शंकरगीता अध्याय ३ रा

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:52:55
शंकर गीता अध्याय ३ रा वंदन शंकरमहाराजांस । आपल्या सर्व भक्तांस या चरित्र - यज्ञास । करून घ्यावे सहभागी ।।१।। महाराजांविषयी जो अज्ञ । त्याला हा चरित्र - यज्ञ ।। करून सोडील पहा तज्ज्ञ । चरित्र - यज्ञ महती ही ।।२।। शंकरमहाराज यज्ञरूप । भजता तराल संसारकूप ।। भावनांचे टाकता तूप । यज्ञ होईल प्रज्वलित ।।३।। बारसे झाले थाटात । शंकर लीला दाखवित ।। लोक भारावून जात । बाळलीला पाहून ।।४।। शंकराची व्यवस्था समस्त । मातापिता करी व्यवस्थीत ।। त्याची सर्व काळजी घेत । सांभाळीत प्रेमाणे ।।५।। उणीव त्याला भासू नये । कमी काही पडू नये ।। त्रास त्याला वाटू नये । काळजी घेत नेहमी ।।६।। उपासना शंकराची घरात । इकडे शंकरास सांभाळीत ।। दिनचर्या दुहेरी चालत । चालली ऐशी शिवभक्ती ।।७।। शिवास अभिषेक करीत । शंकरास अंघोळ घालत ।। शिवास नैवेद्य दाखवीत । जेवू घालत शंकरा ।।८।। इकडे शिव होई प्रसन्न । शंकर जाई आनंदून ।। मातापिता जाती गढून । दिनचर्येत या परी ।।९।। तेवढ्यात म्हणे शंकर । मी आता जातो दूर आज्ञा द्यावी मज लवकर । विनंती मातापित्यास ।।१०।। माता - पिता गहिवरले । ब्रह्मांड त्यांना आठवले ।। ते काहीही न बोलले । तेंव्हा शंकर म्हणाला ।।११।। आई - बाबा, दोघेही । माझी काळजी मुळीही ।। करू नका कसलीही । लहान आता मी नसे ।।१२।। तुमचे दु:ख जाईल । संतान जुळे होईल ।। त्यात आनंदून जाल । सर्व व्यवस्थित होईल ।।१३।। आपणास परवानगी देण्याची । न इच्छा मातापित्यांची ।। शंकराने जाणून तसेची । राहिले ते घरात ।।१४।। पुढे माता होई आनंदीत । शंकरकृपे तीज दिवस जात ।। कडक डोहाळे लागत । मोहरून गेली ती ।।१५।। पत्नीची अवस्था पाहून । चिमणाजी गेला हर्षून ।। दोघे शिवोपासनेत रंगून । आनंदाने राहिले ।।१६।। शंकर आपणा जे म्हणाले । त्याची प्रचिती आपणाला ।। आली, वाकसिध्दी शंकराला । आहे, म्हणे चिमणाजी ।।१७।। शंकरानी जे सांगितले । त्याचप्रमाणे घडून आले ।। चिमणाजीस जुळे झाले । दोन पुत्र जन्मले ।।१८।। जन्मोत्सवाचा आनंद । घरात अगदी निनादे मोद ।। शंकराची त्याला साद । लोक चकित जाहले ।।१९।। बारसे झाले वैभवात । लोक अंतापुरचे जमत ।। खरे भाग्यवान चिमणाजी असत । लोक म्हणती सर्वही ।।२०।। माता आनंदात डुंबत । चिमणाजी सुखात पोहत ।। शंकर आपला व्यूह रचत । चिमणाजीस म्हणे तो ।।२१।। आज्ञा द्यावी आता मजला । भाग इथला मम संपला ईश्वरीय कार्य करण्याला । जाऊ द्यावे मज सुखे ।।२२।। काही योगायोग असत । म्हणून तूमचा संग घडत ।। वेगळेच माझे कार्य असत । सोडा मजला म्हणून ।।२३।। माता - पिता गहिवरले । शंकरानी त्यांस वंदन केले ।। आधी मातेचे चरण वंदिले । नंतर वंदन पित्यास ।।२४।। शास्त्र सांगते सर्वांस । आधी वंदन मातेस ।। नंतर करावे पित्यास । गूढ शास्त्रार्थ असे हा ।।२५।। आधी पित्यास केले वंदन । नंतर मातेस केले नमन ।। दोष येतसे यात घडून ।शास्त्रवचन असेच ।।२६।। प्रथम पूजा करावी गुरूची । नंतर करावी देवाची ।। आज्ञा असे ही शास्त्राची । शास्त्रवचन असेच ।।२७।। आधी पूजा केली देवाची । नंतर केली गुरूंची ।। निष्फलता त्या पूजेची । दोष लागे, शास्त्र हे ।।२८।। माता - पित्यास वंदून । आज्ञा त्यांची मिळवून ।। अंतापूर गावातून । शंकर महाराज निघाले ।।२९।। महाराज जाता घरातून । उभयतांना वियोग होऊन ।। ऊर आले दाटून । वियोग दु:ख ओसंडे ।।३०।। दोघांस लागली हूरहूर । वियोग दु:खात दोघे चूर ।। आठवणींचा मनी पूर । काळ ऐसा चालला ।।३१।। वियोग दु:खावर जहाल । औषध रामबाण काळ ।। निसर्गाची ही कमाल । फार मोठी असेच ।।३२।। जसजसा काळ हो जाई । तसतसे वियोगदु:ख कमी होई ।। पुढे तर आठवण बूजून जाई । काळ असा समर्थ ।।३३।। जाताना अंतापूरातून । लोक त्यांचे घेती दर्शन ।। मार्गातील झाडे वाकून । नमन करती शंकरा ।।३४।। अंतापुरातून जाताना । सर्वांनी पाहिले महाराजांना पुढे कोणत्याही लोकांना । दिसले नाहीत शंकर ।।३५।। तीन पावलात त्रिभुवन । ज्यांनी टाकले व्यापून ।। त्यांना अशक्य काय अजून । अंतराची तमा ना ।।३६।। कोठे अंतापूर नगर । कोठे हिमालय शिखर ।। विस्तीर्ण केवढे अंतर । त्यातून अष्टवक्र हे ।।३७।। शक्य कसे चालत जाणे । चालत अशक्य पोचणे ।। त्यातून हिमालय चढत जाणे । मानवास अशक्य ।।३८।। परी शंकर महाराज । चढून गेले नगराज ।। न चालताच अगदी सहज । हिमालयावर गेले ते ।।३९।। निसर्ग सारा पाहिला कांही दिवस मुक्काम केला ।। नंतर हिमालय धुंडाळला । प्रसन्न त्यांना वाटले ।।४०।। नंतर केदारेश्वरावर जाऊन । बारा वर्षे तेथे राहून ।। नंतर प्रयाग क्षेत्र पाहून । निवास केला त्या स्थळी ।।४१।। गंगा नदी अध्यात्माची । यमुना नदी विज्ञानाची ।। सरस्वती ती भक्तीची । त्रिवेणी संगम प्रयाग ।।४२।। गंगा - यमुना सरस्वती । त्रिवेणी संगम पवित्र अती ।। याच त्या संगमावरती । राहिले महिने पंधरा ।।४३।। त्रिवेणी संगमावरी । राहिला जणू त्रिनेत्रधारी ।। निवांत तेथे वास करी । स्नान तीनही नद्यांत ।।४४।। तिन्हीही नद्या संगमात । महाराजांस स्पर्श करीत ।। स्पर्श होता पावन होत । संगम तो सर्वही ।।४५।। महाराज शिरता पाण्यात । तिन्ही नद्यांची धांदल उडत ।। प्रथम स्पर्श आपणा हवा असत । तिन्ही नद्यांचे मानस ।।४६।। महाराज एका क्षणात । तिघींनाही संतुष्ट करीत ।। पाण्याची हालचाल जी होत । पाहण्यासारखी असेच ।।४७।। हजारो माणसे संगमावर । स्नान करून म्हणती शंकर कोण त्यांना ओळखणार । उभा असून शंकर ।।४८।। तीर्थाचे तीर्थत्व वाढावे । क्षेत्रांचे क्षेत्रत्व चढावे ।। पावित्र्याचे पावित्र्य खुलावे । म्हणून जाती सर्वत्र ।।४९।। कोणी आपणास पाहू नये । कोणी आपणास ओळखू नये ।। कोणास आपण कळू नये । योजना त्यांची होतीच ।।५०।। हे नवीन गृहस्थ कोण । येथे आले कोठून ? ।। काय येण्याचे प्रयोजन । कल्पना कोणा नसेच ।।५१।। तीर्थक्षेत्रांना भेटी देत । अनेक देशांत हिंडत ।। फिरले सारा भारत । गेले युरोपमध्येही ।।५२।। सर्वत्र महाराजांचा संचार । जनमनांचा घेत समाचार ।। करण्या लोकांचा उध्दार । योजना त्यांची होती ही ।।५३।। महाराज विविध ठिकाणी । विख्यात विविध नावांनी ।। लीला त्यांच्या विविध असूनी । अतर्क्य करणी तयांची ।।५४।। सातपुडा या भागात । सुपड्याबाबा त्यांना म्हणत ।। मध्यप्रदेशात विख्यात । ‘गौरीशंकर’ म्हणूनी ।।५५।। देवियाबाबा म्हणून ख्यात । गुजराथ या देशात ।। जॉनसाहेब त्यांना म्हणत । युरोपाखंडामधेच ।।५६।। रहीमबाबा म्हणून । ओळखतात त्यांना यवन ।। शंकरमहाराज म्हणून । महाराष्ट्रात ज्ञात ते ।।५७।। कुंवर स्वामी समर्थ । म्हणतात खानदेशात ।। ख्यात पाश्चात्य देशात । सेंट जॉनसन साहेब ।।५८।। पंढरीनाथ पंढरपूरात । टोंबो म्हणत आफ्रिकेत ।। नूरमहंमदखान अरबस्तानात । लहरीबाबा मध्यप्रांतात ।।५९।। मद्रासकडे गुरूदेव म्हणत । अशीच विविध नावे असत ।। प्रत्येक देशात ते राहत । सहस्त्रनामे तयांची ।।६०।। विविध प्रकारच्या देशांत । विविध नावाने प्रख्यात परी सर्व हे महाराजच असत । कळणार कोणा कसे ते ? ।।६१।। परमार्थ म्हणजे काय असे । हे लोकांना कळावे तसे ।। उध्दार होण्या वागावे कसे । म्हणून त्यांचा संचार ।।६२।। उध्दार लोकांचा होण्यास । परमार्थ त्यांना कळण्यास ।। भक्तिभाव अंतरी उमलण्यास । लीला करीत महाराज ।।६३।। विविध अशा प्रसंगात । विविध चमत्कार ते करीत ।। सन्मार्गास लोकां लावीत । लीला त्यांच्या विचित्र ।।६४।। सर्वत्र संचार त्यांचा होत । नंतर आले महाराष्ट्रात ।। प्रथम प्रज्ञापूर नगरात । पौर्णिमा होती त्या दिवशी ।।६५।। अक्कलकोटस्वामींचे चरण । अगदी डोळे भरून पाहून ।। त्यांनी साष्टांग वंदन करून । मिठी मारली चरणास ।।६६।। दर्शन स्वामींचे घेऊन । अष्टभाव आले दाटून ।। महाराज गेले आनंदून । अपूर्व दर्शन जाहले ।।६७।। साष्टांग करता नमस्कार । अक्कलकोट स्वामी तुष्टले फार ।। आनंद दोघांही हो अपार । स्वामी समर्थ प्रगटले ।।६८।। उठवून शंकर महाराजांस । भेटले एकमेकांस ।। दोघांचेही त्या समयास । बोलणे झाले निवांत ।।६९।। समर्थांच्या समाधीने । ऐकिले उभयंताचे बोलणे ।। समर्थांच्या आज्ञेने । तेथून निघाले महाराज ।।७०।। सोडूनिया प्रज्ञापूर । गाठले त्यांनी सोलापूर ।। आपल्या नादात असती चूर । आले दत्त चौकात ।।७१।। त्या दत्त चौकातून । जुने दत्तमंदिरावरून ।। शुभराय मठ देखून । महाद्वारी थांबले ।।७२।। त्या शुभराय महाराज मठात । मठाधिपती महंत ।। जनार्दनबुवा ते असत । भगवद्भक्त संत ते ।।७३।। मठाच्या सभामंडपात । जनार्दनबुवा भजन करीत भजनात अगदी रंगून जात । गात शास्त्रोक्त संगीत ।।७४।। त्यावेळी रागदारीत । भजन त्यांचे चालले असत ।। जनार्दनबुवा खड्या आवाजात । राग गाती शंकरा ।।७५।। शंकरा राग शंकर ऐकत । उभे महाद्वारात ।। उभे राहूनच ते गर्जत । अल्लख म्हणून जोराने ।।७६।। जनार्दनबुवा भजनात । अगदी तल्लीन झाले असत ।। त्यांच्या कानी गर्जना पडत । पाहू लागले तिकडेच ।।७७।। त्यांना महाद्वारात । भगवान दत्तात्रेय दिसत ।। दिव्य तेजस्वी अद्भुत । दर्शन झाले बुवांना ।।७८।। रूप अत्यंत मनोहर । मनमोहक अति सुंदर ।। आनंदले बुवा फार । भावावस्था प्रकटली ।।७९।। अष्टसात्विक भाव सगळे त्या वेळी जागृत झाले ।। मन आनंदाने मोहरले । अनुभव दिव्य घेत ते ।।८०।। काही वेळ असाच जात । बुवा मग भानावरती येत ।। लगेच महाद्वार ते गाठत । दिसले शंकर महाराज ।।८१।। पाहून महाराज श्री शंकर । घातला साष्टांग नमस्कार ।। आनंदून गेले फार । जनार्दनबूवा त्या वेळी ।।८२।। जनार्दनबूवानी धरून हात । महाराजांस नेले मठात ।। जमलेले लोक दर्शन घेत । भक्तिभावे आदरे ।।८३।। बूवांनी पाहून महाराजांना । ठेवून घेतले आपल्या सदना ।। आनंद वाटे त्यांच्या मना । महाराज येता मठात ।।८४।। महाराज शुभराय मठात । कोणाकोणास हे कळत ।। दर्शनासाठी लोक येत । शुभरायांच्या मठात ।।८५।। महाराज आल्यापासून । शुभराय मठ गेला फुलून ।। गर्दी लोकांची होऊन । लोक येती दर्शना ।।८६।। शंकर महाराज रहात । शुभरायमहाराज मठात बरेच दिवस मुक्काम असत । महाराजांचा मठात ।।८७।। शंकर महाराज पहा तसे । रूप काळेसावळे असे ।। शरीरयष्टी खुजी दिसे । अष्टावक्र बांधाच ।।८८।। दोन्हीही डोळे टपोरे । हि-यासारखे चमकणारे ।। मोठे, तेजस्वी ते पुरे । भव्य भालप्रदेश ।।८९।। दाढी - मिशा भारदार । डोक्यावरती केस फार ।। हा सर्व केशसंभार । अस्ताव्यस्त नेहमी ।।९०।। महाराज नेहमी असत । अगदी बालभावात ।। बालकासारखेच वागत । हातवारे तसेच ।।९१।। महाराजांचे हासणे । निरागस, बालकाप्रमाणे ।। महाराजांचे बोलणे । बालकासम बोबडे ।।९२।। महाराजांचे बोल बोबडे । समजण्यास पडे मोठे कोडे ।। नवीन माणसा न उलगडे । महाराजांचे बोल ते ।।९३।। बोल त्यांचे ऐकू येई । परी शब्दांचा उलगडा न होई ।। बोलणे वा-यावरती जाई । बोध न होई मुळीच ।।९४।। चहा, सिगारेट आणि खिचडी । यांची त्यांना विशेष गोडी ।। या वस्तूवर विशेष आवडी । महाराजांची असेच ।।९५।। आजानुबाहू महाराज । गुडघ्याखाली अगदी सहज ।। हात पोचत, हा करसाज । अक्कलकोटस्वामीसम ।।९६।। दोन्ही हातांच्या बोटात । अंगठ्या महाराज घालत ।। आठ बोटे ती चमकत । सुवर्णमुद्रांमुळेच ।।९७।। या अंगठ्यामधली । रत्ने जी जडवलेली ।। चमकत आसती पहा सगळी । अंगठ्यांचे वैचित्र्य ।।९८।। महाराज वाढवीत दाढी जटा । डोक्यास जरीचा भव्य फेटा ।। गळ्यात शोभे सुवर्णकंठा । रत्नजडित साज हा ।।९९।। कधी पँट कधी धोतर । घालीत छाटी कधी विजार कधी रेशमी पितांबर । कधी तर ते दिगंबर ।।१००।। कधी सदरा घालत । कधी उपरणे पांघरत ।। अंगावर कधी शाल घेत । कधी उघडे रहात ।।१०१।। कधी सर्व हे वापरीत । कधी सर्व फेकून देत ।। कधी केव्हा काय करत । नियम काही मुळी ना ।।१०२।। कधी भरजरी पोषाखात । रत्नजडित अलंकार असत ।। महाराज राजश्वर्यात । राजयोगी महान ।।१०३।। कधी जात गोवा प्रांतात । कधी असत गुजराथेत ।। कधी रहात केरळात । कधी आंध्रप्रदेशी ।।१०४।। कधी कर्नाटकात । कधी उत्तर प्रदेशात ।। कधी पाश्चिमात्य देशात । कधी महाराष्ट्रात ।।१०५।। प्रवास एवढा अचाट । एवढ्या दूरचा अफाट ।। करीत अगदी बिनबोभाट । कसा करीत गूढ हे ।।१०६।। अंग तर वाकडे असे । चालत जाणे शक्य नसे ।। एवढे प्रवास केले कसे ? । त्यांचे त्यांनाच ठाऊक ।।१०७।। वंदून शंकर महाराजांस । महाराजांचे प्रवास ।। तिसरा अध्याय हा खास । येथे झाला समाप्त ।।१०८।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.