शंकरगीता अध्याय ८ वा

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:39:40
शंकर गीता अध्याय ८ वा नयन पाहून महाराजांचे । झोत पडले प्रकाशाचे दिव्य प्रकाशात चरणांचे । दिव्य दर्शन घेतले ।।१।। दिव्यत्वाचा अखंड झरा । दिव्यत्वाचा मेरू पुरा ।। दिव्यत्वाचा सागर खरा । खरे चरित्र या ओवीत ।।२।। एवढे प्रचंड दिव्यत्व । एवढे प्रचंड कर्तृत्व ।। प्रत्यक्ष महाराजांचे अस्तित्व । दिसत होते कसे ते ? ।।३।। महाराज होते कसे दिसत ? । हेही पाहणे गंमतीचे ठरत ।। यातही लीलाविलास असत । महाराजांचा खुबीने ।।४।। डोक्याचे केस अस्ताव्यस्त । दाढी मिशा वाढलेल्या असत ।। घाण फाटका सदरा अंगात । विजारही तशीच ।।५।। कुणाचेही कसलेही । कपडे घालीत घट्ट, ढिलेही ।। कपड्यांना कसलाच आकार नाही । फक्त देह झाकणे ।।६।। नित्य ते बालभावात असत । पिसाटासारखे हसत ।। हास्याचे प्रकार सप्त असत । हळू-मोठे कसेही ।।७।। हात दोन्ही वाकडे । पायही दोन्ही वाकडे ।। कंबर शरीर वाकडे । अष्टवक्र महाराज ।।८।। चालणे त्यांचे वाकडे असत । त्यांना चालता येत नसत बोलणे त्यांचे बोबडे असत । नीट बोलता येत नसे ।।९।। सिगारेट ओढीत सतत पिवळा हत्ती आवडत ।। पाचशे पंचावन्नचे पाकीट । शेकडो सिगारेट प्रतिदिन ।।१०।। अस्सल मद्य विदेशी नित्य । बाटल्यांच्या बाटल्या पीत ।। पान-तंबाखूही खात । अनेकदा दररोज ।।११।। सिगारेट जेव्हा ओढत । राख अंगावर कुठेही पडत ।। बाटल्या मद्यांच्या असता पीत । मद्य अंगावर गळे ।।१२।। पान तंबाखू ते खात । लाळ कपड्यावरती गळत ।। स्वहस्ते जेवताही न येत । अन्न अंगावर पडे ।।१३।। त्यांना भरवावे लागत । भरवणारा असल्यास जेवत ।। सोलापुरी भस्मे भरवीत । आनंदाने महाराजा ।।१४।। नजर तारवटलेली दिसत । मद्यांच्या बाटल्या जवळ असत ।। सिगारेट पाकीटे समीप असत । पान तंबाखू असेच ।।१५।। रूप ऐसे अजागळ । शरीर दिसे अमंगळ ।। बावळट वाटावे केवळ । ऐसे महाराज वर्णन ।।१६।। हे जे वर्णन झाले असत । त्यास लेखणी तयार नसत ।। प्रत्येक शद्वास लेखणी अडत । ऐसे कैसे लिहावे ? ।।१७।। भक्त खवळतील वाचून । ऐसे कैसे लिहिले म्हणून ।। त्यांना वाटेल सत्य वर्णन । ज्यांनी पाहिले महाराजा ।।१८।। म्हणून हा भाग गाळावा ठरविले । परी महाराज उद्गारले ।। याच अध्यायात हे पाहिजे आले । दिव्य प्रचिती दिलीही ।।१९।। समर्थातही जे पाहिले । असमर्थातही जे पाहिले ।। दोन्ही ठिकाणी असणे पहिले । हेच त्यांचे वैशिष्ट्य ।।२०।। हा बोध या वर्णनातून । स्पष्टपणे येतो दिसून ।। हाच हेतू या वर्णनाचा असून । म्हणून वर्णन घडविले ।।२१।। बरोबर कुणी असल्याविना । चालता येत नसे महाराजांना सिगारेट मद्य तंबाखू त्यांना । देण्या मनुष्य हवाच ।।२२।। जेव्हा महाराज सोलापुरात । भस्मे पान कुटून देत ।। महाराजांना भरवीत । भक्तिभावे प्रेमाने ।।२३।। महाराजांचे प्रेम फार । भक्त भस्मे यांच्यावर ।। भस्मे यांची महाराजांवर । निष्ठा खोल अपार ।।२४।। अजानबाहू महाराज असत । दोन डोळे तीक्ष्ण असत ।। जणू दोन हिरेच चमकत । चंद्र - सूर्य रूपाने ।।२५।। महाराज बोबडे बोलत । शब्द नीट न उलगडत ।। ऐकणारास बोध न होत । काय बोलले, न कळे ।।२६।। परी महाराज जे बोलत । काळही ते बदलू न शकत ।। बोलल्याप्रमाणेच घडून येत । वाचासिध्दी होतीच ।।२७।। कधी भरजरी बांधीत फेटा । रत्न सुवर्णांचा गळ्यांत कंठा ।। सदरा रेशमी भारी मोठा । ऐटीत रहात ।।२८।। सर्व बोटात अंगठ्या असत । सुवर्णांच्या रत्नजडीत ।। चौकोनी पवित्रक बोटात । चमकदार अंगठ्या ।।२९।। चहाचा शोक त्यांना भारी । चहा होई घरोघरी ।। स्वत:ही चहा करून । अनेक वेळा घेत ते ।।३०।। खिचडी मटार घातलेली । कांद्यांची भजी तळलेली ।। आवड या वस्तूंवर सगळी । महाराजांची होतीच ।।३१।। एकादशी दिवशीही । खुशीत कांदे खात राही ।। निषिध्द त्यांना काहीच नाही । ऐसे अपूर्व महाराज ।।३२।। भजनाची त्यांना आवड असत । संगीत भजन मुद्दाम ऐकत ।। स्वत: रागदारीत गात । नाचत असती गातांना ।।३३।। महाराज जेव्हा नाचत भक्तांस विविध दर्शने होत ।। विविध देवांची साक्षात । धन्यता वाटे भक्तांना ।।३४।। महाराज जेव्हा कुठे येत । आल्यावर ‘मी आलो’ म्हणत महाराज ऐसे जेव्हा म्हणत । धन्य भक्त होतसे ।।३५।। महाराज अगदी निर्भय असत । रात्री अपरात्रीही न भीत ।। कधी कशाचे कुणाचे भय नसत । भीती कसली ? न ठाऊक ।।३६।। निर्मळ भाव निर्मळ मन । लोकांच्या अडचणी जाणून ।। संकटात अचानक धावून । वाचविले भक्तांना ।।३७।। बाल, पिशाच्च, उन्मत्त । अशा अनेक आविर्भावात ।। प्रखर राजयोगी असत । धनाढ्य गर्भश्रीमंत ।।३८।। प्रत्यक्ष परब्रह्म साक्षात । महाराजांच्या रूपात नांदत ।। अध्यात्मज्ञानाचे योगेश्वर असत । सुख शांतीचा सागर ।।३९।। मुंबईचे वासुदेव बांबोर्डीकर । यांचे पोट दुखत फार ।। ठरले ऑपरेशन होणार । रात्रीच ठणका लागला ।।४०।। एकटेच होते घरात । दु:खाने झाले अती त्रस्त ।। कोणी रात्री पाठ दाबत । दुखणे बंद जाहले ।।४१।। घरात तर कोणी नाही । तोच आवाज ऐकू येई ।। तू ऑपरेशन करून घेई । बरा होशील निश्चित ।।४२।। आवाज महाराजांचा ओळखत । महाराजच पाठ दाबत कळत ।। पुढे ऑपरेशन सुरू होत । महाराज तेथे आलेच ।।४३।। वासुदेवाच्या आईस वदत । महाराज तिला धीर देत ।। ऑपरेशन यशस्वी होत । नऊ डिसेंबर तारीख ।।४४।। पुढे ब-याच दिवसानंतर येत । महाराज वासुदेवास म्हणत ।। डॉक्टर तुज इंजेक्शन देत । डाव्या हातावरी ते ।।४५।। नऊ डिसेंबर तारीख असत । ऑपरेशन तूझे होत ।। ऐसे विचारून सदरा काढत । हात आपला दाखविला ।।४६।। महाराजांच्या हातावर । त्याच ठिकाणी बरोबर ।। ऑपरेशनच्या खूणा सर्व तर । स्पष्ट दिसू लागल्या ।।४७।। क्लेश स्वत: स्वीकारले । वासुदेवास बरे केले महाराजांचे उपकार आठवले । वासुदेव थक्क होई ।।४८।। महाराज आपल्या भक्तास । अखंड भगवन्नाम घेण्यास ।। आवर्जून सांगत या व्रतास । नाममहीमा अगाध ।।४९।। महाराज अखंड नामस्मरणात । तल्लीन ध्यानमग्न असत ।। त्यांची परावाणी कार्यरत । अखंड जागृत असेच ।।५०।। महाराज शिष्यांना सांगत । माझे सदगुरू विख्यात ।। अक्कलकोटस्वामी समर्थ असत । स्मरा त्यांना प्रतिदिन ।।५१।। हीच माझी खरी भक्ती पहा । स्वामी समर्थांचे स्मरण करता ।। मी झालो की आलो म्हणून समजा । अगदी तृप्त प्रसन्न ।।५२।। महाराजांचे अत्यंत । प्रेम दोन ग्रंथावर असत ।। दोन्ही ग्रंथ मुखोद्गत । उलटसुलटही म्हणत ।।५३।। कोणती ओवी कोणत्या पानावर । महाराज सांगत सत्वर ।। समर्थांचा दासबोध सुंदर । ज्ञानेश्वरी माऊली ।।५४।। दोन्ही ग्रंथ हे वाचावेत । त्यांची पारायणे करावीत ।। बहुमोल हे ग्रंथ आहेत । महाराज सर्वां सांगत ।।५५।। एकोणीसशे पस्तीस साली । महाराज एका भक्तास म्हणती ।। शंभरी माझी उलटली । वय किती हे सांगितले ।।५६।। एकोणीसशे पस्तिसात । शंभर वर्षे पूर्ण होत ।। यावरून त्यांचे वय कळत । आज किती असावे ? ।।५७।। असंख्यांना महाराजांनी । आपल्या कृपाकटाक्षांनी ।। ईश्वरी साक्षात्कार दिला करुनी । आपल्या अध्यात्मबळावर ।।५८।। ‘महाराजांवर संस्कार काही न झाले । कधी शाळेतही न गेले ।। महाराज कधीही न शिकले । कोण त्यांना शिकवील ?’ ।।५९।। अक्कलकोट, गाणगापूर । वाडी, औंदूबर, सोलापूर ।। या ठिकाणचा ओढा फार । जात, मनसोक्त राहात ।।६०।। गावोगावी महाराजांनी । संत - देवांचे उत्सव सुरू करुनी भजने - प्रवचने - कीर्तने । जयघोष चाले नामाचा ।।६१।। पारायणे अन्नदान । गाव जाई रंगून ।। पारमार्थिक वातावरण । लोकां सत्प्रवृत्त करीत ।।६२।। पुण्याचे आण्णा काळे भक्त । एकदा महाराज घरी येत ।। संकष्टीचा तो दिवस असत । बायकोचे अत्यंत सोवळे ।।६३।। बायको म्हणे आज पूजा न होणार । महाराज अभक्ष मागवणार ।। महाराज म्हणाले सत्वर । लावा, हमकू जाना है ।।६४।। आण्णांनी दारूची बाटली । विकत आणून त्यांना दिली ।। महाराजांनी प्रशस्त ढोसली । दारू ग्लासामधूनी ।।६५।। आज संकष्टीचे व्रत बुडाले । अभद्र आज घरात आले ।। शुचिर्भूत होणे भाग पडले । बायको बाहेर पहात ।।६६।। महाराज बसले खोलीत । दूध दिसे दारूच्या बाटलीत ।। ग्लासातून महाराज दूध पीत । दूध झाले मद्याचे ।।६७।। दोघे झाले अगदी चकित । संकष्टीस प्रत्यक्ष गणेश येत ।। आणि दूध पिऊन जात । कळले नाही दोघांना ।।६८।। एक श्रीमंत गृहस्थ असत । त्यांना श्रीमंतीचा गर्व होत ।। ते शर्ट शिवून देत । चायना सिल्कचा महाराजांना ।।६९।। श्रीमंतास महाराज म्हणत । घाल माझ्या अंगात ।। महाराजांचे हात वाकडे असत । शर्ट काही जाईना ।।७०।। कसाबसा शर्ट गेला । श्रीमंताने हार घातला ।। महाराज म्हणाले सर्वांना । ‘कसा दिसतो आता मी ?’ ।।७१।। मसाला पान मागितले । महाराज पान चघळू लागले ।। मुखरस, पान चघळलेले । गळू लागले शर्टावर ।।७२।। महाराज दोन्ही बाह्यांनी सतत । मुख आपले पुशीत ।। शर्ट लाल रंगानी भरत । लालभडक जाहला ।।७३।। विडा खाऊन झाल्यावर । महाराज उठले सत्वर दोन्ही हात केले वर । शर्ट काढू लागले ।।७४।। शर्ट काढताना अंगातून । शर्ट गेला फाटून ।। पाण्यातील ढेकळासमान । थिजून गेला श्रीमंत ।।७५।। त्याचा घालविण्या अहंकार । महाराजांनी नाटक सुंदर ।। मुद्दामच केले वेळेवर । अहंकार भोवला ।।७६।। मिरीचे जहागीरदार सरदार । नानासाहेब मिरीकर ।। महाराजांचे भक्तवर । ज्ञानेश्वरी सांगत ।।७७।। उत्तम ज्ञानेश्वरी ते सांगत । म्हणून श्रोत्यांची गर्दी होत ।। महाराजही ऐकण्या बसत । नवल एकदा जाहले ।।७८।। ऐकत असता महाराजांनी । भक्त निसाळांना खूणावूनी ।। निसाळांनी बाटली आणूनी । त्यांच्यापुढे ठेवली ।।७९।। ‘आणखी एक आण’ म्हणती । दुसरी बाटली निसाळ आणती ।। दोन्ही बाटल्या तोंडास लावती । एका दमात संपविल्या ।।८०।। दोन्ही बाटल्या रिचविल्यावर । महाराज म्हणाले अरे मिरीकर ।। तुला ज्ञानेश्वरी काय कळणार ? । आण इकडे मी सांगतो ।।८१।। एका ओवीचे महाराजांनी । मोजून पन्नास अर्थ करूनी ।। सांगितले मोठ्या कौशल्यानी । स्तब्ध श्रोते जाहले ।।८२।। ज्ञानेश्वरीबद्दल फार । महाराज काढीत धन्योदगार ।। ज्ञानेश्वरीचे कर्ते ज्ञानेश्वर । म्हणून नाव ते पडलेच ।।८३।। या ग्रंथाचे खरे नाव असत । ‘भावार्थ दीपिका’ मुळात ।। माऊली जे बोलली असत । ते परावस्थेतून बोलली ।।८४।। वैखरी येथे थांबते । वाचा जेथे विसंबते ।। अशा अत्यंत प्रेममय अवस्थेमध्ये । माऊली ती असतांना ।।८५।। सरस्वतीने साक्षात । त्या प्रेममय अवस्थेच्या गंगौघात ।। स्नान करून प्रशस्त । झाली शब्दरूप अवस्था ।।८६।। शब्दरूप अवस्था धारण करून । ती माऊलीच्या मुखातून ।। बिंदूऐवजी सिंधू होऊन । बाहेर पडली तेजाने ।।८७।। ती भावार्थपदी पोचली । आणि हाच भाव पुढेही ।। सर्व संताना दीपिकेसम होऊनी । मार्गदर्शक झालाच ।।८८।। म्हणून या ग्रंथाप्रत । भावार्थ दीपिका म्हणतात ।। ऐशी नामकरण मीमांसा सांगत । महाराज या ग्रंथाची ।।८९।। पुण्यातील एका भक्ताकडे । महाराज त्याच्या घरी गेले ।। ‘ये हटाव और खुदाई करो’ । महाराज त्याला म्हणाले ।।९०।। सर्व भावंडे त्या भक्तास । अगदी मुर्खात काढत ।। जे हटविण्या महाराज सांगत । टोपलीचा संडास होता तो ।।९१।। विरोध भावंडाचा झुगारूनी । गुर्वाज्ञा शिरसांवद्य मानुनी ।। संडास हलविणे, सुरू केले त्यांनी । दुर्गधीं त्रास सोसला ।।९२।। पुढे भक्तास त्याच ठिकाणी । सुवर्ण वर्खाची गणेशमूर्ती ।। सापडली, आश्चर्य असूनी । अर्थ, महाराज वदण्यात ।।९३।। सोलापूरचे वकील भक्त । महाराज त्यांच्या घरी जात ।। महाराज विश्रांती घेत । माळ्यावरती जाऊनी ।।९४।। जाताना सांगितले सर्वांना । माळ्यावर माझ्या आज्ञेविना ।। येऊ नये ताकीद सकलांना । महाराजांनी केलीच ।।९५।। परी वकील शिडीवरून । महाराजा पाहण्या गेले चढून ।। विलक्षण दृश्य पाहून । चकीत झाले वकील ।।९६।। महाराजांचे पाय एका खुंटीवर । दुसरा पाय दुस-या खुंटीवर ।। डोके कोनाड्यात तर । अवयव विविध ठिकाणी ।।९७।। महाराज उच्च कोटीतील । महान योगी आहेत ।। याची पुढे साक्ष पटत । वकीलमहाशयांना ।।९८।। जादूगार रघुवीर रशियात । होते मॉस्को शहरात ।। तेथे शंकरमहाराज असत । दिवस कडक हिवाळा ।।९९।। सर्वत्र बर्फ पडत । लोक कोटावर कोट घालत ।। महाराज साध्या वेषात । शहरभर हिंडत ।।१००।। प्रत्येक माणूस मॉस्कोत । महाराजांस ओळखीत ।। गरम कपडा न थंडीत । लोक चकित होतात ।।१०१।। पुण्यात महाराज म्हणाले । मान याचे तिकिट आहे फाटले ।। त्या टी.व्ही. वर पाहिजे आणिले । झळकले माने टी.व्ही.त ।।१०२।। चेहरे आणि मुखवटे सदरात । मानेंची मुलाखत होत ।। पुढे ते इहलोक सोडत । तिकिट फाटले होते ना ? ।।१०३।। महाराज चालले टांग्यात । बरोबर काही होते भक्त ।। अगदी म्लान असे दिसत । टांगेवाल्याचा चेहरा ।।१०४।। महाराज टांगेवाल्याला । सांगती तेरा आकडा लावण्याला ।। तैसे करता टांगेवाल्याला । भरपूर पैसा मिळाला ।।१०५।। इतर भक्तांनीही तसेच केले । परी त्यांना पैसे न मिळाले ।। महाराज सर्वांना म्हणाले । पैसे तुम्हास कशाला ? ।।१०६।। टांगेवाल्याची बायको आजारी । तया पैशाची अत्यंत जरूरी ।। चंगळ करावी खरोखरी । पैसा तुम्हा हवा ना ? ।।१०७।। सतत महाराजांना आठवून । आठवूनी वंदन करून ।। आठवणीत राहील असा छान । आठवा अध्याय संपला ।।१०८।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.