संस्कृत अर्धवाक्य लेखमाला 3
श्याम जोशी ब्लॉग Posted at 2016-07-04 12:58:02
संस्कृत सुभाषित ( अर्ध वाक्य ) लेख तृतीय
04 जुलै 2016
लेखक अभ्यासक - श्री श्याम जोशी गुरुजी
टिटवाळा
शनिवार रविवार अत्यंत व्यस्तते मुळे लेख लिहू शकलो नाही ..
आज आपण बघणार आहोत एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य ( अर्थातच अर्ध वाक्य ) .. *जामाता दशमो ग्रह*
वरील वाक्य सर्वसामान्य जन सुद्धा सरळ सरळ वापरून मोकळे होतात हे स्वतः मी अनुभवले आहे ( कारण मी सुद्धा एक जावई आहे ना ) ?☺ असो ..
या अर्ध वाक्याचे पूर्ण रूप खालील प्रमाणे ..
भारतं पंचमो वेदः सुपुत्र: सप्तमो रस: |
दाता पंचदशं रत्नं *जामाता दशमो ग्रह:* ||
अर्थ ---> महाभारत हा पाचवा वेदच होय कारण त्यात अनेक ज्ञानवर्धक विषय आहेत .. सुपुत्र हा सातवा रस च समजावा कारण षड्रस जसे शरीराला मनाला आनंद देतात तसाच उत्तम आज्ञाधारी ज्ञानवंत पुत्र हा सुद्धा मनाला शरीराला आनंदच देत असतो .. व समुद्र मंथनातून प्राप्त झालेली चौदा रत्ने जशी विस्मयकारी , महत्वाची व दुर्मिळ आहेत तशीच एखादा दान देणारा दाता सुद्धा दुर्मिळ व महत्वाचाच समजावा .. आणि आकाशातील नवग्रह जसे आपल्या कुंडली प्रमाणे आपल्याला चांगले वाईट दोन्ही अनुभव देतात तसेच जावई हा सुद्धा दहावा ग्रह समजावा कारण तो सुद्धा चांगले वाईट अनुभव मिळण्याची संभावना असते .. वाईट अनुभव अशा मुळे म्हणावा कि त्याला आपली कन्या दिल्यामुळे त्याची मर्जी सांभाळावी लागते ...
वरील अर्धवाक्य हे सर्रास वापरले जाते .. याच जोडीला याच अर्ध वाक्याचे अजून एक दुसरे पूर्ण रूप आहे व जे काही जणांना माहीत असते .. पण ते सासूसासरे व जावई यांच्या वैशिष्ट्य पूर्ण वागण्या मुळे खूप नंतर आलेले विडंबीत पूर्ण रूप होय .. ते सुद्धा आपण बघूया ..
सदा वक्र: , सदा क्रूर: , सदा पूजाम् अपेक्षते
कन्या राशि स्थितो नित्यं , *जामाता दशमो ग्रह:* ||
अर्थ ---> माणसांना नऊ ग्रहांची पीडा - त्रास असतो त्यात जावई हा दहावा ग्रह समजावा .. कारण तो सासरच्यांशी कधीच सरळ न वागणारा सतत वाकडा ( वक्र ) , क्रूर असतो व कन्येला ( म्हणजे त्याची पत्नी ) मध्ये घालून नेहमी काही ना काही अपेक्षा ठेवून कन्येसकट सासरच्यांना छळत असतो ..
याच अर्ध वाक्याचे अजून एक पूर्ण रूप पाहूया ..
आदित्याद्या ग्रहा सर्वे यथा तुष्यंती दानत: |
सर्वस्वेपि न तुष्येत *जामाता दशमो ग्रह:* ||
अर्थ वरील प्रमाणेच --> पूजा शांती करून दान करून सूर्य शनी वैगेरे ग्रह शांत व संतुष्ट होतील पण जावई हा दहावा ग्रह कधीच संतुष्ट होणार नाही ..
अशा प्रकारे आपण वरील अर्ध वाक्याचे तीन पूर्ण रूप पाहिले .. वरील पूर्ण रूपांमध्ये प्रथम सांगितलेले पूर्ण रूप हे प्राचीन असून दुसरे व तिसरे पूर्ण रूप हे सध्याच्या काळातील जावई व सासुसासरे यांच्यातील गमती जमती मुळे आलेले आहे .. दोन्ही पूर्ण वाक्ये - रूपे कशातील आहे याबद्दल पक्की खात्री नसली तरी ( माझ्या वाचनमाहिती प्रमाणे ) प्रथम सांगीतलेले पूर्ण रूप हे सुभाषित सागर या प्राचीन ( प्राचीन नाही अर्वाचीन च् म्हंटला पाहिजे ) अंदाजे दीडदोनशे वर्षांपूर्वी चा एक पुस्तक वजा ग्रंथ आहे त्यात दिला आहे .. व त्याबरोबर या पन्नास शंभर वर्षातील काही सुभाषितांच्या पुस्तकांमध्ये वरील तीनही सुभाषिते आहेत ..
चला .. उद्या पुन्हा एक नवीन अर्ध वाक्य घेऊन भेटू तोपर्यंत रजा घेतो ..
आपलाच --
लेखक अभ्यासक -- © श्री श्याम जोशी गुरुजी
टिटवाळा
या लेखमालेचा उद्देश --> अनेक वेळा बोलता बोलता आपण संस्कृत मधील एखादे छोटे सुभाषित , वाक्य बोलून जातो . परंतु ते सुभाषित - वाक्य एका मोठ्या सुभाषिताचा किंवा वाक्याचा छोटासा भाग असतो हे आपल्याला माहीत नसते . व्यवहारात ते छोटेसे वाक्य सदैव वापरात असल्याने स्मृतीत राहते व त्याचा पूर्णभाग विस्मृतीत जातो . आपण अशाच ( अर्ध ) वचनांचा - सुभाषितांचा अर्थासह उहापोह या लेखमालेत करणार आहोत .. तसेच संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार हा सुद्धा मुख्य हेतू आहे .
Search
Search here.