शंकरगीता अध्याय १० वा

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:32:07
शंकर गीता अध्याय १० वा दिव्य तेजात महाराज दिसत । रूद्राक्षांच्या माळा रूळत गळ्यात सर्पराज सळसळत । वंदन केले साष्टांग ।।१।। महाराज मजकडे पहात । सर्पराजही मज अवलोकत ।। दोघांच्याही दृष्टीत । दिसला आशीर्वाद मज ।।२।। आण्णासाहेब थोरात । यांना साईबाबांच्या रूपात ।। महाराज नगरला दर्शन देत । धन्यता त्यांना वाटली ।।३।। महाराजांच्या फोटोस । आण्णा सातपुते नैवेद्य दाखवित ।। जेव्हा नैवेद्याची शिते चिकटत । महाराजांच्या मुखास ।।४।। तेव्हाच सातपुते जेवत । समाधीनंतरची ही कथा असत ।। आपणहोऊन शिते चिकटत । भाव जैसा तो पावे ।।५।। पानसरे समाधीमठात राहत । दृष्टान्तात महाराज त्यांना म्हणत ।। समाधीजवळ एक विवर असत । त्यातून आत येई तू ।।६।। माझा डोक्याला समाधीत । एक वीट आहे लागत ।। ती करावी व्यवस्थित विवरातून परत जा ।।७।। बुजवू नकोस ते विवर । पानसरेनी केला विचार ।। अगदी लहान असे विवर । कैसे जाता येईल. ? ।।८।। आज्ञा शिरसावंद्य मानून । आत गेले विवरातून वीट डोक्यास चिकटली असून । काढून नीट बसविली ।।९।। महाराजांचा देह भव्य । अगदी तेज:पुंज दिव्य ।। अगाध महाराजांचे कर्तव्य । सुगंध अगदी दरवळला ।।१०।। नुकतीच पूजा केलेली दिसत । गुलाबपुष्पे अगदी टवटवीत ।। उदबत्यांचा घमघमाट सुटत । प्रत्यक्ष सर्व पाहिले ।।११।। पानसरे तसेच विवरातून । बाहेर आनंदून येऊन ।। समाधीत जे आले दिसून । सर्व त्यांनी सांगितले ।।१२।। तात्या सहस्त्रबुध्दे । महाराजांनी त्यांना नेले ।। गिरिनारवर, महाराज म्हणाले । तीन दिवस थांब इथे ।।१३।। सकाळ संध्याकाळ चहा घे । मूठभर शेंगदाणे दुपारी खावे ।। ऐसे सांगून महाराज वदले । येईन तीन दिवसांनी ।।१४।। तीन महिन्यांनी महाराज आले । तात्यांना घेऊन वरती गेले ।। एक शिळा काढण्या सांगितले । प्रचंड शिळा होती ती ।।१५।। गुरूआज्ञा प्रमाण मानून । तात्या सरकवती हात लावून ।। शिळा सरकता आली दिसून । गुहा एक विस्तीर्ण ।।१६।। गूहेत दोघेही उतरले । महाराज तात्यांना म्हणाले ।। कोणी काही तूज विचारले । उत्तर देऊ नको मूळी ।।१७।। गूहेत दोघेही शिरले । महाराज मागे, तात्या पुढे चालले ।। एक महान सत्पुरूष दिसले । उच्चासनस्थ, तपस्वी ।।१८।। तात्यांना पाहता ते विचारत । कोण तू, का इथे येत ? ।। तात्या अगदी स्तब्ध असत । मागे महाराज दिसले त्यां ।।१९।। महात्मा महाराजांस म्हणत । मागे आपले हिमालयात ।। पावणे दोनशे वर्षापूर्वी होत । दर्शन, नंतर आजच ।।२०।। महाराज गाणगापूरला गेले । पुजा-यास ब्राह्मणेतर वाटले ।। महाराजांस त्यांनी हाकलून दिले । महाराज तेथून निघाले ।।२१।। रूद्र घाटावर महाराज बसले । निर्गुण पादुकांवर उपचार चालले ।। पूजा अभिषेक मंत्र सगळे । पुजारी करू लागले ।।२२।। जे जे उपचार पादुकांवर । ते तसेच महाराजांच्या मस्तकावर ।। येऊ लागले झरझर । घाटावर लोक पहात ।।२३।। स्नान घातले पादुकास । स्नान झाले महाराजांस ।। पंचामृत घालता पादुकांस । महाराज मस्तकी आले ते ।।२४।। मंत्र म्हणण्याच्या घाईत । पुजा-यांच्या हे लक्षात न येत ।। जेव्हा पुजारी फुले वाहत । गडबडून गेली तेव्हा ते ।।२५।। निर्गुण पादुकांवर फुल वहावे । ते ते लगेच गडप व्हावे ।। महाराज मस्तकी ते पडावे । ऐसे घडत चालले ।।२६।। काही पुजारी सोवळ्यात । रूद्र घाटावरून पाणी आणत ।। महाराज मस्तकी फुले पडत । पाहून चकित जाहले ।।२७।। जाऊन मंदिराच्या गाभा-यात । इतर पुजा-यांना ते सांगत ।। रुद्र घाटावर एक माणूस बसत । दिसतो भिका-यासारखा ।।२८।। परी त्याच्या डोक्यावरती । फुले सारखी पडताती ।। सर्व पुजारी चकीत होती । जाऊन त्यांनी पाहिले ।।२९।। ज्याला आपण हाकलून देत । तोच हा माणूस असत ।। जे जे आपण उपचार करत । पूजा फुले वाहिली ।।३०।। केले निर्गुणपादुकांवरती । ते आले याच्या मस्तकावरती ।। पुजारी सर्व ओशाळती । शरण आले महाराजा ।।३१।। निर्गुण पादुकांचे घेण्या दर्शन । सोवळ्याचे कडक बंधन ।। निर्गुण पादुकांचे स्पर्शदर्शन । कुणाला होत नसेच ।।३२।। ऐसे असताना गाणगापूरात । महाराज, आण्णा थोरात ।। निर्गुण पादुकांवर डोके टेकवीत । स्पर्शदर्शन घेतले ।।३३।। सोलापूरच्या जनार्दनबूवाला । महाराज घेऊन गेले कुरवपुरला ।। रात्री झोपून पहाटेला । दोघे बाहेर निघाले ।।३४।। एके ठिकाणी दार बंद दिसले । महाराजांनी लाथेने ते उघडले ।। दोघेही आत शिरले । गुहा होती तेथेच ।।३५।। आत देव्हारा होता गुहेत । त्यावर जनार्दनबूवास बसवीत ।। महाराज त्यांच्या मुस्काडीत मारत । समाधी लागे जनार्दना ।।३६।। पुन्हा मुस्काडात मारुन । जनार्दनबुवांची समाधी उतरून ।। त्या जागेकडे बोट करून । महाराज त्यांना म्हणाले ।।३७।। ‘श्रीपाद श्रीवल्लभ । या कुरवपूर क्षेत्रात ।। येथेच ध्यानस्थ बसत । ध्यानस्थ बसण्याची जागा ही ।।३८।। मुक्त करण्यास बालगंधर्वाला । मी आलो सोलापूरला ।। गंधर्व सोडून जनार्दनबूवाला । धरले’ महाराज म्हणाले ।।३९।। साक्षात्कारी देवीभक्त । पंढरपूरकर मनोहरपंत ।। ओंकारनाथ भस्मे यांना सांगत । आज सोलापूरात ।।४०।। शुभराय महाराजांच्या मठात । एक महान सत्पुरूष येत ।। दोघे त्यांच्या दर्शनास जात । मनोहरपंत म्हणाले ।।४१।। ‘भस्मे, हे शंकरमहाराज असत । तूमचे जीवनमान असेपर्यंत ।। जेव्हा जेव्हा महाराज भेटत । तेव्हा नमस्कार करावा ।।४२।। फक्त त्यांना नमस्कार करा । काही मागू नका त्यांना ।। देऊ नका काही त्यांना । समर्थ आहेत महाराज ।।४३।। महाराज व्यासपीठावर बसत । दोन्ही चरणे जोडून असत ।। भस्मे चरणांवर मस्तक ठेवत । आनंदून गेले ते ।।४४।। चरणांचा स्पर्श होताक्षणी । दिव्य आनंद झाला क्षणी ।। उजवा हात महाराजांनी । उगारला लगेच ।।४५।। भस्मे यांच्या पाठीत । महाराज धपका मारीत ।। पान कुटून देण्यास सांगत । भस्मे पान कुटीत ।।४६।। भस्मे पान तंबाखू देत । रोज येण्यास महाराज सांगत ।। हेच पहिले दर्शन असत । महाराजांचे भस्मेंना ।।४७।। महाराजांनी मारता धपका । भस्मेंना कळला परमार्थाचा भपका उजव्या हाताचा मिळता सपका । परमार्थद्वार उघडले ।।४८।। भस्मे रोज मठात येत । महाराजांचे दर्शन घेत ।। पान कुटून तंबाखू देत । चरणसेवा करीत ।।४९।। भस्मे यांचे कापड दुकान । मुंबईस हुंडी लिहून ।। दोन हजार रूपयांची हुंडी असून । रक्कम काही जमेना ।।५०।। घातले महाराजांच्या कानावर । गुलबग्र्यापलिकडे भागीदार ।। त्यांच्याकडे भस्मे जात सत्वर । व्यवस्था झाली रकमेची ।।५१।। भस्मे रक्कम घेवून निघाले । उरूसामुळे वाहन न मिळे ।। भस्मे चालत निघाले । वेळ होती रात्रीची ।।५२।। चोरांची भीती फार असत । तेवढ्यात एक गृहस्थ येत ।। उंच, घोंगडी, काठी असत । भस्म्यासंगे चालला ।।५३।। भस्मे अगदी घाबरत । चोर असावा हा निश्चित ।। तो सुपारी पान त्यांना देत । राजकारण भस्मे बोलत ।।५४।। बरेच अंतर सोबत करून तो गृहस्थ गेला निघून ।। भस्मे गाडीने येऊन । महाराजांना भेटले ।।५५।। भस्मे यांना महाराज म्हणती । खास तुझ्या सोबतीसाठी ।। ‘मी पांडुरंगास पाठविले करी काठी । अंगी घोंगडी, उंच तो ।।५६।। त्याला पाहून घाबरलास । त्याला चोर समजलास ।। राजकारण बोललास । नावही त्याचे न विचारले ।।५७।। पान सुपारी दिली तुला । त्या माझ्या पांडुरंगाला ।। तू चोर समजला । रागात म्हणाले महाराज ।।५८।। भस्मे यांना खूण पटली । महाराजांची चरणे धरली ।। क्षमा करावी, चूक झाली । चरणी मस्तक ठेवले ।।५९।। ज्यांच्या संरक्षणास । ज्यांनी पाठविले पांडुरंगास ।। त्या तिघांच्या अधिकारास । तिघेच जाणू शकोत ।।६०।। रामभाऊ कोराड मास्तर । एकदा महाराजां म्हणत आज बादलीभर दारू तुम्ही पीत । शोभते का तुम्हा हे ? ।।६१।। महाराज शिव्या देत मास्तरास । मी दारू प्यालो म्हणतोस ।। माझ्या मुखाचा घेई वास । तोंड त्यांनी उघडले ।।६२।। महाराजांच्या मुखातून । गुलाबपुष्पांचा सुगंध छान ।। सर्वत्र गेला दरवळून । कोराड झाले चकित ।।६३।। पन्नास सिगारेट डब्यात असत । महाराज एक शिलगावत ।। तिच्यावरच सा-या ओढीत । डबाच लागे प्रतिवेळी ।।६४।। कित्येक डबे दिवसात । महाराज सहज करती फस्त ।। अंगारा म्हणून ती राख देत । कामे होत लोकांची ।।६५।। भस्मे महाराजांना बोलवित । महाराज त्यांच्या दुकानी जात ।। द्राक्षे आणण्या मुनिमा सांगत । ‘चहा किती आणू ’विचारले ।।६६।। ‘बावीस कप’ महाराज म्हणत । महाराज दोन द्राक्षे घेत ।। तोच दर्शना वीस लोक येत । चहा दिला सर्वांना ।।६७।। द्राक्षे प्रसाद देण्यास । सांगता, द्राक्षे दिली सर्वांस ।। चहा द्राक्षे सर्वा मिळत । लीलाच महाराजांची ही ।।६८।। सन एकोणीसशे सेहेचाळीसात । महानवरात्र अष्टमी असत ।। महाराज तुळजापूरला जात । सोलापूर भक्त्तासमवेत ।।६९।। प्रचंड गर्दी मंदिरात । भस्मे राजेशाही थाटात ।। हटजाव ऐसे ओरडत । लोक सरकले बाजूला ।।७०।। भस्मे आणि महाराज । देवीच्या गाभा-यात जात ।। वैशिष्ट्यपूर्ण सांकेतिक भाषेत । महाराज देवीशी बोलले ।।७१।। दोघेही तेथून बाहेर येत । आले मागील दरवाज्यात ।। ‘घोडा होना’ महाराज म्हणत । भस्मे वाकले लगेच ।।७२।। भस्मे यांच्या पाठीवरती । महाराज ऐटीत पहा बसती ।। भस्मे घोड्यासारखे धावती । महाराजांना घेऊन ।।७३।। भारतीबुवाच्या मठात । देवीच्या पलंगापर्यंत वा-यासारखे भस्मे जात । इतर भक्त मग आलेच ।।७४।। तेथे कोणी भोपी नसत । ‘दरवाजा खोलो’ महाराज म्हणत ।। भस्मे चौकटीसह दरवाजा काढत । पलंगावर बसले महाराज ।।७५।। मधुबुवास समोर बसवून । त्यांची उजवी करंगळी कापून ।। महाराजांनी रक्त काढून । आपल्या भाळी लावले ।।७६।। महाराज भस्मे निघाले । ‘घोडा’ महाराज पुन्हा वदले ।। भस्मे पुन्हा घोडा झाले । महाराज पाठीवर बैसले ।।७७।। दरवाजा काढला, भोप्यास कळले । तलवारी घेऊन ते मारण्या आले ।। इतर भक्त त्यांना म्हणाले । काढणारा गेला पुढेच ।।७८।। तशाच स्थितीत महाराजांसह । देवीस प्रदक्षिणा घालून ।। सा-या पाय-या वेगाने चढून । रस्त्यावरती थांबले ।।७९। दादा फुलारी यांच्या पाठीवर । महाराज बसले नंतर ।। त्रस्त फुलारी झाले फार । महाराजांच्या ओझ्याने ।।८०।। तेथेच भोप्याच्या खोलीत । हे सर्व उतरले असत ।। त्या खोलीत सर्व जात । महाराज समचरण बैसले ।।८१।। महाराजांच्या चरणावरती । भस्मे मस्तक टेकविती ।। अष्टभाव त्यांचे जागृत होती । ब्रह्मानंदात मग्न ते ।।८२।। जेवणे उरकून घेण्यास । महाराज सांगत इतरांस ।। भस्मे भानावरती येत । बसले महाराजांसमोर ।।८३।। महाराज मोठ्याने म्हणाले । हिंदूस्थान हिंदूना दिले ।। पाकिस्तान यवनांना दिले । आवेषात बोलले ।।८४।। महाराजांचे हे भाकित । एक वर्षांनी खरे ठरत ।। हिंदूस्थान पाकिस्तान होत । भारत ऐसा दुभंगला ।।८५।। दुस-या दिवशी तुळजापूरहून । भस्मे महाराजांना भरवून ।। सर्वांचे भोजने होऊन । मोटारीतून परतले ।।८६।। महाराज बसत मोटारीत । भस्मे यांना समोर बसवत ।। महाराज त्यांचा फेटा काढत । चरणे मस्तकी ठेविली ।।८७।। दोन्ही चरणे महाराजांनी । भस्मेंच्या मस्तकावर ठेवूनी ।। भस्मे गेले रंगुनी । चरणस्पर्श होताच ।।८८।। महानंदाचा तो क्षण । ज्याची त्यालाच याची जाण ।। महाराजांनी दिव्य खाण । भस्मे यांना दिलीच ।।८९।। भस्मे यांच्या डोक्यावर । महाराजांची चरणकमले सुंदर ।। दिसू लागली स्पष्ट मनोहर । शिक्कामोर्तब जाहले ।।९०।। यवन सत्पुरूष महीबूब । एकदा महाराजांची गाठ पडत ।। महाराज त्यात खडसावत । धंदा मांडला काय तू ? ।।९१।। एवढ्याचसाठी का तू जन्मला । महीबूब अगदी ओशाळला ।। पुन्हा सोलापूरात कधी न दिसला । काही सत्पुरूष असेही ।।९२।। देवस्थळे महाराजांचे भक्त । त्यांच्या अंगात महाराज येत ।। महापौर राजाराम बुरबुल । एकदा गेले भेटण्या ।।९३।। देवस्थळेंना जेव्हा संचार होत । शरीर त्यांचे लाकडासमान बनत ।। अगदी शंकरमहाराज दिसत । प्रत्यक्ष बुरबुल पाहत ।।९४।। देवस्थळे संचारात । बुरबुलाशी तेलगुत बोलत ।। संचार संपता बुरबुल वदत । तुम्हास तेलगु येते का ? ।।९५।। देवस्थळे त्यांना सांगत । ‘तेलगू मला मुळी न कळत’ ।। ‘संचारात तेलगू कसे बोलत । संचारात वदती महाराज’ ।।९६।। एकदा भोर येथे कारखान्यास । जमीन विकत घेण्यास ।। बुरबुल, खासदार गंगाधर कुचन । रामकृष्ण बेत मंत्री हे ।।९७।। मोटारीने चालले असत । पद्मावतीजवळ पुण्यात ।। मोटार चालली वेगात । तेव्हा बुरबुल म्हणाले ।।९८।। महाराजांची समाधी इथे । आपण दर्शन घेऊन जाऊ सारे ।। ‘येताना पाहू’ दोघे वदले । मोटार चालली जोरात ।।९९।। समाधीच्या मठासमोर । बंद पडली मोटार ड्रायव्हर निष्णात असे फार । चोख मशिनरी सर्वही ।।१००।। ड्रायव्हरने प्रयत्न केले नाना । मोटार चालू होईना ।। आणण्या मेकॅनिकाला । ड्रायव्हर गेला गावात ।।१०१।। दोघांना बुरबुल म्हणत । मोटार दुरूस्त होईपर्यंत ।। दर्शन घेऊन येऊ परत । आले समाधी मठात ।।१०२।। मठात समाधीस लागून । महाराजांची मूर्ती असून ।। त्यांच्या मुखात सिगारेट पेटवून । ठेवलेली दिसतसे ।।१०३।। बुरबुल पहात, दर्शन घेऊन । धूर निघे सिगारेटमधून ।। तसाच महाराजांच्या नाकातून । धूर निघे, स्पष्ट दिसे ।।१०४।। दृश्य हे तिघांनीही पाहिले । चकीत झाले, दर्शन घेतले ।। ड्रायव्हर आला, मोटारीत बसले । मोटार सुरू झालीच ।।१०५।। मेकॅनिक मुळी न मिळत । दर्शनसाठीच मोटार थांबत ।। दर्शनाने फायदा होत । आणखी एक तयांना ।।१०६।। भोरची जमीन विकत मिळत । अत्यंत अल्प किंमतीत ।। महाराज दर्शनाचा हा प्रभाव असत । ऐसे बुरबुल सांगत ।।१०७।। महाराजांच्या चरणांवर । टेकवून भावे मम शिर ।। दशम अध्याय मनोहर । पूर्ण येथे जाहला ।।१०८।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.