पौष मासा विषयी थोडेसे

श्याम जोशी ब्लॉग Posted at 2016-03-19 06:27:19
? श्री महागणपति प्रसन्न ? --- हरी ॐ --- ? पौष मासाविषयी थोडेसे ?
दिनांक........22 डिसेंबर 2014 पासून पौष महिना सुरू होत आहे. 20 जानेवारी 2015 पर्यंत तो राहील. सर्व साधारणपणे पौष मासात लग्न, मुंज व इतर धार्मिक कामे करीत नाहीत. हा महिना अशुभ मानला जातो काही जण तर या महिन्यात शुभ कार्याची बोलणी सुद्धा करीत नाहीत. या साऱ्या गैर समजुती आहेत. कुबेर व मदनाच्या अंमलाखाली असलेला हा महिना हा तसा पाहिला असता अत्यंत शुभ आहे. गुरुपुष्यामृत योग हा सर्वश्रेष्ठ राजयोग मानला जातो त्या योगावर सुवर्ण / रत्न खरेदी करतात. राज्यभिषेका साठी सुद्धा पुष्य ऊत्तम मानले जाते. नक्षत्राचा राजा असलेल्या पुष्य नक्षत्राच्या अमलाखाली हा गुरुपुष्यामृत अमृत योग होतो. त्याच नक्षत्राच्या अधिपत्या खाली पौष महिना येतो त्यामुळे तो अशुभ नाही. लग्न मुंज, वास्तुशांती , प्रवास, व्यवसायाचा शुभारंभ यासह कोणतीही शुभ कामे या महिन्यात करता येतात. पौष महिना सतत अशुभ म्हणून त्याचा सतत अपमान केल्यास दारिद्र्य येते असे अनेक ग्रंथांमधे वचन आहे . त्यामुळे अशुभ महिना म्हणून महत्त्वाची कामे पुढे ढकलू नयेत. हा महिना अशुभ का मानतात याचे कारण ही माहिती असणे आवश्यक आहे. सूर्य ज्यावेळी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस संक्रांतीचा असतो काही धार्मिक कार्यास हा दिवस महत्त्वाचा मानलेला आहे. रवि हा सिंह राशीचा मालक व मकर ही त्याची शत्रू रास. या दोन राशीत मृत्यू षडाष्टक योग होतो. त्यामुळे फक्त सिंह , मकर राशीच्या लोकांनी काही बाबतीत काळजी घ्यावी. संक्रांती पूर्वीचे तीन दिवस व नंतरचे तीन चार दिवस असे हे सहा सात दिवस धार्मिक कार्य सोडून इतर सर्व कार्यांसाठी कडक व अनिष्ट असतात. हे सहा दिवस सोडून पौष मासात इतर दिवशी विवाहादि कोणतीही महत्त्वाची शुभ कामे करण्यास हरकत नाही. पौष महिन्यातच शाकंभरी देवीचे नवरात्र अष्टमी पासून सुरू होते व ते पौर्णिमे पर्यंत राहते. ज्या महिन्यात शाकंभरी देवीचे नवरात्र असते तो महिना अशुभ कसा मानता येईल. ? पुराणात काही संदर्भ दिलेले आहेत. पण ते देवी देवतांशी संबंधित आहेत. त्यामुळे जर या महिन्यात शुभ दिवस अथवा मुहूर्त असतील तर कोणतीही शुभकार्ये करता येतात. गुरुपुष्यामृत योगावर विवाह करू नये म्हणतात, पण या योगावर लग्न झालेली असंख्य जोडपी कित्येक वर्षे सुखा समाधानाने संसार करीत असून कुबेराचे ऐश्वर्य त्यांच्या पायाशी लोळण घेत आहे. मुला बाळासह सर्व सुखे त्यांच्याकडे आहेत. अशी कित्येक उदाहरणे आपल्या डोळ्या समोर आहेत. या महिन्यात लग्ने का करीत नाहीत ? हा महिना अशुभ का मानला जातो ? त्याचा काळ किती असतो ? किती दिवस या बाबी पाळाव्यात ? व या महिन्यातील बाकीचे दिवस अत्यंत शुभ कसे असतात. ? या मागील पौराणिक संदर्भ कसे आहेत ? याचे समाधान कारक पुर्ण व स्पष्ट उत्तर कोणत्याही पंचांगात दिलेले नाही. व त्यामुळेच अर्धवट अज्ञाना मुळे , खोट्या गैरसमजूती पसरवण्या मुळे विनाकारण हा पुर्ण महिना अशुभ ठरवला गेला . आपला देश शेतकी प्रधान आहे . पौष,आषाढ महिन्यात शेतीचे कामे असतात म्हणून पाहूणे यायला , जायला नको म्हणून धार्मिक कार्यक्रम नको व पूर्ण लक्ष शेतीकडे देता यावे त्यामुळे विनाकारण अशी चुकीची रूढी पडली आहे . ऊलट पौष, आषाढ महिन्यातले सर्व धार्मिक कार्यक्रमाचे फल अधिक असते. भाद्रपद कृष्ण पक्ष मात्र अपवाद नाही. काही पंचांगकर्त्यांनीही पौष महिना हा अशुभ नाही असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. व बरेच ठिकाणी धार्मिक सभा , शास्त्र सभा यामधे यापूर्वीही पौषमास अशुभ नाही यावर निर्णय झालेला आहे. काही जुन्या समजुती , रीती , परंपरा आपण अभ्यास करुण , त्यातले खरे शास्त्र शोधून आणि चुकीचे काढून टाकून चांगले तेच घ्यायला हवे असे तरी मला वाटते. ?श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा ? ? शुभम् भवन्तु ?

Search

Search here.