शंकरगीता अध्याय २ रा
ग्रंथ - पोथी > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:55:30
शंकर गीता अध्याय २ रा
जय जय महाराज श्री शंकर । भक्तांना जे कल्याणकर
स्मरता होती सुखकर । नमन त्यांना असो हे ।।१।।
‘शं’ म्हणजे कल्याण तर । ‘कर’ म्हणजे जो करणार ।।
कल्याण करी जो खरोखर । शंकर त्यांना म्हणतात ।।२।।
शंकर महाराजांस माझी विंनती । आपले चरित्र गहन अती ।।
थक्क होऊन जाते मती । लेखणी काय लिहील ? ।।३।।
आपले चरित्र जे असत । त्याविषयी पुस्तकेही प्रकाशित ।।
लोकही बरेच काही सांगत । विविध साधने अशी ही ।।४।।
कोठे लागतसे संगती । कोठे जाणवते विसंगती ।।
कोठे तर वादविवाद होती । कोठे काही भलतेच ।।५।।
असा तुमच्या चरित्राचा । मार्ग काट्याकुट्यांचा ।।
त्यातून मार्ग काढावयाचा । अत्यंत कठीण काम हे ।।६।।
तुम्हीच मला सांगावे । तुम्हीच मला सुचवावे ।।
तुम्हीच मला कौल द्यावे । निवाडा करावा तुम्हीच ।।७।।
करावे विचारांचे स्फुरण । करावी कल्पनांची उधळण ।।
लेखन व्हावे रामबाण । स्फुर्ती ऐशी स्फुरावी ।।८।।
घटना स्फुराव्या सरसर । लेखणी चालावी झरझर
लिहून व्हावे भरभर । दिव्य चरित्र आपुले ।।९।।
माझ्या मानवी बुध्दीतूनी । विनंती केली आपुल्या चरणी ।।
आपलीच सारी ही करणी । कर्ते करविते आपण ।।१०।।
आपल्या चरणांस स्पर्शून । आपला आशीर्वाद घेऊन ।।
वेगात चालले चरित्रलेखन । जय शंकर म्हणून ।।११।।
जन्म झाला मातेविण । ऐसे आले का कोठे घडून ?।।
मातेचा अधिकार म्हणून । त्रैलोक्यात श्रेष्ठच ।।१२।।
मातेविण महाराज जन्मले । हे तो अघटित पहा घडले ।।
अयोनिसंभव अवतरले । धरणीवरती महाराज ।।१३।।
नऊ महिने वागविला । ज्या स्त्रीने पोटचा गोळा ।।
त्या स्त्रीच्याच स्तनाला । पान्हा फुटतो प्रसवता ।।१४।।
नऊ महिने उदरात । बालकास जी पोशीत ।।
तिलाच पान्हा असतो फुटत । त्रिकालाबाधित सिध्दान्त ।।१५।।
मातेवीण जन्म होत नसे । महाराज मातेविण जन्मले तसे ।।
पहीला चमत्कार हा असे । महाराजांच्या जन्माचा ।।१६।।
मातेवीन पान्हा न फुटणार । परी चिमणाजीच्या पत्नीस तर ।।
महाराजांस घेता मांडीवर । पान्हा फुटला जोरात ।।१७।।
महाराजांच्या जन्माचा । चमत्कार दुसरा हा गमतीचा ।।
हाच बालक त्या माऊलीचा । सिध्द सहजच जाहले ।।१८।।
हीच माता महाराजांची । सिध्द होतसे सहजची ।।
कशी पहा चमत्कारांची । रीत न्यारी असे ही ।।१९।।
चिमुकला बालक पाहुनी । दाटले आनंदाश्रू नयनी ।।
अष्टभाव आले उसळुनी । उभयंताच्या मनात ।।२०।।
ही वार्ता अंतापूरात । वायुवेगाने पसरत ।।
नागरीक सारे चकित होत । वृत्त कळताक्षणी ।।२१।।
पाहण्या त्या बालकाला । लोकांचा घोळका जमला
जो तो चिमणाजींच्या घराला । वेढा देऊन थांबले ।।२२।।
लोक पाहती विस्मयाने । चिमणाजीच्या पत्नीने ।।
घेतले मांडीवर आनंदाने । पाजू लागली वात्सल्ये ।।२३।।
मातेस प्रेमपान्हा फुटला । बाळ दूध पिऊ लागला ।।
कौतुक वाटले सर्वांना । भारावून गेले ते ।।२४।।
धन्य चिमणाजी हो भले । आधी त्यांना स्वप्न पडले ।।
स्वप्नाप्रमाणेच सारे घडले । स्वप्न खरे जाहले ।।२५।।
ऐसे लोक वर्णन करती । जे आरंभी दोष देती ।।
तेच नंतर भूषविती । चिमणाजीस या परी ।।२६।।
चिमणाजीच्या पत्नीचे । इतक्या पहा दिवसांचे ।।
अतृप्त मातृहृदय तिचे । आज तृप्त जाहले ।।२७।।
मातृत्त्व हा स्त्रीजीवनाचा । क्षण अत्यंत महत्त्वाचा ।।
आनंदाचा मोलाचा । फलश्रुतीचा असेच ।।२८।।
झाड लावले हौसेनी । पाणी घातले नियमानी ।।
जर ते न बहरले फळाफुलांनी । काय उपयोग वृक्षाचा ? ।।२९।।
मुद्दाम गाय घेतली चांगली । नित्य वैरण तिला घातली ।।
आणि ती जर का न व्याली । केवळ खाण्यास काळ ती ।।३०।।
जनावर विकता येईल । किंवा हाकून दिले जाईल ।।
स्त्रीचे कसे होईल ? । निंदाच तिची होईल ।।३१।।
मातृत्व मिळणे स्त्रीजन्माचा । हक्क आहे, क्षण भाग्याचा ।।
आधार याच मातृत्त्वाचा । सर्व जगास असेच ।।३२।।
लोक येती लांबून । चिमणाजीस वदती नमून ।।
आम्हा घेऊ द्या दर्शन । आपल्या बाळ राजाचे ।।३३।।
हा सामान्य नव्हे बालक । दिसतो हा त्रैलोक्यनायक ।।
त्रैलोक्याचा हा चालक । म्हणती कोणी यापरी ।।३४।।
कोणी म्हणती करून विचार । आज आहे सोमवार
हा शंकराचा अवतार । आला कैलास सोडून ।।३५।।
घेऊन बालकाचे दर्शन । लोक आनंदित होऊन ।।
जाती एकएका मागून । आपआपल्या घरासी ।।३६।।
ऐकून लोकांची ही वाणी । चिमणाजीही अंत:करणी ।।
आनंदून गेला झणी । धन्यता वाटे अत्यंत ।।३७।।
तोही मनात विचार करत । इतके दिवस जे शिवव्रत ।।
निष्ठेने आपण आचरत । फळास आले असावे ।।३८।।
नित्य आपण जो उपासिला । नित्य प्रेमाने पूजिला ।।
जप ध्यानाने आळविला । केली व्रते उपवास ।।३९।।
साधना केली जी खडतर । त्यामुळेच भगवान शंकर ।।
प्रसन्न होऊन आम्हावर । कृपा केली शिवाने ।।४०।।
ज्या शंकराने कृपा केली । ज्याने घटना ही घडविली ।।
त्याने आपली तृप्ती केली । प्रसाद दिला अपूर्व ।।४१।।
याच भगवान शंकराचे । नाव ठेवावे बालकाचे ।।
मन ऐसे चिमणाजीचे । सांगू लागले पत्नीस ।।४२।।
लोक काय काय म्हणतात । मजलाही काय वाटत ।।
सर्व सविस्तर सांगत । तिनेही मान्य केले ते ।।४३।।
बाळ माझा कल्याणकर । जगतास असे शुभंकर ।।
नांव ठेवावे शंकर । स्पष्ट तिने सांगितले ।।४४।।
चांगला मुहूर्त पाहून । बारशाचा दिवस ठरवून ।।
नांवही निश्चित करून । समारंभ ठरविला ।।४५।।
बारशासाठी सर्वांस । गावातील स्त्री - पुरूषांस ।।
आमंत्रणे दिली खास । केली सर्व तयारी ।।४६।।
अगदी समारंभपूर्वक । बारसे केले, जमले कैक ।।
सगेसोयरे भाविक । अगत्यपूर्वक आलेच ।।४७।।
सर्वांच्या मनी नांव शंकर । पित्याच्या मनात शंकर
मातेने ठरविले शंकर । नाव शंकर ठेवले ।।४८।।
बारशास जमलेले भाग्यवान । ज्याने सृष्टी केली निर्माण ।।
शंकर नाव सर्वांनी ठेवून । बारसे त्याचे जेवले ।।४९।।
जग ज्यांनी निर्माण केले । त्याचे बारसे जे जेवले ।।
त्यांचे भाग्य केवढे भले । धन्य जन हो ते सारे ।।५०।।
जय जय प्रभो श्री शंकर । पाप आमचे भयंकर ।।
व्हावे आम्हा शुभंकर । प्रार्थना चरणी आपल्या ।।५१।।
बारसे झाले जोरदार । आनंदून गेले अंतापूर ।।
जो तो ब्रह्मानंदात असे चूर । आनंद नगरी दाटला ।।५२।।
माता बाळास घेऊन । हाक मारी शंकर म्हणून ।।
बाळ लगेच मान वळवून । पहात राही टकामका ।।५३।।
‘शकंर म्हणता’ चिमणाजींनी । हात पाय वरती करूनी ।।
‘ओ ओ ओ ओ’ सतत करूनी । बाळ खेळे आनंदे ।।५४।।
आपण नाव जे ठेवले । ते बाळास पसंत पडले ।।
याचे पुरावे अनुभवले । मातापित्यांनी त्या वेळी ।।५५।।
पत्नी अन् चिमणाजींचा । काळ आत्तापर्यंतचा ।।
शिवोपासनेत मोलाचा । गेला होता कष्टात ।।५६।।
अगदी आत्तापर्यंत । होते शंकर उपासनेत ।।
आता शंकराच्याच सानिध्यात । उभयताही रंगले ।।५७।।
करी शंकराचे कौतुक । खेळवून देती त्याला हाक ।।
खेळणी त्याच्याभोवती कैक । विविधाकृती रंगाची ।।५८।।
दोघे शंकरास खेळवीत । मधून पाळण्यात निजवीत ।।
प्रेमाने त्याला झोका देत । मंजुळ गाणी म्हणून ।।५९।।
शंकरास घेई केव्हा माता । शंकरास घेई केव्हा पिता ।।
शंकरास घेऊन उभयता । जाती शंकरदर्शना ।।६०।।
शंकरास न्हाऊ घाली माता । शांत मातेने पाजविता
झोपी जाई थोपटीता । कधी न भोकाड काढले ।।६१।।
स्वत: बाळलीला करून । मातापित्यास संतोषवून ।।
येणारेही आनंदून । जाती शंकरा पाहून ।।६२।।
विविध बाळलीला करून । विविध चाळे दाखवून ।।
सर्वांस सोडिले मोहून । ऐसा बालशंकर ।।६३।।
याप्रमाणे शुक्लेंदुवत् । बाळ वर्धिष्णू तो होत ।।
शंकर सवंगडी जमवीत । दंग खेळामध्ये तो ।।६४।।
बोल शंकर बोले बोबडे । मातापित्यांच्या कानी पडे ।।
बोबडे ऐकण्याची सवय जडे । मातापिता तुष्टती ।।६५।।
बोबडे बोल पुत्राचे । वाटती लाख मोलाचे ।।
अशा मातापित्यांचे । भाग्य थोर असेच ।।६६।।
एवढ्याचसाठी कैकांनी । व्रतेवैकल्ये आचरूनी ।।
अशा लोकांच्या तरीही सदनी । कधी न हलला पाळणा ।।६७।।
भाग्यवान ते खरे असत । ज्यांच्या घरी बाळ रांगत ।।
बोबडे बोल वेद वाटत । ज्यांचे त्यांनाच कळणार ।।६८।।
थोडा मोठा झाल्यावर । शंकर उठे लवकर ।।
आणि स्नान आटोपल्यावर । भस्म चर्ची सर्वांगा ।।६९।।
दृष्ट कोणाची लागू नये । इडापिडा बाधू नये ।।
नजर कोणाची लागू नये । म्हणून माता काय करी ।।७०।।
तीट लावी गालावरी । ओवाळी मीठ मोहरी ।।
मिरच्या उतरून टाकी सत्वरी । बाळ शंकरावरूनी ।।७१।।
शंकराला खेळवीत । मातापित्यांचा दिवस जात ।।
अगदी आनंदात मजेत । दिवस जाई दोघांचा ।।७२।।
सकाळी उठे शंकर । स्नान करून लवकर ।।
भस्म लावी अंगावर । गावाबाहेर जातसे ।।७३।।
गावाबाहेर अरण्यात । जेथे वनश्री सुशोभित
जेथे सर्वत्र असे शांत । वृक्षाखाली बसतसे ।।७४।।
तो वृक्ष कोणता होता । कोणासही तो माहीत नव्हता ।।
सहज शंकर जात होता । होता बिल्ववृक्ष तो ।।७५।।
हा बिल्ववृक्ष असत । तेथेच बसणे असे युक्त ।।
जाणीवपूर्वक योजना नसत । शंकराची त्या वेळी ।।७६।।
नाहीतर श्री शंकर । कोणत्या वृक्षाखाली बसणार ? ।।
कोणता वृक्ष आवडणार । माहीत असे सर्वांना ।।७७।।
बिल्ववृक्षाखाली आसन । पडलेल्या बिल्वपत्रांचे असून ।।
त्यावर मांडी घालून । ध्यानस्थ बसे शंकर ।।७८।।
ध्यानस्थ बसे कधी तास । कधी बसे तासन् तास ।।
कधी तर सबंध दिवस । ध्यानस्थ राही शंकर ।।७९।।
माता पिता काळजी करीत । शंकर कोठे गेला असत ? ।।
वणवण शोधार्थ हिंडत । दमून येती घरास ।।८०।।
शंकर संध्याकाळी येत । मातापिता त्यास म्हणत ।।
बाळा, तू कोठे असे जात ? । काळजी आम्हा वाटते ।।८१।।
आई, तू अगदी मुळीही । करू नकोस काळजीही ।।
मी कोठेही जात नाही । शोधू नका कुठेही ।।८२।।
घरातच रहा बसून । त्रस्त न व्हा मज हुडकून ।।
मी येईन आपणहून । घरातच असा दोघेही ।।८३।।
ऐसे शंकर असे म्हणत । मातापिता दोघे ऐकत ।।
बाळा केवढा धीर देत । धन्यता वाटे दोघांना ।।८४।।
शंकर जाई अरण्यात । बिल्ववृक्षाखाली बसत ।।
ध्यान लावून निवांत । दृश्य मोठे मोहक ।।८५।।
वारा झुळूझुळू वहात । बिल्ववृक्षाचे पान गळत ।।
ते गिरक्या घेत घेत । पडे शंकरमस्तकी ।।८६।।
बिल्ववृक्षाच्या तळी धरणी । बिल्व पानांच्या आसनी
शंकर बसले ध्यान लावूनी । बिल्वदलेही शिरावर ।।८७।।
दृश्य इतके हे सुंदर । कोण वर्णन करणार ? ।।
कुणीच नव्हते पाहणार । उणीव होती याचीच ।।८८।।
जे जे दृश्य पहात । ते ते काहीही न सांगत ।।
बिल्व धरणी वायू असत । साक्षीदार, बघणारे ।।८९।।
अरण्यात जातायेताना । हिंस्त्र पशू भेटती नाना ।।
त्यांना पाहून मुळी ना । भ्याला शंकर कधीही ।।९०।।
हिंस्त्र पशू अत्यंत क्रूर । नुसते त्यांना पाही शंकर ।।
डोळे फिरवून गरगर । निघून जाती पशू ते ।।९१।।
‘पशुपति शंकर’ ज्याचे नाव । त्यांच्यावर कसा घालतील घाव ।।
घाव घालता उलटेच डाव । माहित होते पशूंना ।।९२।।
जनावरे हे ओळखीत । मनुष्यास मात्र हे न कळत ।।
निष्कारण जीभ विटाळीत । दु:खासागरी पडतात ।।९३।।
ध्यान संपल्यावरती येत । शंकर अंतापूर गावात ।।
कीर्तन - कथा देवळात । चालती तेथे थांबत ।।९४।।
मनोभावे ऐके कीर्तन । भजन ऐकून करी भजन ।।
कोठे चालता नामस्मरण । नामस्मरण करी तो ।।९५।।
सर्व धार्मिक कार्यक्रमात । मनोभावे भाग घेत ।।
सर्व कार्यात रंगून जात । नंतर घरी येतसे ।।९६।।
शंकराचे वागणे पाहून । जो तो चकित होऊन ।।
एवढे वय लहान असून । धार्मिक वृत्ती केवढी ? ।।९७।।
खाण्यापिण्याचे याचे वय । याला कशाचेच नाही भय ।।
धन्य याची असे माय । अध्यात्म याला आवडे ।।९८।।
अरण्यात ध्यानस्थ बसतो । कीर्तनास हजर असतो ।।
मंदिरातही भजन करतो । प्रवचन ऐके प्रेमाने ।।९९।।
अलौकिक याची असे रीत । ऐसा बालक कुठे न मिळत
लक्ष याचे परमार्थात । अन्य काही न आवडे ।।१००।।
शंकराच्या या वागण्यानी । लोक गेले हो मोहुनी
जो तो विचार करी मनी । सामान्य बालक नव्हे हा ।।१०१।।
अंतापुराच्या लोकांत । हाच विचार चर्चिला जात
सर्वांना अभिमान वाटत । शंकर आपल्या गावाचा ।।१०२।।
कोणी म्हणे हा न सामान्य नर । कोणी म्हणे हा अवतार
कोणी म्हणे हा ईश्वर । कोणी म्हणे शंकर ।।१०३।।
कोणी म्हणे याचा अधिकार ।कोणासही न कळणार
योग्यता याची असे फार । मानवी बुध्दीपलीकडे ।।१०४।।
लोक प्रभावित एवढे होत । मातापित्यास सर्व सांगत
मातापिता सर्व ऐकत । आनंद वाटे तयांना ।।१०५।।
आपल्या पुत्राविषयीचे । मत ऐकून लोकांचे
हृदय मातापित्यांचे । अभिमानाने भरतसे ।।१०६।।
सर्व अंतापूर गावात । शंकर हाच विषय चालत
आता पुढील अध्यायात । पुढचा कथाभाग पाहू या ।।१०७।।
नमून महाराज श्री शंकरा । बारसे, बाळलीला हा सारा ।।
अध्याय असे दुसरा । समाप्त येथे जाहला ।।१०८।।
।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज
श्री शंकर महाराज की जय ।।
Search
Search here.