आरती दत्तराजगुरुची
आरती > श्री दत्तात्रेय आरती Posted at 2018-03-29 15:36:40
आरती दत्तराजगुरुची , भवभयतारक स्वामीची ।। ध्रु॰।।
दिगंबर उग्र ज्याची मूर्ती , कटिवर छाटी रम्य दिसती ।
चर्चुनी अंगी सर्व विभूती , कमंडलू धरोनिया हाती -- चाल --
पृष्ठी लोळे जटेचा भार , औदुंबरतळी, कृष्णेजवळी ,
प्रभातकाळी, वर्णिती भक्त कीर्ति ज्याची ,
दिगंतरी वाहे कीर्ति ज्याची ।। १ ।। आरती...
अनुसयेच्या त्वां पोटी , जन्म घेतला जगजेठी ,
दिव्यतव पादभक्तिसाठी , जाहली अमितशिष्य दाटी -- चाल --
राज्यपद दिधले रजकाला , जो रत झाला, त्वत्पदकमला ,
किमपि न ढळला, पाहूनि पूर्ण भक्ती त्याची ,
अंती दिली मुक्ती त्वांची ।। २ ।। आरती...
सती तव प्रताप ऐकोनी , आली पतिशव घेवोनि ,
जाहली रत ती तव चरणी , क्षणभंगुर भव मानोनी -- चाल --
तिजला धर्म त्वांचि कथिला, जी सह्गमनी ,
जाता आणुनि , तीर्थ शिंपुनी , काया सजीव केली पतिची , आवड तुज बहु भक्तांची ।। ३ ।। आरती..
ऐसा अगाध तव महिमा , नाही वर्णाया सीमा ,
धनाढ्य केला द्विजोत्तमा , दरिद्र हरुनी पुरुषोत्तमा -- चाल --
नेला तंतुक शिवस्थानी , वांझ महिषिसी , दुग्ध दोहविसी , प्रेत उठविसी , काया बहुत कुष्ठी ज्याची , केली पवित्र ते साची ।। ४ ।। आरती...
ठेवूनि मस्तक तव चरणी , जोडूनी दामोदर पाणि ,
ऐसी अघटित तव करणी , वर्णू न शके मम वाणी -- चाल --
अहा हे दिनानाथा स्वामिन् , धाव दयाळा ,
पूर्ण कृपाळा , श्रीपादकमळा , परिसुनी विनंती दासाची , भक्ती दे त्वत्पदकमलाची ।। ५ ।। आरती...
Search
Search here.