पौष महिना

सण व उत्सव Posted at 2019-01-12 16:20:05

पौष महिना

वर्षातील बारा महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना, पण त्याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत, इतके कि पौष सुरु झाला म्हणून अनेक शुभकार्ये पुढे ढकलली जातात तर महत्वाची बोलणी टाळली जातात. नवीन व्यवहार होत नाहीत इतका महिना वाईट असल्याची समजूत असल्याने याची भयंकर भीती जनसामान्यांमध्ये आहे तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरच इतका वाईट आहे का ? याचा घेतलेला हा धांडोळा... ★ मराठी वर्षारंभातील दहावा महिना तर हेमंत ऋतूतील दुसरा मास म्हणजे पौष महिना. त्याला तैष आणि सहस्य अशी अन्य दोन नावंही आहेत. अधिक मासाला जसं मलमास किंवा धोंडा मास म्हणतात तसं याला भाकडमास म्हटलं जाऊ लागलं. कारण मकर संक्रातीशिवाय या महिन्यात अन्य सण नाहीत, असा सार्वत्रिक समज. मात्र धर्मशास्त्रात या महिन्यात करण्याची काही कृत्यं सांगितली आहेत ती अशी - 1) पौष पौर्णिमेपासून पौर्णिमान्त माघ सुरू होतो म्हणून या दिवसापासून माघस्नानाला प्रारंभ करावा. 2) पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव (शाकंभरी नवरात्र) शारदीय नवरात्रौत्सवासारखा असतो. 3) पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रित्यर्थ स्नान, जप, होम तर्पण व ब्राह्मणभोजन करावं. 4) पौष अमावास्येला अधोंदय पर्व आलं असता स्नानदानादी धर्मकृत्यं करावीत. 5) महादेवाच्या मंदिरा समोर दीपाराधना करावी. 6) पौषाच्या दोन्ही पक्षांतील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा करावी. दुर्गेची मूर्ती पीठाची करावी व्रतानिमित्त आठ कुमारिकांना भोजन घालावं. 7) महिनाभर एकवेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावं. 8 ) रवि धनु राशीत प्रवास करून मकर राशीपर्यंत प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात. धनुर्मास श्रवणासारखाच पवित्र मानला जातो या धनुर्मासाचे काही दिवस पौषात येतात. संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा व नित्यकर्म उरकून देवास नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. नैवेद्यास मुगाच्या डाळीची खिचडी, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, वांग्याचे व तिळाचे पदार्थ केले जातात. वरील विवेचनावरून धार्मिक कार्यासाठी हा महिना निषिद्ध नाही, हे स्पष्ट होतं. राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्याचा. शास्त्रानुसार काही दिवस वगळता उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज्य नाही. पौष महिना शुभकार्यासाठी वर्ज्य आहे ही निव्वळ खुळचट कल्पना असून तिला कसलाही शास्त्राधार नाही. पौष महिन्याचा उगाच उगाच बागुलबुवा करू नये. गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्ज्य नाही. सुरू असलेलं बांधकाम थांबवू नये. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचर वगैरे करायला हरकत नाही. संपूर्ण महिनाभर घरखरेदी, दागिने खरेदी, प्रवास वा अन्य नैमित्तिक कामं निर्धास्तपणे करावीत. या दिवसांमध्ये वास्तुशांती, गृहप्रवेश, लग्नकार्य इत्यादींचे मुहूर्त असतात ,आहेत पण ते ज्योतीर्विदाकडूनच काढून घावे. पौष महिन्यात शुभकार्य करत नाहीत ही रुढी बनली आहे. पण जी रुढी शास्त्रापासून उत्पन्नच झाली नाही ती न पाळणंच योग्य.

Search

Search here.