शंकरगीता अध्याय ५ वा

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:46:24
शंकर गीता अध्याय ५ वा शंकर महाराजांचे चरण । देखून बहरले पंचप्राण जे सौख्याची असती खाण । वंदन त्यांना असो हे ।।१।। वंदन करा महाराजांना । आनंद होई अपार मना ।। महाराजांचे गुण गाताना । बहरुन येते शरीर ।।२।। एकदा भक्तांच्या समवेत । महाराज बसलेले असत ।। आरडाओरडा गोंधळ होत । शेजारीच, लोकांचा ।।३।। एक मोठा नाग निघत । त्याला मारण्याचा प्रयत्न चालत ।। महाराज तेथे धावून जात । खवळलेला नाग तो ।।४।। महाराज त्याच्या जवळ जात । नाग पायास विळखा घालत ।। बेभानपणे फणा काढत । नाग फुसफुसू लागला ।।५।। महाराजांनी फण्यावरूनी । प्रेमाने हात फिरवूनी ।। नागराज शांत व्हावे, म्हणूनी । गोडीत त्याला सांगितले ।।६।। नागराज अगदी शांत होत । पायाचा विळखा काढत ।। मानेनेच त्यांना वंदन करीत । कोण हे ? त्याने ओळखले ।।७।। हातात घेऊन नागराज । अरण्यात गेले महाराज ।। शंकराचा हा दिव्य साज । तेथे दिला सोडून ।।८।। वाठार गावचा मल्ल असत । शक्तीची त्याला मस्ती चढत ।। अनेक गावात तो प्रख्यात । चालला डौलत रस्त्याने ।।९।। मल्ल होता जणू महान हत्ती । महाराज अचानक तेथे येती ।। बसती त्याच्या खांद्यावरती । मल्ल घामाघूम होत ।।१०।। महाराजांच्या ओझ्यानी । दमछाक त्याची होऊनी ।। रडकुंडीस अगदी येऊनी । शरण आला महाराजा ।।११।। महाराज उतरले खांद्यावरुन । मल्लाने धरले त्यांचे चरण ।। मनी म्हणे अवलिया हे महान । आश्चर्य मोठे मज वाटे ।।१२।। महाराज म्हणती मल्लास । तूजला कुस्ती जिंकावयास ।। मार्ग एक सांगतो खास । गावजेवण द्यावे तू ।।१३।। आत्ताच दवंडी पिटवावी । सर्वांस जेवण्या बोलवावे ।। मल्ल म्हणे काहीच न मजठायी । फजिती होईल दवंडीने ।।१४।। महाराज म्हणाले मल्लाला । मी असता काळजी कशाला ? ।। जेवण्या बोलाव सर्वांना । आमंत्रिले गावास ।।१५।। त्या दिवशी महाराजांनी । शेरभर तांदूळाची खिचडी करुनी ।। अन्नपूर्णेची पूजा करूनी । म्हणती पाने वाढा हो ।।१६।। पंक्तीवर पंक्ती बसत । हजारो माणसे जेवत ।। गाव सारा तृप्त होत । फक्त शेरभर खिचडीत ।।१७।। पुढे कुस्ती ठरली पुण्याला । मल्लास विजय मिळाला ।। खांद्यावर घेऊन मल्लाला । विजय मिरवणूक निघाली ।।१८।। अक्कलकोट महाराज मठाजवळ । शंकर महाराज उभे असत ।। मल्लानी पाहता ये धावत । पाय धरले घट्टच ।।१९।। मल्लाने आपल्या खांद्यावर । महाराजांस घेतले सत्वर ।। बेलबागेपर्यंत जोरदार । मिरवणूक काढली ।।२०।। एकदा महाराज पुण्यात । होते एका भक्ताच्या घरात ।। तेरा पत्रे भक्ताच्या हातात । पोष्टमनने दिलीच ।।२१।। दूरदूरच्या विविध ठिकाणी । विविध उत्सव चालले असूनी उत्सवास महाराज हजर असुनी । उल्लेख ऐसा पत्रात ।।२२।। पत्रे वाचूनी दाखविली । महाराजांस, अनेकांनी वाचली ।। मंडळी अगदी थक्क झाली । हसू लागले महाराज ।।२३।। तेरा ठिकाणी महाराज असत । महाराज पुण्यातही दिसत ।। एकाच वेळी सर्वत्र असत । प्रचिती दिली सर्वास ।।२४।। एकदा नगरहून पाथर्डीस । महाराज पायी चालत जात ।। मधेच तेव्हा ते रस्त्यास । वृध्देश्वरला थांबत ।।२५।। जमिनीवर हात टेकवीत । मोठ्याने ते अल्लख म्हणत ।। जमिनीतून दिव्य प्रगटत । महादेवाची पिंड ती ।।२६।। पिंड वरती मग काढून । व्यवस्थित तिची पूजा करून ।। महाराजांनी पिंड काढली म्हणून । शंकरेश्वर म्हणती त्या ।।२७।। भव्य मंदिर त्या ठिकाणी । आज उभे राहिले असूनी ।। शंकर महाराजांची करणी । साक्ष आजही देतसे ।।२८।। महाअरण्यात गर्भाद्रि पर्वत । हे वाल्मिक ऋषींचे स्थान असत ।। मच्छिंद्र, गोरक्ष, जालंदरनाथ । समाध्या त्यांच्या येथेची ।।२९।। भगवान शंकर येथे येत । कायम तेथेच राहत ।। ‘म्हातारदेव’ त्यांना म्हणत । हेच आपेश्वर असे ।।३०।। आपेश्वराच्या पश्चिमेस । कानिफनाथ राहत ।। कानिफनाथ नाव ठेवीत । मढी ऐसे त्या गावा ।।३१।। याच पुण्यक्षेत्र मढीत । ब-याच वर्षांची धून शांत ।। अल्लख म्हणून केली प्रज्वलित । चौथ्या अध्यायी कथा ही ।।३२।। खानसाहेब पुण्यात । त्यांचे मन नेहमी अशांत ।। मुंबईचे नूरी त्यांना नेत । महाराजांच्या दर्शना ।।३३।। महाराज म्हणती ‘अरे खान । तू आहेस का खरा मुसलमान ? ।। पडतोस का नमाज प्रतिदिन । गुरू आहेस केला का’ ।।३४।। एवढे बोलून महाराजांनी । नमाजातील बारकावे खुबीनी समजाविले उत्तम रीतीनी । यवनांनाही जे न माहीत ।।३५।। महाराजांच्या दर्शनानी । खानसाहेब बनले समाधानी ।। जीवन त्यांचे गेले फुलुनी । गुरू केला महाराजा ।।३६।। महाराज म्हणती कोणत्याही । कृतीला जो माजत नाही ।। ज्याचा अहंकार अल्लाशी । एकरुप असतो झालेला ।।३७।। तोच नमाजी असे खरा । नमाजी म्हणजे न माजणारा ।। अल्लाशी एकरूप होणारा । खरा इस्लामी तोच हो ।।३८।। इस्लाम शब्दाचा अर्थ शांती । महंमद पैगंबर प्रार्थना करती ।। शांतीचा मार्ग दाखवा म्हणती । नित्य प्रार्थिती परमेशा ।।३९।। पैगंबरांचा उपदेश पहा । कोणालाही मारू नका ।। चोरी कोणाची करू नका । सत्य धर्म पाळावा ।।४०।। साफ आणि पाक हृदयात । असते खरी मस्जिद ।। असीम श्रध्दा असावी नित । परमेश्वराबद्दल ।।४१।। प्रेम आहे खरा खुदा । धैर्य सहिष्णुता श्रध्दा ।। सद्गुणांचा करा साठा । इस्लाम धर्म सांगतो ।।४२।। महाराजांना मुसलमान । विचारती शंका प्रश्न ।। ऐशी त्यांना उत्तरे देऊन । समाधान करती सर्वांचे ।।४३।। निरंजनमहाराज पुण्यतिथीस । महाराज जात हैद्राबादेस ।। हैद्राबादचे लोक महाराजांस । म्हणत होते अवलिया ।।४४।। हैद्राबादचे प्रख्यात । भटजी बापू महान संत ।। श्रेष्ठ अधिकारी परमार्थात । कथा त्यांच्या प्रख्यात ।।४५।। वासुदेव केशव अघोरशास्त्री । वडील माझे तज्ज्ञ शास्त्री ।। याज्ञिकी ख्यात ज्योतिषशास्त्री । पुराणिक ते पट्टीचे ।।४६।। भागवत सप्ताह करण्यात । अनेक मानपत्रे त्यांना मिळत ।। भटजीबापूंनी हैद्राबादेत । सप्ताह त्यांचा ऐकिला ।।४७।। ऐकून सप्ताह समस्त । भटजीबापू खूष होत ।। शुक्राचार्य, ऐशी पदवी देत । समारंभपूर्वक ।।४८।। या भटजीबापूस महाराज । देत मार्गदर्शन आशीर्वाद ।। भटजीबापूंच्या जीवनात । आध्यात्मिक प्रगती जाहली ।।४९।। पुण्याजवळील भोर येथ । रामजन्माचा उत्सव होत ।। एकदा महाराज तेथे जात । प्रचंड गर्दी भक्तांची ।।५०।। रामाचा जयजयकार चालत । जन्माची वेळ जवळ येत ।। महाराज शांत ध्यानस्थ बसत । वेळ झाली जन्माची ।।५१।। महाराजांकडे सारे बघत । महाराज अदृश्य झणी होत ।। प्रत्यक्ष प्रभु रामचंद्र प्रगटत । महाराजांच्या ठिकाणी ।।५२।। दशरथी रामांचे साक्षात् । दर्शन घेती सारे भक्त ।। दर्शन घेताच पुन्हा दिसत । शंकर महाराज स्वयमेव ।।५३।। पुण्यात संस्कृत प्राध्यापक देव । महाराजांस माहिती विचारत ।। महाराज देवांना सांगत । उघडा ग्रंथ घेऊनी ।।५४।। कोणता घ्यावयाचा ग्रंथ । कोणते पान उघडणे असत ।। हे महाराज काही न सांगत । कोडे पडले देवांना ।।५५।। हातास येईल तो ग्रंथ घेत । उघडेल ते पान उघडत ।। महाराज देवांना सांगत । आता वाचा पान ते ।।५६।। देव झाले अगदी चकित । जी शंका त्यांच्या मनात ।। जी माहिती त्यांना हवी असत । तोच मजकूर पानात ।।५७।। जिथे देव झाले चकित । माणसाचे मग काय होत ? ।। शंका न विचारता, उत्तर मिळत । अधिकार काय वर्णावा ।।५८।। सर चुनीलाला मेहता गुजराथी । ब्रिटिशांच्या गव्हर्नर पदावरती ।। मुंबईस त्यांचे वास्तव्य असुनी । विद्वान श्रीमंत अत्यंत ।।५९।। एकोणीसशे चव्वेचाळीस । या इसवी सनास ।। ही घटना असे घडत । मोठे सात्विक मेहता ।।६०।। पाश्चात्य पौर्वात्य तत्वज्ञानांचा । अभ्यास व्यासंग मोठा त्यांचा प्रवचने व्याख्याने यांचा । नाद त्यांना भारीच ।।६१।। दर्शने साधूसंताची । दर्शने सकल देवांची ।। सर्व तीर्थक्षेत्रांची । यात्रा त्यांनी केलीच ।।६२।। व्रते, दानधर्म, केला फार । परी मनात चिंतेचा भार ।। कधी भेटेल जगदाधार ? । म्हणून मन अशांत ।।६३।। रावसाहेब मेहेंदळे यांना । मेहता म्हणाले एकदा ।। भगवंताचे दर्शन मजला । कोण करून देईल ? ।।६४।। मेहेंदळे म्हणाले मेहतांना । शंकर महाराजांच्या दर्शना ।। आपण जाऊ, तुमची कामना । पूर्ण तेथे होईल ।।६५।। मामा ढेकणे यांच्या सदनी । दोघे गेले पहा मिळूनी ।। महाराज होते त्या सदनी । निवांत अगदी बसलेले ।।६६।। आपल्या तीक्ष्ण नजरेनी । मेहतांस पाहिले महाराजांनी ।। मेहतांचे अष्टभाव आले फुलुनी । पाहु लागले महाराजा ।।६७।। क्षणात लख्ख वीज उसळे । कोटिसूर्याचे तेज फाकले ।। अत्यंत मोहक रूप प्रगटले । भगवान श्रीविष्णूंचे ।।६८।। शंकरमहाराज गुप्त झाले । तिथे भगवान विष्णू प्रगटले ।। मेहतांस गहिवरून आले । भरले नयन अश्रूंनी ।।६९।। चतुर्भुज विष्णू वरती छत्र । हाती गदा शंख चक्र ।। पाहता संतुष्ट होती नेत्र । अपूर्व भगवंत दर्शन ।।७०।। लगेच मेहता धावत गेले । महाराजांचे चरण धरले ।। डोळ्यांतून अश्रू वाहू लागले । अभिषेक चरणी चालला ।।७१।। मुखातून चालले पुरूषसूक्त । काही वेळ असाच जात ।। नंतर पुरूषसूक्त थांबत । अभिषेकही संपला ।।७२।। मेहता चरणा मिठी मारत । चतुर्भुज विष्णू असता पहात ।। शंकर महाराज प्रगट होत । धन्य झाले मेहता ।।७३।। प्रत्यक्ष विष्णूंचे घडावे दर्शन । ओढ हीच मेहतांची महान ती इच्छा होता पूर्ण । शांत झाले मेहता ।।७४।। महाराजांचे दर्शन झाले । मेहतांचे जीवन बदलले ।। आनंदाने अगदी भरले । आनंदी आनंदच ।।७५।। पानिपतच्या लढाईत । अपूर्व शौर्य जे गाजवित ।। ते मेहेंदळे अप्पा बळवंत । सरदार होते प्रख्यात ।।७६।। यांच्याच नावाचा पुण्यात । अप्पा बळवंत चौक असत ।। भव्य वाडा या चौकात । मेहेंदळेंचा असेच ।।७७।। यांचे वंशज त्या वाड्यात । राहतात सरदार बॅरिस्टर ।। रावसाहेब मेहेंदळे असत । पत्नी ताईसाहेब ।।७८।। ताईसाहेब गायन । भजन प्रवचन कीर्तन ।। सुंदर करीत मन लावून । कार्यक्रम त्यांच्याच वाड्यात ।।७९।। त्यांच्या कीर्तन प्रवचनाला । हॉल नेहमी भरलेला ।। नित्य गर्दी वाड्याला । उत्सव होती सर्वही ।।८०।। महाराजही या वाड्यात । नेहमीच जात असत ।। कसा महाराजांचा संबंध येत । हीही कथा नवलाची ।।८१।। रावसाहेब मुंबईस असत । प्रथम पत्नी निवर्तत ।। असून राजैश्वर्य समस्त । उध्वस्त जीवन जाहले ।।८२।। मुंबई सोडून ते पुण्यात येत । भव्य वाडा भासे स्मशानवत ।। मन त्यांचे उदास होत । चिंताग्रस्त सदा ते ।।८३।। सरदार मिरीकरांनी । रावसाहेबांस नेले आपल्या सदनी ।। महाराज तेथे असूनी । दर्शन त्यांचे घडविले ।।८४।। रावसाहेबांना पहाताच । महाराज त्यांच्या पाठीवर ।। जोराने थाप मारत । रावसाहेबांना म्हणाले ।।८५।। ‘अरे, येरे राजा, तुझीच मी । अगदी वाट पहात असुनी ।। तू नवनाथ ग्रंथातला भर्तरी । मेली तुझी पिंगला ।।८६।। तुझे उध्वस्त जीवन संपणार । ज्ञानेश्वरी रसास्वादाने बहरणार ।। नवीन ऐश्वर्य सुरू होणार । मुख्य कलाकार तू’ ।।८७।। महाराजांच्या उद्गारांनी । आणि हस्तस्पर्शांनी ।। रावसाहेब आले गहिवरूनी । चकित झाले अत्यंत ।।८८।। रावसाहेबांच्या मनात नसूनी । सर्वांच्याच आग्रहावरूनी ।। विवाह त्यांचा होऊन सदनी । ताईसाहेब प्रवेशल्या ।।८९।। दोघांच्या प्रवृत्तीत, वयात । खूप अंतर पहा असत ।। सांसारिक जीवनास कंटाळत । विटून गेले दोघेही ।।९०।। सकल ऐश्वर्य सुखे सारी । हात जोडून उभी दारी ।। दोघेही दु:खीच अंतरी । ताईसाहेब ठरविती ।।९१।। आत्महत्या करावी म्हणुनी । एकट्याच निघाल्या बंगल्यातुनी ।। समुद्राजवळ आल्या झणी । निरोप घेण्या जगताचा ।।९२।। स्वामी समर्थांचे मंदिर दिसत । जाऊन दर्शन असता घेत ।। सतत स्पष्ट ध्वनी ऐकू येत । ‘अष्टवक्रगीता’ हा ।।९३।। तिथे तर कोणीही नसत । मग शब्द हे कोण पुकारत ? ।। ‘अष्टवक्रगीता’ काय असत ? कोण संदेश देतसे ? ।।९४।। बाहेर आल्या संभ्रमात । तोच रावसाहेबांचे मित्र नूरी दिसत ।। फिरावयाला एकट्याच कशा येत ? । विचारून नेले घरात ।।९५।। प्रधानांकडे महाराज असत । रावसाहेबांना निरोप येत ।। दोघेही महाराजांच्या दर्शनास जात । महाराज म्हणाले ताईना ।।९६।। ‘ये बेबी, बैस माझ्यासमोर । रावसाहेबास म्हणाले नंतर ।। मी बेबीला खाल्लं बरं । गिळून टाकले बेबीला’ ।।९७।। महाराजांच्या उद्गारांनी । ताईसाहेब गेल्या बदलुनी ।। रावसाहेब आले बहरुनी । पुर्ण दोघे बदलले ।।९८।। प्रवचने ज्ञानेश्वरीवरती । करीत जा महाराज म्हणती ।। आणि आशीर्वादही देती । ताईसाहेबांना ते ।।९९।। इतकी प्रवचने त्यांची छान । ऐकता हरपे देहभान वाटे ताईच्याच मुखातून । प्रत्यक्ष महाराज बोलत ।।१००।। महाराज नेहमी सांगत । मला बोलता नाही येत ।। तल्लख बुध्दीचा लागत । वक्ता बुध्दिमान हो ।।१०१।। महाराजांची योजना । निवडले ताईसाहेबांना ।। करण्या कीर्तन प्रवचना । रंग भारी चढतसे ।।१०२।। आत्महत्या करणा-या म्हणूनी । ज्या ताई त्यांना खाउनी ।। महाराजांनी टाकले गिळूनी । महाराज होते बोलले ।।१०३।। याचा अर्थ कळला तेव्हा । संपूर्ण बदलले दोघे जेव्हा ।। महाराज करतील काय केव्हा । विधात्यासही कळे ना ।।१०४।। महाराजांच्या कृपेनी । मेहेंदळे पतीपत्नी ।। संसारात अगदी आनंदूनी । उध्वस्त जीवन उमलले ।।१०५।। कथा - कीर्तन - प्रवचन । नैमित्तिक ते गायन ।। उत्सव होती मधूनमधून । गर्दी प्रचंड श्रोत्यांची ।।१०६।। ज्ञानेश्वरीचे रसाळ सुंदर । नवीन ऐश्वर्य सुरू होणार ।। रावसाहेबास आली प्रचिती तर । महाराजांच्या शब्दांची ।।१०७।। शंकर महाराजांस करून नमन । पाहीले त्यांना डोळे भरून ।। पाचवा अध्याय संपूर्ण । या ठिकाणी जाहला ।।१०८।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.