महाकवी कालिदास mahakavi kalidas
श्याम जोशी ब्लॉग Posted at 2016-07-05 16:41:31
कविकुलगुरू कालिदास ....
भारतीय साहित्याचीच नव्हे तर जागतिक साहित्यामधील सर्वश्रेष्ठ विभूती ...
प्राचीन भारतीय इतिहासाचे प्रतिनिधिक दृश्यमान कवी .. उत्तराखंड मधील उज्जैन जवळील कविल्ठ या स्थानी जन्मला असे मानले गेलेला हा कवी ..
भारतीय साहित्याचे सर्वश्रेष्ठत्वाचे कालिदासाच्या लेखनात आहेत ..
नुसते हिंदुस्थानने नाही तर सर्व विश्वाने सुद्धा कालिदासाची गणना जगातील सर्वश्रेष्ठ कवी म्हणून केली आहे .. जगातील कोणताही कवी अजूनपर्यंत कालिदासाच्या लेखनाशी बरोबरी करू शकला नाही हे साऱ्या विश्वाने मान्य केले आहे ..
म्हणूनच कालिदासाच्या लेखनावर मंत्रमुग्ध झालेला जर्मन कवी व समीक्षक गटे / गोएथ ( Goethe ) म्हणतो की शेक्सपिअर ची सर्व नाटके एकत्र करून सुद्धा कालिदासाच्या एका नाटकाशीही बरोबरी करू शकत नाही .. विस्मयचकित झालेला गटे ( Goethe ) व ईस्टवीक ( E B Eastwick ) कालिदासाच्या लेखना विषयी म्हणतात की स्वर्गीय सुख व पूर्ण समाधान काय असते हे फक्त कालिदासाचे नाटकच दाखवू शकते ..
कालिदासाच्या लेखनातील अत्युच्च शैली , सुंदरता , माधुर्य , डोळ्यांसमोर उभे राहणारे सुमधुर वर्णन , विषयाची श्रेष्ठ हाताळणी हे सर्व पाहून एका मर्मज्ञ टिकाकाराने अशा प्रकारे प्रशांसापूर्वक उद्गार काढले आहेत ..
पुराकवीनां गणना प्रसंगे कनिष्टीकाधिष्टीत कालिदास: |
अद्यापितत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव ||
पूर्वी अत्युत्कृष्ट कवींची गणना करतेवेळी कनिष्टीकेवर प्रथम कालिदासाचे नाव घेतले पण दुसऱ्या बोटावर कोणाचे नाव घ्यायचे हेच ठरेणा कारण दुसरा कोणीच त्याच्या तुलनेचा - तोडीचा आढळला नाही म्हणून मग त्या बोटाचे नाव अनामिका च राहिले ..
उत्कृष्ट सादरीकरण , हृदयस्पर्शी वर्णन , विलक्षण शैली , वेगवेगळे पद्यछंद , भावनात्मक माधुर्य , लेखनशैली ची अपूर्वता , कोमलता , रसिकता , सरलता असे अनेकविध गुण कालिदासाच्या लेखनात आढळतात आणि लेखन नीट मनापासून वाचणारा मंत्रमुग्ध , भावविवश होतो ..
प्राचीन साहित्य , इतिहास भाषा परिस्थिती चा अभ्यास संशोधन करणारांना कालिदासाचे परिपूर्ण लेखन अत्यंत आधारभूत ठरते ..
कविकुलगुरू कालिदासांची लेखनसंपदा -->
1 ) कुमारसंभवम् -- सध्याच्या काळात या काव्याचे 18 सर्ग उपलब्ध आहेत .. यातील प्रथम 8 सर्गच कालिदासाने लिहिली आहेत व नंतरची प्रक्षिप्त आहेत अशी मान्यता आहे . यामध्ये पार्वतीचा जन्म , रतिमदन कथा , शिवपार्वती विवाह व नंतर कार्तिकेयाचा जन्म व त्यानंतर त्याने केलेला तारकासुर वध असे अद्भुत वर्णन आहे ..
2 ) ऋतूसंहार --- या मध्ये ग्रीष्मादी षड्ऋतूंचे अत्युत्तम असे वर्णन असून एकूण एकशे अठ्ठावन्न श्लोक यात आहेत . हे एक श्रेष्ठ असे निसर्ग काव्य आहे ..
3 ) मेघदूत --- अत्यंत उच्च शैली रचना असलेले हे एक खंडकाव्य .. नवविवाहित तरुण यक्ष यक्षराज कुबेराच्या शापामुळे आपल्या पत्नीपासून दूर जातो पण पत्नीचा विरह सहन न झाल्यामुळे तिच्या आठवणीमुळे व्याकुळ झालेला तो यक्ष मेघाकरवी आपला प्रेम संदेश पाठवतो असे यात सुमधुर वर्णन आहे ..
4 ) रघुवंश --- हे सुद्धा श्रेष्ठ असे काव्य होय .. एकूण एकोणीस सर्ग असलेल्या या काव्यात रघुराजा , दिलीप , राजा रामचंद्र आदी रघुवंशा चे चरित्र वर्णन आहे .. रघुवंश ही कालिदासाची अद्भुत अद्वितीय अशी अंतिम रचना .. यानंतर कालिदासाची कोणतीच रचना नाही .. अत्यंत भावपूर्ण , सर्व रसांनी परिपूर्ण , सर्वश्रेष्ठ अशी अवर्णनीय रचना .. कारण या रघुवंशावर एक दोन नव्हे तर तब्बल तेहतीस टीका समीक्षा ग्रंथ लिहिले गेले , यावरूनच याचे श्रेष्ठत्व सिद्ध होते ..
अशाच प्रकारे या व्यतिरिक्त एकूण चाळीस रचना कालिदासाच्या आहेत ..
मालविकाग्निमित्र , विक्रमोर्वशियम् , अभिज्ञान शाकुंतलम् , श्रुतबोधम् , कर्पूरमंजरी , शृंगारतिलकम् , पुष्पबाणम् , शृंगाररसशतम् , श्यामादंडकम् , सेतुकाव्यम् , ज्योतिर्विद्याभरणम्
कालिदास एक उत्तम ज्योतिषी सुद्धा आहे असे मानण्यात येते .. ज्योतिर्विद्याभरणम् हा त्याने रचलेला एक ज्योतिष ग्रंथ आहे .. तसेच उत्तरकालामृत हा एक ज्योतिषग्रंथ कालिदासाने लिहिला असे मानण्यात येते .. यातील अनेक ग्रंथांचा फक्त उल्लेख अनेक ठिकाणी असून यातील काही ग्रंथ सध्या उपलब्ध नाहीत ..
परदेशी भाषांमध्ये भाषांतरीत होऊन प्रकाशित झालेले प्रथम भारतीय साहित्य हे कालिदासाचेच ...
कवी लेखक कसा असावा याबद्दल जगद्गुरू आद्य शंकराचार्य विवेकचुडामणीत लिहितात --
वाग्वैखरी शब्दझरी शास्त्रव्याख्यान कौशलम्
वैदुष्यं विदुषां तद्वद भुक्तये न तु मुक्तये ||
वाक्चातुर्य , शब्दप्रभुत्व , शास्त्रव्याख्यान यामध्ये कौशलता असलेला बुद्धिवान कवी असेल पण जो या बुद्धीच्याही पलीकडील भुक्ती मुक्तीची स्थिती जाणतो , भगवंताची लीला अनुभवतो तोच खरा महाकवी ..
आणि हे विशेषण पूर्णपणे कालिदासाला लागू पडते. म्हणूनच सर्व जग त्याला महाकवी म्हणून संबोधतात ..
जाता जाता कालिदासा संबंधीत सत्य मानली गेलेली - प्रचलित असलेली एक कथा --
दंडी आणि कालिदास या दोघांत श्रेष्ठ कोण असा प्रश्न उत्पन्न होतो . तेव्हा हे दोघे माता सरस्वती च्या मंदिरात जातात आणि आपले सर्व लिखित साहित्य गर्भगृहात ठेवून दार लावून घेतात . नंतर काही वेळाने दार उघडल्यावर असे दिसून येते की दंडी चे साहित्य सर्वात प्रथम स्थानावर असून कालिदासाचे साहित्य तेथे नसते . तेव्हा आर्ततेने कालिदास मातेला विचारतो कि आमच्यात श्रेष्ठ कोण ? तेव्हा सरस्वती उत्तर देते , दंडी .. तेव्हा दुःखाने कालिदास विचारतो कि मग मी का श्रेष्ठ नाही व माझे लिखित कुठे आहे ? तेव्हा सरस्वती उत्तर देते - त्वमेवाहं ... म्हणजे कि आपण दोघे वेगळे नाही आणि तुझे लिखित मला खूप आवडले म्हणून मी माझ्याकडे घेतले आहे ..
तर अशा या अखीलजगतातील सर्वश्रेष्ठ महाकवीला आज आषाढ प्रथम दिनानिमित्त कोटी कोटी नमन ..
लेखक -- © श्री श्याम जोशी गुरुजी
टिटवाळा
05 july 2016 Monday
संदर्भ -- संस्कृत साहित्य , विकिपीडिया , कालिदासस्य चरितम् , आंतरजाल ...
Search
Search here.