शंकरगीता अध्याय १ ला

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:57:53
शंकर गीता अध्याय १ ला ॐ परमपूज्य परमसद्गुरू । भगवान ‘श्री’ कल्पतरू धैर्याचे जे महामेरू । कृपासागर केवळ ।।१।। पाहून ‘श्रीं’ चे सुदिव्यचरण । साष्टांग केले मी वंदन ।। ‘श्रीं’ नी सुहास्यवदने मज पाहून । वरदहस्त केलाच ।।२।। ‘श्रीं’ चा पाहून वदरहस्त । त्यात दिसले कैलास समस्त ।। शिवपार्वती त्या कैलासात । स्पष्टपणे मी पाहिले ।।३।। ‘श्रीं’ च्या वरदहस्तात । शिवनिवासस्थान दिसत ।। मी अगदी झालो चकित । दिव्य कैलास पाहिले ।।४।। पार्वतीस म्हणती शंकर । मी भूलोकी जाणार ।। घेणार आहे अवतार । माझ्याच नावाचा प्रिये ।।५।। अगदी आगळावेगळा । अवतार माझा हा सकळा ।। अंतरी विपरीत कळा । रूढीपासून वेगळा ।।६।। सहजासहजी मजला तर । कोणीही न ओळखणार ।। मजजवळ न कोणी येणार । दूर जातील, पाहून ।।७।। ऐसा विपरीत अवतार । मी आहे घेणार ।। पार्वतीस शंकर वदत । पार्वती झाली चकित ।।८।। शिवपार्वती हा संवाद । कैलास दृश्य सुखद देखावा अगदी अलगद । अंतर्धान जाहला ।।९।। त्याच ‘श्रीं’ च्या वरदहस्तात । दुसरा देखावा स्पष्ट दिसत ।। स्वामी समर्थ प्रकटत । दिव्य शरीर तेजस्वी ।।१०।। शिवपार्वती संवाद ऐकला । स्वामी काय म्हणती मला ? ।। हा विचार मजला स्फुरला । स्वामी रोखून पहात ।।११।। काय स्वामींचे तेज दिसले । कोटीसूर्य जणु प्रकटले ।। दिव्य तेजस्वी शरीर पाहिले । मांडी भव्य प्रशस्त ।।१२।। स्वामींनी मजकडे पाहिले । डोळे मजवर रोखले ।। स्वामी काही न बोलले । सुहास्य, केले प्रेमाने ।।१३।। मग स्वामींनी काय केले । दोन्ही बाहू लांबविले ।। दोन्ही पद वर उचलले । गुडघे नेले छातीसी ।।१४।। गुडघे घेऊन छातीशी । हतांची मिठी चरणांशी ।। बैठक ऐशी घालून खाशी । समर्थ बसले डौलात ।।१५।। समर्थ ऐसे कां बसले ? । ऐसे माझ्या मनात आले ।। असे काही मज पाहिले । समर्थांनी त्या वेळी ।।१६।। समर्थांच्या दिव्य दृष्टीत । माझ्या प्रश्नाचे उत्तर दिसत ।। समर्थ ऐसे का बसत ? । कळले मला त्यामुळे ।।१७।। समर्थांना मी न्याहाळले । तोच शंकरमहाराज प्रकटले ।। शंकरमहाराजांना पाहिले । ब्रह्मानंद जाहला ।।१८।। दोन्ही बाहू लांबविले । समर्थांनी आधी दाखविले ।। आजानबाहू अगदी असले । होते शंकरमहाराज ।।१९।। समर्थांनी आधी दाखविले । तसेच शंकरमहाराज झाले ।। तशाच बैठकीने सुचविले । ‘मीच शंकर महाराज’ ।।२०।। समर्थांच्या दिव्यदृष्टीतूनी । नि:संदिग्ध मज आले कळुनी ।। समर्थांचाच अवतार अवनी । शंकरमहाराज हे ।।२१।। काही न बोलता समर्थांनी । सांगितले ते दिव्यदृष्टीतूनी मी गेलो भारावूनी । समर्थ अंतर्धान हो ।।२२।। ‘श्रीं’ च्या वरदहस्तात । तिसरे दृश्य लगेच दिसत ।। भगवान दत्त उभे असत । समीप अष्टवक्र ते ।।२३।। अष्टवक्रास दत्त म्हणत । ‘अवतार घ्यावा कलियुगात’ ।। अष्टवक्र अवतार घेत । तेच शंकरमहाराज ।।२४।। अष्टवक्र थोर अधिकारी । गर्भात आईच्या असता उदरी ।। अगदी मुखोद्गत वेद चारी । पहा अधिकार केवढा ? ।।२५।। जनक राजाने प्रश्न करूनी । बंदिवासात ठेविले ऋषिमुनी ।। अष्टवक्र अष्टवर्षाचे असूनी । समर्पक दिले उत्तर ।।२६।। त्यामुळे पंडित ऋषिमुनी । सुटले बंदीखान्यातुनी ।। ऐसे थोर अधिकारी म्हणुनी । विख्यात अष्टवक्र ते ।।२७।। ऐशा या अष्टवक्रांचा । अवतार कलियुगी मोलाचा ।। श्री शंकर महाराज यांचा । तिसरे दृश्य पाहिले ।।२८।। अष्ट ठिकाणी वक्र असती । म्हणून अष्टवक्र त्यांना म्हणती ।। शंकर महाराज तसेच दिसती । अष्टवक्र अवतार ।।२९।। अष्टवक्र, समर्थ, शंकर । या तिघांचाही अवतार ।। असती महाराज शंकर । स्पष्टपणे कळलेच ।।३०।। शंकर महाराजांची सगळी । छायाचित्रे विविध पाहिली ।। त्यांच्या डोक्यावर शेंडीजवळी । तीन बटा केसांच्या ।।३१।। तीन बटा केसांच्या दिसत । प्रत्येक छायाचित्रात ।। हा काय प्रकार असत । प्रश्न मला पडतसे ।।३२।। या प्रश्नाचे उत्तर । या तिघांनीच दिले तर ।। संगतीही मनोहर । कळली स्पष्टपणेच ।।३३।। तीन बटा डोक्यावर । तिघांचा हे अवतार ।। असती महाराज शंकर । कळले मला निश्चित ।।३४।। शंकर महाराज ‘शिवशंकर’ । शंकर महाराज ‘समर्थ’ खरोखर शंकर महाराज ‘अष्टवक्र’ सुंदर । दृष्टान्त स्पष्ट जाहला ।।३५।। एवढ्या ओव्या लिहिल्यावर । दृष्टान्त झाला मज सुंदर ।। अगदी सुप्रभाती गुरूवार । जागृतावस्थेमध्येच ।।३६।। पहाटे चार वाजता उठलो । पुन्हां पांघरूण घेऊन निजलो ।। जणू टी.व्ही. पाहू लागलो । दृश्य दिसत स्पष्टच ।।३७।। टी.व्ही. च्या पडद्यावर । ओवीचे प्रथम चरण गरगर ।। फिरू लागले चक्राकार । फिरत दुसरे नंतर ।।३८।। चरण तिसरेही फिरत । चौथे चरण फिरू लागत ।। नंतर चरणे स्थिर होत । ओवी दिसली स्पष्ट ती ।।३९।। डोळे मी झाकलेले असत । वरती पांघरूणही घेत ।। जणू टि.व्ही. पहात आहोत । त्यातूनही जाणवले ।।४०।। चरण गरगर फिरत । नंतर चरण स्थिर होत ।। संपूर्ण ओवी स्पष्ट दिसत । लक्षपूर्वक वाचली ।।४१।। ओवी लक्षात ठेवली । उठून ओवी लिहून काढली ।। संपूर्ण ओवी पहा सगळी । पुढीलप्रमाणे असेच ।।४२।। ‘शंकर महाराजांचे चरित्र । रसाळ गोड पवित्र ज्याला वाटे आपण पात्र । तोच सत्पात्र होतसे’ ।।४३।। ओवी किती महत्वाची । ओवी किती मोलाची ।। ओवी किती खुबीची । खोल अर्थ ओवीत ।।४४।। शंकर महाराजांचे म्हणून । जे जे भक्त आहेत जाण ।। त्यांना ही ओवी वरदान । एवढी प्रभावी ओवी ही ।।४५।। ज्यांना खात्री ‘आपण पात्र’ । त्यांनाच रसाळ चरित्र ।। त्यांनाच चरित्र पवित्र । गोड चरित्र त्यांनाच ।।४६।। असेच भक्त सत्पात्र । महाराजांचे वाचण्या चरित्र ।। त्यांनाच चरित्र, पवित्र । करील हो निश्चित ।।४७।। ज्यांची भूमिका हीन पुरती । त्यांना दिसेल विसंगती महाराजांच्या सर्व कृती । चमत्कारीक दिसतील ।।४८।। महाराजांचे चरित्र । सगळेच आहे विचित्र ।। घटना महत्त्वाच्या सर्वत्र । निश्चित कोणा न ठाऊक ।।४९।। अघटित घटनापटूंच्या । घटना ज्या महत्त्वाच्या ।। कशा त्या मानवाच्या । लक्षामध्ये येतील ? ।।५०।। कितीही असो बुध्दिवंत । चिकित्सक असो विख्यात ।। तो येथे हतबल होत । चालत त्यांचे काही ना ।।५१।। मानवी बुध्दीला मर्यादा । चिकित्सेलाही कायदा ।। ज्यांचा पहा वायदा । या सर्वांच्या पलीकडे ।।५२।। अशा विभूतींचे ज्ञान । कसे येणार हो कळून ।। येथे श्रध्देचे कारण । तेव्हाच काही कळेल ।।५३।। असे काही बुध्दिवंत । प्रसिध्द चिकित्सकही ख्यात ।। अकलेचे तारे उधळीत । महाराजकृतीवर ।।५४।। तरीही महाराज शांत । बुध्दिवंताचे प्रयत्न निष्फळ होत ।। मग महाराजांना शरण येत । ऐशी फजिती तयांची ।।५५।। महाराजांचे चरित्र । घटना घडल्या ज्या सर्वत्र ।। कुणा न माहिती तिळमात्र । हेच चरित्र वैशिष्ट्य ।।५६।। कुणास काही जाणवले । तेच त्यांनी सांगितले ।। कोणी काही अनुभविले । कथन केले ते त्यांनी ।।५७।। कोणास काही दृष्टांत झाले । ते तयांनी वर्णन केले ।। प्रत्यक्ष जे जे पाहिले । सांगतात ते तसेच ।।५८।। जे जे आपण ऐकिले । तेच लोक सांगत सुटले ।। असे अनेक प्रसंग रंगले । विविध कथाही तशाच ।।५९।। अशा अनेक कथांतूनी । संगती येते पहा दिसूनी ।। काही कथा पारखूनी । घेतल्या आहेत त्यातल्या त्यात ।।६०।। अनेकांना भेटूनी । निष्ठावंतांशी चर्चा करूनी ऐकीव कथांची खात्री करुनी । निश्चित केल्या कथा त्या ।।६१।। जेवढे देता येईल खरे । प्रयत्न केले तेवढे पूरे ।। जे जे ठरेल खरेखूरे । तेच लिहिणार असे मी ।।६२।। एवढे प्रयत्न करून । नंतर महाराजांना कौल लावून ।। जो आदेश येईल त्यांच्याकडून । तेच लिहिले जाणार ।।६३।। सर्व भक्तांना एवढे । मुद्दाम लिहिले तेवढे ।। शंका कुणा न यावी पुढे । म्हणून हे सांगितले ।।६४।। जो हे चरित्र वाचील । त्यावर विश्वास ठेवील ।। त्यालाच पहा कळतील । योगिराज शंकर ।।६५।। एवढा वाजवूनही डंका । ज्याच्या मनात येतील शंका ।। त्याला देऊनही सुवर्णलंका । शेवटी रंकच होणार ।।६६।। भारतात मुंबई इलाख्यात । जिल्हा नासिक, सटाणा तालुक्यात ।। अंतापूर नावाचे गाव असत । लहान खेडेगाव हे ।।६७।। या अंतापूर गावात । एक गृहस्थ असे राहात ।। चिमणाजी त्याचे नाव असत । निष्ठांवत शिवभक्त ।।६८।। शंकराची पूजा - अर्चा । नेहमी शिवलीलांचीच चर्चा ।। शिवमंदिराकडे सदा मोर्चा । उभयंताचा असे हो ।।६९।। पत्नी गृहकृत्यदक्ष । नेहमी शिवोपासनेत लक्ष ।। ‘ॐ नम: शिवाय’ जप लक्ष । करीत दोघे नेहमी ।।७०।। घरी कशाचीही ना वाण । धनधान्याची असे खाण ।। सर्व प्रकारचेही त्राण । त्यांच्या ठायी हातेच ।।७१।। एवढी सुखे असून सारी । एकच खंत होती उरी ।। पुत्रसंतान नव्हते घरी । हीच काळजी दोघांना ।।७२।। एवढे आपण शिवभक्त । शिव का न इच्छा पुरवीत ? ।। ऐसे कधी न आले मनात । पतिपत्नींच्या पहा हो ।।७३।। यालाच म्हणावे खरा भक्त । जो कधीच काही न मागत ऐसे कधीच न ये मनात । निष्ठावंत भक्त तो ।।७४।। मनात उद्भवता कामना । निष्फळ होतसे साधना ।। क्लेश होती आपल्या मना । जबाबदार आपण ।।७५।। फल न पडता आपल्या पदरा । दोष का द्यावे शंकरा ।। आपलाच गुन्हा असता खरा । शिक्षा कुणा मिळेल ? ।।७६।। चिमणाजी एके दिनी । झोपले होते आपल्या सदनी ।। एक तपस्वी आले स्वप्नी । अग्निशिखेसम तेजस्वी ।।७७।। पहाटेच्या समयात । दिव्य तपस्वी स्वप्नात येत ।। दिव्य दृष्टान्त त्यांना देत । तपस्वी वदती स्पष्टपणे ।।७८।। दिव्य साधू तेजस्वी । तेज:पुंज तपस्वी ।। रूप मनोरम मनस्वी । खणखणीत म्हणाले ।।७९।। चिमणाजी, ऊठ झटपट । संपले तुझे काबाडकष्ट ।। होईल आज तुझे इष्ट । तुला हवे ते मिळेल ।।८०।। या अंतापूर शेजार । दावलमलीक असे पीर ।। तेथून टाकता नजर । झाडी तुला दिसेल ।।८१।। त्या झाडीच्या खाली भलेभले । वाघ दिसतील तुज बसलेले ।। वाघांच्या घोळक्यात निजलेले । बालक एक दिसेल ।।८२।। आजच तेथे जाऊन । घाबरू नको मनातून ।। चटकन बालक घेऊन । घरी आणून सांभाळ ।।८३।। एवढे स्पष्ट सांगून । तपस्वी झाले अंतर्धान ।। चिमणाजी अगदी खडबडून । जागा झाला लगेच ।।८४।। वंदन केले शंकराला । फार आनंद झाला त्याला ।। स्वप्न सांगितले पत्नीला । ब्रह्मानंद तिला तर ।।८५।। चिमणाजीस झाला आनंद । पत्नीस होई ब्रह्मानंद ।। घरात भरला परमानंद । आनंदी आनंदच ।।८६।। आनंदाने चिमणाजी । दृष्टान्त सांगे लोकांमाजी लोक दर्शवून नाराजी । टिंगल करू लागले ।।८७।। पारमार्थिक आपली वाटचाल । दृष्टान्त जे जे होतील ।। साधना जी जी कराल । गुप्त अगदी ठेवावी ।।८८।। साधकांसाठी परमार्थाचा । नियम असे महत्त्वाचा ।। उघडू नये कधी वाचा । तेव्हाच परमार्थ साधेल ।।८९।। लोकांनी जरी निंदा केली । केली सर्वांनी टवाळी ।। चिमणाजीची वृत्ती न ढळली । म्हणे ‘जय शंकर’ ।।९०।। नित्य पहाटेस उठणे । स्नान, पूजा, जप करणे ।। शिवलीलामृत पारायणे । सोमवारी उपवास ।।९१।। साधना उभयंताची ऐशी । चालली होती प्रति दिवशी ।। ‘ॐ नम: शिवाय’ वाचा अशी । चालतसे अखंड ।।९२।। दृष्टान्त होता, त्या दिनी । दोघांनीही स्नान करूनी ।। पूजा उपासना आटोपूनी । दोघे निघाले बाहेर ।।९३।। ‘ॐ नम: शिवाय ’ जप । करीत, चालले झपझप ।। दृष्टान्त स्थळा समीप । येऊन ते पोचले ।।९४।। जे जे दृष्टान्तात पाहिले । ते ते सर्व प्रत्यक्ष दिसले ।। तोच बाळाचे रडणे ऐकिले । वाघही दिसले तेथेच ।।९५।। एक वाघीण त्या बाळावरती । उभी राहून दूध पाजीत होती ।। हे चालले ज्या वृक्षाखाली । बेलवृक्ष होता तो ।।९६।। हाच वृक्ष दृष्टान्तात । होता, चिमणाजी ओळखत ।। धीर धरून पुढे जात । निर्भय होऊन चिमणाजी ।।९७।। वाघ - वाघीण रोखून । पहात असता तिथे जाऊन ।। चिमणाजीने बाळ उचलून । छातीशी धरून परतला ।।९८।। बिल्व वृक्षाचे त्रिदळ पान । त्या बाळावर पडून ।। दोघेही तो बाळ घेऊन । अंतापुरी परतले ।।९९।। वाघ राहिले तसेच बघत । बिल्ववृक्ष आनंदे नाचत चिमणाजी ब्रह्मानंदीचालत । बाळ घेऊन घरी ये ।।१००।। त्या दिवशी उभयंतास । होता कडकडीत उपवास ।। सोमवारचा तो दिवस । लाभ अपूर्व जाहला ।।१०१।। पुत्रलाभ झाला सुंदर । त्या दिवशी शंकराचाच होता वार ।। तो म्हणजेच सोमवार । कार्तिक शुध्द अष्टमी ।।१०२।। साधारणपणे इसवी सन । आठराशे सुमारास जाण ।। महाराजांचा जन्मदिन । याप्रमाणे असेच ।।१०३।। जन्म साल जरी न निश्चित । मिती मात्र निश्चित असत ।। कार्तिक शुध्द अष्टमी होत । जन्म दिवस हा असे हो ।।१०४।। बालकास असता पहात । चिमणाजीस प्रेमे उमाळे येत ।। बाळाचे पटापट मुके घेत । प्रेमानंदे चिमणाजी ।।१०५।। पत्नी बाळास मांडीवर घेत । तोच पत्नीस पान्हा फुटत ।। चुटूचुटू बाळही दूध पीत । तृप्त मायलेकरू ।।१०६।। महाराजांचा जन्मसोहळा । अपूर्व आहे पहा सगळा ।। आनंदाश्रू घळाघळा । मातापित्यांचे वाहती ।।१०७।। वंदून महाराज श्री शंकर । जन्मवृत्त कथन मनोहर ।। हा पहीला अध्याय सुंदर । समाप्त येथे जाहला ।।१०८।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.