रुक्मिणी स्वयंवर 01 to 09

ग्रंथ - पोथी  > इतर ग्रंथ पोथी Posted at 2018-03-16 19:19:40
श्री रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे वाचन , पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुयोग्य , सुस्वरूप व अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे. रुक्मिणी स्वयंवर रुक्मिणी स्वयंवर-प्रस्तावना श्री एकनाथ महाराजांनी आपल्या "रुक्मिणी स्वयंवर" या आख्यान काव्यात सर्व प्रसंग उत्तम तर्‍हेने रंगविले आहेत. या ग्रंथाचे अनेक कुमारिका पारायण करतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे. रुक्मिणी स्वयंवर' ग्रंथात एकूण १२ अध्याय आहेत व त्यातील सार पुढीलप्रमाणे आहे. प्रसंग १ - भीमकाचा निर्णय रुक्मिणी विदर्भराजा भीमक व शुद्धमती यांची कन्या. ५ पुत्रांनंतर झालेली ही कन्या. वसुदेव व देवकी यांचा पुत्र श्रीकृष्ण याच्या रूपगुणांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. रुक्मिणीने ही कीर्ती ऐकली होती. त्यामुळे तिने मनानेच श्रीकृष्णाला वरले होते. प्रसंग २-स्वयंवरास विरोध भीमकाचा ज्येष्ठ पुत्र रुक्मी हा श्रीकृष्णाचा द्वेष करीत असे. त्याने शिशुपाल यास रुक्मिणी देण्याचे ठरविले. शिशुपाल सुद्धा श्रीकृष्णाचा द्वेष करीत असे. हा बंधूचा बेत पाहून रुक्मिणी घाबरली आणि तिने सात श्लोकांचे पत्र सुदेव ब्राह्मणाकडून श्रीकृष्णास पाठविले. प्रसंग ३ - सुदेव श्रीकृष्णाकडे आले. सुदेव ताबडतोब श्रीकृष्णाकडे आले. त्यांनी श्रीकृष्णास पत्र दिले. भीमकाची व शुद्धमतीची इच्छा प्रगट केली. रुक्मीचा विरोध सांगितला. शिशुपालाबरोबर रुक्मिणीचा विवाह होत असल्याचे सांगितले. प्रसंग ४ - रुक्मिणीचे पत्र श्रीकृष्णाने ते पत्र सुदेवासच वाचावयास सांगितले. त्यात लिहिले होते. त्याच्या श्रवणाने त्रिविध ताप नाहीसे होतात. तुमच्या ठायी माझे चित्त जडले आहे. मी अंबा पूजा दर्शनासाठी जाईन. तेथून आपण मला घेऊन जावे. प्रसंग ५ - श्रीकृष्ण रथ घेऊन निघाला. श्रीकृष्ण शस्त्रसंभार घेऊन रथातून निघाले. पाठोपाठ बलरामही सैन्य घेऊन निघाला. इकडे रुक्मिणीचा हळदी समारंभ चालला होता. रुक्मिणी सुदेवाची वाट पहात होती. येवढ्यात तिला सुदेव आलेला दिसला. प्रसंग ६ /७ - श्रीकृष्णाचे आगमन भीमकाने श्रीकृष्ण, बलरामाचे स्वागत केले. ते पाहून रुक्मी, जरासंध व शिशुपाल हे घाबरले. शुद्धमतीने श्री अंबादर्शनाची आठवण केली पण रुक्मीने जाण्यास मनाई केली. परंतु रुक्मिणी नटून थटून देवदर्शनास निघाली. संरक्षणासाठी रुक्मीने काही सैन्य पाठविले. रुक्मिणी मंदिरात आली. अंबेची यथासांग पूजा झाली. देवीने गळ्यातील माळ तिच्या हाती टाकून उजवी दिली. ही माळ कृष्णास घालूया असे रुक्मिणीने मनात योजिले. रुक्मिणी मंदिराच्या बाहेर आली. श्रीकृष्ण बाहेर उभा होता. त्याने सर्व सैन्याला जखडून ठेवले आणि रुक्मिणीला रथात घेऊन या यादवांत आला. रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या गळ्यात माळ घातली आणि स्वयंवर संपन्न झाले. प्रसंग ८ दोन्हीकडील सैन्य लढू लागले. सैन्य शुद्धीवर आले. रुक्मी, जरासंध आले. त्यांनी श्रीकृष्णाला लढाईसाठी हाक मारली. यादवांचे सैन्यही युद्धास तयार झाले. बलराम युद्ध करण्यास आला. प्रसंग ९ - रणसंग्राम सुरू झाला. बलराम सैन्याला मारू लागला. त्या वेळी जरासंध धावून आला. कृतवर्मा व पौंड्रकाचे युद्ध सुरू झाले. अनेक रथ मोडले गेले. अनेक हत्ती मारले गेले. नंतर कौशिक, गवेषण व बलराम युद्ध सुरू झाले. प्रसंग १० - गवेषणाचा पराजय. गवेषणाने अनेकांचा पराभव करण्यास सुरुवात केली. गवेषणाने सारणास मूर्च्छित केले. इकडे बलराम व केशिक लढत होते. केशिकचा पराभव करून बलराम गवेषणाबरोबर लढू लागला. बलरामाने त्याचे सैन्य मारले. गवेषण पळून जाऊ लागला. प्रसंग ११ - यादवांचा विजय झाला. सात्विकाने वक्रदंताचा पराजय केला, त्याला पळवून लावले. गद व जरासंधाचे युद्ध सुरू झाले. तो गदाकडे पाठ करून पळू लागला. त्यामुळे त्याचे सर्व सैन्यही पळू लागले. त्यामुळे यादव विजयी झाले. प्रसंग १२ - शिशुपाल व रुक्मीची दैन्य अवस्था श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन गेला. शिशुपालची दैन्य अवस्था झाली. त्याची आई श्रुतश्रवा रडू लागली. तो लढाईसाठी सैन्य घेऊन निघाला. वाटेमध्येच जखमी जरासंध भेटला. त्याने शिशुपालला सारी हकिगत सांगून परत फिरविले. रुक्मी अतिशय संतापलेला होता. तो सैन्य घेऊन युद्धास निघाला. त्याने श्रीकृष्णावर अनेक प्रकारची अस्त्रे टाकली, परंतु श्रीकृष्णाने ती तोडून टाकली. अनेक मोठमोठ्या योद्ध्यांचा श्रीकृष्णाने पराभव केला. प्रसंग १३ - बलरामाचा रुक्मिणीस उपदेश युद्धातून रुक्मीचे अनेक सैन्य पळून गेले. यादवांना विजय प्राप्त झाला. रुक्मीची अवस्था पाहून बलरामने त्याला सोडून दिले. रुक्मिणीस बलरामाने उपदेश केला. तुझ्या भावाची अवस्था श्रीकृष्णाने जी केली, ती योग्यच आहे. श्रीकृष्णचरण प्राप्त झाल्यानंतर तुझे सर्व प्रकारचे द्वैत संपले पाहिजे. आता श्रीकृष्णाशी एकरूप हो. प्रसंग १४ - विवाहसमारंभ सर्व हकीगत भीमकास कळली. तो प्रभासला आला. त्याने श्रीकृष्णास नमस्कार केला व सांगितले, "कुंडिनपुरास आपण विवाह समारंभास यावे." बलरामासही बोलाविले. परंतु रुक्मिणीच्या सांगण्यावरून तेथेच विवाह संपन्न करण्याचे ठरविण्यात आले. शुद्धमतीने कुंडिनपुराहून सर्व विवाह साहित्य आणले. श्रीकृष्णाने वसुदेव, देवकी व उग्रसेन यांना बोलाविले. सर्वांनी मिळून भोजन केले. प्रसंग १५ - लग्नसमय श्रीकृष्णाने मुहूर्तमणी ओविला आणि सगळे नटून-थटून वसुदेव-उग्रसेनसह वधूमंडपाकडे वाजतगाजत निघाले. रुक्मिणी नटून-थटून सज्ज झाली. श्रीकृष्ण मंडपात आला. मधुपर्कपूजन सिद्ध झाले. प्रसंग १६ - विवाहसंभ्रम ब्राह्मणांनी मंत्रानी भीमकीच्या डोक्यावर अक्षता घातल्या. भीमकीला अंतरबाह्य सर्वत्र श्रीकृष्ण दिसू लागला. श्रीकृष्ण-रुक्मिणीचा विवाह संपन्न झाला. विवाह होम, पाणिग्रहण झाले. रुक्मिणी श्रीकृष्णाचे चरणास वंदन करू लागली परंतु तिला पायच कोठे दिसेनात. नंतर श्रीकृष्णाचे चरणकमलांना वंदन केले आणि दोधे एकरूप झाले. प्रसंग १७ - घेंडानृत्य बोधाने श्रीकृष्णास व देहाभिमानाने नोवरीस खांद्यावर घेऊन नाना प्रकारचे नृत्य केले नंतर भीमकाकडील अनेक कुलदेवतांची नृत्ये झाली. प्रसंग १८ - द्वारकेत गृहप्रवेश श्रीकृष्णास नाना वस्तू आंदण देऊन भीमक निघाले. इकडे द्वारकेस जाण्यास वरात निघाली. सर्व श्रृंगारले होते. विधीपूर्वक लक्ष्मीपूजन झाले. संत एकनाथ महाराजांनी हे सर्व प्रसंग उत्तम तर्‍हेने रंगविले आहेत. या ग्रंथाचे अनेक कुमारिका पारायण करतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते असा अनेक मंडळींचा अनुभव आहे. या ग्रंथातील जीवा-शिवाचे मीलन समजून घ्यावे. अंत:करणातील सर्व प्रकारचे द्वैत नाहीसे करावे अणि सर्वांवर नि:स्वार्थ प्रेमाचा वर्षाव करून आनंदाने जीवनाची वाटचाल करावी. प्रसंग पहिला श्रीगणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ ॐ नमोजी कृष्णनाथा । गणेशसरस्वती नामें धरिता । तूंचि तूं कुळदेवता । कवणा आतां मी प्रार्थू ॥ १ ॥ तूंचि अखिल अवघे जन । सहज गुरु तूं जनार्दन । कृष्णकथेसी लावी मन । नित्यात्मगुण गावया ॥ २ ॥ ऎकतां कृष्णकथाश्रवण । तेणें चित्तवृत्ति वेधली जाण । कर्माकर्मी अखंडपण । लागलें ध्यान भीमकीसी ॥ ३ ॥ शुकयोगींद्राप्रती प्रश्न करी परीक्षिति । भीमकीहरण श्रीपति । काय निमित्त्तीं पैं केलें ॥ ४ ॥ का करितोसी म्हणसि प्रश्न । तरी मी त्यक्तोदक जाण । वदें कथामृत श्रवण । तें जीवन मज तुझेनि ॥ ५ ॥ विशेष हें कृष्णचरित्र । तुझेनि शुद्धमुखें पवित्र । श्रवण करितां माझे श्रोत्र । अधिकाधिक भुकेले ॥ ६ ॥ इतर कथा नव्हे फुडी । नित्य नूतन इची गोडी । सेवूं जाणति आवडी । ते परात्परथडी पावले ॥ ७ ॥ देखोनि प्रश्नाचा आदर । शुक कथेसी झाला सादर । कैसा वचन बोलिला गंभीर । कृपा अपार रायाची ॥ ८ ॥ ऎक बापा परीक्षिती । तूं तंव सुखाची सुखमुर्ती । भीमकीपाणिग्रहणस्थिती । यथानिगुती सांगेन ॥ ९ ॥ अगा वसुदेवाचिये तप:प्राप्ती । श्रीकृष्ण देवकीउदरा येती । कृष्णाची जे कृष्णशक्ती । जालो उतरती भूमंडळीं ॥ १० ॥ कनकासवें जैसी कांती । सूर्यासवे जैसी दीप्ती । तैसी अवतरली कृष्णशक्ती । विदर्भदेशी रुक्मिणी ॥ ११ ॥ जैसा मूर्तिमंत विवेक । तैसा जाण राजा भीमक । सत्त्वाथिला अतिसात्त्विक । निष्कलंक शोभत ॥ १२ ॥ श्रद्धा पत्‍नी शुद्धमती । झाला गर्भातें धरिती । तेथें जन्मली कृष्णशक्ती । चिच्छक्ती रुक्मिणी ॥ १३ ॥ नवविधा तेचि नवमास । गर्भा भरले पूर्ण दिवस । साङ्‌ग जन्मली रूपस । नवनिधान रुक्मिणी ॥ १४ ॥ पांचां विषयांचे शेवटीं । सुबुद्धी उपजे गोमटी । तैसी पांचांहूनि धाकुटी । जाहली गोरटी रुक्मिणी ॥ १५ ॥ जेंहूनी जन्मली कुशीं । तैंहूनि आवडे रायासी । अमान्य करुनि पांचासी । तेची एकी पढियंती ॥ १६ ॥ स्वरूपरूपें अतिसुंदर । लावण्यगुणें गुणगंभीर । दिवसेंदिवस जाहली थोर । वरविचार रायासी ॥ १७ ॥ तेथें कीर्तिनामा ब्राह्मण । रायापाशीं आला जाण । तेणें कृष्णकीर्तन । तेथें तनमन वेधलें ॥ १८ ॥ बसली होती रायापाशी । सादर देखोनि भीमकीसी । मग वर्णिलें कृष्णरूपासीं । चित्स्वरूपेसी साकार ॥ १९ ॥ जो निर्गुण निर्विकार । जो निष्कर्म निरुपचार । तोचि जाहला जी साकार । लीलाविग्रही श्रीकृष्ण ॥ २० ॥ अतिसुरंग चरणतळें । उपमें कठिण रातोत्पलें । बालसूर्याचेनि उजाळें । तैसीं कवळें टांचांचीं ॥ २१ ॥ ध्वजवज्रांकुशरेखा । चरणींची सामुद्रिकें देखा । न वर्णवती सहस्रमुखा । ब्रह्मांदिकां अलक्ष्य ॥ २२ ॥ पिळूनि इंद्रनीळकिळी । वोतली कृष्णतनु सांवळी । पाउले सुकुमार कोंवळीं । घोटीं निळीं दोहीं भागीं ॥ २३ ॥ सुनीळ नभाचिया कळीका । तैशा आंगोळिया देखा । वरी नखें त्या चंद्ररेखा । चरण पीयूषा लुब्धल्या ॥ २४ ॥ सांडूनि कठिणत्वाचें डिंभ । सचेतन मर्गजस्तंभ । तैसे चरण जी स्वयंभ । श्रीकृष्णशरीरीं शोभती ॥ २५ ॥ कृष्णअंगा जडलेंपणें । विजूसी पुट आलें चौगुणें । विसरली अस्तमाना जाणें । पीतांबरपणें कांसेसीं ॥ २६ ॥ कृष्णचरणींचीं भूषणें । वांकीने वेदांसी आणिलें उणे । ते तंव धरूनि ठेलें मौनें । कृष्णकीर्तनें हे गर्जे ॥ २७ ॥ सोहंभावाचेनि गजरें । चरणीं गर्जती नेपुरें । मुमुक्षूचें मन निदसुरें । त्यातें चेइरें करीतसे ॥ २८ ॥ तोडर गर्जे कवणे मानीं । जन्ममरणें हरिचरणीं । नाहीं उपासकालागोनी । संकल्प विकल्प गेलिया ॥ २९ ॥ अनंत रूप नाकळे वेदीं । तें आकळीं जेवीं सद्‍बुद्धी । तैशी मेखला माजामधीं । चिद्रत्‍नसंधी जडली असे ॥ ३० ॥ स्वपदा पावलियापाठीं । जेवीं वृत्ति होय उफराटी । तैशा किंकिणी क्षुद्रघंटी । अधोमुख मेखलेशीं ॥ ३१ ॥ अतिशयेंसी माजू साना । होता अभिमान पंचानना । देखोनी श्रीकृष्णमध्यरचना । लाजोनि राना तो गेला ॥ ३२ ॥ पहावया कृष्णमध्यरचना ॥ चित्रींचीं लेपे जाहलीं जाणा । सांडूनि अंगींच्या अभिमाना । मेखले खेवणा स्वयें जडिले ॥ ३३ ॥ नाभीशीं नाभी नाभिता । देऊनि स्थापिला विधाता । तेथीचा तो पार पाहतां । विधाता पैं नेणेचि ॥ ३४ ॥ म्हणोनी पद्मनाभी नांवा । उदरीं त्रैलोक्याचा सांटोवा । जेवीं सागरामाजी ठेवा । तरंगांचा पैं केला ॥ ३५ ॥ सागरीं लहरीची नव्हाळी । तैसी उदरीं त्रिगुणत्रिवळी । कर्माकर्म रोमावळी । बहिर्मुखें वाढलिया ॥ ३६ ॥ नकळे ह्रदयींचें महिमान । उपनिषदां पडलें मौन । तेथेंही संचरले सज्जन । देहाभिमान सांडोनी ॥ ३७ ॥ शून्य सांडोनि निरवकाश । तेंचि कृष्णह्रदय सावकाश । संतीं केला रहिवास । वृत्तिशून्य होऊनि ॥ ३८ ॥ तया पदीं जे सुलीन । तेचि जडीत पदक जाण । मुक्त मोतिलग संपूर्ण । गुणेंविण लेइलासे ॥ ३९ ॥ ज्ञानवैराग्य शुक्तिसंपुटीं । निपजलीं मुक्त मोतियें गोमटी । तेचि एकावळी कंठीं । श्रीकृष्णाचे शोभत ॥ ४० ॥ जनविजन समान कळा ॥ तेचि आपाद वनमाळा । शांति निजशांति निर्मळा । रुळे गळां वैजयंती ॥ ४१ ॥ ओंकार मातृकांसकट । तोची जाणावा कंबुकंठ । तेचि वेदांचे मूळपीठ । तेथूनि प्रगटे त्रिकांडी ॥ ४२ ॥ खणोनि उपनिशदांची खाणी । अर्थ काढिला शोधूनि । तोचि कंठीं कौस्तुभमणी । निजकिरणीं झळकत ॥ ४३ ॥ गगनगजाचे शुंडादंड। तैसे सरळ बाहुदंड । पराक्रमे अतिप्रचंड । अभयदानीं उदित ॥ ४४ ॥ पंचभूतें भिन्नभिन्न । तैसा आंगोळीया जाण । तळहात तो अधिष्ठान । पांचही मिळति एकमुष्टी ॥ ४५ ॥ चहूं खाणीं क्रियाशक्ती । त्या चारी भुजा शोभती । आयुधें वसविली हातीं । कवणे स्थिती पाहा पां ॥ ४६ ॥ अत्यंत तेजें तेजाकार । द्वेतदलनीं सतेज धार । तेंचि धगधगती चक्र । अरिमर्दनीं उद्भट ॥ ४७ ॥ घायें अभिमान करी चेंदा । तेंचि झळकत पैं गदा । नि:शब्दीं उठवी शब्दा । वेदानुवाद पांचजन्य ॥ ४८ ॥ अभेदभक्त मज भेटती । तेव्हां सुमनें कैंची मिळती । त्यांचिये पूजेलागी हातीं । ह्रदयकमळ वाहतसे ॥ ४९ ॥ बाहुवटे कीर्तिमुखें । चारीं वेद जाहले सुखें । करीं कंकणें जडित माणकें । वार्तिकांत वेदांत ॥ ५० ॥ यंत्रउभवणी उपासकां । त्याचि आंगोळीयां मुद्रिका । त्रिकोण षट्‍कोण कर्णिका । जडित माणिका आगमोक्त ॥ ५१ ॥ पूर्वोत्तरमीमांसा दोनी । कुंडलें जाहलीं कृष्णकर्णी । तीं उपनिषदर्थकिरणीं । झळकताती सतेज ॥ ५२ ॥ एक म्हणती साकार । एक म्हणती निराकार । परी साकार ना निराकार । श्रवणें विकार मावळती ॥ ५३ ॥ गाळोनियां मोक्षसुख । तेथींचा मुसावोनि हरिख । तेंचि कृष्णाचे श्रीमुख । नित्य निर्दोष मिरवित ॥ ५४ ॥ उपमे चंद्रकळा गहन । तो तंव कृष्णपक्षीं क्षीण । उदय अस्ताविण संपूर्ण । वदनेंदु कृष्णाचा ॥ ५५ ॥ उपमेरहित हनुवटी । पाहतां प्रेम दुणावे पोटीं । त्रैलोक्यसौंदर्य एकवटी । दाविताहे दृष्टी निमासुरा ॥ ५६ ॥ जीवशिव एकाकार । तैसे मीनले दोन्ही अधर । माजी दंतपंक्ती तेजाकार । चिदानंदे झळकती ॥ ५७ ॥ नास्तिका देऊनि नास्तिक । उंचावलें तें नासिक । पवन हिंडता पावला दु:ख । कृष्णश्वासें सुखी जाला ॥ ५८ ॥ विशाळ डोळे चैतन्यपणें । तेथें विसावों आले पाहते पाहणें । आपआपणिया देखणें । सबाह्याभ्यंतर समदृष्टी ॥ ५९ ॥ ज्ञानअज्ञानांचीं पातीं । मिथ्यापणें लवत होती । तेहीं सारूनि मागुती । सहजस्थिती पहातसे ॥ ६० ॥ अधिष्ठान विशाळभाळीं । तैसी शोभा कपाळीं । सच्चिदानंद एकमेळीं । तोच त्रिवळीं ललाटीं ॥ ६१ ॥ उगाळूनि अहंपण । सोहं काढिलें शुद्धचंदन । तेंही केलें कृष्णार्पण । निजभाळीं मळवट ॥ ६२ ॥ सपूर गगनांकुर सरळ । तैसीं मस्तकीं केश कुरळ । कृष्णमुखेंसी विन्मुख सबळ । अधोगती धांविन्नलें ॥ ६३ ॥ म्हणोनि ऎक्याचिये मुष्टी । आणुति बांधिलें वीरगुंठीं । सहज भावाचिये मुगुटी । मग दाटलें सुबुद्ध ॥ ६४ ॥ तया मुगुटा-तळवटीं । मुक्तमयूरपिच्छा वेंटी । कैसी शोभताहे गोमटी । दृश्यदृष्टीं अतीत ॥ ६५ ॥ सलोक सरूप समीपता । तें तंव सांडी पिसें सर्वथा ॥ देखणेंपणेंविण डोळसता । तेचि माथां स्तबक ॥ ६६ ॥ अलंकारामाजी आवडी । तेथें कृष्णासी अधिक गोडी । तेंचि सांगू विसरली फुडी । चुकी गाढी पडियेली ॥ ६७ ॥ सकळ भूषणांमाजी भूषण । ब्राह्मणाचा दक्षिण चरण । ह्रदयीं वाहे नारायण । श्रीवत्सलांच्छन गोविंद ॥ ६८ ॥ श्रीकृष्णाची कृष्णमूर्ती । लावण्य आलें त्रिजगतीं । बरविया बरवा श्रीपती । वाचा किती अनुवादों ॥ ६९ ॥ जें जें अत्यंत सुंदर दिसे । तें ते कृष्णाचेनि लेशें । डोळियां तेणें लाविले पिसें । जालीं मोरपिसें हरिअंगी ॥ ७० ॥ सौंदर्याचा अभिमान । मदनाआंगी संपूर्ण । तेणें देखोनिया श्रीकृष्ण । स्वदेहासी विटला ॥ ७१ ॥ मदनें कृष्ण देखिला साङ्‌ग । अंग जाळूनी जाला अनंग । पोटी येऊनियां चांग । उत्तमांग पावला ॥ ७२ ॥ बरवेपणें मीच मोठी । हें होतें लक्ष्मीचे पोटीं । कृष्ण देखोनियां दृष्टी । तेही उफराटी जाहली ॥ ७३ ॥ रूपा भाळोनिया कैसी । रमा झाली परम पिसी । लक्ष्मी नावडे देवासी । जाली दासी पायांची ॥ ७४ ॥ कृष्ण देखिला जिये दृष्टी । ते परतोनि मागुती नुठी । अधिकाधिक घाली मिठी । होय तल्लीन हरिरूपीं ॥ ७५ ॥ कृष्ण पहावयाच्या लोभा । नयनीं नयनासी निघती जिभा । श्रवणी श्रवणासी वल्लभा । अभिनव शोभा कृष्णाची ॥ ७६ ॥ कृष्णरस जे सेवित । तयांसी फिकें होय अमृत । अमर अमृतातें सेवित । तेही चरफडित । हरिरसा ॥ ७७ ॥ श्रिया वाखाणितां अमरेंद्र । कृष्ण इंद्राचाही इंद्र । क्षय पावती इंद्र चंद्र । कृष्ण नरेंद्र अक्षयी ॥ ७८ ॥ असुर सुरां उत्थापिती । ते गार्‍हाणें हरीसीं देती । इंद्र चंद्र प्रजापती । तेही चरफडती हरिपदा ॥ ७९ ॥ ते वेळीं कृष्णनाथ । कंस केशिया करी घात । देवा निजपदीं स्थापित । अमरनाथ श्रीकृष्ण ॥ ८० ॥ कृष्णऎसा त्रिशुद्धी । उदार न देखें स्वात्मबुद्धी । सेवकां बैसवी निजपदीं । अक्षय सिद्ध देऊनियां ॥ ८१ ॥ जे नेदी देवकीयशोदेसी । ते गति दिधली पूतनेसी । समान येणें अरिमित्रांसी । उदारतेसी काय वानूं ॥ ८२ ॥ निजपदातें श्रीकृष्णनाथ । सद्भक्तांसी आपण देत । आपण होय भक्तांकित । राहे तिष्ठत तयांपासी ॥ ८३ ॥ भक्ताआज्ञा मानी मोठी । सिंह सूकर होय जगजेठी । प्रकटला कोरडिये काष्ठीं । वचनासाठीं भक्ताच्या ॥ ८४ ॥ ऎसा धीरवीर उदार । गुणागुणी गुणगंभीर । पृथ्वीवरी यदुवीर । दुजा नाहीं सर्वथा ॥ ८५ ॥ कृष्णचरणींचा आराम । पाहातां विसरें क्रियाकर्म । समाधी तेथे विश्राम । मनोरम हरिपदीं ॥ ८६ ॥ कृष्णरूपाची प्राप्ती । भीमकी सादर श्रवणार्थी । ह्रदयीं आविर्भवली मूर्ती । बाह्यस्फूर्ति मावळली ॥ ८७ ॥ आंग जाहलें रोमांचित । कंठी बाष्पें पैं दाटत । शरीर चळचळां कांपत । पडे मूर्च्छित धरणीये ॥ ८८ ॥ एक म्हणती धरा धरा ॥ एक पल्लवें घालिती वारा । एक म्हणती हे सुंदरा । कृष्णकीर्तनें झडपलीं ॥ ८९ ॥ भक्तीपाशीं भावना जाये । तैसी धांविन्नलि धाये । झणी दृष्टी लागेल माये । म्हणोनि कडिये घेतली ॥ ९० ॥ रायासी कळलें चिन्ह । ईस जाहले कृष्णश्रवण । तेथेंचि वेधलें असे मन । कृष्णार्पण हे करावी ॥ ९१ ॥ मनीं धरोनि हाचि भाव । अंत:पुरा आला रावो । रुक्मिणीसी कृष्णनाहो । राणिये रावो पुसतसे ॥ ९२ ॥ मग बोलली शुद्धमती । हेंचि होतें माझिये चित्तीं । कन्या अर्पावी श्रीपती । पुण्य त्रिजगतीं न समाये ॥ ९३ ॥ वर मानला आम्हांसी । कन्यादान श्रीकृष्णासी । तरीच सार्थकता जन्मासी । दोहीं पक्षांसी उद्धार ॥ ९४ ॥ विकल्परुक्मिया कृष्णद्वेषी । वचन न मानेचि त्यासी । काय म्हणावे वडिलांसी । गोवळीयासीं सोयरीक ॥ ९५ ॥ कृष्ण अगुणांचा अरूप । कन्या सुगण अतिस्वरूप । दोहींशीं घटिताचा विकल्प । शून्य संकल्प सोयरिकें ॥ ९६ ॥ रुक्मिया कृष्णनिंदा करित । वाग्देवता स्तुति वदत । निंदेसी वागेश्वरी भीत । पाप अद्‍भुत निंदेचे ॥ ९७ ॥ एका जनार्दनीं विनवित । निंदेमाजी स्तुति होत । श्रोतीं तेथें ठेवुनि चित्त । कथा निश्चित परिसावी ॥ ९८ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे प्रथम: प्रसंग: ॥ १ ॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ दुसरा श्रीगणेशाय नम: । कृष्णासी शरीरसंबंध । हा तंव बोलचि अबद्ध । वडीलपणें घेतला छंद । बुद्धिमंद म्हातारा ॥ १ । कृष्णासी सोयरिक न ये कामा । हें काय कळलें नाहीं तुम्हां । सखा मारिला अहंमामा । तो काय आम्हां धड होईल ॥ २ ॥ एक म्हणती नंदाचा । एक म्हणती वसुदेवाचा । ठाव नाहीं बापाचा । अकुळी साचा श्रीकृष्ण ॥ ३ ॥ मुळींचा नाहीं जन्मपत्र ॥ कवण जाणे कुळ गोत्र । कृष्ण नव्हे जी स्वतंत्र । भक्तपरतंत्र सदाचा ॥ ४ ॥ कर्म पहातां परद्वारीं । गोरसाची करी चोरी । धरितां न धरावें निर्धारीं । चोरटा हरी चित्ताचा ॥ ५ ॥ गाईपाठीं धांवता । पळूं शिकला तो तत्त्वतां । काळयवनापुढें पळतां । झाला रक्षिता मुचुकंद ॥ ६ ॥ कृष्ण वीर नव्हे गाढा । पळाला जरासंधापुढां । भेणें समुद्राचिया आगडा-माजी दुर्ग बसविले ॥ ७ ॥ केशिया मारिला तटू । बैल मारिला अरिष्टू । इतकियासाठीं वीर बाठू । केवीं सुभटू म्हणावा ॥ ८ ॥ मारिले वत्सासुर वासरूं । बकासुर तें पांखरूं । किरडूं मारिलें अघासुरू । इतुकेनि वीर केंविं होय ॥ ९ ॥ कृष्णासी उघड नाहीं वर्तणें । सदा संसारीं लपणें । त्याचीं मी जाणें विंदाणें । लपतीं स्थानें तीं ऎका ॥ १० ॥ चढे वैकुंठींचे पाहाडीं । क्षीरसागरीं देतसे बुडी । शेषाचिये फणें दडी । मिषें निद्रेचेनि राहे ॥ ११ ॥ विघ्न देखोनिया थोर । होय मत्स्य कीं सूकर । नातरी पाठी करोनि निबर । रूप धरी कमठाचें ॥ १२ ॥ दैत्य देखोनिया भारी । खांबामाजी गुरगुरी । बळें काढिलिया बाहेरी । नरसिंह होऊनि ठेला ॥ १३ ॥ दैत्य देखोनिया सबळ । जाहला भिकारी केवळ । बळीनें केला द्वारपाल । गळां बांधोनि द्वारासी ॥ १४ ॥ सवेचि खुजटपण सांडिले । रूप अणिकचि मांडिलें । दैत्यफळकट काढिले । मजुर जाहले मायेचे ॥ १५ ॥ राखितां इंद्राची गाय । दैत्यें मारिली माय । रडे ये माय माय । सांगूं काय तयाचें ॥ १६ ॥ थोर मांडिलें सांकडें ॥ तैसें मेळविली माकडें । आतांचि पाहा रोकडें । गोवळियांपुढें नाचतसे ॥ १७ ॥ कृष्णाची आणिक कहाणी । तो स्त्री जाहला मोहिनी । सुरां-असुरां ठकवूनी । महादेव मोहिला ॥ १८ ॥ शेखीं जाहला म्हाळसा । वास केला त्या निवासा । त्याचेनि धर्में राहूं कैसा । रविचंद्रासी लागला ॥ १९ ॥ कृष्णांसी नाहीं रूप गुण । न देखॊं एकदेशी स्थान । तयासी कैंचें सिंहासन । वृत्तिशून्य वर्ततसे ॥ २० ॥ कृष्णासी नाही देहाभिमान । कदा नेणे मानापमान । तयाचे गांठी कैंचे धन । भाजीचे पान खातसे ॥ २१ ॥ कृष्णाचा भाव एक । नव्हे स्त्री पुरुष ना नपुंसक । पाहतां निश्चयो एक । नव्हे निष्टंक निर्धारें ॥ २२ ॥ जयासी माया दोन पाहीं । दोघीं वर्तती दोन ठायी । एक देही एक विदेही । देवकीही यशोदा ॥ २३ ॥ एकीं स्वबोध उपजविती । दुजी वाढवी विषयप्रीती । दोघी सांडुनि तळमळती । धर्माप्रती धांविन्निला ॥ २४ ॥ उच्छिष्ट काढी धर्माघरी । ब्राह्मणाची भीड थोरी । लाथ हाणीतली उरावरी । तें पद मिरवी निलाजरा ॥ २५ ॥ तया कृष्णासीं सोयरीक करणें । तेंचि आम्हां विटंबवाणे । सदा संसारी लपणें । लाजिरवाणे लोकांत ॥ २६ ॥ तयासी द्यावें जी भावंड । तैं आमुचें काळें तोंड । या बोलासी म्हणाल पाखंड । तरी ज्ञातें उदंड तुम्हांपाशी ॥ २७ ॥ कृष्ण अतीत चहूं वाचा । तेथें वाग्निश्चयो घडे कैंचा । शब्दनिश्चयो नव्हे साचा । सत्य वाचा हे माझी ॥ २८ ॥ बोला भाके जो सांपडे । तयासी वाग्निश्चयो घडे । हें तंव अवघेचि कुडें । जाणत वेड का होतां ॥ २९ ॥ कुळकर्माचा अंतू । आपणांसकट सकळांचा घातू । करणे असेल जीवा अंतू । तरी कृष्णनाथू वरावा ॥ ३० ॥ जैसे निजतत्त्व निर्मळ । तैसा राया राहें निश्चळ । कुळाभिमानी सबळ । देहसंबंध मी जाणे ॥ ३१ ॥ जन्म कर्म कुळ गोत्र । उंच नीच वर्ण विचित्र । कर्माचें जें कर्मतंत्र । जाणता स्वतंत्र मी एकूं ॥ ३२ ॥ शरीरसंबंधाचें कारण । घटित आहे मजआधीन । प्रकृतिपुरुषां पाणिग्रहण । माझेनि जाण होतसे ॥ ३३ ॥ वचन ऎका प्रबळ । चैद्यदेशीं भूपाळ । महा अभिमानी शिशुपाळ । सोयरा केवळ तो आम्हां ॥ ३४ ॥ शरीरसंबंधाचे घटित । तयाशींचे आहे निश्चित । तुम्ही बैसलेति पंडित । उचितानुचित विचारा ॥ ३५॥ कर्मकांडीचे वेदपाठक । बोलावूनि ज्योतिषी गणक । वाग्निश्चयाचे वाग्जाळिक । शास्त्रें शाब्दिक सोडिलीं ॥ ३६ ॥ मेळा पांचां पंचकांचा । शब्दनिश्चयो तेणें साचा । साभिमान गर्जे वाचा । सोयरा आमुचा शिशुपाळ ॥ ३७ ॥ रुक्मिणी काया मनें वाचा । निश्चय केला श्रीकृष्णाचा । बाहेर वाग्निश्चय शब्दाचा । शिशुपाळासी रुक्मिया ॥ ३८ ॥ लग्नपत्रिका पाहतां डोळां । एक नाडी जी शिशुपाळा । कृष्ण नेईल भीमकबाळा । यासी अवकळा वरील ॥ ३९ ॥ वर शिशुपाळा ऎकतां । दचकली ते राजदुहिता । जैसा सिद्धासी सिद्धिलाभ होता । उठे अवचिता अंतराय ॥ ४० ॥ कवण उपासूं गे देवता । कवणकवणा जावे तीर्था । कवण नवस नवसूं आतां । कृष्णनाथप्राप्तीसी ॥ ४१ ॥ जैसा सद्‍बुद्धीआड कामक्रोधू । कां विवेकाआड गर्वमदू । स्वधर्माआड आळससिंधू । तैसा बंधु रुक्मिया ॥ ४२ ॥ जैसा सविवेक वैरागी । विघ्ने जिणोनी जाय वेगीं । तैसा प्रयत्‍न कृष्णालागीं । करीन स्वांगीं मी देखा ॥ ४३ ॥ कृष्णप्राप्तीचा विचारू । तेथे करूं नये दुजियाचा संचारू । वृत्ति करावी तदाकारू । धैर्यबळें आपुलेनी ॥ ४४ ॥ गुज सांगूं मायेपाशीं । परी साध्य नव्हे तियेसी । रडूं निघेल मोहेंसीं । मिठी लोभेंसीं घालूनी ॥ ४५ ॥ माझिया आशेचिया साजणी । दीन तृष्णेच्या ब्राह्मणी । मिळतील सद्वासना सुवासिनी । मज वेढूनि घेतील ॥ ४६ ॥ तेणें होईल थोर शब्दू । ऎकेल अभिमानिया बंधू । कृष्णप्राप्तीसी अवरोधू । सबळ क्रोधू उपजेल ॥ ४७ ॥ ऎसें विचारूनि जाण । निजभावाचा ब्राह्मण । आप्त पाचारिला सज्ञान । अतिगहन विवेकी ॥ ४८ ॥ कृष्णप्राप्तीचा सद्भावो । यालागीं तो सुदेवो । कृष्ण प्राप्तीसी धाडिला पहा हो । निजपत्रिका देवोनी ॥ ४९ ॥ सातां श्लोकांची व्युत्पत्ती । उपाव भाव आर्तकीर्ती । विवेक निश्चयो निजभक्ती । कृष्णासी विनंती पाठविली ॥ ५० ॥ एका जनार्दनीं मन । श्रोतीं व्हावें सावधान । प्रेमपत्रिकेचें लेखन । अनुसंधान भीमकीचें ॥ ५१ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे द्वितीय: प्रसंग: ॥ २ ॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग तिसरा श्रीवासुदेवाय नम: ॥ आपुले आर्तीचे अंजन । शुद्धसत्वाचे पत्र जाण । बुद्धिबोधे लेखन । वर्णाक्षरीं अक्षर ॥ १ ॥ मनोवेगाचा पैं वारु । त्यावरी बैसविला द्विजवरू । कृष्णापासी सत्वरू । समूळ मूळ पाठविला ॥ २ ॥ माझे पूर्णपुण्ये तूं द्विजवरु । कृष्णप्राप्तीसी मज तूं गुरु । म्हणवोनि केला नमस्कारू । वेगी यदुवीरू आणावया ॥ ३ ॥ स्वामिचरणीं ठेविला माथा । द्वारकेसी जावें जी तत्त्वतां । प्राण वांचवा हो आतां । वेगीं कृष्णनाथा आणावें ॥ ४ ॥ द्विज पावला द्वारका । वैकुंठ कैलासांहूनि अधिका । जेथें निवास जगन्नायका । विश्वव्यापका श्रीकृष्णा ॥ ५ ॥ द्वारकाबाह्यप्रदेशीं । आराम रमवी जीवशिवांसी । वसंत विनवी सदा सुमनेंसी । संताप कोणासी असेना ॥ ६ ॥ प्रेमें विकासलीं कमळें शुद्ध । रुंजी करिता कृष्ण षट्‌पद । ऎकोनि गंधर्व जाहले स्तब्ध । सामवेद मौनावले ॥ ७ ॥ प्रबोध पारवे घुमघुमती । तेणे वागेश्वरी चमके चित्ती । विस्मित जाहला बृहस्पती । आश्चर्य मानिती सुरवर ॥ ८ ॥ डोलतीं पैं द्राक्षांचे घड । मुक्त परिपाके अतिगोड । सकळ कामाचे पुरे कोड । गोडाही गोड ते गोडी ॥ ९ ॥ कोकिळा कृष्णवर्ण कूजती । शब्द नि:शब्द मधुर वृत्ती । तेणें सनकादिक सुख पावती । प्रजापती तटस्थ ॥ १० ॥ मयूर आनंदे नाचत । अप्सरानृत्य तेणें तटस्थ । तांडव विसरले उमाकांत । अतिअद्‌भुत हरिलीला ॥ ११ ॥ शुद्ध हंस द्वारकावासी । मुक्तमोतियें चारा त्यांसी । तें देखोनियां परमहंसी । निजमानसी लाळ घोटी ॥ १२ ॥ शुक पिंगळे अनुवादत । तेणें वेदान्त दचकत । अतिगुह्याचे गुह्यार्थ । पक्षी बोलत द्वारकेचे ॥ १३ ॥ इतर नगरांची उभवणी । तिखणावरी पांचखणी । त्यांहीमाजी अतिदुखणी । द्वारकापट्टणीं तें नाहीं ॥ १४ ॥ द्वारका पाहतां वाडेकोडें । विजू पिळूनि घातले सडे । मुक्त पताका चहूंकडे । मशक त्यांपुढे सत्यलोक ॥ १५ ॥ द्वारकेची नवलपरी । चिंतामणीची चिंता हरी । कल्पतरूची कल्पना वारी । परियेसाची निवारी । जडत्व काळीमा ॥ १६ ॥ दशेचें दैन्य निवडी । अमृताची साल काढी । स्वानंदाची उभवी गुढी । नांदे उघडी द्वारका ॥ १७ ॥ द्वारकेमाजी शुद्ध केणें । दों अक्षरांचें खरें नाणें । जैसें घेणें तैसें देणें । कोणासी उणें असेना ॥ १८ ॥ वैकुंठीचिया वैभवासी । कृष्णें आणिलें द्वारकेसी । देखतां ठक पडलें द्विजासी । ते द्वारका कैसी वर्णावी ॥ १९ ॥ द्विजासी सत्वरता मोठी । नगर न पाहावेचि दृष्टीं । भीतरी पातला उठाउठी । जेथें जगजेठी श्रीकृष्ण ॥ २० ॥ म्हणवुनी द्वारकावर्णन । रहावयाचें हेंचि कारण । द्विजासी देखिला श्रीकृष्ण । विस्मित मन तयांचें ॥ २१ ॥ हेमसिंहासनीं आदिमूर्ती । बैसला असे सहजस्थिती । द्विजासी देखोन श्रीपती । भाव चित्तीं जाणिला ॥ २२ ॥ याचिया आगमनविधी । थोर होईल कार्यसिद्धी । फावली एकांतांची संधी । होय सद्‍बुद्धि ब्राह्मण ॥ २३ ॥ सिंहासनाखालती उडी । घालूनि दोन्हीं कर जोडी । नमन साष्टांगपरवडी । पूजी आवडी द्विजातें ॥ २४ ॥ अमर करिती कृष्णपूजा । तैशियापरी पूजी द्विजा । ब्राह्मणदेव कृष्णराजा । ब्राह्मणपूजा तो जाणे ॥ २५ ॥ ब्राह्मणासी मंगलस्नान । देऊनि पीतांबर सुमन चंदन । सन्निध बैसोनि आपण । दिधलें भोजन यथारुचि ॥ २६ ॥ शय्या घालुनि एकांती । अरळ सुमनांची निगुती । विडिया देऊनि श्रीपती । शयन करविती द्विजातें ॥ २७ ॥ कृष्ण बैसोनियां शेजारी । ब्राह्मणाचे चरण चुरी । येरू म्हणे गा श्रीहरी । करीं धरी कृष्णातें ॥ २८ ॥ ऎकें स्वामी देवाधिदेवा । आम्हीं करावी तुझी सेवा । तूं पूजितोंसी भूदेवा । ब्राह्मण देव म्हणवूनिया ॥ २९ ॥ निजात्मभावें उचितें । ह्रदयीं साहिले लाथेतें । तें हित नव्हेचि आमुतें । विपरीतार्थ फळला असे ॥ ३० ॥ तुझिया पूजा पूज्य जाहलों । तेणें गर्वासी चढिन्नलों । कृष्णसेवेसी नाडलों । थोर वाढलों अभिमानें ॥ ३१ ॥ तूं यज्ञपुरुष नारायण । तुज याज्ञिक नेदिती अन्न । वृक्षा गेलें त्यांचें हवन । कर्मठपण कर्माचें ॥ ३२ ॥ सर्वांभूती भगवद्भावो । नपुजे तंव न भेटे देवो । तैसा मी ब्राह्मण नोहें पाहा हो । जाणसी भावो ह्रदयींचा ॥ ३३ ॥ कृष्णें पुशिलें स्वागत । वृत्ति आहे की निश्चित । चित्तीं चिंता ज्या वर्तत । ते दुश्चित सर्वदा ॥ ३४ ॥ जयाची चिंता निवर्तली । तयाची वृत्ति सुचित जाहली । त्यासीच स्वकर्मे फळलीं । निजात्मफळाचेनि फळें ॥ ३५ ॥ असोनि इंद्राची संपत्ती । तृप्ती नाहीं जयाचे चित्तीं । ते अतिशय दु:खी होती । विटंबिजेती संसारीं ॥ ३६ ॥ असोनिया अकिंचन जयाची वृत्ति समाधान । तेणें अजिता मातें जिंकिले जाण । बंदीजन मी तयाचा ॥ ३७ ॥ सर्वांभूती भगद्भावो । त्यावरी स्वधर्मनिष्ठ भूदेवो । त्याचिया पाऊलापाऊलीं पाहा वो । सर्वांग वोडवीं ॥ ३८ ॥ ऎसिये निष्ठेचे जे ब्राह्मण । ते मज सदा पूज्य जाण । त्यांचे नमस्कारीं मी चरण । वारंवार मस्तकीं ॥ ३९ ॥ कृष्णदर्शनें समाधान । ब्राह्मणासी पडिलें मौन । विसरला कार्याची आठवण । जाणोनि प्रश्न हरि करी ॥ ४० ॥ कोठोनि येणें झालें स्वामी । कवण ग्राम कवण भूमी । तुमचे देशींचा देशस्वामी । प्रजा स्वधर्मी पाळी कीं ॥ ४१ ॥ दुर्गम मार्ग अति संकटीं । क्रमूनि आलेति आमुचे भेटीं । कवण इच्छा आहे पोटीं । ते गुह्य गोष्टी सांगावी ॥ ४२ ॥ आम्ही केवळ ब्राह्मणभक्त । आज्ञा करणें हें उचित । काय अपेक्षित तुमचें चित्त । ते निश्चित मी करीन ॥ ४३ ॥ कवण कार्याचिये विधी । तुम्ही आलेति कृपानिधी । ते झाली कार्यसिद्धी । जाणा त्रिशुद्धी सर्वथा ॥ ४४ ॥ ऎकोनि कृष्णमुखींची गोष्टी । द्विजें बांधिली शकुनगाठी । हर्ष वोसंडला पोटीं । आनंद सृष्टी न समाये ॥ ४५ ॥ म्हणे वैदर्भदेशीचा राजा भीमक । जैसा वैराग्यामाजी विवेक । भागवतधर्मी अतिधार्मिक । शुद्ध सात्त्विक सत्त्वाचा ॥ ४६ ॥ त्याची कन्या चिद्रत्‍न । लावण्य गुणें गुणनिधान । सकळ भूषणांचे भूषण । तें मंडन तिन्हीं लोकी ॥ ४७ ॥ उदार धीर गुणगंभीर । सज्ञान ज्ञानें अतिचतुर । तुझ्या ठायीं अतितत्पर । कलत्रभावें विनटली ॥ ४८ ॥ पित्याने तुम्हांसी दिधली वधू । ऎकुनि हांसिन्नला गोविंदू । हरिखें न सांभाळे स्वानंदू । द्विजासी क्षेम दीधले ॥ ४९ ॥ जें होतें कृष्णाचे पोटीं । तेंचि द्विजें सांगितली गोष्टी । जीवी जीवा पडली मिठी । पाठी थोपटी द्विजाची ॥ ५० ॥ आणिक एक संवादू । तिचा ज्येष्ठ बंधू विरोधू । तेणें शिशुपाळा दिधला शब्दू । लग्न परवा धरिलेंसे ॥ ५१ ॥ येचिविषयीं यदुनायका । आहे भीमकीची पत्रिका । ते वाचूनियां सविवेका । कार्यसिद्धी करावी ॥ ५२ ॥ मग काढिली पत्रिका । कुममंडित सुरेखा । धीर न धरवेचि हरिखा । आवडी देखा चुंबिली ॥ ५३ ॥ पत्रिका देखोनि कृष्णनाथ । श्रवणार्थी आर्तभूत । एका जनार्दनी विनवीत । पत्रिकार्थ परिसावा॥ ५४ ॥ इति श्रीमद‌भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे पत्रिकावलोकनं नाम तृतीय: प्रसंग: ॥ ३ ॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग चौथा श्रीयशोदातनयाय नम: । ॐ नमो जी यदुवीरा । तूं निर्विकार नोवरा । मज न्यावे निजमंदिरा । क्रोधादिक असुरां दमूनी ॥ १ ॥ मज वडील माझा बंधू । जेणें तुजशीं विन्मुख बोधू । ज्याचेनि नीचांशीं संबंधूं । निवारूनि वधू त्या करावी ॥ २ ॥ ऎका भीमकीची वित्पत्ती । पत्रिका लिहिली चवथे भक्ती । वाचितांची भक्तपती । सहजस्थिती धांविन्नला ॥ ३ ॥ रुक्मिण्युवाच ॥ श्रुत्वा गुणान् भवनसुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्णविवरैर्हरतोऽङ्‌गतापम् । रूपे दृशां दृशिमतामखिलार्थलाभं त्वथ्यच्युतायिशति चितमपत्रपं मे ॥ १ ॥ ऎके त्रैलोक्यसुंदरा । सकळसौंदर्यवरागरा । तुझेनि सौंदर्ये सुरनरां । सुंदरत्व वर्णिजे ॥ ४ ॥ तुझी सुधाकर कीर्ती । श्रवणश्रवणा प्रकाशिती । त्रिविध ताप अस्त पावती । जेवीं गभस्ती खद्योत ॥ ५ ॥ ऎशियाची स्वरूपप्राप्ती । चारी मुक्ती दासी होती । सकळ स्वार्थ पायां लागती । ज्या देखती त्या निजलाभ ॥ ६ ॥ क्षय नाहीं गा निश्चित । यालागीं नामें तूं अच्युत । तुझिया ठायीं निर्लज्ज चित्त । अतिसुरत कृष्णसखा ॥ ७ ॥ का त्वा मुकुंद महती कुशलशील रूपविद्यावयोद्रविणधामभिरात्मतुल्यम् । धीरा पतिं कुलवती न वृणीत कन्या काले नृसिंह नरलोकमनोऽभिरामम् ॥ २ ॥ मन-विश्रांतीचा निजबोधू । म्हणवूनि नांवें तूं मुकुंदू । सकळ सुखाचा आनंदकंदू । तुज कोण वधू वरीना ॥ ८ ॥ कुळ शीळ धन रूप । विद्या वयसा अतिस्वरूप । शांति कांति तेज अमूप । करिती तप तुजलागीं ॥ ९ ॥ ऎशी लावण्यगुणसंपत्ती । धीरवती आणि सती । त्याही तुजसमान वर न पावती । तेथें मी किती वराक ॥ १० ॥ ऎकें नरवीरपंचानना । प्राप्तकाळीं पाणिग्रहणा । तुज कोण वरीना अंगना । मनमोहन श्रीकृष्णा ॥ ११ ॥ म्हणसी मी सोयरा अति काळा । बोलावितेसी विवाह - मेळा । तरी पाणीग्रहण जी शिशुपाळा । तो काळांतकाळ मजलागी ॥ १२ ॥ ते काळीं त्वां नुपेक्षावें । हेंचि मागें जिवेंभावें । मज दीनातें उद्धरावें । धांवें पावें लग्नासी ॥ १३ ॥ तन्मे भवान् खलु वृत: परिरंग जायामात्मर्पितश्च भवतोऽत्र विभो विधेहि ! मा वीरभागमभिमर्शतु चैद्य आराद्वोमायुवन्मृगपतेर्बलिमंबुजाक्ष ॥ ३ ॥ माने वाचा आणि काया । निर्धारेंशीं तुझी जाया । मी झाल्यें असें यदुराया । विवाह त्वां कीजे ॥ १४ ॥ तूं तंव पर गा प्रकृती । तुज नावडे स्त्रियांची संगती । उपेक्षिसी माझी विनंती । थोर अपकीर्ती तुज तेव्हां ॥ १५ ॥ मी तव तुझेंचि अर्धांग । केवीं शिशुपाळ शिवे माझें आंग । तूं शिरावरी असतां श्रीरंग । मी वीरविभाग यदुवीर ॥ १६ ॥ कृष्णकेसरीची संपत्ती । चैद्यजंबुक जैं गा नेती । कमळनयना कमळापती । थोर अपकीर्ती होईल ॥ १७ ॥ पूर्तेष्टदत्तनियमव्रतदेवविप्रगुर्वर्चनादिभिरलं भगवान् परेश: ॥ आराधितो यदि गदाग्रज एत्य पाणिं गृह्यतु मे न दमघोषसुतादयोऽन्ये ॥ ४ ॥ तरीच साधेल हें लग्न । जरी म्यां केले असेल भगवद्भजन । ब्रह्मभावें ब्राह्मणपूजन । देवतार्चन हरीचें ॥ १८ ॥ इष्ट जे कां यागादिक । वापी कूप आराम देख । गोभूरत्‍नदानादिक । त्याहून अधिक अन्नदान ॥ १९ ॥ व्रत जें कां एकादशी । पूजाविधि जागरणेंशीं । ब्राह्मणभोजन द्वादशीसी । भगवंताशीं वल्लभ ॥ २० ॥ सकळ धर्माचा पैं धर्म । गुरु तोचि परब्रह्म । ऎसा केला असेल नेम । तरी पुरुषोत्तम मज पावे ॥ २१ ॥ व्रत तप यज्ञ दान । त्याहून अधिक हरींचे ध्यान । निमिषामाजी समाधान । अमन मन होऊनि ठोक ॥ २२ ॥ ऎसोनि साधनें साधिला बोधू । तरी गदू याचा धाकुटा बंधु । वेगीं येऊनि गोविंदू । पाणिग्रहण मज करावें ॥ २३ ॥ परादि वाचा नाहीं सौरस । यालागीं नांवें तूं परेश । भीमकीलिखितें ह्रषीकेश । तटस्थ होऊनि पैं ठेला ॥ २४ ॥ मज कृष्णें नेलियापाठीं । मागें शिशुपाळाचिया पाठीं । बैसेल अवकळा गोमटी । दोघां गांठीं एकचि ॥ २५ ॥ श्र्वोभाविनी त्वमजितोद्वहने विदर्भान् गुप्त: समेत्य पृतनापतिभी: परीत: । निर्मथ्य चैद्यमगधेंद्रबलं प्रसह्य मं राक्षसेन विधिनोद्वह वीर्यशुल्काम् ॥ ५ ॥ पत्रिका पहावी सावधान । विलंब न करावा व्यवधान । प्रात:काळीं आहे लग्न । ऎसिया समयीं पावावें ॥ २६ ॥ देखोनि लिखिताची तातडी । एकला येऊनि घालिशी उडी । तेव्हां मज म्हणशील कुडी । बुद्धि धडफुडी ऎकावी ॥ २७ ॥ तुझिया निजबोधाची सेना । प्रत्यावृत्ति पाहोनि नयना । स्वानुभवाचेनि भारें जाणा । सावध होऊनि त्वां यावें ॥ २८ ॥ स्वरूप तेचिया मदगजा । गुढार घालावें जी वोजा । प्राणपान जिणती पैजा । तैसे वारू पालाणीं ॥ २९ ॥ जिणोनि जाती मनोरथ । तैसे संजोगावे रथ । चक्रवाटातळीं पर्वत । पीठ होते कर्माचे ॥ ३० ॥ तुझिया निजबोधाचे गाढे । द्वैतदलनीं जे निजगाढे । तेचि यादव करूनि पुढें । सबळबळेंशीं त्वां यावें ॥ ३१ ॥ बाह्य सृष्टी जरी तूं येशीं । तरी तर्क पडेल लोकांसी । कळों नेदितां दुजियासी । गुप्तरूपेंसीं प्रगटावें ॥ ३२ ॥ कृष्णासी शिकविते बुद्धी । म्हणाल चतुर तुम्ही अनादी । ह्रदयशून्य कृष्ण त्रिशुद्धी । वर्तणें बुद्धी माझेनि ॥ ३३ ॥ प्रबळ बळेंशीं सबळ । म्हणाल कां बोलाविते बरळ । तरी माया माहेरी प्रबळ । स्थूळास्थूळ अरिवर्ग ॥ ३४ ॥ सखा जिवलग बंधु सबळ । मागध अष्टधा प्रबळ । मंथोनि चैद्यादि खळ । गज केवळ पर्णावें ॥ ३५ ॥ म्हणशी ढालाची तूं मोठी । गोड बोलाची प्रकृती खोटी । येवढी कां सोसूं आटाटी । म्हणोनि गोष्टी नुपेक्षावी ॥ ३६ ॥ तूं तंव अजिंक्य गा धडफुडा । तुझेनि नावें वाटीव भेडा । मज पर्णावया आळस दवडा । होई गाढा वीरवृत्ती ॥ ३७ ॥ म्हणशी युद्ध मांडेल कडाडी । मी उठेन काढाकाढी । नाहीं लौकिक परवडी । कैची घडी घडवटॆ ॥ ३८ ॥ कैचा अंत्रपाट जाण । कवण म्हणेल सावधान । मीतूंपणा नाहीं व्यवधान । म्हणशी लग्न कैसेनी ॥ ३९ ॥ ऎसेनि लग्न लागलियां पुढां । रणी नाचेल रणधेंडा । वोवाळणी बाण प्रचंडा । परस्परें पडतील ॥ ४० ॥ म्हणशी निधीनें नव्हेल लग्न । अविधीनें करी पाणिग्रहण । येविषयींचे विधान । सावधान परिसावें ॥ ४१ ॥ विवाह तरी बहुतांपरी । पिशाच गांधर्व आसुरी । राजे वरिताती स्वयंवरी । पण महाशूरीं भेदूनि ॥ ४२ ॥ पाणीग्रहण ब्राह्मणांसी । खड्‌गलग्न क्षत्रियांसी । रणीं जिंकोनि महाशूरांशी । राक्षसविधी मज पर्णी ॥ ४३ ॥ जागृती स्वप्नीं सुषप्तिकाळा । तुजवांचोनि न देखें डोळा । ग्लानि लिहिता वेळावेळां । उबग गोपाळा न मानावा ॥ ४४ ॥ आतां ऎकें एक बोल । तुझें वीर्य माझें मोल । अल्प वेंचोनि एक वेळ । दासी केवळ मज करीं ॥ ४५ ॥ अंतपुरांतरचरीमनिहत्य बंधूंस्त्वामुद्वहे कथमिति प्रवदाम्युपायम् । पूर्वेद्युरस्ति महती कुलदेवियात्रा यस्यां बहिर्नववधूर्गिरिजामुपेयात् ॥ ६ ॥ म्हणती अंत:पुरामाजील तूं वधू । काढितां आडवे येतील तुझे बंधू । त्यांचा मजकरितां वधू । दू:खसंबंधू होईल ॥ ४६ ॥ येचिविषयीं जी उपाया । सांगेन ऎकें यादवराया । वेगी यावें अंबालया । यात्रासमया ठाकूनी ॥ ४७॥ कुळींचा कुलधर्म भीमकराया । नगराबाहेर अंबालया । नववधू न्यावी पूजावया । जगदंबेसी कुळधर्म ॥ ४८ ॥ तेचि संधी जी कारण । परस्परें हेचि खूण । तेथें रहूनि सावधान । ओंपुण्या करावें ॥ ४९ ॥ यस्यांघ्रिपंकजरज:स्नपनं महांतोवांछत्युमापतिरिवात्मतमोपहत्यै । यर्ह्यंबुजाक्ष न लभेय भवत्प्रसादं जह्यामसृन्व्रतकृशान् शतजन्मभि: स्यात् ॥ ७ ॥ म्हणसी ऎश्वर्यें थोर इंद्र । रूपें मदन कां चंद्र । हे सांडूनि आग्रह थोर । माझाचि कां करितेसी ॥ ५० ॥ ऎसें न म्हणावें सर्वेश्वरा । कवण जाणे या विचारा । केवळ नव्हेसी तूं नोवरा । जन्मोद्धारा मजलागीं ॥ ५१ ॥ तुझिया चरणींची माती । ब्रह्मादिदेवां नव्हे प्राप्ती । आंगें येऊनि उपापती । स्नान वांछिती पदरजीं ॥ ५२ ॥ महादेवा तमोगुण । त्या तमासी उपशमन । तुझिये चरणींचे रज जाण । लागलें ध्यान शिवासी ॥ ५३ ॥ चरणरजालागीं केवळ । ब्रह्मा जाहला पोटींचे बाळ । तोही न पावे चरणकमळ । नाभिकमळीं स्थापिला ॥ ५४ ॥ त्याचि लाजा जी गोपाळा । चरणजा आला गोकुळा । तुवा ठकविला त्याही वेळा । वत्सें गोवळा जाहलासी ॥ ५५ ॥ हें जाणोनि सदाशिवें । ध्यान मांडिलें जीवेंभावें । ऎशियाची प्राप्ती मी पावें । तै थोर दैवे दैवाचा ॥ ५६ ॥ योग याग तपें तपती । तरी नव्हे तुझी प्राप्ती । मी तंव धीट मोठी चित्तीं । आहें वांछिती अर्धांग ॥ ५७ ॥ पत्रिका वाचितांचि देख । तुवां यावें आवश्यक । मज पर्णून नेदिशी सुख । तरी परमदु:ख होईल ॥ ५८ ॥ तुझी कृपा नव्हतां फूडी । कवण जिणियाची आवडी । देहदंडाची हे बेडी । कोण कोरडी वोढील ॥ ५९ ॥ कृपा न करवेल येथें । तरी मारूनि जा आपुले हातें । मग परलोकीं तरी तूतें । सावकाश भोगीन ॥ ६० ॥ ऎसें घडवितां जरी न घडे । तरी देह करीन मी कोरडें । व्रतें तपें अवघडें । तुज उद्देशें करीन ॥ ६१ ॥ प्राण सांडीन सर्वथा । म्हणसी काय येईल हाता । तरी एका दों पांचां सातां । जन्मशतां वरीन ॥ ६२ ॥ पत्रिका वाचितांचि जाण । जाणवेल शहाणपण । म्या तंव वाहिलीसे आण । तुजवीण अन्य वरीं ना ॥ ६३ ॥ ब्राह्मण उवाच ॥ इत्येते गुह्यसंदेश यदुदेव मयऽऽह्रता: । विमृश्य कर्तुं यच्चात्र क्रियतं तदनंतरम् ॥ ८ ॥ द्विज म्हणे यदुनायका । सेवेशी निवेदिली पत्रिका । ते वाचूनि सविवेका । कार्यसिद्धि करावी ॥ ६४ ॥ पत्रिका वाचितांचि गोपाळा । पुढें भीमकी देखे डोळां । बाहू पसरूनि उतावेळा । उठे वहिला आलिंगना ॥ ६५ ॥ भीमकी भावार्थाची कैसी । चटपट लागली देवासी । निद्रा न लगेचि सेजेसी । उठीबैसी करीतसे ॥ ६६ ॥ नवल वैदर्भीचा भावो । रात्रीं वोसणावे देवो । भीमकी सांडूं नको देहो । आलों पाहा वे पर्णावया ॥ ६७ ॥ जया ह्रदयीं जैसा भावो । तयासी तैसा भेटे देवो । भीमकी कृष्णमय पाहाहो । कृष्णदेवो तन्मय ॥ ६८ ॥ ह्रदयीं नाहीं सत्य भावो । तंव कैसिनी पावे देवो । भीमकी भाग्याची पहा हो । उठिला देवों सत्वर ॥ ६९ ॥ कृष्ण सांगे द्विजाजवळी । रात्रीची अवस्था सकळी । मग हांसोनियां वनमाळी । टाळिया टाळी पिटिली ॥ ७० ॥ एका विनवी जनार्दना । कृष्ण चालिला पाणिग्रहणा । भक्तवचनासी अवगणना । देव सर्वथा न करीचि ॥ ७१ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे चतुर्थ: प्रसंग: ४ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग पाचवा श्रीगणेशाय नम: ॥ सन्नद्ध करितां दळभार । येथें लागेल उशीर । मी एकला एकांगवीर । भीमकी घेऊनि येईन ॥ १ ॥ जो दुजियाची वास पाहे । त्यांचे कार्य कंहींच नोहे । यश कैसेनि तो लाहे । साह्य पाहे सांगातीं ॥ २ ॥ विकल्परुक्मिया मज द्वेषी । तेणें निवारिलें विवाहासी । विटंबूनि त्याचिया मुखासी ॥ रुक्मिणीसी आणीन ॥ ३ ॥ चैद्यादिक पक्षपाती । त्यांसीं रणीं लावीन ख्याती । मी तंव कोपलिया श्रीपती । त्रिजगतीं कोण राहे ॥ ४ ॥ जैशा दो काष्ठांच्या भरणी । मथूनि काढिजे जेवीं अग्नी । तेवीं अरिवीरांतें त्रिभांडोनी । पवित्र रुक्मिणी आणीन ॥ ५ ॥ माझिया कोपाची भृकुटी । रणा आणीन सकळ सृष्टी । त्यामज युद्धाची आटाटी । लग्नासाठीं केवढी ॥ ६ ॥ रुक्मिणीचिया लग्नासी । कवण दिवस कवणें मासीं । कवण नक्षत्र तें द्विजासी । मधुसूदनें पूसिलें ॥ ७ ॥ सारथी बोलावूनि दारुकासि । वेगीं संयोजीं रथासी । जाणें असे कौंडिणपुरासी । दुजियासी कळों नेदीं ॥ ८ ॥ जैसे चारी पुरुषार्थ । तैसिया वारुवीं जुंपिला रथ । ऎका नांवें सुनिश्चित । जेथे श्रीकृष्णनाथ आरूढे ॥ ९ ॥ शैब्य सुग्रीव बलाहक । चौथा मेघपुष्प देख । चारी वारू अति नेटक । सारथी दारुक धुरेसी ॥ १० ॥ अनर्घ्यरत्‍नीं रत्‍नखचित । गरुडध्वज लखलखित । लोल पताका डोलत । रथ शोभत अतिशोभा ॥ ११ ॥ शस्त्रास्त्रांचे संभार । रथीं घालूनि अपार । दारुकें केला नमस्कार । जोडोनि कर राहिला ॥ १२ ॥ रथीं चढला नारायण । तुरुंगी बैसविला ब्राह्मण । एक दिवसें जनार्दन । कौंडिण्यपुरा पातला ॥ १३ ॥ नगर देखिलें श्रीपतीं । जैसी मुमुक्षूची संपत्ती । तेथें राजा कौंडिण्यपती । विधानस्थिती करीतसें ॥ १४ ॥ भीमक वश्य जाहला पुत्रासी । जैसा विवेक महामोहासी । कन्या नेमिली शिशुपाळासी । जीवीं कृष्णासी हे द्यावी ॥ १५ ॥ जरी असेल आमुचे भाग्य । भीमकी भाग्याची सभाग्य । भावें पावेल श्रीरंग । येणें उल्हास करीतसे ॥ १६ ॥ नगर श्रृंगारिलें वाडेंकोडें । घातले कुंकुमाचे सडे । तोरणें पताका चहूंकडे । महोत्साहो मांडिला ॥ १७ ॥ गंधाक्षता कुसुममाळा । नगरनारीलोकां सकळा । वस्त्रें भूषणें पाहतां डोळां । जनलीला शोभतसे ॥ १८ ॥ घाव घातला निशाणीं । मंगळतुरें वेदध्वनी । हळदी लाविली रुक्मिणी । मंगळस्नान करविलें ॥ १९ ॥ पीतांबर परिधान । लेइली अलंकार भूषण । नोअरीचे दुश्चित मन। कृष्ण आगमन पाहतसे ॥ २० ॥ नांदीश्राद्ध देवकविधान । केलें ब्राह्मणांचें पूजन । यथाविधी ब्राह्मणसंतर्पण । स्वस्तिवाचन विधीचें ॥ २१ ॥ चहूं वेदींचे ब्राह्मण । येऊनि पुरोहित आपण । अथर्वणवेदें केले हवन । ग्रहशांति दान यथोचित ॥ २२ ॥ सोनें रुपें नानावस्त्रें । घृतेंसहित तिळपात्रें । गोभूदानें विचित्रें । द्विजां नृपवरें दीधलीं ॥ २३ ॥ दमघोष याचिपरी । महोत्सावो आपुले नगरीं । पुत्रविवाहाचा करी । द्विजवरी यथोचित ॥ २४ ॥ वर्‍हाड निघालें बाहेरी । मदगज परिवारिले भारी । सुवर्णरथांचिया हारी । वीर अश्वांवरी आरूढले ॥ २५ ॥ चालती पायांचे मोगर । पातलें कौंडिण्यपुर नगर । आणीक वर्‍हाडी महावीर । चैद्यभार तेही आले ॥ २६ ॥ रुक्मिणी कृष्णासीं होती दीधली । ते शिशुपाळा देऊं केली । ते संधी पाहिजे साधिली । म्हणोनि आले पक्षपाती ॥ २७ ॥ शाल्व आणि जरासंध । विक्रदंत विदूरथ । पौंड्रक वीर अद्‍भुत । सैन्यभारेंशीं पातले ॥ २८ ॥ वर्‍हाडी मीनले ते कैसे । महामोहाचे मेहुडे जैसे । खद्योतसमुदाय निशी वसे । वीर तैसे वाटीव ॥ २९ ॥ कृष्णतरणीचिया किरणीं । मावळती रणांगणीं । भीमकी उल्हासे कमळिणी । कृष्णदिनमणी देखलिया ॥ ३० ॥ जैसे गंधर्वनगरींचे हुडे । तैसे शिशुपाळाचे वीर गाढे । वर्‍हाड आलें वाडेंकोडें । भीमकापुढें सांगितलें ॥ ३१ ॥ राव सामोरा गेला त्यासी । केलें सीमांतपूजनासी । सन्मानूनी समस्तांसी । जानवशासी आणिलें ॥ ३२ ॥ रुक्मिणीहरणासी उद्यत । एकला गेला कृष्णनाथ । यादवसभेसी आली मात । जाहला विस्मित बळिभद्र ॥ ३३ ॥ काल आला होता ब्राह्मण । भीमकीचें पत्र घेऊन । प्रगट न करीच कृष्ण । निवारूं कोण म्हणवूनी ॥ ३४ ॥ यालागीं गुप्त केली मात । एकला गेला कृष्णनाथ । अतुर्बळी हा अनंत । नाहीं भीत कळीकाळा ॥ ३५ ॥ तो ब्राह्मण नव्हेची निश्‍चित । मूर्तिमंत भीमकीचा भावार्थ । भावें नेला कृष्णनाथ । एकाएकीं एकला ॥ ३६ ॥ वक्रदंत जरासंध । शाल्व पौंड्रक उन्नद्ध। चैद्य मीनले सन्नद्ध । होईल युद्ध दारुण ॥ ३७ ॥ कृष्ण करील कार्यसिद्धी । हें तंव न चुके त्रिशुद्धी । टाकूनि जावें युद्धसंधी । हेचि बुद्धी सर्वथा ॥ ३८ ॥ रथ कुंज पालाणा । सन्नद्ध करा चतुरंगसेना । घाव घातला निशाणा । केली गर्जना बळिभद्रें ॥ ३९ ॥ सेनापती तो सात्त्विक । भारी बळराम नेटक । यादववीरांसी हरिख । अतिसुटंक दरभाळ ॥ ४० ॥ सुख, संतोष आणि स्वानंद । कैवल्यापाशीं निजबोध । तैसा पावला हलायुध । यादववीरीं हरिपाशीं ॥ ४१ ॥ नातरी शमदमादि संपत्ती । बोधावेगळी नव्हे निश्चिती । तैसे कौंडिण्यपुरा येती । जेथे श्रीपती उभा असे ॥ ४२ ॥ येरीकडे राजकुमरी । अवस्था लागलीसे भारी । कां पां न येचि श्रीहरि । विचार करी लिखिताचा ॥ ४३ ॥ कृष्णासी नाहीं विषयगोडी । म्या पत्रिका लिहिली कुडी । जे भार्या होईन आवडी । जाहली अनावडी तेणें कृष्णा ॥ ४४ ॥ आढाल ढालाची पै थोर । अभाव भावें अतिसुंदर । दाटोनि रिघों पाहे घर । वशीकरण मज करील ॥ ४५ ॥ मग मी होईन तिज आधीन । जिवें जिता करील दीन । अमना आणूनियां मन । नाचवील निजछंदें ॥ ४६ ॥ कार्याकारण समस्त । तेचि करील निश्चित । सुचित्त आणि दुश्चित्त । आंदण्या दासी आणील ॥ ४७ ॥ तिच विकल्पिया बंधु । आंदणा येईल कामक्रोधु । तिचा बोळवा गर्वमदु । घरभेदू वाटेल ॥ ४८ ॥ माझेनि आंगें थोरावेल । मज ते नांवरूप करील । विषयगोडी वाढवील । मुद्दल वेंचील निजज्ञान ॥ ४९ ॥ होईल निर्लज्जा नि:शंक । मज देखों न शकती लोक । ऎसें जाणोनि निष्टंक । न योचि देख श्रीकृष्ण ॥ ५० ॥ लिखितीं चुकी पडली मोठी । पावेन शतजन्मांपाठीं । हें देखोनि जगजेठी । उठाउठी न पवेची ॥ ५१ ॥ मज नाहीं वैराग्य कडाडी । भेटी न मागेचि रोकडी । माझिया मुखरसाची गोडी । प्रतिबंधक मज झाली ॥ ५२ ॥ शिवादि चरणरज वांछित । त्या मज पाठविल लिखित । आंगे उडी न घालीच येथ । आळसयुक्त भीमकी ॥ ५३ ॥ लिखितासाठीं जरी मी सांपडे । तरी कां साधक शिणती गाढे । भीमकीं आहे केवळ वेडें । येणें न घडे मज तेथें ॥ ५४ ॥ कृष्ण न यावया एक भावो । द्विजें देखिला देवाधिदेवो । विस्मय दाटला पाहाहो । कार्य आठवो विसरला ॥ ५५ ॥ कृष्ण देखतां त्रिशुद्धी । ब्राह्मणासी लागली समाधी । हरपली मनोबुद्धी । लग्नशुद्धी कोण सांगे ॥ ५६ ॥ जे कृष्णासी मीनले । ते परतोनि नाहीं आले । मज आहे वेड लागलें । वाट पाहें द्विजाची ॥ ५७ ॥ मायबापांसी नेणतां । वधूने पाठविलें लिखिता । हेंच जाणोनि निंदिता । येता येतां परतला ॥ ५८ ॥ लग्नाआड येक राती । कां पां न येची श्रीपती । परात्पर उपरियेवरती । वाट पाहात उभी असे ॥ ५९ ॥ डोळा नलगेचि शेजेशी । निद्रेमाजी देखे कृष्णासी । तेणे स्वप्न -सुषुप्तीसी । जागृतीसी नाठवे ॥ ६० ॥ अन्न न खाय तत्त्वतां । जीविता देखे कृष्णनाथा । गोडी लागली अनंता । न लगे आतां धड गोड ॥ ६१ ॥ करूं जातां उदकपान । घोटासवें आठवे कृष्ण । विसरली भूक तहान । लागलें ध्यान हरीचें ॥ ६२ ॥ तोंडी घालितां फोडी । घेऊं विसरली ते विडी । कृष्णी लागलीसे गोडी । अनावडी विषयांची ॥ ६३ ॥ आळविल्या कानीं नायके । थापटिलीया न चक्के । देह व्यापिले यदुनायकें । शरीरसुखे विसरली ॥ ६४ ॥ पाय ठेवितां धरणीं । कृष्णा आठवी रुक्मिणी । सर्वांगी थरथरोनी । रोमांचित होऊनि ठाके ॥ ६५ ॥ लीला कमल घेतां हातीं । कृष्णचरण आठवतीं । नयनीं अश्रु लोटती । कृष्णप्राप्तीलागीं पिशी ॥ ६६ ॥ गोविंदें हरिलें मानस । जाहली विषयभोगीं उदास । पाहे द्वारकेची वास । मनीं आस कृष्णाचीं ॥ ६७ ॥ कां पां न येचि गोविंद । तरी माझेंचि भाग्य मंद । नाहीं पूर्वपुण्य शुद्ध । म्हणौनि खेद करीतसे ॥ ६८ ॥ मग म्हणे गा कटकता । किती करूं गे आहाकटा । मरमर विधातया दुष्टा । काय अदृष्टा लिहिलें असे ॥ ६९ ॥ आजिचेनि हें कपाळ । कृष्णप्राप्तीविण निष्फळ । म्हणूनियां भीमकबाळ । उकसाबुकसीं स्फुंदत ॥ ७० ॥ मज नलगे विंजणवारा । तेणे अधिक होतसे उबारा । प्राण रिघो पाहे पुरा । शार्ङ्गधरावांचोनि ॥ ७१ ॥ आंगी न लावा गे चंदन । तेणें अधिकचि होय दीपन । माझे निघों पाहती प्राण । कृष्णचरण न देखतां ॥ ७२ ॥ साह्य नव्हेचि गे अंबा । विन्मुख जाहली जगदंबा । आतां कायसी लग्नशोभा । प्राण उभा सांडीन ॥ ७३ ॥ शिवा भवानी रुद्राणी । कां पां न पवतीच कोणा । कां विसरली कुळस्वामिणी । चक्रपाणी न पवेचि ॥ ७४ ॥ नेत्रीं अश्रूंचिया धारा । दु:खें कांपतसे थरथरां । धरितां न धरवेचि धीरा । विकळ सुंदरा जातसे ॥ ७५ ॥ तंव लविन्नला डावा डोळा । बाहू स्फुरती वेळोवेळां । हीं तंव चिन्हे गे गोपाळा । प्राप्तिकर पैं होती ॥ ७६ ॥ कृष्णें सांगितलें द्विजासी । वेगीं जावें भीमकीपासी । थोर चिंता होतसे तिसी । उद्वेगेसीं अपार ॥ ७७ ॥ तिसी द्यावें आश्वासन । उदईक आहे तुझे लग्न । तुवां असावें समाधान । पाणिग्रहण मी करीन ॥ ७८ ॥ आठां भावांची परवडी । उभवूनि स्वानंदाची गुढी । द्विज धांविन्नला लवडसवडी । घालती उडी त्वरित ॥ ७९ ॥ भीमकी करीत असतां चिंता । द्विज देखिला अवचितां । हरिखें वोसंडली चित्ता । प्रसन्नता देखोनि ॥ ८० ॥ पहिला ब्राह्मण अतिदीन । याचें पालटलेंसे चिन्ह । दिसत आहे प्रसन्नवदन । घेऊनि कृष्ण पै आला ॥ ८१ ॥ कृष्णदर्शनासी प्राप्ती । द्विज पालटला देहस्थिती । आनंदमय जाहली वृत्ती । लिखितासाठीं द्विजाची ॥ ८२ ॥ जीवप्रयाणाची सुमुहूर्तता ॥ भक्तिनवरत्‍नांचें तारूं बुडतां । धैर्याचा स्तंभ पडतां । जाहला रक्षिता सुदेवो ॥ ८३ ॥ मरतया अमृतपान । किंवा अवर्षणीं वर्षे घन । दुष्काळलिया जेवीं मिष्टान्न । तेवीं आगमन दिजाचें ॥ ८४ ॥ मोहअंधारीं मणी पडला । तों युक्तीच्या हातीं चांचपडिला । न सांपडतां दीप लाविला । कृष्णागमनसुखाचा ॥ ८५ ॥ यापरी आला तो ब्राह्मण । कृष्णागमन भीमकीप्राण । घेऊनि आला जी संपूर्ण । जीवदानी सुदेवो ॥ ८६ ॥ ब्राह्मण म्हणे ना मीं आतां । घेऊनि आलों वो अनंता । देखिला गरुडध्वज झळकता । आनंद चित्ता न समाये ॥ ८७ ॥ आंगींची उतटली कांचोळी । मदिका दाटली आंगोळी । सर्वांगे हरिखली वेल्हाळी । जीवें वोंवाळी द्विजातें ॥ ८८ ॥ याचिया उपकारा उत्तीर्णता । पाहतां ने देखों सर्वथा । जेणें आणिले श्रीकृष्णनाथा । त्यासी म्यां आतां काय द्यावें ॥ ८९ ॥ यालागीं हो सद्‍गुरूसी । उत्तीर्णता नाहीं शिष्यांसी । कवण द्यावें पदार्थासी । हें वेदांसी न बोलवे ॥ ९० ॥ चिंतामणी दे चिंतिल्या अर्था । कल्पतरू तो कल्पिलें देता । सद्‍गुरु दे निर्विकल्पता । त्यासी उत्तीर्णता कैसेनि ॥ ९१ ॥ जो चुकवी जन्ममरण । त्यासी नव्हेचि उत्तीर्ण । कोटिजन्मांचे जन्ममरण । चुकविलें येणे गुरुनाथें ॥ ९२ ॥ देहें उतराई होऊं गुरुसी । तंव नश्वरता या देहासी । नश्वरें अनश्वरासी । उत्तीर्णता कैसी घडे ॥ ९३ ॥ जीवें व्हवे उतराई । तंव तो समूळ मिथ्या पाहीं। जीवासि जीवपण नाहीं । होईल कई उतराई ॥ ९४ ॥ गुरूसी उतराई होतां । न देखों कवणिया पदार्था । यालागीं चरणीं ठेविला माथा । मौनेंकरूनि रुक्मिणी ॥ ९५ ॥ मनीं देओनि साचार भावो । अति संतोषला सुदेवो । तुझेनि धर्मे आम्हां पाहा हो । कृष्णप्राप्ती साचार ॥ ९६ ॥ श्रीकृष्ण आला परिसोन । भीमकी पावली समाधान । उल्हासयुक्त जाहलें मन । हर्षे त्रिभुवन कोंदले ॥ ९७ ॥ करितां अंबिकापूजन । कृष्ण करिल भीमकीहरण । एका विनवी जनार्दन । श्रोतीं ध्यान मज द्यावें ॥ ९८ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे पंचम: प्रसंग: ॥५॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग सहावा श्रीगणेशाय नम: ॥ भीमकीचा विवाहसंभ्रम । पाहों आले कृष्ण राम ॥ हें परिसोनि भीमकोत्तम ॥ दर्शना सकाम ऊठिला ॥ १ ॥ भेरी निशाण मृदंग । नाना वाजंत्रे अनेग । पूजासामुग्री घेऊनि साङ्ग । समारंभेसीं पैं आला ॥ २ ॥ कृष्ण देखोंनि सावधान । केलें साष्टांग नमन । कृष्णें दिधलें आलिंगन । विस्मित मन रायाचें ॥ ३ ॥ मूळेंवीण तूं आलासी । परमसुख हें आम्हांसी । शब्देंवीण सोयरा होसी । तूं जाणसी ब्रह्मसूत्र ॥ ४ ॥ वर वरिष्ठ कृष्णदेवो । मनी धरूनि हाची भावो । मधुपर्कविधी पाहा हो । पूजाविधान करीतसे ॥ ५ ॥ नानापरीची उपायनें । वस्त्रें अलंकार भूषणें । अंगिकारिलीं श्रीकृष्णें । जीवींची खूण जाणोनी ॥ ६ ॥ बळिभद्रादि प्रमुख । जे आले यादवादिक । त्यांची पूजा केली देख । यथोचित विधाने ॥ ७ ॥ राव म्हणे श्रीहरी । आतां चलावें नगरांतरीं । समारंभेसीं सहपरिवारीं । चलावें झडकरी कृपाळुवा ॥ ८ ॥ जानवसा नगराआंत । देतां बोलिला कृष्णनाथ । विरोध आम्हां मागधांत । निकट वास करूं नये ॥ ९ ॥ जवळी राहतां बोलाबोली । शोभनामाजी वाढेल कळी । निकरा जाईल रांडोळी । आम्हां आणि रुक्मिया ॥ १० ॥ यासाठीं पाउलें दोन दूरी । राहूं नगराबाहेरी । ठाव द्यावा अंबिकापुरीं । ऎसें श्रीहरी बोलिला ॥ ११ ॥ तंव राव हासिन्नला मनीं । होय बुद्धिमंत शार्ङ्गपाणी । ठाव दिधला अंबिकाभुवनीं । घाव निशाणीं घातला ॥ १२ ॥ राजा म्हणे चक्रपाणीं । मार्ग आहे नगरामधूनी । कृष्णदर्शना उदित राणी । यालागोनि बुद्धि केली ॥ १३ ॥ जाणोनियां तो भावो । रथीं चढला श्रीकृष्णदेवो । आपणाजवळी बैसविला रावो । थोर उत्साहो मांडिला ॥ १४ ॥ लागली वाद्यांची घाई । चवरें ढळती दोहीं बाहीं । बंदीजन गर्जती पाहीं । कृष्णकीर्तीही कीर्तनें ॥ १५ ॥ छेदावया ह्रदयबंध । साधकांमाजी रिघे बोध । तैसा प्रवेशला गोविंद । नगरामाजी निजबळें ॥ १६ ॥ नगरा आला श्रीकृष्ण । नगरनागरिक जन। उतावेळ कृष्णदर्शन । करावया धांविन्नले ॥ १७ ॥ कृष्ण पाहावया नरनारी । मंडपघसणी होतसे भारी । एक चढले माडिया गोपुरीं । पाहावया श्रीहरी स्वानंदें ॥ १८ ॥ कृष्णमुखकमळ सुंदर । जननयन तेचि भ्रमर । तेथेंचि गुंतले साचार । कृष्णआमोदरसभावें ॥ १९ ॥ नयनद्वारें प्राशन । करूनि ह्रदयीं आणीती कृष्ण । सबाह्य पाहाती समान । समदृष्टी कृष्णातें ॥ २० ॥ ऎसा देखोनि श्रीपती । कृष्णमय जाहली वृत्ती । लवों विसरलीं नेत्रपातीं । कृष्णमूर्तीं पाहातां ॥ २१ ॥ घेऊनि निजबोधाची वेताटी । विवेक दृश्याची मांदी लोटी । तैसा सात्त्विक जगजेठी । जनां सकळिकां वारिता ॥ २२ ॥ मागें परमात्मा कृष्णवीर । करूनि निजबोधाचा भार । चालतसे स्थिरस्थिर । आत्मस्थितीच्या पाउलीं ॥ २३ ॥ बोलती नरनारी सकळा । काल मिरविले गे शिशुपाळा । ने देखो नोवरेपणाची कळा । नाहीं जिव्हाळा लग्नाचा ॥ २४ ॥ कृष्णा नोवरा भीमकीलागीं । भीमकी होय कृष्णाजोगी । सृष्टी शोभत इंहीच दोघी । तिसरें जगीं न देखॊं ॥ २५ ॥ आमुचें जन्मोजन्मींचें सुकृत । शुद्ध पुण्य जें शोभिवंत । तेणें तरी कृष्णनाथ । भीमकीकांत हो लग्नीं ॥ २६ ॥ ऎसे आशीर्वाद देती । कृष्णरूपीं वेधल्या वृत्ती । प्रत्यावृत्ती हरि पाहती । नाहीं उपरती जनासी ॥ २७ ॥ कृष्णें केला मेळिकार । भीमकें केला आदर थोर । सकळ सैन्य पाहुणेर । यथोचित यादवांतें ॥ २८ ॥ भीमकें देखिलें कृष्णासी । दृष्टी जडली त्या रूपांसी । साखरेवरूनी नुठे माशी । तेवी रायासी जाहलें ॥ २९ ॥ भीमकें पूजिले कृष्णासी । विकल्प वाटेल चैद्यासी । यालागीं सकळीकां रायांसी । पूजा विधीसी मांडिली ॥ ३० ॥ यथा कुल तथा शील । जैसे वीर्य तैसे बळ । तदनुसार राजे सकळ । भीमकें केवळ पूजेलें ॥ ३१ ॥ कृष्ण आणि हलायुध । आले ऎकोनि चैद्य मागध । दचकोनि म्हणती विरोध । थोर आम्हां मांडले ॥ ३२ ॥ कृष्ण आला महाबळी । ऎकोनि चिंतेची काजळी । वाढिन्नली ह्रदयकमळीं । तोडें काळीं तेणे झालीं ॥ ३३ ॥ मागध परस्परें आपणांत । कुजबुज करूं लागले बहुत । एकमेकांते खुणवित । समस्त त्यात मीनले ॥ ३४ ॥ भीमकें पूजिलें कृष्णासी । केला मधुपर्क विधानेंसी । तोही मीनला आहे त्यांसी । आहाच आम्हांसीं सोयरीक ॥ ३५ ॥ लग्न लागलियापाठीं । कायसी यादवांची गोष्टी । कार्य करूं दाटोदाटी । आम्ही जगजेठी असतां ॥ ३६ ॥ रुक्मिया आहे आम्हांकडे । भीमके सात्त्विक तें बापुडे । म्हातारपणीं जाहलें वेडें । त्यांचे त्यापुढें काय चाले ॥ ३७ ॥ वेगीं विस्तारा पां फळ । सन्नद्ध जाले वीर सकळ । तूर्ये लागली प्रबळ । घावो निशाणी घातला ॥ ३८ ॥ शुद्धमती म्हणे रायासी । तुम्ही विसरलेति कुळधर्मासी । कन्या न्यावी अंबिकेसी । गौरीहरासी पूजावया ॥ ३९ ॥ तंव रायाचा ज्येष्ठ कुमर । ऎकोनि कोपा चढिन्नला थोर । मिथ्या बायकांचा विचर । केंवि साचार मानितां ॥ ४० ॥ आत्मबुद्धिहितार्थाय गुरुबुद्धिर्विशेषत: । परबुद्धिर्विनाशाय स्त्रीबुद्धि: प्रलयावहा ॥ १ ॥ आपुली बुद्धी ते हितासी । गुरुबुद्धि त्याहून विशेषी । परबुद्धि विनाशाशी । मूळ प्रळयासी स्त्रीबुद्धि ॥ ४१ ॥ अंबालयीं यादव वीर । उतरले असती अकर्माकार । हिरोनी नेतील सुंदर । लाज थोर होईल ॥ ४२ ॥ ऎसें बोले रुक्मिया वीर । करूं नये आणीक विचार । कार्य साधावें सत्वर । मग हो कां भलतेंचि ॥ ४३ ॥ राजा म्हणे कट-कटा । व्यर्थ आलासी मझिया पोटा । नव्हेसी वीरवृत्तिलाठा । अतिकरंटा नपुंसक ॥ ४४ ॥ अजि कळली तुझी बुद्धी । वाटीव उसधी हांडिया-सांधी । हागीर भ्याड तूं त्रिशुद्धी । गाढा बुद्धि नव्हेसी ॥ ४५ ॥ वर्मी खोंचला रुक्मिया । कन्या नेईन अंबालया । ख्याती लावीन यादवां तयां । मज कोपलिया कोण साहे ॥ ४६ ॥ ऎसें होतें माझे पोटीं । लग्न लागलियांपाठीं । दोघें वधूवरें गोमटी । न्यावीं भेटी जगदंबे ॥ ४७ ॥ ऎसा नव्हेचि कुळधर्म । लग्नापूर्वील हा नेम । सिद्धी पाववीन सुगम । पराक्रम पाहें माझा ॥ ४८ ॥ ऎसें सांगोनि रायासी । वेगीं आला चैद्यांपासीं । गुज सांगतसे तयांसी । विघ्न लग्नाली वोढवलें ॥ ४९ ॥ कृष्णाकडे आमुचा पिता । जीवेंभावें तिकडेच माता । कार्याकारण प्रपंचता । मिथा दाविती आम्हांकडे ॥ ५० ॥ ऎका आमुच्या कुळधर्मासी । नोवरी न्यावी अंबिकेसीं । सन्नद्ध होऊन दळभारेंसी । आलें तुम्हांसी पाहिजे ॥ ५१ ॥ येरीकडे चौथे बंधु । घेऊनि निघाले जी वधु । करूनि दळभारु सन्नद्ध । महावीर उदित ॥ ५२ ॥ मी तरी परवडी आढावाची । शस्त्रें उघडीं हातीं त्यांचीं । मागें परवडी धनुर्धरांची । शितें धनुष्यासी वाइलीं ॥ ५३ ॥ तयामागें वीर घोडीं । रथ जोडियले जोडी । वर बैसले परवडीं । शस्त्रें उघडीं झळकती ॥ ५४ ॥ तयामागें कुंजरथाट । गळां सांखळिया एकवट । खिळिले चालती गजघंट । दुर्ग अचाट सैन्याचे ॥ ५५ ॥ भक्तजनाचिया काजा ॥ जेवीं करिती आवरणपूजा । तेवी सैन्य रचिलें वोज । कृष्णभाजा भीमकिया ॥ ५६ ॥ नातरी उपासनायंत्र । तैसें दिसे सैन्यसूत्र ॥ भीमकी मध्यपीठ पवित्र । कृष्णक्षेत्रे निजबीज ॥ ५७ ॥ जेवीं साधनचतुष्टयसंपत्ती । परमात्मयासन्मुख करिती वृत्ती । तैसे चौघे बंधू घेऊनि येती । कृष्णासन्मुख भीमकी ॥ ५८ ॥ नातरी जैसे चारी वेद । उपनिषदें करिती बोध । वृत्ति स्वयें देखे निजपद । तैसे बंधू भीमकीसी ॥ ५९ ॥ नातरी चारी पुरुषार्थ जैसे । भक्तापाशीं येती आपैसे । चारी बंधू जाण तैसे । भीमकीसरिसे चालती ॥ ६० ॥ वैराग्य विवेकाचेनि बळी । तैसा रुक्मरथ रक्ममाळी । मागें पुढें जी सांभाळी । परिके जवळी येऊं नेदी ॥ ६१ ॥ स्वानंद आणि अनुभवू । जीवाहून आवडती बहू । तैसे रुक्मकेली रुक्मबाहू । दोघे भाऊ दोहीं भागी ॥ ६२ ॥ ऎसे भीमकीच्या चहूं भागीं । चौघे बंधू रंगले रंगीं । भीमकीसवें चालती वेगीं । धन्य जगीं रुक्मिणी ॥ ६३ ॥ वडील बंधु चौघांहूनी ॥ जो अतिगर्वित अभिमानी । तो सांडिलासे त्यजूनी । साधुजनीं जेवि निंदा ॥ ६४ ॥ कृष्णद्वेषिया तो खरा । मिळणी मीनला असुरां । म्हणूनि त्यजिला परबाहिरा । नव्हे सोयिरा निजाचा ॥ ६५ ॥ भोग त्यजूनि वैरागी ॥ योगसाधना निघे योगी । तैसी माया माहेर सांडूनि वेगीं । चरणचाली निघाली ॥ ६६ ॥ लोकप्रतिष्ठा महंती । बैसावें अश्वगजरथीं । जेणें होय कृष्णप्राप्ती ॥ भीमकी गती ते जाणे ॥ ६७ ॥ पारिखा पाई कृष्ण ठाके । हें बोलणें समूळ लटिकें । ऎसें जाणोनि निष्टंकें । चरणीं चामके वैदर्भी ॥ ६८ ॥ कृष्णचरणीं जडलें मन ॥ यालगीं वाचें पडलें मौन । दृढ लागलें अनुसंधान । सहजस्थिती चालली ॥ ६९ ॥ आत्मसाक्षात्कारवृत्ती । अनिवार अहिंसादिक येती । तेवीं भीमकीसवें समस्ती । सखिया धांवती स्वानंद ॥ ७० ॥ जे कां निरपेक्ष मानसीं । सिद्धी तिष्ठती सेवेसी । तैसा सखिया भीमकीपाशीं । उपचारेंसी चालती ॥ ७१ ॥ वडिलांमाजी वडीलपणीं । निजशांतीची स्वामिणी । वागवीतसे रुक्मिणी । अग्रगणी सकळिकां ॥ ७२ ॥ बोधपुत्राच्या जननी । ब्रह्मवेत्त्याच्या ब्राह्मणी । अकामकामाचिया कामिनी ॥ सवें सुवासिनी चालती ॥ ७३ ॥ जैसा अनुहताचा गजर । तैसीं तुरें वाजती अपार । नादें कोंदले अंबर । शब्दाकार नभ झालें ॥ ७४ ॥ पहिले उठिले घंटानाद । मागें किंकिणींचे शब्द । मधुर शंखांचे अनुवाद । वीणावेणू रुणझुणती ॥ ७५ ॥ नादें उठिल्या झल्लरी । मृदंगध्वनी त्यामाझारीं । निशाणीं दुमदुमिल्या भेरी । नादाभीतरी मन निवे ॥ ७६ ॥ कृष्णकीर्तीचिया कीर्तनीं । चौघीजणी गाती गाणीं । त्यापुढें नाचणी नाचती । चारी मुक्ती उदास । ७७ ॥ कृष्ण वर्णावया श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट । अठरा मागध अतिउद्भट । वंशावळी वर्णिती ॥ ७८ ॥ कळा वाढविती शब्द । साहीजणांशी विवाद । युक्तिप्रयुक्तीचे बोध । नाना छंद शब्दांचे ॥ ७९ ॥ पातली अंबिकेचें रंगण । केलें करचरणक्षालन । रुक्मिणीचें सावध मन । शुद्धाचमन तिनें केलें ॥ ८० ॥ श्रद्धापूजेचे संभार । शुद्ध सुमनांचे पैं हार । चिद्रत्‍नांचे अलंकार । विरजांबर पूजेसी ॥ ८१ ॥ देवालया आली हरिखें । अंबा पाहतां कृष्णाचि देखे । येणे रूपें यदुनायकें । पाणिग्रहण करावे ॥ ८२ ॥ सावध होऊनि पाहे चित्ता । म्हणे हे आमुची कुळदेवता । आपुल्या रूपें दावी अनंता । होईल भर्ता निश्चित ॥ ८३ ॥ हरिखें ओसंडली पोटीं । मग बांधिली शकुनगाठीं । अतिउल्हासें गोरटी । पूजा विधीसीं मांडिली ॥ ८४ ॥ षोडशोपचारीं पूजा । करिती जाहली भीमकात्मजा । विधी सांगती द्विजभाजा । गरुडध्वजप्राप्तीसी ॥ ८५ ॥ वस्त्रें अलंकार भूषणें । नाना उपचार बलिदानें । दीपावली नीरांजने । सावधानें अर्पिलीं ॥ ८६ ॥ कृष्ण धरूनियां मानसीं । भीमकी पूजी द्विजपत्‍न्यांसी । जें जें बोलिलें विधीसी । तें ते त्यांसी दिधलें ॥ ८७ ॥ निंबें नारिंगे नारिकेळे । अपूप लाडू अमृतफळें । इक्षुदंड आंबे केळें । सुवासिनींसी दिधलीं ॥ ८८ ॥ मुक्ताफळेंसीं आभरणें । सौभाग्यद्रव्यें कंठाभरणें । हळदी जिरें लवण धणे । दिधलीं वाणें नारींसी ॥ ८९ ॥ होती नीलोत्पलांची माळ । ते घातली जगदंबेच्या गळां । वर देईं वो घनसांवळां । उचितकळां आजिच्या ॥ ९० ॥ म्हणॊनि विसर्जिलें मौन । करूं आदरिलें स्तवन । मनामागें ठेवोनि मन । सावधान स्तवनासी ॥ ९१ ॥ जयजय वो अव्यक्तव्यक्ती । जयजय वा अमूर्तमूर्ती । जयजय वो विश्वस्फूर्ती । चिच्छक्ती चिन्मात्रे ॥ ९२ ॥ जयजय वो जगदंबे । जयजय वो आरंभस्तंभे । जयजय वो सौभाग्यशोभे । स्वयंस्वयंभे कुमारी ॥ ९३ ॥ जयजय वो अनादि । नाकळसी तूं मनोबुद्धी । देवोदेवी इंही शब्दीं । तूं त्रिशुद्धी नांदसी ॥ ९४ ॥ शिवा तुझेनि शिवपण । जीवा तुझेनि जीवपण । देवा तुझेनि देवपण । निजकारण तूं माये ॥ ९५ ॥ तुझेनि शब्दांदिका शोभा । तुझेनि नभत्व आले नभा । तूंचि मूळ प्रारंभा । विश्वकदंबा जीवन तूं ॥ ९६ ॥ तुझी उघडलिया दृष्टी । नांदो लागे सकळ सृष्टी । तुवां उपेक्षिलियापाठीं । देवांही नुठी देवपण ॥ ९७ ॥ ॐ पुण्याहं सुमुहूर्ती । लग्न लावणें तुझे हातीं । मज नोवरा श्रीपती । समूळ कर्ती तूं माये ॥ ९८ ॥ ऎसा स्तुतिवाद करितां । कंठीची माळ आली हाता । येचि माळें श्रीकृष्णनाथा । वरीन आतां निर्धारें ॥ ९९ ॥ महाप्रसाद सर्वथा । म्हणोनि चरणीं ठेविला माथा । आशीर्वाद देती समस्ता । पतिव्रता द्विजपत्‍न्या ॥ १०० ॥ येणें उल्हासें सुंदरा । वरूं निघे श्रीकृष्णवरा । स्वानुभवाचा सेवक खरा । त्यातें करी धरूनी ॥ १०१ ॥ भीमकीसौंदर्य अमूप । जिचेनि जगा नांव रूप । तिचे लावण्याचे दीप । मुख्य स्वरूप केवीं वर्णूं ॥ १०२ ॥ जियेतें स्रजूं न शके चतुरानन । कृष्णप्रभावें स्वरूप पूर्ण । तिचिया स्वरूपाचें वर्णन । एका जनार्दन वर्णीतसे ॥ १०३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणें दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे अंबिकापूजनं नाम षष्ठ: प्रसंग: ॥६॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग सातवा श्रीरुक्मिणीकांताय नम: ॥ श्रीकृष्णभक्तीलागीं देखा । नवविधा भक्तीसी आवांका । तैशा नवरत्‍नमुद्रिका । भीमककन्यका लेइलीसे ॥ १ ॥ सकळ सौंदर्याची खाणी । बरवेपण तिजपासूनी । स्वरूपरूपाची जननी । वीरीं रुक्मिणी देखिली ॥ २ ॥ सुरवरपन्नगांच्या ठायीं । हिंडतां सौंदर्या विश्रांति नाहीं । म्हणवुनी धांविन्नलें लवलाहीं । भीमकीदेहीं विश्रांति ॥ ३ ॥ भीमकीकृष्णा आलिंगन । तेणें सौंदर्या समाधान । तिहींलोकींचें बरवेपण । भीमकीपाशीं धांविन्नलें ॥ ४ ॥ ऎकोनि जिचिया सौंदर्यासी । वेध लागला श्रीकृष्णासी । ती भीमकी वर्णावी कैसी । सीमा रूपासी न करवे ॥ ५ ॥ नाहीं स्रष्ट्याने स्रजिली । कृष्णप्रभावें रूपा आली । बरवेपण सीग चढली । साकारली सौंदर्ये ॥ ६ ॥ गगन शून्यत्वा उबगले । कृष्णभेटीसी उदित जाहलें । भीमकीमस्तकासी आलें । निरालंबें शोभत ॥ ७ ॥ मस्तकींचे नील कुंतल । तेंचि नभ अतिनीळ । तळीं मुखचंद्र निर्मळ । भीमकीमुखीं उगवला ॥ ८ ॥ चंद्र क्षीण कृष्णपक्षीं । म्हणे हा पूर्वील माझा बंधु की । म्हणूनि कळवळली भीमकी । तो निजमुखीं धरियेला ॥ ९ ॥ भीमकीमुखीं निष्कळंक । क्षयातीत पूर्ण शशांक । कृष्णप्राप्तीसी मयंक । भीमकीमुखी उगवला ॥ १० ॥ चंद्र पूर्ण पौर्णिमा एकीं । येरवीं क्षयवृद्धी त्या ये लोकीं । तो सदा भीमकीमुखीं । निजात्मसुखीं परिपूर्ण ॥ ११ ॥ चंद्रमंडळा मागेंपुढें । जैसे तारागणांचे वेढे । तैशीं मोतिलग तानवडें । दोहींकडे तळपती ॥ १२ ॥ श्रीकृष्णवेधे वेधली खरी । म्हणवुनी विसरली ते भोंवरी । भोंवरिया कृष्णमायेचा करी । ये अवसरीं ते नाहीं ॥ १३ ॥ भोंवरी नसतां पक्षपाती । पंखे दोहींकडे झळकती । भोंवरियाभागीं मिरवती । भेटी होईल निजकर्णी ॥ १४ ॥ भीमकी थोर कपाळाची । कृष्णदैवें ते दैवाची । निढळीं प्रभा श्यामतेची । तोचि कस्तूरीमळवट ॥ १५ ॥ चंद्रबिंबीं श्यामरेखा । तैसा भाळीं मळवटु देखा । भोंवया रेखिल्या कृष्णरेखा । अतिसुरेखा व्यंकटा ॥ १६ ॥ कृष्ण पाहावया जगजेठी । भोंवई सांडिली व्यंकटी । कृष्णीं मीनलिया दिठी । सहज गांठी सुटेल ॥ १७ ॥ श्रीकृष्णरंगें सुरंग । अहेवपण तेणें अमंग । तेचि कुंकुम पैं चांग । मुखचंद्रीं चंद्रमा ॥ १८ ॥ नभीं इंद्रधनुष्यरेखा । तैसा भांगीं शेंदूर देखा । भुलवावया यदुनायका । मोहिनीमुख पूजियेलें ॥ १९ ॥ ना ते सरस्वती बोधीं । आली कृष्णभेटीलागीं । जीव शिव हांसळिया दोहीं भागीं । मुक्तलगीं तटस्थ ॥ २० ॥ जैसीं नक्षत्रें नभमंडळीं । तैसी मुक्तमोतियांची जाळी । लेइलीसे भीमकबाळी । तेणें वेल्हाळी शोभत ॥ २१ ॥ त्याहीवरी भक्तिफरा । झळकत नवरत्‍नांचा खरा । खुणावीतसे सुरनरां । भजा यदुविरा निजभावें ॥ २२ ॥ दृश्य देखतां शिणले नयन । धणीचें घ्यावया कृष्णदर्शन । एकत्र होऊनि देखणेपण । भीमकीलोचना पैं आले ॥ २३ ॥ पहावया घनसांवळा । कृष्णश्यामता आली बुबुळां । आसावली दोन्ही डोळां । सबाह्य देखणें समदृष्टीं ॥ २४ ॥ कृष्ण देखावया निधान । नयनीं सूदलें अंजन । सोगयाचें झळंबपण । कटाक्षबाणपिसारे ॥ २५ ॥ भीमकीकटाक्षाच्य धायीं । मदन पाडिला ठायींच्या ठायीं । सुरनरांचा पाड कायी । निधडा पाहीं श्रीकृष्ण ॥ २६ ॥ मुखा मुख शोभनिक । श्र्लेषागमनें शिणलें नाक । तें भीमकीमुखा येऊनि देख । नाका बीख पैं चढले ॥ २७ ॥ कृष्णसुवास आवडी । तेणें नाकासी लागली गोडी । दोन्ही नाकपुडियांबुडीं । दिधली बुडी वसंतें ॥ २८ ॥ अधर दोन्ही जालें सधर । बिंबफळें रंगाकार । ते तंव परिपाके नश्वर । हे अनश्वर हरिरंगें ॥ २९ ॥ भीमकी अधरामृतगोडी । श्रीकृष्णाचि जाणे फुडी । एकाएकीं घालूनि उडी । नेईल रोकडी प्रत्यक्ष ॥ ३० ॥ मुखामाजी दंतपंक्ती । जैशा ॐकारामाजी श्रुती । चौकींचे चारी झळकती । सोऽहं स्थिती सोलिंव ॥ ३१ ॥ अधरातळीं हनुवटी । गोरेपणें दिसे गोमटी । येथेंही श्यामप्रभा उठी । कृष्णवर्ण गोंदिलें ॥ ३२ ॥ वनिताअधरीं सुवर्णफांसा । पडोन मुक्त आलें नासा । भेटावया कृष्णपरेशा । उपाव कैसा देखिला ॥ ३३ ॥ भीमकीनाकींचें सुपाणी । सहज देखेल शारंगपाणी । अधोमुख अधिष्ठानी। बोळकंबर हरिलागीं ॥ ३४ ॥ हळदी मीनली हेमकळा । तेणें उटिलें मुखकळा । तेज झळके गंडस्थळा । सूर्यकळा लाजल्या ॥ ३५ ॥ भीमकीमुख-कमळ सुंदर । कृष्णनयन तेचि भ्रमर । आमोद भावाचें शेजार । निजमंदिर हरीचें ॥ ३६ ॥ कृष्णमयी अहेवतंतु । कंठीं धरिला न तुटतु । दिसों नेदी लोकांतु । केला एकंतु निजकंठीं ॥ ३७ ॥ फिटला चिंतेचा दचकु । म्हणोनि न घाली चितांकू । कृष्णपदींचा पदांकू । तेंचि पदकू ह्रदयींचें ॥ ३८ ॥ पृथ्वी नवखंडें खंडिली । जडजाड्यत्वा उबगली । भीमकीचे अंगीं रिघाली । सुनीळ घाली कांचोळी ॥ ३९ ॥ पावावया कृष्णदेवो । सांडिला सवतीमत्सरभावो । आलिंगावया कृष्णरावो । धरा पाहाहो धांविन्नली ॥ ४० ॥ एके अंगी भिन्नपणीं ॥ जीव शिव वाढिन्नले दोनी । तेणें जाली व्यंजनस्तनी । कुचकामिनी कुचभारें ॥ ४१ ॥ विद्या अविद्या पाखें दोनी । आच्छादिले दोही स्तनीं । दाटले त्रिगुणांचे कसणीं । कृष्णावांचोनि कोण सोडी ॥ ४२ ॥ भीमकीकृष्णालिंगन । तेणें जीवशिवा समाधान । यालागी दोनी उचलले जाण । कृष्णस्पर्शन वांछिती ॥ ४३ ॥ मुक्त नाव मुक्तफळा । नेणती मुक्तीचा जिव्हाळा । म्हणोन पडली भीमकीगळां । भेटी गोपाळा माळ जाली ॥ ४४ ॥ पूर्वी क्षीरसिंधुची बाळा । नेसली क्षीरोदक पाटोळा । ना तो पाहावया घनसांवळा । कांसे लागला क्षीराब्धी ॥ ४५ ॥ माझी कन्या हे गोरटी । झणीं कोणाची लागेल दृष्टी । म्हणोनि घातलीसे कंठीं । रत्‍नमाला क्षीराब्धी ॥ ४६ ॥ प्रकृतिपुरुषां पडली मिठी । तैसें बिरडें कांचोळीये दाटी । कृष्ण सोडील जगजेठी । आया बायां न सुटेचि ॥ ४७ ॥ शमदमांची सुभटें । हस्तकडगे बहुवटें । करीं कंकणें उद्भटें । कृष्णनिष्ठे रुणझुणती ॥ ४८ ॥ क्षणक्षणां दिशा उजळे । तैसीं शोभती दशांगुळें । दशावतारांचिये लीळें । जडित कीळें मुद्रिका ॥ ४९ ॥ पाहातां तळहाताच्या रंगा । उणें आणिलें संध्यारागा । करी चरणसेवा श्रीरंगा । तळवा तळहातीं सदा ॥ ५० ॥ आटूनिया हेमकळा । आटणी आटिल्या बारा सोळा । वोतीव केली कटिमेखळा । मध्यें घननीळा जडियेलें ॥ ५१ ॥ दोहींकडे मुक्तलग । तेणें शोभत मध्यभाग । भीमकी भाग्याची सभाग्य । तेणें श्रीरंग वेधिला ॥ ५२ ॥ चरणी गर्जती नूपुरें । वांकी आंदुवाचेनि गजरें । झालें कामासी चेइरें । धनुष्य पुरें वाइलें ॥ ५३ ॥ कृष्ण धरूनिया चित्तीं । भीमकी चालतसे हंसगती । चैद्य मागध पाहाती । मदनें ख्याती थोर केली ॥ ५४ ॥ माझी अभिलाषिती जननी । म्हणोन विंधिले कामें बाणीं । वीर पडिले धरणीं । कामबाणीं मूर्च्छित ॥ ५५ ॥ कामें हरितल्या दृष्टी । धनुष्यें गळालीं पैं मुष्टी । भीमकी राखावी गोरटी । हेंही पोटीं विसरले ॥ ५६ ॥ रथींचे उलंडले थोरथोर । अश्वांहूनि पडले वीर । गजींचे कलथले महाशूर । रिते कुंजर गळदंडीं ॥ ५७ ॥ भीमकी पाहातसे सभोंवतें । तंव वीर भेदिले मन्मथें । कृष्ण त्रिशुद्धी नाहीं येथें । जेणें कामातें जिंकिलें ॥ ५८ ॥ रमारमणीं एकांती । मीनल्या काम नुपजे चित्तीं । यालागीं नामें तो श्रीपती । भाव निश्चिती भीमकीचा ॥ ५९ ॥ कामबाणीं नव्हे च्युत । यालागीं नावें तो अच्युत । भोग भोगूनि भोगातीत । कृष्णनाथ निर्धारें ॥ ६० ॥ कृष्ण पहावया लोभें उठी । आडवे केश सलोभदृष्टी । धरूनि ऎक्याचिये मुष्टी । सुमनें वीरगुंठी बांधिली ॥ ६१ ॥ कृष्ण पाहावया भाव एक । तो तंव अर्काचाही आदिअर्क । नयनीं नयना प्रकाशक । यदुनायक केवीं दिसे ॥ ६२ ॥ निजभावें पाहे गोरटी । तंव घनश्याम पाहे दृष्टीं । लाज वृत्ति झाली उफराटी । तंव जगजेठी पावला ॥ ६३ ॥ उपरमोनि पाहे सुंदरी । तंव अंगीं आदळला श्रीहरी । प्रेमें सप्रेम घबरी । करीं धरी निजमाळा ॥ ६४ ॥ वीरांच्या अभिमाना जाला अस्त । माध्यान्हीं आला गभस्त । मुहूर्ती मुहूर्त अभिजित । समयो वर्तत लग्नाचा ॥ ६५ ॥ काळ सावधान म्हणत । सूर्य लग्नघटिका पाहात । वियोग अंत:पट सोडीत । भावार्थ म्हणत ॐपुण्या ॥ ६६ ॥ भीमकी पाहे कृष्णवदन । नयनीं गुंतले नयन । दोहींचा एक जाला प्राण । पाणिग्रहण जीवशिवां ॥ ६७ ॥ ऎसिया भावाचेनि निवाडें । माळा घाली वाडेंकोडें । वीर मूर्च्छा व्यापिले गाढे । आडवा पुढें कोणी न ये ॥ ६८ ॥ यापरी शारंगपाणी । रथीं वाहोनि रुक्मिणी । निघता झाला तत्क्षणीं । प्रगट कोणी न देखो ॥ ६९ ॥ एकाएकीं वनमाळी । रथीं वाहोनि भीमकबाळी । आला यादवांजवळी । पिटिली टाळी सकळिकीं ॥ ७० ॥ त्राहाटिल्या निशाणभेरी । गगन गर्जे मंगळतुरीं । देव पुष्पें वर्षती अंबरीं । जयजयकारीं प्रवर्तले ॥ ७१ ॥ यादव गर्जती महावीर । सिंहनाद करिती थोर । भीमकी आनंदें निर्भर । वरिला वर श्रीकृष्ण ॥ ७२ ॥ हरिखें नाचत नारद । आतां होईल द्वंद्वयुद्ध । यादव आणि मागध । झोटधरणीं भिडतील ॥ ७३ ॥ रथ लोटतील रथांवरी । कुंजर आदळतील कुंजरीं । असिवार असिवारांवरी । महावीरीं महावीर ॥ ७४ ॥ शस्त्रें सुटतील गाढीं । वीर भिडतील कडोविकडी । डोळेभरी पाहीन गोडी । शेंडी तडतडी नारदाची ॥ ७५ ॥ थोर हरिखें पिटिली टाळी । साल्या मेहुण्यां होईल कळी । कृष्ण करील रांडोळी ।तेही नवाळी देखेन ॥ ७६ ॥ एका जनार्दन म्हणे । रुक्मिणीहरण केलें कृष्णें । वीर खवळतील धांवणें । युद्ध सत्राणें होईल ॥ ७७ ॥ रसाळ कथा आहे पुढां । रणीं नाचेल रणधेंडा । वोवाळणी बाणप्रचंडा । परस्परें पडतील ॥ ७८ ॥ ऎका युद्धाची कुसरी । युद्ध मांडेल कवणेपरी । क्रोधें झुजतां झुजारीं । मुक्ती चारी कामाच्या ॥ ७९ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे भीमकीहरणं नाम सप्तम: प्रसंग ॥ ७ ॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ रुक्मिणी स्वयंवर प्रसंग आठवा श्रीकृष्णाय नम: ॥ रिघोनि जंबुकांमाझारीं । आपुला भाग ने केसरी । तैसी वेढिली महावीरीं । नेली नोवरी श्रीकृष्णें ॥ १ ॥ सांगातिणी जिवेंभावें । जड्ल्या होत्या भीमकीसवें । त्या त्यजूनि कृष्णदेवें । नेली निजभावें भीमकी ॥ २ ॥ आंदण्या अविद्येच्या दासी । मोहममतेच्या सखियांसी । सांडूनि नेले भीमकीसी । उकसाबुकसीं स्फुंदती त्या ॥ ३ ॥ सुडावीत नेली वधू । लाजिन्नला अभिमानिया बंधू । अपूर्णकामें उपजे क्रोधू । तैसा मागधू धांविन्नला ॥ ४ ॥ कोणीं नेलें गे नोवरीसी । येरी म्हणती लाज नाहीं तुम्हांसी । राखों आलेति भीमकीसी । शेखीं आम्हांसी पूसतां ॥ ५ ॥ जळो तुमचें दादुलेपण । नपुंसकाहूनि हीन । वृथा गेली आंगवण । काय वदन दावितां ॥ ६ ॥ स्यंदने गरुडकेतुमंडिते कुंडिनेशतनयाधिरोपिता । केनचिन्नवतमालकांतिवच्छ्‌यामलेन पुरुषेण नीयते ॥ १ ॥ गरुडध्वज झळके ज्यासी । तोडर गर्जे चरणांसी । विजू खिळिली मेखळेली । तैसा कांसेसी पीतांबर ॥ ७ ॥ टिळक रेखिला पिवळा । मुकुट कुंडलें वनमाळा । डोळस सुंदर सांवळा । भीमकबाळा तेणें नेली ॥ ८ ॥ मागध म्हणे गेली वाटीव । धैर्य गांभीर्य वैभव । यश कीर्तीची राणीव । नेली सर्व यादवीं ॥ ९ ॥ धिग्‌धिग् ज्यालेपण जीवाचें । आतां येथोनि परतणें कैंचें । गोवळीं यश नेलें आमुचें । म्हणॊनि कवचें बांधिलीं ॥ १० ॥ पाठाची हिरोन नेली भाज । याहून थोर कवण लाज । करणें निर्वाणींचें झुंज । म्हणॊनि पैज घेतली ॥ ११ ॥ वीर वळंवळे अश्वांवरी । नाचती तिहीं पायांवरी । 'होहो' 'मामा' 'जीजी' कारी । यावा स्वारीं दाविला ॥ १२ ॥ पुढें पायांचें मोगर । आढाउ चालती गंभीर । सेले साबळे कोतेकर । धनुर्धर पायांचे ॥ १३ ॥ रथ जोडिले एकवट । वरी चढले वीर उद्भट । घडघडले चक्रवाट । रजें अंबुट कोंदलें ॥ १४ ॥ घोडिया बाणली मोहाळी । कंगण टोप रागावळी । पांखरा झळकती तेजाळी । आरसे तळीं लाविले ॥ १५ ॥ दोंही बाहीं कुंजरथाट । गदगलित गजघट । दांतीं लोहबंध तिखट । वीर सुभट वळंघले ॥ १६ ॥ एक चढले उंटांवरी । एक चढले अश्वांवरी । एक चढले खेचरीं । वीर भारी गर्जती ॥ १७ ॥ शस्त्रें झळकताती कैसीं । प्रळयकाळींची बिजू जैसी । मेघ गर्जती आकाशीं । तैसा गजांसी गडगर्ज ॥ १८ ॥ आम्ही प्रचंड धनुर्वाडे । रणकर्कश रणगाढे । नोवरी घेऊन आम्हांपुढें । कोणीकडे पळतील ॥ १९ ॥ निशाण त्राहाटिल्या भेरी । खाखाइल्या रणमोहरी । सिंहनाद केला वीरीं । उपराउपरी धांविन्नले ॥ २० ॥ शस्त्रास्त्रीं सन्नद्ध सबळ । मीनले महावीर सकळ । धांविन्नले उतावेळ । यादवदळ ठाकले ॥ २१ ॥ अवघे मिळोनि दिधली हांक । कृष्णा दाखवीं पां मुख । 'भीमकी पावली' हें सुख । झणीं देख मानिसी ॥ २२ ॥ सांडीं सांडी भीमकीचा संग । अबद्ध बांधिजसी निलाग । आला कोपिष्टांचा लाग । पडेल पांग दुजयाचा ॥ २३ ॥ एकला एकट होतासी । तै तूं कोणा नाटोपसी । स्त्रीलोभें अडकलासी । सांपडलासी वैरियां ॥ २४ ॥ तूं ह्रदयशून्य अविवेकी । दुजियातें न मानिसी शेखीं । तुज मीनले जे विवेकी । ते त्वां वृत्तिशून्य पैं केलें ॥ २५ ॥ अविचारितां एकाएकीं । चोरली परात्पर भीमकी । ते तंव न जिरे इहलोकीं । वीरीं कार्मुकें वाहिलीं ॥ २६ ॥ अविद्या चोरिली चंद्रावळी । विद्या पेंधी ते गोवळी । तैसी नेऊं पाहसी भीमकबाळी । असुरीं फळी मांडिली ॥ २७ ॥ न करितां रे उवेढा । केवीं जाऊं पाहसी पुढां । पळों नको परत भेडा । होई गाढा वीरवृत्ती ॥ २८ ॥ गौगोरस मंथन करितां । चोरिसी सारांश नवनीता । तैसिच नेऊं पाहसी राजदुहिता । बहुतां झुंजतां तें नये ॥ २९ ॥ यापरी तूं गोवळा जाण । आतां करीं शहाणपण । भीमकी सांडून वांचवीं प्राण । जीवदान तुज दिधलें ॥ ३० ॥ जैसे अहंकाराचे दुर्ग । तैसें आलें चातुरंग । भीतरीं वीर अनेग । कामक्रोधादि खवळले ॥ ३१ ॥ महामोहांचे मेहुडे । तैसें सैन्य आलें पुढें । कृष्णबोधाचे निजगडे । यादव गाढे परतले ॥ ३२ ॥ भीमकीऎशी नेणों किती । कृष्णें वरिल्या अनंत शक्ती । तुम्हां मशकांचा पाड किती । वेगीं दळपती परतला ॥ ३३ ॥ पळतां जन्म गेलें तुमचें । बोल बोलतां नाकें उंचें । आतांचि जाणवेल साचें । बहु बोलाचें फळ काय ॥ ३४ ॥ सत्रा वेळ पळालेती । निर्लज्ज मागुती आलेती । रणीं तुम्हां लावीन ख्याती । धनुष्यें हातीं वाइलीं ॥ ३५ ॥ दोहीं सैन्यां झाली भेटी । वोढिल्या धनुष्यांच्या मुष्टी । होत बाणांची पै वृष्टी । कूर्मपृष्ठी कांपतसे ॥ ३६ ॥ तडक फुटलें एकसरें । भिंडिमाळांचे पागोरे । वीर गर्जती हुकारें । रणतुरे लागलीं ॥ ३७ ॥ पायींचे लोटले पायांवरी । असिवार असिवारांवरी । वीर पडखळले वीरीं । परस्परें हाणिती ॥ ३८ ॥ गज आदळले गजांसी । महावंत महावंतांसी । शस्त्रें वोडविती शस्त्रांसी । घायीं घायांसी निवारण ॥ ३९ ॥ वोडणें आदळती वोडणा । बाण सुटती सणसणा । खड्‌गे वाजती खणाखणा । काळनंदना मांडली ॥ ४० ॥ धीर वीर राहे साहे । मागें न ठेविती पाये । माथां वाजती धाये । रुधिर वाहे भडभडा ॥ ४१ ॥ शस्त्रें सुटती हातींचीं । कटारा काढिती माजीचीं । उदरे फोडिती गजांची । वीर पायांचे चवताळती ॥ ४२ ॥ वोडण उचलोनियां ठायीं । वारु तोडिले पायीं । वीर पाडोनियां भुई । आढाऊ पायीं भीडती ॥ ४३ ॥ भातडीचे सरले शर । धनुष्यदंडे महावीर । झोडून पाडिती अपार । घोरांदर मांडिलें ॥ ४४ ॥ लाथा हाणोनियां गजांतें । झोंटी धरोनि महावंतांतें । तळीं आणोनियां त्यांतें । घायीं आंतें काडिती ॥ ४५ ॥ घायें पाडिती गजांतें । उपडोनि घेती गजदंतांतें । धांवोनि हाणिती रथांतें । एकेचि घाते शतचूर्ण ॥ ४६ ॥ घायीं मातले महावीर । वोढिती अंत्रमाळांचे भार । तरी धांवती समोर । थोर थोर पाडिती ॥ ४७ ॥ कृष्णबळें यादव गाढे । रणीं लोटलिया पुढें । देखोनि मागद धनुर्वाडे । कोपें वेगाढे उठावले ॥ ४८ ॥ हांक दिधली महावीरीं । बाण सुटले एकसरीं । यादवसैन्याचा महागिरी । शरधारीं झांकोळला ॥ ४९ ॥ आमच्या बाणांचें लाघव । आजि फावले यादव । धंवा पावा चला सर्व । आले गौरव आम्हांसी ॥ ५० ॥ देखोनि वैरियांच वरवळा । कांपिन्नली भीमकबाळा । नाश होईल दोंही कुळां । बोल कपाळा लागेल ॥ ५१ ॥ दीर भावे पडतील रणीं । सासुरां होईल टेहणी । कैंची आणिली हे वैरिणी । धड कोणी न बोलती ॥ ५२ ॥ सखे बंधू पडतील रणीं । दु:खें फुटेल जननी । माहेर तुटेल येथुनी । मुख कैसेनी दाखवावें ॥ ५३ ॥ कृष्ण पावलिया पुढें । कैसें मांडलें सांकडें । कठिण वोढवलें दोहींकडे । कपाळ कुडें माझेंचि ॥ ५४ ॥ थोर वोडवलें दुस्तर । तुटलें सासुरें माहेर । कृष्णावेगळा न दिसे थोर । पाहिलें वक्र हरीचें ॥ ५५ ॥ देखोनि हासिन्नला वनमाळी । भिऊं नको वो वेल्हाळी । यादव उठावले महाबळी । रणकंदळी करितील ॥ ५६ ॥ तुझे दीरभावे रणीं । शत्रु भेदतील बाणीं । धडमुंडांकित धरणी । अर्धक्षणीं करितील ॥ ५७ ॥ यादववळीं थोर थोर । परतले जी महावीर । परिसा नांवें सादर । सविस्तर सांगेन ॥ ५८ ॥ वीरां मुख्य हलायुध । अक्रूर कृतवर्मा आणि गद । सारण सात्त्विक सन्नद्ध । चक्रदेव महावीर ॥ ५९ ॥ सात्यकि अतिदांत श्वफल्क । महाबाहू वीर कंक । इतुके मुख्य करूनि देख । वीर अनेक यदुभारीं ॥ ६० ॥ हरिवंशीं यादववीर । सांगितले जी अपार । तितुका न धरवे विस्तार । कथा अपार वाढेल ॥ ६१ ॥ दोन्ही पंचक आणि एक । इतुके येथें वीरनायक । येरयेरांसी साह्य देख । मुख्य चालक बळीभद्र ॥ ६२ ॥ परदळीं अतिदारुण । वीर आले कोण कोण । ज्यांची गाढी आंगवण । ते राजे जाण सांगिजेती ॥ ६४ ॥ जरेंपासून जन्मला मोहो । तैसा जरासंध पहाहो । वेगें उठावला महाबाहो । सैन्यसमुदावो लोटला ॥ ६५ ॥ जरासंधासवें प्रबळ । राजे चालिले सबळ । कोण कोण आले भूपाळ । नांवें सकळ परियेसा ॥ ६६ ॥ शाल्व पौंड्रक विदूरथ । बळे प्रबळ वक्रदंत । या वीरांचा अद्‍भुत्‌ । वेग न धरत पातले ॥ ६७ ॥ गवेषण अंग वंग । केशिक कारूष कलिंग । हेही राजे जी अनेग । बळें चांग उठावले ॥ ६८ ॥ सकळां मुख्य जरासंध । सबळ बळेंसीं मागध । अवघे जाले सन्नद्ध । दारुण युद्ध मांडिलें ॥ ६९ ॥ चढिला बळिभद्रासी रणमद । देखोनि बोलिला वीर गद । वीर्य शौर्य अतिविनोद । गोत्रसंबंध युद्धाचा ॥ ७० ॥ दैवें जोडिलें युद्धसंपत्तीसी । एकलाचि तूं नेऊं पाहासी । स्वार्थी ऎसा कैसा होसी । वांटा आम्हांसी पाहिजे ॥ ७१ ॥ वीरविभाग तव प्रसिद्धू । माझा वांटा जरासंधू । सात्त्विक आमुचा धाकुटा बंधू । वक्रदंत त्यासी दीधला ॥ ७२ ॥ पौंड्रक दिधला कृतवर्म्यासी । विदूरथ दिधला अक्रूरासी । येर अवघे दिधले तुम्हांसी । गोत्रजांसी समजावे ॥ ७३ ॥ कोणी विकल्प धरील चित्तीं । संबंध याहीं अर्थाअर्थी । वांटा केला अतिनिगुती । वीरवृत्तीं नांदावें ॥ ७४ ॥ दायाद एकादे आपुले । रणीं देखाल खंगले भंगले । त्यांसी पाहिजे सांभाळिले । धन जोडिलें त्या नांव ॥ ७५ ॥ हांसें आलें बळीभद्रासी । टाळी पिटिली टाळीसी । रणचतुर तूं योद्धा होसी । म्हणोनि पोटासी धरियेला ॥ ७६ ॥ एका जनार्दनीं सन्नद्ध । मीनले गद हलायुध कोपें खवळला जरासंध । दारुण युद्ध मांडिलें ॥ ७७ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितांसंमते रुक्मिणीस्वयंवरे युद्धप्रारंभो नाम अष्टम: प्रसंग: ॥८॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ प्रसंग नववा श्रीगणेशाय नम: ॥ येऊनि जरासंधाप्रती । वीर प्रतिज्ञा बोलती । धनुष्यें वाइली हातीं । रणीं ख्याती लावुनी ॥ १ ॥ आमुच्या बाणांची प्रौढी । केवीं साहतील बापुडीं । नेणती युद्धाची परवडी । रणनिरवडी माराची ॥ २ ॥ यादवांचे बळ तें किती । आम्हां सन्मुख केवीं राहाती । नोवरी सांडूनियां पळती । महारथी लोटले ॥ ३ ॥ आचांगळी अधिक शब्द । ऎकून उठिला वीर गद । कोपे खवळाला हलायुध । रणमद चालिला ॥ ४ ॥ रागें पेटला प्रबळ । घेतलें नंगर मुसळ । नेत्रींहूनी निघती ज्वाळ । परदळ खळबळलें ॥ ५ ॥ सैन्य आटीत हलायुध । देखोनि चालिला जरासंध । त्यावरी उठावला वीर गद । द्वंद्वयुद्ध मांडिलें ॥ ६ ॥ महावीर बळीभद्र । म्हणोनि चालिला दंतवक्र । त्यावरी उठावला सात्त्विक वीर । येर येरां पडखळले ॥ ७ ॥ दोघां झाली दृष्टादृष्टी । घडघडिल्या चक्रवाटी । वोढल्या धनुष्यांच्या मुष्टी । दोघे हठी महावीर ॥ ८ ॥ रागें पौंड्रकें चालिल । त्यावरी कृतवर्मा लोटला । रथ रथेंसीं झगटला । गुण सुटला धनुष्याचां ॥ ९ ॥ बाण ओढूनिया ओढी । कृतवर्मा सवेग सोडी । पौंड्रकाचा ध्वज तोडी । पताका पाडी महीतळीं ॥ १० ॥ ध्वज तोडिला देखोनी । वेगें विंधिला सहा बाणीं । हातींचें धनुष्य तोडूनी । पाडिला धरणी कृतवर्मा ॥ ११ ॥ कृतावर्मा वीर अंगें । रथावरी चढला वेगें । धनुष्य बाहूनियां रागें । बाण अनेगेम वर्षला ॥ १२ ॥ पौंड्रक बाणांते तोडित । बाणामागें बाण सोडित । अलक्ष लक्षूनि भेदित । वीर विख्यात कृतवर्मा ॥ १३ ॥ हातीं घेऊन तीन बाण । धगधगित अतिदारुण । पौंड्रका तुझा घेईन प्राण । वेगीं विंदान पाहें माझें ॥ १४ ॥ पौंड्रक निवारण करी । परी ते अनिवार भारी । एक सारथियात मारी । दोन उरीं आदळले ॥ १५ ॥ बाण भेदिले सपिच्छेंसीं । पौंड्रक पाडिला धरणीसी । मूर्च्छना दाटली त्या कैसी । देहभावासी विसरला ॥ १६ ॥ पौंड्रक पडिला मूर्च्छित । तंव धांविन्नला विदूरथ । त्यातें अक्रूर त्वरित । पाचारीत रणभूमी ॥ १७ ॥ अक्रूर वीर अति गाढा । रथ आडवा रथापुढां । घालोनि उठिला वेगाढा । बळें मेढा वोढिला ॥ १८ ॥ तुझें नांव तंव अक्रूर । दारुण योद्धा नव्हेसी क्रूर । तुज कोण गणील वीर । रणीं धीर न धरवे ॥ १९ ॥ जयासी नाहीं वीरवृत्ती । तयासी अक्रूर गा म्हणती । तुजसी युद्ध तें किती । बाण शितीं लाविला ॥ २० ॥ तुझिये ह्रदयींची क्रूरता । समूळ बाणीं मी छेदिता । पाहें माझी अक्रूरता । मदगर्विता झाडीन ॥ २१ ॥ सुटले दोघांचेही बाण । अति झणत्कारें वाजती गुण । बाणीं गगन झालें पूर्ण । सूर्यकिरण झांकुळले ॥ २२ ॥ मेघामाजी विजु तळपती । तैशा भाली झळकताती । बाण बाणां आदळती । तिडक्या उठती अंतराळीं ॥ २३ ॥ षड्‌विकार साही बाण । अक्रूरावरी घाली दारुण । येरीं निर्विकर लक्ष साधून । बाणीं बाण निवारिले ॥ २४ ॥ तिखट उर्मीचिया भाली । सवेंचि विदूरथ घाली । घायें करीन अबोध भुली । गर्जून बोलीं विंधित ॥ २५ ॥ काढिला निजबोधकुर्‍हाडा । गुणी लावूनि लोटिला पुढां । भालीसहित तोडिला मेढा । गाढा धनुर्वाडा अक्रूर ॥ २६ ॥ घेऊनि क्रोधाचा भाला । रथावरून तो उडाला । निश्चळ निजशांतीं विंधिला । भाला तोडिला माझारीं ॥ २७ ॥ गुप्त होती वासनासुरी । हाणो धांविन्नला उरावरी । स्वानुभवाची भाली खरी । धीरें निर्धारी विंधिली ॥ २८ ॥ भाळीं आदळली सत्राणें । विदूरथ झणाणिला तेणें । सुरी उडविली कोणे मानें । गेली गगना दिसेना ॥ २९ ॥ बाण अव्यय काढिला । गुणीं अवगुणाचें जोडिला । अक्रूरें कानाडीं ओढिला । उडविला ही विदूरथ ॥ ३० ॥ बाप अक्रूर वीरराणा । कोणे नेटे सोइले बाणा । रथासहित उडविला गगना । रणप्रदक्षिणा करविली ॥ ३१ ॥ बाण भेदिला जिव्हारीं । विदूरथ पडिला धरणीवरी । डोळां लागली अर्धचंद्री । जेवीं खेचरी योगिया ॥ ३२ ॥ श्वफल्क सात्यक चक्रदेव । कंकसारणादि यादव । यांवरी उठावले राजे सर्व । अंगवंगादि कलिंग ॥ ३३ ॥ बाण सणासणां सूटती । खड्‌गे खणखणा वाजती । रथ रथांसी आदळती । वीर गर्जत सिंहनादें ॥ ३४ ॥ रणीं उठिला लोहधुळोरा । तेणें चालों न शके वारा । रणमद चढलासे वीरां । येर येरां हांकिती ॥ ३५ ॥ बाण बाणांसी आदळती । घायीं तिडकिया उठती । तेणें पिसारे पेट घेती । बाण जळती अंतराळीं ॥ ३६ ॥ करूषें घेऊनि बाण नव । वेगीं विंधिल चक्रदेव । बाणासरसी घेऊनि धांव । रथावरूनि आसुडिला ॥ ३७ ॥ चक्रदेवें लवडसवडी । कारूषावरी घातली उडी । येरू सांपडला रथाबुडीं । बुद्धि गाढी तेणें केली ॥ ३८ ॥ अंग चुकवूनि वेगेंसीं । चक्रदेव धरिला केशीं । थडक हाणोन उराशीं । कारूषासीं पाडिले ॥ ३९ ॥ गजारूढ पैं विख्यात । अंगरायें पेलिला हस्त । चक्रदेवाचा मोडिला रथ । वीरां खस्त करीतसे ॥ ४० ॥ अंग योद्धा महाबळी । रथ रगडी गजातळीं । यादवसेना मंडळी । रणरांगोळी करूं आला ॥ ४१ ॥ यादवामाजी कंक बळी । रागें करीत उठिला होळी । अंगासी हाणोनि कपाळीं । गजासहित मारिला ॥ ४२ ॥ कलिंगसैन्यावरी देख । रागें उठिला सात्यक । वीर मारिले अनेक । रणीं सैनिक पाडिले ॥ ४३ ॥ कोप आला कलिंगासी । सात्यकी विंधिला बाणें विसीं । एकचि बाणें तोडूनि त्यांसी । कलिंगासी पाचारिलें ॥ ४४ ॥ गुणीं लावूनि कुर्‍हाडा । मुकुट पाडूनि तोडिला मेढा । धनुष्य घेऊनि उठिला वेगाढा । कलिंग गाढा कोपला ॥ ४५ ॥ रथ विंधिला मकरतोंडीं । सवेंचि दोन्ही चाकें फोडी । पाडली सट्यकिची मुरकुंडी । बाणीं वितंडीं विंधिला ॥ ४६ ॥ सात्यकी वीर जगजेठी । पडत पडतां सवेंचि उठी । गदा घेऊनियां मुष्टी । कलिंग दृष्टी सूदला ॥ ४७ ॥ सव्य अपसव्य घोवंडी गदा । न धरत पातला तो योद्धा । कलिंगें तोडिली ते गदा । सात्यकी क्रोधा चढिन्नला ॥ ४८ ॥ घेऊनि रथाचा पैं आंख । वेगें धांविन्नला सन्मुख । कोपें होणों आला सात्यक । येरें मस्तक चुकविला ॥ ४९ ॥ रथाखाली घातली उडी । आंग चुकविलें रथाबुडीं । कलिंगाचा रथ मोडी । चारी घोडीं मारिलीं ॥ ५० ॥ वंगराजा रणप्रवीण । कोपें चालिला घेऊनि बाण । त्यावरी उठावला सारण । युद्ध दारुण तेथे जालें ॥ ५१ ॥ भोंवता बाणांचा वळसा । सैन्य पाडिलें धारसा । बाण भेदिले सपिच्छा । वंग त्रासा पावला ॥ ५२ ॥ सारणें थोर केला मारु । सारथीं जाणि मारिले वारु । बाणीं भेदिले रहंवरु । आणि दळभारू झोडिला ॥ ५३ ॥ विरथ केला वंगराजा । सवेंचि चढे पट्टगजा । धनुष्य वाहोनियां वोजा । बाण पैंजा घेतले ॥ ५४ ॥ शर सोडिले सारणावरी । सारण बाणांतें निवारी । गजें रथ केला चुरी । दांत उरीं लाविले ॥ ५५ ॥ रथाखालीं घातली उडी । गज धरिला शुंडादंडीं । सारण सोंडतें मुरडी । गजाबुडीं रिघाला ॥ ५६ ॥ गज मारावया एकसरें । सारण गजातळीं फिरे । वंग वर्षताहे शस्त्रें । सारणा बाहेर निघों नेदी ॥ ५७ ॥ सारण कोंडिला महावीर । यादवदळीं हाहाकार । ऎकोनि पावला बळिभद्र । वृक्ष थोर उपडिला ॥ ५८ ॥ राहें साहें म्हणे वंगातें । तेणें विंधिला बाणें शतें । मुसळ घेऊनि डावे हातें । त्या बाणातें निवारिलें ॥ ५९ ॥ दक्षिणहातीं होता वृक्ष । एकेचि घायें कपाळमोक्ष । गज निमाला नि:शेष । अधोमुख पडियेला ॥ ६० ॥ आडवा धांविन्नला केशिक । राजा उठावला मुख्य ।झाला बळिभद्र । सन्मुख । दोघे देख खवळले ॥ ६१ ॥ केशिकावरी हलायुध । मारा पेटला सुबुद्ध । येरिकडे राजे सन्नद्ध । यादवांवरी उठावले ॥ ६२ ॥ केशिक राजा अतुर्बळी । राम मारील निजहळीं । गवेषण राजा रणकल्लोळीं । घेईल समफळी यादवांसी ॥ ६३ ॥ तेव्हां राम माजवील रणनदी । तेथें चहूं पुरुषार्था मोक्षसिद्धी । कृष्णदृष्टीचिया प्रबोधीं । सायुज्यपदीं निजयोद्धे ॥ ६४ ॥ श्रीकृष्णाचिया दृष्टींपुढें । रणा येतां सायुज्या चढे । निधडिया वीरां भाग्य चोखडें । सायुज्य रोकडें साधिती ॥ ६५ ॥ तेथें द्वंद्वयुद्ध अतितुंबळ । रणीं माजेल रणकल्लोळ । एका जनार्दनीं रसाळ । कथा कलिमलनाशिनी ॥६६॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे । दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे नवम: प्रसंग ॥९॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ रुक्मिणी स्वयंवर -- http://www.shyamjoshi.org/rukmini-svayamvar2/

Search

Search here.