श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय ७ ते १२
ग्रंथ - पोथी > श्री नवनाथ भक्तिसार कथा Posted at 2019-02-17 06:00:21
श्री नवनाथ भक्तिसार कथा --- अध्याय ७ ते १२
अध्याय ७.
वीरभद्राबरोबर मच्छिंद्राचे युद्ध; स्वर्गलोकी सन्मान; वज्रावतीचे दर्शन...
मच्छिंद्रनाथ हरेश्वरास गेल्यावर तेथे त्याने गदातीर्थी स्नान केले. इतक्यात स्नानासाठी त्या समयी त्याच तीर्थास त्रिशूळ, डमरू, धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र आला होता; तेथे त्याची व मच्छिंद्रनाथाची भेट झाली. उभयतानी एकमेकास नमस्कार केला. मग तुम्ही कोण, कोठचे, पंथ कोणता, अशाबद्दल वीरभद्र विचारपूस करू लागला. तेव्हा ह्या देहाला मच्छिंद्र म्हणतात, नाथपंथ तो आमचाच आहे, शैली, कंथा व मुद्रा ही आमची भूषणे आहेत वगैरे मच्छिंद्रनाथाने सर्व सांगितल्यावर वीरभद्र म्हणाला, हे एक नवीन पाखंड बंड मातवून असे काळे तोंड जगात मिरविता, हे तुम्हास योग्य नाही, यास्तव ह्या मुद्रा टाकून दे. न टाकशील तर ठिकठिकाणी त्याबद्दल तुला पुष्कळ दुःखे सोसावी लागतील. वेदविधीने लावून दिलेल्या धर्माविरुद्ध हा एक निराळाच पंथ काढणारा असा मूर्ख तुझा गुरु तरी कोण? अशी त्याची निंदाप्रचुर भाषणे ऐकून, मच्छिंद्रनाथाचे पित्त खवळून गेले. तो क्रोधाच्या तडाख्यात वीरभद्रास म्हणाला, अरे अधमा ! तुझ्या दर्शनाने मला स्नान करावयाला पाहिजे. आता निमूटपणे आपल्या कामास जा; नाही तर माझ्या हाताने तू आता मरण पावशील. ह्या भाषणाचा वीरभद्रास अतिशय राग आला व तो म्हणाला, अरे मूर्खा ! आता तुझा प्राण घेतो पाहा. असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्वाण बाण काढला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने म्हटले की, अरे पतिता ! उन्मत्तपणाने तू जनात आपले अहित करून घेत आहेस. अरे ! धनुष्यबाण काढून मला सोंग दाखवीत आहेस; परंतु या योगाने तू या वेळेस मरण मात्र पावशील. अरे ! असली बहुरूप्यांची सोंगे दाखविणारे मजसमोर पुष्कळ येऊन गेले. तुझे हे हावभाव मजसमोर क्षणभरसुद्धा टिकाव धरणार नाहीत. आता तुझे आयुष्य सरले म्हणूनच तू येथे आलास असे मला वाटते !
अशी त्या समयी उभयताची आवेशाची पुष्कळ भाषणे झाली. नंतर वीरभद्राने धनुष्यास बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण करावयास सांगितले. ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, राममंत्र तुला अपवित्र वाटला, म्हणून त्या मंत्राचे मला स्मरण करावयास सांगतोस, पण इतके पक्के समज की, त्याच मंत्राने शंकर दुःखातून मोकळे होऊन सुखी झाले. वाला (वाल्मीकि) तरला तोच मंत्र मला तारील. आता तू सावध राहा. असे म्हणून त्याने हातात भस्म घेतले व वज्रास्त्र सिद्ध करून फेकले, ते दाही दिशा फिरू लागले. त्यावेळी वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथास तृणासमान भासला. तो बाण मच्छिंद्रनाथाचा प्राण घ्यावयास येत होता, पण भस्माच्या जोराने तो आकाशात भ्रमण करू लागला. इतक्यात मच्छिंद्रनाथाच्या वज्रशक्तीने त्या बाणाचा चूर होऊन गेला. नंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागास्त्राची योजना करून तोहि पाठोपाठ सोडला. ते पाहून मच्छिंद्रनाथानेहि आपल्या संरक्षणाकरिता रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्र प्रेरिले. त्यांनी वीरभद्राची शक्ती क्षीण करून टाकली. पुढे वीरभद्राने वातास्त्र सोडताच, मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्र सोडले. अशा रितीने ते दोघे वीर, अस्त्रे पेरून एकमेकांचा पाडाव करावयास पाहात होते. शेवटी ब्रह्मा, विष्णु, महेश यांनी युद्धस्थानी येउन मच्छिंद्रनाथाचे समाधान केले. नंतर वीरभद्रास जवळ बोलावून त्याचे मच्छिंद्रनाथाशी सख्य करून दिले व हा नाथ कविनारायणाचा अवतार आहे असे सांगितले. मग तो देखील त्यास वर देण्यास तयार झाला. त्याने बोलून दाखविले की, मी आजपर्यंत मोठमोठाले बलवान असे असंख्य वीर जेरीस आणून हतवीर्य केले. पण मच्छिंद्रनाथासारखा वीर मला आढळला नाही. असे बोलून त्याने प्रेमाने त्यास आलिंगन दिले व कोणती मनकामना आहे म्हणून विचारिले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की, मी साबरी विद्या साध्य केली आहे, तर तीस तुझे साहाय्य असावे. मग मंत्राबरहुकूम सर्व कामे करण्याचे वीरभद्राने मच्छिंद्रनाथास वचन दिले व आम्हीहि साहाय्य आहो असे संपूर्ण देवांनी आश्वासन दिले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना नमस्कार केला.
नंतर विष्णूने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले आणि सांगितले की, तुझ्या विद्येस माझे पूर्ण साहाय्य आहे, माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य होऊन तुझ्या संकटाचे निवारण करीन, असे बोलून त्याने त्यास चक्रास्त्र दिले. नंतर शंकराने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र, ब्रह्मदेवाने शापादप्यास्त्र, तसेच इंद्राने वज्रास्त्र दिले. त्याचप्रमाणे देवांनी प्रसन्न होऊन एक एक वर दिला. मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थानास जावयास निघाले. त्या वेळेस मच्छिंद्रनाथाने देवाची प्रार्थना केली की, मणिकर्णिकेचे स्नान करावे असा माझा हेतु आहे; तेवढी माझी मनकामना पुरवावी. ते त्याचे म्हणणे सर्व देवांनी आनंदाने कबूल केले.
मग लक्ष्मीकांताने त्यास आपल्या विमानात बसवून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर त्यास बसविले. त्याचे भोजन, निजणे, बसणे, उठणे, सर्व विष्णूबरोबर वैकुंठात होत होते. वैकुंठात असता मच्छिंद्रनाथ नित्य मणिकर्णिकेचे स्नान करीत असे. एकदा आपण पूर्वजन्मी मेरुपर्वतावर घेतलेली समाधी पाहाण्याची इच्छा होऊन त्याने हा आपला हेतु विष्णूस कळविला. म्हणून त्याने त्यास तेथे नेऊन एक वासुदेवाची व दुसरी नवनारायणाची अशा समाधि दाखविल्या; त्या पाहून तो आनंद पावला. मच्छिंद्रनाथ वैकुंठास एक वर्षभर राहिला. तेथून त्यास शंकर कैलासी घेऊन गेले. तेथेहि तो एक वर्षभर राहिला. मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्यास अमरावतीस घेऊन गेला. तो तेथे तीन महिने होता. नंतर ब्रह्मदेवाने सांगितल्यावरून नारद येऊन त्यास सत्यलोकास घेऊन गेला. तेथे तो सहा महिने राहिला. पुढे सर्व देवांनी त्यास आपल्याकडे एक एक दिवस आग्रहाने राहवुन घेतले. तो एकंदर सात वर्षे स्वर्गात राहून पाहुणचार खात होता. नंतर सर्वांना विचारून तो मृत्युलोकी यावयास निघाला, तेव्हा सर्व देवांनी त्याला विमानात बसवून अति आदराने मृत्युलोकी आणून पोचविले नंतर ते स्वर्गास गेले व मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाला.
मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेला. त्या ठिकाणी वज्रभगवतीचे स्थान आहे. तेथे त्याने तीनशेसाठ उष्णोदकाची कुंडे पाहिली, तेव्हा त्यास परम आश्चर्य वाटले. मग तेथल्या सर्व तीर्थात स्नान करून तो अंबिकेच्या देवालयात गेला व पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल विचारू लागला. तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी या ठिकाणी वसिष्ठ मुनीने यज्ञ केला. त्या समयी सर्व देव खाली आले होते. त्यांनी स्नानास गेल्यावर ऊन पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून आपापली नावे कुंडास ठेविली. ते देव बारा वर्षे बारा दिवसपर्यंत येथे राहिले होते. यज्ञ समाप्त झाल्यावर देव परत गेले, पण कुंड अजूनपर्यंत त्याच ठिकाणी आहेत.
असा मजकूर ऐकल्यावर आपणहि कुंडे निर्माण करावी, असे मच्छिंद्रनाथाच्या मनात येऊन त्याने त्रिशूळाच्या योगाने कुंडे खणून तयार केली व वरुणमंत्र जपून भोगावतीचे उदक उत्पन्न केले. मग अग्निमंत्र जपताच त्यात अग्नीने प्रवेश करून पाणी ऊन केले, नंतर त्या नव्या भोगावतीच्या कुंडात मच्छिंद्रनाथाने स्नान करून तो वज्रादेवीच्या देवळात गेला व तिला त्या कुंडातील ऊन पाण्याने स्नान घातले. तेव्हा तिने त्यास शाबासकी देऊन एक महिना राहवून घेतले. नंतर तुला वज्राबाई का म्हणतात, असे मच्छिंद्रनाथाने तिला विचारिले असता ती देवी म्हणाली वसिष्ठाच्या यज्ञात इंद्र हवनाच्या वेळी आला होता, पण सभेत जे ऋषि बसले होते, त्यांच्याकडून त्यास मान न मिळाल्यामुळे त्याने वज्राची प्रेरणा केली. हे पाहून श्रीरामचंद्राने 'शक्ति' मंत्राने दर्भ मंत्रून सोडला. त्यात मी प्रगट होऊन वज्र गिळून टाकिले आणि हवनास हरकत होऊ दिली नाही. मग इंद्राने आपले वज्र मिळविण्यासाठी रामाची प्रार्थना केली. त्याने इंद्रास वज्र परत दिले. मग त्याच वेळेस देवांनी व ऋषींनी मला 'वज्राबाई' असे नाव दिले. मग सर्व ठिकाणी गेल्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली. त्याने प्राणप्रतिष्ठा करतेसमयी मला भोगावतीचे स्नान घातले होते. त्यावर आज झाले. पण रामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस. ती ही की, त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले व तू ऊन पाण्याने घालून भोगावती येथे अक्षयी ठेविलीस, असो; तेथे मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिला व देवीचा निरोप घेऊन पुढे गेला.
॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥
*******************************************
अध्याय ८. कथासार
मच्छिंद्राचे सूर्याबरोबर युद्ध ......
नंतर मच्छिंद्रनाथ तीर्थे हिंडत हिंडत द्वारकेस गेला व गोमतीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेऊन अयोध्येस आला. तेथे शरयूतीरी स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयाकडे चालला. त्यावेळी अयोध्यामध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करीत होता. हा सूर्यवंशीय श्रीरामचंद्राचा वंशज होय. तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयात गेला होता. राजा देवालयात पूजेस गेला असता, देवळाभोवती पाऊल ठेवण्यास जागा नाही इतकी दाटी झाली होती. तशा गर्दीतून मच्छिंद्रनाथाची स्वारी रामाचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली व तो जेमतेम देवळाच्या दरवाजापाशी आला. पण द्वारपाळांनी त्यास आत जाण्यास अटकाव केला.
मच्छिंद्रनाथ उतावळीने देवळात जात असता त्याच्याशी द्वारपाळ उद्धटपणाने बोलू लागले. त्यांनी मर्यादा न ठेविता पुष्कळ अपशब्दांनी ताडण करून व शेवटी हात धरून त्यास मागे लोटले. अशी अप्रतिष्ठा झाली, तेव्हा मच्छिंद्रनाथासहि वाईट वाटले. त्यास संताप आला असताहि, त्याने तो विवेकाने सहन केला, कारण सेवकांबरोबर तंटा करणे शोभत नाही, ह्या विचाराने तो उगीच राहून द्वारपाळाशी न बोलता राजासच शिक्षा करण्याचा विचार त्याने मनात आणिला. राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार मंडळींचा जीव खालवर होऊन अवघे फिकिरीत पडतील, ह्या हेतूने त्याने स्पर्शास्त्रमंत्र म्हणून व रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेविले. नंतर राजाने देवीची पूजा करून हात जोडून जमिनीस साष्टांग नमस्कार घातला. त्याचे कपाळ जमिनीस लागले आहे, अशी संधि पाहून त्या स्पर्शास्त्राने आपला अंमल राजावर बसविला व त्यामुळे राजास जमिनीपासून सुटे होता येईना. तो चिकटून राहिला. त्याने पुष्कळ खटपट करून पाहिली, पण निष्फळ. मग राजाने प्रधानास बोलावून हा प्रकार कळविला. मंत्री मोठा चाणाक्ष होता, तो लागलाच बाहेर येऊन कोणाबरोबर कोणाचा तंटाबखेडा झाला आहे काय, ह्याची चौकशी करू लागला. त्याने तर्काने असे धोरण बांधिले की, नगरात कोणी जती किंवा साधु आला असेल, त्याचा राजसेवकांनी छळ केल्यामुळे तो रागावला असावा. पण त्याने राग मनात ठेविल्यामुळे भगवंतास ही गोष्ट सहन न होऊन त्याचाच क्षोभ असावा. म्हणून देवीच्या भक्ताचा छळ कदापि कोणी करू नये. येथेहि या वेळी असाच काही तरी छळ राजसेवकांकडून होऊन भगवंतास शस्त्र धरावे लागल्यामुळे ह्या परिणामास गोष्ट आली असावी, असा तर्क करून शोध चालविला. तो देवळाच्या दाराशी येताच सर्व खबर त्यास लागली. त्याने मच्छिंद्रमुनीस शोधून काढिले. मग तो त्याच्या पाया पडला व हात जोडून प्रार्थना करू लागला की, आता स्वामींनी कृपा करावी. तुम्ही संत शांतीचे भांडार. औदार्याला तर सीमाच नाही. या भाषणाने मच्छिंद्रनाथाचा क्रोध शांत होऊन त्यास संतोष वाटला. मग हातात भस्म घेऊन विभक्तमंत्र म्हणून त्यास भस्म फुंकताच राजा जमिनीस चिटकलेला होता तो लागलाच सुटा झाला.
राजा उठून बसल्याची बातमी लागताच प्रधानाने मच्छिंद्रनाथाचा हात धरून त्यास देवळात नेले व राजास झालेला समग्र वृत्तांत निवेदन केला. मग राजा त्याच्या पाया पडला व नाव विचारू लागला असता, मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून त्याने त्यास सांगितले. मच्छिंद्रनाथाची कीर्ति पूर्वीच राजास ऐकून ठाऊक झालेली होती. तोच मच्छिंद्रनाथ आज येऊन दर्शन देत आहे, म्हणून राजास फार आनंद झाला. नंतर राजाने त्याचा हात धरून आपल्या समागमे राजवाड्यात नेले. तेथे सिंहासनावर बसवून त्याची षोडशोपचारांनी पूजा केली व स्वतः त्याच्या सेवेकरिता हात जोडून उभा राहिला. अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथास परमानंद झाला. मग प्रसन्न होऊन कोणता हेतु तुझ्या मनात आहे तो मला कळव म्हणून त्याने म्हटले. तेव्हा राजा म्हणाला, मी सूर्यवंशी श्रीराम राजाच्या घराण्यातला आहे. माझे नाव पाशुपत. मला इतकेच मागावयाचे की, सूर्यकुळांत उत्पन्न झालेला जो वीरशिरोमणी श्रीराम त्याची मला भेट व्हावी. ते ऐकून रामाची व तुझी भेट आताच करून देतो, असे बोलून राजास घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर आंगणात येऊन उभा राहिला.
त्यावेळी त्याने धूम्रास्त्रमंत्र म्हणून व भस्म मंत्रून सूर्यावर टाकिले, तेणेकरून संपूर्ण आकाश धुराने भरून गेले; सूर्य झाकून गेला व त्याचा सारथी अरुण धुरामुळे डोळे पुसू लागला आणि तोंडात धूर गेल्याने कासावीस होऊ लागला. तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणी तरी राजाने ही धुम्रास्त्रविद्या प्रेरिली आहे, असे सूर्यास वाटले. मग त्याने वायु अस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला. तेव्हा मोठा वारा सुटला, त्या योगाने धूर दाही दिशांस फाकला. मग मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली. त्याने सूर्याच्या रथास अडथळा झाला त्या क्षणीच सूर्यनारायणाने वज्रास्त्र सोडिले. तेणेकरून पर्वतास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वताच्या नाश झाला. मग मच्छिंद्रनाथाने भ्रमास्त्राची योजना केली. तेव्हा घोड्यासहित अरुण सुद्धा भ्रमिष्ट होऊन वाट सोडून रथ भलतीकडे नेऊ लागला. असे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडिले. तेव्हा अग्नीवर उदक टाकल्याने जसा तो नाहीसा होतो किंवा शिष्याचे अज्ञानपण बोध करून सद्गुरू नाहीसे करतो. त्याचप्रमाणे सूर्याने ज्ञानास्त्राची प्रेरणा करून भ्रमाचे निरसन केलं, ते पाहून मच्छिंद्रनाथाने वाताकर्शण अस्त्र सोडिले. तेव्हा सूर्यासह सारथी, घोडे ह्यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला व रथ उलटून जमिनीवर आदळला. त्याबरोबर सूर्यहि रथाखाली पडला. त्या तेजोमय सूर्याच्या योगाने पृथ्वी जळून जाऊ लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकास्त्राची योजना केली. मग अपरिमित जलवृष्टि होऊन दाह शांत झाला. परंतु सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्याने देवांची तोंडे सुकून गेली. ते सर्व मच्छिंद्रनाथाजवळ आले. ब्रह्मदेव, विष्णु, शिव, वरुण, अश्विनी, कुबेर गंधर्व वगैरे सर्व देव लगबगीने धावत आले. एका सूर्यासाठी हे सर्व देव महीवरती उतरून मच्छिंद्रनाथाजवळ गेले व सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे, म्हणून त्यानी विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने नमस्कार केला आणि उत्तर दिले की, हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असताहि सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही. व ह्याच्याकडे नुसता ढुंकूनसुद्धा पाहात नाही. पाशुपत राजा सूर्यास आवडत नाही, म्हणून त्यास वळणावर आणावयासाठी मला असे करावे लागले. असे करण्यामध्ये आणखी दुसरे हेतु आहेत. माझ्या साबरि मंत्रविद्येला सुर्याचे बिनहरकत साह्य मिळावे व ज्याने सूर्यवंशामध्ये अवतरून विजयध्वज लाविला, त्या श्रीरामचंद्राची या पाशुपत राजास भेट व्हावी; का की, या राजाचा मजवर पूर्ण लोभ आहे. यास्तव हे चक्रपाणी, माझे इतके हेतु पुरवावे. हे ऐकून विष्णुने सांगितले की, तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील, परंतु अगोदर सूर्याला सावध कर. तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टींनी अनुकूल असून जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून देईल. सहज सूर्याचे नाव घेतले असता पातक भस्म होते. मग ते मंत्रप्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल. आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहो, आता विलंब न करिता यास लवकर उठीव. वीरभद्राच्या युद्धप्रसंगाच्या वेळेस आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले, नागपत्रअश्वत्थाचे ठिकाणी तुला वरदाने दिली. असे असता अजून संशयात का पडतोस? असे बोलून सर्व देवांनी दुःखापासून सोडविण्याबद्दल मनस्वी भीड घातली. परंतु मच्छिंद्रनाथाने सांगितले की, पाशुपत राजास रामाचे दर्शन करवा; म्हणजे माझ्या मनाला स्वस्थता वाटेल. हे ऐकताच रामचंद्र प्रगट झाले. तेव्हा राजास व नाथास अपार आनंद झाला. नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडला. त्यास रामाने पोटाशी धरिले.
त्याच वेळी मच्छिंद्राने रामाची प्रार्थना केली की, तुझे नाम श्रेष्ठ होय. साबरी विद्येच्या मंत्रयोगामध्ये तुझे नाव येईल, तेव्हा तू येथे हजर राहून ते कार्य सिद्धीस न्यावेस व ह्याबद्दल प्रसन्न मनाने वचनादाखल माझ्या हातावर हात द्यावा. हे ऐकून रामाने की, तिन्ही देवांचा अवतार दत्तात्रय, त्याचा पूर्णपणे वरदहस्त तुझ्या मस्तकावर, तो पूर्णब्रह्म नरसिंहअवतार, त्याचीहि तुला पूर्ण अनुकूलता. मग मी का तुला साह्य न व्हावे? तर तुला मी सर्वस्वी साह्य आहे. मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य करीन, असे त्यास रामाने वचन दिले. त्या वेळी त्याने असेही सांगितले की, तु कविनारायणाचा अवतार असल्यामुळे आपण उभयता एकच आहो, असे सांगून सूर्यास उठविण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथाचे पुष्कळ आर्जव केले.
मच्छिंद्रनाथाचा त्या वेळचा आनंद अपरिमित होता. मग मच्छिंद्रनाथाने वायूक्त अस्त्रमंत्र म्हणून भस्म टाकिताच सुर्य सावध झाला व त्याने सर्व देवाना जवळ बोलाविले. सर्व देवांनी त्यास नमस्कार केला. पुढे हा कोणत्या वीराचा प्रताप म्हणून सूर्याने विष्णूस विचारिले व मला हात दाखविणाऱ्या प्रतापीवीरास एकदा आणून मला भेटवा म्हणून सांगितले. सूर्यास भेटण्यासाठी देवानी मच्छिंद्रनाथास बोलाविले, मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून चंद्रास्त्र मंत्रून नाथ त्यास भेटावयास गेला. नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्यास नाव गाव विचारिले असता विष्णूनेच मुळापासून त्यास कथा सांगितली. तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथास साबरी विद्येस साह्य असल्याबद्दल वचन दिले. मग पाशुपत राजास त्याच्या पायावर घातले. आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला. मग त्याचे समाधान करून सूर्यासह सर्व देव आपापल्या ठिकाणी गेले. मच्छिंद्रनाथहि राजाचा निरोप घेऊन व रामाचे दर्शन घेऊन पुढे तीर्थयात्रा करीत चालला.
॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥
*******************************************
अध्याय ९.
गोरक्षनाथाचा जन्म....
अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, मथुरा, प्रयाग, गया आदिकरून तीर्थे करीत करीत तो बंगाल्यात गेला. तेथे चंद्रगिर गावात उतरल्यावर भिक्षेस निघाला असता, एका ब्राह्मणाचे घर दिसले. ते पाहताच, त्यास भस्माची आठवण झाली तो मनात विचारू लागला की, मागे मी भस्म मंत्रून दिले होते, ते हेच घर. येथच्या यजमानीणबाईचे नाव सरस्वती, तिला मी बारा वर्षांनी परत येईन म्हणून सांगितले होते तिचा मुलगा कसा आहे तो पहावा, असा विचार करून तो त्या घराजवळ गेला व बाहेरून त्याने तिचे नाव घेऊन हाक मारिली. हाक ऐकून ती बाहेर आली व गोसावी पाहून भिक्षा आणून घालू लागली. तेव्हा खूण पटण्यासाठी त्याने तिला तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव वगैरे विचारिले. त्यावरून तिने आपले नाव सरस्वती, नवऱ्याचे दयाळ व जात गौडब्राह्मण वगैरे सर्व सांगितले; तेव्हा त्यास खूण पटली. मग मुलगा कोठे आहे, म्हणून त्याने तिला विचारिले असता, मला अजूनपर्यंत पुत्र झालाच नाही, असे तिने उत्तर दिले. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू खोटे का बोलतेस? तुला पुत्र होण्यासाठी मी विभूति मंत्रून दिली होती ती काय झाली? असे विचारताच ती घाबरली व आपण ती उकिरड्यावर टाकिली, हे वाइट केले, म्हणून तिला पूर्व पश्चात्ताप झाला. आता हा कानफाड्या माझी काय दशा करील कोण जाणे? आता मी करू तरी काय? ह्याने तर मला पक्के ओळखले. असे विचार तिच्या मनात येऊ लागल्याने ती भांबावून गेली. तशात मच्छिंद्रनाथ पुत्र दाखविण्यासाठी वारंवार तिला टोचीत होताच. नंतर ती त्याच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाली, योगिराज ! माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला, ह्या माझ्या अन्यायाची मला क्षमा करा.
त्या वेळी स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे अनर्थास कारण होते, अशा अर्थाचे बहुत विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. ह्या बाईच्या नादी लागल्यामुळे त्या वेळी आपला मूर्खपणा झाला, असे त्याला वाटले. पुत्रप्राप्तीस्तव सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रण करून दिलेल्या भस्माची धुळदाणी झाल्याने त्यास रुखरुख लागली. ते भस्म फुकट न जाता त्याला देह झालाच पाहिजे असे वाटून व ते भस्म कोठे टाकिले त्याचा तपास करावा म्हणजे काय अवस्था झाली आहे ते कळेल, असा विचार मनात आणून तो म्हणाला की, माते ! जसे व्हावयाचे तसे घडून आले. तुजवर जरी मी आता रागावलो तरी माझ्या पदरात काय पडावयाचे आहे? होणारी गोष्ट होऊन गेली. आता इतके कर की, जेथे ते भस्म टाकिले होतेस ती जागा मला दाखव म्हणजे झाले. मच्छिंद्रनाथाने असे म्हटल्यावर तिची भीति उडाली. मग जेथे ते भस्म टाकिले होतेस ती जागा मला दाखव म्हणजे झाले.
मच्छिंद्रनाथाने असे म्हटल्यावर तिची भीति उडाली. मग जेथे भस्म टाकिले होते तो मोठा उंच गोवराचा ढीग त्यास दाखवून येथेच भस्म टाकले. असे ती म्हणाली. ती जागा पाहिल्यावर त्याने मुलास उद्देशून हाक मारिली की, हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता, तू जर गोवरात असलास तर बाहेर नीघ. तुझा जन्म येथे झाला व आज बारा वर्षे ह्यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेविले आहे. यास्तव हे गोरखनाथा, तू आता उशीर न लावता बाहेर ये. इतके शब्द ऐकताच उकिरड्यातून शब्द आले की, गुरुराया, मी गोरक्षनाथ आत आहे; पण गोवराची रास मोठी असल्यामुळे बाहेर निघता येत नाही; यास्तव गोवर एका बाजूस करून मला बाहेर काढावे. नंतर खाच उकरून गोरक्षनाथास बाहेर काढिले. तो तेजःपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. तेव्हा सरस्वतीस फार पश्चात्ताप झाला. असा पुत्र आपल्या हातून गेला. म्हणून तिला तळमळ लागली व ती रडू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने तिला सांगितले की, आता रडतेस कशाला? तो मुलगा तुझ्या नशिबीच नव्हता, मग तो तुला कोठून प्राप्त होणार? आता तू येथून जा. कारण माझा कोप प्रत्यक्ष अग्नीप्रमाणे आहे. तो ब्रह्मादिकाना देखील सहन होण्यास कठीण. आता व्यर्थ खेद न करिता जा; नाही तर शाप मात्र घेशील. ते भाषण ऐकून ती घाबरली व मुकाट्याने मागल्या पायी घरी गेली, पुढे गोरक्षनाथ गुरूच्या पाया पडला. त्यास मच्छिंद्रनाथाने प्रसन्न होऊन उपदेश केला व आपला वरहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला आणि त्यास नाथदीक्षा दिली. नंतर तो त्यास घेऊन तीर्थयात्रेस निघाला.
मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथास घेऊन तीर्थे करीत हिंडत असता, जगन्नाथास जाण्याच्या वाटेवर एक कनकगिरी म्हणून गाव लागला तेथे येताच तो क्षुधेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथास भिक्षेस पाठविले. तो घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडे पितृतीथ होती, म्हणून चांगली चांगली पक्वान्ने केलेली होती. तेथे जाऊन गोरक्षनाथाने 'अलख' शब्द केला. तो ऐकून घरधनीण बाहेर आली. तिने त्याच्या त्या गंभीर भव्य व तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच हा कोणी तरी योगी असावा, असा विचार तिच्या मनात आला. त्यावेळेस तिने त्यास सर्व पदार्थ वाढलेले घवघवीत पान दिले. अनेक पदार्थ पाहून गोरक्षास समाधान वाटले व तिला आशीर्वाद देऊन तो निघून गेला. पोटापुरती बेगमी झाली असे पाहून तो जास्त न फिरता माघारी गेला व ती भिक्षा त्याने गुरुपुढे ठेविली. षड्रस पक्वानांनी भरलेले पात्र पाहून गुरूस आनंद झाला. मग तो जेवावयास बसला. ते अन्न स्वादिष्ट लागल्यामुळे मच्छिंद्रनाथ प्रीतीने जेवला. त्या योगाने त्याचे पोट भरले; तरी त्याचा त्या पात्रातील वड्यावर हेतु राहून गेला. तेव्हा त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले त्याने काय इच्छा आहे ते कळवावी अशी विनंति केली. त्यावर तो म्हणाला, वड्यावर माझे मन गेले आहे; तो जर आणखी एक असता तर चांगले झाले असते.
गुरूने आपली वासना वड्यावर आहे असे सांगताच मी आता जाऊन वडे घेऊन येतो. असे बोलून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेला व गुरूकरिता त्या बाईपाशी आणखी वडे मागू लागला. तेव्हा ती म्हणाली, गुरूचे नाव कशाला घेतोस? तुला पाहिजेत असे का म्हणेनास? हे ऐकून त्याने तिला सांगितले की, खरोखर मला नकोत, मी गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठीच वडे मागून नेत आहे. तेव्हा ती म्हणाली, अरे तुला बैरागी समजून मी भक्तिपूर्वक पुष्कळ पदार्थ घालून चांगले घवघवीत पान वाढून दिले होते, तू फिरून आलास? असे उत्तम अन्न वारंवार फुकट मिळते काय? हे तिचे शब्द ऐकून गोरक्षनाथ म्हणाला. मी तुला जे मागशील ते देतो; पण गुरूची इच्छापूर्ण करण्याकरिता मला वडे दे. हे ऐकून त्याची परीक्षा पाहाण्याकरिता तिने त्याचा एक डोळा मागितला. तेव्हा गोरक्षनाथाने लागलीच डोळ्यात बोट घालून आतले बुबुळ काढले व ते तिच्या हवाली करू लागला. तेव्हा डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली. ते साहसकृत्य पाहून तिने तोंडात बोट घातले. तिची छाती दडपून गेली. तिला त्याचा फारच कळवळा आला. ती पाच सात वडे घेऊन बाहेर आली व ते त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली, महाराज ! मी सहज बोलले, माझ्या अन्यायाची मला क्षमा करा. दुसऱ्याकरिता तुम्ही साधु अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जिवास करून घेता; वगैरे त्यास म्हटल्यावर गोरक्ष म्हणाला, तू का खंती होतेस? वड्यांच्या मोबदला मी तुला डोळा दिला. तेव्हा ती म्हणाली, मजवर कृपा करून बुबुळासह अन्न घेऊन जा व माझे अन्याय पोटात घाला.
मग गोरक्षनाथ तिचे समाधान करून बुबुळ व वडे घेऊन निघाला व परत गुरूकडे आला. त्याने डोळ्याचे व्यंग दिसण्यात येऊ नये म्हणून पट्टा बांधिला होता. पट्टा बांधण्याचे कारण गुरूने विचारिले. परंतु ते ऐकून त्याला दुःख होऊन तो वडे खाणार नाही व त्याची इच्छा तशीच राहून जाईल म्हणून त्याने पट्टा सहज बांधिला म्हणून सांगितले पण गुरूने डोळा दाखविण्यासाठी हट्ट घेतला, तेव्हा गोरक्षाने झालेला सर्व प्रकार कळविला व अन्यायाची क्षमा करण्याकरिता विनंति केली. मग बुबुळ मागुन घेऊन मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यात ते बसवून डोळा पूर्ववत केला व मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरून हात फिरविला. नंतर उभयतांनी भोजन केले. तेथे महिनाभर राहून मच्छिंद्राने त्यास सर्व साबरी विद्या शिकविली आणि अस्त्रविद्येतहि निपुण केले.
॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥
********************************************************
अध्याय १०.
गहिनीनाथाचा मातीच्या पुतळ्यापासून जन्म, मधुनाभा ब्राह्मणाकडून संगोपन...
कनकागिरी गावात मच्छिंद्राने गोरक्षनाथास उपदेश करून सर्व वेदशास्त्रांत प्रवीण केले, चौदा विद्याहि त्यास पक्क्या पढविल्या; सकल अस्त्रात वाकब केले, साबरी विद्या शिकविली व सर्व देवाच्या पायांवर त्यास घातले. नरशी, कालिका, म्हंदा, म्हैशासुर, झोटिंग वेताळ, मारुती, श्रीराम इत्यादिकांची दर्शने करविली. जेव्हा रामाची भेट झाली, तेव्हा रामाने गोरक्षनाथास मांडीवर बसवून आशीर्वाद दिले. असो बावन वीरांसहवर्तमान श्रीराम, सूर्य, आदिकरून सर्वांनी गोरक्षास वरदाने दिली व त्यास तपास बसविण्यासाठी मच्छिंद्रनाथास सांगून ते आपापल्या ठिकाणी गेले.
एके दिवशी गोरक्षनाथ संजीवनीमंत्र पाठ करीत बसला होता. जवळ मच्छिंद्रनाथ नव्हता. तो एकटाच त्या ठिकाणी बसला आहे अशा संधीस गावची मुले खेळत खेळत त्याच्या जवळ गेली. ती मुले चिखलाचा गोळा घेऊन आपसात खेळत होती. त्यांनी गोरक्षास चिखलाची गाडी करावयास सांगितले, पण त्याने आपणास गाडी करता येत नाही म्हणून सांगितल्यावर ती मुले आपणच करू लागली. त्यांनी चिखलाची गाडी तयार केली. त्या गाडीवर बसावयासाठी एक गाडीवान असावा असे त्या मुलांच्या मनात येऊन ती चिखलाचा पुतळा करू लागली, परंतु त्यांना साधेना, म्हणून ती एक मातीचा पुतळा करून देण्याविषयी गोरक्षनाथाची प्रार्थना करू लागली. त्याने त्यांची ती विनवणी कबूल केली व चिखल घेऊन पुतळा करावयास आरंभ केला.
गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करील त्यापासून गहिनीनाथाचा अवतार व्हावयाचा, वगैरे संकेत पूर्वी ठरलेला होता. त्या अन्वये त्यास पुतळा करून देण्याची बुद्धि उत्पन्न झाली. नवनारायणांपैकी करभंजन हा अवतार ह्या मातीच्या पुतळ्यापासून व्हावयाचा, म्हणून गोरक्षास तशी बुद्धि होऊन त्याने पुतळा करावयास घेतला. त्या वेळी मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ चालला होता. संपूर्ण पुतळा तयार झाला अशी संधि पाहून करभंजनाने त्यात प्रवेश केला. तेव्हा अस्थी, त्वचा, मांस, रक्त इत्यादि सर्व होऊन मनुष्याचा तेजःपुंज पुतळा बनला. मग तो रडू लागला. हा आवाज जवळ असलेल्या मुलांनी ऐकिला. तेव्हा गोरक्षनाथाने भूत आणिले. असा त्या मुलांनी बोभाटा केला व लागलेच सर्वजण भिऊन पळून गेले. पुढे मार्गात मच्छिंद्रनाथाशी भेट होताच, त्याने त्या मुलास भिण्याचे व ओरड करून लगबगीने धावण्याचे कारण विचारिले व तुम्ही भिऊ नका म्हणून सांगितले. तेव्हा पुतळ्याचा मजकूर मुलांनी सांगितला.
मुलांचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ विस्मयात पडला व काय चमत्कार आहे तो आपण स्वतः डोळ्यांनी पाहावा असे त्याने मनात आणिले आणि मुलांस जवळ बसवून सर्व खाणाखुणा विचारून घेतल्या. मच्छिंद्रनाथास मुलांनी दुरून ठिकाण दाखविले होतेच. तेथून एक मुलाचा शब्द त्यास ऐकू येऊ लागला. तेव्हा हा करभंजन नारायणाचा अवतार झाला, असे मच्छिंद्रनाथाने समजून मुलास उचलून घेतले व तो मार्गाने चालू लागला. गोरक्षनाथाने पुतळा केला असूनहि तो जवळ दिसेना, म्हणून मच्छिंद्रनाथ मुलास घेऊन जात असता, गोरक्षनाथास हाका मारीत चालला. ती गुरूची हाक ऐकून गोरक्ष एका घरात लपला होता तेथून बाहेर आला. पण मच्छिंद्राच्या हातातील मुलास पाहताच त्यालाहि भीति वाटली. त्याची गुरूजवळ येण्यास हिंमत होईना. हे पाहून गोरक्षास भय वाटते असे मच्छिंद्रनाथ समजला. मग त्याने मुलास चिरगुटात गुंडाळून ठेविले व गोरक्षापाशी जाऊन सांगितले की. हा मनुष्य आहे व तो नवनारायणापैकी एक नारायणाचा अवतार आहे. मग गोरक्षानेहि कसा काय प्रकार झाला होता तो सांगितला तेव्हा ते वर्तमान ऐकून मच्छिंद्रनाथास आनंद झाला जसा तू गोवरामध्ये झालास तसाच तू संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा केलास. त्यात करभंजन नारायणाने संचार केला आहे; तो भूत नसून मनुष्य झाला आहे, अशी साद्यंत हकीगत सांगून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाची भीति उडविली मग त्यासहवर्तमान मुलास घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमास गेला तेथे त्याने गाईचे दूध आणून मुलास पाजिले व त्यास झोळीत घालून हालवून निजविले
याप्रमाणे प्रकार घडल्याची बातमी गावभर झाली. तेव्हा गावचे लोक भेटीस जाऊन मुलाची चौकशी करीत तेव्हा नाथहि सर्व वृत्तांत सांगत; तो ऐकून त्यांना नवल वाटे मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करविला ह्यास्तव ब्रह्मदेवाकडून मच्छिंद्रनाथाची योग्यता विशेष होय, असे जो तो बोलू लागला
तेथून पुढे तीर्थयात्रा करीत फिरताना मुलासहि बरोबर नेणार असा मच्छिंद्राचा मानस पाहून, त्यामुळे मुलाची अनास्था होईल मुलाचे आईवाचून संरक्षण व्हावयाचे नाही, म्हणून मुलास कोणाच्या तरी हवाली करा, असे पुष्कळांनी मच्छिंद्रनाथास सुचविले. ते ऐकून, तसे होईल तर फारच चांगले होईल असे नाथाने उत्तर दिले. अशा तर्हेने मच्छिंद्रनाथाचा रुकार मिळाल्यानंतर मुलास कोणाच्या तरी माथी मारावा असा गावकऱ्यांनी घाट घातला. मग मधुनाभा या नावाचा एक ब्राह्मण तेथे राहात होता. त्याची गंगा ह्या नावाची स्त्री महापतिव्रता होती. उभयता संतति नसल्याने नेहमी रंजीस असत व त्यास कोणत्याच गोष्टीची हौस नसे. ती ह्या मुलाचा प्रतिपाळ आस्थेने करतील असे जाणून त्यांच्याबद्दल सर्वांनी मनापासून मच्छिंद्राजवळ शिफारस केली. मग अशा जगन्मान्य स्त्रीपुरुषांच्या हातात गहिनीनाथासारखे रत्न देणे नाथासहि प्रशस्त वाटले. त्याने मुलास गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले की, मातोश्री ! हा पुत्र वरदायक आहे. करभंजन म्हणून जो नवनारायणांपैकी एक त्याचाच हा अवतार आहे. ह्याचे उत्तम रितीने संगोपन कर. तेणेकरून तुझे कल्याण होईल व जगाने नावाजण्यासारखा हा निपजेल; हा पुढे कसा होईल हे मातोश्री, मी तुला आता काय सांगू? पण याचे सेवेसाठी मूर्तिमंत कैलासपति उतरेल. ज्याचे नाव निवृत्ति असेल त्यास हा अनुग्रह करील. याचे नाव गहिनीनाथ असे ठेव. आम्ही तीर्थयात्रेस जातो. पुन्हा बारा वर्षांनी हा आमचा बाळ गोरक्षनाथ येथे येईल, तेव्हा तो ह्यास अनुग्रह करील.
मग मोहनास्त्र मंत्र म्हणून विभूति तिचे अंगावर टाकताच, तिच्या स्तनात दूध उत्पन्न झाले. मग मुलास स्तनपान करविल्यानंतर तिने गावातील सुवासिनी बोलावून मुलास पाळण्यात घालून गहिनीनाथ असे त्याचे नाव ठेविले पुढे मच्छिंद्रनाथ काही दिवस तेथे राहिला व गावकऱ्यांची रजा घेऊन गोरक्षासहवर्तमान तो तीर्थयात्रेस गेला. जाताना गोरक्ष अजून कच्चा आहे असे मच्छिंद्रनाथास दिसून आले. मग त्यास बदरिकेद्वार स्वामींच्या हवाली करून तपास लावावे असे मनात जाणून अनेक तीर्थयात्रा करीत करीत ते बदरिकाश्रमास गेले.
॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥
******************************************
अध्याय ११.
मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्यात गमन, जालिंदरनाथाची जन्मकथा.....
गहिनीनाथास गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास समागमे घेऊन मच्छिंद्रनाथ निघाला. तो तीर्थयात्रा करीत करीत बदरिकाश्रमास शिवालयात गेला. दोघांनी शंकरास नमस्कार केला आणि स्तवन करण्यास आरंभ केला. त्यांची स्तुति ऐकून शंकर प्रसन्न झाला व प्रगट होऊन त्याने दर्शन दिले. मग उभयतास आलिंगन देऊन जवळ बसविले, त्या वेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरविला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथास असे सांगितले की, हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक होईल. कनकगिरीवर तू अभ्यास करून दैवते साध्य करून घेतलीस; श्रीराम, नरसिंह, सूर्य, हनुमंत, कालिका वगैरे वीरांसहवर्तमान भैरवांना बोलाविलेस तेव्हा मीहि आलो होतो. तेव्हापासून माझी व या गोरक्षाची ओळख आहे. तू ह्याचेकडून विद्याभ्यास करविला आहेस खरा, पण त्यापासून विशेष उपयोग व्हावयाचा नाही. ह्याने तप केलेच पाहिजे, यास्तव माझ्या आश्रमामध्ये ह्यास तू तप करण्याकरिता बसव. मग ह्याची विद्या, अस्त्रे ही सर्व फलद्रूप होतील, असा जेव्हा शंकराने मच्छिंद्रनाथास बोध केला, तेव्हा गोरक्षनाथास उत्तम मुहूर्तावर तपश्चर्येस बसविले. मग तो लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर करून फळे, पाला खाऊन तपश्चर्या करू लागला. हे पाहून मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा बारा वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तीर्थयात्रेस जावयास निघाला.
तो अनेक तीर्थे करून शेवटी सेतुबंधरामेश्वराला गेला तेथे रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्रस्नानास गेला असता त्यास मारुतीने नमस्कार केला. त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला. त्यास ह्रदयी धरून जवळ बसविल्यावर मारुती म्हणाला, आज चोवीस वर्षांनी तुझी भेट झाली. मग त्याने तेथे नाथाचे आदरातिथ्य उत्तम प्रकारे केले. पुढे गोष्टी सांगता सांगता योग्य संधि पाहून मारुतीने गोष्ट काढिली की, स्त्रीराज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस; असे असता तू अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस; तर कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतु पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनांतू मोकळा कर. 'मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पुरवील' असे मी तिला वचन देऊन ठेविले आहे. ते पूर्ण केले पाहिजे व तूहि मला मागे वचन दिले आहेस ते पाळण्याची आता ही चांगली संधि आहे, असे हनुमंताने म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ 'ठीक आहे' असे म्हणाले व तीन रात्री तेथे राहून ते दोघेहि स्त्रीराज्यात जाण्यासाठी निघाले.
ते थोड्याच दिवसात तीर्थे करीत करीत स्त्रीराज्यात गेले. त्या राज्यात पुरुष नावाला सुद्धा नव्हता. राज्यपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार पाहाणाऱ्या स्त्रिया आहेत. त्या राज्यकारभार सुयंत्र चालवीत. असो; या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली. तेव्हा तिला आनंद होऊन त्यास कनकासनावर बसविले. मग त्यांची षोडशोपचारानी पूजा करून ती हात जोडून उभी राहिली व हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीची प्रार्थना केली. मारुतीने तिला सांगितले की, तू तप केलेस त्या वेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषयविलासाचे यथेच्छ सुख देईल' म्हणून मी वरदान दिले होते, तोच हा होय. तर आता ह्याच्यापासून तू आपली मनकामना पुर्ण करून घे. या प्रमाणे तिला सांगितल्यावर मारुती तेथे तीन रात्री राहून परत सेतुबंधरामेश्वरास आला व रामाचे भजन करीत बसला.
इकडे मच्छिंद्रनाथ विषयविलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेला. मच्छिंद्रनाथ विषयविलासाचा उपभोग घेत असता काही दिवसांनी राणी गरोदर राहिली. मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले. त्याचे नाव मोठ्या आवडीने 'मीननाथ' असे ठेविले. इकडे कुरुकुळात जनमेजय राजापासून सातवा पुरुष जो बृहद्रव राजा, त्याने हस्तिनापुराचे राज्य करीत असता सोमयाग करण्यास प्रारंभ केला. पूर्वी शंकराच्या नेत्राच्या प्रळयाग्नीने मदन जाळीला होता. तो अग्नीच्या उदरात वाढत होता. त्यात अंतरिक्षनारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकिला. पूर्णाहुति झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणांनी हात घातला असता मुलगा हातास लागून त्याचे रडणेहि त्यास ऐकू येऊ लागले. मग पुरोहिताने ही गोष्ट राजास कळविली. त्या मुलास पाहून बृहद्रवा राजास संतोष झाला. त्यास राजाने आपल्या हातात घेतले व त्याचे मुके तो घेऊ लागला. हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळा असे राजास वाटले.
मग राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतःपुरात सुराचना राणिकडे गेला. तिचे रुप देवांगनेप्रमाणे होते. कुरुकुळास तारण्यासाठी साक्षात रमा, सरस्वती किंवा पार्वती अवतरली आहे, असे वाटे. मुलगा कोणाचा म्हणून विचारल्यावर राजाने तिला सांगितले की, हा अग्निनारायणाने प्रसाद दिला आहे; मीनकेत तर तुला एक पुत्र आहेच, त्यास ह्यांचे पाठबळ होईल. हे ऐकताच तिने बालकास आपल्या हाती घेऊन स्तनाशी लावताच दूध उत्पन्न जाले, मग मोठा उत्सव सुरू झाला. बाराव्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला व जालंदर असे त्याचे नाव ठेविले. त्या दिवशी गावात साखर वाटली व याचकांना पुष्कळ द्रव्य दिले. पुढे बृहद्रवा राजाने जालंदरचा व्रत बंध केला. नंतर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले. त्यावरून त्याने धूमीण प्रधानाबरोबर पुरोहितास देऊन उत्तम मुलगी पाहण्यासाठी पाठविले.
प्रधान गेल्यावर धूमीण प्रधान आताशी दिसत नाही, तो कोठे दूर गेला आहे काय, म्हणून जालंदराने एके दिवशी आईस विचारिले असता ती म्हणाली, तुझ्या बापाने तुला बायको पाहावयास त्यास व पुरोहितास पाठविले आहे. तेव्हा बायको कशी असते, असे त्याने तिला विचारल्यावर, माझ्यासारखी बायको असते, म्हणून तिने त्यास सांगितले. ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळावयास गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारिले की, गड्यांनो, माझे आईबाप मला बायको करून देणार आहेत; तर ती कशासाठी करतात ह्याची माहिती तुम्हास असली तर मला सांगा. असे त्याने विचारल्यावर मुलांना त्याच्या अज्ञानाचे फारच नवल वाटले. त्यास त्यानी सर्व कारण उघड करून सांगितले. तेव्हा तो मनात विचार करू लागला की, हे जग परम अधम आहे; जेथून उत्पन्न व्हावयाचे ते स्थान आपण वर्ज्य करावे व अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये, असे मनात आणून तो अरण्यात निघाला. गावाच्या सीमेवर रक्षक होते त्यांनी त्यास पाहिले; पण राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यास कोठे जातोस म्हणून विचारिले नाही. मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट त्यांना राजास कळविली. ती ऐकताच राजा घाबरून धावत आला व तोहि अरण्यात शोध करू लागला. अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक एकसारखे त्यास धुंडीत होते; पण पत्ता लागला नाही. मग निराश होऊन सर्व मंडळी घरोघर गेली. नंतर मुलाच्या वियोगाने राजास व राणीस अतिशय दुःख झाले. ती उभयता त्याचे गुण आठवून शोक करू लागली.
इकडे जालंदर अरण्यात निजला असता रात्रीस वणवा लागला. मग गवत पेटत पेटत अग्नि अगदी जवळ आला; त्या अग्नीने मुलास ओळखले. मग चांगल्या ठिकाणी ह्यास सोडिले असता हा अशा स्थितीत येथे कसा आला म्हणून तो चिंतेत पडला तेव्हा अग्नीने मूर्तिमंत्र प्रगट होऊन त्यास जागृत केले आणि मांडीवर बसवून येथे येण्याचे कारण विचारिले. तेव्हा तू कोण आहेस असे जालंदराने अग्नीला विचारिले असता तो म्हणाला, मी तुझी आई व बाप आहे; मला अग्नि म्हणतात. मग तू माझा आईबाप कसा म्हणून उलट त्याने त्यास विचारल्यावरून अग्नीने त्यास सविस्तर जन्मकथा सांगितली.
॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥
*******************************************************
अध्याय १२.
जालंदरनाथास वरप्राप्ति; कानिफनाथ जन्मकथा व त्यास वरप्राप्ति ....
अग्नीने जालंदरास त्याच्या जन्माची सविस्तर कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता हेतु आहे तो निवेदन कर. असे अग्नीचे भाषण ऐकून जालंदरनाथ म्हणाला की, तू सर्व जाणत आहेस, मी सांगितले पाहिजे असे नाही; तरी सांगतो ऐकावे. हा नरदेह प्राप्त झाला आहे, त्या अर्थी ह्याचे काही तरी सार्थक होईल असे कर. नाही तर जन्मास येऊन न येऊन सारखेच, असे मात्र होऊ देऊ नको. माझी कीर्ति त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईन असे कर. असा जालंदराचा मानस पाहून अग्नीला परमानंद झाला व त्याने त्याची वाहवा केली.
मग हा जालंदर सर्वापेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नि त्यास घेऊन दत्तात्रेयाकडे गेला. उभयतांच्या मोठ्या आदरसत्काराने भेटी झाल्या. नंतर दत्तात्रेयाने अग्नीला विचारले की, आज कोणता हेतु धरून येणे झाले आहे व हा बरोबर दुसरा कोण? तेव्हा अग्नीने दत्तास वृत्तांत निवेदन केला की, शंकराच्या देहातला काम म्या जाळिला, तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेविला होता. मग बृहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात या जालंदरनाथाच्या देहास निर्माण केले. ह्यास तुमच्या पायांवर घालितो, याचे तुम्ही संरक्षण करावे. व ह्यास अनुग्रह देऊन सनाथ करून चिरंजीव करावे. मग दत्तात्रेयाने सांगितले की, मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतुप्रमाणे तयार करीन, परंतु ह्यास येथे बारा वर्षेपर्यंत ठेविले पाहिजे. हे ऐकून जालंदराला दत्तात्रेयाजवळ ठेवण्यास अग्नि कबूल झाला. शेवटी दत्ताने जालंदरास मांडीवर बसवून त्याच्या मनातील विकल्प घालविण्याचा प्रयत्न चालविला. वरदहस्त मस्तकावर ठेविताच त्याच्या अज्ञानपणाचा भ्रम निरसन होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले. नंतर अग्नि दत्तास नमस्कार करून गुप्त जाला. मग जालंदरास बरोबर घेऊन दत्तात्रेय नित्य फिरे. तो नित्य भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेई. व कोल्हापुरास भिक्षा मागून पांचाळेश्वर भोजन करी. असो, अशी बारा वर्षे दत्त समागमात काढून नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रविद्येत जालंदर निपुण झाला. तसाच तो सर्व वेद, शास्त्रे, पुराणे, व्याकरण वगैरे सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाला.
अशा रितीने परिपूर्ण झाल्यानंतर दत्ताने दैवतांची आराधना केली. व ती सर्व दैवते जालंदरास वर देण्यासाठी खाली उतरली. मग अग्नीने तेथे येऊन व जालंदरास सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शित केला. तेव्हा दत्तात्रेयाने अग्नीस सांगितले की, आता हा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला. आता दैवते प्रसन्न करून घेतल्यावर त्यास भेटवून त्यांच्यापासून वर देववावे. हे ऐकून अग्नीने त्यास खांद्यावर बसवून त्रिभुवनातील दैवते दाखविली मागे मच्छिंद्रनाथाचे ज्या दैवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते, त्याच दैवतांनी जालंदरास वर दिले. नंतर जालंदराने बदरिकाश्रमास जाऊन तेथे बारा वर्षे तप केले व कसोटीस उतरल्यावर सर्व देवांनी माना डोलविल्या. नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा, विष्णु, महेश आदिकरून सर्व आलेले देव आपापल्या स्थानी संतोष पावून गेले.
पुढे बदरिकाश्रमी बदरिनाथाने (शंकराने) अग्नीस व जालंदरनाथास आपल्याजवळ तीन रात्री ठेवून घेतले. त्या वेळी सत्यलोकात घडून आलेली विपरीत कथा शंकराने त्यास सांगितली ती अशी - ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षांची असता तिचे रूप व अवयवांचा नीटनेटकेपणा पाहून ब्रह्मदेवास कामाने व्याकुळ केले; तेव्हा तो अविचारास प्रवृत्त झाला. तो तिच्या मागे लागला असता धावताना वीर्यपात झाला. तेव्हा वाऱ्याच्या नेटासरसा वीर्यबिन्दु हिमाचलाच्या वनात एक हत्ती होता त्याच्या कानात पडला. त्यात प्रबुद्धनारायणाने संचार केला. ह्या गोष्टीस युगेच्या युगे लोटली. तरी तो हत्ती जिवंत होता. त्याच्या कानातून प्रबुद्धनारायणाचा अवतार-जन्म होईल, त्यास जालंदराने आपला शिष्य करावा. कानापासून जन्म आहे म्हणून 'कानिफा' असे त्याचे नाव पडेल. असे शंकराने सांगताच अग्नि म्हणाला, तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहा, पण तो हत्ती कोठे आहे हे दाखवून द्यावे. एरव्ही ही गोष्ट फार चांगली झाली की, माझ्या मुलास एक पाठबळ झाले.
ह्याप्रमाणे अग्नीने म्हटल्यानंतर जालंदर व अग्नि यास गजस्थान दाखविण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले, तेथे एका पर्वतावर विशाळ हत्ती दिसला. तेव्हा शंकराने सांगितले की, हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवील; तर ह्यास आळवण्यासाठी कोणती युक्ति करावी? तेव्हा जालंदरने हिंमत धरून म्हटले की महाराज ! माझ्या मस्तकावर दत्तात्रेयाने आपला वरदहस्त ठेविला आहे; त्याचा चमत्कार आपण आता पाहाल ! प्रळयकाळचा काळहि जेरीस येऊन उगीच बसेल, मग ह्या हत्तीचा काय हिशेब आहे? असे म्हणून त्याने झोळीतून चिमटीभर भस्म घेतले आणि मोहनीअस्त्राचा मंत्र म्हणून व स्पर्शास्त्र मंत्रून ते भस्म हत्तीवर टाकिले तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज, पण अगदी नरम पडला.
मग जालंदर त्याच्याजवळ एकटाच कानिफास आणावयास गेला. तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की, तुझ्यासारखा धैर्यवान कोणी नाही. तुझ्या कानात दिव्य रत्न निर्माण झाले अहे; आता हे समर्थ प्रबुद्धनारायणा ! तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस, म्हणूण तुझे नाव 'कानिफा' असे ठेविले आहे. आता सत्वर बाहेर ये. जालंदराचे वचन ऐकून कानिफा म्हणाला की, महाराज गुणनिधे ! स्थिर असावे. मग हत्तीच्या कानाच्या भोकाशी येऊन कानिफाने जालंदरास नमस्कार केला; त्या वेळी ती सोळा वर्षांची महातेजस्वी मूर्ति जालंदराने हाताचा आधार देऊन कानातून खाली जमिनीवर घेतली. मग त्यास खांद्यावर बसवून शंकरापाशी नेले व खाली उतरून शंकरास व अग्नीला नमस्कार करावयास सांगितले. हे ऐकून कानिफाने त्यास व जालंदरासहि नमस्कार केला तेव्हा कानिफास शंकराने प्रेमाने मांडीवर बसविले व त्याचे मुके घेतले. पुढे त्यास अनुग्रह देण्याकरिता जालंदराने शंकरास विनंति केली.
अनुग्रह झाल्यावाचून अज्ञानपणाचा मोड व्हावयाचा नाही असे मनात आणून शंकराने सुचविल्याप्रमाणे गुरूचे स्मरण करून जालंदरनाथाने कानिफाच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला. तेणेकरून त्याचे अज्ञान तत्काळ नाहीसे झाले. मग चौघेजण बदरिकाश्रमास गेले. तेव्हा दत्ताने जे काय दिले, ते कानिफास द्यावे असे जालंदरास सांगून अग्नि गुप्त झाला. तेथे शंकर सहा महिने पावेतो त्यांना भेटत होते. सहा महिन्यात कानिफा सर्व विद्यामध्ये निपुण झाला. पण संजीवनी वाताकर्षण ही दोन अस्त्रे मात्र जालंदराने त्यास सांगितली नव्हती.
कानिफास अस्त्रे, दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकराने जालंदरास सांगितले. मग जालंदराने हात जोडून प्रार्थना केली. की, कानिफा सकल विद्येत निपुण झाला त्यास वर द्यावेत. हे ऐकून सर्व दैवते म्हणाली की, तुला आम्ही वरप्रदान दिले. कारण दत्तात्रेयाने तुला विद्या शिकविली व अग्नीचीहि मीड पडली, यास्तव त्यांचा शब्द मोडवेना म्हणून तुला वरप्रदान मिळाले, पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाहीत. या पुढे तुमचे असंख्य शिष्य होतील, तेवढ्यांना कोठवर वर देत बसावे ! याप्रमाणे बोलून देव विमानात बसून जाऊ लागले. त्या योगाने जालंदरास अति क्रोध आला. तो म्हणाला, माझा अनादर करून तुम्ही निघून आपापल्या स्थानी चाललेत, परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून पाहिला नाही. आताच तुम्हास चमत्कार दाखवितो, असे म्हणून त्याने वातास्त्राची योजना केली. तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागली. मग त्या त्या दैवतांनी आपापली शस्त्रे सोडिली. तितक्यांचे जालंदराने निवारण केले. परंतु हरिहर दुरून हा चमत्कार पाहात होते. जालंदरनाथापुढे अस्त्राचे काही चालत नाही, असे पाहून शस्त्रे घेऊन खाली उतरण्याचा दैवतांनी निश्चय केले. त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन ते महीवर उतरले.
त्या समयी जालंदराने कामिनीअस्त्र सोडिले; तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या. नंतर त्याने कामास्त्राची प्रेरणा केली. तेणेकरून देव कामातुर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले. त्यांच्यावर स्त्रिया आपले नेत्रकटाक्षबाण सोडीत होत्याच. त्या पुढे पळत व देव त्यांची विनवणी करीत पाठीमागून जात; असे करीत त्या बोरीच्या वनात शिरल्या. त्या स्त्रिया झाडावर चढल्या तेव्हा देवहि चढले इतक्यात स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकताच ते प्रगट होऊन गेले. तेव्हा देवांचे पाय झाडावर चिकटले. कित्येकांची डोकी खाली व पाय वर अशी दशा होऊन ते लोंबू लागले. तेव्हा हरिहर दिसू लागले व आज बरी गंमत पाहावयास मिळाली असे ते बोलू लागले; इतक्यात स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे सोडून घेऊन त्यांस नग्न केले व जालंदरनाथापाशी त्या वस्त्रांचा एक मोठा ढीग केला. मग जालंदरनाथाने कानिफास इषाऱ्याने सर्व देव उघडे झाल्याचे जाणविले. यावरून तो ज्याचे त्यास वस्त्र नेसवू लागला. आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चात्ताप होऊन अतिशय दुःख झाले. त्यास कानिफा म्हणाला, मी गुरूच्या नकळत तुम्हास वस्त्रे नेसवीत आहे, पण ही गोष्ट गुरूना सांगू नका. तो दरएक देवास वस्त्र नेसवून त्याच्या पाया पडे. याप्रमाणे कानिफाची नम्र भक्ति पाहून देव समाधान पावले व त्यानी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिले अस्त्रांत आम्ही सर्वप्रकार अनुकूल असल्याचे कबूल केले. मग जालंदरनाथाने विभक्त अस्त्र सोडले. तेव्हा सर्व देव झाडास चिकटले होते तेथून मुक्त झाले व अस्त्रेभूषणे सावरून जालंदरनाथाजवळ गेले. त्यास त्यांनी नमस्कार केला व अस्त्रामध्ये आम्ही स्वतः प्रगट होऊन साक्षात्कार दाखवू असा कानिफास वर दिल्याबद्दल कळविले. तेव्हा जालंदराने सर्वांस सांगितले की, पुढे मी साबरीकवित्व करणार आहे; त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी साह्य व्हावे. त्यास त्यानी रुकार देऊन वचन दिले व ते सर्व आपापल्या स्थानी गेले. नंतर हरिहर, जालंदरनाथ व कानिफनाथ तीन दिवस बदरिकाश्रमात राहिले.
॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥
*********************************************************
Search
Search here.