शंकरगीता अध्याय ४ था
ग्रंथ - पोथी > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:50:17
शंकर गीता अध्याय ४ था
अतर्क्य ज्यांची असे किमया । सर्वत्र ज्यांची वसे छाया
या महाराजांच्या पाया । साष्टांग वंदन त्रिवार ।।१।।
विचित्र तुमची दिसे काया । आनंद होतो गुण गाया ।।
तुमचे चरित्र सुगंधफाया । सुगंध दरवळे त्रिभुवनी ।।२।।
आपल्या चरित्रसुगंधात । मन झाले सुगंधित ।।
सव्यकर स्फुरण पावत । चरित्र लिहिण्या उत्सुक ।।३।।
चरित्र अगाध अतर्क्य दिव्य । गुंतागुंतीचे, अतिभव्य ।।
लिहिणे मानवास असंभाव्य । कर्ता करविता आपण ।।४।।
आपण मला सुचविता । आपणच मला सांगता ।।
विवाद्य स्थळी कौल देता । लिहून घेता आपण ।।५।।
महाराजांचे समस्त । चरित्र मला तरी अज्ञात ।।
कधी न काही ऐकले नसत । पाहीले न कधी महाराज ।।६।।
सोलापूरचे व्यापारी । कापडदुकान ज्यांचे भारी ।।
स्वातंत्र्यसैनिक ख्याती तरी । देव देश भक्त जे ।।७।।
निष्ठा ज्यांची महाराजांवरी । महाराजांविषयी श्रध्दा खरी ।।
नित्य महाराज ज्यांच्या अंतरी । ॐकारनाथ भस्मे हे ।।८।।
या माहात्म्यामुळे मी वळलो । हे चरित्र लिहिण्यास सरसावलो
या कार्यास प्रवृत्त झालो । दिपून गेलो लीलेने ।।९।।
ॐकारनाथांच्या सत्संगात । महाराजांचा संग घडत ।।
महाराजांच्या समाधीचे होत । दर्शन पुणे नगरीत ।।१०।।
माथे टेकविले मी समाधीवर । म्हणती मज महाराज शंकर ।।
चरित्र सुरू करावे सत्वर । आधार भस्मे आहेत ।।११।।
माझा आधार अप्रत्यक्ष । भस्मे आधार प्रत्यक्ष ।।
आम्ही दोघे एकच साक्ष । जाणवेल तूलाही ।।१२।।
ऐसे वदता महाराजांनी । सोलापुरी मी येऊनी ।।
महाराजांस वंदन करुनी । ग्रंथ प्रारंभिला हा ।।१३।।
महाराज सोलापूरात । शुभरांयाच्या मठात असत ।।
एकदा भजन चालले जोरात । सारे दंग भजनात ।।१४।।
सारे शंकरमहाराजरूप बनत । चमत्कार हा केवढा असत ।।
कोण महाराज ? । कोण भक्त ? । कुणालाही कळेना ।।१५।।
महाराज जनार्दनबूवाला । म्हणाले अक्कलकोटाला ।।
जाऊ आपण योग भला । चाळीस भक्त निघाले ।।१६।।
अक्कलकोट स्वामी समर्थ । त्यांच्या समाधी मठात ।।
येऊन सारे वंदन करत । शंकर महाराज म्हणाले ।।१७।।
‘हेच माझे सद्गुरू असत’ । ऐसे म्हणून माथा टेकवित ।।
गुरू - शिष्यांची भेट होत । अपूर्व हा सोहळा ।।१८।।
काही दिवस येथे राहून । महाराज येथून निघून ।।
त्र्यंबकेश्वराला जाऊन । निवांत तेथे राहिले ।।१९।।
रामभाऊ अकोलकर । महाराजांचे भक्तवर ।।
त्यांच्या सदनी मुक्काम तर । महाराजांचा असेच ।।२०।।
त्र्यंबक आणि शंकर । भेट होता खरोखर ।।
बहरून गेले त्र्यंबकेश्वर । निष्ठावंत जाणत ।।२१।।
शंकर आणि त्र्यंबक । हे दोघेही असती एक ।।
नैष्ठिक भाविक निवडक । भक्ता प्रचिती येतसे ।।२२।।
एक दशग्रंथी ब्राह्मण । महाराजांचे धरून चरण ।।
म्हणे मी तुम्हा शरण । प्रसाद द्यावा मज काही ।।२३।।
महाराज म्हणाले ब्राह्मणाला । मी प्रसाद देतो तूजला ।।
तू खाणार नाहीस, मग कशाला । तूजला देऊ प्रसाद ।।२४।।
ब्राह्मण म्हणे निश्चय करून । खात्रीने प्रसाद खाईन ।।
कागदाची पुडी करून । प्रसाद दिला ब्राह्मणाला ।।२५।।
आनंदाने ब्राह्मण जात । घरी जाऊन पुडी उघडत ।।
कोंबडीची चार अंडी दिसत । ब्राह्मण मनी भडकला ।।२६।।
मी भिक्षुक वैदिक पवित्र । प्रसाद अभक्ष अपवित्र ।।
फेकून उकिरड्यावर मात्र । सचैल स्नान करितसे ।।२७।।
तेवढ्यात अकोलकर येऊन । म्हणती शास्त्रीबूवास देखून ।।
‘या वेळी हो कसले स्नान ?’ । चवताळून द्विज म्हणे ।।२८।।
तुमच्या महाराजांचा प्रसाद तर । दिली कोंबडीची अंडी चार ।।
फेकून दिली उकिरड्यावर । म्हणून सचैल स्नान हे ’ ।।२९।।
ब्राह्मणास म्हणती अकोलकर । ‘कोठे प्रसाद ? दावा सत्वर’ ।।
दोघे गेले उकिरड्यावर । कागदात आंबे चार होते ।।३०।।
ब्राह्मण अगदी ओशाळला । तोबा तोबा करू लागला ।।
पश्चाताप झाला त्याला । लोटांगण पुन्हा घातले ।।३१।।
आंब्याची अंडी होत । अंड्याचे आंबे बनत ।।
चमत्कृती ही अपूर्व होत । महाराजांचे वैशिष्ट्य ।।३२।।
ऐसे अनंत चमत्कार । महाराजांनी केले फार ।।
चकीत होती सुरवर । कळतील कैसे मानवा ? ।।३३।।
नंतर सोडले त्र्यंबकेश्वर । पुण्यास आले महाराज शंकर ।।
भक्तजन जमती नारीनर । पुण्यात निवांत राहिले ।।३४।।
अनेक गावांना पुण्याहून । महाराज आले जाऊन ।।
परी कायम वास्तव्याचे स्थान । पुणे त्यांनी ठरविले ।।३५।।
पुण्यात लष्कर भागात । एक विदेही यवन स्त्री रहात ।।
त्या बाईचे नाव असत । हजरत बाबाजान हे ।।३६।।
महाराज कोण ? हे ओळखे ही बाई । महाराजांस म्हणजे आई ।।
प्रत्यक्ष अल्ला भूवर येई । ऐसी निष्ठा बाईची ।।३७।।
सलाम करी सदोदित । तिच्या आग्रहावरून रहात ।।
काही दिवस लष्कर भागात । महाराज ते आनंदे ।।३८।।
एकोणीसशे पस्तीत साली । प्राध्यापक भालचंद्र देव यांनी ।।
प्रश्न आपले वय किती ? । महाराजांना विचारला ।।३९।।
मी दीडशे वर्षाचा असून । दुस-या पेशवाच्या हातून ।।
दक्षिणा धेतली भोजन करून । शनिवारवाड्यामधेच ।।४०।।
ऐसे महाराज उत्तर देत । काहींना महाराज सांगत ।।
आमचे वास्तव्य होते खानदेशात । कुंवरस्वामी म्हणून ।।४१।।
माझे मूळ नाव गौरीशंकर । राजाधिराज म्हणून कुंवर ।।
आमचे समाधी मंदिर । वाघोडात असेच ।।४२।।
पुढे पुण्याहून गेले नगरला । तेथून पुण्यक्षेत्र मढीला ।।
नाथांच्या पुण्यसमाधीला । वंदन केले सर्वांनी ।।४३।।
कित्येक वर्षांची धूनी शांत । महाराज जेंव्हा अल्लख म्हणत ।।
तेव्हा आपोआप धूनी पेटत । चकीत झाले सर्वही ।।४४।।
प्रज्वलीत केली तेथली धूनी । साधनेचे महत्व पटवूनी ।।
उत्तम प्रथा आचराव्या म्हणूनी । महाराज सर्वा सांगत ।।४५।।
यल्लूबाई माने सुविख्यात । प्रसिध्द गायिका त्या असत ।।
घरच्या चांगल्या श्रीमंत । फार भाविक होत्या त्या ।।४६।।
एकदा नृसिंहवाडीत । त्यांची महाराजांशी गाठ पडत ।।
फार उत्तम या गातात । महाराजांना समजले ।।४७।।
महाराजांनी यल्लूबाईस । सांगितले गावयास ।।
सुस्वर राग आळविण्यास । सुरूवात केली बाईनी ।।४८।।
शिवास आवडे संगीत । गाणे ऐकून महाराज डोलत ।।
यल्लूबाईवर प्रसन्न होत । आशीर्वाद देत ते ।।४९।।
येल्लूबाई आंनदीत । आशीर्वाद ऐकून होत ।।
पुण्यातील त्यांच्या वाड्यात । महाराज गेले एकदा ।।५०।।
यल्लूबाई एकास । सांगत होती कृष्ण लीलेस ।।
कृष्ण कसा रांगतसे खास । तोच चमत्कार जाहला ।।५१।।
महाराज दुडुदुडू रांगत । परी प्रत्यक्ष कृष्णच दिसत ।।
यल्लूबाई चकीत होत । चमत्कार सारे पाहती ।।५२।।
यल्लूबाईची भावना तीक्ष्ण । म्हणून महाराज झाले कृष्ण ।।
जसे भावनेला उधाण । लाभ तैसा मिळतसे ।।५३।।
सोलापूर शुभराय मठात । बाबा जक्कल दर्शना येत ।।
त्यांना महाराज स्पष्ट दिसत । श्रीपाद श्रीवल्लभ ।।५४।।
कार्तिकी एकादशीचा दिवस असत । पुण्यास मेहेंदळे वाड्यात ।।
ताईसाहेब कीर्तन करत । सुंदर ते ध्यान गात त्या होत्या ।।५५।।
महाराज, बालगंधर्वही असत । बालगंधर्व खूष म्हणत ।।
‘पांडूरंगाचे दर्शन बाकी असत । एवढा अभंग रंगला’ ।।५६।।
तोच महाराज उभे राहत । सर्वां पांडूरंगच दिसत ।।
प्रत्यक्ष अनुभूती सर्वा येत धन्यता वाटे सर्वांस ।।५७।।
गंधर्व नाटक मंडळीत । महाराज पडदे ओढीत ।।
एकदा महाराज पाहण्या जात । गंधर्वांचे नाटक ।।५८।।
बालगंधर्वांचा बसत । आवाज अगदी काम न देत ।।
नाटकाची तर वेळ होत । तिकिट विक्री जाहली ।।५९।।
औषधे घेतली अनेक । नवसही बोलले ते कैक ।।
नाटकाचा बदलावा का दिनांक । येथपर्यंत पाळी ये ।।६०।।
कळता, महाराज तात्काळ । गेले बालगंधर्वांजवळ
आपल्या मुखातील विडा सकळ । गंधर्वमुखी घातला ।।६१।।
महाराजांचा प्रसाद असत । म्हणून बालगंधर्व विडा खात ।।
लगेच आश्चर्य पहा घडत । आवाज सुटला संपूर्ण ।।६२।।
त्या दिवशीचे नाटक होत । अगदी जोरदार सर्वांत ।।
प्रेक्षक अगदी रंगून जात । शंकरलीला अशी ही ।।६३।।
बालगंधर्व एक दिन । आपले सहकारी घेऊन ।।
जात गाणगापूरी घेण्या दर्शन । दर्शन घेतले सर्वांनी ।।६४।।
स्टेशनवर आले संध्याकाळी । कळले गाडी उद्या सकाळी ।।
उपाशीच होती सर्वं मंडळी । हॉटेलही तेथे नव्हतेच ।।६५।।
भूकेने सारे व्याकुळले । उपाशीच सर्वही झोपले ।।
रात्री एकाने त्यांना पुकारले । उपाशी का झोपता ? ।।६६।।
गरम पूरीभाजी तयार । उठले सारे सत्वर ।।
खाल्ली पूरीभाजी पोटभर । बील विचारू लागले ।।६७।।
हॉटेलवाला म्हणे घाई न । बील उद्या द्या आणून ।।
सारे चकित होऊन । एकमेकास म्हणतात ।।६८।।
काहीच येथे नसून । हॉटेल आले कसे कोठून ? ।।
बील उद्या द्या सांगून । हॉटेलवाला गेलाही ।।६९।।
सकाळी पाहतात उठूनी । हॉटेल तेथे मूळीच नसूनी ।।
सारे गाडीत बसूनी । सोलापूरी परतले ।।७०।।
गेले महाराजांच्या दर्शना । महाराज म्हणती गंधर्वांना ।।
रात्रीच्या पूरीभाजीचे बील द्याना । चपापले सर्वही ।।७१।।
कोण होता हॉटेलवाला ? । रात्री कोणी दिले खायला ? ।।
कळले तेव्हा सर्वांना । महाराजांची लीला ही ।।७२।।
गंधर्व म्हणाले बील किती ते ? । महाराज वदले मी मागेन ते ।।
देणार काय सांग पूरते । जरून देईन महाराज ।।७३।।
महाराज वदले ‘प्रति गुरूवार दिन । करावे शास्त्रोक्त संगीत भजन’
महाराज आज्ञा प्रमाण मानून । संगीत भजन चालले ।।७४।।
एकदा महाशिवरात्रीस । पुणे महेंदळे वाड्यास ।।
भजन - किर्तन गाण्यास । गर्दी फार जाहली ।।७५।।
महाराज हसून म्हणत । ‘आज महाशिवरात्र असत ।।
मंदिर एकदाच असे उघडत’ । सारे पाहू लागले ।।७६।।
महाराजांचा रंग बदलत । नीलवर्ण महाराज बनत ।।
महाराज प्रत्यक्ष शिव दिसत । महाशिवरात्र खरी ही ।।७७।।
बेल सर्वांनी शिवावर । वाहून मस्तकी चरणांवर ।।
दर्शन घेतले सत्वर । धन्यता वाटे सर्वांस ।।७८।।
महाराजांना अन्नपूर्णा । प्रसन्न अगदी पहाणा ।।
नव्हे, होती ही अन्नपूर्णा । महाराजांच्या आज्ञेत ।।७९।।
डॉक्टर हरी त्र्यंबक खरे यांस । सुरू असलेल्या उत्सवास ।।
पाच शेर धान्य आणावयास । महाराज सांगत ।।८०।।
धान्ये, डाळ - तांदूळ, गहू ही । प्रत्येकी पाच शेर आणूनी।।
महाराजांच्या पुढती वंदूनी । डॉक्टर खरे ठेवीत ।।८१।।
धान्य घेऊन आत जात । महाराज खोली बंद करत ।।
‘कुणा येऊ न द्यावे आत’ । महाराज सांगत ।।८२।।
एकटेच महाराज खोलीत । अन्नपूर्णेची पूजा करत ।।
पूजा करून बाहेर येत । सर्वां प्रसादा सांगती ।।८३।।
उत्सवाच्या शेवटच्या दिनी । त्याच धान्याचा स्वयंपाक करूनी ।।
पाच हजार माणसे जेवूनी । तृप्त अगदी जाहली ।।८४।।
पाच शेर धान्यात । पाच हजार माणसे जेवत ।।
असे अनेक प्रसंग घडत । शंकरलीला अपूर्व ।।८५।।
महाराज असता खुषीत । सांगत कथा पूर्ववृत्तांत ।।
म्हणाले मी होतो सर्कशीत । नाटकाचे पडदे ओढले ।।८६।।
मी फार वर्षापूर्वी । तमाशात सोंगाड्याचे काम करी
चिलया बाळाचा वग त्या दिनी । स्टेजवरती चालला ।।८७।।
शंकराची आज्ञा होताच । मी उडविले चिलयाचे मुंडकेच ।।
सांगितले तसे मी केलेच । यात चुकले काय मम ? ।।८८।।
गडबड लोकांनी करून । केला पोराचा खून म्हणून ।।
पोलिसाकडून मज पकडून । तमाशा सारे पहात ।।८९।।
सदगुरूस्वामींचे स्मरण केले । तिरकमट घेऊन स्वामी आले
संजीवनी मंत्र वदले । मुंडके जोडले मुलाचे ।। ।।९०।।
मुलगा उठूनिया बसला । कडकडाट टाळ्यांचा झाला
मी सोडून तमाशाला । पळून गेलो त्या क्षणी ।।९१।।
माझ्या मागे लागले स्वामी । नदी तीरावर पडलो मी ।।
तेव्हा मजला म्हणती स्वामी । शंकर माझे ऐक तू ।।९२।।
नको गुंतू मायाजाळात । तुझे वाकडे पाय असत ।।
म्हणून लोक तुझा तमाशात । उपयोग करून घेतात ।।९३।।
जगाच्या या तमाशात । दाखवावयाचे सत्य जे असत ।।
हेच तुझे कार्य असत । अवतार तुझा त्यासाठी ।।९४।।
दुसरी कथा महाराज सांगत । माझे मातापिता वृध्द असत ।।
मज घेऊन पंढरी जात । प्लेग मजशी जाहला ।।९५।।
प्लेगाचे चार गोळे उठले । अगदी सारेही घाबरले ।।
स्वामींचे मी स्मरण केले । स्वामी आले धावून ।।९६।।
त्यांनी हाती चक्र घेऊन । चार गोळे काढले कापून ।।
म्हणून आठ ठिकाणी वाकून । अष्टावक्र झालो मी ।।९७।।
ऐसे महाराज सांगत । आपला पूर्ववृत्तांत ।।
आपण काय केले असत । अष्टवक्र कसा मी ? ।।९८।।
एकदा महाराजांच्या मनात । तुळजापूरी जाण्याचे येत ।।
महाराज भक्तासमवेत । गेले तुळजापूरात ।।९९।।
भवानी मातेच्या मंदिरात । भाविकांची गर्दी असत
या प्रचंड गर्दीत । उभे कोठे रहावे ? ।।१००।।
मंदिरातील ओवरीत । महाराज जाऊन थांबत ।।
भक्तही मग तेथे जात । ओवरीत थांबले ।।१०१।।
थोड्या वेळानी महाराजांस । सारे सांगती उठावयास ।।
भवानी मातेच्या दर्शनास । आपण आता जाऊ या ।।१०२।।
सर्वांना महाराज म्हणत । देवी काय फक्त मंदिरात ? ।।
येथे काय देवी नसत ? । इथेच घ्या दर्शन ।।१०३।।
महाराज ध्यानस्थ बसत । तोंच नवल असे घडत ।।
प्रत्यक्ष स्पष्ट दर्शन घडत । तुळजाभवानी देवीचे ।।१०४।।
सर्वांनी दर्शन घेतले । भक्त अगदी आनंदले ।।
सालंकृत दर्शन घडले । जगन्माऊली मातेचे ।।१०५।।
पुन्हा दर्शन असता घेत देवीच्या ठिकाणी महाराज दिसत ।।
थक्क होती सारे भक्त । अधिकार त्यांचा पाहून ।।१०६।।
येथे काय देवी नसत ? । येथेच घ्यावे दर्शन ।।
महाराजांनी आपले शब्द । खरे करून दाखविले ।।१०७।।
शंकर महाराजांच्या चरणी । आनंदाने वंदन करूनी ।।
चौथा अध्याय या ठिकाणी । पूर्ण असे जाहला ।।१०८।।
।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज
श्री शंकर महाराज की जय ।।
Search
Search here.