शंकरगीता अध्याय १३ वा

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:15:47
शंकर गीता अध्याय १३ वा श्री भगवान उवाच । श्री शंकरमहाराज उवाच हे दोघेही मुळात एकच । वंदन दोघांस व्दिवार ।।१।। दोघे एकच हे विधान । प्रख्यात पुरातन सनातन ।। शिवस्य ह्रदयं विष्णु । विष्णुस्य ह्रदयं शिव: ।।२।। एका भक्तास महाराजांनी । कुरूक्षेत्राचे युध्द दाखवूनी ।। स्वत: श्रीकृष्ण होऊनी । भगवद्गीता सांगितली ।।३।। धर्माच्या व्यवस्थित घडीवर । श्रीकृष्णाचा होत अवतार ।। धर्माची घडी विस्कटल्यावर । अवतार महाराजांचा हो ।।४।। दोघांनी सांगितले एकच । विश्लेषणात तरीही फरकच ।। सत्य कळणार, रुढी टाळताच । महाराजांचे सांगणे ।।५।। आपण शिवलीलामृत वाचता । तशाच घटनांची ही शंकर गीता ।। दोन्ही ग्रंथाचा करविता । असती महाराज शंकर ।।६।। दिगंबर राजयोगीयांस । महाराज दीक्षा देत परमहंस ।। महाराज समाधी घेताच त्याच वेळेस । इंदोर येथे प्रगटले ।।७।। राजयोगी यांस महाराज म्हणती । ‘माझी पूजा नैवेद्य कर आरती ।। नर्मदेस चाललो मज दे छाटी’ । राजयोगी पूजा करीत ।।८।। महाराज राजयोगींना आज्ञा करत । माझे स्थान वाघोड असत नोकरी सोडून हे सांभाळ स्थान । घटना समाधीनंतरची ।।९।। शुभराय महाराज मठात । शुभरायाची गादी असत ।। अनुग्रह देऊन गादीवर बसवीत । पंरपरा ही असेच ।।१०।। परी अनुग्रहाविना गादीवर बसवीत । जनार्दनबूवास, पिताजी सांगत ।। याला अनुग्रह देण्यास येणार आहेत । महान अवतारी पुरूष ।।११।। जनार्दनबूवा पूजा होते करत । एक व्यक्ती देवघरात शिरत ।। गोंधळ झाला, कोण आत जात ? । दोघे गुप्त जाहले ।।१२।। श्रीपाद श्रीवल्लभांचे जे स्थान असत । त्या कुरवपूरच्या भुयारात ।। दोघे प्रगटून आत शिरत । महाराज साक्षात प्रगटले ।।१३।। मांडीवर बसवून जनार्दनाला । तारकमंत्राचा अनुग्रह दिला ।। अपूर्व अगदी योग हा भला । धन्य जनार्दन जाहले ।।१४।। महाराज जनार्दनबूवास । ‘बुवा’ म्हणुनीच संबोधीत ।। बूवा नेहमी महाराजांस । ‘मालक’ म्हणत आदरे ।।१५।। महाराजांची अत्यंत प्रीती । शिष्य जनार्दनबूवावरती ।। बूवामुळेच अनेकांना लाभती । शंकरमहाराज पहा हो ।।१६।। ज्ञानेश्वरास पांडुरंगानी । स्वत: दिली समाधी ।। जनार्दनबूवास स्वत: समाधी । महाराजांनी दिलीच ।।१७।। जनार्दनबूवांचा अधिकार । यावरून स्पष्ट होतेतर ।। धन्य - जनार्दन - शंकर । धन्य शुभराय मठ तसा ।।१८।। एका रविवारी जनार्दनबूवांनी । धनुर्मास करण्याचे ठरवूनी ।। महाराजांची संमती घेऊनी । निमंत्रिले सर्वांस ।।१९।। या वेळी सोलापूरात । शंकराचार्यांचा मुक्काम असत ।। त्यांनाही केले निमंत्रित । बोलावणे गेलेच ।।२०।। शंकराचार्य आपल्या स्थानात । पार्थिवपूजा होते करीत ।। जे उपचार ते पार्थिवावर वहात । अदृश्य होऊ लागले ।।२१।। माझे उपचार कोठे गेले ? । अंतर्ज्ञानाने मग त्यांना कळले माझे उपचार जाऊ लागले । महाराजांच्या पदावर ।।२२।। मठात महाराजांच्या चरणावर । कोठून येतात हे उपचार ? ।। भक्त पाहती हा चमत्कार । शंकराचार्य आलेच ।।२३।। ती आपण पार्थिवपूजा जी केली । महाराज चरणावरती आली ।। शंकराचार्यांनी प्रत्यक्ष पाहिली । निवेदन केले सर्वही ।।२४।। ब-हाणपूरचे वैदिक शास्त्री । त्यांना नव्हती संतती ।। सांगता महाराज त्यांना म्हणाली । चल रे शास्त्री मजसंगे ।।२५।। दोघे गावाबाहेर जात । चालचालून शास्त्री थकत ।। चहा बिडीची त्याला तल्लफ होत । डांगरावर दोघे थांबले ।।२६।। महाराज टाळी वाजवीत । एक मुलगा चहा आणीत ।। बिडीबंडल आगपेटी असत । दोन कपबशा किटलीही ।।२७।। दोन कपांचीच किटली असत । दोघांना तो चहा देत ।। शास्त्रीस आणखी हवा असत । चहा अमृततुल्य हो ।।२८।। महाराज सांगता मुलास । हवा तेवढा दे शास्त्रीस ।। तीन कप पिता म्हणे बास । बिडी घेतली शास्त्रीने ।।२९।। डोंगरात चहा कुणी आणला ? । तो अमृततुल्य का वाटला ? ।। शास्त्री तीनच कप चहा का प्याला । एकच विडी का ओढली ।।३०।। याचा संदर्भ पुढे कळाला । चहा महाराजांनीच आणला ।। प्रसाद होता, म्हणून वाटला । अमृततुल्य चहा तो ।।३१।। शास्त्रीस तीन मुले झाली । नंतर एक मुलगी जन्मली ।। चहा पुल्लिंगी म्हणून मुले झाली । मुलगी, बिडी स्त्रीलिंगी ।।३२।। हिवाळ्याचे होते दिवस । महाराज म्हणाले जनार्दनबूवास ।। मी खोलीत बसतो शौचास । थंडी फार वाजते ।।३३।। खोलीस कुलूप लावून ठेवा । घाण मुळीच काढू नका ।। पंधरा दिवस कार्यक्रम असा । महाराजांचा चालला ।।३४।। पुढे पंधरा दिवस ठेविली खोली बंद । महिनाभर खोली बंद असत एकदा एक महारोगी येत । जनार्दनबुवास म्हणाला ।।३५।। मला देवीचा दृष्टांत झाला । जावे शुभराय मठात सोलापूरला ।। शकरमहाराजांच्या दर्शनाला । म्हणून आलो इथे मी ।।३६।। महाराज म्हणाले बुवा त्यास । त्या कुलुप लावललेल्या खोलीत नेऊन ।। कपडे काढून सर्वांगास । उटी तेथील लावावी ।।३७।। बूवा त्याला तैसे करती । रोग्यास लाभली रोगमुक्ती ।। शरिरास आली दिव्य कांती । युक्ती कैशी महाराजांची ? ।।३८।। पंधरा दिवस हिंदू - मुसलमानात । मुंबईत तीव्र दंगा चालत ।। भक्त मोटार - कारखानदार श्रीमंत । महाराज होते त्याकडे ।।३९।। मध्यरात्री महाराज म्हणाले । आपणास आता जावयाचे ।। महमदअली रोडने पुढे । गाडी काढ बाहेर ।।४०।। दंग्याचा जो रस्ता असत । तोच रस्ता महाराज सांगत ।। ड्रायव्हरसह सारेच घाबरत । गाडी निघाली वेगात ।।४१।। मुसलमान जमले गाडी अडवीत । महाराज सार्वांना दरडावत ।। सरका मज जरुरीचे काम असत । परत येताना भेटेन ।।४२।। आश्चर्य मुसलमान बाजूस झाले । महाराज काळबादेवीकडे गेले ।। बंद दरवाजे पटापट उघडले । रौद्ररूप घेत महाराज ।।४३।। महाराजांनी शिव्यांची लाखोली । काळाबादेवीला वाहिली ।। पटापट दारे बंद झाली । महाराज बाहेर पडताच ।।४४।। आल्या रस्त्यानेच मोटार परतली । सर्व मुसलमानांची गर्दी झाली ।। पुष्पहार प्रत्येकाच्या करकमली । तबक पान - सुपारीचे ।।४५।। महाराजांची ते वाटच पहात । या अल्ला, या परवर दिगार ।। या खुदा, ऐसे म्हणत घालत । हार प्रत्येक, महाराजा ।।४६।। पानसुपारी वाटली । यातच रात्र संपली ।। द्वेष - काळोख संपून उगवली । प्रभात नव्या दिवसाची ।।४७।। इंग्लंडचा एक युरोपियन असत । गर्व्हनर होता कलकत्यात बायको त्यांची इंग्लडात । महाराज कलकत्यामध्ये ।।४८।। बदली होईना, रजा मिळेना । गव्हर्नरास होती यातना ।। एका मित्राने सांगितले त्यांना । महाराजांना सांगावे ।।४९।। गव्हर्नर महाराजांस विनंती करी । मी माझ्या जाईन घरी ।। सात वर्षे झाली पुरी । एकटाच येथे असे मी ।।५०।। बायको माझी एकटी । घरी झुरत असेल माझ्यासाठी ।। बदली व्हावी मम उठाउठी । ऐसे करावे महाराज ।।५१।। महाराज त्याला समजावीत । अरे तू इथे असे आनंदात ।। बदलीचा विचार न आणी मनात । गव्हर्नरला पटेना ।।५२।। प्रत्यक्ष तुज पहावयाचे असेल जर । पहा माझ्या हातावर ।। हात दाखवून त्याच्या समोर । महाराज त्याला म्हणाले ।।५३।। महाराजांच्या हातावर । गव्हर्नरास दिसले आपले घर ।। बायको घेऊन प्रियकर । रममाण होती झालेली ।।५४।। जणू टी.व्ही. आहोत पहात । ऐसे दृश्य स्पष्ट दिसत ।। परपुरूषास पाहून भडकत । पित्त गव्हर्नराचे ।।५५।। गव्हर्नर म्हणे संतापून । आत्ताच इंग्लडला जाऊन ।। करतो त्या पुरूषाचा खून । गोळ्या झाडून क्षणात ।।५६।। महाराज गव्हर्नरास म्हणती । इंग्लडला जाण्याचे कारण नाही ।। आत्ताच गोळ्या घालुनी । खून करावा लगेच ।।५७।। त्या पुरूषाचा दोष नसून । तुझी बायकोच त्याकडे जाऊन ।। त्याला आणते बोलावून । तिच्यावर गोळ्या झाड तू ।।५८।। गव्हर्नर गेला भडकून । बायको महाराजहातावर देखून ।। तिच्यावर पिस्तूल रोखून । सहा गोळ्या झाडल्या ।।५९।। गव्हर्नर येता भानावर । आपण महाराजांच्या हातावर ।। गोळ्या झाडल्या भराभर । पश्चात्ताप त्याला जाहला ।।६०।। क्षमा मागितली महाराजांस । पाहता महाराजांच्या हातास त्यास कसलीच खूण न दिसली! । चकित झाला गव्हर्नर ।।६१।। त्याला दुस-या दिवशी तार येत । आपल्या बायकोचा खून होत ।। खूनी सहा गोळ्या झाडत । शोधात आहोत खूनीच्या ।।६२।। महाराजांनी सांगितले । तसेच अगदी घडून आले ।। पिस्तूल हातावर झाडले । बायको मेली घरात ।।६३।। गोळ्या घालूनही हात । अगदी तसाच असत ।। गव्हर्नर झाला चकित । पाय धरी प्रभूचे ।।६४।। भस्मे घेऊन महाराजांस । बसवीत पहा शौचास ।। महाराजांच्या विष्टेस । सुगंधी अगदी येतसे ।।६५।। विष्ठेसही सुगंधी येत । त्यामुळे भस्मे चकित होत ।। महाराज त्यांना सांगत । शुध्द असावा मनुष्य ।।६६।। जेव्हा अंतर्बाह्य शुध्दता असत । तेव्हाच विष्ठेस सुगंध येत ।। ऐसी शुध्दता ती सतत । टिकवून ठेवली पाहिजे ।।६७।। महाराजांच्या या वचनावरून । आपआपले अंत:करण ।। घ्यावे सर्वांनी तपासून । किती शुध्द आपण ? ।।६८।। एक भक्त करून नमस्कार । ‘माझे काम केव्हा होणार ?’।। विचारी, महाराज म्हणती सत्वर । मी मेल्यावर होईल ।।६९।। भक्त मग चौकशी करीत । महाराजांचे वय किती असत ।। काम होण्यास महाराज कधी जात । हाच ध्यास भक्ताला ।।७०।। मग महाराजांस वय विचारत । महाराज रागाने ओरडत ।। वेड्या तुझ्यातील ‘मी’ जेव्हा मरत । तेव्हा काम होईल ।।७१।। या भक्तासारखेच भक्त । आपण सारे आहोत ।। काम होण्यावर आपली नजर असत । प्रज्वलित ‘मी’ ठेवून ।।७२।। काहीही होवो महाराजांचे । काम व्हावे आमचे ।। वादळ अशा विचारांचे । सतत चाललेले असतेच ।।७३।। आपल्यातील ‘मी’ चिरंजीव । करीत असतो यत्ने सतत सांगण्याचा ‘काम नाही होत’ । ‘हक्क काय आपणा ?’ ।।७४।। नुसते ‘मी’ ही आपण न सोडीत । श्रध्दा भक्तीचा पत्ताच नसत ।। वासनांचा धुमाकूळ चालत । कैसे महाराज कळतील ? ।।७५।। महाराज काशीक्षेत्रात । बुटासह महादेवावर बसत ।। पुजारी त्यांना हाकलून देत । महाराज गेले नदीवर ।।७६।। पुजारी जाता मंदिरात । मंदिर गरगर असे फिरत ।। मंदिरात पुजा-यास जाता न येत । घाबरुन गेले अत्यंत ।।७७।। जो महादेवावर होता बसून । त्याला आपण दिले हाकलून ।। त्याचाच परिणाम हा असून । खात्री पुजा-यांची जाहली ।।७८।। हुडकू लागले सगळे त्याला । गंगेवर नावेत तो दिसला ।। शरण गेले, वदती त्याला । महाराज क्षमा करावी ।।७९।। महाराज वदती रागावून । का आलात विश्वेश्वर सोडून ।। महादेव मंदिरात नसून । मंदिर फिरते गरगर ।।८०।। पुजा-यास महाराज सांगत । जा दिसेल विश्वेश्वर मंदिरात ।। मंदिराचे फिरणेही होईल शांत । पुजारी गेले मंदिरी ।।८१।। मंदिराचे फिरणे बंद होत । विश्वेश्वर मंदिरात दिसत ।। पुजारी महाराजांची पूजा करीत । मोठ्या भक्तिभावाने ।।८२।। आधी पूजा महाराजांची । नंतर काशी विश्वेश्वराची ।। महिनाभर याप्रमाणेची । महाराज होते नावेत ।।८३।। पहिला निजाम महाराजांना भजत । दुसरा निजाम मुळी न मानत ।। त्याने दिवाण सालारजंगाकडून । हाकलून दिले महाराजा ।।८४।। महाराज म्हणाले दिवाणाला । तुझा राजा सिंहासनावर मला ।। पुन्हा बसवितो की नाही तेच पहा । वादळ सुटले लगेच ।।८५।। मुसळधार पाऊस सुरू झाला । गाव पाण्यात बुडाला ।। दुसरा निजाम घाबरला । अचानक कसे घडले हे ? ।।८६।। सालारजंग म्हणे निजामाला । तुम्ही हाकलून दिले महाराजाला संकट भोवले तुम्हाला । शरण जाता टळेल ।।८७।। निजाम महाराजांस शरण जाऊन । सिंहासनावर त्यांना बसवून ।। महाराज म्हणाले खण नारळ देऊन । ओटी भरावी नदीची ।।८८।। ओटी भरता, तासात । पाणी संपूर्ण ओसरत ।। महाराज निजामास म्हणत । ‘परीक्षा पाहतोस काय मम ?’ ।।८९।। तुझी एकच पिढी राज्य करील । तू रजकधोबी गुरुचरित्रातील ।। तुला मीच राजा केले असत । राज्य बुडाले नंतर ।।९०।। गणेश महादेव अभ्यंकर । यांना युध्दात पॅन्टवर ।। गोळ्या लागल्या भरपूर । चाळणी झाली पॅन्टची ।।९१।। परी पायास नुसती जखमही । मुळीच अगदी झाली नाही ।। ऐसे कैसे घडले पाही ? । अभ्यंकर चकित जाहले ।।९२।। पुढे महाराज त्यांना म्हणत । अरे गोळ्यांचे वार मी सोसत ।। कसे वाचलो युध्दात । अभ्यंकराना समजले ।।९३।। महाराजांची स्वाक्षरी । असावी आपल्या संग्रही घरी ।। अभ्यंकरांना वाटे अंतरी । महाराजांना म्हणाले ।।९४।। महाराज या कागदावरी । करावी आपली स्वाक्षरी ।। महाराज म्हणाले ‘मी तरी । सही नाही करणार’ ।।९५।। निश्चयाने म्हणाले अभ्यंकर । ‘मी तुमची सही घेणार’ ।। महाराज वदत मी सही न देणार । शर्यत लागली दोघांची ।।९६।। पुढे महाराज काशीस जात । पुजा-याच्या घरी रहात ।। तेथून ते पत्र धाडत । अभ्यंकरांना नगरास ।।९७।। मला पैशाची जरूरी असत । इथे न कोणी मज पैसे देत ।। आपण पैसे पाठवावेत । पुजा-याच्या नावाने ।।९८।। महाराजांचे पत्र वाचून । अभ्यंकर गेले आनंदून ।। महाराजांस पकडतो युक्ती करून । जिंकणार मी शर्यत ।।९९।। ऐसा त्यांनी विचार करूनी । पैसे पाठविले मनिऑर्डरनी शंकर महाराजांच्या नावानी । पुजा-याच्या पत्त्यावर ।।१००।। पोष्टमन गेला पुजा-याच्या घरी । ‘शंकरमहाराज कोण ?’ विचारी ।। ‘हेच आहेत’ म्हणे पुजारी । पोष्टमन म्हणे सही करा ।।१०१।। महाराज फॉर्मवर सही करत । पोष्टमन त्यांना पैसे देत ।। पावती अभ्यंकरांना मिळत । सही पाहू लागले ।।१०२।। ‘शंकर दत्तात्रेय उपासनी’ । ऐसी महाराजांची सही असुनी ।। सही सीलबंद अगदी करुनी । तिजोरीत त्यांनी ठेवली ।।१०३।। जेव्हा महाराज घरी येत । अभ्यंकर त्यांना सांगत ।। महाराज मी जिंकली शर्यत । तुमची सही मजपाशी ।।१०४।। अशक्य, असेल तर दाखव । अभ्यंकरांनी तिजोरीतून ।। लगेच पावती काढून । पाहताच चपापले ।।१०५।। पावती सर्व तशीच असून । फक्त स्वाक्षरी झाली अंतर्धान ।। महाराजांचे धरून चरण । साष्टांग केले वंदन ।।१०६।। महाराज दशावतारी नृत्य । केव्हा केव्हा असत करत ।। नृसिंह नृत्य करत असत । नृत्ये सर्व शास्त्रोक्त ।।१०७।। देखून महाराजांची करणी । वंदन केले त्यांच्या चरणी ।। तेरावा अध्याय या ठिकाणी । विराम आहे पावला ।।१०८।। ।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.