शंकरगीता अध्याय १७ वा

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 16:55:45
शंकर गीता अध्याय १७ वा देखून कैलासाचा राणा । आनंद झाला पंचप्राणा वंदून त्यांच्या दिव्यचरणा । उत्साहित जाहलो ।।१।। वय महाराजांचे किती होते ? । प्रत्येकास कळावे वाटते ।। हे निश्चित सांगता न येते । कोणी दीडशे म्हणतात ।।२।। साधू सांगतात वर्षे तीनशे । तपस्वी सांगतात सातशे ।। अंतर्ज्ञानी दोन हजार वर्षे । प्रत्येकास आधार ।।३।। समाधी घेतल्यावर महाराजांनी । बारा वर्षांनी जपानमधूनी ।। एक मनुष्य दिला पाठवूनी । समाधीच्या मठात ।।४।। त्याला सांगितले महाराजांनी । मी मेलो आहे म्हणूनी ।। माझी समाधी बांधूनी । उत्सव करतात पाहून ये ।।५।। तो जपानी मनुष्य आला मठात । समाधी फोटो पहात ।। अश्रू नयनी ओघळत । सांगू लागला सर्वांस ।।६।। अहो हे महाराज याच रूपात । सध्या आहेत जपानात ।। त्यांचे कार्य चालले जोरात । उत्सव कसे तुम्ही करता ? ।।७।। त्यांनीच मजला पाठविले । गंमत पाहून येण्यास सांगितले ।। महाराज असता पुण्यतिथी सगळे । साजरी कशी करता हो ?।।८।। महाराज वदत, दुस-या महायुध्दात । जपानवर बाँब पडणार असत जपानची हानी होणार निश्चित । मी उध्दार करणार ।।९।। महाराजांनी ऐसे म्हटल्यावर । तीन वर्षांनी जपानवर ।। बाँब पडून देशभर । प्रचंड हानी जाहली ।।१०।। म्हणून महाराज जपानात । सध्या कार्य आहेत करीत ।। कसे होणार समाधीस्त ? । कसे कळणार वय त्यांचे ? ।।११।। महाराजांच्या समवेत । आठ भक्त नेहमी असत ।। अष्टप्रधान त्यांना म्हणत । नववे असती महाराज ।।१२।। या नऊ जणांचा फोटो । नवरत्न दरबार त्यांना म्हणत ।। महाराज पारखी, थोरात । नवले, कुकडे, श्रोत्रीय, ।।१३।। कारखानीस, धनेश्वर । नववे असती मिरीकर ।। अष्टप्रधान नवरत्न दरबार । सर्वत्र मिळतो पहावया ।।१४।। महाराज दहा वचने नेहमी म्हणत । १) लेखणी माझ्या हातात ।। २) अशक्य ते मजलाच शक्य । ३) इच्छा माझीच केवळ ।।१५।। ४) टाइम इज दि फॅक्टर । ५) आमच्या पुढे कुठले सरकार ६) पंखे मी वायूच्या सहज । गतीने जात असे ।।१६।। ७) कैरी कैरी पत्ते की अंदर । छुपेंगी कितना दिन ।। बझार मे एक दिन । जरूर आयेंगी ।।१७।। ८) दीप जले पहिले । फिर जले परवाना ।। पहिले जलाना सीख ले । फिर दुसरेकू जलाना ।।१८।। ९) रंग जाने रंगारी । भडवा क्या जाने पिंजारी ।। १०) जिसका बंदर वोही । नचाये, ऐशी दहा वचने ही ।।१९।। प्रसंग, घटना ज्या ज्या घडत । त्यातून ही वचने सिध्द होत ।। या वचनांच्या अनुषंगात । प्रत्येक घटना घडतसे ।।२०।। अलीकडे प्रत्येक सतरा वर्षांनी । आता समाधी घ्यावी म्हणूनी ।। महाराजांच्या मनी । विचार येत, जातही ।।२१।। एकोणीसशे तीस साली । समाधी ठरविली महाराजांनी तेव्हा डॉक्टर धनेश्वरांनी । विचार त्यांच्या बदलविला ।।२२।। डॉक्टर धनेश्वरांमुळे । अधिक सतरा वर्षे लाभत ।। महाराजांचा सहवास मिळत । भक्तांना त्या सर्वही ।।२३।। पद्मावतीसमीप अरण्यात । महाराज नेहमी जात असत ।। तेथे एका ठिकाणी ते थांबत । ठिकाण भरले मनात ।।२४।। ही जागा मालपाणींची असत । महाराज मालपाणींना बोलवीत ।। आणि त्यांना सांगत । येणार आहे इथे मी ।।२५।। ती जागा देण्याचे वचन । मालपाणीकडून घेऊन ।। सोय समाधीची अशी करून । एक वर्ष आधीच ।।२६।। त्याच ठिकाणावर जाऊन । शांत बसत ध्यान लावून ।। हेच समाधीचे ठिकाण असून । महाराज भक्तास सांगत ।।२७।। महाराज भक्तास म्हणत । हे कपडे जीर्ण झालेत ।। टाकून दिले पाहिजेत । सूचक ऐसे बोलत ।।२८।। तीन महिने आधीच । महाराज सांगत सर्वांस ।। वैशाख शुध्द अष्टमीस । समाधी आम्ही घेणार ।।२९।। तिथी वार दिनांक सगळे । महाराजांनी सांगितले ।। नंतर हिंडणे बंद केले । एकाच स्थळी रहात ।।३०।। सप्तमीच्या दिवशी महाराजांनी । स्वत: खिचडी तयार करूनी ।। प्रसाद म्हणून द्रोण भरूनी । स्वत: सर्वां दिलीच ।।३१।। याच दिवशी महाराजांनी । आनंद कुटे यांना बोलावूनी ।। एक रेशमी शर्ट दे मज आणूनी । महाराज त्यांना सांगत ।।३२।। कुटे रेशमी शर्ट आणून देत । महाराजांच्या अंगात घालत ।। विलक्षण तेज महाराजांचे दिसत । लीलाच होती वेगळी ।।३३।। महाराजांचा निवास असत । शेवटी ढेकणे मामांच्या घरात ।। महाराज मामींना सांगत । खोलीत गादी ठेवावी ।।३४।। सकाळी दहा वाजण्याला । महाराजांनी चहा घेतला गादीवर टेकून तक्क्याला । महाराज बसले खोलीत ।।३५।। मला कुणाशी न बोलावावयाचे । मला कुणी न भेटावयाचे ।। दार बंद करून घ्या खोलीचे । खोली उघडू नका मुळी ।।३६।। शेवटचे दहा दिन । महाराजांनी धरले मौन ।। हिंडणेही दिले सोडून । स्वस्थ शांत मौनात ।।३७।। महाराजांची तेव्हा खोली । ढेकणे मामांनी बंद केली ।। मामी - मामा रात्रभर मुळी । खोलीपासून हलले ना ।।३८।। खोलीत महाराज असून । घातले होते पद्मासन ।। आदेश आला खोलीतून । पहाटे चार वाजता ।।३९।। पुढील सोय करा, ही आत्मज्योत । बाहेर आहे आता पडत ।। मामा - मामी हे ऐकत । दिड़्गमूढ झाले ऐकून ।।४०।। शके अठराशे एकोणसत्तर । वैशाख शुद्ध अष्टमी सोमवार ।। सन एकोणीसशे सत्तेचाळीस । दिनांक एकोणतीस मे ।।४१।। महाराजांची आत्मज्योत । विलीन झाली विश्वरूपात ।। प्रत्येकाची आत्मज्योत । थरारली कळताच ।।४२।। वा-यासारखे हे वृत्त । सर्वांस कळविण्यात येत ।। कुणासही हे खरे न वाटत । गर्दी जमली प्रचंड ।।४३।। ज्योत सोमवारीच प्रगटली । सोमवारीच अंतर्धान पावली।। अशी सोमवारची ख्याती भली । प्राकट्य अंतर्धानाची ।।४४।। का निवडला सोमवार ? । दोन्ही घटनांस हाच का वार ? ।। यातून कळून येते सार । कोण होते महाराज ? ।।४५।। शुध्द अष्टमीला प्रगट झाले । शुध्द अष्टमीलाच अंतर्धान पावले ।। हे दोन्हीही घडून आले । शुध्द अष्टमीलाच ।।४६।। महाराज सर्व देशात असत । महाराजासं सर्व भाषा येत ।। महाराजांचे प्रेम असत । सर्व धर्मीयांवर ।।४७।। निर्वाण वृत्त जेव्हा कळत । सर्वधर्मीय येऊन म्हणत हे महाराज आमचेच असत । वाद निर्माण जाहला ।।४८।। आत्मविश्वासाने जो तो म्हणत । महाराज आमचेच असत ।। परी कुणाच्याही न ये लक्षात । सर्वांचेच महाराज ।।४९।। अमर्याद अमाप नि:सीम । असामान्य अगणित निष्काम ।। अलोट महाराजांचे प्रेम । मानवावरती अपार ।।५०।। वृत्त कळता बसावा शॉक । प्रत्येकजण झाला अवाक ।। महाराजांना मारीत हाक । पुण्याकडेच निधाला ।।५१।। सर्वांस पुणे शहर वाटत । महाराजांचे जे असत भक्त ।। त्यांना श्रीक्षेत्र पुणे असत । पुण्य, पावन पुणे हे ।।५२।। या सगुणरुपाचे दर्शन । सर्व भक्तांस व्हावे म्हणून ।। पार्थिव देह तीन दिवस जपून । ठेविला ढेकणे निवासी ।।५३।। वृत्त कळता भस्मे येत । रेशमी कद घेतला पुण्यात ।। सुंदर वुलनची शाल घेत । सदगुरूस अर्पिण्या ।।५४।। महानिर्वाण यात्रा जेव्हा निघत । भस्मे गुरूस कद नेसवीत ।। महाराजासं शाल पांघरून घालत । पुष्पहार घातला ।।५५।। ढेकणेंच्या घरापासून । महानिर्वाणयात्रा निघून ।। मिरवणूक गेली गजबजून । गर्जनेत भक्तांच्या ।।५६।। टाळ-मृदंगाचा ध्वनी । जयजयकार भक्तांच्या मुखातुनी ।। गर्जत राही अभंगवाणी । ढीग पुष्पहारांचे ।।५७।। तात्या काडगावकर गर्जत । अभंग खड्या आवाजात ।। लोक हार - फुले वहात । बेल तुळशी - बुक्काही ।।५८।। तीन दिवस देह होत । अगदी तेजस्वी दिसे पाहता ।। रेशमासारखा लागे स्पर्शिता । धनंजय नाडी चालत ।।५९।। मिरवणूकीत भक्त जमले फार । त्यांच्या दु:खाचे नाना प्रकार ।। कुणा दु:ख झाले अपार । वदता रडता न ये कुणा ।।६०।। या मिरवणुकीत महाराजांनी । भक्तांना विविध दर्शने देऊनी सांत्वन त्यांचे केले असूनी । धीर दिला सर्वांना ।।६१।। ढेकणे मामांचे निवासस्थान । बाबू गेनू चौकातून ।। काका हलवाई दत्त मंदिरावरून । ग्लोब टॉकीजवरून ।।६२।। अक्कलकोट स्वामींचा मठ । मंडई, शनिपार, मारुती भिकारदास ।। पर्वती अरण्येश्वर, पद्मावतीवरून । मिरवणूक निघाली ।।६३।। या सबंध मिरवणुकीत । भस्मे, महाराजांवर छत्री धरत ।। समाधी - स्थानावर मिरवणूक येत । जयजयकारात संपली ।।६४।। भक्तांनी गुलाल उधळला । पार्थिव देह वटवृक्षाखाली ठेवला ।। जो तो महाराजांस पाहू लागला । तोच चमत्कार जाहला ।।६५।। महाराज दिसले मारूतीराय । जो तो धरी त्यांचे पाय ।। आज आमची गेली माय । कळवळा फुटला सर्वांना ।।६६।। तेवढ्यात माळीमहाराज आले । त्यांनी अंत्यदर्शन घेतले ।। महाराज बजरंगबलीच दिसले । माळी महाराज म्हणाले ।।६७।। आपण बजरंगबलीचे रूप घेतले । भक्तीचे मार्ग वेगवेगळे ।। जगाला सांगण्यासाठी सगळे । म्हणून असे बनला का ? ।।६८।। महाराज भक्तांस नेहमी म्हणती । मी प्रत्यक्ष आहे मारुती ।। मारूतीच्या रूपात दर्शन देती । आपल्या अनेक भक्तांस ।।६९।। महाराजांचे हे वचन । मारूती रूपात झालेले दर्शन ।। यावेळी सर्वांस आठवून । ह्रदय आले भरून ।।७०।। प्रात:स्मरणीय चिरंजीव सप्त । त्यात मारूतीराय प्रख्यात ।। म्हणून मी चिरंजीव असत । हेच महाराज सुचवित ।।७१।। महाराजांनी जी जागा सुचविली । तिथे जमीन नुसती उकरली ।। सात बाय साडेतीन पूâट निघाली । भव्य शिळा त्या स्थळी ।।७२।। शिळा बाजूला काढली । आत त्याच मापाची बांधलेली ।। समाधी तयारच होती सगळी । योजना कशी पहा ही ।।७३।। आळंदी ज्ञानेश्वरमहाराज । सोपानदेव, जंगलीमहाराज पद्मावती, माळीमहाराज । ओंकारेश्वर येथील ।।७४।। या सहा ठिकाणच्या भाविकांनी । पवित्र वस्तू आणुनी ।। मोठ्या भक्तिभावनेनी । समाधीत ठेवल्या ।।७५।। या समाधीच्या भागात । दादा फुलारी, राम कोराड ।। पुरूषोत्तमबुवा, धनेश्वर । चौघेच असती आत हे ।।७६।। पार्थिव देह महाराजांचा । माळीमहाराजांच्या हस्ते पहा ।। समाधीत व्यवस्थित ठेवला । गुलालपुष्पे उधळली ।।७७।। तेथील सर्व भक्तांनी । पार्थिवदेहाची पूजा करूनी ।। हार - बेल - तुळस वाहूनी । अंत्यदर्शन घेतले ।।७८।। नंतर मीठ - आघाडा - तुळस ठेऊनी । अगदी शास्त्रोक्त पध्दतीनी ।। विधियुक्त समाधी बंद करूनी । जयजयकार निनादला ।।७९।। महासमाधीची पूजा केली । आरती कर्पुरारती झाली ।। पाच वाजता संध्याकाळी । सोहळा पूर्ण जाहला ।।८०।। पंधरा दिवस पहा सतत । परगावचे लोक येत असत ।। तेराव्या दिवशी उत्सव होत । नंतर प्रसादोत्सव ।।८१।। नेहमी देश - विदेशातून । सतत संचार करणारे असून ।। महाराज झाले अंतर्धान । निसर्गही गेला थिजून ।।८२।। पहिल्या पुण्यतिथीस् । भस्मे जाऊन पुण्यास ।। अखंड वीणा नामसप्ताहास । करून प्रथा आरंभिली ।।८३।। बारा वर्षांनी भस्मे यांनी । सुंदर पालखी बनवूनी ।। रामभाऊ अकोलकरांना आणूनी । पुण्यतिथीच्या दिवशीच ।।८४।। रुद्राभिषेक केला महाराजांना । पालखी अर्पिली महाराजांना ।। देहही अर्पिला महाराजांना । म्हणाले जय शंकर ।।८५।। महाराजांनी भक्तांना । सांगितल्या भविष्यकाळातील घटना ।। वचने दिली अनेकांना । आश्वासनेही दिलीच ।।८६।। जरी महाराज झाले समाधिस्त । घटना सिध्द करून दाखवीत दिलेली वचने पूर्ण करीत । आश्वासने पाळीत ।।८७।। महाराज प्रत्यक्ष प्रगटतात । भक्तास वचनाची जाणीव देत ।। वचन मी पूर्ण केले असत । जाणीव देऊन जातात ।।८८।। आजही हे असे घडत । असे उद्याही घडणार असत ।। काल तर घडले प्रत्यक्षात । त्रिकाळ त्यांच्याच हातात ।।८९।। अजून महाराज प्रत्यक्ष प्रगटतात । भक्तास प्रत्यक्ष सांगतात ।। स्वप्नात तर अनेकांना भेटतात । मार्गदर्शन करतात ।।९०।। मामा ढेकणेंच्या घरात । तात्या सहस्त्रबुध्दे येत ।। महाराजांसारखेच तात्या दिसत । समाधी देउुन परतता ।।९१।। काही भक्तांच्या शरीरात । महाराज प्रवेश करीत असत ।। तेव्हा ते भक्त प्रत्यक्ष दिसत । हुबेहुब महाराज ।।९२।। काही संदेश सांगणे । कार्य काही करून घेणे ।। एकाच वेळी प्रगटणे । अनेकांच्या शरीरात ।।९३।। असे महाराज करत । अष्टमहासिध्दीच्या पलीकडची ।। ही यौगिक क्रिया असूनी । अजूनही महाराज करतात ।।९४।। खंडयोग महाराज करत असत । देहाचे तुकडे तुकडे करत ।। पूर्ववत तुकडे सारे जोडत । पुन्हा महाराज उभेच ।।९५।। महाराज विविध कथा सांगत । दूरान्वयाने ज्ञान देत ।। विविध उपदेशही करीत । एकदा महाराज म्हणाले ।।९६।। मातीचा बनविला शंकर । परि माती नसे शंकर ।। शंकराने पूजिला शंकर । माती मातीच राहते ।।९७।। कशाची घडविली भवानी । कासे मात्र नसे भवानी ।। भवानीने पूजिली भवानी । कासे राही कासेच ।।९८।। तैसे आम्हा पूजिती सज्जन । पूजा स्वीकारती भगवान ।। महाराजांचे हे वचन । असे अत्यंत मोलाचे ।।९९।। महाराजांचे जे जे भक्त । त्यांना महाराज खडसावून सांगत पृथ्वीचा होईल जेव्हा अंत । तेव्हा निष्ठावंत भक्तांना ।।१००।। मी माझ्या मांडीवर । घेऊन त्यांना तारणार ।। हानी होऊ न देणार । जबाबदारी मजकडे ।।१०१।। जबाबदार भगवंत । भक्त असणे निष्ठावंत ।। विचार करतील का विचारवंत । महाराजांची मेख ही ।।१०२।। महाराजांच्या गळ्यात । सुवर्णाचे एक लॉकेट असत ।। खाली एक बदाम शोभत । नाव होते त्यावर ।।१०३।। शंकर नारायण अंतापूरकर । नावाखाली समर्थ सुंदर ।। होते हा अलंकार । विलोभनीय अत्यंत ।।१०४।। महाराज जक्कलच्या मळ्यात । येऊन शिळेवर उभे रहात ।। या शिळेवरती उमटत । महाराजांची पाऊले ।।१०५।। राम कोराडच्या घरात । महाराज फरशीवर उभे रहात ।। त्या फरशीवर पादुका उमटत । महाराज निघुन जाताच ।।१०६।। समाधीच्या मठात । जे दत्तमंदिर असत ।। अजूनही रात्रभर त्यामंदिरात । महाराज असतात ।।१०७।। देहरूप बनले विश्वरूप । नमनाचा करूनिया धूप ।। सतराव्या अध्यायास चढे हुरूप । समाप्त येथे जाहला ।।१०८।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.