संस्कृत अर्धवाक्य लेखमाला 4
श्याम जोशी ब्लॉग Posted at 2016-07-06 13:47:22
|| श्री गणेशाय नमः ||
संस्कृत सुभाषित ( अर्ध वाक्य ) लेखमाला
लेख चतुर्थ 06 जुलै 2016 बुधवार
लेखक अभ्यासक - श्री श्याम जोशी गुरुजी
टिटवाळा
गेल्या लेखांमध्ये आपण प्रसिद्ध अशा अनेक संस्कृत अर्ध वाक्यांचा उहापोह केला . आज सुद्धा अत्यंत प्रसिद्ध अशा संस्कृत वाक्य ( अर्धवाक्य ) विषयी मी सांगणार आहे .
आजचे संस्कृत अर्ध वाक्य आहे --
*विनाशकाले विपरीतबुद्धिः*
सर्वाना सुपरिचित असलेले हे अर्धवाक्य सर्व जण एखाद्याचा विनाश किंवा मोठे भरून न येणारे नुकसान होणार असेल तर बुद्धी भ्रष्ट होते अशा साठी सर्रास वापरतात . म्हणजेच सरळ सरळ असा अर्थ घेतात की विनाशकाल जवळ आला की बुद्धी भ्रष्ट होते .
आता या अर्ध वाक्याचे पूर्ण रूप आपण पाहू या .
न भूतपूर्वो न च केन दृष्टो
हेम्नः कुरङ्गो न कदापि वार्ता |
तथापि तृष्णा रघुनन्दनस्य
*विनाशकाले विपरीतबुद्धिः* ||
सोन्याचा हरिण पूर्वी कधी झाला नाही आणि कोणी पाहिला नाही. त्याची कोणालाही काहीहि माहिती नाही. तरीहि रामाला त्याचा लोभ पडला . विनाशकाळी बुद्धि उलटी फिरते .
रामायणातील सुवर्ण मृग पकडण्याच्या प्रसंगावर आधारलेल्या या वाक्याचा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी थोड्याफार शब्दफरकाने उल्लेख आहे . चाणक्य नीती , महाभारत तसेच काही काही मध्ययुगीन नीती सूत्रे , उपदेश सूत्रे या मध्ये हे वाक्य थोड्याफार शब्द फरकाने आलेले आहे .
ती इतर पूर्ण रूपे सुद्धा आपण पाहुयात .
1 ) न निर्मित: केन न दृष्टपूर्व:
न श्रुयते हेममय: कुरन्ग
तथापि तृष्णा रघूनंदनस्य
*विनाशकाले विपरीत बुद्धी* ||
2 ) न भूतपूर्वं न कदापि वार्ता
हेम्नः कुरंगो न कदापि दृष्ट
तथापि तृष्णा रघूनंदनस्य
*विनाशकाले विपरीत बुद्धी* ||
3 ) हेम्नः कुरंगो न कदापि दृष्ट
असंभवं हेममृगस्य जन्म
तथापि रामो लुलुभे मृगाय
*विनाशकाले विपरीत बुद्धी:* ||
सोन्याचा हरीण कधीच कोणीही पाहिला नाही व त्याचा ( अशा सुवर्णमृगाचा ) जन्म सुद्धा संभव नाही . हे ज्ञान असून सुद्धा रामाचे मन / बुद्धी विचलित झाली व सुवर्णमृगाचा लोभ धरला . विनाशाचा / मोठ्या संकटाचा काळ आला की बुद्धी अशीच फिरते / भ्रष्ट होते .
वरील तीनही पूर्ण वाक्यांचा अशाच प्रकारचा अर्थ आहे . इथे विनाशकाळ याचा अर्थ विनाश असा न घेता मोठे संकट असा सुद्धा घ्यावा . तसेच मला असे वाटते की विनाशकाळ जवळ आला म्हणजे बुद्धी फिरते / भ्रष्ट होते असे म्हणण्या पेक्षा बुद्धी भ्रष्ट झाली की विनाशकाळ येतो असे म्हणणे जास्त संयुक्तिक वाटेल . बरोबर ना ? बहुतेक हेच सुभाषितकारांना अभिप्रेत असेल .
असो . चला तर मंडळी . उद्या पुन्हा एक नवीन अर्ध वाक्य घेऊन भेटू तोपर्यंत रजा घेतो . नमस्कार ?. शुभम् भवन्तु ...
लेखक अभ्यासक --
आपलाच --
© श्री श्याम जोशी गुरुजी
टिटवाळा
या लेखमालेचा उद्देश --> अनेक वेळा बोलता बोलता आपण संस्कृत मधील एखादे छोटे सुभाषित , वाक्य बोलून जातो . परंतु ते सुभाषित - वाक्य एका मोठ्या सुभाषिताचा किंवा वाक्याचा छोटासा भाग असतो हे आपल्याला माहीत नसते . व्यवहारात ते छोटेसे वाक्य सदैव वापरात असल्याने स्मृतीत राहते व त्याचा पूर्णभाग विस्मृतीत जातो . आपण अशाच ( अर्ध ) वचनांचा - सुभाषितांचा अर्थासह उहापोह या लेखमालेत करणार आहोत . तसेच संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार हा सुद्धा मुख्य हेतू आहे .
Search
Search here.