शंकरगीता अध्याय ९ वा

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:35:40
शंकर गीता अध्याय ९ वा दोन्ही चरणांवर करांची मिठी । प्रति बोटात झळके अंगठी वंदुनी जयघोष ओठी । महाराजांचा केला मी ।।१।। मस्तक ठेविता चरणांवर । महाराजानी आपला कर ।। फिरविला माझ्या डोक्यावर । प्रसन्नतेची पावती ।।२।। महाराज बघती प्रसन्न होऊन । आठवा अध्याय झाला छान ।। दोन्ही प्रकारचे गुणगान । छान केले म्हणाले ।।३।। मजला भिती वाटत होती । कोठे भक्त रागावती ? ।। महाराज जेथे संतुष्ट होती । भिती कसली मग मजला ? ।।४।। गोकुळाष्टमीच्या उत्सवात । महाराज अचानक हजर होत ।। सर्वांस लिमलेटच्या गोळ्या देत । जणू प्रसाद म्हणूनी ।।५।। निर्मला गुप्ते यांना गोळी । अगदी सुंठवड्यासारखी लागली ।। प्रत्यक्ष कृष्णाने गोळी दिली । त्यांचा भाव पाहून ।।६।। सोमवती आमावस्या दिनी । महाराज आले जेजुरीहूनी ।। वासुदेव पंडीत सदनी । गादीवरती बैसले ।।७।। महाराजांच्या शरिरातून । बघता बघता महान ।। शिवपिंड झाली निर्माण । मी कोण ? त्यांनी सांगितले ।।८।। अक्कलकोट स्वामी समर्थ । ठेवीत छोटे शिवलिंग सुंदर शंकर महाराजांच्या जिभेवर । अभिषेक करत त्यावर ।।९।। स्वत: अक्कलकोट स्वामी समर्थ । तासन् तास अभिषेक करत ।। शंकर महाराज स्तब्ध असत । अभिषेक चालू असताना ।।१०।। शंकर महाराज भावास्थेत । अखंड भावसमाधी लागत ।। अगदी ध्यानमग्न अवस्थेत । रममाण होऊन जायचे ।।११।। अक्कलकोट स्वामी महाराज । आणि शंकर महाराज ।। यांच्यातील घटनेचा हा साज । दिव्य आध्यात्मिक असे ।।१२।। म्हणून महाराज आपल्या अत्यंत । प्रिय भक्तास जीभ दाखवत ।। जीभ हाताने बाहेर ओढीत । खुणावीत पाहण्या ।।१३।। कुणा नुसता फुगवटा दिसे । कुणा लिमलेट गोळी भासे ।। जिभेवर शिवलिंग दिसे । अगदी आत असे हे ।।१४।। महाराजांनी या घटनेमुळे । कोडे एक सोडविले ।। जिभेवर शिवलिंग स्थापिले । बोलता कैसे येईल ? ।।१५।। तोंडात सुपारी विंâवा गोळी । आपण थोडी जरी टाकली ।। बोलता येत नसे मुळी । स्वानुभव हा नित्याचा ।।१६।। जिभेवर ज्यांच्या शिवलिंग । समर्थांनी केले स्थापन ।। बोलता त्यांना कसे येईल ? । अगदी स्पष्ट असे हे ।।१७।। प्रश्न उद्भवतो यावर । शिवलिंग ज्यांच्या जिभेवर ।। त्यांची वाणी पवित्र सुंदर । प्रभावी उध्दारक अती ।।१८।। ऐसे असता बोलण्या न येत । विचित्र सारेच वाटत ।। प्रश्न खवचट जरी असत । तरीही अगदी योग्यच ।।१९।। महाराजांस स्वमुखातून । बोलणे अवघड मुळीच नसून ।। अनेकांच्या मुखातून । बोलणे कल्याणकारक ।।२०।। नुसत्या कृपादृष्टीने पाहताना । वक्ते बनविले अनेकांना ।। जे सांगावयाचे महाराजांना । वदले वक्त्यामुखातून ।।२१।। असे जरी पहात असत । कैक घटना अशा घडत महाराज स्पष्ट खणखणीत । निर्भीड अगदी बोलत ।।२२।। जाता शिवदर्शना शिवमंदिरात । तीर्थाचा चिखल कसा ? ।। शिवदर्शन बाजूलाच रहात । ऐसे चिकित्सक असतात ।।२३।। अक्कलकोट स्वामी समर्थांस । ‘मालक’ असे म्हणत ।। समर्थांच्या समाधीसमोर । सिगारेट कधी न ओढत ।।२४।। स्टेशनवर महाराज जात । ‘दारूड्या वेडगळ’ हमाल म्हणत ।। महाराज हमालास सांगत । ‘उचल जरा मज पाहू’ ।।२५।। अगदी लावून सर्व ताकद । हमाल महाराजांस उचलत ।। महाराज मुळीही उचलले न जात । पाय धरी हमाल ।।२६।। हाताशिवाय झंझावातात । न विझता काडी पेटवत ।। खाली वर ओठातोंडात । सिगारेट फिरविती ।।२७।। हनुमान जयंतीचा दिवस असत । महाराज हनुमंताच्या रूपात ।। एका भक्तास दर्शन देत । इच्छा त्याची पुरवली ।।२८।। महाराज अजब चमत्कार करत । लोक सारे दिपून जात ।। या चमत्काराबाबत । त्यांना लोक विचारती ।।२९।। महाराज लोकासं सांगत । चमत्कार नव्हेत ।। हे कौतुक झालेले असत । भगवंताकडून भक्तांचे ।।३०।। महाराज नेहमी म्हणत । अक्कलकोट महाराजांच्या सान्निध्यात ।। मी असतांना, स्वामी समर्थ । मला फार जपायचे ।।३१।। आपल्या अंगावरचे दूध । स्वामी समर्थांनी मज पाजले असत ।। त्यामुळे स्वामी समर्थ । माझी आई आहेत ।।३२।। अध्यात्मसाधना अध्यात्मात । स्वामी समर्थ मज शिकवत ।। अध्यात्मविद्येत पारंगत । त्यांनीच मला करुनी ।।३३।। सत्रावीचे स्तनपान । करावयाला शिकवून ।। आत्मज्ञानाचे दुग्धपान । अगदी अमृतमय असे ।।३४।। हे अमृतमय दुग्धपान । करावयाला शिकवले म्हणून ती माझी माऊली होत । महाराज असे सांगत ।।३५।। अक्कलकोट महाराज समर्थ स्वामी । महाराजांच्या माऊली ।। महाराजांच्या गुरूमाऊलीही । दोन संबंध असे हे ।।३६।। म्हणूनीच महाराजांचे बोल । स्वामी समर्थांना जो भजेल ।। तोच मजला प्रिय होईल । भेटेन त्याला सदा मी ।।३७।। कधी महाराज स्वत: ब्रॅन्डी पीत । ज्यांना या घटनेचा तिटकारा वाटत ।। त्यांना ब्रॅन्डीची नशा चढत । कैक प्रसंग असेही ।।३८।। ओंकारनाथ व्यंकटेश भस्मे । रामभाऊ कोराड मास्तर हे ।। एकनिष्ठ भक्त महाराजांचे । भक्तद्वयांनी ठरविले ।।३९।। सोलापूरी जक्कलच्या मळ्यात छोटेसे दत्तमंदिर बांधून ।। महाराजांच्या पादुका स्थापून । व्दितीय पुण्यतिथी ठरविली ।। ।।४०।। मंदिरास रंग लावण्याचे काम । पेंटर कडलासकर करत एकोणीसशे एकोणपन्नासात । दत्तमंदिरामध्ये या ।। ।।४१।। महाराजांच्या पादुका दिव्य असत । स्थापना मंदिर बांधून होत महाराजांची व्दितीय । पुण्यतिथी करणे संकल्प ।।४२।। कडलासकर रंग लावत । मध्यरात्र उलटून जात ।। रंग आला संपत । अजून गाभारा तसाच ।।४३।। उद्याच पुण्यतिथी असत । अडचण मोठीच पडत ।। रंग मिळण्याची वेळ नसत । कोंडी कशी ? किती हो ? ।।४४।। महाराजांचे नाव घेत । पेंटर तसाच रंग देत ।। आणि काय आश्चर्य घडत । रंगवून झाले मंदिर ।।४५।। ज्यांनी पाहिले महाराजांना । सहवास त्यांचा घडला ज्यांना ।। महाराजांवर पुस्तके निघाली नाना । त्यांचे भक्त - शिष्य जे ।।४६।। या सर्वांच्या आधारावरून । महाराजांचे वर्णन ।। पाहिले, परी या सर्वाहून । पुस्तक एक वेगळे ।।४७।। आङग्लविद्याविभूषित । घरी लक्ष्मी गजान्त मोठा सरकारी अधिकारी असत । पक्का नास्तिक संपूर्ण ।।४८।। टोवर्डस् दि सिल्व्हर क्रेस्ट ऑफ हिमालयाज । त्यांनी पुस्तक लिहिले ।। माधव प्रधान नाव त्यांचे । महाराजांवर लिहिलेच ।।४९।। महाराज या पुस्तकात । अगदी आगळे वेगळे असत ।। पंडित वक्ते निष्णात । विचारवंत नि:स्पृह ।।५०।। महाराज जेथे जात असत । प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखीत ।। दर्शनास सारा गाव जमत । प्रत्येक गावी प्रवचने ।।५१।। अगाध महाराजांचे ज्ञान । रंगून जाई व्याख्यान ।। लोक विचारीत नाना प्रश्न । उत्तरे देत समर्पक ।।५२।। महाराजांच्या प्रवचनाची । पध्दत अद्ययावत पध्दतीची ।। अगदी वेगळीच सांगण्याची । खुबी त्यांची प्रभावी ।।५३।। रूढी भावना ज्या सांभाळल्या । सा-याच त्यांनी ऊखडून दिल्या ।। नूतन विचारांना चालना दिल्या । ऐसे कौशल्य महान ।।५४।। दारू सिगारेट तंबाखू पान । यांचे कुठेच नसे वर्णन ।। महाराजांचे कुठे नावही न । गुरूदेव ऐसा उल्लेख ।।५५।। प्रधानांचे घर संपूर्ण । अगदी सुधारक असून ।। भारतीय संस्कारविहीन । ऐसे प्रधान स्वयमेव ।।५६।। देव धर्म सत्पुरूष संत । तिटकारा यांचा अत्यंत ।। ऐशा प्रधानास सत्यवंत । महाराजांनी बनविले ।।५७।। पूर्ण नास्तिक ज्याची बुध्दी । त्याला शिकवली निर्विकल्पसमाधी ।। प्रचंड लौकिक अती उपाधी । बडे सरकारी अधिकारी ।।५८।। आशा प्रधानांना महाराजांनी । परमार्थात योग्यता संपादूनी ।। हिमालयात ठेविले नेऊनी । सर्व पाश सोडून ।५९।। प्रधान खरोखरीच भाग्यवान । नशीब त्यांचे प्रधान ।। भेटता महाराज भगवान । गुरूदेवरूप बनलेच ।।६०।। त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग । ऐकता कुणीही होईल दंग ऐशी महाराजांची कृपा अभंग । प्रधानांवर अपार ।।६१।। हातावर पाण्याचा थेंब पडला । त्या थेंबाचाच सागर झाला ।। असाच प्रधानांचा प्रकार घडला । महाराजांच्या कृपेने ।।६२।। प्रधानांचे अनुभव प्रचंड । महाराजांची कृपा उदंड ।। अनुभव ऐकता लोखंड । सुवर्ण होऊन जाईल ।।६३।। महाराज समाधीस्त होत । कळता समाधीजवळ प्रधान असत ।। महाराज समाधीतून प्रगटत । भेट दोघांची जाहली ।।६४।। सन एकोणीसशे बेचाळीसात । सासवड शुगर फॅक्टरीत ।। मॅनेजिंग डायरेक्टर असत । सेक्रेटरी प्रधान ।।६५।। प्रधान मुंबईस जाण्या निघत । बैलगाडीतून महाराज येत ।। दोघांची दृष्टादृष्ट होत । प्रधान ढुंकूनही न पहात ।।६६।। नदीवर तेव्हा पूल नव्हता । पाऊस सारखा पडत होता ।। भिजत राहण्याशिवाय नव्हता । मार्ग प्रधानांना तो ।।६७।। प्रधान रात्रभर भिजत । सणसणून त्यांना ताप चढत ।। सकाळी परत बंगल्यात येत । बिछान्यावर झोपत ।।६८।। तेवढ्यात हसण्याचा आवाज येत । प्रधान डोळे उघडत ।। महाराज समोर उभे दिसत । प्रधानांना म्हणाले ।।६९।। का रे, मुंबईला जाण्याची । तुजला होती ना घाई ।। काय झाले मग ? ऐसे म्हणूनी । ते अंतर्धान जाहले ।।७०।। प्रधानांचा ताप उतरला । महाराज म्हणाले एका गोसाव्याला ।। अक्कलकोट स्वामी समर्थांचा । अंगारा टाक प्रधानमुखी ।।७१।। प्रधानांच्या मुखात । गोसावी अंगारा घालत ।। प्रधान अगदी अचेतन होत । लाकडासारखे निश्चल ।।७२।। प्रधानास समाधी लागल । प्रधान शरीराबाहेर पडत ।। विहार नक्षत्रांकित आकाशात । सुमधुर नाद सुगंध ।।७३।। याचा घेत आस्वाद । सात तास समाधी अवस्थेत प्रधान जेव्हा डोळे उघडत । प्रत्यक्ष महाराज समोर ।।७४।। प्रधान नमस्कार करून म्हणत । आपल्या सामथ्र्यांची कल्पना नसत ।। तुम्हीच माझे गुरू असत । आजपासून, गुरूदेव ।।७५।। अशा रितीने प्रधानांची । आणि शंकरमहाराजांची ।। गाठ पडली सहजची । पक्की होत गेलीच ।।७६।। एकदा प्रधान नॉर्वेहून । जर्मनीस चालले विमानातून ।। अचानक विमानात बिघाड होऊन । प्राणावरी बेतले ।।७७। विमान चालवणा-या पायलटलाही । बिघाड कसा झाला कळले नाही ।। विमानातील सर्व उतारूनीही । अशा सोडली प्राणांची ।।७८।। महाराजांचे स्मरण । करू लागले प्रधान ।। केवढे आश्चर्य महान । विमान सुरक्षित उतरले ।।७९।। भेट होता महाराज म्हणत । त्या दिवशी तू विमानात ।। एवढा का घाबरत । तेव्हा प्रधान म्हणाले ।।८०।। ‘महाराज तुम्हास काय माहिती ?’ । महाराज प्रधानास म्हणत ।। तुझ्या शेजारीच मी बसलो असत । मीच अपघात टाळला ।।८१।। प्रधान इंग्लंडला असत । त्यांचे वडील वारले भारतात ।। शेवटची भेट होऊ शकली नसत । दु:ख याचे प्रधाना ।।८२।। महाराज उभे प्रधानासमोर । प्रधान, महाराजांच्या मांडीवर ।। डोके ठेवून रडले फार । सांत्वन करती महाराज ।।८३।। महाराज प्रधानांना घेऊन । गिरनार पर्वतावर जाऊन ।। मच्छिंद्र, गोरक्षांचे दर्शन । प्रधानांना घडविले ।।८४।। नंतर प्रधानांना दिसले दोन श्वान । प्रगटले दत्तात्रेय भगवान ।। प्रधानांनी घेतले दर्शन । तेव्हा शांत प्रधान हो ।।८५।। ही दिव्य दर्शने महान असूनी । प्रत्यक्ष घडविली महाराजांनी ।। एकदा महाराजांस प्रधानांनी । प्रश्न एक विचारला ।।८६।। कुरूक्षेत्रावर युध्दात । अर्जुनास श्रीकृष्ण गीता सांगत हे माझ्या बुध्दीला न पटत । प्रधानास बघती महाराज ।।८७।। प्रधानास समाधी लागत । कुरूक्षेत्राचा स्पष्ट देखावा दिसत ।। कौरव - पांडव युध्द सूरू असत । कृष्णार्जूनही दिसलेच ।।८८।। युध्द तर चालूच असत । अर्जून सारखे बाण सोडीत ।। श्रीकृष्ण घोडे हाकीत । श्रीकृष्ण गीता सांगतसे ।।८९।। श्रीकृष्ण गीता सांगत असत । ध्यान लावून अर्जून ऐकत ।। प्रधानही ऐकून होत चकित । स्पष्ट पाहिले ऐकिले ।।९०।। प्रधान श्रीकृष्णाकडे पहात । तेथे त्यांना महाराज दिसत ।। इकडे समाधी उतरत । तीन तासांची समाधी ।।९१।। डोळे उघडती प्रधान । महाराजांचे धरले चरण ।। प्रत्यक्ष पाहिले ऐकिले, तास तीन । निवदन केले संपूर्ण ।।९२।। एकदा महाराज आले खूषीत । प्रधानास निश्चयाने म्हणत ।। माग तूला हवे जे वाटत । आज आहे देणार ।।९३।। प्रधान म्हणाले पहा बरे । मी मागितल्यावर, अन्य दुसरे ।। आगळे वेगळे वाटेल ते सारे । माग ऐसे म्हणाल ।।९४।। मी देईन ऐसे म्हटल्यावर । निश्चित अगदी देणार ।। प्रधान म्हणाले यावर । ‘महाराज मला ज्ञान द्या’ ।।९५।। महाराज एकदम ओरडले त्यावर । माझ्या लंगोटीलाच तू तर ।। बेटा, हात घातलास की रे सत्वर । हरकत नाही, तथास्तू ।।९६।। ज्ञानेश्वर माऊली सोपानदेव । यांच्या दर्शन घेण्यास्तव ।। प्रधान गेले धरून भाव । ‘अल्लख’ प्रधान म्हणाले ।।९७।। अल्लख ऐसे पुकारता क्षणी । प्रत्यक्ष प्रगटून दोघांनी ।। दिव्य दर्शने देऊनी । धन्य कले प्रधानांना ।।९८।। मातोश्रींच्या आग्रहावरूनी । दत्तांचे प्रत्यक्ष दर्शन घडवुनी ।। तिला धन्य केले प्रधानांनी । इच्छा तिची पुरविली ।।९९।। चेट्टियार मद्रासचे उद्योगपती । त्यांच्या घरी महाराज जाती ।। लोक दर्शनास प्रचंड जमती । सर्प निघाला बागेत ।।१००।। महाराज झाडाजवळ जात । ओठाने मधुर शीळ घालत ।। सर्पराज सळसळ करत येत । विळखा घातला पायाला ।।१०१।। महाराज त्याला हातात धरत । सर्पराज महाराजासं अवलोकत ।। नंतर तो विळखा घालत । महाराजांच्या गळ्यास ।।१०२।। महाराजांच्या डोक्यावरती । फणा काढून सर्पराज डोलती ।। लोक घाबरून स्तब्ध होती । अरण्यात गेले महाराज ।।१०३।। एका झाडाजवळ जाऊन । नागास तेथे सोडून ।। ‘कुणा चावू नकोस निष्कारण’ । फणा काढून मान्य करी ।।१०४।। चरणे महाराजांची देखून । दोन्ही चरणांवर फणा टेकवून ।। फणा आनंदाने डोलवून । सर्प गेला झूडूपात ।।१०५।। झूडूपावर फणा काढली । कर्णमधूर शीळ त्याने घातली ।। महाराजांनी शीळ जी वाजवली । तिला उत्तर नागाचे ।।१०६।। सर्पाने महाराजांस ओळखले । डोक्यावर फणा काढून सुचविले ।। हे प्रत्यक्ष शंकर नाथ भोले । पाहून कळले कुणा ना ।।१०७।। प्रत्यक्ष उभे महाराज । गळ्यात त्यांच्या सर्पराज ।। नमून, नववा अध्यायसाज । पूर्ण येथे जाहला ।।१०८।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.