मल्लारि खंडोबा माहात्म्य

ग्रंथ - पोथी  > इतर ग्रंथ पोथी Posted at 2018-12-09 15:01:28
श्रीमल्लारिमहात्म्य  अध्याय पहिला मणिमल्लमर्दन जगदीश्वर । चिच्छक्तिमहालसाप्रियकर । ब्रह्मानंद जगदाधार । निर्विकार जगद्‌गुरु ॥ १ ॥ सायुज्यतुरंगीं विराजित । दिव्य ज्ञानखड्‍ग करीं झळकत । बोधत्रिशूळ प्रतापवंत । सद्‌विवेक सत्य डमरू तो ॥ २ ॥ निजामृतें भरलें पाणिपात्र । जो सुहास्यवदन शतपत्रनेत्र   । जो दुष्टदमन चारुगात्र । लीला विचित्र तयाची     ॥ ३ ॥ मुमुक्षु ज्ञानी चतुर पंडित । तयांप्रति श्रीधर विनवित । मणिमल्लमर्दन आमुचें कुळदैवत । तयांचे चरित परिसा आतां ॥ ४ ॥ जो अवतरला कैलासवासी । प्रतापार्क प्रेमपुरविलासी । सनत्कुमारादि महाऋषी । कथा दिननिशीं गाती ज्याची ॥ ५ ॥ तडिदंबरें तेजाळ झळकतीं । कीं उदया आला किशोरगभस्ती । तुहनगिरिनंदिनी भागीरथी । दोघी शोभती दोहींकडे ॥ ६ ॥ कलधौतप्रभेहून प्रबळ । उधळे भावहरिद्राचूर्ण तेजाळ । तिणें उर्वी आणि निराळ । आनंदमय शोभले ॥ ७ ॥ ब्रह्मांडपुराणीं नि:सीम । सत्यवतीह्रदयरत्नें उत्तम । कथिलें मणिमल्लमर्दनमाहात्मय । तें सप्रेम परिसिजे ॥ ८ ॥ कैलासशिखरीं अपर्णा । पुसती जाली भाळलोचना । जगद्‌वंद्या पंचवदना । पुरातना परमेश्वरा ! ॥ ९ ॥ क्षेत्रांत क्षेत्र कोणतें विशेष?' । यावरि बोले व्योमकेश । कृतयुगीं मनु ऋषिविशेष । परि बलहीन श्रीहीन जाला ॥ १० ॥ तो हिंडतां घोर कांतार । पूर्वपुण्यें भेटले सनत्कुमार । तिहीं त्याप्रति कथिलें हें चरित्र । सर्व ऎश्‍वर्य देणार जें ॥ ११ ॥ पूर्वीं धर्मपुत्र सत्यसुजाण । तपस्तेजें जेविं चंडकिरण । मणिचूळपर्वती राहून । तप दारुण आचरती ॥ १२ ॥ मणिचूळपर्वत शोभिवंत । नाना वृक्षीं विराजत । सदा सफळ गगनभेदित । माजीं आदित्यकिरण न दिसे ॥ १३ ॥ मलयागर कृष्णागर चंदन । सुवासें भरलें सर्व वन । जैसे सत्पुरुषाचे गुण । न सांगतां प्रकट होती ॥ १४ ॥ आम्रवृक्ष पाडा भाले । टपटपा टाकिती पक्वफळें । जैसे उदार मनींचे कोवळे । धनदानें वर्षती ॥ १५ ॥ मयोरें चातकें बदकें । कस्तुरीकुरंग जवादिबिडाळकें । खेळतीं, जैसे निजसुखें । विरक्तपुरुष विश्रांतिवनीं ॥ १६ ॥ राजहंस चातक कोकिळा । निजछंदें बोलती स्वलीला । तें वनींचें सुख पाहता डोळां । तटस्थ होती सुरनर ॥ १७ ॥ ऎसा तो मणिचूळ पर्वत । अग्निहोत्री महाराज पंडित । कुटुंबांसहित ऋषि समस्त । आश्रम करून तेथ असती ॥ १८ ॥ आंगीं उमटतां दिव्यज्ञान । प्राक्तनभोगें ये संसारविघ्न । तेंवि मणिमल्ल सेना घेऊन । मृगयामिसें तेथ आले ॥ १९ ॥ परमविक्राळ दैत्य दारुण । सुर-भूसुर-पीडक दुर्जन । विध्वंसित चालिले वन । गो-द्विज-हनन करिती बहु ॥ २० ॥ जैसें मर्कटीं केलें मद्यपान । भूतसंचार वरि वृश्‍चिकदंशन । मग ते पर्वतीं अन्योन्य । तेंवि दुर्जन दैत्य ते ॥ २१ ॥ कुंडवेदिका विध्वंसून । यज्ञपात्रें टाकिती जाळून । मांस मद्य आणून । भक्षून उच्छिष्ट विखरिती ॥ २२॥ मनुष्यप्रेतखंडें आणून । कुंडांत टाकिती प्रेत्नेंकरून । द्विज जाती आश्रम टाकून । त्यांस धरून बांधिती वृक्षीं ॥ २३ ॥ पतिव्रतांस बळेंचि धरिती । त्या तत्काळचि प्राण सोडिती । एकी दीर्घस्वरें हाका देती । पितापतिबंधुनामें ॥ २४ ॥ ब्रह्मचारी वनस्थ मस्करी । स्वस्थानें सांडून पळती दुरी । जैसा वोणवा पेटतां कांतारीं । अंडज जाती अन्यस्थळा ॥ २५ ॥ विप्रकन्या घेऊन सर्व । तेथून गेले दुष्ट दानव । तेणें दु:खें ते भूदेव । तळमळती, तें न वर्णवे ॥ २६ ॥ गिरिकंदरीं लपती विप्रोत्तम । म्हणाल, 'शापून केले कां न भस्म?' तरी तप केलें जें नि:सीम । त्यास क्षय होईल कीं! ॥ २७ ॥ प्रजा पीडतां बहुत । उर्वीवरी जाला आकांत । दैत्यां भेणें समस्त । घोर कांतारीं विवरीं दडती ॥ २८ ॥ मग सर्व प्रजा ऋषि मिळोन । पाकशासनास गेले शरण । शक्रे सर्व विप्रांस नमून । आसनीं बैसवून पूजिलें ॥ २९ ॥ शोकें विव्हळ जाले ब्राह्मण । म्हणती,  'मणिमल्लीं पीडिलें दारुण' । वासवें समस्त ऎकून । म्हणे, 'दुर्जन माजले ॥ ३०॥ ब्रह्मवरें मत्त जालें । इहीं एक अंगुष्ठावरी तप केलें । हे मज नाटोपती वहिले । बहु प्रयत्न करितांही ॥ ३१ ॥ आतां वैकुंठ पुरविलासी । इंदिरावर क्षीराब्धिवासी । भक्तवत्सल ह्रषीकेशी त्यापाशी जाऊं चला' ॥ ३२॥ मग त्रिदशांसहित वासव । सवें प्रजा ऋषि घेऊन सर्व । वैकुंठपीठिंचा राव । जवळीं केला प्रेमभरें ॥ ३३ ॥ तें पाहतां वैकुंठनगर । अवघे चतुर्भुज पीतांबरधर । शंकचक्रादि चिन्हीं सुंदर । हरिरूप समान ते ॥ ३४ ॥ श्रीवत्सलांछनविरहित । विष्णुस्वरूप सर्व भक्त । सगुण सायुज्यता प्राप्त । बहुत जन्में तप करितां ॥ ३५ ॥ तेथ नाहीं द्वंद्वदु:ख। तेथ नाहींत कामक्रोधादिक । तेथिंचें ब्रह्मानंदसुख । अनुभविये जाणती ॥ ३६ ॥ जेथ निर्विकल्प वृक्षांचे वन । सुधारसाहून कोटिगुण । ते स्थळींचें गोड जीवन । ब्रह्मादिकां दुर्लभ तें ॥ ३७ ॥ क्षुधा तृषा मोह शोक पाहीं । इच्छा कल्पना भ्रांति सर्वही । यांची वार्ता तेथ नाहीं । वर्णूं काय एकमुखें ॥ ३८ ॥ असो, देव ऋषी प्रजानन । पावले तेव्हां वैकुंठभुवन । जयजयकार करून । लोटांगणें घालिती ॥ ३९ ॥ त्रिभुवन सौंदर्य एक होऊन । ओतलें हरिस्वरुप सगुण । कीं ब्रह्मानंदसुख संपूर्ण । श्रीमुखावरि रूपा आलें ॥ ४० ॥ घनश्याम पीतांबरधर । सच्चिदानंदतनु निर्विकार । जेथ नसती षड्‌विकार । षड्‍गुणैश्‍वर्यसंपन्न जो ॥ ४१ ॥ कर्तृत्व भोक्‍तृत्व नियंतृत्व । विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व । यश:श्रीकीर्तिऔदार्यमंडित । वैराग्य विज्ञान सर्व तेथ ॥ ४२ ॥ कोटिमनोजतात  भगवंत । अर्धांगी भार्गवी विराजत । सजळघनीं चपला झळकत । तैशी शोभत जगन्माता ॥ ४३ ॥ स्कंदतातभूषणशत्रु जाण । पुढें उभा सदा कर जोडून । पूर्व उत्तर मीमांसा वेद संपूर्ण । पक्षांतून ध्वनि गर्जती ॥ ४४ ॥ यालागीं छंदोगाम । तारक्षास बोलिजे नाम । ज्याचे स्वरूप वर्णिती निगम । चतुर्भुज हरिरूप तो ॥ ४५ ॥ चारी वेद बंदीजन विशेष । वर्णिती श्रीहरीचें निर्दोष यश । षट्‌शास्त्रें पुराणें अष्टादश । दूर उभीं कर जोडूनी ॥ ४६ ॥ इंद्र अग्नि यम नैऋत्य वरुण । वायु कुबेर ईशान । अष्टकोनी बद्धांजुळीपूर्ण । दिक्पाळ उभे असती ॥ ४७ ॥ ऎसा महिमा वर्णिता । कोटी वरुषें न सरे सर्वथा । श्रुतिस्मृतींचा खाले माथां । वर्णूं जाता जगदीश्वर ॥ ४८ ॥ निरभिमान होऊन । देव ऋषि करीत स्तवन । 'हे इंदिरावर पद्मनयन । हे भक्तजनकुलिश-पंजर तूं ! ॥ ४९ ॥ हे मधुमुरनरककैटभभंजन । हे शंबररिपु हरमानसरंजन । हे, मंदरगिरिधर पीतवसन । ब्रह्मानंदा जगद्‌गुरो ! ॥ ५० ॥ हे गजमर्दन गजेंद्रोद्धारण । हे कमलोद्‌भवजनक जनार्दन । हे जगद्‍वंद्य जगरक्षण । यज्ञपाळण यज्ञपुरुषा ! ॥ ५१ ॥ हे दशावतारचरित्रचालका । हे मधुकैटभरिपो सर्वात्मका । हे अनंतशयन अनंतवेषधारका । आदिपुरुषा अभेदा!' ॥ ५२ ॥ ऎसें देवी स्तवन करून । सांगती, 'मणिमल्लांनीं गांजिलें दारूण' । यावरि जगद्‍गुरु सुहास्यवदन । बोलता जाला त्यांप्रती ॥ ५३ ॥ म्हणे, 'मममानससरोवरमराळ । जो कर्पूरगौर गोक्षीरधवळ । त्याच्या हातें ते परमखळ । मणिमल्ल संहारती' ॥ ५४ ॥ मग समस्तांस घेऊन श्रीकरधर । कैलासाप्रति चालिला मुरहर । तो मणिमयगिरिवर प्रभाकर । कोटि दिनकर प्रकटले जेवीं ॥ ५५ ॥ सकळ ज्योतिर्मय शिवसदन । मणिमय नग शुभ्र वर्ण । तैसा नंदिकेश्वर बळगहन । चंडकिरणप्रभेऎसा ॥ ५६ ॥ शुभ्रमंडप सिंहासन शुभ्र । वरि दैदीप्यमान कर्पूरगौर । मस्तकीं स्वर्धुनी सकुमारा । शुभ्रवर्ण झळकतसे ॥ ५७ ॥ शुभ्र जटा शुभ्र चंद्र भाळीं पूर्ण । कर्णीं शुभ्र कुंडलें दैदीप्यमान । शुभ्र विशाळ नेत्र आकर्ण । पंचवदन त्रिलोचन जो ॥ ५८ ॥ सर्वांगीं शुभ्र विभूति चर्चिली । पंच मुगुटांची प्रभा पडली । माळा शोभत शुद्ध श्‍वेतोत्पळीं । शुभ्र सुमनहार झळकती ॥ ५९ ॥ शुभ्र व्यालभूषणें झळकतीं । त्यांचे शिरीं शुभ्र मणि वोप देती । श्‍वेतगजचर्माची दीप्ती । शार्दूलचर्म शुभ्रचि तें ॥ ६० ॥ शुभ्र चिरें शुभ्रचामरें । वरि भक्त वारिती स्नेहादरें । हर हर शिवनामगजरें । दास गर्जती क्षणक्षणीं ॥ ६१ ॥ कमलोद्‌भवजनकसहोदरी । सजलजलदवर्ण सुंदरी । तुहिनधराधरप्रियपुत्री । वेदशास्त्रीं वर्णिली जे ॥ ६२ ॥ जिचिया अंगुष्ठावरुनि देखा । ओवाळाव्या अष्टनायिका । जिचें स्वरूप पाहतां कामांतका । धणी न पुरे सहसाही ॥ ६३ ॥ जिचिया मुखमृगांकावरून । ओवाळावे कोटि मीनकेतन । अंबुजसंभव पाकशासन । त्याचेनि स्वरूप ऎसें न करवे ॥ ६४ ॥ जे जगदंबा मुरहरभगिनी । ओतिली इंद्रनीळकीळ  गाळुनी । मृगमीनखंजन  लोचनांवरुनी । सांडणें करुनि  टाकावे ॥ ६५ ॥ दंततेज पडतां मेदिनीं । पाषाण होती महामणी । जिचा मुखमृगांक देखोनी । देवललना पाहती खाले ॥ ६६ ॥ असो, ऎसा शक्तीसह कैलासनायक । देखोनि सकळ वृंदारक । जोडुनियां निजहस्तक । स्तवन करिती प्रीतीनें ॥ ६७ ॥ 'जय जय हरिचित्तसागरउल्हासचंद्रा । निजजनमानसचकोरआल्हादकरा । मायाचक्रचालका परमोदार । ब्रह्मानंदा जगद्‌गुरो ! ॥ ६८ ॥ अपर्णानयनाब्जविकासकभास्करा । षडास्यजनका यक्षपतिप्राणमित्रा । दक्षमखविध्वंसका त्रिनेत्रा । त्रिपुरांतका त्रिदोषशमना ! ॥ ६९ ॥ भक्तवरदा वृषभध्वजा । दाक्षायणीवल्लभा जय दशभुजा । खट्‌वांगपाणि बलितनुजा  । प्रियवरदायका जगद्‌गुरो ! ॥ ७० ॥ काकोळभक्षका गंगाधरा । वामदेवा ईशान्येश्‍वरा । शफरीध्वजशिक्षाकरा । परात्परा परमात्मया !' ॥ ७१ ॥ ऎकोन संतोषला त्रिनयन । वैकुंठपतीस सन्मुख देखून । प्रेमपडिभरें देत आलिंगन । अनुक्रमें समस्तांसी ॥ ७२ ॥ 'मणिमल्लें गांजिलें बहुत' । सुरभूसुर गार्‍हाणें सांगत ।  'मणिपर्वतशिखरीं राहत । नाटोपती' त्रिभुवना ॥ ७३ ॥ त्यांस भेऊन शक्र नित्यनूतनें । पाठवितो पारिजातसुमनें । तिहीं अग्निहोत्रें केलीं विच्छिन्नें । विटंबना न वर्णवे ते ॥ ७४ ॥ त्यांस जाळूं न सके अग्नी । दिक्पाळ सेवेस लाविले सदनीं । कुंभिनीवसन पाणि जोडुनी । इच्छिलीं आणुनी रत्‍नें देत ॥ ७५ ॥ ऋषिप्रजा करिती रुदन । स्त्रिया भ्रष्टविल्या स्वामी नेऊन' । ऎसें ऎकतां पंचानन । कल्पांत हाक फोडित ॥ ७६ ॥ सत्राणें जटाभार आफळी । अकस्मात् त्यांतून कृत्या निघाली । विशाळवदना चाटी आवळी । वाटे कमळभवांड ग्रासिलें ॥ ७७ ॥ तिचें भयानक रूप देखोन । भयाभीत जालें त्रिभुवन । ऋषींनीं तीवरि घृत शिंपून । घृतमारी नाम ठेविलें ॥ ७८ ॥ काळरूपिणी खेचरी । हाकें तिचे ब्रह्मांड थरारी । उभा ठाकला त्रिपुरारि । मार्तंडरूप धरी तेव्हां ॥ ७९ ॥ नंदी जाहला तुरंग । त्यावरि आरूढला उमारंग । गगनभेरी ठोकितां स्वर्ग । नादें डळमळूं लागलें ॥ ८० ॥ रणतुरें खांकती एकसरी । दैत्यां आंगीं उमटली शारी । देवसेना ते अवसरीं । स्वर्गपंथें उतरत ॥ ८१ ॥ सवें निघाले साठि कोटि गण । चौसष्टि कोटि चामुंडा दारुण । औटकोटि भुतावळी संपूर्ण । नवकोटि कात्यायनी ॥ ८२ ॥ वेताळ चालिले असंख्यात । अष्टभैरव पुढें धांवत । एकादशरुद्र अद्‍भुत । भयानक निघाले ॥ ८३ ॥ तुरंगारूढ महाराज मार्तंड । सवें सात शत सारमेय प्रचंड । भयानक रूपें वितंड । सिंहशार्दूलासमान ॥ ८४ ॥ पूर्वदिशेचा राव तेव्हां । ऎरावतारूढ चाले मघवा ॥ मेषारूढ प्रचंड बरवा । सप्तपाणि मिरवतसे ॥ ८५ ॥ म्हैसारूढ तेव्हां पहा तो । दक्षणापती आला श्राद्धदेवो । नरारूढ नैऋत्यरावो । शिवासंमुख शोभतसे ॥ ८६ ॥ आपल्या भारेंसी रसाधिपती । मकरारूढ येत शीघ्रगती । लोकप्राणेश निश्‍चितीं । मृगारूढ धावतसे ॥ ८७ ॥ पुष्पकारूढ यक्षनायक जाण । वृषभारूढ येत ईशान । आपुलालीं शस्त्रें सांवरून । दळासहित पातले ॥ ८८ ॥ सवें निघाल्या पर्वतपंक्ती । तैसे चालिले चौदंत हस्ती । सप्त द्वीपींचे तुरंग धावती । पक्ष झळकती तयांचे ॥ ८९ ॥ जळराशीवरी जहाजें तळपतीं । तैसे स्यंदन वेगें धावती । नवग्रहांत श्रेष्ठ गभस्ती । तेंवि महीपति मुख्य शिव ॥ ९० ॥ ज्या तुरंगीं शिव बैसला । वाटे चंद्रकिरणें आटून घडिला । क्षीरसागरें पाठविला । ह्रदयशाळेमधूनी ॥ ९१ ॥ उच्चै:श्रव्याचा बंधु कनिष्ठ । कीं नवनीताचा घडिला सुभट । पुच्छवाल अयाल अवीट । महारजत प्रभेसमान ॥ ९२ ॥ विद्रुमप्रभेहून विशेष । चारी खूर त्याचे राजस । विशाळनेत्र, मनपवनास । सहज चालतां टाकी मागें ॥ ९३ ॥ जान्हवीजीवनें नित्य धूतला । सुधारसपानें पुष्ट जाला । ऎसिया ह्यावरी बैसला । हयपती नाम म्हणवूनी ॥ ९४ ॥ ऎसा हयारूढ मार्तंड । हातीं खांडा झळके प्रचंड । भार चालतां कमळभवांड । डळमळूं लागलें तेधवां ॥ ९५ ॥ साठि कोटि गणांसहित । रथारूढ गणपती निघत । मयूरारूढ षण्मुख विराजित । सेनानाथ स्वर्गींचा तो ॥ ९६ ॥ निजभारेंसी चालिला वीरभद्र । दैदीप्यमान जेंवि प्रलयरुद्र । वाटे वडवाग्नी आणि द्वादशमित्र । एकत्र करूनि घडियेला ॥ ९७ ॥ सर्वांत शिवतेज परमाद्‍भुत । वाटे तेजावरती पडिले शशि आदित्य । धाकें आकाश असुडत । सडा होत भगणाचा ॥ ९८ ॥ शुष्कतुंबिनीफळ जळीं । तेंवि कुंभिनीतळ डळमळी । चतुर्दशलोकीं हाक गाजली । चपळा पडती कडकडुनी ॥ ९९ ॥ मणिमल्लगृहीं अपशकुन देख । शोणितवर्षाव करी बलाहक । महाद्वारीं एकाएक । उर्वी उलली तेधवां ॥ १०० ॥ दैत्यांच्या आकर्षिल्या शक्ती । दिवाभीतें दिवा बोभाती । असो, एकवीस पद्में गणती । मार्तंडदळ मिळालें  ॥ १०१ ॥ वारणचक्र असंभाव्य । त्यावरी एकला लोटे कंठीरव । तेंवि नंदिकेश्‍वरें घेतली धाव । विनायक जैसा अहीवरी ॥ १०२ ॥ तों मणिपर्वतशिखरींहुनी । सेवकीं देखिली शिववाहिनी । मग मणिमल्लाप्रति जाऊनी । जाणविती समाचार ॥ १०३ ॥ मणिमल्ल पाहती वरून । म्हणत, 'भिकारी हा पंचवदन । पतंग प्रलयाग्नीस लक्षून । तैसा येत अम्हांवरी ॥ १०४ ॥ अपवित्र परम नरमुंडमाळा । गळां घाली, न ये कंटाळा । वोलें करिचर्म पांघुरला । चिताभस्म सर्वांगी' ॥ १०५ ॥ ऎसी निंदा करून । क्रोधा चढिले दोघे जण । दैत्यसेना घेऊन । बाहीर निघते जाहले ॥ १०६ ॥ मदोत्कट नाम दैत्य थोर । भट नाम देवशैल्य असुर । सौरभ्य सुरग्रासक अपार । दळासमवेत निघाले ॥ १०७ ॥ केयूर कवच सदामद । गौरमुख धूम्रवक्त्र सिंधुनाद । दीर्घजिव्हा खरानन सिंहशब्द । हलदंत वक्रदंत ॥ १०८ ॥ द्विशिर त्रिशिर त्रिपाद । एक अष्टचरण चतुष्पाद । अश्‍वमुखें  अगाध । प्रताप ज्यांचा अद्‍भुत हो! ॥ १०९ ॥ गजस्कंधीं बैसला मणी । मल्ल आरूढला  दिव्यस्यंदनी । पर्वतांचे कडे खचती धरणी । वाद्यनादें तयांच्या ॥ ११० ॥ सप्तकोटि अंगल गगन । मल्लारिदेवा वेष्टित जाण । शातकुंभप्रभेसमान । हरिद्राचूर्ण उधळतसे ॥ १११ ॥ असो, दोन्ही सैन्यें मिसळलीं । संग्रामाचीं झूज लागली । बाणांची वाकडी बैसली । अखंड धारा खंडेना ॥ ११२ ॥ लोहार्गळा घेऊनि असुर । करिती देवदळाचा संहार । शिरें छेदून अपवित्र । रक्तपान करिती बळें ॥ ११३ ॥ दैत्यकबंधे शिरें नसतां । धावतीं घेऊन असिलता । देवचमूचा तत्त्वतां । संहार करिती सक्रोधें ॥ ११४ ॥ लवण पाहोन सवेगा । धावती रुधिराच्या निम्नगा । तें देखोन उमारंगा । न सांवरे क्रोधाग्नी ॥ ११५ ॥ भ्रूसंकेत दावी कल्पांतरुद्र । तों उठावले देवांचे भार । तृणपर्वत जाळी वैश्‍वानर । तैसे निर्जत धावती ॥ ११६ ॥ मार्तंड कृपादृष्टीनें पाहत । देवांचीं प्रेतें उठतीं अकस्मात । जो इच्छामात्रें ब्रह्मांड घडित । त्यास अशक्य काय असे? ॥ ११७ ॥ खड्‌ग दंष्ट्री दैत्य अद्‌भुत । मणिमल्लासी बोले शपथ । 'स्मशानवासी हा अकस्मात । धरून आणिन पाहें आतां' ॥ ११८ ॥ सवें पांच लक्ष गजभार । चाळीस लक्ष रहंवर । घेऊन चालिला असुर । मल्लारीवरि अभिमानें ॥ ११९ ॥ ऎसें देखोन कैलासनाथ । स्कंदाप्रती दावी भ्रूसंकेत । उद्यानीं चपळ पडे अकस्मात । तेंवि धावला मयूरवहन ॥ १२० ॥ खड्‌गदंष्ट्री बोले वचन । 'अरे, तूं शिवबाळक करी रक्तपान । तुवां तारकासुर मारिला कपटेंकरून । तें मजसीं न चले एथें!' ॥ १२१ ॥ स्वामी म्हणे, 'शतमूर्खा । ऎक वज्रदंष्ट्री मश्यका । मी शिवबाल, परि देखा । काळ तुझा निर्धारें ॥ १२२ ॥ तुझिया गर्वाचें कवच पूर्ण । समरीं आतां करीण चूर्ण । मी षडानन तुझे पंचप्राण । मुक्त करीन शरीरांतुनि!' ॥ १२३ ॥ ऎसें बोलोन तारकारि । सहस्त्र बाण घातले त्यावरी । सपक्ष बुडाले शरीरीं । परि असुर डळमळीना ॥ १२४ ॥ दैत्यें सोडिले लक्षशर । ते खड्‌गे तोडी शिवकुमर । मग नाना शस्त्रांचे मार । परस्परें करिते जाले ॥ १२५ ॥ बाण बाणासी संघटती । वन्हिवृष्टि होत क्षितीं । दोन्ही दळें तटस्थ पहाती । युद्ध दोघांचें अनिवार ॥ १२६ ॥ स्वामी कार्तिक अनिवार । क्षोभला जैला प्रळयरुद्र । मस्तकीं झळकती साही कोटीर । अंगीं अलंकार विद्युत्प्राय ॥ १२७ ॥ द्वादश हस्तांचे संधान । साही चापें ओढी षडानन । आलातचक्रवत् भ्रमती जाण । किंवा चक्रे क्षणप्रभेचीं ॥ १२८ ॥ दैत्य गगनपंथे जाऊन । शिवदळावरी वर्षे मार्गण । त्याहून उंच उडाला मयूरवहन । सोडी बाण दैत्यावरी ॥ १२९ ॥ सवेंचि भूमंडळीं येती । मागुती गगनीं गुप्त होती । जैसे कुहूचे दोषेमाजी न दिसती । सीतकर उष्णकर ॥ १३० ॥ सवेंच प्रगटले दळाभीतरीं । मग कुमारें शक्ति काढिली झडकरी । शतघंटा महामारी । स्थळीं स्थळीं बांधिल्या जीतें ॥ १३१ ॥ उगवले सहस्त्र सूर्य अखंड । तैसी शक्ति काढिली प्रचंड । कीं उभारला काळदंड । संहारावया जगातें ॥ १३२ ॥ प्रळायाग्नीची शिखा सबळ । कीं कृतांतजिव्हा तेजाळ । स्वामीनें सोडिली तत्काळ । खड्‌गदंष्ट्रीवरी क्रोधें ॥ १३३ ॥ त्रुटी न वाजतां ते क्षणीं । दैत्याचें ह्रुदय फोडुनी । पंचप्राण गेली घेउनी गगनपंथें तेधवां ॥ १३४ ॥ दैत्यदळीं हाहाकार । मग उल्कामुख आला असुर । वीस लक्ष सवें रहंवर । रथ कुंजर दश लक्ष ॥ १३५ ॥ त्यावरि उठिला गजानन । जेंवि शुष्ककाननीं प्रवेशे अग्न । दैत्य म्हणे, 'तुवां मोदक भक्षून । सुखें रहावें होतें घरीं ॥ १३६ ॥ तूं लंबोदर जड बहुत । कैसा तगसील युद्धाआंत । तुवां करुनियां नृत्य । शिवगौरी संतोषवावे' ॥ १३७ ॥ गणाधीश बोले वचन । 'तुझा शिरच्छेद करून । तोषवीन एथें अपर्णारमण । पाहें क्षण न लगतां! ॥ १३८ ॥ स्यंदनारूढ गणपती । सोडी असंख्य बाणपंक्ती । जैशा विद्युल्लता लवती । एकामागें एक वेगें ॥ १३९ ॥ शिरांच्या लाखोल्या बहुत । भूलिंगास गणपती समर्पित । करचरण असंख्यात । पाडिले, गणित करी कोण? ॥ १४० ॥ दैत्यकबंधें उठोनी । टाळिया वाजत नाचती रणीं । शिरें हांसतीं गगनीं । मुक्त जालीं म्हणॊनियां ॥ १४१ ॥ दैत्यें टाकिली गदा सबळ । ते गणेशें फोडिली तत्काळ । मग गणपतीचा स्यंदन चपळ । दैत्यें छेदिला अंख त्याचा ॥ १४२ ॥ दैत्याचाही सबळ रथ । चूर्ण करी गणनाथ । मग चरणचाली दोघे चमकत । समरभूमीस तेधवां ॥ १४३ ॥ दैत्यें टाकिली दारुण शक्ती । ते दंताखालें घालीत गणपती । यवपिष्टवत् करूनि क्षितीं । टाकिली क्रोधें तेधवां ॥ १४४ ॥ मग दैत्यसेनेंत गजानन । शुंडादंडें दैत्य धरून । कोट्यवधी केलें चूर्ण । दाढेखालीं दाटुनी ॥ १४५ ॥ पळतां पायीं गज धरुनी । असंख्य आपटिले रणमेदिनीं । रथ भिरकाविले गगनीं । संख्या गणी कवणातें ॥ १४६ ॥ अश्‍वांसहित स्वार । आपटुनियां केले चूर । विद्युत्प्राय शिवकुमर । दैत्यसेनेंत तळपतसे ॥ १४७ ॥ दैत्य धरून बलागळें । दाढेखालीं गणेशें रगडिले । पळॊं लागलीं असुरदळें । हाहाकार जहाला ॥ १४८ ॥ अनिवार गजवदनाचा भार । साहों न सकती कदा असुर । प्रळयकाळ वर्तला थोर । धन्य वीर गजानन ॥ १४९ ॥ विधि हरि हर शचीपती । तर्जनी मस्तक डोलविती । यावरी उल्कामुख पापमती । सिंहवदन जहाला ॥ १५० ॥ हाक देऊन झडकरीं। वेगें आला गणपतीवरी । युद्ध जहालें घटका चारी । न ये हारी दैत्य कदा ॥ १५१ ॥ मह शुंडादंडें धरून । मुखीं घालून केला चूर्ण । पुष्पें वर्षती सुरगण । शोक दारुण दैत्यदळीं ॥ १५२ ॥ मार्तंडे ह्रदयीं धरून । आलिंगिला वारणानन । यावरि कोटिकुंजर दैत्य जाण । युद्धास पुढें पातला ॥ १५३ ॥ त्यावरि नंदिकेश्वर । उठावला परम भयंकर । शिवरूप धरून साचार । रथावरी बैसला ॥ १५४ ॥ कुंतलोमा नाम दैत्य । नंदीस म्हणे, 'तूं पशु सत्य । तुवां भक्षावें गवत । तुज युद्ध कायसें?' ॥ १५५ ॥ यावरि बोले गायत्रीनंदन । 'आतां दैत्यवन आवघेंच भक्षिन!' । मग एक यामपर्यंत जाण । युद्ध केलें नंदीनें ॥ १५६ ॥ कुंतलोमा कोटिकुंजर दोघे जण । नंदीनें खड्‍गघायेंकरून । घेतला दोघांचा प्राण । गर्जती सुरगण आनंदें ॥ १५७ ॥ यावरि मणिमल्ल दोघे जण । क्रोधावले जैसे प्रलयाग्न । म्हणती, 'शिवसेना जाळून । टाकूं आतां क्षणार्धे!' ॥ १५८ ॥ मल्लाप्रती म्हणे मणी । 'माझें युद्ध पाहें समरांगणीं' । मणीसिंहनादें मेदिनी । थरारिली अतिभयें ॥ १५९ ॥ मेरुमंदार डळमळी । सिद्धांचीं आसनें चळलीं । नवही खंडें गजबजलीं । सप्तही द्वीपें थरथरित ॥ १६० ॥ सप्तसमुद्र उचंबळत । छप्पन्न देश चळीं कांपत । सप्तपाताळें दणाणित । हाकेसरसी तयाच्या ॥ १६१ ॥ विशाळ शरीर त्याचें पूर्ण । किंवा आकाशास दिधलें टेंकण । वीस भुजा मणीलागून । सायकासनें दशहस्तीं ॥ १६२ ॥ जांबुनद सुवर्ण तप्त । त्याचे अलंकार झळकत । रक्तचंदन उटी विराजत । आरक्त हार जपापुष्पें ॥ १६३ ॥ जैसे महाविजांचे उमाळे । तेंवि अलंकार आंगीं मिरवले । मुगुटतेज प्रकाशलें । धरणीवरी असंभाव्य ॥ १६४ ॥ ऎसा समरांगणा आला मणि । वैभव दावी शिवालागुनी । तेंवि सिंहासन्मुख इभ माजूनी । मुक्त दावी मस्तकींचें ॥ १६५ ॥ खद्योत आपले तेजें जाणा । जिंकीन म्हणें चंडकिरणा । मार्जार माजोन समरांगणा । आला जैसा व्याघ्रापुढें ॥ १६६ ॥ तुरंगारूढ जगदात्मा शिव । हांसे देखोनि त्याचें वैभव । कीं असंख्य दीपिकांचे उजाळ सर्व । उष्णकर नाणी दृष्टीतें ॥ १६७ ॥ गर्वे शिवाप्रती बोले मणी । 'तूं भीक मागोनी रहावें स्मशानीं । तूं भस्मासुरापुढें पळोनी । गेलासी, मी हें जाणतों!' ॥ १६८ ॥ शिव म्हणे, 'मस्यका मणी! । तुझें शिर आजि उडवीन रणीं । तूं यमपुरीस जाऊनी । स्थळपाहें बंधूस तुझ्या ॥ १६९ ॥ तूं मरण पावल्या पाठीं । मल्लास पाठवितों उठाउठीं । तुवां गोब्राह्मणा पीडिलें सृष्टीं । पाहें कौतुक आतां !' ॥ १७० ॥ विजयश्रीमंडित खंडेरायें । हाकें गर्जविलें  भुवनत्रय । चंड गदा लवलाहें । प्रथम प्रेरिली मणीवरी ॥ १७१ ॥ ते मणीचे ह्रदयीं आदळत । गदगदां दैत्येंद्र हांसत । 'तुझें बळकटपण कळलें सत्य । गदा पुष्पवत्  मज वाटे!' ॥ १७२ ॥ यावरि शरसंधानीं उमावल्लभ । संहारीत दैत्यांचे कदंब । जैसे प्रलयाग्नीमाजीं शलभ । चक्र सांपडलें एकदाचि ॥ १७३ ॥ मणींने सहस्त्र शर ते वेळां । वेगें सोडिले जेंवि चपळा । जगदीश्‍वरें हुंकार दिल्हा । भस्म केले शर सर्व ॥ १७४ ॥ वृक्षाग्रीचीं फळें लक्षुनी । श्येनपक्षी धावती बळेंकरूनी । तैसीं दैत्यशिरें उडवुनी ।  बाण नेती गगनांत ॥ १७५ ॥ जैशा मेघधारा अपार । तैसे सुटती असंख्य शर । दैत्य रणीं खिळिले समग्र । मयोरा ऎसे दिसती हो! ॥ १७६ ॥ एक शर सोडी मणिदर्पहरण । त्यापासाव निघती मार्गण । जैसी मूळ प्रकृतीपासून । असंख्य जीवसृष्टी उद्‌भवे ॥ १७७ ॥ कीं एकुलता एक पुत्र । संतती वाढे त्याची अपार । कीं शब्दमाला साचार । निघती पंडितमुखांतुनी ॥ १७८ ॥ ऎसें संहारतां दळ । मणीहि सोडी बाणजाळ । जैसा महाचतुरापुढें प्रबळ । मूर्ख दावी शब्दरचना ॥ १७९ ॥ यावरी मणीचा मुगुट तेजाळ पूर्ण । शिवें फोडिला सोडून बाण । सर्षपप्राय कुटके करून । आकाशपंथें उडविला ॥ १८० ॥ क्रोधायमान खवळला मणी । शरभरूप धरी ते क्षणीं । उमावल्लभाचे आंगीं जाउनी । दंशिता जाला सक्रोधें ॥ १८१ ॥ महीपतीनें शक्ति घेतली । दैत्यावरी बळें प्रेरिली । दैत्यें धरून सगळी । चावून गिळिली क्षणार्धे ॥ १८२ ॥ दोघे एकांगवीर अनिवार । होत युद्धाचें घनचक्र । देव वाद्यें वाजविती अपार । रणश्रीवर्धन परम जीं ॥ १८३ ॥ हरिद्राचूर्ण उधळे अपार । तेणें पीतवर्ण जालें अंबर । कुरंगधर आणि दिनकर । गेले लपोन त्यामाजीं ॥ १८४ ॥ सर्परूप धरून मणी । दंश करी देवसेनेंत रिघोनी । सवेंच अश्‍वरूप धरूनी । सव्यापसव्य उदाळत ॥ १८५ ॥ मुखखुरघायें सकट । देवसेना केली पिष्ट । सवेंच गजरूप धरून सुभट । मारीत उठे निर्जरां ॥ १८६ ॥ गगनपंथें भिरकावी रथ । अश्‍व पायीं धरूनि आपटित । दशदिशांनीं देव पळत । थोर आकांत वर्षला ॥ १८७ ॥ जीं जीं रूपें मणी धरित । असिलताघायें अकस्मात । महीपती तत्काळ छेदित । आणिक धरीत तनु नूतन तो ॥ १८८ ॥ म्हैसासुर जाला मणी । शिवें तोही छेदिला रणीं । मागुती मुख्य रूप धरुनी । चौताळला शिवावरी ॥ १८९ ॥ देव म्हणती, 'दयाळा महीपती ! यावरि देईं यास मुक्ती !' । त्यावरी जगदीश्‍वरें ख्याती । केली तेव्हां ऎका ते ॥ १९० ॥ तुरंगारूढ भगवान । मन-पवन-गरुडास मागें टाकून । असिलता करीं घेऊन । नि:सीमवेगें धावला ॥ १९१ ॥ वज्रें भंगिजे शैलशिखर । तैसें उडविलें मणीचें शिर । पायांखाले घालूनि सत्वर । चूर्ण केलें रगडुनी ॥ १९२ ॥ जाला एकचि जयजयकार । उधळिती प्रतापभंडार । मणि पावोन दिव्यशरीर । विमानारूढ जाहला ॥ १९३ ॥ मणी स्तवन करीत ते क्षणीं । 'जय पंचवदना शूलपाणी! । मी धन्य जालों रे ! या मेदिनीं । तुझ्या हस्तें जगदात्मया! ॥ १९४ ॥ घडले पापाचे पर्वत । गो-द्विज पीडिले बहुत । ते दोष जळाले समस्त । पुण्यवंत मी जहालों ॥ १९५ ॥ माझें तुझें युद्ध जालें परम । जे वर्णिती भक्तसत्तम । आयुष्य आरोग्य श्री उत्तम । देईं त्यासी जगन्नाथा ! ॥ १९६ ॥ तुझें माहात्म्य गाती ऎकती । त्यांस यशस्वी करीं महीपती!' । ऎसें बोलोन, कैलासाप्रती । मणी गेला ऊर्ध्वपंथे ॥ १९७ ॥ ब्रह्मानंदे म्हणे श्रीधर । पुढें वीररस माजेल अपार । शिष्टाईस येईल सुरवर । इंदिरावर जगदात्मा ॥ १९८ ॥ ते कथा अति सुढाळ । ऎकोत निजभक्त प्रेमळ । ब्रह्मानंदस्वामी दयाळ । मणिमल्ल मर्दिले तेणेंचि ॥ १९९ ॥ ॥इति श्रीब्रह्माण्डेपुराणे क्षेत्रखंडे मल्लारिमाहात्म्ये प्रथमोऽध्याय: ॥ श्रीमल्लारिमहात्म्य - अध्याय दुसरा चतुर पंडित भाविक प्रेमळ । पुढें चरित्र ऎका रसाळ । जें ऎकतां कळिकाळ । विघ्वजाळ बांधीना ॥ १ ॥ यावरी मणिप्राणहरण । इंदिरावराप्रती  बोले वचन 'जगद्‍वंद्या! तुवां तेथ जाऊन । मल्लाप्रती प्रबोधावें ॥ २ ॥ नीति सांगोन घननीला । त्याप्रती धाडावें पाताळा । नायके, तरी त्या कुटिला । संहारीन सर्वस्वें! ॥ ३ ॥ ऎसें वचन ऎकतां श्रीरंग । सुपर्णारूढ जाला भक्तभवभंग । जो घनश्यामवर्ण कोमळांग। वेदशास्त्रें वर्णिती जया ॥ ४ ॥ कमलदलाक्ष कमलावर । मल्लमंदिरा आला मुरहर । दैत्येंद्र उठोनी सत्वर । सामोरा आला बाहेरी ॥ ५ ॥ घालुनियां श्रेष्ठासन । मल्लें पूजिला जगज्जीवन । सर्वोपचार समर्पून । म्हणे, 'धन्य आजी जालों ! ॥ ६ ॥ महाराज तूं जगद्‌वंद्य । माझा पूर्वज जो प्रल्हाद । तेणें अर्चिलासि तूं मुकुंद । मजही पूज्य त्याकरितां!' ॥ ७ ॥ हरि म्हणे, 'कैलासानाथ । वेदशास्त्रां वंद्य समर्थ । ज्याचे आज्ञेनें यथार्थ । ब्रह्मांड केलें कमलोद्‍भवें ॥ ८ ॥ शिवशक्त्यात्मक सर्व जण । हें तूं जाणसी पूर्ण ज्ञान । जो दक्षमखविध्वंसक जाण । पुरातन पंचमुकुट तो ॥ ९ ॥ जो कामरहित कामांतक । गजासुरमर्दक  गजास्यजनक । जो दक्षमखविध्वंसक । अंधकासुरप्राणहरण ॥ १० ॥ हिमनगजामात काकोळधर । महास्मशानवासी जो अगोचर । भक्तसंतापनाशक मम प्राणमित्र । त्यासी मैत्रिकी करीं तूं ॥ ११ ॥ भूताधिपति विश्‍वेश्‍वर । मायाचक्रचालक महत्पापहर । त्रिगुणातीत त्रिनेत्र । तरि तो मित्र करीं तूं ॥ १२ ॥ संसारा आला जो पुरुष । जोडावें लोकीं निर्दोष यश । तरी सर्वभावें व्योमकेश । सखा करुनि नांदे सुखें ॥ १३ ॥ जो भोळा चक्रवर्ती दिगंबर । आपलें सर्व भक्तांस देणार । तरि तो अर्धनारीनटॆश्‍वर । सखा करूनि नांदे सुखें ॥ १४ ॥ शिव दयाळ कारुण्यसमुद्र । कोपलिया विश्‍व जाळील समग्र । तरि तो हिमनगजामात  कर्पूरगौर । सखा करूनी नांदे सुखें ॥ १५ ॥ हे गोष्टी तुज न माने जरी । पाताळीं नांदे तूं राज्य करीं । गो-ब्राह्मण उर्वीवरी । पीडून कष्टी करूं नको!' ॥ १६ ॥ ऎसें ऎकोन मल्लवीर । नेत्र केले जेंवि खदिरांगार । श्‍मश्रु पिळूनि सत्वर । म्हणे, ऎके श्रीवरा ! ॥ १७ ॥ मणी मारूनि आटिली वाहिनी । महावीर माझे ग्रासिले रणीं । त्यासी मैत्रिकी रथांगपाणी ! । करी म्हणसी कैसा तूं? ॥ १८ ॥ मी कोपलिया मल्लवीर । पडत्या आकाशास देईन धीर । आचमन करून सप्तसमुद्र । उदरामाजीं सांठवीन ॥ १९ ॥ चतुर्दश लोकांचे घेईन प्राण । स्वर्ग कैलास क्षणें जाळीन । दिग्गजांचे दंत मोडून । पृथ्वी नेईन रसातळा ॥ २० ॥ ग्रहगण सर्व नक्षत्रें । मोटॆंत बांधीन क्षणमात्रें । परम तेजाळ माझीं शस्त्रें । खंडण करितील वायूचें ॥ २१ ॥ हरि!   मी प्रल्हादकुळीं उत्पन्न । तरि तूं पहा माझें युद्धकदन । मी त्यास कदा न वजाय शरण । साम न करीं मुरारी! ॥ २२ ॥ पूर्वीं प्रल्हादें सहस्त्रनयन । जिंकिला समरीं युद्ध करून । कालाचे हस्तींचा हिरोन । दंड घेतला पुरुषार्थें ॥ २३ ॥ त्याचे कुळीं मी मल्लवीर । करीन त्या शिवाचा संहार । सैन्य गिळीन मी समग्र । वैकुंठपती । पाहें कां ॥ २४ ॥ तूं माझ्या पूर्वजीं पूजिलासी । म्हणवून तुज राखितों ह्रषीकेशी ! नाहीं तरी तुज गिळावयासी । उशीर मज कायसा? ॥ २५ ॥ मणिपर्वतीं उभा राहोन क्षणभरी । माझा संग्राम पाहें मधुकैटभारी । शिवाचें उदर फाडून झडकरी । गिळिला बंधु शोधीन ॥ २६ ॥ माझीं शस्त्रें तृषित समग्र । शोषूं भावितीं शिवाचें रुधिर । सुरसैन्य जाळीन सत्वर । पाहें आतां पद्मनाभा !' ॥ २७ ॥ हरि म्हणे, 'ऎक माझें वचन । तूं सोडीं गर्व अभिमान । महीपतीप्रति जाई शरण । अक्षय कल्याण होय तेणें ॥ २८ ॥ बंधुशोकाचें ज्वाळ । तेणें आहाळले तुझें ह्रदयकमळ । ढाळहीन मनमुक्ताफळ । जालें तुझें मल्लवीरा! ॥ २९ ॥ जेणें होय अनर्थ पूर्ण । तेथ चतुरें न घालाचें मन । उत्तम सन्मार्ग टाकून । आडमार्गा न वजावें!' ॥ ३० ॥ मल्ल म्हणे, 'ऎक श्रीपति । पश्‍चिमेस उगवेल गभस्ती । मृगजळीं बुडेल अगस्ती । तरि मी मैत्री न करीं कदा!' ॥ ३१ ॥ ऎसें बोलोन मल्लवीर । उभा ठाकला महासुर । सूर्यरथासी कोटीर । झगटला जाऊन तेधवा ॥ ३२ ॥ समुद्रांत करितां स्नान । नाभीपर्यंत त्यासी जीवन । कीं आकाशमंडपास जाण । स्तंभ दिधला दिसतसे ॥ ३३ ॥ मंदरगिरी जैसा प्रचंड । तैसे सरळ त्याचे दोर्दंड । खदिरांगापर्वत चंड । तैसे नेत्र तयाचे ॥ ३४ ॥ मल्ल चालता धरणीवरी । लवत भारें सकळ धरित्री । सिंदूरवर्ण जटा शिरीं । चर्चिला भाळीं रक्तचंदन ॥ ३५ ॥ छत्रचामर मित्रपत्रें शोभती । मकरबिरुदें पुढें चालतीं । अपार रणतुरें खाकातीं । दिग्गज कांपती ऎकतां  ॥ ३६ ॥ चौदंत हस्ती चौताळती । कीं पायांचे पर्वत धावती । हिरे पांचा जडिल्या दातीं । दशकोटी निघती कुंजर ॥ ३७ ॥ सुपर्णासमान वेगाडे । धावती पक्षांचे चपळ घोडे । रणसागरींचीं जहाजें प्रचंडें । रथ चहुंकडे तेंवि दिसती ॥ ३८ ॥ समुद्र पृथ्वीवरी लोटती । तैसी पायदळा नाहीं मिती । इकडे मल्लास पुसोन रमापती । महेश्‍वराजवळीं पातला ॥ ३९ ॥ वर्तमान समूळ सांगितलें । शिळेवरी उगवतील कमळें । हेंहि घडे एक वेळे । परि मल्ल शिकविले नायके ॥ ४० ॥ ऎसें ऎकतां कैलासनाथ । निजदळेंसि चालिला समर्थ । मल्ल निजभारेंसि लोटत । थरथरित ब्रह्मांड ॥ ४१ ॥ मेघांची बैसली दांतखिळी । चतुर्दश लोक कांपती चळीं । शेष कूर्म वराह सकळीं । दणाणिलीं पाताळें ॥ ४२ ॥ भगणें रिचवितीं धरणी । विजा पडती कडकडूनी । सप्तदीपें नवखंड अवनी । हलकल्लोळ होतसे ॥ ४३ ॥ उभयदळीं वाद्यगजर । तेणें छप्पन्नदेश जाले बधिर । जाला एकचि हाहाकार । कल्पांतप्रलयासारिखा ॥ ४४ ॥ वाटॆ धरणी होईल पालथी । रविमंडप पडेल क्षितीं । सृष्टी गेली गेली म्हणती । सुर पळविती विमानें ॥ ४५ ॥ दोहीं सैन्यां भेटी होत । कोट्यवधी असिलता झळकत । शरांचा मेघ वर्षत । गारा पडत शिरांच्या तेथें ॥ ४६ ॥ यमराष्ट्रवर्धिनी निम्नगा । शोणितें भरोनि चालिल्या वेगा । लवण पाहोन लगबगा । भेटूं धावती सिंधूतें ॥ ४७ ॥ कल्पांतवीज पडे धरणीं । तैसीं घृतमारी आली धावोनी । संहारित चालली वाहिनी । देव गगनीं पाहती ॥ ४८ ॥ पर्वत सांठवी मुखांत । ऎसी ते आवली पसरित । महाशूल जैसे दंत दिसती ॥ ४९ ॥ शतांचे शत कुंजर धरुनी । गरगरां फिरवीत गगनीं । सवेंच घालून वदनीं । चावून गिळी क्षणार्धें ॥ ५० ॥ इभ फिरवून आपटी धरणी । तेथ चूर्ण होती रथश्रेणी । अश्‍वांसहित स्वार उचलुनी । दाटी वदनगर्तेत ॥ ५१ ॥ आकाशीं भिरकावी बहुत । ते समुद्रांत जाऊन पडत । घृतमारीची हाक गाजत । डळमळीत भूगोल तेणें ॥ ५२ ॥ जिव्हा तिची लंबायमान । तेणेंच आवरी गजास्यनंदन । दैत्य शस्त्रें दारुण । घृतमारीवरी प्रेरिती ॥ ५३ ॥ वज्रदाढा कडकडित । चावून गिळिली क्षणांत । दैत्यसेना धाकें पळत । मल्ल पहात अद्‍भुत हें ॥ ५४ ॥ कल्पांत हाक फोडून । मल्लें मांडिलें संधान । म्हणे, 'कृत्ये ! सैन्य भक्षून । माजलीस बहुत पुष्ट तूं !' ॥ ५५ ॥ मुद्‌गल घेऊन घृतमारी । मल्ल ताडिला ह्रदयावरी । मग तीक्ष्णबाण धारीं । दैत्य वर्षे सक्रोधें ॥ ५६ ॥ विजेऎसे येती शर । मुखांत घालुनी गिळी समग्र । दैत्यें त्रिशूळें भुजा सत्वर । छेदिला तेव्हां कृत्येचा ॥ ५७ ॥ आणीक भुज सवेंच निघाली । मग दैत्य गेला गगनमंडळीं । शिलापर्वत तत्काळीं । वर्षता जाला वरूनी ॥ ५८ ॥ देवसेनेचा संहार होत । घृतमारी गेली गगनांत । युद्ध जालें परमाद्‍भुत । मागुती येत भूतळीं ॥ ५९ ॥ यावरि मल्लें तिच्या कपाळांत  । शतबाण भेदिले अकस्मात । सत्याहत्तरि बाण सत्य । स्तनावरी भेदिले तिच्या ॥ ६० ॥ नाभी आणि उरावरी । खिळिली शत शत शरीं । पर्वत विरूढती तृणांकुरीं । तैसी सर्वांगीं भेदिली ते ॥ ६१ ॥ मूर्छा येऊन पडतां धरणी । त्यावरि मुख्य मार्तंड ते क्षणीं । नंदीवरी वळघोनी । चपलेऎसा धाविला ॥ ६२ ॥ मल्ल म्हणे, 'तूं पशुपती । भीक मागणार, स्मशानीं वस्ती ।  नरकपाळ घेतलें हातीं । चिताभस्म सर्वांगी तुझ्या ॥ ६३ ॥ परम अपवित्र मुंडमाळ । दुर्गंधी गजचर्म अमंगळ । भूतें घेऊनि पुष्कळ । निरंजनीं राहसी सदा ॥ ६४ ॥ तुझी स्त्री वृद्ध महाकाळी । दुजी जटेंत लपविली । ते तुज सांडून समुद्रास मिळाली । सहस्त्रमुखें चुंबित ॥ ६५ ॥ तूं अभागी कापट्यकोश । तुज पाप पुण्य न कळे नि:शेष । सेनेसहित तुझा ग्रास । क्षणमात्रें करीन मी ॥ ६६ ॥ माझें विशाळ शरीर बळ अद्‍भुत । तुज ग्रासीन एक क्षणांत!' । यावरि तो खड्‍गधर जगदीश बोलला । ऎक मश्यका वृथापुष्टा ॥ ६७ ॥ तुज मी दिसतों सान । क्षणें तनु तुझी विदारीन । भस्में आच्छादिलों द्विमूर्धान । परि क्षणें कानन जाळील ॥ ६८ ॥ कंठीरव दृष्टीं न भरे परी । क्षणांत वारणचक्रे विदारी । कुलिश धाकटें शक्रकरी । परि धराधर चूर्ण केले ॥ ६९ ॥ बहु धाकटा वामन । परि ढेंगेंत आटिलें ब्रह्मांड जाण । कुंभोद्‍भवाची तनु सान । परि मेदिनीवसन प्राशिला ॥ ७० ॥ लहान दिसे चंडांश । परि कमळभवांडीं न माये प्रकाश । तरि तुझा क्षणमात्रें नाश । मीच करीन पाहें आतां ॥ ७१ ॥ पंडितापुढें शतमूर्ख जाण । सव्यापसव्य करी भाषण । तैसा तूं जल्पसी पूर्ण । देहांतीं फाटा फुटला तूंतें ॥ ७२ ॥ खांडववनाचा सूड सवेग । वैश्‍वानरास मागे पतंग । की विष्णुवहनापुढें उरग । झेपावत आला जैसा ॥ ७३ ॥ तेंवि मणीचा सूड घ्यावया देखा । आलास तूं एथ कीटका ! । तरणीच्या किरणावरि पिपीलिका । कैसी चढोन जाईल? ॥ ७४ ॥ कल्पांतविजू धरून वदनीं । केंवि शलभ उडेल गगनीं । उर्णनाभीतंतेंकरूनी । बांधवेकेंवि ऎरावत ॥ ७५ ॥ आपलें तेज धुंधुमार । तरणीस दावी वारंवार । कीं ब्रीदें बांधोन खर । नारदापुढें गाऊं आला!' ॥७६ ॥ ऎसे तीक्ष्ण शब्द ऎकोन । मल्ल धाविला खड्‌ग घेऊन । तें खंडेरायें छेदून । क्षणमात्रें टाकिलें ॥ ७७ ॥ मल्ल तेव्हां चाप ओढून । शर सोडी चपलेसमान । परि महाराज मणिप्राणहरण । छेदिता जाला खड्‍गघायें ॥ ७८ ॥ शक्ति सोडीत बळें दैत्य । असिलताघायें त्याही तोडित । अग्निअस्त्र मल्ल प्रेरित । चालिली जळत देवसेना ॥ ७९ ॥ शिवें मेघास्त्र घालून । तत्काळ विझविला अग्न । मल्लें वातास्त्र सोडून । जलदजाळ विदारिलें ॥ ८० ॥ शिवें पर्वतास्त्र घालून तत्काळ । वात कोंडिला परम सबळ । पर्वत फोडिला न लागतां वेळ ।  मल्लें वज्रास्त्र घालुनी ॥ ८१ ॥ दैत्य सोडी माहेश्‍वर । ब्रह्मास्त्र प्रेरी जगदीश्‍वर । शक्तिअस्त्र घालून शंकर । म्हैसासुर पळविले ॥ ८२ ॥ दैत्य प्रेरी पादोदर । शिव सोडी त्यावरी खगेंद्र । असो, प्रळय वर्तला थोर । युगान्त वाटला महावीरां ॥ ८३ ॥ खड्‍ग हातीं घेऊन । मल्ल भिडला जवळीं येऊन । एक हाक गाजली दारुण । विमानें सुरगण पळविती ॥ ८४ ॥ मेघमुखाहून घोष थोर । गडगडा गर्जती दैत्येंद्र । देवसेना अपार । आटिली तेणें क्षणार्धे ॥ ८५ ॥ अशुद्धनिम्नगा वहाती । त्यांमाजीं जीत वीर पोहती । प्रेतांच्या लाखोल्या पाडिल्या क्षितीं । वस्त्रालंकारीं मंडित हो! ॥ ८६ ॥ शस्त्रांसहित पडिले कर । मुगुटांसहित शिरें अपार । ऎसें रण माजिलें अनिवार । संकट वाटे सर्वांसी ॥ ८७ ॥ देवसेना आटली बहुत । ऎसें देखोन हिमनगजामात । निर्वाणशस्त्र पाशुपत । काढिता जाला तेधवां ॥ ८८ ॥ गभस्ती पावला अस्त । एकयाम रजनी होत । दीपिका पाजळील्या तेथ । तेतीस कोटीं सुरवरीं ॥ ८९ ॥ झळकती दीपिकांचे भंभाळ । हरिद्रचूर्ण उधळे पुष्कळ । तेणें पीतवर्ण पृथ्वी निराळ । त्यांत सुर सुमनें वर्षती ॥ ९० ॥ सप्तकोटी मुख्य गण । त्यांसहित खड्‌गराज विराजमान । जयजयकार करून । दीपिका सुरगण ओवाळिती ॥ ९१ ॥ म्हणती, 'दयाळा महीपति ! । मल्लास द्यावी यावरि मुक्ति । याच्या भयें भयभीत क्षिती । करी निर्वृति सर्वही !' ॥ ९२ ॥ इकडे मल्लें केला संहार । अजा पिटीत जैसा व्याघ्र। तैसे पळती निर्जर । हांक घोर गाजली ॥ ९३ ॥ ऎसें देखोन उमानाथ । जें सकळ शस्त्रास्त्रांमाजीं समर्थ । प्रेरिता जाला पाशुपत । तेजें उजळत ब्रह्मांड हे ॥ ९४ ॥ उगवले सहस्त्रे सहस्त्रकर । तैसें अस्त्र प्रचंड अनिवार । कीं कृतांतदंड साचार । उभारला महाप्रळयीं ॥ ९५ ॥ कीं असंख्य विजांचा एक रोळ । कीं प्रळयकाळची जिव्हा सबळ । सप्तकोटी मंत्रांचे तेज सकळ । सामर्थ्य तेथ एकवटलें ॥ ९६ ॥ पृथ्वी तडतडं उधळत । शेष मस्तक सांवरित । वराहवेष भगवंत । देत दंत सांवरूनी ॥ ९७ ॥ ऎसें चालिलें पाशुपत । तेजें ब्रह्मांड उजळत । दोन्ही दळे मोह पावत । येत अकस्मात मल्लावरी ॥ ९८ ॥ त्रुटि न वाजतां ते क्षणीं । शिर छेदून  पाडिलें धरणीं । पायांखाले घालूनी । रगडिलें खंडेराजें ॥ ९९ ॥ जाला एकचि जयजयकार । देव वर्षती सुमनें भंडार । दीपिका घेऊन समग्र । नाचती तेव्हां रणगोंधळी ॥ १०० ॥ अष्टनायिका नृत्य करिती । नारद तुंबर आनंदें गाती । इंद्र ब्रह्मा यश वर्णिती । ऋषि स्तुति करिती सर्व ॥ १०१ ॥ दिव्यदेह पावोन मल्ल अपार । स्तवन करीत प्रीतीनें थोर । 'मल्लारी हें नाम साचार । एथून वागवीं दयाळा ! ॥ १०२ ॥ तुझें पढती जें माहात्म्य । त्यांचे पुरविसी सकळकाम । युद्धामाजीं जय परम । दॆईं त्यांस दयाळा ! ॥ १०३ ॥ मल्लपुत्र पांच जण । कुंभ शूलधर दोघे जण । देवगंधर्व लोहार्गल पूर्ण । महाबाहु पांचवा ॥ १०४ ॥ ते पांचही पर्वत करून । स्थापिले भक्तपुत्र म्हणवून । त्यावरि धर्मपुत्र सत्य सुजाण । मणिचूल पर्वतीं स्थापिले ॥ १०५ ॥ 'तुम्हांस जो द्वेषील त्रासील जाण । त्यास मी सगळेंच ग्रासीन । माझ्या भक्तास जो करील विघ्न । त्यास निर्दळीन नेमेंसीं ॥ १०६ ॥ माझे भक्तीस जो रत पूर्ण । त्यास मी अंतर्बाह्य रक्षीन । कोठेंहि पडों नेदी न्यून । भक्ताअधीन मी साच!' ।१०७ ॥ त्यावरि कल्पवृक्षातळीं । दोनी लिंगें उत्पन्न जालीं । मल्लारी म्हाळसा देव सकळीं । षोडशोपचारें पूजिते जाले ॥ १०८ ॥ मासांमाजीं उत्तम मास । हरीची विभूति मार्गशीर्ष । शुद्धपक्षीं चंपाषष्ठीस । शततारका नक्षत्रीं ॥ १०९ ॥ रविवारीं प्रकट अवतार । मणिमल्लमर्दन परमेश्‍वर । देव ऋषि गंधर्व नर । यात्रा अपार भरलीले ॥ ११० ॥ तें अवतारस्थळ साचार । महाराज क्षेत्र प्रेमपुर । प्राकृत लोक म्हणती पेंभर । निजमाहेर भक्तांचें ॥ १११॥ मुख्यस्थल प्रेमपुर पाहीं । मग भक्तांलागीं प्रगटला ठायीं ठायीं । स्थापना किती मिती नाहीं । पूजा घेत भक्तांची ॥ ११२ ॥ म्हणोन पुराणप्रसिद्ध स्थळ । तें प्रेमपुर निर्मळ । निजभक्त जाणती प्रेमळ । सुख तेथिंचें कैसें तें ॥ ११३  ॥ जेथिंचे यात्रेस अभिनव । स्वर्गीहून येती देव । अष्टनायिका आणि गंधर्व । नृत्य गायन करिती तेथें ॥ ११४ ॥ मणि आणि मल्ल । अश्‍वारूढ दोघे द्वारपाळ । होउनी तिष्ठती सर्व काळ । प्रेमपुरीं शिवापुढें ॥ ११५ ॥ तेथिंचा महिमा अपार । वर्णूं न शके सहस्त्र वक्त्र । ते स्थळीं जाऊन पूजिती जे नर । त्यांस इहपरत्र सुखरूप ॥ ११६ ॥ ब्रह्मादि शक्र ऋषि मिळोनी । मृत्तिकेचीं लेपें करोनी । प्राणप्रतिष्ठा करितां तत्क्षणीं । सजीव जालीं रूपें तींच ॥ ११७ ॥ म्हाळसा गंगा दोघी जणी । दोहींकडे विलसती कामिनी । दिव्यवस्त्रीं दिव्याभरणीं । दैदीप्यवंत सर्वदा ॥ ११८ ॥ देव म्हणती, 'मल्लारी! । तूं कुळदैवत ज्याचे घरीं । त्याचे सर्व काम पूर्ण करीं । उणें तिळभरी पडों नेंदी ॥ ११९ ॥ अष्टगंधें आणि भंडार । आरक्तपुष्पें गुंफून हार । अर्चिती जे म्हाळसाप्रियकर । तेचि नर धन्य पै ॥ १२० ॥ तुझें माहात्म्य करिती पठण । श्रवण करिती भावेंकरून । त्यांचे मनोरथ पुरवून । विजय करीं सर्वस्थळीं !' ॥१२१ ॥ चंपाषष्ठीच्या दिवसांत । सहा दिवसपर्यंत । त्रिकाळ जे प्राणी पढत । नाहीं अंत भाग्या त्यांच्या ॥ १२२ ॥ त्रिमास पठण करितां नित्य । पोटीं पुत्र होईल प्रतापवंत । लक्ष्मी घरीं अमित । नित्य काळ तयाचे ॥ १२३ ॥ ग्रहपीडा पिशाच भूतावळी । यांची पीडा नव्हे कदाकाळीं । षण्मास पढतां त्रिकाळीं । महाव्याधि दूर होये ॥ १२४ ॥ धान्यक्षेत्रीं जे पठण करित । तेथ पीक होय परमाद्‍भुत । दक्षणामुख पढतां मासांत । शत्रुक्षय होय पैं ॥ १२५ ॥ आदित्यवारीं पुस्तक पूजोन । जे करिती हें माहात्म्यश्रवण । नष्टद्रव्य सांपडे पूर्ण । तस्करउपद्रव नव्हे कधीं ॥ १२६ ॥ आधिव्याधी दूर करून । मृत्यू दरिद्र संहारून । भक्तगृहीं मणिमल्लमर्दन । रात्रिदिवस राहे सुखें ॥ १२७ ॥ त्याचें ऋण मल्लारी । आपण आंगें परिहारी । ग्रामास गेला बहुदिन दुरी । तोही भेटे श्रवणें याच्या ॥ १२८ ॥ चतुर्दश अक्षरांचा मंत्र । गुरुमुखें शिकती जे साचार । त्यांचे घरीं सर्व प्रकार । म्हाळसावर पुरवील सदा ॥ १२९ ॥ यंत्रपूजन मंत्रधारण । सहस्त्रनाममंत्रश्रवण । जे भक्त करिती अनुदिन । प्रपंच परमार्थ गोड त्यांचा ॥ १३० ॥ चंपाषष्ठीस जाण । द्यावें ब्राह्मणास उत्तम भोजन । रोट वृंताकशाक क्षीरोदन । प्रिय पूर्ण मल्लारीतें ॥ १३१ ॥ एथे मूर्ख बुद्धिहीन । म्हणती, करावें पलांडूभक्षण । हें मूळ ग्रंथ पाहतां शोधून । संस्कृतीं नाहीं सर्वथा ॥ १३२ ॥ सनत्कुमारीं हे कथा । मनूप्रती सांगितली तत्वता । मल्लारिकवच मंत्र पढतां । निर्भय भक्तां सर्वकाळ ॥ १३३ ॥ प्रेमपुराभोवतीं तीर्थें असतीं । अष्टतीर्था आणिक नाहीं मिती । तीं वर्णिलीं मूळ ग्रंथीं । नाना रीतीं ऋषींनीं ॥ १३४ ॥ जैशीं वाराणशीस बहुत तीर्थें तैसींचि प्रेमपुरीं अद्‌भुतें । पापसंहारकें अमितें । सनत्कुमारीं वर्णिलीं बहु ॥ १३५ ॥ तीर्थविधी करावा पर्वकाळीं । सर्वस्वें तोषविजे कपाळमाळी । मुख्य याग विप्र सकळीं । धनधान्यदानीं पूजावे ॥ १३६ ॥ महानवमीचे दिवशी । अगत्य पूजावें मणिमर्दनासी । त्यावरि पूर्णिमा कार्तिकमासीं ते दिवशीं पूजावा तो ॥ १३७ ॥ त्यावरि मुख्य चंपाषष्ठी । ते दिवशीं अर्चावा धूर्जटी । ते भक्त कधीं संकटीं । न पडतीच जाणिजे ॥ १३८ ॥ प्रेमपुर देखिलें नाहीं नयनीं । तरी माहात्म्य ऎकावें श्रवणीं । कवच सहस्त्रनाम पढोनी । मंत्र यंत्र आराधिजे ॥ १३९ ॥ तेणें सर्वपापसंहार । अष्टादश कुष्ट समग्र । नाना रोग पीडा करणार । श्रवणपठणें दूर होती ॥ १४० ॥ मूर्तीपुढें बैसोन । माहात्म्य वाचावें, करावें श्रवण । पार्यातकपुष्पें आणून । मल्लारीस अर्चावें ॥ १४१ ॥ आठां दिवसां आदित्यवारीं । भक्तीं अर्पिजे प्रीतीं मल्लारी । पीतवर्ण तंदूळ कल्हारी । भक्तकैवारी अर्चावा ॥ १४२ ॥ वसंतऋतूंत मल्लारीस । करिजे बहुत पूजाविलास । महिमा वर्णितां शेष । लज्जित होय प्रेमपुरींचा ॥ १४३ ॥ ब्रह्मांडपुराणीं क्षेत्रखंड । तेथींचें हें माहात्म्य अति गोड । श्रवणें पुरवी सकळ कोड । न पडे चाड इतरांची ॥ १४४ ॥ प्रेमपुराजवळी शिवगया पूर्ण । जे तेथ करिती पिंडदान । त्यांचे पूर्वज उद्धरोन । शिवलोकाप्रती जाती ॥ १४५ ॥ मेघवाहन नगरीं भाग्य विशेष । चंद्रानन नामें होता वैश्‍य । कुटदुर्मती  नाम त्याच्या पुत्रास । परम नष्ट द्र्व्यलुब्धी ॥ १४६ ॥ कपटताजवा करून । ग्राहकांस नाडी रात्रंदिन । पुढें ती मृत्यु पावोन । काग जन्माप्रति गेला ॥ १४७ ॥ मुखीं यावानल धरूनी । अंतरिक्ष जातां गगनीं । गयापदावरी येऊनी । क्षणएक स्थिरावला ॥ १४८ ॥ मुखींचे यावानल सुटोन । गयापदीं पडिलें गळोन । सदाशिवें संतोषोन । पिंडदान मानिलें ॥ १४९ ॥ त्याचे पितृगण नरकीं पडिले । ते नेऊन कैलासीं स्थापिले । ऎसीं तीर्थें तेथ प्रबळें । महिमा अपार न वर्णवे ॥ १५० ॥ ब्रह्मानंदे जोडून कर । चतुर पंडितां विनवी श्रीधर । आमचे पूर्वज सर्व योगीश्वर । तिहीं देव अर्चिला हा ॥ १५१ ॥ पंढरीहून पश्‍चिमेस देख । नाझरें नाम पुण्यकारक । ह्याखालें ग्राम सुरेख । वाटंबर नाम त्याचें ॥ १५२ ॥ वडिलांची भक्ति अभिनव । देखोनि प्रेमपुरीचा राव । मायागंगातीरीं निजभाव । पाहोनिया प्रकटलासे ॥ १५३ ॥ ज्ञानानंद ब्रह्मानंद । उभयबंधु जगप्रसिद्ध । त्यांचे चरणाब्जीं मिलिंद । श्रीधर स्वानंद अभंग सदा ॥ १५४ ॥ संस्कृत बावीस अध्याय उत्तम । ग्रंथ जाणिजे मल्लारिमाहात्म्य । त्याची प्राकृत टीका सप्रेम । दो अध्यायांत कथियेली ॥ १५५ ॥ ब्रह्मानंदा श्रीधरवरा । म्हळसाह्रुदयारविंदभ्रमरा । भक्तवत्सला करुणासमुद्रा । अतिउदारा अभंगा ! ॥ १५६ ॥ ॥ इति श्रीब्रह्माण्डपुराणे क्षेत्रखण्डे मल्लारिमाहात्म्यं सम्पूर्णमस्तु ॥

Search

Search here.