साईबाबा स्तोत्र2
स्तोत्र - मंत्र > साईबाबा स्तोत्र Posted at 2018-11-30 11:27:22
श्री साईबाबा स्तोत्र दासगणू कृत
जयाची ती रुपे सगुण निर्गूण,
ऐसा नारायण वंदू आधी,
सगूण सेविता निर्गूण ये हाती,
निर्गूणाची प्राप्ती आरंभी ना आधी
मुलं काढी क ख बाराखडी,
मग शब्द जोडी झाल्या ज्ञान
गणू म्हणे ऐसी सगुणोपासना,
बाराखडी जाणा अध्यात्म्याची (१)
तीही बाराखडी शिकवी जो गुरु,
भवाब्धीचे तारू तोच जाणा
गुरुसेवा हीच प्रथम पायरी ,
असे टिकण्या भारी अवघड
सदगुरुरायाची कृपा संपादिता,
सेवेचि पूर्तता सहज होई
गणू म्हणे केल्या प्रसन्न सविता,
प्रभेची न्युनता केवी पडे (२)
सदगुरुरायाची सेवा बहुतांनी केली,
ऐसी साक्ष दिधली पुराणांनी
पुर्णब्रम्ह राम जानकीचा कांत,
झाला शरणागत वसिष्ठांशी
रुक्मिणीवल्लभे केला सांदिपनी
आपणालागी गुरुराय
गणू म्हणे गुरु-वाचुनिया नर ,
तोचि जाणा खर दो पायांचा (३)
निष्ठावंत भाव हाच देतो फळं,
अभक्तिचा मळ निमालिया
चहाड दुतोंड्या ऐसा नारद मुनि,
परी झाला तरणी प्रल्हादाते
गोपिचंदे गुरु लिदिसी गाढीला,
परी तोची झाला वंद्य त्याते
गणू म्हणे सोने चढे मोलाअंगे,
कसोटीच्या संगे जगामाजी (४)
क्षमा शांति दया असे जया ठायी,
तैसे ज्ञान पाही संपूर्ण ते
जयाचिये शिरी ईश्वराचा हात,
तोच सद्गुरुनाथ करावा हो
बाहेरील सोंगा भुलु नका कदा,
पतंगाते दगा दिपापाशी
गणू म्हणे हंस पाण्याते टाकोनि,
घेतसे शोधोनि जैसे दूध (५)
हिरे आणि गारा एक्याच खाणीत,
तैसे बद्ध मुक्त जगामाजी
पारखी तो येता हिरा घे वेचुनी ,
कुक्कुट पायानी कालवी तो
मुमुक्क्षु पारखी चार्वाक कोंबडा,
कुक्कुटा उकिरडा गोड वाटे
गणू म्हणे जो का असे भाग्यवंत,
तयाचाच हेत गुरुपायी (६)
क्षमा शांतियुक्त भवाब्धिचे जहाज,
ऐसा सद्गुरुराज शिरडीमाजी
नानाविधा शोभे जया साई,
अनाथांची माई तीच जाणा
अनाथ सनाथ हा न भेद जेथे,
सुर्यप्रकाशाते निवड कैची
माझा गुरुनाथ जान्हविचे जळ,
गणू अर्पी भाळ तया पायी (७)
अंगकाठी उंच केलीसे धारण,
कळावया लीन भक्तजना
उच्च ज्ञान जे का अध्यात्म सजिरे,
तेची सेवा सारे कल्याणार्थ
परी नका सोडू ठेंगडी लीनता,
न ये थोर बाल्याविण
गणू म्हणे वर्ण तांबूस सावळा,
सद्गुरुरायाची लिला अगाधची (८)
सद्गुरुरायाने जला तेल केले,
दीप उजळिले लक्षावधी
ठेवुनिया दीप उशा पायथ्याशी,
पहुडे फळीसी गुरुमुर्ती
त्यांच्या ह्या कृतिचा हाच आहे अर्थ,
कदा अंधारात निजु नये
गणू म्हणे माया दुर्धर अंधार,
ज्ञानदीप थोर म्हणून लावा (९)
शिव विष्णु ब्रम्ह आहे बाबा साई,
भाव दुजा काही मानु नका
सद्गुरुरायांच्या पायाची जी धूळ,
तेच गंगाजल शुद्ध माना
अमृता आगळी मुखींची वचने,
तीच माना मने गीता जेवी
गणू म्हणे बाबा वसंत सोज्वळ,
भक्तांनो कोकिळ व्हारे तुम्ही (१०)
परमार्थाची आस आहे मनातून,
त्याने हे चरण पहावे आधी
ऐहिक सुखाशी देउनिया फाटा,
भक्तिच्या त्या वाटा ढुंढाळाव्या
द्वेषाचे सराटे फेकुनिया द्यावे,
साईमय पहावे जगालागी
गणु म्हणे तरी तुम्ही त्यांचे भक्त,
शोभाल जगात सज्जनांनो (११)
शिर्डीक्षेत्र नोहे पचंबा बाजार्,
येथे दुकानदार परमार्थाचा
ऐहिक सुखाचि खेळणी बाहुल्या,
समूळ फेकिल्या गुरुराये
काकि तयामाजि किमपी न अर्थ,
फसतील पोरे व्यर्थ माझी
गणू म्हणे पोर पचंब्यासि जाते,
किरकिरेच घेते आवडीने (१२)
कर्म भक्ति बाजारी या माल,
मनी जो वाटेल तोचि घ्यावा
तिघांची किंमत एक आहे जाणा,
फळही तिघांना एकची हो
भावरुपी द्रव्य पाहिजे तयासी,
साईसद्गुरुसी दुजे न लगे
गणू म्हणे भावरुपी नाणेआहे जयापाशी,
त्याने बाजारासी तेथे जावे (१३)
फळ ते पाथेय घ्यावे फराळासी,
मग पंढरीसी जावे सुखे
बाबाजीने कृपा तुकोबासि केली,
तयीच फळली पंढरी त्या
थापटणे गोर्याने मारुन नाम्याला,
कच्चा ठरविला देवापुढे
गणू म्हणे मग खेचर माऊली,
नाम्याने वंदिली कल्याणार्थ (१४)
निवृति ज्ञानेश ईश्वरी अवतार,
परी गुरुवर गहिनी केला
गुरुकृपेवीण एकालाही जनी,
विठू चक्रपाणी भेटला ना
पंढरीरायाची मनी असलिया आस्,
सदगुरुची कास दृढ धरा
गणू म्हणे जया भवाचे ना भय,
त्याचे चित्ती पाय सद्गुरुचे (१५)
शुक सनकादि नारद अंबरीश,
निवृति ज्ञानेश नामा तुका
दास तुलसी चोख्या जयदेव सावंता,
पंत नाथ मेहता कबीर तो
बोधला पवार विसोबा खेचर,
गोरोबा कुंभार कुर्मदास
गणू म्हणे त्याच कोटीतला साई,
चला त्याच्या पायी लीन होऊ (१६)
जरी या संतांच्या मुर्ती हो लोपल्या,
साईरुपे उरल्या पहावया
त्रिभुवनामाजी जे जे कोणी संत,
ते ते साईनाथ मजलागी
भेदबुद्धी नुपजो माझी संताठायी,
संत शेषषायी प्रत्यक्षची
गणूदास आहे संतांचा अंकित,
भेटो पंढरीनाथ त्यांच्या कृपे (१७)
भक्तिरुप गंगा वाहे जया ठायी,
तेथे माझा साई राहे उभा
हस्तसंकेताने पालवितो लोका,
या हो फिरु नका रानोमाळ
मज ओळखावे आहे मी कोठला,
कशासाठी आला शिरडीसी
पंढरीक्षेत्रीचा मीच हो वाटाड्या,
गणुच्या त्या उड्या साईबळे (१८)
मज ना विचारिता पंढरीच्या वाटे,
जाल तरी काटे रुततील
पंढरीची वाट मोठी अवघड,
मोठे मोठे पहाड मार्गामाजी
तयाचे ते वज्र आहे मजपाशी,
तसा हृषिकेशी ओळखिचा
गणू म्हणे जन्मोजन्मी नाही तुटी,
साईंच्या जगजेठी हृदयात (१९)
म्हणून ही संधी दवडु नका कोणी,
पडाल मागुन पस्तावात
दंभाचे हे गाठोडे एकीकडे ठेवा,
विकल्प सोडा घातक जो
क्रोधाची ती होळी ज्ञानग्नीने करा,
वासनेसी मारा अभ्यासाने
गणु म्हणे ऐश्या व्रतासी जो पाळी,
तयासी सांभाळी साई माझा (२०)
करु नका नाश या आयुष्याचा,
जन्म मानवाचा पुन्हा नाही
प्रत्येक जन्मात कन्या पोरे घर,
मैथुन आहार आणि निद्रा
नरजन्म नाही ऐशा कृत्यासाठी,
बांधा खुणगाठी मनामाजी
जोडू जाता जोडे जन्मी या ईश्वर,
नरजन्म थोर गणू म्हणे (२१)
लोभ मोहमाया टाकून अवघ्यांची,
धरा सदगुरुची पाऊले ती
गुरुपायामाजी आहे सर्व काही,
गुरुविण नाही सार्थकता
गुरु कामधेनू गुरु कल्पलता,
चिंतेसी वारिता चिंतामणी
गुरुभक्तिठायी जो का एकनिष्ठ,
त्रिलोकी तो श्रेष्ठ गणू म्हणे (२२)
गुरुपदी भाव विठुसी अबोला,
ऐशा मानवाला मोक्ष नोहे
भोपळा हातात परी धोंडा कंठी,
बांधल्या शेवटी घात घडे
गुरुरुपी देह आत्मा पांडुरंग,
केल्या येई रंग एक्या ठायी
एक्या अव्हेरिता एक न ये हाता,
दोघांची योग्यता सारखीच
गुरु आणी देव यात केल्या तुटी,
दुख्खाची नरोटी येई हाता
गणू म्हणे रहा सावध या साठी,
गुरु जगजेठी एकरुप (२३)
साईबाबा आणी सद्गुरु वामन ,
हे न दोघे भिन्न एकरुप
भाव साधकांनी ठेवा दोघापायी,
परी विठाबाई गावी वाचे
साई वामनाचे करावे पूजन,
राखावा सन्मान भूपतिचा
परमार्थात भक्ति व्यवहारी नीती,
संसारा विरक्ति गणू म्हणे (२४)
गुरुपाठाचे हे अभंग पंचवीस,
जपता होय नाश पातकांचा
गुरुचे पवाडे गाता मोक्ष लाभे,
नका मरु दंभे निरर्थक
साईमहाराजांचा धरुनीया हात,
तरा भवाब्धीत बुडू नका
साईंच्या इच्छेने होते अवघे काही,
गणुकडे नाही बोल याचा (२५)
श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय ...
Search
Search here.