संस्कृत अर्धवाक्य लेखमाला 5

श्याम जोशी ब्लॉग Posted at 2016-07-10 13:20:00
​|| श्री गणेशाय नमः ||  संस्कृत सुभाषित ( अर्ध वाक्य ) लेखमाला  लेख पंचम  10 जुलै 2016 रविवार  लेखक अभ्यासक - श्री श्याम जोशी गुरुजी  टिटवाळा   सस्नेह नमस्कार मंडळी ,  संस्कृत अर्धवाक्य लेखमाला या मध्ये आपण आज बघणार आहोत एक अर्धवाक्य -   " *वादे वादे जायते तत्वबोध:* "  सर्वसामान्य व्यक्तींपैकी काही जणांनाच परिचित असणारे हे अर्ध वाक्य संस्कृत प्रेमी मंडळी , वेद - पुराण - रामायण - महाभारत आदी चे ज्ञान असलेले पुरोहित मंडळी यांना मात्र नवीन नाही .. कारण अध्यात्मिक क्षेत्रामध्ये हे वाक्य अनेक वेळा सर्रास वापरले जाते .. याचा अर्थ हि तसाच  -- " *वाद विवाद ( चर्चा संवाद ) या द्वारे तत्वांचा ( खऱ्या ज्ञानाचा ) बोध होतो* .. "  एखाद्या विषयावर अनेक विद्वानांची मते काय आहेत या चर्चा संवादाने त्या विषयाचे सार , तत्व , खरे आकलन होते या अर्थाने हे अर्ध वाक्य अनेक वेळा वापरले जाते ..  आपण या वाक्याच्या पूर्ण रुपाकडे जाऊ ..  तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृंदम्  वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद:  | *वादे वादे जायते तत्वबोध:*  बोधे बोधे भासते चंद्रचूड:  || अर्थ  ---  प्रत्येक तीर्थक्षेत्रात पुण्यवान ज्ञानवंत ब्राह्मणांचे समुदाय असतात , प्रत्येक ब्राह्मण समुदायांमध्ये वेदांत , शास्त्र , धर्म अशी चर्चा -  चिंतन चालू असते , त्या प्रत्येक चर्चेत काही ना काही ज्ञान - तत्व  याचा बोध होत असतो व प्रत्येक बोधामध्ये श्री शिवशंकरांचे दर्शन असते ..  हे नुसते वेदांत धर्म या क्षेत्रातच लागू न होता आजच्या युगामध्ये जे काही शास्त्रीय विषय आहेत या विषयातील चर्चेला सुद्धा लागू आहे ..   शंकराचार्य यांच्या तत्वचिंतानुवाद व पादपूर्ती जिज्ञासा या मधील या ओळी , नारदपूराणातील काही प्रतींमध्ये सुद्धा आढळतात असा उल्लेख आहे ..   काही ठिकाणी " चंद्रचूड " ( म्हणजे शंकर ) या जागी " चक्रधर " ( म्हणजे विष्णू ) असा सुद्धा भेद आहे ..  काही ठिकाणी " तीर्थे तीर्थे " या ऐवजी " मार्गे मार्गे " असा सुद्धा पाठभेद आहे ..  " समयोचित पद्य मालिका " या नावाच्या एका ग्रंथा मध्ये या सारखी 3 ते 4 वेगवेगळी पदे आली आहेत .. आणि हि पदे कालिदासाच्या नाटक प्रकरणात सुद्धा आहेत असा उल्लेख आहे ..  ( या विषयातील जिज्ञासू - अभ्यासू चिकित्सक व्यक्तींनी त्या वाक्य / पदांसाठी मला संपर्क  करावा . ) 1950 च्या आसपास एका विद्वानाने ( श्री . गंगादासजी , आडनाव माहीत नाही ) या वाक्याच्या विरोधी एक वाक्याचा उल्लेख एके ठिकाणी  केला होता .. तो म्हणजे -- " वादे वादे वर्धते वैरवन्हि: "  म्हणजे वाद चर्चे मध्ये वैर - शत्रुत्वाचाच भाग जास्त दिसून येतो व वाढतो ..  सध्या काही ठिकाणी चर्चा संवाद कार्यक्रमा मध्ये या वाक्याचा प्रत्यय दिसून येत आहे ..  असो . चला तर मंडळी . उद्या पुन्हा एक नवीन अर्ध वाक्य घेऊन भेटू तोपर्यंत रजा घेतो . नमस्कार ? . शुभम् भवन्तु  ...  लेखक अभ्यासक --  आपलाच --   © श्री श्याम जोशी गुरुजी  टिटवाळा या लेखमालेचा उद्देश --> अनेक वेळा बोलता बोलता आपण संस्कृत मधील एखादे छोटे सुभाषित , वाक्य बोलून जातो . परंतु ते सुभाषित - वाक्य एका मोठ्या सुभाषिताचा किंवा वाक्याचा छोटासा भाग असतो हे आपल्याला माहीत नसते . व्यवहारात ते छोटेसे वाक्य सदैव वापरात असल्याने स्मृतीत राहते व त्याचा पूर्णभाग विस्मृतीत जातो . आपण अशाच ( अर्ध ) वचनांचा - सुभाषितांचा अर्थासह उहापोह या लेखमालेत करणार आहोत .  तसेच संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार हा सुद्धा मुख्य हेतू आहे .

Search

Search here.