शंकरगीता अध्याय ६ वा
ग्रंथ - पोथी > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:44:19
शंकर गीता अध्याय ६ वा
महाराजांचे स्मरून चरण । शरीराचा प्रत्येक कण न कण
बहरून येई म्हणून शरण । महाराजांच्या चरणी मी ।।१।।
वंदन करतो पुन्हा पुन्हा । फुटतो चरित्र लिखाणाचा पान्हा ।।
उभा राहून शंकर कान्हा । शंकरगीता सांगती ।।२।।
शंकर महाराज शंकर गीता । सांगतात मी दर्शन घेता ।।
तेच कर्ता करविता । नाममात्रही नसे मी ।।३।।
मी लिहिले चरित्र । याचा पुरावाही तिळमात्र ।।
नसे मजजवळ मी अपात्र । म्हणून कैसे लिहिले मी ? ।।४।।
दिसत महाराजांचे चरण । करावे त्यांना वंदन ।।
श्रध्देने मनापासून । एवढेच मला येतसे ।।५।।
हे चरित्र अति सुरस । त्याप्रमाणे फार सरस ।।
महाराजांचा लीलाविलास । कृपा वैशिष्ट्य असे हे ।।६।।
महाराजांचे एक भक्त । बाबूराव रूद्र असत ।।
महाराज त्यांच्या घरी जात । आपण होऊन आनंदे ।।७।।
स्वत: महाराज चहा करीत । पाणी दोन कप ठेवीत ।।
चहा तयारही असे होत । उतरून खाली ठेवला ।।८।।
तेवढ्यात तेथे काही भक्त । दर्शनासाठी मुद्दाम येत
त्यात एक वेदान्ती पंडित । प्रथमच आला दर्शना ।।९।।
‘आपण शास्त्रे जी वाचली असती । त्यांची प्रत्यक्ष अनुभूती ।।
देणार कोणी मज भेटती ?’ पंडितांची शंका ही ।।१०।।
एकवीस माणसे सारी असत । महाराज सर्वांना चहा देत ।।
शिल्लक एक कप रहात । महाराजांनी घेतला तो ।।११।।
महाराजांस पाहून । पंडितांच्या कपाळी आठ्या पडून ।।
कुठले मम प्रश्नांचे याला ज्ञान ? । अहंकार त्याचा पेटला ।।१२।।
दोनच कपांचे पातेले । समोरच होते चिमुकले ।।
सर्वांचे चहापान झाले । बावीस लोक सर्वही ।।१३।।
दोनच कपांच्या भांड्यात । बावीस कप चहा होत ।।
लोक सारे झाले चकित । फक्त न कळले पंडिता ।।१४।।
प्रश्नही त्याने न विचारला । शंका जी होती त्याला ।।
प्रत्यक्ष दाखवून घटनेला । बोध पंडिता होईना ।।१५।।
म्हणून महाराज पंडिता सांगत । तोंडात आणि नाकात ।।
एकच बोटाचे अंतर असत । बोट लावून पहा की ।।१६।।
नाकावर बोट ठेवूनी । मिशीवर पीळ देवूनी ।।
मनुष्य नेहमी बोलत असूनी । त्यांच्या या कृतीतून ।।१७।।
तो आपला अहंकार । व्यक्त करतो वारंवार ।।
किती किळसवाणा हा अहंकार । तुम्हा माहीत आहे का ? ।।१८।।
नाक शिंकरून महाराजांनी । मोठा बेडका काढूनी ।।
हातावरती तो घेऊनी । चटकन तोंडात टाकला ।।१९।।
पाहून किळसवाणा तो प्रकार । शहारे आले अंगावर ।।
इतका घाणेरडा हा अहंकार । महाराज पंडिता म्हणाले ।।२०।।
पंडित अगदी सर्द झाला । अहंकार त्याचा गळाला ।।
घडल्या घटनांचा बोध झाला । अभिमान त्याचा मावळला ।।२१।।
प्रश्न शंका न विचारता । उत्तर मिळाले घटना घडता
महाराजांचे चरण दिसता । चरणी मस्तक टेकवी ।।२२।।
बाबुराव रूद्र उभे असत । महाराज तोंडातील एकेक दात ।।
काढून समोर ठेवीत । सर्व दात काढले ।।२३।।
संध्याकाळी रुद्र पहात । महाराजांच्या तोंडात ।।
सर्व दात अगदी पूर्ववत । रूद्र चकित जाहले ।।२४।।
एकदा अप्पा बळवंत चौकात । महाराज टांगा बोलावीत ।।
बसता, दोन थोबाडीत । दिल्या टांगेवाल्याच्या ।।२५।।
टांगेवाला गप्प बसत । कोणी अलौकिक व्यक्ती दिसत ।।
टांगेवाल्यास वाटत । सिटी पौष्ट येताच ।।२६।।
घड्याळाचे दुकान असत । खानसाहेबांचे प्रख्यात ।।
तेथे महाराज उतरत । टांगेवाल्यास जा म्हणती ।।२७।।
पैसे न देता, जा म्हणत । टांगेवाला तसाच जात ।।
टांगेवाल्याच्या जीवनात । बदल झाला त्यामुळे ।।२८।।
महाराज थोबाडीत देत । म्हणून चांगले दिवस दिसत ।।
टांगेवाल्याची खात्री होत । भक्त बनला निस्सीम ।।२९।।
गणेशोत्सव मिरवणूक पुण्यात । जोरात अगदी असे निघत ।।
महाराजांचे एक भक्त । वासुदेव पंडित ।।३०।।
घरच्या पत्र्यावर चढून । वरती शिडी ती ठेवून ।।
एका लहान मुलास घेऊन । वरती चढू लागले ।।३१।।
तोच शिडी उलटली । मंडळी सारी घाबरली ।।
दोघेही मरणार ओरडली । तोच धावले महाराज ।।३२।
महाराजांनी शिडी धरली । तशीच जमिनीवर टेकवली ।।
दोघेही जमिनीवरती पडली । अगदी सुखरूपपणेच ।।३३।।
इतक्या उंचावरून पडले । नुसते थोडेही न खरचटले ।।
महाराजांनीच त्यांना वाचवले । अगाध लीला कशी पहा ।।३४।।
डॉक्टर भोई प्रवासास । मोटार सायकलवरून जात
एक म्हैस आडवी येत । रस्त्यामध्ये अचानक ।।३५।।
आता होणार अपघात । म्हणून सायकल वळवीत ।।
डॉक्टर शेजारच्या शेतात जात । तोच तेथे नाग उभा ।।३६।।
एक अपघात चुकविला । दुसरा अपघात समोर आला ।।
नागराज डोलू लागला । फणा काढून पहात ।।३७।।
एवढा मोठा नागराज । कधी न पाहिला दिसे आज ।।
तेच आहेत महाराज । डॉक्टरांनी जाणले ।।३८।।
नागराजास वंदन केले । नागानी ते स्वीकारले ।।
नागराज मग गुप्त झाले । चकित झाले डॉक्टर ।।३९।।
नागराजांच्या रूपात । महाराज आज दर्शन देत ।।
अशा या आनंदात । मोटारसायकल वळवली ।।४०।।
डॉक्टर येता रस्त्यावर । महाराज प्रगटले समोर ।।
आता पाहिला जो नाग भयंकर । तसेच दिसले महाराज ।।४१।।
महाराज रोखून पहात । त्यांच्या नजरेतून स्पष्ट कळत ।।
आताच पाहिलेला जो नाग असत । तोच आम्ही आहोत ।।४२।।
डॉक्टर भोई चकित झाले । नशीब केवढे आले भले ।।
ज्यांना शंकरमहाराज दिसले । भाग्यवान ते खरोखर ।।४३।।
गोसावी, महाराजांचे भक्त । एके दिवशी काय घडत ।।
त्यांना भव्य विशालरूप दिसत । महाराजांच्या ठिकाणी ।।४४।।
अहमदनगरला महाराज जात । कबरीजवळ ते बसत ।।
मुसलमानांची श्रध्दा असत । महाराजांवरती खरी ।।४५।।
महाराजांच्या ठिकाणी अनेक । दर्शने मुसलमानांना होत ।।
‘बडे आदम मालिक’ म्हणत । महाराजांना सर्व ते ।।४६।।
महाराजांनी सोलापूरला । यज्ञ एक सुरू केला ।।
एक भाविक मुका, यज्ञाला । येता बोलू लागला ।।४७।।
सशक्त बॅरिस्टर पुण्यात । महाराजांची चेष्टा करत
महाराजांनी आपल्या गुडघ्यात । पकडून त्याला ठेवले ।।४८।।
महाराज तर कृश अत्यंत । बॅरिस्टर धिप्पाड असत ।।
बोबडी वळली पकडीत । शरण आला महाराजा ।।४९।।
डॉक्टर खरे दर्शन घेत । महाराज आशीर्वाद देत ।।
खरे यांना प्रत्यक्ष दत्त दिसत । महाराजांच्या ठिकाणी ।।५०।।
महाराज गेले नाशिकला । भक्तांनी मग विचार केला ।।
जाऊ त्र्यंबकेश्वराला । गहिनीनाथांच्या दर्शना ।।५१।।
ज्ञानेश्वर गुरू निवृत्तिनाथ । निवृत्तिगुरू गहिनीनाथ ।।
गहिनीनाथ समाधी असत । त्र्यंबकेश्वर क्षेत्रात ।।५२।।
महाराज म्हणाले ‘तुम्हास । घडू नये जाण्याचा सायास ।।
आज रात्री येथेच येण्यास । साक्षात त्यांना बोलवितो’ ।।५३।।
लोकांचा विश्वास बसेना । म्हणती बोलवा गहिनीनाथांना ।।
महाराज जागविती लोकांना । एक वाजला रात्रीचा ।।५४।।
प्रचंड आवाज ऐकू येत । ‘अल्लख’ मोठ्याने गर्जना होत ।।
आवाजाने झाले भयभीत । महाराज गेले खोलीत ।।५५।।
अत्यंत तेजस्वी प्रकाश पडला । एक नाथपंथीय पुरूष आला ।।
भव्य अत्यंत तेजस्वी भला । तोही गेला खोलीत ।।५६।।
आवाजांनी अन् तेजांनी । सारे गेले घाबरूनी ।।
तोंडावर पांघरून घेऊनी । निजले स्वस्थ भिऊनी ।।५७।।
पहाट होता सारेही । गांगरून गेले भीतीनी ।।
महाराज आले खोलीतुनी । म्हणती ‘का हो घाबरला ?’ ।।५८।।
सारे म्हणती महाराजांना । ‘एक नाथसंप्रदायी भला ।।
दिव्य सत्पुरूष पाहिला । अतीव तेज तयांचे’ ।।५९।।
महाराज म्हणाले सर्वांस । मी सांगितले होते ना तूम्हास ।।
बोलावणार आहे गहिनीनाथास । आपल्या घरी आज मी ।।६०।।
तुमचा विश्वास बसला नाही । गहिनीनाथ येऊनही ।।
तुम्ही दर्शन घेतले नाही । प्रत्यक्ष येऊनही ते ।।६१।।
येऊन गहिनीनाथ साक्षात् । तुम्हास दर्शन घेता न येत ।।
समाधीच्या जागी जाऊन । तुम्ही काय करणार ? ।।६२।।
पहाटेपर्यंत गहिनीनाथ । माझ्याशी बसले बोलत ।।
आवेगात महाराज सांगत । चकित झाले सर्वही ।।६३।।
प्रत्यक्ष गहिनीनाथ येत । गहिनीनाथ ज्यांच्याशी बोलत ।।
त्याचा अधिकार केवढा असत ? । कोण वर्णू शकेल ? ।।६४।।
एक सत्पुरूष हैद्राबादेत । महाराजांना होता मानीत ।।
एकदा त्याच्या मनात । अहंकार उफाळला ।।६५।।
श्रेष्ठ मी सर्व योगीपुरूषात । ऐसे ठाम त्याला वाटत ।।
महाराजांना हे कळत । नगरला होते त्या वेळी ।।६६।।
नगरहून हैद्राबादेत । लगेच महाराज तेथे येत ।।
मला थंडी आहे वाजत । स्नानार्थ पाणी तापवा ।।६७।।
चांगले पाणी उकळू द्यावे । नंतर स्नान मज घालावे ।।
महाराजांनी स्नान केले । अगदी उकळत्या पाण्याने ।।६८।।
राहिलेल्या उकळत्या पाण्यात । स्नान करण्या सत्पुरूषास सांगत ।।
सत्पुरूषाची छाती न होत । त्याला महाराज म्हणाले ।।६९।।
‘सर्वश्रेष्ठ योगी स्वत:स । तू तर अगदी समजतोस ।।
उकळत्या पाण्या का भितोस’ । सत्पुरूष अंतरी समजला ।।७०।।
अहंकार आपला जावा म्हणूनी । महाराज आले नगरहूनी ।।
सत्पुरूषाला येता कळुनी । पाय धरले लगेच ।।७१।।
पिढ्यान पिढ्या दत्तोपासक । असे एक गृहस्थ भाविक ।।
ते पहिल्या महायुध्दात । लढाईवर होतेच ।।७२।।
एके दिवशी युध्दात । अनेक गोळ्या त्यांना लागत ।।
पँटला अनेक भोके पडत । परत आले तंबूत ।।७३।।
त्यांना वाटले आपला संपूर्ण । पाय काढावा लागणार कापून
पाहीली पँट वर करून । अगदी लक्षपूर्वक ।।७४।।
पायाला एकही गोळी । नव्हती पहा लागलेली ।।
पँटला तर अनेक भोके पडलेली । नवल त्याना वाटले ।।७५।।
पुढे महायुध्द संपत । गृहस्थ सुखरूप घरी येत ।।
अचानक त्यांच्या दारात । उभे राहिले महाराज ।।७६।।
महाराज त्यांना म्हणत । ‘पहिल्या महायुध्दात ।।
मी तुमच्याबरोबर असत । खाणाखूणाही सांगितल्या ।।७७।।
तूमच्या पायावर झाडलेल्या । ज्या ज्या होत्या सगळ्या गोळ्या ।।
त्या सर्वही मीच झेलल्या’ । एवढे त्यांनी म्हणताच ।।७८।।
त्या गृहस्थास खाणाखुणा पटत । पायास भोके का न पडत ।।
अर्थबोध याचा आज होत । साष्टांग दंडवत घातले ।।७९।।
महाराज ज्या भक्ताघरी उतरत । त्याचा दहा वर्षांचा मुलगा संगे घेत ।।
नगरहून गिरिनारला जात । भक्तसमवेत महाराज ।।८०।।
गिरिनार पर्वताच्या पायथ्याशी । आले मध्यरात्रीशी ।।
गिरिनारच्या रांगा आकाशाशी । हितगूज होत्या करीत ।।८१।।
महाराज म्हणाले अगदी वर । या पर्वताच्या शिखरावर ।।
दहा हजार पाय-या चढून सत्वर । आपणास आहे जायाचे ।।८२।।
महाराजांची आज्ञा झाली । मंडळी चालू लागली ।।
मुलगा चालण्या तयार न मुळी । महाराज घेती खांद्यावर ।।८३।।
महाराज मुलास खांद्यावर घेत । झपाझप पावले टाकत ।।
दहा हजार पाय-या ओलांडत । डोंगर चढून गेले ते ।।८४।।
अगदी अर्ध्याच तासात । शिखरावर दत्तात्रेय स्थान असत ।।
तेथे महाराज जाऊन बसत । लोक होती चकीत ।।८५।।
ज्यांना मदतीशिवाय चालता न येत । ते मुलास खांद्यावर घेऊन चढत ।।
दहा हजार पाय-यांचा पर्वत । शक्ती कसली म्हणावी ? ।।८६।।
गिरिनार पर्वतावर महाराज जात । अल्लख ऐसे पुकारत
शेकडो साधू तेथे जमत । मुलगा चकित जाहला ।।८७।।
अगदी काळोख तेथे असत । ठिकाण उंच अत्यंत शांत ।।
साधू कोठून कसे येत ? । कोडे कसे कळणार ? ।।८८।।
महाराज गिरिनार पर्वतावर । आठ दिवस रहात ।।
सारखे पर्वतावर हिंडत । नि:संकोच चोहिकडे ।।८९।।
अनेक वाघांच्या समवेत । एकदा महाराज होते हिंडत ।।
पंचमहाभूते ज्यांच्या ताब्यात । त्यांना भीती कशाची ? ।।९०।।
हिंडून महाराज आले । वाघ सारे निघून गेले ।।
हे सर्वही ज्यांनी पाहिले । अवाक् बनले भक्त ते ।।९१।।
गिरिनारहून निघतांना । महाराजांच्या आले मना ।।
जेवण द्यावे सांधूना । शंख फुंकला लगेच ।।९२।।
दत्तात्रेयांच्या स्थानाजवळ । स्वयंपाकाची जागा असत ।।
कणकीचे गोळे भाजत । दुसरा पदार्थ भजी हा ।।९३।।
महाराजांनी शंख फुंकला । सांधूचा मग लोंढा आला ।।
सारे बसले जेवावयाला । प्रशस्त जेवण सर्वांचे ।।९४।।
कणकीचा गोळा एवढा मोठा । मोठ्या नारळाएवढा ।।
पाऊणशे ते ऐंशी खावयाचा । गोळे साधू प्रत्येक ।।९५।।
भक्त करीती विचार । एका गोळ्यात आपण ठार ।।
ऐंशी गोळ्यांचा यांचा आहार । केवढा प्रचंड आहार ? ।।९६।।
एकाचा प्रश्न साधूस तसा । एवढा तुमचा आहार कसा ? ।।
प्रश्न ऐकून त्याचा तसा । साधू त्याला म्हणाले ।।९७।।
‘जेव्हा येतात अवधूत । तेव्हाच आमचा आहार असत ।।
एरवी आमचे खाणे असत । वायुभक्षण सर्वदा’ ।।९८।।
दुपारचे बारा वाजत । भोजन पंक्ती सुरू होत ।।
स्वत: महाराज वाढत । तृप्त साधू होतात ।।९९।।
अगदी मध्यरात्रीपर्यंत । सारख्या पंक्तीच चालत
एकूण किती पंक्ती होत ? । किती साधू जेवले ? ।।१००।।
अन्न किती ते लागले ? । अन्न कोणी शिजवले ? ।।
धान्यही किती लागले ? । दिले कोणी धान्य हे ? ।।१०१।।
धान्यही कोणी आणले ? । गिरिनावर कसे नेले ? ।।
स्वयंपाकासाठी सामान । सगळे कोणी कसे आणले ? ।।१०२।।
साधूंना कोणी बोलावले ? । साधू होते हे कुठले ? ।।
साधूंना हे कसे कळले ? । कशी भोजन व्यवस्था ? ।।१०३।।
एवढ्या पंक्ती वाढल्या कुणी । पाने काढणे - मांडणे केले कुणी ? ।।
स्वयंपाकपात्रे आणली कुणी । व्यवस्था काय पाण्याची ? ।।१०४।।
रात्री प्रकाशव्यवस्था काय असत । कोण कशा रीतीने करत ? ।।
अशी एकवीस प्रश्ने अनुत्तरित । उत्तर त्यांचे स्वयमेव ।।१०५।।
साधू म्हणती ‘जिथे अवधूत । तिथेच आम्ही भोजन घेत’ ।।
यावरून सिध्द होत । महाराजच अवधूत ।।१०६।।
येणा-यांची जी भाषा असत । महाराज त्याच भाषेत ।।
त्या गृहस्थाशी बोलत । चकीत होई येणारा ।।१०७।।
चरण महाराजांचे स्मरून । चरित्र चालले हे गहन ।।
सहावा हा अध्याय लिहून । समाप्त येथे जाहला ।।१०८।।
।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज
श्री शंकर महाराज की जय ।।
Search
Search here.