श्रीशंकरमहाराज बावन्नी स्तोत्र
स्तोत्र - मंत्र > श्री सद्गुरु स्तोत्र Posted at 2018-03-30 06:20:06
सद्गुरू श्री शंकर महाराजांची बावन्नी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु | गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुर्साक्षात परब्रम्ह | तस्मैश्री गुरुवे नमः
जय शिव शंकर शुभंकरा | श्री दत्ताच्या अवतारा ||
भव भय हारक हरिहरा | विनम्र वंदन स्वीकारा || धृ.||
वाघांच्या सहवासात | बाळ प्रकटले रानात ||
चिमणाजीला दृष्टांत | देवूनी स्वगृही आलात ||१ ||
असंख्य केल्या कृष्ण लीला | अंतापुरच्या गावाला ||
जो तो धावे बघण्याला | छकुल्या शंकरच्या लीला || २ ||
हिमनग शिखरावर फिरले | विश्वामधुनी संचारले ||
अक्कलकोटी श्री आले | विनम्र गुरुचरणी झाले || ३ ||
शुभरायांच्या मठातून | किर्तन करिती जनार्दन ||
दत्तरूप त्या दाखवून | प्रकट झाले जनातून || ४ ||
तेथे रंगता ते भजनी | प्रत्येकास दिसे नयनी ||
जिकडे तिकडे भक्तगणी | शंकररूपे ये दिसुनी || ५ ||
मेहेंदळेच्या वाड्यात | उत्सव शिवरात्री करीत ||
वर्णपालटे शरीरात | शिवशंभूसम श्री दिसत || ६ ||
श्रीपादवल्लभ दिसती कुणा | कुणा पंढरीचा राणा ||
कुणा भवानी कृष्ण कुणा | दर्शन देती भक्तांना || ७ ||
जरी पुण्यातून नच जाती | असंख्य पत्रे तरी येती ||
हजार उत्सवाला असती | अनेक गावी श्री दिसती || ८ ||
अल्लख वदता मुखातून | पिंड निघाली भूमीतून ||
पाथर्डीस हे शिवस्थान | भोवती नाथांचे ठाण | | ९ ||
नाथ समाधी मढीतली | तेथील शांत धुनी झाली ||
अल्लख देवूनी आरोळी | क्षणात प्रज्वलित केली || १० ||
मेहेंदळे सौभाग्यवती | जीवन संपवण्या जाती ||
पूर्णत्वाला तिज नेती | रसाळ ज्ञानेश्वरी कथिती || ११ ||
गिरीनारीच्या गिरी जाती | वायुभक्षण जे करिती ||
भोजन साधुना देती | संगती प्राणीही असती || १२ ||
कुरुक्षेत्रावर जी घडिली | मनास घटना ना पटली ||
गीता कैसी सांगितली | शंका कोणीतरी विचारली || १३ ||
बघता रोखुनी त्यावती | दिसली ज्योतिर्मय मूर्ती ||
कृष्णापरी त्या श्री दिसती | तत्क्षण ज्ञानगीता प्राप्ती || १४ ||
सोमवातीच्या शुभ दिवशी | स्वरूप लिंगात्मक दिसती ||
उत्कट प्रीती ज्या पाशी | तोच बघे त्या तेजाशी || १५ ||
महाराजांच्या जिभेवर | लिंग वसतसे खरोखर ||
समर्थ स्वामी गुरुवर | पूजन करिती सत्वर || १६ ||
समर्थ स्वामी माउलीने | तृप्त केले स्तनपाने ||
ऐसे सांगती अभिमाने | शिरसावंद्य गुरुवचने || १७ ||
प्रधान लंडनला जाती | तेव्हा मातापिता जाती ||
सदगुरुला मनी स्मरीती | तत्क्षण सन्मुख श्री येती || १८ ||
पर्वत गिरीनारी नेती | दत्त्प्रभुना बोलाविती | |
समक्ष अंत्यविधी करिती | शिष्य मनोरथ पुरविती || १९ ||
प्रधान झाले शिष्ठा प्रधान | लाभे गुरुभक्तीचे ज्ञान ||
उत्कट भक्ती प्रीती महान | गुरुह्रीद्यांचे प्रपंच प्राण || २० ||
गाणगापूरला श्री जाती | रुद्रा घाटावर श्री बसती ||
निर्गुण पादुकांवरती | ब्राम्हण पूजा जी करती || २१ ||
महारांजाच्या पडे शिरी | जो तो मनी आश्चर्य करी ||
सन्मानाने मठांतरी | घेऊन येती श्री स्वारी || २२ ||
भस्मे वरती अति माया | पदपंकज शिरी ठेवूनिया ||
स्वरूप गुरुचे जाणाया | दृष्टी दिव्य दिली सदया || २३ ||
गुरूने आपला मज म्हणून | जवळी घ्यावे आवळून ||
ऐसी इच्छा प्रकटून | फुलारी दादा घे वचन || २४ ||
तत्क्षण शरीरी संचरून | आपणासारखे त्या करून ||
केले आश्वासन पूर्ण | कृतार्थ दादांचे जीवन || २५ ||
गणेश अभ्यंकर यांना | युद्धावरती असतांना ||
असंख्य गोळ्या पायांना | चाटुनी गेल्या खुणाविना || २६ ||
विजार चाळण सम झाली | तरीही जाणीव नच झाली ||
लीला कोणी ही केली | अंतरी जान कृपा झाली || २७ ||
सद्गुरू असता काशीत | ब्राम्हण वैदिक हिणवीत ||
भोंदू अजागळ अशिक्षित | जाणे काय कसे वेद || २८ ||
सागरगोटे झेलीत | कन्या खेळतसे तेथ ||
तिच्या मुखातून बोलवीत | बृह्स्पतीसम श्री वेद || २९ ||
नवरात्रीच्या अष्टमीस | शरीरी दुर्गेचा वास ||
करिती तांडव नृत्यास | अनंत नमने मातेस || ३० ||
सप्तचिरंजीव जे असती | त्यातील श्रेष्ठ असे विभूती ||
तो मी मारुती या जगती | स्वये मुखाने श्री वदती || ३१ ||
नवले विनवी सदगुरुला | दावा विष्णूपद मजला ||
सागर तीरावर नेला | सुवर्ण पदपंकज दिसला || ३२ ||
लांब चरण ते स्पर्शून | उर्मी उसळल्या मनातून ||
व्योमी बघता यर दिसून | किरीटी चमके लखलखून || ३३ ||
तात्यावारती अति प्रीती | अनन्य शरणागती असती ||
तात्या जणू की प्रतिकुती | दुसरी सद्गुरूंची मूर्ती || ३४ ||
परस्परांची बदलून | कामे करिती समजून ||
कुणा न ये हे कळून | कोण शिष्य नि गुरु कोण || ३५ ||
समाधीतुनी प्रकटती | मिठीत रुद्रांना घेती ||
पृथ्वीभोवती फिरविती | साक्षित्वाची दिली प्रचिती || ३६ ||
मी शंकर कैलासपती | अवतरलो या भूवरती ||
समज द्यावया जगाप्रती | कार्य असे हे ममचित्ती || ३७ ||
विविध रंग या जगतात | इथले मात्र नसे तेथ ||
ज्ञात न कोणा हे होत | ज्ञान असे हे अतिगुप्त || ३८ ||
स्वतःस कोणी ओळखिल | तो मज निश्चित जाणेल ||
धनदौलत जरी उधळील | तरीही त्याला नुमजेल || ३९ ||
घे घे जाणुनी तू मजला | अथवा पश्चाताप भला ||
कार्यभाग न मम अडला | अडेल माझ्यावीन तुझला || ४० ||
कांचनसम हे अक्षरबोल | कोरूनी दगडावरती खोल ||
सुवेळी तुझला स्मरतील | शब्द सुधेसम हे अनमोल || ४१ ||
केले तुझला गुह्य खुले | साधुनी अपुले घेई भले ||
शरणांगत मज जे आले | ते मी निश्चित उद्धारीले || ४२ ||
अशक्य काम करी शक्य | ऐसे ज्याचे ब्रीदवाक्य ||
भक्तांशी जो करी सख्य लिलया देई सदा मोक्ष || ४३ ||
भिऊ नको मी पाठीशी | असता भीती तुला कैशी ||
वचनबद्ध जो भक्तांशी | का नच त्यावर विश्वाशी || ४४ ||
योगक्षेम मी चालविण | ऐसे दिद्धले न वचन ||
त्याचे चिंतन मनी करून | चिंता द्यावी अर्पून || ४५ ||
सद्गुरू येथुनी नच गेले | चिरंजीव ते असती भले ||
अनेक वेळा श्री उठले | समाधीतुनी प्रकटले || ४६ ||
अंत जगाचा होईल | सुभक्त तितुके रक्षील ||
ऐसे ज्याचे दृढबोल | प्रीती अपेक्षी बहुमोल || ४७ ||
ऐसा समर्थ स्वामीला | भव मनीचा सांगितला ||
भक्ती प्रीती दे मजला | परमार्थाचा मार्ग भला || ४८ ||
मिठीत मजला घेवून | आईपरी घे चुंबन ||
माझा याळ असे म्हणून | कृतार्थ करी हे जीवन || ४९ ||
बावन्नी भाऊदासाची | प्रीतीसुद्धा जणू भक्तीची ||
प्राशन करता मिळायची | मधुरा भक्ती सद्गुरूंची || ५० ||
बावन्नी ज्याच्या स्मरणात | अमलभाव हा हृदयात ||
सद्गुरूंच्या तो सावलीत | हिच फल श्रुती पदरात || ५१ ||
जय शिव शंकर शुभंकरा | श्री दत्ताच्या अवतारा ||
भव भय हारक हरिहरा | विनम्र वंदन स्वीकारा || ५२ ||
|| जय शंकर || || श्री गुरुदेव दत्त ||
|| ऊँ श्री शंकरनाथाय नमः ||
Search
Search here.