श्रीशंकर महाराज स्तवन व आरती

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 18:19:57
श्री शंकर महाराज स्तवन संतवर्य श्री योगिराज प्रभु शंकरमहाराज वंदन करूनी चरणि अर्पिता भक्तीचा साज ।।१।। अतर्क्यलीला, अगाध महिमा, अमर्याद करणी सदैव आम्ही नतमस्तक हो, आपल्याच चरणी ।।२।। इष्टदेवता ग्रामदेवता स्थानदेवताही सर्व देवता आमच्या अगदी आहात हो तुम्ही ।।३।। सकलही देवांच्या रूपात तुम्ही दर्शन देत अधिकार हा प्रचंड तुमचा कळूनिया येत ।।४।। अशक्य जे जे जगी, सहज ते तुम्हालाच शक्य तुम्ही कोण ? हे ओळखणे ही मानवा न शक्य ।।५।। जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता जे जे तुमच्या मनात येईल, करून दाखविता ।।६।। भूत भविष्य नि वर्तमान हे तुमच्या हातात महाकाळ हा तुम्हापुढे हो होई भयभीत ।।७।। तुम्हा पाहणे, तुम्हांस स्मरणे, घेणे दर्शन भाग्याविण या गोष्टी सा-या, येती ना घडुन ।।८।। तुमच्या चरणी सतत आमची वाढावी निष्ठा अयोग्य गोष्टी आम्हाला हो वाटाव्या विष्ठा ।।९।। धरले आम्ही भावे तुमचे, जगी घट्ट चरण सोडणार कधी नाही आम्ही, आले जरी मरण ।।१०।। नित्य घडावे स्मरण नि पूजन, देहच रंगावा शंकरमहाराजांचा जयजयकार मुखी व्हावा ।।११।। अकरा कवनांचे हे स्तोत्र पठण करता दिनरात विजयी होईल सर्वत्र कामना पूर्ण होतील ।।१२।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।। ------------------------------------------------ श्री शंकरमहाराज आरती ( सिध्दयोगी डॉ. दा. ना. धनेश्वर यांनी गायीलेली ) ।। ॐ दीनानाथ गुरू माऊली ।। अज्ञानतमे गिळिले ज्ञान तेजाला । अहंकारे धर्म समूळ बुडवीला । त्राहि त्राहि एकचि आरोळा झाला । दिनोध्दारणा लागी अवतार झाला । जयदेव जयदेव सद्गुरू अवतारा, श्री दत्तावतारा । तारक तू आम्हासी, तारक तू सकलासी, शंकर दातारा ।।१।। पुराणपुरूषा सकल धर्म आचार्या । सुरवर मुनिजन सर्वां एकचि गुरूवर्या । पांडुरंगा आदिनाथा गुरू दत्तात्रेया । अपार नामे नटला चालवी निजकार्या । जयदेव ।।२।। त्रिविधा गुण कर्माचे सूत्र तव अधिन । तिन्ही लोकांवरती सत्ता पूर्ण शरणागत कैवारी भवभय संहरण नारायणा नित्य दाखवी तव चरण । जयदेव ।।३।। --------------------------------------------------- श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ॥ उजळल्या पंचप्राण ज्योती । सहजचि ओवाळू आरती । मिटवूनी क्षणिक नेत्र पाती । हृदयी स्थितः झाली गुरुमूर्ती । श्री गुरु दैवत श्रेष्ठ जनी । जणू का भाविकास जननी ॥ संस्कृती पाश, सहज करी नाश, मुक्त दासास । करी कामधेनु आमुची । करू या ज्ञानसागराची ॥ १ ॥ आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ॥ ध्यान हे रम्य मनोहर से । ध्यान धृड जडले नयनिसे । भक्त हृदयाकाशी विलसे । तेज ब्रम्हांडी फाकतसे । पितांबर शोभवित कटीला । भक्त मालिका हृद पटला ॥ भक्त जन तारी, नेई भवतीरी, पतित उद्धरी । करू नित्य सेवा चरणांची । करू या ज्ञानसागराची ॥ २ ॥ आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ॥ लक्षी जग प्रचंड नीज नयनी । लक्षी ब्रम्हांड हृद्य भुवनी ॥ हरिहर विधी, दत्त त्रिगुणी । आठवी नित्यभूवन सुमनी ॥ दत्तमय असे योगिराणा । ओम कारीचे तत्व जाणा ॥ धारा दृढचरण, दास उद्धरण, जनार्दन शरण । आस पुरवावी दासांची । करू या ज्ञानसागराची ॥ ३ ॥ आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ॥ ॥ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर महाराज कि जय ॥

Search

Search here.