वर आहात. आता मी तुमचे शरण सोडून कोठेही जाणार नाही." नरहरीचा मनोभाव पाहून श्रीगुरुंनी त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारले. मग त्याला बरोबर घेऊन गाणगापुरास परत आले. तेथे नरहरीने पुष्कळ कवित्व करून श्रीगुरूंची सेवा केली." ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "अशाप्रकारे दोघेही कवी-नंदी आणि नरहरी श्रीगुरुंच्या जवळ राहून त्यांची सेवा करू लागले." सरस्वती गंगाधर सांगतात, "श्रीगुरू ज्याच्यावर प्रसन्न होतात त्याच्या घरी कल्पवृक्षच असतो. जे मागावे ते मिळते."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'कल्लेश्वर नरहरीची कथा' नावाचा अध्याय पंचेचाळीसावा समाप्त.
==================================
अध्याय ४६ वा
भक्तांसाठी आठ रूपे
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, "पुढे काय झाले ती कथा मला सविस्तर सांगा." सिद्धमुनी म्हणाले, "नामधारका, तू खरोखर मोठा भाग्यवान आहेस. तुझी ही श्रीगुरूचरित्र ऐकण्याची तीव्र इच्छा पाहून मला संतोष आहे. या श्रीगुरूचरित्र श्रवणाने तुला पुत्रपौत्र होतील. तुला सर्वप्रकारचे ऐश्वर्य लाभेल. आता तुला पुढची कथा सांगतो. ती श्रवण केली असता महापापीसुद्धा पावन होईल." श्रीगुरू गाणगापुरात असताना एक गमतीदार गोष्ट झाली. एकदा दिवाळीचा सण आला. श्रीगुरुंचे सात शिष्य श्रीगुरुंच्याकडे आले. या मंगल दिनी श्रीगुरुंचे चरण आपल्या घराला लागावेत असे प्रत्येकाला वाटत होते. या दिवाळीच्या दिवशी श्रीगुरुंनी आपल्या घरी यावे असे प्रत्येकाला वाटत होते. तशी त्यांनी श्रीगुरुंना विनंती केली. श्रीगुरुंना त्यांचे मन मोडवेना. तेव्हा ते शिष्यांना म्हणाले, "तुम्ही सगळेच माझे प्रिय शिष्य आहात. तेव्हा मी एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी कसा येणार ? तेव्हा मी कुणाच्या घरी येऊ ते आपापसात ठरवा व मला सांगा." श्रीगुरुंनी आपल्याच घरी यावे असे त्या सातही शिष्यांना वाटत होते. त्यावरून त्यांचे भांडण सुरु झाले. त्यांचे काही केल्या एकमत होईना. मग श्रीगुरुंनी युक्ती केली. त्यांनी एकेका शिष्याला बाजूला बोलाविले व त्याला सांगितले, "मी तुझ्याकडेच येईन; पण हे कोणाला सांगू नकोस. आता तू शांतपणे आपल्या घरी जा." अशारीतीने प्रत्येकाची समजूत काढून सर्वांना वाटेला लावले. त्यामुळे श्रीगुरू फक्त आपल्याच घरी येणार नाही म्हणून सर्वांना आनंद झाला. ते सार्वजन आपापल्या गावी गेले.
दिवाळीला श्रीगुरू बाहेरगावी आपल्या शिष्यांकडे जाणार ही बातमी मठातील भक्तांना समजली, तेव्हा ते श्रीगुरुंना म्हणाले, "स्वामी, दिवाळीसारख्या पवित्र दिवशी तुम्ही बाहेरगावी शिष्याकडे जाणार ? मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे ? तुम्ही दिवाळीत आम्हाला सोडून कोठेही जाऊ नये." त्यांचे मनोगत लक्षात घेऊन श्रीगुरू त्यांना म्हणाले, "तुम्ही चिंता करू नका. आम्ही येथेच राहू." ते ऐकून सर्वांना समाधान वाटले. दिवाळीच्या दिवशी श्रीगुरुंनी मंगलस्नान केले. आपल्या योग-सामर्थ्याने सात रूपे घेतली व एकेका रूपाने ते विविध गावांत राहणाऱ्या आपल्या सातही शिष्यांच्या घरी गेले. त्या सर्वांकडून त्यांनी पूजासेवा घेतली व मठातही राहिले. कार्तिकी पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्रीगुरुंचे ते सातही शिष्य गाणगापुरला मठात आले. त्यावेळी प्रत्येकजण सांगू लागला,"दिवाळीला श्रीगुरू फक्त आपल्याच घरी आले होते." आणि आपण दिलेली वस्त्रे श्रीगुरुंच्याकडे असल्याचे दाखवू लागला. ते ऐकून सर्व शिष्य मोठ्या संभ्रमात पडले. पण गाणगापुरातील लोक म्हणाले, "श्रीगुरू तुमच्यापैकी कोणाकडेच आले नव्हते, ते मठातच होते. त्यांनी आमच्याबरोबर दिवाळी साजरी केली."
हे सगळे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. श्रीगुरू साक्षात परमेश्वर आहेत. त्रैमूर्तींचा अवतार आहेत. भक्तांसाठी त्यांनी आठ रूपे घेतली हे रहस्य उघड होताच सर्वांनी श्रीगुरूंचा जयजयकार केला. ते म्हणाले, "परमेश्वरा, अनंत रूपे धारण करणारा तू त्रैमूर्ती भगवान आहेस. तुझे सामर्थ्य आम्हाला कसे बरे कळणार ?" त्यावेळी सर्वांनी श्रीगुरूंची स्तुती केली. दीपाराधना करून समाराधना केली.
ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरुंचे माहात्म्य हे असे आहे." या प्रसंगाने श्रीगुरूनृसिंहसरस्वतींची ख्याती सर्वत्र झाली. ग्रंथकर सरस्वती गंगाधर सांगतात, "सज्जन हो ! तुम्ही श्रीगुरूंची आराधना करा. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. जे मूर्ख असतात त्यांना श्रीगुरुसेवा करण्याची लाज वाटते. जे ज्ञानी असतात ते श्रीगुरुंचे नामामृत प्राशन करतात. श्रीगुरू हेच त्रैमूर्ती आहेत. हा संसारसागर तरुन जाण्यास श्रीगुरू हाच एक आधार आहे.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'भक्तांसाठी आठ रूपे' नावाचा अध्याय सेहेचाळीसावा समाप्त.
==============================
अध्याय ४७ वा
जसा भाव तसे फळ
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
सिद्धयोगी नामधारकाला श्रीगुरुचरित्र सांगत होते. त्यांनी त्याला एक अपूर्व कथा सांगावयास सुरुवात केली. ही कथा श्रवण केली असता सर्व इच्छा पूर्ण होतात. सिद्धयोगी ती कथा सांगू लागले. श्रीगुरू गाणगापुरात असताना त्यांची ख्याती सर्वत्र झाली. त्याच गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा एक गरीब शेतकरी होता. तो श्रीगुरूंचा परमभक्त होता. तों काया, वाचा, मनाने श्रीगुरूंची मनोभावे सेवा करीत असे. त्याचा एक नेम होता. श्रीगुरू नित्य सकाळी स्नानसंध्यादी करण्यासाठी भीमा-अमरजा संगमावर जाण्यास निघाले, की वाटेत असलेल्या आपल्या शेतात उभा राहावयाचा व श्रीगुरू दिसले की धावत येउन त्यांच्या पाया पडायचा. हा त्याचा नेम कित्येक दिवस चालू होता. श्रीगुरू त्याच्याशी काहीही बोलत नसत.
एके दिवशी श्रीगुरुंनी त्याला विचारले, "तू नित्यनेमाने मला भेटून नमस्कार करतोस. हे कष्ट का घेतोस ? तुझी इच्छा काय आहे ?" पर्वतेश्वर म्हणाला, "श्रीगुरुंनी माझ्या शेताकडे कृपादृष्टीने पाहावे. माझे शेत चांगले पिकले आहे." "तू शेतात काय पेरले आहेस?" असे श्रीगुरुंनी विचारले असता तो म्हणाला, "ज्वारी पेरली आहे. पीक चांगले आले आहे. आपल्या कृपेने माझ्या शेतात भरपूर धान्य यावे. " प्रसन्न झालेले श्रीगुरू म्हणाले, "तुझा माझ्यावर विश्वास असेल तर एक काम कर. मी संगमावर जाऊन स्नान-संध्या करून परत येतो, तोपर्यंत तुझे हे सर्व पीक चार बोटे खाली ठेवून कापून टाक." पर्वतेश्वर म्हणाला, "श्रीगुरुंचे शब्द मला प्रमाण आहेत. मी आपला शब्द मोडणार नाही." मग श्रीगुरू अनुष्ठानासाठी संगमाकडे निघून गेले. पर्वतेश्वराने पीक कापण्याचा निश्चय केला. तो गावात गेला व तेथील अधिकाऱ्याला भेटन म्हणाला, "मला माझे शेतातील ज्वारीचे पीक कापण्याची परवानगी असावी. मी शेतसारा म्हणून गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्य खंड म्हणून देईन. जर पीक आले नाही तर साठवणीतले देईन. तेही अपुरे पडले तर माझी गुरे जप्त करावीत." असे वचन देऊन त्याने शेत कापण्याची परवानगी घेतली.
मग त्याने गडी-माणसे लावून शेत कापण्यास सुरुवात केली. ही बातमी समजताच पर्वतेश्वराची बायकामुले शेताकडे धावत आली व रडू लागली; पण त्याने त्याकडे लक्षच दिले नाही. 'एका संन्याशाच्या सांगण्यावरून हा आपले भरले पीक कापून टाकण्याचा मूर्खपणा करत आहे' असे लोक बोलू लागले; पण पर्वतेश्वराने त्यांच्या बोलण्याला भीक घातली नाही. त्याने सगळे पीक कापून टाकले. मग तो संगमावर गेला. श्रीगुरूंना शेतावर घेऊन आला व म्हणाला, "गुरुदेव, आपल्या आज्ञेप्रमाणे मी सगळे पीक कापले." ते पाहून श्रीगुरू म्हणाले, "अरे, तू हे काय करून बसलास ? तू उगाच पीक कापलेस . मी तुला तसे केवळ गंमतीने म्हणालो होतो." तो म्हणाला, "स्वामी, माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. आपली आज्ञा मला प्रमाण. मी ती पाळली. बाकी काही मला माहित नाही." तेव्हा प्रसन्न झालेले श्रीगुरू म्हणाले, "जसा तुझा भाव तसे तुला फळ मिळेल. धन्य आहे तुझा निर्धार ! तुझ्या श्रद्धेचे मोठे फळ मिळेल. आता तू कसलीही चिंता करू नकोस." असे आश्वासन देऊन श्रीगुरू मठाकडे गेले.
काही दिवसांनी प्रचंड वादळ झाले. मुसळधार पाउस सुरु झाला. गावातील शेतकऱ्यांची पिके पार बुडाली. अतोनात नुकसान झाले. ओला दुष्काळ पडला. पर्वतेश्वराच्या शेतातील ज्वारीच्या बुडख्यांना मात्र असंख्य अंकुर फुटले. पीक जोरात वाढले. शतपटीने धान्य आले. बाकी सगळ्या गावात धान्याचा दुष्काळ पडला. सर्व लोक दुःखी झाले होते व ते पर्वतेश्वराचे पीक पाहून आश्चर्य करीत होते. पर्वतेश्वराच्या शेतात गावाला पुरून उरेल इतके धान्य आले. पर्वतेश्वराच्या बायकामुलांना अतिशय आनंद झाला. त्याच्या पत्नीने शेतात येउन धान्यराशीची पूजा केली. मग ती आपल्या पतीच्या पाया पडून म्हणाली, "मी तुमची व श्रीगुरूंची निंदा केली त्याबद्दल मला क्षमा करा. आता आपण श्रीगुरुंच्या दर्शनाला जाऊ." पर्वतेश्वराने ते मान्य केले. मग ते सर्वजण मठात गेले. त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली. बायकामुलांनी श्रीगुरूंची क्षमा मागितली. मग पर्वतेश्वराने काय काय घडले ते सर्व श्रीगुरुंना सांगितले. श्रीगुरुंनी सर्वांना आशीर्वाद दिले, "तुमच्या घरी लक्ष्मी अखंड राहील."
पर्वतेश्वराने धान्याची रस मोजली. शतपट धान्य आले होते. त्याने काबुल केल्याप्रमाणे अधिकाऱ्याला सारा म्हणून नेहमीपेक्षा दुप्पट धान्य दिले. गावात धान्याचा तुटवडा आहे हे पाहून त्याने आपल्या धान्यातील निम्मे धान्य गावातील लोकांना दिले. आपल्याला पुरेल एवढे धान्य ठेवून बाकी धान्य गोरगरिबांना वाटले. श्रीगुरुंच्या आशीर्वादाने पर्वतेश्वराचे कुटुंब पूर्ण सुखी झाले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरुचरित्राचे माहात्म्य असे आहे. श्रीगुरुंच्यावर ज्याची दृढ श्रद्धा आहे त्याच्या घरी दैन्य, दारिद्र्य, दुःख कधीच राहत नाही. जे भावभक्तीने श्रीगुरूंची सेवा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. लक्ष्मी त्याच्या घरी अखंड पाणी भरीत असते."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'जसा भाव तसे फळ' नावाचा अध्याय सत्तेचाळीसावा समाप्त.
===============================
अध्याय ४८ वा
अमरजा संगम - अष्टतीर्थ माहात्म्य
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारकाने सिद्धयोग्यांना वंदन करून विचारले, "मनुष्यवेषधारी श्रीगुरूनृसिंहसरस्वती हे त्रैमूर्तीचा अवतार आहेत. या भूमीवर अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे असताना ते गाणगापुरास येउन का राहिले ? या गाणगापुर क्षेत्राचे काय माहात्म्य आहे ? ते ऐकण्याची माझी फार इच्छा आहे. ते मला सविस्तर सांगा."
नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना आनंद झाला. ते म्हणाले, "नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलास. मी त्याचे उत्तर देतो. लक्षपूर्वक ऐक. एकदा अश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीचा पर्वकाल होता. त्यावेळी श्रीगुरु शिष्यांना म्हणाले, "गया-प्रयाग-वाराणसी या त्रिस्थळी स्नान करणे पुण्यकारक असते, तेव्हा आपण सर्वजण यात्रेला जाऊ या. तुम्ही तुमच्या बायकामुलांनाही बरोबर घ्या. सर्वांनाच मोठा पुण्यलाभ होईल." शिष्य म्हणाले, "ठीक आहे. आम्ही घरी जातो व सगळी तयारी करतो." त्यावर श्रीगुरू म्हणाले, "अरे, तयारी कसली करता ? सगळी तीर्थे तर आपल्या गावाजवळच आहेत. त्यासाठी तयारी करण्याची काहीच गरज नाही. चला माझ्याबरोबर. मी तुम्हाला सर्व तीर्थे दाखवितो." असे सांगून श्रीगुरू सर्व शिष्यांना बरोबर घेऊन भीमा-अमरजा संगमावर गेले. तेथे सर्वांनी स्नान केले. त्यावेळी श्रीगुरू सर्व शिष्यांना म्हणाले, "या संगमाचे माहात्म्य फार मोठे आहे. येथे स्नान केले असता प्रयागस्नानाचे पुण्य लाभते. येथे भीमा नदी उत्तरवाहिनी असल्याने ती गंगेपेक्षा अधिक पवित्र आहे. येथे अष्टतीर्थे आहेत. त्यामुळे येथे आले असता काशीक्षेत्रापेक्षा शतपट पुण्यलाभ होतो."
श्रीगुरुंनी सांगितलेले हे रहस्य ऐकून सर्व शिष्यांना मोठा आनंद झाला. ते म्हणाले, "स्वामी, 'अमरजा' नदीविषयी आम्हाला सविस्तर सांगा. तिला 'अमरजा' असे नाव का मिळाले हे जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे." श्रीगुरू म्हणाले, "जालंधर पुराणात या नदीच्या उत्पंत्तीची कथा आली आहे. ती कथा अशी पूर्वी जालंधर नावाच्या अत्यंत बलाढ्य दैत्याने देवांशी युद्ध करून त्यांना देशोधडीला लावले. त्याने त्रैलोक्य पादाक्रांत केले. त्याने इंद्राशी युद्ध करून स्वर्गलोकही जिंकला. त्या जालंधराच्या सैन्येतील जे दैत्य जखमी होत असत त्या दैत्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत असत. त्यामुळे युद्धात त्याला जिंकणे अशक्य झाले. त्यामुळे काळजीत पडलेला इंद्र शंकरांना शरण गेला. त्यांना त्याने सर्व परिस्थिती सांगितली व आता तुम्हीच काहीतरी करा व दैत्यांपासून देवांना वाचवा." अशी विनंती केली. इंद्राने असे सांगताच अत्यंत क्रुद्ध झालेल्या शंकरांनी रौद्ररूप धारण करून ते दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त झाले. त्यांनी अमृतमंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ इंद्राला दिला. शंकरांनी जालंधराचा पराभव केला. इंद्राने घटातील मंत्रोक्त जल देवगणांवर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले. त्या जलकुंभातील थोडेसे जल पृथ्वीवर पडले. ते ज्या ठिकाणी पडले तेथे नदी उत्पन्न झाली. ती संजीवनी देणारी नदी म्हणून प्रसिद्ध झाली. तिलाच 'अमरजा' असे म्हणतात. या नदीत जे स्नान करतात. त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होत नाही. ब्रम्हहत्यादी महापातके नाहीशी होतात. या अमृतनदीचा भीमानदीशी संगम झाला आहे. तो संगम प्रयागातील त्रिवेणीसंगमासमान आहे. कार्तिक-माघ महिन्यात या संगमात स्नान केले असता इहलोकांत सर्व सुखांचा लाभ होतो व अंती मोक्षप्राप्ती होते. सोमवारी, सूर्यग्रहणाच्या दिवशी, संक्रातीला, सोमवती अमावास्येला तसेच एकादशीच्या दिवशी स्नान केले असता अनंत पुण्याचा लाभ होतो. या पर्वदिवशी जमले नाही तर अन्य कोणत्याही दिवशी येथे स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात. ऐश्वर्ययुक्त दीर्घायुष्य लाभते. या संगमाजवळच अश्वत्थवृक्षासमोर नदीच्या तीरावर 'मनोरथ' नावाचे तीर्थ आहे. त्या तीर्थात स्नान केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. ती अश्वत्थवृक्षासमान आहे तेथेच माझे नित्य वास्तव्य असते. तेथे 'गरुडपक्षी' दिसतात ही त्याची खूण आहे. जे लोक त्या अश्वत्थाची सेवा करतात त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात.
याविषयी संदेह बाळगू नये. प्रथम अश्वत्थाची पूजा करावी व नंतर शिवमंदिरात जावे. तेथे त्रिलोलच संगमेश्वर आहे. त्याची भक्तिभावाने पूजा करावी. श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुनाप्रमाणेच हा संगमावरील रुद्र आहे. त्याला भक्तिपूर्वक प्रदक्षिणा घालावी. तेथील नंदीला वंदन करून चंडीला वंदन करावे. पुन्हा नंदीला सव्य प्रदक्षिणा घालून सोममूत्रास जावे. अशा तीन प्रदक्षिणा घालाव्यात. मग नंदीमागे उभे राहून शिवदर्शन घ्यावे. असे केल्याने सर्वप्रकारचे वैभव व पुत्रपौत्रांदीचा लाभ होतो. त्यानंतर नागेशी गावी जावे. तेथे 'वाराणसी' नावाचे तीर्थ आहे. तेथे प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे. काल्पनिक कथा नव्हे.
त्या नागेशी गावात भारद्वाज गोत्रातील एक ब्राम्हण होता. त्याने सर्वसंगपरित्याग केलेला होता. तो सदैव शिवध्यान करीत असे. त्याच्या भक्तीने भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले होते. त्याला सतत समोर साक्षात शंकर दिसत असत. त्यामुळे तो देहभान विसरून गावात वेड्यासारखा फिरत असे. गावातले लोक त्याची 'वेडा' म्हणून टिंगलटवाळी करीत असत. त्याला 'ईश्वर' आणि 'पांडुरंगेश्वर' नावाचे दोन भाऊ होते. एकदा ते सर्व तयारी करून काशीयात्रेला निघाले. त्यांनी त्या वेड्यालाही 'आमच्याबरोबर काशीयात्रेला चल' असे म्हटले. तेव्हा तो शिवभक्त ब्राम्हण त्यांना म्हणाला, "तुम्ही काशीला कशाला जाता ? तो काशीविश्वनाथ माझ्याजवळ आहे. मी तुम्हाला तो दाखवीन." हे ऐकताच सर्व लोक आश्चर्यचकित झाले. "आम्हाला तो काशीविश्वनाथ दाखव. तो येथेच दिसणार असेल तर त्याच्या दर्शनासाठी इतक्या दूर जाण्याचा त्रास तरी वाचेल." असे त्याचे भाऊ म्हणाले. त्याचवेळी तो ब्राम्हण नदीत स्नान करून शिवध्यान करीत बसला. त्याचक्षणी प्रत्यक्ष शंकर त्याच्यापुढे प्रकट झाले. तेव्हा तो ब्राम्हण शंकरांना म्हणाला, "भगवंता, आम्हाला येथेच आपले नित्यदर्शन व्हावे अशी माझी तुला प्रार्थना आहे." भोळा चक्रवर्ती सदाशिव त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन 'तथास्तु' असे म्हणाला. त्याचक्षणी तेथे मणिकर्णिका तीर्थ उत्पन्न झाले. काशीविश्वनाथाची मूर्तीही प्रकट झाली. ती नदीच्या उत्तरदिशेला आहे. भीमा-अमरजा संगमावर काशीप्रमाणेच मंदिर व कुंड प्रकट झाले. त्या कुंडातून विश्वेश्वराची मूर्ती प्रकट झाली. भीमा-अमरजा काशीप्रमाणेच मंदिराची व कुंडाची रचना झाली.
काशीतील सर्व खाणाखुणा लोकांना दिसू लागल्या. ते पाहून दोघे बंधू आपल्या या भावाला खूप माणू लागले. मग तो ब्राम्हण आपल्या दोघा भावांना म्हणाला, "आता यापुढे आपल्या वंशातील कोणीही काशीला जाण्याची गरज नाही. यानंतर माझे नाव 'भ्रांत गोसावी' असे राहील. तुमचे नाव 'आराध्ये' असेल. आता येथेच पांडुरंगाची सेवा करावी. यापुढे तुम्ही काशीयात्रेला म्हणून येथे गाणगापुरास यावे." श्रीगुरुंनी भीमा-अमरजा संगामचे माहात्म्य सांगितले असता शिष्यांची व भक्तांची श्रद्धा वाढली. तेव्हापासून सर्वजण येथेच स्नानदानादी करू लागले.
सिद्धयोगी म्हणाले, "त्यानंतर श्रीगुरू 'पापविनाशी' तीर्थांकडे गेले. त्या तीर्थात केवळ स्नान केल्याने मनुष्याची सर्व पातके नाहीशी होतात. तेथे श्रीगुरूंची पूर्वाश्रमीची रत्नाबाई नावाची बहिण होती. ती श्रीगुरुंचे दर्शन घेण्यासाठी आली. श्रीगुरुंनी तिला विचारले, "तू पूर्वी अनेक पातके केली होतीस. ती तुला आठवतात का ?" त्या पापकर्माची फळे तुला भोगावी लागत आहेत. तुला कुष्ठरोगही झाला आहे." श्रीगुरुंनी असे विचारले असता ती श्रीगुरुंच्या पाया पडली व शो करीत म्हणाली, "मी केवळ अज्ञानी आहे. मूर्ख आहे. मला काहीच आठवत नाही. तुम्ही जगदात्मा, जगदीश्वर आहात. तुम्हाल सर्वकाही माहित आहे. माझ्या हातून कोणते पापकर्म घडले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी." ती असे म्हणाली असता श्रीगुरुंना तिची दया आली. ते तिला म्हणाले, "तू पूर्वजन्मी चुकून केवळ अनवधानाने नुकत्याच प्रसूत झालेल्या मांजरीच्या पाच पिल्लांना ठार मारलेस. आणखीही काही पापकर्मे केलीस. त्या पापकर्माचे फळ म्हणून तुला या जन्मी अनेक दुःखे भोगावी लागत आहे. तुला श्वेतकुष्ठ झाले आहे हेही त्या पातकांचे फळ आहे. तुझ्या हातून अनेक पातके झाली आहेत. ती पुढील जन्मी भोगावी लागतील." श्रीगुरुंनी असे सांगितले असता रत्नाबाई श्रीगुरुंच्या पाया पडून म्हणाली, "मला आता पुनर्जन्म नको. हे सर्व भोग भोगण्याची माझ्यात शक्तीच नाही, म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे. माझा उद्धार करा." त्यावर श्रीगुरू म्हणाले, "तू पापविनाशी तीर्थात स्नान कर. तेथे स्नान करताच तुझा कुष्ठरोग जाईल. तेथे तू नित्यनेमाने स्नान कर म्हणजे, सप्तजन्मातील सर्व पातके नाहीशी होतील. याविषयी संदेह बाळगू नकोस." श्रीगुरुंनी असे सांगितले असता तिने पापविनाशी तीर्थाजवळ राहून त्रिरात्र स्नान केले. त्यामुळे तिचा कुष्ठरोह नाहीसा झाला." सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "ही नुसती ऐकलेली बातमी नाही. आम्ही त्यावेळी तेथेच होतो. आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलेले आहे."
श्रीगुरुंनी आपल्या शिष्यांना अमरजा नदीच्या तीरावरील कोटीतीर्थ, रुद्रपादतीर्थ, गयातीर्थ, चक्रतीर्थ, कल्लेश्वर देवस्थान अशा आठ तीर्थाचे व पवित्र स्थानांचे माहात्म्य सांगून तेथे स्नान, दान, पूजा केली असता अनंत पुण्याचा लाभ होतो, सर्व पातके नष्ट होतात व सर्व सुखांचा लाभ होतो हे विस्तारपूर्वक सांगितले. ते ऐकून सर्व शिष्यांची खात्री पटली की, काशी, प्रयाग, गया सर्वकाही येथेच आपल्याजवळ आहे. आपण आजपर्यंत केवळ अज्ञानाने त्रिस्थळी यात्रेला जाण्याचा त्रास होतो. सर्व तीर्थे अगदी आपल्या अनाग्नातच आहेत. हे आपल्याला श्रीगुरुंच्याकडून समजले. मग अष्टतीर्थे माहात्म्य सांगून मठात परत आले. त्यावेळी मोठी समाराधना करण्यात आली.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'अमरजा संगम - अष्टतीर्थ माहात्म्य' नावाचा अध्याय अठ्ठेचाळीसावा समाप्त.
==================================
अध्याय ४९ वा
गुरुमाहात्म्य - श्रीगुरुगीता
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारकाने सिद्ध्योग्यांच्या चरणांना वंदन करून त्यांचा जयजयकार केला. तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, आपण माझ्यासाठी कृपासागर आहात. आपण मला प्रत्यक्ष श्रीगुरुचरित्र दाखवून कृतार्थ केलेत. या निमित्ताने तुम्ही मला अनेक धर्म सांगितलेत. त्यामुळे मी धन्य ,धन्य झालो. हा संसारसागर अनादीअनंत आहे. तो महाभयंकर आहे. तो जडजीवांना तरुन जाता येत नाही. आरोग्य बिघडले तर वैद्याचे औषध घ्यावे लागते, त्याप्रमाणे हा संसारसागर तरुण जाण्यासाठी सद्गुरूलाच शरण जावे लागते. त्याच्या कृपेने हा संसारसागर पार करता येतो. यासाठी गुरुभक्ती करावयास हवी. गुरुभक्ती म्हणजे प्रत्यक्ष कामधेनूच. गुरुभक्ती हा मुक्तीचा महामार्ग आहे. या संबंधी स्कंदपुराणात ईश्वरपार्वती संवाद असून तो 'गुरुगीता' या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात पार्वतीने शंकरांना प्रश्न विचारला होता व त्याला शंकरांनी पार्वतीला गुरुमाहात्म्य सांगितले. गुरुभक्ती कशी करावी हे सविस्तर सांगितले आहे. तो बहुमोल उपदेश मला तुमच्याकडून ऐकवायचा आहे. तो कृपा करून मला सांगा."
नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, "बा शिष्या, खरोखर तू धन्य आहेस. तू लोकोपकारक ठरेल असा प्रश्न विचारला आहेस.त्याचे उत्तर मी देतो. तू ते एकाग्रचित्ताने श्रवण कर. रम्य अशा कैलास शिखरावर पार्वतीने भगवान शंकरांना भक्तिभावाने नमस्कार करून विचारले,"गुरुभक्ती कशी करावी ? गुरूचा महिमा काय आहे ते मला सांगा. येथे पार्वती ही साधक असून भगवान शंकर हे परात्पर गुरु आहेत. 'मला गुरुमाहात्म्य सांगा' असे पार्वती म्हणाली असता भगवान शंकर म्हणाले, "देवी तू फार उत्तम प्रश्न विचारला आहेस. सर्व लोकांना उपकारक ठरेल अशा तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देतो. लक्षपूर्वक श्रवण कर.भगवान शंकर म्हणाले, तिन्ही लोकांत दुर्लभ असे गुरुतत्व तुला सांगतो. श्रीगुरूच सदैव ब्रम्ह होय, गुरुशिवाय दुसरे ब्रम्ह नाही, हे त्रिवार सत्य. वेदशास्त्र-पुराणे कितीही वाचली, व्रत-तप तीर्थयात्रा कितीही केल्या तरी संसारबंधनातून मुक्त होता येत नाही. शैवशाक्तादी विविध पंथ जीवांना, चुकीचा समज, गैरसमज करून देण्यास कारणीभूत होतात. साधकांच्या मनात भ्रम निर्माण करतात. यज्ञ, व्रत, तप, दानधर्म, तीर्थयात्रा करणारे लोक जोपर्यंत गुरुतत्व जानीत नाहीत तोपर्यंत मूर्खांसारखे भटकत राहतात ज्ञानस्वरूप आत्म्याहून श्रीगुरू भिन्न नाही. आपल्या गुरूविषयी पूज्यबुद्धी श्रद्धा असली की मग गुरुभाक्ताला दुसरे काहीही कर्तव्य असत नाही. म्हणून गुरुभक्ती प्राप्त व्हावी यासाठी साधकांनी प्रयत्न करावा. या देहांत अज्ञानाने उत्पन्न झालेली जगन्माया गुप्त विद्येच्या रुपात राहते. आत्मप्रकाश किंवा आत्मविकासाने ज्ञानाचा उदय होतो. गुरु शब्दाने तो उदय दर्शविला जातो.. श्रीगुरुचरणांच्या सेवेने अंतःकरण सर्व पापांतून मुक्त होते. त्यामुळे देहधारी जीव ब्रम्हरूप होतो. श्रीगुरुचरणकमलांचे स्मरण करून चरणतीर्थ मस्तकी धारण केले असता सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल साधकाला प्राप्त होते. विविध तपांतून मुक्ती मिळते. सद्गुरुचरणतीर्थ सर्व तीर्थाचे माहेर होय. श्रीगुरूचरणतीर्थ पापहरक आहे. ज्ञानरुपी तेजाला अधिक प्रकाशित करणारे आहे. संसारसागरातून पार करणारे आहे. ते समूळ अज्ञान दूर करते. जन्मकर्मांचे निवारण करते.
ज्ञान-वैराग्यासाठी ते प्राशन करावे. गुरुचरणतीर्थ प्राशन करून श्रीगुरू आज्ञापालन हेच उच्छिष्ट भोजन मानून श्रीगुरुमूर्तींचे ध्यान करीत गुरुमंत्राचा सदैव जप करावा. श्रीगुरुचे निवासस्थान हेच काशीक्षेत्र, चरणतीर्थ हीच गंगा व श्रीगुरु हेच प्रत्यक्ष श्रीविश्वेश्वर समजावेत. श्रीगुरुचे चरणतीर्थ हेच साक्षात गयातीर्थ. गुरु हेच गयेचा नित्य स्मरण करावे. गुरुनामाचा जप करावा. गुरुआज्ञा मनःपूर्वक पाळावी. गुरुशिवाय दुसरी कोणतीही भावना मनात ठेवू नये. गुरु ब्रम्हरूप होय. ते गुरुकृपेनेच प्राप्त होते, म्हणून सदैव गुरुचे ध्यान करावे. चिंतन करावे. आपले घरदार, संपत्ती, विद्या, वैभव इत्यादींची आसक्ती सोडून द्यावी. गुरुशिवाय अन्य कशातही भावना ठेवू नये. जे अनन्य भावाने, निष्ठेने गुरुचे चिंतन करतात त्यांना परमपद सुलभ असते, म्हणून प्रयत्नपूर्वक श्रीगुरुची आराधना करावी. गुरुमुखी असलेली विद्या, गुरुभक्तीशिवाय प्राप्त होत नाही.
'गुरु' शब्दातील 'गु' अक्षराचा अर्थ अज्ञानरुपी अंधकार. 'रु' चा अर्थ ज्ञानप्रकाश. अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रम्ह गुरु होय यात शंकाच नाही. 'गुरु' शब्दातील 'गु' कार मायादी गुण प्रकट करणारा असून 'रु' कार ब्रम्हाचे द्योतक आहे. गुरु हा मायानिर्मित भ्रमनिरसन करणारा आहे. गुरुचरण श्रेष्ठ होत. ते देवांनाही दुर्लभ आहेत गुरुहून श्रेष्ठ दुसरे तत्व नाही, म्हणून गुरु संतुष्ट होण्यासाठी सर्व काही गुरूला अर्पण करावे. श्रीगुरुची आराधना करावी. आपले सर्वस्व गुरूला समर्पण करावे. गुरुकृपा परमेश्वरप्राप्तीचे साधन आहे. काया-वाचा-मनाने सदैव गुरूची आराधना करावी. आपल्या गुरूला सर्वभावे शरण जावे. श्रीगुरूला साष्टांग नमस्कार घालावा. संसारवृक्ष आरूढ होऊन नरकार्णवात पतन झालेल्या सर्वांचा ज्याने उद्धार केला त्या श्रीगुरुला नमस्कार करावा.
गुरु हाच ब्रम्हा, विष्णू, महेश्स्वरूप आहे. गुरूच परब्रम्ह आहे म्हणून अशा गुरूला नमस्कार करावा. गुरु हा जगाच्या उत्पत्तीचा हेतू आहे. तो संसारसागर पार पाडणारा सेतू असून सर्व विद्यांना प्रभावित करणारा उदयस्थान आहे. अशा शिवस्वरूप गुरूला नमस्कार करावा. अज्ञानरुपी अंधाराने अंध झालेल्या जीवाच्या नेत्रांत ज्ञानांजन घालून ज्याने दिव्यचक्षू उघडले व त्याला आत्मस्वरूपाचा निधी दाखविला त्या श्रीगुरुला सदैव नमस्कार करावा. गुरु हाच माता-पिता बंधू आहे. या गुरूच्या अस्तित्वाने जगाला अस्तित्व येते. त्याच्याच प्रकाशाने जग प्रकाशते व त्याच्याच आनंदमयी स्वरूपाने सर्वजण आनंदित व सुखी होतात. जगाला अर्थ येतो तो गुरूमुळे. जीवन सार्थ होते ते गुरूमुळे. जग अशाश्वत असुअनहि नित्याचे वाटते ते गुरूमुळे. गुरु म्हणजे दैदिप्य्मान आत्मसूर्य. ज्याच्यामुळे हे जग चेतन स्वरूपाने अनुभवास येते, ज्याच्यामुळे ह्या विश्वाला सजीवता प्राप्त होते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती इत्यादी अवस्था ज्याच्यामुळे प्रकाशित होतात त्या गुरूला नमस्कार. श्रीगुरुमुळेच विश्व शिवाहून भिन्न दिसत नाही. तो पूर्ण अभेदयोगी असतो. जगाचे मूळ कारण सद्गुरु. गुरुचे कार्य जगतरूपाने भासते. गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे. गुरु म्हणजे सर्व सामर्थ्यशाली शक्ती होय. गुरु हा अव्यक्त परमेश्वराचे व्यक्तरुप होय. श्रीगुरुचे चरण सुख-दुःखादी द्वंद्वापासून होणारा त्रास नाहीसा करतात. सर्व आपत्तीतून तारून नेतात. शिव क्रुद्ध झाला तर गुरु शरण करतो; पण गुरूच रुष्ट झाला तर आपला त्राता कोणीही असत नाही. गुरुचरण शिवशक्तीरूप असतात. शिव आणि शक्ती ह्यांच्या मिलापाने व्यक्त झालेले रूप म्हणजे श्रीगुरु. जो गुणरूपांच्या पलीकडे-म्हणजेच निर्गुण, निराकार स्वरूपाचा साक्षात्कार करून देतो त्यालाच गुरु ही संज्ञा प्राप्त होते. गुरु हा त्रिनेत्र नसूनही शिवरूप आहे. चतुर्भुज नसूनही विष्णू आहे व चतुर्मुख नसूनही ब्रम्हदेव आहे. श्रीगुरुच्या कृपेमुळेच जीवाला भेदात्मक संसारातून मुक्त होता येते. तो दयासागर आहे. त्याच्या कृपेला भारती यावी म्हणून त्याला हात जोडून प्रणाम करावा. श्रीगुरुचे परमरूप विवेकरुपी चक्षूंसाठी अमृतासमान असते; पण मंदभाग्य असलेले जिब ह्या गुरुस्वरूपाला बघू शकत नाही. ज्या दिशेला चरणयुगल असतात त्या दिशेला दररोज भक्तिपूर्वक नमस्कार करावा. एक गुरुभक्ती जमली की इतर साधना आपोआप होतात. श्रीगुरूगीता गुरुभक्तीयोगाचे शास्त्रच आहे. श्रीगुरुचा अनुग्रह झाला की अज्ञानाचा नाश होतो. संसारवणवा नष्ट होतो. सच्चिदानंदस्वरूप त्याचा अवतार असतो. गुरु हा केवळ ब्रम्हविद्या देत नाही, तर तो आत्मसाक्षात्काराचा अनुभव प्राप्त करून देतो. गुरुचे केवळ स्मरण केले असता आपोआप ज्ञान उत्पन्न होते. गुरु हा चैतन्यस्वरूप, शाश्वत, शांत आकाशदिशापेक्षा सूक्ष्म, निरंजन नादातीत असतो. सर्व चराचर सजीव-निर्जीव जग श्रीगुरुचे व्यापले आहे. गुरु हा साधकाला भक्ती-मुक्ती, भोग व मोक्ष देतो. तो आपल्या आत्मज्ञानाच्या प्रभावाने अनेक जन्मांतील संचित कर्माचे भस्म करतो. गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही.
गुरुसेवा व गुरुभक्ती याहून श्रेष्ठ दुसरे तप नाही. गुरु हा सर्व जगाचा स्वामी असून तो सर्वव्यापी आहे. गुरुतत्व स्वयंभू आहे. गुरु हेच परमदैवत आहे. म्हणून गुरूला सदैव नमस्कार करावा. गुरूच्या चरणतीर्थात सप्तसमुद्रात स्नान केल्याचे फळ मिळते. श्रीहरी कोपला तर गुरु भक्ताचे रक्षण करतो; पण गुरूच रुष्ट झाला तर भक्ताला त्राता कोणीही नाही. म्हणून गुरूची मनःपूर्वक पूजा करावी. गुरुभक्ती केल्याने आत्मज्ञान प्राप्त होते. गुरुहून श्रेष्ठ कोणीही नाही असे श्रुतिवचन आहे, म्हणून काया-वाचा-मनाने गुरूची नित्य सेवा करावी.
केवळ गुरुकृपेमुळेच ब्रम्हा-विष्णू-महेश जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करू शकतात, अखंड गुरुस्मरण घडणे हीच गुरुसेवा. देव-गन्धर्वादीसुद्धा जर गुरुसेवा करणार नसतील तर ते मुक्त होऊ शकत नाहीत. गुरुध्यान हे सर्वप्रकारचा आनंद, सुख, भक्तीमुक्ती व मोक्ष देणारे आहे. म्हणूनच परब्रम्हस्वरूप गुरुचे स्मरण करावे. त्याचे स्तवन करावे. त्याला नमस्कार करावा, गुरु हा ब्रम्हानंदस्वरूप, ज्ञानस्वरूप, द्वंद्वरहित, निर्लेप, सर्वसाक्षी भावावीत, त्रिगुणरहित असतो. तो नित्य बद्ध, निराकार, परब्रम्हस्वरूप आहे. तो आनंदस्वरूप,आनंददाता, ज्ञानस्वरूप, योगीश्वर, संसाररोगावर औषध देणारा वैद्य आहे. गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही. हे शिवशासन आहे म्हणूनच तो परमकल्याणकारी आहे. अशाप्रकारे गुरुध्यान केल्यास शिष्याच्या ठायी आत्मज्ञान आपोआप येते. गुरूने दाखविलेल्या मार्गानेच साधना करून चित्तशुद्धी करून घ्यावी.
भगवान सदाशिव पार्वतीला म्हणतात, "हे गुरुमाहात्म्य ऐकूनही जो गुरुनिंदा करील तो घोर नरकात पडेल. बुद्धिमान शिष्याने गुरूशी कधीही खोटे बोलू नये. गुरु फसत नाही-फसतो तो शिष्य. गुरुकृपा-प्राप्त साधकाने निःशंकपणे साधना करावी. जेथे गुरुप्राप्ती आहे तेथे भीती असूच शकत नाही.
गुरुगीता गुरुभक्ती शिकविते. गुरुमहती पटविते. श्रीगुरूगीता श्रुतिस्मृतींचे सार होय. श्रीगुरुगीता म्हणजेच गुरुजप. गुरुसेवकाला केवळ गुरुसेवेने चारी आश्रम पुरे करता येतात. गुरुसेवा म्हणजे गुरुउपदेशानुसार साधना करणे. गुरुसेवेने गुरुप्रसाद लाभला की आत्मसाक्षात्कार होतो. गुरुभक्ताला गुरुउपसानेनुसार शाश्वती लाभते. गुरुध्यान हा साक्षात्काराचा सोपा व खात्रीचा उपाय आहे.
यानंतर पार्वतीने महादेवांना पिंड, पद, रूप व रूपातित म्हणजे काय असे विचारले असता भगवान शंकर म्हणाले, "कुंडलिनीशक्तीला पिंड म्हणतात. हंस म्हणजे पद. बिंदूला रूप व निरंजन निराकार परमात्म्याला रूपातीत म्हणतात. ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली, ज्याचा 'हंस:' मंत्राक्षरात प्राण स्थिर झाला व ज्याला आत्मज्योतीचे नील बिंदूत दर्शन झाले आहे व जो निर्विकल्प स्थितीत आहे, तोच मुक्त. साधकाला साक्षात्कार झाला की तो अनासक्त होतो. गुरुकृपा - प्रसादाने त्याचे मन शांत होते. मग तो प्रारब्धाने जे सहज मिळेल ते अलिप्तपणे भोगतो. त्याला बसल्याजागी आनंद, शांती लाभते.
यानंतर भगवान शंकरांनी श्रीगुरूगीतेचे भक्तिपूर्वक पठणश्रवण केल्याने कोणते विशेष फळ मिळते ते सांगितले. श्रीगुरूगीतेच्या पठणश्रवणाने साधकाला नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त होते. तो भव्यव्याधीतून मुक्त होतो. सर्वप्रकारचे पाप, ताप, दैन्य, दुःख नाहीसे होते. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व्याधी नाहीशा होतात. सर्व सिद्धींची प्राप्त होते. प्रारब्धाने जरी असाध्य रोग निर्माण झाला, तरी साधक श्रीगुरूगीता जपाने रोगमुक्त होतो. म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने योग्यस्थळी, योग्य आसनावर बसून परमश्रद्धेने स्वतःच श्रीगुरुगीता पाठ करावा. त्यामुळे जीवन सार्थ, कृतकृत्य, यशस्वी व मंगलदायी होते. इच्छापूर्ती होते. गुरुप्रसाद लाभतो. श्रीगुरूगीतेच्या जपाने साधकाला दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, पुत्र-पौत्र इत्यादींचा लाभ होतो. श्रीगुरुगीता सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आहे. कल्पवृक्ष आहे. साक्षात चिंतामणी आहे. एका श्रीगुरूगीतेच्या उपासनेने सर्व देवदेवतांची उपासना होते. श्रीगुरूगीतेच्या पठणाने जीवाशिवाचे ऐक्य होते. त्याच्यावर सरस्वतीची पूर्ण कृपा होते. असे सांगून भगवान सदाशिव म्हणतात, मी सांगितलेले ते त्रिवार सत्य आहे. श्रीगुरूगीतेचे पठणश्रवण करणाऱ्याला अनंत फलप्राप्ती होते.
अशाप्रकारे भगवान शंकरांनी श्रीगुरूभक्तीचे व श्रीगुरुगीतेचे माहात्म्य पार्वतीला सांगितले. सिद्धयोग्यांनी त्याचा आश्रय नामधारकाला सांगितला. सारांश, शहाण्याने गुरु नित्य भजावा. गुरुसेवेचे फळ अनंत आहे. श्रीगुरुला शरण जावे. श्रीगुरू संतुष्ट झाले असता त्रैमूर्ती संतुष्ट होतात. याला वेदशास्त्री संमती आहे. या कलियुगात वेदमार्ग लोप पावला. लोक मूर्ख झाले. पशुसमान वागू लागले. डोळे-कान असूनही अंध-बहिरे झाले आहेत, म्हणून शहाण्या माणसाने मनात गुरुभाव धारण करावा. त्यामुळे मनात गुरुभाव धारण करावा. त्यामुळे भवबंधनातून सुटका होईल. कैवल्यपदाची प्राप्ती होईल. या कलियुगात संत-सज्जनांचा उद्धार करण्यासाठी, भूभार हलका करण्यासाठी श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वतींनी नावांनी घेतला. गुरुभक्ती ही कामधेनू आहे. याविषयी शंका न धरता श्रीगुरुंना शरण जावे. त्यामुळे यमपाश तुटेल. सर्व पातकांचा क्षय होईल.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'गुरुमाहात्म्य - श्रीगुरुगीता' नावाचा अध्याय एकोणपन्नासावा समाप्त.
==============================
अध्याय ५० वा
पूर्वजन्मातील रजकाची कथा
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "यानंतर एक मोठी अपूर्व घटना घडली. पूर्वी तुला मी एका रजकाची कथा सांगितली होती. श्रीगुरुंनी त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात कुरवपूर येथे एका रजकाला 'तू पुढच्या जन्मी बैदुरनगरात यवन राजा म्हणून जन्म घेशील आणि मी यतिरूपाने तुला भेटेन' असा वर दिला होता. ही कथा तुला चांगली आठवत असेल. त्यानुसार तो रजक यवनधर्मात जन्मास आला व बेदरचा राजा झाला. तो सर्वप्रकारच्या ऐश्वर्याचा व लौकिक सुखाचा उपभोग घेत बेदरला राज्य करीत होता. तो हीन जातीत जन्मास आला तरी पूर्वजन्मातील पुण्याईने व संस्कारामुळे तो मोठा पुण्यशील, सुसंस्कृत, उदार अंतःकरणाचा होता. तो सर्व धर्म समान मानीत असे. सर्वांना उदार हस्ते दानधर्म करीत असे. तथापि पूर्वसंस्कारामुळे त्याचे ब्राम्हणांवर विशेष प्रेम होते. त्याच्या राज्यात अनेक मठ-मंदिरे होती; पण तो यवन असूनही कुणाला कसलाही त्रास देत नसे. उलट, मठ-मंदिरांना उदार हस्ते दानधर्म करीत असे. त्यामुळे त्याचे पुरोहित त्याला समजावीत. 'आपण यवन आहोत. आपला धर्म वेगळा, हिंदूंचा वेगळा. आपण त्यांच्या देव-ब्राम्हणांची निंदाच केली पाहिजे. तुम्ही मात्र त्यांची सेवा करीत आहात. यामुळे मोठा दोष निर्माण होतो.आपण आपल्या जातीधार्माप्रमाणेच वागले पाहिजे. त्यामुळेच पुण्यप्राप्ती होते. ते ब्राम्हण महामूर्ख आहेत. ते दगडधोंड्यांची देव म्हणून पूजा करतात. ते वृक्ष, पाषाण, लाकडांनाही देव समजतात. ते लोक गाय, अग्नी, सूर्य, तीर्थ, नदी इत्यादींना देवदेवता समजतात व त्यांची पूजा करतात. ते मंद बुद्धीचे ब्राम्हण निराकार परमेश्वराला साकार मानतात. अशांची जर यवनांनी सेवा केली तर त्यांचा अधःपात होतो." यवन पुरोहित असे बोलू लागला असता त्या यवन राजाला अतिशय राग आला. तो त्या यवन पुरोहिताला म्हणाला, "अहो, तुम्हीच उपदेश करता, की परमेश्वर अणुरेणुतृणकाष्ठात आहे. परमेश्वर सर्वेश्वर असून तो सर्वत्र आहे. मी सुद्धा तेच मानतो; सर्व सृष्टी त्या परमेश्वरानेच निर्माण केली आहे.
सर्व प्राणी, पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतातून निर्माण झाले आहे. सर्वांची पृथ्वी एकाच आहे. कुंभार मातीपासून वेगवेगळी गाडगी-मडकी तयार करतो, पण त्यात माती एकच असते. गाई वेगवेगळ्या रंगाच्या असल्या तरी त्या सर्वांच्या दुधाचा रंग एकच, पांढराच असतो. त्याप्रमाणे देह वेगवेगळे असले तरी सर्वांच्या ठायी परमात्मा एकच असतो. पृथ्वीवर मानवजाती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचा परमेश्वर एकाच आहे. 'नाना देही देव एक विराजे' हे सर्व सामान्य तत्व आहे. आपलेच मत खरे आहे असे मानून इतरांची निंदा कशासाठी करावयाची ? म्हणून शहाण्याने कोणत्याही धर्मपंथाची निंदा -स्तुती करू नये. प्रत्येकजण आपापल्या चालीरीतीप्रमाणे वागत असतो, म्हणून "आम्ही म्हणतो तेच खरे, इतरांचे चूक असे माणू नये." असे बोलून राजानें यवनपुरोहितांचा युक्तिवाद खोडून काढला.
पुढे काही दिवसांनी त्या यवनराजाच्या मांडीवर गळूसारखा एक फोड आला. त्यावर त्याने वैद्यांच्या सल्ल्याने अनेक औषधोपचार केले; पण काही केल्या गुण येईना. त्याला असह्य वेदना होत होत्या. तो दिवस रात्र तळमळत असे. त्यावेळी श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरात होते. आपली कीर्ती ऐकून तो यवनराजा आपल्याला भेटावयास येईल त्यांना असे वाटले. तसे झाले तर येथील ब्राम्हणांना ते आवडणार नाही. त्यांना विनाकारण त्रास होईल म्हणून आपण आता गुप्त राहावे हेच योग्य. असा विचार करून श्रीगुरू शिष्यांना म्हणाले, "यावर्षी गुरु सिंह राशीत आहे. या पर्वानिमित्त आपण गोदावरी तीरावरील तीर्थक्षेत्रांची यात्रा करावी असे मला वाटते. तुम्ही यात्रेची तयारी करा." श्रीगुरुंनी असे सांगताच सर्व शिष्य तयारीला लागले.
इकडे तो यवन राजा मांडीवरील फोडाच्या व्याधीने फारच त्रस्त झाला. नाना प्रकारची औषधे झाली, हकीम झाले, मात्र काडीमात्र दुखणे बरे होईना. काय करावे, त्याला काही समजेना. मग त्याने काही विद्वान ब्राम्हणांना पाचारण केले. तो त्या विद्वान ब्राम्हणांना म्हणाला, "माझ्या व्याधीपुढे सर्व वैद्य-हकीमांनी हात टेकले आहेत. कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाही. जीव अगदी नकोस झाला आहे. आता यावर काय इलाज करायचा ?" त्यावर ते ब्राम्हण म्हणाले, "राजा, पूर्वजन्मीचे पाप असे व्याधीच्या रूपाने पीडा देते. ज्यावेळी मानवी उपाय थांबतात, त्यावेळी काही दैवी उपाय करावे लागतात. यासाठी आपण तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म करावा. त्यामुळे ही व्याधी नाहीशी होईल किंवा एखाद्या थोर सत्पुरुषाची सेवा करावी. त्याच्या कृपादृष्टीने आजार नाहीसा होईल. सत्पुरुषाच्या दृष्टीने कोटीजन्माची पापे नाहीशी होतात, तेथे आपल्या या व्याधीचे काय चालणार ?" त्यावर तो यवनराजा म्हणाला, मला यवन असे मानू नका. मी ब्राम्हणांचा दासानुदास आहे. मी पूर्वजन्मी श्रीगुरूचरणांची सेवा केली होती; पण काही पापांमुळे मला यवन कुळात जन्म घ्यावा लागला आहे. त्याला माझा इलाज नाही. मी आपणास शरण आलो आहे. मला एखादा निश्चित उपाय सांगा. " राजाने अशी विनवणी केली असता ते ब्राम्हण म्हणाले, "महाराज, तुम्ही गुप्तपणे पापविनाशी तीर्थास जा व त्या तीर्थात स्नान करा. त्यामुळे पापक्षालन होऊन तुमचा रोग बरा होईल."
ब्राम्हणांनी असे सांगितले असता राजाला आनंद झाला. मग तो कुणालाही बरोबर न घेता, एकटाच गुप्तपणे पापविनाशी तीर्थावर गेला. तेथे त्याने मोठ्या भक्तिभावने स्नान केले. त्याचवेळी तेथे एक संन्यासी आला. राजाने त्याला साष्टांग नमस्कार केला. मग आपल्या मांडीवरील फोड दाखवून त्याने विचारले, "यतिमहाराज, माझी ही व्याधी कशामुळे बरे होईल ?" त्यावर तो संन्यासी म्हणाला, "एखाद्या थोर अवतारी पुरुषाचे दर्शन घेतले असता तुझा हा आजार पूर्ण बरा होईल. थोर अवतारी पुरुषाच्या कृपादृष्टीचा प्रभाव किती मोठा असतो याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ती ऐकलीस की तुझी खात्री पटेल." असे बोलून त्या सन्याशाने कथा सांगण्यास सुरुवात केली.
पूर्वी अवंतीनगरीत एक ब्राम्हण राहत होता. तो नुसता नावाचाच ब्राम्हण. अत्यंत दुराचारी होता. मदोन्मत्त होता. ब्राम्हणकुळाला कलंक असलेला तो अनेक स्त्रियांशी ब्याभिचार करीत असे. तो स्नानसंध्या-पूजापाठ इत्यादी जो ब्राम्हणाचा आचारधर्म त्याचा पूर्ण त्याग करून पिंगला नावाच्या एका वेश्येच्या घरी राहत असे. तिच्याकडे भोजन करीत असे.
एकदा तो त्या वेश्येच्या घरी असताना ऋषभनावाचा एक महायोगी तेथे आला. त्याला पाहताच त्या ब्राम्हणाने व पिंगलेने त्या महायोग्याला साष्टांग नमस्कार घालून त्याला सन्मानपूर्वक घरात आणले व त्याची मोठ्या भक्तिभावाने यथासंग पूजा केली. त्याचे चरणतीर्थ घेतले. त्याला उत्तम भोजन दिले व पलंगावर झोपविले. त्याचे पाय चेपले. त्याला गाढ झोप लागली. ती दोघे रात्रभर त्या योगेश्वाराची सेवा करीत राहिले. त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेला तो ऋषभ योगेश्वर सकाळी जागा झाला. त्या दोघांना आशीर्वाद देऊन निघून गेला. कालांतराने त्या दुराचारी ब्राम्हणाला व पिंगला वेश्येला वार्धक्याने मृत्यू आला.
त्या वृषभ योग्याची मनोभावे सेवा केल्यामुळे तो ब्राम्हण दशार्ण राजा वज्रबाहू व त्याची सुमती नावाची पत्नी यांच्या पोटी जन्मास आला. सुमती गर्भवती असताना तिच्या सवतीने मत्सरापोटी तिला विष घातले. त्या विषाने ती मेली नाही. पण तिच्या सर्वांगाला फोड झाले. तशाच स्थितीत ती प्रसूत झाली. विषामुळे नवजात बाळाच्या अंगावरही फोड उठले. त्या मायलेकरांचे अतिशय हाल होत होते. त्यांना वेदना होत होत्या. त्यांचे हाल पाहून राजाला मोठी काळजी वाटू लागली. त्याने पुत्रजन्माचा उत्सव केला नाही. त्याने मोठमोठ्या वैद्यांना पाचारण करून राणीवर व राजपुत्रावर औषधोपचार केले; पण कशाचाही उपयोग झाला नाही. ती मायलेकरे असह्य वेदनांनी ओरडत होती. राजाला त्या दोघांचे हाल पाहवेनात. त्या फोडांनी तय दोघांची शरीरे नासून किळसवाणी झाली. शेवटी राजाने मन कठोर करून त्या दोघांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्याने काही कोळ्यांना बोलाबून सांगितले, "या दोघा मायलेकरांना निर्मनुष्य अशा अरण्यात नेउन सोडून या." राजाचा हा निर्णय ऐकून राजवाड्यातील सर्व स्त्री-पुरुषांना अतिशय दुःख झाले. ते राजाला शिव्याशाप देऊ लागले. त्याला पापी दुराचारी म्हणून लागले. राजाच्या आज्ञेनुसार कोळ्यांनी राणीला व राजपुत्राला रथात बसवून निर्मनुष्य अशा अरण्यात नेउन सोडले. बिचारी सुमती आधीच शरीरावरील फोडांनी त्रस्त झालेली, त्यातच पतीने त्याग केलेला, यामुळे ती आक्रोश करत होती. आपल्या व्याधीग्रस्त मुलाला कडेवर घेऊन रानावनात भटकू लागली. अन्नपाण्याविना तिचे फार हाल होत होते. त्या घोर अरण्यात भटकत असता तिला काही गुराखी दिसले. ती त्यांच्याजवळ पाणी मागू लागली, तेव्हा ते गुराखी तिला म्हणाले, "तू अशीच पुढे जा. तेथे तुला एक मंदिर दिसेल. तेथे तुझी खाण्यापिण्याची, राहण्याची सोय होईल." असे त्या गुराख्यांनी सांगितले असता सुमती मुलाला घेऊन पुढे जाऊ लागली. वाटेत तिला एक गाव लागले. त्या गावातील लोक तिला सुखी समाधानी वाटले. ते पाहून तिला खूप बरे वाटले. तिने त्या गावातील स्त्रियांकडे जाऊन 'या गावाचा राजा कोण आहे ?' असे विचारले असता त्या स्त्रिया म्हणाल्या, 'पद्माकर नावाचा वैश्य या गावाचा मुख्य आहे. तो मोठा पुण्यवान, परोपकारी, धर्मशील श्रीमंत आहे. तू त्याला भेट. त्याला आपली परिस्थिती सांग. तो तुला नक्की आश्रय देईल." त्या स्त्रिया असे सांगत होत्या, त्याचवेळी पद्माकाराची दासी योगायोगाने तेथे आली. त्या मायलेकरांची दयनीय अवस्था पाहून त्या दासीला त्यांची दया आली. ती त्या दोघांना घेऊन पद्माकाराच्या घरी गेली. त्या पद्माकर वैश्याने त्या दोघांना आपल्या घरी आश्रय दिला. त्यांच्या अन्नवस्त्राची, राहण्याची अवस्था केली.
त्या पद्माकर वैश्याकडे राहत असताना एके दिवशी तय राजपुत्राला- म्हणजे सुमतीच्या मुलाला मृत्यू आला. आपला एकुलता एक पुत्र मरण पावला म्हणून सुमती दुःखाने जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागली. राजवाड्यातील स्त्रियांनी तिचे परोपरीने सांत्वन करण्याचा प्रयत्न केला; पण सुमतीचा शोक काही केल्या थांबेना. त्याचवेळी दोघांचे पूर्वजन्मातील पुण्यकर्म लक्षात घेऊन महायोगी ऋषभ तेथे प्रकट झाला. त्याला पाहताच पद्माकर वैश्याने त्या योगीशाला साष्टांग नमस्कार करून त्याची यथासंग पूजा केली.
त्यावेळी त्या योगीशाने विचारले, "घरात कोण बरे रडत आहे ? काय झाले आहे ? " पद्माकाराने त्या मायलेकरांची हकीगत सांगितली. ती ऐकताच त्या महायोगी ऋषभाला त्या मायलेकरांची दया आली. मग तो सुमतीजवळ जाऊन तिला समजावीत म्हणाला, "तू विनाकारण का बरे शोक करतेस ? या जगात कोण जन्मास आला ? आणि कोण मेला ? सांग बरे. या जगात चिरंजीव कोण आहे ? जो जन्मास येतो त्याला एक न एक दिवस मृत्यू येतोच. हे जग क्षणभंगुर आहे. देह हा नाशिवंत आहे. गंगेच्या पाण्यावरील फेस किंवा पाण्यातील बुडबुडा, त्याप्रमाणे दे जग क्षणिक आहे, म्हणून शहाण्या मनुष्याने जन्म-मृत्यूबद्दल आनंद किंवा दुःख करू नये. मातेच्या उदरात जेव्हा गर्भ निर्माण होतो तेव्हा त्याचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणी तरुणपणी मरतो तर कोणी वृद्धपणी मरतो. प्रारब्धानुसार सर्व काही घडत असते. आई-वडील, पुत्र इत्यादी नाती मायेपोटी निर्माण झालेली असतात. ब्रम्हदेवाने लिहिलेली ललाटरेषा कधीही बदलत नाही. मला सांग, गतजन्मी तू कोणाची पत्नी होतीस ? कोणाची तू माता होतीस ? कोण तुझा पुत्र होता ? सांगता येत नाही ना ? मग तू विनाकारण शोक का बरे करतेस ? तेव्हा शोक आवर व भगवान सदाशिवला शरण जा." त्या महायोगी ऋषभाने असे परोपरीने समजाविले तरी, सुमतीचे दुःख कमी झाले नाही. ती म्हणाली, "योगीराज, मी या व्याधीने मरणयातना भोगत आहे. मी राज्यभ्रष्ट झाले आहे. माझ्या पतीने माझा प्राणत्याग केला आहे आणि माझा जीव की प्राण असा माझा पुत्र मरण पावला आहे. अशा परीस्थितीत मी जिवंत तरी कशी राहू ? मला आता मरण आले तर बरे होईल ."
सुमतीचे दुःख पाहून ऋषभ योग्याला तिची दया आली. त्याने थोडे भस्म घेऊन त्या मृत बालकाला लावले व त्याच्या मुखातही घातले. त्याच क्षणी तो मुलगा जिवंत झाला. ऋषभाने आणखी भस्म अभिमंत्रित करून त्या मायलेकरांच्या शरीराला लावले. आणि काय आश्चर्य ! दोघेही रोगमुक्त झाली. शरीराला सुवर्णकांती प्राप्त झाली.
दोघांच्याही शरीरावरील फोड पूर्ण नाहीसे झाले. प्रसन्न झालेल्या त्या ऋषभ योग्याने दोघांना वर दिला, "तुम्हाला कधीही वार्धक्य येणार नाही. तुम्ही सदैव तरुण राहाल." त्या योग्याने सुमतीला वर दिला, 'तुझा पुत्र दीर्घायुषी होईल. त्याला फार मोठी कीर्ती लाभेल. तो आपल्या पित्यापेक्षा अधिककाळ राज्य करील." असा वर देऊन तो ऋषभ योगी एकाएकी निघून गेला.
ही कथा सांगून तो संन्यासी यवन राजाला म्हणाला, "हे राजा, चिंता करू नकोस. सत्पुरुषाच्या कृपाप्रसादाने तुझ्याही मांडीवरील हा फोड नाहीसा होईल, यावर तू पूर्ण विश्वास ठेव." त्या संन्याशाने असे सांगितले असता यवनराजाने नमस्कार करून विचारले, "ते सत्पुरुष कोठे आहेत ? मला सांगा, म्हणजे मी लगेच त्यांच्याकडे जातो व त्यांच्या चरणांचे दर्शन घेतो." त्यावर तो संन्यासी म्हणाला, "गाणगापुरात भीमेच्या तीरावर ते महात्मा आहेत. तू त्यांच्याकडे जा व त्यांचे दर्शन घेताच तुझी व्याधी नाहीशी होईल." हे ऐकताच तो यवनराजा श्रीगुरुंच्या दर्शनाला निघाला. मजल-दरमजल करीत गाणगापुरात आला. त्याने गावातील लोकांना विचारले, "येथे एक थोर संन्यासी आहेत असे ऐकतो. आता ते कोठे आहेत ?" असे त्याने विचारताच गावातले लोक घाबरले. ते आपापसात म्हणाले, "अहो, आता काही खरे नाही. हा यवन श्रीगुरूंची चौकशी करतो आहे. आता हा काय करील सांगता येत नाही." अतिशय घाबरलेले ते लोक काहीही बोलेनात. तेव्हा तो राजा रागावून म्हणाला, "अरे, बोला ना ! मी त्यांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. ते आता कोठे आहेत ते सांगा." मग लोक म्हणाले, "श्रीगुरू नित्य मध्यान्हकाळी भीमा-अमरजा संगमावर अनुष्ठानासाठी जातात. अनुष्ठान पूर्ण झाले की मठात परत येतात. आता ते संगमावर आहेत." हे ऐकताच यवन राजा आपला लवाजमा मागे ठेवून एकटाच मेण्यात बसून श्रीगुरुंना भेटण्यासाठी संगमावर गेला. दुरूनच श्रीगुरुंना पाहताच तो मेण्यातून खाली उतरला, पायी चालत चालत श्रीगुरुंच्या समोर गेला व भक्तिभावाने हात जोडून उभा राहिला. श्रीगुरुंनी त्याला विचारले, "काय रे रजका ! तुमची माझी भेट पूर्वी झाली होती. आता खूप वर्षांनी परत आला आहेस !" श्रीगुरू असे बोलताच त्या राजाला पूर्वजन्माची आठवण झाली. त्याने श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या चरणपादुकांवर लोळण घेतली. त्याचे शरीर रोमांचित झाले. त्याच्या डोळ्यांवाटे आनंदाश्रू वाहू लागले. तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, आपण माझी उपेक्षा का बरे केलीत ? मी अनाथ झालो. मी आपल्या चरणांपासून वेगळा झालो. मी मदोन्मत्त होऊन आपले चरण विसरलो. आपण जवळ होतात तेव्हा मी आपणास ओळखले नाही. आपण भक्तजनांची कधीही उपेक्षा करत नाही, अशी माझी पूर्ण खात्री होती मग आपण मला अज्ञानसागरात का बरे लोटून दिलेत ? आता माझा उद्धार करा. यासाठी मी आपणास शरण आलो आहे. आता मला हा जन्म पुरे !
श्रीगुरू त्याला म्हणाले, "मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या सर्व इच्छा, वासना पूर्ण होतील. " तेव्हा राजा म्हणाला, "स्वामी, माझ्या मांडीवर मोठा फोड आला आहे. त्याच्या असह्य वेदना होत आहेत. आपण एकदा कृपादृष्टीने पाहावे." राजाचे ते बोलणे ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, "अरे, तो फोड कोठे आहे दाखव बरे !" राजा पाहतो तो काय ? तो असह्य वेदना देणारा फोड नाहीसा झाला होता. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले. तो श्रीगुरुंच्या चरणांवर मस्तक ठेवून म्हणाला, "स्वामी, मला आपण रोगमुक्त केलेत. मला राजपद व सर्व ऐश्वर्ये देऊन माझी गत्जान्मातील इच्छा पूर्ण केलीत, ही सगळी केवळ आपली कृपा ! आता आपण एकदा तरी माझ्या राजधानीत यावे अशी प्रार्थना आहे." त्यावर श्रीगुरू म्हणाले, "अरे, आम्ही आहोत तापसी संन्यासी ! आम्ही तुझ्या नगरात कसे येणार ? तेथे तर हिंसादी पापकर्मे चालू असतात. तेथे गोहत्या होत असते. जीवहिंसा हे महापाप अशा ठिकाणी आम्ही येणे योग्य ठरणार नाही." राजा म्हणाला, "हे सर्व घडते. माझा पूर्वीचा जन्म रजकाचा, पण आपल्या आशीर्वादाने मला राज्य मिळाले, अनेक प्रकारची सुखे मला मिळाली; पण एकदा मला पुत्रपौत्र समजून आलात तर सर्व गोष्टींचा त्याग करून आपली सेवा करीत राहीन." राजाने अशी परोपरीने विनंती केली असता श्रीगुरुंनी विचार केला, "आता यापुढे यवनांची सत्ता वाढणार तेव्हा आता या कलियुगात जास्त काऴ प्रकट राहणे योग्य नाही. आज हा यवन राजा येथे आला, उद्या त्याचे प्रजाजन येऊ लागतील. तेव्हा आता गुप्त होणेच योग्य. तेव्हा सिंहस्थाच्या निमित्ताने गौतमीयात्रा करू व या राजाचीही इच्छा पूर्ण करू." असा विचार करून ते मठाकडे निघाले. राजाने त्यांना मेण्यात बसविले. त्यांच्या पादुका हातात घेऊन तो पायी चालू लागला, तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, "राजा, तू ब्राम्हणाची सेवा करतो आहेस असे तुझ्या लोकांनी पहिले तर ते तुझी निंदा करतील, म्हणून तू मेण्यात बस." पण राजाने ते मानले नाही. 'मी आपला दासानुदास आहे.' असे म्हणून तो चालतच निघाला. राजाने आपल्याबरोबर आणलेले सर्व ऐश्वर्य दाखविले. श्रीगुरू त्याला म्हणाले, "राजा, तुझ्या या लवाजम्याबरोबर जायचे तर उशीर होईल माझ्या नित्य अनुष्ठानात खंड पडेल. तू पुढे जा. मी तुझ्या नगरीत येईन." असे सांगताच राजा निघून गेला. मग श्रीगुरू शिष्यांसह अदृश्य झाले व मनोवेगे पापविनाशी तीर्थावर आले.
श्रीगुरू आल्याचे समजताच सायंदेव साखरेचा पुत्र नागनाथ तेथे आला. श्रीगुरू अनुष्ठानास बसले होते. नागनाथाने श्रीगुरुंना आपल्या घरी नेउन त्यांची यथासंग पूजा केली व मोठी समाराधना केली. मग श्रीगुरू त्याला म्हणाले, "आता आम्हाला निरोप दे. बिदरचा यवन राजा मला पापविनाशी तीर्थावर भेटावयास येणार आहे. मी तेथे दिसलो नाही तर तो येथे येईल. तुम्हा ब्राम्हणांना त्याचा उपद्रव होईल." असे सांगून व त्याला अनेक आशीर्वाद देऊन श्रीगुरू पापविनाशी तीर्थावर गेले. पूर्वी ठरल्याप्रमाणे यवनराजा तेथे आला. त्याने श्रीगुरुंना पालखीत बसवून वाजतगाजत आपल्या राजधानीला नेले. ब्राम्हणादी हिंदूंना आनंद झाला; पण यवनांची राजाची निंदा केली. राजाने श्रीगुरुंना उच्चासनावर बसवून त्यांची पाद्यपूजा केली. त्यांच्याबरोबर आलेल्या शिष्यांचा सन्मान केला. मोठा दानधर्म केला. ब्राम्हणांना व याचकांना संतुष्ट केले. या निमित्ताने प्रजाजनांनाही श्रीगुरुंच्या दर्शनाचा लाभ झाला. संतुष्ट झालेल्या श्रीगुरुंनी एकांतात राजाला आशीर्वाद देऊन विचारले, "आता तू संतुष्ट झाला आहेस न ? तुझी आणखी काही इच्छा आहे काय ? असेल तर सविस्तर सांग." राजा म्हणाला, "स्वामी, आता तुमची चरणसेवा घडावी एवढीच माझी इच्छा आहे. मला मुक्ती हवी आहे. ते ज्ञान मला द्या." श्रीगुरू म्हणाले, "तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आपल्या पुत्रावर राज्याची जबाबदारी सोपवून श्रीशैल्य पर्वतावर ये. तेथे आपली भेट होईल." असे सांगून श्रीगुरू गौतमी यात्रा करून गाणगापुरात परत आले. श्रीगुरुंना पाहताच सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्वांनी त्यांची मंगल आरती केली. मग सर्व शिष्यांना जवळ बोलावून श्रीगुरू त्यांना म्हणाले, "माझी सर्वत्र ख्याती झाली आहे. बिदरचा यवन राजा माझा भक्त झाला आहे. हे पाहून त्याचे प्रजाजानही आपल्या वासनापूर्तीसाठी येथे येऊ लागतील. त्यांचा येथील लोकांना व ब्राम्हणांना त्रास होईल, म्हणून मी प्रकटरूपाने श्रीशैल्य यात्रेला जाणार आहे. मात्र गुप्त, सूक्ष्म देहाने मी येथेच गाणगापुरात वास्तव्य करणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा." असे सांगून लौकिकार्थाने ते श्रीशैल्य यात्रेला निघाले. असे सिद्ध्योग्यांनी नामधारकाला सांगितले.
ग्रंथकार सरस्वती गंगाधर म्हणतात, "श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरात असलेले मी प्रत्यक्ष पहिले आहे. जे लोक त्यांची भक्तिभावाने उपासना, आराधना करतात, त्यांच्या सर्व इच्छाकामना त्वरित पूर्ण होतात. याविषयी जराही संदेह बाळगू नये. ज्यांना विनाकष्ट कामनापुर्ती हवी असेल त्यांनी गाणगापुरास जावे. तेथे प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे. तेथे गेले असता मनातल्या सर्व इच्छाकामना पूर्ण होतात. धन, धान्य, पुत्र-पौत्र इत्यादी जे हवे असेल ते प्राप्त होते."
सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, जे कोणी श्रीगुरूचरित्राचे भक्तिभावाने, निष्ठेने श्रवण-पठण करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'पूर्वजन्मातील रजकाची कथा' नावाचा अध्याय पन्नासावा समाप्त.
=================================
अध्याय ५१ वा
श्रीगुरू नृसिंहसरस्वतींचे निजानंदगमन
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक शिष्य सिद्ध्योग्य चरणांना वंदन करून म्हणाला, "यवनराजाने श्रीगुरू नृसिंहसरस्वतींना त्याच्या बिदर नगराला गेले होते. तेथून श्रीगुरू गाणगापुरात परत आले असे तुम्ही यापूर्वी सांगितलेत. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा." त्यावर सिद्धयोगी म्हणाले, "बाळा, आता पुढे काय झाले ते मी तुला सांगतो. ती विशेष घटना तू लक्षपूर्वक ऐक. ही कथा श्रवण करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात." श्रीगुरू यवनराजाला त्याच्या नगरात भेटून गाणगापुरात परत आले. परत आल्यावर त्यांनी एक विचार पक्का केला, की आता हा पसारा खूप वाढला आहे. लोकांना खरा परमेश्वर समजावा. नुसती व्यक्तीची पूजा असू नये. आता आपण गुप्त होऊन अवतारसमाप्ती करावी. मग त्यांनी आपल्या शिष्यांना व भक्तांना आपण श्रीशैल्यपर्वतावर जाऊन तेथेच गुप्तपणे राहणार असे सांगितले. प्रस्थानाची सर्व तयारी झाली. श्रीगुरू शिष्यांसमवेत श्रीशैलयात्रेला म्हणून निघाले. त्यावेळी भक्तजनांना अतिशय वाईट वाटले. ते श्रीगुरुंच्या चरणी पडून म्हणाले, "स्वामी, आम्हाला सोडून आपण का बरे जाता ? स्वामी, तुम्ही आम्हा भक्तांसाठी कामधेनू आहात. तुमच्या केवळ दर्शनाने सर्व पातके दाही दिशांना पळून जातात. तुमच्या कृपेने आमच्या सर्व कामना पूर्ण होतात. आई आपल्या बालकाचा कधी त्याग करते का ? तुम्हीच आमचे माता-पिता सर्व काही आहात. आमच्यावर कृपा करा. आम्हाला सोडून जाऊ नका."
सर्व भक्तांनी अशी परोपरीने विनवणी केली असता श्रीगुरू त्या सर्वांना अत्यंत प्रेमाने म्हणाले, "भक्तजन हो, तुम्ही कसलीही चिंता करू नका. मी तुम्हाला सोडून कोठेही जाणार नाही. मी याच गाणगापुरात, नित्य अमरजा संगमात स्नान करून मठातच गुप्तपणे राहीन, याविषयी तुम्ही निश्चिंत राहा. जे लोक माझी नित्य भक्ती करतील त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईन. मात्र जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्या दृष्टीने मी शैल्य्यात्रेला जात आहे. मी प्रातःकाली कृष्णानदीत स्नान करीन. कृष्णा-पंचगंगा संगमावर औदुंबरक्षेत्री अनुष्ठान करीन. संगमावर पुन्हा स्नान करीन. मध्यान्हकाळी मठात येईन. तेथे मी भक्तांच्या पूजेचा स्वीकार करीन. तुम्ही कसलही चिंता करू नका. आम्ही गाणगापुरात निरंतर वास्तव्य करणार आहोत. जे लोक आमची भक्ती करतात, आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतात ते आम्हाला विशेष प्रिय आहेत. त्यांच्या सर्व कामना, इच्छा त्वरित पूर्ण होतील. हे आमचे वचन त्रिवार सत्य आहे. अमरजा संगमावर जो अश्वथवृक्ष आहे तो कल्पवृक्ष आहे. त्याची नित्य पूजा करा म्हणजे तुमच्या मनात ज्या इच्छा असतील त्या खात्रीने पूर्ण होतील. मी मठात माझ्या निर्गुण पादुका ठेवीत आहे. अश्वत्थाची पूजा करून मठात येत चला व तेथे माझ्या निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करीत जा. विघ्नहर्त्या चिंतामणी श्रीगणेशाची पूजा करा. त्यामुळे तुमच्या सर्व चिंता नाहीशा होऊन इच्छित फळ मिळेल. आमची दररोज त्रिकाल आरती करावी म्हणजे सर्व कार्ये सिद्धीला जातील." अशा रीतीने सर्व भक्तजनांची समजूत घालून, त्यांना आशीर्वाद देऊन श्रीगुरू नृसिंहसरस्वती श्रीशैल्ययात्रेसाठी निघाले. सर्व भक्त त्यांना प्रेमाचा निरोप देऊन मठात परत आले. त्यावेळी त्यांना श्रीगुरू मठातच आहे असे दिसले.
श्रीगुरू आपल्या चार शिष्यांसह पाताळगंगेच्या तीरावर आले. त्यांनी शिष्यांना सांगितले, " माझ्यासाठी फुलांचे आसन तयार करा, मी या नदीतून श्रीपार्वातापर्यंत जाईन व मल्लिकार्जुनाशी ऐक्य साधून राहीन." श्रीगुरुंनी असे सांगताच शिष्यांनी शेवंती, कमळ, मालती, कल्हार अशी फुले केळीच्या पानात गुंडाळून आणली. त्या फुलांचे त्यांनी सुंदर आसन तयार करून ते गंगेच्या पवित्र पाण्यावर ठेवले. मग श्रीगुरू त्यांना म्हणाले, "आता तुम्ही गावात परत जा."
हे ऐकताच सर्व शिष्य दुःखी झाले. श्रीगुरू त्यांना समजावीत म्हणाले, "आम्ही गाणगापुरातच मठात असू. तुम्हाला दर्शन देऊ. कसलीही चिंता करू नका. लौकिकदृष्ट्या आम्ही जात आहोत असे दिसले तरी आम्ही नित्य भक्तांच्या घरीच असू, याची खात्री बाळगा." असे सांगून श्रीगुरू उठले व नदीतील आसनावर जाऊन बसले. आता मी निजस्थानी जातो. तेथे गेल्यावर प्रवाहातून फुले प्रसाद म्हणून पाठवितो." असे ते शिष्यांना म्हणाले. त्यावेळी कन्या राशीत गुरु होता. बहुधान्य नाम संवत्सर होते. त्या दिवशी माघ वद्य प्रतिपदा होती. वार शुक्रवार होता. शिशिरऋतू होता.
श्रीगुरू निजानंदी बसले, त्यावेळी ते शिष्यांना म्हणाले, "आम्ही निजधामाला जात आहोत. तेथे पोचल्याची खूण म्हणून शेवंतीची चार प्रसादपुष्पे प्रवाहात वाहत येतील. ती तुम्ही घ्या. आमची नित्य पूजा करीत जा. त्यामुळे तुमच्या घरी अखंड लक्ष्मी राहील. आम्हाला गायन खूप आवडते. ज्या घरी आमचे स्तोत्रगान चालू असेल त्या घरी आम्ही अखंड वास्तव्य करतो. आमचे जो नेहमी स्तोत्रगान करतो त्याला कसलीही व्याधी येणार नाही. त्याचे दारिद्र्य नाहीसे होईल. त्याला पुत्रपौत्र प्राप्त होतील. तो निरामय शतायुषी होईल. जे कोणी आमचे चरित्र श्रवण-पठण करतील त्यांच्या घरी लक्ष्मी नांदेल. याविषयी संदेह नसावा." असे आपल्या शिष्यभक्तांना आश्वासन देऊन श्रीगुरू एकाएकी गुप्त झाले.
सगळे भक्त तेथेच चिंता करीत बसले त्यावेळी एका नावेतून काही नावाडी आले. ते त्या शिष्यांना नमस्कार करून म्हणाले, "आम्ही पैलतीरी होतो. तेथे आम्ही श्रीगुरुंना पाहिले. संन्यासी वेषात असलेल्या त्यांनी हातात दंड धारण केला होता. त्यांनी स्वतःचे नाव श्रीनृसिंहसरस्वती असे सांगितले. त्यांनी तुम्हाला एक निरोप सांगितला आहे. "आम्ही कर्दळीवनी जात असलो तरी नित्य गाणगापुरातच असू." त्यांनी जाताना असेही सांगितले की, तुम्ही आता तुमच्या घरी जावे. वंशोवंशी माझी भक्ती करीत सुखाने राहावे. प्रसादपुष्पे आल्यानंतर ती शिष्यांनी घ्यावीत असे आम्हाला सांगून श्रीगुरू एकाएकी अदृश्य झाले. ते नावाडी असे सांगत होते तोच प्रसादपुष्पे वाहत आली. तू चार शिष्यांनी घेतली.
सिद्धयोगी असे सांगत होते त्यावेळी नामधारकाने विचारले, "ते चार प्रमुख शिष्य कोण ?" त्यावर सिद्धयोगी म्हणाले, "श्रीगुरुंचे अनेक शिष्य होते. श्रीगुरुंनी त्यांना संन्यासदीक्षा देऊन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पाठविले. त्यातील कृष्णसरस्वती, बालसरस्वती व उपेंद्रसरस्वती व माधवसरस्वती या चौघांनाही तीर्थयात्रेला पाठविले. श्रीगुरू निजधामाला गेले त्यावेळी सायंदेव साखरे, कवीश्वर नाव दिलेला नंदीब्राम्हण, नरहरी कवी आणि मी स्वतः असे चौघेजण त्यांच्याबरोबर होतो. आम्ही ती पुष्पे काढून घेतली. ते पुष्प आजही माझ्याकडे आहे. त्याची मी नित्य पूजा करतो." असे सांगून सिद्धयोग्यांनी नामधारकाला ते शेवंतीचे पुष्प दाखविले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, श्रीगुरू नृसिंहसरस्वतींचा महिमा हा असा मोठा फार अद्भुत, अपूर्व आहे. तो अपार आहे. त्यातील फार मोठा भाग मी तुला सांगितला. नामधारका, साक्षात कामधेनू असेलेले श्रीगुरुचरित्र मी तुला सविस्तर सांगितले. आता तुझे दैन्य, दारिद्र्य पळून गेले असेच समज. हे श्रीगुरूचरित्र लिहून काढतील किंवा याचे जे श्रवण-पठण करतील ते लक्ष्मीवंत होतील. त्यांना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल. त्यांच्या मातृ-पितृ उभयपक्षी महानंद होईल. त्यांना पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल."
असे हे श्रीगुरुचरित्र सिद्धांनी नामधारकाला सांगितले. ते ऐकून नामधारकाला परमानंद प्राप्त झाला. त्याच्या सर्व इच्छा तत्काळ पूर्ण झाल्या.
ग्रंथकार सरस्वती म्हणतात, "नामधारकाने या श्रीगुरुचरित्राचे जे मोठ्या भक्तिभावाने श्रवण-पठण करतील. त्यांना धर्मार्थकाममोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. श्रीगुरू नृसिंहसरस्वती त्यांचे वंशोवंशी रक्षण करतील, म्हणून सरस्वती गंगाधर श्रोत्यांना वंदन करून सांगतात, "श्रोते हो ! सर्व इच्छा, कामना पूर्ण करणाऱ्या या श्रीगुरूचरित्राचे तुम्ही नित्य भक्तिभावाने, श्रद्धेने श्रवण-पठण करा. तुमचे सदैव कल्याण होईल."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीगुरू नृसिंहसरस्वतींचे निजानंदगमन' नावाचा अध्याय एकावन्नावा समाप्त.
============================
अध्याय ५२ वा
श्रीगुरूचरित्र अवतरणिका
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेव परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः ।। ॐ।।
श्रोते हो ! सावधानचित्ताने ऐका ! श्रीगुरूचरित्राचे एकावन्न अध्याय श्रवण केले असता नामधारकाची भावसमाधी लागली . तो निजानंदात मग्न झाला. श्रीगुरूचरित्रामृत सेवन करून तो तटस्थ झाला. त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव मिर्माण झाले. सर्वांगावर घामाचे बिंदू उत्पन्न होऊन रोमांच उभे राहिले. कंठ दाटून आला. सर्वांगाला कंप सुटला. त्याच्या डोळ्यांवाटे प्रेमाश्रू वाहू लागले. शरीराची हालचाल बंद झाली. तो समाधिसुखात आनंदाने डोलत होता. ते पाहून सिद्धयोग्यांना परमानंद झाला.
त्यांनी त्याला प्रेमाने कुरवाळून सावध केले. त्याला गाढ प्रेमालिंगन देऊन ते म्हणाले, "बाळ, नामधारका, तू खरोखर भवसागर तरुन गेला आहेस; पण तू असा समाधी अवस्थेत राहिलास तर तुला मिळालेले ज्ञान तुझ्याच ठिकाणी राहील. मग लोकांचा उद्धार कसा होईल ? तू वारंवार विचारलेस म्हणूनच मला श्रीगुरूंची अमृतवाणी आठवली. ती त्रिविधतापांचा, सर्व दुःखाचा नाश करणारी आहे. तुझ्यामुळेच मला श्रीगुरुचरित्र आठवले. तुही ते एकाग्रचित्ताने श्रवण केलेस." सिद्धयोगी असे बोलले असता नामधारकाने डोळे उघडले. तो हात जोडून उभा राहिला व सिद्धयोग्यांना म्हणाला, "स्वामी, तुम्ही खरोखर कृपातरू आहात. या विश्वाचे तुम्ही आधार आहात. तुमच्या कृपेनेच संसारसागर पार करता येतो. माझ्यावर तुमचे अनंत उपकार आहेत.
आता माझी एक विनवणी आहे अमृतापेक्षा श्रेष्ठ अशा श्रीगुरूचरित्रामृताची अवतरणिका मला सांगा. आपण सांगितलेल्या श्रीगुरूचरित्रामृतात भक्तजनांच्या चितवृत्ती बुडून गेल्या असल्या, तरी मी अद्यापही अतृप्त आहे. मला श्रीगुरूचरित्रामृत पाजून आनंदसागरात ठेवा. अनेक औषधी वनस्पतींचे सार काढून ते दिव्य औषध काढतात, त्याप्रमाणे श्रीगुरूचरित्रामृताचे सार मला सांगा."
नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, "बाळा, तुझी श्रीगुरुचरित्रावर अखंड श्रद्धा राहो. त्यासाठी मी तुला श्रीगुरूचरित्राची अवतरणिका सांगतो, ती ऐक.
पहिल्या अध्यायात मंगलाचरण असून सर्व देवदेवतांचे स्मरण केले आहे. भक्तजनांना श्रीगुरूमूर्तीचे दर्शन घडले आहे.
दुसऱ्या अध्यायात ब्रम्होत्पत्ती सांगितली असून चारी युगांची वैशिष्ट्ये कथन केली आहेत. त्याच अध्यायात गुरुमाहात्म्य व संदीप आख्यान आले आहे.
तिसऱ्या अध्यायात अंबरीष आख्यान सांगितले आहे.
चौथ्या अध्यायात सती अनुसूयेची सत्वपरीक्षा पाहण्यासठी आलेले त्रैमूर्ती तिची बालके होतात, ती त्रैमूर्ती श्रीदत्तात्रेय अवतार कथा सांगितली आहे.
पाचव्या अध्यायात श्रीदत्तात्रेयांच्या श्रीपादश्रीवल्लभ अवताराची कथा आली असून, सहाव्या अध्यायात गोकर्णमहिमा व महाबळेश्वरलिंग स्थापनेची कथा सांगितली आहे.
आठव्या अध्यायात शनिप्रदोषव्रत माहात्म्य वर्णिले असून, नवव्या अध्यायात श्रीगुरुंनी एका रजकाला राज्यप्राप्तीचा वर दिल्याची कथा आली आहे.
दहाव्या अध्यायात कुरवपूर क्षेत्र महिमा सांगितला असून. वल्लभेश आख्यान सविस्तर वर्णिले आहे.
अकराव्या अध्यायात करंजपुरी माधव व अंबा यांच्या पोटी श्रीनृसिंहसरस्वतींचा अवतार झाल्याचे व श्रीगुरू नरहरी बालचरित्रलीला वर्णन केले आहे.
बाराव्या अध्यायात नरहरीचा गृहत्याग, काशीक्षेत्री संन्यास ग्रहण व गुरु-शिष्य परंपरा हे विषय आले आहेत.
तेराव्या अध्यायात श्रीगुरूनृसिंहसरस्वतींचे करंजागावी आगमन व पोटदुखी असलेल्या एका ब्राम्हणावर श्रीगुरुंनी कृपा केली या कथा सांगितल्या आहेत.
चौदाव्या अध्यायात क्रूरयवन शासन व सायंदेव वरप्रदान कथा आल्या आहेत.
पंधराव्या अध्यायात श्रीगुरुंचे वैजनाथक्षेत्री गुप्त वास्तव्य व तीर्थयात्रा निरुपण आले असून, सोळाव्या अध्यायात गुरुभाक्तीचे माहात्म्य, धौम्य शिष्यांच्या कथा सांगितल्या आहेत.
सतराव्या अध्यायात भुवनेश्वरीला जीभ कापून देणाऱ्या एका मंदबुद्धीच्या मुलास श्रीगुरू ज्ञानप्राप्ती करून देतात ही कथा सांगितली असून,
अठराव्या अध्यायात अमरापूरमाहात्म्य सांगून श्रीगुरूकुपेने एका ब्राम्हणाचे दारिद्र्य कसे गेले ही कथा सांगितली आहे.
एकोणिसावा अध्यायात औदुंबरमाहात्म्य, नावाड्याची त्रिस्थळी यात्रा व योगिनी कथा हे विषय आले आहेत.
विसाव्या अध्यायात ब्राम्हण स्त्रीची पिशाचबाधा कशी दूर केली हे सांगितले आहे.एकविसाव्या अध्यायात औदुंबर येथे आलेल्या श्रीगुरुंनी एका मृतबालकाला सजीव केल्याची कथा असून,
बाविसाव्या अध्यायात श्रीगुरुंनी एक वांझ म्हैस दुभती केल्याचा चमत्कार सांगितला आहे.
तेविसाव्या अध्यायात श्रीगुरूगाणगापुरात येतात व एका ब्रम्हराक्षसाचा उद्धार करतात या कथा दिल्या असून, चोविसाव्या अध्यायात त्रिविक्रमभारतीचा उद्धार केल्याची कथा आहे.
पंचविसाव्या अध्यायात गर्विष्ठ ब्राम्हणांचा 'जयपत्राविषयी हट्ट' हा प्रसंग सांगितला असून, सव्विसाव्या अध्यायात वेदविस्तार वर्णिला आहे.
सत्ताविसाव्या अध्यायात उन्मत्त ब्राम्हणांना श्रीगुरुंनी दिलेला शाप व एका मातंगाला पूर्वजन्म स्मरण करून दिल्याच्या कथा आहेत.
अठ्ठाविसाव्या अध्यायात कर्मविपाक व मातंग कथा आली आहे, एकोणतिसाव्या अध्यायात भस्ममाहात्म्य सांगितले आहे.
तिसाव्या अध्यायात एका विधवेचा शोक व ब्रम्हचाऱ्याने तिला केलेला उपदेश हे विषय आले असून,
एकतिसाव्या अध्यायात पतिव्रतेचा आचारधर्म सांगितला आहे.
बत्तिसाव्या अध्यायात विधवेचा आचारधर्म सांगितला असून, मृत ब्राम्हण जिवंत झाल्याची कथा सांगितली आहे.
तेहतिसाव्या अध्यायात रुद्राक्षमाहात्म्य व सुधर्मतारक आख्यान आले आहे.
चौतिसाव्या अध्यायात रुद्रध्यायात सांगितले आहे. पस्तिसाव्या अध्यायात कच-देवयानी कथा व सोमवार व्रत व सीमंतिनी आख्यान आले आहे.
छत्तिसाव्या अध्यायात परान्न्दोष, धर्माचरण हे विषय आले असून, सदतिसाव्या अध्यायात गृहस्थाश्रमाचा आचारधर्म सांगितला आहे.
अडतिसाव्या अध्यायात श्रीगुरुंनी भास्कर ब्राम्हणाची लाज कशी राखली हे सांगून, एकोणिसाव्या अध्यायात अश्वत्थमाहात्म्य व साठ वर्षांच्या वंध्येस संतानप्राप्ती झाल्याची कथा आहे.
चाळीसाव्या अध्यायात नरहरीचा कुष्ठरोग कसा नाहीसा झाला हे सांगून, शिवभक्त शबरकथा सांगितली आहे.
एकेचाळीसाव्या अध्यायात सायंदेवाची गुरुसेवा, काशीयात्रा व त्वष्टाख्यान हे विषय आले आहेत.
बेचाळीसाव्या अध्यायात अनंतव्रत कथा आली असून,
त्रेचाळिसाव्या अध्यायात विमर्षण राजाची कथा व एका विणकरास मल्लिकार्जुन हे विषय आले आहेत.
चव्वेचाळीसाव्या अध्यायात श्रीगुरूंनी नंदीब्राम्हणाचा कुष्ठरोग घालविल्याची कथा सांगितली आहे.
पंचेचाळीसाव्या अध्यायात भक्तवत्सल श्रीगुरुंनी आपल्या भक्तांसाठी आठ रूपे धारण केल्याची कथा सांगितली आहे.
सत्तेचाळीसाव्या अध्यायात श्रीगुरुंनी एका शुद्र शेतकऱ्यावर कृपा केल्याची कथा सांगितली आहे. अठ्ठेचाळीसाव्या अध्यायात अमरजासंगम व अष्टतीर्थमाहात्म्य सांगितले आहे.
एकोणपन्नासाव्या अध्यायात गुरुमाहात्म्य व शिवपार्वती संवादात्मक संपूर्ण गुरुगीता आली आहे.
पूर्वजन्मातील एक श्रीगुरुभक्त यवन वंशात जन्मास येतो व श्रीगुरुंनी त्याला दिलेल्या पूर्वीच्या वरदानाने तो बिदरचा राजा होतो ती सविस्तर कथा पन्नासाव्या अध्यायात आली आहे.
एकावन्नाव्या अध्यायात श्रीगुरूनृसिंहसरस्वतींचे निजानंदगमन, अवतार-समाप्ती झाल्याची कथा दिली आहे.
सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरूचरित्र अनंतअपार आहे. त्यातून मी तुला केवळ एकावन्न अध्याय सांगितले आहे. त्यांची अवतरणिका तुला सांगितली. नामधारका, श्रीगुरू अवतार-समाप्ती करून गेले असे लोकांना वाटत असेल; पण ते आजही गाणगापुरात आहेत हे लक्षात ठेव. या कलियुगात अधर्मवृत्ती फार वाढली आहे हे पाहून श्रीगुरू गुप्त झाले आहेत. खऱ्या भक्तांना ते आजही दर्शन देतात. नामधारका, मी सांगितलेल्या श्रीगुरूचरित्राच्या अवतरणिकेचे जे नित्य श्रवण-पठण करतील त्यांना श्रीगुरू नक्कीच भेटतील. आपला जसा भाव असेल तसे फळ श्रीगुरू देतात. नामधारका, तू अवतरणिका सांगण्याची विनंती केलीस, त्यानुसार सगळा इतिहास मी तुला पुन्हा सांगितला. ज्यांनी पूर्वीच श्रीगुरुचरित्राचे श्रवण-पठण केले असेल त्यांना या अवतरणिकेमुळे सगळे काही आठवेल. इतरांना ही अवतरणिका वाचून संपूर्ण श्रीगुरुचरित्र पठण-श्रवणाची इच्छा होईल." सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, आता या श्रीगुरूचरीत्राचा पारायण विधी मला सांगा. पारायण करताना दररोज किती अध्याय वाचावेत ते मला सांगा." त्यावर सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलास. यामुळे लोकांच्यावर फार मोठा उपकार होणार आहे. आता तुला पारायणाविषयी सांगतो. आपले अंतःकरण पवित्र असताना दररोज शुचिर्भूतपणे जमेल तेवढे श्रीगुरुचरित्र वाचावे. दुसरा प्रकार पारायणविधी केले असता फार मोठे पुण्य प्राप्त होते. दिनशुद्धी पाहून - म्हणजे शुभ दिवशी पारायणाला प्रारंभ करावा. प्रथम स्नानसंध्या करावी. जेथे पारायण करावयाचे ती जागा पवित्र करावी. रांगोळ्या काढाव्यात. देशकालादी संकल्प करून ग्रंथरुपी श्रीगुरुंचे यथाविधी पूजन करावे. ब्राम्हणाचीही पूजा करावी. प्रथमदिवसापासून पारायण संपेपर्यंत एकाच स्थानी बसावे.
वाचन चालू असताना अनावश्यक अथवा भाषण करू नये. ब्रम्हचर्यादी नियम कसोशीने पाळावेत. पारायण चालू असताना दिवा (समई इ.) प्रज्वलित असावा. देव, ब्राम्हण व घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पूर्वोत्तर मुख करून बसावे व वाचनास प्रारंभ करावा.
प्रतिदिवशी वाचावयाची अध्यायसंख्या -
पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचावेत.
दुसऱ्या दिवशी आठ ते अठरा अध्याय वाचावेत.
तिसऱ्या दिवशी एकोणीस ते अठ्ठावीस अध्याय वाचावेत.
चौथ्या दिवशी एकोणीस ते चौतीस अध्याय वाचावेत.
पाचव्या दिवशी पस्तीस ते सदतीस अध्याय वाचावेत.
सहाव्या दिवशी अडतीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावेत.
सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते एकावन्न अध्याय वाचावेत.
शेवटी अवतरणिका ( बावन्नावा अध्याय ) वाचावी.
रोजचे ठराविक वाचन पूर्ण झाले की ग्रंथाचे उत्तरांगपूजन करावे. श्रीगुरू नृसिंहसरस्वतींना नमस्कार करून आसन सोडावे. मग फलाहार करावा. सात दिवस रात्री जमिनीवर झोपावे. सदैव शास्त्राधारे पवित्र, व्रतस्थ असावे. पारायण पूर्ण झाल्यावर ब्राम्हण-सुवासिनीस भोजन द्यावे. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. सर्वांना संतुष्ट करावे.
अशारीतीने सर्व नियमांचे पालन करून सप्ताह पारायण पूर्ण केले असता श्रीगुरुंचे दर्शन होते. भूतप्रेतादी बाधा नाश पावून सर्व सुखांची प्राप्ती होते.
सिद्ध्योग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला. 'आपण धन्य झालो. कृतकृत्य झालो.' असे म्हणून त्याने सिद्ध्योग्यांच्या चरणांवर मस्तक टेकले. सिद्ध्योग्यांचे शब्द हीच रत्नांची खाण. नामधारकाने त्यातील रत्ने घेऊन एकावन्न रांजण भरले व याचकभक्तांना संतुष्ट केले. सिद्धयोगी हाच कल्पवृक्ष. नामधारकाने भक्तजनांवर परोपकार करण्यासठी हात पसरून याचना केली. सिद्धमुनी हाच मेघ, नामधारक हा चातक. त्याने मुख पसरून त्या मेघाकडे एक बिंदू मागितला असता त्या मेघाने अपार वर्षाव करून भक्तांना अमृताचा लाभ करून दिला.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीगुरूचरित्र अवतरणिका' नावाचा अध्याय बावन्नावा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ।। श्री गुरुदेव दत्त ।।
।। श्री गुरुचरित्र सारामृत समाप्त ।।
।। ॐ तत्सत् ।।
Search
Search here.