श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय १९ ते २४
ग्रंथ - पोथी > श्री नवनाथ भक्तिसार कथा Posted at 2019-02-17 05:54:54
श्री नवनाथ भक्तिसार कथा --- अध्याय १९ ते २४
अध्याय १९
कलिंगा गणिकेबरोबर गोरक्षनाथाचा स्त्रीराज्यात प्रवेश, मारुतीशी युद्ध...
जेव्हा कानिफा व गोरक्ष यांच्या भेटी झाल्या. तेव्हा तू गुरूच्या शोधास का फिरतोस? तुझा गुरु मच्छिंद्रनाथ तर स्त्रीराज्यात मौजा मारीत आहे, असे गोरक्षास कानिफाने सांगितले होते. ते ऐकून गोरक्ष स्त्रीराज्यात जावयास निघाला व त्या सीमेपर्यंत येऊन पोचला. नंतर त्याच्या मनात अनेक विचार येउ लागले. ते तर्क अशा प्रकारचे की, ज्या ठिकाणी गुरुराज आहेत त्या ठिकाणी वैभव काही कमी नसावयाचे; परंतु ख्यालीखुशालीत गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही, हीच भ्रांति आहे. अशा प्रकारचे अनेक तर्क त्याच्या मनात आले.
त्या वेळी कलिंगा या नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह स्त्रीदेशात जात होती. ती रूपवती असून नृत्यगायनात अप्सरा, गंधर्व यांना लाजविण्याइतकी हुशार होती. तिची व गोरक्षनाथाची मार्गात गाठ पडली. मग तो तिच्याजवळ जाऊन तिला तिचे नाव गाव व कोठे जावयाचे हे विचारू लागला. तेव्हा ती म्हणाली, मला कलिंगा असे म्हणतात. मी स्त्रीराज्यात जात आहे. तेथे मैनाकिनी या नावाची स्त्री राज्यकारभार करीत असते. तिला मी आपली नृत्यगायनकला दाखवून वश करून घेणार आहे. तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे ती मला पुष्कळ द्रव्य देईल. ते कलिंगेचे भाषण ऐकून तिच्याच संगतीने गोरक्षनाथाने स्त्रीराज्यात जाण्याचा बेत ठरविला. तिच्याबरोबर आपणास राजगृहात जाता येईल व मच्छिंद्रनाथ गुरूचाहि पक्का तपास लागेल, हा त्याचा विचार होता. त्यावरून त्याने तिच्याजवळ गोष्ट काढिली की, कृपा करून मला समागमे न्याल तर बरे ! माज्या मनातून तुमच्याबरोबर यावे असे आहे. हे ऐकून ती म्हणाली, तुमच्या अंगात कोणता गुण आहे? तेव्हा गोरक्ष म्हणाला, मला गाता येते व मृदंगहि वाजविता येतो. मग तिने त्यास सांगितले की, तुमच्या अंगचा गुण प्रथम येथे दाखवा. तेव्हा त्याने आंब्याच्या झाडाखाली बसावयास घातले व तिने सारंगी-मृदंग वगैरे सर्व साज त्याच्या पुढे आणून ठेविले.
मग गोरक्षनाथाने गंधर्वप्रयोगमंत्र म्हणून भस्म कपाळावर लाविले व ते चोहीकडे फेकून गावयास बसला. तेव्हा झाडे, पाषाण ही सुद्धा सुस्वर गायन करू लागली व वाद्ये वाजू लागली. हा चमत्कार पाहून कलिंगेने तोंडात बोट घातले. तिला तो त्या वेळी शंकरासारखा भासू लागला. जो मनुष्य झाडे; दगड यांच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करवीत आहे, त्याला स्वतः उत्तम गाता, वाजविता येत असेल ह्यात आश्चर्य कोणते? त्याच्या अंगचा गुण पाहून तिला अत्यानंद झाला व आपण त्याच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यास म्हणाली की, महाराज ! गुणनिधे! आपल्यापुढे माझी काहीच प्रतिज्ञा चालावयाची नाही. असे बोलून ती त्याच्या बद्दल सर्व विचारपूस करू लागली. तेव्हा गोरक्षनाथ गहन विचारात पडला. त्याने तिला नाव न सांगण्याचा बेत केला. कारण त्याचा पुढील कार्यभाग साधावयासाठी याला नाव गुप्त ठेवावयास पाहिजे होते. यास्तव त्याने तिला पूर्वडाम असे आपले नाव सांगितले. मग तिने तुमच्या मनात कोणता हेतु आहे, म्हणून विचारिले. त्यावर तो म्हणाला, विषयसुखाविषयी मी अगदी अज्ञानी आहे व ते मला नको; पण पोटाला मात्र एक वेळेस घालीत जा. ह्यावाचून माझी दुसरी काहीच इच्छा नाही. गोरक्षनाथाचे ते भाषण ऐकून कलिंगा म्हणाली, महाराज ! आपण म्हणता त्याप्रमाणे तजवीज होईल. पण मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात स्त्री राज्यात जावयाचे आहे, पण त्या देशात पुरुषाचे जाणे होत नाही. ते ऐकून पुरुष तेथे न जाण्याचे कारण गोरक्षाने तिला विचारिले. तेव्हा ती म्हणाली, मारुतीच्या भुभूःकाराच्या योगाने सर्व स्त्रिया गरोदर होतात, त्यात पुरुषाचा गर्भ मरतो व स्त्रियांचा जगतो. कोणी मोठा पुरुष का जाईना, तो तेथे मरावयाचाच ! ह्यास्तव तेथे तुमचा कसा निभाव लागेल, ह्याचा मला मोठा संशय आहे. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, मारुती मला काय करणार आहे? त्याच्या भुभुःकारापासून मला काही एक इजा व्हावयाची नाही. तू हा संशय मनात अजिबात आणू नको, असे बोलून तो तेथून उठला. मग कलिंगा रथात बसल्यावर गोरक्षनाथ तिचा सारथी झाला. व त्याने घोड्याचे दोर हातात धरिले, प्रथमारंभी त्याने वज्रास्त्र, स्पर्शास्त्र, मोहनास्त्र व नागास्त्र यांची योजना केली. त्याने त्यास बिनहरकत स्त्रीराज्यात प्रवेश करता आला. पुढे अस्तमान झाल्यामुले ते चिन्नपट्टण गावी वस्तीस राहिले. तेथे भोजन झाल्यानंतर सर्वांनी शयन केले. नंतर सुमारे प्रहर रात्रीस अंधार नाहीसा होऊन स्वच्छ चांदणे पडले.
इकडे मारुती सेतुबंध रामेश्वराहून स्त्रीराज्यात जावयास निघाला तो सीमेवर येताच गोरक्षानाथाने भारून ठेविलेल्य चार अस्त्रातून प्रथम वज्रास्त्र येऊन उदरात बसले. एवढा वज्रशरीरी मारुती, पण त्या अस्त्राच्या झपाट्यासरसा मूर्छित होऊन धाडकन जमिनीवर पडला. तेव्हा स्पर्शास्त्राने त्यास जमिनीवर खिळवून टाकिले, तेणेकरून त्यास हलता चालता येईना. त्यानंतर मोहिनीअस्त्राचा अंमल बसला. शेवटी नागास्त्रामुळे प्रत्यक्ष शेष येऊन त्यास वेढा देऊन बसला. नागास्त्राच्या वेष्टणाने मारुती फारच विकल होऊन पडला. अशा चारी अस्त्राचा त्याजवर मारा झाल्याने त्याचे काही चालेनासे झाले तो काही वेळाने मरणोन्मुख झाला व आपण आता वाचत नाही असे त्यास वाटू लागले. तो वारंवार सावध होई व बेशुद्ध पडे, आता अंतकाळी श्रीरामाचे स्मरण करावे असा विचार करून त्याने श्रीरामचंद्राचे स्तवन केले. त्यामुळे श्रीराम तत्काळ धावून गेले व मारुतीची ती कठीण अवस्था पाहून त्यांना कळवळा आला. मग रामाने पाकशासन (इंद्र) अस्त्राच्या योगाने वज्रास्त्र काढून घेतले. विभक्तास्त्राच्या योगाने स्पर्शास्त्राचेहि निवारण केले व शेषास काढून घेऊन मोहिनीअस्त्राचेहि निवारण करून रामाने मारुतीस त्या संकटातून सोडविले.
मग मारुती सावध होऊन रामाच्या पाया पडला व हात जोडून म्हणाला की रामा ! अशी प्राण घेणारी ही प्रखर अस्त्रे आहेत. आज माझा प्राण गेलाच होता, पण तू धावत येऊन मला जीवदान दिलेस म्हणून वाचलो. प्रभो ! तुझे उपकार माझ्याने कदापि फिटावयाचे नाहीत. असे म्हणून मारुती रामाच्या पाया पडला. त्यास रामाने पोटाशी धरिले व असा तुला हात दाखविणारा शत्रु कोण आहे म्हणून विचारले. तेव्हा मारुती म्हणाला, सांप्रतकाळी माझ्याशी शिरजोरपणा दाखविणारा क्षत्रिय कोणी राहिलेला नाही, परंतु नाथपंथाचे लोक तूर्त प्रबळ झालेले आहेत. त्या नऊ नाथांपैकी कोणी येथे आला असावा. आजकाल ते अजिंक्य असून पृथ्वीवर निर्धास्तपणे संचार करीत आहेत. ते मारुतीचे भाषण ऐकून रामाने त्यास सांगितले की, नाथपंथाचे लोक हल्ली प्रबळ झाले असून ते अनिवार आहेत. परंतु ते माझे पूर्ण भक्त आहेत व माझी त्याजवर पूर्ण कृपा आहे, यास्तव तू आपल्या बळाचा अभिमान मिरवून त्यांच्या वाटेस जाऊ नको. असा मारुतीला बोध करून कोणत्या नाथाचे हे कृत्य म्हणून अंतर्दृष्टीने पाहिल्यानंतर हे गोरक्षनाथाचे असे रामाच्या ध्यानात आले. मग मारुतीला रामाने सांगितले की, हरिनारायणाचा अवतार जो गोरक्षनाथ तो आला आहे व हा प्रताप त्याचाच आहे.
मग मारुतीने रामाला सांगितले की, त्याने हे संधान करून स्त्री राज्यात संचार केला आहे, त्याच्या दर्शनास चलावे. त्याची भेट घेऊन मला त्याच्यापासून एक मोठे कार्य करून घ्यावयाचे आहे. हे ऐकून त्याच्याशी तुझे असे कोणते काम आहे म्हणून रामाने विचारले असता, मारुतीने मच्छिंद्रनाथाची मूळारंभापासून सर्व हकीगत सांगितली. नंतर तो म्हणाला, त्या मच्छिंद्रनाथास हा गोरक्ष आता घेऊन जाईल. यास्तव त्यास गोड गोड बोलून अनुकूल करून घ्यावे म्हणजे तो त्यास नेणार नाही. तेव्हा रामाने म्हटले की, चल, तुझे काम आहे ह्यास्तव मीही युक्तिप्रयुक्तीच्या दोन गोष्टी सांगेन व होईल तितकी खटपट करीन. असे बोलून दोघेजण निघाले.
ते मध्यरात्रीच्या सुमारास चिन्नापट्टणास जाऊन पोचले. त्या वेळी सर्वत्र सामसूम झाली होती. हे दोघे ब्राह्मणाचे रूप घेऊन गोरक्षनाथाजवळ गेले. त्या वेळेस तो निवांत ध्यान करीत बसला होता. त्यास नमस्कार करून हे दोघेजण त्याच्याजवळ बसले. मग आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहोत, असे बोलून गोरक्षनाथाची पुष्कळ स्तुती करू लागले. नंतर आमच्या मनात एक हेतु आहे, तो पूर्ण करावा. असे मारुतीचे भाषण ऐकून कोणते काम आहे ते कळवावे म्हणून गोरक्षनाथाने त्यास विचारले. त्या वेळी ते म्हणाले, मी कार्य करून देतो, असा प्रथम भरवसा देऊन वचन द्या, म्हणजे आमचा हेतु सागू. हे ऐकून गोरक्षनाथाने मनात आणिले की, हे मजपाशी काय मागणार आहेत? शिंगी, सारंगी, कुबडी, फावडी, शैली, भोपळा ही काय ती संपत्ति आमच्याजवळ आहे. ह्यावाचून आमच्यापाशी तर काही नाही. असे असता हे आमच्या जवळ काय मागणार नकळे ! असा विचार करीत असता दुसराहि एक विचार त्यांच्या मनात आला की, आता मध्यरात्र उलटून गेली असता या वेळी ह्या स्त्रीराज्यात पुरुष आले कसे? तर हे सहसा मनुष्य नसावे, कोणीतरी स्वर्गात राहणारे देव असावे. अशी त्यांच्याबद्दल अटकळ करून मग त्यांच्याकामाबद्दल विचार करून पाहू लागला, तो काहीच त्याच्या लक्षात येईना मग आपण ज्या कामासाठी आलो त्याखेरीजकडून त्यांचे म्हणणे कबूल करण्यास हरकत नाही, असा विचार करून तो त्यांना म्हणाला की, महाराज ! आपण विप्र म्हणता, पण येथे येण्याची त्यांची छाती नाही; तरी आपण कोण आहा हे मला प्रथम सांगा. असे बोलून त्याने लीनतेने त्यांच्या पायावर मस्तक ठेविले. तेव्हा ह्यास आता ओळख द्यावी असा रामाने विचार केला. त्यास मारुतीचाहि रुकार मिळाला. मग रामाने आपले स्वरूप प्रगट करून त्यास पोटाशी धरून मच्छिंद्रनाथास न नेण्याबद्दलचा मारुतीचा हेतु त्यास कळविला व मारुतीने मैनाकिनीला वचन दिले आहे म्हणून तू त्याला नेऊ नये, हा ह्याचा हेतु तू पूर्ण कर म्हणून कळविले. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, आम्ही योगी ! आम्हास हे कर्म अनुचित होय; यास्तव हे वगळून दुसरे पाहिजे ते मागा मी देतो, पण या पुढे मच्छिंद्रनाथास येथे ठेवणार नाही हे खचित. आपण या बाबतीत मला अगदी भीड घालू नका म्हणून गोरक्षनाथाने धडकावून उत्तर दिले. तेव्हा मारुतीस राग येऊन तो युद्ध करण्यास तयार झाला. ते पाहून रामाने मारुतीचे सांत्वन करून त्या दोघामध्ये होणारा तंटा मिटवून गोरक्षनाथास पोटाशी धरिले. गोरक्षनाथ रामाच्या पाया पडला. नंतर श्रीराम आणि मारुती आपापल्या स्थानी गेले.
॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥
************************************************************
अध्याय २०
मैनाकिनीचे पूर्वचरित्र, गोरक्षनाथाचे तबलावादन व गुरु मच्छिंद्रनाथाची भेट...
पुढे मारुतीने लहान रूप धारण केले व श्रृंगमुरुडास जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला. त्यावेळी राणी पद्मिणी (मैनाकिनी) आपल्या मंचकावर स्वस्थ निजली होती. तिच्या दासी वगैरे दुसरे कोणी जवळ नाही, असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला. त्याने राणीचा हात धरिला, तेव्हा ती जागी झाली व मारुती तिच्या दृष्टीस पडला. त्यासरसे तिने त्याच्या पायांवर मस्तक ठेविले. असो.
त्या राणीला तिलोत्तमा, मैनाकिनी व पद्मिणी अशी तीन नावे होती ही तीन नावे पडण्याची कारणे अशी की, सिंहलद्वीपामध्ये पद्मिणी स्त्रियात ही मैनाकिनी स्त्री फारच सुंदर होती. तिच्यासारखी रूपवती दुसरी नव्हती. एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहात असता, त्यावेळी विमानात बसून जात असलेल्या वसूचे धोतर एके बाजूस होऊन विषयदंड विमानाच्या गवाक्षद्वारातून मैनाकिनीच्या पाहण्यात आला. तेव्हा तिला हसू आले हे पाहून तो तिला म्हणाला, माझ्याविषयी तुला प्रीति उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले आहे. खरोखर तू व्यभिचार कर्म करणारी पापीण आहेस मी तसा भ्रष्ट नाही. सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी आहे. असे असता माझ्या अभिलाषाची इच्छा करून हसतेस तर आताच स्त्रीराज्यात तुझी वस्ती होईल. तेथे तुला पुरुष दिसावयाचा नाही. तो शाप ऐकताच ती त्याची स्तुति करून म्हणाली, महाराज ! चुकून अपराध घडला त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला. जे प्रारब्धी असेल ते बिनतक्रार भोगले पाहिजे हे खरे; परंतु आता इतके तरी करा की मला उःशाप देऊन आपल्या चरणाच्या ठिकाणी जागा द्यावी. ती प्रार्थना ऐकून वसूने उःशाप दिला की, हे पद्मिणी, तुला सांगतो ऐक. स्त्रीराज्यात हल्ली राज्यपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे. ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसशील. आता माझ्या ठिकाणी तुझा हेतु गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुजशी रममाण होईल. त्याच्यापासुन तुला 'मीननाथ' या नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुजपासून दूर जाईल मग तूहि स्वर्गाप्रत येऊन भोग भोगशील हे ऐकताच मैनाकिनीने त्यास विचारिले की, त्या ठिकाणी एकहि पुरुष नसून साऱ्याच स्त्रिया आहेत. मग त्यांना संतति तरी कशी होते? तेव्हा त्याने सांगितले की, वायूचा पुत्र मारुती ऊर्ध्वरेता आहे. त्याच्या भुभुःकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते; पण पुरुषगर्भ मात्र गळून जातो व स्त्रीगर्भ वाढतो.
उपरिक्षवसूने ही माहिती मैनाकिनीला सांगितल्यानंतर, मच्छिंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्यास विचारिले. शिवाय तिने अशी शंका विचारिली की, ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे मच्छिंद्रनथाचे येणे कोणत्या युक्तीने होईल, हे मला कळवावे. ते ऐकून तो म्हणाला, तू आता तप करून मारुतीची आराधना कर म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करील. पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतो ती नीट लक्षात धरून ठेव. ती ही की, ज्या वेळेस मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्या वेळेस तू त्याच्या प्रत्यक्ष अंगसंगाचे मागणे माग. तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास घेऊन येईल. अशा बेताबेताने तुझा कार्यभाग साधून घे. त्या मारुतीविषयी तू कोणत्याहि प्रकारच्या शंका मनात आणू नकोस. तो तुझी मच्छिंद्रनाथाची निःसंशय गाठ घालून देईल. असा वर देऊन उपरिक्षवसू आपल्या स्थानाप्रत गेला.
त्यानंतर मैनाकिनीने स्त्रीराज्यातील शृंगमुरुड नामक शहरात प्रवेश केला. तेथे ती एका चांभाराच्या घरी गेली व ओटीवर बसली. तेव्हा घरधणीन तिची चौकशी करू लागली असता तिने आपली मूळकथा सांगितली. ती अशी की, मी सिंहलद्वीपी राहात असते, पण उपरिक्षवसूचा शाप झाला म्हणून या शहरात आले. आता माझा येथे कसा निभाव लागेल हे माझे मलाच कळत नाही. हे ऐकून चांभारणीने सांगितले की, तू मला कन्येप्रमाणे आहेस. येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवीत जा. मग ती आनंदाने तेथे राहिली. ती दोघींचा स्वयंपाक करू लागल्यामुळे चांभारणीची चूल सुटली. ती तेथे राहून आनंदामध्ये आपली कालक्रमणा करी.
एके दिवशी तिलोत्तमा राणीने प्रधानादि दरबारातील स्त्रियांस सांगितले की, माझा वृद्धापकाळ झाल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा नेम नाही; ह्यास्तव या स्त्रीराज्यपदावर कोणाची स्थापना करावी याचा विचार केला पाहिजे. तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले की, हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठवावे. व तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे. ही युक्ति तिने आनंदाने मान्य केली. मग एका सुमुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठविले. त्याने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली. त्यावरून तिला राजवाड्यात मोठ्या थाटाने नेऊन सिंहासनावर बसविले. मैनाकिनीस राज्य प्राप्त झाल्यानंतर तिने मोठे तप केले. तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला वगैरे इतिहास मागे विदित केलाच आहे. ती सिंहलद्वीपामध्ये असता, तिच्या आईबापांनी आवडीने तिचे 'मैनाकिनी' असे नाव ठेविले होते. ती सिंहलद्वीपातील स्त्री पद्मिणी असल्याने लोक तिला त्याच नावाने हाक मारीत. तिला तिलोत्तमाचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला तिलोत्तमा असेही म्हणत. अशी ही तिची तीन नावे प्रसिद्ध झाली; असो.
मारुतीने मैनाकिने राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला की, मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला, परंतु तो आता येथे फार दिवस राहणार नाही. का की, मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्यास घेऊन जाण्यासाठी येथे येत आहे; तो सर्वांना अजिंक्य आहे, मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केला. श्रीरामानेहि सांगून पाहिले. परंतु आम्हा उभयतांचे त्याने ऐकिले नाही. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मारुती स्पष्ट बोलला. तसेच, मारुतीने मैनाकिनीस सांगितले की, गोरक्षनाथ आता येईल, त्यास हरयुक्तीने येथे रमीव. पण तो विषयासक्त नाही हे लक्षात ठेव आणि जसे होईल तसे करून त्यास तुझ्या छापेत आण इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकिनी चिंतेत पडली.
इकडे गोरक्षनाथ कलिंगा वेश्येसमागमे शृंगमुरुडास जाऊन पोचला. ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती. तेथून ती वेश्या आपला सारसरंजाम बरोबर घेऊन राजवाड्यात जावयास निघाली. तिच्या समागमे पाच सात जणी होत्या. तिने आपण आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाळास सांगितले. त्यांनी तो निरोप राणीस कळविल्यावर तिच्या बरोबरीच्या मंडळीसुद्धा कचेरीत आणावयाचा राणीने हुकूम दिला. त्यावरून ती सभेमध्ये गेली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकिनी होती. त्यांच्या तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या कलिंगेने दरबारात आल्यावर पद्मिणी राणीस सांगितले की, आपली कीर्ति ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ऐश्वर्य पाहून समाधान पावले. तिने त्या वेळी पद्मिणीची फारच स्तुति केली. नंतर त्याच रात्रीस कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरविल्यावर कलिंगा आपल्या बिर्हाडी गेली.
त्या समारंभाकरिता मैनाकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगेला आणावयाला पाठविले. तेव्हा ती आपला साजसरंजाम घेऊन जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून गोरक्षनाथहि तिजसमागमे जाण्यास निघाला जाण्यापूर्वी त्याने तिला एकांती बोलावून सांगितले की, मृदंग वाजवावयास मला दे; तो मी इतक्या कुशलतेने वाजवीन की, मच्छिंद्रासह राणीस खूशच करीन. त्या वेळी लागेल तितका पैसा तू त्यांच्याजवळून मागून घे. परंतु कलिंगा म्हणाली की, मी तुला बरोबर घेऊन गेले असते; परंतु तेथे सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे. तुला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील. ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाला मी स्त्रिच्या रूपाने येतो, यात दोन फायदे आहेत. गुरुची भेट मला व्हावी हे माझे कार्य होईल व तुलाहि पैसा पुष्कळ मिळेल. हे त्यांचे म्हणणे कलिंगेने कबूल केले. मग उत्तम तर्हेने लुगडे नेसून चोळी घालून, वेणीफणी करून व दागदागिने घालून त्याने हुबेहुब स्त्रीचा वेष घेतला. नंतर ती सर्व मंडळी थक्क झाली. उर्वशी सारख्या स्त्रियांनी दासी व्हावे, असे ते अप्रतिम रूप होते. ते पाहून राणी वगैरे मंडळींनी तिची अत्यंत वाखाणणी केली. कलिंगा मुख्य नायकीण, पण तिचेहि गोरक्षाच्या स्त्रीरूपापुढे तेज पडेनासे झाले. त्याने ताल, सूर बरोबर जमवून मृदंगावर थाप दिली. नंतर नाच सूरू झाला. त्या वेळचे कलिंगेचे गाणे ऐकून सर्वांस अत्यानंद झाला.
गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास पाहताच मनात नमस्कार केला व इतके दिवसांनी दर्शन झाल्याने आपण कृतार्थ झालो असे त्यास वाटले. तेथील नृत्यगायनाचा समारंभ फारच अपूर्व झाला व खुद्द मच्छिंद्रनाथाने मान डोलावून शाबासकी दिली. परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदंग वाजवीत असता, मधून मधून 'चलो मच्छिंदर गोरख आया' असा ध्वनि वारंवार उठवी. तो ऐकून मच्छिंद्रनाथास दचका बसे व गोरक्ष कसा आला ह्या विचारात तो पडे. त्या आवाजाने त्याची मुखश्री उतरून गेली व गाण्यावरून त्याचे मन उडाले. तेव्हा असे होण्याचे कारण पद्मिणीने विचारिले. त्यावरून त्याने तिला गोरक्ष नाथाचा सर्व प्रकार मुळापासून कळविला.
मारुतीने पद्मिणीस गोरक्ष आल्याविषयी सांगितलेली खूण पटताच तीहि खरकन उतरून गेली. तेणेकरून त्या गाण्याच्या आनंदरंगाचा भंग झाला. तरी मैनाकिनी तशीच लक्ष देऊन ऐकत होती. काही वेळाने तिच्याहि श्रवणी तसाच आवाज पडला, मग तिने कलावंतीणीस सांगितले की, आमच्या संग्रही मृदंग आहे तो वाजवून पाहा. त्यावरून तिने तो वाजविला असताहि तोच आवाज निघू लागला. राणीने आपली कलावंतीण वाजवावयास पाठविली. पण तिला 'चलो मच्छिंदर गोरख आया' हे शब्द काढता येईनात; तेव्हा त्या स्त्रीवेषधाऱ्याला (गोरक्षाला) मैनाकिनीने एकीकडे नेऊन खरा प्रकार सांगण्याविषयी प्रार्थना करून गुरूची शपथ घातली. तेव्हा प्रगट होण्याचा हाच योग्य समय आहे असा विचार करून तो तिला म्हणाला की, मी खरोखर स्त्री नव्हे, मच्छिंद्रनाथाचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे. तुझ्या राज्याच्या व्यवस्थेमुळे मी स्त्रीवेष घेतला आहे. ते ऐकून मैनाकिनी त्याच्या पाया पडली. मग रत्नखचित अलंकार व पुरुषांची ऊंची वस्त्रे आणून गोरक्षनाथास दिली. तेव्हा त्याने स्त्रीवेष टाकून पुरुष वेश घेतल्यानंतर ती त्याचा हात धरून त्यास सभेमध्ये मच्छिंद्रनाथाकडे घेऊन गेली. तेथे तिने मच्छिंद्रनाथास खूणेने इषारा केला व सांगितले, तुमच्या भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ येथे आला आहे. प्रारब्ध उदयास आले म्हणून आज हा येथे दृष्टीस पडत आहे ! ह्याच्या योगाने संपूर्ण राष्ट्रास मोठे भूषण आहे. आता माझी सर्व काळजी दूर झाली. राज्याची जोखमदारी आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालवील. हा आता आपला धाकटा भाऊ मीननाथ याचेहि उत्तम संगोपन करील.
अशा प्रकारे मैनाकिनीने त्यास मोहून टाकण्याचा उत्तम घाट घातला. परंतु तो तिचा बेत पाहून गोरक्षनाथास हसू आले. तो तिला म्हणाला, आम्ही शुद्ध वैष्णव लोक; आम्हास हे भूषण काय कामाचे? विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे? असे जरी त्याने बाह्यतः म्हटले तरी मच्छिंद्रनाथ त्याच्या स्वाधीन होईपर्यंत पद्मिणी जसे वागवील तसे वागण्याचा त्याने बेत केला, नंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी मारली व कलिंग नायकिणीस बहुत द्रव्य देऊन निरोप दिला. नंतर गुरूने शिष्यास नवल वर्तमान विचारले. तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्यास कळविली व आता तुम्हास सोडून मी कदापि एकटा राहावयाचा नाही, म्हणून सांगितले. त्या वेळेस मच्छिंद्रनाथानेहि त्याची परोपरीने समजूत करून म्हटले की, तुझ्याविषयी मी निरंतर विचार करीत आहे, पण काय करू? न घडावे त घडून आले. मला मारुतीने गोवून येथे आणून घातले. पण तुझ्यावाचून मला येथे चैन पडत नाही. अशी बहुत प्रकारांनी त्याची तो समजूत करू लागला. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला की, तुमचे शिष्य अनेक आहेत. तुम्ही जाल तेथे दुसरेही पुष्कळ शिष्य कराल, त्या योगाने तुमची माया सर्वाठायी वाटली जाईल, पण मला तर तुम्ही एकटे गुरु आहात,म्हणून माझा सर्वस्वी लोभ तुमच्यावर. जशी माशांना उदकावाचून गति नाही, तद्वत माझा सर्व आधार कायय तो तुम्हीच ! असे भाषण करीत असता गोरक्षनाथाच्या नेत्रावाटे आसवे गळत होती. मग मच्छिंद्रनाथाने त्यास पुष्कळ बोध करून त्याचे समाधान केले. त्या वेळी त्यांची प्रेमाची बरीच भाषणे झाली. नंतर उभयतांनी एके ठिकाणी भोजन केले व एकाच ठिकाणी निद्रा केली. दुसरे दिवशी सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर मीननाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागले.
॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥
************************************************************
अध्याय २१
गोरक्षनाथास मोहविण्याचे मैनाकिनीचे सर्व प्रयत्नि निष्फळ...
मच्छिंद्रनाथानें गोरक्षास तेथें राहवून घेतल्यावर त्याचें मन रमून त्यानें तेथें राहावें म्हणून मैनाकिनीनें अनेक प्रयत्न केले. ती तर आपल्या पुत्राहून त्याच्यावर विशेष प्रेम ठेवूं लागली. तिनें त्याच्या खाण्यापिण्याची, निजण्याबसण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद ठेविली व त्यास कपडालत्ता व दागदागिना हवा तसा उंची वापरावयास देऊं लागली. गोरक्षनाथास अशीं सर्व सुखें मिळत असतांहि त्यास तें गोड लागेना. तो नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे कीं, तिन्ही लोकांत आपण मान्य, अशीं आपली योग्यता असतां ह्या विषयसुखाच्या खाडयांत कां पडत आहां ? तशांत तुम्ही मूळचे कोण आहां, आतां कार्य कोणतें करीत आहां व अवतार घेऊन कोणतें कर्म करावयाचें आहे ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे; यास्तव सर्वसंगपरित्याग करून ह्या काळजींतून मोकळें व्हावें.
अशा प्रकारें गोरक्षानें मच्छिंद्रनाथ गुरुस बरेच वेळां सांगितलें तेणेंकरुन त्यास विरक्तता उत्पन्न झाली. मग मायापाशांत गुंतून न राहतां आपल्या मुलुखास जाण्याबद्दल त्यानें गोरक्षास वचन दिलें; तेव्हां त्यास आनंद झाला. पुढें गोरक्षासमागमें गेल्यावांचून आतां मला सुटका नाहीं, असा आपला विचार मच्छिंद्रनाथानें तिलोत्तमेस कळविला पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाहीं, असेंहि सुचविलें. तेव्हां ती म्हणाली, तुम्ही जर गेला नाहीं तर तो तुम्हांस कसा नेईल ? तें ऐकून, आपण त्यास दिलेलें वचन आणि गोरक्षाबरोबर झालेलें भाषण त्यानें तिला कळविलें आणि म्हटलें, त्याच्याबरोबर गेल्यावांचून सुटका नाहीं व तुझा मोहपाश मला जाऊं देत नाहीं, अशा दुहेई संकटांत मी सांपडलों आहें, आतां ह्यास एकच उपाय दिसतो. तो हा कीं, तूं त्यास आपल्या कुशलतेनें मोहवून टाक. हें ऐकून ती म्हणाली, मीं पूर्वीच उपाय करून पाहिले. त्यांत कोणतीहि कसर ठेविली नाही, परंतु व्यर्थ ! माझ्या बोधानें व करामतीनें कांहीं एक निष्पन्न झाले नाहीं. असें तिचें निराशेचें भाषण ऐकूनहि आणखी एकदां प्रयत्नम करून पाहावयासाठीं मच्छिंद्रनाथानें तिला सुचविलें.
एके दिवशीं गोरक्षनाथानें पद्मिनीपाशीं गोष्ट काढिली कीं, आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेस जातों. तेव्हां तिनें त्यास बोध केला कीं, बाळा, मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजतें. भावाचें तुला पाठबळ आहेच, आतां आम्ही अन्नवस्त्र घेऊन स्वस्थ बसून राहणार. गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती दीन मुद्रेनें असें बोलत असतांहि त्याच्या मनांत दया उत्पन्न झाली नाहीं. उलट तिला त्यानें त्यावेळीं स्पष्ट सांगितलें कीं, आम्हांस त्रैलोक्याच्या राज्याची देखील पर्वा नाहीं; मग तुझ्या या स्त्रीराज्याचा हिशेब काय ? तें तुझें खुशाल भोग. आम्ही योगी. आम्हांस या भूषणामध्यें मोठेसें महत्त्व वाटत नाहीं; यास्तव आम्ही तीर्थाटनास जातों. तेथें सुकृतक्रिया आचरण करून सुखसंपत्ति भोगूं. असें म्हणून तिच्यापाशीं जाण्याकरितां आज्ञा मागूं लागला. तिनें त्यास पुष्कळ समजावून सांगितलें, परंतु तो ऐकेना. सरतेशेवटीं एक वर्षभर तरी, राहावें म्हणून तिनें अतिशय आग्रह केला असतां तो तिला म्हणाला, मला येथें येऊन सहा महिने झाले, यास्तव आतां मी येथें जास्त रहाणार नाहीं. तेव्हां पद्मिणी आणखी सहा महिने राहाण्यासाठीं आग्रह करुं लागली व आतां थोडयासाठीं उतावळी करुं नकोस; मग मी मोठया आनंदानें मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा करावयाची आज्ञा देईन, अशा प्रकारच्या भाषणानें ती त्याची पायधरणी करुं लागली. तिनें इतकी गळ घातल्यामुळें त्याच्यानें तिचें म्हणणे अमान्य करवेना. त्यानें तिला सांगितलें कीं, तुझ्या म्हणण्याप्रमाणें मी आणखी सहा महिने तुझ्याकरितां राहातो. पण त्या मुदतीनंतर तरी आम्हांस जाण्याची तूं कधीं परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळव, म्हणजे ठीक पडेल. मग चैत्र शुद्ध प्रतिपदेस भोजन झाल्यानंतर मी राजीखुषीनें तुमची रवानगी करून देईन, म्हणून तिनें गोरक्षनाथास कबूल केलें. ते सहा महिने हां हां म्हणतां निघून जातील असें मनांत आणून तो तेथें स्वस्थ राहिला.
या गोष्टी कांहीं दिवस लोटल्यानंतर एके दिवशीं मैनाकिनीनें गोरक्षनाथास हांक मारुन जवळ बसविलें. तोंडावरुन हात फिरविला आणि म्हटलें, बाळा, माझ्या मनांत तुझें एकदांचें लग्न करून द्यावें असें आहे ! मग त्या माझ्या सुनेबरोबर हंसून खेळून माझी कालक्रमणा तरी होईल. जी फारच स्वरुपवता स्त्री असेल तिच्याशीं मी तुझा विवाह करीन. लग्नसमारंभहि तुझ्या खुशीप्रमाणें मोठया डामडौलानें करीन. तुम्ही तीर्थयात्रा करून लौकरच परत या. फार दिवस राहूं नका. येथें आल्यावर सर्व राज्यकारभार तूं आपल्या ताब्यांत घे, बाळा, इतकी तूं माझी हौस पुरवलीस म्हणजे झालें. असें बोलून त्यानें मोहजालांत गुंतावें म्हणून ती पुष्कळ प्रकरच्या युक्त्या योजून पाहात होती, परंतु तिच्या भाषणांपासून बिलकुल फायदा झाला नाहीं. त्यानें तिला निक्षून सांगितलें कीं, मला कर्णमुद्रिका या दोन बायका आहेत, आणखी तिसरी करण्याची माझी इच्छा नाहीं व आतां लग्न करणें मला शोभतहि नाही. असा जेव्हां त्यानें तिला खडखडीत जबाब दिला, तेव्हां ती निराश होऊन स्वस्थ बसून राहिली.
नंतर एके दिवशीं गोरखनाथास मोहविण्यासाठीं पद्मिणीनें एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिषानें रात्रीस त्याच्याकडे पाठविली. तिनें सोंगटयाचा पट बरोबर घेतला होता. ती गोरक्षनाथाच्या खोलींत जाऊन त्यास म्हणाली, तुमच्या समागमें आज दोन सोंगटयाचे डाव खेळावे असें माझ्या मनांत आलें आहे. हें ऐकून तोहि तिचा हेतु पुरविण्यास्तव तिजबरोबर खेळावयास बसला. त्या वेळीं तिनें नेत्रकटाक्षांनीं पुष्कळ बाण मारुन त्यास विंधून टाकण्याविषयीं प्रयत्नि केले. पण तो तिच्या नेत्रकटाक्षांस, तिच्या भाषणास व हावभावांस कांहीं एक जुमानीना. शेवटीं तिनें आपल्या मांडया उघडया ठेवून गुह्यभागहि त्याच्या नजरेस पाडला. इतक्या निर्लज्जपणानें ती त्याशीं वागत असतांहि त्याच्या मनांत मुळींच कामवासना उत्पन्न होईना; असें पाहून ती अखेरीस खिन्न झाली व राणीस सर्व वृत्तांत सांगून विन्मुख होऊन परत घरीं गेली. सारांश, मैनाकिनीनें गोरखनाथास राहविण्याकरितां केलेले सर्व प्रयत्नख फुकट गेले.
पुढें पुढें, मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी मीननाथास पोटाशीं धरुन रडत बसूं लागली. त्या वेळीं दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजूत करीत व गोरक्षनाथास आपण वश करुं असा तिला धीर देत; तरी त्यांच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना. अशा रीतीनें ती चिंतेमध्यें दिवस काढीत असतां, पूर्वी ठरलेला वर्षप्रतिपदेचा दिवस येऊन ठेपला. त्या दिवशीं जिकडे तिकडे लोक आनंदांत मौजा मारण्यांत गुंतावयाचे; परंतु त्या दिवशीं सर्व नगरी हळहळूं लागली.
इकडे गोरक्षनाथ शिंगी, फावडी इत्यादि घेऊन मच्छिंद्रनाथास बोलावूं आला. तो त्याच्या पायां पडून निघण्यासाठीं उतावळी करुं लागला. तेव्हां तर मैनाकिनी मोठमोठयानें रडूं लागली. तिनें म्हटलें कीं बाळा, तुम्ही दोघेहि जेवून जा; उपाशीं जाऊं नका. मग स्वयंपाक झाल्यावर गुरुशिष्यांनीं एके पंक्तीस भोजन केलें.
नंतर तिलोत्तमा राणीनें मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढिली कीं, तुम्ही तर आतां जावयास निघालांत तरी मीननाथास घेऊन जाण्याचा विचार आहे कीं नाहीं, हें मला सांगावें. हें ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले कीं, त्याच्याविषयीं जसें तुझ्या विचारास येईल तसें आम्ही करुं. त्याच्याबद्दल तुझें मन आम्ही दुखविणार नाहीं, तेव्हां ती म्हणाली, तुम्हीं मीननाथास आपल्या समागमें घेऊन जावें. आजपर्यंत तुम्ही येथें होतां म्हणून मारुतीच्या भुभुःकारापासून त्याचे संरक्षण झालें. तुम्ही गेल्यानंतर त्याचे येथें रक्षण करणारा कोणी नाहीं. दुसरीहि ह्यांत एक अशी गोष्ट आहे कीं, मला उपरिक्षवसूचा (तुमच्या पित्याचा) शाप आहे. त्याच्या शापास्तव मीं सिंहलद्वीप सोडून येथें आले आहे. शापाचि मुदतहि भरत आली आहे; यास्तव तुम्ही जातांच उःशापाचें फळ मला प्राप्त होईल व तो येऊन मला येथून घेऊन जाईल; मग मीननाथाचें येथें संरक्षण कोण करील ? जर त्यास स्वर्गास घेऊन जावे तर मनुष्यदेह तेथें जात नाहीं, अशा या सर्व अडचणीं लक्षांत आणून माझें मत असें आहे कीं, मीननाथास तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जावें. मग तिच्या मर्जीनुरुप मीननाथास घेऊन जाण्याचा विचार ठरला.
मग भोजन झाल्यानंतर गोरक्षनाथानें निघण्याची घाई मांडिली. मीननाथाकडे पाहून तिलोत्तमेच्या मुखांतून शब्द निघेनासा झाला. तिला गहिंवर येऊन ती एकसारखी रडत होती. तेव्हां तेथील स्त्रियांनीं गोरक्षनाथास वेढून टाकिलें. त्यानें जाऊं नये म्हणून त्या राजवैभवाचें वर्णन करुं लागल्या. निरनिराळ्या दागदागिन्यांचा व कपडयालत्त्यांचा त्याचेपुढें ढीग करून रत्न्खचित अलंकार व भरजरीचे शेलेदुपेटे त्यांनीं त्याचेपुढें आणून ठेविले. तसेंच, आम्ही अवघ्या जणी तुझ्या बटीक होऊं, तुझ्या मर्जीप्रमाणें नटून श्रृंगारुन तुला यथेच्छ रतिसुख देऊं, असा पुष्कळ प्रकारांनीं त्यांनीं त्याला मोहविण्याचा प्रयत्नत केला; पण गोरक्षनाथ त्या सर्वांचा धिःकार करून म्हणाला, आम्हांला सुखसंपत्तीशीं काय करावयाचें आहे ? जमिनीचें आथंरुण आम्हांस फार सुखदायक होतें. अशा प्रकारें बोलून तो लागलाच निघाला. जातांना त्यानें मैनाकिनीस नमस्कार केला, मीननाथास खांद्यावर घेतलें व मच्छिंद्रनाथास बरोबर घेऊन तो गांवाबाहेर गेलां.
ते निघण्यापूर्वी गोरक्षनाथाच्या नकळत आपल्या भांडारातील सोन्याची एक वीट मैनाकिनीनें मच्छिंद्रनाथास दिली होती; ती त्यानें त्यास न कळूं देतां झोळींत ठेविली. वेशीपर्यंत मंडळी त्यांस पोंचवावयास गेली होती तेथें मैनाकिनी मच्छिंद्रनाथाच्या पायां पडली. तिनें गोरक्षनाथास पोटाशीं धरिलें व त्यास नाथाची बरदास्त ठेवून त्याच्या जिवास जपण्याविषयीं पुष्कळ सांगितलें, तरी पण तिचा मायामोह सुटेना. तिनें गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी घातली आणि मोठमोठयानें रडूं लागली. मग त्या प्रसंगांतून निसटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा हात धरुन सपाटयानें चालूं लागला.
इकडे तिलोत्तमा (मैनाकिनी) ऊर बडवून व डोकें आपटून घेऊं लागली व गायीसारखा हंबरडा फोडून शोक करुं लागली. तो शोक उपरिक्षवसूनें आकाशांतून ऐकतांच विमान घेऊन तो तिच्याजवळ आला व तिला तिच्या घरीं घेऊन गेला. तो म्हणाला, तुला वेड तर लागलें नाहीं ना ? तूं हें मांडिलें आहेस काय ? तूं स्वर्गांतील राहणारी असून शाप मिळाल्यामुळें येथें आलीस. आतां शापमोचन होऊन तूं सुखी होणार ! असें बोलून त्यानें तिच्या अंगावर हात फिरवून तिला पोटाशीं धरिलें व तिचे डोळे पुसून तिला घरीं नेल्यानंतर युक्तिप्रयुक्तीनें बोध केला.
॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥
************************************************************
अध्याय २२
मच्छिंद्रनाथ व राणी मैनाकिनीची भेट; गोरक्षनाथाची संशयनिवृत्ति...
गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर तिलोत्तमा (मैनाकिनी) शोकसागरांत बुडून गेली असतां तेथें उपरिक्षवसु प्राप्त झाला. त्यानें तिला घरीं नेऊन बोध केला आणि तिचा भ्रम उडविला. त्या समयीं तो म्हणाला, या जगांत जें सर्व दिसतें तें अशाश्वत व नाशिवंत आहे. म्हणून शोक करण्याचे काहीं एक कारण नाहीं. तूं जेथून पदच्युत झाली होतीस, त्या स्वर्गांतील सिंहलद्वीपीं आता चल. बारा वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथास भेटवीन. गोरक्षनाथ व मीननाथ हेहि समागमें राहतील. आतां हा योग कोणत्या कारणानें घडून येईल म्हणून तुला संशय असेल, तर सांगतो ऐक. सिंहलद्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करील. त्या वेळेस तेथें विष्णु , ब्रह्मदेव, शंकर आदिकरुन श्रेष्ठ देवगण येतील, नवनाथहि येतील. ह्यास्तव आतां शोकाचा त्याग करून विमानारुढ होऊन सिंहलद्वीपांत चल. तेव्हां ती म्हणाली. इंद्र यज्ञ करो अगर न करो; पण मच्छिंद्रनाथाची भेट करविण्याचें आपण मला वचन द्यावे, म्हणजे माझा जीव स्वस्थ होईल. तें ऐकून त्यानें मच्छिंद्रनाथाची भेट करवून देण्याबद्दल वचन दिलें. मग त्याच्या आज्ञेनें मैनाकिनी दैर्भामा नांवाच्या आपल्या दासीस राज्यावर बसवून आपण स्वर्गी जावयास निघाली. मैनाकिनीच्या जाण्याचे सर्व स्त्रियांना परम दुःख झालें. तरी जातांना तिनें सर्वांची समजूत केली व दैर्भामेस, नीतीनें राज्य चालवून सर्वांना सुख देण्यासाठीं चांगला उपदेश केला. नंतर मैनाकिनीस विमानांत बसवून सिंहलद्वीपास पोंचविल्यावर उपरिक्षवसु आपल्या स्थानीं गेला. अशा रीतीनें मैनाकिनी शापापासून मुक्त झाली.
इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गौडबंगाल्यांत आले. येतांना वाटेंत कानिफनाथाची गांठ पडली.तेव्हां आपल्या गुरुचा शोध ह्या कानिफानें पक्क्या खाणाखुणा सांगितल्यामुळें लागला, असें मनांत आणून गोरक्ष मीननाथास खांद्यावरुन खालीं उतरवून कानिफनाथाच्या पायां पडला. भेटतांना डोळ्यांतून अश्रू वाहूं लागले. मग मच्छिंद्रनाथानें त्यास रडतोस कां, म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथानें बदरिकेदार सोडल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्या वेळेपर्यंतचा सर्व मजकूर निवेदन केला. मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाचें समाधान करून पुढें मार्गस्थ झाले. जाण्यापूर्वी जालंदरनाथास राजा गोपीचंदानें खांचेंत पुरल्याबद्दलचा सविस्तर मजकूर गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथास कळविला. जालंदरनाथास घोडयाच्या लिदींत पुरल्याची हकीगत ऐकतांच मच्छिंद्रनाथास अनिवार क्रोध येऊन तो गोपीचंदाच्या नाशास प्रवृत्त झाला. नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीचे नगर हेळापट्टण येथें येऊन पोंचले. तेव्हां कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यांस भेटली. त्यांच्यापाशीं शोध करितांना कानिफानें जालंदरास वर काढिल्याची, गोपीचंदास अमर करविल्याची व मुक्तचंदास राज्यावर वसविल्याची सविस्तर बातमी त्यांनीं सांगितली. ती ऐकून मच्छिंद्रनाथाचा कोप शांत झाला. मग हल्लीं येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधानानें चालत आहे म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर, मैनावतीच्या मार्फत तो चालतो, असें सांगून लोकांनीं तिची स्तुति केली.
मग तिची भेट घेण्याचा उद्देशानें गोरक्षनाथ व मीननाथ यांस घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाडयांत गेले. तेथें आपलें नांव सांगून आपली राणीला भेटण्याची मर्जी आहे, ह्यास्तव आपण आल्याची वर्दी देण्यासाठीं दारावरील पहारेकऱ्यास पाठविलें. त्या द्वारपाळानें जलद जाऊन कोणी योगी दोन शिष्यांस घेऊन आला आहे असें मैनावतीस सांगितलें. त्याच्या स्वरुपाचें व लक्षणांचे वर्णन करून हुबेहुब जालंदरनाथाप्रमाणें तो दिसत आहे असेंहि कळविलें. मग प्रधानादिकरुन मंडळी समागमें घेऊन मैनावती त्यांस सन्मानानें मंदिरांत घेऊन गेली व त्यांस सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्यांची तिनें षोडशोपचारांनीं पूजा केली. नंतर आपलें चरण आज घरीं लागल्यानें मी कृतार्थ झालें, वगैरे बोलून तिनें मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुति केली व आदरपूर्वक विचारपूस करुं लागली. त्या समयीं मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले :---
मी उपरिक्षवसूचा मुलगा, मला मच्छिंद्रनाथ असें म्हणतात. सर्व समर्थ दत्तात्रेयानें मला अनुग्रह दिला; त्यांनींच जालंदरनाथास उपदेश केला.तो जालंदरनाथ माझा धाकटा गुरुबंधु होय. त्याची येथें दुर्व्यव्यवस्था झाली असें ऐकण्यांत आल्यावरुन मी येथें क्रोधानें येत होतों, परंतु येथें झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांकडून मला कळला. ह्यावरुन तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडीच होय. तूं जन्मास आल्याचें सार्थक करून घेऊन त्रिलोक्यांत सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलास. बेचाळीस कुळें उद्धरिलीस. धन्य आहेस तूं ! असें नाथानें बहुत प्रकारें तिचें वर्णन केल्यानंतर मैनावती त्याच्या पायां पडली आणि म्हणाली, महाराज ! हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय. बरें किंवा वाईट जसें इच्छावें तसें कल्पतरु फळ देतो; परीस लोखंडाचे सुवर्ण करितो; पण त्या दोहोंपेक्षांहि तुमचें औदार्य अनुपम होय. अशा रीतीनें मैनावतीनें त्याची स्तुति केली आणि पायांवर मस्तक ठेविलें. मग मोठया सन्मानानें त्यांचें भोजन झालें. मच्छिंद्रनाथ तेथें तीन दिवस राहून तेथून निघाले. पुष्कळ मंडळी त्यांस पोंचवावयास गेली होती.
हेळापट्टणाहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीननाथ यांसह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथक्षेत्रास गेले. तेथें तीन रात्रीं राहून तेथून पुढें निघाले. ते फिरत फिरत सौराष्ट्रगांवीं मुक्कामास राहिले. तेथें दुसरे दिवशीं सकाळीं गोरक्षनाथ भिक्षेकरितां गांवांत गेला. त्या वेळी मीननाथें निजला होता. तो उठल्यावर मच्छिंद्रनाथानें त्यास शौचास बसविलें. इतक्यांत गोरक्षनाथ भिक्षा मागून आला. तो येतांच त्यास मीननाथास ’धुऊन’ आणावयास सांगितलें. मीननाथ लहान वयाचा असल्यामुळें त्याचे हातपाय मळानें भरुन गेलेले पाहून गोरक्षनाथास घाण वाटली. तो मनांत म्हणाला, आपणां संन्याशास हा खटाटोप कशाला हवा होता ? अशा प्रकारचे बहुत तरंग मनांत आणून मच्छिंद्रनाथाच्या स्त्रीराज्यांतल्या कृत्यास त्यानें बराच दोष दिला.
त्या रागाच्या आवेशांत गोरक्षनाथ मीननाथास घेऊन नदीवर गेला व तेथें एका खडकावर त्यास आपटून त्याचा प्राण घेतला. नंतर त्याचें प्रेत पाण्यांत नेऊन हाडें, मांस हीं मगरी, मासे यांना खावयास टाकून दिलीं. कातडें मात्र स्वच्छ धुवून घरीं नेऊन सुकत घातलें. त्या वेळीं मच्छिंद्रनाथ आश्रमांत नव्हता. तो परत आल्यावर मीननाथ कोठें आहे म्हणून त्यानें विचारिलें. तेव्हां त्यास धुवून सुकत घातला आहे, असें गोरक्षनाथानें त्यास सांगितलें; पण ह्यांत त्याची बरोबर समजूत पटेना. तो पुनः पुनः मीननाथ कोठें आहे, मला दिसत नाहीं असें म्हणे. मग बाहेर नेऊन वाळत घातलेलें मीननाथाचें कातडें गोरक्षनाथानें दाखविलें. तेव्हां मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथानें धाडकन् जमिनीवर अंग टाकिलें. तो गडबडां लोळून परोपरीनें विलाप करुं लागला; कपाळ फोडून घेऊं लागला. तसेंच एकीकडे रडत असतां त्याच्या एक एक गुणांचें वर्णन करी.
मीननाथासाठीं मच्छिंद्रनाथ शोक करीत आहे, असें पाहून गोरक्षनाथ गुरुजवळ जाऊन म्हणाला, गुरुराज’ तुम्ही असें अज्ञानांत का शिरतां ? तुम्ही कोण, मुलगा कोणाचा आणि असें रडतां हें काय ? विचार करून पाहतां मेला आहे कोण ? नाशिवंतचा नाश झाला, शाश्वतास मरण नाहीं. तुमचा मीननाथ कदापि मरावयाचा नाहीं. शस्त्रानें, अग्निनें, वाऱ्यानें, पाण्यानें किंवा कोणत्याहि प्रकारानें त्याचा नाश व्हावयाचा नाहीं. कारण तो शाश्वत आहे.अशा प्रकारें बोलून गोरक्षनाथ त्याचें सांत्वन करुं लागला. परंतु ममतेमुळें मच्छिंद्रनाथास रडें आवरेना व विवेकहि आवरेना. मग गोरक्षनाथानें संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिमटी मीननाथाच्या कातडयावर टाकताच तो उठून उभा राहिला. त्यानें उठतांच मच्छिंद्रनाथाच्या गळ्यांत मिठी मारली. त्यानें त्यास पोटाशीं धरिलें. त्याचे मुके घेतले व त्याच्याशीं लडिवाळपणानें बोलूं लागला. मग आनंदानें ते त्या दिवशीं तेथेंच राहिले.
दुसरे दिवशीं ते पुनः मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढिली कीं, तुमची शक्ती अशी आहे कीं, निर्जीवास सजीव करून सहस्त्रावधि मीननाथ एका क्षणांत तुम्ही निर्माण कराल. असें असतां रुदन करण्याचें कारण कोणतें तें मला कळवावें. तुमचें हें वर्तन पाहून मला आश्चर्य वाटलें. असें गोरक्षनाथाचें भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले कीं, त्यास तूं कोणत्या हेतुवस्तव मारिलेंस, तें कारण मला सांग. तेव्हां तो म्हणाला, तुमचा लोभ पाहावयासाठीं ! तुम्ही विरक्त म्हणवितां आणि मीननाथावर इतकी माया, ममता धरिली. म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे. हें पाहावयासाठींच ती मीननाथास मारिलें. पण तुम्ही सुज्ञ असून रडूं लागलेत हें कसें, तें सांगावें. तेव्हां मच्छिंद्रनाथ म्हणाला, आशा, तृष्णा इत्यादिकांचा तुझ्या अंगी कितपत वास आहे, हें पाहण्यासाठींच मीं मुद्दाम हें कौतुक करून दाखविलें. तसेंच ज्ञान, अज्ञान, शाश्वत, अशाश्वत, हें तुला कळलें आहे कीं नाहीं याचा मला संशय होता; तो मी या योगानें फेडून घेतला. ते भाषण ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप, असें गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथास सांगून त्याच्या पायांवर मस्तक ठेविलें.
॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥
************************************************************
अध्याय २३
मच्छिंद्रनाथास सोन्याच्या विटेचा मोह, समाराधना, गहिनीनाथास गोरक्षाचा उपदेश...
मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावांहून निघाले ते मार्ग क्रमीत तैलंगणांत गेले. तेथें त्यांनीं गोदेचे संगमीं स्नान करून श्रीशिवाचें पूजन केलें. पुढें आंवढयानागनाथ, परळीवैजनाथ आदिकरुन तीर्थे केल्यावर महारण्यांत गर्भागिरी पर्वतावर जे वाल्मीकिऋषीचें स्थान आहे, तेथें ते आले. तें अरण्य महाभयंकर, वाट देखील धड उमगेना; अशा त्या घोर अरण्यांतून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळें मच्छिंद्रनाथ भिऊन गेला. त्याचें कारण असें होते कीं, स्त्रीराज्यातून निघतांना त्यास मैनाकिनी राणीनें जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजूं देतां त्याने झोळींत ठेविली होती. ती वीट चोर नेतील या धास्तीनें त्याच्या जिवांत-जीव नव्हता. ही सर्व भीति गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठींच होती, नाहीं तर मच्छिंद्रनाथास भीति कशाची असणार ! तो मार्गात चालत असतां गोरक्षास विचारी कीं, ह्या घोर अरण्यांत चोरांची धास्ती तर नाहीं ना ? हें ऐकून गुरुला चोराचें भय कशासाठीं असावें, ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनांत उत्पन्न झाली. गुरुजवळ कांहीं तरी वित्त असलें पाहिजे व तें चोर लुटून नेतील ही भीति त्यांना आहे, असा त्यानें तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा, असा मनांत विचार करून तो कांहीं उत्तर न देतां तसाच मुकाटयानें चालत होता. इतक्यांत त्यांस एक पाण्याचें ठिकाण लागलें तेथें मच्छिंद्रनाथानें गोरक्षास अंमळ थांबावयास सांगितलें व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला. तेव्हां गोरक्षनाथानें गुरुच्या झोळींत पाहिलें तों सोन्याची वीट दिसली. तेव्हां हेंच भीतीचें मूळ असें जाणून त्यानें ती वीट फेंकून देऊन तितक्याच वजनाचा एक दगड तींत भरुन ठेविला व आपण चालूं लागला. मच्छिंद्रनाथहि मागून तांतडीनें शौचाहून आल्यानंतर चालूं लागला. गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत होता. त्याची वाट पहात विसांवा घेत बसला, इतक्यांत एक विहीर त्याचे नजरेस पडली. तींत त्यानें स्नान केलें, मीननाथास स्नान घातलें व नित्यकर्म उरकून घेत आहे तो मच्छिंद्रनाथ जवळ आला आणि पूर्ववत् ’येथून पुढें कांहीं भय वगैरे नाहीं ना ?’ असें विचारुं लागला. त्यावर ’भय होतें तें मागें राहिलें, आतां काळजी न वाहतां स्वस्थ असावें’ असें गोरक्षनाथानें उत्तर दिलें.
अशा उडवाउडवीच्या गोष्टी जेव्हां गोरख सांगूं लागला तेव्हां मच्छिंद्रनाथ चकित झाला.मग त्यानें आपणांस वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील, ही मोठी मला धास्ती आहे, म्हणून बोलला. तें ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आतां आपल्याजवळ नाहीं म्हणून भय देखील नाहीं ! हें ऐकून कांहीं तरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनांत उद्भवली व त्यास तळमळ लागली. तेव्हां गोरक्षानें मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयतांनीं आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासतां झोळींत वीट नाहीं असें पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलला व रडून त्यानें एकच गोंधळ केला. त्या दुःखानें तो गडबडां लोळूं लागला व मोठमोठयानें रडून पिशाच्चासारखा चौफेर फिरुं लागला. त्यानें गोरक्षास नाहीं नाहीं तें बोलून शेवटीं निघून जा. तोंड दाखवूं नको, इतकें सुद्धां सांगितलें.
मच्छिंद्रनाथाचे तें काळजास झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्ष उगाच राहिला व त्याचा हात धरुन त्यास पर्वतशिखरावर घेऊन गेला. जातांना पर्वतावर गोरक्षानें सिद्धयोगमंत्र जपून लघवी केली. त्यामुळें तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला. मग लागेल तितकें सुवर्ण नेण्यास त्यानें गुरुस विनंति केली. तें अघटित कृत्य पाहून त्यानें गोरक्षाची वाहवा करून त्यास शाबासकी दिली आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशीं धरुन म्हटलें, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करुं ? अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथानें त्याची पुष्कळ वाखाणणी केली.
गोरक्षानें गुरुच्या बोलण्याचा तो झोंक पाहिला, तेव्हां आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास्तव जपून ठेविली होती तें मला सांगावें, असा त्यानें आग्रह धरिला. तेव्हां मच्छिंद्रनाथ म्हणाला कीं, माझ्या मनांत अशी इच्छा होती कीं, आपल्या देशीं गेल्यावर साधुसंतांची पूजा करून एक मोठी समाराधना घालावी. तें ऐकून तुमचा हा हेतु मी पुरवितों, म्हणून गोरक्षानें त्यास सांगितलें. मग गोरक्षानें गंधर्वास्त्रमंत्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेंकलीं; त्याबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथास वंदन करून काय आज्ञा आहे म्हणून विचारुं लागला. तेव्हां गोरक्षानें सांगितलें कीं, आणखी कांहीं गंधर्वांस बोलाव आणि त्यांना चौफेर पाठवून बैरागी, संन्यासी, जपी, तपी, संतसाधु, देव, गंधर्व, दानव किन्नर या सर्वांस येथें आणावें. कां कीं, आम्हांस एक टोलेजंग जेवणावळ घालावयाची आहे. मग चित्रसेनानें शंभर गंधर्व आणून जिकडे तिकडे पाठविलें. ते गंधर्व पुष्कळांस आमंत्रण करून त्यांस घेऊन आले. नवनाथ, शुक्राचार्य, दत्तात्रेय, याज्ञवलक्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मिकि, आदिकरुन मुनिगण तेथें थोडक्याच वेळांत येऊन पोहोंचले.
नंतर गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथास सांगितलें कीं, भोजनसमारंभास पुष्कळ मंडळी जमली आहे; तरी तुमची मी मागें मार्गांत टाकून दिलेली सोन्याची वीट आणून देतों, ती घेऊन समारंभ साजरा करावा. यावर मच्छिंद्रनाथानें त्याचें समाधान केलें कीं, बाळा तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मला यःकश्चित् सोन्याची वीट घेऊन काय करावयाची आहे ? मग गोरक्ष म्हणाला, सर्व यथासांग होईल; पण हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप, मजकडे कांहीं नाहीं, असें बोलून त्यानें चरणांवर मस्तक ठेविलें व मी सर्व व्यवस्था लावून बंदोबस्त करितों, आपण कांहीं काळजी न करितां स्वस्थ असावें असे सांगितलें.
नंतर त्यानें अष्टसिद्धींस बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचें काम देऊन उंची उंची अनेक पक्वान्नें तयार करण्याची आज्ञा केली व बंदोवस्त नीट राहून कांहीं एक न्यून न पडूं देण्याची सक्त ताकीद दिली. मग त्यानें एकंदर कामाची व्यवस्था लाविली व उत्सवाचा बंदोवस्त उत्तम प्रकारचा ठेविला. त्या वेळेस सर्वांना अत्यानंद झाला.
या भोजनसमारंभांत गहिनीनाथ आले नव्हते. म्हणून गोरक्षनाथानें ही गोष्ट मच्छिंद्रनाथास सुचविली. तेव्हां मधुब्राह्मणाकडे एका गंधर्वास पाठवून पुत्रासह त्यास घेऊन येण्यास सांग, म्हणजे तो त्यास आणील, असें मच्छिंद्रनाथानें गोरक्षास सांगितलें. त्यावरुन गोरक्षनाथानें चित्रसेनगंधर्वास सर्व वृत्तांत कळविला व त्याच्या अनुमतीनें एक पत्र लिहविलें. तें त्यानें सुरोचन नामक गंधर्वाजवळ दिले. ते त्यानें कनकगिरीस जाऊन त्या मधुब्राह्मणास दिले व इकडील सविस्तर मजकूर सांगितला. मग तो ब्राह्मण मोठया आनंदानें मुलास आणि गहिनीनाथास घेऊन निघाला, तो मजल दरमजल करीत करीत गर्भाद्रिपर्वतीं येऊन पोहोंचल्यावर त्यानें गहिनीनाथास मच्छिंद्रनाथाच्या पायांवर घातले. त्या वेळेस त्याचे वय सात वर्षाचें होते. मच्छिंद्रनाथ मुलाचे मुके घेऊं लागला. त्या नंतर हा गहिनीनाथ करभजननारायणाचा अवतार असल्याचे त्यानें सर्वांस निवेदन केलें.
त्या वेळीं शंकरानें मच्छिंद्रनाथास सांगितलें कीं, आम्हास पुढें अवतार घ्यावयाचा आहे, त्या वेळीं मी निवृत्ति या नांवानें प्रसिद्धीस येईन व हा गहिनीनाथास अनुग्रह करील; यास्तव यास अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्यें प्रवीण करावें. हें ऐकून मच्छिंद्रनाथानें गोरक्षनाथाकडून गहिनीनाथास लागलाच अनुग्रह देवविला. तसेंच संपूर्ण देवांच्या समक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला हा समराधनेचा समारंभ एक महिनाभर सतत चालला होता. मग गोरक्षानें कुबेरास सांगितलें कीं, तूं हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि ह्याच्या मोबदला आम्हांस अमोल वस्त्रें-भूषणें दे; म्हणजे तीं सर्व मंडळीस देऊन रवाना करतां येईल. हें भाषण ऐकून कुबेरानें येथील धन येथेंच असूं द्या. आज्ञा कराल त्याप्रमाणें वस्त्रालंकार मी घेऊन येतों. मग त्यानें वस्त्रांचीं दिंडें व तर्हेसतऱ्हेचे पुष्कळ अलंकार आणून दिले. तीं वस्त्रें भूषणें सर्वांना दिलीं; याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठया सन्मानानें सर्वांची रवानगी करून दिली. समारंभ झाल्यावर उपरिक्ष वसूसमागमें मीननाथास सिंहलद्वीपास त्याच्या तिलोत्तमा मातोश्रीकडे पाठवून दिलें. त्यानें मीननाथास तिलोत्तमेच्या स्वाधीन केलें व मच्छिंद्रनाथाचा सारा वृत्तांत तिला सांगितला. तेव्हां मच्छिंद्रनाथाच्या भेटीची निराशा झाल्यामुळें तिच्या डोळ्यांस पाणी आले. तें पाहून एक वेळ तुला मच्छिंद्रनाथ भेटेल, तूं कांहीं चिंता करुं नको, असें सांगून उपरिक्षवासु आपल्या स्थानीं गेला. मग ती मुलावर प्रीति करून आनंदानें राहिली.
इकडे गर्भाद्रिपर्वतावर गहिनीनाथास अभ्यास करविण्याकरितां गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले. उमाकांतहि तेथेंच होते. त्या सुवर्ण पर्वतावर अदृश्यास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानीं गेला. अदृश्यास्त्राच्या योगानें सुवर्णाचा वर्ण झांकून गेला; परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले. ते अद्यापि तेथेंच आहेत. त्यास ’म्हातारदेव’ असें म्हणतात. त्याच्या पश्चिमेस कानिफनाथ राहिला; त्यानें त्या गांवाचें नांव मढी असें ठेविलें. त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथानें वसति स्थान केलें. त्याच्या पूर्वेस जालंदरनाथ राहिला. त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गांवीं नागनाथानें वस्ती केली. विटे गांवांत रेवणसिद्ध राहिला. गर्भाद्रिपर्वतावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिला. त्यानें तेथेंच गहिनीनाथाकडून विद्याभ्यास करविला. एका वर्षांत तो सर्व विद्येंत निपुण झाला. नंतर त्यास मधुब्राह्मणांकडे पाठवून दिलें. पुढें त्या ठिकाणीं बहुत दिवसपर्यंत राहून शके दहाशें या वर्षीं त्यांनीं समाधि घेतल्या.
कबरीच्या घाटाच्या समाधि बांधण्याचा मुख्य मुद्दा हाच होता कीं, पुढें यवनराजाकडून उपद्रव होऊं नये. एकदां औरंगजेबबादशहानें ह्या समाधि कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावरुन लोकांनीं त्यास सांगितलें कीं, तुमच्या पूर्वजांच्या आहेत. मठांत कान्होबा; पर्वती; मच्छिंद्र, त्याच्या पूर्वेस जालंदर, त्याच्या पलीकडे गहिनीनाथ असें ऐकून त्यानें तीं नांवें पालटून दुसरीं ठेविलीं, तीं अशीं : जानपीर असें नांव जालंदरास दिलें. गैरीपीर हें नांव गहिनीनाथास ठेविलें. मच्छिंद्राचें मायाबाबलेन व कानिफाचें कान्होबा अशी नांवें ठेवून तेथें यवन पुजारी ठेविले. कल्याण कलयुगीं बाबाचैतन्य यांची समाधि होती, पण तें नांव बदलून राववागशर असें नांव ठेविलें. गोरक्ष आपल्या आश्रमीं सटव्यांस ठेवून तीर्थयात्रेस गेला.
॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥
************************************************************
अध्याय २४
भर्तरीची जन्मकथा, त्याचे बालपण व आईबापांचा वियोग...
एके दिवशीं सांयकाळी सूर्याची व ऊर्वशीची नजरानजर होऊन सूर्यास कामानें व्यापून टाकिल्यामुळें वीर्यपात झाला. तें वीर्य आकाशांतून पडतांच वाऱ्यानें त्याचे दोन भाग झाले. त्यांपैकी एक भाग लोमेशऋषीच्या आश्रमांतील घटामध्यें पडून त्यापासून अगस्तीचा देह उप्तन्न झाला. दुसरा भाग कौलिकऋषीच्या आश्रमास आल. त्या वेळेस तो भिक्षा मागावयास बाहेर जात होता. तो आपलें भिक्षापात्र अंगणांत ठेवून दार लावीत होता. इतक्या अवकाशांत तें वीर्य त्यांत येऊन पडलें. हें ऋषीच्या पाहाण्यांत आलें. त्या वेळीं हें वीर्य सूर्याचें आहे, असें तो समजला. तीन हजार एकशें तीन वर्ष लोटन्यांनतर धृमीननारायण या पात्रांत संचार करील; यास्तव हें नीट जपून ठेवलें पाहिजे, असा विचार करून त्यानें तें भिक्षापात्र नीट जपून ठेवलें.
ह्या गोष्टीस बहुत वर्षे लोटल्यानंतर पुढें कलियुग सुरू झालें. नंतर त्या ऋषीनें तें पात्र मंदराचळाच्या गुहेंत तोंडाशींच नेऊन ठेविलें आणि आपण निघून गेला. पुढें कलीची तीन हजार एकशें तीन वर्षें लोटल्यानंतर द्वारकाधीशानें धृमीननारायणाच्या अवतारामध्यें त्या पात्रांत संचार केला. तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन नऊ महिने पूर्ण भरतांच पुतळा तयार झाला. तो त्यांत सामावेना, तेव्हा त्या पात्राचीं दोन शकलें झालीं. त्यांतलें मूल सूर्याप्रमाणें दैदीप्यमान होतें; पण रडून आकांत करीत होतें.
त्याच संधीस कांहीं हरिणें तेथें चरावयास आलीं. त्यांत एक हरिणी गर्भिणी होती ती चरत तेथें जाऊन प्रसूत झाली. तिला दोन बाळें झालीं; परंतु ती मागें पाहूं लागली तेव्हां तिला तीन बाळें दिसली. तीं तिन्ही मुलें माझींच असा तिला भास झाला. मग ती त्यांस चाटूं व हुंगूं लागली. ती दोन्ही हरणें प्यावयास लागली, पण तिसऱ्यास प्यावयाचें कसें तें माहित नव्हतें. ह्यामुळें तें टकमक पाहूं लागलें. परंतु तिनें युक्तिप्रयुक्तीनें स्तनपान करवून त्या मुलीचें सरंक्षण केलें. पुढें कांहीं दिवसांनी मूल रांगूं लागलें. तिन्ही मुलें एके ठिकाणीं ठेवून ती हरिणी चरावयास जात असे, तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता. ती घडोघडी येऊन त्यांस पाहून पुन्हां चरावयास जाई. याप्रमाणें तीन वर्षे लोटली. मग तो हरिणामध्यें जाऊन झाडपाला खाऊं लागला तो निरंतर आपल्या आई मागे राहीं. अशा रीतीनें त्यानें तिच्या संगतीनें पांच वर्ष काढली.
एके दिवशीं तीं चौघें चरत चरत मार्गावर आलीं असतां त्या वाटेनें एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता. त्यानें हें मूल पाहिलें. त्या भाटाचें नांव जयसिंग व त्याच्या स्त्रीचें नांव रेणुका असें होतें. तीं उभयतां एकमतानें वागत. त्यांनी सूर्याप्रमाणें तेजस्वी असा तो मुलगा तेथें पाहून, अशा सुकुमार व स्वरूपवान् मुलास आईबापांनीं अरण्यांत सोडून दिल्यामुळें त्या मुलाविषयीं त्याच्या मनांत नानाप्रकारे विचार येऊं लागले. जयसिंहास पाहून हरिणी पळून जाऊ लागली व तिच्यामागून तो मुलगाहि धांवत जाऊं लागला. परंतु जयसिंहानें त्यास धरिलें. नंतर तो त्यास म्हणाला मुला, भिऊं नको. तुझीं आईबापें कोठें आहेत तीं मला सांग. मी तुला तुझ्या घरीं नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो. परंतु तें रडून हंबरून आकांत करूं लागलें व मुलगा मनुष्याच्या हाती सांपडल्यामुळें त्या हरिणीसहि परम दुःख झालें. तिला मनुष्याच्या भयानें जवळ येण्यास हिंमत होईना. म्हणुन लांबूनच ती हंबरडा फोडूं लागली.
जयसिंह भाट मुलास म्हणाला, मुला ! तूं रडून असा कां आकांत करून घेत आहेस ? तुझीं आईबापें कोठें आहेत, मला सांग, मी तुला त्यांच्या स्वाधीन करितों. पण मुलाच्या तोंडून एक शब्दसुद्धां निघेना. तो ब्यां ब्यां करून रडत होता. मग मुका असेल असें जयसिंगास वाटलें, म्हणुन तो त्यास हातांच्या खुणा करून विचारूं लागला. परंतु त्या त्यास समजत नसल्यामुळें तो कांहींच उत्तर देईना. सरतेशेवटीं त्यानें त्या मुलास आपल्या घरीं घेऊन जाण्याचा निश्चय केला. मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊं लागला. तो मुलगा ओरडून हरिणीस हांक मारीत होता व ती पाठीमागून येत होती. पण मनुष्याच्या भीतीनें ती जवळ येईना. ह्यांतलें वर्म जयसिंगास काय तें कळेना. ती हरिणी जयसिंगाच्या मागून ओरडत जातच होती. ती बरीच लांबपर्यत गेली, तेव्हां हिचें पाडस रानांत चुकलें असेल, म्हणुन ही रडत आहे असें जयसिंगाला वाटून तो मुलास घेऊन चालता झाला.
मुलास घेऊन जयसिंग जात असतां, सांयकाळ झाल्यावर एका पदरहनी गांवांत वस्तीस राहिला. त्यानें तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला. पुढें मुलास हळूहळू हरिणीचा विसर पडत चालला. त्याला थोडें खाणें, पिणें, बोलणें, चालणें, उठणें बसणें हें सर्व कळूं लागलें.
अशा रीतीनें तो भाट फिरत फिरत काशीस गेला. तेथें भागीरथीचें स्नान करून विश्वेश्वराचें दर्शन घेण्यासाठीं देवालयांत गेला. बरोबर मुलगा होता. दर्शन घेत असतां लिंगातून शब्द निघाला कीं, 'यावें भर्तरी ! तुम्ही अवतार घेऊन प्रकट झालांत, फार चांगलें.' हें शंकराचे शब्द ऐकले. तें ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनांत आली व हा आपल्या पूर्वपुण्याईच्या योगानें आपणांस प्राप्त झाला आहे असेंहि त्यास वाटलें. मग शिबिरास गेल्यावर त्यानें हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून ह्याचें भर्तरी नांव ठेवून याचें पुत्राप्रमाणें पालन कर, ही अलभ्य जोड आपणांस प्रयत्नाकवांचून कर्मधर्मसंयोगानें प्राप्त झाली आहे, असे सांगितलें.
'यावें भर्तरी' म्हणुन शंकरानें कां म्हटलें, अशी कदाचित कोणी कल्पना काढील. तशी हांक मारण्याचें कारण असें कीं, त्याचा जन्म भर्तरीमध्यें झाला म्हणुन शंकरानें त्याच नांवानें त्यास हांक मारली. असो, शंकराच्या देवालयांतला वृत्तांत जयसिंगानें रेणुकाबाईस कळविल्यानंतर तिला परमानंद झाला. त्या दिवसापासुन तीं उभयतां त्यास भर्तरी असें म्हणूं लागली. त्यांस पुत्र नसल्यामुळें त्यांची भर्तरीवर अत्यंत प्रीति जडली. तीं त्याचें लालनपालन उत्तम प्रकारें करीत. त्यासहि आनंद होऊन तो त्यांशीं त्यांच्या मनाप्रमाणें वागे. त्यांस हा मुलगा प्राप्त झाल्यानें अतिशय हर्ष झाला होता. परंतु त्या मुलाच्या आईबापांस, तो चुकल्यामुळें परम दुःख होत असेल, तीं ह्याचा तपास करीत असतील, व आपली भेट झाल्यास त्यास आपणांपासून घेऊन जातील, अशी शंका त्यांच्या मनांत वारंवार येई. मग ती त्याच क्षेत्रांत राहून भिक्षा मागुन आपला उदरनिर्वाह करूं लागली.
भर्तरीस संपूर्ण राजयोग होता. तो गांवांतली मुलें जमवून अनेक प्रकारचे खेळ खेळतांना आपण राजा बनून दुसऱ्यांस कामदार करी. अश्व, पायदळ, मंत्री आदिकरून सर्व मुलांस निरनिराळे वेष देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहुब थाट आणीत असे. जसजसा योग असेल तशतशीं त्याच्या हातून कृत्यें घडत.
एके दिवशीं काठीचे घोडे करून खेळत असतां भरधांव पळत व तोंडानें हो हो म्हणत आणि त्यांची पाठ थोपटीत, ते गांव सोडून अरण्यांत गेले. तेथें खेळतांना भर्तरिस ठेंच लागून तो उलथून खाली पडला. अगदी बेशुद्ध झाला. त्यानें जेव्हां डोळे पांढरे केले तेव्हां मुलें भिऊन पळून गेलीं व हा आतां मेला व भूत होऊन बोकांडीस बसेल आणि आपणांस खाऊन टाकील असें म्हणुं लागली. मग सर्व मुलें तेथून पळून भागीरथीच्या कांठीं जाऊन विचार करूं लागलीं कीं, भर्तरी भूत होऊन गांवांत हिंडेल व आपणांस खाऊन टाकील, ह्यास्तव आतां आपण बाहेर जाऊं नये. ज्यानें त्यानें आपपल्या घरींच खेळावें. असा तीं आपसांत विचार करून घरीं गेलीं. इकडे भर्तरी अगदीच बेशुद्ध होऊन निश्चेष्ट पडला. त्याचें सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळें अंगांतून रक्त निघाले होतें. सर्व प्रकार सूर्यानें पाहिला व त्यास पुत्रमोहास्तव कळवळा आला. तत्क्षणीं त्यानें भूतलावर येऊन, प्रेमानें मुलास उचलून पोटाशीं धरिलें. नंतर भागीरथीचं उदक आणुन त्यास पाजलें व सावध केलें. मग कृपाद्दष्टीनें त्याच्याकडे पाहतांच त्याचा देह पूर्वीप्रमाणें झाला. इतकें झाल्यावर सूर्यानें विप्राचा वेष घेतला आणि भर्तरीस घरीं आणून पोंचविलें. येतांना वाटेंत भर्तरीस पोरांनीं ओळखून तो भुत होऊन आला, असें तीं ओरडूं लागली आणि भिऊन घरोघरी जाऊन लपून राहिली.
सूर्यानें भर्तरीस घरीं नेऊन रेणुकेच्या स्वाधीन केलें, तेव्हां ती त्यांची विचारपूस करूं लागली. तो तेजःपुंज ब्राह्मण पाहून तिनें त्यास आसनावर बसविलें आणि म्हटलें, महाराज ! तुम्ही अति ममतेनें या मुलास घेऊन आलां आहां, त्याअर्थी आपण कोठून आलां व आपलें नांव काय हें सर्व मनांत काडीभर सुद्धां संशय न आणितां सांगावें. तेव्हां सूर्य म्हणाला, मी या मुलाचा बाप आहे; म्हणुन ममतेनें मी ह्यास तुजकडे घेऊन आलों आहें व मीं तुला या मुलास अं:तकरणपूर्वक अर्पण केलें आहे. ह्यास्तव तूं मनांत कोणत्याहि प्रकारची आकांक्षा आणिल्यावांचून ह्याचें संगोपन कर. तें ऐकून, तुम्हीं याचे जनक कसे, असें रेणुकेनें विचारल्यावर तो म्हणाला, मी विप्रवेषानें तुजकडे आलों आहें म्हणुन तुं मला ओळखलें नाहींस. सुर्य म्हणून देव म्हणतात तो मी. असें सांगून मुळापासून भर्तरीची कथा सांगून त्याचें हरिणीनें संगोपन कसें केलें व तो त्यांच्या हातीं कसा आला हा सर्व साद्यंत वृत्तांत सांगितला. शेवटीं तो तिला म्हणाला, हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असें मानून निर्धास्तपनें तूं याचें संरक्षण कर. हा पुढें मोठमोठालीं कृत्यें करून लौकिकास चढेल. तुझें भाग्य उदयास आलें म्हणून हा तुला प्राप्त झाला. असें तिला सांगून विप्रवेषधारी सूर्य निघून गेला.
ह्या वेळेस तिचा नवरा जयसिंग घरीं नव्हता. तो येतांच तिनें हें वर्तमान त्यास सांगितलें; तें ऐकून त्यासहि परमानंद झाला. त्याच्या संशयाची निवृत्ति झाली. मग त्याचें त्यावर पूर्ण प्रेम बसलें. मुलाचें वय सोळा वर्षाचें होईपर्यंत ती काशींत राहिली. पुढें मुलांचें लग्न करण्याचा विचार मनांत आणून तीं आपल्या गांवीं जाण्यासाठीं काशीहून निघाली. तों मार्गात अरण्यामध्यें चोरांनी जयसिंगास ठार मारून व त्याजवळचें सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले. पतीचें दुःख दुःसह होऊन रेणुकाहि गतप्राण झाली. मग भर्तरीनें उभयतांना अग्नि देऊन दहन केलें. तो निराश्रित होऊन शोकसागरांत बुडून गेला. त्यास शोक आवरेना व निराश्रित झाल्या मुळें तो अनेक प्रकारच्या विवंचनेंत पडला. त्या वेळीं कांहीं व्यापारी व्यापारासाठीं त्याच मार्गानें जात होते ते भर्तरीस पाहून त्याच्यापाशीं गेलें. त्यांना त्याची दया आली आणि त्यांनीं त्यास विचारल्यावरून भर्तरीनें त्यास सर्व प्रकार निवेदन केला. मग त्यांनी त्यास बोध केला कीं, प्रारब्धीं होतें तसें झालें, आतां तुं रडून कपाळ फोडून घेतलेंस तरी तीं आतां पुन्हां परत येणार नाहींत. ह्या रीतीचा त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले, ते त्यास अन्नवस्त्र देत व तोहि त्यांचें कामकाज करी. असें कांहीं दिवस लोटल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासानें त्यास आपल्या दुःखाचा थोडाथोडा विसर पडत चालला पुढें ते कांहीं दिवसांनीं अवंतीनगरी येऊन पोचले.
॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥
************************************************************
Search
Search here.