शंकरगीता अध्याय १२ वा
ग्रंथ - पोथी > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:21:10
शंकर गीता अध्याय १२ वा
अगाध ज्यांची असे करणी । अतर्क्य ज्यांची विचारसरणी
ज्यांनी रुढीला घातली गवसणी । वंदन त्यांना त्रिवार ।।१।।
महाराज देशोदेशी जात । दर्शनास गर्दी उसळत ।।
लोक अनेक प्रश्न विचारीत । महाराजांना भक्तीने ।।२।।
प्रत्येक प्रश्नावर महाराज । प्रदीर्घ प्रवचन करीत ।।
विद्वत्ता त्यांची कळून येत । मुद्देसूद प्रवचन ।।३।।
जणू ज्ञानाचा वाहे झरा । विचारांचा सुसाट वारा ।।
कल्पनांचा भव्य भारा । रूढी उखडून टाकली ।।४।।
ऐशी महाराजांची प्रवचने । प्रमुदित होत श्रोतृमने ।।
प्रवचनांचीही विविध स्थाने । सारांशरूपे ऐकू या ।।५।
श्रीशंकरमहाराज उवाच । सुख - शांती समाधान ।।
सर्वांनाच हे हवे असून । त्यास्तव धडपड चालली ।।६।।
सुख, शांती, समाधान । म्हणजे नक्की काय असून ।।
हे आधी घ्या समजून । सुख कशाला म्हणतात ।।७।।
ज्यामुळे असुख निर्माण होऊन । मन:शांती जाते बिघडून ।।
असे अडथळे दूर सारून । सुख: शांती मिळतसे ।।८।।
इच्छा, ईर्ष्या, असूया, वासना । महत्वाकांक्षा हावरेपणा
अतृप्ती, विविध कामना । जीवन गढूळ याने हो ।।९।।
त्यामुळे सुख - शांती - समाधान । या गोष्टी नष्ट होऊन ।।
ग्रंथ पुराणे वाचून । पांडित्य तुम्हा लाभेल ।।१०।।
अहंकार होईल निर्माण । त्यामुळे न मिळणार समाधान ।।
सुखदु:खाचे मूळ जाण । मनाच्या अस्थिरतेमध्ये ।।११।।
जितक्या तटस्थपणाने । मनाच्या सूक्ष्म हालचालीचे ।।
निरीक्षण करून, समजून घेण्याचे । प्रयत्न जेवढे कराल ।।१२।।
तेवढ्या प्रमाणात समस्यांची । उकल होईल पहा त्यांची ।।
आत्मसंशोधन हा त्यावरती । उपाय आहे एकच ।।१३।।
दुस-याचे मार्गदर्शन । गुरू, मंत्र, ग्रंथ, पुराण ।।
उपयोग यांचा मुळीच नसून । शुध्द वंचना असे ही ।।१४।।
जग झपाट्याने असे बदलत । जीवनमूल्ये बदलत सतत ।।
गुरू शब्दास जुन्या जमान्यात । महत्त्व होते आगळे ।।१५।।
सामाजिक, धार्मिक, नैतिक । अधिष्ठान होते गुरू शब्दात ।।
आता त्याचा मागमूसही नसत । महत्व गेले लयाला ।।१६।।
पूर्वीच्या जीवनात । भौतिकतेला स्थान नसत ।।
आजच्या जीवनात असत । भौतिकतेलाच महत्व ।।१७।।
आजची जीवनमूल्ये सारी । भौतिक सुखे मिळतील कशी ।।
या एकाच कसावरती । पारखली जातात ।।१८।।
पूर्वीच्या जीवनात । ज्या विचारसरणीने सुखी शांत ।।
जीवन समाधानी बनत । समृध्द होत असेच ।।१९।।
त्या विचारसरणीचा बळी देऊन । नवी भौतिक जीवनपध्दत ।।
स्वीकारली आहे आपण । शाश्वत मूल्ये विसरलो ।।२०।।
गुरू, ग्रंथ, मंत्र, उपदेश । यांचा पूर्वी घनिष्ट संबंध ।।
आजच्या भौतिक विचारसरणीत । महत्व त्यांचे नच उरले ।।२१।।
सध्या भक्ती कशाशी खातात ? । श्रध्दा म्हणजे काय असत ?
प्रेम कशाला म्हणतात ? । पैसा धर्मच आजचा ।।२२।।
सत्य नीती सदाचार । हे पदार्थ असू शकतात काय ? ।।
यांचा जेथे पत्ताच नसत । तिथे गुरू उपदेश कैसा कळे ? ।।२३।।
सध्या अडचणी निवारण्यास । गुरू हवाय सर्व लोकांस ।।
अडचणी दूर न झाल्यास । चालले दुस-या गुरूकडे ।।२४।।
सध्या गुरू या शब्दाला । बाजारीपणा आहे आला ।।
गुरूची आवश्यकता न लोकाला । अडचणी - निवारक गुरू हवा ।।२५।।
ऐहीक अडचणींच्या वेळी । उपयुक्त उपयोगी पडणारी ।।
गुरू ही संस्था मुळीच नाही । किंवा नव्हे उतारा ।।२६।।
सत्यश्रध्दा, समर्पणबुध्दी । भक्ती प्रेम आनंदमयस्थिती ।।
यांचा तुम्हाला अनुभव नाही । आजचे गुरूही असेच ।।२७।।
आंधळ्याला आंधळ्याने । मार्गदर्शन करावयाचे ।।
काय होईल दोघांचे ? । दोघे आंधळे जाणोत ।।२८।।
स्वत:चे गुरू व्हावे स्वत:च । सर्वांत उत्तम मार्ग आहे हाच ।।
तुमच्या सुखाच्या आड तुम्हीच । निर्माण करता अडथळे ।।२९।।
कुणाच्याही कच्छपी लागू नका । गुरू या खुळात अडकू नका ।।
हेतू न मम ‘गुरूवर टीका’ । उद्देश समजून घ्या मम ।।३०।।
आपल्या समस्या विचारपूर्वक । आपण जर सोडवू शकाल ।।
कोणताच प्रश्न कठिण नसत । अनुभव याचा येईल ।।३१।।
गुरू शोधावा नाही लागत । गुरूच शिष्य पारखून निवडत ।।
अज्ञान नष्ट करून ज्ञान देत । भाग्यवान हे शिष्य हो ।।३२।।
असे शिष्य आपल्या जीवनात । गुरूला सर्वोच्च स्थान देतात ।।
गुरूस्तव वाटेल तो त्याग करतात । गुरूस ईश्वर मानती ।।३३।।
गुरूवर विश्वास उतुंग अढळ । गुरूच्या ज्ञानाबाबत ।।
कर्तुमकर्तुम शक्तीबद्दल । संदेश नसतो मुळीच ।।३४।।
गुरूलाही शिष्याचे कल्याण कशात । हे पूरेपूर असते माहीत
निरपेक्षपणे साधून शिष्याहित । उध्दार त्याचा करीतसे ।।३५।।
अपेक्षित साध्य असे अंत:स्थिती । अनुभव शब्दाने व्यक्त न होती ।।
अनुभव शाब्दिक मूळीच नसती । ग्रंथोपयोग काय मग ? ।।३६।।
श्रध्दा म्हणजे ठाम विश्वास । जीत कसलीच अपेक्षा नसत ।।
तीत कधीच बदल न होत । अविचल स्थिती अशी मनाची ।।३७।।
अशी अविचलित भक्ती तुमची । आहे का कोणा देवावरती ? ।।
म्हणता देव सर्वशक्तिमान सर्वव्यापी । मूर्तिपूजा मग का करता ।।३८।।
कारण सत् चिद्घन परमेश्वरावर । पूर्ण श्रध्दा असेल तर ।।
चैतन्यस्वरूप ईश्वराशिवाय तर । मूर्तिपूजा व्यर्थच ।।३९।।
ईश्वर ज्याला । त्याला त्याच्या रागालोभाचा ।।
ईश्वरास संतोष देण्याघेण्याचा । प्रश्नच नाही उद्भवत ।।४०।।
तुम्ही देवास्तव जे जे बोलता । आणि प्रत्यक्षात जे जे आचरता ।।
त्यामागे कुठलीच वैचारिक भूमिका । नाही, केवळ विसंगती ।।४१।।
म्हणून माझे सांगणे तुम्हाला । यात अडकवून घेऊ नका स्वत:ला ।।
मनाचा मागोवा घेण्याचा । योग्य प्रयत्न कराच ।।४२।।
विष घेतले तर मरून जाल । उडी टाकू नका जळत्या चितेत ।।
कोणी सांगितले हे तुम्हास ? । सांगा गुरू कोण हा ? ।।४३।।
कितीतरी गोष्टी जीवनात । गुरूशिवाय आपण असतो करत ।।
विचारपूर्वक आचरणाचे फलित । निश्चितपणे असे हे ।।४४।।
ज्या क्षणी याल आत्मबोधावर । त्या क्षणी घडेल आत्मसाक्षात्कार ।।
आत्मजागृती नि अनुभव यात तर । क्षणालाही स्थान नसे ।।४५।।
साधनमार्गात अपेक्षा नि पूर्ती । अध्याहत अपरिहार्य असती ।।
त्यांचा शेवट निराशा विफलतेत अती । होणेच ठरते सुसंगत ।।४६।।
शिकलेला मनुष्य हा जास्तच । असमाधानी असावयाचाच ।।
नारळाचे पाणी जितके गोडच । तिते खोब-याची चव कमी ।।४७।।
जेवढी विद्वता असे जास्त । तेवढी निष्ठा कमी असत
विद्वान लोकांना पहा सतत । कल्पना जास्त स्फुरतात ।।४८।।
फार चिकित्सा करण्यात । नुकसानच होत असत ।।
म्हणून चिकित्सा मर्यादेत । अल्प अगदी असावी ।।४९।।
कल्पनेचे खरे - खोटेपण । अनुभवानीच कळते म्हणून ।।
अनुभवानंतर तत्क्षण । कल्पना थांबली पाहिजे ।।५०।।
आपल्या अंतरंगात डोकावणे । निरीक्षण व श्रध्देत मानवाचे ।।
जीवन तात्काळ बदलून टाकण्याचे । असीम आहे सामर्थ्य ।।५१।।
तुमच्या प्रत्येक कृतीत । अपेक्षा स्वार्थ दडलेला असत ।।
पत्नीकडूनही अपेक्षा असतात । निरपेक्ष नि:स्वार्थ कुणी नसे ।।५२।।
अपेक्षा स्वार्थ करण्याकरता । तुम्ही मित्रांना मदत करता ।।
समाजकार्ये दानधर्म करता । कीर्ती प्रतिष्ठा मिळावी ।।५३।।
तुमच्या देणगीचे होता कौतुक । दानधर्माचा जेव्हा उदोउदो होती ।।
तेव्हाच तुम्हास बरे वाटत । अन्यथा तुम्ही खवळता ।।५४।।
हा अहंकारच आपल्या जीवनात । जे जे भव्य अन् उदात्त ।।
त्याच्या आड असे येत । हे आत्मसंशोधन करता कळेल ।।५५।।
आशा, इच्छा, हव्यास, वित्त । कधी न शेवट यांना जीवनात ।।
सर्वोच्च बिंदू अस्तित्वात । या गोष्टींचा नसेच ।।५६।।
बोटीतून प्रवास करावयाचाच । तर बोट डोलणार हलणारच ।।
मळमळ ओका-या बोट लागणारच । सहन केलेच पाहिजे ।।५७।।
विवाह झाल्यावर सर्वांना । मूल व्हावे, इच्छितांना ? ।।
डोहाळ्यांचा त्रास प्रसूतिवेदना । कशा टाळता येतील ? ।।५८।।
त्याप्रमाणे ऐहिक जीवनात । कटकटी चुकविता येणार नाहीत ।।
जोपर्यंत हे शरीर असत । तोपर्यंत त्याच्या व्याधीही ।।५९।।
कोणी मला विचारतात । तुम्ही आम्हाला काय दिले असत ? ।।
न मागताच मी असे देत । मागण्याची जरूरी का ? ।।६०।।
जी घटना घडलेली घडत । तीच मी दिलेली असत
तुम्ही मागितले, मी दिले नसत । ऐसे काय सांगा ते ।।६१।।
कशाचीही गरज न ज्याला । इच्छित नाही पदार्थ कसला ।।
कधी न पैशाच्या मागे तो लागला । संग्रहाचा न हव्यास ।।६२।।
ते कुणाची न करती स्तुती । कुणाची मेहेरबानगी न संपादती ।।
अप्रसिध्द अज्ञात असे असती । निर्भय ब्रह्मानंदात ।।६३।।
व्यक्तिश: मला कशाची गरज नसत । मला हवे, असे काहीच नसत ।।
दु:खी असमाधानी मुळीच नसत । मन:शांती कधी ढळत नसे ।।६४।।
मजजवळ काही न गमावण्यासारखे । काहीच नसे मिळविण्यासारखे ।।
ईश्वराने जे जे असे निर्मिले । त्यात माझ्यात फरक ना ।।६५।।
जे समजल्याने जगात । समजण्यासारखे काही न उरत ।।
अशा मनाच्या स्थितीत म्हणतात । सत्य - आत्मदर्शन ।।६६।।
जे नाही, ते मिळवावयाचे । अशा स्वरूपाचे साध्य नाही ते ।।
ज्याचे स्वरूपच अनिश्चित जिथे । नेतिनेति वेद म्हणतात ।।६७।।
रूढीचे ओझे बुध्दीवर नसेल । तेव्हाच बुध्दीस स्वातंत्र्य मिळेल ।।
आत्मसंशोधनाचे सामर्थ्य वाढेल । महान अनुभव येतात ।।६८।।
हे जे अनुभव येतात । हा जो साक्षात्कार असे घडत ।।
हे जे आत्मदर्शन होत । देव यालाच म्हणतात ।।६९।।
ऐकावे जिवाचा करून कान । लक्षपूर्वक करावे निरीक्षण ।।
त्यामुळे प्रगल्भ प्रचोदायी महान । हुकुमी अनुभव येतात ।।७०।।
अष्टेंद्रिये शरीरात हालचाल करीत । अशा या निर्विकल्प स्थितीत ।।
माणसाला आत्मदर्शन घडत । आत्मानुभव याला म्हणतात ।।७१।।
ब्रह्म चैतन्यरूप अविनाशी असत । त्याला जन्ममृत्यू मुळीच नसत ।।
ज्याला जन्ममृत्यू आदि असत । मायारूप सर्व ते ।।७२।।
ज्ञान अनुभवांच्या समन्वयाने । मायेपासून सुटका होते ।।
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या असे । वचन प्रसिध्द असेच ।।७३।।
ज्यांना प्राप्त झाले खरे ज्ञान । सत्याचे झाले दर्शन ।।
जाणले जीवनाचे सर्व पैलू छान । अवतार त्यांना म्हणतात ।।७४।।
सर्व अवतारी पुरूषांची शिकवण । आणि अनुभव एकच असून ।।
पध्दतीत फरक येतो दिसून । काळ - स्थितीप्रमाणे ।।७५।।
संताची विचारधारा शिकवण । सर्वच अगदी एकच असून ।।
भक्त विसरतात शिकवण । माजवतात अवडंबर ।।७६।।
जाणीव आणि नेणीव । मनाच्या दोन अवस्था असत ।।
जाणिवेत असतो अहंभाव जागृत । नेणिवेत अहंभाव नसतोच ।।७७।।
या दोन अवस्थांच्या पलिकडे । उच्च अवस्थेत मन जेव्हा जाते ।।
पूर्ण चेतन ज्ञानातील ही अवस्था असे । समाधी याला म्हणतात ।।७८।।
समाधी केव्हाही लावता येते । कार्य संपल्यावर समाधी घेता येते ।।
समाधी लावणे, समाधी घेणे । वेगळे दोन प्रकार हे ।।७९।।
मी जे असतो बोलत । त्याचप्रमाणेच सर्व घडून येत ।।
मी सिध्दीच्या मागे नसत । सिध्दीच्या मागे लागू नका ।।८०।।
मिळाले त्याचा आनंद लुटा । अप्राप्याच्या मागे धावू नका ।।
भगवंताने अनेक गोष्टी दिल्या । उपभोगसामर्थ्यही दिलेच ।।८१।।
ते सोडून वेगळ्याकडे धावणे । सिध्दीच्या मागे न लागणे ।।
हीच सिध्दी प्राप्त होणे । अत्यंत महत्वाचे असे हे ।।८२।।
मानवी शरीर ही महासिध्दी । त्यात आपणास दिली बुध्दी ।।
जड फायदे देते सिध्दी । आपणा जडापलीकडे जायचे ।।८३।।
सिध्दीपेक्षा श्रेष्ट भक्ती । सर्व संताची हीच उक्ती ।।
सिध्दीने मिळत नसे मुक्ती । मुक्तीचा मार्ग भक्तीच ।।८४।।
सोपे असे नुसते वाचणे । महत्वाचे भवसागरातून वाचणे ।।
असेल दु:खातून बाहेर पडणे । वाचण्याप्रमाणे कृती हवी ।।८५।।
रत्नजडित मुगुट राजांच्या डोक्यावर । परी समाधान न तिळभर ।।
समाधानाचा मुगुट ज्यांच्या हृदयावर । तेच राजे खरे हो ।।८६।।
निर्गुण परमेश्वराचे रूप सगुण । प्रत्यक्ष आई - वडील घरी असून
त्यांच्याकडे दुर्लक्ष करून । देवामार्गा लागता ।।८७।।
म्हणून समाधान मिळत नाही । घरीच आई वडीलाची ।।
मनोभावे सेवा करा तुम्ही । समाधान येईल चालत ।।८८।।
आत्मसाक्षात्काराकरिता । शास्त्र, गुरूपासून आत्मा अनात्मा ।।
यांचे स्वरूप समजावून घेण्याला । ज्ञान ऐसे म्हणतात ।।८९।।
अष्टांगाच्या अभ्यासाने । चित्ताचा निरोध करणे ।।
प्रयत्नपूर्वक हे आचरणे । योग्य याला म्हणतात ।।९०।।
अज्ञानाने देह - आत्मा या दोघांच्या । अन्योन्याध्यासात ये उदयाला ।।
हात घालून वेगळे करतो दोघांना । विवेक त्याला म्हणतात ।।९१।।
असा विवेक जागा रहावा सदैव । मी शरीर नसून आत्मा असत ।।
असणे असा विचार अंत:करणात । यालांच तप असे म्हणतात।।९२।।
दु:खिताला होणारे दु:ख । कारूण्याने नाहीसे असता करत ।।
सुष्ट दुष्ट हा न करणे भेद । दया याला म्हणतात ।।९३।।
कर्मंद्रियाचे व्यवहार । बंद पडतात प्राण जिंकल्यावर ।।
बंद होतात ज्ञानेद्रिये व्यवहार मनोनिग्रह केल्याने ।।९४।।
सर्व ओझे सहन करीत असताना । सहन करण्याच्या अभिमानाला ।।
मुळेच स्पर्शन होणे याला । क्षमा ऐसे म्हणतात ।।९५।।
दुस-यास क्षमा केली तर । आतून आनंद - राशी प्रगटतात ।।
क्षमेचा निर्भेळ हा आनंद । चिरकाल असतो टिकणारा ।।९६।।
आध्यात्मिक आधिभौतिक । आधिदैविक संकटे आकस्मिक ।।
येता धारक शक्तीने जो पचवित । धैर्य त्याला म्हणतात ।।९७।।
निष्काम धर्माचा आचार । अंतरी आत्मानात्म विचार ।।
अंगी मुरलेत खरोखर । शौच याला म्हणतात ।।९८।।
साधण्यासाठी स्वत:चे हित । इतरांचे न करणे मुळीच अहित ।।
न करणे प्रयत्न निंद्य कलुषित । याला अद्रोह म्हणतात ।।९९।।
सद्गुणामुळे नयोग्य असुनी । मान दिला असता लोकांनी
लज्जित होणे विनयांनी । अमानित्व याला म्हणतात ।।१००।।
अशा या सदगुणांची सतत । वाढ व्हायला हवी असत ।।
त्यामुळे दडलेले माणसात । देवत्व प्रकट होतसे ।।१०१।।
त्याचे आंतर्बाह्य जीवन । निघेल अगदी उजळून ।।
कृतार्थ होईल जीवन । धन्य होईल मानव ।।१०२।।
मी राहतो कैलासात । शंकर माझे नाव असत ।।
जगाला समजून देण्या मी येत । सार्थक करून घ्या आपले ।।१०३।।
पुष्कळ रंग या जगात । इथला रंग निराळा असत ।।
हे गुह्य कुणाला न समजत । गुह्यात गुह्य असे हे ।।१०४।।
जो स्वत:ला ओळखतो । तोच मला जाणू शकतो ।।
सर्व ऐश्वर्य ओवाळून जरी टाकले । किंमत त्याची मुळी ना ।।१०५।।
समजावून घे, जर समजेल । मागाहून पश्चात्ताप होईल ।।
आमचे काहीच न बिघडेल । नुकसान आहे तुझेच ।।१०६।।
लिहा दगडांच्या भिंतीवर । सुवर्णाक्षराने हे सुंदर ।।
आठवतील वेळ आल्यावर । आमचे बोल सर्व हे ।।१०७।।
प्रकांड पाण्डित्य महाराजांचे । देखून वंदन केले भावे वाचे ।।
लेखन द्वादश अध्यायाचे । पूर्ण येथे जाहले ।।१०८।।
।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज
श्री शंकर महाराज की जय ।।
Search
Search here.