श्रीसत्यविनायक व्रत पूजा

व्रत - पूजा - कथा Posted at 2019-02-17 16:21:23

***श्रीसत्यविनायक व्रत पूजा***

आपल्या सर्वांना सत्यनारायण पूजा माहित आहेच. त्याप्रमाणे सत्यविनायक पूजा आहे. या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याला अखंड सुखाची प्राप्ती व्हावी असे वाटते म्हणूनच ऋषि, साधुसंतानी परमेश्वराच्या भक्तिसारखे दुसरे साधन नाही असे म्हटले आहे. कलौ “चंडी विनायकौ” या वचनाप्रमाणे कलियुगात देवी, गणपती यांची उपासना जास्त फ़लप्रद आहे. खूप लोकांचे आराध्य दैवत गणपती असून त्याला विघ्नहर्ता सुखकर्ता असे म्हटले आहे म्हणजेच विघ्नांचा नाश करणारा आणि सुखाची प्राप्ती करवून देणारा त्या अनुषंगाने शास्त्रामध्ये हि सत्यविनायक पूजा करण्यास सांगितले आहे. या सत्यविनायक पूजेमध्ये गणेशाचे असे वर्णन आले आहे की गणेशाचे शरीर श्वेत असून श्वेत रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत कपाळी श्वेत गंध लावले आहे प्रसन्न मुखकमल असून रत्नजडीत सिंहासनावरती विराजमान झाले आहेत. कलशावरती सत्यविनायकाची स्थापना करून परिवार देवता आहेत त्यांचे आवाहन, पूजन केले जाते. या पूजेमध्ये विविध प्रकारची पत्री / फ़ुले अर्पण करण्यास सांगितली आहेत. १०८ वेळा गणेशाच्या नावाने दूर्वा समर्पण आहे. नैवेद्यासाठी तूपामध्ये तळलेले मोदक, पंचखाद्य, पेढे इ. सांगितले आहे. पूजा पूर्ण झाल्यावरती विशेष प्रार्थना करावी . सरस्वती पूजन करून ब्राह्मण पूजन करावे कथा श्रवण करून झाल्यावर आरती मंत्रपुष्पाजंली म्हणून सांगता करावी. * व्रत कधी, कोणी, कशासाठी करावे? हे व्रत व पूजा लहानापासून थोरापर्यंत कोणत्याही वयाच्या स्त्री अगर पुरुषाने किंवा सपत्नीक केल्यास अधिक उत्तम! १.इच्छित हेतू सफल होण्यासाठी,कन्या अगर पुत्र यांच्या प्राप्तीसाठी,धनप्राप्ती साठी. २.मनात योजिलेले अगर हाती घेतलेले कार्य यशस्वी होण्यासाठी. ३.परीक्षेत,निवडणुकीत, चढाओढीत, क्रीडा स्पर्धेत यश मिळवण्यासाठी व यश मिळाल्यानंतर आनंदोत्सवासाठी.रोगपीडा,शत्रुपीडा,दुःख व दारिद्र्य दूर होण्यासाठी, नोकरी मिळण्यासाठी, व्यापार धंदा चांगला चालण्यासाठी. ४.गृहप्रवेश, दुकान,चित्रमंदिर,नाट्यमंदिर, दवाखाना,विद्यामंदिर,व्यायाम- शाळा, यांच्या उद्घाटन प्रसंगी; व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त, किंवा संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त. ५.कोणत्याही आनंद प्रसंगी,उत्सव प्रसंगी, खाजगी-सार्वजनिक समारंभ प्रसंगी,मकर संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभ प्रसंगी. कोणत्याही मंगळवारी,प्रत्येक महिन्याच्या शुक्ल चतुर्थीस म्हणजे 'विनायकी चतुर्थीस' व कृष्ण पक्षातील चतुर्थीस म्हणजे'संकष्ट चतुर्थीस'हे व्रत करावे.तसेच कोणतीही पौर्णिमा,वैशाखी पौर्णिमा, गणेश चतुर्थी (वरद चतुर्थी) यांपैकी कोणत्याही दिवशी, श्रीसत्यविनायकाचे व्रत करून पूजा करावी. प्रत्येक मंगळवारी लागोपाठ २१ पूजा दृढश्रद्धेने केल्यास त्वरित फळ मिळते.नवस केलेली पूजा व व्रत करणे, लांबणीवर टाकू नये किंवा विसरू नये. संकष्टी चतुर्थीचा उपवास करणारांनी त्या दिवशी गणपतीची पंचोपचारपूजा करून यातील पोथी वाचावी व चंद्रोदयानंतर उपवास सोडावा. * महानैवेद्य * नैवेद्यासाठी पंचामृत, फळे, गूळ-खोबरे,साखर मिश्रित खोबऱ्याचा कीस किंवा साखरफुटाणे अगर पेढे असावेत.साखर, खवा (खवा नसल्यास खोबर्‍याचा किस) व गव्हाचा बारीक रवा, या वस्तू प्रत्येकी सव्वा प्रमाणात घ्याव्यात.खव्यात किंवा खोबर्‍याच्या किसात साखर घालून सारण तयार करावे व मोदक करून ते तूपात तळावेत. पूजा संपल्यावर सत्यविनायकाला २१ मोदकांचा महानैवेद्य दाखवावा. १.ज्या दिवशी हे व्रत व पूजा करावयाची असेल,त्या दिवशी सकाळीच स्नान करुन शुचिर्भूत व्हावे आणि उपोषण करावे. दुपारी फक्त दूध व फलाहार घ्यावा. (उपवासाला चालणारे पदार्थ खावे) घरातील केरकचरा काढून सडासंमार्जन करावे. २.पूजेची वेळ सांगून इष्टमित्र नातेवाईक,शेजारीपाजारी यांना पूजेसाठी,देव दर्शनासाठी आणि तीर्थ प्रसादासाठी बोलवावे. ३.घरात, देवळात अगर कोणत्याही, मोकळ्या व स्वच्छ जागी तोरणे, पताका लावून छोटासा मंडप तयार करावा.घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचा एक टहाळा बांधावा. मंडपाखाली चौरंग अगर पाट मांडून त्यावर फुलांच्या माळांनी शृंगारलेले मखर तयार करावे. ४.त्या मखरात विनायकाची (गणपतीची) सोन्याची, चांदीची,तांब्याची अगर पोवळ्याची छोटी मूर्ती, तसबीर किंवा प्रतीक म्हणून एक नारळ किंवा सुपारी ठेवावी. ५.पूजा साधारणतः.सायंकाळी दिवेलागणीस करावी. पूजा सांगण्याचे काम गुरुजींं कडून करवावे.परंतु गुरुजी मिळणे शक्य नसल्यास किंवा ठरलेल्या वेळी ते न आल्यास स्वतःच षोडशोपचाराने यथासांग पूजा करावी. ६.नंतर श्रीसत्यविनायकाची पोथी वाचावी. व इतरांनी ती शांतपणे ऐकावी. नंतर या पोथीतील खास आरती व इच्छेनुसार इतर आरत्या म्हणून पंचारती ओवाळावी. ७.स्वतः तीर्थप्रसाद घ्यावा व इतरांनाही तीर्थप्रसाद द्यावा. महाप्रसादाचेे मोदक कुटुंबातील सर्वांना जेवताना वाढावेत.रात्री कुटुंबीयां समवेत मिष्टान्न भोजन करावे. ८.शक्य असल्यास गायन ,भजन, कीर्तन यांपैकी इच्छेनुसार एखादा कार्यक्रम रात्री ठेवावा. ९.दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून उत्तरपूजा करावी.सत्यविनायक म्हणून पुजलेला नारळ किंवा सुपारी आणि इतर सर्व निर्माल्य नीट गोळा करून समुद्रात किंवा नदीत सोडावे. धातूची मूर्ती व तसबीर उचलून घरात ठेवावी व पुढे प्रत्येक पूजेच्यावेळी मखरात ठेवावी. **************************************************************** श्रीसत्यविनायक अध्याय १ ॐ श्रीसत्यविनायकाय नमः। श्रीगजवदनाय नमः। श्रीविघ्नराजेंद्राय नमः। कृपा करी आम्हावरी॥१॥तुझिया थोरवीचा पार । चतुर्वदनासी न लागे साचार। तेथ मी काय वर्णू पामर । बोलवीता तूं धनी॥२॥ सेवक मी सरस्वतीचा । पाईक मी गजाननाचा । दास असे मी सदाशिवाचा । विष्णूचा भक्त मी ॥३॥ मी गुरु मार्गींचा वाटसरू । मी गुरुमाउलीचें लेकरूं । मी निष्काम भक्तीचें वासरूं ।सांभाळी मज गणेशा ॥४॥ तूं विषेश गणांचा नायक । म्हणूनी म्हणितला विनायक । तुजविना देवांसी निःशंक । कार्य करिता नयेचि ॥५॥ मज पाखरांते तूं कल्पतरू । तू त्रैलोक्य प्राणधारू । तू माझिया इंद्रियांचे वारू। विवेके वळवावे ॥६॥ आणि सगुण शब्दरूप । थरी तू अससी अमाप ।आम्हासीं गँ मंत्रे स्वरूप । दाविसी ॐ कारा ॥७॥ तिन्ही अवस्थांचिया वरी । तुर्यावस्थेचिया माहेरी । गजानना तव सारी । ध्यानकळा ये हाता ॥८॥ तुझिया रूप गुणांचा । थांग न लागे चरित्राचा ।तूं दैवत शिवपार्वतीचा । पुत्र होउनी झालासी ॥९॥ मायातीत असुनी तव । अवर्णनीय मायेचे वैभव । सत्यविनायका मम भाव । तुझिया पायी॥१०॥गजमुखा मम लेखनी । प्रतिभेचे देणे देउनी । तव महात्म्य वर्णुनी । घेईं रे गणनायका ॥११॥नैमिषारण्य महावन । सूत शौनकादि साधुसज्जन ।यज्ञसत्रास्तव येऊन । राहती पूर्वी एकदा ॥१२॥तधीं काय जाहले वर्तमान । शौनकादि ऋषिजन ।सूतासी करुनियां वंदन । काय बोलते जाहले ॥१३॥ पुराणवक्ता तू सूता । रोमहर्षणा सांगसी कथा । देव दानवांची युगप्रथा । नाना शास्त्रे वर्णिसी ॥१४॥ धन्य असे तुझे ज्ञान । तरी करावे आमुचे समाधान । करावयासी जनकल्याण । पृच्छा असे आमुची ॥१५॥ कलियुग पुढती येणार । लोक अधर्मे त्रस्त होणार । एरव्ही दुःखमय संसार ।सर्वांप्रती ठाउका ॥१६॥ तरी आधि व्याधि निरसन । इष्ट लाभ समाधान । सुख शांती मन प्रसन्न । कैसे व्हावे सर्वांचे ॥१७॥ कोणते असे ऐसे व्रत । उपाय उत्तम सर्वांप्रत । जेणे वैभव विद्याही प्राप्त । होतील उपासकां ॥१८॥ सूत म्हणे प्रश्न उत्तम । तुम्हांसी रक्षणीय असे धर्म । ब्रम्हदेवे पूर्वी जे मर्म । नारदासी कथियेले ॥१९॥ विरंची म्हणे नारदा । एकच दैवत हरी आपदा । शरण जावे विनायकपदा । मूळ दैवत तो असे ॥२०॥शीघ्र फलदायी व्रत । सत्यविनायक म्हणुनी सांगत । पूजन,कथा पठण संगत ।तीर्थप्रसाद ग्रहणही ॥२१॥ शौनकासी म्हणे सूत ।सत्यविनायक शक्ति अद्भुत । प्रसन्न होतां निजभक्त ।श्रेष्ठपदासी चढवीतसे ॥२२॥ कथा तयाचिया अनेक । पार्वतीस सांगती त्र्यंबक । सांगतो तुम्हांसी सिद्धिदायक । परिसा प्रेमे सर्वही ॥२३॥ तुम्हांसी वर्णिली भागवती कथा । जेणे विरली व्यास मनोव्यथा । भगवद्भक्तीची प्रथा । विस्तारिली त्या गुणे ॥२४॥ तेथ सुदामा ब्राम्हणासी । भेटतां कल्याण करी ह्रषीकेशी । कथा वर्णिलीसे ऐसी ।सविस्तर ती परिसावी ॥२५॥ सुदामा दरिद्री निर्धन । परी श्रद्धाळू त्याचे होते मन । करूं शकेना कुटुंबपोषण । कृष्णाचा मित्र तो ॥२६॥ घरी खावया नसे दाणा । येरू म्हणे मित्र द्वारकेचा राणा । पत्नी मुले दीन याचना । करिताती आप्तेष्टां ॥२७॥ मुखे वाखाणी चक्रपाणी । परी उपाशी राही गृहिणी । एकदा ती धीर करुनी । पतीसी काय बोलली ॥२८॥ जरी द्वारकाधीश तुमचा सखा ।कासया भोगावे आपण दुःखा । जाउनी त्याजवळी काही मागा । चिंता दूर करील ॥२९॥ भेटावे प्रेमे जाउनी । अन्नान्नदशा घालावी कानी । कृपा उपजतां महादानी । विन्मुख ना पाठवी ॥३०॥ आता विलंब ना करावा । भेटावे जाउनी केशवा । दैन्य भोग काही सरावा । करणे ऐसा उपाय ॥३१॥ ऐकुनी स्त्रीची विनंती । पाहुनी तिची काकुळती । सुदामा तो द्वारकेप्रती । निघालासे जाण्याते ॥३२॥ परी मनी करी विचारा । जावे कैसे मित्रघरा । भेटवस्तुविना पाहुणेरा । जातां दोष लागतसे ॥३३॥ रिक्त हस्ते कैसे जावे । न्यावे म्हणतां काय घ्यावे । जवळी नसे काही ठावे । थोर चिंता पडलीसे ॥३४॥ तंव पत्नी जाय शेजारी । पोह्यांची करी उसनवारी । पुरचुंडी बांधूनीया करी । पतीचिया देतसे ॥३५॥ उपरण्यासी सतरा गांठी । पोह्याविना नसे काही गांठी । हळूहळू सुदामा गांठी ग्रामांतरे कष्टाने ॥३६॥ पाही मागे वळुनी वळुनी । डोळां भरुनिया पाणी । म्हणे कैसा बोलूं जाउनी ।कृष्णापुढे या वेषे ॥३७॥ दुबळा दीन लज्जित ।दरिद्र्यामुळे क्षीण होत । कालांतरे द्वारकेसी जात ।प्रभासतीर्थ ओलांडुनी ॥३८॥ चौक्या पहारे पहारेकरी । सुदामा चकित अवलोकन करी ।कृष्णसभेमाजी प्रवेश तरी । विप्रत्वे होय सहज तो ॥३९॥ सभेमाजी बैसलेला । बालमित्र गोविंद देखिला । ब्राम्हणे संकोचे आपणाला । दूषण दिले त्या वेळी ॥४०॥ पुरचुंडी हाती चाचपीत । पुढती गेला भीतभीत । तया पाहुनी रुक्मिणीकांत ।लगबग करी तेधवां ॥४१॥ आलिंगन देई सुदाम्याला । अश्रु लोटले तये वेळा । सुदामा निरखी यदुपतीला । कंठ दाटला भावनांनी ॥४२॥ कृष्ण विचारी" रे सखया । विलंब केलासी भेटावया । आश्रमातील स्मृती यावया । लागती मज एकसरे" ॥४३॥ त्वरेने तो सभेतुनी । नेई विप्राते निजसदनी ।जेथे असे राणी रुक्मिणी । लक्ष्मी स्वये विराजती ॥४४॥ सलगी करी जगन्नाथ । उपरण्याला घाली हात । पोहे घेऊनी करांत । अतिप्रेमे भक्षीतसे ॥४५॥ भेट आणिली घराहुनी । गोकुळींचे दुधलोणी ।आठवुनिया तो चक्रपाणी । प्रशंसोनी भक्षीतसे ॥४६॥ मागुती सुदाम्यासी म्हणे । मुख कारे केविल वाणे । सुदामा करी तधी बोलणे । शांत थोडा होउनी ॥४७॥ दारिद्र्याची कर्मकहाणी । ऐकता बोले महादानी । मित्रा मज उदास मनी । वाटे तव स्थितीने ॥४८॥ अयाचित वृत्ती असे तव । म्हणुनी न मिळे वैभव । परी तुज एक संभव । उपाय मी सांगयसे ॥४९॥ सत्यविनायक नामे व्रत । गणेश प्रीत्यर्थ प्रशस्त । तुवां आचरितां समस्त । मिटतील तव चिंता ॥५०॥ ऋषी देवता गणेशाते । या व्रते करूनी आराधनतें । मिळविती सत्ता वैभव बिरुदे ।महाफलदायी व्रत असे ॥५१॥ विद्या बुद्धी मान किर्ती । कांता सुत यश संपत्ती । गणेशकृपेने प्राप्त होती । संशय नको मनि धरूं ॥५२॥ वैशाख मास पौर्णिमेला । जन्म जाहला विनायकाला । म्हणुनियां या व्रताला । तिथी पवित्र ती असे ॥५३॥ निर्गुण निराकार तो जरी । भक्तांवरी तो कृपा करी ।सगुण रूपे तो संचारी । दर्शन देई भक्तांसी ॥५४॥ पौर्णिमा अथवा चतुर्थी । मंगळवार योग्य व्रताप्रती।पूजन करावे यथाशक्ती । सायंकाळी तयाचे ॥५५॥उपोषण करावे पूर्ण दिन । सत्यविनायक मूर्ती स्थापून । उत्तम चौरंगावरी पूजन । यथासांग करावे ॥५६॥ सुवर्ण रजत ताम्र धातू । मूर्ती घ्यावी पूजनहेतू ।पवित्र प्रतिमा समस्तु । धातुमय जाणाव्या ॥५७॥ शमी दुर्वा मंदार । पूजा साहित्य शेंदूर । सुगंधी द्रव्य मनोहर । पूजेसाठी जमवावी ॥५८॥ साखर खोबरे यांचे सारण । रव्याचे मोदक घ्रुतीं तळून । एकवीस मोदक समर्पण । महानैवेद्य करावा ॥५९॥ पंचारती पुष्पांजली । आणि पाचारुनी मित्रमंडळी । ऐसा पूजावा सायंकाळी ।विनायक श्रद्धेने ॥६०॥ सुदामदेवा ऐसे व्रत । मीही करितो हे गुपित । म्हणुनी मज वैभव प्राप्त ।जाहलेसे एवढे ॥६१॥ मजसी मानवावतारा । घेणे पडे देवांचिया आधारा । गणेश-कृपा प्रभाव सारा ।सत्य जाण मम वचन ॥६२॥ सुदाम डोले 'बरे' म्हणुनी । परी शंकित असे मनी । कृष्णा ने केवळ व्रत सांगुनी । स्वये दिले नच काही ॥६३॥ परी पुढती त्याच्या सदनी । राहिला तो निस्पृह होउनी ।दुसऱ्या दिवशी गर्गमुनी । मंगळवारी येताती ॥६४॥ सत्यविनायक पूजाविधान । तयांनी केले ते पाहुन । सुदामा मनी करी चिंतन । व्रताचरण कराया ॥६५॥ म्हणे मज लाभे धन । तरी करिन व्रत पूर्ण ।कृष्णाचा निरोप घेऊन । तैसाचि निघे जावाया ॥६६॥ मनी म्हणे कृष्ण भेटला । परी काही न मिळे मला।' श्रीपतीचा'प्रत्यय आला । वैभव ते देखिले ॥६७॥ ऐसा करीत विचार । परतुनी चालला विप्रवर ।' पत्नी येता मजसमोर' । म्हणे 'काय सांगू मी' ॥६८॥ तंव मार्गीं घडले नवल । एक मनुष्य आला जवळ । करीत समोरूनी धावपळ । हातीं पेटी धरोनी ॥६९॥ म्हणे विप्रश्रेष्ठा ऐकावे । कर्माचे सुत्र काय जाणावे । चोरांनी मज लुटून वैभवे । निष्कांचन केले हो ॥७०॥ तेधवा मी म्हटले मनी ।जरी धन मिळेल परतुनी । तरी अर्धे मी त्यातुनी ।ब्राम्हणासी देईन ॥७१॥ मार्गीं येता अवचित ।सहस्त्र मोहरा या पेटींत । गवसल्या मजला मार्गांत ।धन हे असे माझेचि ॥७२॥ तरी पाहिले तुम्ही पुढती । विश्वरुपे प्राप्त संप्रती । पांचशत मोहरा तुम्हाप्रती । अर्पीतसे सद्भावे ॥७३॥ स्वीकार करावा आनंदे । पुनीत करा मज आशीर्वादे । ऐसे म्हणुनी तेणे मोदे । नमस्कारिला सुदामा ॥७४॥ सुदामा आश्चर्ये विचारी । नांव काय सांगा तरी । तंव म्हणे मी 'मणि'व्यापरी । द्रव्य होते बहुत मम ॥७५॥ अघटित जाहली घटना । सुदामा करी पूजना । सत्यविनायक व्रत पालना । नच करी विलंब ॥७६॥ कृष्ण सखा तो ब्राम्हण । करितां विनायक ध्यान । प्रत्यक्ष देतसे दर्शन । सत्यविनायक तयातें ॥७७॥ विघ्नहर्ता चतुर्हस्त । गजवदन एकदन्त । पाशांकुश धारण करित । सिंहारूढ तेजस्वी ॥७८॥ माथा मुकुटाची झळाळी ।नागादिक भूषणे आगळीं । ऐसा विनायक त्या वेळीं । देता झाला दर्शन ॥७९॥ सुदामा करी स्तवन ।धनसंपदा प्राप्त करून । पूर्ण सुखी होऊन । धन्य जाहला जगतांत ॥८०॥ *************************************************************** श्रीसत्यविनायक अध्याय २ जय जय सिंधुरवदना । जय जय दुरितनाशना । जय जय भक्तरक्षणा । कृपाकरी विनायका ॥८१॥मणिवैश्यासही घडले दर्शन । तीर्थ प्रसाद करी प्राशन विप्रासी म्हणे हे पूजन । सविस्तरे मज सांगा ॥८२॥ तधींं सुदामा ब्राह्मण । पूजाव्रताचें करी वर्णन । मणिवैश्य तें समजून । निजसदना जातसे ॥८३॥ म्हणे मज आली आपत्ती । सत्यविनायक निवारील तो । आता जाउनी गृहाप्रती व्रत पूर्ण करीन ॥८४॥ मणिवैश्यासी व्रतसांगुनी । सुदामा मनी आनंदुनी । निजनगरा गेला परतुनी । पुढती काय जाहले ॥८५॥ आठवीत विनायका । सुदामा तो कृष्णसखा । जातां पाही कौतुका । विलक्षण आश्चर्यें ॥८६॥ पाहतसे चमत्कार । जाउनी चंद्रमौळी घर । प्रासाद भव्य मनोहर । तया जागी दिसतसे ॥८७॥ मार्ग दिसे प्रशस्त । उद्यान भोवतीं दिसत । आश्चर्यें उद्गार काढीत । सुदामा त्यावेळी ॥८८॥ कोठे गेले माझे ठिकाण । कोणाचे हे विशाल भवन । भ्रांत जाहले काय मन । काही मज उमजेना ॥८९॥ द्वारकेसी गेलो तोवरी । इकडे काय जाहली परी । मोह पडला मज भारी । म्हणुनी गेले होते ते ॥९०॥ तंव अवचित सेवक येती । 'महाराज'!म्हणुनी वंदिती । 'यावे' म्हणून बोलाविती । आत्यादरे तयासी ॥९१॥ पत्नी धावली बाहेर । मुले धावली बरोबर । हर्षे नाचती समोर । 'बाबा बाबा' म्हणून ॥९२॥ सुंदर अलंकार भूषणे । शोभिवंत वस्त्रे प्रावरणे । पाहतां ती सुदामा म्हणे । काय नवल जाहलें ॥९३॥ पत्नी म्हणे आपले घर । कृष्णे कृपा केली आम्हांवर । तुम्ही द्वारकेत गेल्यावर । दृष्टांत होय मज स्वप्नीं ॥९४॥ गजानन येउनी सांगतं ।सुदामे केले माझे व्रत । तुम्हांसी आतां वैभव प्राप्त ।होईल उदईक ॥९५॥ जागृत होउनी पाहतां । भोवती दिसली संपदा । नगरामाजी श्रीमंता । नवल वाटे प्रभाती ॥९६॥ तरी रहस्य सांगा आपण । कोणते केले व्रताचारण । कृष्ण आणि श्रीगजानन । कैसे प्रसन्न जाहले ॥९७॥ निजपत्नीसी सांगे सुदामा । जेव्हा गेलो कृष्णधामा । सत्यविनायक व्रतमहिमा । कृष्णे मज सांगितला ॥९८॥ मार्गी जाहले प्राप्त धन । तेने केले विनायक पूजन । मणि नामे वैश्य येऊन। साह्य केले अवचित ॥९९॥ पोहे घेतले मूठभर । सुख दिधले आयुष्यभर । कृष्ण विनायक आपल्यावर ।संतुष्ट ते जाहले ॥१००॥ उसने घेतले पोहे जेवढे ।सुवर्ण दिले त्यांनी तेवढे । शेजारीन म्हणे केवढे ।उपकार आम्हावरी ॥१०१॥ सुदामा ब्राह्मण प्रासादांत । पत्नीसह व्रत करित । परिवारासह आनंदात । नित्यनेम पाळितसे ॥१०२॥ पौर्णिमेसी करी व्रत । आयुरारोग्य संपदा प्राप्त । अंती पावे मोक्षपद । ऐसा महिमा व्रताचा ॥१०३॥ ********************************************************** श्रीसत्यविनायक अध्याय ३ जय जय गणाधीशा । जय जय बुद्धिमतिप्रकाशा ।जय जय मंगल आशा । भक्तांची तूं गणपते ॥१०४॥ मणि वैश्य निजसदनी । कच्छभुज नगरीं प्रसन्न मनी । जाता जाहला समाधानी। सत्यविनायक दर्शने ॥१०५॥ सर्वांसी आश्चर्य सांगत । म्हणे करू विनायकव्रत । प्रथम चतुर्थी होय प्राप्त । तीच केली निश्चित ॥१०६॥ पुजा केली यथासांग ।प्रार्थना करी नमुनी साष्टांग । म्हणे कृपा करी सिंधुराङ्ग । पूजा-स्वीकार करावी ॥१०७॥देवदर्शनानिमित्त । जमले मित्र आप्त गणगोत ।परस्परांसी प्रेमे भेटत । मंडपी दाटी जाहली ॥१०८॥ चित्रबाहु नामे राजप्रधान । मणिवैश्यमित्र येऊन । भेटता मणीते समाधान । जाहलेसे उभयतां ॥१०९॥ तेथ अघटित एक जाहले । तस्कर योगायोगे आले । जवाहिर जे होते चोरले । तेच घेउनी विक्रीते ॥११०॥ रत्नजडित भूषणे । हार मोत्यांचे चांदी सोने । दाविती लोकांसी गुप्तपणे ।धनवंत निवडुनी ॥१११॥ प्रधानासवे मणि बैसतां।तेणे ओळखिलीं रत्ने हातां । गुप्तपणे करी वार्ता ।म्हणे हेच तस्कर ॥११२॥ मुद्रिका जी प्रधाने दिली ।पूर्वीं एका समारंभवेळी । तीच खुणेने दाखविली ।खात्री पटली प्रधाना ॥११३॥ प्रधाने तस्करांसी पकडुनी । चौकशी केली धमकावुनी । अपराध मान्य करुनी । चोर क्षमा मागती ॥११४॥ चोरी कशा केली कोठे । सांगितले तो नवल मोठे । सर्व काढिलीं तेथे । प्राधानापुढती ठेविली ॥११५॥गयावया करिती तस्कर । मणिवैश्य कृपाळू खरोखर । म्हणे दया करावी यांच्यावर । माल माझा मिळाला ॥११६॥ प्रधानाने क्षमा करुनी । मुक्त केले तस्करां तत्क्षणी । मणिवैश्य मिळतां धन फिरुनी ।समाधान पावला ॥११७॥ मणिवैश्य त्यापुढती । करितसे नित्य व्रताप्रती । मंगळवारी यथारीति ।उपोषण करुनिया ॥११८॥ पाहुनी सत्यविनायक व्रत । तात्काळ फळ कैसे देत । प्रधानही विचार करीत । पुत्रकामना धरोनी ॥११९॥ मनी म्हणे सर्व भोग असती । परी नसे मज संतती । नवस बोलला काकुळती । पुत्र व्हावा म्हणूनी ॥१२०॥ विनायका मी तुज शरण । देई रे मज संतान । तव व्रताचे आचरण । करीत मी त्यावरी ॥१२१॥ पुत्र होई त्यासी प्राप्त । आनंदात परी विस्मृत । नवस जो बोलला सुखांत । दुःख विसरे पुर्वीचे ॥१२२॥तेणे मंत्रिपद जाउनी । राजाने दिले घालवुनी । दोष दुष्कीर्ती झाली जनी । परागंदा भटक ॥१२३॥ रेवा नदी-तटीं प्रधान । एक वर्षभरी राहून पोट भरी भिक्षा मागून । फार दु:खी जाहला ॥१२४॥ चिंता करीत अंतरी । भटके सर्वत्र दीनापरी । गेला दूर देशान्तरी । शुकमुनींच्या आश्रमा ॥१२५॥ परम विरक्त सोज्ज्वळ । शुकदर्शन होतांं बहुसाळ ।पश्चात्ताप करी प्रांजल । दु:ख निवेदी ऋषीते ॥१२६॥ शुक म्हणती चित्रबाहुते । तुवा केले होते नवसाते । आठव सत्याविनायकाते।बोललसी काय ते ॥१२७॥ सत्यविनायक व्रत । संतान होतांच होय विस्मृत । आतां तरी प्राप्त । असे क्षमा मागुनी॥१२८॥ जरी करिशील पूजन । संकटे सर्व निवारण ।पूर्वपद तुजसी मिळुन । सुखी फिरूनी होशील ॥१२९॥ चित्रबाहूसी स्मरे संकल्प । म्हणे जाहले माझे पाप । चुकलो विनायका!मायबाप!तूंच क्षमा करावी ॥१३०॥ आश्रमांतच अन्य दिनी । प्रधान मग्न विनायक पूजनी । पश्चात्ताप अत्यंत पावुनी । शरण जाई विनायका ॥१३१॥ तंव जाहला चमत्कार । धर्मकीर्ति राजा थोर । दूत पाठवी नगर नगर । शोधाया तयाते ॥१३२॥ शुकाश्रमांत दूत येउनी । चित्रबाहूते ओळखुनी । नेती राजधानीसी परतुनी । म्हणती राव बोलावी ॥१३३॥ अपराध नसतां तयाचा । अन्याये दंड केला साचा । ऐसा संदेश रायाचा ।सांगता नवल वाटले ॥१३४॥ प्रधानासी मिळतां पूर्वपद । जाहला अत्यंत आनंद । सत्यविनायक कृपाप्रसाद । आठवित घडिघडी ॥१३५॥ पुढती तस्करांचे काय झाले । मगधदेशी सर्व गेले । मणिवैश्याचे व्रत पाहिले । तेच स्मरे तयांसी ॥१३६॥ तस्करीचा आला उबग । सापडावा वाटे सन्मार्ग । मनी म्हणती पापसंग । दूर व्हावा आपुला ॥१३७॥ फल्गु नदीतीरी येतां । संकल्प दृढ झाला चित्ता । सत्यविनायकाचिया व्रता । करावें ठरविती ॥१३८॥ तेथ सरितातीरी मनोहर । मंडप घातला सुंदर । सत्यविनायकव्रत तस्कर । करिती प्रतिमास ते ॥१३९॥ ऐसे उन्मार्गी सन्मार्गी झाले ।विनायकव्रत करुं लागले । पुढती काय नवल जाहलें । सूत म्हणे परिसावें॥१४०॥ ****************************************************************** श्रीसत्यविनायक अध्याय ४ तस्करांचे चालले व्रत । फल्गु नदीचा आसमंत ।भरून भक्तिभावे जात । सत्कीर्ती हो तयांची॥१४१॥ भार्गव गोत्रींचे आचार्य । ब्राह्मण करिती सहकार्य । पुजा व्रतादि सत्कार्य । यथासांग करविती ॥१४२॥ तेथ येई एक नारी ।फाल्गुनदीचिया तीरीं । मंडपाचिया अंतरी । येउनिया रडतसे ॥१४३॥ तिज पाहुनी दु:खित ।सुंदर आणिक शीलवंत । श्रीमंत आणिक दैवहत ।करी सांत्वन आचार्य ॥१४४॥ वृत्तांत तिजला पुसती । ती म्हणे मी तव पदीं । शरण आलें मम दैवगती । कैसी आहे नाकळे ॥१४५॥ आचार्य म्हणे नच भ्यावें । दु:ख आपुले सांगावें । सत्यविनायक-प्रभावें । कल्याण तव होईल ॥१४६॥ ती म्हणे मावळ देशाची । राणी सुशीला मी साची । पत्नी चंद्रसेन राजाची । अपत्यहीन नावडती ॥१४७॥माझा करुनी तिरस्कार । सवतीवर प्रीती करी फार । चंद्रसेन नृपवर । दु:ख त्याचे मज असे ॥१४८॥मदनावती माझी सवत । पद्मसेन नामें तिज सुत ।प्राप्त होत आनंद बहुत । मजसीही जाहला ॥१४९॥ परि मज पुत्र न दाविती । राजासह कोणी न विचारती । अपमान उपहास करिती । हाल करिती सर्वही ॥१५०॥ महिनोमहिने चंद्रसेन । पाहीना मजकडे ढुंकून । विनवण्या मी करुन । थकले परि व्यर्थचि ॥१५१॥ मदनावतीसी राज वश । मजवरी तयाचा रोष । त्यातुनी ती पुत्रवती खास । मर्जी बैसली तिजवरी ॥१५२॥ पुढती मद्रराजाची सुता ।पद्मसेनाची जाहली कांता । लग्नसोहळा अपूर्व होता । मजसी नाही निमंत्रण ॥१५३॥ पुत्रावरी राज्य टाकुनी । यात्रेसी निघाली राजाराणी । मीही आपण होउनी । येथवरी येतसे ॥१५४॥ गयाक्षेत्रीं काय घडलें । मदनावतीने मज मारले । लाथांनी बहु ताडण केले । दुःख बहुत हो मज ॥१५५॥ प्रबळ होतां शोकावेग । नदीत कराया प्राणत्याग । प्रवाही द्यावे झोकुनी अंग । म्हणुनिया धावले ॥१५६॥ तंव मंडप भव्य पाहुनी । क्षणभरी ये शांती मनी ।तीर्थप्रसाद घेउनी ।जावे वाटे एकदा ॥१५७॥तीर्थप्रसाद मज द्यावा । व्रताचा महिमा सांगावा ।आचार्य मजसी सोडवा । दारुण मम अवस्था ॥१५८॥ आचार्य होउनी सकरुण । म्हणती तिज सद्वचन । दुःखासी भिउनी प्राण । टाकूं नये कधींही ॥१५९॥ आत्मनाश करूं नये । धैर्य मुळीं सोडूं नये । दु:खाचा वीट धरूं नये । देव सर्व पाहतसे ॥१६०॥ जावे तयासी शरण । तुज ज्याचे झाले दर्शन । तोचि सत्यविनायक जाण । भाग्यवती तू अससी ॥१६१॥ करी सत्यविनायक व्रत । तुजसी प्रीती होईल प्राप्त । निष्ठा असतां जीवनांत । धैर्य उपजे स्वभावे ॥१६२॥ राणी म्हणे आचार्यांते । व्रत सांगावे हो मातें । भार्गव आचार्य तियेते । कथा सांगती तेधवां ॥१६३॥ कृष्ण-सुदामा व्रतांत ।मणिवैश्याची कथा सांगत । चित्रबाहूने केले व्रत ।तेही सांगती ॥१६४॥ तस्करांचे मतपरिवर्तन । तयांचे व्रतग्रहण । सांगुनियां केले वर्णन । व्रत कैसे करावे ॥१६५॥ तीही तीर्थप्रसाद घेऊन ।विनायकासी वंदून । आचार्यांसी देई वचन ।व्रत करीन म्हणूनिया ॥१६६॥ मंगळवार अथवा चतुर्थी । उत्तम असे पौर्णिमा तिथी । ऐसे भार्गव तिज बोधिती । आशीर्वाद देउनिया ॥१६७॥ सुशीला राणी बोले नवस । पति होउं दे मज वश । पुत्र प्राप्त व्हावा विशेष । पराक्रमी सद्गुणी ॥१६८॥सत्यविनायक व्रत करीन । नित्य मनी ठेवुनी स्मरण । म्हणुनी करी चरणवंदन । परतुनी चालली ॥१६९॥ धैर्य धरूनी जाई राणी । शांत मनें आपुल्या स्थानी । सत्यविनायक ध्यानी मनी । धरीतसे निरंतर ॥१७०॥ सूत म्हणे ऋषींसी । पुढती श्रवण करा कथेसी । सत्यविनायक भक्तांसी । कृपादान देतसे ॥१७१॥ ****************************************************** श्रीसत्यविनायक अध्याय ५ पूर्ण करूनिया यात्रेसी । चंद्रसेन चालला नगरीसी । घेउनिया दोन्ही राण्यांसी । कर्णावत पट्टणीं प्रवेशला ॥१७२॥ पुढती चंद्रसेन मनी म्हणे ।सुशीलेसी काय दोष देणे । अपत्य होणे नच होणे । दैवाधीन सर्वही ॥१७३॥ तेढ नावड सोडूनी । नृप जाई तिच्या सदनी । दिवसेंदिवस प्रेम उपजुनी ।पश्चात्ताप पावतसे ॥१७४॥ सुशीलेच मनोगत । नृप चंद्रसेन सांभाळीत । मदनावती आश्‍चर्य करीत । परी बोलूं शकेना ॥१७५॥ सुशीला मनीं विचारी । सत्यविनायक कृपा करी । म्हणुनी पालटली सारी । स्थिती ऐसी आपली ॥१७६॥ एकेदिनीं राजपुरोहितांसी । बोलावी ती भरद्वाजांसी । म्हणे गुरुवर्य मजसी । व्रत करावें वाटतसे ॥१७७॥ सत्यविनायक पूजाव्रत । करावें ऐसा मनोरथ । भरद्वाज जाहलेआनंदित । म्हणती तिज तेधवां ॥१७८॥ देवी आपला मनोदय । उत्तम असे नि:संशय । सत्यविनायक दयामय । इष्ट सर्व देतसे ॥१७९॥ राजासी करुनी निवेदन । पूजा सामग्री आणून ।नाना पुष्पें जमवून । केले मोदक नैवेद्या॥१८०॥ वैभवासी साथ भक्तिभावाची । ऐसी पूजा विनायकाची । चंद्रसेन-सुशीलादंपतीची । सर्वांसी हो आनंद ॥१८१॥ ब्राम्हणांस दीन दुबळ्यांसी । दक्षिणा दाने दिली याचकांसी । हळदी कुंकू सुवासिनींसी । अति रम्य सोहळा ॥१८२॥ सर्वही करिती आनंद । मदनावती करी प्रमाद । दर्शन घेईना मतिमंद । प्रसादही अव्हेरीला ॥१८३॥मदनावतीसी मत्सर जाळी । विपरीत प्रति जाहली । सत्यविनायक-निंदा केली । तुच्छ मानिलें देवाला ॥१८४॥ सुशीलेसी चंद्रसेन । प्रेमे करी आचरण ।कालान्तरे पुत्र संतान । प्राप्त होई तियेला ॥१८५॥ लक्षप्रद नाम ठेवियले । आनंदासी भरतें आलें । प्रजा जनांसी धन वाटलें । चंद्रसेनें संतोषे ॥१८६॥ मदनावती क्रोध करून । वादविवाद करी दारुण ।सत्यविनायकासी निंदुन । पाप घडले भयंकर ॥१८७॥ काया होई रोगग्रस्त । कोडी जाहली राणी दुःखित । नृपही तिचा त्याग करित । सुशीलेसी बहु मानी ॥१८८॥ मदनावती करी विचार । चुकले आपुलेच फार । सुशीलेपुढे पसरुनी पदर ।क्षमा मागे बापडी ॥१८९॥ सत्यविनायकाते स्मरूनी । म्हणे तिज सुशीला राणी । तूवा धरिला मत्सर मनी । म्हणुनी दुःख जाहले ॥१९०॥ आतां तरी जावे शरण । सत्यविनायकाचे करी पूजन । करावे दुःख निवारण । ऐसी करी प्रार्थना ॥१९१॥अव्हेरिलासी प्रसाद । इतरांसी दिधला विषाद । क्षम्य करावया प्रसाद । विनायक समर्थ॥१९२॥ऐकतां तियेचे वचन । मदनावतीने पुशिले लोचन ।सत्यविनायक व्रत करीन । केला ऐसा संकल्प॥१९३॥ सदनी आपुल्या जाउनी । व्रत करी मदनावती राणी । सुशीलाही पुनश्च तिजकारणीं ।व्रत करी नि:स्वार्थ ॥१९४॥ व्याधी गेली मदनावतिची । आवडती जाहली राजाची । कृपा होतां गजाननाची । परमानंद जाहला ॥१९५॥ गेले संकटांचे कालमेघ । नष्ट जाहले दैवभोग ।निरसले पूर्वसंचित अघ । मदनावती राणीचे ॥१९६॥दोघी राण्यांसमवेत । चंद्रसेन नृप राज्य करीत । कर्णावत नगरांत । समारंभ जन करिताती ॥१९७॥राजा स्वीकारी नित्य व्रत । सोहळा करी सदोदित ।विनायक कृपेने गजान्त । लक्ष्मी नांदे त्याजवळी ॥१९८॥ करर्णावतन नगरांत । विनायकाचें मंदिर प्रशस्त । वैभवशाली बहुत । चंद्रसेने बांधियले॥१९९॥ वैभव भोगुनी दीर्घकाळ । सद्गतीसी गेला भूपाळ । राण्याही संगे सोज्ज्वळ । दिव्यदेही जाहल्या ॥२००॥ ऐसें सत्यविनायक व्रत । सार्थक जन्माचे प्राप्त । जमवुनी इष्टमित्र गणगोत । करावे ते श्रद्धेने ॥२०१॥ दिनभरी करावे उपोषण ।सायंकाळी ते पूजन । सर्वांसी तीर्थप्रसाद देऊन ।रात्रीं भोजन करावे ॥२०२॥ महात्म्य कथा वाचावी । सर्वांनी ती श्रवण करावी । सज्जनांसी सांगावी ।व्रतपूजा करावया ॥२०३॥ श्रेष्ठ दैवत विनायक ।कथेचे श्रोते शौनकादिक । परंपरेचा आद्यप्रवर्तक ।त्र्यंबक सांगे उमेसी ॥२०४॥ ब्रह्मदेव सांगे निजसुतासी । श्रीकृष्ण सुदाम देवासी । सूत सांगे ऋषींसी । परम कल्याण-कारक ॥२०५॥प्राकृतामाजी गणेशभक्त । ओवीरचना सुबोध ।करूनिया समर्पण करित । भगवच्चरणांवरी ॥२०६॥ विनायकासी प्रार्थना । करिती ते तव उपासना । करावें त्यांचिया कल्याणा । कलयुगीं दु:ख अती॥२०७॥ गजमुखा सुखकारका।भुक्ति-मुक्तीप्रदायका। शरणांगतांसी उद्धारका। कृपा करी भक्तावरी ॥२०८॥ श्रीसत्यविनायक व्रत कथा समाप्त. ।। शुभं भवतु ।। ॥ श्रीसत्यविनायक अर्पणमस्तु ॥

Search

Search here.