शंकरगीता अध्याय ७ वा
ग्रंथ - पोथी > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:41:59
शंकर गीता अध्याय ७ वा
संतवर्य योगिराज । सदगुरू राजाधिराज
श्री शंकर महाराज । वंदन राजीखूषीने ।।१।।
राजीखूषीने वंदन । हा काय प्रकार नूतन ? ।।
ज्या खूषीत राजेपण । राजखूषी म्हणतात ।।२।।
कशास म्हणावे वंदन । ज्याहून कोणी वंद्य न ।।
त्याला केलेले नमन । वंदन त्याला म्हणतात ।।३।।
देखल्या देवा दंडवत । परमार्थ मार्गात नाही चालत ।।
कैसे अश्रू माया उपजत ? । मोले घातले रडाया ।।४।।
भावभक्ती श्रध्दा निष्ठा । यांची होते जेथे चेष्टा ।।
वाळलेल्या शुष्क काष्ठा । पल्लवी कैसी फुटेल ? ।।५।।
महाराजांच्या चरणावर । निष्ठा ज्यांची अपार ।।
त्यांनाच महाराज तारणार । चरित्र त्यांनाच कळणार ।।६।।
अन्यथा कोरडे, समुद्रात बुडविले । लोणकढी तुपातही तळले ।।
चांगले साखरेत घोळले । मूळ गुणधर्म कायम ।।७।।
ऐशी न व्हावी आपली गती । टळावी आपली अधोगती ।।
एकच मार्ग, व्हावी सन्मती । शरण जाण्याची महाराजा ।।८।।
नगरला न्हाव्याच्या दुकानात । दाढी करण्यास महाराज जात
अर्धी दाढी झाली असत । तोच उठले महाराज ।।९।।
एका ठिकाणी एक प्रेत । लोक तिरडीस होते बांधत ।।
महाराज त्या ठिकाणी जात । सरका लोकांस म्हणाले ।।१०।।
महाराज प्रेतावरती बसत । आणि त्या प्रेतास विचारीत ।।
अजून तूज परमार्थ साधायचा असता । कोठे आत्ताच चालला ।।११।।
महाराज एवढे बोलून । चटकन गेले तिथून निघून ।।
प्रेत तिरडीवर बसले उठून । गाव जमा जाहला ।।१२।।
एक वेडगळ मनुष्य येतो । लोकास बाजूला सरका म्हणतो ।।
प्रेतावर बसून प्रेताशी बोलतो । प्रेत बसते उठून ।।१३।।
सारेच अतर्क्य अघटित । सारेच त्या माणसा शोधत ।।
नगरातही शोध न लागत । जरुरीच काय कीर्तीची ? ।।१४।।
कीर्ती पैसा हवा ज्याला । परमार्थ त्याचा बुडाला ।।
कीर्ती पैसा नको ज्याला । परमार्थ त्याच्या हातात ।।१५।।
भोई डॉक्टर अमृतसरला । रेल्वेतून निघाले प्रवासाला ।।
चालत्या गाडीतून प्रसंग घडला । खाली पडले डॉक्टर ।।१६।।
एक मनुष्यही खाली पडला । तो चाकाखाली सापडला ।।
महाराजांनी डॉक्टरला । अलगद बाजूस निजवले ।।१७।।
पडलेला मनुष्य लगेच मेला । काहीही न झाले डॉक्टरला ।।
महाराजांनीच वाचविले मला । जाणीव होती डॉक्टरला ।।१८।।
तुफान वेगात गाडी चाले । महाराज कसे तिथे आले ? ।।
कसे डॉक्टरांना वाचविले ? । अतर्क्य लीलाविलास ।।१९।।
एक गाढे विद्वान पंडित । महाराजांस शंका विचारीत ।।
श्रीकृष्णांनी अर्जूनास कुरूक्षेत्रात । गीता कशी सांगितली ? ।।२०।।
युध्द चालले असतांना । गीता सांगण्यास श्रीकृष्णांना ।।
वेळ तरी कसा मिळाला ?। काही कळत नसे हे ।।२१।।
महाराजांनी त्या गृहस्थाला । सांगितले जवळ बसण्याला ।।
गृहस्थ जवळ येऊन बसला । क्षणात निघून गेलाही ।।२२।।
लोक सारे प्रश्न ऐकत । महाराज उत्तर देणार असत ।।
त्यापूर्वीच तो गृहस्थ जात । नवल लोका वाटले ।।२३।।
दुसर्या दिनी तो पाहून । लोक त्याला विचारीत ।।
महाराज उत्तर देण्याआत । गेला निघून का तुम्ही ? ।।२४।।
लोकांस सांगत पंडित । मी महाराजांजवळ जाऊन बसत ।।
प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण दिसत । महाराजांच्या ठिकाणी ।।२५।।
एवढे त्यांचे तेज अपार । दिपून गेलो मी तर फार ।।
मग कसा तेथे थांबणार ? । उत्तर सोडून निघालो ।।२६।।
एका महान विद्वानाची । अनुभूती केवढी महत्वाची ।।
स्वप्न नव्हे हे प्रत्यक्षची । साक्षात श्रीकृष्ण महाराज ।।२७।।
एक बाई असे भक्त । घरी चाले भजन संगीत ।।
काही उडाणटप्पू शिरत । कुचेष्टा करती बाईची ।।२८।।
तोंच महाराज उभे दारात । हंटर त्यांच्या हातात ।।
सर्वांस हंटरने बडवीत । शरण आले सर्वही ।।२९।।
पाया पडून माफी मागा । महाराज वदती सर्वांना ।।
तसे केल्यावरतीच त्यांना । सोडून देती महाराज ।।३०।।
इच्छा एका भक्ताची । अरबस्तानला जाण्याची ।।
महाराज त्या भक्ताला घेऊनी । गेले अरबस्तानात ।।३१।।
महाराज अरबी पोषाखात । अरबस्तानात वावरत ।।
अरबी भाषेत बोलत । हिंडत उंटावरूनी ।।३२।।
तेथील लोक महाराजांस मानीत । अनेक चमत्कार तेथे करत ।।
भक्त येता जेव्हा परत । सर्व त्यांनी सांगितले ।।३३।।
महाराज श्री शैल्याला जात । जवळच पाण्याची गुंफा असत ।।
दोन दिवस गुंफेतील पाण्यात । महाराज बसले निवांत ।।३४।।
महाराज म्हणजे प्रचंड शक्त्ती । महाराज म्हणजे उदंड युक्ती
निसर्गावर ज्यांची अखंड सक्ती । आधार काय या तिघांना ?।।३५।।
प्रश्न तुमचा बरोबर । शंका तर योग्य खरोखर ।।
घटना घडल्या आहेत तर । प्रत्यक्ष, पहिला आधार ।।३६।।
दुसरा आधार बहुमोल । प्रत्यक्ष महाराजांचेच बोल ।।
मी जे जे सांगणार । त्याप्रमाणेच घडणार ।।३७।।
लेखणी माझ्या हातात । मी एखादी गोष्ट लिहून देत ।।
ती तशीच घडेल निश्चित । लिहील्याप्रमाणेच होणार ।।३८।।
माझे शब्द सत्य असत । खोटे ठरणार नाहीत ।।
माझ्या पहा लेखणीत । ताकद आहे प्रचंड ।।३९।।
अशक्य ते शक्य करून । मी पहा दाखवीन ।।
महाराजांचे शब्द प्रमाण । अन्य दाखले कशाला ? ।।४०।।
व्यवहारात माणूस बोलतो । परी त्याप्रमाणे न वागतो ।।
परमार्थमार्गात जो असतो । बोलत नाही कधी तो ।।४१।।
मी कितीतरी असे योग्य । म्हणणे, व्यवहारात ठरते अयोग्य ।।
परमार्थात तर कधी न योग्य । खुणा आहेत ठरलेल्या ।।४२।।
अयोग्य माणसेच परमार्थात । बढाया त्या मारतात ।।
अशांचे पितळ उघडे पडत । वेळ नाही लागत ।।४३।।
परमार्थात अधिकारी असून । अधिकार सांगतो तो ठासून।।
अधिकार त्यांचा किती महान !। कसा कोणा कळेल ? ।।४४।।
महाराज औदुंबरला असत । पुण्यात अककलकोटस्वामींचा भक्त ।।
फोटोग्राफी त्याचा व्यवसाय असत । दृष्टांत त्याला जाहला ।।४५।।
तू येई औदुंबराला । माझा फोटो काढण्याला ।।
फोटोंचा दिवसही सांगितला । चकीत झाला तो भक्त ।।४६।।
तो पुण्याहून गेला मिरजेस । घटना सांगितली लोकांस ।।
दोन मोटारी भरून खास । लोक निघाले दर्शना ।।४७।।
दोन मोटारी निघत । मधेच त्या बंद पडत ।।
दुरूस्तीचे खूप प्रयत्न करत । होईनात चालू त्या ।।४८।।
कारण त्या फोटोग्राफरला । दिवस होता सांगितला ।।
एकटेच फोटो काढण्याला । बोलावीले होतेच ।।४९।।
फोटोग्राफरने ओळखले । आपण सर्वांना आणले ।।
म्हणून नसते विघ्न उद्भवले । एकटे गेलेच पाहिजे ।।५०।।
लगेच सायकल घेऊन औदुंबरला तो येऊन ।।
महाराजांचे घेतले दर्शन । महाराज त्याला म्हणाले ।।५१।।
‘मी बोलावले फक्त तुला । तू घेऊन आला सर्वांना ।।
काढ माझा फोटो भला’ । फोटो त्यांचा काढला ।।५२।।
घेऊन चल मला पुण्याला । महाराज म्हणाले त्याला ।।
फोटोग्राफरने महाराजांना । स्टेशनवरती आणले ।।५३।।
त्याने तिकिट ते काढून । महाराजांचा हात धरून ।।
डब्याकडे चालला घेऊन । महाराजांना सत्वर ।।५४।।
हात वेगळाच भासत । म्हणून फोटोग्राफर पहात ।।
तोच दिसत स्वामी साक्षात । अक्कलकोट महाराज ।।५५।।
महाराज असता कलकत्यात । ऊन वारा थंडीत बसत ।।
रोज त्यांना पहात असत । एक श्रीमंत गृहस्थ ।।५६।।
आपण कोण आहात म्हणून । यांना विचारावे काय आपण ।।
महाराजांना पाहून । श्रीमंताला वाटले ।।५७।।
तोच महाराज म्हणाले श्रीमंताला । आज मी तुझ्या घरला ।।
येऊ काय जेवावयाला ? । अवश्य यावे महाराज ।।५८।।
श्रीमंताचा कलकत्यात । मोठा कत्तलखाना असत ।।
महाराज जेवण्या घरी येत । स्वागत करून बसविले ।।५९।।
भोजनाचे आणण्या ताट । पतीपत्नी आत जात ।।
ताट आणून पाहतात । अस्ताव्यस्त महाराज ।।६०।।
महाराजांचे पाय तुटलेले । डोके धडापासून कापलेले
हात दोन्ही तुटलेले । धडही पडले बाजूला ।।६१।।
एकदम त्यांना धक्का बसला । चक्कर आली दोघांना ।।
त्यांना महाराजांनी धीर दिला । शुध्दीवर आणले दोघांना ।।६२।।
दोघे डोळे उघडून पाहतात । महाराज समोर उभे दिसले ।।
काहीच कळेना, झाले भयभीत । महाराजांना म्हणाले ।।६३।।
असे भयंकर स्वरूप आपले । कधी दाखवू नका असले ।।
दृश्य भयानक आजच पाहिले । महाराज त्याला म्हणतात ।।६४।।
तुझ्या कत्तलखान्यात । रोजच असे घडत असत ।।
तेव्हा तूज भीती न वाटत । आज का भीती वाटते ।।६५।।
न जेवताच महाराज गेले । कसे जेवणार ? जिथे हिंसा चाले ।।
श्रीमंतास झणझणीत अंजन झाले । बंद केला व्यवसाय ।।६६।।
कत्तलखाने बंद केले । अन्य व्यवसाय प्रारंभिले ।।
महाराजांचे महत्व कळले । भक्त झाला पुढे तो ।।६७।।
असेच एकदा नाटकात । महाराज छिन्नविच्छिन्न होत ।।
लोक घाबरून पळून जात । महाराज उठले तसेच ।।६८।।
महाराजांकडे येत भक्त काही । साधना केली पण अनुभव नाही ।।
महाराज करीत उपदेश काही । स्पर्श फक्त करीत ।।६९।।
महाराज नुसता स्पर्श करीत । कुंडलिनी त्यांची जागृत होत ।।
तास न तास समाधी अवस्थेत । रंगून जात भक्त हे ।।७०।।
महाराज मध्यप्रदेशात । काही दरोडेखोर साध्या वेशात ।।
आले महाराजांच्या सानिध्यात । महाराजांनी ओळखले ।।७१।।
त्यांना महाराज म्हणाले पाहून । दरोडा घालून चोरी करून ।।
तुमचे होणार नाही कल्याण । याच जन्मा नव्हे तर ।।७२।।
पुढील जन्मासाठीही । पुण्य जोडावे तुम्ही काही ।।
आयुष्यभर सरकारी यंत्रणेलाही । भिऊन जगण्यापेक्षा हो ।।७३।।
आपला घाम गाळून । अगदी ताठ मान करून ।।
स्वाभिमानाने जगा म्हणून । महाराजांनी सांगितले ।।७४।।
आपणास महाराजांनी ओळखले । म्हणून दरोडेखोर ओशाळले ।।
महाराजांचे पाय धरले । ‘धंदाबंद’ शपथ घेतली ।।७५।।
मुंबईचा एक गरीब भक्त । महाराज त्याच्याकडे जात असत ।।
एकदा तो इच्छा व्यक्त करत । खूप द्रव्य मिळण्याची ।।७६।।
महाराजांनी खूप समजावले । पैशाच्या मागे लागू नये ।।
तरीही पैशाचा मोह त्याचा न सुटे । आशीर्वाद दिला तसा ।।७७।।
त्याची परिस्थिती बदलली पूरी । बनला मुंबईचा मोठा व्यापारी ।।
महाराजांचे त्याच्या घरी । जाणे बंद जाहले ।।७८।।
महाराज बिलीमोरियाला जात । एका कारखान्याच्या आवारात ।।
माझ्या पादुका आहेत । महाराजांनी सांगितले ।।७९।।
विश्वास लोकांना बसेना । कारखान्यातील व्यवस्थापकांना ।।
दृष्टांत झाला पहाना । पादुका आहेत या स्थळी ।।८०।।
तसेच कारख्यानाच्या आवारात । उकरून सारे पहात ।।
खरोखरीच दोन पादुका निघत । दिपून गेले सर्वही ।।८१।।
महाराजांनी पादुकांची । स्थापना करून पूजेची ।।
व्यवस्था केली नित्याची । एका भक्ता योजिले ।।८२।।
पुण्यातील भोई डॉक्टर । अमरनाथ यात्रेला जात ।।
अमरनाथ यात्रा अवघड असत । घोडा केला डॉक्टरांनी ।।८३।।
उंच डोंगर खोल दरी । प्रवास अवघड असे भारी ।।
सतत काळजी उठे उरी । केव्हा काय होईल ? ।।८४।।
घोड्यावरून प्रवास सुरू होत । अचानक घोड्याचा पाय घसरत ।।
डॉक्टर झाले भयभीत । घोड्यासह घसरले ।।८५।।
घोड्यासह घसरत घसरत । खोल अशा दरीत ।।
डॉक्टर जाऊ लागत । तोच तेथे महाराज ।।८६।।
खोल उतरत्या खड्या दरीत । चालले भोई घोडा घसरत
तिथे नसतानाही प्रगटत । महाराज अचानक ।।८७।।
एका हातात डॉक्टरला । दुस-या हाताने घोड्याला ।।
घट्ट धरले त्या दोघांना । वरती काढले तत्काळी ।।८८।।
रस्त्यावर घोडा उभा केला । घोड्यावर बसविले डॉक्टरला ।।
डॉक्टरचा प्रवास सुरू झाला । गुप्त झाले महाराज ।।८९।।
अचानक आपण कसे पडलो । खोल दरीत कसे कोसळलो ।।
पुन्हा वरती कसे आलो । कळले नाही डॉक्टरला ।।९०।।
महाराजांचे निष्ठावंत । भोई एकनिष्ठ भक्त असत ।।
मनोभावे खूप सेवा करत । मठामध्ये डॉक्टर ।।९१।।
त्यामुळे भोई जेथे जात । तिथे महाराजांचे दर्शन होत ।।
संकटकाळी धावून येत । महाराज स्वत:च ।।९२।।
जसे परम श्रध्दाळू भक्त । महाराजांकडे येत ।।
तसे गर्वाने फुगलेले पंडित । येत असती नेहमी ।।९३।।
कोणी शंका विचारीत । नसते प्रश्न कोणी करत ।।
डावपेच धरून कोणी येत नाना प्रकार लोकांचे ।।९४।।
जो मनुष्य असेल तसा । तसे उत्तर देई त्याला ठोसा ।।
जसा भाव लाभ तसा । येणा-यास मिळतसे ।।९५।।
विद्वत्तेच्या गर्वात । महाराजांस कोणी प्रश्न करत ।।
महाराज खवळून उत्तर देत । इंग्रजीतून लगेच ।।९६।।
उत्तरही अगदी अचूक असे । इंग्रजीही अगदी शुध्द तसे ।।
चकीत होऊन जात असे । विचारणारा गृहस्थ ।।९७।।
महाराज इंग्रजी कोठे शिकले ? । कसे शिकले ? पत्ता नकळे ।।
व्याकरण शुध्द उत्तरे । देऊन इंग्रजीमधून ।।९८।।
अनेक गर्विष्ठ विद्वानांचे । अनेक विचित्र शंकांचे ।।
निरसन करीत खुबीचे । महाराज खात्रीने ।।९९।।
अकलूजचे एक गृहस्थ सोलापूरला महाराजांकडे येत
खाणावळीचा डबा आणून देत । महाराज जेवावे म्हणून ।।१००।।
महाराजांनी जेवावे । आपणा प्रसाद म्हणून काही द्यावे ।।
म्हणून घाईघाईने । आग्रह करू लागला ।।१०१।।
वाट पाहून कंटाळला । रात्री तसाच निघून गेला ।।
रात्री बारा वाजण्याला । भस्मे, महाराजा भरविती ।।१०२।।
दुस-या दिवशी त्या गृहस्थांनी । विनविले अकलूजला या म्हणुनी ।।
महाराज त्याच्यासंगे जाऊनी । जेवण्यासाठी थांबले ।।१०३।।
गृहस्थ जात बाजारात । बायको तांदूळ निवडत ।।
महाराज तिच्या गळ्यात । हात घालून बैसले ।।१०४।।
गृहस्थ येता, पाहिले त्यांनी । पित्त त्यांचे खवळुनी ।।
महाराज आत्ताच जा निघुनी । महाराजांना म्हणाला ।।१०५।।
नेऊन सोड महाराज म्हणत । गृहस्थ महाराजा सोलापूरी आणत ।।
अशी किरकोळ परीक्षा घेत । अर्धवट अशा भक्ताची ।।१०६।।
मुद्दाम भोजना गावी नेले । महाराजांनी नाटक केले ।।
भक्ताचे पितळ उघडे पडले । घेती ऐशी परीक्षा ।।१०७।।
महाराजांचे चरण वंदून । मनोभावे केले वंदन ।।
सातव्या अध्यायाचे लेखन । संपले या ठिकाणी ।।१०८।।
।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज
श्री शंकर महाराज की जय ।।
Search
Search here.